गंगाजल/लोक आत्मचरित्र का लिहितात?

विकिस्रोत कडून


अकरा :


लोक आत्मचरित्र का लिहितात?


 आपल्या स्वत:बद्दल लिहावेसे वाटणे हे म्हातारपणाचे लक्षण आहे. मला वाटते, मी पाहिलेली आत्मचरित्रे, आठवणी सर्व म्हाताऱ्यांनीच लिहिलेली आहेत. तरुण माणसांनीही क्वचित स्वत:बद्दल लिहिले आहे, पण ते स्वत:चे एखादे कृत्य वा भूमिका ह्यांच्या समर्थनासाठी आहे. “मी माझा धर्म का सोडला?' “मला कम्युनिझमचा वा भांडवलशाहीचा कंटाळा का आला?"- अशासारखी ती आत्मनिवेदने आहेत. स्वत:च्या आयुष्यावरच आधारलेल्या एखाद्या प्रसंगाचे चित्रण, नाटक, कादंबरी, कथा वा काव्य ह्या रूपानेही ती आपल्यापुढे आलेली आहेत. पण त्यांतही चितारलेल्या स्वानुभवातील 'मी' नाहीसा होऊन त्या 'मी' चे एक सर्वात्मक प्रतीक बनते. अशा त-हेच्या वाङमयातील आनंद, दुःख, त्वेष ही अमक्या-एका कालातील, अमक्या-एका ठिकाणी असलेल्या अमक्या-एका व्यक्तीची न राहता तशा त-हेच्या प्रसंगातील कोणाचीही बनतात. असे झाले असते, तर आपल्यालाही असेच वाटले असते, अशी भावना तशा प्रसंगातून न गेलेल्या व्यक्तींनासुद्धा निर्माण होते. थोड्याफार फरकाने सर्वच वाङमयाबद्दल असे म्हणता येईल. पण आत्मकथा व्यक्तिगत राहते; ज्या गोष्टी आपण आपल्या मित्रांजवळ बोलू, त्या सर्वांजवळ बोलल्या जातात. हे म्हातारपणाचेच लक्षण नाही का?

 माझे एक मित्र काही दिवस 'आत्मचरित्र' म्हणजे काय व लोक ते का लिहितात, ह्याबद्दल सारखी चर्चा करीत होते. त्यांनीही आत्मचरित्र लिहिले होते. ते का, हे त्यांनी सांगितले नाही. मीही विचारिले नाही. पण त्यांचे आत्मनिवेदन काही थोडे प्रसंग वगळल्यास प्रसंगनिष्ठ व वस्तुनिष्ठ झालेले होते. 'आत्मा' एका समाजातील, एका कालातील सुशिक्षित माणसाचे प्रतीक होता. त्यातील 'व्यक्ती' सापडत नव्हती. ते माझ्या मामंजींना विचारीत होते, “अण्णा, तुम्ही आत्मचरित्र का लिहिले?' अण्णांचे उत्तर त्यांच्या स्वभावाला धरून होते. ते म्हणाले, “पुढील लोकांना मार्गदर्शन व्हावे, ही माझी इच्छा," परत मी प्रश्न विचारिला, “चार पाउले उमटवु आपुली ठेवु खुणेचा मार्ग बरा' अशा अर्थाने का?" ते म्हणाले, “होय.” हा हेतू म्हणजे म्हातारपणाची बडबड खासच नाही. कार्य काय, अकार्य काय, चांगले काय, वाईट काय, ह्याबद्दल ज्यांचे विचार पक्के आहेत, कसोटीचा प्रसंग आला असता धीर करून ज्यांनी आपले विचार आचरणात आणिले व ज्याच्या मनात स्वत:बद्दल कधी शंका आली नाही, अशा एका माणसाचे हे उद्गार होते. बेंजामिन फ्रैंकलिनचे आत्मचरित्र असेच असणार. फार काय, अचाट कार्य करणाऱ्या चर्चिलचे आत्मचरित्र, त्याचा तितकाच अचाट शत्रू जो हिटलर त्याचेही आत्मनिवेदन ह्याच त-हेचे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामुळे, कार्याच्या व्याप्तीमुळे व लिहिण्याच्या शैलीमुळे त्यांत फरक आहे, जमीन- अस्मानाचा वाटावा, इतका फरक आहे; पण त्या निवेदनाच्या मागची भूमिका सारखीच. हेही एक प्रकारे आत्मसमर्थनच आहे; पण त्याच्या बुडाशी स्वत:बद्दलची म्हणजे स्वत:च्या कृत्यांच्या, व मतांच्या सर्वथैव योग्यतेची खात्री आहे.

 मी ज्या आत्मनिवेदनाबद्दल बोलते आहे, ते ह्या प्रकारचे नव्हे. ते एक निवेदन असते,-अगदी स्वत:बद्दलचे निवेदन असते. त्याच्या पाठीमागे काही मोठा हेतू नसतो. आपले सांगावेसे वाटते, बोलावेसे वाटते, म्हणून बोललेले असते. त्या बोलण्यात नेहमीच्या बोलण्याप्रमाणेच खूपसे लपविलेले असते; पण बरचसे लपविलेले निसटून बाहेर पडतेच. स्वत:बद्दलचे खूपसे सांगितलेले असते; पण म्हातारपणीच असे का सांगावेसे वाटते?

 सर्वच म्हातारी माणसे खूपच बडबडतात. त्यातली काही साक्षर असतात. साक्षरांतल्या काहींना आपली बडबड कागदावर उतरवायला वेळ असतो. ही बडबड छापून काढणारे काही आढळतात. कारण अशी कागदावर उतरलेली, स्वत:च्या घरच्या नसलेल्या म्हाताऱ्याची वटवट ऐकायला काही रिमाटेकड्या लोकांना वेळ असतो.

 सगळे खरे, पण रिकामा वेळ असला म्हणून तरी स्वत:बद्दल लिहावेसे का वाटावे? तरुणपणी का वाटत नाही? म्हातारपणीच का वाटावे?  ह्या प्रश्नाचे उत्तर अगदी अचानक दोन प्रसंगी, दोन तर्‍हानी मिळाले. एझुपेरी नावाच्या फ्रेंच लेखकाने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी घरदार सोडून अमेरिकेत स्थायिक होण्यास निघालेल्या लोकांचे वर्णन केले आहे : “(लिस्बनमध्ये जुगार खेळताना पाहिलेली) ही माणसे बोटीवर मला परत दिसली. ती सर्व अमेरिकेला निघालेली होती. बोट एका खंडातून दुसऱ्या खंडाला जायला निघाली होती. माल कोणता? - ज्यांची मुळे तुटली आहेत, अशा ह्या झाडांचा. ज्यांशिवाय अगदी चालायचेच नाही, एवढ्याच वस्तू मी आपल्याबरोबर घेतल्या होत्या. पण ही माणसे खिशात हात घालून आपल्या नावाची कार्डे -आपल्या व्यक्तित्वाची उरलीसुरली फुटकी निशाणी- शोधशोधून काढीत होती. आपण कोणीतरी आहोत, हा खेळ ती परत खेळत होती. आपल्याला काहीतरी अर्थ आहे, ही समजूत टिकविण्यासाठी ती आपली ओढाताण करीत होती. 'तुम्हांला माहिती आहे का? मी तो अमका- तमका.' असे ती म्हणत होती. 'मी अमक्या गावचा, त्या तमक्याचा मित्र, तुम्हांला माहीत आहे ना तो?' आणि मग ती दुसऱ्याला निरनिराळे लांबलचक इतिहास ऐकवीत होती : कोठच्यातरी मित्राचा, कोठच्यातरी केलेल्या कामाचा. ज्यांमध्ये काही अर्थ नाही व कोणाला स्वारस्य नाही, अशा काहीतरी लांबलचक हकीकती ती सांगत बसत... आपण खरेच परतणार आहो, असा एक विचित्र खेळ ती मनाशी खेळत होती.

 "माणूस शेजारी गेले आहे की सातासुद्रापलीकडे गेले आहे, ह्याला महत्व नसते. एखाद्या मित्राची वाट पाहत असावे, त्याचे येणे लवकर होऊ नये, अशा वेळी त्याचे आपल्या मनातील अस्तित्व हे शरीराने त्याच्या जवळ असण्यापेक्षासुद्धा तीव्रतेने जाणवते. मी सहारात होतो, त्या वेळी माझे आपल्या घरावर जेवढे प्रेम होते, तेवढे इतर केव्हाही नव्हते. सोळाव्या शतकात खलाशी जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या टोकाशी वाऱ्याच्या भिंतीतून आपली गलबते नेत-नेत वर्षे मोजीत होते, तेव्हा ते आपल्या प्रियेच्या जितके जवळ होते, तितके कोणीही जवळ नसेल. त्यांचे प्रयाण ही त्यांच्या परत येण्याची सुरुवात होती. जायच्या दिशेने जेव्हा ते शिडे उभारीत, तेव्हा खरोखर त्यांची परतीची तयारी चाललेली असे. ब्रिटनीच्या बंदरातून प्रियेच्या घरी जाण्यासाठी सगळ्यांत जवळचा रस्ता आफ्रिकेच्या केप हॉर्नवरून गेलेला होता. आता ह्या बोटीवरून जाणारी माणसे ब्रिटनीच्या त्या खलाशासारखी होती; पण कोणीतरी त्यांची ब्रिटनीमधली प्रियाच हिरावून नेली होती. त्यांना रात्री-अपरात्री वाट दिसावी म्हणून ब्रिटनीमधली कोणीही बाई आपल्या खिडकीत पणती ठेवून बसली नव्हती. घरावर रुसून गेलेल्या मुलासारखीही ही नव्हती. ती बाहेर निघाली होती हे खरे; पण परत जायला त्यांना घरच उरले नव्हते. जेथे व्यक्तिमत्त्व, स्वत्व नाहीसे झाले आहे, अशा खऱ्या प्रयाणाला ती निघाली होती...

 "त्यांना कोणतीही मानवी घनता नव्हती. ज्यांना अमुक-एक घर आहे. अमुक-एक मित्र आहे, अमुक-एक जबाबदारी आहे, अशी ती माणसे नव्हती. हे सर्व आपल्याला आहे, असे ती वागत होती. पण तो निव्वळ एक खेळ होता. कोणाला त्यांची गरज नव्हती. कोणीही त्यांच्याकडे मदत मागायला जाणार नव्हते."

 म्हातारी माणसे अशाच महाप्रयाणाला निघालेली असतात. येथले सर्व काही-आपले घर, आपली आळी, आपली माणसे, ज्याने म्हणून मानवी जीवनाला घनता आलेली असते, जे-जे म्हणून येथल्या मातीत दृढमूल झालेले असते, ते सर्व टाकून त्यांना जायचे असते. परत यायचे नसते. जेथे जायचे, तेथे येथल्या ओळखीदेखी उपयोगी नसतात. येथल्या कोणालासुद्धा त्यांची गरज नसते, आणि अगदी अशाच वेळी त्यांना स्वत:बद्दल, स्वत:च्या अनुभवांबद्दल, स्वत:च्या मित्रांबद्दल बोलावेसे वाटते.

 एझुपेरीचे पुस्तक न वाचलेल्या माझ्या एका बालमैत्रिणीने अगदी अशाच तर्‍हेचे शब्द परवा उच्चारिले. प्रश्न होता कोल्हापूर सोडण्याचा,-पुण्याला येऊन राहण्याचा. "लग्नानंतरचे सर्व आयुष्य येथे गेले. येथे रस्त्यातून गेले, तर पंचवीस माणसे ओळखीची भेटतात. कुणी मदत मागायला येतात, कुणी सल्ला विचारायला येतात. कुणाला गरज आहे, ते आपल्याला माहीत असते. दोन दिवस आम्ही दिसलो नाही, तर लोक घरी विचारपूस करायला येतात. पुण्याला सुट्टीत गेले होते. सबंध आठवड्यात कोणी ओळखीचे भेटले नाही. भाऊ व नातेवाइक आपापल्या कामांत वा मेळाव्यात दंग. आपली कोणाला गरजच नाही. मला इतके चमत्कारिक वाटले. मी आले बाई निघून परत." लहानपणची तिची पुण्यातल्या मातीतली मुळे तुटली होती. म्हातारपणी नवी मुळे येण्याची तिला तरी शक्यता वाटत नव्हती.

 व्यक्तिमत्त्व, वैशिष्ट्य, मीपणा हे सर्व माझे स्वत:चे खाजगी असे काहीतरी आहे, असा माझा समज होता. फक्त मलाच हे तीन गुण आहेत, इतरांना नाहीत, हा माझा ग्रह कधीच नव्हता. उलट प्रत्येक व्यक्तीला ते आहेत. अगदी साधारण व्यक्तीतसुद्धा असाधारण वैशिष्ट्यांचा मीपणा आहे, असा माझा आग्रह आहे. माझी जी चूक होती, ती हे वैशिष्ट्य काहीतरी सर्वस्वी खाजगी आहे, असे वाटण्याची. मीपणा- इतरांपासूनचे आपले असे निराळे अस्तित्व -ह्याची जाणीवच मुळी इतरांबरोबरच्या व्यवहारातून होते. आपल्याबद्दलचे स्वत:चे असे जे चित्र असते, ते इतरांच्या आपल्याबद्दल ज्या आकांक्षा असतात, इतरांशी आपला जो संबंध येतो, त्यांतून उत्पन्न झालेले असते. अनामातून, निराकारातून आपण जन्माला आलेले असतो. जन्माला येतानाच आपल्याला आकार मिळतो. थोड्याच दिवसांत नाव मिळते आणि जन्मभर त्या नावाच्या त्या आकृतीत अनुभवांची भरती होत-होत व्यक्तिमत्व जमत राहते. “उपजलिया बाळकासी। नाव नाही तयापासी। ठेविलेनि नावेसी। ओ देत उठी।।"... नाव ठेविले, तरी ते नाव आपले आहे, हे कळायला वेळ लागतोच. ते नाव व ती आकृती मिळून एक 'मी' ची जाणीव होते. मग असंख्य देवाण-घेवाणीतून त्या 'मी' ला विशिष्ट आकार येत राहतो. भोवतालचे वस्तुमय जग सारखे अपेक्षा निर्मीत असते. त्यांतील काही, आपली आळी, आपले घर, आपले गाव अशा त-हेच्या ममत्वाने 'मी' चे भाग बनून जातात. आपण कोणाचे तरी मूल असतो, कोणाचेतरी भावंड असतो; कोणाचीतरी बायको, आई, काकू, मैत्रीण, शत्रू असतो; गुरू, मालक, नोकर असतो. प्रत्येक संबंधात आपण कुणाच्यातरी अपेक्षेप्रमाणे वागत असतो व कोणाकडून कशाची तरी अपेक्षा करीत असतो. प्रत्यक्ष परस्पर-संबंधातून अप्रत्यक्ष दूरवर पसरलेले संबंध निर्माण होतात. परस्पर-अपेक्षेतून मूल्ये निर्माण होतात. उतारवयात व्यक्तिमत्त्व, मीपणा कमी होत जातो. प्रत्यक्ष संबंध संकोचतात: म्हाताऱ्या माणसाने आयुष्याच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप केला, तर असे आढळते की, ह्या वाटेवरचा एक एक मैलाचा दगड म्हणजे एक हरवलेली व्यक्ती, एकेक हरवलेला संबंध असतो. आई-वडील, भावंडे, सासू-सासरे, दीर-जाऊ जे-जे म्हणून गेलेले असते, त्यांच्या संबंधाची स्मृती, छाया राहते, पण प्रत्यक्ष संबंधाचा उत्कटपणा नाहीसा झालेला असतो. 'ही माणसे जिवंत असताना आपल्या हातून असे झाले नसते, तर बरे झाले असते,'.... 'असे झाले असते तर...' अशी खंत वाटून एक प्रकारच्या विषण्णतेने आत्मा झाकळून जातो. शेवटी शेवटी तर दुःखाची वा अपराधाची जाणीवही नाहीशी होते. आपल्या आत्म्याचे दु:खही नाहीसे व्हावे, स्मृतीची तीव्रताही जावी, म्हणजे व्यक्तिमत्वाचाच लोप नाही का? व्यक्तिमत्त्वाचा विकास जसा परस्पर संबंधाने दोन अंगांनी होतो, तसा लोपही दोन अंगांनी होत असतो. ज्यांमुळे स्वत्वाची जाणीव झाली, त्यांना आतून आत्मा विसरत असतो. बाहेरून इतर लोक त्या व्यक्तीला विसरत असतात. एखादी महान व्यक्तीसुद्धा एक पुसट आठवण म्हणून राहते. माझ्या मामंजींना 'भारतरत्न' ही पदवी मिळाली, त्याचे दिल्लीहून मुंबईला पत्र आले व 'मालक सापडत नाही,' ह्या शेऱ्यानिशी परत गेले. हा प्रसंग मी विसरूच शकत नाही. शाळेतल्या पुस्तकांतून ज्याच्याबद्दल धडा येतो, असा हा गृहस्थ जिवंतपणी बऱ्याच जणांना फक्त नाममात्रच झाला होता,- तोसुद्धा मुंबईत! त्यांनी तरुणपणी विधवाविवाह केला; त्यांच्याबद्दल पुणे-मुंबईच्या वर्तमानपत्रांनी उलट-सुलट टीका केली; गावाने त्यांना वाळीत टाकिले. त्या वेळी त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्कट होते. ते कोणाचेतरी, कशाचेतरी विरोधक होते. ते कोणत्यातरी व्यवहाराचे हिरीरीने मंडन करीत होते. शेवटी ते जगाला विसरले होते: जग त्यांना विसरले होते. ह्याच अर्थाने व्यक्तिमत्त्वाचा लोप होतो, असे मी म्हटले. प्रेम आणि राग, मैत्री आणि विरोध, आपुलकी आणि दुरावा-अगदी त्रयस्थपणासुद्धा- अशा अनेक व्यवहारातूनच माझा अमुकपणा निर्माण होतो. निरनिराळ्या व्यक्तींना मी निरनिराळी असते, माझी भूमिकाही प्रत्येकाशी निरनिराळी असते. वयाप्रमाणे हा व्यवहार कमी होतो. जी अगदी जवळची असतात. ती मेलेली तरी असतात किंवा दूर तरी गेलेली असतात. कृतीमागील व विचारामागील तारुण्यातील उत्कटता नाहीशी होऊन फक्त आचाराच्या व विचाराच्या सवयी तेवढ्या राहिलेल्या असतात. संध्येच्या दाट छाया सबंध दिवसभर पडलेल्या असतात. सर्वस्वी नाहीसे होण्याच्या काळोखात जाण्याची वेळ आलेली असते, आणि अगदी ह्याचमुळे आत्मनिवेदनाची उबळ येते.

 'खुणेचा मार्ग' मागे ठेवून पुढच्या पिढीला वाट दाखवावयाची ह्या विचारामागेसुद्धा बऱ्याच अंशी वरील भावना असते. स्वत:ची 'खूण' ठेवायची धडपड असते. सर्व 'अमुकपणा'. सर्व 'मीपणा' नाहीसा होणार, अजिबात जाणार हे कळते, आणि जन्मभर ज्याने सोबत केली तो मीपणा टिकावा, ज्यांच्यामुळे हे व्यक्तिमत्त्व मिळाले त्यांच्या स्मृतीत काही दिवस घर करून राहावे, म्हणून धडपड चालते. कोणी बोलत राहतात, कोणी फोटो काढतात, कोणी आपली बडबड कागदावर उतरवितात. "मी अमुक-अमुक आहे.- इथेच आहे,- अगदी तुमच्यातच आहे," असा तो आक्रोश असतो.

१९६८