मृत्यूनंतर गुरुची प्रस्तावना
गडक-यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुरू गोविंद चिमणाजी भाटे यांनी एका पुस्तकाच्या आवृत्तीस लिहिलेली "प्रस्तावना" -
माझे मित्र कै. राम गणेश गडकरी यांच्या 'प्रेमसंन्यास' या पहिल्या नाटयकृतीला मी त्यांच्या विनंतीवरून पहिली प्रस्तावना लिहिली होती. त्या गोष्टीला आता दहावर वर्षे झाली. त्यानंतर गडक-यांच्या दुस-या नाटयकृती समाजापुढे येऊन गडक-यांचे नाव सर्वतोमुखी झाले व त्यांच्या नाटयसंसाराच्या अद्वितीय कारभाराने सर्वांचे डोळे दीपून जाऊ लागले. तोच अकाली, अल्पवयात व आपल्या एका नाटकरूपी अपत्याला जन्म दिल्याबरोबर त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नाटकृतींची वाङ्मयावृत्ती काढण्याचे सरस्वती मंडळाने ठरविले व पहिल्या नाटकाचा धर्मपिता या नात्याने या नाटकाच्या दुस-या आवृत्तीची प्रस्तावना मीच लिहावी अशी त्या मंडळाने विनंती केल्यावरून कै. गडक-यांच्या मृत्यूने हळहळणा-या मनाने मी आज ही प्रस्तावना लिहावयास लेखणी हाती धरली आहे.
कै. गडक-यांच्या प्रतिभाशक्तीने एकंदर पाच नाटके निर्माण केली. त्यांची प्रतिभाशक्ति शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे सारखी वाढत होती व म्हणून त्यांच्या या पाच कृती म्हणजे चंद्राच्या पाच अवस्थांप्रमाणे जास्त जास्त आनंददायक होत गेल्या आहेत. 'प्रेमसंन्यास' हे नाटक प्रतिपच्चंद्राप्रमाणे आहे. या नाटकात गडक-यांच्या प्रतिभेचा उदय होऊन तिच्या सुखद प्रकाशाच्या छटा व भावी वैभवाची साक्ष वाचकांच्या व प्रेक्षकांच्या नजरेस येते. त्यांचे दुसरे नाटक 'पुण्यप्रभाव' हे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे आहे. यात गडक-यांच्या प्रतिभेचा शीतल व मनाला चकित करणारा प्रकाश दृष्टीस पडून वाचकांचे मन थक्क होते. त्यांचे तिसरे नाटक 'एकच प्याला' हे अष्टमीच्या चंद्राप्रमाणे आहे. यात गडक-यांच्या प्रतिभेचा प्रकाश सर्वत्र पसरून दीर्घकाळ टिकणारा आहे असे नजरेस येते. त्यांचे चौथे नाटक 'भावबंधन' हे द्वादशीच्या चंद्राप्रमाणे आहे. यात त्यांच्या प्रतिभेच्या प्रकाशाचे पटल सर्व दशदिशांभर पसरले आहे व जिकडे नजर फेकावी तिकडे प्रकाशच प्रकाश वाचकांस दिसू लागतो. रा. गडक-यांचे पाचवे नाटक 'राजसंन्यास' हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहे. यात गडक-यांच्या प्रतिभेच्या देदीप्यमान प्रकाशाने मनुष्याचे मन आनंदसागरात पोहू लागते; पण पौर्णिमेचा चंद्र आकाशात मध्यावर येण्याचे सुमारास जसे त्यास राहूने ग्रासून खग्रास ग्रहण पाडावे त्याप्रमाणे 'राजसंन्यास' हे नाटक अर्धेमुर्धे तयार झाले नाही तोच क्रूर मृत्यूने गडक-यांस ग्रासून त्यांच्या 'राजसंन्यासा'स कायमचे खग्रास ग्रहण लावले हे मराठी भाषेचे व महाराष्ट्राचे केवढे दुर्भाग्य! पण ज्याप्रमाणे खग्रास सूर्यग्रहण किंवा खग्रास चंद्रग्रहण यांचे वेळी ज्योतिषी आपल्या दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्याचे किंवा चंद्राचे सावकाश व सूक्ष्म निरीक्षण करून त्या त्या गोलाचे विशेष ज्ञान मिळविण्यात उपयोग करतात, त्याप्रमाणे कै. गडक-यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नाटकांचा विशेष कोणकोणत्या बाबतीत आहे हे येथे सांगणे अप्रासंगिक होणार नाही. नाटकपंचकाचे सविस्तर परीक्षण करण्यास नाटकांइतकाच मोठा ग्रंथ लिहावा लागेल व तसे करण्यास सध्या मला सवड नाही. या गेल्या पाच-पंचवीस वर्षांत महाराष्ट्रात किती तरी नाटकार झाले आहेत व होत आहेत; कारण आमच्या महाराष्ट्रात हल्ली नाटकांचा फार नाद लागलेला आहे. नाटकावर नाटककार व नाटक मंडळी यांना खूप पैसा मिळतो. यामुळे हा धंदा हल्ली डोळयावर येण्यासारखा झाला आहे. यामुळे किती तरी माणसे या नाटक लिहिण्याच्या नादी लागलेली आहेत. तेव्हा नाटककारांच्या वाढत्या मालिकेत कै. गडक-यांना अल्पावकाशातच अग्रपूजेचा मान का मिळाला व गडक-यांच्या निधनानंतर निरनिराळया ठिकाणी त्यांचे स्मृतिदिन का पाळण्यात येतात, अर्थात् गडक-यांच्या नाटकात इतके अद्वितीयत्व काय आहे हे प्रस्तावनेत सांगणे क्रमप्राप्त आहे; म्हणून थोडक्यात तसा प्रयत्न येथे केला आहे.
कै. गडक-यांच्या नाटकाचा पहिला विशेष कथानकाबाबत आहे. मराठी भाषेत निर्माण होणा-या पुष्कळशा नाटकांकडे नजर टाकली तर असे दिसून येते की, बहुधा नाटकाचे कथानक पुराणातून घेतलेलं आहे किंवा महाराष्ट्रातील व क्वचित् दुस-या प्रांताच्या इतिहासातले आहे. पुराणांतील एखादे नाटकास सोइस्कर कथानक काढ किंवा इतिहासांतील एखादा प्रसंग घे, त्यात थट्टा व विनोद उत्पन्न करण्याकरिता एखाददुसरे पात्र निर्माण कर; लोकांना आवडणा-या अशा काही कल्पना किंवा लोकप्रिय नावे यांचा ओढूनताणून उल्लेख कर; लोकांना नावडत्या गोष्टीची टवाळी कर; ऐतिहासिक कथानक असल्यास कालविपर्यासाच्या दोषाकडे दुर्लक्ष करून लोकप्रिय राजकीय नव्या कल्पना त्या जुन्या काळच्या कथानकांत घुसडून दे! सारांश, इकडून तिकडून काही तरी गोष्टी जमा करून मनोरंजन होईल अशा तऱ्हेने त्या गोष्टीची खिचडी बनव म्हणजे झाले नाटक तयार व झाला तो नाटककार! असाच प्रकार फार दिसून येतो. यामुळे त्या नाटकात एखादे ध्येय नसावयाचे किंवा नाटकाचा विशिष्ट हेतू नसावयाचा, किंवा असल्यास निदान स्पष्टपणे दिसून तरी यावयाचा नाही; पण या बाबतीत गडक-यांच्या नाटकांमध्ये अद्वितीयत्व आहे. आधी गडक-यांची सर्व नाटके सहेतुक आहेत. म्हणजे प्रत्येक नाटकात समाजाला काही तरी एक विशिष्ट बाबतीत उपदेश करण्याच्या हेतूने ती लिहिलेली आहे. अर्थात् तो उपदेश गुरगुरणा-या गुरूप्रमाणे किंवा कर्कश आवाजाने कंठशोष करणा-या गावकाकाप्रमाणे नसून प्रेमळ प्रियवचन पत्नीने केलेल्या उपदेशाप्रमाणे आहे. 'कांतासंभितयोपदेशयुजे' हे काव्यप्रकाशात घातलेले काव्याच्या लक्षणांतील एक पद कै. गडक-यांच्या सर्व नाटयकृतींस अक्षरश: लागू आहे. उदात्त ध्येय व सदुपदेश देशबांधवांपुढे मांडण्याकरिता कै. गडक-यांनी पुराणातली कथानके न घेता ती स्वतंत्रपणे आपल्या प्रतिभाशक्तीने निर्माण केलेली आहेत. त्यांच्या शेवटच्या नाटकाखेरीज सर्व नाटकांची कथानके काल्पनिक आहेत. त्यापैकी तीन तर 'आजकाल'च्या समाजातील मध्यम वर्गाच्या सांसारिक प्रसंगांची आहेत. एक कथानक मात्र कोणच्या काळचे आहे हे समजण्यास साधन नाही. ते पूर्वकाळचे धरणे स्वाभाविक दिसते व ते समाजातील राजेरजवाडयांसारख्या वरिष्ठ दर्जातील लोकासंबंधी आहे. त्यांच्या शेवटच्या नाटकाचा प्रसंग मात्र खरा ऐतिहासिक आहे. गडक-यांच्या 'प्रेमसंन्यासा'चा उद्देश हल्लीच्या समाजातील बालविवाह, विषमविवाह, पुनर्विवाहप्रतिबंध वगैरे दोषांचे हृदयद्रावक तऱ्हेने आविष्करण करून समाजाची सद्सद्विवेकबुध्दी जागृत करण्याचा आहे. त्यांच्या 'पुण्यप्रभाव' नाटकाचा उद्देश स्त्रियांचे उदात्त चरित्र, पत्नी या नात्याने त्यांचा समाजातील दर्जा व निरतिशय सद्गुण आपल्या प्रखर प्रभावाने दुर्गुणी व दुष्ट माणसांनासुध्दा कसा ताळयावर आणू शकतो याचे परिणामकारक चित्र जनमनाच्या हृत्पटलावर खोदण्याचा आहे. त्यांच्या 'एकच प्याला' या नाटकाचा उद्देश सध्या समाजात सरसहा पसरलेल्या एका व्यसनाचे भयंकर सामाजिक परिणाम काय होतात व होत आहेत हे दाखविण्याचा आहे. त्यांच्या 'भावबंधना'चा उद्देश समाजातल्या व्यक्तीचा हटवादीपणा, वृथाभिमान, व्यावहारिक लुच्चेगि-या, विवाहविषयक सौदेवजा कल्पना वगैरे दोघांचे आविष्करण करणे व अशा स्थितीत सुध्दा समाजातील भाबडया प्रेमाचा, विनयाचा व दृढनिश्चयाचा शेवटी विजय कसा होतो हे दाखविण्याचा आहे. त्यांच्या 'राजसंन्यासा'चा उद्देश राजाने आपले कर्तव्यकर्म सोडल्याने देशावर कसे संकट ओढवते व त्या संकटाचे दुष्परिणाम सद्गुणी माणसांस सुध्दा कसे भोगावे लागतात, हे दाखविण्याचा आहे. सारांश, गडक-यांच्या नाटकपंचकाचा पहिला विशेष म्हणजे सहेतुकता हा होय. काही तरी एक हेतू मनात धरून तो निव्वळ जनमनरंजनाचा नव्हे, तर जनमनोन्नतीचा-त्याच्या सिद्ध्यर्थ गडकरी आपल्या नाटकाचे कथानक रचीत. अर्थात् ते स्वकपोलकल्पित असल्यामुळे व पुराणातून किंवा ऐतिहासिक प्रसंगांतून घेतले नसल्यामुळे गडक-यांच्या कथानकात स्वभावविपर्यास, कालविपर्यास वगैरे आमच्या विद्यमान नाटककाराच्या कृतीत दिसून येणा-या दोषांस अवकाशच राहिलेला नाही. त्यामुळे नाटकाचे कथानक व नाटकातले मूलभूत तत्त्व अगर हेतू यांचा सुंदर मेळ गडक-यांच्या सर्व नाटकांत दिसून येतो व म्हणून मराठी विद्यमान नाटकात गडक-यांच्या नाटकपंचकास अद्वितीयत्व आले आहे.
गडक-यांच्या नाटकांचा दुसरा विशेष, शेक्स्पीयरच्या रस्किनने दाखविलेल्या एका विशेषासारखा आहे. Shekespeare has no heroes, he has, all heroines in his dramas. रस्किनच्या म्हणण्याचा अर्थ हा की, शेक्स्पीयरचे नायक हे आदर्शभूत पुरुष नाहीत. प्रत्येक नायकात काही ना काही तरी दोष -दुर्गुण आहेत; पण शेक्स्पीयरच्या नायिका मात्र आदर्शभूत स्त्रिया आहेत. त्या निर्दोष व सद्गुणी स्त्रिया आहेत व कथानकांतील प्रसंगांतून त्यांच्या गुणांनी नायकांची सुटका झाली आहे. रा. गडक-यांच्या नाटकांचा हाच एक विशेष आहे. गडक-यांच्या नाटकांत नायिका व उपनायिका अशा जोडया सर्वत्र आहेत. त्यांच्या लीला- सुशीला, कालिंदी-वसुंधरा, सिंधु-शरद्, मालती-लतिका व येसूबाई -शिवांगी या निरनिराळया नाटकांतील नायिकोपनायिकांच्या जोडया पाहा! खरोखरीच हिंदू समाजातील आदर्शभूत स्त्रियांच्या या मूर्ती नाहीत असे कोण म्हणेल? या सर्व स्त्रियांची पतिनिष्ठा, त्यांचा स्वार्थत्याग, त्यांचा दृढनिश्चय, त्यांचा विनम्र करारीपणा, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचे धैर्य इत्यादि गुण मनुष्याला आश्चर्यचकित करतात; इतकेच नाही, तर न कळत या गुणांची छाप मनुष्यावर पडते व त्याची सद्गुणाकडे प्रवृत्ती वळते, इतकी गडक-यांची ही चित्रे उठावदार उतरली आहेत. तेव्हा या बाबतीत गडक-यांना शेक्स्पीयरच्या जवळ नेऊन बसविण्यास मला काही एक हरकत वाटत नाही.
कै. गडक-यांच्या नाटकपंचकातला तिसरा विशेष म्हणजे त्यांची विनोदी पात्रे. गडक-यांनी नाटकाचा हेतू-निदान त्यांच्या लोकप्रियतेचे एक कारण तरी मनोरंजन आहे, ही गोष्ट सर्वदा ध्यानात ठेविली होती, यात काही एक शंका नाही. म्हणून त्यांच्या प्रत्येक नाटकात एकापासून पाचापर्यंत विनोदी पात्रांची योजना केलेली आहे. मराठी नाटकांत हा अलीकडे सरसहा प्रघातच पडून गेला आहे व गडक-यांनी तो प्रघात चालू ठेवला; पण इतर नाटककारांची पात्रे नुसता पाचकळपणा करून किंवा धांगडधिंगा घालून किंवा शब्दावर शुष्क कोटया करून व शेवटी बीभत्स व अश्लील गोष्टींचा आश्रय करून प्रेक्षकांना हसवितात; म्हणजे इतर नाटककारांचा विनोद फार हलक्या दर्जाचा आहे, तर गडक-यांचा विनोद उच्च दर्जाचा आहे. गडक-यांचा विनोद अर्थचमत्कृतीने आनंद देतो; त्याला अश्लीलपणाचा किंवा बीभत्सपणाचा वास सुध्दा येत नाही. या बाबतीत मराठीतील इतर नाटककार व गडकरी यांमध्ये फरक आहे. हरिभाऊंच्या कादंब-या ज्याप्रमाणे आबालवृध्दांनी व आबालिकापुरंध्रींनी वाचण्यास हरकत नाही, त्याप्रमाणे गडक-यांचा विनोद खरोखर शुध्द, सात्त्वि आनंद देणारा आहे. या बाबतीत गडक-यांनी शेक्स्पीयरच्या वर कडी केली आहे असे मोठया अभिमानाने म्हणता येते. शेक्स्पीयरच्या नाटकात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी न वाचण्यासारखे भाग पुष्कळ आहेत व म्हणूनच शेक्स्पीयरच्या नाटकांच्या शाळेत वाचण्यालायक अशा निराळया आवृत्त्या काढाव्या लागल्या आहेत. गडक-यांच्या बाबतीत एखाददुस-या ठिकाणाखेरीज अशा आवृत्त्या काढण्याची आवश्यकता वाटणार नाही असे वाटते. शेक्स्पीयरच्या काळी लोकांची अभिरुची अश्लीलप्रिय होती म्हणून शेक्स्पीयरला अश्लील प्रकार आपल्या नाटकांत नाइलाजाने आणावे लागले असे शेक्स्पीयरच्या तर्फेने म्हणण्यात येते; पण तसे पाहिले असता महाराष्ट्रातील लोकांची अभिरुची शेक्स्पीयरच्या काळच्या लोकांच्या अश्लीलप्रियतेपेक्षा कमी आहे अशातील भाग नाही; पण शेक्स्पीयर जसा त्या काळच्या अभिरुचीला खुषी राखण्याच्या मोहाला बळी पडला त्याप्रमाणे गडकरी मोहाला बळी पडले नाहीत, म्हणून गडक-यांनी शेक्स्पीयरवर कडी केली असे मला वाटते. असो.
गडक-यांच्या नाटकपंचकाचा शेवटचा विशेष गडक-यांची भाषाशैली. आपली नाटके वाङ्मयदृष्टया वरच्या दर्जाची व्हावी याबद्दल त्यांनी फार खबरदारी घेतलेली दिसते. त्यांनी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविल्यावरच नाटके लिहिण्यास हाती घेतली. यामुळे त्यांची भाषाशैली कमावलेली व बनलेली दिसते. त्यांची वाणी खरोखरीच 'परिणतप्रज्ञस्य वाणी' भासते यात काही एक शंका नाही. त्यांच्या भाषेत ओढूनताणून अनुप्राप्त आणलेले नाहीत तर भाषा गद्यमय काव्यच होय. त्यांनी आपल्या एकाच ऐतिहासिक नाटकाकरिता त्या काळचे भाषाप्रचार आणण्याकरिता फार परिश्रम केले होते असे दिसते. अर्थात् त्या भाषाशैलीचा पूर्ण मासला नाटक अर्धवट राहिल्यामुळे आता दृष्टीस पडणे अशक्य झाले आहे, ही गोष्ट निराळी!
असे हे गडक-यांच्या नाटकांचे विशेष आहेत. म्हणून ही नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनले आहेत. भाषेचा अद्वितीय अलंकारकार कालाने अकाली हरण करून नेला हे मराठी भाषेचे दुर्भाग्य! पण गत गोष्टीला उपाय काय? गडक-यांच्या प्रतिभेने जे हे अलंकार भाषेला लाभले आहेत त्यांचे निरीक्षण-परिक्षण करणे व त्यापासून आनंद, उपदेश व अनुकरणप्रवृत्ति आपल्या अंत:करणात बिंबविणे इतकेच भावी पिढीचे काम आहे. ते करण्याची बुध्दी महाराष्ट्रीयांस होवो अशी आशा प्रदर्शित करून ही घाईघाईने लिहिलेली प्रस्तावना संपवितो.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |