गुरुस्तुति

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

श्रीगुरुचरणस्मरनस्तवननमन भद्र सर्वदा साचें. श्रीगुरुगुनकीर्तन जें, तेंचि तपज्ञान सर्व दासाचें. ॥१॥


श्रीगुरुच्या उछिष्टें होय विमळ, जेंवि आशय ज्ञानें. तुटतो गुरूपदेशें जैसा, तैसा न पाश यज्ञानें. ॥२॥


गुरुनें जीव शिवचे, बहु बरवी प्रकटूनि हातवटि केला. वृद्ध तरुण शांतनुनें न पसरवुनि, जेंवि हात वटिकेला. ॥३॥


गुरुराज जनक, जननी, बंधु सुहृन्मित्र, सोयरे, स्वजन. भजन श्रीगुरुचें तें गंगावाराणसीगयाव्रजन. ॥४॥


संसारात श्रीगुरु परम हित, न अन्य सोयरा जीव. शिष्यातें मधुप करी, आपण सुरसाढ्य होय राजीव. ॥५॥


सर्वस्व श्रीगुरुला अर्पुनि उत्तीर्ण शिष्य होय न तें कृत्य स्मरुनि, वहावें परिचरणीं देह, जेंवि तोय नतें. ॥६॥


मुख्य प्रसाद गुरुचा होतां, हरिचाहि बहुत बा ! होतो. इछावें कृत्य करिन मी प्रथम मजचि दहांत बाहो तो. ॥७॥


जरि गुरु वळे, हरिहरहि, बहुकाळ नको यशास तरि होया. वश कर्णधार होतां, लागे म्हणणें कशास तरि ‘ हो ! या. ॥८॥


ब्रह्माविष्णुमहेश्वर साक्षात् श्रुतिगीतमहिम गुरु ज्यांस, ते अन्य संसृतीसहि उन्मूळिति, जेंवि अहिमगु रुजांस. ॥९॥


गुरु बंध, गुरु परिग्रह, गुरु पुत्रहि, गुरु तसाचि वाटावा. दाटावा तद्विरहें कंठ, मग न कां भवाब्धि आटावा ? ॥१०॥

उपसंहार ( गीतिवृत्त )

गुरुभक्ताच्या कार्या याव्या, म्हणऊनि या दहा आर्या भक्तामयूरें धार्या लिहिल्या; रुचतिल न कां जना आर्या ? ॥११॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg