गंगाजल/उकल

विकिस्रोत कडून



तेरा :
उकल


 कधीतरी काहीतरी कोडे पडलेलं असतं. तेही इतक्या मागं की, आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही ही गोष्टसुद्धा मन-जागृत मन- विसरलेलं असतं आणि एकदम एखादे दिवशी अगदी भलत्याच संदर्भात जुन्या आठवणी जाग्या होतात, मनाला डिवचतात व पुन्हा विचार करायला लावतात. जुनी कोडी उलगडतात, कधीकधी पूर्णपणे, कधीकधी नवी कोडी मनापुढे उभी करून.

 ज्ञानदेवीच्या अठराव्या अध्यायाची सुरुवात म्हणजे शब्दांची कसरत आहे. प्रत्येक शब्द समास आहे. त्या समासातील शब्दांचे अर्थ समजून सबंध समास कळायचा, म्हणजे मन एकाग्र करून वाचावं लागतं. माझ्या समजुतीपमाणे सर्व चित्त देऊन मी वाचीत होते. पण माझ्या मनाचा काही भाग मला नकळत भटक्या मारीत असला पाहिजे. डोळे वाचीत होते. जन्मजराजलदजालप्रभंजन' मन एकदम म्हणालं, “मदन-एडका मदन." मदन हा शब्द 'प्रभंजन' सारखाच आहे. प्रभंजन-भंग करणारा; तसेच, ‘मदन' म्हणजे मद आणणारा, मदास असणारा, म्हणजेच मद आलेला. 'एडका मदन" म्हणजे 'मद आलेला एडका' अठरावा अध्याय राहिला बाजूला आणि जणू आता घडत आहे अशा प्रकारे पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आजीच्या बरोबर मी रत्नागिरीच्या विठोबा-मंदिरात होते. सभामंडपात भजन रंगात आलं होतं. सोनार मंडळींची दिंडी होती म्हणे. एकजण गळ्यात पखवाज अडकवून वाजवीत होता. इतरांच्या गळ्यात झांजा होत्या. सर्वजण अगदी रंगात येऊन भजन म्हणत होते व नाचत होते “एडका मदन-मदन-मदन, तो केवळ पंचानन, केवळ पंचानन! एडका मदन." मला सबंध भजन ऐकायचं होतं. पण आजीला घरी जायची घाई होती आणि मला तिच्या बरोबर जावंच लागलं. माझे कान मागे लागले होते; पुढची ओळ काय आहे, हे ऐकण्याची उत्सुकता होती; पण आम्ही लांब जाईपर्यंत, 'एडका मदन' व 'पंचानन' एवढीच अक्षरं ऐकू येत होती. एडका, रतिपती मदन आणि पंचानन ह्यांचा संबंध काय असावा, मला मोठ्ठं कोडं पडलं होतं. “पंचानन म्हणजे काय ग?" "वाघ.' एवढंच उत्तर भराभर चालणाऱ्या आजीनं दिलं होतं. त्यानं काही कळलं तर नाहीच, पण मन आणखी गोंधळात पडलं.

 ज्ञानदेवीचा अठरावा अध्याय मी काही आजच वाचीत नव्हते. धातूला 'अन' लागून होणारी असंख्य नामंही माझ्या चांगली माहितीची होती. पण आजच का कोण जाणे 'प्रभंजन' शब्द वाचला आणि पूर्वी ऐकिलेल्या त्या 'मदन' शब्दाचा अर्थ कळला असं वाटलं. ओळीचा अर्थ लावला. 'एडका' मदन' म्हणजे 'माजलेला एडका'; 'तो केवळ पंचानन' म्हणजे कळला, "नुसता वाघ आहे." तेवढ्यापुरतं जुनं कोडं उलगडल्यासारखं वाटल. पण मनाचं समाधान होत नव्हतं. 'मदन' म्हणजे 'माजविणारा, माजलेला' असा अर्थ करिता येईल. पण ह्या ठिकाणी बसतो का, असा नवा प्रश्न पड़ला आणि 'एडका मदन तो केवळ पंचानन' ह्या ओळीचा विठोबाशी संबंध काय? ह्या ओळी लिहिणारा तरी कोण? मला वाटलं, नक्की तुकारामबुवांच्या गाथेत ह्या ओळी सापडतील. सर्व गाथा धुंडाळली; पण व्यर्थ. डेक्कन कॉलेजातल्या एका प्रोफेसरांना विचारलं; “नक्की ठाऊक नाही, पण एकनाथांच्या असाव्यात."

 एकनाथ म्हणजे समुद्र. त्यात ह्या ओळी शोधायच्या कुठं? ज्या अर्थी एका लहान गावातली भजनी मंडळी त्या म्हणत होती, त्या अर्थी पांगारकरांच्या किंवा अशाच एखाद्या भजनी गाथेत सापडावी. 'सकलसंतगाथा' नावाच्या बारीक टाइपातला एक अवाढव्य ग्रंथ लायब्ररीत मिळाला. त्यात एकनाथ पाहिला. तो 'एडका' ह्या नावाखाली एक पाच- सहा ओळींचं रूपक सापडलं. आणि कळलं की, माझा अर्थ अगदीच चुकीचा होता. त्या ओळीत 'मदन' म्हणजे 'माज आणणारा मदन' म्हणजे 'रतिपती' अर्थात 'कामदेव' हाच अर्थ अपेक्षित आहे. कुत्रा, गाय, वगैरे रूपकं आहेत. तसंच हे एक. मदन म्हणजे एडकाच, व तो इतका मस्त की, तो वाघाप्रमाणे सामर्थ्यवान. सबंध रूपकच देते. नाही तर दुसऱ्या कोणा मनाला माझ्याप्रमाणे कोडं पडायचं.

 एडका मदन तो केवळ पंचानन।।ध्रु||  धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा।  इन्द्रचन्द्रासी भेदरा । लाविला ज्यानं  तो केवळ ।।ध्रु.॥  धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा  दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण ।  तो केवळ ॥ध्रु.॥  भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गती झाली वालीसी  विश्वामित्रासारिखा ऋषी । नाडिला ज्यानं  तो केवळ ॥ध्रु.॥  शुकदेवानें ध्यान धरूनी । एडका आणिला आकळोनी  एका जनार्दनाचे चरणी । बांधिला जेणें।  तो केवळ पंचानन ॥

 मदनरूपी एडक्यानं सर्वांना लोळविलं. फक्त शुकानं त्याच्यावर मात केली म्हणून शेवटच्या ओळीतलं 'पंचानन' हे विशेषण एडक्याला लागू नसून शुकाचं समजण्यास हरकत नसावी. आता ह्या ओळीशी विठोबाचा संबंध काय, हा दुसरा प्रश्न. त्याचं उत्तर माझ्या हातातच होतं. 'सकलसतगाथे'त संतांची कविता होती,- मुख्यत: वैष्णव वारकरी संतांची कविता होती. ह्या कवींच्या तोड्न जे- जे बाहेर पडलं, ते- ते सर्व थेट विठोबाशी रुजू होतं, हा वारकऱ्यांचा दृढ विश्वास. शब्द काहीही असोत, 'हरि मुखे म्हणा' असोत. 'चंदनाची चोळी, माझे अंग अंग पोळी' असोत, 'विटंबिती रांडापोरें' असोत. 'नाम घेतां उठाउठी, होय संसाराची तुटी' असोत वा 'एडका मदन' असोत. सर्व काही सारख्या प्रमाणात विठोबाच्या चरणी रुजू होतं. दोन्ही प्रश्न एकदम सुटले.

 ह्या एडक्याच्या आधीही आईनं मला एका कोड्यात टाकिलं होतं. आम्ही त्या वेळी ब्रह्मदेशात होतो. वडील दर दोन वर्षांनी काहीतरी १०६ / गंगाजल

कामानिमित्त हिंदुस्थानात यायचे. परत जाताना तिकडे न मिळणाऱ्या कितीतरी गोष्टी मुंबईहून व कलकत्त्याहून आणायचे. मुख्य जिन्नस असत नव्या गाण्यांच्या तबकड्या. ते आले म्हणजे आम्ही दिवसभर त्या तबकड्या लावून गाणी तोंडपाठ करीत असू; आणि मग दिवसभर आम्ही ती गाणी म्हणत असू.' नका टाकून जाउं, डावा डोळा पाण्याने माझा भरला' हे गाणं मी घोळून-घोळून म्हणत होते. आईनं देवघरातून दरडाविलं, “माई, ते गाणं म्हणायचं नाही." मी 'बरं' म्हटलं व थांबले. थोड्या वेळानं आई बाहेर आली व तिनं एक धपाटा लगावला. “सांगितलं होतं ना ते गाणं म्हणायचं नाही!” तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की, मी पाटीवरील बेरीज वजाबाक्या करिता-करिता अगदी अनवधानानं परत तेच मना केलेलं गाणं म्हणत होते म्हणून. मोठ्या प्रयत्नानं मी ते गाणं मनातून काढून टाकिलं. पण एक प्रश्न उरला होता, ते गाणं का म्हणायचं नाही?' आईला विचारावं, तर ती रागावलेली. प्रश्न तसाच राहिला व पुढे मी विसरूनही गेले. नंतर कितीतरी वर्षांनी मी पुण्यातच दुपारची बसायला म्हणून माहेरी आले होते. रविवार असल्यामुळे सर्व मुलं घरीच होती. गाण्याच्या नव्या-जुन्या सगळ्या तबकड्या लावावयाचा बूट निघाला. मी तिथं गप्पा मारीत बसले होते. गाण्यांकडे विशेष लक्ष नव्हतं, पण एकदम 'नका टाकून जाउं' ही जुनी रेकॉर्ड ऐकू आली. मी ते गाणं जवळजवळ विसरलेच होते. फक्त पहिली ओळ आठवत होती. गप्पा थांबवून मी उत्सुकतेनं पुढं होऊन गाण्याचे शब्द ऐकू लागले. 'नका टाकून जाउं डावा डोळा पाण्याने माझा भरला।तीन दिवस झाले म्हणूनि तंटा हो माझ्याशी केला' वगैरे वगैरे शब्द. सगळ्या शब्दांचे अर्थही लक्षात आले; एवढेच नव्हे, तर आईनं गाण्यास मनाई का केली, अनवधानानं गाणं घोकून म्हणत असता धपाटा का मारिला, हेही उलगडलं. गाणं जुनं झालं होतं. मुलांच्या तोंडी राहिलं नव्हतं. बऱ्याच जणांना जुनंपण नवीन वाटलं. माझ्या लेकीनं मला हलवून विचारिलं, “म्हणजे काय गं?" “अग, काय विचारिते आहेस?" मी आपल्या तंद्रीतून जागी होऊन विचारिलं. “तीन दिवस झाले म्हणुनी तंटा हो माझ्याशी केला' म्हणजे काय ग? आणि डावाच डोळा एकटा कसा ग पाण्यानं भरतो?" तिनं मला कोड्यात टाकलं होतं. “डावाच डोळा पाण्यानं कसा भरतो, हे मला नाही बाई समजत." मी प्रांजळ कबुली दिली. पण तिचा पहिला प्रश्न कायमच होता. “अग, ती बाई तीन दिवस विटाळशी म्हणून त्याला भेटायला गेली नाही, बाजूला बसली होती जुन्या लुगड्यात, तर तो तू का आली नाहीस म्हणून भांडायला लागला." तिनं नीट ऐकिलं. "असं होय? बावळट होता म्हणायचा!" ती म्हणाली. जुनं कोडं उलगडलं. नव्या कोड्यातून सुटका झाली.

 लहानपणी पडलेली बरीचशी कोडी शिक्षणाच्या कोतेपणामुळे पडलेली असतात. पुरेसा अनुभव नसतो, शब्दांचे अर्थ माहीत नसतात, म्हणून मन घोटाळ्यात पडतं. पण गुंता उत्पन्न होण्यास हेच कारण आहे, असं नव्हे. अगदी मोठेपणी अनुभवाची व ज्ञानाची पुरेशी सामग्री असूनही मन नसत्या घोटाळ्यात पडतं, ते केवळ पूर्वानुभवामुळं म्हणजेच पूर्वाग्रहामुळं. वाचता-वाचता काही-काही मुद्दे लक्षात येऊन पुढचं वाचन मग त्या पहिल्या अनुभूतीच्या चौकटीतून जाऊ लागतं. वाचताना लागणारा मनाचा निर्लेपपणा नकळत नाहीसा झालेला असतो व मग माणूस नसत्या घोटाळ्यात पडतं. उद्योगपर्वातील कर्ण-कुंती-संवाद मी एकदा वाचीत होते. कुंती कर्णाला सांगते. "बाबा. तू राधेय नाहीस, कौंतेय आहेस. तुझा बाप सूर्य व आई मी,- आता तू आपल्या भावांना सामील हो व रामजनार्दनां (बलरामकृष्णां) प्रमाणे तुमची कर्णार्जुनांची जोडी युद्धात शोभू दे." ह्या भाषणावर कर्णाचं फार विदारक उत्तर आहे. त्या उत्तरात त्यानं म्हटलं आहे, "हा तुझा नियोग (नियोगकरणं तव) माझं धर्मद्वार होऊ दे. मी क्षत्रिय म्हणून जन्मलो, पण माझ्यावर क्षत्रियाचा एकही संस्कार झाला नाही. पूर्वी कधी तुला आईचा कळवळा आला नाही. आज जे सांगते आहेस, ते केवळ आप्पलपोटेपणामुळे..." वगैरे. "तुझ्या नियोगामुळे मला धर्माचं दार मोकळं झालं." ह्या वाक्याचा अर्थ लागेना. कुंतीनं कुमारी असताना सूर्याशी संयोग केला, ह्या क्रियेला 'नियोग' हा शब्द का लावावा? 'नियोग' म्हणजे नवरा जिवंत असताना त्याच्या आज्ञेनं वा संमतीनं वा तो मेल्यावर त्याला पुत्र प्राप्त करून देण्यासाठी इतर पुरुषाबरोबर (बहतेक दिराबरोबर) केलेला जो समागम तो. ह्या व्याख्येत तर कुंती-सूर्य-संयोग बसत नाही. बरं, त्यामुळं धर्माचं दार मोकळं झालं, म्हणजे तरी काय? ह्या घोटाळ्यात मी पडले व तशा अर्थाची टीप माझ्या लेखात देऊन इतरांनाही मी घोटाळ्यात टाकिलं. अंबिका, अंबालिका व कुंती सर्वांनीच नियोगानं पुत्रोत्पती करून घेतली होती. हे माझं पूर्वज्ञान इथं माझ्या आड येत होतं. लीलाबाई अर्जुनवाडकरांचं मन असं पूर्वग्रहानं भरलेलं नव्हतं. त्यांनी 'नियोग' शब्दाचा सरळ अर्थ केला

'आज्ञा', 'सांगावा', 'आयुक्ती'. 'तुझा नियोग' म्हणजे 'तुझी आज्ञा',

'तुझं सांगणं' असा अर्थ होतो. 'ह्या तुझ्या सांगण्यामुळे मी कोण, हे उमजलं; आता मी आनंदानं लढाईत मरेन, कारण मी क्षत्रिय असल्यामुळे या क्षत्रियोचित मरणानं मी स्वर्ग साधीन,' असं कर्णाचं म्हणणं सरळ दिसतं. त्यात घोटाळा काही नाही. 'नियोग' हा शब्द व नियुज ह्या धातूची रूपे माझ्याही परिचयाची होती. 'तक्तिं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव' ही ओळ कितीदा तरी वाचनात आली होती. 'नियोग- ‘सांगितलेली आज्ञा' हा अर्थही कित्येक वाक्यांत आलेला होता. पण महाभारताच्या परत-परत केलेल्या वाचनानं व त्यातील राण्यांच्या 'नियोगा'नं माझं मन इतकं व्यग्र झालेलं होतं की, साधा-सरळ अर्थही मला सुचेनासा झाला होता. तो उलगडा एका विद्वान व व्यग्र नसलेल्या लख्ख मनानं केला.

 देवळातले शिल्प, धातूच्या मूर्ती, मध्ययुगापासून काढलेली चित्रं ह्यांतल्या बऱ्याचशा कलाकृतींत मनुष्यदेह वस्त्राच्छादित असूनही देहाकृती स्पष्टपणे दर्शविलेली आहे. वस्त्राच्या चुण्या, खांद्यावरून व पोटावरून लपेटलेले वस्त्र यांचा आकारही स्वच्छ दाखवून त्यांच्या आडचे अवयवही स्पष्ट दाखविलेले आहेत. मला वाटायचं, हा एक संकेत आहे म्हणून. वस्त्राचं सौंदर्य व मनुष्यदेहाचं सौंदर्य ही दोन्ही दाखविण्याचा मोह कलाकाराला आवरला नाही व त्यातून वस्त्रही दाखवायचं व त्याच्या मागची देहाची आकृतीही दाखवावयाची, असा संकेत पडला असावा, अशी माझी ठाम समजूत होती. एक दिवस माझा हा भ्रम नाहीसा झाला. ओरिसात जाजपुर रोड स्टेशनवरच्या प्रतीक्षालयात सकाळच्या वेळी मी बसले होते. मी बसलेली खोली सावलीची होती. खिडक्या पश्चिमेकडे होत्या. पुढे पूर्वेला प्लॅटफॉर्म व त्याच बाजूला दार होतं. सूर्याचे किरण दारातून खोलीच्या मध्यापर्यंत आले होते. मी सहप्रवाशांकडे पाहत होते. अधूनमधून प्लॅटफॉर्मवर दृष्टी टाकीत होते; मधून-मधून घड्याळाकडे बघत बसले होते. इतक्यात एक वयस्क विधवा बाई आपल्या नातवाचा हात धरून दाराशी आली. ती आत येण्याच्या आतच तिला दुसरी कोणी मुलं भेटली, व ती त्यांच्याशी बोलत दारातच उभी राहिली. बाई उघड-उघड जुन्या वळणाची होती. तिच्या अंगात चोळीपोलकं काही नव्हतं. त्याचप्रमाणे नेसल्या साडीच्या खाली हल्लीच्या मुली घालतात, तसा परकर नव्हता. तिचं नेसणंपण जुन्या त-हेच्या उडिया बाईचं. पांढऱ्या शुभ्र साडीचा एक एकेरी  वेढा कमरेभोवती होता व बाकीची साडी सर्वांगभर सैल गुंडाळली होती. डोक्यावरून पदर खाली घेऊन परत खांद्यावरून मागे नेऊन पुढे आणला होता. आणि ह्या सर्वांतून मला बाईचं अंग सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत होतं. तिचा अर्धवट उघडा गळा. त्याखाली तिचे सुकलेले लोंबणारे स्तन दिसत होते. मागच्या बाजूनं तिची शरीर-रेषा तर फारच स्पष्ट दिसत होती. मानेपासून पाठ निघाली ते वाकण, कमरेशी मणक्याचं दुसरं वाकण, ढुंगणाचा फुगीर भाग, नंतर तो मांडीला मिळतो तिथली घडी, मांड्या, गुडघ्याच्या वाटीचा फुगवटा व त्या मागचा खोल भाग, खाली पोटरी व तीखाली घोटा व पाऊल. घोटा व पाऊल वस्त्राबाहेर होतं. म्हणून जास्त स्पष्ट दिसत होतं, असं मुळीच नव्हतं. वस्त्रातीलही अंग तितकंच स्पष्ट दिसत होतं. मधून-मधून वस्त्राच्या चुण्या, वस्त्र डोक्यावरून खांद्यावर आलं तिथली गोलाई, ब-याच ठिकाणी वस्त्र एकेरी, काही ठिकाणी दुहेरी, पण शरीर पूर्ण झाकील इतकी जाडी कुठेच नव्हती. तिचं काळं अंग, सुरकुतलेलं ढुंगण-अगदी रेष-नरेष दिसत होतं. बाई विनयशील होती. डोक्यापासून पोटर्‍याच्यापर्यंत वस्त्रात लपेटलेली होती. तिच्या प्रत्यंगांचं प्रदर्शन खट्याळ सूर्यकिरणं करीत होती. सूर्य कलाकार नव्हता म्हणून म्हणा, की सर्वश्रेष्ठ कलाकार होता म्हणून म्हणा, वस्त्राआडच्या तरुण नसलेल्या कृश, काळ्या देहाच उघडं पण झाकलेलं दर्शन मला तो घडवीत होता; आणि मला प्रत्यय आला की, आमचे जुने कलावंत कुठच्यातरी संकेताच्या आहारी जाऊन प्रतिमा घडवीत किंवा रंगवीत नव्हते, तर त्यांना जे दिसत होतं, ते थोड्याशा अतिशयोक्तीनं दाखवीत होते. आमचे मध्ययुगीन विणकरपण बारीक, तलम सुती वस्त्रं विणण्यात पटाईत होते. आणि वस्त्रांत गुरफटलेले पण उघडे असे स्त्री-पुरुष तेव्हापासून आजतागायत भारतात वावरत आहेत. मीच डोळे उघडे ठेवून बघत नव्हते.

 डोळे व कान उघडे ठेवून बघणं किंवा चित्त देऊन अनुभव घेणं म्हणजे तरी काय? मन निरनिराळ्या गमती करीत असतं. ज्या गोष्टीचा संबंध अगदी - वरवर पाहता दिसतो, तिथं तो संबंध उमजून येत नाही. असं एकदा नाही, तर अनेकदा घडतं. आणि मग एक दिवस अकस्मात उजाडतं. एकच गोष्ट उमगते असं नाही, तर आतापर्यंत लक्षात न आलेले धागेदारे व संबंध प्रत्ययाला येतात. पूर्वीच्या अनुभूतीत प्रत्ययाला न आलेल्या गोष्टी नव्या प्रेरणेनं मनात घुसतात. मनाला एवढा धक्का बसतो की, मन अगदी बधिर होऊन जातं.  एकदा जुन्या इंग्रजी पाचवीच्या वर्गात संस्कृताचा धडा चालला होता. पुस्तक होतं भांडारकरांचं दुसरं पुस्तक. पुस्तकात एक वाक्य भाषांतरासाठी होतं. 'आनन्दं ब्रह्मणो विद्वान न बिभेति कदाचन।' अर्थ लावायची माझी पाळी होती. 'भी' धातूच्या तृतीय-पुरुषाच्या रूपासाठी वाक्य घातलं, हे उघड होतं. वाक्य सोपं होतं. सर्व शब्द व त्यांची रूपं मला माहीत होती. मी अर्थ केला, “ब्रह्माचा आनंद माहीत असणारा कधीही भीत नाही." अर्थ बरोबर होता. मी खाली बसले. शब्दांचा अर्थ लागला होता. पण वाक्याचा अर्थ मला मुळीच कळला नव्हता. ब्रह्माचा आनंद आणि भीती ह्याचा संबंध काय? मनात म्हटलं, “मला कुठं भीती वाटते आहे? पण मला कुठं ब्रह्माचा आनंद होतो आहे? हे भांडारकर विचित्रच वाक्यं घालतात."

 काही दिवस वाक्य मनात घोळलं व नंतर कित्येक तपं मी ते वाक्य विसरूनही गेले होते. बी. ए. च्या वर्गात म्हणे मी तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता; पण सबंध दोन वर्षांत त्या वाक्याची मला आठवण झाली नाही. कधी तरी अजिंठ्याची लेणी पहायला मी गेले होते. तिथे मनुष्याला ‘पंचमहाभय की ‘सप्तमहाभयं' असतात, त्यांचे चित्रण केलेलं पाहिलं. एवढंच काय 'मृत्यू उदराचिये परिवरौं।गर्भ गिंवसी' ही ज्ञानदेवीतली ओवीपण मोठा रस घेऊन वाचली. पण मन काही केल्या ह्या अनुभूतीचा भांडारकरांच्या पुस्तकात वाक्याशी संदर्भ जोडीना. पण एक दिवस उजाडला. हायडेगरचे एक भाषांतरित पुस्तक वाचीत होते. विषय त्याचा आवडता. झाइन (Sein) आणि निष्ट-झाइन (Nichtsein). ‘झाइन' म्हणजे असणे, ‘निष्ट-झाइन' म्हणजे नसणं. त्यानं ज्यावर भाष्य केलं आहे अशी आणखी एक कल्पना ‘डाझाइन' (Dasein) म्हणून आहे. ‘डाझाईन' म्हणजे 'तिथं असणं, असणारं', संस्कृतात नैयायिकांच्या भाषेत सांगावयाचे, म्हणजे 'तत‘ झाइन-नेस' (Sein-ness)- असणेपण, म्हणजे सत्ता; ‘निष्ट-झाइन-नेस- (Nicht-sein-ness)- विशिष्ट ठिकाणी नसणेपणा म्हणजे असत; व ‘डाझाइन-नेस' (Dasein-ness)- विशिष्ट ठिकाणी असणं, म्हणजे 'तत्ता'- ‘डाझाईन' हे ‘दिक व काल यांनी मर्यादेत आणलेलं' - ‘अभिव्यक्त झालेलं झाईन' किंवा 'व्यक्ती'. हायडेगर सत् ची त्यापेक्षाही तत् ची चिकित्सा करिताना व रूप निश्चित करिताना त्याचे मुख्य गुण काय, हे सांगतो. 'सत' हे सर्वव्यापी व अनंत असल्यामुळे असत ला गुंडाळून बसलेलं असतं. पण ‘तत्' हे सत् चे देशकालानं मर्यादित झालेलं रूप असल्यामुळे त्यावर  असतची दाट छाया जन्मापासूनच पडलेली असते व ‘निष्ट-झाइन’ ‘नाहीसं होणं' ह्या परिणामाचं भय त्याला असतं. हे भय तत् चं एक लक्षण आहे. इथपर्यंत आले आणि डोळ्यांपुढे पुस्तकातलं पान व ओळ स्वच्छ दिसली. 'आनन्दं ब्रह्मणो विद्वान न बिभेति कदाचन।' भय कसलं असतं व कशामुळे ते नाहीसं होतं, हे अगदी लख्ख समजलं. हायडेगर तिथंच सोडला व पाचवीच्या पुस्तकातलं वाक्य परत सापडतं का, बघू लागले.

 हात व डोळे पुस्तकं चाळीत होते आणि मन भरकटत होतं. ह्या ओळीचा अर्थ इतका सोपा आहे की, त्याला म्हातारपण का यावं लागलं? वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी कळलं नाही, तर नवल नाही, पण मागून विशीच्या पुढे सुद्धा मन प्रगल्भ झालं नव्हतं का? लहानपणी मूत्यूची कल्पना नसते. पुढे जीव व मृत्यू ह्या दोन शब्दांची सांगड घातलेली वाक्यं वाचली, तरी 'भय' शब्द नसल्यामुळे साखळी जुळली नाही. पंचमहाभय- सप्तमहाभयांची चित्रं पाहिली, पण त्यांत निरनिराळ्या एकेका भयाचं, पाण्यात बुडून मरण्याचं, आगीत जळण्याचं वगैरे चित्रण असल्यामुळे 'भया' च्या सर्वंकष सामान्यत्वाची कल्पना आली नाही. ज्ञानदेवांच्या ओळींतही 'जन्म' आणि 'मृत्यू' असे शब्द आहेत; ‘भय' नाही. म्हणून लक्षात आलं नाही. अशी सारवासारव मी करू बघत होते. पण एकदा जागं झालेलं मन ही तडजोड मानायला तयार नव्हतं. परत पहिल्यापासून विचार करायला लागले.

 लहानपणी मृत्यूची कल्पनाच नसते. त्यामुळे ही ओळ समजण्याचं सामर्थ्यच मनाला नव्हतं. इथपर्यंतचं समर्थन पटण्यासारखं होतं. मोठेपणी क्षणभर थांबून उसंत घेतली असती, विचार केला असता, तर ओळ समजली असती. पण मन व शरीर वर्तमानकाळात इतक्या आस्थेनं वावरत होतं, इतक्या उत्कटतेनं प्रत्येक क्षण जगत होतं की, अव्यक्त अशी सुरुवात (अव्यक्तादि) व अव्यक्त असा अंत (अव्यक्तनिधन) ह्यांकडे त्याची झेपच नव्हती. व्यक्तमध्यात ते पूर्णपणे गुरफटलेलं होतं. तेही दिवस गेले. सासर- माहेरची वडील माणसं गेली. ज्यांना जिवाभावाचे मित्र म्हणत असे, त्यातलेही काही गेले. पण मन अजून पुरं जागं झालं नव्हतं. स्वत:ची जिवावरची दुखणी आली. म्हातारपण व अशक्तपणा आला. तेव्हा जिथं जातो तिथं बरोबर असणार्‍या ह्या सांगातीची ह्या ‘निष्ट-झाइन'च्या अस्तित्वाची जाणीव झाली. भयानं मनाला स्पर्श केला. हा सर्व अनुभव येईपर्यंत अगदी चिरंतन उघडं सत्यही दिसलं नव्हतं. सत्य कायम, डोळ्यांपुढे उघडं असतं. ते पडद्याआड नसतं. कुठूनतरी उकरून काढायचं नसतं. त्याला न ओळखणं, न पाहणं, पाहूनही दृष्टीआड करणं ही सर्व आपल्या मनाची किमया आहे. वाचायला येऊन उमजत नाही. अनुभव घेऊनही आपण कोरडेच राहतो. कारण सत्य समजून घेण्याची, त्याचा आविष्कार सहन करण्याची मनाची तयारी नसते. मनाच्या तयारीप्रमाणे एकेक कोडी उलगडतात, आणि कितीतरी न उलगडता तशीच राहत असली पाहिजेत. कोडी आहेत, ह्याची जाणीवही आपल्याला न होता आपला अंत होत असेल, हा सगळा विचार संपतो, तो हवं असलेलं वाक्य तैत्तिरीय उपनिषदात सापडलं. तिथं खूण घालून हायडेगर पुढे वाचावयास घेतला..

 व्यक्तीला (तत् ला) नाहीसं होण्याची कायम भीती आहे. पण हायडेगर एवढ्यावरच थांबला नाही. त्याची चिकित्सा पुढे चालू झाली. हे जे तत् असतं, त्याचं आणि त्याच्या असण्याच्या क्रियेतच जे नसण्याचं भय असतं, त्याचं एक रूपांतर ते तत करितं. ते रूपांतर म्हणजे इतरांबद्दल काळजी वा चिंता. व्यक्ती कसल्या-ना-कसल्या काळजीत असते. ती दुसर्‍यांबद्दल काळजीत असते, सगळ्यांची चिंता करीत असते आणि ही दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी वा चिंता दुसरं-तिसरं काही नसून स्वतःला स्वतःच्याबद्दल जी चिंता वाटते, तिचं एक रूपांतर आहे. स्वत:च्या नष्ट होण्याची चिंता बाळगीत राहिल्यानं जीवन दुःसह होईल. पण त्या चिंतेला असं रूप दिलं, म्हणजे जीवनौघ व्यवस्थित चालू राहतो, ही हायडेगरच्या विचारावर पडलेली फ्रॉइडची छाया. ह्या दोघांनी मिळून मला माझं खरं रूप दाखविलं. माझ्या प्रकृतीबद्दल विचारणाऱ्या माणसाला हसून उलट, “आता तुमची प्रकृती कशी आहे? मध्ये फार आजारी होता, नाही?" असं काळजीच्या सुरात विचारणारी मानभावी मी, “अग, तुला हल्ली बरं नसतं. एवढी बडबड करू नकोस; घरी बसून विश्रांती घे" असं कर्त्यासवरत्या शहाण्यासुरत्या मुलीला बजावणारी मी, “हे बघ धाकटीला पडसं झालं आहे. तिच्या अंगात गरम घाल. तिला बाहेर नेऊ नकोस. भारी काळजी वाटते बाई तिची." असा उपदेश करणारी मी, म्हणजे स्वत:च्या भयानं वळवळणारा वरवर दुसऱ्याबद्दलच्या काळजीचा बुरखा घेतलेला माझाच क्षुद्र जीव आहे हे स्पष्ट झालं.   एखादी गोष्ट हातात घेतली की, बुद्धी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तिचा पाठपुरावा करायचा, मध्ये थांबायचं म्हणून नाही; अगदी शेवटाला जायचं, हा जर्मन लोकांचा गुण आहे. रस्त्यावर खडी चेपणारा रूळ असतो ना, तसं त्यांचं आहे. तोच अजस्त्रपणा, तोच संथपणा, तोच एकमार्गीपणा, तोच अटळपणा आणि तेच सामर्थ्य, हायडेगरने माझा आत्मा पार भुईसपाट करून टाकिला.

१९६८