Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय दुसरा

विकिस्रोत कडून

<poem> ॥श्रीः॥ ॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न॥


एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥

जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा । विश्वीं विश्वात्मा ये सद्भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥१॥ ते विश्वीं जो विश्ववासी । त्यातें विश्वासी म्हणसी । तेणें विश्वासें प्रसन्न होसी । तैं पायांपाशीं प्रवेशु ॥२॥ त्या चरनारविंदकृपादृष्टी । अहं सोहं सुटल्या गांठी । एकसरें तुझ्या पोटीं । उठाउठी प्रवेशलों ॥३॥ यालागीं तूं निजात्ममाये । या हेतू जंव पाहों जायें । तंव बापपण तुजमाजीं आहे । अभिनव काये सांगावें ॥४॥ येथ मातापिता दोनी । वेगळीं असती जनीं । ते दोनी एक करोनी । एका जनार्दनीं निजतान्हें ॥५॥ आतां उभयस्नेहें स्नेहाळा । वाढविसी मज बाळा । परी नित्य नवा सोहळा । संभ्रम आगळा निजबोधाचा ॥६॥ शिव शक्ति गणेशु । विश्व विष्णु चंडांशु । ऐसा अलंकार बहुवसु । निजविलासु लेवविशी ॥७॥ यापरी मज निजबाळा । लेणीं लेवविशी स्वलीळा । आणि लेइलेपणाचा सोहळा । पहाशी वेळोवेळां कृपादृष्टीं ॥८॥ बाळका लेवविजे लेणें । तयाचें सुख तें काय जाणे । तो सोहळा मातेनें भोगणें । तेवीं जनार्दनें भोगिजे सुख ॥९॥ आपुल्या चिद्रत्नांंच्या गांठी । आवडी घालिशी माझ्या कंठीं । यालागीं मज पाठोवाठीं । निजात्मदृष्टीं सवें धांवे ॥१०॥ समर्थ जयाचा जनकु । त्यास मानिती सकळ लोकु । एका जनार्दनीं एकु । अमान्य अधिकु मान्य कीजे ॥११॥ बाळक स्वयें बोलों नेणे । त्यासी माता शिकवी वचनें । तैशीं ग्रंथकथाकथनें । स्वयें जनार्दनें बोलविजे ॥१२॥ तेणें नवल केलें येथ । मूर्खाहातीं श्रीभागवत । शेखीं बोलविलें प्राकृत । एकादशार्थ देशभाषा ॥१३॥ परिसोनि प्रथम अध्यावो । उगाचि राहिला कुरुरावो । पुढें कथाकथनीं ठावो । कांहीं अभिप्रावो दिसेना ॥१४॥ आपण करावा प्रश्न । तंव हा सांगेल कृष्णनिधन । यालागीं राजा मौन । ठेला धरुन निवांत ॥१५॥ जाणोनि त्याचा अभिप्रावो । बोलत जाहला शुकदेवो । तो म्हणे मोक्षाचा प्रस्तावो । तो हा अध्यावो परीक्षिति ॥१६॥ हा एकादश अलोकिक । श्लोकाहून श्लोक अधिक । पदोपदीं मुक्तिसुख । लगटलें देख निजसाधकां ॥१७॥ ऐसें ऐकतांचि वचन । राजा जाहला सावधान । मुक्तिसुखीं आवडी गहन । अवधानें कान सर्वांग केले ॥१८॥ ऐसें देखोन परीक्षिती । शुक सुखावे अत्यंत चित्तीं । तो म्हणे अवधानमूर्ती । ऐक निश्चितीं गुह्य ज्ञान ॥१९॥ द्वितीयाध्यायीं निरुपण । नारद-वसुदेवसंवाद जाण । निमिजायंतांचे प्रश्न । मुख्य लक्षण भागवतधर्म ॥२०॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीशुक उवाच-गोविन्दभुजगुप्तायां द्वारवत्यां कुरुद्वह । अवात्सीन्नारदोऽभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः ॥१॥

जो मुक्तांमाजीं अग्रणी । जो ब्रह्मचारियां शिरोमणी । योगी वंदिती मुकुटस्थानीं । जो भक्तमंडणीं अतिश्रेष्ठ ॥२१॥ जो ब्रह्मरसाचा समुद्र । जो निजबोधाचा पूर्णचंद्र । तो बोलता झाला शुक योगींद्र । श्रोता नरेंद्र कुरुवंशींचा ॥२२॥ तो म्हणे व्यासाचा जो निजगुरु । आणि माझाही परमगुरु । नारद महामुनीश्वरु । त्यासी अतिआदरु श्रीकृष्णभजनीं ॥२३॥ द्वारकेहूनि स्वयें श्रीकृष्ण । पिंडारका पाठवी मुनिगण । तेथूनि नारद आपण । द्वारकेसी जाण पुनः पुनः येतु ॥२४॥ हो कां जे द्वारकेआंत । न रिघे भय काळकृत । जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ । असे नांदत निजसामर्थ्यें ॥२५॥ दक्षशापु नारदासी पाहीं । मुहूर्त राहों नये एके ठायीं । तो शापु हरिकीर्तनीं नाहीं । यालागीं तो पाहीं कीर्तननिष्ठु ॥२६॥ ज्याची गाइजे कीर्तनीं कीर्ती । तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती । तेथें शापबाधेची न चले प्राप्ती । यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें ॥२७॥ नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान । त्यासी कां कृष्णमूर्तीचें ध्यान । श्रीकृष्णदेहो चैतन्यघन । यालागीं श्रीकृष्णभजन नारदा पढियें ॥२८॥ यापरी कृष्णभजन । मुक्तांसी पढियें पूर्ण । त्यासी न भजे अभागी कोण । तेंचि निरुपण शुक सांगे ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

को नु राजन्निन्द्रियवान्मुकुन्दचरणाम्बुजम् । न भजेत्सर्वतोमृत्युरुपास्यममरोत्तमैः ॥२॥

ऐकें बापा नृपवर्या । येऊनि उत्तमा देहा या । जो न भजे श्रीकृष्णराया । तो गिळिला माया अतिदुःखें ॥३०॥ ज्या भगवंतालागुनी । माथा धरुनि पायवणी । सदाशिव बैसला आत्मध्यानीं । महाश्मशानीं निजवस्ती ॥३१॥ पोटा आला चतुरानन । इतरांचा पाडु तो कोण । देहा येवोनि नारायण । न भजे तो पूर्ण मृत्युग्रस्त ॥२२॥ त्यजूनि परमात्मा पूर्ण । नाना साधनें शिणती जन । त्यासी सर्वथा दृढबंधन । न चुके जाण अनिवार ॥३३॥ सांडूनि श्रीकृष्णचरण । इंद्रादि देवांचें करितां भजन । ते देव मृत्युग्रस्त पूर्ण । मा भजत्याचें मरण कोण वारी ॥३४॥ असोनि इंद्रियपाटव पूर्ण । जो न भजे श्रीकृष्णचरण । त्यासी सर्वत्र बाधी मरण । क्षणक्षण निर्दाळी ॥३५॥ तो नारद महामुनीश्वरु । मुक्त होऊनि भजनतत्परु । द्वारके वसे निरंतरु । श्रीकृष्णीं थोरु अतिप्रीति तया ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

तमेकदा देवर्षि वसुदेवो गृहागतम् । अर्चितं सुखमासीनमभिवाद्येदमब्रवीत् ॥३॥

धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वीं सर्वत्र गोविंदु । सर्वदा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदु सदोदित ॥३७॥ जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा । ज्याचेनि संगें तत्त्वतां । नित्यमुक्तता जडजीवां ॥३८॥ तो नारदु एके वेळां । स्वानंदाचिया स्वलीळा । आला वसुदेवाचिया राउळा । तेणें देखोनि डोळां हरिखला ॥३९॥ केलें साष्टांग नमन । बैसों घातलें वरासन । ब्रह्मसद्भावें पूजन । श्रद्धासंपूर्ण मांडिलें ॥४०॥ नारद तोचि नारायण । येणें विश्वासेंकरुनि जाण । हेमपात्रीं चरणक्षाळण । मधुपर्कविधिपूर्ण पूजा केली ॥४१॥ पूजा करोनि सावधानीं । वसुदेव बैसोनी सुखासनीं । हृदयीं अत्यंत सुखवोनी । काय आल्हादोनी बोलत ॥४२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

वसुदेव उवाच-भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सवदहिनाम् । कृपणानां यथा पित्रोरुत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥४॥

स्वलीला कृपा केली तुम्हीं । तेणें परम सभाग्य जाहलों जी मी । तुमचेनि आगमनें आम्ही । कृतकृत्य स्वामी सन्निधिमात्रें ॥४३॥ चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं । त्यासी मातेच्या आगमनीं । संतोष मनीं निर्भर ॥४४॥ त्याहूनि श्रेष्ठ तुमची यात्रा । नित्य सुखदाती भूतमात्रां । स्वलीला तुम्ही मही विचरां । दीनोद्धारालागुनी ॥४५॥ मातेच्या आगमनीं निजबाळा । दृष्टिउत्संगीं नित्य नवा सोहळा । तुमची यात्रा दीनां सकळां । भोगवी स्वलीळा निजात्मसुख ॥४६॥ माता सुख दे तें नश्वर । तुमच्या आगमनीं अनश्वर । नित्य चित्सुख चिन्मात्र । परात्पर भोगावया ॥४७॥ तुम्ही भागवतधर्ममार्गगामी । तैंचि तुमची भेटी लाहों आम्ही । जैं पुण्यकोटी निष्कामीं । प्रयागसंगमीं केलिया ॥४८॥ नारदा तूं भगवद्रूप । तुझी भेटी करी निष्पाप । तुवां कृपा केलिया अल्प । स्वयें चित्स्वरुप ठसावे ॥४९॥ तुझेनि भक्तीसी महिमा अमूप । तुझेनि वाढला भक्तिप्रताप । तुझेनि भक्ति भगवद्रूप । तूं चित्स्वरुप निजनिष्ठा ॥५०॥ तूं भक्तिप्रकाशकु दिवटा । कीं भक्तिमार्गींचा मार्गद्रष्टा । नारदा तुझा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां ॥५१॥ मुख्य भागवतशास्त्र पूर्ण । तुवां व्यासासी उपदेशून । प्रगट करविलें दशलक्षण । दीन जन उद्धरावया ॥५२॥ नारदा तूं देवासमान । हेही उपमा दिसे गौण । तेचिविषयीं निरुपण । वसुदेव आपण निरुपी ॥५३॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च । सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनाम् ॥५॥

देवांपासूनि भूतसृष्टी । सुखदुःखें शिणे पोटीं । अतिवृष्टी कां अनावृष्टी । भूतकोटी आकांतु ॥५४॥ त्या देवांपरीस साधु अधिक । हें साचचि मज मानलें देख । देवचरितें उठी सुखदुःख । साधु निर्दोख सुखदाते ॥५५॥ त्यांहीमाजीं तुजसारिखा । जोडल्या कृपाळू निजात्मसखा । तैं पेठ पिके परमार्थसुखा । हा महिमा लोकां कदा न कळेचि ॥५६॥ दिधल्या सुखासी मागुती । च्युती हों नेणे कल्पांतीं । ते अच्युतात्मस्थिती । तुजपाशीं निश्चितीं नारदा ॥५७॥ तुझिये महिमेपासीं । मुदल देवो न ये तुकासी । तेंही सांगेन मी तुजपासीं । यथार्थेंसीं नारदा ॥५८॥ देवाचा अवतार होये । दासां सुख, दैत्यां भये । तेथही ऐसें विषम आहे । हें न समाये तुजमाजीं ॥५९॥ तूं देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपासीं । रावण तुज नेऊनि एकांतासी । निजगुह्यासी स्वयें सांगे ॥६०॥ देव रावणें घातले बंदीं । तो रावण तुझे चरण वंदी । शेखीं रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमधीं असेना ॥६१॥ जरासंधु कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं । आणि कृष्णाचे सभेमाझारीं । आप्तत्वें थोरी पैं तुझी ॥६२॥ नाम घेवों नेदी देवाचें । हें बिरुद हिरण्यकशिपूचें । त्यासी कीर्तन तुझें रुचे । विषमत्व साचें तुज नाहीं ॥६३॥ लांचुगी बुद्धि सदा देवांसी । तैशी नाहीं तुम्हां साधूंसी । ऐक त्याही अभिप्रायासी । यथार्थेंसीं सांगेन ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

भजन्ति ये यथा देवान् देवा अपि तथैव तान् । छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥६॥

जे जैसे देव यागीं यजिजती । तैसतैसीं फळें देव देती । न भजत्यांतें विघ्नें सूचिती । ऐसी गती देवांची ॥६५॥ जैसजैसा पुरुष वेंठे । तैसतैसी छाया नटे । तेवीं भजनें देव प्रसन्न मोठे । येरवीं उफराटें विघ्न करिती ॥६६॥ जंव जंव सूर्य प्रकाशत असे । तंव तंव छाया सरिसी दिसे । निजकर्मे देवही तैसे । कर्मवशें प्रसन्न ॥६७॥ सूर्यअस्तमानीं छाया नासे । अभजनें देव क्षोभती तैसे । एवं लांचुगे देव ऐसे । तूंही अनायासें जाणसी ॥६८॥ इतर देवांची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण । तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥६९॥ त्याचें जीवें सर्वस्वें भजन । केल्या निजांग देऊनि होये प्रसन्न । परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे ॥७०॥ तैसी नव्हे तुमची बुद्धी । दीनदयाळ त्रिशुद्धी । तूं तंव केवळ कृपानिधी । ऐक तो विधी सांगेन ॥७१॥ तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गुह्यज्ञान । ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥७२॥ प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हां । तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥७३॥ केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एकाएक । महाकवि केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥७४॥ देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी । ऐसा तूं कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥७५॥ वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचें पाप । शेखीं सायुज्याचे दीप । दाविशी सद्रूप दयाळुवा ॥७६॥ तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारीं । म्हणौनि देवो तुमचा आज्ञाधारी । तुम्ही म्हणाल त्यातें उद्धरी । येर्हहवीं हातीं न धरी आनातें ॥७७॥ ऐसा तूं दीनदीक्षागुरु । ब्रह्मज्ञानें अतिउदारु । तरी पुसेन तो विचारु । निजनिर्धारु सांगावा ॥७८॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

ब्रह्मंस्तथापि पृच्छामो धर्मान्भागवतांस्तव । यान् श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते विश्वतो भयात् ॥७॥

आदरें म्हणे देवऋषी । आजि सकळ पुण्यें आलीं फळासी । मायबाप तूं घरा आलासी । निजसुखासी दायक ॥७९॥ कृपा केली मागील शिष्यां । तेचि कृपेचा घालीं ठसा । मज तुझा पूर्ण भरवंसा । सोडवीं भवपाशापासूनि ॥८०॥ तुझेनि दर्शनें कृतकृत्यता । जर्हीा मज जालि तत्त्वतां । तर्हीि भागवतधर्मकथा । कृपेनें तत्त्वतां सांगावी ॥८१॥ ऐसे सांगावे भागवतधर्म । जेणें निरसे कर्माकर्म । श्रद्धेनें ऐकतां परम । जन्ममरण हारपे ॥८२॥ भवभय अतिदारुण । त्या भयाचें माया निजकारण । तिचें समूळ होय निर्दळण । ऐसे धर्म कृपेनें सांगावे ॥८३॥ मज नाहीं अधिकार पूर्ण । ऐसें विचाराल लक्षण । तेविषयींची हे विनवण । सावधान अवधारीं ॥८४॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

अहं किल पुराऽनन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् । अपूजयं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥८॥

मज अधिकारु नाहीं पूर्ण । हें मीही जाणतों आपण । मागें म्यां केलें भगवद्भजन । तें तूं कथन अवधारीं ॥८५॥ म्यां पूर्वी आराधिलें देवराया । तें भजन ममता नेलें वांयां । प्रलोभविलों देवमाया । पुत्रस्नेहालागूनि ॥८६॥ मज देव तुष्टला प्रसन्नपणें । मागसी तें देईन म्हणे । तेथें मायेनें ठकिलें मजकारणें । माझा पुत्र होणें मी मागें ॥८७॥ तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान । तोचि वंदी माझे चरण । म्हणे बाळक पूर्ण मी तुझें ॥८८॥ यापरी श्रीकृष्णपासीं । ज्ञानप्राप्ति नव्हे आम्हांसी । कृष्ण परमात्मा हृषीकेशी । हें निश्चयेंसीं मी जाणें ॥८९॥ श्रीकृष्ण जन्मला माझिया कुशीं । म्हणौनि श्रद्धा आहे मजपाशीं । तेणेंचि तूं तुष्टलासी देवऋषी । तरी निजकृपेंसीं उद्धरीं ॥९०॥ जे मायेनें ठकिलों वाडेंकोडें । ते माया समूळ झडे । ऐसें सांगिजे रोकडें । बहु बोलोनि पुढें काय काज ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

यया विचित्रव्यसनाद्भवद्भिर्विश्वतो भयात् । मुच्येमह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सुव्रत ॥९॥

मायाजलें भवसागरु । भरला असे अतिदुस्तरु । त्याचा उतरावया पैलपारु । होय तूं तारुं मुनिराया ॥९२॥ याचें सकळ जळ क्षार । माजीं सावजें अनिवार । एकएकें चराचर । गिळिलें साचार निजशक्तीं ॥९३॥ लाटांवरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा । आदळती अविवेकतटा । धैर्याचिया कांठा पाडित ॥९४॥ अहं-कुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे सागरु । मी-माझेनि गजरें घोरु । अतिदुर्धर गर्जत ॥९५॥ नाना वासनांचा वळसा । पाहें पां भंवताहे कैसा । येथ तरावया धिंवसा । नव्हे सहसा सुरनरां ॥९६॥ क्रोधाचें प्रबळ भरतें । भरी द्वेषाचिया तरियांतें । असूयातिरस्कारांची तेथें । चिडाणी उते अनिवार ॥९७॥ कामपर्वताचीं शिखरें । विषमें भासती अपारें । आशेइच्छेचीं वरी थोरें । झाडें विषयांकुरें वाढलीं ॥९८॥ संकल्पविकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण । ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण । सागरीं जाण तळपती ॥९९॥ एवढाही हा भवसागरु । शोषिता तूं अगस्ती साचारु । तुझेनि भवाब्धिपैलपारु । पावों हा निर्धारु जाहला आम्हां ॥१००॥ याचा विश्वतोभय हेलावा । तो आम्हां न बाधी तुमच्या कणवा । अप्रयासें नारददेवा । मरणार्णवा मज तारीं ॥१॥ पायीं उतरुन भवसागरु । साक्षात्‌ पावें परपारु । ऐसा भागवतधर्मविचारु । तो निजनिर्धारु प्रबोधीं ॥२॥ ऐकोनि वसुदेवाची उक्ती । नारद सुखावला चितीं । तोचि अभिप्रावो परीक्षिती । शुक स्वमुखें स्थिति सांगत ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

श्रीशुक उवाच-राजन्नेवं कृतप्रश्नो वसुदेवेन धीमता । प्रीतस्तमाह देवर्षिर्हरेः संस्मारितो गुणैः ॥१०॥

सांगतां वसुदेवाचा प्रश्न । श्रीशुक जाहला स्वानंदपूर्ण । नारदु वोळला चैतयघन । चित्सुखजीवन मुमुक्षां ॥४॥ श्रीशुक म्हणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा । ऐकोनि प्रश्नसुहावा । तो म्हणे वसुदेवा धन्य वाणी ॥५॥ परिसतां हा तुझा प्रश्न । चित्सुखें प्रगटे नारायण । ऐसें बोलतां नारद जाण । स्वानंदें पूर्ण वोसंडला ॥६॥ रोमांच उचलले अंगीं । स्वेद दाटला सर्वांगीं । आनंदाश्रु चालिले वेगीं । स्वानंदरंगीं डुल्लतु ॥७॥ सप्रेम मीनलिया श्रोता । जैं पूर्ण सुखावेना वक्ता । तैं तो जाणावा अवघा रिता । कथासारामृता चवी नेणे ॥८॥ ऐकतां वसुदेवाचा प्रश्न । नारद सुखावे पूर्ण । मग स्वानंदगिरा गर्जोन । काय आपण बोलत ॥९॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

नारद उवाच-सम्यगेतद्ववसितं भवता सात्वतर्षभ । यत्पृच्छसे भागवतान्धर्मांस्त्वं विश्वभावनान् ॥११॥

नारद म्हणे सात्वतश्रेष्ठा । वसुदेवा परमार्थनिष्ठा । धन्य धन्य तुझी उत्कंठा । तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥११०॥ ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हें विश्व अवघेंचि उद्धरे । हें विचारिलें तुवां बरें । निजनिर्धारें श्रीकृष्णजनका ॥११॥ तुझेनि प्रश्नोत्तरें जाण । साधक निस्तरती संपूर्ण । साधकांचें नवल कोण । महापापी पावन येणें होती ॥१२॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

श्रुतोऽनुपठितो ध्यात आदृतो वाऽनुमोदितः । सद्यः पुनाति सद्धर्मो देवविश्वद्रुहोऽपि हि ॥१२॥

भागवतधर्माचेनि गुणें । एक उद्धरती श्रवणें । एक तरती पठणें । एक निस्तरती ध्यानें संसारपाश ॥१३॥ एक श्रोतयां वक्तयांतें । देखोनि सुखावती निजचित्तें । सद्भावें भलें म्हणती त्यांतें । तेही तरती येथें भागवतधर्में ॥१४॥ हें नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दुरात्मा । अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा । तोही तरे हा महिमा भागवतधर्मी ॥१५॥ हृदयीं धरितां भागवतधर्म । अकर्म्याचें निर्दळी कर्म । अधर्म्याचें निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥१६॥ जेथ रिघाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म । निंदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचें नाम उरों नेदी ॥१७॥ ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेनें केला प्रश्न तुवां थोर । निजभाग्यें तूं अति उदार । परम पवित्र वसुदेवा ॥१८॥ तुझें वानूं पवित्रपण । तरी पोटा आला श्रीकृष्ण । जयाचेनि नामें आम्ही जाण । परम पावन जगद्वद्य ॥१९॥ तो स्वयें श्रीकृष्णनाथ । नित्य वसे तुझिया घरांत । तुझियाऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहतां ॥१२०॥ वसुदेवा तुझिया नामतां । वासुदेव ’म्हणती अनंता । तें वासुदेव नाम स्मरतां । परमपावनता जगद्वंद्यां ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

त्वया परमकल्याण पुण्यश्रवणकीर्तनः । स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥१३॥

ज्याचेनि श्रवणें वाढे पुण्य । ज्याचेनि नामें झडे भवबंधन । तो सद्य स्मरविला तुवां नारायण । तुझी वाचा कल्याण वसुदेवा ॥२२॥ तुझा आजि ऐकतांचि प्रश्न । पूर्ण प्रगटला नारायण । मज तुझा हा उपकार पूर्ण । तूं परम कल्याण वसुदेवा ॥२३॥ आशंका ॥ ऐकोनि नारदाचें वचन । झणें विकल्प धरील मन । यासी पूर्वी होतें विस्मरण । आतां जाहलें स्मरण वसुदेवप्रश्नें ॥२४॥ ज्यांची ऐसी विकल्पयुक्ती । ते जाणावे निजात्मघाती । तेही अर्थीची उपपत्ती । ऐक निश्चितीं शुक सांगे ॥२५॥ अग्नि कुंडामाजीं स्वयंभ असे । तो धृतावदानें अति प्रकाशे । तेवीं सप्रेम प्रश्नवशें । सुख उल्लासे मुक्तांचें ॥२६॥ सप्रेम भावार्थें मीनला श्रोता । मुक्तही उल्हासें सांगे कथा । तेथील सुखाची सुखस्वादुता । जाणे जाणता सवर्म ॥२७॥ यालागीं मुक्त मुमुक्षु विषयी जन । भागवतधर्में निवती संपूर्ण । तोचि वसुदेवें केला प्रश्न । तेणें नारद पूर्ण सुखावला ॥२८॥ जे कां पूर्वपरंपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ । सांगावया नारदमुनि निश्चित । उपपादित इतिहासु ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् । आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मनः ॥१४॥

येच अर्थी विदेहाचा प्रश्न । संवादती आर्षभ नवजण । ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास संपूर्ण सांगेन ऐक ॥१३०॥ आर्षभ कोण म्हणसी मुळीं । त्यांची सांगेन वंशावळी । जन्म जयांचा सुकुळीं । नवांमाजीं जाहली ब्रह्मनिष्ठा ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

प्रियव्रतो नाम सुतो मनोः स्वायंभुवस्य यः । तस्याग्नीध्रस्ततो नाभिऋषभस्तत्सुतः स्मृतः ॥१५॥

स्वायंभु मनूचा सुतु । जाण नामें ’प्रियव्रतु’ । त्याचा ’आग्रीध्र’ विख्यातु । ’नाभी’ त्याचा सुतु सूर्यवंशीं ॥३२॥ त्या नाभीपासूनि ज्ञानविलासु । ’ऋषभ’ जन्मला वासुदेवांशु । मोधधर्माचा प्रकाशु । जगीं सावकाशु विस्तारिला ॥३३॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

तमाहुर्वासुदेवांशं मोक्षधर्माविवक्षया । अवतीर्णं सुतशतं तस्यासीद्वेदपारगम् ॥१६॥

ऋषभ वासुदेवाचा अंशु । ये लोकीं मोक्षधर्मविश्वासु । प्रवर्तावया जगदीशु । हा अंशांशु अवतार ॥३४॥ त्याचें पंचमस्कंधीं चरित्र । सांगितलें सविस्तर ।त्यासी जाहले शत पुत्र । वेदशास्त्रसंपन्न ॥३५॥ त्यांहीमाजीं ज्येष्ठ पुत्र । अतिशयें परम पवित्र । ऐक त्याचें चरित्र । अतिविचित्र सांगेन ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायणपरायणः । विख्यातं वर्षमेतद्यन्नाम्ना भारतमद्भुतम् ॥१७॥

जो ज्येष्ठपुत्र ’भरत’ जाण । तो नारायणपरायण । अद्यापि ’भरतवर्ष’ उच्चारण । त्याचेनि नांवें जाण विख्यात ॥३७॥ जो मनसा-वाचा-कर्मणा । अखंड भजे नारायणा । असतांही राज्यधर्मी जाणा । जो आत्मखुणा न चुके ॥३८॥ जेवीं मार्गीं चालतां । पाउलें वक्रेंही टाकितां । दैववशें अडखुळतां । आश्रयो तत्त्वतां भूमिकाचि ॥३९॥ तेवींचि तयासी असतां । राज्यधर्म चाळितां । यथोचित कर्म आचरतां । निजीं निजात्मता पालटेना ॥१४०॥ या नांव बोलिजे ’अखंडस्थिती’ । जे पालटेना कल्पांतीं । जेथ असतां सुखी होती । पुनरावृत्ति असेना ॥४१॥ ऐसें करी सदाचरण । आणि नारायणपरायण । आईक त्याचेंही व्याख्यान । विशद करुन सांगेन ॥४२॥ नरांचा समुदाय गहन । त्यासी ’नार’ म्हणती जाण । त्याचें ’अयन’ म्हणजे स्थान । म्हणौनि म्हणती ’नारायण’ आत्मयासी ॥४३॥ त्याच्या ठायीं परायण । म्हणिजे अनन्यत्वें शरण । निवटूनियां आपुलें अहंपण । तद्रूपें जाण राहिला ॥४४॥ ऐसा तो ऋषभाचा पुत्र । जयासी नांव ’भरत’ । ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजीं ॥४५॥ तो भरतु राहिला ये भूमिकेसी । म्हणौनि ’भारतवर्ष’ म्हणती यासी । सकळ कार्यारंभीं करितां संकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताति ॥४६॥ ऐसा आत्माराम जर्हीि झाला । तर्हीच विषयसंग नव्हे भला । यालागीं त्याचा वृत्तांतु पुढिला । सांगेन सकळां आइकें ॥४७॥ नामें ख्याती केली उदंड । यालागीं त्यातें म्हणती ’भरतखंड’ । आणीकही प्रताप प्रचंड । त्याचा वितंड तो ऐका ॥४८॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

स भुक्तभोगां त्यक्त्वे-मां निर्गतस्तपसा हरिम् । उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिस्त्रिभिः ॥१८॥

तेणें दिग्मंडल जिंतिलें । समुद्रवलयांकित राज्य केलें । नानाविध भोग भोगिले । जे नाहीं देखिले सुरवरीं ॥४९॥ अनुकूळ स्त्रिया पुत्र । अनुकूळ मंत्री पवित्र । अनुकूळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ॥१५०॥ ऐसे भोग भोगिलियापाठीं । सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी । स्वयें निघाला जगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥५१॥ जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती । भरतें केली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥५२॥ तो तेणेंचि जन्में जाण । होआवा मोक्षासी आरोहण । परी जाहलें जन्मांतरकारण । तेंही विंदाण सांगेन ॥५३॥ संनिहितप्रसूतिकाळीं । मृगी जळ प्राशितां जळीं । ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडालि तत्काळीं अतिसत्राणें ॥५४॥ धाकें गर्भु तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळीं । देखोनि कृपाळु कळवळी । काढी तत्काळीं दयाळुत्वें ॥५५॥ मृगी न येचि परतोन । मातृहीन हें अतिदीन । भरत पाळी भूतदयेनें । मृगममता पूर्ण वाढली ॥५६॥ स्नान संध्या अनुष्ठान । करितां मृग आठवे क्षणक्षण । आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥५७॥ आसनीं भोजनीं शयनीं । मृग आठवे क्षणक्षणीं । मृग न देखतां नयनीं । उठे गजबजोनि ध्यानत्यागें ॥५८॥ ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छेंसीं । त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकर्षी देहातें ॥५९॥ यालागीं साचचि जाण । ममतेपाशीं असे मरण । जो निर्मम संपूर्ण । त्यासि जन्ममरण स्पर्शेना ॥१६०॥ भरत तपिया थोर अंगें । तेथ काळ कैसेनि रिघे । ममतासंधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगें पावला ॥६१॥ देहासी येतां मरण । भरतासी मृगाचें ध्यान । तेणें मृगजन्म पावे आपण । जन्मांतरकारण जाहलें ऐसें ॥६२॥ कृपेनें केला जो संगु । तोचि योगियां योगभंगु । यालागीं जो निःसंगु । तो अभंगु साधक ॥६३॥ मृगाचेनि स्मरणें निमाला । यालागीं तो मृगजन्म पावला ॥ जो कृष्णस्मरणें निमाला । तो कृष्णुचि जाला देहांतीं ॥६४॥ अंतकाळीं जे मती । तेचि प्राणियांसी जाण गती । यालागीं श्रीकृष्ण चित्तीं । अहोरातीं स्मरावा ॥६५॥ परी मृगदेहीं जाण । भरतासी श्रीकृष्णस्मरण । पूर्वीं केलें जें अनुष्ठान । तें अंतर जाण कदा नेदी ॥६६॥ मागुता तिसरे जन्में पाहें । तो ’जडभरत’ नाम लाहे । तेथें तो निर्ममत्वें राहे । तेणें होय नित्यमुक्त ॥६७॥ बहुतां जन्मींची उणीवी । येणें जन्में काढिली बरवी । निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥६८॥ ऋषभपुत्रउत्पत्ती । शतबंधु जाण निश्चितीं । त्यांत हे ज्येष्ठाची स्थिती । उरल्यांची गती ते ऐका ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

तेषां नव नवद्वीपपतयोऽस्य समन्ततः । कर्मतन्त्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥१९॥

नव नवखंडांप्रती । ते केले खंडाधिपती । एक्यायशीं जणांची स्थिती । कर्ममार्गीं होती प्रवर्तक ॥१७०॥ उरले जे नव जण । सकळ भाग्याचें भूषण । ब्रह्मज्ञानाचें अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचें ॥७१॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नवाभवन्महाभागा मुनयो ह्यर्थशंसिनः । श्रमणा वातरशना आत्मविद्याविशारदाः ॥२०॥

ऋषभकुळीं कुळदीप । स्नेहसूत्रेंवीण देदीप्य । नवही जण स्वयें सद्रूप । सायुज्यस्वरुपप्रकाशक ॥७२॥ आत्माभ्यासीं परिश्रम । करुन निरसिलें कर्माकर्म । यालागीं ते अकृताश्रम । निजनिभ्रम स्वयें जाहले ॥७३॥ शाब्दबोधें सदोदित । ब्रह्मज्ञानपारंगत । शिष्यप्रबोधीं समर्थ । परमाद्भुत अतिदक्ष ॥७४॥ ते ब्रह्मविद्येचें चालतें डिंब । त्यांचे अवेव ते ब्रह्मकोंब । ते विद्येचें पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ परब्रह्म ॥७५॥ दशदिशा एकूचि दोरा । भरुनि पांघरुणें मुनीश्वरा । वारा वळून कडदोरा । बांधिला पुरा ग्रंथीरुप ॥७६॥ आकाशाच्या ठायीं । अंबरत्व केलें तिंहीं । ते चिदंबर पाहीं । एकचि नवांही पांघरुण ॥७७॥ प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी केली नाभीच्या ठायीं । तंव जीवग्रंथी सुटली पाहीं । तेंचि नवांही ब्रह्मसूत्र ॥७८॥ ऐसे परब्रह्मवैभवें । निडारले निजानुभवें । त्यांचीं सांगेन मी नांवें । यथागौरवें तें ऐक ॥७९॥ ज्यांचें नाम ऐकतां । कांपत काळ पळे मागुता । संसार नुघवी माथा । नाम स्मरतां जयांचें ॥१८०॥ त्यांचिया नामांची कीर्ती । आईक सांगेन परीक्षिती । ज्यांचेनि नामें आतुडे मुक्ती । जाण निश्चितीं भाविकां ॥८१॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥२१॥

कवि हरि अंतरिक्ष । प्रबुद्ध पिप्पलायन देख । आविर्होत्र द्रुमिल सुटंक । चमस निर्दोष करभाजन ॥८२॥ एवं नवही नांवें जाण । यांचें करितां नामस्मरण । सकळ पापा निर्दळण । हे महिमा पूर्ण तयांची ॥८३॥ त्यांची परमहंसस्थिती । सांगेन मी तुजप्रती । ज्यांचेनि पावन होय क्षिती । त्या या नव मूर्ती पुण्य पूज्य ॥८४॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

एते वै भगवद्रूपं विश्वं सदसदात्मकम् । आत्मनोऽव्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥२२॥

ते वेगळे दिसती नवांक । परी भगवद्रूपें अवघे एक । संतासंत जन अनेक । आपणांसगट देख एकत्वें पाहती ॥८५॥ त्यांसी तंव असंतता । उरली नाहीं सर्वथा । संत म्हणावया पुरता । भेदु न ये हाता चिन्मयत्वें ॥८६॥ जग परिपूर्ण भगवंतें । आपण वेगळा नुरे तेथें । तंव भगवद्रूप समस्तें । भूतें महाभूतें स्वयें देखे ॥८७॥ हेंहीं देखतें देखणें । तेंही स्वयें आपण होणें । होणें न होणें येणें जाणें । हीं गिळूनि लक्षणें विचरती मही ॥८८॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

अव्याहतेष्टवतयः सुरसिद्धसाध्यगन्धर्वयक्षनरकिन्नरनागलोकान् । मुक्ताश्चरन्ति मुनिचारणभूतनाथविद्याधरद्विजगवां भुवनानि कामम् ॥२३॥

वैकुंठ कैलास सुरसिद्धस्थानें । सप्तपाताळादि गमनें । एवं श्लोकोक्त चवदा भुवनें । स्वइच्छा विचरणें कामनारहित ॥८९॥ त्यांसी जीवीं नाहीं विषयासक्ती । यालागीं खुंटेना त्यांची गती । इच्छामात्रें गमनशक्ती । सुखें विचरती निष्काम ॥१९०॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

त एकदा निमेः सत्रमुपजग्मुर्यदृच्छया । वितायमानमृषिभिरजनाभेर्महात्मनः ॥२४॥

जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसे स्वइच्छा विचरतां मही । आले ते पाहीं कर्मभूमीसी ॥९१॥ मही विचरतां वितंड । पातले ’अजनाभ’ खंड । तंव विदेहाचा याग प्रचंड । मीनले उदंड ऋषीश्वर ॥९२॥ याग वेदोक्तविधी निका । कुंडमंडप वेदिका । आवो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशुद्ध ॥९३॥ स्त्रुक्‌-स्त्रुवा-त्रिसंधानें । विस्तारुनि परिस्तरणें । अखंड वसुधारा दंडाप्रमाणें । ऋषिमंडणें होम करिती ॥९४॥ होम होतां संपूर्ण । पूर्णाहुतीसमयीं जाण । येतां देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजें ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

तान्दृष्टवा सूर्यसंकाशान्महाभागवतान्नृप । यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एवोपतस्थिरे ॥२५॥

अमित सूर्यांचिया कोटी । हारपती नखतेजांगुष्ठीं । तो भगवंत जिंहीं धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥९६॥ त्यांचिया अंगप्रभा । सूर्य लोपताहे उभा । जिंहीं प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥९७॥ नवखंड पृथ्वीचे अलंकार । नवनिधींचें निजसार । नवरत्नां चेंही निजभांडार । तें हे साकार नवही जण ॥९९॥ कीं ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण । नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥२००॥ आव्हानिले तिन्ही अग्नी । उभे ठेले त्यांतें देखोनी । ते हे भागवतीं देखिले नयनीं । इतरांलागुनी दिसेना ॥१॥ येतां देखोनि तेजोमूर्ती । ऋत्विज आचार्य उभे ठाकती । साउमा धांवे विदेहनृपती । स्वानंदवृत्ती सन्मानी ॥२॥ सवेग घाली लोटांगण । मुगुट काढोनि आपण । मस्तकीं वंदूनियां चरण । पूर्णादरें जाण आणिता झाला ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

विदेहस्तानभिप्रेत्य नारायणपरायणान् । प्रीतः संपूजयांचक्र आसनस्थान्यथाऽर्हतः ॥२६॥

त्यांतें जाणोनि भगवत्पर । विदेहा आल्हाद थोर । त्यांचे पूजेसी अत्यादर । स्वयें सादर पैं झाला ॥४॥ श्रद्धायुक्त चरणक्षालन । धूप दीप सुमन चंदन । पूजा मधुपर्कविधान । केलें संपूर्ण यथायोग्य ॥५॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

तान्रो चमानान्स्वरुचा ब्रह्मपुत्रोपमान्नव । पप्रच्छ परमप्रीतः प्रश्रयावनतो नृपः ॥२७॥

निजांगींच्या निजप्रभा । अंगासी आणिली शोभा । काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा शोभायमान ॥६॥ निजहृदयींचें ब्रह्मज्ञान । परिपाकें प्रकाशलें पूर्ण । तेंचि निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥७॥ मुगुट कुंडलें कंकण । मूर्खाअंगीं बाणलीं पूर्ण । ते शोभा लोपूनि मूर्खपण । बाहेर संपूर्ण प्रकाशे ॥८॥ तैसे नव्हती हे ज्ञानघन । ब्रह्मपूर्णत्वें विराजमान । तेंचि त्यांसी निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥९॥ ब्रह्मानुभवें पूर्णत्व पूर्ण । इंद्रियद्वारा विराजमान । तें त्यांसी निजशांतिभूषण । मुगुट कंकण तें तुच्छ ॥२१०॥ मागां वाखाणिले सनकादिक । त्यांसमान कीं अधिक । ऐसा विचारितां परिपाक । त्यां यां वेगळीक दिसेना ॥११॥ त्यांची यांची एक गती । त्यांची यांची एक स्थिती । त्यांची यांची एक शांती । भेदु निश्चितीं असेना ॥१२॥ त्यांच्याऐसे हे सखे बंधु । त्यांच्याऐसा समान बोधु । त्यांच्याऐसा हा अनुवादु । सर्वथा भेदु असेना ॥१३॥ ते चौघे हे नव जण । अवघ्यां एकचि ब्रह्मज्ञान । त्यांची यांची शांती समान । हें विदेहासी पूर्ण कळूं सरलें ॥१४॥ ऐसें परिपूर्णत्व जाणोनी । राजा सुखावे स्थिति देखोनी । मग अतिविनीत होऊनी । मृदु मंजुळ वचनीं विनवीत ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

विदेह उवाच-मन्ये भगवतः साक्षात्पार्षदान्वो मधुद्विषः । विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति हि ॥२८॥

सार्वभौम चक्रवर्ती । देहीं असोनि विदेहस्थिती । तो जनकु आर्पभांप्रती । अतिप्रीतीं विनवितु ॥१६॥ त्यांच्या भेटीसवें उलथलें सुख । विदेहासी देहेंवीण हरिख । तेणें हरिखेंकरुनियां देख । प्रीतिपूर्वक विनवितु ॥१७॥ तुमचें सामर्थ्य पाहतां येथ । तुम्ही ईश्वररुप समस्त । देहभावें तरी भगवद्भक्त । जैसे पार्षद हरीचे ॥१८॥ देवो आपुला आपण भक्तु । ऐसा जो कां उपनिषदर्थु । तो साच करुनि वेदार्थु । निजपरमार्थु अनुभवा ॥१९॥ ’शिव होऊनि शिवु यजिजे’ । हें लक्षण तुम्हांसीच साजे । येरीं हे बोलचि बोलिजे । परी बोलते वोजें अर्थ न लभे ॥२२०॥ विष्णूनें सृष्टीं जें जें स्त्रजणें । तें तें तुम्हीं पवित्र करणें । मही विचरायाचीं कारनें । कृपाळूपणें दीनोद्धारा ॥२१॥ तुम्ही विचरा विश्वकणवा । परी भेटी होय प्राप्ति तेव्हां । आजि लाधलों तुमची सेवा । उद्भट दैवाथिलों मी ॥२२॥ आजि माझें धन्य दैव । आजि माझें धन्य वैभव । आजि धन्य मी सर्वीं सर्व । हे चरण अपूर्व पावलों ॥२३॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङगुरः । तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥२९॥

सकल देहांमाजीं पहा हो । अतिदुर्लभ मनुष्यदेहो । त्याचिया प्राप्तीचा संभवो । तो अभिप्रावो अतिदुर्गम ॥२४॥ सुकृतदुष्कृत समान समीं । तैं पाविजे कर्मभूमी । तेंचि जैं पडे विषमीं । तैं स्वर्गगामी कां नरकीं ॥२५॥ समानकर्मी नरदेह जोडे । तरी समस्तां समबुद्धि न घडे । त्यां समांमाजीं विषम गाढें । जेणें पडे तें ऐका ॥२६॥ पापाचा एकु महाचिरा । पुण्यें जोखणीं चाराचुरा । समान आलिया तुळाभारा । येणें जन्में नरा दृढ पापबुद्धी ॥२७॥ वाळू आणि सुवर्ण । जोखितां झाल्याही समान । सोनियालागीं वेंचिती धन । वाळू ते जाण न घेती फुकट ॥२८॥ एकाचें पुण्य अत्यंत थोर । पाप लहानसहान एकत्र । करुनि जोखितां तुळाभार । समान साचार जैं होय ॥२९॥ ऐसेनि कर्में जे जन्मती । त्यांसी पुण्यावरी अतिप्रीती पुण्य पाप दोनी झडती । तैं नित्यमुक्ति पाविजे ॥२३०॥ ऐशा अतिसूक्ष्म संकटीं । मनुष्यदेहीं होय भेटी । तेथेंही अभिमान अति उठी । धन दारा दिठी विषयांच्या ॥३१॥ मनुष्यदेहींचेनि आयुष्यें । विषयीं सायास करिती कैसे । अमृत देऊनि घे जैसें । तान्हें सावकाशें मृगजळ ॥३२॥ गंधर्वनगरींचीं ठाणीं । घेतलीं देऊनि चिंतामणी । तैशी लटिकियालागीं आटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥३३॥ तोडूनि कल्पतरुंचे उद्यान । सायासीं तें वाहोनि रान । तेथें साक्षेपें पेरिली जाण । आणूनि आपण विजया जैशी ॥३४॥ तैसें नरदेह येऊनि नरां । करिती आयुष्याचा मातेरा । पूर्ण व्यवसावो शिश्नोदरां । उपहास निद्रा कां निंदा ॥३५॥ नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयांची खटपट । कदा आरायिल्या चोखट । स्वेच्छा सारीपाट खेळणें ॥३६॥ नाना विनोद टवाळी । नित्य विषयांची वाचाळी । त्यासी जपतां रामनामावळी । पडे दांतखिळी असंभाव्य ॥३७॥ घरा आली कामधेनु । दवडिती न पोसवे म्हणूनु । तेवीं श्रीरामनाम नुच्चारुनु । नाडला जनु नरदेहीं ॥३८॥ करितां नरदेहीं अहंकार । तंव तो देहचि क्षणभंगुर । देहीं देहवंता भाग्य थोर । जैं भगवत्पर भेटती ॥३९॥ ज्यांसी भगवद्भक्तीची अति गोडी । त्यांवरी भगवंताची आवडी । त्यांची भेटी तैं होय रोकडी । जैं पुण्याच्या कोडी तिष्ठती ॥२४०॥ ज्यांचिया आवडीच्या लोभा । भगवंतु पालटें आला गर्भा । दशावतारांची शोभा । जाहली पद्मनाभा ज्यांचेनि ॥४१॥ ऐसे कृष्णकृपासमारंभें । जे भगवंताचे वालभे । त्यांची भेटी तैंचि लाभे । जैं भाग्यें सुलभें पैं होती ॥४२॥ निष्कामता निजदृष्टी । अनंत पुण्यकोटयनुकोटी । रोकडया लाभती पाठोपाठीं । तैं होय भेटी हरिप्रियांची ॥४३॥ व्याघ्रसिंहांचें दूध जोडे । चंद्रामृतही हाता चढे । परी हरिप्रियांची भेटी नातुडे । दुर्लभ भाग्य गाढें मनुष्यां ॥४४॥ व्याघ्रसिंहदुधासाठीं । अतिसबळता जोडे पुष्टी । परी जन्ममरणांची तुटी । दुधासाठीं कदा नव्हे ॥४५॥ म्हणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी । मुख्य चंद्रचि क्षयरोगी । त्याचें अमृत निरोगी करी केवीं ॥४६॥ व्याघ्रसिंहदुग्धाचे शक्तीं । प्राणी जैं अजरामर होती । तैं तेणें दुग्धें ज्यांची उत्पत्ती । ते कां मरती व्याघ्रसिंह ॥४७॥ जैं हरिभक्तांची भेटी घडे । तैं न बाधी संसारसांकडें । जन्ममरण समूळीं उडे । त्यांची भेटी आतुडे अतिभाग्यें ॥४८॥ आजि मी भाग्यें सभाग्य पूर्ण । लाधलों तुमचें दर्शन । तरी ’आत्यंतिक क्षेम’ कोण । तें कृपा करुन मज सांगा ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

अत आत्यन्तिकं क्षेमं पृच्छामो भवतोऽनघाः । संसारेऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्सङगः शेवधिर्नृणामू ॥३०॥

म्हणों तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ । नासती सकळ कलिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व ॥२५०॥ स्नान केलिया गंगा । पवित्र करी सकळ जगा । ते गंगाही निजपापभंगा । तुमचे चरणसंगा वांछीत ॥५१॥ तुमची दर्शनसंग-चिद्गंगा । अत्यंत दाटुगी माजीं जगा । दर्शनमात्रें ने भव भंगा । जन्ममरण पैं गा मग कैंचें ॥५२॥ तेथें कायसा गंगेचा पडिपाडु । नाहीं तीर्थमहिमेसी पवाडु । तीर्थां भवदोष अवघडु । त्यांचा करी निवाडु दृष्टिसंगें ॥५३॥ ऐशी पवित्रता प्रबळ । दृष्टिउत्संगीं वाढवा सकळ । आजि झालों मी अतिनिर्मळ । तुम्हीं दीनदयाळ मीनलेति ॥५४॥ ऐसे पवित्र आणि कृपामूर्ति । भाग्यें लाधलों हे संगती । सत्संगाची निजख्याती । सांगता श्रुति मौनावल्या ॥५५॥ ब्रह्म निर्धर्म नेणे निजधर्मा । साधुमुखें ब्रह्मत्व ये ब्रह्मा । त्या सत्संगाचा महिमा । अतिगरिमा निरुपम ॥५६॥ सत्संग म्हणों निधीसमान । निधि जोडल्या हारपे जाण । सत्संगाचें महिमान । साधकां संपूर्ण सद्रूप करी ॥५७॥ निधि सांपडलिया साङग । अत्यंत वाढे विषयभोग । तैसा नव्हे जी सत्संग । निर्विषयें चांग सुखदाता ॥५८॥ इंद्रियांवीण स्वानंदु । विषयांवीण परमानंदु । ऐसा करिती निजबोधु । अगाध साधुनिजमहिमा ॥५९॥ निमिषार्ध होतां सत्संग । तेणें संगें होय भवभंग । यालागीं सत्संगाचें भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥२६०॥ संतचरणीं ज्यांचा भावो । भावें तुष्टती संत स्वयमेवो । संतसन्निधिमात्रें पहावो । संसार वावो स्वयें होय ॥६१॥ नाना विकार विषयविधी । संसारु सबळत्वें बाधी । त्या संसाराची अवधी । जाण त्रिशुद्धी सत्संग ॥६२॥ दीपचिये संगप्राप्ती । निःशेष कापुरत्वाची शांती । तेवीं झालिया सत्संगती । संसारनिवृत्ति क्षणार्धें ॥६३॥ ते तुमची सत्संगती । भाग्यें पावलों अवचित्तीं । ’आत्यंतिक क्षेम’ कैशा रीतीं । प्राणी पावती तें सांगा ॥६४॥ आत्यंतिक क्षेमाचें वर्म । जरी म्हणाल भागवतधर्म । त्या धर्माचा अनुक्रम । साङग सुगम सांगा जी ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

धर्मान्भागवतान्ब्रूत यदि नः श्रुतये क्षमम् । यैः प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः ॥३१॥

परिसावया भागवतधर्मी । श्रवणाधिकारी असों जरी आम्ही । तरी कृपा करुनि तुम्हीं । सांगावे स्वामी सकळ धर्म ॥६६॥ नवल या धर्मांची ख्याती । सप्रेम आदरितां प्रीती । तेणें तुष्टोनियां श्रीपती । दे सेवकां हातीं आपणिया ॥६७॥ ’अजन्मा’ या नामाची ख्याती । वेदशास्त्रीं मिरवी श्रीपती । तो भागवतधर्माचिया प्रीती । सोशी जन्मपंक्ती भक्तांचिया ॥६८॥ एवं भागवतधर्मी जाण । जो कोणी अनन्य शरण । त्यासी तुष्टोनियां नारायण । निजात्मता पूर्ण स्वयें देतु ॥६९॥ भागवतधर्मश्रवणार्थ । मज अधिकारु जरी नसेल येथ । तरी मी अनन्य शरणागत । आणि तुम्ही समस्त कृपाळू ॥२७०॥ भूतदयेचें निडारलेपण । तुमच्या ठायीं वोसंडे पूर्ण । तुम्ही दयानिधि संपूर्ण । दीनोद्धरण तुमचेनी ॥७१॥ जेथ तुमची कृपा पूर्ण । तेथ न राहे जन्ममरण । सर्वाधिकार संपूर्ण । सहज आपण वोळंगे ॥७२॥ तंव तुमचे कृपेपरतें । आन सामर्थ्य नाहीं येथें । ऐसें जाणोनियां निश्चितें । शरण तुम्हांतें मी आलों ॥७३॥ कायसी ज्ञातेपणाची लाज । येथें तुमचे कृपें माझें काज । ऐसें विदेहें प्रार्थूनि द्विज । चरणरज वंदिलें ॥७४॥ ऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न । संतोषले नवही जण । तेंचि श्रीमुखें नारद आपण । करी निरुपण वसुदेवा ॥७५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

नारद उवाच- एवं ते निमिना पृष्टा वसुदेव महत्तमाः । प्रतिपूज्याब्रुवन्प्रीत्या ससदस्यर्त्विजं नृपम् ॥३२॥

जो जगाची स्थिति गति जाणता । जो हरिहरांचा पढियंता । जो निजात्मज्ञानें पुरता । तो झाला बोलता नारदु ॥७६॥ नारद म्हणे वसुदेवा । विदेहें प्रश्न केला बरवा । तेणें परमानंदु तेव्हां । त्या महानुभावां उलथला ॥७७॥ संतोषोनि नवही मूर्ती । धन्य धन्य विदेहा म्हणती । ऋत्विजही सादर परमार्थी । सदस्य श्रवणार्थी अतितत्पर ॥७८॥ऐसें देऊनि अनुमोदन । बोलते जाहले नवही जण । तेचि कथेचें निजलक्षण । नव प्रश्न विदेहाचे ॥७९॥ भागवतधर्म,भगवद्भक्त । माया कैसी असे नांदत । तिचा तरणोपाव येथ । केवीं पावत अज्ञानी ॥२८०॥ येथ कैसें असे परब्रह्म । कासया नांव म्हणिजे कर्म । अवतारचरित्रसंख्या परम । अभक्तां अधमगति कैशी ॥८१॥ कोणे युगीं कैसा धर्म । सांगावा जी उत्तमोत्तम । ऐसे नव प्रश्न परम । जनक सवर्म पुसेल ॥८२॥ ऐसे विदेहाचे प्रश्न । अनुक्रमें नवही जण । उत्तर देती आपण । तयांत प्रथम प्रश्न कवि सांगे ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

कविरुवाच - मन्येऽकुतश्चिद्भयमच्युतस्य पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् । उद्विग्नबुद्धेरसदात्मभावाद्विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ॥३३॥

रायें पुशिलें ’आत्यंतिक क्षेम’ । तदर्थी कवि ज्ञाता परम । तो आत्यंतिक क्षेमाचें वर्म । भागवतधर्म प्रतिपादी ॥८४॥ ऐक राया नवलपरी । आपुला संकल्प आपणा वैरी । देहबुद्धी वाढवूनि शरीरीं । अतिदृढ करी भवभया ॥८५॥ जयापाशीं देहबुद्धी । त्यासी सुख नाहीं त्रिशुद्धी । ते बुडाले द्वंद्वसंधीं । आधिव्याधिमहार्णवीं ॥८६॥जे देहबुद्धीपाशीं । सकळ दुःखांचिया राशी । महाभयाचीं भूतें चौंपाशीं । अहर्निशीं झोंबती ॥८७॥ देहबुद्धीचिया नरा । थोर चिंतेचा अडदरा । संकल्पविकल्पांचा मारा । ममताद्वारा अनिवार ॥८८॥ देहबुद्धीमाजीं सुख । अणुमात्र नाहीं देख । सुख मानिती ते महामूर्ख । दुःखजनक देहबुद्धी ॥८९॥ दीपाचे मिळणीपाशीं । केवळ दुःख पतंगासी । तरी आलिंगूं धांवे त्यासी । तेवीं विषयांसी देहबुद्धी ॥२९०॥ ऐशी असंत देहबुद्धी कुडी । वाढवी विषयांची गोडी । तेथें महाभयाची जोडी । जन्ममरणकोडी अनिवार ॥ एवढा अनिवार संताप । देहबुद्धीपाशीं महापाप । जाणोनि धरी जो अनुताप । विषयीं अल्प गुंतेना ॥९२॥ धरितां विषयांची गोडी । भोगाव्या जन्ममरणकोडी ।येणें भयें विषय वोसंडी । इंद्रियांतें कोंडी अतिनेमें ॥९३॥ इंद्रियें कोंडितां न कोंडती । विषय सांडितां न सांडती । पुढतपुढती बाधूं येती । यालागीं हरिभक्ती द्योतिली वेदें ॥९४॥ इंद्रियें कोंडावीं न लगती । सहजें राहे विषयासक्ती । एवढें सामर्थ्य हरिभक्तीं । जाण निश्चितीं नृपवर्या ॥९५॥ योगी इंद्रियें कोंडिती । तीं भक्त लाविती भगवद्भक्तीं । योगी विषय जे त्यागिती । ते भक्त अर्पिती भगवंतीं ॥९६॥ योगी विषय त्यागिती । त्यागितां देह दुःखी होती । भक्त भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥९७॥ हें नव्हे म्हणती विकल्पक । याचिलागीं येथें देख । ’कायेन वाचा ’ हा श्लोक । अर्पणद्योतक बोलिजेला ॥९८॥ दारा सुत गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण । हे भागवतधर्म पूर्ण । मुख्यत्वें ’भजन’ या नांव ॥९९॥ अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लावाव्या भगवद्भक्ती । ऐक राया तुजप्रती । संक्षेपस्थिती सांगेन ॥३००॥ ’मनें’ करावें हरीचें ध्यान । ’श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण । ’जिव्हेनें’ करावें नामस्मरण । हरिकीर्तन अहर्निशीं ॥१॥ ’करीं’ करावें हरिपूजन । ’चरणीं’ देवालयगमन । ’घ्राणीं’ तुलसीआमोदग्रहण । जिंहीं हरिचरण पूजिले ॥२॥ नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थें अभ्यंतरीं । हरिप्रसाद ज्याचे उदरीं । त्या देखोनि दुरी भवभय पळे ॥३॥ वाढतेनि सद्भावें जाण । चढतेनि प्रेमें पूर्ण । अखंड ज्यासी श्रीकृष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥४॥ सकल भयांमाजीं थोर । भवभय अतिदुर्धर । तेंही हरिभक्तीसमोर । बापुडें किंकर केवीं राहे ॥५॥ करितां रामकृष्णस्मरण । उठोनि पळे जन्ममरण । तेथें भवभयाचें तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥६॥ जेथें हरिचरणभजनप्रीती । तेथें भवभयाची निवृत्ती । परम निर्भय भगवद्भक्ती । आमुच्या मतीं निजनिश्चयो ॥७॥ कृतनिश्चयो आमुचा जाण । येथें साक्षी वेद-शास्त्र-पुराण । सर्वात्मा भगवद्भजन । निर्भयस्थान सर्वांसी ॥८॥ असो वेद शास्त्र पुराण । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण । मी सर्वथा भक्तिआधीन । भक्तिप्रधान भगवद्वाक्य ॥९॥ उभवूनियां चारी बाह्या । निजात्मप्राप्तीच्या उपाया । ’भक्त्याहमेकया ग्राह्यः’ । बोलिला लवलाह्यां श्रीकृष्ण ॥३१०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये । अञ्जः पुंसमविदुषां विद्धि भागवतान् हि तान् ॥३४॥

न करितां वेदशास्त्रव्युत्पत्ती । ऐशिया अज्ञानां निजात्मप्राप्ती । सुगम जोडे ब्रह्मस्थिती । यालागीं हरिभक्ती प्रकाशिली देवें ॥११॥ न करितां वेदशास्त्रपठण । जड मूढ म्हणाल तरले कोण । उन्मत्तगजेंद्रउद्धरण । गर्भसंरक्षण परीक्षितीचें ॥१२॥ अंबरीषगर्भनिवारण । करावया भक्तीच कारण । ’अहं भक्तपराधीनः’ । स्वमुखें नारायण बोलिला ॥१३॥ वनचर वानर नेणों किती । उद्धरले भगवद्भक्तीं । अस्वलें तारावया निश्चितीं । विवरीं जांबवती भक्तीस्तव वरिली ॥१४॥ जाण पां अविवेकी केवळ । गौळी गोधनें गोपाळ । तेही उद्धरिले सकळ । श्रीकृष्णसखे प्रबळ अनन्यप्रीतीं ॥१५॥ शास्त्रविरुद्ध अविवेकस्थिती । जारभावें श्रीकृष्णप्रीती । गोपी उद्धरिल्या नेणों किती । अनन्यभक्तिसख्यत्वें ॥१६॥ न करितां नाना व्युत्पत्ती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती । अबळें तरावया निश्चितीं । भगवंतें निजभक्ति प्रगट केली ॥१७॥ तें हें राया भागवत जाण । मुख्यत्वें भक्तिप्रधान । भावें करितां भगद्भजन । अज्ञान जन उद्धरती ॥१८॥ हें भागवत नव्हे नव्हे । अज्ञानालागीं निजपव्हे । भवाब्धि तरावया भजनभावें । महानाव देवें निर्माण केली ॥१९॥ भागवताचे महानावे । जे रिघाले भजनभावें । त्यांसी भवभयाचे हेलावे । भजनस्वभावें न लागती ॥३२०॥ स्त्रीशूद्रादि आघवे । घालूनियां ये नावे । एकेच खेपे स्वयें न्यावे । भजनभावें परतीरा ॥२१॥ जे आवलितां भावबळें । तोडी कर्माकर्मक्रूरजळें । स्वबोधाचेनि पाणीढाळें । काढिती एक वेळे निजात्मतीरा ॥२२॥ वैराग्याचे निजनावाडे । अढळ बसले चहूंकडे । विषयांचे आदळ रोकडे । चुकवूनि धडपुडे काढिती कांठा ॥२३॥ संचितक्रियमाणांच्या लाटा । मोडोनि लाविती नीट वाटा । वेंचूनि प्रारब्धाचा सांठा । निजात्मतटा काढिती ॥२४॥ तेथ गुरुवचन साचोकारें । सांभाळीत उणेंपुरें । भूतदयेचेनि दोरें । निजनिर्धारें वोढिती ॥२५॥ तंव एकाएकीं एकसरीं । काढिली परात्परतीरीं । तंव प्रत्यावृत्ती येरझारी । आत्मसाक्षात्कारीं खुंटली ॥२६॥ येथ धरिला पुरे भावो । तैं बुडणेंचि होय वावो । मग टाकावो जो ठावो । तो स्वयमेवो आपण होय ॥२७॥ येथ पव्हणयावीण तरणें । प्रयासेंवीण प्राप्ति घेणें । सुखोपायें ब्रह्म पावणें । यालागीं नारायणें प्रकाशिली भक्ती ॥२८॥ भागवतधर्माचिये स्थिती । बाळीं भोळीं भवाब्धि तरती । सुखोपायें ब्रह्मप्राप्ती । तेचि श्लोकार्थी विशद सांगे ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

यानास्थाय नरो राजन्न प्रमाद्येत कर्हिचित् । धावान्निमील्य वा नेत्रे न स्खलेन्न पतेदिह ॥३५॥

जो श्रुतिस्मृती नेणता । भावें भजे भगवत्पथा । त्यासी विधिनिषेधबाधकता । स्वप्नींही सर्वथा प्रमादु न घडे ॥३३०॥ सद्भावेंसीं सप्रेम । आचरितां भागवतधर्म । बाधूं न शके कर्माकर्म । भावें पुरुषोत्तम संतुष्ट सदा ॥३१॥ श्रुतिस्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आंधळे । तेही हरिभजनीं धांवतां भावबळें । पडे ना आडखुळें सप्रेमयोगें ॥३२॥ प्रेमेंवीण श्रुतिस्मृतिज्ञान । प्रेमेंवीण ध्यानपूजन । प्रेमेंवीण श्रवण कीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥३३॥ माता देखोनि प्रेमभावें । बालक डोळे झांकूनि धांवे । ते धांवेसवें झेंपावे । अति सद्भावें निजमाता ॥३४॥ तैसा सप्रेम जो भजे भक्त । त्या भजनासवें भगवंतु । भुलला चाले स्वानंदयुक्तु । स्वयें सांभाळितु पदोपदीं ॥३५॥ ऐसे आचरितां भागवतधर्म । बाधूं न शके कर्माकर्म । कर्मासी ज्याची आज्ञा नेम । तो पुरुषोत्तम भजनामाजीं ॥३६॥ ऐसा भागवतधर्में गोविंदु । तुष्टला चाले स्वानंदकंदु । तेथें केवीं रिघे विधिनिषेधु । भक्तां प्रमादु कदा न बाधी ॥३७॥ जेवीं कां स्वामीचिया बाळा । अवरोधु न करवे द्वारपाळा । तेवीं भागवतधर्मभजनशीळा । कर्मार्गळा बाधूं न शके ॥३८॥ ज्यासी भगवद्भजनीं विश्वासु । विधिनिषेधु त्याचा दासु । देखोनि निजभजनविलासु । स्वयें जगन्निवासु सुखावे ॥३९॥ भागवतधर्में राहे कर्म । तंव तंव सुखावे पुरुषोत्तम । सप्रेमभक्ता बाधी कर्म । हा वृथा भ्रम भ्रांतांसी ॥३४०॥ कर्म करुं पावे प्रमादु । तंव प्रमादीं प्रगटे गोविंदु । यालागीं विधिनिषेधु । न शकती बाधूं हरिभक्तां ॥४१॥ अजागिळा कर्मबाध । यमपाशीं बांधितां सुबद्ध । तेथें प्रगटोनि गोविंद । केला अतिशुद्ध नाममात्रें ॥४२॥ स्वधर्म-कर्म हेच दोनी । निजसत्ता भोयी करुनी । जो पहुडे भजनसुखासनीं । तो पडे तैं दंडणी स्वधर्म-कर्मां ॥४३॥ भजनप्रतापसत्तालक्षणें । स्वधर्मकर्मां ऐसें दंडणें । वर्णाश्रमांचा ठावो पुसणें । होळी करणें कर्माची ॥४४॥ एवं भागवतधर्में जे सेवक । स्वधर्मकर्म त्यांचें रंक । तें राहों न शके त्यांसन्मुख । मा केवीं बाधक हों शकेल ॥४५॥ कैसे कैसे भागवतधर्म । केवीं भगवंतीं अर्पे कर्म । अतिगुह्य उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धयात्मना वाऽनुसृतः स्वभावात् । करोति यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥३६॥

हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक । भगवंतीं अर्पे सकळिक । या नांव देख ’भागवतधर्म’ ॥४७॥ उदकीं तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ । तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं ॥४८॥ ये श्लोकींचें व्याख्यान । पहिलें मानसिक अर्पण । पाठीं इंद्रियें बुद्धि अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥४९॥ भागवतधर्माची निजस्थिती । मन बुद्धि चित्त अहंकृती । आदिकरुनि इंद्रियवृत्ती । भगवंतीं अर्पिती तें ऐक ॥३५०॥ बाधूं न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचें वर्म । मनीं प्रगटला पुरुषोत्तम । अतिनिःसीम निजबोधें ॥५१॥ म्हणोनि संकल्पविकल्प । अवघे जाहले भगवद्रूप । यालागीं भक्त नित्य निष्पाप । सत्यसंकल्प हरिदास ॥५२॥ जेवीं बुद्धिबळांचा खेळ । राजा प्रधान गजदळ । अवघे काष्ठचि केवळ । तेवीं संकल्प सकळ भगवद्रूप ॥५३॥ जो जो संकल्प कामी कामु । तो तो होय आत्मारामु । तेथ भजनाचा संभ्रमु । अतिनिःसीमु स्वयें वाढे ॥५४॥ जागृति सुषुप्ती स्वपन । तिहीं अवस्थां होय भजन । तेथ अखंड अनुसंधान । निजबोधें पूर्ण ठसावलें अंगीं ॥५५॥ मना होतां समाधान । समाधानें अधिक भजन । पूर्ण बाणलें अनुसंधान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे ॥५६॥ तुर्या साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगद्भजनीं । जंववरी अवस्थापणीं । आपआपणीं मुकल्या नाहीं ॥५७॥ ऐसा भावनेवीण उपजे भावो । तो तो तत्काळ होय देवो । मग अर्पणाचा नवलावो । न अर्पितां पहा हो स्वयें होय ॥५८॥ स्वरुपें मिथ्या केलें स्वप्न । जागृती सोलूनि काढिलें ज्ञान । निवडोनि सुषुप्तिसुखसमाधान । तिहींतें पूर्ण एकत्र केलें ॥५९॥ तये स्वरुपीं सगळें मन । स्वयेंचि करी निजात्मार्पण । तेथींचें सुखसमाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥३६०॥ यापरी मानसिक जाण । सहज स्वरुपीं होय अर्पण । आतां इंद्रियांचें समर्पण । होय तें लक्षण ऐक राया ॥६१॥ दीपु लाविजे गृहाभीतरीं । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं । तेवीं मनीं प्रगटला श्रीहरी । तोचि इंद्रियांतरीं भजनानंदु ॥६२॥ तोचि इंद्रियव्यापार । सांगिजती सविस्तर । स्वाभाविक इंद्रियव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मीं ॥६३॥ जंव दृष्टि देखे दृश्यातें । तंव देवोचि दिसे तेथें । यापरी दृश्यदर्शनातें । अर्पी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥६४॥ दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवटी । सहजें ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्पी ॥६५॥ दृश्य प्रकाशी दृश्यपणें । तेंचि दृष्टीमाजीं होय देखणें । ऐसेनि अभिन्नपणें । दर्शनार्पणें भजती भक्त ॥६६॥ हे एकपणीं तीनही भाग । तिन्हीमाजीं एक अंग । ऐसें जें देखणें चांग । त्याचि अर्पणें साङग सहजें अर्पी ॥६७॥ नाना पदार्थ प्रांजळे । नीच नवे देखती डोळे । परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळें अर्पिती स्वयें ॥६८॥ यापरी दृष्टीचें दर्शन । भक्त करिती ब्रह्मार्पण । आतां श्रवणाचें अर्पण । अर्पी तें लक्षण ऐक राया ॥६९॥ जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणीं झाला श्रोता । तोचि अर्थावबोधु जाणता । तेथें ब्रह्मार्पणता सहजेंचि ॥३७०॥ शब्दु शब्दत्वें जंव उठी । तंव शब्दविता प्रगटे पाठींपोटीं । तेणें अकृत्रिम भजन उठी । ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे ॥७१॥ शब्दबोलासवें अर्थवाढी । तंव शब्दविता घे शब्दार्थगोडी । तेणें हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेंसीं ॥७२॥ शब्द जंव कानीं पडे । तंव शब्दार्थें भजन वाढे । बोलवित्याच्या अंगा घडे । अर्पण उघडें करितांचि ॥७३॥ बोलासी जो बोलविता । त्यासीं दृढ केली एकात्मता । तें भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगें ॥७४॥ सद्गुरुवचन पडतां कानीं । मनाचें मनपण विरे मनीं । तेंचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवद्भजनीं सार्थकता ॥७५॥ श्रवणेंचि यापरी श्रवण । करितां उठिलें ब्रह्मार्पण । हेतुरहित भगवद्भजन । स्वभावें जाण स्वयें होत ॥७६॥ भजनें तुष्टला जगन्निवास । होय वासाचा निजवास । मग घ्राणद्वारा परेश । भोगी सुवास ब्रह्मार्पणेंसीं ॥७७॥ जो सुमना सुमनपण जोडी । तो घ्राणाचेंही घ्राण होय आवडी । मग नाना सुवासपरवडी । ब्रह्मार्पणप्रौढीं निजभोग अर्पी ॥७८॥ वासाचा अवकाश होय आपण । घ्राणीं ग्राहकपणें जाण । तो भोगुचि स्वयें संपूर्ण । कृष्णार्पण सहज होतु ॥७९॥ रसना रस सेवूं जाये । तंव रसस्वादु देवचि होये । मग रसनेमाजीं येऊनि राहे । ब्रह्मार्पणें पाहे रसभोगवृत्ती ॥३८०॥ जे जे रसना सेवी गोडी । ते ते हरिरुपें धडफुडी । स्वादा येऊनि रोकडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभोग अर्पी ॥८१॥ रस-रसना-रसस्वादु । त्रिविधभेदें निजअभेदु । रससेवनीं परमानंदु । स्वानंदकंदु वोसंडे ॥८२॥ कटु मधुर नाना रस । रसना सेवी सावकाश । परी तो अवघा ब्रह्मरस । स्वादीं सुरस परमानंदु ॥८३॥ यापरी रसीं रसना । भोगें रतली कृष्णार्पणा । आतां स्पर्शविषयरचना । अर्पे ब्रह्मार्पणा तें ऐक राया ॥८४॥ स्पर्श घेइजे निजदेहीं । तंव देहींच प्रगटे विदेही । मग स्पर्शी जें जें कांहीं । तो तो भोगु पाहीं ब्रह्मार्पणें उठी ॥८५॥ स्पर्शास्पर्शें जें स्पर्शिजे । तंव स्पर्शावया नाडळे दुजें । तेणें एकपणाचेनि व्याजें । कृष्णार्पणवोजें भजन प्रगटे ॥८६॥ तेथ जो जो घेईजे पदार्थु । तो तो पदार्थु होय समर्थु । तेणेंचि भजनें परमार्थु । निजस्वार्थु निजभक्तां ॥८७॥ द्यावया कांहीं देवा जाये । तंव देतां भजन कैसें होये । देतें घेतें दान स्वयें । देवोचि होये निजांगें ॥८८॥ जेउतें जेउतें चालवी पाये । तो तो मार्गु देवोचि होये । मग पाउलापाउलीं पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ॥८९॥ चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती । चालतां तैशिया युक्ती । सहज ब्रह्मस्थिति निजकर्में अर्पी ॥३९०॥ बोल बोलवितिया वदनीं भेटी । बोलणें लाजे त्याचिया दृष्टी । ते लाज गिळून बोलणें उठी । निजभजनपुष्टी ब्रह्मार्पणेंसीं ॥९१॥ शब्द मावळे निःशब्दीं । निःशब्दचि बोलिजे शब्दीं । तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशुद्धी समर्पितेनिशीं ॥९२॥ बोलु बोलविता बोलाआंतु । तो बोलु अर्पणेंसींच येतु । ऐसा शब्देंचि भजनार्थु । प्रकटे परमार्थु ब्रह्मार्पणेंसीं ॥९३॥ ऐसा मनें-कर्में-वचनें । जो दृढावला भगवद्भजनें । तेंचि भजन अभिमानें । निजनिर्वाणें दृढ धरी ॥९४॥ तरंग समुद्राआंतौता । म्हणे माझेनि मेघु तत्त्वतां । जगातें निवविता जीवविता । तृषा हरिता चातकांची ॥९५॥ माझेनि सस्यें पिकती । माझेनि सरिता उसळती । मागुती मजमाजीं मिळती । समरसती सिंधुत्वें ॥९६॥ तेवीं मुळींचें पूर्णपण । पावोनि भजे अभिमान । त्याचे भजनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥९७॥ म्हणे मी सकललोककर्ता । कर्म करोनि अकर्ता । मी सर्वभोगभोक्ता । नित्य अभोक्ता मी एकु ॥९८॥ सकळ लोकीं माझी सत्ता । सकळीं सकळांचा नियंता । सकळां सकळत्वें मी प्रकाशिता । होय मी शास्ता सकळिकांचा ॥९९॥ सकळां भूतीं मी एकु । मीचि व्याप्य व्यापकु । जनिता जनयिता जनकु । न होनि अनेकु जगद्रूप मी ॥४००॥ मी देवांचा आदिदेवो । देवीं देवपणा माझाचि भावो । व्ययामाजीं मी अज अव्ययो । अक्षरीं अक्षरभावो माझेनि अंगें ॥१॥ ईश्वरीं जे जे सत्ता । ते ते माझी समर्थ्यता । भगवंतीं भगवंतता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२॥ मी आपरुपीं आपु । मी प्रकृतिपुरुषांचा बापु । सृष्टिरचनेचा संकल्पु । निर्विकल्प पैं माझा ॥३॥ मी आदीची अनादि आदी । मी समाधीची निजसमाधी । निजशुद्धीसी माझेनि शुद्धी । यापरी त्रिशुद्धी अभिमानार्पण ॥४॥ मी अजन्मा न जन्मोनि जन्में । मी अकर्मा न करोनि करीं कर्में । माझेनि योगें पुरुषोत्तमें । पाविजे महिमे उत्तमत्वाचे ॥५॥ सच्छब्दें माझें अंग । चिच्छब्दें मीचि चांग । न होनियां तिन्ही भाग । आनंद निर्व्यंग तोचि मी ॥६॥ माझेनि सूर्यदृष्टी डोळस । मजमाजीं चिदाकाशाचा अवकाश । माझेनि अंगें जगन्निवास । सावकाश नांदतु ॥७॥ अजा अजपणें मी अज । निःशेष निर्बीजां मी बीज । माझेनि निजांगें निज । निजभोज स्वयें नाचे ॥८॥ अधिष्ठाना मजमाजीं अधिवासु । मी जगदीशाचा पूर्ण ईशु । मी परम पुरुषाचाही पुरुषु । परेशा परेशु मीच स्वयें ॥९॥ असंत माझेनि संत होये । अचित्‌ माझेनि चिदत्व लाहे । निजानंदासीही पाहें । आनंदु निर्वाहे माझेनि ॥४१०॥ मी सकळ सिद्धींची निजसिद्धी । मी सर्वांगदेखणी बुद्धीची बुद्धी । मोक्ष म्हणणें तोही उपाधी । जाण त्रिशुद्धी माझेनि ॥११॥ मी साचार निजधर्म । मजमाजीं ब्रह्म विसरे कर्म । ब्रह्मसमाधीचें परब्रह्म । निजनिःसीम मीच मी ॥१२॥ हरि-हर-ब्रह्मा निजनिर्धारीं । हेही माझे अंशांशधारी । मी दशावतारांचा अवतारी । माझी निजथोरी मीही नेणें ॥१३॥ ऐसिया नाना विवंचना । अभिमानें भजे भगवद्भजना । ’ब्रह्माहमस्मि’ दृढ भावना । आपण आपणा पूर्णत्वें अर्पी ॥१४॥ जीव घालूनि पूर्णत्वाआंतु । जें जें अभिमान कल्पितु । तें तें साचचि स्वयें होतु । तेंही पूर्णत्व अर्पितु निजपूर्णत्वीं ॥१५॥ ’ब्रह्महमस्मि’ नुसधें वचन । ये अहंते नाम भगवद्भजन । मा हा तंव तद्रूप होऊन । भजे अभिमान ब्रह्मार्पणेंसीं ॥१६॥ सांडूनि देहबुद्धीचा केरु । भजनें उठिला अहंकारु । तो अपरोक्ष निजसाक्षात्कारु । पावूनि पूर्ण निर्धारुअ पूर्णत्वें वते ॥१७॥ म्हणौनि मनना मीचि मनन । स्मरणा मीचि नित्य स्मरण । चित्तासी मी निजचिंतन । चिंत्यधर्मेंवीण सर्वदा ॥१८॥ ज्याची सहसा प्राप्ति नव्हे । तें निजचित्तेंचि चिंतावें । तंव अप्राप्तीची प्राप्ति पावे । चित्त निजानुभवें सहज भजतां ॥१९॥ तेव्हां निश्चितें जें जें चिंती चित्त । तें तें स्वयेंचि होय समस्त । या प्रतीतीं चित्त भजत । ब्रह्मार्पणयुक्त निजबोधें ॥४२०॥ नाथिलें चिंती ते ’अतिचिंता’ । आथिलें चिंती ते ’निश्चिंतता’ । आथी नाथी सांडिली चिंता । सहजें न भजतां भजन होये ॥२१॥ चित्त चिंत्य आणि चिंतन । यापरी तिहींस जाहलें समाधान । तें समाधानही कृष्णार्पण । सहजीं संपूर्ण स्वयें होये ॥२२॥ ऐसिया भगवद्भजनविधीं । भजनशील झाली बुद्धी । तैं सकळ कर्मी समाधी । जाण त्रिशुद्धी स्वयें झाली ॥२३॥ कर्माचरणीं समाधी । एक म्हणती न घडे कधीं । ते पावले नाहीं निजात्मबोधीं । जाण त्रिशुद्धी विदेहा ॥२४॥ ताटस्थ्या नांव समाधी । म्हणे त्याची ठकली बुद्धी । ते समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाणावी नुसधी मूर्च्छा आली ॥२५॥ ताटस्थ्यापासूनि उठिला । तैं तो समाधीस मुकला । तेव्हां एकदेशी भावो आला । मंदही या बोला न मानिती सत्य ॥२६॥ समाधी आणि एकदेशी । बोलतां बोलणें ये लाजेसी । सत्य मानी ते शब्दपिशी । शुद्ध स्वरुपासी अनोळख ॥२७॥ येथें प्राचीन अतिसमर्थ । तें मूर्च्छा आणोनि करी तटस्थ । वांचूनि चालते बोलते समाधिस्थ । जाण पां निश्चित वसिष्ठादिक ॥२८॥ पाहें पां देवर्षि नारदु । विनोदें न मोडे समाधिबोधु । याज्ञवल्क्याचा समाधिसंबंधु । ऋषिप्रसिद्धु परीक्षा केली ॥२९॥ स्वरुप देखोनि मूर्च्छित जाहला । तो आपणियां आपण तरला । स्वयें तरुनि जन उद्धरिला । तो बोधु प्रकाशिला शुकवामदेवीं ॥४३०॥ यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोनी अवस्थांसहित जाण । बुद्धी होये ब्रह्मार्पण । अखंडत्वें पूर्ण परमसमाधि ॥३१॥ अर्जुना देऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायुद्धीं । परी तो कृष्ण कृपानिधी । ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्शों ॥३२॥ सकळ कर्मी समाधी । हे सद्गुरुचि बोधी बुद्धी । तरी युद्धींही त्रिशुद्धी । निजसमाधी न मोडे ॥३३॥ बुद्धीं आकळलें परब्रह्म । तैं अहैतुक चाले कर्म। हेंचि बुद्धीचें अर्पण परम । इतर तो भ्रम अनुमानज्ञान ॥३४॥ स्वरुपीं दृष्टी निरवधी । अनवच्छिन्न समानबुद्धी । कर्माकर्मी अज्ञान न बाधी । ’परमसमाधी’ तिये नांव ॥३५॥ निःशेष गेलिया देहबुद्धी । स्वरुपपणें फुंज न बाधी । कर्माकर्मी अज्ञान न बाधी । ते ’परमसमाधी’ निर्दुष्ट ॥३६॥ ते स्वरुपीं निरवधी । भजनशीळ झाली बुद्धी । ते सकळ कर्मी समाधी । निजार्पणविधी स्वयें जाहली ॥३७॥ जेथें शमली मनाची आधी । ते जाणावी ’परमसमाधी’ । समाधी घेणें ते देहबुद्धी । काष्ठ तें त्रिशुद्धी मूर्च्छितप्राय ॥३८॥ मनासी ठाउकें नसे । इंद्रियीं व्यापारु तरी दिसे । कर्म निपजे जें ऐसें । तें जाणिजे आपैसें ’कायिक’ ॥३९॥ श्वासोच्छवासांचे परिचार । कां निमेषोन्मेषांचे व्यापार । तेही नारायणपर । केले साचार निजस्वभावें ॥४४०॥ तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आलीं जीं जीं कर्में । तीं तीं आचरोनि निजधर्में । पूर्वानुक्रमें अनहंकृती ॥४१॥ साकरेचें कारलें प्रौढ । तें देठू-कांटेनशीं सर्वही गोड । तेवीं इंद्रियकर्मगूढ । स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मार्पणें ब्रह्मीं ॥४२॥ कर्मकलापु आघवा । आचरोनि आणी गौरवा । परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावा स्पर्शेना ॥४३॥ मजपासून झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम । म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥४४॥ देहसंगें तरी वर्तणें । परी देहधर्म धरुं नेणे । देहस्वभाव लक्षणें । ब्रह्मार्पणें विचरती ॥४५॥ देहधर्माचा नुठे फांटा । ज्ञानगर्वाचा न चढेचि ताठा । यालागीं सहज भजनामाजिवटा । झाला तो पैंठा अनहंकृती ॥४६॥ त्यापासूनि जें जें निपजे । तें तें देवो म्हणे माझें खाजें । यालागीं ब्रह्मार्पणवोजें । त्याचे स्वभाव सहजें नार्पितां अर्पिती ॥४७॥ परिसाचे कसवटीवर्हेंर । जें जें लागे तें तें साडेपंधरें । तेवीं निपजे जें जें शरीरें । तें तें खरें परब्रह्म ॥४८॥ त्याचा खेळु तेंचि महापूजन । त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन । त्याचे स्वभावीं स्वानंदपूर्ण । श्रीनारायण सुखावे ॥४९॥ तो जेउती वास पाहे । आवडीं देवो तेउता राहे । मग पाहे अथवा न पाहे । तरि देवोचि स्वयें स्वभावें दिसे ॥४५०॥ तयासी चालतां मार्गें । तो मार्गु होइजे श्रीरंगें । तो देवाचिया दोंदावरी वेगें । चाले सर्वांगें डुल्लत ॥५१॥ जें जें कर्म स्वाभाविक । तें तें ब्रह्मार्पण अहेतुक । या नांव भजन निर्दोख । ’भागवतधर्म’ देख या नांव ॥५२॥ स्वाभाविक जें वर्तन । तें सहजें होय ब्रह्मार्पण । या नांव शुद्ध आराधन । भागवतधर्म पूर्ण जाण राया ॥५३॥ यापरी भगवद्भजनपथा । भय नाहीं गा सर्वथा । ’अभय’ पुशिलें नृपनाथा । तें जाण तत्त्वतां भजनें होय ॥५४॥ येथें भयाचें कारण । राया तूं म्हणशील कोण । तेंही सांगों सावधान । ऐक श्रवणसौभाग्यनिधी ॥५५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

भयं द्वीतीयाभिनिवेशतः स्यादीशादपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः । तन्माययाऽतो बुध आभजेत्तं भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा ॥३७॥

आत्मा पूर्णत्वें सर्वत्र एक । तेथ जो म्हणे मी वेगळा देख । तेंचि अज्ञान भयजनक । दुःखदायक अतिद्वंद्वें ॥५६॥ भयाचें मूळ दृढ अज्ञान । त्याचें निवर्तक मुख्य ज्ञान । तेथ कां लागलें भगवद्भजन । ऐसा ज्ञानाभिमान पंडितां ॥५७॥ ऐक राया येचि अर्थी । ज्ञानासी कारण मुख्य भक्ती । हा कृतनिश्चयो आमुच्या मतीं । तेही उपपत्ती अवधारीं ॥५८॥ अज्ञानाचें मूळ माया । जे ब्रह्मादिकां न ये आया । गुणमयी लागली प्राणियां । जाण ते राया अति दुस्तर ॥५९॥ त्या मायेचें मुख्य लक्षण । स्वस्वरुपाचें आवरण । द्वैतांचें जें स्फुरे स्फुरण । ’मूळमाया’ जाण तिचें नांव ॥४६०॥ ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । ते स्वरुपीं स्फुरे जें मीपण । तेंचि मायेचें जन्मस्थान । निश्चयें जाण नृपनाथा ॥६१॥ ते मायेच्या निजपोटीं । भयशोकदुःखांचिया कोटी । ब्रह्माशिवादींचे लागे पाठी । इतरांची गोठी ते कोण ॥६२॥ ते महामायेची निवृत्ती । करावया दाटुगी भगवद्भक्ती । स्वयें श्रीकृष्ण येचि अर्थी । बोलिला अर्जुनाप्रती गीतेमाजीं ॥६३॥ (भगवद्गीताश्लोकार्ध) - "मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥" (अ.७, श्लो. १४) माया म्हणिजे भगवच्छक्ती । भगवद्भजनें तिची निवृत्ती । आन उपाय तेथें न चलती । भक्त सुखें तरती हरिमाया ॥६४॥ हरीची माया हरिभजनें । हरिभक्तीं सुखेंचि तरणें । हें निजगुह्य अर्जुनाचेनि कारणें । स्वयें श्रीकृष्णें सांगितलें ॥६५॥ मायेची हेचि निजपुष्टी । स्वरुपीं विमुख करी दृष्टी । द्वैतभावें अत्यंत लाठी । भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा ॥६६॥ भयाचें जनक द्वैतभान । द्वैतजनक माया जाण । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । हें संत सज्ञान बोलती ॥६७॥ ऐसें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान । तें भक्तीचें पोसणें जाण । न करितां भगवद्भजन । ब्रह्मज्ञान कदा नुपजे ॥६८॥ जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न । तिहीं न करितां भगवद्भजन । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । तयांसीही जाण कदा नुपजे ॥६९॥ शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । दाटुगी होय लौकिक स्थिती । मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती । न करितां हरिभक्ती कदा नुपजे ॥४७०॥ हरिगुणांची रसाळ कहाणी । ते ब्रह्मज्ञानाची निजजननी । हरिनामाचेनि गर्जनीं । जीव घेऊनि माया पळे ॥७१॥ माया पळतां पळों न लाहे । हरिनामधाकें विरोनि जाये । यालागीं हरिमाया पाहें। बाधूं न लाहे हरिभक्तां ॥७२॥ नामाची परम दुर्धर गती । माया साहों न शके निजशक्ती । हरिभक्त माया सुखें तरती । यालागीं श्रीपती बोलिला स्वयें ॥७३॥ सायुज्यादि चारी मुक्ती । अंकीं वाढवी भगवद्भक्ती । ते न करितां अनन्यगती । शास्त्रज्ञां मुक्ती न घडे कदा ॥७४॥ हरिभजनीं जे विमुख । त्यांसी सदा द्वैत सन्मुख । महाभयेंसीं दुःखदायक । प्रपंचु देख दृढ वाढे ॥७५॥ जेवीं एकाएकीं दिग्भ्रमु पडे । तो पूर्व म्हणे पश्चिमेकडे । तैसी वस्तुविमुखें वाढे । अतिगाढें मिथ्या द्वैत ॥७६॥ द्वैताचिये भेदाविहिरे । सुटती संकल्पविकल्पांचे झरे । तेथ जन्ममरणांचेनि पूरें । बुडे एकसरें ब्रह्मांडगोळ ॥७७॥ जन्ममरणांचिया वोढी । नाना दुःखांचिया कोडी । अभक्त सोशिती सांकडीं । हरिभक्तांतें वोढी स्वप्नींही न लगे ॥७८॥ भक्तीचें अगाध महिमान । तेथें रिघेना भवबंधन । तें करावया भगवद्भजन । सद्गुरुचरण सेवावे ॥७९॥ निजशिष्याची मरणचिंता । स्वयें निवारी जो वस्तुतां । तोचि सद्गुरु तत्त्वतां । येर ते गुरुता मंत्रतंत्रोपदेशें ॥४८०॥ मंत्रतंत्र उपदेशिते । घरोघरीं गुरु आहेत आइते । जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूतें । सद्गुरु त्यातें श्रीकृष्ण मानी ॥८१॥ गुरु देवो गुरु माता पिता । गुरु आत्मा ईश्वर वस्तुतां । गुरु परमात्मा सर्वथा । गुरु तत्त्वतां परब्रह्म ॥८२॥ गुरुचे उपमेसमान । पाहतां जगीं न दिसे आन । अगाध गुरुचें महिमान । तो भाग्येंवीण भेटेना ॥८३॥ निष्काम पुण्याचिया कोडी । अगाध वैराग्य जोडे जोडी । नित्यानित्यविवेकआवडी । तैं पाविजे रोकडी सद्गुरुकृपा ॥८४॥ सद्गुरुकृपा हातीं चढे । तेथें भक्तीचें भांडार उघडे । तेव्हां कळिकाळ पळे पुढें । कायसें बापुडें भवभय ॥८५॥ गुरुतें म्हणों मातापिता । ते एकजन्मीं सर्वथा । हा सनातन तत्त्वतां । जाण पां वस्तुता मायबापु ॥८६॥ अधोद्वारें उपजविता । ते लौकिकीं मातापिता । अधोद्वारा आतळों नेदिता । तो सद्गुरु पिता सत्यत्वें शिष्यां ॥८७॥ गुरुतें म्हणों कुळदेवता । तिची कुळकर्मीच पूज्यता । हा सर्व कामीं अकर्ता । पूज्य सर्वथा सर्वार्थी ॥८८॥ गुरु म्हणों देवासमान । तंव देवांसी याचेनि देवपण । मग त्या सद्गुरुसमान । देवही जाण तुकेना ॥८९॥ गुरु ब्रह्म दोनी समान । हेही उपमा किंचित न्यून । गुरुवाक्यें ब्रह्मा ब्रह्मपण । तें सद्गुरुसमान अद्वयत्वें ॥४९०॥ यालागीं अगाध गुरुगरिमा । उपमा नाहीं निरुपणा । ब्रह्मीं ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा । हे वाक्यमहिमा गुरुची ॥९१॥ ब्रह्म सर्वांचें प्रकाशक । सद्गुरु तयाचाही प्रकाशक । एवं गुरुहूनि अधिक । नाहीं आणिक पूज्यत्वें ॥९२॥ यालागीं गुरुतें मनुष्यबुद्धीं । पाहों नये गा त्रिशुद्धी । ऐशिये भावार्थबुद्धी । सहजें चित्तशुद्धी सच्छिष्यां ॥९३॥ ज्यांचा गुरुचरणीं निःसीम भावो । त्यांचा मनोरथ पुरवी देवो । गुरुआज्ञा देवो पाळी पहा हो । गुरुवाक्यें स्वयमेवो जड मूढ तारी ॥९४॥ ब्रह्मभावें जे गुरुसेवक । देवो त्यांचा आज्ञाधारक । त्यांसी नित्य पुरवी निजात्मसुख । हे गुरुमर्यादा देख नुल्लंघी देवो ॥९५॥ देवो गुरुआज्ञा स्वयें मानी । तंव गुरु देवासी पूज्यत्व आणी । एवं उभयतां अभिन्न्पणीं । भावार्थियांलागोनी तारक ॥९६॥ सद्भावो नाहीं अभ्यंतरीं । बाह्य भक्ति भावेंचि करी । ते भावानुसारें संसारीं । नानापरी स्वयें ठकती ॥९७॥ ठकले ते मनुष्यगती । ठकले ते निजस्वार्थी । ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभें हरिभक्ती कदा नुपजे ॥९८॥ येथ भावेंवीण तत्त्वतां । परमार्थु न ये हाता । सकळ साधनांचे माथां । जाण तत्त्वतां सद्भावो ॥९९॥ कोरडिये खांबीं धरितां सद्भावो । तेथेंचि प्रगटे देवाधिदेवो । मा सद्गुरु तंव तो पहा वो । स्वयें स्वयमेवो परब्रह्म ॥५००॥ यालागीं गुरुभजनापरता । भजावया मार्गु नाहीं आयता । ज्ञान-भक्ति जे तत्त्वतां । ते जाण सर्वथा सद्गुरुभक्ति ॥१॥ गुरुहूनि श्रेष्ठ ब्रह्म । म्हणतां गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म । ऐसा भाव धरितां विषम । ब्रह्मसाम्य शिष्यां नुपजे ॥२॥ आम्हां सद्गुरु तोचि परब्रह्म । ऐसा नित्य निजभाव सप्रेम । हेचि गुरुसेवा उत्तमोत्तम । शिष्य परब्रह्म स्वयें होये ॥३॥ ऐशिये गुरुसेवेआंत । प्रल्हाद झाला द्वंद्वातीत । नारद स्वानंदें गात नाचत । ब्रह्मसाम्यें विचरत सुरासुरस्थानें ॥४॥ ऐसीचि गुरुसेवा करितां । चुकली अंबरीषाची गर्भव्यथा । ते गर्भ जाहला देवोचि साहता । भक्तां भवव्यथा बाधों नेदी ॥५॥ ऐशिया अभिन्न भावना । सुबुद्धी भजती गुरुचरणां । ते पढियंते जनार्दना । त्यांसी भवभावना शिवों नेदी ॥६॥ गुरु ब्रह्म दोनी एक । शिष्यही असे तदात्मक । जे भेदें मानिती वेगळिक । तेही मायिक कवि सांगे ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयोर्ध्यातुर्धिया स्वप्नमनोरथौ यथा । तत्कर्मसंकल्पविकल्पकं मनो बुधो निरुन्ध्यादभयं ततः स्यात् ॥३८॥

पुरुषासी जो प्रपंचु दिसे । तो नसतांचि मिथ्या आभासे । जेवीं कां एकला निद्रावशें । स्वप्नीं निजमानसें जग कल्पी ॥८॥ असोनि निद्रावश दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण । करुं बैसे मनोरथध्यान । तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे ॥९॥ हो कां घालोनि आसन । जो करी मूर्तिचिंतन । त्यासी ध्येय-ध्याता-उपचार-ध्यान । नसतेंच जाण कल्पित भासे ॥५१०॥ जेवीं धनलोभ्याचें हारपे धन । परी वासना न सांडी धनधान्य । धनातें आठवितां मन । धनलोभें पूर्ण पिसें होये ॥११॥ मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन । तंव स्मृती वळघे वन । व्यामोहें पूर्ण पिसें होय ॥१२॥ तेवीं व्यामोहाचें पूर्ण भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत । तें अहंभावें मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अंगीं ॥१३॥ भवभयाचें कारण । मनःकल्पना मुख्य जाण । त्या मनाचें करावया निरोधन । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥१४॥ हें जाणोनि सच्छिष्य ज्ञाते । गुरुवाक्यें विश्वासयुक्तें । विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनातें आकळिती ॥१५॥ तेचि आकळती हातवटी । संक्षेपें राया सांगेन गोष्टी । सद्गुरुवाक्य परिपाटी । जे मनातें थापटी निजबोधें ॥१६॥ चंचळत्वें विषयध्यान । करितां देखे जें जें मन । तें तें होय ब्रह्मार्पण । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥१७॥ धरुनियां विषयस्वार्थु । मनें जो जो घेइजे अर्थु । तो तो होय परमार्थु । हा अनुग्रहो समर्थु गुरुकृपेचा ॥१८॥ जो भुईभेणें पळों जाये । तो जेथें पळे तेथें भू ये । मग येणेंजाणें स्वयें राहे । ठायीं ठाये पांगुळला ॥१९॥ तैसें मनासी लाविजे वर्म । जें जें देखे तेंचि ब्रह्म । जें जें करुं बैसे कर्म । तेथ पुरुषोत्तम स्वयें प्रगटे ॥५२०॥ एवं इंद्रियवृत्तिउल्लाळे । मोडिले गुरुवाक्यप्रतीतिबळें । निजाधिष्ठानमेळें । कळासलें येके वेळे अखंड कुलुप ॥२१॥ ऐसें नेमितां बाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैतभ्रम । तंव बाह्य परब्रह्म । पूर्ण चिद्वोम कोंदाटे ॥२२॥ ऐसें भजनें मन नेमितां स्वयें । न रिघे कल्पांतकाळभये । भक्त होऊनियां निर्भयें । विचरती स्वयें निःशंक ॥२३॥ हे अगाध निष्ठा परिपूर्ण । भोळ्याभाळ्या न टके जाण । यालागीं सुगम साधन । सांगेन आन तें ऐक ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

श्रृण्वन् सुभद्राणि रथाङगपाणेर्जन्मानि कर्माणि च यानि लोके । गीतानि नामानि तदर्थकानि गायन्विलज्जो विचरेदसङगः ॥३९॥

तरावया भाळेभोळे जन । मुख्य चित्तशुद्धीच कारण । जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरें ॥२५॥ चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणें सादरें ऐके माता । तेणें सादरें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥२६॥ हरीचीं जन्मकर्में अनंत गुण । म्हणाल त्यांचें नव्हेल श्रवण । लोकप्रसिद्ध जें जें पुराण । तें श्रद्धा संपूर्ण ऐकावें ॥२७॥ बहु देव बोलिले पुराणीं । तेही लागती ज्याचे चरणीं । तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपुराणीं वंदिजे ॥२८॥ त्याचीं जीं जीं जन्में अतिअद्भुत । जीं जीं कर्में परमार्थयुक्त । स्वमुखें बोलिला भगवंत । तीं तीं ज्ञानार्थ परिसावीं ॥२९॥ जें जें केलें पुराणश्रवण । तें तें व्यर्थ होय मननेंविण । यालागीं श्रवण-मनन । सावधान करावें ॥५३०॥ मोलें घेतली जे गाये । दुभतें खातां विषय होये । तेचि दान देतां लवलाहें । दुभती होये परमामृतें ॥३१॥ तेवीं केलें जें श्रवण । तें मननें परम पावन । तेंचि उपेक्षितां जान । परिपाकीं पूर्ण वांझ होय ॥३२॥ हरिनाम पडतां श्रवणीं । एकां गळोनि जाये वदनीं । एकां ये कानींचें ते कानीं । जाय निघोनि हरिनाम ॥३३॥ हरिनाम पडतां श्रवणीं । ज्याचे रिघे अंतःकरणीं । सकळ पापा होवोनि धुणी । हरिचरणीं तो विनटे ॥३४॥ यापरी श्रवणीं श्रद्धा । मननयुक्त करितां सदा । तैं विकल्प बाधीना कदा । वृत्ति शुद्धा स्वयें होये ॥३५॥ ऐसें मननयुक्त श्रवण । करितां वोसंडे हर्ष पूर्ण । तेणें हर्षें हरिकीर्तन । करी आपण स्वानंदें ॥३६॥ हरिचरित्रें अगाध । ज्ञानमुद्रा-पदबंध । कीर्तनीं गातां विशद । परमानंद वोसंडे ॥३७॥ वानिती अजन्मयाचीं जन्में । वानिती अकर्मियाचीं कर्में । स्मरती अनामियाचीं नामें । अतिसप्रेमें डुल्लत ॥३८॥ साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाची लाज । कीर्तनीं नाचती भोज । अतिनिर्लज्ज निःशंक ॥३९॥ कीर्तनें निर्दळिले दोष । जप तप ठेले निरास । यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥५४०॥ यमनियमां पडती उपवास । मरों टेंकले योगाभ्यास । कीर्तनगजरें हृषीकेश । निर्दाळी दोष नाममात्रे ॥४१॥ कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोंदला उद्भट । हरुषें डोले वैकुंठपीठ । तेणें सुखें नीलकंठ तांडवनाचें नाचतु ॥४२॥ यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान । हा भक्ति-राजमार्ग पूर्ण । ये मार्गी स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥४३॥ चक्र घेऊनि भक्तांचे ठायीं । म्हणे तुझें कार्य कायी । मज जगीं वैरीचि नाहीं । भक्तद्वेषी पाहीं निजशस्त्रें नाशी ॥४४॥ चक्रें अभिमानाचा करी चेंदा । मोहममता छेदी गद । शंहें उद्बोधी निजबोधा । निजकमळें सदा निजभक्त पूजी ॥४५॥ जेथें चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भवभयाची कथा वार्ता । यापरी कीर्तिवंता । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥४६॥ ज्यांसी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन । तिंहीं करावें नामस्मरण । ’राम-कृष्ण-गोविंद’ ॥४७॥ ’अच्युत’ नामाची निजख्याती । चेवल्या कल्पांतीं हों नेदी च्युती । त्या नामातें जे नित्य स्मरती । ते जाण निश्चितीं अच्युतावतार ॥४८॥ रामकृष्णादि नामश्रेणी । अखंड गर्जे ज्यांची वाणी । त्यांसी तीर्थें येती लोटांगणीं । सुरवर चरणीं लागती स्वयें ॥४९॥ बाप नामाचें निजतेज । यम वंदी चरणरज । नामापाशीं अधोक्षज । चतुर्भुज स्वयें तिष्ठे ॥५५०॥ नामाचेनि पडिपाडें । कायिसें भवभय बापुडें । कळिकाळाचें तोंड कोणीकडे । नामापुढें रिघावया ॥५१॥ जेवढी नामाची शक्ती । तेवढें पाप नाहीं त्रिजगतीं । नामापाशीं चारी मुक्ती । जाण निश्चितीं विदेहा ॥५२॥ ऐक राया सावधान । नामापरतें सुगम साधन । सर्वथा नाहीं नाहीं आन । निश्चय जाण नेमस्त ॥५३॥ जन्म-नाम-कर्में श्रीधर । श्रवणें उद्धरती पामर । यालागीं हरिलीला सुभद्र । शास्त्रज्ञ नर वर्णिती ॥५४॥ ऐसा बाणल्या भक्तियोग । न धरी जाणपणाचा फूग । त्यजूनि अहंममतापांग । विचरती निःसंग हरिकीर्तनें ॥५५॥ करितां श्रवण स्मरण कीर्ति । तेणें वाढे सप्रेम भक्ति । भक्त विसरे देहस्फूर्ति । ऐक तेही स्थिति सांगेन राया ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

एवं व्रतः स्वप्रियनामकीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः । हसत्यथो रोदिति रौति गायत्युन्मादवन्नृत्यति लोकबाह्यः ॥४०॥

हरिनामगुणकीर्तनकीर्ती । अखंड आवडे जागृतीं । स्वप्नींही तेचि स्थिती । दृढ हरिभक्ती ठसावे ॥५७॥ ऐशियापरी भक्तियुक्त । दृढतर जाहलें ज्याचें व्रत । तंव तंव होय आर्द्रचित्त । प्रेमा अद्भुत हरिनामकीर्ती ॥५८॥ आत्मा परमप्रिय हरी । त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी । नित्य नवी आवड वरी । सबाह्याभ्यंतरीं हरि प्रगटे ॥५९॥ चुकल्या मायपूतां संकटीं । एकाकीं बहुकाळें जाहली भेटी । तेणें वोरडे घालोनि मिठी । चाले जेवीं पोटीं अनिवार रुदन ॥५६०॥ तेवीं जीवशिवां अवचटी । भक्तीचे पेठे जाहली भेटी । आत्मसाक्षात्कारें पडे मिठी । ते संधीमाजीं उठी अनिवार रुदन ॥६१॥ परमात्मयासी आलिंगन । तेणें अनिवार स्फुंदन । रोमांचित रुदन । सप्रेम पूर्ण उसासोनि करी ॥६२॥ सवेंचि गदगदोनि हांसे । मानी मजमाजींच मी असें । चुकलों भेटलों हें ऐसें । देखोनि आपुलें पिसें हांसोंचि लागे ॥६३॥ मी अखंडत्वें स्वयें संचलों । अभेदपूर्णत्वें अनादि रचलों । तो मी अव्ययो म्हणे जाहलों मेलों । येणें आठवें डोलडोलों हांसोंचि लागे ॥६४॥ पळतां दोराच्या सर्पाभेण । पडे अडखळे भयें पूर्ण । तोच दोरातें वोळखोन । आपणियां आपण स्वयें हांसे ॥६५॥ तेवीं संसाराचा अभावो । देहभाव समूळ वावो । तेथें नाथिली ममता अहंभावो । मज होता पहा वो म्हणूनि हांसे ॥६६॥ बाप गुरुवाक्य निजनिर्वाहो । देहीं असतां विदेहभावो । माझे चारी देह झाले वावो । येणे अनुभवें पहा वो गर्जों लागे ॥६७॥ म्हणे धन्य धन्य भगवद्भक्ती । जिणें मिथ्या केल्या चारी मुक्ती । मी परमात्मा निजनिश्चितीं । येणें उल्हासें त्रिजगती गर्जवी गजरें ॥६८॥ धन्य भगवंताचें नाम । नामें केलों नित्य निष्काम । समूळ मिथ्या भवभ्रम । गर्जोनि निःसीम हाक फोडी ॥६९॥ आतां दुजें नाहींच त्रिलोकीं । दिसे तें तें मीच मी कीं । मीच मी तो एकाकी । येणें वाक्यें अलोलिकी हाक फोडी ॥५७०॥ दुर्धर भवबंध ज्याचेनी । निःशेष गेला हारपोनी । त्या सद्गुरुच्या निजस्तवनीं । गर्जवी वाणी अलोकिक ॥७१॥ म्हणे संसार झाला वावो । जन्ममरणांचा अभावो । कळिकाळासी नाहीं ठावो । म्हणोनियां पहा वो हाक फोडी ॥७२॥ ऐशा हाकांवरी हाका । फोडूं लागे अलोलिका । सवेंचि गाये निजात्मसुखा । स्वानंदें देखा डुल्लतु ॥७३॥ परम सख्याची गोड कथा । तृप्ती न बाणे स्वयें सांगतां । तेवीं निजानुभवें हरि गातां । धणी सर्वथा पुरेना ॥७४॥ त्याचें गाणें ऐकतां । सुखरुप होय सज्ञान श्रोता । मुमुक्षां होय परमावस्था । जरी तो अवचिता गावों लागे ॥७५॥ गातां पदोपदीं निजसुख । कोंदाटे अधिकाधिक । वोसंडतां परम हरिख । स्वानंदें अलोलिक नाचों लागे ॥७६॥ सारुनि दुजेपणाचें काज । निरसोनि लौकिकाची लाज । अहंभावेंविण सहज । आनंदाचे भोजें अलोलिक नाचे ॥७७॥ जो मोलें मदिरा खाये । तो मदिरानंदें नाचे गाये । जेणें ब्रह्मानंदु सेविला आहे । तो केवीं राहे आवरला ॥७८॥ यालागीं तो लोकबाह्यता । स्वये नाचे ब्रह्मउन्मादता । लोक मानिती तया पिशाचता । हा बोधु पंडितां सहजा न कळे ॥७९॥ त्याचिया निजबोधाचि कथा । ऐक सांगेन नृपनाथा । एक भगवंतावांचून सर्वथा । त्यासी लौकिकता दिसेना ॥५८०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

खं वायुमग्निं सलिलं महीं च ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन्‌ । सरित्यसमुद्रांश्च हरेः शरीर यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः ॥४१॥

ब्रह्म उन्मादपरमानंदें । जंव जंव पाहे स्वानंदबोधें । तंव तंव चराचर पूर्णानंदें । देखे स्वानंदकंदें दुमदुमित ॥८१॥ पृथ्वी आप तेज वायु नभ । देखे हरिरुप स्वयंभ । भूतां महाभूतांचें डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वें ॥८२॥ जेवीं न मेळवितां मेळा । पाहतां जैसा केळीचा कळा । स्वयें विकासे फळां दळां । तेवीं वस्तु हे पांचाला भूतभौतिकात्मक ॥८३॥ जेवीं कांतोनियां रंध्रसळे । स्फटिकदीपगृह-अंगमेळें । चित्तारिलीं अश्वगजदळें । तीं भासती सोज्ज्वळें आंतुलेनि दीपें ॥८४॥ तेवीं सोमसूर्यादि तेजशक्ती । कां वन्हि नक्षत्रें जे लखलखिती । जननयनादि निजदीप्ती । देखे आत्मज्योती सतेज ॥८५॥ युक्तीं मेळवितां द्रव्यांतर । अग्नि परी भासे पुष्पाकार । तेवीं वस्तु स्वलीला साचार । रविचंद्रकार नानात्वें भासे ॥८६॥ पृथ्वी गंधरुपें स्वयें असे । तो गंधु कस्तूर्यादिकीं भासे । तेवीं भगवत्सत्ता सर्वत्र असे । परी सात्त्विकीं दिसे अतिप्रगट ॥८७॥ यालागीं सात्त्विकाठायीं सत्त्व । तेथ देखे भगवत्तत्त्व । सत्त्वें सत्त्ववंतां महत्त्व । अति मान्यत्व हरिरुपें ॥८८॥ पृथ्वीसी जळावरण आहे । तेंचि चतुःसमुद्र नांव लाहे । तैसें देवाचेंचि अंग पाहे । दिशात्वें वाच्य होये दशदिशां ॥८९॥ पूर्वपश्चिमादि योग । दशदिशांचे दिग्विभाग । तेही देवाचेंचि अंग । तद्रूप श्रीरंग स्वयें भासे ॥५९०॥ तृण दूर्वा दर्भ द्रुम । देखोनि म्हणे हेही हरीचे रोम । अनोळखा हें अतिविषम । निजांगीं सर्व सम हरिरुप पाहतां ॥९१॥ जैशा आपुल्या अंगोळिया । गणितां दिसती वेगळालिया । परी असती लागलिया । स्वयें सगळिया अखंड अंगीं ॥९२॥ तेवीं वन-वल्ली-दर्भ-दांग । देखोनि म्हणे हें हरीचें अंग । अनन्यभावें लगबग । भिन्नभाग देखेना ॥९३॥ म्हणे दूर्वा-द्रुम-वन-वल्ली । हेचि अनंत कोटी रोमावळी । हरीचेनि अंगें असे वाढली । त्या निजशोभा शोभली हरिरुपत्वें ॥९४॥ जेवीं वटाच्या पारंबिया । लोंबोनि वाढती वेगळालिया । त्याही वटरुपें संचलिया । वटत्वा मुकलिया म्हणों नये ॥९५॥ तेवीं चैतन्यापासोनि वोघ । निघाले सरितारुप अनेग । तेही चैतन्यघन चांग । चिद्रूपें साङग सद वाहती ॥९६॥ हो कां चंद्रबिंबीं अमृत जैसें । बिंबीं बिंबरुप होऊनि असे । तेवीं भगवंतीं संसारु भासे । भजनविश्वासें भगवद्रूप ॥९७॥ ऐसे वेगवेगळे भाग । पाहतां उल्हासे जंव चांग । तंव अवघें उघडें जग । देवोचि साङग स्वयें झाला ॥९८॥ यालागीं सर्व भूतांचे ठायीं । अनन्यशरण कैसा पाहीं । लवण जैसें सागरापायीं । ठायीं ठायीं जडोनि ठाके ॥९९॥ तेथ मुंगीही देखोनि जाण । हरिरुपीं वंदी आपण । मशकासही अनन्यशरण । घाली लोटांगन भगवद्रूपें ॥६००॥ गो-खर-चांडाळ-श्वान । अतिनिंद्य जे हीन जन । ते भगवद्रूप देखोनि पूर्ण । घाली लोटांगण अनन्यभावें ॥१॥ हरिरुपें देखे पाषाण । भगवद्रूपें वंदी तृण । जंगमस्थावरादिकां शरण । घाली लोटांगण चिदैक्यभावें ॥२॥ करितां हरिनामस्मरणकीर्ती । एकाएकीं एवढी प्राप्ती । झाली म्हणसी कैशा रीतीं । ऐकें नृफ्ती तो भावो ॥३॥ करितां पूजाविधिविधान । कां श्रवण स्मरण कीर्तन । सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण । ’पूर्ण प्राप्ति’ जान त्यातेंचि वरी ॥४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

भक्तिः परेशानुभवो विरक्तिरन्यत्र चैष त्रिक एककालः । प्रपद्यमानस्य यथाऽश्नतः स्युस्तुष्टिः पुष्टिः क्षुदपायोऽनुघासम् ॥४२॥

आइकें विदेहा चक्रवर्ती । ऐशी जेथें भगवद्भक्ती । तीपाशीं विषयविरक्ती । ये धांवती गोवत्सन्यायें ॥५॥ हें असो जेवीं जावळीं फळें । हों नेणें येरयेरां वेगळें । तेवीं भक्ति विरक्ति एके काळें । भक्त तेणें बळें बळिष्ट होती ॥६॥ जेथ भक्ति आणि विरक्ती । नांदों लागती सहजस्थिती । तेथेंचि पूर्णप्राप्ती । दासीच्या स्थितीं सर्वदा राबे ॥७॥ यापरी भगवद्भक्ती । पूर्ण दाटुगी त्रिजगतीं । भक्तांघरीं नांदे प्राप्ती । भक्तिविरक्तिनिजयोगें ॥८॥ भक्ति विरक्ति अनुभवप्राप्ती । तिन्ही एके काळें होती । ऐक राया तेही स्थिती । विशदोक्तीं सांगेन ॥९॥ जैसी कीजे भगवद्भक्ती । तैसीच होय विषयविरक्ती । तदनुसारें अनुभवस्थिती । ती भक्त पावती तेचि क्षणीं ॥६१०॥ जेवीं कां भुकेलियापाशीं । ताट वाढिलें षड्रसीं । तो पुष्टि तुष्टि क्षुधानाशासी । जेवीं ग्रासोग्रासीं स्वयेंचि पावे ॥११॥ जितुक जितुका घेइजे ग्रास । तितुका तितुका क्षुधेचा नाश । तितुकाचि पुष्टिविन्यास । सुखोल्हास तितुकाचि ॥१२॥ पुष्टि तुष्टि क्षुधानाशनी । जेवीं एके काळें येती तिनी । भोक्ता पावे स्वयें भोजनीं । तेवीं भगवद्भजनीं भक्त्यादि त्रिकु ॥१३॥ सद्भावें करितां भगवद्भक्ती । भक्ति-विरक्ति-भग-वत्प्राप्ती । तिनी एके काळें होती । ऐशिया युक्तीं जाणिजे राया ॥१४॥ ’भक्ति’ म्हणजे सर्व भूतीं । सप्रेम भजनयुक्ती । ’प्राप्ति’ म्हणिजे अपरोक्षस्थिती । भवगत्स्फूर्ती अनिवार ॥१५॥ ’विरक्ति’ म्हणिजे ऐशी पहा हो । स्त्रीपुत्रदेहादि अहंभावो । समूळ जेथें होय वावो । विरक्तिनिर्वाहो या नांव राया ॥१६॥ यापरी भजनाचे पोटीं । भक्ति-विरक्ति-प्राप्ति त्रिपुटी । ऐक्यभावें सद्भक्तां उठी । हरिभजनदिठी एकेचि काळीं ॥१७॥ यालागीं राया निजहितार्थी । आदरें करावी हरिभक्ती । तेणें अवश्य भगवत्प्राप्ती । उपसंहारार्थी कवि सांगे ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

इत्यच्युताङिंघ्र भजतोऽनुवृत्त्या भक्तिर्विरक्तिभगवत्प्रबोधः । भवन्ति वै भागवतस्य राजंस्ततः परां शान्तिमुपैति साक्षात् ॥४३॥

यापरी अनन्य भक्ती । जे सर्वदा सर्वभूतीं करिती । ते भक्ती-विरक्ती-भगवत्प्राप्ती । सहजें पावती अनायासें ॥१९॥ राया हरिभक्तिदिव्यांजन । तें लेऊनि भक्त सज्जन । साधिती भगवन्निधान । निजभजनमहायोगें ॥६२०॥ करितां ऐक्यभावें निजभक्ती । उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती । तेणें होये असतांची निवृत्ती । भक्तां ’पूर्णप्राप्ति’ परमानंदें ॥२१॥ यालागीं धन्य भगवद्भक्त । इंद्रियीं वर्ततां विषयीं विरक्त । देहीं असोनि देहातीत । नित्यमुक्त हरिभजनें ॥२२॥ भावें करितां भगवद्भक्ती । भक्त मुक्तीही न वांछिती । तरी त्यांपाशीं चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ॥२३॥ हा भागवतांचा निजमहिमा । अनुपम नाहीं उपमा । भावें भजोनि पुरुषोत्तमा । परमात्मगरिमा पावले ॥२४॥ अगाध भगवंताची भक्ती । भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती । ऐकतां विदेहचक्रवर्ती । आश्चर्यें चित्तीं चमत्कारला ॥२५॥ म्हणे धन्य धन्य भगवद्भजन । हरिखें कवीस लोटांगण । घालितां चालिलें स्फुंदन । रोमांचित नयन अश्रुपूर्ण जाहले ॥२६॥ आनंदस्वेदें कांपत । नावेक राहिला तटस्थ । सवेंचि जाहला सावचित्त । म्हणे झणीं महंत न पुसतां जाती ॥२७॥ ऐशिया अतिकाकुलतीं । नेत्र उघडोनि पाहे नृपती ।बैसली देखोनि मुनिपंक्ती । अतिशयें चित्तीं सुखावला ॥२८॥ तेणें संतोषें डोलत । म्हणे ’पूर्णप्राप्त’ भगवद्भक्त । जगीं कैसे कैसे विचरत । तीं चिन्हें समस्त पुसों पाहों ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

राजोवाच-अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम् । यथा चरति यब्र्हूते यौर्लिङैगर्भगवत्प्रियः ॥४४॥

भक्तां ’पूर्णप्राप्ति’ सुगम । ऐकतां राजा निवाला परम । तो भक्तचिन्हानुक्रम । समूळ सवर्म पूसत ॥६३०॥ विदेह म्हणे स्वामी मुनी । पूर्ण प्राप्ति आकळोनी । ते भक्त कैसे वर्तती जनीं । तीं लक्षणें श्रवणीं लेववा मज ॥३१॥ भक्तलक्षणभूषण । तेणें मंडित करा श्रवण । सावध ऐकतां संपूर्ण । होइजे आपण भगवत्प्रिय ॥३२॥ त्यांचा कोण धर्म कोण कर्म । कैसे वर्तती भक्तोत्तम । हृदयीं धरोनि पुरुषोत्तम । त्यांचें बोलतें वर्म तें कैसें ॥३३॥ कोणेपरी कैशा स्थितीं । हरिभक्त हरीस प्रिय होती । ऐशिया लक्षणांचिया पंक्ती । समूळ मजप्रती सांगिजे स्वामी ॥३४॥ विदेहाच्या प्रश्नावरी । संतोषिजे मुनीश्वरीं । कविधाकुटा जो कां हरी । तो बोलावया वैखरी सरसावला ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

हरिरुवाच-सर्वभूतेषु यः पश्येद्भगवद्भावमात्मनः । भूतानि भागवत्यात्मन्येष भाववतोत्तमः ॥४५॥

हरि म्हणे रायाप्रती । अमित भक्तलक्षणस्थिती । एक दिगंबरत्वें वर्तती । एक स्वाश्रमस्थिती निजचारें ॥३६॥ एक सदा पडले असती । एकांची ते उन्मादस्थिती । एक सदा गाती नाचती । एक ते होती अबोलणे ॥३७॥ एक गर्जती हरिनामें । एक निर्दाळिती निजकर्में । एक भूतदयाळू दानधर्में । एक भजननेमें राहती ॥३८॥ ऐशा अनंत भक्तस्थिती । सांगतां सांगावया नाकळे वृत्ती । त्यांमाजीं मुख्य संकलि । तीं राया तुजप्रती सांगेन ॥३९॥ पूर्णप्राप्तीचा मुख्य ठावो । सर्वां भूतीं भगवद्भावो । हाचि पूर्णभक्तीचा निजगौरवो । तोचि अभिप्रावो हरि सांगे ॥६४०॥ सर्व भूतीं मी भगवंत । सर्व भूतें मजआंत । भूतीं भूतात्मा मीचि समस्त । मीचि मी येथ परमात्मा ॥४१॥ ऐसें जें पूर्णत्वाचें मीपण । तेणें वाढे आत्मभिमान । सहजें निजनिरभिमान । तें शुद्ध लक्षण ऐक राया ॥४२॥ शुद्ध भक्तांचें निजलक्षण । प्रत्यगात्मयाचें जें मीपण । तेंही मानूनियां गौण । भावना पूर्ण त्यांची ऐसी ॥४३॥ सर्वां भूतीं भगवंत । भूतें भगवंतीं वर्तत । भूतीं भूतात्मा तोचि समस्त । मी म्हणणें तेथ मीपणा न ये ॥४४॥ सर्व भूतीं भगवंत पाहीं । भूतें भगवंताचे ठायीं । हें अवघें देखे जो स्वदेहीं । स्वस्वरुप पाहीं स्वयें होय ॥४५॥ तो भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ । तो भागवतांमाजीं वरिष्ठ । त्यासी उत्तमत्वाचा पट । अवतार श्रेष्ठ मानिती ॥४६॥ तो योगियांमाजीं अग्रगणी । तो ज्ञानियांचा शिरोमणी । तो सिद्धांमाजीं मुगुटमणी । हें चक्रपाणी बोलिला ॥४७॥ जैशा घृताचिया कणिका । घृतेंसीं नव्हती आणिका । तेवीं भूतें भौतिकें व्यापका । भिन्न देखा कदा नव्हती ॥४८॥ हे ’उत्तम’ भक्तांची निजस्थिती । राया जाणावी सुनिश्चितीं । आतां ’मध्यम’ भक्त कैसे भजती । त्यांची भजनगती ऐक राया ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

ईश्वरे तदधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च । प्रेममत्रीकृपोपक्षा यः करोति स मध्यमः ॥४६॥

ईश्वर मानी उत्तमोत्तम । तद्भक्त मानी मध्यम । अज्ञान ते मानो अधम । द्वेषी ते परम पापी मानी ॥६५०॥ ईश्वरीं ’प्रेम’ पवित्र । भक्तांसी ’मैत्री’ मात्र । अज्ञानी तो कृपापात्र । ’उपेक्षा निरंतर द्वेषियांची ॥५१॥ हे मध्यम भक्तांची भक्ती । राया जाण ऐशिया रीतीं । आतां ’प्राकृत’ भक्तांची स्थिती । तेही तुजप्रती सांगेन ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

अर्चायामेव हरये पूजां यः श्रद्धयेहते । न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः ॥४७॥

पाषाणप्रतिमा हाचि देवो । तेथेंचि ज्याचा पूर्ण भावो । भक्त-संत-सज्जनांसी पहा वो । अणुमात्र देहो लवों नेदी ॥५३॥ ते ठायीं साधारण जन । त्याची वार्ता पुसे कोण । त्यांसी स्वप्नींही नाहीं सन्मान । यापरी भजन प्राकृताचें ॥५४॥ ऐशिया स्थितीं जो जड भक्तु । तो जाणावा मुख्य ’प्राकृतु’ । प्रतिमाभंगें अंतु । मानी निश्चितु देवाचा ॥५५॥ यापरी त्रिविध भक्त । सांगितले भजनयुक्त । परी उत्तमांचीं लक्षणें अद्भुत । तीं सांगावया चित्त उदित माझें ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

गृहीत्वापीन्द्रियैरर्थान्यो न द्वेष्टि न हृष्यति । विष्णोर्मायामिदं पश्यन् स वै भागवतोत्तमः ॥४८॥

इंद्रियें विषयांतें सेविती । परी सुखदुःख नुमटे चित्तीं । विषय मिथ्यात्वें देखती । ते जाण निश्चितीं उत्तम भक्त ॥५७॥ मृगजळीं जेणें केलें स्नान । तो नाहतां कोरडाचि जाण । तेवीं भोगीं ज्यांसी अभोक्तेपण । ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम ॥५८॥ ’उत्तम भक्त विषय सेविती’ । हा बोलु रुढला प्राकृतांप्रती । त्यांसी विषयीं नाहीं विषयस्फूर्ती । त्यागिती भोगिती दोनी मिथ्या ॥५९॥ स्वप्नींचें केळें रायभोगें । जागा होऊनि खावों मागे । तेणें हातु माखे ना तोंडीं लागे । तेवीं विषयसंगें हरिभक्त ॥६६०॥ येथवरी मिथ्या विषयभान । तरी सेवावया त्यांसी काय कारण । येथ प्रारब्ध बळी पूर्ण । तें अवश्य जाण भोगवी ॥६१॥ परी मी एक विषयभोक्ता । ही स्वप्नींही त्यास नुमटे कथा । यालागीं उत्तम भागवतता । त्यासीच तत्त्वतां बाणली ॥६२॥ यापरी विषयासक्तीं । वर्तिजे उत्तम भक्तीं । याहूनि अगाध स्थिती । सांगेन तुजप्रती ते ऐक ॥६३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

देहेन्द्रियप्राणमनोधियां यो जन्माप्ययक्षुद्भयतर्षकृच्छ्रैः । संसारधर्मैरविमुह्यमानः स्मृत्या हरेर्भागवतप्रधानः ॥४९॥

देह-इंद्रिय-मन-बुद्धि-प्राण । हेंचि बंधाचें पंचायतन । क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण । जन्ममरण इत्यादि ॥६४॥ या पांचां स्थानीं अपार श्रम । या नांव म्हणिजे ’संसारधर्म’ । निजभक्तां प्रसन्न आत्माराम । त्यांसी भवभ्रम स्वप्नींही नाहीं ॥६५॥ क्षुधा लागलिया दारुण । अन्नआकांक्षें पीडे प्राण । भक्तां क्षुधेची नव्हे आठवण । ऐसें अगाध स्मरण हरीचें ॥६६॥ भावें करितां भगवद्भक्ती । क्षुधेतृषेची नव्हे स्फूर्ती । एवढी पावले अगाध प्राप्ती । ते भवभयें निश्चितीं डंडळतीना ॥६७॥ मनामाजीं भवभयभरणी । तें मन रातलें हरिचरणीं । आतां भयातें तेथ कोण मानी । मन मनपणीं असेना ॥६८॥ मनीं स्फुरे द्वैताची स्फूर्ती । तेथ भवभयाची दृढस्थिती । ते मनीं जाहली हरीची वस्ती । यालागीं भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं ॥६९॥ देहबुद्धीमाजीं जाणा । नानापरी उठती तृष्णा । ते बुद्धि निश्चयें हरीच्या स्मरणा । करितां परिपूर्णा विनटली स्वयें ॥६७०॥ जेथें जें जें स्फुरे तृष्णास्फुरण । तेथें स्वयें प्रगटे नारायण । तेव्हां तृष्णा होय वितृष्ण । विरे संपूर्ण पूर्णामाजीं ॥७१॥ यापरी गा तृष्णारहित । हरिस्मरणें भगवद्भक्त । इंद्रियक्लेशां भक्त अलिप्त । तोही वृत्तांत ऐक राया ॥७२॥ मुख्य कष्टाचें अधिष्ठान । इंद्रियकर्मीं राया जाण । ते इंद्रियकर्मीं ब्रह्मस्फुरण । हरिभक्ताम पूर्ण हरिभजनें ॥७३॥ दृष्टीनें घेऊं जातां ’दर्शन’ । दृश्यमात्रीं प्रगटे नारायण । श्रवणीं ’शब्द’ घेतां जाण । शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तु ॥७४॥ घ्राणीं घेतां नाना ’वासु’ । वासावबोधें प्रगटे परेशु । रसना सेवी जो जो ’रसु’ । रसीं ब्रह्मरसु निजस्वादें प्रगटे ॥७५॥ देहीं लागतां शीत-उष्ण । अथवा कां मृदु-कठिण । तेथें ’स्पर्श’ ज्ञानें जाण । चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वयें ॥७६॥ आतां कर्मेंद्रियप्रवृत्ती । तेथही स्फुरे ब्रह्मस्फूर्ती । घेणें देणें गमनस्थिती । इंद्रियां गती आत्मारामें ॥७७॥ ऐसे करितां इंद्रियें कष्ट । ते कष्टीं होय निजसुख प्रगट । तेणें इंद्रियां विश्रांति चोखट । पिकली स्वानंदपेठ हरिभक्तां ॥७८॥ जेणें इंद्रियां कष्ट होती । तेणेंचि इंद्रियां सुखप्राप्ती । हे भगवद्भजनीं निजयुक्ती । भोगिजे हरिभक्ती हरीचेनि स्मरणें ॥७९॥ जन्म आणि मरण । हें देहाचे माथां जाण । भक्त देहीं विदेही पूर्ण । ध्यातां हरिचरण हरिरुप जाहले ॥६८०॥ यालागीं देहाची अहंता । कदा नुपजे भगवद्भक्तां । ते भक्तपूर्णतेची कथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥८१॥ देह धरिल्या पंचाननें । भक्त न डंडळी जीवें प्राणें । वंध्यापुत्र सुळीं देणें । देहाचें मरणें तेवीं देखे ॥८२॥ छाया पालखीं बैसावी । ऐसें कोणी चिंतीना जीवीं । तैशी देहासी पदवी यावी । हा नुठी सद्भावीं लोभ भक्तां ॥८३॥ देहासी आलिया नाना विपत्ती । भक्तां खेदु नुमटे चित्तीं । जेवीं आकाश शस्त्रघातीं । न ये काकुळती तैसे ते ॥८४॥ जननीजठरीं देहो जन्मला । भक्तु न म्हणे मी जन्मा आला । रवि थिल्लरीं प्रतिबिंबला । थिल्लर मी जाहला कदा न म्हणे ॥८५॥ सायंप्रातः सूर्य प्रकाशे । अभ्रीं गंधर्वनगर आभासे । देह प्रतिपाळी अदृष्ट तैसें । म्यां केलें ऐसें स्फुरेना ॥८६॥ भक्तदेहासी येतां मरण । हेतुरहित हरीचें स्मरण । यालागीं देह निमाल्या आपण । न मरतां पूर्ण पुर्णत्वें उरे ॥८७॥ थिल्लरा समूळ नाशु झाला । तरी रवि न म्हणे मी निमाला । तेवीं देहो गेलिया भक्त उरला । सद्रूपें संचला हरिस्मरणें ॥८८॥ आधीं काय सर्पु मारावा । मग दोरातें दोरु करावा । तो न पालटतां निजगौरवा । दोरुचि अघवा दोररुपें ॥८९॥ तेवीं हरिभक्तां देहाचा अभावो । मा काळ कवणा घालील घावो । आतां आम्ही ते आम्हीच आहों । तें आम्हीपणही वावो आमुचेनि आम्हां ॥६९०॥ इत्यादि संसारदेहधर्म । ज्यासी स्पर्शों न शके कर्माकर्म । मोहें नव्हेचि भवभ्रम । तो भक्तोत्तम प्रधानत्वें ॥९१॥ राया आणिकही एक खूण । तुज मी सांगेन संपूर्ण ।


एकनाथी भागवत - श्लोक ५० वा

न कामकर्मबीजानां यस्य चेतसि सम्भवः । वासुदवैकनिलयः स व भागवतोत्तमः ॥५०॥

हृदयीं चिंतितां आत्माराम । तद्रूप जाहला हृदयींचा काम । त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम । देवदेवोत्तम तुष्टोनि प्रगटे ॥९३॥ तेथें ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पकडल्या हरिसुखासी । एवं वासना जडल्या हरिरुपाशीं । हरि आश्रयो त्यांसी दृढ जाहला ॥९४॥ तेथ जो जो भक्तांसी कामु । तो तो होय आत्मारामु । वासनेचा निजसंभ्रमु । पुरुषोत्तमु स्वयें होये ॥९५॥ जगीं हरिभक्ति उत्तमोत्तम । भक्त कामेंचि करी निष्काम । चाळितां वासना-अनुक्रम । निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वयें ॥९६॥ ग्रासोग्रासीं रामस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण । भक्त भोगी मुक्तपण । या रीतीं जाण विदेहा ॥९७॥ ऐसा जो निष्कामनिष्ठ । तोचि भागवतांमाजीं श्रेष्ठ । त्यासीच प्रधानत्वपट । जाण तो वरिष्ठ उत्तमत्वें ॥९८॥ उत्तम भक्त कैसे विचरती । त्या भक्तांची विचरणस्थिती । ते सांगितली राया तुजप्रती । यथानिगुती तीं श्लोकीं ॥९९॥ उत्तम भक्त कोणें लिंगेंसीं । आवडते जाहले भगवंतासी । तें लक्षण सांगावयासी । अतिउल्हासीं हरि बोले ॥७००॥


एकनाथी भागवत - श्लोक ५१ वा

न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः । सज्जतेऽस्मिन्नहंभावो देहे व स हरेः प्रियः ॥५१॥

प्राकृतां देहीं देहाभिमान । तेणें गुरुकृपा करितां भजन । पालटे अभिमानाचें चिन्ह । अहं नारायणभावनायुक्त ॥७०१॥ ’अहं देह’ हें समूळ मिथ्या । ’अहं नारायण’ हें सत्य तत्त्वतां । ऐशी भावना दृढ भावितां । ते भावनाआंतौता अभिमान विरे ॥२॥ अभिमान हरिचरणीं लीन । तेव्हां भक्त होय निरभिमान । तेंचि निरहंतेचें लक्षण । हरि संपूर्ण सांगत ॥३॥ निरहंकाराचीं लक्षणें । तो जन्मोनि मी जन्मलों न म्हणे । सुवर्णाचें केलें शुनें । तरी सोनें श्वान हों नेणे तदाकारें असतां ॥४॥ तेवीं जन्मादि अहंभावो । उत्तम भक्तां नाहीं पहा हो । कर्मक्रियेचा निर्वाहो । ’अहंकर्ता’ स्वयमेवो मानीना ॥५॥ तो कर्म करी परी । न म्हणे ’मी कर्ता’ । जेवीं गगनीं असोनि सविता । अग्नि उपजवी सूर्यकांता । तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं ॥६॥ सूर्यें सूर्यकांतीं अग्निसंग । तेणें होतु याग कां दाघ । तें बाधूं न शके सूर्याचें अंग । तेवीं हा चांग करुनि अकर्ता ॥७॥ अचेतन लोह चुंबकें चळे । लोहकर्में चुंबक न मैळे । तेवीं हा चांग करुनि सकळें । अनहंकृतिबळें अकर्ता ॥८॥ देहींचिं कर्में अदृष्टें होती । मी कर्ता म्हणतां तीं बाधती । भक्तां सर्व कर्मीं अनहंकृती । परमात्मप्रतीती भजनयोगें ॥९॥ एव्म देहींचीं कर्में निपजतां । पूर्णप्रतीती भक्त अकर्ता । कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथां अनहंकृती ॥७१०॥ जरी जाहला उत्तम वर्ण । तरी तो न म्हणे ’मी ब्राह्मण’ । स्फटिक कुंकुमें दिसे रक्तवर्ण । ’मी लोहीवा पूर्ण’ स्फटिक न म्हणे ॥११॥ ज्यासी नाहीं देहाभिमान । तो हातीं न धरी देहाचा वर्ण । तैसाचि आश्रमाभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा ॥१२॥ अंगीं बाणला संन्यासु । परी तो न म्हणे मी परमहंसु । जेवीं नटाअंगीं राजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥१३॥ तेवीं आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा । तैशीच जातीचीही कथा । न घे माथां भक्तोत्तम ॥१४॥ जाति उंच नीच असंख्य । परी तो न म्हणे हे माझीचि एक । जेवीं गंगातीरीं गांव अनेक । परी गंगा माझा एक गांव न म्हणे ॥१५॥ तेवीं जन्म-कर्म-वर्णा-श्रम-जाती । पूर्ण भक्त हातीं न धरिती । चहूं देहांची अहंकृती । स्वप्नींही न धरिती हरिभक्त ॥१६॥ आशंका ॥ तरी काय वर्णाश्रम-जाती । भक्त निःशेष सांडिती । त्यांत असोनि नाहीं अहंकृती ।ते हे उपपत्ति बोलिलों राया ॥१७॥ तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती । तेव्हां त्यासवें नाहीं वर्णाश्रम-जाती । जन्मअभिमानें माथां घेती । हे कुळगोत-जाति पैं माझी ॥१८॥ ऐशा नाथिल्या अहंकृती । ब्रह्मादिक गुंतले ठाती । वाढवितां वर्णाश्रम जाती । सज्ञान गुंतती निजाभिमानें ॥१९॥ ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती । ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती । सोडूं नेणे गा कल्पांतीं । सज्ञान ठकिजेती निजाभिमानें ॥७२०॥ येथें भक्तांच्या भाविक स्थितीं । अभिमान तुटे भगवद्भक्तीं । ते निरभिमान भक्तस्थिती । राया तुजप्रती दाविली स्वयें ॥२१॥ समूळ देहाभिमान झडे । तो देहाचि देवासी आवडे । ते भक्त जाण वाडेकोडें । लळेवाडे हरीचे ॥२२॥ ते जें जें मागती कौतुकें । तें देवोचि होय तितुकें । त्यांचेनि परम संतोखें । देव सुखावला सुखें दोंदिल होये ॥२३॥ तो जिकडे जिकडे जाये । देव निजांगें तेउता ठाये । भक्त जेउती वास पाहे । देव ते ते होय पदार्थ ॥२४॥ त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढें मागें । त्यासभोंवता सर्वांगें । भक्तीचेनि पांगें भुलला चाले ॥२५॥ निरभिमानाचेनि नांवें । देव निजांगें करी आघवें । जेवीं कां तान्हयाचेनि जीवें । जीवें भावें निजजननी ॥२६॥ एवं राखतां निजभक्तांसी । तरी देव धाके निजमानसीं । जरी हा मजसीं आला ऐक्यासी । तरी हे प्रीति कोणासीं मग करावी ॥२७॥ कोणासी पाहों कृपादृष्टीं । कोणापें सांगों निजगोष्टी । कोणासी खेवें देवों मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥२८॥ या काकुळतीं श्रीअनंतु । ऐक्यभावें करी निजभक्तु । मग देवो भक्त दोहींआंतु । देवोचि नांदतु स्वानंदें ॥२९॥ एवं आपुली आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीतीं । हेंचि निरुपण वेदांतीं । ’अद्वैतभक्ति’ या नांव ॥७३०॥ त्यासी चहूं भुजीं आलिंगितां । हांव न बाणेचि भगवंता । मग रिघोनियां आंतौता । परमार्थता आलिंगी ॥३१॥ ऐसें खेंवाचें मीस करी । तेणें भक्त आणी आपणाभीतरीं । मग आपण त्याआंतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोंदाटे ॥३२॥ नवल आवडीचा निर्वाहो । झणीं यासी लागे काळाचा घावो । यालागीं निजभक्तांचा देहो । देवाधिदेवो स्वयें होये ॥३३॥ ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजीं उत्तमोत्तम । यापरी भागवतधर्म । पुरुषोत्तम वश्य करी ॥३४॥ ऐशिया उत्तम भक्ता । भेदाचि समूळ नुरे वार्ता । हेचि अभेदभक्तकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक ५२ वा

न यस्य स्वः पर इति वित्तेष्वात्मनि वा भिदा । सर्वभूतसमः शान्तः स वै भागवतोत्तमः ॥५२॥

अद्वैतभजनाचे वोजें । मी माझें तूं आणि तुझें । ज्यासी नुरेचि सहज निजें । तो भक्त मानिजे उत्तमत्वें ॥३६॥ यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं । भेदु निःशेष उरला नाहीं । तेथ माझें तुझे हें कांहीं । तें निमालें पाहीं जेथींच्या तेथें ॥३७॥ जेवीं अग्नीशीं जें जें टेंके । तें तें अग्नीचि होऊनि ठाके । तेवीं अभेदभक्त जें जें देखे । तें तें यथासुखें स्वस्वरुप होये ॥३८॥ निजवित्त आणिकापाशीं देतां । आवांकू नुपजे त्याचिया चित्ता । न देखे पारकेपणाची वार्ता । विकल्प घालितां तरी उपजेना ॥३९॥ डावे हातींचे पदार्था । उजवे हातीं स्वयें देतां । येथें कोण देता कोण घेता । तेवीं एकात्मता सर्वभूतीं ॥७४०॥ आपणासकट सर्व देहीं । भक्तां भगवंतावांचूनि नाहीं । यालागीं शांति त्याचे ठायीं । स्वानंदें पाहीं निःशंक नांदे ॥४१॥ ऐशिया निजसमशांतीं । भगवद्भक्त क्रीडा करिती । यालागीं उत्तमत्वाची प्राप्ती । सुनिश्चितीं पावले ॥४२॥ हरिभक्तांची ’निरपेक्षता’ । ऐक सांगेन नृपनाथा । उत्तम भक्तांची सांगतां कथा । अतिउल्हासता हरीसी ॥४३॥ निरपेक्ष तो मुख्य ’भक्त’ । निरपेक्ष तो अति ’विरक्त’ । निरपेक्ष तो ’नित्यमुक्त’ । सत्य भगवंत निरपेक्षी ॥४४॥


एकनाथी भागवत - श्लोक ५३ वा

त्रिभुवनविभवहतवऽप्यकुण्ठस्मृतिरजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् । न चलति भगवत्पदारविन्दाल्लवनिमिषार्धमपि यः स वष्णवाग्र्यः ॥५३॥

सप्रेमभावें करितां भक्ती । हरिचरणीं ठेविली चित्तवृत्ती । निजस्वार्थाचिये स्थितीं । अतिप्रीतीं निजनिष्ठा ॥४५॥ तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती । कर जोडूनि वरुं प्रार्थिती । तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी ॥४६॥ क्षणार्ध चित्तवृत्ती काढितां । त्रिभुवनविभव ये हाता । एवढिया सांडूनि स्वार्था । म्हणाल हरिभक्तां लाभ कोण ॥४७॥ हरिचरणीं अपरोक्षस्थिती । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती । त्यापुढें त्रिभुवनविभवसंपत्ती । भक्त मानिती तृणप्राय ॥४८॥ सकळ जगाचा स्त्रजिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वतां । त्रैलोक्यराज्यसमर्थता । वोळगे वस्तुतां अंगणीं ज्याचे ॥४९॥ त्रिभुवनवैभवाचे माथां । ब्रह्मपदाची समर्थता । तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिंवसिता हरिचरण ॥७५०॥ त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती । ब्रह्मा बैसोनि एकांतीं । अहर्निशीं हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे ॥५१॥ सहसा न पवे हरिचरण । यालागीं ब्रह्मा साभिमान । तेणें अभिमानेंचि जाण । नेलीं चोरुन गोपाल-वत्सें ॥५२॥ तेथें न कष्टतां आपण । न मोडतां कृष्णपण । गोपाल-वत्सें जाहला संपूर्ण । पूर्णत्वें पूर्ण स्वलीला ॥५३॥ अगाध हरिलीला पूर्ण । पाहतां वेडावलें ब्रह्मपण । तेव्हां सांडोनि पदाभिमान । अनन्यशरण हरिचरणीं ॥५४॥ कैलासराणा शूलपाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणीं । तोही निजराज्य सांडोनी । महाश्मशानीं हरिचरण चिंती ॥५५॥ कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरीं । हरिचरण हृदयामाझारीं । शिव निरंतरीं चिंतीत ॥५६॥ एवं ब्रह्मा आणि शंकर । चरणांचे न पवती पार । तेथें त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमंदभाग्य ॥५७॥ हरिचरणक्षणार्धप्राप्ती । त्रैलोक्यराज्यसंपत्ती । भक्त ओंवाळूनि सांडिती । जाण निश्चितीं निंबलोण ॥५८॥ हरिचरणसारामृतगोडी । क्षणार्ध जैं जोडे जोडी । तैं त्रैलोक्यवैभवाच्या कोडी । करी कुरवंडि निजभक्त भावें ॥५९॥ एवं हरिचरणांपरतें । सारामृत नाहीं येथें । यालागीं चित्तें वित्तें जीवितें । जडले सुनिश्चितें चरणारविंदीं ॥७६०॥ निमिषार्ध त्रुटी लव क्षण । जे न सोडिती हरिचरण । ते वैष्णवांमाजीं अग्रगण । राया ते जाण ’उत्तम भक्त’ ॥६१॥ जे त्रिभुवनविभवभोग भोगिती । तेही पावले अनुतापवृत्ती । त्यांच्या तापाची निजनिवृत्ती । हरिचरणप्राप्ती तें ऐक ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक ५४ वा

भगवत उरुविक्रमाङिघ्रशाखानखमणिचन्द्रिकया निरस्ततापे । हृदि कथमुपसीदतां पुनः स प्रभवति चन्द्र इवोदितेऽर्कतापः ॥५४॥

थोर हरिचरणाचा पराक्रम । पदें त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम । ब्रह्मांड भेदोनि पदद्रुम । वाढला परमसामर्थ्यें ॥६३॥ ते पदद्रुमींचिया दशशाखा । त्याचि दशधा दशांगुलिका । अग्रीं अग्रफळचंद्रिका । नखमणि देखा लखलखित ॥६४॥ ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत । चरणचंद्रामृतें नित्य स्त्रवत । भक्तचकोर ते सेवित । स्वानंदें तृप्त सर्वदा ॥६५॥ त्यांसी कामादि त्रिविधतापप्राप्ती । सर्वथा बाधूं न शके पुढती । जेवीं सूर्याची संतप्त दीप्ती । चंद्रबिंबाआंतौती कदा न रिघे ॥६६॥ जे हरिचरणचंद्र-चकोर । स्वप्नींही संसारताप न ये त्यांसमोर । ऐसा चरणमहिमा अपार । हरि मुनीश्वर हर्षें वर्णी ॥६७॥ ’देहे वै स हरेः प्रियः’ । येणें श्लोकें गा विदेह्या । दाविली भक्तिलिंगक्रिया । जाण तूं राया सुनिश्चित ॥६८॥ ’न यस्य स्वः पर इति’ । येणें त्याची धर्मस्थिती । राया सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं यथार्थ ॥६९॥ ’यादृश’ म्हणिजे कैसे असती । भगवद्भजनें स्वानंदतृप्ति । त्रिविध तापांची निवृत्ती । करोनि असती हरिभक्त ॥७७०॥ आतां त्यांची बोलती परी । नामें गर्जती निरंतरीं । तेचि ते संक्षेपाकारीं । उपसंहारीं हरि सांगे ॥७१॥ सकळ लक्षणांची सारस्थिती । प्रेमळाची परमप्रीती । उल्लंघूं न शके श्रीपती । तेही श्लोकार्थी हरि सांगे ॥७२॥


एकनाथी भागवत - श्लोक ५५ वा

विसृजति हृदयं न यस्य साक्षाद्धरिरवशाभिहितोऽप्यघौघनाशः । प्रणयरशनया धृताङिघ्रपद्मः स भवति भागवतप्रधान उक्तः ॥५५॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे एकाकारटीकायां द्वितीयोऽध्यायः ॥२॥

अवचटें तोंडा आल्या ’हरी’ । सकळ पातकें संहारी । तें हरिनाम निरंतरीं । जे निजगजरीं गर्जती ॥७३॥ ऐसें ज्यांचे जिव्हेवरी । नाम नाचे निरंतरीं । ते धन्य धन्य संसारीं । स्वानंदें हरि गर्जतु ॥७४॥ सप्रेम सद्भावें संपूर्ण । नित्य करितां नामस्मरण । वृत्ति पालटती आपण । तेंही लक्षण ऐक राया ॥७५॥ नामसरिसाच हरी । रिघे हृदयामाझारीं । तेणें धाकें अभ्यंतरीं । हों लागे पुरी हृदयशुद्धी ॥७६॥ तेव्हां प्रपंच सांडोनि ’वासना’ । जडोनि ठाके जनार्दना । ’अहं’ कारु सांडोनि अहंपणा । ’सोहं’ सदनामाजीं रिघे ॥७७॥ ’चित्त’ विसरोनि चित्ता । जडोनि ठाके भगवंता । ’मनाची’ मोडली मनोगतता । संकल्पविकल्पता करुं विसरे ॥७८॥ कृतनिश्चयेंसीं ’बुद्धी’ । होऊनि ठाके समाधी । ऐशी देखोनि हृदयशुद्धी । तेथोनि त्रिशुद्धी न रिघे हरी ॥७९॥ हरिनामप्रेमप्रीतीवरी । हृदयीं रिघाला जो हरी । तो निघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरीं कृपाळू ॥७८०॥ भक्तें प्रणयप्रीतीची दोरी । तेणें चरण धरोनि निर्धारीं । निजहृदयीं बांधिला हरी । तो कैशापरी निघेल ॥८१॥ भगवंत महा अतुर्बळी । अदट दैत्यांतें निर्दळी । तो कोंडिला हृदयकमळीं । हे गोष्टी समूळीं मिथ्या म्हणती ॥८२॥ जो शुष्क काष्ठ स्वयें कोरी । तो कोंवळ्या कमळामाझारीं । भ्रमर गुंतला प्रीतीवरी । केसर माझारीं कुचंबो नेदी ॥८३॥ तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं । हृदयीं कोंडिला श्रीपती । तेथ खुंटल्या सामर्थ्यशक्ती । भावार्थप्रती बळ न चले ॥८४॥ बाळ पालवीं घाली पिळा । तेणें बाप राहे थोकला । तरी काय तो निर्बळ जाहला । ना तो स्नेहें भुलला ढळेना ॥८५॥ तेवीं निजभक्त लळेवाड । त्याचें प्रेम अत्यंत गोड । निघावयाची विसरोनि चाड । हृदयीं सुरवाड हरि मानी ॥८६॥ ऐसें ज्याचें अंतःकरण । हरि न सांडी स्वयें आपण । तैसेचि हरीचे श्रीचरण । जो सांडीना पूर्ण प्रेमभावें ॥८७॥ हरीचे ठायीं प्रीति ज्या जैशी । हरीची प्रीति त्या तैसी । जे अनन्य हरीपाशीं । हरि त्यांसि अनन्य सदा ॥८८॥ ऐसे जे हरिचरणीं अनन्य । तेचि भक्तांमाजीं प्रधान । वैष्णवांत ते अग्रगण । राया ते जाण ’भाववतोत्तम’ ॥८९॥ गौण करुनि चारी मुक्ती । जगीं श्रेष्ठ भगवद्भक्ती । त्या उत्तम भक्तांची स्थिती । संक्षेपें तुजप्रती बोलिलों राया ॥७९०॥ पूर्ण भक्तीचें निरुपण । सांगतां वेदां पडलें मौन । सहस्त्रमुखाची जिव्हा पूर्ण । थकोनि जाण थोंटावे ॥९१॥ ते भक्तीची एकांशता तुज म्यां सांगितली हे कथा । यावरी परिपूर्णता । राया स्वभावतां तूं जाणशी ॥९२॥ हरीसारिखा रसाळ वक्ता । सांगतां उत्तमभक्तकथा । तटस्थ पडिलें समस्तां । भक्तभावार्थता ऐकोनी ॥९३॥ तंव रावो रोमांचित जाहला । रोममूळीं स्वेद आला । श्रवणसुखें लांचावला । डोलों लागला स्वानंदें ॥९४॥ पूर्ण संतोषोनि मनीं । म्हणे भलें केलें मुनी । थोर निवालों निरुपणीं । श्रवणाची धणी तरी न पुरे ॥९५॥ ऐकोनि हरीचें वचन । राजा म्हणे हे अवघे जण । अपरोक्षज्ञानें ज्ञानसंपन्न । वक्ते पूर्ण अवघेही ॥९६॥ भिन्न भिन्न करोनि प्रश्न । आकर्णूं अवघ्यांचें वचन । ऐशिया श्रद्धा राजा पूर्ण । अनुपम प्रश्न पैं करील ॥९७॥ रायासी कथेची पूर्ण चाड । पुढां प्रश्न करील गोड । जे ऐकतांचि पुरे कोड । श्रोते वाड सुखावती ॥९८॥ त्या प्रश्नाचें गुह्य ज्ञान । श्रवणीं पाववीन संपूर्ण । वदनीं वक्ता श्रीजनार्दन । यथार्थ पूर्ण अर्थवी ॥९९॥ पांवा नाना मधुर ध्वनी गाजे । परी तो वाजवित्याचेनि वाजे । तेवीं एका जनार्दनीं साजे । ग्रंथार्थवोजें कवि कर्ता ॥८००॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे एकाकारटीकायां द्वितीयोऽध्यायः ॥२॥ ॥ ॐ तत्सत् - श्रीकृष्ण प्रसन्न ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]