Jump to content

करुणात्रिपदी

विकिस्रोत कडून

करुणात्रिपदी हे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी रचलेले स्तोत्र असून दत्त संप्रदायात या स्तोत्राला अनन्य साधारण महत्व आहे. करुणात्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, आपण केलेल्या अपराधांची माफी मागून क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी भावपूर्ण रचना आहे.[]

१. शांत हो श्रीगुरुदत्ता

[संपादन]

शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।ध्रु।।

तू केवळ माता जनिता। सर्वथा तू हितकर्ता।।
तू आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।
भयकर्ता तू भयहर्ता। दंडधर्ता तू परिपाता।।
तुजवाचुनि न दुजी वार्ता। तू आर्ता आश्रय दत्ता (आश्रयदाता)।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।१।।

अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।
तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवू माथा।।
तू तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा?
सोडविता दुसरा तेव्हां। कोण दत्ता आम्हां त्राता?
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।२।।

तू नटसा होउनि कोपी। दंडिताहि आम्ही पापी ।।
पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरी नच संतापी ।।
गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच होऊ कोपी ।।
निजकृपा लेशा ओपी। आम्हांवरि तू भगवंता।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।३।।

तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां ।।
सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दूजा (दुसरा) त्राता।।
निजबिरुदा आणुनि चित्ता। तू पतितपावन दत्ता।।
वळे आतां आम्हांवरता। करुणाघन तू गुरुनाथा।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।४।।

सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार ।।
तव पदी अर्पू असार। संसाराहित हा भार ।।
परिहरिसी करुणासिंधो। तू दीनानाथ सुबन्‍धो।।
आम्हां अघ लेश न बाधो। वासुदे-प्रार्थित दत्ता।।
शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।५।।

भावार्थ:
हे श्रीगुरुदत्ता आपण शांत व्हा. माझ्या चित्ताला शांत करा. आपणच माझे हितकर्ते मायबाप आहात. (गर्भित अर्थ असा आहे कीं हे प्रभो अंतर्बाह्य आपणच आहात हे जरी खरे असले तरी मी स्वतःला आपल्यापेक्षा वेगळा समजत असल्यामुळे माझ्या चित्तात जे वासनामय वादळ उठले आहे व सारखे उठत आहे ते आपणच शमवू शकता! आपणच माझी आई आहात व पिताही आपणच आहात. माता-पित्याला जशी पुत्राची काळजी असते व ते त्याचे हित पाहतात तसेच आपणही माझे हित पाहावे कारण आपणच माझे हितकर्ता आहात.)

हे प्रभो आपणच माझे आप्त, आपणच माझे स्वजन, आपणच माझे भाऊ असे सर्व आपणच आहात त्यामुळे आपणच मला तारणारे आहात. भय निर्माण करणारेही आपणच आहात आणि भय नाहीसे करणारेही आपणच आहात. शिक्षा करणारेही आपणच आहात व क्षमा करणारेही आपणच आहात.

त्यामुळे आपल्या खेरीज दुसरे कोण तारणार? दुःखीताला(त्रिविध तापाने आम्ही दुःखी आहोत) आश्रय देणारे आपणच आहात त्यामुळे हे प्रभो, हे गुरुदत्ता आपणच शांत व्हा आणि माझ्या चित्ताला शांती प्राप्त होईल असे पहा.

आमच्या सदोष आचरणामुळे अनेक अपराध घडत असतात आणि तसे घडू नयेत म्हणून तर आपण दंड धारण करून आम्हालाही योग्य ती शिक्षा करताच आहात. पण हे प्रभो आम्ही आपल्या चरणी मस्तक नमवून त्यासाठीच आपली प्रार्थना करीत असतो.  

आणि तरी जर आपण आम्हाला शिक्षा करणार असाल तर मग आम्ही कोणाचा बरे धावा करावा? हे प्रभो आपल्या शिवाय आम्हाला दुसरा कोणी तरी सोडवणारा आहे कां? त्यामुळे आपणच आम्हाला तारणारे आहात तेंव्हा कृपया शांत व्हा आणि आमच्या चित्ताला शांत करा.

खरे तर तूं कधीच रागावत नसल्यामुळे आम्हावर तूं रागावल्याचा अभिनय करीत असतोस असेच मला वाटते. आमच्या सारख्या पापी लोकांना शिक्षा केल्यावरही आमच्याकडून पुन्हा पुन्हा चुका होत राहतात पण कृपया आपण आमच्यावर राग धरु नये.

कारण कार्य करणाऱ्याकडून चूक होऊ शकते असे गृहीत धरून आपण आमच्या सारख्या कर्मप्रवृत्त लोकांवर कृपा करावी.

आपणास माझी प्रार्थना आहे प्रभो कीं आपण शांत व्हा व आमचे चित्त आपल्या चरणस्मरणापासून विचलित होऊ देऊ नका.   हे प्रभो आपल्या चरणी शरण आलेल्यांची पाउले जर चुकीच्या मार्गावर जाऊ लागली तर त्याला सांभाळून योग्य मार्गावर आपल्या शिवाय कोण बरे आणू शकणार?

हे प्रभो भक्तवत्सल व पतितपावन करणारे  हे आपले बिरुदच आहे आणि ते आपण ध्यानात ठेवून आमच्यावर सदैव कृपा करावी ही नम्र प्रार्थना आहे. तेंव्हा कृपया शांत व्हा आणि आमच्या चित्ताला शांत करा.

हे प्रभो, सर्व परिवारासह व कुटुंबासह आम्ही आपले दास आहोत व घरादारासह हा असार असलेला संसार स्वहितासाठी आपल्या चरणी अर्पण केला आहे.

हे सर्व जाणून हे करुणासागरा, दीनानाथा, वासुदेवाने प्रार्थना केलेल्या गुरुदत्ता, आम्हाला पापांची थोडीसुद्धा बाधा होऊ देऊ नकोस. तेंव्हा कृपया शांत व्हा आणि आमच्या चित्ताला शांत करा.

२. श्रीगुरुदत्ता जय भगवंता

[संपादन]

श्रीगुरुदत्ता जय भगवंता। ते मन निष्ठुर न करी आता।।ध्रु।।

चोरे द्विजासी मारीता मन जे। कळवळले ते कळवळो आता।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता.....।।१।।

पोटशूळाने द्विज तडफडता। कळवळले ते कळवळो आता।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता.....।।२।।

द्विजसुत मरता वळले ते मन हो की उदासीन न वळे आता।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता.....।।३।।

सतिपति मरता काकुळती येता। वळले ते मन न वळे की आता।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता.....।।४।।

श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता।।
श्रीगुरुदत्ता जय भगवंता.....।।५।।

भावार्थ:

हे श्रीगुरुदत्ता, हे भगवंता, आपला जयजयकार असो, हे दयाळू प्रभो आपले ते मन आता असे निष्ठुर करू नका.

(गुरुचरित्रात१० व्या अध्यायात उल्लेख असलेल्या वल्लभेश नामक) ब्राह्मणाला जेंव्हा चोरांनी मारले त्यावेळी आपले मन जसे कळवळले तसे ते आताही कळवळू द्या!

(गुरुचरित्रातल्या १३ व्या अध्यायात उल्लेख असलेल्या उदर व्यथेचा) ब्राह्मण उदरव्यथेने तडफडत (प्राणत्याग करत) असलेला पाहून त्यावेळी आपले मन जसे कळवळले तसे ते आताही कळवळू द्या!

(गुरुचरित्रातल्या २० व्या अध्यायात उल्लेख असलेल्या गंगाधर नामक) द्विजाचा म्हणजे ब्राह्मणाचा पुत्र मरण पावल्यावर जे मन वळले (म्हणजे कृपा करते झाले) ते मन आता कां बरे उदासीन झाले आहे? कां वळत नाही? तेंव्हा हे गुरुदत्ता हे भगवंता त्यावेळी जसे कळवळले तसे ते आताही कळवळू द्या!

(गुरुचरित्रातल्या ३०, ३१व ३२ यात जी कथा आहे त्यात माहूरच्या दत्तात्रेय नामक द्विजाचा अंत झाला त्याची पत्नी शोकाकुल झाली त्यावेळचे हे वर्णन आहे) त्या सतीचा पती मृत झाल्यावर ती सती काकुळतिला येताच आपले मन वळले (म्हणजे तिच्या पतीला जीवित केले) ते मन आता कां बरे वळत नाही? तेंव्हा हे गुरुदत्ता हे भगवंता त्यावेळी जसे कळवळले तसे ते आताही कळवळू द्या!

तरी हे करुणाघन श्रीगुरुदत्ता कृपा करा आणि ही निष्ठुरता सोडून द्या व आपले कोमल मन आता आमच्यावर कृपा करू दे! हे श्रीगुरुदत्ता, हे भगवंता, आपला जयजयकार असो, हे दयाळू प्रभो आपले ते मन आता असे निष्ठुर करू नका.

३. जय करुणाघन निजजनजीवन

[संपादन]

जय करुणाघन निजजनजीवन।
अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन।।ध्रु।।

निज-अपराधे उफराटी दृष्टी।
होऊनि पोटी भय धरू पावन।।१।। जय करुणाघन .....।।

तू करुणाकर कधी आम्हांवर।
रुसशी (रुससी) न किंकर-वरद-कृपाघन।।२।। जय करुणाघन .....।।

वारी अपराध तू मायबाप।
तव मनी कोप लेश न वामन।।३।। जय करुणाघन .....।।

बालकापराधा गणे (गणीं) जरी माता।
तरी कोण त्राता देईल जीवन।।४।। जय करुणाघन .....।।

प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव।
पदी देवो ठाव देव अत्रिनन्‍दन।।५।। जय करुणाघन .....।।

भावार्थ: हे दयाळू अनसूया नंदना (म्हणजे अनसूयेच्या पुत्रा, श्रीगुरुदत्ता) तूंच आमचे जीवन आहेस त्यामुळे आमच्याकडे दायाद्र दृष्टीने पहा.

आमच्याच चुकी मुळे आम्ही हा संसार सत्य मानून त्यात रमलो आहोत वास्तविक हा स्वप्नवत असूनही खरा मानतो अशी आमची दृष्टी उलटी झाली आहे. ह्या संसार भयापासून आम्हाला सोडव.

हे भगवन् तूं करुणेचा सागर आहेस व आमच्यावर कधीही रागावत नाहीस त्यामुळे हे वर देणाऱ्या श्रेष्ठ भगवंता आम्हा दासांवर  कृपा कर.

आमचे सगळे अपराध पोटात घाल कारण तूच आमचा त्राता माय बाप आहेस तुझ्या मनात किंचितही राग असतच नाही.

आईच जर बालकाचे अपराध मोजायला लागली तर त्याला कोण तारू शकेल सांग बरे!

त्यामुळे हे भगवंता, वासुदेव आपल्या चरणी विनीत होऊन भक्तिभावाने आपली प्रार्थना करीत आहे कीं आपल्या चरणी मला जागा द्या.  

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत