Jump to content

राजापुरस्थगंगाप्रतिनिधितीर्थकीर्तन

विकिस्रोत कडून

श्रीमद्भार्गवरामप्रभुवरशरपातजातसंत्रास सिंधु सरे, सहयास त्यजुनि, ग्रह जेंवि लब्धमंत्रास. ॥१॥ तें इषुपातक्षेत्र, स्थल जें सोडुनि जाय अर्णव तो.


त्या सुरतीर्थमयाचा महिमा लघुकविस काय वर्णवतो ? ॥२॥ ‘त्या सुक्षेत्रीं’ म्हणती वृद्ध ‘परमभक्त शुद्रतो भावें


चिंती गंगेसि.’ सुधारसपानें हृदय कां न लोभावें ? ॥३॥ ‘हा गंगे ! तुज अंतीं अंतरलों कीं’ असें दरिद्र वदे.


तो धांवा, मातेच्या हृदया शिशुचा तयापरि द्रव दे. ॥४॥ आली धांवुनि, केलें जें गंगाद्वार तत्समान खळें.


पावावा या सुरभीपासुनि सुजनें, न, वत्समान, खळें. ॥५॥ प्रकटे हरिचरणसुता, उन्मूलूनि क्षणांत मेढीतें.


स्वतरंगाहीं दावी, माय भुजाहीं शिशूसि वेढी तें. ॥६॥ श्रीगंगा मूर्तिमती होऊनि कर्पूरजन्म कदलीतें


हृदयांत लाजवाया, ऐका सुरसिक ! तयासि वदली तें :--- ॥७॥ ‘बहु कारुण्यें, द्रवल्यें, देवूं बा ! काय वासरा ! मागें.


बा ! माज्या या हृदयीं केला न क्षणहि वास रामागें.’ ॥८॥ नमुनि भगवतीस म्हणे, ‘हा माते ! म्यां बहु श्रमविलीस;


जे तूं श्रीजगदीशें निजशुद्ध जटांत कीं रमविलीस. ॥९॥ या चरणदर्शनाहुनि मागावें अधिक तें दिसे न मला.


तुज तरि याहुनि बहुमत वर, माते ! सांग कोण तो गमला ? ॥१०॥ तरि मावल्ये ! करावी, धावुनियां कलियुगीं, असीच दया.


हा दास दीन नेणे मागोंसें, म्हणसि ‘बोल, हूं, वद, या.’ ॥११॥ ते वत्सला म्हणे, बा ! भूतदया सुगुण हा न सामान्य.


हे नसती तरि कैसा होतासि यशें जगीं असा मान्य ? ॥१२॥ स्नानें करितिल माघापासुनि वैशाखमासपावेतों.


बा ! तें हें, चातकशिशु आ करि जों, मेघ त्यास पावे तों. ॥१३॥ परि तुजसम जे दुर्बळ, भोळे, सद्भक्त, तेचि तरतील.


स्पर्श न करतिल बालिश, ‘पाणी पाणी; म्हणोनि मरतील. ॥१४॥ तुजकरितां प्रतिवर्षीं येइन, जड निंदितील, सोसीन,


मीं शरण आलियांतें, प्रक्षाळुनि सर्व पंक, पोसीन.’ ॥१५॥ ऐसें वदली गंगा, क्षीरें न्हाणून वत्स, तर्पून.


वाणीतें प्रभु रक्षिति, अधनीं कन्येसि जेंवि अर्पून. ॥१६॥ येते अद्यापि श्रीगंगा राजापुराचिया जवळ;


कोंकण करि ती, विखरुनि शुद्धयशश्चंद्रचंद्रिका, धवळ, ॥१७॥ मज एकवेळ घडलें, सत्संगतिनें, अलभ्य मज्जन ! हो ! ॥१८॥


या तीर्थकीर्तनाचा पडला, त्या तीर्थकीर्तनें विसर. नग लेऊनि, विसरावा मुक्तांचा सुगुणपूर्ण जेंवि सर. ॥१९॥


गंगा म्हणे, ‘अहा ! या माझी कैसी सुकीर्ति धवळील ? मद्रूप विसरला, जें केवळ कारुण्य मूर्त जवळिल.’ ॥२०॥


हे लागलीच चिंता गंगेला, म्हणुनि मज दिलें स्मरण, कीं गंगेचेंचि सुद्दढ, सर्वजनोद्धार, सदूव्रताचरण, ॥२१॥


कडियेवरि नच घेतां स्तन्यामृत काय बाळ कवळील ? स्तवन असोचि गुरुदया नसतां जड पशुहि नीट न वळील. ॥२२॥


जें गंगेसि वहावें, गंगाप्रभुच्या पदींच तें बाहे. वाहे अन्या जैशा, तैशी ऐशाहि रीतिनें वाहे. ॥२३॥


कीर्तनभक्ति इलुसि मज दाखवुनि, मनास लाविला चटका. हा लाभ, परि निजसुखानुभवावांचूनि, ताविला चटका. ॥२४॥


गंगेला जायाला, मज हतभाग्या न शक्ति, न उपाय. स्तुति सूचविलि, प्रभुचे, देति प्रणतासि भक्ति नउ, पाय. ॥२५॥


भक्तमयूरमनोनट नटतो, सामान्य कीं बरा नटतो ? श्रीरामचि हें जाणे, उरला व्यापूनि सर्वही घट तो. ॥२६॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.