Jump to content

कृष्णामाहात्म्य

विकिस्रोत कडून

<poem>

अध्याय पहिला (वृत्त - मंदाक्रांता)

श्रीकृष्णेची परम सुखदा सत्कथा आयका, या. हे बाळाच्या शुचि करि, जसी वत्सला माय काया वक्त्रीं, चित्तीं, हितकर इचें सर्वदा नाव राहो. तीर्था योगा हयमखशता सर्वदाना वरा हो ! ॥१॥

(वृत्त - वसंततिलका)

भाग्यें विलोकुनि, महामुनि नारदातें, पूजूनियां, ऋषि भवांबुधिपारदातें, जोडूनि हस्त, वदले, ‘कलिदोषदावा ! भ्यालों प्रभो ! सुपथ, देवुनि तोष, दावा. ॥२॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

जोडूनि पापें नरकीं भरावें; कैसें महोग्रा कलितें तरावें ? अन्नोदक त्यागुनियां मरावें; सांग प्रभो ! काय कसें करावें ?’ ॥३॥

(गीतिवृत्त)

देवर्षि म्हणे, “ऋषि हो ! जेणें पुरुषार्थ सर्व जोडावा, ब्राम्हाणदेह सुदुर्लभ, तो न कलिभयें कदापि सोडावा. ॥४॥

श्रीहरिहरयश असतां तत्संकीर्तन करावया रसना, कां मरण वांछितां हो ! दुस्तर मानुनि मनीं कलिव्यसना ? ॥५॥

(वृत्त - मालिनी)

प्रकट हरिहरांची कीर्ति जी, या नदीनें धुवुनि मळ, करावें सत्पदा यान दीनें, कळिस बळ न कांहीं, सेतु हा बाळवेचा, त्यजुनि अघभयातें, कीर्तनीं काळ वेंचा. ॥६॥

(वृत्त - स्वागता)

कर्षणें जसि कृषीवल भुक्ति, कीर्तनें कुशल साधिति मुक्ति: त्यागिती न बुध मौक्तिकशुक्ति, हे धरा स्वहृदयीं शुचि उक्ति. ॥७॥

(वृत्त - रथोद्धता)

कीर्तनेंचि पुरुषार्थ साधती, पातकें हरिजना न बाधती; या युगीं गुण असे असा; रहा स्वस्थधी; कळि नव्हे असार हा. ॥८॥

(गीतिवृत्त)

ऋषि हो ! विष्णुप्रभुनें आणिकही निर्मिलें असे त्राण; कथितों तेंहि, कलिभयें होवुनि विकळ, त्यजूं नका प्राण. ॥९॥

(वृत्त - शार्दूलविक्रीडित)

पूर्वीं ‘सृष्टि करीं’ असी प्रभु हरि ब्रम्हायासि आज्ञा करी; तो प्रार्थी गुरुतें, ‘सुकीर्ति सुगति त्वत्सेवकातें वरी; हें मीं जाणतसें, तुज्याचि करुणायोगें, मुकुंदा ! परी, चिंतेची, मम चित्त, पावुनि भया, या आदरी बा ! दरी. ॥१०॥

(गीतिवृत्त)

कलियुग अघसागर कीं त्यांत त्रैलोक्यनायका ! देवा ! कैसी स्थिति प्रजांची कल्पावी. म्यां घडावया सेवा ? ॥११॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

पापें प्रजा व्याकुळ आपदानीं, होतील सिद्ध मग शापदानीं; स्वर्गार्थ धर्मीं चिर या सजाव्या, देवा ! न दोषें निरयास जाव्या.’ ॥१२॥

(गीतिवृत्त)

कृष्ण म्हणे, ‘इर्मावीं तिर्थे, कलिदोष सर्व हरितील; करितील पुण्यसंग्रह जीव, सुखें सद्नतीस वरितील. ॥१३॥

धात्या ! मत्करुणेनें केली विज्ञप्ति मजहि निर्माया तीर्थांच्या मातेतें, झालों उद्युक्त मींहि निर्माया. ॥१४॥

(वृत्त - स्वागता)

जीस मीं उठवितों प्रतिकल्पीं. वर्तती सुतनु यत्तनुतल्पीं, धातया ! प्रकटितों, कलि, तीतें; त्रस्त हो, बहु अघ छळिती तें.’ ॥१५॥

(गीतिवृत्त)

ऐसें वदोनि, कृष्णें कृष्णा नद्यग्रजा, सुकृतसलिला, निजतनुपासुनि केली प्रकट, कराया सदा सभय कलिला. ॥१६॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

आधीं श्रीकृष्ण कृष्णेतें पुण्यकीर्तिसह स्रजी; धाता भगवदाज्ञेनें मग तीर्थसहस्र जी ! ॥१७॥

(गीतिवृत्त)

मंत्रमहौषधिधारी पडतां ज्वाळांतही न भाजावा; ज्या प्राप्त सिद्धिगुटिका, तो लंघुनि सागरा नभा जावा. ॥१८॥ यापरि कृष्णाश्रित जे, ते पडतांहि न कळींत मळतील. जळतील दोष, त्यांच्या स्पर्शें प्रत्यूह दूर पळतील.” ॥१९॥

(वृत्त - प्रहर्षिणी)

जे होते ऋषि कलिभीत, सारदानें केले ते प्रमुदित सर्व नारदानें, हें कृष्णायश, वश यास जे तयांतें, षड्वैरी नमितिल मोहजेतयांतें. ॥२०॥

अध्याय दुसरा (गीतिवृत्त)

ऋषि म्हणति, ‘ब्रम्हाण्यें श्रीकृष्णें प्रेषिलासि रक्षाया, सत्पात्र तूंचि सुयशा भवमग्नोद्धारकर्मदक्षा ! या. ॥१॥

(वृत्त - स्रग्धरा)

त्वां प्रहरादध्रुवादि, स्वहित कथुनियां, नारदा ! धन्य केला; बा ! तूं या मंडळीला, पवनसुत जसा त्या धराकन्यकेला; त्वद्वाक्पीयूषपानेंकरुनि, बहु सुखें आमचा काय कोंदे. श्रीमत्कृष्णानदीचा निरुपम महिमा सर्वही आयकों दे.’ ॥२॥

(गीतिवृत्त)

जें पुसिलें श्रीकृष्णामाहात्म्य, द्रुहिणपुत्र सांगे हें. सफळ प्रणतमनोरथ करुणेच्या, न करिजेल कां, गेहें ? ॥३॥

देवर्षि म्हणे, ‘मुनि हो ! पुसतां परमादरें जसें मजला विधिहि असेंचि पुसे त्या, जो नतजन उद्धरावया सजला.’ ॥४॥

प्रभु सांगे, ‘कृष्णेचा महिमा अहिमानवावामरस्तव्य, भव्यप्रभाव विश्वीं, जो सुकृतरसिकमनीं सदा नव्य. ॥५॥

ऐकुनि सांग स्वजना, वत्सा ! चतुरानना ! बुधाधारा ! कृष्णेची जलकणिका सुहित करी, नच असी सुधाधाराअ. ॥६॥

बा ! होय मन्मयी हे श्रीकृष्णा मत्कळा सुधासम जे म्हणतिल, ते बाळचि, जो मत्सेवक तत्व त्या बुधा समजे. ॥७॥

स्रानें, पानें, स्तवनें, स्मरणें, कृष्णेचिया महाघ सरे. वैकुंठपदींहि चढे प्राणी, तेथुनि जसा न हा घसरे. ॥८॥

नि:शंक न प्रवर्ते, कृष्णेचें फार भय असे कलिला. स्पर्शुनि जगदघ हरितो, जो वायु स्पर्शला इच्या सलिला. ॥९॥

धात्या ! साक्षान्मत्तनु कृष्णा, साक्षान्महेशतन्‌ वेणा; भजतां यांसि, चुकतिल प्राण्यांच्या रोगमृत्युजनु - वेणा. ॥१०॥

(वृत्त - वसंततिलका)

मुक्तिप्रद, प्रकट मार्ग, पुराण आहे; त्यातें धरूनि, विरळ स्वपदासि लाहे. कृष्णासमाश्रित सुखें सुगतीस पाहे; कीं तो सुदुस्तर, सविन्घ, सदा न वाहे. ॥११॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

होय मुक्त सुखें, कृष्णावेणासंश्रित जो जन. यछिरीं कल्पवल्ली त्या काय दुर्लभ भोजन ? ॥१२॥ तारिती सर्व जीवांतें कृष्णावेणा महानद्या. मोटेंचि देती फळ या, म्हणो कोणी ‘लहान द्या.’ ॥१३॥

(गीतिवृत्त)

असती सिद्धचि संतत आश्रितजीवासि निजपदा न्याया; द्याया अमृत जनांतें; आम्हांहुनि बहु गुणें वदान्या या. ॥१४॥

करितिल कृष्णास्नान, स्मरतिल, धरितिलहि जे मम ध्यान, तच्चित्तीं प्रकटुनि, मीं दीप्त करिन भवभयापह ज्ञान. ॥१५॥

(वृत्त - शार्दूलविक्रीडित)

कृष्णेतें स्त्रजितों, स्वयें कलिभय त्यागूनि, तूंहि प्रजा निर्मीं, त्या सुयशा वरीं, बहु सुखें गातील सद्विप्र ज्या. सर्वत्र द्युमणिप्रभा प्रसरतां, जो पांथ, बाधा तया कैंची ? कीं न घडे पराभव तमापासूनि वा ! धातया !’ ॥१६॥

(गीतिवृत्त)

ऐसें बोलुनि, भगवान्‌, शमवाया विषयभोगतृष्णेतें, प्रकट करी तनुपासुनि निरुपमतमरम्यमूर्ति कृष्णेतें. ॥१७॥

(वृत्तें - शार्दूलविक्रीडित; इंद्रवंशा; शिखरिणी; अनुष्टुभ्‌)

वर्ण श्याम तसा, जसाचि हरिच्या श्रीमूर्तिचा शोभला. चक्रांका, सुचतुर्भुजा, गुण जिचा निर्दोष जो, तो भला. श्रीशाचा महिमा, विलोकुनि जितें, त्याचि क्षणीं लोभला, ‘माया केवळ आपणावरि’ म्हणे, चित्तीं प्रभु क्षोभला. ॥१८॥

ती शोभली फार महानदी सती, जीच्या पुढें योग लहान दीसती. चित्तीं म्हणे, ‘जे करितील मज्जन, ते अन्यपापें हरितील मज्जन. ॥१९॥

असी कृष्णादेवी निजतनुभवा, विश्वसुहिता, दिली कृष्णें, तीतें शतधृति म्हणे, ‘हे स्वदुहिता.’ तयाचा जो लोकप्रियहित मिळाला सुरस, त्या बहु प्रेमें सर्वा करिति नुति, पूजा, सुरसत्या. ॥२०॥

भाग्येंकरूनि भव्याची मावली पावली मग; ब्रम्हा रची श्रीहरिच्या उक्तिनें युक्तिनें जग. ॥२१॥

(गीतिवृत्त)

जगदघहरें सुतीर्थें रचिलीं, या निर्मिल्या जगीं विधिनें, त्यावरि भूवरि कृष्णा तीर्थांबा आणिली दयानिधिनें. ॥२२॥

जैसी सुरभि स्वर्गीं विविधविषयभुक्तिदान दीनां दे: या भूतळीं तदधिका हे कृष्णा मुक्तिदा नदी नांदे. ॥२३॥


अध्याय तिसरा (वृत्तें - शिखरिणी; अनुष्टुभ्‌)

जगत्पूज्या कृष्णा परम गुरुची मूर्ति सुसती. तिच्या माहात्म्यातें मुनि, नमुनियां पाय, पुसती. कृपावर्षें ज्याच्या भय तिळ न संसारदव दे , महात्मा तो ऐसें, करुनि करुणा, नारद वदे, ॥१॥

‘या प्रश्रें तुमची मोटी माझीही धन्यता पहा. म्हणतील भवत्ताप ‘हा’ तसे अन्य ताप ‘हा’. ॥२॥

(गीतिवृत्त)

श्रीकृष्णामाहात्म्यश्रवणेछा जेधवां मनीं झाली, आली तुमच्या हस्तीं मुक्ति, प्रेमें जसि प्रिया आली. ॥३॥

जेथें श्रीकृष्णेचें माहात्म्यश्रवण तोचि वरदेश, सर्व मनोरथ पुरवी, नुरवी, कळिविन्घ, विष्णु वरदेश. ॥४॥

कृष्णेच्या भक्ताचा, कोणाहि पुढें, न हात पसरेल; त्या परम सभाग्याचें कल्पांतींहि न महातप सरेल. ॥५॥

(घृत्त - शार्दूलविक्रीडित)

पक्षांचा ध्वनि ऐकतांचि हृदयीं जे पक्षिपाळा अही भीती, त्यांसि लपावया स्थळ बिळीं दे ती दयार्द्रा मही. कृष्णेच्या सुयशासि कांपति अघें, दे त्यां न थारा खही. तीं, जींत प्रभुचित्रगुप्त - लिखितें, ती होय दग्धा वही. ॥६॥

(गीतिवृत्त)

महिमा कृष्णेचा जो, याचें ‘कलिदलन’ नाम या गाते जे जन, होती योगा जैसे तैसेचि धाम यागा ते. ॥७॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

मंदरीं पुसिलें स्कंदें कृष्णामाहात्म्य आदरें त्यातें जगल्लताकंदें कथिलें त्या उमावरें. ॥८॥

(गीतिवृत्त)

रोमांचिततनु होऊनि, यछ्रवणीं निश्चळा उमा राहे कृष्णाकीर्ति परिसिली म्यां, नमुनि प्रभुसुता कुमारा, हे, ॥९॥

या माहात्म्यश्रवणा शुचि सज्जन शैव भागवत मात्र पात्र, प्रसिद्ध ज्यांचें, सात्विक भावासि होय गृह, गात्र ॥१०॥

(वृत्तें - उपजाति; शार्दूलविक्रीडित)

कृष्णातटीं जो वश योगयाग या, कधीं तशांतें न म्हणेचि ‘या’ गया. सर्वां ऋणांपासुनि जीव सोडवी; न मागती प्रत्युत हात जोडवी. ॥११॥

ब्रम्हा, विष्णु, महेश्वर, प्रभु, कलिप्रारंभ होतां क्रिया व्हाया सत्फलदा, सुपुण्यनिधि या भूच्या कराया प्रिया, कृष्णा घेऊनि आदरें उतरले आनंद अर्पावया, विश्वातें विपुलें महामृतरसें, तप्तांसि तर्पावया. ॥१२॥

(गीतिवृत्त)

ब्रम्हादि देव भूवरि अवलोकित सुप्रदेश जों आले, तों ते तपस्विवर्या सत्पुरुषातें विलोकिते झाले. ॥१३॥

त्या पुरुषातें पुसती ते सुर, ‘तूं कोण ? वांछिसी काय ? घे इष्ट शिष्टवर्या ! बहु कृश झाला तप:श्रमें काय. ॥१४॥

किमपि अदेय नसे, या कृष्णेच्या आगमोत्सवामाजी; ‘मा’ जीभ न बोले; ती श्रेष्ठा, पुरवील अर्थिकामा जी.’ ॥१५॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

हें ऐकतां तापस फार हर्षे, प्रेमाश्रुधारा घनसाचि वर्षे; वंदी, स्तवी जोडुनि अंजलीला; वर्णी प्रभूंच्या पदकंजलीला. ॥१६॥

(गीतिवृत्त)

‘प्रभु हो ! तप करितों, कीं न बुडोत कलींत जीव सर्व तमीं; आलों शरण तुम्हांतें, जोडुनियां हस्त, सहय पर्वत मीं. ॥१७॥

झालां प्रसन्न, तरि द्या वर हा, माझीच हे असो कन्या. कृष्णानदी प्रवर्तो मजपासुनि, यश असें नसो अन्या. ॥१८॥

(वृत्ते - अनुष्टुभ्‌; पृथ्वी)

करितों प्राप्त व्हाया मीं पुण्यता, धन्यता, पसा. द्या कृष्णा हे, मुक्ति जैसी देतसां अन्य तापसां.’ ॥१९॥

असा नमुनि मागतां सुवर उद्धराया जना, तदुक्त रुचलें बहु त्रिभुवनेश्वरांच्या मना: प्रसन्नमति पाहती सकळ देव कृष्णानना, ज्से तृषित चातक प्रियकरा उदारा घना. ॥२०॥

(वृत्त - शिखरिणी)

म्हणे कृष्णा, ‘सह्या ! अससि शुचिधर्मा, नत नया; तुझी होऊं मीं कां सकळजनशर्मा न तनया ? मिळाली ती कन्या जसि भुवनमाता हिमनगा, तुला मीं, या नात्या परम वश माझेंहि मन गा ! ॥२१॥

(गीतिवृत्त)

सहया ! मीं जेंवि, तुज्या होतिल बहु मदनुजा नद्या कन्या अन्या, वाढवितिल यश, करितिल तुजलाहि धन्य त्या धन्या, ॥२२॥

मीं सहयसुता होत्यें; सुरमुनि हो ! सहयजा म्हणा मातें, यासि सुखें करिन, शिवा करित असे जसि तया, प्रणामातें,’ ॥२३॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

या वात्सल्यें सर्व देवसंघ विस्मय पावला. म्हणे, ‘कृष्णे ! तुझा, जो या कृष्णाचा, तोचि पावला. ॥२४॥

भक्तवत्सलता नित्य, प्रभुहृत्सारसा जसी, कृष्णे ! तुझ्याहि सेवी; या सदगुणें फार साजसी.’ ॥२५॥

(गीतिवृत्त)

सहय, प्रमुदित होऊनि, कृष्णेसि म्हणे, “महाप्रसाद’ असें; गौरीप्रसादभाजन जेंवि हिमाचल, तसाचि मीहि असें.” ॥२६॥

कृष्णेसह कृष्णातें, ब्रम्हादिसुरां समेत, घेवून सहय स्वपदा गेला तच्चरणावरि शिरोब्ज ठेवून. ॥२७॥

सहयाचळीं मिळाले वसुरुद्रादित्य सर्व नाकर्षी, राजर्षि, महर्षि सकळ, तो कृष्णोत्सव तयांसि आकर्षी. ॥२८॥

गंधर्व, यक्ष, किन्नर, विद्याधर, सिद्ध, साध्य, आशाप. यांला तो उत्सव हित, मलिन कलिनरक तयांस हा शाप. ॥२९॥

ते अळि, तो पद्माकर, ते पिक, तो वृक्षराज आंबा हो, कृष्णोत्सव कल्पद्रुम त्या अर्थिजनां यशें न कां बाहो ? ॥३०॥

पूजी फळपुष्पादि द्रव्यें भव्यें तयांसि नग सहय, स्वक्षय, तो मह कळतां, होइल कैसा कळीस मग सहय़? ॥३१॥

ऋषि, पितर, देव म्हणती, ‘झालेचि कृतार्थ सर्व नर, कास कृष्णेची धरुनि, खळा कलिस, तसा त्यजिल गर्व नरकास. ॥३२॥

कृष्णेंत करुनि तर्पण, आम्हांला परम तृप्ति भव्याहीं कव्याहीं देतिल नर, कर्मीं आदर धरुनि, हव्याहीं. ॥३३॥

कृष्णेंत जलांजलि जरि आम्हांस मिळेल. सौख्य अर्पावें तरि काय हो स्वधेनें ? काय सुधेनेंहि अधिक तर्पावें. ? ॥३४॥

जाईल ज्या दिशेप्रति, होईलचि ती अलंकृता, पूता: अमृतफळ मिलाल्यावरि, रसिक जन पुसेल कोण हो तूता ? ॥३५॥

तेचि सुभाग्य जन जगीं, तेचि शुभोदय समस्तवर देश, तींच सुपुण्यक्षेत्रें, जेथें कृष्णाप्रवाह वरदेश. ॥३६॥

विस्तार स्वर्गाचा होइल, संकोच नरकवर्गाचा, ईचा प्रवाह जैसा सर्वार्थप्रद मुहूर्त गर्गाचा. ॥३७॥

स्वर्गाची नि:श्रेणी कृष्णा भाग्यें नरांसि सांपडली. कळि जरि तम तो, गमतो केवळ जड, यासि भूल कां पडली ? ॥३८॥

(वृत्तें - शालिनी, स्वागता)

कृष्णातीरीं जंगमत्वें वसावें, किंवा भाग्यें स्थाणुभावें असावें, वर्षें शीतें कष्टतां आतपानें, आहे मोटी धन्यता वातपानें,’ ॥३९॥

बोलिले अमर यापरि सारे, त्यां म्हणे हरिहि ‘या, परिसा, रे ! दीसतो परि लहान गमू हा न, स्वयें हरिल हा नग मोहा. ॥४०॥

(गीतिवृत्त)

बसतों हया सहयाशिरीं श्वेताश्वत्थस्वरूप मीं सुगम. कृष्णेचा मत्पादापासुनि होइल महायशा उगम.’ ॥४१॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

अश्वत्थरूप प्रभु होय, धारा कृष्णाहि तन्मूलज तोयधारा; त्या सर्व देवद्विजमंडलीला श्रीविष्णुची ती करि थंड लीला. ॥४२॥

(गीतिवृत्त)

सुरमुनि ‘जयजय’ वदती, पुष्पांच्या वर्षती सरी घनसे, गंधर्वगीति निपुणा, परि द्याया हर्ष तीस रीघ नसे. ॥४३॥

गावूनि हरिहरांचीं मधुरें त्रिजगन्मनोहरें कृत्यें, करित्या झाल्या हर्षें, त्या परम महीं, वराप्सरा नृत्यें. ॥४४॥

अघ हरित, जग प्रमुदित करित, तनुहि ती महानदी प्रसरे: निबिडतमतम:प्रशमीं नच मागें. जरि लहान, दीप्र सरें. ॥४५॥

(वृत्त - शिस्त्ररिणी)

पुढें झाला हर्षें नरसहित नारायणमुनी. तयामागें चाले त्वरितगति कृष्णा सुरधुनी; प्रतापें पूर्वेचीं हरित दुरितें पुण्यसलिला सुखें गेली; झाली बहुत हृदयीं भीति कलिला. ॥४६॥

(वृत्त - वसंततिलका)

सर्वांसि दे सुकृततेज नदी पिके तें त्या सोडिती क्षण न ते जन दीपिकेतें. जी देवुनि स्वसहवास वदे, ‘वसा रे ! माझ्या तटींच सहवासव देव सारे,’ ॥४७॥

(गीतिवृत्त)

सर्वदुरिततापन्घी पुण्या ऋग्वेदसंहिता आहे; अतिपुण्यें तींत जसीं सूक्तें, येथेंहि बुध असें पाहे. ॥४८॥

कृष्णा पुण्या, तीर्थें अतिपुण्यें वर्तती इच्या पोटीं; ज्यांचें सेवन करितां, भस्मचि होतात पातकें मोटीं ॥४९॥

सहयापासुनि सागरसंगमपर्यंत विप्र हो ! असती तीर्थें अतिपुण्यें या कृष्णेच्या आश्रयें सुखें वसती. ॥५०॥

या कृष्णामाहात्म्यश्रवणें जळतात सर्वही दोष; रोष न कळिकाळाचा चाले; श्रीविष्णु पावतो तोष. ॥५१॥


अध्याय चवथा (गीतिवृत्त)

देवर्षि म्हणे, ‘मुनिहो ! जेथें यमनियमरक्षणा जपला पूर्वीं भगवान्‌ ब्रम्हा, साधाया आत्मसिद्धिला, तपला. ॥१॥

तो ब्रम्हागिरि द्विज हो ! सहयाच्या उत्तरेकडे शृंगीं जो स्वाश्रितीं सुवत्सळ, पद्माकर जेंवि सर्वदा भृंगीं. ॥२॥

त्याच्या दक्षिणभागीं, जेथें द्रवले समस्तही वेद, तो वेदगिरि, जयाचें दर्शन तत्काळ वारितें खेद. ॥३॥

या दोघांच्या मध्यें आहे सत्तीर्थ आमलक नामें; मुक्तचि केले स्वाश्रित अगणित, या पुण्यसिद्धिच्या धामें. ॥४॥

दिव्य जनांलाचि दिसे, ज्या स्थानीं, दिव्यमूर्ति आमलकी; ज्याच्या स्रानें - पानें करुनि म्हणे ‘हाय’ न प्रजा मळकी. ॥५॥

आमलकीतरुमूळापासूनि प्रकट जाहली वेणा; जीची कीर्ति कळीला, सिंहाची गर्जना जसी एणा. ॥६॥

वेणेचा कृष्णेसीं योग महासिद्धिहेतु सन्मुनि हो ! बुध म्हणति, ‘कृष्णवेणा, तद्दर्शन कलियुगांत जन्मुनि हो.’ ॥७॥

कविम्हणति, ‘कृष्णवेणा हें अंतीं नाम यो, जिभे ! घोकीं; लोकीं श्रेष्ठीं स्थापी; कोणालाही बुडों न दे शोकीं.’ ॥८॥

मुनि हो ! ककुद्मतीसीं कृष्णेसीं प्रीतिसंगम; ‘नमो’ ही म्हणतां मुक्त करि तसा, हा जैसा साधुसंग मन मोही. ॥९॥

परम प्रेमळ हरिहर - भक्तांचा तेंवि धन्य संगम हा. देतो सर्वांसि जसा, विपुला देनाचि अन्यसंग महा. ॥१०॥

झाला ककुद्मतीच्या, कृष्णेच्या, तेंवि संग ओघांचा, जे ज्ञानभक्तियोग स्वछ जसा काय याचि दोघांचा. ॥११॥

याच्या कीर्तिपुढें परकीर्ति, खजूरीपुढें जशा शिंदी; हा कलिसंगमल हरी, संगम लहरी सुधाब्धिअच्या निंदी. ॥१२॥

हिमगिरि गौरीस, तसा कीर्तिस याचा सुदंडक वियाला;

हा प्रीतिसंगम अतुळ; गाती गातिल उदंड कवि याला. ॥१३॥

कृष्णादक्षिणतीरीं गणिकाख्य सुतीर्थ तें अहो मुनिहो ! म्हणतें, ‘माज्या तेजीं मुक्त महापातकास होमुनि हो.’ ॥१४॥

पूर्वीं नरनारायण विधिला भेटावया स्वयें आले, धाले तत्सत्कारें, जे मोहीं नित्य घालिते घाले. ॥१५॥

जो सकळतीर्थपूर्ण ब्रम्हाकमंडलु, तयांतुनि प्रकट होय नदी, जाळाया श्रितपातक पापवासनांसकट. ॥१६॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

म्हणती साधु करुनि प्रणिपात, ‘कमंडली जीतें,’ निजक्षयरुजा गणि पातकमंडली. ॥१७॥

(गीतिवृत्त)

संगम कमंडलीचा कृष्णेशीं जो, तयाचि शुद्धतमीं तपले नरनारायण, मनहि म्हणे, ‘ज्यांपुढें न उद्धत मीं.’ ॥१८॥

म्हणतें हें तीर्थ, ‘महापातक मद्यशचि हरिल, गा ! मातें. कळि याच्या महिम्यातें केवळ वश, जेंवि हरि लगामातें.’ ॥१९॥

‘मुनि हो ! या तीर्थाचा महिमा आदर करूनि परिसा हो ! इतिहास उग्र, आधीं मन तुमचें, धृति धरूनि, परि साहो.’ ॥२०॥

होता गौतमनामा ऋषि तेजस्वी, स्मरारिचा भक्त, त्यक्तक्रोध, जितेंद्रिय, धनधान्यसमन्वित, क्रियासक्त. ॥२१॥

रम्य महाकाळवनीं वसला बहु काळ, होय तो जीन. मोजी न दशेसि, म्हणे, ‘अंतीं मन शिवपदींच योजीन.’ ॥२२॥

त्या वृद्धाची तरुणी, रूपवती, संगलालसा, भार्या; ती पतिच्या फार जपे, किमपि जपेनाचि तो तिच्या कार्या. ॥२३॥

पतितें नित्य म्हणे ती. ‘माझें जातें वृथाचि तारुण्य; पाषाणीं द्रव, तैसें तुझिया हृदयीं नसेचि कारुण्य. ॥२४॥

(वृत्तें - इंद्रवज्रा; उपजाति; शालिनी; वसंततिलका)

पुत्रार्थ संपादिति अंगना; कीं पुत्राविणें होयचि भंग नाकीं कां व्यर्थ नानामिष ? ये रमाया; वाटे मला हे विष, येर माया. ॥२५॥

बळेंचिन घे साधुनि अंगसंग ती; स्त्रीची करी सन्मतिभंग संगती. म्हणे. ‘मम स्वप्रिय बायको,’ पहा; करिल हो ! तीवरि काय कोप हा ? ॥२६॥

संध्याकाळीं गर्भ पोटांत राहे; चित्तीं चिंता साधु तो विप्र वाहे; गर्भछद्में तें महापाप वाढे, जेणें व्हावे प्राप्त संताप गाढे. ॥२७॥

सिंहोदरी प्रसवली सुत विप्रजाया; हर्षोनि, हर्षित करी बहु विप्रजा या; संस्कार सर्व करि गौतम नंदनाचे; नेणोनि भावि फळ तो बहु मंद नाचें. ॥२८॥

(गीतिवृत्त)

गौतम गर्गासि म्हणे, ‘कैसा होईल पुत्र हा ? गर्गा ! बा ! सांग भविष्य, तुला म्हणती ‘सर्वज्ञ’ बहु जसे भर्गा.’ ॥२९॥

त्याचें जातक पाहुनि गर्ग म्हणे, ‘गौतमा ! मुइवरा ! हे ! ऐसी तव कीर्ति, जिला बहु लाजुनि शारदी पुनिव राहे. ॥३०॥

बा ! तुज असा कसा सुत झाला ? होणार हा महापाप, ब्रम्हान्घ, मातृगामी, मद्यप, देईल दर्शनें ताप. ॥३१॥

याचें नाम सुदाम; परम दुरात्मा; परंतु हा अंतीं पावेल शांति कृष्नामाहात्म्यीं; गाइजेल ही संतीं.’ ॥३२॥ हें ऐकुनि धर्मात्मागौतम मूर्छित पडे, रडे, तापे, स्त्रीतें म्हणे, ‘कशी गे ! प्रसवलिस महाघ तूं महापापे ! ॥३३॥ जेंवि बहु कुपुत्राचें, न फणीचें तेंवि, दे वपु त्रास, देता झाला कैसा ऐसा मज देवदेव पुत्रास ? ॥३४॥ गृह शून्य अपुत्राचें. न कुपुत्राचेंचि शून्य गृह लोकीं ?’ इत्यादि विलाप करी तो गौतम, मग्न होय बहु शोकीं. ॥३५॥ शोकें हृदय तडकलें. बहुधा झालेंन हरिहरस्मरण; बहु ‘हाय ! हाय ! वदला गौतम, तत्काळ पावला मरण. ॥३६॥ मृत पति, सुत शिशु, टाकुनि, संपादाया महाघ, रागेली सच्चरितावरि, सहसा सोडुनि सिंहोदरी घरा गेली. ॥३७॥ ती कान्यकुब्जदेशीं गणीकांची नायिका स्वयें झाली. भ्याली नाहीं नरका, बहु भक्षुनि मांस, ती सुरा प्याली. ॥३८॥ तारुण्यें, सौंदर्यें, चातुर्यें, सर्व तरुण लुटिले, तें काय वदावें ? भुलले कामुक रंभेसि तेंवि कुटिलेतें. ॥३९॥ दांतीं वरपर्यंकीं चवरांहीं वीजिती तिला गणिका. मणि काय ? काय कांचन ? वाढे ती. जेंवि वन्हिची कणिका. ॥४०॥ संपत्ति कामसेना ती सेवी आयती समा चवदा. कामुक म्हणती, ‘तीतें, जी रंभा काय तीसमाच, वदा.’ ॥४१॥ तो शिशु सुहृज्जनाहीं वाढविला पुत्रसाच पोसून. अत्यंत दृष्टचेष्टित जरि तो, तरि तदपराध सोसून. ॥४२॥ द्यूत करी, चोरी, त्या चोरा परसंपदा दुरापा न. सुहृदांस न आटोपे. पाप सुदामा करी सुरापान. ॥४३॥ जे पापमार्गलुंपक त्यांत शिरे सत्यमार्गलुंपकसा; रोधी त्यास न नरकत्रास, निवारिल गजासि कुंप कसा ? ॥४४॥ ब्राम्हाणहि सुदाम्यानें वधिले. तें पाप काय सांगावें ? ‘मां गावें. बहु लघु, हें गुरु’ म्हणती, मांगिणी न कां गावें ? ॥४५॥ ऐसें करुनि, सुदामा तो गेला कान्यकुब्ज देशातें; घे पापकर्मपर्वत माथां, न ब्रम्हाकर्मलेशातें; ॥४६॥ बुडविति जना न कोटिहि अरि लोभक्रोधकामसे; नेला ऋषिसुत दुष्कर्माला; कीं तो दे भोग कामसेनेला. ॥४७॥ वृत्त. गळां पडुनि, पुसे सर्व महापापपुंज तो तीस. ‘गणिका झालीस कसी ? पूर्वीं तूं सांग कोण होतीस ?’ ॥४८॥

(वृत्त - शार्दूलविक्रीडीत)

सांगे ती निजवृत्त, गोत्र पतिचें, जें नाम तें आपलें. त्याचें मानस ऐकतां, उपजतां नातें, अघें तापलें. होय व्याकुळ, ‘हायहाय’ चि वदे, दुर्जीविता त्रासला. पर्यंकावरुनि क्षमेवरि पडे नष्टासुसा पासला. ॥४९॥

