साहित्यिक:टेंबे स्वामी
Appearance
थोडक्यात परिचय:
- १८५४ - माणगांव जन्म, आनंद नाम संवत्सर, श्रावण कृ।।५, रविवार
- १८६२ - माणगांव व्रतबंध, अध्ययन
- १८७५ - माणगांव विवाह, स्मार्ताग्नि-उपासना, गायत्री पुश्चरण, वय २१ वर्षे ज्योतिष अभ्यास
- १८७७ - माणगांव पितृछत्र मिटले. (वे.मू.गणेशभटजींचा मृत्यू).वय २३ वर्षे
- १८८३ - श्रीदत्तमंदिराची निर्मिती व वैशाख शु।। ५ ला मूर्तीची स्थापना. वय २९ वर्षे
- १८८९ - माणगांवचा सहकुटुंब त्याग व वाडीस आगमन. वय ३५ वर्षे कोल्हापूर-भिलवडी-औदुंबर-पंढरपूर-बार्शी मार्गे-
- १८९१ - गंगाखेड वै. व।। १४ पत्नीचा मृत्यू व १४व्या दिवशी वय ३५ वर्षे संन्यासग्रहण (ज्यै. शु।। १३). वाशीम-उमरखेड-माहूर-खांडवा-बढवाई-मंडलेश्वर-बलवाडा मार्गे उज्जैनी. प. प. श्रीनारायणानंदसरस्वतींकडून दंडग्रहण व पहिला चातुर्मास. महत्पूर-सारंगपूर-बजरंगगड-पिछौरा-खरेरा-जालवण वय ३८ वर्षे
- १८९२ - ब्रह्मावर्त आठ महिने मुक्काम, दुसरा चातुर्मास, श्रीदत्तपुराणाची वय ३८ वर्षे रचना, गोकुळ, वृंदावन, मथुरा मार्गे.
- १८९३ - हरिद्वार येथें चातुर्मासापूर्वी आगमन, शारदापीठाधीश्वर श्रीशंकराचार्य श्रीराजराजेश्वरस्वामी यांच्या सहवासात चातुर्मास.
- १८९४-९५ - हिमालय बदरीनारायणाची यात्रा व नरनारायणाचे दर्शन. दोन वर्षांपेक्षा अधिक अज्ञातवास. हरिद्वारला परतून
- १८९६ - जालवण येथे सहावा चातपर्मास करून ब्रह्मावर्त-महत्पूर-ब्रह्माणी मार्गे नेमावरला नर्मदास्नान व नर्मदेचे दर्शन. $कारेश्वर-मंडलेश्वर-महेश्वरमार्गे.
- १८९७ - पेटलाद येथे सातवा चातुर्मास. श्रीदत्तलीलामृताब्धिसार या ग्रंथाची रचना. तेथून चिखलदा येथे दीपावली (श्रीदत्तप्रभूंचा अभ्यंगस्नानाचा हट्ट) करून तिलकवाड्यास.
- १८९८ - चिखलदा येथें चातुर्मासापूर्वी दोन महिने आगमन. प्लेगची साथ. रेवाखंजावर पुराण व तेलुगु लिपीतील कूर्मपुराणाचे देवनागरीत लिप्यंतर. चातुर्मास-समाप्तीनंतर मणिनागेश्वर-कुंभेश्वर-गंगानाथमहादेव-कर्णाळी-चांदोद-व्यास-शुकमुनि करून बरकाळच्या अत्रि-आश्रमांत आगमन, अनसूयास्तोत्र. येथे आठवा चातुर्मास. श्री. रामचंद्रशास्त्री प्रकाशकर व श्री. गांडाबुवा यांच्या भेटी. गिरनार-प्रभासपट्टण-सोरटी सोमनाथ-प्राचीक्षेत्र-पोरबंदर करून.
- १८९९ - श्रीक्षेत्र द्वारका येथे नववा चातुर्मास. ग्रंथ जवळ नसता प्रभासक्षेत्री आरंभ केलेली द्विसाहस्रीवरील टीका येथे पूर्ण. चूर्णिकाही झाली. समाप्तीनंतर, राजकोट-बढवाण-विरमगाव मार्गे सिद्धपूर (मातृगया) हाटकेश्वर मंदिरात दत्तजयंती. डाकोरमार्गे शिनोर. जागलावर कृपा. ज्येष्ठाच्या आरंभी
- १९०० - चिखलदा येथे येऊन दहावा चातुर्मास. माघमाहात्म्य या ग्रंथाची रचना. समाप्तीनंतर मंडलेश्वर. येथे श्री. गणेशपंत सातावळेकर व श्री. सखारामशास्त्री टिल्लू यांना मार्गदर्शन. तेथून इंदोर येथे १८ दिवस गायत्रीभाष्य सांगून उज्जैनीस श्रीगुरुस्वामींची शुश्रूषा करून वैशाखात...
- १९०१ - महत्पूर येथे आगमन. तेथेच अकराव चातुर्मास. सहा महिने मुक्काम. श्रीदत्तमाहात्म्य व त्रिशति गुरुचरित्र या ग्रंथांची रचना. डॉ. विश्वनाथराव ताटके यांचा हाड्या व्रण (कर्करोग) बरा केला. श्रीगांडाबुवांचे जिह्वाच्छेदन डॉ. ताटके यांच्याकरवी करून त्यांची खेचरी सिद्ध. तेथून सारंगपूरमार्गे भेलसा येथे श्री. गोविंद पंडित यांना योगाचे शिक्षण. तेथून जालवणमार्गे चैत्रांत
- १९०२ - १९०४ - ब्रह्मावर्त येथे तिसऱ्यांदा आगमन. तेथे पूर्वाश्रमींचे बंधू श्री. सीतारामपंत यांची भेट. बंधूंना गायत्रीपुरश्चरणास बसविले. त्यासाठी तेथे २।। वर्षे मुक्काम. प्लेगची बाधा. गुरुचरित्राचे संस्कृत भाषांतर, समश्लोकी गुरुचरित्र व लघुवासुदेव-मननसार या ग्रंथांची रचना. काशीच्या श्रीशांतारामस्वामींचे आगमन. सप्तशतिगुरुचरित्रसार. चौदाव्या चातुर्मासात मौन. समाप्तीनंतर यमुनातीराने काल्पी-जालवण-पिछोरामार्गे वेत्रवतीच्या तीरावर भेलसा येथे श्रीदीक्षितस्वामींची भेट. तेथून हुशंगाबादवरून फाल्गुन शु।।२ शनिवारी सकाळी १० वाजता
- १९०५ - श्रीक्षेत्रनृसिंहवाडी येथे आगमन. वाडीत ४८ दिवस मुक्काम. श्रीदीक्षितस्वामी (श्रीनृसिंहसरस्वती) महाराजांना दंड दिला. वाडीत वेदपाठशाळेची स्थापना, श्रीधुंडिराज कवीश्वर अध्यापक. चैत्र व।। ३० ला श्रीनारायणस्वामींची पुण्यतिथी झाल्यावर वाडीकरांचा निरोप घेऊन व शिरोळ व मिरज कृष्णाघाट येथे प्रत्येकी ३ दिवसांचा मुक्काम करून पंढरपूर-कमळापूर-अक्कलकोट मार्गे गाणगापूरला जाताना श्रीकृष्णामाईंचे साक्षात् दर्शन व श्रीकृष्णालहरी स्तोत्राची (५१ श्लोक) उत्स्फूर्त रचना. गाणगापूरी पापविनाशीतीर्थावर ३ दिवस मुक्काम व दृष्टांताप्रमाणे संगमावर गमन व श्रीदत्तप्रभूंचे साक्षात् दर्शन. तुकाराम नामक दत्तभक्तास दर्शन व त्याच्यासाठी श्रीगुरुस्तुति या स्तोत्राची रचना. तीन दिवसांच्या मुक्कामानंतर हुमणाबादमार्गे गंगाखेड येथे दशहरा. परळी वैजनाथ-माहूर-औंढ्या नागनाथ-येवले-हिंगोली-पांगरी मार्गे नरसी गावी कयाधू नदीच्या काठी पंधरावा चातुर्मास. दत्तचंपू या ग्रंथाची रचना. वाडीच्या पुजाऱ्यांवरील देवांचा रोष शमविण्यासाठीकरुणात्रिपदी. गोटेगाव-वाशीम मार्गे श्रीक्षेत्र कारंजे येथे मारुतीच्या देवळात मुक्काम. पुढे अमरावतीस जगदंबेचे दर्शन करून मूळ तापीस संग्रहणीचा त्रास वाढल्याने महिनाभर दत्तमंदिरात मुक्काम. दिवाळीनंतर चित्रकूटवरून पयस्विनी-मंदाकिनी संगमावर स्नान करून मार्गशीर्षांत हुशंगाबादमार्गे भेलसा येथे दत्तजयंती. तेथून वेत्रवतीकाठी बासोदा-मुगावली-जालवण मार्गे ब्रह्मावर्त. तेथून फाल्गुन अखेर निघून प्रयाग मार्गे काशीच्या तारकमठांत ३ दिवस मुक्काम. तिथे वाडीला जाण्याचा देवांच्या आज्ञेने एकदम अदृश्य होऊन प्रयागला प्रकट. तेथून ब्रह्मावर्त-जालवण-सिप्री-गुणाछावणी-सारंगपूर-इंदोर-बलवाडा येथे इंदोरचे सखारामशास्त्री यांच्याकडून तीन चुली मांडून भिक्षा. तेथून $कारेश्वरमार्गे इंदोर संस्थानांत नर्मदाकिनारी.
- १९०६ - बढवाई येथे खेडेघाटी धर्मशाळेत सोळावा चातुर्मास. श्रीगांडामहाराज-श्रीसीताराममहाराजप्रमुख भारतभरातून भक्तजनांची गर्दी. योग, वेदांत आदींचे शिक्षण. सत्तू-ताक-फळे एवढाच आहार. भक्तांना मात्र रोज पक्वान्ने. मोठमोठ्या पंक्ती. समाप्तीनंतर फुलामाळांनी व धूप-दीपांदींनी सजविलेल्या नौकातून परतीरावर. सनावदहून पुढे जंगलातून एकट्याने एक महिन्याचा प्रवास. महिन्यात फक्त तीनच वेळा भिक्षा (जेवण). बाकी जलाहार. पंढरपूरला आगमन. पंढरपूर ते वाडी (८०-९० मैल) एक दिवसांत (आश्विन व।। ६). वाडीला ब्रह्मानंदमठात दोन महिने मुक्काम. वाडीत गुरुद्वादशीचा उत्सव व कार्तिक पौर्णिमेचे वनभोजन. मार्गशीर्ष कृ।। ७ ला देवाच्या आज्ञेने अचानक वाडीहून कुरुंदवाडला प्रयाण व घाटावर मुक्काम. दुसऱ्या दिवशी कुरुंदवाड संस्थानाच्या राजेसाहेबांकडे (श्रीमंत(बाळासाहेब) भिक्षा व श्रीदत्तप्रभूंच्या फुलबागेत मुक्काम. तेथून तेरवाड-सदलगे-मलिकवाड-संकेश्वर-बेळगाव-शृंगारपूर-केंगेरी मार्गे गुर्लहोसूर येथे स्वामी कैलासाश्रम यांच्या आग्रहाने ८-२० दिवस मुक्काम. तेथून घटप्रभा, विश्वामित्री नद्यांच्या काठाने जात तुंगभद्रातीरी हंपी येथे श्रीविद्यारण्यस्वामींच्या मठात मुक्काम. पुढे ऋष्यमूक पर्वत-किष्किंधा करून शेषाचल पर्वतावर श्रीकार्तिकस्वामींचे दर्शन. द्व्यर्थी षडाननस्तोत्र व कुमारशिक्षा यांची रचना. तेथून बाहुदा, करतोया या नद्यांच्या तीरावरून भार्गवक्षेत्र, पुढे श्रीरंग-श्रीशैल्यमल्लिकार्जुन करून श्रीतिरुमलावर श्रीव्यंकटेशाचे स्पर्शपूर्वकदर्शन. पुढे कालहस्ती-शिवकांची-पक्षीतीर्थ करून चैत्री पौर्णिमेला पिनाकिनीच्या तीरावर क्षौर व स्नान. स्नानाच्या वेळी बुडी मारण्याइतकेही पाणी नसताना एकदम छातीएवढे पाणी आले. पुढे चिदंबरक्षेत्रावरून मायावरम् येथे आल्यावर स्वामींच्या मृत्युच्या अफवेने महाराजांना शोधत आलेल्या वाडीच्या मंडळींची भेट. त्यांचे समाधान करून त्यांना पाठवून तंजाव-श्वेतारण्य-कुंभकोणम्-मदुरामीनाक्षी करून
- १९०७ - तंजावरजवळ कावेरी (वेणू) तीरावर संध्यामठयेथे सतरावा चातुर्मास. गुरुचरितम् ची चूर्णिका येथे झाली. कृष्णालहरीवर संस्कृत टीका. समाप्तीनंतर, सत्यमंगल-जंबुकेश्वर-कोटीलिंग करून श्रीरंगम् येथे शृंगेरीपीठाच्या शंकराचार्यांचे दर्शन व त्यांच्याकडून गौरव. तेथून भवानी मार्गे करूर स्टेशनवरून नेलोर येथे श्रीसदाशिवब्रह्मेंद्रस्वामींच्या समाधीचे दर्शन व स्तोत्र. तंजावरला परत येऊन अवधूतराव यांच्याकडे दत्तजयंतीचा उत्सव करून अमरावती-चिदंबर-त्रिपूर-कालहस्ती मार्गाने श्रीशैल्याच्या पायथ्याशी. तेथून कृष्णातटाकाने कोटिलिंगाचे दर्शन करून कृष्णा जिल्ह्यांत, नंदीगड तालुक्यात कृष्णाकाठी.
- १९०८ - मुक्तीश्वरपूर म्हणजेच मुक्त्याला येथे अठरावा चातुर्मास. युवशिक्षा, वृद्धशिक्षा, स्त्रीशिक्षा या ग्रंथांची निर्मिती. चातुर्मासानंतर नागेश, हंसलादेवी, कृष्णासागर, पेडकल्लापल्ली या सप्तगोदावरीच्या स्थानास येऊन गोदावरीची स्तुती केली. तेथून गोदातीरी बेदवाडपल्ली येथे दत्तजयंती साजरी करून कोगूर-पालर-राजमहेंद्री मार्गे पीठापूर या श्रीपादवल्लभांच्या जन्मस्थानाची तेथील लोकांना माहिती करून देऊन तेथे श्रीपादुकांची स्थापना केली. नंतर कोकोनाडा (? काकिन्नाडा) मार्गे राजमहेंद्रीला परत. तेथे श्रीब्रह्मानंदसरस्वती यांनी स्वामींच्या हस्तेत्रिमुखीदत्ताची व पादुकांची स्थापना करविली. पुढे इच्छेश्वर-भीमेश्वर-मंथनकाळेश्वर-नागभीडतळोदी-नागपूर मार्गे वैनगंगा तीरावर भंडारा जिल्ह्यांत
- १९०९ - पवनी (पौराणिक पद्मावतीपुरी) येथे एकोणिसावा चातुर्मास. प्रथम स्थानिक लोकांची ओळख नसल्याने उपेक्षा. मात्र परगावच्या भक्तांची वर्दळ सुरू झाल्यावर सर्व भक्त झाले. नित्य हजार-दीड हजारांच्या पक्वांन्नांच्या पंक्ती होत. यज्ञयागादिक कार्ये, पुराण, प्रवचन, श्रीस्वामींच्या महापूजा असे कार्यक्रम थाटाने होत व द्रव्यही खूप जमे. त्याचा (देवाचा खजिना) विनियोग विद्वानांची संभावना, ब्राह्मणांना दक्षिणा, सुवासिनींना लुगडे-चोळी इ. होई. याच चातुर्मासात वडीलबंधूश्री. शंकरराव, माता उमाबाई व भगिनी गोदावरी यांच्यासह आलेल्या श्री. वामनराव गुळवणी यांना अनुग्रह झाला. हेच पुण्याचे सुप्रसिद्ध योगीराज श्रीगुळवणीमहाराज होत. हा चातुर्मास झाल्यावर महाराज बोरी-उनकेश्वर मार्गे माहूरगडावर दर्शन करून फुलसुंगी-हिंगोली मार्गे आजेगांवला श्री. शंकरराव आजेगांवकर यांच्या केशवराजाच्या मंदिरात मुक्काम. शंकररावांचा क्षयरोग बरा केला. तेथून रेणापुरास येऊन दत्तजयंती केली, बार्शीस अंबरीषवरदाचे दर्शन घेतले. मकरसंक्रांतीला पंढरपूर करून वाडीला पौष १३ ला वाडीस आगमन. वै।। १२ पर्यंत मुक्काम. शृंगेरीस चलावे अशी आज्ञा होतांच एकसंबे-टाकळी-बेळगांव मार्गे मलप्रभाकाठाने गुर्लहोसूर येथे श्रीकैवल्याश्रमस्वामींच्या आग्रहाने दशाहारापर्यंत मुक्काम. पुढे धारवाडहून श्रीगांडाबुवांना गायत्रीपुरश्चरणास पाठविले. येथे श्री धुंडिराज कवीश्वर यांची स्वहस्ताची भिक्षा घेतली. तेथून तुंगभद्रा तीरावर
- १९१० - हावनूर या हावेरी स्टेशनजवळच्या गावात त्रिपुरांतकेश्वराच्या देवळांत विसावा चातुर्मास. श्रीवामनराव गुळवणी यांना १०-१२ दिवस सहवास वव्याघ्रांबरधारी श्रीदत्तात्रेयांचे दर्शन. तुलागताचे स्नान करून कुपेलूर-शिमोगा मार्गे शृंगेरीस आचार्यपीठास वंदन करून हरिहर-नृसिंहवन करून बनवासी येथे १।। महिना मधुकेश्वराच्या मंदिरात मुक्काम. दत्तजयंती तेथेच केली. पुढे शिरसी-सिद्धेश्वर मार्गे गोकर्ण येथे अहिल्याबाईंच्या छात्रांत मुक्काम. १०-१२ दिवस मुक्काम व संक्रांत साजरी. तेथून कोटीतीर्थ-गुर्लहोसूर मार्गे गलगली येथे दोन महिने मुक्काम. तेथे बरीच धार्मिक अनुष्ठाने संपन्न व शैव-वैष्णव सामंजस्य. नंतर जैनापूर-मलप्रभा-कृष्णासंगम-कडलूर मार्गे रायचूरजवळ कृष्णानदीतील दुर्गम बेट
- १९११ - कुरुगड्डी अर्थात् कुरवपूर या श्रीपादश्रीवल्लभांच्या स्थानांत येऊन एकविसावा चातुर्मास. पुढे समाप्तीला पैलतीरावर जाऊन येऊन गुरुद्वादशीपर्यंत तेथेच राहिले. अशा दुर्गम स्थानीही पावसाळा असूनसुद्धा भक्तजनांची खूप गर्दी. पुढे कृष्णाकाठाने प्रवास करीत तुळजापूरला जगदंबेचे दर्शन करून वांजरातीरावर दत्तजयंती केली. तेथून गोदावरी संगम-परळी वैजनाथ मार्गे राजूरला येऊन हंपी शंकराचार्य, श्रीदाजीमहाराज, हैद्राबादचे भटजीबापू यांच्या उपस्थितीत मोठा स्वाहाकार केला. तेथून औंढ्या नागनाथ-पिंपरी-उटी-जिंतूर-राक्षसभुवन-बामणी-पांचाळेश्वर-पाथरी-पैठण-हिंगोली-दौलताबाद-गोंड या भागांत २० स्वाहाकार, दोन चातुर्मास्य याग व दोन ठिकाणी श्रीदत्तपादुकांच्या स्थापना करून गोपेगावी आले. तेथे अप्पादेव व अण्णादेव यांना एका कडुनिंबाखाली अरणे सांगितली. तो निंब गोड झाला. तेथून वेरूळजवळ घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन कन्नड, चाळीसगाव, धर्मपुरी मार्गे नर्मदाकाठी
- १९१२ - चिखलदा येथे बावीसावा चातुर्मास संपन्न झाला. ६-७ महिने मुक्काम झाला. तेथून कातरखेड्याच्या जंगलांतून प्रवास करीत असतां अश्वत्थाम्याने वाट दाखविली व ओळख दिली.
- १९१३ - गरुडेश्वर चैत्र व।। ६ शनिवारी महाराज या नर्मदाकिनारीच्या स्थानी आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. तेवीसावा चातुर्मास तेथेच झाला. भक्तजनांची खूप गर्दी होऊन स्थानाचे माहात्म्य वाढले. नित्यश्रीर्नित्यमंगलम् असा मोठा उत्सवच तेथे सुरू झाला. वैशाखापासून प्रकृती बिघडली. पूर्वाश्रमांत कुणीतरी मागे लावलेला व आयुष्यभर शक्य असूनही प्रतिकार न करता सहन केलेला अतिसार बळावला. कोणतेही औषध व चिकित्सा आयुष्यभरांत धेतले नव्हते. तसेच आतांही घेतले नाही. भक्तांच्या आग्रहाला त्यांचे उत्तर की, या देहाला दोन वेळा सर्पदंश, तीन वेळां महामारी, एक वेळ सन्निपात, एक वेळ प्लेग, दोन वेळां महाव्याधि, दोन वेळा कोड, इतके रोग उत्पन्न झाले. संग्रहणी तर कायमचीच आहे. त्यावेळी कोणी औषध दिले जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो याही वेळी आहेच. त्याची इच्छा असेल तसे होईल
आषाढ शु।। १ प्रतिपदा मंगळवार, आर्द्रा नक्षत्र, उत्तरायण लागतांच सिद्धासन घालून देवाकडे मुख करून त्राटक केले. श्वासनिरोध करून दीर्घ प्रणवोच्चार करीत देहाचे विसर्जन केले.