Jump to content

गंगाजल/ते सर्व तूच आहेस

विकिस्रोत कडून

चौदा :


'ते सर्व तूच आहेस!'


 "आज पुरे. माझं डोकं चालत नाही. आजचं तपासून झालं तेवढं उद्या नीट करून आण-पुढचं उद्या वाचू"

 "तुम्हांला बरं आहे ना? माझा रोज येण्यानं त्रास नाही ना होत?" तिने काळजीच्या स्वरात विचारिले.

 "छे, छे! तसं काही नाही. पण हल्ली मला पहिल्यासारखं काम होत नाही. माझी प्रकृती पार बिघडायच्या आत संपवून टाक उरलेलं काम, म्हणजे सुटलीस."

 "किती काळजी करता बाई तुम्ही माझी! काम माझं, आणि ओझं तुम्हांला. दुसऱ्यासाठी फार खपता तुम्ही!"

 ती अगदी मनापासून पण विचार न करिता बोलली. मला हसू आलं. तिनं विचारलं, "हसण्यासारखं बोलले मी?"

 "हसण्यासारखंच नाही तर काय? तू म्हणालीस, 'काम माझं आणि ओझं तुम्हांला म्हणून तुला वाटतं, तू माझी विद्यार्थिनी, मी तुझी शिक्षिका -तुझ्यासाठी मी स्वत:ला झिजविते आहे म्हणून-"

 माझे बोलणे पुरे व्हायच्या आत उताविळीने तिने म्हटले, "मग हे खरं नाही का?"

 मी नकारार्थी मान हलविली. "हे पहा तापी, तू विद्यार्थिनी खरी, पण त्याच्या पाठीमागं विशेषण काय लावते मी? माझी विद्यार्थिनी. मी तिला शिकविते. ती पास झाली, म्हणजे तिच्याबरोबरच माझीही परीक्षा पास होते. तू पास होतेस विद्यार्थिनी म्हणून, मी पास होते शिक्षिका म्हणून. तुला कल्पना नाही. ही परीक्षा किती कठीण आहे ती. बाहेरचे परीक्षक तुझ्या निबंधाबद्दल जे लिहितील, ते तुझ्यापेक्षा मलाच जास्त लागू असतं. माझ्या सुदैवानं ही शोभा फार प्रकटपणे होत नाही! जे विद्यार्थी नापास, त्यांच्याबरोबर मीही नापास; पण जे पास होतात, त्यांच्याबरोबर मी क्वचितच नीटपणे पास होते. ही परीक्षा पास होण्यासाठी माझी धडपड. मी तुझ्यावर रागावते, कधी तुला चुचकारते, तुझं लिखाण नीट व्हावं म्हणून मेहनत घेते, ह तुझ्यासाठी नसून स्वत:साठीच आहे. आयुष्यात मी निरनिराळ्या भूमिका पार पाडीत असते. त्यांतील एक शिक्षकाची. माझ्या मनात मी शिक्षक म्हणून एक स्वत:चं चित्र उभं केलं आहे. प्रत्येक विद्यार्थी हा दुहेरी त-हेने मीच असतो. माझ्या शिक्षणाचं, शिक्षकत्वाचं ते एक प्रतीक असतं. माझ्या विद्यार्थीपणाचं ते दुसरं एक प्रतीक असतं. माझी सर्व धडपड ही माझ्यासाठीच आहे. माझ्यात जे अनंत 'मी' आहेत ना, त्यांतल्या एकेका 'मी' साठी मी जीव टाकीत असते."

 मी थोडा वेळ थांबले. तापी माझं बोलणं ऐकून विचार करीत होती.

 "हे बघ तापी, उपनिषदांत म्हटलं आहे ना ग कुठेसं, 'अरे, तू स्त्रीवर बायको म्हणून प्रेम करीत नाहीस, आपल्या आत्म्यावरचं प्रेम असतं ते. वगैरे?"

 तापीने नुकतीच उपनिषदे वाचली होती. तिचे स्मरणही माझ्या मानाने तल्लख होते. तिने माझ्या कपाटातून बृहदारण्यकोपनिषदातील ते पानच माझ्यापुढे धरिले :

 "न वा अरे पत्यु:कामाय पतिः प्रियो भवति।  आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति।  न वा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रिया भवन्ति।  आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रिया भवन्ति। ।  न वा अरे देवानां कामाय देवाः प्रिया भवन्ति।  आत्मनस्तु कामाय देवाः प्रिया भवन्ति।  न वा अरे भूतानां कामाय भूताः प्रिया भवन्ति।  आत्मनस्तु कामाय भूताः प्रिया भवन्ति।"

 बघ तापी, याज्ञवल्क्यानं गुरुशिष्याचं निराळं असं उदाहरण दिलं नाही कारण त्याची बायकोच त्याच्यापुढे शिष्या म्हणून बसली होती."

 "आई जे आपल्या मुलावर प्रेम करिते, त्याच्या खस्ता खाते, ते काय  ‘आत्म्याच्या, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वत:च्या प्रेमाखातर? तापीने शंका काढिली.

 “होय ना, तापी, याज्ञवल्क्याचं हे उदाहरण तर मला फार पटतं. तान्ह्या मुलाच्या रूपाने आईच्या इवल्याशा आत्म्याला सर्जनशील परमात्म्याचा अनुभव आलेला असतो. तो लहान जीव सर्वस्वी आईवर अवलंबून असतो. आई त्याला खाऊ घालते, वाढविते, रडविते; अशा वेळी सर्वसत्ताधारी सर्वशक्तिमान ईश्वराची भूमिका ती पार पाडीत असते. मुलाच्या खस्ता खाताना, लौकिकात वावरताना तिने स्वत:शी रंगविलेली, समाजमान्य झालेली आईची भूमिका ती पार पाडीत असते. त्या मुलाला बोलायला ती शिकविते, वागायला ती शिकविते, शाबासकी ती देते, शिक्षा ती लावते,- कर्ती-करवती तीच असते. ही भूमिका पार पाडीत असता, तिच्या आत्म्याच्या ह्या आविष्काराचा तिला एवढा कैफ चढतो की, ते मूल हाही एक स्वतंत्र आत्मा आहे, हे ती विसरते. वाढणार्‍या आणि वाढलेल्या मुलाकडून लहानपणच्या असहायतेची,- लगटण्याची, भीतीची, आज्ञा- पालनाची तिची अपेक्षा असते. ती भंगली, म्हणजे तिला अतोनात दुःख होतं. हे वाढलेलं, आपली सत्ता नाकारणारं मूल हेही आपणच आहोत, हे तो विसरते.'

 तापीला माझं प्रवचन पटलेलं दिसलं. “मूल मोठे होण्याची वाटच पहावी लागत नाही, बाई. किती लहानपणापासून त्याचा स्वतंत्रपणा दिसू लागतो. जशा आईच्या अपेक्षा असतात, तशाच मुलाच्याही ठाम अपेक्षा असतात. तेही आपली आई म्हणजे आपल्या 'स्व'चीच पुस्ती म्हणून वागते. मला जर उशीर झाला, तर माझा चार वर्षांचा मुलगा किती रुसतो! त्याचं काही कमी पडलं म्हणून नाही, पण जणू मी त्याच्या काही हक्कावर गदा आणिली, असा त्याचा आविर्भाव असतो.' तिने हसत-हसत सांगितले. आणि उद्याचा वायदा करून ती निघून गेली.

 विद्यार्थिनी गेली, पण माझ्या मनाला एक नवीन करमणूक देऊन गेली. माझी नात खेळता-खेळता पडली. मी आजारी असताही तिला उचलून घ्यायला धावले. माझे मन मला म्हणाले, “ती तूच आहेस" कोवळया चांदण्यासारख्या हसणाऱ्या, वसंताच्या झुळुकीप्रमाणे दुडूदुडू पळणार्‍या माझ्या लहानग्या नातीला माझ्या वाळक्या वृद्ध हातांनी कवळीत हसतच मी म्हटले, “आहेच मुळी मी ती" बाहेर बागेत गेले, तो कुत्रा धावत-धावत शेपूट हलवीत पुढ्यात आला. “तोपण तूच आहेस.' “होय. खरंच." मी म्हटले. बागेतल्या बकुळीच्या झाडाची बकुळे खात एक कोकीळ बसला होता. मला पाहताच उडून गेला. “तो तूच आहेस."

 माझी करमणूक चालूच होती. काही दिवसांनी मी महाबळेश्वराला गेले. एका संध्याकाळी कुठल्याशा टोकाला जाऊन समोरच्या डोंगरांच्या रांगांतील सूर्यास्त पाहात बसले होते. खाली थिजलेल्या दगडांच्या अफाट लाटा, वर निळ्या आकाशात रंगीबेरंगी ढगांच्या लाटा व कुठेतरी अधांतरी मी! "ते सर्व तू आहेस." माझे मन आनंदाने अगदी उतू चालले होते. सूर्यास्ताशी होणारी एकात्मता त्याला एकदम पसंत होती. आणि ह्या आनंदात भर टाकायला एक उपनिषद मदतीला धावलेच. “हे सूर्या, लोकांचे नियमन करणाऱ्या. लोकांच्या जन्मदात्या, आपले प्रखर किरण एकत्र आण. त्याना आवर. तुझे सौम्य कल्याणकारी रूप मला पाह दे. त्यात जो पुरुष आहे ना, तो मीच आहे." मी परत-परत जिभेवर घोळवीत मिटक्या मारीत हा जुना श्लोक म्हणत होते. विश्वाशी झालेल्या एकात्मतेचा मला कैफ चढला होता.

 मी पुण्याला परतले होते. रोजच्याप्रमाणे वर्तमानपत्र चाळीत होते इस्रायलमध्ये चाललेल्या आइश्मान् खटल्याची हकीकत होती ती. लक्षावधी निरपराधी लोकांना-अर्भकांना, स्त्रियांना, पुरुषांना-हाल करून नात्सी लोकांनी मारिले. ही गोष्ट मला माहीत होती. पण एका मनुष्याने काय क्रूरपणा केला, ती हकीकत वाचवत नव्हती. ह्या हत्येत मारले गेलेले माझे जर्मन मित्र मला आठवले. पळून गेल्यामुळे ज्यांचा जीव वाचला, पण आयुष्य कायमचे मातीमोल झाले, अशा मैत्रिणी डोळ्यांसमोर आल्या. त्याच्या मारेकऱ्यांबद्दल मन त्वेषाने उफाळून निघाले. "तेही तूच आहेस." विजेचा चटका बसला. छे! छे! कदापि नाही. ज्याच्याबद्दल मला इतकी घृणा वाटते, इतका त्वेष वाटतो, ते मी कधीही असणे शक्य नाही. अंगी चिकटू पाहणारे हे किळसवाणे झुरळ मी जोरात झटकून टाकिले. मन बिचारे गप्प बसले.

 रोजचा व्यवहार चालूच होता. विषय शिकवायचा होता समाजातील गुन्हेगारीबद्दलचा. माझी जीभ विवेचनात अगदी रंगून गेली होती. "ज्यांना आपण गुन्हेगार म्हणतो ना, ते समाजाचेच घटक आहेत. सामाजिक परिस्थिती व समाजाची बांधणी हीसुद्धा इतर गोष्टींबरोबरच गुन्ह्याला कारणीभूत होतात. तुम्ही, मी, सर्वजण आज ह्या दालनात बसून गुन्हेगार व त्यांची प्रवृत्ती ह्यांचा विचार करितो आहोत, - जणू काही गुन्हेगार म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी निराळे, काहीतरी लोकविलक्षण म्हणून. पण ते खरं नाही. मानवाच्या- तुमच्या, माझ्या, सर्वांच्या-प्रवृत्ती सगळीकडे सारख्याच असतात. सुस्थितीत राहण्यासाठी स्वत:ला, बायकोला, मुलांना खाणेपिणे, कपडेलत्ते नीट मिळावे, असं सर्वांनाच वाटतं. अगदी ह्याच साधारण प्रवृत्ती गुन्हेगारांच्याही असतात. आपल्यापेक्षा मानाने, वयाने, शिक्षणाने, अधिकाराने मोठे असतील, त्यांचं म्हणणं ऐकावं, हीही सामान्य प्रवृत्तीच आहे, आणि तिचा फायदा राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात वडील माणसं व पुढारी घेतातच. खुनी फक्त पैशासाठी खून करितो, सूडासाठी करितो, असं थोडंच आहे? धर्मवेडाने, देशप्रेमानेही माणसं दुसऱ्यास मारावयास प्रवृत्त होतात."

 “तुमचं म्हणणं असं की लढाई म्हणजे खूनच?" वर्गातील एक आवाज.

 "प्रश्न विचार करण्यासारखा आहे, पण आज आपला विषय आहे समाजातील गुन्हेगारी. तेवढ्यापुरताच आपण विचार करू."

 "तुमचं म्हणणं असं की धार्मिक भावना, पितृप्रेम, देशप्रेम ह्या उदात्त प्रवृत्तीही गुन्हेगाराला प्रेरक होतील?" दुसरा आवाज.

 “माणसं काही वेळा भावनेने भारून जातात. गुरू, पुढारी, वडील माणसं जे सांगतात, ते करून जातात. आपली स्वत:ची अशी मूल्यं आहेत, आपल्या धार्मिक मूल्यांचा विचार करून त्यातली काही तरतमभावाने स्वीकारण्याचा आपला हक्क आहे, हे माणसं विसरतात. इतर विचार, नोकरी, सुखी जीवन हीही अशा गोष्टी विसरायला मदत करतात. पूर्वी माणूस राजाच्या नोकरीत राहिला म्हणजे आपल्या आश्रयदात्याचं ऐकण्यात भूषण मानीत असे. जीव देणं व घेणं ह्या गोष्टी त्याच्या लेखी सारख्याच होत्या. परमभक्तीचं एक लक्षणच असं आहे की, मनुष्य सर्वथा दुसऱ्याचा होतो. अशा मन:स्थितीतही गुन्हा होणे शक्य आहे. नुसतं शक्य आहे, इतकंच नव्हे, तर महाभयंकर गुन्हे झाल्याचं इतिहासात नमूद आहे. युरोपात मध्ययुगात ख्रिश्चन धर्माच्या नावाने 'इन्क्विझिशन' या संस्थेमार्फत कित्येक वर्ष लोकांचे अनन्वित हाल झाले. तिची आपल्या इकडे गोव्यामध्येही झळ लागली. मनुष्यजातीविरुद्ध ही एक भयानक गुन्हेगारीच होती, आणि धर्मवेडाने उत्पन्न झालेली होती."  तास झाला. मुले पांगली. पण माझे विचार चालूच होते. गुन्हेगारांच्या प्रवृत्ती इतर मानवांसारख्याच असतात हे जर खरे, तर ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे कोणीही मनुष्य काही विशिष्ट परिस्थितीत गुन्हा करणे शक्य आहे. लाखांमध्ये एखादा असा सापडतो की, तो 'प्राण गेला तरी बेहेत्तर, पण माझी स्वत:ची अशी मूल्ये बाळगून राहीन,' असे म्हणतो, आणि दहा लाखांत एखादाच असा की, कसोटीची वेळ आली, म्हणजे खरोखरच तसा वागतो. गुन्हेगारी, दुर्वर्तन, लबाडी हे सर्व प्रकार म्हणजे सर्वसाधारण मानवी प्रकृतीचाच आविष्कार मानिला, म्हणजे मानवी प्रकृती कुठल्या टोकापासून कुठल्या टोकापर्यंत जाण्याचा संभव आहे, ह्याची गुन्हेगारी ही एक खूण व आठवणच म्हणावयाची. गुन्हेगाराच्या रूपाने आपल्यापुढे जे येते, ते आपलेच सुप्त अनाविष्कृत स्वरूप का?

 माझे मन दचकून मागे सरले.

 जुना विषय संपून नवा सुरू झाला होता. सामाजिक संबंध किती प्रकारचे असतात, हे समजावून देणे चालले होते. फार खोल विचार न करता पाठ म्हणावा, तशी मी बोलत होते. “उच्चनीचपणा, पुढारीपणा, अनुयायीपणा परस्परसाहाय्य व विरोध-"

 "विरोध हाही एक सामाजिक संबंधच म्हणायचा का?" वर्गातून एक आवाज आला.

 "संबंध आल्याशिवाय विरोध येणारच नाही. एवढंच काय, जेथे-जेथे सहकार्य आहे तेथे-तेथे विरोध दिसून येतो. मालक व मजूर या दोघांच्या प्रयत्नांनी उत्पादन होत असते व त्याच क्रियेत दोघांचा एकमेकांशी विरोध दिसून येतो. समाजाच्या विधिनिषेधाच्या कल्पना आत्मसात करून व्यक्ती समाजाभिमुख होताना असा विरोध तर सारखा दिसून येतो. लहान मुलाचेच पहा. सकाळी दात घातल्याशिवाय खायचं नाही, ही सवय त्याला लावायला श्रम पडतात ना? त्यांचा विरोध होत-होत हळूहळू त्याच्या सामाजिक जाणिवेचा विकास होत असतो. समाजाची मूल्यं गळी उतरत असतात, आत्मसात होत असतात. ह्याहीपलीकडे जाऊन फ्रॉइड म्हणतो की, विरोध हा बर्‍याच प्रसंगी संमतीचं लक्षण असतो. मनातून संमती असते, बाहेरून विरोध असतो. जागृत मनाला म्हणजेच समाजाभिमुख मनाला अमक्या गोष्टी वाईट, अमक्या गोष्टी चांगल्या, अशी ठाम शिकवण मिळालेली असते. पण खोलखोल दुसरं मन दडलेलं असतं. लांडग्याचं क्रौर्य, वाघाचा शिकारीपणा, हरिणांचा भित्रेपणा, कुत्र्यांची लाचारी, डुकराची हाव, माकडाचा खट्याळपणा, सर्व काही त्यात असतं. ज्या घटनांबद्दल किंवा माणसांबद्दल तिरस्कार वाटतो, त्यांच्या कृत्यांचं एक मन हळूच कौतुक करीत असतं. एकाच शरीरात अशी दोन मन हळूच कौतुक करीत असतं. एकाच शरीरात अशी दोन मनं असतात. सामान्य माणसांच्या व्यवहारात बहुतेक एका मनाचं चित्र उमटलेलं दिसतं. दुसरं दबलेलं असतं, पण काही प्रसंगी ते मन उफाळून येतं, आणि एकच माणूस देवाची, आणि दैत्याची अशा दोन्ही परस्परविरोधी भूमिका उमटवीत असतो. पाश्चात्यांच्या कथा-कादंबऱ्यांत कथानकाला रंग भरण्यासाठी ह्या तत्वाचा उपयोग केला गेला आहे. पहिल्या भेटीत ज्याच्याबद्दल गैरसमज घृणा किंवा द्वेष, त्याबद्दल शेवटी आत्यंतिक प्रेम अशी कलाटणी बऱ्याच कथा कादंबऱ्यांत दिसते. आपल्याकडे भक्तिमार्गी लिखाणात व तत्वज्ञानात ह्याचा विचार फार खोल केला आहे; पण इतर वाङ्मयप्रकारात तो दिसत नाही. भक्तिवाङमयात विरोधभक्ती म्हणून एक प्रकार सांगितला आहे. देवाचे आत्यंतिक विरोधी व वैरी असलेल्या लोकांची मने सूडापायी इतकी देवमय होतात की, तेही शेवटी देवाला जाऊन पोहोचतात, असे सांगितले आहे. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्राह्मी स्थिती प्राप्त व्हायची, म्हणजे संपूर्ण समता अंगी बाणली पाहिजे. समता म्हणजे राग नाही, लोभ नाही, घृणा नाही, आसक्ती नाही, प्रेम नाही, द्वेष नाही. पाणी गायीला आणि वाघाला सारखंच असतं. 'गायीची तृषा हरू,वाघ्रा विष होऊनि मारूं' असं ते करीत नाही. सूर्य रावरंक म्हणत नाही. ती समता; तीच अलिप्तता. एका दृष्टीनं सर्व आपणच व दुसऱ्या दृष्टीने आपण कशातच नाही, अशी ही वृत्ती. ह्या सर्वांचा विचार केला, म्हणजे विरोध-आत्यंतिक विरोध- म्हणजे नुसता सामाजिक नव्हे, तर वैयक्तिक संबंध व लागेबांधे ह्यामुळेच उत्पन्न होतो. त्या विरोधामध्येसुद्धा आत्मीयता आहे, ह्याची प्रचीती येते. प्रेम आणि द्वेष ही एकाच आत्म्याची दोन रूपं आहेत -"

 मनाला पुढे जाववेना. ते विचार करायचे थांबले.

 एकदा ठेच लागली, म्हणजे परत-परत तिथेच ठेच लागते. तसे माझे झाले. एक पाहुणे घरी आले होते. ते मला म्हणाले, "मी एक फारच छान पुस्तक वाचतो आहे-तुम्ही अवश्य वाचाच.' मी ते घेतले. ते होते शायरर् चे हिटलरच्या उदयास्ताबद्दलचे. मी वाचायला घेतले. काही गोष्टी माहीत होत्या, तरी त्या नव्याने मांडल्या होत्या. जर्मनीत हिटलरचा उदय का बरे झाला? पहिल्या महायुद्धानंतर युरोपात काही विशिष्ट घडी बसवण्याची विल्सन स्वप्ने रचीत होता, पण इंग्लंड-फ्रान्सच्या कुटिल राजकारणाचा वीट येऊन तो निघून गेला व जर्मनी या दुकलीच्या चिमट्यात गवसला. आपला प्रतिस्पर्धी, पहिले महायुद्ध करणारा गुन्हेगार, म्हणून जर्मनीच्या या दोन शत्रूनी पुरेपूरपणे जर्मनीचे नाक खाली करण्याचा चंग बांधला. जर्मनीच्या पुढाऱ्यांना त्या वेळच्या राष्ट्रसंघात न्याय मिळणे अशक्य झाले. तिच्या साध्या व रास्त मागण्याही धुडकाविल्या गेल्या. मी जर्मनीत गेले, तेव्हा ते सबंध राष्ट्र रागाने धुमसत होते. जे याचनेने मिळाले नाही, ते हिटलरने दांडगाईने घेतले, तेव्हा जर्मनीवर एकच आवाज उमटला, “असेच पाहिजे होते. इंग्लंडला, फ्रान्सला व अमेरिकेलाही सभ्य, रास्त मागण्या समजत नाहीत; त्यांना बडगाच कळतो." पहिली दांडगाई पचल्यावर हिटलरने निरपराध राष्ट्रांना गिळंकृत केले; ती दांडगाई ह्या बड्यांनी ऐकून घेतली. त्या वेळी दटावले असते. परिणामाचा भयंकर परिपाक लक्षात घेऊन वेळीच ठोकले असते, तरी जर्मनी गप्प बसता. पण पहिल्याने स्वार्थामुळे डोळ्यांवर पडदा ओढला. आता भीतीने गप्प बसले. ह्या भानगडीत मध्ययुरोपातील फिनलंडपासून अल्बानियापर्यंत सर्व चिमुकल्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य पहिल्याने जर्मनीने व नंतर रशियाने नष्ट केले व लक्षावधी असहाय ज्यूंची अमानुष हत्या झाली. ह्याला जबाबदार फक्त जर्मनीच का? जर्मनीच्या गुन्हेगारीत सर्व युरोपचा, पर्यायाने सर्व जगाचा वाटा नाही का? जी गोष्ट राजकीय गुन्हेगारीची, तीच, सामाजिक गुन्हेगारीची.

 एका भयंकर सत्याच्या जाणिवेने मी व्याकुळ झाले होते. 'तत्त्वमसि', "ते तू आहेस'- माझ्यापढे बोट नाचवीत मन म्हणत होते. मी थरथर कापत म्हटले, "होय, हे मीच आहे. आइश्मान, स्टालिन, हिटलर आणि त्यांनी मारिलेले लोकसद्धा मीच आहे."

 पण एवढ्यावरच हा ज्ञानाचा लोट थांबणार नव्हता. "इतर देशांतल्या माणसांची व घटनांची नावे का घेतेस? घरचीच, जवळचीच नावे घे की." मनाने छेडले.

 "स्वातंत्र्याच्या चळवळीत काही निरपराध माणसं मारिली गेली. काय म्हणालीस तु त्या वेळेला? आठवतं?"

 मला आठवलं, “देश युद्धात पेटलं, म्हणजे असं एखादे वेळेला व्हायचंच."  "ज्यांनी वाममार्गाने पैसे मिळविले, लाच घेतली, असं तुला वाटतं त्यांचा तुझा कधी संबंध येऊ द्यायचा नाही. असं कटाक्षानं वागणं तुला शक्य आहे का?"

 "नाही." मी परत कबुली दिली.

 “देशात सर्व जातींनी, सर्व धर्मांनी एकत्र नांदावं, असं असताना परिस्थितीचा बऱ्याचदा विपर्यास करणारे, भडक प्रचार करून तरुणांची मनं भडकविणारे लोक तुझ्या ओळखीचे आहेत ना?"

 मी परत "होय" म्हटले व त्रासून विचारले, “काय, मी रानात जाऊन राहू? का जीव देऊ?"

 “तसं केलंस, तरच तुला अलिप्तपणाचा आव आणता येईल, एरवी नाही. आपल्या कामापुरता,- जास्त नाही,- एवढा जरी व्यवहार तू ठेवलास तरी तेवढ्यापुरती तुझी त्या माणसांच्या कृत्यात भागीदारी होतेच की. अशा त-हेचा सतत प्रचार ज्यूंविरुद्ध चालला होता, हे तुला माहीत आहे. येथील वातावरण अजून तितकं तापलेलं नाही. पण जर्मनीत झालेल्या प्रकाराची येथे पुनरावृत्ती होणार नाहीच असं काही म्हणता येणार नाही, हे खरे ना? अशाच प्रचाराने गांधींचा खून झाला ना? महात्मा गांधींच्या वधाचे निमित्त करून किती घरांची महाराष्ट्रात होळी झाली? एवढंसं निमित्त होऊन भयानक जातीय दंगे भारतात झाले ना?"

 मी आपली 'होय', 'होय' म्हणत होते, पण अजून संपले नव्हते. "ही सर्व द्वेषाची बीजं नाहीतशी करण्याचे तू किती प्रयत्न केलेस? त्याच समाजात, त्याच लोकांत तू आपलं संभाळून, कातडी-बचावाच्या धोरणाने राहिली आहेस ना? मग जगात, तुझ्या स्वत:च्या समाजात, ही गुन्हेगारी चालली आहे व जे गुन्हेगार आहेत, त्यात आपला काही भाग नाही, हे म्हणण्यात काय अर्थ आहे? ते तूच आहेस. कर, आठवण कर. याज्ञवल्क्य काय म्हणाला, ते सबंध आठव ना."

 मी जडपणे पाठ म्हटला, “एवं वा अरे अयमात्मा अनन्तर: आबाह्य: कृत्स्नः प्रज्ञानघन एव... यत्र हि द्वैतमिव भवति तदितर: इतरं पश्यति।"

 "अग, ह्याप्रमाणे हा आत्मा सर्व बाहेरच असतो, तसाच सर्वस्वी आतला असतो. द्वैतभावना असेतोपर्यंतच बाहेरचे इतर परके वाटतात. पण सर्वत्र आत्मा ज्ञानमय, ज्ञानाचाच बनलेला आहे."

 जाणीव वा ज्ञान ही गोष्ट कधीतरी सुखदायक असते का? ज्ञानाच्या कुंडात माझी पूर्णाहुती पडत होती. मी व्यथित होऊन कळवळून म्हणाले, "होय, होय. माझी धाकटी नात मीच, शेपटी हालवीत, भावपूर्ण डोळ्यांनी माझ्याकडे पाहणारा कुत्रा मीच, निळ्या आकाशातून भरदिशी जाणारा कोकीळ मीच, भव्य संध्याकाळ मीच, आइश्मान, स्टालिन, हिटलर, खून करणारे, घरे जाळणारे, दंगा माजविणारे, जळत्या घरातून होरपळणारे, खड्ड्यात जाणारे जीवही मीच आहे. खरंच, सगळं मीच आहे."

 माझी कबुली पूर्ण झाली. ज्या क्षणी ज्ञान झाले, त्याच क्षणी मी भस्म होऊन गेले.

१९६३