गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र
<poem> माझे परमपुज्य लेखनगुरू, स्वतंत्र शक्तीचे नाटककार, प्रतिभासंपन्न कवि मार्मिक टीकाकार, कुशल विनोदपंडित व विद्वान् निबंधकार
रा. रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - बी.एल्एल्.बी.; वकील खामगांव.
संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन व वधूपरीक्षा या नाटकांचे व 'सुदाम्याचे पोहे' या लेखसंग्रहाचे कर्ते यांसः
गुरूवर्य तात्यासाहेब, माझ्यासारख्या विषम स्थितीतल्या आणि असदृश योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकी वर्षे उदार हृदयाने, बरोबरीच्या मित्रपणाचा थोर मान देत आला; वेळोवेळी माझ्या चुकल्या बालबुध्दीला वडीलपणाने समुपदेशन करीत आला; कधीमधी उच्छृंखलपणाने माझ्याकडून आपला उपमर्द झाला असता त्यांचीही बंधुप्रेमाने क्षमाच करीत आला; आजवर मी लिहिलेल्या वेडयावाकडया शब्दांचे पितृतुल्य प्रेमाने प्रोत्साहनपर कौतुकच करीत आला; या प्रमाणे, एक ना दोन, हजारो उपकारांचे आज एकसमयावच्छेदे करून स्मरण होऊन, अंतःकरण कृतज्ञतेने उचंबळून येत आहे ! आणि त्या कृतज्ञतेचे अश्रूच आज मी सानंद भक्तिभावाने आपल्या परमपूज्य चरणी वाहत आहे.
माझ्या सबंध पुस्तकाची आपण लिहिलेल्या एखाद्या शब्दाइतकीसुध्दा किंमत नाही हे मी जाणून आहे; पण हा प्रश्न योग्यतेचा नाही. गोपाळबाळाने भक्तिभावाने वाहिलेल्या फत्तराची फुले झाली. या कथेत ऐतिहासिक सत्य मात्र खास आहे; तोच प्रकार कृतज्ञतेचाही !
आपलेच लेख वाचून मला हे चार शब्द लिहिता आले; तेव्हा यात जे चांगले असेल ते आपलेच आहे, त्याचा आपण स्वीकार करालच; आणि जे वाईट आहे त्याचे तरी क्षमापूर्ण उदारतेने कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार ?
ता.20 डिसेंबर 1912 आपला कृषाभिलाषी फर्ग्युसन कॉलेज, पुणे. राम गणेश गडकरी
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |