Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय पंधरावा

विकिस्रोत कडून

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो श्रीजनार्दन । सकळ सिद्धींचें सिद्धस्थान । सकळ ऋद्धींचें परम निधान । तुझे श्रीचरण सर्वार्थी ॥१॥ निधान साधावया अंजन । नयनीं काळिमा घालिती जन । तेणें काळवंडले नयन । थितें निधान दिसेना ॥२॥ तैसे नव्हती तुझे चरण । करितां चरणरजवंदन । निःशेष काळिमा निरसे जाण । पूर्ण निधान दाविसी ॥३॥ अंजनें साधितां निधान । तेथ छळावया पावे विघ्न । बळी देऊनि साधिल्या जाण । नश्वरपण तयासी ॥४॥ तैसे नव्हती तुझे चरण । अवलीळा करितां स्मरण । नित्य सिद्ध अव्यय जाण । निजनिधान ठसावे ॥५॥ हें साधूनियां निधान । झाले सनकादिक संपन्न । नारदाचें उदारपण । येणेंचि जाण वाखाणे ॥६॥ वज्रकवच प्रल्हादासी । हेंचि भांडवल गांठी त्यासी । शुकादि वामदेवांसी । महिमा येणेंसीं पावले ते ॥७॥ व्यासवाल्मीकि महावेव्हारे । येणेंचि भांडवलें झाले खरे । त्यांचेनि भांडवलें लहान थोरें । छेदूनि दरिद्रें नांदती ॥८॥ त्या सद्गुभरूचे श्रीचरण । परम निधींचें निधान । एका जनार्दना शरण । हें आम्हां परिपूर्ण भांडवल ॥९॥ येणेंचि भांडवलें प्रस्तुत । प्राप्त झालें श्रीभागवत । तेथ उद्धवासी श्रीअनंत । ज्ञानमथितार्थ सांगत ॥१०॥ त्या दोघांची एकान्त मातू । प्रकट जाहली जगाआंतू । हा परीक्षितीचा विख्यातू । उपकार लोकांतू थोर झाला ॥११॥ ज्याचे श्रद्धेच्या आवडीं । शुक पावला लवडसवडी । तेणें गुह्य ज्ञानाची गोडी । प्रकट उघडी दाखविली ॥१२॥ त्या शुकाचें नवल महिमान । कानीं न सांगतां गुह्य ज्ञान । श्रवणें तोडोनि भवबंधन । परीक्षिती जाण उद्धरिला ॥१३॥ एथवरी श्रवणाची गोडी । प्रसिद्ध दाविली उघडी । तरी अभाग्यु दांतखिळी पाडी । कानाची नुघडी निमटली मिठी ॥१४॥ श्रवणीं घालितां वाडेंकोडें । कथासारामृत बाहेरी सांडे । श्रवणाआंतौता थेंबही न पडे । यालागीं रडे विषयांसी ॥१५॥ असो हे श्रोत्यांची कथा । कथा सांगे जो वक्ता । तोही तैसाचि रिता । घोटु आंतौता पावों नेदी ॥१६॥ जैसा गुळउंिसाचा घाणा । रसु बाहेरी जाये मांदणा । फिकेपणें करकरी गहना । ते गती वदना वक्त्याचे ॥१७॥ जें कथामृताचें गोडपण । तें सद्गुगरूवीण चाखवी कोण । यालागीं जनार्दना शरण । जेणें गोडपण चाखविलें ॥१८॥ परी चाखविली उणखूण । तेही अभिनव आहे जाण । स्वाद स्वादिता आपण । होऊनि गोडपण चाखवी ॥१९॥ बाळकाहातीं दिधल्या फळा । खावें हें न कळे त्या अबळा । त्याचे मुखीं घालूनि गळाळा । गोडीचा जिव्हाळा जनक दावी ॥२०॥ गोडी लागल्या बाळकासी । तेंचि फळ खाय अहर्निशीं । तेवीं जनार्दनें आम्हांसी । गोडी श्रीभागवतासी लाविली ॥२१॥ ऐसी लाविली गोडी चढोवडी । तेणें झाली नवलपरवडी । मज सांडितांही ते गोडी । गोडी न सोडी मजलागीं ॥२२॥ ते गोडीनें गिळिलें मातें । मीपण गेलें गोडीआंतौतें । ते गोडीचें उथळलें भरितें । सबाह्य रितें उरों नेदी ॥२३॥ हें शुकमुखींचें श्रेष्ठ फळ । गोडपणें अतिरसाळ । त्वचा आंठोळीवीण केवळ । गोडीच सकळ फळरूपें ॥२४॥ ते श्रीभागवतींची गोडी । श्रीकृष्णें निजआवडीं । उद्धवासी कडोविकडी । भक्ति चोखडी चाखविली ॥२५॥ करितां माझें भजन । धरितां माझे मूर्तीचे ध्यान । समाधिपर्यंत साधन । उद्धवासी संपूर्ण सांगीतलें ॥२६॥ ते कृष्णामुखींची मातू । ऐकोनि चौदाव्या अध्यायांतू । उद्धव हरिखला अद्भुातू । माझा निजस्वार्थू फावला ॥२७॥ मज कृष्णमूर्तीचें ध्यान । सहजें सदा असे जाण । तेणेंच होय समाधि समाधान । तरी कां प्रश्न करूं आतां ॥२८॥ ऐकोनि चौदावा अध्यायो । झाला उद्धवासी हा दृढ भावो । हें देखोनि स्वयें देवो । पुढील अभिप्रावो सूचितू ॥२९॥ दृढ विश्वसेंसीं जाण । करितां माझें भजन ध्यान । पुढां उपजे सिद्धींचें विघ्न । ते अर्थीं श्रीकृष्ण उपदेशी ॥३०॥ पंधरावे अध्यायीं निरूपण । भक्तीं माझें करितां भजन । अवश्य सिद्धी उपजती जाण । त्या त्यागवी विघ्न म्हणोनी ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीभगवानुवाच । जितेन्द्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः । मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयः ॥१॥

प्राणापानजयो जयापासीं । इंद्रियजयो असे ज्यासी । यावरी उल्हास मद्भाक्तीसी । चित्त अहर्निशीं मद्युक्त ॥३२॥ उद्धवा गा त्याच्या ठायीं । अनिवार सिद्धी उपजती पाहीं । ये अर्थी संदेह नाहीं । जे जे समयीं जें इच्छी ॥३३॥ ऐसें उद्धवें ऐकतां । चमत्कारू झाला चित्ता । समूळ सिद्धींची कथा । श्रीकृष्णनाथा पुसों पा ॥३४॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

श्रीउद्धव उवाच । कया धारणया कास्वित् कथं वा सिद्धीरच्युत । कति वा सिद्धयो ब्रूहि योगिनां सिद्धीदो भवान् ॥२॥

कोण्या धारणा कोण सिद्धी । ते सांगावी विधानविधि । संख्या किती सकळ सिद्धी । तेंही कृपानिधी सांगिजे ॥३५॥ या सकळ सिद्धींची कथा । तूं एक जाणता तत्त्वतां । ते मज सांगिजे जी अच्युता । तूं सिद्धीदाता योगियां ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

श्रीभगवानुवाच । सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः । तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥३॥

सिद्धी अष्टादश जाण । त्यांची धारणा भिन्न भिन्न । ऐंसे बोलिले योगज्ञ । योगसंपन्न महासिद्ध ॥३७॥ या नांव गा सिद्धी समस्ता । यांत अष्ट महासिद्धी विख्याता । त्या माझे स्वरूपीं स्वरूपस्थिता । आणिकासी तत्त्वतां त्या नाहीं ॥३८॥ मनसा वाचा कर्मणा जाण । विसरोनि देहाचें देहपण । माझेनि स्वरूपें अतिसंपन्न । चैतन्यघन जो झाला ॥३९॥ त्यापाशीं या सिद्धी जाण । उभ्या असती हात जोडून । परी तो न पाहे थुंकोन । निचाड जाण यापरी ॥४०॥ इतर दहा सिद्धींची कथा । ज्या सत्त्वगुणें गुणभूता । साधक शुद्धसत्त्वात्मा होतां । त्यापाशीं सर्वथा प्रकटती ॥४१॥ अष्ट महासिद्धींची कथा । तुज मी सांगेन तत्त्वतां । ज्या माझे स्वरूपीं स्वभावतां । असती वर्तता अहर्निशीं ॥४२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ व ५ वा

