चतुःश्लोकी भागवत/सृष्टिरचना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

एवं नाभिकमळीं कमलासन । बैसला केवळ अज्ञान । तंव हदयी झाली आठवण । मी येथें कोण कैचा पां ॥६१॥
मज कैचें हें कमलासन । येथें याचें मूळ तें कवण । तें पाहावया आपण । जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥
सहस्त्रवरुषें बुडी देतां । कमळमूळ नयेचि हाता । तेथें निरबुजला ये वरुता । बैसे मागुता कमळासनी ॥६३॥
विधाता विचारी चारी खाणी । चौर्यां सीलक्ष जीवयोनी । या चराचराची मांडणी । सृष्टी कैसेनी सृजावी हे ॥६४॥
सुर नर आणि पन्नग । उत्तममध्यमअधमभाग । कैसेनी सृजावें म्यां जग । पूर्वत्रविभाग स्फुरेना मज ॥६५॥
ऐसी स्त्रष्टा चिंता करी । निश्चळ बैसे कमळावरी । पंचभूतें हीं कवणेपरी । देही देहधारी होतील ॥६६॥
ऐसी तो चिंता करी । चित्त उगें न राहे क्षणभरी । मी कोण मजभीतरी । हें मनी निर्धारी कळेना ॥६७॥
नकळतां माझें मीपण । केवी प्रपंच होय निर्माण । ऐसें चिंतोनी अतिगहन । चतुरानन अनुतापी होत ॥६८॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.