Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय पहिला

विकिस्रोत कडून

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ ॥श्रीः॥ ॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥

ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभवभावना । न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्गुरुराया ॥१॥ नमन श्रीएकदंता। एकपणें तूंचि आतां । एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥२॥ तुजमाजीं वासु चराचरा । म्हणौनि बोलिजे लंबोदरा । यालागीं सकळांचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥३॥ तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारु । यालागीं ’विघ्नहरु’ । नामादरु तुज साजे ॥४॥ हरुष तें वदन गणराजा । चारही पुरुषार्थ त्याची चारही भुजा । प्रकाशिया प्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजदंतु ॥५॥ पूर्वउत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानीं । निःशब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि उभिया ॥६॥ एकेचि काळीं सकळ सृष्टी । आपुलेपणें देखत उठी । तेचि तुझी देखणी दृष्टी । सुखसंतुष्टी विनायका ॥७॥ सुखाचें पेललें दोंद । नामीं आवर्तला आनंद । बोधाचा मिरवे नागबंद । दिसे सन्निध साजिरा ॥८॥ शुद्ध सत्त्वाचा शुक्लांबर । कासे कसिला मनोहर । सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभती ॥९॥ प्रकृतिपुरुष चरण दोनी । तळीं घालिसी वोजावुनी । तयांवरी सहजासनीं । पूर्णपणीं मिरवसी ॥१०॥ तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी । तोडिसी संसारफांसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥११॥ भावें भक्त जो आवडे । त्याचें उगविसी भवसांकडें । वोढूनि काढिसी आपणाकडे । निजनिवाडें अंकुशें ॥१२॥ साच निरपेक्ष जो निःशेख । त्याचें तूंचि वाढविसी सुख । देऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥१३॥ सूक्ष्माहूनि सूक्ष्म सान । त्यामाजीं तुझें अधिष्ठान । यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साचे ॥१४॥ पाहता नरु ना कुंजरु । व्यक्ताव्यक्तासी परु । ऐसा जाणोनि निर्विकारु । नमनादरु ग्रंथार्थी ॥१५॥ ऐशिया जी गणनाथा । मीपणें कैंचा नमिता । अकर्ताचि जाहला कर्ता । ग्रंथकथाविस्तारा ॥१६॥ आतां नमूं सरस्वती । जे सारासारविवेकमूर्ती । चेतनारुपें इंद्रियवृत्ती । जे चाळिती सर्वदा ॥१७॥ जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक । जे प्रकाशा प्रकाशक । स्वयें देख स्वप्रभ ॥१८॥ ते शिवांगीं शक्ति उठी । जैसी डोळ्यांमाजीं दिठी । किंवा सुरसत्वें दावी पुष्टी । फळपणें पोटीं फळाच्या ॥१९॥ जैसा साखरेअंगीं स्वादु । कीं सुमनामाजीं मकरंदु । तैसा शिवशक्तिसंबंधु । अनादिसिद्धु अतर्क्य ॥२०॥ ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूं वाचांमाजीं वाडी । म्हणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थी चोखडी चवी दावी ॥२१॥ सारासार निवडिती जनीं । त्या हंसावरी हंसवाहिनी । बैसली सहजासनीं । अगम्यपणीं अगोचरु ॥२२॥ ते परमहंसीं आरुढ । तिसी विवेकहंस जाणती दृढ । जवळी असतां न देखती मूढ । अभाग्य दृढ अतिमंद ॥२३॥ तिचें निर्धारितां रुप । अरुपाचें विश्वरुप । ते आपुलेपणें अमूप । कथा अनुरुप बोलवी ॥२४॥ हा बोलु भला झाला । म्हणोनि बोलेंचि स्तविला । तैसा स्तुतिभावो उपजला । बोलीं बोला गौरवी ॥२५॥ ते वाग्विलास परमेश्वरी । सर्वांगदेखणी सुंदरी । राहोनि सबाह्यअभ्यंतरीं । ग्रंथार्थकुसरी वदवी स्वयें ॥२६॥ ते सदा संतुष्ट सहज । म्हणोनि निरुपणा चढलें भोज । परी वक्तेपणाचा फुंज । मीपणें मज येवोंच नेदी ॥२७॥ वाग्देवतेची स्तुती । वाचाचि जाहली वदती । तेथें द्वैताचिये संपत्ती । उमस चित्तीं उमसेना ॥२८॥ तिणें बोल बोलणें मोडिलें । समूळ मौनातें तोडिलें । त्यावरि निरुपण घडिलें । न बोलणें बोलें बोलवी ॥२९॥ तिसी सेवकपणें दुसरा । होऊनि निघे नमस्कारा । तंव मीपणेंसीं परा । निजनिर्धारा पारुषे ॥३०॥ जेथें मीपणाचा अभावो । तेथें तूंपणा कैंचा ठावो । याहीवरी करी निर्वाहो । अगम्य भावो निरुपणीं ॥३१॥ जैशा सागरावरी सागरीं । चालती लहरींचिया लहरी । तैसे शब्द स्वरुपाकारीं । स्वरुपावरी शोभती ॥३२॥ जैशा साखरेचिया कणिका । गोडिये भिन्न नव्हती देखा । तैसें निरुपण ये रसाळसुखा । ब्रह्मरसें देखा रसवृत्ति ॥३३॥ तेथें मीपणेंशीं सरस्वती । बैसविलें एका ताटें रसवृत्ती । तेणें अभिन्नशेष देऊनि तृप्ती । ते हे उद्गार येती कथेचे ॥३४॥ आतां वंदूं ते सज्जन । जे कां आनंदचिद्धन । वर्षताती स्वानंदजीवन । संतप्त जन निववावया ॥३५॥ ते चैतन्याचे अळंकार । कीं ब्रह्मविद्येचे श्रृंगार । कीं ईश्वराचें मनोहर । निजमंदिर निवासा ॥३६॥ ते अधिष्ठाना अधिवासु । कीं सुखासही सोल्हासु । विश्रांतीसी विश्वासु । निजरहिवासु करावया ॥३७॥ कीं ते भूतदयार्णव । कीं माहेरा आली कणव । ना ते निर्गुणाचे अवेव । निजगौरव स्वानंदा ॥३८॥ ना ते डोळ्यांतील दृष्टी । कीं तिचीही देखणी पुष्टी । कीं संतुष्टीसी तुष्टी । चरणांगुष्ठीं जयांचे ॥३९॥ ते पाहती जयांकडे । त्यांचें उगवे भवसांकडें । परब्रह्म डोळियांपुढें । निजनिवाडें उल्हासे ॥४०॥ तेथें साधनचतुष्टयसायास । न पाहती शास्त्रचातुर्यविलास । एक धरिला पुरे विश्वास । स्वयें प्रकाश ते करिती ॥४१॥ ते जगामाजीं सदा असती । जीवमात्रातें दिसती । परी विकल्पेंचि ठकिजती । नाहीं म्हणती नास्तिक्यें ॥४२॥ मातियेचा द्रोण केला । तो कौळिका भावो फळला । म्हणौनि विश्वासेंवीण नाडला । जगु ठकला विकल्पें ॥४३॥ एकाएकीं विश्वासतां । तरी वाणी नाहीं निजसत्ता । त्यांचे चरणीं भावार्थता । ठेवितां माथा विश्वासें ॥४४॥ ते नमस्कारितां आवश्यक । करुन ठाकती एक । परि एकपणें सेवक । त्यांचाचि देख स्वयें होआवें ॥४५॥ त्यांचिया सेवेचिये गोडी । ब्रह्मसुखाची उपमा थोडी । जे भजती अनन्य आवडीं । ते जाणती गाढी निजचवी ॥४६॥ ते प्रकृतीसी पर । प्रकृतिरुपीं ते अविकार । आकार-विकार-व्यवहार । त्यांचेनि साचार बाधीना ॥४७॥ ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती । आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ॥४८॥ ते ज्ञातेपणा न मिरविती । पिसेपण न दाविती । स्वरुपफुंजुविस्मृती । गिळूनि वर्तती निजांगें ॥४९॥ प्रेमा अंगींचि जिराला । विस्मयो येवोंचि विसरला । प्रपंचपरमार्थु एकु जाहला । हाही ठेला विभागु ॥५०॥ स्मरण विस्मरणेंशीं गेलें । देह देहींच हारपलें । आंतुबाहेरपण गेलें । गेलें ठेलें स्मरेना ॥५१॥ स्वप्नजागृती जागतां गेली । सुपुष्ति साक्षित्वेंसीं बुडाली । उन्मनीही वेडावली । तुर्या ठेली तटस्थ ॥५२॥ दृश्य द्रष्टेनशीं गेलें । दर्शन एकलेपणें निमालें । तें निमणेंपणही विरालें । विरवितें नेलें विरणेनिशीं ॥५३॥ ज्ञान अज्ञानातें घेऊनि गेलें । तंव ज्ञातेपणही बुडालें । विज्ञान अंगीं घडलें । परी नवें जडलें हें न मनी ॥५४॥ यापरी जे निजसज्जन । तिहीं व्हावें सावधान । द्यावें मज अवधान । हें विज्ञापन बाळत्वें ॥५५॥ सूर्य सदा प्रकाशघन । अग्नि सदा देदीप्यमान । तैसे संत सदा सावधान । द्यावें अवधान हें बालत्व माझें ॥५६॥ तंव संतसज्जनीं एक वेळां । थोर करुनियां सोहळा । आज्ञापिलें वेळोवेळां । ग्रंथ करविला प्राकृत ॥५७॥ एकांतीं आणि लोकांतीं । थोर साक्षेप केला संतीं । तरी सांगा जी मजप्रती । कोण ग्रंथीं प्रवर्तों ॥५८॥ पुराणीं श्रेष्ठ भागवत । त्याहीमाजी उद्धवगीत । तुवां प्रवर्तावें तेथ । वक्ता भगवंत तुज साह्य ॥५९॥ आम्हांसी पाहिजे ज्ञानकथा । वरी तुजसारिखा रसाळ वक्ता । तरी स्तुति सांडूनि आतां । निरुपण तत्त्वतां चालवीं ॥६०॥ तुज संतस्तवनीं उत्सावो । हा तंव कळला भावो । तरी कथेचा लवलाहो । निजनिर्वाहो उपपादीं ॥६१॥ या संतांचे कृपावचनें । एकाएकीं आनंदलों मनें । तेणें वाक्यपसायदानें । स्वानंदघनें उल्हासे ॥६२॥ जैसा मेघांचेनि गर्जनें । मयूर उपमों पाहे गगनें । नाना नवेनि जीवनें । जेवीं चातक मनें उल्हासे ॥६३॥ कां देखोनि चंद्रकर । डोलों लागे चकोर । तैसें संतवदनींचें उत्तर । आलें थोर सुखावित ॥६४॥ थोर सुखाचा केलों स्वामी । तुमचें पुरतें कराल तुम्ही । तरी वायांचि कां मीपणें मी । मनोधर्मी वळंगेजों ॥६५॥ परी समर्थांची आज्ञा । दासां न करवे अवज्ञा । तरी सांगितली जे संज्ञा । ते करीन आज्ञा स्वामींची ॥६६॥ परी तुम्हीं एक करावें । अखंड अवधान मज द्यावें । तेणें दिठिवेनि आघवें । पावेल स्वभावें निजसिद्धी ॥६७॥ अगा तुझिया मनामाजीं मन । शब्दीं ठेविलेंसे अनुसंधान । यालागीं निजनिरुपण । चालवीं जाण सवेगें ॥६८॥ आतां वंदूं कुळदेवता । जे एकाएकी एकनाथा । ते एकीवांचून सर्वथा । आणिक कथा करुं नेदी ॥६९॥ एक रुप दाविलें मनीं । तंव एकचि दिसे जनीं वनीं । एकचि कानीं वदनीं । एकपणीं ’एकवीरा’ ॥७०॥ ते शिवशक्तिरुपें दोनी । नेऊन मिरवे एकपणीं । एकपणें जाली गुर्विणी । प्रसवे एकपणीं एकवीरा ॥७१॥ ते एकरुपें एकवीरा । प्रसवली बोध-फरशधरा । जयाचा कां दरारा । महावीरां अभिमानियां ॥७२॥ तेणें उपजोनि निवटिली माया । आज्ञा पाळूनि सुख दे पितया । म्हणोनि तो जाहला विजया । लवलाह्यां दिग्मंडळीं ॥७३॥ जो वासनासहस्त्रबाहो । छेदिला सहस्त्रार्जुन-अहंभावो । स्वराज्य करुनियां पहा हो । अर्पी स्वयमेवो स्वजातियां ॥७४॥ तेणें मारुनि माता जीवविली । तेचि कुळदेवता आम्हां जाहली । परी स्वनांवें ख्याति केली । एकात्मताबोली एकनाथा ॥७५॥ ते जैंपासोनि निवटिली । तैंपासोनि प्रकृति पालटली । रागत्यागें शांत झाली । निजामाउली जगदंबा ॥७६॥ तया वोसंगा घेऊन । थोर दिधलें आश्वासन । विषमसंकटीं समाधान । स्वनामस्मरण केलिया ॥७७॥ ते जय जय जगदंबा । ’उदो’ म्हणे ग्रंथारंभा । मतीमाजी स्वयंभा । योगगर्भा प्रगटली ॥७८॥ आतां वंदूं जनार्दनु । जो भवगजपंचाननु । जनीं विजनीं समानु । सदा संपूर्णु समत्वें ॥७९॥ ज्याचेनि कृपापांगें । देहीं न देखती देहांगें । संसार टवाळ वेगें । केलें वाउगें भवस्वप्न ॥८०॥ जयाचेनि कृपाकटाक्षें । अलक्ष्य लक्ष्येंवीण लक्षे । साक्षी विसरली साक्षें । निजपक्षें गुरुत्वें ॥८१॥ तेणें जीवेंवीण जीवविलें । मृत्यूवीण मरणचि मारिलें । दृष्टि घेऊनि दाखविलें । देखणें केलें सर्वांग ॥८२॥ देहीं देह विदेह केलें । शेखीं विदेहपण तेंही नेलें । नेलेपणही हारपलें । उरीं उरलें उर्वरित ॥८३॥ अभावो भावेंशीं गेला । संदेह निःसंदेहेंशीं निमाला । विस्मयो विस्मयीं बुडाला । वेडावला स्वानंदु ॥८४॥ तेथ आवडीं होय भक्तु । तंव देवोचि भक्तपणाआंतु । मग भज्यभजनांचा अंतु । दावी उप्रांतु स्वलीला ॥८५॥ नमन नमनेंशीं नेलें । नमितें नेणों काय जाहलें । नम्यचि अंगीं घडलें । घडलें मोडलें मोडूनि ॥८६॥ दृश्य द्रष्टा जाण । दोहींस एकचि मरण । दर्शनही जाहलें क्षीण । देखणेपण गिळूनि ॥८७॥ आतां देवोचि आघवा । तेथें भक्तु न ये भक्तभावा । तंव देवोही मुकला देवा । देवस्वभावा विसरोनि ॥८८॥ देवो देवपणें दाटला । भक्तु भक्तपणें आटला । दोहींचाही अंतु आला । अभेद जाहला अनंतु ॥८९॥ अत्यागु त्यागेंशीं विराला । अभोगु भोगेंशीं उडाला । अयोगु योगेंशीं बुडाला । योग्यतेचा गेला अहंभावो ॥९०॥ ऐशियाहीवरी अधिक सोसू । सायुज्यामाजीं होतसे दासू । तेथील सुखाचा सौरसु । अति अविनाशु अगोचरु ॥९१॥ शिवें शिवूचि यजिजे । हें ऐशिये अवस्थेसि साजे । एर्हंवीं बोलचि बोलिजे । परि न पविजे निजभजन ॥९२॥ ये अभिन्न सुखसेवेआंतु । नारद आनंदें नाचत गातु । शुकसनकादिक समस्तु । जाले निजभक्तु येणेंचि सुखें ॥९३॥ सागरीं भरे भरतें । तें भरतें भरे तरियांतें । तैसें देवेंचि देवपणें येथें । केलें मातें निजभक्त ॥९४॥ सागर सरिता जीवन एक । परी मिळणीं भजन दिसे अधिक । तैसें एकपणेंचि देख । भजनसुख उल्हासे ॥९५॥ वाम सव्य दोनी भाग । परी दों नामीं एकचि अंग । तैसा देवभक्तविभाग । देवपणीं साङग आभासे ॥९६॥ तेवीं आपुलेपणाचेनि मानें । भक्त केलों जनार्दनें । परी कायावाचामनें । वर्तविजे तेणें सर्वार्थीं ॥९७॥ तो मुखाचें जाला निजमुख । दृष्टीतें प्रकटे सन्मुख । तोचि विवेकेंकरुन देख । करवी लेख ग्रंथार्थी ॥९८॥ परी नवल त्याचें लाघव । अभंगीं घातलें माझें नांव । शेखीं नांवाचा निजभाव । उरावया ठाव नुरवीच ॥९९॥ या वचनार्था संतोषला । म्हणे भला रे भला भला । निजभाविकु तूंचि संचला । प्रगट केला गुह्यार्थु ॥१००॥ हे स्तुति कीं निरुपण । ग्रंथपीठ कीं ब्रह्मज्ञान । साहित्य कीं समाधान । संज्ञाही जाण कळेना ॥१॥ तुझा बोलुचि एकएकु । सोलींव विवेकाचा विवेकु । तो संतोषासी संतोखु । आत्यंतिकु उपजवी ॥२॥ तुझेनि मुखें जें जें निघे । तें संतहृदयीं साचचि लागे । मुमुक्षुसारंगांचीं पालिंगें । रुंजी निजांगें करितील ॥३॥ ग्रंथारंभु पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक । श्रवणमात्रेंचि देख । निजात्मसुख पावती ॥४॥ येणें वचनामृततुषारें । ग्रंथभूमिका विवेकांकुरें । अंकुरली एकसरें । फळभारें सफलित ॥५॥ कीं निर्जीवा जीवु आला । ना तरी सिद्धा सिद्धिलाभु जाला । कीं निजवैभवें आपुला । प्रियो मीनला पतिव्रते ॥६॥ तैसेनि हरुषानंदें । जी जी म्हणितलें स्वानंदें । तुमचेनि पादप्रसादें । करीन विनोदें ग्रंथार्थू ॥७॥ श्रीरामप्रतापदृष्टीं । शिळा तरती सागरापोटीं । कीं वसिष्ठवचनासाठीं । तपे शाटी रविमंडळीं ॥८॥ कीं याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता । शुष्ककाष्ठांस पल्लवता । कीं धर्में श्वानु सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ॥९॥ तैसे माझेनि नांवें । ग्रंथ होती सुहावे । आज्ञाप्रतापगौरवें । गुरुवैभवें सार्थकु ॥११०॥ घटित एका आणि एकादशें । राशि-नक्षत्र एकचि असे । त्या एकामाजीं जैं पूर्ण दिसे । तैं दशदशांशें चढे अधिक ॥११॥ मागां पुढां एक एक कीजे । त्या नांव एकादशु म्हणिजे । तरी एका एकपणचि सहजें । आलें निजवोजें ग्रंथार्थें ॥१२॥ तेथें देखणेंचि करुनि देखणें । अवघेंचि निर्धारुनि मनें । त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणें सार्थक ॥१३॥ पाहोनि दशमाचा प्रांतु । एकादशाच्या उदयाआंतु । एकादशावरी जगन्नाथु । ग्रंथार्थु आरंभी ॥१४॥ म्हणौनि एकादशाची टीका । एकादशीस करी एका । ते एकपणाचिया सुखा । फळेल देखा एकत्वें ॥१५॥ आतां वंदूं महाकवी । व्यास वाल्मीक भार्गवी । जयातें उशना कवी । पुराणगौरवीं बोलिजे ॥१६॥ तिहीं आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती । हेचि करीतसें विनंती । ग्रंथ समाप्तीं न्यावया ॥१७॥ वंदूं आचार्य शंकरु । जो ग्रंथार्थविवेकचतुरु । सारुनि कर्मठतेचा विचारु । प्रबोधदिनकरु प्रकाशिला ॥१८॥ आतां वंदूं श्रीधर । जो भागवतव्याख्याता सधर । जयाची टीका पाहतां अपार । अर्थ साचार पैं असे ॥१९॥ इतरही टीकाकार । काव्यकर्ते विवेकचतुर । त्यांचे चरणीं नमस्कार । ग्रंथा सादर तिहीं होआवें ॥१२०॥ वंदूं प्राकृत कवीश्वर । निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर । नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचें भाग्य थोर गुरुकृपा ॥२१॥ जयांचे ग्रंथ पाहतां । ज्ञान होय प्राकृतां । तयांचे चरणीं माथा । निजात्मता निजभावें ॥२२॥ संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृतीं काय उणीवी । नवीं जुनीं म्हणावीं । कैसेनि केवीं सुवर्णसुमनें ॥२३॥ कपिलेचें म्हणावें क्षीर । मा इतरांचें तें काय नीर । वर्णस्वादें एकचि मधुर । दिसे साचार सारिखें ॥२४॥ जें पाविजे संस्कृत अर्थें । तेंचि लाभे प्राकृतें । तरी न मनावया येथें । विषमचि तें कायी ॥२५॥ कां निरंजनीं बसला रावो । तरी तोचि सेवकां पावन ठावो । तेथें सेवेसि न वचतां पाहा हो । दंडी रावो निजभृत्यां ॥२६॥ कां दुबळी आणि समर्थ । दोहींस रायें घातले हात । तरी दोघींसिही तेथ । सहजें होत समसाम्य ॥२७॥ देशभाषावैभवें । प्रपंच पदार्थी पालटलीं नांवें । परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवें पालटु ॥२८॥ संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली । असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ॥२९॥ आतां संस्कृता किंवा प्राकृता । भाषा झाली जे हरिकथा । ते पावनचि तत्त्वता । सत्य सर्वथा मानली ॥१३०॥ वंदूं ’भानुदास’ आतां । जो कां पितामहाचा पिता । ज्याचेनि वंश भगवंता । झाला सर्वथा प्रियकर ॥३१॥ जेणें बाळपणीं आकळिला भानु । स्वयें जाहला चिद्भानु । जिंतोनि मानाभिमानु । भगवत्पावनु स्वयें झाला ॥३२॥ जयाची पदबंधप्राप्ति । पाहों आली श्रीविठ्ठलमूर्ति । कानीं कुंडलें जगज्ज्योति । करितां रातीं देखिला ॥३३॥ तया भानुदासाचा ’चक्रपाणि’ । तयाचाही सुत सुलक्षणी । तया ’सूर्य’ नाम ठेवूनी । निजीं निज होऊनि भानुदास ठेला ॥३४॥ तया सूर्यप्रभाप्रतापकिरणीं । मातें प्रसवली रुक्मिणी । म्हणौनि रखुमाई जननी । आम्हांलागूनि साचचि ॥३५॥ हे ग्रंथारंभकाळा । वंदिली पूर्वजमाळा । धन्य निजभाग्याची लीळा । आलों वैष्णवकुळा जन्मोनि ॥३६॥ ते वैष्णवकुळीं कुळनायक । नारद प्रल्हाद सनकादिक । उद्धव अक्रूर श्रीशुक । वसिष्ठादिक निजभक्त ॥३७॥ ते वैष्णव सकळ । ग्रंथार्थी अवधानशीळ । म्हणौनि वैष्णवकुळमाळ । वंदिली सकळ ग्रंथार्थी ॥३८॥ उपजलों ज्याचिया गोत्रा । नमन त्या विश्वामित्रा । जो कां प्रतिसृष्टीचा धात्रा । गायत्रीमंत्रा महत्त्व ॥३९॥ जो उपनिषद्विवेकी । तो वंदिला याज्ञवल्की । जो कविकर्तव्यातें पोखी । कृपापीयूखीं वर्षोनि ॥१४०॥ नमन भूतमात्रां अशेखां । तेणें विश्वंभरु जाहला सखा । म्हणौनि ग्रंथारंभु देखा । आला नेटका संमता ॥४१॥ आतां नमूं दत्तात्रेया । जो कां आचार्यांचा आचार्या । तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निजबोधु ॥४२॥ तो शब्दातें दावितु । अर्थु अर्थें प्रकाशितु । मग वक्तेपणाची मातु । स्वयें वदवितु यथार्थ ॥४३॥ तो म्हणे श्रीभागवत । तें भगवंताचें हृदत । त्यासीचि होय प्राप्त । ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं ॥४४॥ तें हें ज्ञान कल्पादी । ’चतुःश्लोक’ पदबंधीं । उपदेशिला सद्भुद्धी । निजात्मबोधीं विधाता ॥४५॥ नवल तयाचा सद्भावो । शब्दमात्रें झाला अनुभवो । बाप सद्गुरुकृपा पहा हो । केला निःसंदेहो परमेष्ठी ॥४६॥ तो चतुःश्लोकींचा बोधु । गुरुमार्गें आला शुद्धु । तेणें उपदेशिला नारदु । अतिप्रबुद्धु भावार्थी ॥४७॥ तेणें नारदु निवाला । अवघा अर्थमयचि झाला । पूर्ण परमानंदें धाला । नाचों लागला निजबोधें ॥४८॥ तो ब्रह्मवीणा वाहतु । ब्रह्मपदें गीतीं गातु । तेणें ब्रह्मानंदें नाचतु । विचरे डुल्लतु भूतळीं ॥४९॥ तो आला सरस्वतीतीरा । तंव देखिलें व्यासऋषीश्वरा । जो संशयाचिया पूरा । अतिदुर्धरामाजीं पडिला ॥१५०॥ वेदार्थ सकळ पुराण । व्यासें केलें निर्माण । परी तो न पवेचि आपण । निजसमाधान स्वहिताचें ॥५१॥ तो संशयसमुद्रांआंतु । पडोनि होता बुडतु । तेथें पावला ब्रह्मसुतु । ’नाभी’ म्हणतु कृपाळू ॥५२॥ तेणें एकांतीं नेऊनि देख । व्यासासि केलें एकमुख । मग दाविले चार्हीऊ श्लोक । भवमोचक निर्दुष्ट ॥५३॥ ते सूर्यास्तें न दाखवुनी । गगनातेंही चोरुनी । कानातें परते सारुनी । ठेला उपदेशुनी निजबोधु ॥५४॥ तें नारदाचें वचन । करीत संशयाचें दहन । तंव व्यासासि समाधान । स्वसुखें पूर्ण हों सरलें ॥५५॥ मग श्रीव्यासें आपण । भागवत दशलक्षण । शुकासि उपदेशिलें जाण । निजबोधें पूर्ण सार्थक ॥५६॥ तेणें शुकही सुखावला । परमानंदें निवाला । मग समाधिस्थ राहिला । निश्चळ ठेला निजशांती ॥५७॥ तेथें स्वभावेंचि जाणा । समाधि आली समाधाना । मग परीक्षितीचिया ब्रह्मज्ञाना । अवचटें जाणा तो आला ॥५८॥ पहावया परीक्षितीचा अधिकारु । तंव कलीसि केला तेणें मारु । तरी धर्माहूनि दिसे थोरु । अधिकारु पैं याचा ॥५९॥ कृष्णु असतां धर्म जियाला । पाठीं कलिभेणें तो पळाला । परी हा कलि निग्रहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्यें अधिक ॥१६०॥ अर्जुनवीर्यपरंपरा निर्व्यंग । सुभद्रा मातामहीचें गर्भलिंग । तो अधिकाररत्नं उपलिंग । ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला ॥६१॥ गर्भींच असतां ज्याच्या भेणें । स्पर्शूं न शके शस्त्र द्रौण्य । त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ ॥६२॥ जेणें रक्षिलें गर्भाप्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं । यालागीं नांवें परीक्षिती । अगाध स्थिति नांवाची ॥६३॥ तो अभिमन्यूचा परीक्षिती । उपजला पावन करीत क्षिती । ज्याचेनि भागवताची ख्याती । घातली त्रिजगतीं परमार्थपव्हे ॥६४॥ अंगीं वैराग्यविवेकु । ब्रह्मालागीं त्यक्तोदकु । तया देखोनि श्रीशुकु । आत्यंतिकु सुखावला ॥६५॥ बाप कोपु ब्राह्मणाचा । शापें अधिकारु ब्रह्मज्ञानाचा । तयांच्या चरणीं कायावाचा । निजभावाचा नमस्कारु ॥६६॥ ब्रह्माहूनि ब्राह्मण थोरु । हें मीच काय फार करुं । परी हृदयीं अद्यापि श्रीधरु । चरणालंकारु मिरवितु ॥६७॥ म्हणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु । यालागीं वेदरुपें नारायणु । उदरा येऊनु वाढला ॥६८॥ म्हणोनि ब्राह्मण भूदेव । हे ब्रह्मींचे निजावेव । येथें न भजती ते मंददैव । अति निदैंव अभाग्य ॥६९॥ ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिहीं आज्ञाधारकु केला देवो । प्रतिमाप्रतिष्ठेसि पहा हो प्रकटे आविर्भावो मंत्रमायें ॥१७०॥ तंव संत म्हणती काय पहावें । जें स्तवनीं रचिसी भावें । तेथें प्रमेय काढिसी नित्य नवें । साहित्यलाघवें साचार ॥७१॥ गणेशु आणि सरस्वती । बैसविलीं ब्रह्मपंक्ती । तैशीच संतस्तवनीं स्तुती । ऐक्यवृत्ती वदलासी ॥७२॥ पाठीं कुल आणि कुलदैवता । स्तवनीं वदलासि जे कथा । ते ऐकतांचि चित्त चिंता । विसरे सर्वथा श्रवणेंचि ॥७३॥ जो सद्भावो संतचरणीं । तोचि भावो ब्राह्मणीं । सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी पैं तुझी ॥७४॥ तरी तुझेनि मुखें श्रीजनार्दन । स्वयें वदताहे आपण । हे बोलतांचि खूण । कळली संपूर्ण आम्हांसी ॥७५॥ चढत प्रमेयाचें भरतें । तें नावेक आवरोनि चित्तें । पुढील कथानिरुपणातें । करीं निश्चितें आरोहण ॥७६॥ विसरलों होतों हा भावो । परी भला दिधला आठवो । याचिलागीं सद्भावो । तुमचे चरणीं पहा हो ठेविला ॥७७॥ उणें देखाल जें जें जेथें । तें तें करावें पुरतें । सज्जनांमाजीं सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥७८॥ ते म्हणती भला रे भला नेटका । बरवी ही आया आली ग्रंथपीठिका । आतां संस्कृतावरी टीका । कविपोषका वदें वहिला ॥७९॥ याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायांचा ठावो । तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहा हो कथेचा ॥१८०॥ तरी नैमिषारण्याआंतु । शौनकादिकांप्रति मातु । सूत असे सांगतु । गतकथार्थु अन्वयो ॥८१॥ मागें दहावे स्कंधीं जाण । कथा जाली नव-लक्षण । आतां मोक्षाचें उपलक्षण । सांगे श्रीकृष्ण एकादशीं ॥८२॥ जो चिदाकाशींचा पूर्णचंद्र । जो योगज्ञाननरेंद्र । तो बोलता झाला शुक योगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ॥८३॥ तंव परीक्षिती म्हणे स्वामी । याचिलागीं त्यक्तोदक मी । तेचि कृपा केली तुम्हीं । तरी धन्य आम्ही निजभाग्यें ॥८४॥ अगा हे साचार मोक्षकथा । ज्यांसि मोक्षाची अवस्था । तिहीं पाव देऊनि मनाचे माथां । रिघावें सर्वथा श्रवणादरीं ॥८५॥ भीतरी नेऊनियां कान । कानीं द्यावें निजमन । अवधाना करुनि सावधान । कथानुसंधान धरावें ॥८६॥ बहुतीं अवतारीं अवतरला देवो । परी या अवतारींचा नवलावो । देवां न कळे अभिप्रावो । अग्मय पहा हो हरिलीला ॥८७॥ उपजतांचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीळा । बाळपणीं मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळां निजांगें अर्पी ॥८८॥ मायेसि दाविलें विश्वरुप । गोवळां दाविलें वैकुंठदीप । परी गोवळेपणाचें रुप । नेदीच अल्प पालटों ॥८९॥ बाळ बळियांतें मारी । अचाट कृत्यें जगादेखतां करी । परी बाळपणाबाहेरी । तिळभरी नव्हेचि ॥१९०॥ ब्रह्म आणि चोरी करी । देवो आणि व्यभिचारी । पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥९१॥ अधर्में वाढविला धर्म । अकर्में तारिलें कर्म । अनेमें नेमिला नेम । अति निःसीम निर्दुष्ट ॥९२॥ तेणें संगेंचि सोडिला संगु । भोगें वाढविला योगु । त्यागेंवीण केला त्यागु । अति अव्यंगु निर्दोष ॥९३॥ कर्मठां होआवया बोधु । कर्मजाडयाचे तोडिले भेदु । भोगामाजीं मोक्षपदु । दाविलें विशदु प्रकट करुनि ॥९४॥ भक्ति भुक्ति मुक्ति । तिन्ही केलीं एके पंक्ती । काय वानूं याची ख्याति । खाऊनि माति विश्वरुप दावी ॥९५॥ त्याचिया परमचरित्रा । तुज सांगेन परमपवित्रा । परी निजबोधाचा खरा । या अवतारीं पुरा पवाडा केला ॥९६॥ एकादशाच्या तात्पर्यार्थीं । संक्षेपें विस्तरे मुक्ति । बोललीसे आद्यंतीं । परमात्मस्थिति निजबोधें ॥९७॥ तेथें नारदें वसुदेवाप्रती । संवादूनि निमि-जायंती । सांगितली कथासंगती । ’संक्षेपस्थिति’ या नाम ॥९८॥ तेचि उद्धवाची परमप्रीति । नाना दृष्टांतें उपपत्ति । स्वमुखें बोलिला श्रीपति । ते कथा निश्चितीं ’सविस्तर’ ॥९९॥ दशमीं ’निरोध’ लक्षण । मागां केलें निरुपण । जेथें धराभार अधर्मजन । निर्दळी श्रीकृष्ण नानायुक्ति ॥२००॥ ज्यांचेनि अधर्मभारें क्षिति । सदा आक्रंदत होती । जिच्या साह्यालागीं श्रीपति । पूर्णब्रह्मस्थिति अवतरला ॥१॥ दुष्ट दैत्य आणि दानव । धराभार राजे सर्व । वधिता झाला श्रीकृष्णदेव । तो गतकथाभाव शुक सांगे ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीबादरायणिरुवाच कृत्वा दैत्यवंधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः । भुवोऽवतारयद्भारं जविष्ठं जनयन्कलिम् ॥१॥

पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण । निधडे यादव मेळवूनि जाण । दैत्यनिर्दळण श्रीकृष्णें केलें ॥३॥ जे यादवांसि न येत वधीं । तेथें श्रीकृष्ण करी बुद्धि । सखे स्वजन स्वगोत्रामधीं । कलह उत्पादी अतिघोर ॥४॥ उतरावया धराभार । कलहमिसें शारंगधर । मारवी कौरवभार । पांडुकुमर क्षोभवूनि ॥५॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्नै-र्दुर्द्यूतहेलनकचग्रहणादिभिस्तान् । कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् हत्वा नृपान्निरहरत्क्षितिभारमीशः ॥२॥

दुष्ट अकर्मी अतिघोर । ज्यांची सेना धराभार । ते वधार्थ करावया एकत्र । कलहाचें सूत्र उपजवी कृष्ण ॥६॥ येणें श्रीकृष्णसंकल्पोद्देशें । हों सरले कपटफांसे । तेणें कपटें बांधून कैसे । वधवी अनायासें कौरवभार ॥७॥ जगीं द्यूत खेळिजे दुष्टें । तेंही आरंभिलें कपटें । धर्मावरी फांसे खोटे । घालिती हटें दुर्बुद्धि ॥८॥ बाळेभोळे अज्ञान जनीं । तेही गांजिती ना धर्मपत्नीद । ते साचचि धर्माची मानिनी । आणिली बांधोनी सभेमाजीं ॥९॥ दुःशासनें धरिले वेणीकच । तेणेंचि वाढली कचकच । तें कर्म त्याचें त्यासीच । भंवलें साच त्याभोंवतें ॥२१०॥ वनीं कोणी कोणा नागवी । तो नागोवा राजा आणवी । सभेसि राजा उगाणवी । तैं मृत्यूची पदवी मस्तका आली ॥११॥ अन्यायेंवीण नागवी रावो । तैं धांवणिया धांवे देवो । द्रौपदीवस्त्रहरण पाहा हो । हा मुख्य अन्यावो कौरवां ॥१२॥ अग्निदानें गरदानें । धनदारा अपहारणें । घाला घालूनि मारणें । शस्त्रपाणी होणें वधार्थ ॥१३॥ अवज्ञा आणि हेळण । दुरुक्ती जें धर्मच्छळण । हेंचि निमित्तासी कारण । केलें संपूर्ण श्रीकृष्णें ॥१४॥ पतिव्रतेचें वस्त्रहरण । तेणे तत्काळ पावे मरण । हेंचि कलहाचें कारण । कुळनिर्दळण येणें कर्में ॥१५॥ ऐसा जो धर्माचा विरोधी । त्यासी देवो अवश्य वधी । यालागीं पांडवांचिये बुद्धी । अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपु ॥१६॥ भूभारहरणचरित्र । सखे-स्वजन-सुहृद-स्वगोत्र । शास्त्रविवेकी अतिपवित्र । त्यांमाजीं विचित्र उपजवी कलहो ॥१७॥ धराभार हरावया गोविंदु । कळवळियाचे सखे बंधु । करविला तेथ गोत्रवधु । साह्य संबंधु राजभारेंसीं ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

भूमारराजपृतना यदुर्भिर्निरस्य गुप्तैः स्वबाहुभिरचिन्तयदप्रमेयः । मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं यद्यादवं कुलमहो ह्याविषह्यमास्ते ॥३॥

ऐसे पक्षपाती राजे अपार । अमित सेना धराभार । मारविले अधर्मकर । मिषांतर कलहाचें ॥१९॥ पृथ्वीचे अधर्मसेनासंभार । शोधशोधूनि राजे मारिले अपार । तर्हीी उतरला धराभार । हें शारंगधर न मानीचि ॥२२०॥ यादव करुन अतुर्बळ । नाना दुष्ट दमिले सकळ । परी यादव झाले अतिप्रबळ । हें न मनीच केवळ श्रीकृष्ण ॥२१॥ नव्हतां यादवांचें निदान । नुतरे धराभार संपूर्ण । ऐसें मानिता झाला श्रीकृष्ण । कुलनिर्दळण तो चिंती ॥२२॥ अग्नि कर्पूर खाऊनि वाढे । कापुरांतीं अग्निही उडे । तैसें यादवांचें अतिगाढें । आलें रोकडें निदान ॥२३॥ केळी फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी । तैशी यादव कुळाची शीग गाढी । चढे रोकडी मरणार्थ ॥२४॥ फळ षरिपाकें परिमळी । तें घेऊन जाय माळी । तैशीं स्वकुळफळें वनमाळी । न्यावया तत्काळीं स्वयें इच्छी ॥२५॥ अनंतबाहुप्रतापें । यादव वाढले श्रीकृष्णकृपें । तोचि निधनाचेनि संकल्पें । काळरुपें क्षोभला ॥२६॥ अतुर्बळ अतिप्रबळ । वाढलें जें यादवकुळ । ते वीर देखोनि सकळ । असह्य केवळ श्रीकृष्णासी ॥२७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत्कथंचिन्मत्यंश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् । अन्तःकलिं यदुकुलस्य विधाय वेणुस्तम्बस्य वह्निमिव शान्तमुपैमि धाम ॥४॥

मज गेलिया निजधामा । हेचि प्रवर्तती अधर्मा । श्रियोन्नत अतिगर्व महिमा। मुख्य अकर्मा निजहेतु ॥२८॥ हे मद्बळें अतिप्रबळ । अतिरथी झाले सकळ । यांसि अप्रतिमल्ल दिग्मंडळ । यांतें दमिता केवळ मी एकु ॥२९॥ हे नाटोपती इंद्रादि देवां । दैत्य-राक्षसां कां दानवां । शेखीं निर्दाळावया यादवां । मागुतें मज तेव्हां पडेल येणें ॥२३०॥ तरी आतांचि आपुले दिठी । कुळ बांधूं काळगांठीं । ऐसा विचार जगजेठी । निश्चयें पोटीं दृढ केला ॥३१॥ यदुवंश-वंशजाळी । वाढली श्रीकृष्णकृपाजळीं । तेथें अवकृपेची इंगळी । ऋषिशापमेळीं कपटें पडली ॥३२॥ ते मुळी पेटली श्रीकृष्णसंकल्पें । धडाडली ब्रह्मशापें । ते स्वजनविरोधरुपें । काळाग्निकोपें नाशील ॥३३॥ ऐसें यावकुळनिर्दळण । करुनियां स्वयें श्रीकृष्ण । निरसूनि निजधामा गमन । स्वलीला आपण करुं इच्छी ॥३४॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

एवं व्यवसितो राजन्सत्यसंकल्प ईश्वरः । शापव्याजेन विप्राणां संजह्ने स्वकुलं विभुः ॥५॥

यापरी आपुलें कुळ । नासूं आदरिलें तत्काळ । हाचि विचारु अढळ । केला समूळ कुळक्षयार्थ ॥३५॥ हेंचि कार्य होय कैसें । तें विचारिजे जगदीशें । ब्रह्मशापचेनि मिसें । कुळ अनायासें नासेल ॥३६॥ इतकें हें जैं सिद्धी जाय । तैं सरलें अवतारकृत कार्य । मग स्वधामा यदुवर्य । जावों पाहे स्वलीला ॥३७॥ लीलाविग्रही सुंदरपूर्ण । गुणकर्मक्रिया अतिपावन । जगदुद्धारी श्रीकृष्ण । ब्रह्मपरिपूर्ण पूर्णावतार ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

स्वमूर्त्या लोकलावण्यनिर्मुक्त्या लोचनं नृणाम् । गीर्भिंस्ताः स्मरतां चित्तं पदैस्तानीक्षतां क्रिया ॥६॥

जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळीं कामिनीरमण । मोक्षाचें तारुं स्वयें श्रीकृष्ण । ज्याचें बरवेपण अलोलिक ॥३९॥ जो भक्तकामकल्पद्रुम । मनोहर मेघश्याम । ज्याचें त्रिलोकीं दाटुगें नाम । स्वयें पुरुषोत्तम शोभतु ॥२४०॥ श्रीकृष्णाचिया सौंदर्यापुढें । लक्ष्मी भुलोनि झाली वेडें । मदन पोटा आलें बापुडें । तेथ कोणीकडे इंद्र चंद्र ॥४१॥ ज्याचें त्रैलोक्यपावन नाम । जो करी असुरांतें भस्म । तो बोलिजे अवाप्तकाम । भक्तां सुगम सर्वदा ॥४२॥ त्रिलोकींचें बरवेपण । भुलोनि कृष्णापाशीं आलें जाण । ना कृष्णलेशें बरवेपण । शोभे संपूर्ण तिहीं लोकीं ॥४३॥ जो सकल सौंदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालभा । ज्याचिया अंगसंगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥४४॥ जो हरिखाचा सोलींव हरिख । कीं सुख सुखावतें परमसुख । ज्याचेनि विश्रांतीसि देख । होय आत्यंतिक विसांवा ॥४५॥ तो अमूर्त मूर्तिधारण । कीं सकललोकलावण्य । शोभा शोभवी श्रीकृष्ण । सौभाग्य संपूर्ण साजिरा ॥४६॥ घृत थिजलें कीं विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें । तेवीं अमूर्त मूर्ती मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म ॥४७॥ तयासि देखिलियाचि पुरे । देखादेखीं देखणेंचि सरे । पहाणें पाहातेनिसीं माघारें । लाजोनि वोसरे सलज्ज ॥४८॥ दृष्टी धाली दे ढेंकर । आपण आपुलें शेजार । होवोनियां परात्पर । सुखावे साचार श्रीकृष्णरुपीं ॥४९॥ श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी । रसस्वादु रसना सोडी । जाये चाखणेपणाची आवडी । चाखतें दवडी चाखोनि ॥२५०॥ नवल तेथींचें गोडपण । अमृतही फिकें केलें जाण । यापरी रसना आपण । हरिरसीं संपूर्ण सुखावे ॥५१॥ लागतां श्रीकृष्णसुवावो । अवघा संसारुचि होय वावो । सेवितां श्रीकृष्णसुगंधवावो । घ्राणासि पहा वो आन नावडे ॥५२॥ वासु सुवासु सुमन । घ्रेय घ्राता आणि घ्राण । कृष्णमकरंदें जाण । विश्रामा संपूर्ण स्वयें येती ॥५३॥ जयाचेनि अंगस्पर्शें । देह-देही-देहपण नासे । अंगचि अंगातें कैसें । विसरे आपैसें देहबुद्धि ॥५४॥ कठिणाचें कठिणपण गेलें । मृदूचें मृदुपणही नेलें । कृष्णस्पर्शें ऐसें केलें । स्पर्शाचें ठेलें स्पर्शत्व ॥५५॥ तयाचेनि पठणें वाचा । ठावो वाच्यवाचकांचा । नेतिशब्दें पुसोनि साचा । करी शब्दाचा निःशब्दु ॥५६॥ बोलु बोलणेंचि ठेलें । बोलतें नेणों काय झालें । कृष्णशब्दें ऐसें केलें । वाच्यानें नेलें वाचिक ॥५७॥ चित्त चिंतितांच पाये । चित्तपणा विसरोनि जाये । मग निश्चितपणें पाहे । कृष्णचरणीं राहे निवांत ॥५८॥ चित्त चिंता चिंतन । तिहींची नुरे आठवण । चिंतितांचि श्रीकृष्णचरण । ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त ॥५९॥ नवल तयाचा पदक्रम । पाहतां पारुषे कर्माकर्म । मग कर्म कर्ता क्रियाभ्रम । करी निर्भ्रम पदरजें ॥२६०॥ पहातां पाउलांचा माग । तुटती कर्माकर्मांचे लाग । कर्माचें मुख्य माया अंग । तिचा विभाग उरों नेदी ॥६१॥ गाईमागिल कृष्णपाउलें । पाहतां कर्म कर्तेनिसीं गेलें । अकर्म म्हणणें नाहीं उरलें । ऐसें कर्म केलें निष्कर्म ॥६२॥ जयाचेनि कीर्तिश्रवणें । श्रोता नुरे श्रोतेपणें । वक्ता पारुषे वक्तेपणें । श्रवणें पावणें परब्रह्म ॥६३॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

आच्छिद्य कीर्तिं सुश्लोकां वितत्य ह्यञ्जसा नु कौ । तमोऽनया तरिष्यन्तीत्यगात्स्वं पदमीश्वरः ॥७॥

यापरी उदारकीर्ती । थोर केली अवतारख्याती । जेणें जड जीव उद्धरती । श्रवणें त्रिजगती पावन होये ॥६४॥ स्वधामा गेलिया चक्रधरु । मागां तरावया संसारु । कृष्णकीर्ति सुगम तारुं । ठेवून श्रीधरु स्वयें गेला ॥६५॥ नवल त्या तारुवाची स्थिती । बुडवूं नेणे कल्पांतीं । श्रवणें तरले नेणों किती । पुढेंही तरती श्रद्धाळू ॥६६॥ श्रीकृष्णकीर्तीचें तारुं । घालितां आटे भवसागरु । तेथें कोरडया पाउलीं उतारु । श्रवणार्थी नरु स्वयें लाहे ॥६७॥ जे कृष्णकीर्ति करिती पठण । त्यांच्या संसारासि पडे शून्य । कीर्तिवंत ते अतिपावन । त्यांतें सुरगण वंदिती ॥६८॥ आदरें पढतां श्रीकृष्णकीर्ति । पायां लागती चारी मुक्ति । त्यांचेनि पावन त्रिजगती । परमनिर्वृत्ति हरिनामें ॥६९॥ श्रीकृष्णकीर्तिनामाक्षरें । रिघतांचि श्रवणद्वारें । भीतरील तम एकसरें । निघे बाहेरें गजबजोनि ॥२७०॥ तंव कृष्णकीर्तिकथागजरीं । तमासि ठावो नुरेचि बाहेरी । धाकेंचि निमे सपरिवारीं । कृष्णकीर्तिमाझारीं परमानंदु ॥७१॥ कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशें । संसार कृष्णमय दिसे । कीर्ति कीर्तिमंताऐसें । दे अनायासें निजसुख ॥७२॥ जो देखिलिया देखणें सरे । जो चाखिलिया चाखणें पुरे । जो ऐकिलिया ऐकणें वोसरे । जो चिंतितां नुरे चित्तवृत्ति ॥७३॥ ज्यासि झालिया भेटी । भेटीसी न पडे तुटी । ज्यासि बोलतां गोठी । पडे मिठी परमार्थीं ॥७४॥ ज्यासि दिधलिया खेंव । खेंवाची पुरे हांव । ज्याचें घेतांचि नांव । नासे सर्व महाभय ॥७५॥ तो सत्यसंकल्प ईश्वरु । स्वलीला सर्वेश्वरु । स्वपदासि शार्ङगधरु । अतिसत्वरु निघाला ॥७६॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

राजोवाच--ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनाम् । विप्रशापः कथमभूद् वृष्णीनां कृष्णचेतसाम् ॥८॥

आदरें पुसे परीक्षिती । यादव विनीत विप्रभक्तीं । त्यांसि शापु घडे कैशिया रीतीं । सांग तें मजप्रती शुकयोगींद्रा ॥७७॥ यादव दानें अतिउदार । राजे होऊनि परम पवित्र । ब्राह्मणसेवे तत्पर । आज्ञाधर कृष्णाचे ॥७८॥ यादव सदा कृष्णयोगेंसीं । नित्य साधु यादवांपासीं । तेथेंचि वसे नारदऋषी । शापु यादवांसी घडे कैसा ॥७९॥ दक्षशाप न बाधी कृष्णापासीं । म्हणौनि नारद वसे द्वारकेसी । तोचि श्रीकृष्ण असतां अंगेंसीं । शापु यादवांसी घडे कैसा ॥२८०॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

यन्निमित्तः स वै शापो यादृशो द्विजसत्तम । कथमेकात्मनां भेद एतत्सर्वं वदस्व मे ॥९॥

शापासि मूळ मुख्य संतापु । कैसेनि ब्राह्मणां आला कोपु । कोणेपरीचा दिधला शापु । संक्षेपरुपु सांगावा ॥८१॥ यादव समस्त सखे बंधु । यांसि प्रतिपाळी स्वयें गोविंदु । एकात्मता स्वगोत्रसंबंधु । त्यांमाजीं युद्धभेदु घडे कैसा ॥८२॥ "आत्मा वै पुत्रनामासि" । हे श्रुति प्रमाण सर्वांसी । तेथें शाप बाधी कृष्णात्मजांसी । केवीं आलें यासी सत्यत्व ॥८३॥ कृष्णसंकल्प कुळनाशन । तोचि ब्रह्मशापासी कारण । यालागीं बाधक जाण । होय संपूर्ण यादवां ॥८४॥ सृष्टि स्त्रजी पाळी संहारी । हें कृष्ण संकल्पमात्रें करी । तो यदुकुळनिधन निर्धारी । त्याची अवतारथोरी शुक सांगे ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक १० व ११ वा

श्रीशुक उवाच- बिभ्रद्वपुः सकलसुन्दरसन्निवेशं, कर्माचरन्भुवि सुमंगलमाप्तकामः । आस्थाय धाम रममाण उदारकीर्तिः, संहर्तुमैच्छत कुलं स्थितकृत्यशेषः ॥१०॥

कर्माणि पुण्यनिवहानि सुमंगलानि, गायज्जगत्कालिमलापहराणि कृत्वा । कालात्मना निवसता यदुदेवगेहे, पिण्डारकं समगमन्मुनयो निसृष्टाः ॥११॥

रायासी म्हणे श्रीशुकु । कर्ता करविता श्रीकृष्ण एकु । तो शापार्थ आत्यंतिकु । आत्मजां अविवेकु उपजवी स्वयें ॥८६॥ स्वयें जावया निजधामा । थोर आवडी पुरुषोत्तमा । यालागीं अवशेषकर्मा । मेघश्यामा लवलाहो ॥८७॥ केव्हां होईल कुलक्षयो । हेंचि मनीं धरी देवो । तो देवाचाचि भावो । शापासि पहा वो दृढ मूळ ॥८८॥ जो कुलक्षयो चिंती । त्या कृष्णाची सुंदरमूर्ति । शुक सांगे परीक्षितीप्रति । स्वानंदस्थिति उल्हासे ॥८९॥ सकल सौंदर्या अधिवासु । धरोनि मनोहर नटवेषु । लावण्यकलाविन्यासु । आणी जगदीशु निजांगें ॥२९०॥ नवल सौंदर्या बीक उठी । सर्वांगीं गुंतल्या जनदिठी । कृष्णस्वरुपीं पडे मिठी । होत लुलुबुटी डोळ्यां ॥९१॥ जैशी गुळीं माशीवरी माशी । तेवीं दिठीवरी दिठी कृष्णरुपासी । सर्वांगीं वेढोनि चौपासीं । अहर्निशीं नोसंडिती ॥९२॥ नयन लांचावले लोभा । दृष्टीसि निघालिया जिभा । यापरी श्रीकृष्णशोभा । स्वानंदगाभा साकार ॥९३॥ तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठीं । ते परतोनि मागुती नुठी । अधिकाधिक घाली मिठी । देखे सकळ सृष्टी श्रीकृष्णु ॥९४॥ ऐशी डोळ्यां आवडी । म्हणौनि कामिनी वरपडी । यालागीं गोपिकां गोडी । अतिगाढी गोविंदीं ॥९५॥ कृष्ण अतिसुंदर मनोरम । म्हणाल असेल त्यासि विषयधर्म । तरी तो अवाप्तसकळकाम । आत्माराम श्रीकृष्ण ॥९६॥ कृष्ण अवाप्तसकळकाम । त्यासि कां द्वारका गृहाश्रम । स्त्रिया पुत्र राज्यसंभ्रम । विषयकाम कां भोगी ॥९७॥ चहूं आश्रमां प्रकाशकु । त्रिलोकीं कृष्ण गृहस्थ एकु । तोचि ब्रह्मचारी नैष्ठिकु । अतिनेटकु संन्यासी ॥९८॥ कृष्णदेहीं नाहीं दैवबळ । लीलाविग्रही चित्कल्लोळ । त्याचीं सर्व कर्में पावनशीळ । उद्धरी सकळ श्रवणें कथनें ॥९९॥ कृष्णकर्मांचें करी जो स्मरण । तें कर्म तोडी कर्मबंधन । ऐसें उदार कर्माचरण । आचरला श्रीकृष्ण दीनोद्धरणा ॥३००॥ श्रीकृष्ण असेल सकाम । म्हणाल यालागीं आचरे कर्म । ज्याचें नाम निर्दळी सर्व काम । तो स्वयें सकाम घडे केवीं ॥१॥ श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वयें संन्यासी होती निष्काम । सकामाचा निर्दळे काम । ऐसें उदार कर्म आचरला ॥२॥ तेणें अवाप्तसकळकामें । ऐशीं आचरला अगाध कर्में । मानव तारावया मनोधर्में । कीर्ति मेघश्यामें विस्तारिली ॥३॥ कैसें कर्म सुमंगळु । कानीं पडतांचि अळुमाळु । नासोनियां कर्ममळु । जाती तात्काळु श्रवणादरें ॥४॥ श्रवणें उपजे सद्भावो । सद्भावें प्रकटे देवो । तेणें निर्दळे अहंभावो । ऐशी उदार पहा वो हरिकीर्ति ॥५॥ श्रीकृष्णकीर्तीचें स्मरण । कां करितां श्रवणपठण । मागें उद्धरले बहुसाल जन । पुढें भविष्यमाण उद्धरती ॥६॥ जरी केलिया होती पुण्यराशी । तरी अवधान होये हरिकथेसी । येर्हेवीं ऐकतां येरांसी । लागे अनायासीं अतिनिद्रा ॥७॥ जे हरिकथेसी सादर । त्यांच्या पुण्या नाहीं पार । कृष्णें सुगमोपाव केला थोर । दीनोद्धार हरिकीर्तनें ॥८॥ कृष्णकीर्तनें गर्जतां गोठी । लाजिल्या प्रायश्चित्तांचिया कोटी । उतरल्या तीर्थांचिया उटी । नामासाठीं निजमोक्षु ॥९॥ ऐसा निजकीर्तिउदारु । पूर्णब्रह्म सारंगधरु । लीलाविग्रही सर्वेश्वरु । पूर्णावतारु यदुवंशीं ॥३१०॥ उतरला धराभार येथ । सत्य न मनी श्रीकृष्णनाथ । यादव उरले अतिअद्भुत । तेही समस्त निर्दळावे ॥११॥ ये अवतारीं हृषीकेशी । म्हणे हेंच कृत्य उरलें आम्हांसी । निर्दळोनि निजवंशासी । निजधामासी निघावें ॥१२॥ तो यादवांमाजीं माधव । कालात्मा देवाधिदेव । जाणोनि भविष्याचा भाव । काय अपूर्व करिता झाला ॥१३॥ नारदादि मुनिगण । त्यांसि पाचारुनि आपण । करुं सांगे शीघ्र गमन । स्वयें श्रीकृष्ण साक्षेपें ॥१४॥ ज्यांपासूनि संत दूरी गेले । तेथें अनर्थाचें केलें चाले । हें यादवनिधनालागीं वहिलें । लाघव केलें श्रीकृष्णें ॥१५॥ भक्त संत साधु ज्यापासीं । तेथें रिघु नाहीं अनर्थासी । जाणे हें स्वयें हृषीकेशी । येरां कोणासी कळेना ॥१६॥ जेथें संतांचा समुदावो । तेथें जन्ममरणां अभावो । हा श्रीकृष्णचि जाणे भावो । तो करी उपावो ब्रह्मशापार्थ ॥१७॥ जेथूनि संत गेले दुरी । तेथें सद्यचि अनर्थु वाजे शिरीं । हें जाणोनियां श्रीहरी । द्वारकेबाहेरी ऋषि घाली ॥१८॥ ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांतें लाघवी हृषीकेशी । तीर्थमिषें समस्तांसी । पिंडारकासी स्वयें धाडी ॥१९॥ पिंडारका मुनिगण । श्रीकृष्णें धाडिले कोण कोण । ज्यांचें करितांचि स्मरण । कळिकाळ आपण भयें कांपे ॥३२०॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

