Jump to content

केकावली

विकिस्रोत कडून

कविवर्य मोरोपंत विरचित केकावलि

सदाश्रितपदा । सदाशिवमनोविनोदास्पदा ।
स्वदासवशमानसा । कलिमलान्तका ! कामदा ।
वदान्यजनसद्गुरो । प्रशमितामिता सन्मदा ।
गदारिदरनंदकांबुजधरा । नमस्ते सदा.। । १ । ।

अर्थ : या श्लोकातील बहुतांश शब्द म्हणजे विष्णुला उद्देशलेली सम्बोधने आहेत. ज्याच्या पदांशी सदैव त्याच्या आश्रयास आलेले भक्त असतात अश्या ईश्वरा, शंकराचे मन ज्या ठिकाणी (आस्पदा), म्हणजे ज्या ईश्वराच्या स्मरणात, विनोदन (समाधान) पावते अश्या हे विष्णो, स्वत:च्या दासांमध्ये (कल्याणासाठी) ज्याचे मन सदैव वश (इथे अर्थ 'गुन्तलेले') असते, कलिमल राक्षसाचा अन्त करणारा, कामना पूर्ण करणारा, जनांचा उदार (वदान्य) सद्गुरु, अतिशय शान्तिदायक (अमित-प्रशमित) आणि उल्लासकारक (सत्-मद), गदा + अरि (सुदर्शन) + दर (शंख) + नन्दक नांवाची तलवार + कमळ धारण करणारा, असा जो तू विष्णु, त्या तुला माझे सदैव वन्दन असो.

<poem> केकावली - प्रसंग १ सदाश्रितपदा ! सदाशिवमनोविनोदास्पदा !

स्वदासवशमानसा ! कलिमलांतका ! कामदा !

वदान्यजनसद्गुरो ! प्रशमितामितासन्मदा !

गदारिदरनंदकांबुजधरा ! नमस्ते सदा. ॥१॥

पदाब्जरज जे तुझे, सकलपावनाधार ते

अघाचलहि तारिले बहु तुवांचि राधारतें; ।

अजामिळ, अघासुर, व्रजवधू, बकी, पिंगळा,

अशां गति दिली; उरे न तृण भेटतां इंगळा ॥२॥

तुझ्या बहुत शोधिले अघनिधी पदांच्या रजे;

न ते अनृत, वर्णिती बुध जनी सदाचार जे; ।

असे सतत ऐकते, सतत बोलते, मीच ते

प्रमाण न म्हणो जरी उचित माझिया नीचते ॥३॥

तैसाचि उरलो कसा ? पतित मी नसे काय ?

की कृपाच सरली ? असेहि न घडे जगन्नायकी ।

नसेन दिसलो कसा ? नयन सर्वसाक्षी रवी,

विषाद धरिला म्हणो ? न सुरभी विषक्षीर वी ॥४॥

व्रजावन करावया बसविले नखाग्री धरा;

सलील तइं मंदारख्यहि नग स्वपृष्ठी धरा; ।

वराहतनु घेउनी, उचलिली रदाग्रे धरा;

सुदुर्धर तुम्हां कसा पतित हा ? न का उद्धरा ? ॥५॥

नतावनधृतव्रत ज्वलन तूचि बाधावनी;

पदप्रणतसंकटी प्रजव तूचि बा ! धावनी; ।

दया प्रकट दाखवी कवण सांग त्या वारणी ?

सतीव्यसनवारणी ? जयजयार्थ त्या वा रणी ? ॥६॥

सुपात्र न न रमाहि यद्रतिसुखास दारा परी,

असा प्रभुहि सेवका भजसि खासदारापरि; ।

प्रियाकुचतटी जिही न बहुवार पत्रावळी,

तिही अमित काढिल्या नृपमखांत पत्रावळी ॥७॥

न पावसि, म्हणोनि मी म्हणतसे तुला आळशी;

वरी न असदुक्ति हे रविसखोत्थिता आळशी ।

असंख्य जन तर्पिले, क्षुधित एकला जेमनी

चुकेल, तरि त्यास दे, परि वदान्य लाजे मनी ॥८॥

अंगा ! प्रणतवत्सला !' म्हणति त्या जनां पावलां;

म्हणोन तुमच्याच मी स्मरतसे सदा पावला ।

करू बरि कृपा, हरू व्यसन, दीन हा तापला.'

असे मनि धरा; खरा भरवसा मला आपला ॥९॥

(गंगेचे सामर्थ्य )

मला निरखिता भवच्चरणकन्यका आपगा

म्हणे, 'अगइ ! ऐकिलेहि न कधी असे पाप गा ! ।

कर श्रवणि ठेविते, नुघडि नेत्र, घे भीतिला;

न घालिन भिडेस मी, जरिहि कार्यलोभी तिला ॥१०॥

(अन्यदेवतांचे सामर्थ्य)

सदैव नमिता जरी पद ललाट केले किणे,

नसे इतर तारिता मज भवत्पदाब्जाविणे;

नता करुनि मुक्तही म्हणसि 'मी बुडालो रिणे,'

अशा तुज न जो भजे मनुज धिक् तयाचे जिणे ! ॥११॥

(भगवद्दर्शनार्थ प्रार्थना)

पटुत्व सकलेंद्रियी, मनुजता, सुवंशी जनी,

द्विजत्वहि दिले भले, बहु अलभ्य जे की जनी; ।

यशःश्रवणकिर्तनी रुचि दिली; तरी हा 'वरा'

म्हणे 'अधिक द्याच की,' अखिल याचकी हावरा ॥१२॥

असे न म्हणशील तू वरद वत्सल, श्रीकरा !

परंतु मज भासले म्हणुनि जोडितो मी करा; ।

दिले बहु बरे खरे, परि गमे कृपा व्यंग ती.

अलंकृतिमती सती मनि झुरे, न जो संगती ॥१३॥

कराल पुरती दया, तरि असो दिले पावले;

परंतु हरि ! एकदा त्वरित दाखवा पावले; ।

प्रसाद करणे मनी जरि नसेल, हे आवरा;

जया बहु तयास द्या, मज कशास ? मी हावरा ॥१४॥

(सलगीचे भाषण.)

'दिले, फिरुनि घेतले,' अशि अकीर्ति लोकी न हो;

सुनिर्मल तुझी पदे कधि तरी विलोकीन, हो ! ।

निजप्रियजनाकडे तरिहि दे हवाला; जशी

पडेल समजाविशी, तशि करोत; कां लाजशी ?॥१५॥

(पश्चात्ताप)

अहा ! निपट धृष्ट मी; प्रभुवरासि 'कां लाजशी ?'

म्हणे; तुज नसो तशी विकृति, भाविकाला जशी ।

परंतु अपराध हा गुरु, म्हणोनि शिक्षा करी;

असेचि धरिली नयच्युतदमार्थ दीक्षा करी ॥१६॥

(स्वतःचे पातित्य)

सदैव अपराध हे रचितसे असे कोटि, गा !

स्वयेहि कथितो, नसे तिळहि लाज, मी कोटिगा; ।

अजांडशतकोटि ज्या उदरि सर्वदा नांदवा,

न त्यांत अवकाश या ? स्थळ दिले तदा का दवा ? ॥१७॥

तुझ्या जिरविले बहु प्रणतमंतु पोटे, पण

त्यजी मदपराध, हे मजकडेचि खोटेपण; ।

दवाग्नि जठरी अतिक्षुधित, त्यास हे अन्न द्या;

वितृष्ण करिती श्रितां तुमचिया दयासन्नद्या ॥१८॥

(भगवंताचे पतितपावनत्व)

न होय कवणाहि, ते तुमचियाचि लीलालसे

पदे चरित दाविजे त्रिजगदब्जकीलालसे; ।

मदुद्धरण मात्र कां जड तुम्हां दिसे ? वारिती

स्वकव्यसन मर्त्यही, न करितीच सेवा रिती. ॥१९॥

(भगवत्कारुण्य)

दयाब्द वळशील तू, तरि न चातका सेवकां

उणे किमपि; भाविकां उबगशील तूं देव कां? ।

अनन्यगतिका जनां निरखितांचि सोपद्रवा,

तुझेचि, करुणार्णवा ! मन धरी उमोप द्रवा. ॥२०॥

(पापक्षालनार्थ विनंति)

कळी करि सुनिर्मळी परम उग्र दावा नळी;

तयांत अविशुद्ध मी, शलभ जेवि दावानळी; ।

व्रणार्तपशुच्या शिरावरि वनी उभे काकसे,

स्मरादि रिपु मन्मनी; अहि न काळ भेका कसे ? ॥२१॥

तरेन तुमच्या बळे भवमहानदी, नाविका !

तुम्हीच मग आतरास्तव मला सुदीना विका ।

असे विदित वासही मज सदाश्रमींचा; करा

दया, गुण पहा; सवे मज सदा श्रमी चाकरा ॥२२॥

धना, परिजना, घरी तुमचिया उणे कायसे ?

न लाभ मणिहेमभूपतिस जोडिल्या आयसे ।

परि प्रभुहि संगही उकल वस्तुला ठेविती;

गुणा न म्हणता उणा, अधिक, आदरे सेविती २३

दिसे म्हणुनि शाश्वतप्रकृतिरंक मी काय? हो !

प्रसन्न तुमचा बरे मजवरी प्रभो ! पाय हो ।

क्षण त्यजुनि इंदिराबृहदुरोजसंगा, धरा

शिरी पद, मिळो सखा सम सुशील गंगाधरा ॥२४॥

(प्रभुस्तुति)

'प्रभुस्तुति न ठाउकी, परि तिच्या महाकामुका

मला कृपण मारितो बहु सकाम हाका मुका' ।

म्हणा मनि असे; कसे प्रथम नीट ये लेकरा ?

हळुहळु पटु स्वये सुपथि लावियेले करा ॥२५॥

जनी तरि असे असे, शिशुहि जे मुखे वर्ण वी,

पिता पिउनि ते भुले, मधुरता सुखे वर्णवी;

मना जरि नये, गुरुक्तहि म्हणे कटु प्रायशा;

दयानिधि! तुम्हांपुढे जनकथा अशा कायशा ?॥२६॥

'अतर्क्य महिमा तुझा, गुनहि फार, बा ! हे,' विधी

श्रुतिजॅहि म्हणे सदा, स्तविल आमुची केवि धी ? ।

तरीजन यथामति स्तवुनि जाहले सन्मती;

स्तवार्थ तुझिया तुझ्या सम कवी कधी जन्मती ? ॥२७॥

निजस्तुति तुम्हां रुचे; स्तविति त्या वरे तर्पितां;

नमस्कृतिपरां बरे सधन सर्वही अर्पिता;

स्वभाव तुमचा असा विदित जाहला याचका;

करू स्तव जसा तसा; फळ नव्हे जना याच का? ॥२८॥

'तुम्ही परम चांगले, बहु समर्थ, दाते; असे

सुदीन जन मी, तुम्हा शरण आजि आलो.' असे ।

पुन्हाहि कथितो, बरे श्रवण हे करा यास्तव;

समक्ष किति आपुला सकललोकराया ! स्तव ? ॥२९॥

किती श्रवण झांकिति प्रभुहि; काय ते पोळती ?

