गंगाजल/एकाकी

विकिस्रोत कडून



दहा :


एकाकी


 मी एकटी आहे. मी काय एकाकी आहे होय? मुळीच नाही. माझ्याभोवती माझी काळजी घेणार्‍यांची गजबज आहे. मग मी काय असहाय आहे ? अंहं. मी हाक मारण्यापूर्वीच कितीतरी हात मला मदत द्यायला तयार आहेत, कितीतरी पाय माझ्यासाठी धावताहेत. इतकी माणसे भोवती पण कुणाला म्हणून माझ्या अंत:करणाचा ठाव सापडला नाही, असा का प्रकार आहे? छे! तसेही नाही. माझ्या अंत:करणाचा ठाव ज्यांना सापडला, अशीही पुष्कळ आहेत. मग मी एकटी कशी?

 मी एकटीच होते, -आहे, व पुढेही एकटीच असणार आहे. हे उमजायला जवळजवळ सगळे आयुष्य जावे लागले! सगळ्या गोष्टींचे हे असेच आहे. सर्व आपल्या डोळ्यांपुढे असते, पुस्तकातून वाचीत असतो, समजले आहे असा भास होत असतो. एक दिवस, -कसे कोण जाणे? - अंतरी एकदम वीज चमकावी असा प्रकाश पडतो व खरोखरचे समजते. मी माझ्या स्कूटरवर बसून स्वतंत्रपणे ती चालवू लागले तेव्हाची गोष्ट. पहिल्याच दिवशी माझ्यापुढे एक टांगा होता. टांग्याचा वेग किती, मोटारीचा वेग किती, या गोष्टी मला अगदी तोंडपाठ होत्या. मला टांग्याच्या पुढून एक वळण घ्यावयाचे होते. मी आपली वाट पाहत होते, टांगा पुढे सटकेल आणि आणि मी वळेन म्हणून. एकदम माझ्या डोक्यात लख्ख झाले. अरे, मी तर टांग्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने जाऊ शकते की!

 एखादे वेळी डोक्यात प्रकाश पटदिशी पडतो. कधीकधी फार-फार वेळ लागतो. मोठ्या श्रमाने मी कितीतरी गोष्टी एकत्र केल्या होत्या. द्राविड  भाषांमधील नात्यांचे शब्द माझ्याजवळ जमले होते. वंशावळीही खूप होत्या. पण द्राविड कुटुंबरचनेचे सूत्र काही लक्षात येत नव्हते. गोळा केलेली माहिती शक्य तितक्या मुद्देसूदपणे मांडून ‘अमक्या-अमक्या गोष्टीमागील सूत्र काही उमजत नाही,' म्हणून लेख लिहिला. तो प्रसिद्ध झाला, पण मनाचे काही समाधान होत नव्हते. असे महिनेच्या-महिने गेले. असमाधान, सूक्ष्म रुखरूख हा एक स्थायी भाव होऊन बसला होता. पण वरवर मात्र मन आणि शरीरही इतर कामांत व्यग्र होती. एक दिवस मी सकाळी उठले, ती द्राविड कुटुंबरचनेचे उलगडलेले सूत्र घेऊनच. माझा पूर्वीचा लेख काढून त्यात उल्लेखिलेल्या सर्व गोष्टी डोळ्यांखाली घातल्या. आता कशी सार्‍या विसंगतींना संगती लागत होती; एखादेही टोक विनासंदर्भ अधांतरी लोंबत राहिलेले नव्हते. जे विचार करकरूनही समजत नव्हते, ते विनासायास हाती आले तरी कसे? असे काही झाले म्हणजे मला एका ओळीची आठवण होते. "नायमात्मा प्रवचनेन लभ्यः, न मेधया, न बहुना श्रुतेन। यमेवैष वृणुते तेन लभ्यः...।।" हा आत्मा आहे ना, तो प्रवचनाने मिळत नाही, बुद्धीने हाती लागत नाही, पुष्कळ पढून गवसत नाही. तो स्वत: होऊन ज्याला निवडतो, त्यालाच तो मिळतो. ही ओळ मनात आली की, कॉलेजात शिकलेला इंदुमतीस्वयंवराचा सर्ग आठवतो व डोळ्यांपुढे चित्र उभे राहते ते स्वयंवराचे. किती राजकुमार बिचारे जिवाचा आटापिटा करीत होते, पण तिने ज्याला माळ घातली, त्यालाच ती मिळाली. तस्सा खट हा आत्मा आहे. म्हणजे काय खटपटच करू नये? कोणी म्हणतात, ह्या वाक्यात परमेश्वरी कृपेचे सूत्र गोवलेले आहे. ईश्वर म्हणतात ना, तो तपश्चर्येने लाभत नाही, त्याची कृपा व्हावी लागते!

 अगदीच ह्याच त-हेने एक दिवस एकदम मला ज्ञान झाले की, मी एकटी आहे.

 ध्यानी-मनी नसता डोक्यात जो प्रकाश पडतो, त्याला कृपा म्हणता येईल का? ज्ञानाचा हा झोत मलातरी विजेच्या लोळासारखा वाटला. मी त्यात भाजून निघाले, तडफडले. वरून जिवंत होते, तरी आतून मेल्यासारखी झाले. एकटे असणे ही गोष्ट काय एवढी भयंकर आहे? जगाच्या गलबल्याने कंटाळून एकटे असावे, असे वाटत नाही का कधी? मनस्वी राग आला, म्हणजे नाही का आपण होऊनच माणूस जगापासून दूर होण्याचा प्रयत्न करीत?   रागाने दूर निघून जाणे, रुसून कोप-यात बसणे, जगाला कंटाळून लांब जाणे हे सर्व प्रकार खरे एकटेपणाचे नव्हत. आपली चहा होत नाही, लोकांना आपले अंतरंग समजलेच नाही, असे वाटून मनुष्य जेव्हा रागाने जातो, तेव्हा मनाच्या कुठच्यातरी कोप-यात जगाच्या निकटपणाची जाणीव त्याला असतेच. जगाने माझी आज उपेक्षा केली, तरी उद्या त्याला माझी किंमत कळेल, ह्या गावी माझी बूज राहिली नाही, तरी कुठेतरी दुसरीकडे माझ्या भावनेला खासच साद मिळेल, अशी त्याची खात्री असते. ह्या एकान्तवासाची सर्व भूमिकाच लोकसापेक्ष असते. लोकांपासून तोंड वळविले, तरी पशुपक्षी, झाडे ह्यांच्या सहवासात संतकवी परमेश्वरचिंतन करीत होते असे दिसते. म्हणजे- जरी कोणी रुसले, रागावले, एकान्तवासात गेले, तरी एकटे नसते.

 मला जे एकटेपणाचे ज्ञान झाले, त्यामुळे मी इतकी भांबावून, गडबडून गेले, तो अगदी खराखुरा, अनादि-अनंत असा एकटेपणा आहे. तो माझाच नव्हे, सर्व जीवजातीचा, ज्यात-ज्यात म्हणून चैतन्य आहे, त्याचा एकटेपणा आहे. आपल्या भोवती जी माणसे आहेत, त्यांना आपण कधी भेटलोच नाही, अशा भेटीची शक्यताच नाही; डोळा डोळ्याला भिडतो, काहीतरी मिळालेसे वाटते. पण ती खरी मिळणीच नाही; स्पर्शाची तीव्र अनुभूती ही भेट नव्हे. एखाद्याचा पायरव कानी पडावा, त्याचे शब्द कानी यावे, पण हे सर्व भेटीचे प्रसंग म्हणजे समुद्रात सहजगत्या प्रवाहाने एकत्र येणारी लाकडे जशी एकमेकांना टक्कर देतात, त्यापेक्षा विशेष असे काही नाही. शेवटचा उपाय म्हणून देवाच्या पायांवर डोके ठेविले. मंदिराच्या दाराशी जरा बसले, तेथेही मनात हाच विचार आला, ‘अठ्ठावीस युगे ह्या क्षणाची वाट पाहत तू उभा असणार, जन्म-जन्मांतरीच्या फे-यांत मी चुकून तुझ्या पायांवर येऊन आदळले ही काय भेट म्हणायची? एक आत्मा, दुस-या आत्म्याला भेटणेच शक्य नाही.

 ह्या परिस्थितीला आल्यावर आपण शेवट गाठला, ह्यापलीकडे जाणे शक्य नाही, असे वाटले. माझ्या समजुतीप्रमाणे मी स्वस्थ होते; पण मला न सांगता, न सवरता मन ह्या कोंडीतून सुटण्याचा प्रयत्न करीतच होते. आता पुढे मार्ग नाही, ही कबुली द्यायला मन तयार नसतेच..

 नेहमीच्या वाचनातील ओळी व शब्द निराळ्याच संदर्भात मनापुढे यायला लागतात. शब्द तेच, प्रत्येक शब्दाचा अर्थ तोच, पण मनाच्या स्थितीप्रमाणे वाक्यार्थात निराळेपणा किंवा खोली यायला लागते. 'विश्वात्मकें देवें' हे दोन शब्द कितीदा ऐकिले असतील, डोळ्यांनी वाचले असतील, पण ह्या वेळच्या वृत्तीमुळे मन तेथेच घोटाळत राहिले. विश्वात्मकता, सर्वात्मकता म्हणजे सर्व एकाकी आत्म्यांचे भेटण्याचे स्थान नाही का? प्रत्येकाला विश्वात्म्याची भेट होण्याची शक्यता आहे, व काही असामान्य व्यक्तींना ते साधलेही होते विश्वात्म्याशी भेट म्हणजे सर्वत्र विखुरलेल्या एकाकी जीवांशीही भेट, ही परिस्थिती आपोआपच आली की,-ह्या विचारांनी मनाला बरे वाटले. म्हणजे हा नवा विचार मनात आल्याबरोबर माझी लगेच इतरांशी एकात्मता झाली, असे मुळीच नाही. पण 'एकटेपणा' वर एक तोडगा अस्तित्वात आहे. ह्या जाणिवेनेच बरे वाटले. मी आपली समजूत घातली की, एकटेपणा वाटणे म्हणजे आपल्याभोवती कुंपण घालणे आहे. हे कुंपण तुटले, तर सर्वात्म्याशी व त्याच्या द्वारे इतरांशी खरी भेट होण्याची शक्यता आहे. पण मी आपल्याभोवती शब्दांचे जंजाळ पसरीत होते व बोलाच्याच कढी-भाताने भूक शमविण्याचा प्रयत्न करीत होते.

 ज्या मनाने माझ्यापुढे हा विचार आणिला, तेच शत्रूप्रमाणे माझ्यापाठी लागले होते. मी कुठे दम खाईन किंवा विश्रांती घेईन. ह्याची सोयच नाहीशी झाली होती. कसे का होईना, माझे समाधान झाले होते ना, -पण मन स्वस्थ बसू देत नव्हते. काहीतरी दुवा हाताशी आहे पण सापडत नाही, तसे झाले होते.

 नवा दुवा सापडला, तोही गोष्ट वाचता-वाचताच. पूर्वी वाचलेले पण नक्की आठवेनासे झालेले-फक्त हरहरीच्या रूपाने राहिलेले काय होते, ते समजले व उलगडा झाला, आणि मनाची धडपडही थांबली. "आत्मा एव इदम अग्ने आसीत एक: एवासः अकामयत। बहु स्याम।" पूर्वी पहिल्याप्रथम आत्माच फक्त होता; एक होता. त्याने इच्छा केली, मी पुष्कळ व्हावे."स: अबिभेत तस्माद एकाकी बिभेति"... त्याला भीती वाटली. एकटे असले, म्हणजे अशीच भीती वाटते. “स वै नैव रमे। तस्मादेकाकी न रमते"... त्याला करमेच ना. एकटे असले, म्हणजे करमत नाही. त्याला वाटले, आपल्याला बायको असावी. एकटे असले, म्हणजे असेच वाटते.

 मला खूप हसू आले. एकदम मनावरचे कितीतरी दिवसांचे दडपण गेले. 'सर्वात्मा, सर्वात्मा' म्हणतात ना, तो पूर्वी एक होता. अद्वितीय होता, त्याला एकटे वाटले! त्याला वाटले, पुष्कळ व्हावे!  गम्मतच आहे. एकटे, सर्वात्मक, दुसरे नाही, असे असले म्हणजे इतर असावेत, असे वाटते; ब्रह्म झाले म्हणून काय झाले, त्यालाही कुणाचे तरी बोलणे ऐकावेसे वाटले, कुणालातरी पहावेसे वाटले; म्हणून ते पुष्कळ झाले; आणि त्याचे तुकडे एकमेकांची खरी भेट होत नाही म्हणून रडतातच. एक असतानाच एकाकीपणा घालविण्यासाठी दुकटे व्हायचे, आणि पुष्कळ असल्यामुळे वाटणारा एकाकीपणा घालविण्यासाठी विश्वात्म्याकडे धाव घ्यायची. हे चक्र कधीच थांबणार नाही. माझ्या अगदी आतल्या मनाचेही समाधान झाले वाटते. तेसुद्धा कुरतडायचे थांबून दमलेल्या कुत्र्यासारखे पुढच्या पंजात डोके टेकून शांत निजले.

१९६२