खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने/सौख्याचे अर्थशास्त्र

विकिस्रोत कडून

१०. सौख्याचे अर्थशास्त्र


 कोणाही माणसाला तहानभूक भागविण्यासाठी काही प्यायला मिळाले, खायला मिळाले म्हणजे आनंद वाटतो. थंडीवाऱ्यापासून संरक्षण व्हावे यासाठी कपडे, निवारा मिळाला म्हणजे संतोष होतो. संसार थाटला की गृहस्थीच्या जीवनात मुलाबाळांना आनंदाने खेळताबागडता यावे यासाठी, खाणेपिणे, कपडे, निवारा, करमणूक यासाठी अनंत साधने हवीहवीशी वाटतात. माणसाच्या या सर्व जन्मजात प्रेरणा आहेत. खावे, प्यावे, उपभोगावे, आनंद लुटावा यासाठी माणूस जन्मभर खटाटोप करतो.
 उपभोग वाढविण्याची प्रत्येक प्राणीमात्राची इच्छा असते हे खरे; पण, अशा तऱ्हेने सर्व प्रयत्नांनी ऐहिक सुखसंपदांच्या मागे लागणाऱ्या व्यक्तींचा समाज सुखीसमाधानी, आनंदी राहील का? समाजाला मन नाही, राष्ट-ांना बुद्धी नाही; तेव्हा त्यांच्याकरिता भल्याचे काय हे ते बोलत नाहीत. मग साऱ्या देशाकरिता उत्पादन, वितरण इत्यादी अर्थकारणासाठी भल्याची व्यवस्था कोणती? हे जाणण्यासाठी काही फूटपट्टी आहे काय? समाजाच्या सौख्याचे मोजमाप करता येईल काय? अमेरिकेतील लोकांचे सौख्य अमुक अमुक एकक, हिंदुस्थानातील लोकांचे सौख्य इतके इतके एकक असे काही मोजता येईल काय? निदान, दोन देशांची तुलना करून त्यातील एक सौख्यात वरचढ आहे, दुसरा काही कमी आहे असेतरी म्हणता येईल काय? हे सारे प्रश्न सोडविण्यासाठी केवळ अर्थशास्त्राचा आधार पुरेसा नाही. जीवशास्त्र, समाजशास्त्र, अगदी तत्त्वज्ञानाचादेखील आधार घ्यावा लागेल.
 उदाहरणाने हा प्रश्न समजावयास थोडा सोपा होईल. समजा 'अ' आणि 'ब' ही दोन माणसे आहेत. दोघांनीही शेवटचे जेवण चोवीस तासांपूर्वी घेतले. त्यानंतर त्यांना काहीच खायला मिळाले नाही. चोवीस तासांनी एकएक भाकरी मिळाली आणि त्यांनी ती भाकरी खायला सुरुवात केली. दोघांच्याही पोटात कमालीची भूक आहे. दोघांनाही, कधी एकदा काहीतरी पोटात जाते अशी वखवख लागलेली. पण, ही भुकेची आर्तता मोजायची कशी? जर माणसाच्या जठरात भुकेमुळे उत्पन्न होणाऱ्या आम्लाचे मोजमाप, शरीरविच्छेदन न करता घेता येत असते तर भुकेच्या तीव्रतेचा काहीसा अंदाज बांधता आला असता; पण, तोदेखील फारसा शास्त्रीय ठरला नसता. भुकेने तयार होणाऱ्या एक औंस आम्लाचा परिणाम 'अ' आणि 'ब' या दोघांवरही सारखाच होईल असे मानण्यास काहीच आधार नाही. 'अ'ला पूर्वायुष्यात उपासमार काढण्याची सवय असली किंवा तो वजन आणि आकारमान यांत कमी असला तर त्याची भुकेच्या तीव्रतेची जाणीव 'ब'पेक्षा वेगळी असू शकेल. काही माणसे अती भूक लागली म्हणजे चिडचीड, रागराग करतात. दुसरी काही माणसे शक्तीचा व्यय टाळण्याकरिता निमूटपणे शांत झोपून घेतात. थोडक्यात, भुकेला काही मोजमाप नाही आणि दोन माणसांच्या भुकेची तुलनाही नाही.
 दोघांचीही भूक चोवीस तासांची, पण तिची तीव्रता ज्याला त्याला जाणवणारी वेगळी; त्यांची तुलना अशक्य. तसेच, भुकेच्या समाधानाने होणाऱ्या आनंदाची तुलनाही अशक्य. 'अ' आणि 'ब' यांनी भाकरीचा पहिला घास खाल्ला तेव्हा परब्रह्म भेटल्याचा आनंद दोघांनाही होणार. पण, दोघांच्या परब्रह्म आनंदाची तुलना करण्याची शक्यता नाही. प्रत्येकाच्या अनुभवातले परब्रह्म हेही वेगळे वेगळेच असते.
 भाकरी खाण्यापासून 'अ' आणि 'ब' यांना मिळणाऱ्या समाधानाबद्दल एक गोष्ट निश्चित सांगता येईल. पहिला घास खाताना उच्च कोटीचा आनंद झाला. पुष्कळदा भुकेल्या घशाला कोरड पडलेली असते. चवीची जाणीवसुद्धा होत नाही. दुसरा, तिसरा, चौथा घास अधिकाधिक गोड लागत जातो. काही काळानंतर का होईना, पाचपन्नास घासांनंतर भूक शमते आणि प्रत्येक नव्या घासाने मिळणारे समाधान आधीच्या समाधानाच्या तुलनेने कमी कमी होऊ लागते. पहिली भाकरी संपेपर्यंत समाधान वाढत राहील असे समजू. दुसरी भाकरी समोर आली की तिच्या दर्शनाने होणारा आनंद पहिल्या भाकरीच्या तुलनेने दोघांच्याही बाबतीत कमीच झालेला असणार; तिसऱ्या भाकरीच्या वेळी त्याहूनही कमी, चौथी भाकरी समोर आली तर 'आता नको, पोट भरले' अशी अवस्था होईल. तरीही आग्रह चालूच राहिला तर काही काळाने भाकरीमुळे सौख्य मिळण्याऐवजी त्रास वाटू लागेल, ती गिळवणार नाही, गिळलेल्या भाकरीचेही अपचन होईल. सारांश, भाकरीच्या घासागणिक तिच्या सेवनातून मिळणारा आनंद 'अ' आणि 'ब' या दोघांच्याही बाबतीत अधिकाधिक घटत जाईल.
 घसरत्या संतुष्टीच्या आधाराने सामाजिक अर्थशास्त्राचे काही आधार बनविण्याचा अगदी पहिल्याने प्रयत्न, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पिगू नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने १९४६ साली “सामाजिक सौख्याचे अर्थशास्त्र Economics of Welfare" हे पुस्तक प्रसिद्ध करून केला. त्याच्या या पुस्तकाचा दहावीस वर्षे दबदबा राहिला. वेगवेगळ्या रंगछटांच्या समाजवाद्यांनी पिगूच्या अर्थशास्त्राचा वारंवार उपयोग केला. पिगूच्या साऱ्या विश्लेषणाचा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी पार धुव्वा उडविला आहे. पण तरीही, सरकारी अर्थकारण, अंदाजपत्रकातील धोरणे, सरकारी कल्याणकारी योजना या सर्वांमागे अजूनही पिगूचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
 मनुष्यप्राण्याच्या सौख्याची अनेक साधने आहेत : मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक, कलासंबंधी इत्यादी, इत्यादी. ज्या सौख्यांचे मोजमाप पैशाच्या आधाराने करता येते त्याला आर्थिक सौख्य म्हणावे ही पिगूची व्याख्या. आर्थिक सौख्य वाढले म्हणजेच समाजाचे सर्वार्थाने भले होते हे खरे नाही. आर्थिक सौख्याचा सर्वसाधारण समाजाच्या भल्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो. देशातील एकूण राष्ट्रीय उत्पादन हे त्या देशातील आर्थिक सौख्याचे एक मोजमाप आहे. पण, उत्पादनाचे वाटप वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. वाटप कसेही झाले तरी सामाजिक सौख्याची बेरीज सारखीच राहील काय? उत्पादनातून जमीनदारांना भाडेपट्टी मिळेल, कामगारांना मजुरी मिळेल, भांडवल पुरविणाऱ्यांना व्याज मिळेल आणि उद्योजकांना फायदा मिळेल. अशा तऱ्हेने राष्ट्रीय संपत्तीचे वाटप होईल. पण, अशा वाटपाने राष्ट्रीय संपत्तीतून मिळणारे आर्थिक सौख्य सर्वोच्च पातळीचे ठरेल याची काहीच खात्री नाही. उत्पादनाच्या वेगवेगळ्या घटकांना मिळालेला मोबदला त्यांचा उत्पादनातील सहभाग लक्षात घेता योग्यच आहे असे मानले तरी वेगवेगळ्या घटकांच्या हातात येणाऱ्या उत्पन्नातील तफावत फार मोठी असेल तर साऱ्या समाजाचे मिळून आर्थिक सौख्य कमी भरेल.
 वर घेतलेल्या उदाहरणात 'अ'ला दहा भाकरी दिल्या आणि 'ब'ला दोनच दिल्या तर 'अ'ला अजीर्णाचा त्रास आणि 'ब'ला अर्धपोटी राहण्याचा अशी अवस्था होऊन जाईल. त्यापेक्षा, दोघांनाही सहा सहा भाकऱ्या मिळाल्या असत्या तर एकूण बारा भाकऱ्यांपासून दोघांना मिळून होणारे सौख्य सर्वात अधिक झाले असते.
 एकेका घासापासून मिळणाऱ्या आनंदाचे मोजमाप करता येईल; सर्व उपभोगांतून मिळणारा आनंद कमी कमीच होत जातो आणि उपभोगाची सर्व मनुष्यप्राण्यांची क्षमता सारखीच असते ही पिगूची गृहीततत्त्वे. त्यांच्या आधाराने त्याने समाजधुरीणांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे मांडली.
 - राष्ट्रीय संपत्ती वाढली म्हणजे आर्थिक सौख्यात वाढ होते हे खरे. फक्त या वाढीव उत्पादनासाठी लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध श्रम करण्याची सक्ती होता कामा नये.
 - राष्ट्रीय उत्पादनातील गरीबांचा वाटा वेगवेगळ्या मार्गांनी वाढविता येतो. आणि, काही अपवाद सोडल्यास गरीबांचा वाटा वाढविल्याने सामाजिक सौख्यात वाढ होते. फक्त अशा कार्यक्रमांमुळे उद्योजकांचे प्रोत्साहन कमी होऊ नये आणि गुंतवणूक व उत्पादन यांवर विपरीत परिणाम होऊ नये.
 पिगूच्या सौख्याच्या अर्थशास्त्राचे, त्यातील गृहीततत्त्वांचे, तर्कशास्त्राचे आणि विश्लेषणाचे अर्थशास्त्र्यांनी वाभाडे वाभाडे काढले. पण दीनदुबळ्या करुणेपोटी दानधर्म करण्याची धार्मिकांची करुणेवर आधारित परंपरा आणि समाजवाद्यांची गरीबांसंबंधीची कळकळ या दोघांनाही पिगूच्या मांडणीने, थोडासा शास्त्रीय वाटणारा आधार मिळाला.
 माणसे समान असतात; सारी देवाची लेकरे; त्यात विषमता नाही या सर्वमान्य तत्त्वांचा मोठा विपरीत अर्थ पिगूच्या सौख्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. सारी माणसे एकाच ठशाची, एकसारखीच आहेत; दोन माणसांना येणारे सुखदु:ख, गरम आणि थंड यांचे अनुभव एकसारखेच असतात; जांभळा रंग म्हटला की 'अ'च्या मन:पटलावर ज्या रंगछटेची अनुभूती होते तीच 'ब'च्याही मनात होते या कल्पनांना काही आधार नाही. प्रत्येक माणसाला वाढत्या उपभोगाबरोबर होणारा आनंद कमी होत जातो हे खरे. पण, माणसे काही तीच तीच वस्तू उपभोगत नाहीत; उपभोगाच्या वस्तूंची विविधता वाढवीत राहतात. भाकरीबरोबर कोरड्यास घेतात; चपात्या, पुऱ्या, मांडे, मिठाई असे नवनवे पदार्थ शोधून काढून उपभोगसौख्याची कमान वाढती राहील अशी व्यवस्था ते करतात. भाकरीच्या प्रत्येक घासापासून मिळणारे समाधान घसरत जाईल हे खरे; पण, आमदनीच्या प्रत्येक नव्या रुपयापासून होणारे समाधान घटत जाईल असे नाही. दोन वेगवेगळ्या माणसांच्या मनातील उपभोगसौख्याची तुलना करणे तर अगदीच अशक्यप्राय आहे. उपाशी माणसाची भूक तीव्र, ती शमविण्यासाठी तो प्रचंड खटाटोप करेल; ज्याची भूक कमी तीव्र त्याचा खटाटोप तुलनेने कमी तीव्र राहील असे म्हणावे तर इतिहास त्याला साक्षी राहात नाही. दुष्काळाच्या काळात माणसे उपासमारीने मरून पडतात, पण धान्याच्या गोदामांवर हल्ले करून धान्य लुटण्याचा प्रयत्न करीत नाहीत. उलट तुलनेने, चैनीच्या वस्तूंचा तुटवडा पडताच चैनी माणसे आकाशपाताळ एक करून टाकतात हा अनुभव नेहमी येतो.
 मोरारजी देसाई अर्थमंत्री असताना त्यांनी जवळजवळ साऱ्याच परदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली; प्रसाधनांच्या वस्तूंवरही बंदी घातली. आयातीवरील नियंत्रणे साऱ्या देशाने मुकाटपणे सहन केली. पण, दिल्लीतील उच्चभ्रू समाजातील महिला तक्रारी घेऊन पंडीत नेहरूकडे गेल्या आणि त्यांना लागणाऱ्या प्रसाधनसाधनांचे उत्पादन देशातल्या देशात सुरू व्हावे याची तजवीज त्यांनी करून घेतली.
 मनुष्यप्राणी समान आहेत, पण ती एका मुशीतून काढलेली बाहुली नाहीत. प्रत्येक प्राणी वेगळा आहे, अनन्यसाधारण आहे हे त्यांच्यातील समानतेचे सूत्र आहे. हे न समजल्याने धर्मवादी फसले, समाजवादीही फसले. करुणा आणि विषमतानिर्मूलन यांना काही तार्किक पाया देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पिगूने अर्थशास्त्र्यांना त्याच मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. 'सौख्याचे अर्थशास्त्र' आपल्या पायावर कधी उभे राहिलेच नाही. पण, प्रत्यक्ष शासकीय धोरणावर त्याचा प्रभाव प्रचंड आहे. श्रीमंतांवर कर बसवून गरीबांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्या असे कार्यक्रम सर्वच पक्ष आग्रहाने मांडतच असतात. बिनबुडाचा हा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन दररोजच्या शासकीय अर्थकारणात महत्त्वाचा ठरला आहे. कारण उघड आहे. राजकीय शासनाच्या हाती अर्थकारणाची सूत्रे गेली. दरडोई एक मत हे तत्त्व अर्थकारणातही लागू झाले. पिगूची अशास्त्रीय गृहीततत्त्वे प्रत्यक्षात खरी मानली गेली. अशास्त्रीय पिगू प्रत्यक्षात मोठी मान्यता मिळवून व टिकून आहे.

(६ मार्च १९९८)