कृष्णास्तव

विकिस्रोत कडून

श्रीकृष्णमूर्तिचें जें शुद्ध यश, तुझेंहि देवि ! कृष्णे ! तें. त्वन्नाम सर्वतोखद ओखद, हरितेंचि विषयतृष्णेतें. ॥१॥


त्वज्जन्मभूमि कृष्णे ! श्रुतिगीत महाबळेश्वरजटा, कीं. तरिच तुझें जळ जंतुसि म्हणतें, ‘ घे शुद्ध सत्व, रज टाकीं. ’ ॥२॥


द्यावें सुरवृक्षवनें सुख, सुरभीच्याहि जें न कळपानें, तें होतें प्राप्त जना तुझिया विजितामृताछजळपानें. ॥३॥


कृष्णे ! येवुनि भेटे तुज गंगा, जेंवि आलि आलीला. निवविसि तूं प्रेमरसें, धांवुनि आलिंगनार्थ आलीला ॥४॥


कृष्णे ! तव प्रवाहीं मज्जन करितांचि, सर्व पाप सरे. यम निजदूतांसि म्हणे, ‘ ते वंद्य तुम्हांसि शुद्ध तापस, रे ! ’ ॥५॥


धर्मार्थकाम हे किति ? मोक्षातेंहि त्वदीयतट वीतें. फ़टवीतें षडरींतें, होतें दव भवमहापदटवीतें. ॥६॥


कृष्णे ! जीवासि म्हणसि, ‘ माज्या तोयांत मज्ज, नाकवनीं क्रीड सुखें, सुकवींच्या हो वर्णित कीर्तिमज्जना ! कवनीं. ’ ॥७॥


कृष्णे ! तुज जन सेवी, त्यावरि उडविति सुचामरें देवी. त्या स्वपदीं हरि ठेवी, वाहे, जो भीति फ़णिकुळा दे, वी. ॥८॥


कृष्णे ! विदित नसेल त्वत्सुयशाची जयास रुचि, तो या साक्षात् ब्रह्मरसमया अमृतसम तुज्या म्हणेल शुचि तोया. ॥९॥


कृष्ण ! शरणागत जो, त्या न म्हणसि तूं महानदी ‘ नाहीं. ’ कीं उद्धरितां, दिधलें कोणींहि न यश लहान दीनांहीं. ॥१०॥


श्रीकृष्णे सरिदीश्चरि ! हा रामात्मज मयूर लक्षावा. दक्षा, वात्सल्यवती, तूं, म्हणुनि, तुवांचि जडहि रक्षावा. ॥११॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.