अणिमा महिमा मूर्तेर्लघिमा प्राप्तिरिन्द्रियैः । प्राकाश्यं श्रुतदृष्टेषु शक्तिप्रेरणमीशिता ॥४॥

गुणेष्वसङ्गो वशिता यत्कामस्तदवस्यति । एता मे सिद्धयः सौम्य अष्टावौत्पत्तिका मताः ॥५॥

अणिमा महिमा लघिमास्थिती । या तिन्ही देहसिद्धीचे प्राप्ती । ’ प्राप्तरिंद्रियैः ’ जे वदंती । ते जाण चौथी महासिद्धी ॥४३॥ प्राकाम्य श्रुतदृष्टांता । ते पांचवी सिद्धी गा सर्वथा । शक्तिप्रेरण ईशिता । हे जाण तत्त्वतां सहावी सिद्धी ॥४४॥ माझे धर्म जेथ वश होती । ते वशिता बोलिजे सिद्धांतीं । ते सातवी सिद्धी वदंती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४५॥ त्रिलोकीं भोग जो निरुपम । तो न करितां परिश्रम । इच्छामात्रें उत्तमोत्तम । भोग सुगम हों लागे ॥४६॥ इच्छील्या कामसुखाची प्राप्ति । त्रिभुवनींची भोगसंपत्ती । एकेच काळें अवचितीं । ते जाण पां ख्यातीं आठवी सिद्धी ॥४७॥ या अष्टमहासिद्धींची राशी । स्वभावें असे मजपाशीं । साधक शिणतां प्रयासीं । एकादी कोणासी उपतिष्ठे ॥४८॥ हे महासिद्धींची व्युत्पत्ती । इतर दाहा ज्या बोलिजेती । त्याही सांगेन तुजप्रती । यथानिगुती उद्धवा ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ व ७ वा

अनूर्मिमत्त्वं देहेऽस्मिन्दूरश्रवणदर्शनम् । मनोजवः कामरूपं परकायप्रवेशनम् ॥६॥

स्वच्छन्दमृत्युर्देवानां सहक्रीडानुदर्शनम् । यथासङ्कल्पसंसिद्धीराज्ञाप्रतिहता गतिः ॥७॥

देहीं बाधिती ना ऊर्मि साही । ते अनूर्मिसिद्धी पहिली पाहीं । दूरली वाचा ऐके ठायीं । दूरश्रवण नवाई दुसरी सिद्धी ॥५०॥ त्रिलोकींचा सोहळा । बैसले ठायीं देखे डोळां । हे तिसरे सिद्धी लीला । दूरदर्शन कळा ती नांव ॥५१॥ मनोजवसिद्धी ऐशी आहे । कल्पिल्या ठायासी पाहें । मनोवेगें शरीर जाये । चौथी होये हे सिद्धी ॥५२॥ कामरूप सिद्धीची परी । जैशिया रूपाची कामना करी । तैसें रूप तत्काळ धरी । हे पांचवी खरी कामनासिद्धी ॥५३॥ आपुलें शरीर ठेवूनि दूरी । परशरीरीं प्रवेश करी । हे परकायप्रवेशपरी । सहावी साजिरी अतिसिद्धी ॥५४॥ काळासी वश्य नाहीं होणें । आपुलिये इच्छेनें मरणें । हे सातवी सिद्धी जाणणें । स्वच्छंदमरणें ती नांव ॥५५॥ स्वर्गीं देवांचें जें क्रीडन । त्यांचें हा देखे दर्शन । स्वयें क्रीडावया अंगवण । ते सिद्धी जाण आठवी ॥५६॥ जैसा संकल्प तैसी सिद्धी । ते नववी जाण पां त्रिशुद्धी । राजाही आज्ञा शिरीं वंदी । ज्याची गमनसिद्धी सर्वत्र ॥५७॥ ज्याची आज्ञा आणि गमन । कोठेंही अवरोधेना जाण । हें दहावे सिद्धीचें लक्षण । ज्ञानविचक्षण जाणती ॥५८॥ या गुणहेतुसिद्धींची विधी । म्यां सांगीतली हे त्रिशुद्धी । यांहीहोनि क्षुद्रसिद्धी । त्याही निजबुद्धीं अवधारीं ॥५९॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ व ९ वा

त्रिकालज्ञत्वमद्वन्द्वं परचित्ताद्यभिज्ञता । अग्न्यर्काम्बुविषादीनां प्रतिष्टम्भोऽपराजयः ॥८॥

एताश्चोद्देशतः प्रोक्ता योगधारणसिद्धयः । यया धारणया या स्याद्यथा वा स्यान्निबोध मे ॥९॥

क्षुद्रसिद्धी पंचलक्षण । भूत भविष्य वर्तमान । या त्रिकाळांचें जें ज्ञान । तें पहिलें जाण ये ठायीं ॥६०॥ सुख दुःख शीत उष्ण । मृदु आणि अतिकठिण । या द्वंद्वांसी वश नव्हे जाण । तें दुसरें लक्षण सिद्धीचें ॥६१॥ पराचें स्वप्न स्वयें सांगणें । पुढिलाचे चित्तींचें जाणणें । हे तिसरी सिद्धी म्हणणें । ऐक लक्षणें चौथीचीं ॥६२॥ अग्नि वायु आणि उदक । शस्त्र विष आणि अर्क । यांचें प्रतिस्तंभन देख । ते सिद्धी निष्टंक पैं चौथी ॥६३॥ कोणासी जिंकिला न वचे पाहें । जेथींचा तेथ विजयी होये । एकला सर्वत्र विजयो लाहे । हे पांचवी आहे विजयसिद्धी ॥६४॥ उद्देश्यमात्रें सिद्धींची गती । म्यां सांगीतली तुजप्रती । आतां कोण धारणा कोण स्थिती । सिद्धीची प्राप्ती होय ते ऐक ॥६५॥ अष्ट महासिद्धींची धारणा । गुणहेतु दहा सिद्धी जाणा । क्षुद्रसिद्धी पंचलक्षणा । त्यांचे साधित्या साधना हरि बोले ॥६६॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

भूतसूक्ष्मात्मनि मयि तन्मात्रं धारयेन्मनः । अणिमानमवाप्नोति तन्मात्रोपासको मम ॥१०॥

अष्ट महासिद्धी स्वाभाविका । माझ्या ठायीं असती देखा । या असाध्य साधावया आवांका । करित्या साधका साधन सांगे ॥६७॥ मी अणुरेणूचाही अणुरेण । जीवाचाही हृदयस्थ जाण । तेथ अणुतन्मात्र करूनि मन । माझ्या ठायीं जाण जो राखे ॥६८॥ अणुतन्मात्र ध्यान सदा राहे । त्याचा अणुमात्रचि देह होये । कीटकीभृंगीच्या ऐसें पाहें । अणिमेची लाहे तो सिद्धी ॥६९॥ तो अच्छिद्रीं निघोनि जाये । जगाच्या डोळ्यामाजीं समाये । कोठेंही खपेना पाहें । हे अणिमेची लाहे महासिद्धी ॥७०॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

महत्यात्मन्मयि परे यथासंस्थं मनो दधत् । महिमानमवाप्नोति भूतानां च पृथक् पृथक् ॥११॥

माझें स्वरूप अनंत अपार । महत्तत्त्वाहोनि अतिथोर । आणि महत्तत्त्वाचाहीं साचार । नियंता ईश्वर जो कां मी ॥७१॥ हे सिद्धी साधावया जो नर । माझी धारणा धरी अपरंपार । तेवढेंच होय त्याचें शरीर । हे सिद्धी महाथोर महिमान ॥७२॥ सूक्ष्म कापुसाचे तंतू पाहें । तो कल्पनेऐसा पटू होये । माझी महती धारणा वाहे । तो माझी सिद्धी लाहे महिमत्वें ॥७३॥ तुकितां त्याच्या समान भारा । न पुरे सपर्वत सगळी धरा । एवढ्या महत्तत्त्वांचा उभारा । सिद्धिद्वारा तो पावे ॥७४॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

परमाणुमये चित्तं भूतानां मयि रञ्जयन् । कालसूक्ष्मार्थतां योगी लघिमानमवाप्नुयात् ॥१२॥

वाय्वादि प्राणप्रमाण । जेणें काळसूत्राचें गणन । तो परमाणुरूप भगवंत जाण । त्याचेंचि दृढ ध्यान सदा जो करी ॥७५॥ परमाणुधारणेचा महिमा । त्याचा देहासी ये अतिलघिमा । तो मस्तकीं चढोनि पाहे मा । उडे व्योमामाजीं सुखें ॥७६॥ अणिमादि तीनी धारणा । या देहींच्या सिद्धी जाणा । लहान थोर हळूपणा । देहलक्षणां उपजवी ॥७७॥ उरल्या ज्या पंचमहासिद्धी । त्यांच्या धारणेचा विधी । तोही सांगेन त्रिशुद्धी । ऐक सुबुद्धी उद्धवा ॥७८॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

धारयन्मय्यहंतत्त्वे मनो वैकारिकेऽखिलम् । सर्वेन्द्रियाणामात्मत्वं प्राप्तिं प्राप्नोति मन्मनाः ॥१३॥

मूळींचा शुद्ध अहंकारू । ज्यापासूनि इंद्रियविकारू । इंद्रियअशधिष्ठात्री सुरवरू । चेतविता ईश्वरू जो कां मी ॥७९॥ त्या माझ्या ठायीं धारणा धरितां । इंद्रियअधिष्ठात्री देवता । त्यासी पावोनि एकात्मता । इंद्रियप्रकाशता स्वयें लाहे ॥८०॥ जे कां इंद्रियव्यापार जगाचे । प्रकाशूनि हा देखे साचे । एवढिये इंद्रियप्राप्तीचें । साधी सिद्धीचें वैभव ॥८१॥ तेव्हां ज्याचा जो जेथ पाहे । इंद्रियांचा व्यापारू होये । तो येणेंचि केला आहे । ऐशी प्रतीति होये इंद्रियप्राप्ती ॥८२॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

महत्यात्मनि यत्सूत्रे धारयन्मयि मानसम् । प्राकाश्यं पारमेष्ठ्यं मे विन्दतेऽव्यक्तजन्मनः ॥१४॥

जें महत्तत्त्व गा जाण । तें मायेचें प्रथम स्फुरण । ज्यासी क्रिया सूत्रप्रधान । नामाभिधान बोलती ॥८३॥ तेथ अजन्मा मी आपण । जाहलों सूत्राचा सूत्रात्मा जाण । त्या माझ्या स्वरूपाचें ध्यान । सावधान जो करी ॥८४॥ ज्या सूत्राचेनि प्रकाशप्रवाहें । ब्रह्मांड हिरण्यगर्भ प्रकाशला राहे । ते प्रकाशता त्यासी वश्य होये । येणें सूत्रात्मा पाहे निदिध्यासनें ॥८५॥ त्या निदिध्यासनापोटीं । करूं शके ब्रह्मांडकोटी । एवढी प्रकाशसिद्धी गोमटी । हे मजवीण नुठी साधकां ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

विष्णौ त्र्यधीश्वरे चित्तं धारयेत्कालविग्रहे । स ईशित्वमवाप्नोति क्षेत्रक्षेत्रज्ञचोदनाम् ॥१५॥

मायादित्रिगुणनियंता । जो कळिकाळातें आकळिता । उत्पत्तिस्थितिप्रळयकर्ता । जाण तत्त्वतां अंतर्यामी ॥८७॥ त्या मज विष्णूचें ध्यान । निरंतर जो करी जाण । त्यासी अदृष्टद्रष्टेपण । शक्तिप्रेरण ईशित्वें ये ॥८८॥ मिथ्या बुद्धिबळाच्या खेळाप्रती । स्वारीची जाणे गती निगुती । तेवीं मिथ्या संसारप्रतीती । भूतांची आगती निर्गती स्वयें जाणे ॥८९॥ तो जीवादि शरीरप्रेरण । स्वयें करूं शके आपण । करितां अंतर्याम्याचे ध्यान । एवढी सिद्धी जाण उपतिष्ठे ॥९०॥ तो आपुलेनि प्रतापस्वभावीं । मशकाहातीं मेरू विभांडवी । नीचहस्तें सृष्टि विध्वंसूनि मांडवी । कां इंद्रातें मारवी उंदिराहातीं ॥९१॥ यापरी एकातें मारवी । जीवें गेलिया जीववी । अचेतनातें पालेजवी । ये सिद्धीची पदवी ईशित्व ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

नारायणे तुरीयाख्ये भगवच्छब्दशब्दिते । मनो मय्यादधद्योगी मद्धर्मा वशितामियात् ॥१६॥

जीव शिव आणि प्रकृती । यांहूनि परती चौथी स्थिती । ज्यातें नारायण म्हणती । जाण निश्चितीं सज्ञान ॥९३॥ जागृति स्वप्न सुषुप्ती । यांवेगळी तुरीय स्थिती । त्यातें नारायण म्हणती । यथानिगुती सज्ञान ॥९४॥ दृश्य द्रष्टा दर्शन । यांअतीत चौथा जाण । त्यातें म्हणती नारायण । ज्ञानविचक्षण निजबोधें ॥९५॥ त्रिपुटीवेगळी जे मातू । असोनियां त्रिपुटी आंतू । जो कां त्रिपुटीसी अलिप्तू । तो मी विख्यातू नारायण ॥९६॥ यश श्री वैराग्य ज्ञान । ऐश्वर्य औदार्य हे षड्गुण । नित्य वसती परिपूर्ण । तो मी नारायण भगवंत ॥९७॥ त्या मज नारायणातें ध्यातां । माझी वशिता सिद्धी ये हाता । सर्व कर्मीं अलिप्तता । भोगून अभोक्ता भोगातें ॥९८॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा निर्गुणे ब्रह्मणि मयि धारयन् विशदं मनः । परमानन्दमाप्नोति यत्र कामोऽवसीयते ॥१७॥

चित्तदेवता सत्त्वगुण । इंद्रियें तो रजोगुण । विषय केवळ तमोगुण । हेंचि आवरण परमानंद ॥९९॥ परमानंदासी आवरण । आडवे असती तिन्ही गुण । त्यांतें सांडूनि निर्गुण । ब्रह्म परिपूर्ण मज जो ध्याये ॥१००॥ त्यासी माझिये ध्यानस्थितीं । होय परमानंदअणवाप्ती । ज्या आनंदामाजीं उपशांती । होय निश्चितीं सकळ कामा ॥१॥ झालिया परमानंदप्राप्ती । सकळ काम निमग्न होती । जेवीं सूर्योदयाप्रती । तारा हारपती सचंद्र ॥२॥ तेवीं परमानंदाच्या पोटीं । हारपती कामकोटी । तेथ इंद्रियसुखाच्या गोठी । लाजोनि उठाउठी विरताती ॥३॥ उद्धवा ऐक पां निश्चितीं । नव्हतां परमानंदप्राप्ती । कदा नव्हे कामनिवृत्ती । नाना युक्ती करितांही ॥४॥ या अष्ट महासिद्धीच्या धारणा । तुज म्यां सांगीतल्या जाणा । यांसी साधावया आंगवणा । सुरनरगणां पैं नाहीं ॥५॥ यापरी अष्ट महासिद्धी । तुज म्यां सांगीतली धारणाविधी । आतां गुणहेतुकाचे प्रबोधीं । सावधबुद्धी अवधारीं ॥६॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

श्वेतद्वीपपतौ चित्तं शुद्धेधर्ममये मयि । धारयन्‍ श्वेततां याति षडूर्मिरहितो नरः ॥१८॥

