Jump to content

चित्रा नि चारू/चित्रा

विकिस्रोत कडून
चित्रा


बळवंतराव मामलेदार फार लोकप्रिय होते. मामलेदार म्हणजे तालुक्याचा राजा. हिंदुस्थानातील इंग्रजांचा कारभार तेच चालवत होते असे म्हणा ना. मामलेदारावर तालुक्यातील सुखदुःख अवलंबून असते. मामलेदार सव्यसाची असतो. त्याला मुलकी सत्ता व फौजदारी सत्ता. आरोप करणारा तोच, शिक्षा देणारा तोच. तालुक्यातील पीक पाणी कसे आहे याचा अहवाल तोच देणा. सरासूट द्यायला हवी की नको याची शिफारस तोच करणार. गोरगरिबांवर अन्याय होत नाहीत ना, हे तोच पाहणार. मामलेदार मनात आणील तर तालुका सुखी करू शकेल. निदान त्याच्या हातात असते तितके तरी तो प्रामाणिकपणे करील तरी लोकांना पुष्कळसे हायसे वाटेल.

बळवंतराव हे अपवादात्मक मामलेदार होते. लाचलुचपत त्यांना माहीत नव्हती. पापभिरू व देवभीरू ते होते. इकडे देवदेवतार्चन भरपूर करावयाचे व तिकडे पैसे खावयाचे असा त्यांचा धर्म नव्हता. ते फिरतीवर गेले म्हणजे शेतकरी त्यांना भेटी देत. कोणी तूप देई, कोणी काही देई, परंतु बळवंतराव घेत नसत.

"मला धुतल्या तांदळासारखी राहू दे. तुम्ही कदाचित प्रेमानेही देत असाल, परंतु लोक निराळा अर्थ करतील. म्हणतील की, हा मामलेदार लाच घेतो. नकोच हे घेणे." असे ते म्हणावयाचे.

त्यांची नुकतीच निर्मळपूरला बदली झाली होती. सामानसुमान सारे आले. ते आधी एकटेच पुढे आले होते. मंडळी मागून आली. त्यांच्या पत्नीचे नाव सीता. सीताबाईंना एक मुलगी व तीन मुलगे होते. मुलगी सर्वांत मोठी, तिचे नाव चित्रा. चित्रा आता जवळजवळ १५-१६ वर्षांची होती. भावांची नावे श्यामू, रामू व दामू अशी होती. श्यामू बारा वर्षांचा होता. रामू दहा वर्षांचा होता. दामू सात वर्षांचा होता. दामूच्या पाठीवर मात्र सीताबाईंस मूल झाले नव्हते. सर्वांत लहान तो सर्वांचा लाडका होता; परंतु बळवंतरावांचे चित्रेवर फार प्रेम होते. चित्रा जन्माला आली व ते मामलेदार झाले होते. इतक्या लवकर आपणास मामलेदारीचा योग आला याचे कारण चित्रा, असे ते म्हणत. चित्रा म्हणजे आपल्या कुटुंबाचे भाग्य आहे, सुदैव आहे, असे ते म्हणायचे. चित्राच्या आधी झालेली मुले मरण पावली होती. परंतु चित्रा जगली, मोठी झाली, तीच वाचली एवढेच नव्हे, तर आपल्या पाठच्या भावडांनाही तिने आयुष्य दिले, यामुळे बळवंतराव चित्राला जीव की प्राण करीत. तिचे मन ते कधी दुखवीत नसत. तिची इच्छा नेहमी पूर्ण करीत.

 चित्रा आता इंग्रजी शाळेत होती. पाचवी-सहावीत होती. निर्मळपूरच्या फौजदारांची नात फातमा तिची मैत्रीण होती. फातमा तिच्यात वर्गात होती. मुसलमान मुली इंग्रजी शाळेत क्वचितच असतात, परंतु फातमाचे आजोबा सुधारक होते. ज्ञान ही पवित्र वस्तू आहे असे ते म्हणत. बुरख्याचे थोतांड त्यांस पसंत नसे.

 फातमाची आई लहानपणीच वारली होती. तिच्या बापाने पुढे दुसरे लग्न केले. फातमा आजोळीच असे. आजोबा महंमदसाहेब फातमावर जीव की प्राण करीत. फातमाचा बाप हसन तिला भेटायला मधूनमधून येत असे.

 एकदा एके रविवारी बळवंतराव एका खेड्यावर वनभोजनासाठी गेले होते. एका मळ्यात उतरले होते. फौजदार महंमदसाहेब व फातमा ही ही आली होती. चित्रा, श्यामू व रामू हीही आली होती. सुंदर अशी बैठक आमराईत घातलेली होती. तिकडे मोट धो धो चालू होती. भाजीपाल्याचा आसपास फुलझाडेही होती. श्यामू व रामू तिकडे रंगले. रताळी उपटून ते खात होते. टमाटो मटकावीत होते.  बळवंतराव व चित्रा, महंमदसाहेब व फातमा ही बोलत बसली होती. गावचे काही प्रतिष्ठित लोक तेथे बसलेले होते. बोलता बोलता धर्माच्या गोष्टी निघाल्या.

 "महंमदसाहेब, तुमचे बाकी धाडस आहे. फातमाला तुम्ही मोकळेपणे मुलांच्या शाळेत शिकवता, याचे कौतुक वाटते." बळवंतराव म्हणाले.

 "रावसाहेब, तुम्ही तुर्कस्तानात जाल तर चकित व्हाल. जगात कोठेही नाही इतके स्त्रीस्वातंत्र्य तेथे आहे. तुर्की असेंब्लीत जितक्या स्त्रिया आहेत, तितक्या स्वातंत्र्याचे माहेरघर समजले जाणा-या अमेरिकेच्या सेनेटमध्येही नाहीत. केमाल पाशाने ही क्रांती केली."

 "परंतु तुम्हा मुसलमानांस हे आवडते का? हिंदी मुसलमान केमालचे कौतुक करतील, परंतु आपल्या स्त्रियांना जनानखान्यात, पडद्यात ठेवतील." बळवंतराव म्हणाले.

 "मला माझ्या धर्मबंधूची कीव येते. पैगंबरांचा थोर संदेश अद्याप आम्हाला समजला नाही. ज्ञानाला पैगंबर फार मान देत. पैगंबरांची मुलगी फातमा कुराणावर प्रवचन करी. हुतात्म्यांच्या रक्तापेक्षाही नवीन ज्ञान देणारी शाईची एक ओळ अधिक महत्वाची आहे असे पैगंबर म्हणत. रात्रंदिवस नमाज पढणा-यांपेक्षा सृष्टीचे गूढ उकलणारा, सृष्टीचे नीट परीक्षण करणारा, निसर्गाचा अभ्यास करणारा अधिक धार्मिक होय असे पैगंबर म्हणत. पैगंबरांचा संदेश पहिली तीनचारशे वर्षे आम्ही ऐकला व इ. सनाच्या ७ व्या ते १० व्या शतकापर्यंत ज्ञानात आम्ही अग्रेसर होतो. प्रचंड विद्यापीठे आम्ही स्थापिली, सर्व शास्त्रांत शोध लावले. रावसाहेब, इस्लामी धर्मातील ती तेजस्वी ज्ञानोपासना आमच्यात केव्हा सुरू होईल ते खुदा जाने."

 "स्त्रियांच्या बाबतीत पैगंबरांची दृष्टी कशी होती?"

 "अत्यंत उदार होती. स्वर्ग जर कोठे असेल तर तो मातेच्या चरणी आहे असे ते म्हणत. स्त्रियांना त्यांनी वारसा हक्क दिला. त्यांना काडीमोडाची परवानगी दिली. पैगंबरांनी त्यांच्या काळात अरबस्तानातील परिस्थिती लक्षात घेऊन खरोखरच किती तरी केले."  "परंतु त्यांनी बहुपत्नीकत्वाची चाल ठेवली."

 "त्याचे कारण आहे अरबस्तानात स्त्रियांची संख्या जास्त होती. शिवाय युद्धकैद्यांच्या स्त्रियांचे काय करायचे हाही प्रश्न असे. त्यांना गुलाम करण्यापेक्षा पत्नी म्हणून करून घेणे अधिक भूतदयेचे असे. असे अनेक प्रश्न त्या काळातील अरबस्तानात होते; परंतु तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, की पैगंबरांनी कुराणात स्वच्छ सांगितले आहे की, ‘चार बायकांची मर्यादा ठेवा.’ एवढेच नव्हे, तर ते पुढे म्हणतात, ‘एकच करणे अधिक श्रेयस्कर.’"

 "परंतु काय हो महंमदसाहेब, पैगंबरांनी तर खूप लग्ने केली.’"

 "त्या लग्नांकडे निराळ्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. लक्षात ठेवा की, पैगंबरांची पहिली पत्नी खदिजा जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत त्यांनी दुसरी बायको केली नाही. ते जर केवळ भोगासक्त असते तर ते इतकी वर्षे असे एकपत्नी राहाते ना. खदिजेच्या मरणानंतरची पैगंबरांची लग्ने ही अरबी भांडणे बंद करण्यासाठी होती. निरनिराळ्या जाती, वंश, कुळे यांत भांडणे असत. परंतु पैगंबरांनी त्या त्या कुळांतील एखाद्या स्त्रीशी लग्न केले, म्हणजे आपोआप भांडणे थांबत. कधी धर्माच्या कामी मरण पावलेल्यांच्या पत्नीचा तिच्याशी लग्न करूनच ते अधिक सांभाळ करू शकत. रावसाहेब, महापुरूषांची लग्ने कधीकधी त्या स्त्रीच्या रक्षणार्थ केवळ असतात. त्यात कामुकता नसते. पैगंबर जर असे विषयासक्त असते तर त्यांचा त्यात प्रभाव पडता का? आज तेराशे वर्षे पैगंबर कोट्यवधी लोकांच्या हृदयाचे सम्राट आहेत, तसे राहाते का? कोणा भोगी किड्याने कोट्यवधी जनतेला शेकडो वर्षे मार्गदर्शन केल्याचे आहे का उदाहरण?"

 "महंमदसाहेब, तुमचे म्हणणे खरे आहे. पैगंबर एक अवतारी विभूती होऊन गेले. मराठीत त्यांचे सुंदर चरित्र अद्याप नाही. हिंदुस्थानात आपण हिंदु-मुसलमान एकत्र राहातो, परंतु सहानुभूतीने एकमेकांच्या संस्कृतीच्या कधी अभ्यास केला नाही. आपण दूर दूर राहिलो." बळवंतराव म्हणाले.

 "एके काळी तसा प्रयत्न झाला..." महंमदसाहेब म्हणाले.  "परंतु इंग्रजांनी येऊन अडथळा केला. होय ना आजोबा?" फातमा मध्येच म्हणाली.

 "होय." बळवंतराव म्हणाले.

 "मी पैगंबरांचे मराठीत सुंदर चरित्र लिहीन. मी मराठीच मातृभाषा मानते. महाराष्ट्रात राहून मराठी लिहिता वाचता न येणे म्हणजे लाजिरवाणे आहे. नाही का ग चित्रा?" फातमा चित्राचा हात हातात घेऊन म्हणाली.

 "फातमा, तू मला मराठीतून पत्र लिहीत जा. मला विसरू नकोस." चित्रा म्हणाली.

 "फातमा आता लौकरच जाईल. तिचे आता लग्न होणार आहे. तिच्या बापाने ठरवले आहे. तो माझे ऐकत नाही." महंमदसाहेब म्हणाले.

 "मग फातमाचे शिक्षण? महंमदसाहेब, मी खूप शिकणार आहे. होय ना बाबा? माझे नाही ना लवकर लग्न करणार?" चित्राने लडिवाळपणाने बापास विचारले.

 "तुझ्या आईचाही आग्रह चालला आहे. मिळाले चांगले स्थळ तर देऊ अडकवून!" बळवंतराव म्हणाले.

 "फातमा, आपण कोठेही गेलो तरी एकमेकीस पत्रे पाठवू. हां?" चित्रा म्हणाली.

 "पाठवू, खरेच पाठवू." फातमा म्हणाली.

 इतक्यात तिकडे श्यामू व रामूचे भांडण जुंपले. दोघे एकमेकांना ओढीत होते. श्यामू म्हणे मी मोट हाकून बघतो. रामू म्हणे मी. बळबंतरावांनी दोघांना हाका मारल्या आणि फातमा व चित्रा खाण्याची तयारी करू लागल्या. आनंदाने जेवणे झाली. गाड्या जोडून पुन्हा सारी निर्मळपूरला आली.