गुरूचरित्र/अध्याय पंचेचाळीसावा
<poem> श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा निरोपिलीसी । नंदीनामा कवि ऐसी । दुसरा आणिक आला म्हणोनि ॥१॥
कवणेंपरी झाला शिष्य । तें सांगावें जी आम्हांस । विस्तार करुनि आदिअंतास । कृपा करुनि दातारा ॥२॥
सिद्ध म्हणे नामधारका । सांगों तुतें कथा ऐका । आश्चर्य झालें कवतुका । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥३॥
गाणगापुरीं असतां गुरु । ख्याती झाली अपरांपरु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत जाहले ॥४॥
नंदीनामा कवि होता । कवित्व केलें अपरिमिता । समस्त लोक शिकती अमृता । प्रकाश झाला चहूं राष्ट्रीं ॥५॥
ऐसें असतां एके दिवसीं देखा । श्रीगुरुसी नेलें भक्तें एका । आपुले घरीं शोभनदायका । म्हणोनि नेलें आपुले ग्रामा ॥६॥
हिपरगी म्हणिजे ग्रामासी । नेलें आमुचे श्रीगुरुसी । पूजा केली तेथें बहुवसी । समारंभ थोर जाहला ॥७॥
तया ग्रामीं शिवालय एक । नाम 'कल्लेश्वर' लिंग ऐक । जागृत स्थान प्रख्यात निक । तेथें एक द्विजवर सेवा करी ॥८॥
तया नाम 'नरहरी' । लिंगसेवा बहु करी । आपण असे कवीश्वरी । नित्य करी पांच कवित्वें ॥९॥
कल्लेश्वरावांचूनि । आणिक नाणी कदा वचनीं । एकचित्तें एकमनीं । शिवसेवा करीतसे ॥१०॥
समस्त लोक त्यासी म्हणती । तुझे कवित्वाची असे ख्याति । श्रीगुरुसी कवित्वावरी प्रीति । गुरुस्मरण करीं तूं कांहीं ॥११॥
त्यांसी म्हणे तो नर । कल्लेश्वरासी विकिलें जिव्हार । अन्यत्र देव अपार । नरस्तुति मी न करीं ॥१२॥
ऐसें बोलोनियां आपण । गेला देवपूजेकारण । पूजा करितां तत्क्षण । निद्रा आली तया द्विजा ॥१३॥
नित्य पूजा करुनि आपण । कवित्व करी पार्वतीरमणा । ते दिवसीं अपरिमाण । निद्रा आली तया देखा ॥१४॥
निद्रा केली देवळांत । देखता जाहला स्वप्नांत । लिंगावरी श्रीगुरु बैसत । आपण पूजा करीतसे ॥१५॥
लिंग न दिसे श्रीगुरु असे । आपणासी पुसती हर्षें । नरावरी तुझी भक्ति नसे । कां गा आमुतें पूजितोसि ॥१६॥
षोडशोपचारेंसीं आपण । पूजा करी स्थिर मनीं । ऐसें देखोनियां स्वप्न । जागृत झाला तो द्विज ॥१७॥
विस्मय करी आपुले मनीं । म्हणे नरसिंहसरस्वती शिवमुनि । आला असे अवतरोनि । आपण निंदा त्याची केली ॥१८॥
हाचि होय सद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारु । भेट घ्यावी आतां निर्धारु । म्हणूनि आला श्रीगुरुपाशीं ॥१९॥
आला विप्र लोटांगणेंसीं । येऊनि लागला चरणासी । कृपा करीं गा अज्ञानासी । नेणों तुझें स्वरुप आपण ॥२०॥
प्रपंचमाया वेष्टोनि । नोळखें आपण अज्ञानी । तूंचि साक्षात् शिवमुनि । निर्धार जाहला आजि मज ॥२१॥
कल्लेश्वर कर्पूरगौरु । तूंचि होसी जगद्गुरु । माझें मन झालें स्थिरु । तुझे चरणीं विनटलों ॥२२॥
तूंचि विश्वाचा आधारु । शरणागता वज्रपंजरु । चरणकमळ वास भ्रमर । ठाकोनि आलों अमृत घ्यावया ॥२३॥
जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु । घरा आलिया कामधेनु । दैन्य काय आम्हांसी ॥२४॥
पूर्वीं समस्त ऋषि देखा । तप करिती सहस्त्र वर्षें निका । तूं न पवसी एकएका । अनेक कष्ट करिताति ॥२५॥
न करितां तपानुष्ठान । आम्हां भेटलासि तूं निधान । झाली आमुची मनकामना । कल्लेश्वर लिंग प्रसन्न झालें ॥२६॥
तूंचि संत्य कल्लेश्वरु । ऐसा माझे मनीं निर्धारु । कृपा करीं गा जगद्गुरु । म्हणोनि चरणीं लागला ॥२७॥
श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी । आजि कैसें तुझे मानसीं । आलासी भक्ति उपजोनि ॥२८॥
विप्र म्हणे स्वामियासी । अज्ञान अंधकार आम्हांसी । कैसे भेटाल परियेसीं । ज्योतिर्मय न होतां ॥२९॥
म्यां कल्लेश्वराची पूजा केली । तेणें पुण्यें आम्हां भेटी लाधली । आजि आम्ही पूजेसी गेलों ते काळीं । लिंगस्थानीं तुम्हांसि देखिलें ॥३०॥
स्वप्नावस्थेंत देखिलें आपण । प्रत्यक्ष भेटले तुझे चरण । स्थिर जाहलें अंतःकरण । मिळवावें शिष्यवर्गांत ॥३१॥
ऐसें विनवोनि द्विजवर । स्तोत्र करीतसे अपार । स्वप्नीं पूजा षोडशोपचार । तैसें कवित्व केलें देखा ॥३२॥
मानसपूजेचें विधान । पूजा व्यक्त केली त्याणें । श्रीगुरु म्हणती तत्क्षण । आम्ही स्वप्नरुप लोकांसी ॥३३॥
प्रत्यक्ष आम्ही असतां देखा । स्वप्नावस्थीं कवित्व ऐका । येणें भक्तें केलें निका । स्वप्नीं भेदूनि समस्त ॥३४॥
ऐसें म्हणोनि शिष्यांसी । वस्त्रें देती त्या कवीसी । लागला तो श्रीगुरुचरणासी । म्हणे आपण शिष्य होईन ॥३५॥
श्रीगुरु म्हणती तयासी । कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हांसी । पूजा करीं गा नित्य त्यासी । आम्ही तेथें सदा वसों ॥३६॥
विप्र म्हणे स्वामियासी । प्रत्यक्ष सांडोनि चरणासी । काय पूजा कल्लेश्वरासी । तेथेंही तुम्हांसी म्यां देखिलें ॥३७॥
तूंचि स्वामी कल्लेश्वरु । त्रयमूर्तीचा अवतारु । हाचि माझा सत्य निर्धारु । न सोडीं आतां तुझे चरण ॥३८॥
ऐसें विनवोनि स्वामियासी । आला सवें गाणगापुरासी । कवित्वें केलीं बहुवसी । सेवा करीत राहिला ॥३९॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । कवीश्वर दोघे श्रीगुरुपाशीं । आले येणें रीतीसीं । भक्ति करिती बहुवस ॥४०॥
म्हणे सरस्वती-गंगाधरु । ज्यासी प्रसन्न होय श्रीगुरु । त्याचे घरीं कल्पतरु । चिंतिलें फळ पाविजे ॥४१॥
कथा कवीश्वराची ऐसी । सिद्ध सांगे नामधारकासी । पुढील कथा विस्तारेंसीं । सांगेल सिद्ध नामधारका ॥४२॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे नरहरिकवीश्वर-वरप्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
( ओंवीसंख्या ४२ )