सांडूनि कार्येंसीं रजतमें दूरी । जो मी सत्त्वाधिष्ठाता श्रीहरी । त्या माझी जो धारणा धरी । अखंडाकारी सर्वदा ॥७॥ तो माझेनि सत्त्वे सत्त्ववंतू । होय षडूर्मींसीं रहितू । शोक मोह जरा मृत्यू । क्षुधा तृषा हातू लावूं न शके ॥८॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

मय्याकाशात्मनि प्राणे मनसा घोषमुद्वहन् । तत्रोपलब्धा भूतानां हंसो वाचः श्रृणोत्यसौ ॥१९॥

सघोष प्राणेंसीं शब्दमहिमा । अवश्य विश्रांतीस ये व्योमा । त्या आकाशाचाही मी आत्मा । मजमाजीं व्योमा रहिवासू ॥९॥ तो मी सघोष प्राणांचाही प्राण । सकळ वाचांची वाचा जाण । वागीश्वरीचें जीवन । सत्य मी जाण उद्धवा ॥११०॥ ऐसिया माझें दृढ ध्यान । निजहृदयीं जो करी जाण । तो विचित्रा वाचांचें श्रवण । जीवस्वरूपें जाण स्वयें ऐके ॥११॥ सनाद माझी धारणा पोटीं । धरितां जगाच्या गुह्य गोष्टी । त्याचे पडती कर्णपुटीं । ते काळीं उठी दूरश्रवणसिद्धी ॥१२॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

चक्षुस्त्वष्टरि संयोज्य त्वष्टारमपि चक्षुषि । मां तत्र मनसा ध्यायन् विश्वं पश्यति सूक्ष्मदृक् ॥२०॥

सविता तो मी नारायण । ऐसें डोळ्यांमाजीं करी ध्यान । तेव्हां डोळाचि मद्‌रूप जाण । सविता आपण स्वयें होय ॥१३॥ एवं डोळा सविता हें माझे ध्यान । तिहींस एकात्मता झाल्या जाण । तेव्हां सूक्ष्मद्रष्टा होय आपण । जग संपूर्ण तो देखे ॥१४॥ बैसलेचि ठायीं जाण । चतुर्दशभुवनांचे दर्शन । एके काळें देख आपण । दूरदर्शन हे सिद्धी ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

मनो मयि सुसंयोज्य देहं तदनु वायुना । मद्धारणानुभावेन तत्रात्मा यत्र वै मनः ॥२१॥

अत्यंत सवेग तें मन । त्या मनाचेंही मी मन जाण । त्या मनासी मजसीं अभिन्न । प्राणधारणयुक्त राखे ॥१६॥ ऐसें प्राणधारणयुक्त मन । मजसीं राखतां अभिन्न । त्या धारणाप्रभावें जाण । मनोवेगें गमन देहासी होय ॥१७॥ जेथें संकल्पें जाय मन । तेथें होय देहाचेंही गमन । हे मनोजवसिद्धी जाण । धारणालक्षण या हेतू ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

यदा मन उपादाय यद्यद्रूपं बुभूषति । तत्तद् भवेन्मनोरूपं मद्योगबलमाश्रयः ॥२२॥

पहिली मनोजवधारणा । त्याहीवरी माझी भावना । अचिंत्य सामर्थ्य माझें जाणा । अनुसंधाना जो आणी ॥१९॥ मी नाना रूपांतें धरिता । सवेंचि रूपांतरें विसर्जिता । ऐशी माझी संपूर्ण सत्ता । ते त्याच्या हाता पैं लाभे ॥१२०॥ एवं माझिया दृढ धारणा । माझें सामर्थ्य ये त्याच्या मना । मग ज्या रूपाची करी भावना । तद्‌रूप जाणा स्वयें होय ॥२१॥ सुरनरपन्नगांमाजीं जें जें रूप । धरावया करी जो संकल्प । तो तत्काळ गा मद्‌रूप । हे कामरूप सिद्धी माझी ॥२२॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

परकायं विशन् सिद्ध आत्मानं तत्र भावयेत् । पिण्डं हित्वा विशेत्प्राणो वायुभूतः षडङ्‌घ्रिवत् ॥२३॥

