कणा

विकिस्रोत कडून


"ओळखलंत का सर मला?" पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून,
गंगामाई आली पाहुणी, गेली घरट्यात राहून,
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.