ज्ञानेश्वरी/अध्याय तिसरा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

    अर्जुन उवाच: ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
                तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥

मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले । तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥ १ ॥

तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी ॥ २ ॥

तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुता ॥ ३ ॥

हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारासी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं ॥ ४ ॥

तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवित अहासी ॥ ५ ॥

    व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
    तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥

देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें । आता संपले म्हणे पां आघवें । विवेकाचे ॥ ६ ॥

हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥ ७ ॥

वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज ॥ ८ ॥

जैसे आंधळे सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥ ९ ॥

मी आधींचि कांही नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । कृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥ १० ॥

तंव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजीं गांवाई । तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ॥ ११ ॥

आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणे ॥ १२ ॥

आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥ १३ ॥

तरी ये जाणिवेचे कीर सरलें । परी आणिक एक असें जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥ १४ ॥

तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥ १५ ॥

ना तरी झकवितु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें । हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥ १६ ॥

म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी ॥ १७ ॥

मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें । कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ १८ ॥

देखें रोगातें जिणावें । औषध तरी द्यावें । परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥ १९ ॥

तैसें सकळार्थभरित । तत्व सांगावे उचित । परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥ २० ॥

देवा तुज ऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥ २१॥

हां गा कामधेनूचें दुभतें । देवें जाहलें जरी आपैतें । तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे ॥ २२ ॥

जरी चिंतामणि हातां चढे । तरी वांछेचे कवण सांकडे । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ॥ २३ ॥

देखें अमृतसिंधूतें ठाकावें । मग तहाना जरी फुटावें । मग सायासु कां करावे । मागील ते ॥ २४ ॥

तैसा जन्मांतरी बहुतीं । उपासिता लक्ष्मीपती । तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥ २५ ॥

तरी आपुलेया सवेसा । कां न मगावासी परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥

देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें । हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥

जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥ २८ ॥

जैसां मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥

तैसें देवा तूंते । पुसिजतसें आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥ ३० ॥

तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । ते सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥

    श्रीभगवानुवाच: लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
                ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ॥ ३ ॥

या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥

जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्हीं ॥ ३३ ॥

तो उद्देशु तूं नेणसी । म्हणोनि क्षोभलासि वायांचि । तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥

अवधारीं वीरश्रेष्ठा । यें लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥

एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठीजे । जेथ ओळखीसवें पाविजे । तद्रूपता ॥ ३६ ॥

एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥

हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं । जैसे सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी ॥ ३८ ॥

कां पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहतां । मग सिंधूमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥

तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते - । आधीन असे ॥ ४० ॥

देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥ ४१ ॥

तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥

तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥

येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावतें होती ॥ ४४ ॥

    न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
    न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥ ४ ॥

वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥ ४५ ॥

कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥

सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥ ४७ ॥

ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥ ४८ ॥

जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं । मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥ ४९ ॥

म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥

आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे । कीं त्यजिलें हें कर्म सांडे । ऐसें आहे ॥ ५१ ॥

हें वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे । परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी ॥ ५२ ॥

    न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
    कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः ॥ ५ ॥

जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जि चेष्टा गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥

देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥

सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रीचे तेज गेलें । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥ ५५ ॥

ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥ ५६ ॥

हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालो विसरले । हे असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥ ५७ ॥

हें न ठकेचि जरी कांही । तरी सांडिले तें कायी । म्हणोनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिमंतां ॥ ५८ ॥

कर्म पराधीनपणे । निपजतसे प्रकृतिगुणें । येरीं धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥

देखें रथीं आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे । मग चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥

कां उचलिलें वायुवशें । चळें शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥ ६१ ॥

तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । मिष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥

म्हणऊनि संगु जंव प्रकृतिचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें ॥ ६३ ॥

    कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
    इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उचयते ॥ ६ ॥

जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधूनि ॥ ६४ ॥

तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सापडे । वरी नटती तें फुडे । दरिद्र जाण ॥ ६५ ॥

ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । वोळखावे तत्वता । येथ भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥

आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचे चिन्ह । धनुर्धरा ॥ ६७ ॥

    यस्तित्वंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
    कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥ ७ ॥

जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥ ६८ ॥

तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥

तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥

तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥ ७१ ॥

तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगे आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥

तैसा सामन्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥ ७३ ॥

ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि तरी मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥

अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूंते ॥ ७५ ॥

तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी । मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥

    नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।
    शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मणः ॥ ८ ॥

म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां ॥ ७७ ॥

म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥ ७८ ॥

पार्था आणिकही एक । नेणसी तूं हे कवतिक । जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥

देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८० ॥

    यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।
    तदर्थे कर्म कौंतेय मुक्तसङगः समाचरः ॥ ९ ॥

स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ ८१ ॥

हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥ ८२ ॥

म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन । कहींच नाहीं ॥ ८३ ॥

हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला । तो नित्ययज्ञाते चुकला । म्हणोनियां ॥ ८४ ॥

आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥ ८५ ॥

    सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
    अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्  ॥ १० ॥

तें नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तिये यज्ञातें । सूक्ष्म म्हणऊनी ॥ ८६ ॥

तें वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥ ८७ ॥

तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ॥ ८८ ॥

तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावे । तीर्थासी गा ॥ ८९ ॥

योगादिक साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥ ९० ॥

देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावे । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥ ९१ ॥

अहेतुकें चित्तें । अनुष्ठां पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ९२ ॥

तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हां एकु । ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥ ९३ ॥

देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा ॥ ९४ ॥

    देवान् भावयतानेन ते देवाः भावयंतु वः ।
    परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यच ॥ ११ ॥

जें येणेचिकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सीता । अर्थांते देती ॥ ९५ ॥

या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥ ९६ ॥

तुम्हीं देवतांते भजाल । देव तुम्हां तुष्टितील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति तेथ ॥ ९७ ॥

तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचे ॥ ९८॥

वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ ९९ ॥

जैसें ऋतुपतींचे द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येंसी ॥ १००॥

    इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।
    तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥

तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हापांठी ॥ १०१ ॥

ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥ १०२ ॥

कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादां । विषयांचिया ॥ १०३ ॥

तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी । तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं । न भजेल तो ॥ १०४ ॥

अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन । प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचे ॥ १०५ ॥

विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी । संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥ १०६ ॥

ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥ १०७ ॥

तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचे सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥ १०८ ॥

जैसें गतायुषीं शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निदैवाचां घरीं । न राहे लक्ष्मी ॥ १०९ ॥

तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला। जैसा दीपासवे हरपला । प्रकाशु जाय ॥ ११० ॥

तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥ १११ ॥

म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचे ॥ ११२ ॥

मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशी ॥ ११३ ॥

तैशी त्रिभुवनींची दुःखे । आणि नानाविध पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥ ११४ ॥

ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां । परी कल्पांतीहीं सर्वथा । प्राणिगण हो ॥ ११५ ॥

म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावीं । ऐसें प्रजांते शिकवी । चतुराननु ॥ ११६ ॥

जैसें जळचरां जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥ ११७ ॥

म्हणोनि तुम्ही समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढतपुढती । म्हणिपत असे ॥ ११८ ॥

    यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः ।
    भुङजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ॥ १३ ॥

देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी । जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥ ११९ ॥

गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमितादिकीं यजी । पितरोद्देश ॥ १२० ॥

या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां । हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥ १२१ ॥

तें सुखे आपुलां घरीं । कुटुंबेसीं भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥ १२२ ॥

तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं । जयापरी महारोगीं । अमृतसिद्धी ॥ १२३ ॥

कां तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥

म्हणोनि स्वधर्में जें अर्जें । तें स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥

हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे ॥ १२६ ॥

जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांते भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांही ॥ १२७ ॥

हे यज्ञोपकरण सकळ । नेणसांते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥

इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥

जे संपत्तिजात आघवें । हे हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषी ॥ १३० ॥

हें सांडोनिया मूर्ख । आपणपेयांलागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥

जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां ॥ १३२ ॥

हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जे जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥ १३३ ॥

    अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नस्संभवः ।
    यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥

अन्नस्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें । मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥

त्या पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥ १३५ ॥

    कर्म ब्रह्मोद्बभवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
    तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं ॥ १५ ॥

मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर । म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥

परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुती । ऐकें सुभद्रापती । अखंड गा ॥ १३७ ॥

    एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
    अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती ॥ १६ ॥

ऐशीं आदि हे परंपरा । संक्षेपे तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागौनियां ॥ १३८ ॥

म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥

तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥ जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥

तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसे कां अभ्रपटळ । अकाळींचे ॥ १४१ ॥

कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥ १४२ ॥

म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १४३ ॥

हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आले । मग उचित कां आपुले । वोसंडावे ॥ १४४ ॥

परिस पां सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥ १४५ ॥

    यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
    आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥ १७ ॥

देखें असतेनि देहकर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥

जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला । म्हणोनि सहजे सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥

    नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन ।
    न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥

तृप्ती झालिया जैसीं । साधने सरती आपैसीं । देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्मे नाही ॥ १४८ ॥

    तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
    असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरूषः ॥ १९ ॥

म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥

जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वतां । पातले जगी ॥ १५१ ॥

    कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः ।
    लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥ २० ॥

देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥

याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥ १५३ ॥

जे आचरता आपणपेयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि । १५४ ॥

देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥

मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥ १५६ ॥

हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे । तिहीं कवणेपरी जाणिजे । मार्गांते या ॥ १५७ ॥

    यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
    स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥

एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥

हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावे । विशेषें आचरावें । लागे संती ॥ १५९ ॥

    न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
    नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥

आता आणिकाचिया गोठी । तुज सांगो काय किरीटी । देखें मीचि इये राहाटी । वर्तत असे ॥ १६० ॥

काय सांकडे कांही मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥

तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझां अंगी । जाणसी तूं ॥ १६२ ॥

मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्ते ॥ १६३ ॥

    यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
    मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥

परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा - । लागोनियां ॥ १६४ ॥

जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । ते न व्हावें बरळ । म्हणोनियां ॥ १६५ ॥

    उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
    संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ 

आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी ॥ तरी हे प्रजा कैसेनि । निस्तरेल ॥ १६६ ॥

इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी । ते लौकिक स्थिती अवघी । नासिली होईल ॥ १६७ ॥

म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते । तेणे सविशेषें कर्मातें । त्यजावे ना ॥ १६८ ॥

    सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत ।
    कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोग्रहम् ॥ २५ ॥

देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥

जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥ १७० ॥

मार्गाधारे वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥

    न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ।
    जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥ २६ ॥

जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥

तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥ १७३ ॥

तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥ १७४ ॥

तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगी । तो कर्मबंधु आंगी । वाजेलना ॥ १७५ ॥

जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥

    प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
    अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥ २७ ॥

देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे । तरी सांगे कां न दाटिजे । धनुर्धरा ॥ १७७ ॥

तैसी शुभाशुभें कर्में । जिये निफजति प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥

ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥

हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पां ॥ १८० ॥

    तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
    गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥

जे तत्वज्ञियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥

ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी । साक्षिभूत होऊनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥

म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥

    प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
    तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥ २९ ॥

एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतिचेनि आटोपें । वर्ततु असे ॥ १८४ ॥

इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥

    मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा ।
    निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्ज्वरः ॥ ३० ॥

परी उचिते कर्में आघवीं । तुवा आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ती न्यासावी । आत्मरूपीं ॥ १८६ ॥

हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगो देसी ॥ १८७ ॥

तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥

आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥

जगीं कीर्ती रूढवीं स्वधर्माचा मानु वाढवीं । मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥ १९० ॥

आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांही । बोलों नये ॥ १९१ ॥

    ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः ।
    श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥

हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरे स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ १९२ ॥

तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणोनि हें निश्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥

    ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
    सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥

नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रियां लळा देऊनी । जे हें माझे मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥

जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥

ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले । अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥

देखें शवाचां हातीं दिधलें । जैसे कां रत्न वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥

कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥

तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावे ना ॥ १९९ ॥

म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगे पतंग काय साहती । प्रकाशातें ॥ २०० ॥

पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ २०१ ॥

    सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
    प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥

म्हणोनि इंद्रिये एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरूनि ॥ २०२ ॥

हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगे हाळाहाळ जिरेल । सेविलिया ॥ २०३ ॥

देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥

एर्‍हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगरचना । मेळवावी ॥ २०५ ॥

आपण सायासेंकरूनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावे कां ॥ २०६ ॥

सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें । पोखावें काई ॥ २०७ ॥

मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥

म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागी एथ अंतःकरण । देयावें ना ॥ २०९ ॥

    इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
    तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ ॥ ३४ ॥

एर्‍हवीं इंद्रियाचियां अर्था - । सारिखा विषयो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥ २१० ॥

परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ २११ ॥

बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता । परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी ॥ २१२ ॥

देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥ २१३ ॥

परी तयामाजि गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ २१४ ॥

तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा कीजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥ २१५ ॥

जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी । आणि मृगातें बुद्धीं । साधावया ॥ २१६ ॥

एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥ २१७ ॥

म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ॥ २१८ ॥

    श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
    स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥

अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥ २१९ ॥

येरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥

सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वाने आहाति बरवीं । तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥

हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥

तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ॥ २२३ ॥

हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली । तरी भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २२४ ॥

तेवीं आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु । तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥ २२५ ॥

हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपें केवीं ॥ २२६ ॥

ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥ २२७ ॥

म्हणोनि आणिकांसी जे विहीत । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावे जरी हित । विचारिजे ॥ २२८ ॥

या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयतां । दिसतसे ॥ २२९ ॥

ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥

हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें । परि पुसेन कांही आपुले । अपेक्षित ॥ २३१ ॥

    अर्जुन उवाच: अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः ।
                अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥

तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थितीही भ्रंशे । मार्ग सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥ २३२ ॥

सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ॥ २३३ ॥

बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥ २३४ ॥

जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करिता न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५ ॥

आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बलात्कारे सुइजती । तयाचिमाजी ॥ २३६ ॥

जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । चुकविती ते गिंवसी । तयातेंचि ॥ २३७ ॥

ऐस बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावे हृषिकेशें । पार्थु म्हणे ॥ २३८ ॥

    श्रीभगवानुवाच: काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
                 महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥

तंव हृदयकमळारामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥ २३९ ॥

तरी हे कम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं । हें कृतांताचां ठायीं । मानिजती ॥ २४० ॥

हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥ २४१ ॥

हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि ॥ २४२ ॥

हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययांचे । अविद्या केले ॥ २४३ ॥

हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधले । प्रमादमोह ॥ २४४ ॥

हे मृत्यूचां नगरीं । मानिजति निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥ २४५ ॥

जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडी यांची आशा । चाळित असे ॥ २४६ ॥

कौतुकें कवळितां मुठीं । जिये चौदा भुवनें थेंकुटीं । तें भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥

जे लोकत्रयाचें भातुके । खेळताचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥ २४८ ॥

हें असो मोहे मानिजे । यांते अहंकार घेपे दीजे । जेणे जग आपुलेनि भोजें । नाचवित असे ॥ २४९ ॥

जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥

साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥ २५१ ॥

इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥ २५२ ॥

इहीं संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥ २५३ ॥

इहीं बोधाची रोपे लुंचिली । सुखाची लिपी पुसली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥ २५४ ॥

हे आंगा तव घडले । जीवींचि आथी जडले । परी नातुडती गिंवसले । ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥

हें चैतन्याचे शेजारी । वसती ज्ञानाचां एका हारीं । म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥ २५६ ॥

हें जळेंवीण बुडविती । आगीविण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियांते ॥ २५७ ॥

हे शस्त्रेविण साधिती । दोरेविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनि ॥ २५८ ॥

चिखलेंवीण रोविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणें ॥ २५९ ॥

    धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
    येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥

जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळीं । ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥ २६० ॥

कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥ २६१ ॥

तैसें इहीविण एकलें । आम्हीं ज्ञान नाही देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥ २६२ ॥

    आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
    कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥ ३९ ॥ 

तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥ २६३ ॥

आधी यांते जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥ २६४ ॥

यांते साधावयालागी । जें बळ जाणिजे अंगी । तें इंधन जैसें आगी । सावावो होय ॥ २६५ ॥

    इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
    एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥

तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियांते जिणिजे । इहींचि जगीं ॥ २६६ ॥

ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥

    तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
    पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥ ४१ ॥

यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें । आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव ॥ २६८ ॥

    इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः ।
    मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥

मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥ २६९ ॥

    एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
    जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥  ४३ ॥

हें अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मीवीण उरले । मृगजळ नाही ॥ २७० ॥

तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥ २७१ ॥

जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं ॥ २७२ ॥

ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥ २७३ ॥

आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥ २७४ ॥

तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥

ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा ॥ २७६ ॥

अध्याय तिसरा समाप्त ||


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg