Jump to content

चित्रा नि चारू/चित्रेचे लग्न

विकिस्रोत कडून
चि त्रे चे
ल ग्न

♣ * * * * * * ♣







 निर्मळपूर तालुक्यात गोडगाव म्हणून एक खेडे होते. गोडगावला एक मोठे जहागीरदार होते. त्यांच्या मुलाचे नाव चारू. एकुलता एक मुलगा. फारच देखणा होता तो मुलगा, चारू जसा दिसायला सुरेख होता, तसाच स्वभावानेही चांगला होता. सारा गाव त्याच्यावर प्रेम करी.

 चारूचे मराठी शिक्षण संपले. त्याने इंग्रजी शिक्षणही घेतले. थोडे दिवस कॉलेजमध्येही तो होता. परंतु १९३० सालच्या चळवळीत त्याने कॉलेज सोडले, तो चळवळीत भाग घेणार होता, परंतु आईबापांच्या सांगण्यामुळे तो तुरुंगात गेला नाही.

 तो तेव्हापासून घरीच असे. घरीच वाची. घरचा एक मळा होता. त्या मळ्यात काम करी. शेतक-यांवर तो फार लोभ करी. शेतक-यांची बाजू घेऊन भांडे.

 बळवंतरावांच्या कानावर चारूची गोष्ट आल्याशिवाय राहिली नाही. ते एकदा गोडगावला मुद्दाम गेले होते, जहागीरदारांकडेच उतरले होते. मेजवानी झाली. चारूला पाहून त्यांना आनंद झाला.

 " तुम्ही सत्याग्रह संपल्यावर पुन्हा का नाही गेलात कॉलेजात ? शिक्षण पुरे झाले असते." बळवंतरावांनी विचारले.

 "शिक्षण म्हणजे ज्ञानच ना ? ते घरी बसूनही मला मिळवता येईल. मला नोकरीचोकरी करायची नाही. घरीच बरे. मळ्यात खपावे. शेतक-यांत असावे. त्यांची बाजू घ्यावी. हाच माझा आनंद." चारू म्हणाला  " आणि लग्न नाही का करायचे ? "

 "आई व बाबा आहेत. त्यांना ती काळजी."

 अशी बोलणी चालली आहेत, तो जहागीरदार आले.

 "काय हो, यांचे लग्न नाही का करणार ? "

 "हो, आता करायला हवेच. चारूच 'इतक्यात नको' असे म्हणतो. त्याच्या आईने पाहिली आहे एक मुलगी. तिच्या एका मैत्रिणीची मुलगी आहे. चारूचे त्या मुलीजवळच लग्न लावावे असे तिला वाटते. होय ना रे चारू?"

 "परंतु मला नको ती मुलगी. मी आजोळी गेलो होतो, तेव्हा पाहिली होती. आईचा उगीच हट्ट. त्या मुलीजवळ लग्न लावण्याऐवजी मी असाच राहीन. "

 " परंतु, अरे, दुस-या मुली.येतील."

 "अहो, चांगल्या मुलाकडे मुलींचे आईबाप खेप घालतात."

 "खरे आहे."

 अशी बोलणी झाली. मामलेदार गावात हिंडून लोकांच्या तक्रारी वगैरे ऐकून निर्मळपूरला परत गेले. बळवंतरावांनी चारू आवडला. हा जावई बरा असे त्यांना वाटले. त्यांनी घरी गोष्ट काढली.

 " विचारून पाहू का ? तुला काय वाटते ? " बळवंतरावांनी पत्नीला विचारले.

 "परंतु फार शिकलेला नाही ना ? " सीताबाई म्हणाल्या.

 "कशाला हवे शिकायला ? नोकरीचाकरी करण्याची जरूरी नाही. अाणि वाचून ज्ञान मिळविण्याइतका तो शिकला आहे. त्याच्या घरी सुंदर ग्रंथालय आहे. गावातील लोकांनाही रात्री शिकवतो. मोठा छान, मुलगा. गुणी व सुस्वभावी आणि दिसायला खरोखरच मदनासारखा आहे.”

 "परंतु आमची चित्रा त्यांना पसंत पडेल का ? "

 "मी एकदा चित्राला घेऊन त्यांच्या मळ्यात जाणार आहे. बघू या कसे जमते ते."

 "बघावी नाडीपरीक्षा."  आणि तसा एकदा योग आला. जहागीरदारांनीच बोलावले; कारण एकदा बळवंतराव सहज त्यांच्याजवळ म्हणाले होते, " तुमच्या मळ्यात भरीत-भाकरीचा जमवा बोवा एकदा बेत. मी आमची चित्रा पण घेऊन येईन. खेडेगाव पाहाण्याचा तिला फार नाद. " जहागीरदार ती गोष्ट विसरले नव्हते.

 जहागीरदारांकडची गाडी आली. बळवंतराव निघाले. चित्राही निघाली. आज त्यांनी बरोबर दुसरे कोणी घेतले नाही. दामू, रामू,श्यामू सारे पाठीस लागले, परंतु सीताबाईंनी त्यांची समजूत घातली.

 "ताईला दाखवायला नेत आहेत वाटते? " श्यामूने हसून विचारले.

 "अय्या, होय का ग आई ?" रामूने टाळी वाजवून म्हटले.

 "चाहाटळ आहात. चला घरात ! " सीताबाई म्हणाल्या.

 बळवंतराव व चित्रा गोडगावच्या मळ्यात आली. फारच सुंदर होता मळा. प्रसन्न वाटत होते. मळ्यात एक लहानशी बंगली होती. तिच्या दिवाणखान्यात बैठक होती. बळवंतरावांचे जहागीरदारांनी स्वागत केले.

 " बाबा. मी बाहेरच हिंडते. मला नाही असे आत आवडत." असे म्हणून चित्रा बाहेर गेली.

 तिकडे चारू बाहेर होता. फुले तोडून गुच्छ करीत होता. चित्राने चारूकडे पाहिले. त्याने तिच्याकडे पाहिले. कोणी बोलले नाही, परंतु थोड्या वेळाने-!

 “ मला छान करता येतो गुच्छ. मी करू का ? " चित्राने विचारले.

 " परंतु तुम्हाला देण्यासाठी तर मी करीत आहे. पाहुणेमंडळींचे स्वागत करायला हवे. बाबांनी मला सांगितले, गुच्छ कर म्हणून. "

 " तुम्ही आम्हाला गुच्छ द्या, आम्ही तुम्हाला देऊ."

 "परंतु आमचीच फुले घेऊन आम्हाला देणार वाटते ? तुमच्याकडे आम्हाला बोलवा व द्या मग गुच्छ,"

 "आम्ही बोलावले तर तुम्ही याल ?"

 "परंतु तुमचे वडील मामलेदार, खेड्यातील लोकांना मामलेदार का घरी पाहुणचारास बोलावतील? "  " माझे बाबा तसे नाहीत. ते साधे आहेत. शेतकरी घरी आले, तरी त्यांना बैठकीवर बसवतात. त्यांना पानसुपारी देतात. आम्ही तुम्हाला बोलवू हां, परंतु आधी सांगा, मी करू का गुच्छ ? एक तरी करत्येच. तुम्हाला हो द्यायला. तुमच्या वडिलांना द्यायला मला भीती वाटेल, लाज वाटेल."

 " आणि मला द्यायला ? "

 " आनंद वाटेल. तुम्हाला द्यायला कसली आहे भीती ?"

 " करा तर मग. मी जातो हे दोन घेऊन."

 " परंतु तुमचे नाव काय ? "

 " माझे नाव चारू."

 "चारू म्हणजे सुंदर, होय ना ?"

 " मला संस्कृत फारसे येत नाही."

 " तुम्ही कॉलेजात होते. मला माहीत आहे."

 " तुम्हाला काय माहीत ?"

 " एक दिवस बाबा आईला सांगत होते."

 " तुम्ही चोरून ऐकलेत वाटते ?”

 * कानावर आले. कान मिटण्याऐवजी ते अधिकच ताणून ऐकू लागल्ये."

 "का बरे ?"

 "माझ्या लग्नाची कुणकुण घरात चालली आहे हे मला माहीत होते. आपल्या लग्नासंबंधीचे बोलणे कोणाला ऐकावेसे वाटणार नाही."

 " कॉलेजात शिकलेला पाहिजे वाटते तुम्हाला नवरा ? तुम्ही मामलेदारांच्या कन्या. तुम्हाला चांगला आय्. सी. एस्. मिळेल की नवरा."

 " परंतु चारू म्हणजे सुंदर ना?"

 " होय."

 " माझे नाव माहीत आहे का तुम्हाला ?"

 " माझ्या घरी थोडेच कोणी लग्नाचे बोलतो ? कसे कळणार तुमचे नाव?"  "तुमची आई तुमच्या लग्नाची खटपट करीत नाही का ? मला माहीत आहे."

 "परंतु तुमचे नाव काय ?"

 "सांगूच ? "

 "सांगा."

 "हस्त नक्षत्राच्या पुढे कोणते नक्षत्र येते ? "

 "माझी परीक्षा घेता वाटते ? "

 "हो."

 "उत्तरा ना?"

 "अहो, हस्त नक्षत्राच्या पाठीमागचे नाही ! हिन्दुस्थानला पाठीमागे नाही जायचे, पुढे जायचे आहे !"

 " उत्तरा, हस्त, चित्रा,...."

 "तुमचे नाव चित्रा ? "

 "होय."

 " छान आहे नाव. रवींद्रनाथांच्या एका काव्यमय नाटकाचे नाव चित्रा आहे."

 " तुम्ही आता जा तिकडे. माझा गुच्छ नाही तर तसाच राहील."

 चारू निघून गेला. चित्रेने त्याच्याकडे पाहिले. तिने सुंदर गुच्छ तयार केला आणि ती बंगलीत परत आली.

 "चित्रा, कोठे होतीस हिंडत ? " बळवंतरावांनी विचारले.

 " होत्ये फुलांच्या संगतीत." ती म्हणाली.

 "गालांची फुले झाली आहेत. उन्हात इतक्या वेळ का राहायचे ? "

 "बाबा, लागू दे की एखादे वेळेस थोडे ऊन ! "

 "तुला भूक लागली आहे का ? ही बघ फळे आहेत. आम्ही खाल्ली. तुला ठेवली आहेत."

 "मी का आता एकटीच खाऊ ? "

 " आमचा चारू पण खाईल, त्यानेच चिरून आणली. परंतु खाल्ली नसतील. चारू, अरे चारू...." जहागीरदारांनी हाक मारली.
" तुमचे नाव चित्रा ? "









 "काय बाबा ? "

 "बस की यांच्याबरोबर. खा फळे. या आतच आल्या. बस."

 "बाबा, मला नकोत. " चारू म्हणाला.

 "अरे असा लाजतोस काय ? आमचा चारू साऱ्या मुलखाचा लाजरा आहे."

 "परंतु आमची चित्रा साऱ्या मुलखाची धीट. वाटेल त्याच्याजवळ बोलेल. मैत्री करील. ते फौजदार होते ना महंमदसाहेब, त्यांच्याकडेही चित्री जायची. त्यांची मुलगी फातमा ती हिची मैत्रीण."

 "मुसलमानाशी नको हो मैत्री !” चारू म्हणाला.

 "मुसलमान का सारेच वाईट असतात? " चित्राने विचारले.

 "इतर देशांतील चांगले असतील, या देशातील तरी वाईट आहेत." जहागीरदार म्हणाले.

 " या देशातील मुसलमान हिंदूतून बाटून झालेले ना ? जर ते वाईट असतील तर मुळात हिंदुच वाईट असे नाही का ?" चित्राने विचारले.

 " वा, चांगलाच वाद करते तुमची चित्रा," जहागीरदार म्हणाले.

 " फार चुरुचुरू बोलते ती. बॅरिस्टर हवा नवरा तिला. इतर नवरे नाही उपयोगी." बळवंतराव हसून म्हणाले.

 " आमचा चारू अगदीच मुखस्तंभ ! " जहागीरदार जर ओशाळून म्हणाले.

 " अहो, मुखस्तंभ नाहीत काही ते. मघा तिकडे माझ्याजवळ किती तरी वेळ ते बोलत होते. माझे नाव-गाव विचारीत होते. खरे की नाही हो ? " चित्रेने हसून विचारले.

 "परंतु आधी तुम्हीच विचारले, " चारू हसून म्हणाला.

 "इतक्यात गड्याने येऊन स्वयंपाक तयार आहे असे सांगितले. बोलणे चालले असता फळांचा फन्ना केव्हाच उडवण्यात आला होता.

 "चित्रा, बसायचे को जेवायला ? बसूच, लौकर परत जाऊ, "

 " लौकर को बाबा ? संध्याकाळ झाली म्हणजे निघू. उन्हातून कशाला ? "  "खरेच, घाई कशाला रावसाहेब ? " जहागीरदार म्हणाले.

 "बरे बघू मग. आता आधी जेवून घेऊ. " रावसाहेव म्हणाले.

 पाटपाणी तयार होते. बळवंतराव, चित्रा, जहागीरदारसाहेब बसले पानांवरून.

 "आणि तुमचे चारू नाही का बसत ? " चित्राने विचारले.

 " तो वाढायला थांबेल." जहागीरदार म्हणाले.

 " अय्या, बायकांचे काम का ते करणार ? मग मीच थांबत्ये. मी वाढत्ये. मला भूकसुद्धा नाही लागली. आता तर फळे खाल्ली. वाढू का मी ? " चित्राने विचारले.

 " चारू, तू सुद्धा बस. रामाच वाढील. सारे चालतेच आपणाला, " जहागीरदार म्हणाले.

 " रामाच्या ऐवजी रहीम असता तर चालता का हो वाढायला ? " चित्रेने विचारले.

 " चित्रा, पुरे आता." बळवंतराव म्हणाले.

  पाने वाढलो गेलो. सारी बसली. चित्राचे पान रिकामे होईना.

 "चित्रा, आटप की. " पित्याने सांगितले.

 "पोट भरलेले आहे." ती म्हणाली.

 "जेवल्यावर मळ्यात हिडा-फिरा. झोके घ्या, सारे पचून जाईल.” चारू म्हणाला.

 "परंतु बाबा म्हणतात, उन्हात जाऊ नको. चित्रा म्हणाली.

 "परंतु झोका झाडाला आहे. तेथे ऊन नाही." चारू म्हणाला.

 "जेवल्याबरोबर का कोणी झोके घेतात ?" ती म्हणाली.

 "जेवल्यानंतर जरा झोपून मग घ्या. येयल्या विहिरीचे पाणी पाचक आहे. काही बाधत नाहो. होय ना बाबा ? " तो म्हणाला.

 “होय. फार छान पाणी." जहागीरदार म्हणाले.

 "मला हा मळा फार आवडला. येथेच राहावे, मोट आहे, फुले आहेत. झोका आहे, फळे आहेत. " चित्रा यादी सांगत होती.

 “ आणखी काय काय आहे? पित्याने हसून विचारले.  "काय काय तरी आहे. अजून सारे नीट लक्ष देऊन थोडेच पाहिले आहे ! जेवल्यावर पाहीत." ती म्हणाली.

 मजेने हसत खेळत बोलणी चालली, तो पाणी पिताना चित्राला ठसका लागला. अळसूद गेले. ती घाबरली. " वर बघ, वर बघ. सासू टांगलेली आहे." बाप हसून म्हणाला.

 "सासूच सुनेला टांगीत असेल. " चारू हसून म्हणाला.

 " नव्या युगात आता सुनाच सास्वांना टांगतील." जहागीरदार म्हणाले.

 " किती ठसका लागला. फातमाने आठवण काढली असेल. तिचे लग्न लागले असेल." चित्रा म्हणाली.

 जेवणे झाली. बंगलीतील बैठकीवर सारी बसली. पानसुपारीचे तबक होते. सर्वांनी विडे खाल्ले. परंतु चित्राने पान घेतले नाही.

 "तुम्हाला नको का ?" चारूने विचारले.

 " मला नाही आवडत विड़ा करायला. चुन्यात बोट घालायचे. " चित्रा म्हणाली.

 "परंतु खायला आवडतो ना? " पित्याने विचारले.

 "कोणी करून दिला तर मी खाते. फातमाला पान फार आवडे. तिच्या आजोबांच्या तोंडात तर नेहमी पान असायचे. फातमा मला पट्टी करून देत असे. माझे छान रंगे तोंड. फातमाचे नसे रंगत. मग मी काय म्हणायची बाबा, आहे का माहीत ?"

 "काय ग म्हणस ? "

 "फातमा तुझ्यावर कोणाचे प्रेम नाहीं, तुझा विडा रंगत नाही. माझ्यावर सर्वांचे प्रेम आहे. माझा विडा रंगतो. आणि फातमा म्हणे, तुझेही नाही का माझ्यावर प्रेम ? मग मी हसत असे व म्हणे, तुला कळत नाही, काही समजत नाही. फातमा मग मला चिमटा घेई. जणू सारे समजले असे दाखवी."

 इतक्यात चारूने सुरेख विडा तेथे हळूच करून ठेवला. तो उठून गेला. चित्राने तो हळूच उचलून खाल्ला.

 " पडा जरा.” जहागीरदार बळवंतरावांस म्हणाले,  "चित्रा, तू पण पड. आणि गेलीस झोके घ्यायला, तर फार उंच नकोस हो झोके घेऊ." पिता म्हणाला.

 बळवंतरावांनी वामकुक्षी केली. चित्राही जरा तेथे लवंडली. जहागीरदारही बाहेर झोपले. चारू मात्र मळ्यात होता.

 थोड्या वेळाने चित्रा उठली. ती मळ्यात गेली. झाडाला बांधलेला झोका तिला दिसला. ती तिकडे गेली. झोक्यावर झोके घेऊ लागली. परंतु तिला भीती वाटत होती. इतक्यात चारू तेथे आला. तिचे झोके थांबले. ती खाली उतरली.

 " उतरलातशा ?" त्याने विचारले.

 "तुम्हाला खूप उंच नेता येतो का हो ?"

 " हो."

 "मला दाखवा बरे."

 चारू झोक्यावर चढला आणि हळूहळू त्याने खूपच उंच झोका नेला. शेवटी तो खाली आला.

 " मला नेता येईल का इतका उंच ?"

 " हो."

 " पडायची नाही ना ? ”

 "पडल्यात तर मी आहे ना ? "

 "पडल्यावर तुमचा काय उपयोग?"

 "लहान लहान मुलेही खूप उंच नेतात."

 चित्रा पुन्हा चढली झोक्यावर, ती झोका खूप उंच नेऊ लागली.

 "शाबास, शाबास !" चारू म्हणाला.

 तिने आणखी वर नेला. परंतु ती लटपटली, तिला का घेरी आली ? तिचा हात सुटला. चित्रा खाली पडली. ती ओरडली. तिकडे गडी-माणसे होती, ती धावत आली. चित्राला बरेच लागले. कपाळाला एक दगड लागला. रक्ताची धार लागली. कोपर बरेच खरचटले. बळवंतराव, ते जहागीरदार, सारे तेथे गजबजून आले. एका गड्याने कसला तर पाला आणला, भांबुरडीचा पाला. हातावर चोळून तो त्याने चित्राच्या कपाळावर बांधला. रक्त थांबले.  " चित्रा, चालवते का ? ऊठ, " पिता म्हणाला. हळुइळू तो बंगलीत आली. केस तिने एका हाताने साफ केले. कोपर दुखत होते. तिला रडू आले.

 " हे काय ! रडतेसशी ? अग उंदीर पळाला ! इतके काही नसेल हो लागले. घरी जायचे का ? " बापाने विचारले.

 " आता मी जरा पडत्ये. "

 " पड तर मग. "

 चित्रा झोपली. थोड्या वेळाने खरोखरच तिला झोप लागली. बळवंतराव, जहागीरदार, चारू पत्ते खेळत होते. खेळता खेळता बळवंतराव एकदम मोठ्याने हसले. चित्रा जागी झाली, तो उठली.

 "नीज़ की जरा." बाप प्रेमाने म्हणाला.

 "तुम्ही मात्र खेळणार नि मी निजू वाटते ? "

 “ तुला लागले ना आहे ?"

 “तुम्हीच ना म्हणालेत उंदीर पळाला ? काही नाही लागले. मी येते खेळायला. पाच पानी हुकमाचे खेळू. कोण कोण भिडू ?"

 " आम्ही म्हातारे एका बाजूला, तुम्ही दोघे एका बाजूला. "

 "चालेल का हो तुम्हाला ?" चित्राने चारूला विचारले.

 "मोठ्यांचे ऐकलेच पाहिजे." तो हसून म्हणाला. खेळ सुरू झाला. चित्रा व चारू यांच्याकडेच सारखा डाव यावयाचा. चित्राला हसू आवरेना.

 "बाबा, तुम्हाला काही कसा येत नाही डाव ?"

 "अग, ज्यांचे लग्न व्हायचे असते ना, त्यांच्याकडे डाव येतो." बळवंतराव म्हणाले.

 "यांचे व्हायचे आहे वाटते लग्न ?" तिने हसून विचारले.

 "आणि तुमचे जसे व्हायचेच नाही ! " चारूही हसून म्हणाला.

 "तुमचे दोघांचे लग्न केव्हा तरी होईलच. आज ना उद्या तूही करशील, तूही करशील." बळवंतराव म्हणाले.

 "बाबा, कोपर दुखते आहे हो, " ती म्हणाली.

 "घरी गेल्यावर आयोडाईन लावीन हो."  " ते झोंबेल."

 "जरा झोंबेल. मग बरे वाटेल."

 " चला आता ! पुरे खेळ बाबा, "

 "कंटाळलीस ? चला तर."

 गाडी जोडली गेली. गाडीत गादी. दोन तक्कये ठेवण्यात आले. जहागीरदारांनी दोघांना फुलांचे गुच्छ दिले.

 "खरेच, मीसुद्धा एक करून ठेवला होता. " चित्रा आठवण आल्यासारखे करीत म्हणाली.

 " मग जा, तो घेऊन ये." बाप म्हणाला.

 "नको आता. हा एक पुरे. तो राहू दे येथेच. नाही तर यांना होईल."

 "इतक्यात चारू तो गुच्छ घेऊन आला व चित्रेला देऊ लागला.

 "अहो, मीच तो केलेला. मीच केलेला मला काय देता ? तुम्हालाच घ्या तो." ती म्हणाली.

 "आणि तुम्हाला आत्ता मी दिले ते चारूनेच केलेले होते. " जहागीरदार म्हणाले.

 "परंतु मी केलेला अधिक सुंदर आहे." ती म्हणाली.

 "बायकांना अधिक कला असते." चारू म्हणाला.

 "अच्छा, फार मौज आली. " बळवंतराव म्हणाले.

 "तुमची मौज, मी मात्र पडल्ये, दुखावल्ये." चित्रा म्हणाली.

 "परंतु मळा आवडला ना ? " जहागीरदारांनी हसत विचारले.

 "हो ! फार आवडला."

 "येत जा अशी मधूनमधून." जहागीरदार म्हणाले

 "गाडी निघाली. जहागीरदार व चारू थोडे अंतर पोचवीत आले व नमस्कार करून मागे वळले.

 "चित्रा व बळवंतराव घरी आली. चित्रा झोक्यावरून पडल्याची हकीगत सर्वांना समजली. कपाळाला रुमाल बांधलेला होताच. श्यामू, रामू , दामू सारे ताईची थट्टा करू लागले.

 " ताई, तुला दाखवायला ना नेले होते ? ' श्यामूने विचारले.  "सासूने मारले वाटते ? " रामू म्हणाला.

 "लग्न नाही झाले, तोच कशी सासू मारील ? राम, आधी लग्न ठरावे लागते. मग होईल. मग सासू मारील. होय ना ग आई ? " श्यामूने जरा प्रौढपणे जणू विचारले.

 "परंतु ताईला चांगलीच सासू मिळेल." सीताबाई म्हणाल्या.

 "निदान नवरा तरी चांगला मिळेल." बळवंतराव म्हणाले.

 "ताई, तू बऱ्याच उंचावरून पडलीस ?" रामूने विचारले.

 " हो." ती म्हणाली.

 " तू रडली असशील ! " दामू म्हणाला.

 " मग डोळे कोणी पुसले ?" रामूने विचारले.

 " नव-याने !" श्यामू हसून म्हणाला.

 " परंतु लग्न झाले म्हणजे तो खरा नवरा. तूच ना म्हटलेस ?" रामू म्हणाला.

 " जा ना रे बाहेर. तिला पडू दे. आणि ताईच्या लग्नावी अशी टिंगल का करायची ? पुन्हा भलभलते बोलाल तर बघा." बळवंतराव जरा रागाने म्हणाले.

 "ती मुले बाहेर गेलो. चित्रा आपल्या खोलीत जाऊन आंथरुणावर पडली. तो रडत होती. का बरे ? तिचे का कोपर जास्त दुखत होते ? कपाळाची जखम दुखत होतो ?

 रात्री सीताबाई व बळवंतराव बोलत होती.

 " ती दोघे एकमेकांजवळ बोलली. एकमेकांना आवडली. मोकळी आहेत त्यांची मने, चारू खरेच सुंदर मुलगा आहे. जमले तर आपली चित्रा द्यावी तेथे." बळवंतराव म्हणाले.

 " माझी हरकत नाही. जहागीर आहे. एकुलता एक मुलगा आणि मुलगाही फार चांगला आहे म्हणता." सीताबाई म्हणाल्या.

 "स्वरूपाने सुंदर व गुणांनीही सुंदर आहे. असा मुलगा मी पाहिला नाही, आणि चित्रा व तो चारू, जणू पूर्वीची ओळखीची अशा त-हेने बोलत होती. काय ऋणानुबंध आहे कळत नाही. आपली तरी इकडे लांब बदली होईल असे कोणाला वाटले होते ? जणू चित्राच्या लग्नासाठीच देवाने आणले असे आपले मला वाटते. जमले तर करावे ना? का नको इतक्यात ?"

 " आता काही तशी लहान नाही चित्रा, तिला सारे समजते. कशाला लांबवा ? वेळीच सारे बरे असे मला वाटते. उगीच लांबविण्यात अर्थ नाही." सीताबाई म्हणाल्या.

 पुढे काही दिवसांनी बळवंतरावांनी जहागीरदारांना खरेच विचारले.

 "तुमचा चारू तयार आहे ना ?" बळवंतरावांनी प्रश्न केला.

 “तो तयार आहे. कारण आपल्या आईजवळ तो तसे बोलला. करीन लग्न तर चित्रेशीच, असे त्याने सांगितले." जहागीरदार म्हणाले.

 " तुम्हालाही पसंत आहे ना ? "

 "अहो, अशी नक्षत्रासारखी मुलगी कोणाला सून म्हणून आवडणार नाही ? चारूच्या आईचीच जरा समजूत घातली पाहिजे."

 "तुम्हाला हुंडा हवा असेल तितका देईन. एकदा माझ्या चित्राला चारू वर मिळो हीच इच्छा."

 "अहो, हंडा नकोच, आम्हाला का काही कमी आहे! आणि चारूने हुंडा घ्यायचा नाही ही गोष्ट मला कधीच सांगितली आहे. हुंडा घेईन तर चारू पळून जाईल, तुम्हाला काय द्यायचे ते तुम्ही प्रसन्नपणे चारूला व चित्राला द्या. रावसाहेब, माझे खरोखर भाग्य, की तुमच्यासारख्या सज्जनांशी संबंध जोडण्याची संधी मिळाली. मी चारूच्या आईची समजूत घालीन. आपण ठरवून टाकू. समजून चला, की ठरले असे." जहागीरदार म्हणाले.

 चित्राच्या लग्नाच्या गोष्टी सर्वत्र पसरल्या. ती आता शाळेत जाईना. . मुले मोठ्याने बोलून चिडवीत. ती घरीच वाची. घरीच राही.

 तिकडे चारूच्या आईची समजूत घालणे चालले होते.

 "मला काही ही मुलगी पसंत नाही. चारू, तू लहान होतास तेव्हापासून माझ्या मैत्रिणीला मी सांगितलेल आहे, की तुला मुलगी झाली तर माझ्या चारूला करीन. का रे नाही ती तुला पसंत ? " चारूच्या आईने विचारले.

 " मला ती नको वाटते." चारू म्हणाला.  अग, पण चारूला जर ही चित्रा पसंत आहे, तर तू का आड येतेस ? त्यांना जन्म काढायचा आहे." जहागीरदार म्हणाले.

 "ही चित्रा म्हणे फार फटाकडी आहे. चारूजवळ मळ्यात आपली एकदम हसू-बोलू लागली आणि मुसलमानांशी म्हणे तिची मैत्री. मुसलमानांच्या मुली मैत्रिणी! त्यांच्याकडे विडे खाते. नको ही असली मुलगी. आपण खेड्यातील माणसे. ह्या अशा लाडावलेल्या व शेफारलेल्या मुली उद्या वाटेल ते करतील, तोंडाला काळेही फासायच्या. माझे ऐका. चारू, आईचे ऐक, ती माझ्या मैत्रिणीची मुलगी कर, " आईने पुन्हा जोराने सांगितले.

 "का ग आई, तुझ्या माहेरी नाही वाटते मुसलमान येत ? तुमच्याकडे तर मुसलमानांशीच व्यवहार. मी आजोळी येतो तेव्हा बघतोच सारे. मुसलमान वाईट, तर आजोळी कशाला त्यांच्याशी व्यवहार करतात ? उगीच काही तरी तू बोलतेस. त्या चित्राची एक मुसलमान मैत्रीण तिच्या वर्गातील होती. ती देई एखादे वेळेस तिला पट्टी. दुसरे कोणी मुसलमान नव्हते देत. तिने मोकळेपणाने मळ्यात सांगितले. गड्यांनी येऊन तुला सांगितले ? तुझे हेर पाठविले होतेस वाटते मळ्यात, आम्ही काय काय बोलतो, काय काय करतो, किती हसतो ते पहायला ? आई, माझे लग्न करायचेच असेल तर चित्राजवळच करा. माझ्या जीवनाच्या दिवाणखान्यात चित्राचाच प्रवेश. दुसरे कोणी नको तेथे डोकावायला."

 "बरे हो चारू, तुमचे ठरले असेल तर मी कशाला आड येते ! "

 "मग ठरवू ना मुहूर्त ?" जहागीरदारांनी विचारले.

 "बाबा, हुंडा नको हो." चारूने सांगितले.

 "नाही हो." ते म्हणाले.

 बळवंतरावांच्या विचाराने जहागीरदारांनी मुहूर्त ठरविला.

 तुमच्या खेड्यात आम्ही येऊ की तुम्ही निर्मळपूरला याल ? " बळवंतरावांनी विचारले.

 जशी तुमची इच्छा."

 " चित्रा तर म्हणते, की तुमच्या गावीच लग्न व्हावे. त्या मळ्यात आम्ही जानोशाला उतरू. मळ्यात आमचा मंडप."  " जशी तिची इच्छा. " जहागीरदार म्हणाले.

 आणि ज्या मळ्यात चित्रा व चारू यांची प्रथम भेट झाली, दृष्टादृष्ट झाली, ज्या मळ्यात तिने झोके घेतले, त्याच मळ्यात सुंदर मंडप घालण्यात आला. मोठ्या थाटाने लग्न झाले, शेतकऱ्यांस मेजवानी देण्यात आली. निर्मळपूरचेही पुष्कळ प्रतिष्ठित लोक आले होते. फातमाचे प्रेमळ पत्र व लग्नभेट आली होती. चित्रा व चारू यांनी परस्परांस माळा घातल्या. सर्वांना आनंद झाला.

 लग्न झाले. सारी मंडळी परत आली. चित्रा सासरीच राहिली. एके दिवशी चित्रा व चारू त्या मळ्यात झोके घेत होती.

 "पडेन हो मी चारू. नको, मला भीती वाटते."

 "त्या दिवशी तू एकटी होतीस. आज आपण दोघे मिळून झोके घेऊ.मी तुला पडू देणार नाही."

 "त्या दिवशी रे मग का नाही बरोबर आलास ? "

 "तू का नाही बोलावलेस ? "

 असे प्रेमळ संवाद पतिपत्नीचे चालले होते. आणि त्या झोक्यावर दोघे चढली. चारूने खूप उंच चढविला झोका.

 " पुरे, मला भीती वाटते चारू. "

 " बरे पुरे ! "

 आणि थांबला झोका. दोघे खाली उतरली. मळ्यात फिरली.

 "हा मळा तुला फार आवडत होता ना?"

 "चारू, तुझा हा मळा म्हणून आवडे हो."

 " चित्रा, आपली का पूर्वजन्मीची ओळख होती ? पूर्व जन्मीही का आपण एकमेकांचा होतो ? आपणास परकेपणा अगदी वाटत नाही. खरे की नाही ?"

 " होय हो चारू, तुला जणू शोधीत मी या बाजूला आल्ये."

 " तू उद्या घरी जाणार ना ? "

 "चारू. आता तुझे घर ते माझे घर."

 "अग घरी म्हणजे माहेरी."

 "हो, उद्या बाबा नेणार आहेत. "  " केव्हा येशील परत ? "

 " चारू, आता मी तुझीच आहे. येईन लौकरच."

 " तुझ्या फातमाला आपला दोघांचा फोटो पाठवलास का ?"

 "पाठवणार आहे. फातमा आपल्या नव-याबरोबर दूर गेली आहे. तुमचे आजोळ आहे ना ? त्याच बाजूला फातमा गेली आहे कोठे तरी. "

 "पुष्कळच लांब ! "

 "आपण जायचे का फातमाकडे ? ”

 "परंतु तिच्या नव-याला थोडेच आवडेल ? चित्रा, लहानपणचे पुष्कळसे शेवटी मनातच ठेवावे लागते."

 "चित्रा, तुला एक सांगून ठेवतो. आई काही बोलली तरी मनावर नको घेऊ तु. माझ्याकडे बघ. आईचेही मन पुढे निवळेल. तीही तुझ्यावर प्रेम करील, चित्रा, तुझ्यावर कोण नाही प्रेम करणार? तु गुणी आहेस.प्रेमळ, हसरी, मोकळी आहेस.

 “होय हो चारू. खरोखरच तू मला मिळणे म्हणजे पूर्वपुण्याई. चारू, माझ्यापेक्षा तूच सुंदर आहेस. तूच गुणी आहेस. चित्रा साधी मुलगी. "

  " साधीच मला आवडते. फुलांवर प्रेम करणारी फुलराणीच मला आवडते. चल तुला नटवतो फुलांनी."

 आणि त्याने तिच्या केसात फुले घातली. दोघे घरी आली. चित्रा पुढे माहेरी गेली. चित्रा अत्यंत आनंदात होती.