विश्वामित्रोऽसितः कण्वो दुर्वासा भृगुरंगिराः । कश्यपो वामदेवोऽत्रिर्वसिष्ठो नारदादयः ॥१२॥

जे तपस्तेजें देदीप्यमान । जे पूर्णज्ञानें ज्ञानघन । ज्यातें सदा वंदी श्रीकृष्ण । ते ऋषीश्वर जाण निघाले ॥२१॥ जे गायत्रीमंत्रासाठीं । करुं शके प्रतिसृष्टी । जो विश्वामित्र महाहटी । तोही उठाउठीं निघाला ॥२२॥ जेथ न बाधी उष्णशीत । ते आश्रमीं वसे असित । ज्याचेनि नामें द्वंद्वें पळत । तोही त्वरित निघाला ॥२३॥ जो सूर्यासि रिघोनि शरण । अश्वाचे कर्णी बैसोन आपण । पूर्ण केलें वेदपठण । तो कण्वही जाण निघाला ॥२४॥ जो दुर्वास अत्याहारी । आहार सेवूनि निराहारी । तोही द्वारकेबाहेरी । त्वरेंकरुनि निघाला ॥२५॥ भृगूचा श्रीचरण । हृदयीं वाहे नारायण । मिरवी श्रीवत्स भूषण । तो भृगुही जाण निघाला ॥२६॥ अंगिरा स्वयें सद्बुद्धि सृष्टीं । बृहस्पति जन्मला ज्याचे पोटीं । जो परमगुरु देवांच्या मुकुटीं । तोही उठी गमनार्थ ॥२७॥ कश्यपाची नवलगोठी । सुर नर किन्नर जन्मले पोटीं । यालागीं हे काश्यपी सृष्टी । तोही कश्यपु उठी निजगमनीं ॥२८॥ मुक्तांमाजीं श्रेष्ठ भावो । वेदीं वाखाणिला वामदेवो । तोही द्वारकेहूनि पहा हो । स्वयमेवो निघाला ॥२९॥ अत्रीची नवल परी । तीनी देव जन्मले उदरीं । श्रीदत्त वंदिजे योगेश्वरीं । हे अगाध थोरी अनसूयेची ॥३३०॥ तो स्वयें अत्रि ऋषीश्वर । श्रीकृष्णआज्ञातत्पर । पिंडारका अतिसत्वर । प्रयाण शीघ्र तेणें केलें ॥३१॥ जो श्रीरामाचा सद्गुरु । ब्रह्मज्ञानें अतिउदारु । ज्याचे शाटीचा प्रताप थोरु । जिंकिला दिनकरु तपस्तेजें ॥३२॥ ऐसा जो वसिष्ठ महामुनी । तोही कृष्णसंज्ञा मानुनी । निघाला द्वारकेहुनी । शीघ्र गमनीं पिंडारका ॥३३॥ आणि देवर्षि नारदु । त्याचाही अगाध बोधु । ज्यासि सर्वदा परमानंदु । अति आल्हादु हरिकीर्तनीं ॥३४॥ ब्रह्मवीणा स्वयें वातु । ब्रह्मपदें गीत गातु । ब्रह्मानंदें नाचतु । निघे डुल्लतु पिंडारका ॥३५॥ इत्यादि हे मुनिवरु । श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीश्वरु । शिष्यसमुदायें सहपरिवारु । मीनले अपारु पिंडारकीं ॥३६॥ एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव । मीनले कृष्णवैभव । अतिअपूर्व वर्णिती ॥३७॥ बाप लाघवी वनमाळी । कुलक्षयो घडावया तत्काळीं । कुमरीं ऋषीश्वरांसि रांडोळी । कपटमेळीं मांडिली ॥३८॥ निंदा अवज्ञा हेळण । करितां ब्राह्मणांसि छळण । जेथ ब्रह्मद्वेष वाढे पूर्ण । कुळक्षयो जाण ते ठायीं ॥३९॥ ब्राह्मणांच्या कोपापुढें । कुळ कायसें बापुडें । महादेवाचें लिंग झडे । इंद्रपदवी पडे समुद्रीं ॥३४०॥ तो समुद्रही केला क्षार । ऐसा द्विजकोप अतिदुर्धर । हें एकएकाचें चरित्र । ते ऋषि समग्र मीनले तेथें ॥४१॥ धरातळीं ब्रह्म ब्राह्मण । त्यांचें वचन परम प्रमाण । हें सत्य करावया श्रीकृष्ण । कुळनिर्दळण स्वयें दावी ॥४२॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

क्रीडन्तस्तानुपव्रज्य कुमारा यदुनन्दनाः । उपसंगृह्य पप्रच्छुरविनीता विनीतवत् ॥१३॥

यदुनंदन समस्त । क्रीडाकंदकु झेलित । एकमेकांतें हाणित । ठकवून पळत परस्परें ॥४३॥ ऐसे नाना क्रीडाविहार । करीत आले यदुकुमार । अंगीं श्रीमद अपार । औद्धत्यें थोर उन्मत्त ॥४४॥ अतीत-अनागत-ज्ञानवंत । ऋषीश्वर मीनले समस्त । ज्यांचें वचन यथार्थभूत । त्यांसिही निश्चित ठकूं आम्ही ॥४५॥ जैं अघडतें येऊनि पडे । तैं यांचें वचन कैसें घडे । म्हणोनि ऋषीश्वरांपुढें । मांडिलें कुडें यदुकुमरीं ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

ते वेषयित्वा स्त्रीवेषैः साम्बं जाम्बवतीसुतम् । एषा पृच्छति वो विप्रा अन्तर्वत्न्यमसितेक्षणा ॥१४॥

पहिलेच श्रीमदें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट । सांबास देऊनि स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला ॥४७॥ तो श्यामसुंदर डोळसु । अंगा शोभला स्त्रीवेषु । प्रमदावैभवविलासु । दावी विन्यासु सलज्ज ॥४८॥ नयनीं सोगयाचें काजळ । व्यकंट कटाक्षु अतिचपल । सुंदर सुकुमार वेल्हाळ । चाले निश्चळ हंसगती ॥४९॥ वस्त्रें बांधोनियां उदर । नावेक केलें थोर । तेणें ते गरोदर । दिसे साचार इतरांसी ॥३५०॥ हात घालूनि सखियांच्या खांदीं । चालतां उदर हालों नेदी । विसांवा घेत पदोपदीं । येतां ऋषिवृंदीं देखिली ॥५१॥ ऐसा स्त्रीवेष दाखवूनि । नावेक अंतरें राहोनि । इतर ऋषींजवळी येऊनि । लोटांगणें घालिती ॥५२॥ पूर्वश्लोकींचा श्र्लोकार्थ तेथ । व्याख्यान नव्हेच समस्त । यालागीं तेंचि येथ । वाखाणिजेत कथान्वयें ॥५३॥ छळाचेनि मिषें जाणा । ऋषींसि करिती प्रदक्षिणा । अत्यादरें लागती चरणा । म्हणती दर्शना आम्ही आलों ॥५४॥ ऐसे यदुकुमार समस्त । अविनीत परी विनीतवत । कर जोडोनि राहिले तेथ । मृदु विनवीत मुनीश्वरां ॥५५॥ स्वामी पैल हे जे सुंदर । तुमच्या वचनीं भावार्थ थोर । आसन्नप्रसव गरोदर । स्वयें सुकुमार पुसों लाजे ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

प्रष्टु विलज्जती साक्षात्प्रब्रूतामोधदर्शनाः । प्रसोष्यन्ती पुत्रकामा किंस्वित्सजनयिष्यति ॥१५॥

स्वयें येऊन तुम्हांप्रती । तिचेनि न बोलवे निश्चितीं । यालागीं आम्हांहातीं । सेवेसि विनंती करविली ॥५७॥ तुम्ही सत्यदर्शी साचार । अमोघवीर्य तुमचें उत्तर । शिरीं वंदिती हरिहर । ज्ञानें उदार तुम्ही सर्व ॥५८॥ यालागीं हे गर्भवती । सादरें असे पुसती । पुत्रकाम असे वांछिती । काय निश्चितीं प्रसवेल ॥५९॥ ऐसे कपटाचेनि वालभें । विनीत कर जोडूनि उभे । तैशींच फलें भावगर्भें । छळणलोभें पावती ॥३६०॥ कर्म जाणोनियां कुडें । नारदु नाचे ऋषींपुढें । मुनि म्हणे यादवांचें गाढें । निधन रोकडें वोढवलें ॥६१॥ मुंगिये निघालिया पांख । तिसी मरण ये अचूक । तेवीं ब्राह्मणछळणें देख । आवश्यक कुळनाश ॥६२॥ शापीत आलिया द्विजजन । त्यांसि सद्भावें करावें नमन । मारुं आलिया ब्राह्मण । मस्तक आपण वोढवावें ॥६३॥ त्या ब्राह्मणांसि छळण । तें जाणावें विषभक्षण । विषें निमे भक्षित्याचा प्राण । कुळनिर्दळण द्विजछळणें ॥६४॥ अविद्य सुविद्य न म्हणतां जाण । धरातळीं ब्रह्म ब्राह्मण । त्याचें करुं जातां छळण । कुळनिर्दळण आवश्यक ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

एवं प्रलब्धा मुनयस्तानूचुः कुपिता नृप । जनयिष्यति वो मन्दा मुसलं कुलनाशनम् ॥१६॥

ऐकें परीक्षिति नृपवरा । यापरी यादवकुमरां । निधनाचा भरला वारा । तेणें ते ऋषीश्वरां छळूं गेले ॥६६॥ कपट जाणोनियां साचार । थोर कोपले ऋषीश्वर । मग तिंहीं काय वाग्वज्र । अतिअनिवार सोडिलें ॥६७॥ अरे हे प्रसवेल जें बाळ । तें होईल सकळकुळा काळ । निखळ लोहाचें मुसळ । देखाल सकळ मंदभाग्यें ॥६८॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

तच्छ्रुत्वा तेऽतिसंत्रस्ता विमुच्य सहसोदरम् । साम्बस्य ददृशुस्तस्मिन्मुसलं कुलनाशनम् ॥१७॥

ऐकूनि शापाचें उत्तर भयभीत झाले कुमर । सोडूनि सांबाचें उदर । अतिसत्वर पाहती ॥६९॥ तंव ते लोहमय मुसळ । देखते झाले तत्काळ । मग भयभीत विव्हळ । एकाएकीं सकळ दचकोनि ठेले ॥३७०॥ नासावें यादवकुळ । ऐसा श्रीकृष्णसंकल्प सबळ । तोचि झाला लोहाचें मुसळ । जाण तात्काळ ऋषिवाक्यें ॥७१॥ जें जें ब्राह्मणाचें वचन । तें तें अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण । ब्राह्मणाचें जें वदे वदन । तें श्रीकृष्ण स्वयें सत्यत्वा आणी ॥७२॥ देखोनि ऋषीश्वरांचा कोप । ऐकोनि कुलक्षयाचा शाप । यदुकुमरां अतिसंताप । भयें कंप सूटला ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः । इति विह्वलिता गेहानादायं मुसलं ययुः ॥१८॥

आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरु कोपविले शठें । निजधाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥७४॥ काय म्हणती नगरजन । कां छळूं गेले हे ब्राह्मण । चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घेऊन घरा आले ॥७५॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

तच्चोपनीय सदसि परिम्लानमुखश्रियः । राज्ञ आवेदयांचक्रुः सर्वयादवसन्निधौ ॥१९॥

सभेसि वसुदेव उग्रसेन । बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न । यादव बैसले संपूर्ण । एकला श्रीकृष्ण तेथ नाहीं ॥७६॥ सभे सांबादि आले सकळ । पुढां ठेवूनि लोहमुसळ । शापु सांगितला समूळ । मुखकमळ अतिम्लान ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

श्रूत्वाऽमोघं विप्रशापं दृष्टवा च मुसलं नृप । विस्मिता भयसंत्रस्ता बभूवुर्द्वारकौकसः ॥२०॥

ऐकून द्विजांचा परम कोपु । यादवां सुटला भयकंपु । मिथ्या नव्हे ब्रह्मशापु । भयें संतापु सर्वांसी ॥७८॥ प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली खळबळ । नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥७९॥ ऐक राया परीक्षिती । सबळ भविष्याची गती । वृत्तांतु श्रीकृष्णा न सांगती । विचार आपमतीं तिंहीं केला ॥३८०॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

तच्चूर्णयित्वा मुसलं यदुराजः स आहुकः । समुद्रसलिले प्रास्यल्लोहं चास्यावशेषितम्‌ ॥२१॥

आहुक राजा उग्रसेन । तेणें लावूनि लोहघण । मुसळ करोनियां चूर्ण । समुद्रीं जाण घालविलें ॥८१॥ त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ । उरळा वज्रपाय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला ॥८२॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ व २३ वा

कश्चिन्मत्स्योऽग्रसील्लोहं चूर्णानि तरलैस्ततः । उह्यमानानि वेलायां लग्नान्यासन्किलैरकाः ॥२२॥

मत्स्यो गृहीतो मस्यघ्नैर्जालनास्यैः सहार्णवे । तस्योदरगतं लोहं स शल्ये लुब्धकोऽकरोत् ॥२३॥

समुद्रलाटांचे कल्लोळ । तेणें तें लोहचूर्ण सकळ । प्रभासीं लागोनि प्रबळ । उठिलें तत्काळ येरिकारुपें ॥८३॥ लोहकवळु मीन गिळी । त्या मीनातें समुद्रजळीं । अन्यत्र मत्स्यसहित जाळीं । मत्स्यघ्न आकळी निजलाघवें ॥८४॥ तो मत्स्य मत्स्यघ्न विदारी । तंव लोह निघे त्याचे उदरीं । देखोनि हरिखला तो भारी । हें आंतुडे करीं तो सभाग्य ॥८५॥ मत्स्योदरींचें लोह जाण । त्याचें अचूक संधान । अगाध पारधी साधे पूर्ण । यालागीं तो बाण लुब्धकें केला ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

भगवान् ज्ञातसर्वार्थ इश्वरोऽपि तदन्यथा । कर्तुं नैन्छद्विप्रशापं कालरुप्यन्वमोदत ॥२४॥

कोणी न सांगतां हें पेखणें । जाणितलें सर्वज्ञें श्रीकृष्णें । परी द्विजशापु अन्यथा करणें । हें निजमनें स्पर्शेना ॥८७॥ म्हणाल हें नव्हेल त्यासी । पालटवेना द्विजशापासी । जो निमाल्या आणी गुरुपुत्रासी । कृष्ण कळिकाळासी नियंता ॥८८॥ पाडूनि कळिकाळाचे दांत । देवकीचे गतगर्भ आणीत । ईश्वरा ईश्वरु श्रीकृष्णनाथ । जाणे सर्वार्थनिजसिद्धी ॥८९॥ निद्रा न मोडितां तिळभरी । मथुरा आणिली द्वारकेभीतरी । श्रीकृष्ण काय एक न करी । तोही ममता न धरी कुळाची ॥३९०॥ निजकुळक्षयो जर्हीन आला । तर्हीन अन्यथा न करी ब्राह्मणबोला । ब्राह्मणें पांपरा जरी हाणितला । तो हृदयीं धरिला पदांकु ॥९१॥ तेंचि श्रीवत्सलांछन । सकळ भूषणां भूषण । हृदयीं मिरवी श्रीकृष्ण । यालागीं पूर्ण ब्रह्मदेवो ॥९२॥ श्रीकृष्ण शिरीं वंदी ब्राह्मन । अन्यथा न करी ब्राह्मणवचन । यालागीं ’ब्रह्मण्यदेवो’ पूर्ण । वेद बंदीजन वर्णिती ॥९३॥ ब्राह्मणरुप स्वयें श्रीहरी । यालागीं ब्राह्मणांचा कैवारी । कुळक्षयो जाहला जरी । तरी द्विजांवरी क्षोभेना ॥९४॥ ऐकोनि ब्राह्मणांचा शापु । न धरी मोहाचा खटाटोपु । म्हणे सिद्धी गेला कृतसंकल्पु । कुलक्षयानुरुपु संतोषे ॥९५॥ यापरी श्रीगोविंदु । काळरुपी मानी आनंदु । कुळक्षयाचा क्षितिबाधु । अल्पही संबंधु धरीना ॥९६॥ पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा । पुढील अध्यायीं ज्ञानकथा । अतिरसाळ स्वानंदता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥९७॥ जेथें नारद आणि वसुदेवा । संवाद होईल सुहावा । जनक आणि आर्षभदेवां । प्रश्नोत्तरीं जीवा स्वानंदु दाटे ॥९८॥ हे रसाळ ब्रह्मज्ञानमातु । चाखवीन निजपरमार्थु । एका जनार्दना विनवितु । श्रोते कृपा करितु अर्थावबोधें ॥३९९॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंसंहितायां एकाकार-टीकायां विप्रशापो नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]