पुसाल जरि कोण ते ? पदरजी तुझ्या लोळती ।

बरे तुजचि सोसवे स्तवन; कृत्तिवासा गरा

न पी, तरि कसे घडे ? हितकरा ! दयासागरा ! ॥३०॥

गमो मधुर हे विष स्तवन, सेवितां माजवी,

करी मलिन सद्यशोमुख, हलाहला लाजवी; ।

हरापरिस तूं बरा, प्रभुवरा ! सदा जो पिशी

असा रस समर्पि, त्या अमृत आपुले ओपिशी ॥३१॥

कवीश्वरमनःपयोनिधिसुतस्तुतीच्या पते !

भले न वरिति स्तुतिप्रति, न जोडिती पाप ते; ।

गळां पडति ज्यांचिया तव गुणैकदेशभ्रमे,

तिही तुजचि दाविता, भजति, बा ! तुला संभ्रमे ॥३२॥

(कवितासुतासमर्पण)

म्हणोनि कवितासुता तुज समर्पितो; साजरी

नसे बहुतशी गुणी कनकपीतवासा ! जरी, ।

तरी न इतरा वरी, हरि ! करी इला किंकरी;

मयूरहि निजात्मजाग्रहविमुक्त, जैसा करी ॥३३॥

स्मरोनि कृतमंतुला, न कवितावधूस्वीकृती

कराल, तरि आयका प्रभु ! खराच मी दुष्कृती; ।

नमस्कृतिपुरःसर स्वकृति अर्पितो आजि, ती

दिली रविसखे तुह्मा जशि नमोनि सात्राजिती ॥३४॥

'पिता खळ, परंतु ती गुणवती सती चांगली;

म्हणोनि तुज आपुल्या भजनि लावणे लागली; ।

म्हणाल, तरि तत्सुखा कशि, ? तुम्हांसवे भांडगा

अहर्निशिहि भांडला त्रिणव रात्र जो दांडगा ॥३५॥

तिलाहि बरवी म्हणा, उचित होय; तोषाकरे

असेल सजली यथारुचि तयी स्वयोषा करे, ।

जशी पदरजे शिला; परि असे न हे शापिली

धवे, हरिमनोहराकृति सती अघे व्यापिली ॥३६॥

भले स्मरण जाहले समयि, कंसदासी करे

कशी उजरली समुज्वलदयासुधासी करे ? ।

तुम्हां स्वरिपुची तशी बटिक आवडे, मत्कृती

नको, न सजवे, असा बहुत काय मी दुष्कृती ? ॥३७॥

जशी पृथुकतंदुलप्रसृति आप्तकामा तशी

रुचो कृति; सभाग्य तू सुनय आप्त का मातशी ? ।

कण्या विदुरमंदिरी म्हणति साधु आखादिल्या;

खरे जरि, कशा तुज प्रभुसि आपुल्या स्वा दिल्या ? ॥३८॥

जिणे रस पहावया प्रशिथिली रदी चाविली,

सुवासहि शबरी तशी बदरिकापळे दे जुनी,

कथा अशि असो, पहा स्वचरिते तुम्ही मेजुनी. ॥३९॥

(शरणागतांविषयी प्रभूचे कारुण्य)

प्रभो ! शरण आलियावरि न व्हां कधी वांकडे,

म्हणोनि इतुकेचि हे स्वहितकृत्य जीवांकडे ।

प्रसाद करितां नसे पळ विलंब बापा ! खरे,

घनांबु न पडे मुखी उघडिल्याविना पांखरे ॥४०॥

शिवे न तुझिया पदा अदयताख्य दोष क्षण;

प्रभो ! चुकतसो, तरी करिसि तूचि संरक्षण ।

नसेचि शरणागती घडलि सत्य अद्यापि ती;

रुचे विषय; ज्या मिळे अमृत, ते न मद्या पिती ॥४१॥

(क्षमस्व अशी प्रार्थना)

विपाक न गणोनि म्या प्रकट आपुल्या घातके.

कळोनि अमिते बळे विविध जोडिली पातके ।

'क्षमस्व भगवन्नजामिलसखोऽस्मि' ऐसे तुला

म्हणे नमुनिया सदुस्तरविपन्नदीसेतुला ॥४२॥

(भगवत्परीक्षेची वेळ)

नव्हे अनृत, सत्य ते, अचल ऊचलीला करे

तुवां हरिमदापहे बृहदुदारलीलाकरे ।

समुद्धरसि एकटा जरि जडासि या कर्दमी,

म्हणेन भुवनत्रयी तरि तुला 'भला मर्द, मी, ॥४३॥

(वैद्याचा दृष्टांत)

चिकित्सक 'भला भला' म्हणुनि फार वाखाणिला,

जरी बहुजनामयद्रुम समूळही खाणिला, ।

तथापि अतिदुःसहस्वगदशत्रुच्या अत्ययाविना,

न ह्रदयी धरी सरुज पामर प्रत्यया ॥४४॥

(खोद्धारार्थ उताविळपणा)

म्हणा मज उताविळा; गुणचि घेतला; घाबरे

असो मन असेचि बा ! भजकबर्हिमेघा ! बरे ।

दिसे क्षणिक सर्व हे भरवसा घडीचा कसे

धरील मन ? आधिने बहु परिभ्रमे चाकसे ॥४५॥

कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली;

पुरःसरगदांसवे झगडतां तनू भागली ।

सहाय दुसरा नसे तुजविणे बळे आगळा;

न हो जरि उताविळा, स्वरिपु कापितो हा गळा ॥४६॥

(प्रभुविषयी काळजी)

अवश्य करणे खरे प्रणतरक्षण स्वोचित;

उशीर मग का ? बसो कृपण मीहि का शोचित ?

नव्हे प्रभुवरा ! तुम्हा उचित एकटे धांवणे;

कृतांत शिवला नसे तव, दिसे बरे पावणे ॥४७॥

'कसे तरि करू तुझे अवन; पूरवू आळ जी

असेल मनि; आमुची तुज कशास रे काळजी ?' ।

असे जरि म्हणाल हो प्रियतमा ! जगज्जीवना !

तदाश्रितमृगासि ती सुखसमृद्धि बा ! जी वना ॥४८॥

सुखेचि सुख बाळका प्रकट होय मातेचिया;

तिला घडति जे श्रम, प्रियजनोत्तमा ! तेचि या; ।

म्हणोनि न शिवो पळ क्षणहि कष्ट जीवा ! तुला,

सुखेचि सुख बाळका प्रकट होय मातेचिया;

तिला घडति जे श्रम, प्रियजनोत्तमा ! तेचि या; ।

म्हणोनि न शिवो पळ क्षणहि कष्ट जीवा ! तुला,

विपज्जलधिसेतुला, सकललोकजीवातुला ॥४९॥

(प्रभूला आयुरर्पण)

असोत तुज आमुची सकल भाविकायुर्बळे;

जगोनि बहु काय म्या सुकृत जोडिले दुर्बळे ? ।

असे प्रियसख्या ! सुखी बहुतकाळ; मायातमी

जना सुपथ दाखवी; मुदित सत्तमा ! यात मी ॥५०॥

(देवाचे अत्यंत क्षमाशीलत्व )

भले परिशिले सुरासुरनरी तसे लक्ष मी'

म्हणोत म्हणणार बा ! तुज असा नसेल क्षमी; ।

उरी भृगुपदाहती मिरवितोसि, अद्यापि ती,

कवी तव यशःकथा नवसुधानवद्या पिती ॥५१॥

(विषयवासनेचे दुर्निवार्यत्व)

'भवन्मतिस आवडे जरि, धनादिकांलागि ते

मदीय गुणकीर्तनश्रवण कां तरि त्यागिते ? ।'

असेहि म्हणशील बा ! जरि तरी तुझी मावली

तुज त्यजुनि पाजिता, कशि दुधाकडे धावली ? ॥५२॥

अनावर पिशाचिका विषयवासना सत्य, जी

असे करवि कृत्य, जी भुलविते, कधी न त्यजी; ।

म्हणोन तुज जाणत्या विनवितो, इला गाढ गा !

करीन मग, तू जरी म्हणसि, आपणा गाढ गा’ ॥५३॥

तुझ्या गुणकथा महासुरभि, त्यांत ही रासभी

शिरे विषयवासना; जसि शुका अहीरास भी, ।

तशी न इतरास भी; इस सदंडही हाकिती;

तथापि बहु लाथळी; मग अदंड मी हा किती ॥५४॥

(विषयवासनाक्षयार्थ प्रभुकृपाच समर्थ)

खरासुर जसा, तशी विषयवासना हे खरी;

हिचा वध करावया तुजच शक्ति आहे खरी; ।

बकि सुमति, ताटका लघु, न हे भली; लाजशी

उगाचि, तशि एक ही; व्रजवनांत लीला जशी ॥५५॥

कसे तरि असो मग; स्वपणरक्षणाकारणे

अवश्य शरणागतव्यसन तो स्वये वारणे; ।

तुम्हा विहित मुख्य हे; न पुसतां करा हो ! खरी

निजोक्ति; खर काय तो अधिक? संहरा हो ! खरी ॥५६॥

खरी करीतसे कशी तव जनीहि सत्ता पहा;

हिचा वध न निंद्य बा ! प्रबळ मूर्त सत्ताप हा; ।

’कथासुरभिचा रस स्वहित, पुष्कळ, स्वादुही,’

म्हणे, ’त्यजुनि कां मला निजधना, परखा दुही?’ ॥५७॥

(कथासुरभीचे अत्यंत कारुण्य)

कथासुरभि या भल्या स्वजननीहुनी वाटती;

शिशूंसि जरठांसही निरखितां रसे दाटती; ।

दुहोत भलते सदा, तरि न लेशही आटती;

स्ववत्समल भक्षिती परि न सर्वथा बाटती ॥

कथांसि उपमा दिली सुरभिची, दिसे नीट ती;

परंतु बहु मंद मी, म्हणुनि सच्छुती वीटती; ।

कथा निरुपमा तयांप्रति पशूपमा शुद्ध तें

नव्हेचि; न विचारिले बुधजनासि म्यां उद्धते ॥५९॥

असेहि उपदेशिती गुरु रहस्य मंदा रुचे

निजस्तव जसा तसा, अगुण घे न वंदारुचे; ।

म्हणोनि निमगस्तुता भलतसे तुला वानितो;

परंतु ह्रदयी महाजनभयास मी मानितो ॥६०॥ म्हणे-स्वकृतिच्या उणे किमपि एक वर्णी न हो;

असे तुज कधी बरे विगतशंक वर्णीन हो !

असेचि अशि आवडी, करिसि कां न अत्यादर ?

स्वभक्तसुरपादपा ! हरि ! नसेचि सत्या दर ॥६१॥

ध्रुव स्तवनि आवडी धरि, म्हणोनि अत्यादरे

तुम्ही करुनि दाविली, शिवुनि गल्ल सत्या दरे ।

तसे मज करा, करांबुज धरा शिरी मावरा !

वराभयपरा ! पराक्रमपटो ! मना आवरा ॥६२॥

करांबुज असो. नसे उचित त्यास मी पामर;

प्रणाम करिती पदाप्रतिहि सन्मुनी सामर; ।

पदाब्जरजही जगत्रयनमस्क्रियाभाजन;

प्रसादचतुरा ! कसा तरि करा बरा हा जन ॥६३॥

तुम्ही करुनि दाविला ध्रुव कृतार्थ जैसा दरे,

तसेचि जरि योजिले तुमचिया मनें सादरे, ।

असो; विहित ते करा; परि बरोबरी त्यासवे

नसे उचित; तो महाप्रभळ, वंदिजे वासवे ॥६४॥

किती वय ? कसे तप प्रखर ? काय विश्वास तो ?

ध्रुव ध्रुव खरा; स्तवा उचित होय विश्वास तो; ।

कशी तुळितसा तुम्ही प्रकट मेरुशी मोहरी ?

प्रसाद करितां उणे अधिक नाठवा, हो ! हरी ! ॥६५॥

प्रभुत्व तरि हेच की करुनि दे कृपा दान ते,

स्वसाम्य यदुपार्जने मिरविजे स्वपादानते, ।

प्रसाद मग काय तो? जरि निवारिना लाघवा ?

कसे दशमुखानुजा विसरलां ! अहो ! राघवा ! ॥६६॥

असो वरि कसा तरी, विमल भाव ज्याचा, करा

तयावरि दया; पचे वर, असाचि द्या चाकरा ।

वृथाचि गमते दिले, बहुहि, जे न दासा जिरे;

पुसोनि अधिकार द्या; सुकर ते सदा साजिरे ॥६७॥

प्रसन्न बहु होतसां, परि कराल हो ! बावरे

शिवापरि वरासवे ह्रदय, हे न हो बा ! वरे; ।

असा वृक कृतघ्न हे न कळले कसे हो ! हरा ?

भला जगविला तुम्ही भवमहाहिचा मोहरा ॥६८॥

भजे सुदृढनिश्चये द्विजकुमारक क्षीरधी,

तया करि तुम्हीच द्या मदनमारक ! क्षीरधी; ।

उदारपण ते बरे, सुखवि जे सुपात्रा सदा;

दिले अमृत पन्नगा, तशि खळी कृपा त्रासदा ॥६९॥

अतिप्रिय, सुखप्रद, प्रथम तूं मुदंभोद या

मयूरह्रदया; तुझी क्षण विटो न शंभो ! दया; ।

उदारपण वानिले; अजि ! गुरूपहासा बळे

कसे करिल लेकरू ? निपट हे पहा साबळे ॥७०॥

(हरिहरांचे अभिन्नत्व.)

तुम्हा हरिहरांत ज्या दिसतसे, दिसो; ’वास्तव’

प्रबुद्ध म्हणती ’नसे तिळहि भेद;’ मी यास्तव ।

म्हणे मनि, ’यथार्थ जे स्वमत वर्णिती शैव ते

न; वैष्णव दुराग्रही; परम मुख्य ही दैवते.’ ॥७१॥

म्हणे क्षण पुरांतक, क्षण मुरांतक; ब्राह्मणा

मला जरि म्हणाल वा ! तरि विशंक लुब्रा म्हणा; ।

तुम्हां शिव, शिवा तुम्ही भजतसां; शुक, व्यास हा

सदर्थ वदले; पुरातन कथा, न नव्या, सहा. ॥७२॥

(व्यासस्तवन)

तुझाचि अवतार तो सुत पराशराचा; वळे,

तदुक्तिस जन; प्रभो ! जरि निजेमधे चावळे ।

तरि, त्रिभुवनेश्वरा ! तव विशुद्ध नामावली

मुखी प्रकट होय, जी करि सुखी जना मावली ॥७३॥

(भगवन्नाममाहात्म्य)

तुझे कुशळ नाम बा ! हळुहळू मना आकळी;

दुरत्यय असा महा खळहि त्यास भी हा कळी; ।

हरि व्यसन पाप हे बहु कशास ?

कायाधवा-परि त्वरित भेटवी तुजहि, योगमायाधवा ! ॥७४॥

तुम्हांसमचि हे गुणे; अणु उणे नसे नाम; हा

दिसे अधिकही, तसा गुण तुला असेना महा; ।

सदैव भलत्यासही सुलभ; आणखी गायका

छळी न, न अधोगति क्षणहि दे जगन्नायका ! ॥७५॥

(बळीभक्ताचा छळ व त्याची सहनशीलता.)