(वृत्तें - भुजंगप्रयात, इंद्रवज्रा; अनुष्टुम्‌; शार्दूलविक्रीडित; शालिनी; अनुष्टुभ्‌; शालिनी)

अघें आंत- बाहेरही ताप ल्याला; सुचेनाचि कांहीं तया तापल्याला; म्हणे तो, ‘त्रिलोकीं अशा उद्धतातें दिसेनाचि, देईलजें शुद्धता, तें. ॥५०॥ ब्रम्हान्घही. मद्यप, मातृगामी, ऐसा महापातकराशि हा मीं; कैसा तरुं या अघसागराला ? घोंटील उग्रा न घसा गराला.’ ॥५१॥ स्वदेहा, मानवे विष्ठामूत्रांच्या मणिका, पण विटे सिंहोदरी, निंदी बहु तें गणिकापण. ॥५२॥ ‘होत्यें धार्मिकभूमिदेवगृहिणी, म्यां भाग्य तें सोडिलें; आप्तांचें मन शीलसद्‍गुणयश:स्नेहक्षयें मोडिलें; लज्जामौक्तिकदामभूषण बरें अत्याग्रहें तोडिलें; वेश्या होऊनि, सेवटीं अघ असें अत्युग्र हें जोडिलें. ॥५३॥ प्राणत्यागा योग्य हे मी अशीला, अन्य प्रायश्चित्त कैंचें अशीला ? स्पर्शेल श्रीवन्हि या काय देहा ? कीं मोडीत क्रीडला कायदे हा. ॥५४॥ विटला जीव माझा हा; कशाला काय गेह या ? जो रणीं मरणारा त्या स्वशाला काय गे ! हया ?’ ॥५५॥ तोही, तीही होय निर्विण्ण; दोघें नेलीं दैवें. जेंवि काष्ठादि ओघें; कोणी कोणाच्या मुखातें न पाहे, होतें तेथें गेह. सर्वस्व, राहे. ॥५६॥

(गीतिवृत्त)

भ्रमतां वनांत, नामें देवल परमर्षि भेटला; भावें नमिला त्यांहीं, तैसें तें, बुडतां जेंवि वेट लाभावें. ॥५७॥ देवल पुसे तयांतें, ‘दिसतां दु:खित, विरक्त; सांगातें प्राणत्यागोद्यत कां ? कारण जें काय, सत्य सांगा तें.’ ॥५८॥ तीं दोघेंही म्हणती, ‘अश्राव्य, अवाच्य, तें महापाप घडलें आम्हां, स्वामी ! तेणें अत्यंत पावलों ताप. ॥५९॥ मुनिवर्या ! सर्वज्ञा ! ज्ञानें तुजन कथितांहि समजावें; शरणागताघ तुझिया तेजें, रविच्याहि सस्र्व तम, जावें.’ ॥६०॥ देवल म्हणे, ‘समजलें मज तुमचें सर्व वृत्त सुज्ञानें; निष्कृति कृष्णा, दुसरी या पापा पाहिली न सुज्ञानें.’ ॥६१॥

(वृत्त- मालिनी)

नमुनि म्हणति दोघें, ‘देवला ! सांग बापा ! कथिसि, हरिल कृष्णा या अशा घोर पापा; वद सदयवरा ! ती कोण ? कोठें पहावी अनुसरुनि तनू हे जीस आम्ही वहावी ?’ ॥६२॥

(गीतिवृत्त)

देवल सांगे, ‘सहयप्रभवा कृष्णा महानदी आहे; वाहे प्राचींत; जिच्या स्नानें पातक न लेशरी राहे. ॥६३॥ झाली श्रीकृष्णतनु श्रीकृष्णा, भवभयासि उडवाया; योगमयी, तीर्थमयी, ज्ञानमयी, सर्व पाप बुडवाया. ॥६४॥ रक्षिल कृष्णाचि तुम्हां, कीं ती दोषाचळासि अशनीच; ज्यां स्पर्शे वायु इचा, ते होति न यमभटांसि वश नीच. ॥६५॥ ब्रम्हानदीसंभेदीं जा, नरनारायणाश्रमींच वसा; माघशतस्नानें ती कृष्णा पावेल निश्चयें नवसा.’ ॥६६॥

(वृत्तें - मालभारिणी; मालभारिणी; पुष्पिताग्रा)

बरवा रस हा असार साचा, न सुरांच्या गुण तो असा रसाचा; मुनि हो ! नच पी तथापि याला; जडधी जाय दुज्या कथा पियाला. ॥६७॥ यश हें बहु मानसा धुयाला पटु; देती बहुमान साधु याला. निववी पतिता, पहा निवारी हरिजेचें अति तापहानि वारी. ॥६८॥ न हरितनुधुनीयशासमान स्वरस, असें कळतां, कशास मान ? त्रिदश कविहि देति, देवमाया भुलवि तयां, उमजों न दे वमाया. ॥६९॥


अध्याय पांचवा (गीतिवृत्त)

मुनितें वंदुनि, आलीं तीं नरनारायणाश्रमीं दोघें; ओघें प्रमुदित केलीं; झालींच अघें तयांपुढें मोघें. ॥१॥ त्या अघनिकृंतनीतें गणिका तत्सुत करूनियां प्रणती, ‘माते ! कृष्णे ! सद्‌गति आम्हां शरणागतांसि दे’ म्हणती. ॥२॥ स्नान करुनि अभयवर, ‘होइन नि:संग मीं’ असा याची. ती गणिका, तो तत्सुत, इछा धरि संगमीं वसायाची. ॥३॥ पाहुनि मुनीश्वरातें, दोघें लाजोनि दोंकडे गेलीं; रोहोनि दक्षिणोत्तरतीईं स्नानें, उपोषणें, केलीं. ॥४॥

(वृत्त - शिखरिणी)

