खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने/परिशिष्ट २ : व्यक्तिविकास इदम् न अलम्?

विकिस्रोत कडून

परिशिष्ट २
व्यक्ति विकास इदम् न अलम्?


श्री. अशोकराव निरफराके यास,
सप्रेम नमस्कार,
 आपला माझा परिचय नाही, आपण कोण कुठले, वय काय हेही मला माहिती नाही. 'संवाद' नावाच्या कोणा मासिक पत्रिकेच्या संपादकाने जानेवारी १९९७ चा 'युवा' विशेषांक पाठवला. अशी प्रकाशने झटकन चाळून दूर केली जातात. कविता तर सहसा वाचण्याच्या भानगडीतच मी पडत नाही. आपल्या कवितेच्या आकृतिबंधावरून ते मुक्तकाव्य वा गद्यकाव्य नसून मात्रांची शिस्त पाळणाऱ्या वृत्तांचे आहे. हे दुर्मिळ लक्षात आले, त्यामुळे काही कुतुहल वाटले. त्यात 'ततः किम्?' असे मोठे आकर्षक संस्कृत शीर्षक पाहून अधिकच उत्सुकता वाटली. कविता वाचली, दोनतीनदा वाचली. इतरांना वाचून दाखवली. काहींना वाचायला दिली आणि आज तुम्हाला हे पत्र लिहिण्यास बसलो आहे.
 एवढे कुतुहल जागृत करण्याची आपल्या कवितेची ताकद आहे, हेही दुर्मिळ. त्याबद्दलच प्रथम आपले अभिनंदन केले पाहिजे.
 कवितेचा थाट सावरकरी आणि भाषेचा प्रवाह रामदासी आहे. असे लिहिणे प्रचितीशिवाय होत नाही. कवितेच्या नायकाची कर्तबगारी हे कवीचे स्वप्नरंजन नाही हे स्पष्ट आहे. स्वातंत्र्यवीरांच्या कवितेत जसा स्वतःच्या बृद्धिविषयी, धडाडीविषयी, शौर्याविषयी, राष्ट-प्रेमाविषयी अहंकार दिसतो पण टोचत नाही; तसेच आपल्या कवितेतही आहे. आत्मगौरवाची जाणीव मोठी सुखकारक असते!
 मी सातवीआठवीत असतांनाचा एक अनुभव. एक दिवस कोण्या निमित्ताने कोण जाणे, मनात विचार आला. केवढे आपण भाग्यवान! या साऱ्या अनंत विश्वात परमेश्वराचा कोणता लाडका ग्रह असेल तर तो म्हणजे पृथ्वी हे नि:संशय. या पृथ्वीतलावर भारतवर्षासारखी सुजलाम् सुफलाम् नरवीरांची खाण, नारीदेवतांचे पूज्यस्थान अशी पुण्यभूमी दुसरी नाही. या भारतभूमीत महाराष्ट- नि:संशय सर्वश्रेष्ठ. कारण ज्ञानेश्वरांसारखे संत आणि शिवरायांसारखे महाप्रतापी वीर येथे होऊन गेले. १९५७ चे समर गाजवणारे नानासाहेब, तात्यासाहेब, राणी लक्ष्मीबाई महाराष्ट-ाच्याच कुशीतल्या. या महाराष्ट्राची सर्वश्रेष्ठ जात कोणती असेल तर ती वर्णश्रेष्ठ ब्राह्मण हेही तितकेच उघड आहे. अशा ब्राह्मण कुळात आपल्या आईबापांसारखा श्रेष्ठचरितांच्या पोटी आपण जन्मलो. या अतिविशिष्ट जन्माचे भाग्य मोठे असाधारण आहे, या विचाराने काही काळ धन्य धन्य वाटले. विरासतीत मिळालेल्या या भाग्याचा सदुपयोग करण्याची जड जबाबदारी आपल्यावर असल्याचीही जाणीव झाली. या ऋणाचे उतराई कसे व्हावे, हेच समजेना. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात काही काळ गेला.
 एक दिवस सहज मनांत प्रश्न आला, ही सगळी जन्माच्या भाग्याची उतरंड कितपत खरी आहे? एकामागोमाग एक प्रश्न मनांत येऊ लागले. पृथ्वी सर्वश्रेष्ठ ग्रह असे मानायला काय आधार आहे? इतर ग्रहांविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. एवढ्या विश्वाच्या अवकाशात याहीपेक्षा मोठे, याहीपेक्षा सुंदर, माणसापेक्षा प्रबुद्ध आणि उन्नत प्राणी अंगाखांद्यावर खेळवणारे ग्रह नसतील कशावरून? पृथ्वीवर म्हटले तरी, भारतवर्षात काय आहे की जे इतर कोणत्याच देशात नाही? निसर्ग जास्त करून दरिद्री, संपन्नता पहावी तर सर्वात गरीब, निरक्षर, भुकेल्यांचा हा देश. इतर देशांमध्ये शूरवीर आणि कर्तबगार रमण्या झाल्या नाहीत असे थोडेच आहे? महाराष्ट- तर बोलून चालून काटेरी झाडांचा आणि दगडाधोंड्यांचा दुष्काळी प्रदेश. आणि ब्राह्मणवर्गाचे श्रेष्ठत्व ते कोणते? त्यांनी तयार केलेली संस्कृती जेव्हा जेव्हा दुसऱ्या कोणाच्याही संपर्कात आली तेव्हा पराभूत झाली. आपल्याच समाजातील बहुसंख्यांना विद्येचा, धर्मग्रंथवाचनाचा, मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाकारणारी ही वर्णसंस्कृती, यात शरम वाटण्यासारखे काही नसेल, पण विशेष अभिमान बाळगण्याचीही काही गरज दिसत नाही.
 मग भाग्याच्या उतरंडीचा हा विचार मनात आलाच का? डोक्यात प्रकाश पडला, जन्माच्या अपघाताने जे जे मिळते तेच पवित्र, तेच उदंड, तेच थोर; त्याचाच अभिमान बाळगावा असे वाटणे ही प्राणीमात्राची साहजिक प्रवृत्ति आहे. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या वारशाचा कोणतेही प्रश्न न विचारता अभिमान बाळगणे हे इतरांच्या वारशाविषयीच्या अज्ञानातूनच निघते. कोणी हिंदुत्वाचा अभिमान सांगू लागला तर त्याची दखल गंभीरपणे घेण्याची गरज नाही. जन्माच्या अपघाताने न मिळालेल्या एखाद्या गोष्टीचे कोणी कौतुक केले तर ते विशेष मानावे. परधार्जिणेपणा हा काही गुण नाही तो दोषच, पण हा दोष क्षुद्र स्वाभिमानाच्या दोषाच्या तुलनेने तसा विरळा!
 या जाणीवांनी मी अस्वस्थ झालो. आणि तेव्हापासून सगळ्या विश्वाच्या आणि माझ्या स्वत:च्या उत्पत्तिलयाच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या लहान वयातही मी एक मोठा अकटोविकट प्रयत्न केला. जन्माच्या अपघाताने मिळालेली अभिमान स्थळे खऱ्याखुऱ्या विचाराची सुरवातच होऊ देत नाहीत. अभिमान रुजले असले की सगळा विचार या अभिमान-स्थळांची नवी-नवी समर्थने शोधण्याच्या कामातच अडकून गुरफटून जातो. याला उपाय काय? त्याकाळी श्रीमद् भगवद्गीता, श्रीमद् आद्य शंकराचार्य आणि आर्य चाणक्य माझी अभिमानस्थळे होती. यांचा उल्लेख करायचा झाला तर पहिल्या उपपदाऐवजी एखादा खास अभद्र शब्द वापरायचा व जन्माच्या वारशाने मिळालेल्या बौद्धिक मानसिक गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची असा हा प्रयोग. जात तर जात नाही पण वृथा धर्माभिमान टाळण्याकरिता काही काळ दरवर्षी धर्मांतर करून एक नवा धर्म अभ्यासपूर्ण स्वीकारण्याचा मी बेत केला होता, तो हातून पार पडला नाही ही गोष्ट वेगळी.
 तुमची कविता वाचल्यानंतर थोडी आशा वाटली. मला पडलेले आणि न सोडवता आलेले प्रश्न ज्याने अल्पवयातच सोडवले आहे, अशा कोणाचे दर्शन होते काय अशी आशा वाटली. म्हणून आपल्याला हे पत्र लिहीत आहे. आपला कुलीनाघरी जन्म झाला, त्या कुलाचे नेमके श्रेष्ठत्व काय? एव्हरेस्ट सर करणारे, दक्षिण ध्रुवावर पोचणारे, नोबेल पारितोषिक विजेते कोणी शास्त्रज्ञ कोणी संशोधक, किंवा कोणी उत्तुंग राष्ट-सेवा घडविलेले कोणी निरफराके माझ्यातरी ऐकिवात नाही.
 अभिमान बाळगण्यासारखे गोमटे रूप आपणास मिळाले, पुण्याच्या चित्पावनी संस्कृतीत कोणी थोडे गोरे असले की त्याला सुंदर किंवा रुबाबदार मानले जाते. आपण त्यापलीकडे सुस्वरूप असणार अशी माझी खात्री आहे.
 कुशाग्र बुद्धी मिळाली याची प्रचिती आपणास केव्हा आली? आणि आपण ज्याला सुविख्यात शाळा म्हणतात तिने आपल्या राष्ट्रास ललामभूम अशी कामगिरी बजावल्याचेही काही माहिती नाही. कुल, रूप, बुद्धी यांच्याबद्दलची ही स्वकौतुकी आहे का वास्तविकता आहे?
 परीक्षेत गुण मिळवले आणि सध्याच्या समाजाच्या मापदंडाने वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी प्रवेश मिळवला म्हणजे आपण सारे गड जिंकलो, आता आपल्या स्वत:च्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे तरी किती याची चिंता पडलेला एक अविनाश धर्माधिकारी मी पाहिलेला आहे. तुमची गत त्याच्यासारखी तर नाही!
 खेळ, कला, वक्तृत्व, लेखन, विदेश-यात्रा, मोठा पगार, पुढारीपण या सगळ्यात काही नाव कमावले याबद्दल आपण खरंच अभिनंदनास पात्र आहात. आणि यानंतर ततः किम्? या गोष्टीचे काय कौतुक आहे. यापलीकडे राष्ट-सेवा घडली पाहिजे अशी आपली दुर्दम्य आकांक्षा आहे याचे तर विशेष नवल वाटले!
 आता राष्ट-सेवा म्हणजे आपण काय करू इच्छिता हे मात्र काही लक्षात येईना. या देशातील कोट्यानुकोटी लोक दैन्यात आहेत ते दैन्य दूर करण्यासाठी काही पौरुषाची प्रतिज्ञा आपण करू इच्छिता? हे नेमके पौरुष कोणते? त्याचे रूप काय? त्याचा मार्ग काय? हे जर स्पष्ट नसले तर पौरुषाची ही पूजा निर्माल्य होऊन कोणत्यातरी जातीयवादी गटारगंगेस मिळण्याचा मोठा धोका असतो.
 अभ्यास, खेळ, कला, लेखन, द्रव्यार्जन ही सारी क्षेत्रे वेगळी. यात कितीही नैपुण्य मिळवले, प्राविण्य मिळवले, कीर्ती मिळवली तर 'ततः किम्?' या क्षेत्राच्या बाहेर राष्ट-सेवेचे असे काही वेगळे क्षेत्र आहे, आणि त्यात पौरुष गाजवायचे आहे, ते हे पौरुषाचे क्षेत्र कोणते?
 तुमच्या कुशाग्र बुद्धीचा तुम्ही जागतिक कीर्तिमानपात्र वापर केला (म्हणजे परीक्षेत प्रश्नांची सोडत घेऊन उच्चांक मिळवण्याकरिता नव्हे) तर ती राष्ट-सेवा आहे का नाही? जगभरात आज संशोधनाचा रथ प्रचंड वेगाने चालला आहे. इलेक्ट-ॉनिक्स, जेनेटिक्स या क्षेत्रांत तर अद्भूत अवतरत आहे. या सगळ्या संशोधनात कोणी भारतीय सामील झाला तेव्हा काही घडले. जयंत नारळीकर पुण्यास परतले आणि निष्प्रभ झाले. ही जी तुम्ही राष्ट-सेवा राष्ट-सेवा म्हणतात ती विज्ञान, वैद्यकीय, यांत्रिकी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काही ज्ञानकण जोडून दिल्याने होणार नाही का?
 गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताची दुर्दशा आपण पाहिली. एरवीही भारतीय पुरुषांचे उच्चांक जागतिक महिलांच्या उच्चांकाच्या खालचे असतात. आपण कबड्डी, खो-खो, फुटबॉल, टेनिस यांतील गल्लीपातळीवरील प्राविण्याचा 'ततः किम्' म्हणून उपहास करण्यापेक्षा हे प्राविण्य अभ्यासाने कसोशीने, तपस्येने, आंतरराष्ट-ीय पातळीवर उच्चांक फडकवणारे व्हावे असे जोपासले तर ती राष्ट ट-सेवा होणार नाही काय?
 विद्या, कला, क्रीडा, नेतृत्व, वक्तृत्व या सगळ्याच क्षेत्रात परिस्थिती अशी की आमची राष्ट-ीय शिखरे जगाच्या तुलनेत खुजी वारूळे दिसू लागावी. मागासलेल्या देशात सारीच चणचण असली तरी महात्म्यांची वाण नसते. जन जितके अध:पतित् तितके त्यांचा उद्धार करण्याचा डौल मिरवणारे 'थोर' लोक अधिक संख्येने उपलब्ध, त्यांचा मानही मोठा. सारा देश दैन्यावस्थेतला. पण दैवी गुणांच्या महात्म्यांचा उदे उदे प्रचंड! मग कुवतीची तरुण मुले आईन्स्टाईन होऊ पहात नाहीत. एफेल होण्याची धडपड करत नाहीत, वनगॉग होऊ पहात नाहीत, बिल गेटस्, पिट सॅम्प्रस होण्याचे स्वप्न बाळगत नाही, उलट असल्या सगळ्या कर्तबगारीचा 'ततः किम्' म्हणून उपहास करतात. आणि काही शाब्दिक वाचाळपणा करण्याच्या कामाला राष्ट-सेवा म्हणतात. आपणही तसंच करणार काय? कुंपणापर्यंत कशीबशी पोच असलेले, कुंपण ओलांडण्याऐवजी राष्ट-सेवेची पोकळ बतावणी सुरू करतात काय?
 शब्दांच्या, भाषेच्या थाटावरून आपण ज्ञानप्रबोधिनीच्या पठडीतले आहात हे उघड आहे. वेदान्तात पिंड व ब्रह्म यांचे अद्वैत मानले आहे. पिंडाचा दृष्टिकोण आणि ब्रह्मज्ञान यांत काही तफावत नाही. 'पिंड आपल्या प्रेरणेने पुढे जात जातच ब्रह्मांडाचा हेतू सफल करतो.' असा विचार आहे. वेदान्त व्यक्तिवादी आहे, हिंदु तत्त्वज्ञानाची ती सर्वोच्च परंपरा आहे. मुसलमान आणि युरोपीय आक्रमणापुढे हतबल झालेल्या समाजाने घाबरून व्यक्ती आणि विश्व यांचे अद्वैत संबंध जोडणारी ही विचारधारा सोडली आणि जेत्यांच्या कल्पनांतील सामूहिक पूजा, प्रार्थना, राष्ट-चे श्रेष्ठत्व, व्यक्तीचे दुय्यमत्व अशा कल्पना स्वीकारल्या आणि पराभवामुळे खचलेल्या समाजाची विवेकानंद, हेडगेवार आणि बाळ ठाकरे अशी दैवते बनली. व्यक्ती हे अनुभवाचे, विचाराचे, चिंतनाचे एकक आहे. आपल्या शोधाच्या प्रवाहात स्वतःच्या सोयीसाठी तो कुटुंब, वाडी, टोळी, गाव, जात, धर्म, राष्ट- अशा वाढत्या व्यापकतेच्या समूहांचा घटक बनण्याचे स्वीकारतो. समूहाचे सदस्यत्व काही बंधने घालते. पण स्वातंत्र्याच्या अनेक कक्षा मोकळ्या करून देते. राष्ट- ही व्यक्तींची एका विशिष्ट कालखंडातील गरज असते. युद्धप्रसंगी व्यक्तीने राष्ट-करिता स्वत:चा बळी देण्याची तयारी दाखवावी हे समजण्यासारखे आहे. अन्यथा व्यक्तींकरिता राष्ट- हेच योग्य.
 व्यक्तिमत्वाच्या परिपोषातून राष्ट-चे कल्याण साधत नसेल तर राष्ट- ही काही मायावी राक्षसी गोष्ट आहे, असे मानावे लागेल. आपण विविध क्षेत्रात निपुण आहात. त्यातील कोणतेही एक क्षेत्र निवडा. आम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशी काही कामगिरी करून दाखवा. राष्ट-सेवा अशा व्याख्याशून्य निरर्थक कल्पनांच्या हव्यासात आपली भाग्याची उतरंड विफल करू नका एवढीच विनंती. मनांत आले ते लिहिले, पत्रोत्तराची अपेक्षा तर नाही. कधीतरी भेट होऊ शकली तर आम्हाला आनंद वाटेल.

आपला,

शरद जोशी


(२१ फेब्रुवारी १९९७)