छळी नृप बळी बळी, तरिच तो नसे आटला;

गमे बहु भला मला न, सकळांसही वाटला;

परीक्षक करी, तसे जडहि सोशिते हेमही;

न केवळ विरोचनात्मज तरे पदे, हे मही ॥७६॥

(भक्तच्छळाची आवश्यकता)

असा न करिता जरी छल, तरी प्रभो ! तो भली

सुकीर्ति कशि पावता कविसभा जिणे शोभली ? ।

पदी उपजती नदी कशि? कशी त्रिलोकी सती

अशा अतुल मौक्तिकावलिविणे बरी दिसती ? ॥७७॥

(छळ सोसण्याविषयी कवीचे असामर्थ्य)

नको छळ; अधीर मी; तशि न कीर्ति हो; चामरे

नृपासि उचिते; वृथा, मिरविली जरी पामरे; ।

अकीर्तिच असो, रुचे तुज कशी व्रजी कांबळी ?

असे न समजा कसे? वरिल हारिला कां बळी ?॥७८॥

छळाल कृपणासि कां ? अजि ! दयानिधे ! कांपिती

भटासि भट संगरी, परि न कातरा दापिती; ।

कराल तितुकी कृपा बहु; अहो ! शरण्या ! तमी

बुडोनि शरणागत श्रमतसे अरण्यात मी ॥७९॥

(रामावतारस्मरण-रामवनवास)

मुखासि जव पातली ’श्रम’, ’अरण्य’ ऐशी पदे,

निजस्मृतिस जाहली विषय ती तव श्रीपदे,

गुरुक्तिस करावया सफळ, जानकीजीवना !

धरासुरतपःफळे त्वरित धावली जी वना ॥८०॥ (सीतेप्रमाणे मजवरही दया करा, अशी प्रार्थना)

तयी प्रभुवरा ! तसे सदय; कां असे ? आज हो !

विचारुनि पहा बरे निजमनी महाराज ! हो !

वनोवनि फिरा पिशापरि; म्हणा अहोरात्र ’हा’ !

नसे कुशळ भाषणी, परि असे कृपापात्र हा ॥८१॥

समागम तुझा घडो म्हणुन जाहले लाकडे

तपोनळि, तसे मुनि त्यजुनि, जोडिली माकडे; ।

अयुक्त बहु ज्या जनास्तव घडे, पडे सांकडे,

तदुक्तिहुनि आमुचे बहुत बोलणे वाकडे ॥८२॥

’जगत्रयमनोहरा ! बलगुणैकरत्‍नाकरा !’

म्हणे ’कनकरंकु द्या मज, महा प्रयत्ना करा.’ ।

प्रियाहि अशि जाहली तुज कुकार्य आज्ञापिती;

सुधा त्यजुनि कामुक प्रकट अंगनाज्ञा पिती ॥८३॥

स्वदास समयी जपे, तरि न दे वरा, चाकरी

चुके न, परि सार्थक श्रम न देवराचा करी; ।

वदेहि भलतेचि; ते तिसचि, कोप टाका, पुसा;

असे मृदु, म्हणोनि बा ! मज न धोपटा कापुसा ॥८४॥

(आवड गोड-कृष्णावतारकथा)

न जे प्रिय, सदोष ते; प्रिय सदोषही चांगले.

स्वतोक पितरां रुचे, जरिहि कर्दमी रांगले ।

तुलाचि धरि पोटिशी कशि तदा यशोदा बरे ?

जरी मळविशी रजोमलिनकाय तू अंबरे ॥८५॥

तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट, ते

सुखप्रद गुणस्तवापरिस जाहले वाटते; ।

क्षमा न करि एकदा, तरिहि फार खोडी करा;

न देचि भय, ताडनोद्यमसमेत सोडी करा ॥८६॥

जरी म्हणसि बांधिले, तरि न कष्टवीले; करा

विचार, जशि कष्टवा तशि न कष्टवी लेकरा; ।

यथेष्ट पुरते जरी प्रथम दाम, का सांधिती ?

न ती प्रबळ गोपिका; तुज तुझी दया बांधिती ॥८७॥

(भगवन्निषुरता क्षणिक व केवळ भक्तकल्याणार्थ असते.)

तुम्हीहि बळि बांधिला म्हणुनि आमुची माय जी

मनांत सहजा दया, निपट टाकिली काय ? जी ! ।

सकोप दिसती गुरु क्षणभरीच; जे तापले

जल ज्वलनसंगमे, त्यजि न शैत्य ते आपले ॥८८॥

(भगवंताची सदयता)

प्रसिद्ध तुमचे महासदय पाय; जीवांकडे

चुकी, म्हणुनि होतिल क्षणहि काय जी ! वांकडे ? ।

न निष्ठुर पिता; म्हणे मनि ’न हो प्रजा टोणपी;’

अपथ्यरुचि रुग्ण तो कटुक ओखदे कोण पी ? ॥८९॥

असंख्य खळ संगरी निजकरी तुवा मारिले;

न निष्ठुरपणे, कृपा करुनि ते भवी तारिले; ।

जगज्जनक तू, मुले सकळ जीव, या भातुके

दटावुनिहि देशि बा ! अमृत नेदिजे घातुके ॥९०॥

(भगवत्कथाप्रशंसा)

कथा श्रवणचत्वरि जरि पुनः पुन्हा ये, रते

महारसिक तद्रसी, विटति ऐकता येर ते; ।

विलोकुनि विलासीजन पुनःपुन्हां कामुका

वरी प्रकट शांतिला धरि, परंतु मीना बकी

गिळि; तशि तुला टपे सुकृतबुद्धिहीना बकी; ।

जिणे गरळ पाजिले; अमृत पाजिले तीस ता;

खळासि न दिसो भलेपण, खरे भल्या दीसतां ॥९१॥

(देवच खरा सदय पिता)

सदाहि हित नायको; बहु अपाय केले, करू;

तरी सकृप बाप तू म्हणसि, ’नायके लेकरू;’

कधी न करिसी प्रभो ! भजकबाळकोपेक्षण;

न तूजवरी ज्यापरी पशुपपाळ कोपे क्षण ॥९२॥

खरा जनक तू, जना इतर कोण हो ! देव वी ?

समीहित फळे जगा तव पदाब्ज दे, देववी; ।

अशीच करुणा असो हरि ! कधी न भंगो पिता;

अशा मज असाधुला इतर कोण संगोपिता ? ॥९३॥

सुविद्य, धन मेळवी, वचन आयके, आवरी

प्रपंच, भर घे शिरी, करि कृपा पिता त्यावरी; ।

असा जरि नसे, रुचे तरि न तो अभद्र क्षण;

तसा तुजचि आवडे; करिसि तूचि तद्रक्षण ॥९४॥

(मातृमहिमा)

पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;

दयामृतरसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे; ।

प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे;

म्हणूनि म्हणती भले ’न रिण जन्मदेचे फिटे ॥९५॥

(भगवत्कृपा हीच खरी माता)

विटेल जननीहि की शत रची निमित्ते विधी;

मळे कलियुगी श्रुती जशि, खळी तिची तेवि धी ।

कदाचित विटेल; बा ! तव दया न दीनावरी;

जशी जगदघक्षयी कर भवन्नदी नावरी ॥९६॥

कृपाचि जननी तुझी; सकल जीव दायाद; या

तिणेचि उपदेशिल्या करिति सर्व दाया दया; ।

असे उमजता भले न गुरुभाव तो टाकिती;

मता तुजहि गोपिका, मग जनास तोटा किती ? ॥९७॥

(देवाची कृतज्ञता)

भरोनि कुचकुंभ जी विपरसे मुखी दे बकी,

प्रभो ! तिसहि ठेविशी, जशि महासुखी देवकी; ।

न होति जननी कशा पशुपदार, गाई ? लया

न पावतिच तत्सुखे, कृति न कोण गाईल या ? ॥९८॥

अशी तरि कृतज्ञता हरि ! तुझ्याच ठायी अगा !

सख्या ! अणुचि मानिशी, करुनि सुप्रसादा अगा ! ।

भुले सुकविवाग्वधू तव गुणा अनर्घ्यानगा;

म्हणेल जन कोण, की यश पुनःपुन्हा ते न गा ? ॥९९॥

तुम्ही बहु भले, मला उमज होय ऐसे कथा;

कसा रसिक तो ? पुन्हा जरि म्हणेल आली कथा; ।

प्रतिक्षण नवीच दे रुचि, शुकाहि संन्यासिया;

न मोहिति भवत्कथा अरसिका अधन्यासि या ॥१००॥ (भगवत्कथाप्रसंग)

कथा श्रवनचत्वरी जरि पुनःपुन्हा ये, रते

महारसिक तद्रसी, विटति ऐकता येर ते; ।

विलोकुनि विलासिनीजन पुनःपुन्हा कामुका

करी वश; नव्हे बुळा, विवश घेइना कां मुका ! ॥१०१॥

कथा सुपुरुषा तुझी वश तशी करी, राधिका

जशी तुज, जिला स्वये म्हणसि तू शरीराधिका;

तिचे न घडता, रमाह्रदयवल्लभा ! सेवन

प्रभो ! तुज जसे, तसे मतिस गेह भासे वन. ॥१०२॥

(कथा मोहिनीपेक्षा श्रेष्ठ)

कथा भुवनमोहिनी, अशि न मोहिनी होय ती;

हरो असुरधी; हिणे भुलविले किती हो ! यती; ।

नव्हे न म्हणवे; असो; जरि विमोहिला दक्षहा,

प्रिया बसविली शिरी, मुनिपथी कसा दक्ष हा ? ॥१०३॥

सुरासुरनरोरगां भुलवुनी कथा न त्यजी;

न भेद करि पंक्तिचा; अमृत पाजिती सत्य जी; ।

तिणे जरि सुधारस खरतमानसां पाजिला,

वधी अमृत घोटितां, द्रव नयेचि बापा ! जिला ॥१०४॥

अभीष्ट वरितात, जे तव कथेसि विश्वासती;

भली असुरवंचनी, श्रुत असेचि विश्वास ती; ।

कथा कशि सखी तिची? ठकवुनी हरी संचिते,

तरी अमृत दे, असे सदय, दाखवी वंचिते ॥१०५॥

(कथेची वंचना भक्तकल्याणार्थ)

करा श्रवण येवढे, अपटु लोक हांसो मला;

अहो ! जरि गिळावया प्रियकुमार गे सोमला, ।

तयासि ठकवूनि दे बहुत शर्करा माय जी,

तिला स्वशिशुवंचने अदयता शिवे काय ? जी ! ॥१०६॥

म्हणोनि बहु मोहिनीहुनि भली कथा हे तुजी,

अभीष्ट फल द्यावया नतमनोरथां हेतु जी; ।

म्हणाल जरि ’मीच त्या, विषम काय दोघीत रे ?

जसा जन सितासिताभिधनदीसदोघी तरे ॥१०७॥

अहा ! बहु विशुद्ध हे प्रभु ! तव स्वरूपाहुनी;

न भिन्नतनु त्या; भले भजति, एकता पाहुनी; ।

परंतु वदतो जनानुबव, नातळो पाप गा !

तशी न यमुना गमे, जशि गमे, निलिंपापगा ॥१०८॥

(गंगावर्णन)

न द्गिरुमहेश्वरप्रभुशिरी जिचे नांदणे,

तिच्या जळमळे तुळे न शरदिंदुचे चांदणे,

प्रजा हरिहरा अशा यदुदरी अनेका; कवी

भिऊनि म्हणतील कां जशि सुधा तशी काकवी ?॥१०९॥

(मोहिनीची यमुनेशी व गंगेची कथेशी तुलना)

तुला स्वयमुनेसवे, कुवलयद्युतिश्यामला !

म्हणाल जरि मोहिनी निजतनू, अवश्या मला; ।

तुलीन अमृतोदधिप्रभवपुंडरीकामला

कथा सुरधुनीसवे, सुजन जीत विश्रामला ॥११०॥

(कथा तुला व निरुपमा-भागवताची व गुरूची साक्ष.)

शुकोदित पुराण ज्या श्रवण सन्मुखे साग्रही,

म्हणेल ’अतुला कथा’ झणि म्हणाल, ’तो आग्रही;’ ।

न केवळ मलाचि हे निरुपमा, यशोमंडिता,

गुरुसहि गमे, पुसा खबरदा महापंडिता ॥१११॥

(भगवत्कथा मोहिनीपेक्षा श्रेष्ठ-आणखी एक कारण)

प्रभो ! तुज न मोहिनी भुलवि; मोहिला तोहि ती

त्यजी जन; नव्हे तशी, तुझी कथा मोहिती; ।

निजानुभव तू पहा; जशि महौषधी पारदा,

तुला स्थिर बळे करी, कळविले तुवा नारदा ॥११२॥

(प्रभूची स्वकथासक्ति)

सुरर्षिजवळी स्वये वदसि, ’तत्र तिष्ठामि;’ या

तुझ्याचि वचने म्हणे तुज ’कथावश’ स्वामिया !

जसा स्थिर कथेत तू, स्थिर करी तसे या मना;

स्वभक्तसुरपादया ! सफळ हे असो कामना ॥११३॥

(भगवद्गुणवर्णनाची नारदाला आवड)

सुरषि म्हणतो, ’तुझे यशचि धन्य; यो गायना

मला; कवि म्हणोत ते सुखद अन्ययोगायना;’

विमुक्तिबहुसाधने तदितरे गणीनाच तो;

सजूनि वरवल्लकी तव सभांगणी नाचतो ॥११४॥

(भगवत्कथामाहात्म्य-देवर्षि नारदाचा अनुभव)

तुझे चरित सन्मुखे श्रवण जाहले, यास्तव

प्रजापतिसुतत्व ये, करिति साधु ज्याचा स्तव; ।

स्वनीचपण मागिले, बहु दया अशी नारदा

स्मरे घडिघडि, प्रभो ! भवपयोधिच्या पारदा ! ॥११५॥

तुझे यशचि तारिते, परि न केवळा तारवे;

सहाय असिला असे, तरिच शत्रुला मारवे; ।

न भागवता भेटता, न घडतांहि सत्संगती,

न अज्ञह्रदये, तशी तव यशोरसी रंगती ॥११६॥

(नौकेचा दृष्टांत)

बुडे, बुडवि सागरी तरि, सुकर्णधाराविना; ।

सहाय नसता स्वये परतटासि ती दाविना; ।

सहाय भगवज्जना तव सुकीर्ति जेव्हा करी,

तयीच उतरी भवोदधितट जनां लौकरी ॥११७॥

(वरप्रसादयाचना)

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो;

कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो; ।

सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटाने अडो;

वियोग घडता रडो मन, भवच्चरित्री जडो ॥११८॥

न निश्चय कधी ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;

न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो; ।

स्वतत्त्व ह्रदया कळो; दुरभिमान सारा गळो;

पुन्हा न मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो ॥११९॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,

क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; ।

कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,

तशि प्रकट हे निजाश्रितजनां सदा सावरी ॥१२०॥

दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे;

रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे; ।

असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?

तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे ॥१२१॥

(उपसंहार-उपास्यदेवता श्रीरामांचे मांगल्य सूचक सप्रेम स्मरण.)

कारुण्यांभोद राम प्रियसखा गुरुही जो मयूरा नटाचा,

होता तापत्रयार्त त्वरित भववनी रक्षिता रानटाचा,

त्याचे साचे स्वभद्रस्मरण, मग न ते त्या कसे ये कवीस ?

केका, एका सख्याते स्मरुनि, करि अशा एकशे एकवीस ॥१२२॥

श्रीराम जयराम जयजयराम |


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.