Jump to content

गजानन विजय/अध्याय २०

विकिस्रोत कडून

<poem> ॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।

देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥

तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं ।

मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥

माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।

राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥

यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष ।

खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥

म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।

पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥

असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर ।

म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥

शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती ।

आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥

समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर ।

कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥

आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? ।

देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥

ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती ।

महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥

जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ।

ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥

तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ ।

ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥

ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां ।

गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥

हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा ।

नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥

अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी ।

बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥

एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस ।

उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥

केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी ।

शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥

तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां ।

हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥

उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी ।

कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥

हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें ।

दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥

फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती ।

गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥

हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण ।

तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥

तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी ।

उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥

त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें ।

प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥

यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर ।

येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥

अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य ।

त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥२६॥

पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी ।

म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥

ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस ।

तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥

आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार ।

सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥

मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची ।

तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥

असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें ।

त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥

या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची ।

जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥

लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां ।

बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥

कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत ।

हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥

घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या घेतला मनें ।

कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥

असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं ।

तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥

आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा ।

ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥

तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य ।

ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥

तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी ।

चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥

गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर ।

यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥

पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी ।

तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग तें ॥४१॥

पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? ।

अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥

उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास ।

हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥

खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण ।

म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥

लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला ।

तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥

मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी ।

प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥

अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी ।

भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥

एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी ।

आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥

हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर ।

त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥

दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली ।

अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥

आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन ।

ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥

जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी ।

रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥

तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून ।

आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥

मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें ।

पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥

जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार ।

जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥

शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी ।

जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥

दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात ।

जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥

झंझावात बळावला । कडकडाट करी चपला ।

मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥

मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा ।

शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥

शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण ।

तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥

तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं ।

बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥

हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां ।

अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥

कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।

त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥

तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन ।

करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥

दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन ।

मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥

तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर ।

तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥

जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता ।

वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥

कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन ।

तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥

ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी ।

उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥

ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां ।

पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥

पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें ।

जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥

वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा ।

दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥

बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी ।

कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥

साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन ।

हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥

कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही ।

ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥

एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार ।

हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥

यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला ।

त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥

परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना ।

फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥

फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी ।

स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥

हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त ।

उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥

तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला ।

भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥

पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी ।

डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥

कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर ।

त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥

जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी ।

नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥

परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे ।

येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥

घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी ।

भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥

यादव म्हणे मनांत । भिकारी हा लोचट बहुत ।

नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥

त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन ।

सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥

दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य ।

फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥

तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें ।

तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥

हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन ।

आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥

कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण ।

श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥

पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे ।

श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥

ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार ।

तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥

त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी ।

रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥

ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता ।

कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥

भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी ।

होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥

पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले ।

तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥

यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला ।

तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥

संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? ।

कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥

तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार ।

माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥

तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? ।

ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥

फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात ।

तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥

रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी ।

यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥

परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला ।

ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥

सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं ।

फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥

तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या ।

विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥

विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत ।

तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥

आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला ।

तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥

समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं ।

निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥

भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर ।

त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥

म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला ।

सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥

गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची ।

वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥

बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं ।

अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥

तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित ।

आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥

ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत ।

कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥

आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों ।

नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥

बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला ।

घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥

रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी ।

वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥

तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला ।

कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥

गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार ।

गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥

म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला ।

हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥

खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत ।

अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥

तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण ।

आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥

काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला ।

वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥

तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार ।

मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥

ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां ।

कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥

मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों ।

वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥

बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले ।

तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥

मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य ।

प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥

बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला ।

म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥

हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण ।

गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥

तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला ।

डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥

गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर ।

या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥

तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें ।

नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥

हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली ।

तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥

हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार ।

मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥

सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला ।

वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥

मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें ।

व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥

आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा ।

करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥

समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत ।

मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥

संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी ।

भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥

दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी ।

आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥

एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार ।

तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥

त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला ।

बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥

दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें ।

वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥

मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना ।

ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥

वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी ।

हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥

शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर ।

उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥

ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां ।

शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥

येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार ।

पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥

दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ ।

घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥

हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें ।

मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥

ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं ।

घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥

आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास ।

शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥

तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला ।

मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥

माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत ।

तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥

अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन ।

हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥

पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी ।

तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥

अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी ।

नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥

त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला ।

मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥

नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी ।

तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥

समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? ।

सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥

दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत ।

नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥

दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा ।

आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥

कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची ।

ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥

ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर ।

प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥

लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी ।

प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥

मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती ।

तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥

तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर ।

औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥

थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला ।

परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥

चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी ।

एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥

वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती ।

कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥

मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला ।

मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥

तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं ।

तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥

पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत ।

हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥

तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी ।

पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥

निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव ।

उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥

रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा ।

परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥

वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार ।

पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥

औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत ।

ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥

त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी ।

मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥

वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें ।

कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥

कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य ।

कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥

कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार ।

दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥

औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले ।

गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥

पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत ।

म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥

कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें ।

कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥

तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी ।

विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥

वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन ।

देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥

माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची ।

आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥

तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान ।

मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥

तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य ।

समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥

गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया ।

वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥

खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची ।

परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥

समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर ।

बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥

हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी ।

त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥

बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें ।

नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥

हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना ।

रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥

ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन ।

म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥

कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं ।

यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥

पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण ।

संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥

श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा ।

अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥

मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर ।

मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥

त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें ।

लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥

ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं ।

निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥

तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें ।

लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥

त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन ।

येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]