स्मरे ती, जावूं दे लवहि न रिकामा दिसवड; करी तीन स्नानें; जपुनि अरि कामादि सवड न पावे; वैराग्यें तृणचि गणिकायापरिभावा, सुखें साहे, वेंची तपुनि गणिका यापरि भवा. ॥५॥

(गीतिवृत्त)

प्रायोपवेश करि ती गणिका, निश्चय धरी मरायाचा; हरिहरनामस्मरणें सुचला सद्योग हा तरायाचा. ॥६॥ दर्शन देवूनि पुसे ‘कोण मनोरथ तुझा ?’ असें नंदी: ऐकुनि गणिका हर्षे, त्या वृषरूपेश्वरासि ती वंदी ॥७॥ हांसोनि म्हणे, ‘वृषभा ! तुज काय कथूं ? स्वयें तुझा भर्ता कर्ता सफल मनोरथ, कोठें तो नतभवव्यथाहर्ता ? ॥८॥ प्रभुला नंदी वंदी, बंदी ज्याचे समस्तही वेद; गणिकोक्त तया सांगे, तच्चित्तींचा हरावया खेद. ॥९॥ परम प्रसन्न सांगुनि नंदीनें वृत्त देवमणिकेला गणिकेला तो भेटे जैसा पवमान वन्हिकणिकेला. ॥१०॥ देव म्हणे, ‘पावसि कां, सेवुनि हें दिव्य वारि, खेदास ? कृष्णेनें उद्धरिले, हर्षविले, सर्व सारिखे दास. ॥११॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

ते मुक्त, जे या कृष्णेचें करिती तटसेवन; न जाणोनिहि माहात्म्य, प्राशिती घटसे वन. ॥१२॥

(वृत्त - स्रग्धरा)

जे कोणी योगयागव्रतनिरत सदा, तापस, ब्रम्हाचारी, दाते विद्याभयांचे, द्दढ गुरुभजनीं, गोद्विजत्राणकारी, त्यांला जें प्राप्त होतें शुभ फळ, गणिके ! जाण त्याहूनि भारी कृष्णेचें तीर्थकोटिस्तुतशुचियश हें सेवितां भव्य वारी. ॥१३॥

(वृत्त - शार्दूलविक्रीडित)

कृष्णेच्या तपलीस पावनन तटीं; दुष्कर्म तें क्षाळिलें; झालें शुद्ध तुझें कलेवर, पुटीं सोनें जसें जाळिलें; आतां सुभ्रु ! असेल कृत्य उरलें. तें सांग शक्तास या; मान्या तूं विजयादि जेंवि गिरिजासेवातिसक्ता सया.’ ॥१४॥

(गीतिवृत्त)

ऐसें ऐकुनि, पडली गणिका त्या प्रभुपुढें, जसा दंड; थंड क्षणांत झाली. कीं करि जगदीश सुयश जें भंड. ॥१५॥ गणिका म्हणे, ‘प्रभुवरा ! माजें दुष्कृत तुला सकळ कळतें; द्रवलासि, कीं जनकमन, दु:खित पाहुनि मुलास, कळकळतें. ॥१६॥ नच तरत्यें मीं, करितां शतजन्में अतितपा वनामाजी; त्वां लाज राखिली बा ! सदयवरा ! पतितपावना ! माजी. ॥१७॥ जरि सुप्रसन्न मजवरि झालासि दयार्णवा ! अगा ! धात्या ! ज्यांत असें दु:खभय, प्रभुजी ! नाशीं भवा अगाधा त्या. ॥१८॥ ‘गणिकेश्वर’ या नामें तूं या कृष्णातटीं रहा देवा ! ‘गणिकातीर्थ’ असें या तीर्थातें जग म्हणो महादेवा ! ॥१९॥ या तीर्थीं माघव्रत करितां. व्हावेचि सर्वही मुक्त; उक्त प्रणतांचें तूं सफळ करिसि, तुजचि होय हें युक्त. ॥२०॥ जे न्हातिल या तीर्थीं ! त्यांचें त्वां पापबीज जाळावें; टाळावें विन्घ विभो ! सकळां शरणागतांसि पाळावें.’ ॥२१॥ नंदीवरि बैसुनि , घे गणिकेसहि, म्हणुनियां ‘तथास्तु’ तिला. केली प्रभुनें ऐशी विश्वाच्या पात्र हे कथा स्तुतिला. ॥२२॥ श्रीसिद्धेश्वरतीर्थीं माघस्नानें करुनियां शुचिता, तोहि सुदामा पावे सद्नति, जीब्रम्हाविज्जना उचिता. ॥२३॥ ज्याच्या श्रवणीं भिजवी पाप्याचें देह, वस्त्रही, घाम; तें धुतलें जेणें, त्या तीर्थाचें ‘धूतपाप’ हें नाम. ॥२४॥

(वृत्त - द्रुतविलंबित)

स्वगुरुपुत्रसदाशिवपंडितें, सुरसिकें, निजसद्‌गुणमंडितें, लिहविलें परमाद्‌भुत सहयजा - यश, म्हणे कळिकाळ असहय ज्या. ॥२५॥

(वृत्त -म्शार्दूलविक्रीडित)

कृष्णेचें निजपूर्वजांसि लिहिलें माहात्म्य तर्पावया; हें नि:सीम अनंत भक्तहृदया आनंद अर्पावया; ऐकावें रसिकाननेंचि रसिकें साधावया मुक्तितें; श्रीकृष्णाप्रियभक्तहो ! सुजन हो ! द्या मान या उक्तितें. ॥२६॥

(वृत्त - वसंततिलका)

श्रीरामनंदन मयूर लिहोनि पाहे, हें कृष्णशंकरपदांबरि पुष्प वाहे; कृष्णाप्रसाद शुभ हा गुण यांत आहे; जो शंभुविष्णुजन, तो बहु हर्ष लाहे. ॥२७॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.