परकायप्रवेशू करितां जाणा । आवरूनि स्वदेहींच्या सर्व प्राणां । जेथ प्रवेश करितां आपणा । तेथ आपुली भावना करावी ॥२३॥ तेव्हां लिंगदेहाचे माथां । जीवप्राणांची एकात्मता । धरोनि देहांतरअहहंता । बाह्य वायूच्या पंथा मिळोनि जाय ॥२४॥ तेथ मिळातांचि मिळवणी । या देहाचा अभिमान सांडुनी । देहांतरीं प्रवेशोनी । मी म्हणोनी उठे तेथें ॥२५॥ जैसें कमळींहूनि कमळांतरा । वायुबळें प्रवेशणें भ्रमरा । तैसें सांडोनियां स्वशरीरा । देहांतरा जीवू जाये ॥२६॥ हें परकायप्रवेशन । म्यां सांगीतलें संपूर्ण । माझिया स्वरूपाचें धारण । तें निजलक्षण अवधारीं ॥२७॥ दृढ ध्यातां माझे स्वरूपासी । तैं सर्व देहीं तूंचि आहेसी । न सांडितां निजदेहासी । हा परकायेंसीं प्रवेशू ॥२८॥ स्वसत्ता स्वदेह सांडणें । तेचि अर्थीचीं लक्षणें । पुढिले श्लोकीं नारायणें । विशद निरूपणें निरूपिलीं ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

पार्ष्ण्यापीड्य गुदं प्राणं हृदुरःकण्ठमूर्धसु । आरोप्य ब्रह्मरन्ध्रेण ब्रह्म नीत्वोत्सृजेत्तनुम् ॥२४॥

देहत्यागाचें प्राणधारण । तेंच स्वच्छंदमृत्यूचें लक्षण । तदर्थी जें प्राणोत्क्रमण । तें योगधारण अवधारीं ॥१३०॥ मूळाधारीं वामचरण । टांचेचेनि नेटें जाण । अपानाचें अधोगमन । गुद पीडून राखावें ॥३१॥ हृदयीं विचरता जो प्राण । त्याचें सदा ऊर्ध्व गमन । तो प्राणायामें आवरून । अधोमुख जाण करावा ॥३२॥ अपानाचें ऊर्ध्व गमन । स्वाधिष्ठानपर्यंत जाण । प्राणाचें अधःसंचरण । तेचि चक्रीं जाण जैं घडे ॥३३॥ तेथ प्राणापानांची बुझावण । त्या चक्रामाजीं करी समान । ऐक्ये पडिलें आलिंगन । एकात्मता जाण चालिले ॥३४॥ सांडोनि अपानाची अधोवाट । प्राणें त्यजिला हृदयकंठ । फोडूनि सुषुम्नेचें कपाट । ऊर्ध्व मुखें नीट चालिले ॥३५॥ जिणतां सुषुम्नेचें घर । भेदिले साही चक्रांचे पदर । उघडूनि काकीमुखाचें द्वार । ब्रह्मरंध्र ठाकिलें ॥३६॥ तेथें पावल्या यथानिगुतीं । या देहाची सांडूनि स्थिती । जो कामभोग वाहे चित्तीं । त्या देहाची प्राप्ती तो पावे ॥३७॥ वैकुंण्ठ कैलास अमरावती । सार्वभौम चक्रवर्ती । जे कामना कामि चित्तीं । ते पावे गती तत्काळ ॥३८॥ जरी तो ब्रह्मसायुज्यता वाहे । तरी सांडूनि देहाची सोये । शुद्धधारणा पाहे । तो ब्रह्मचि होये स्वतःसिद्ध ॥३९॥ यापरी प्राणधारण । करूनि निवर्ते जो जाण । तें स्वच्छंदमृत्यूचें लक्षण । त्याआधीन कळिकाळ ॥१४०॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

विहरिष्यन् सुराक्रीडे मत्स्थं सत्त्वं विभावयेत् । विमानेनोपतिष्ठन्ति सत्त्ववृत्तीः सुरस्त्रियः ॥२५॥

देवांचे दिव्यभोगीं आसक्त । योगियाचें झाल्या चित्त । ते प्राप्तिलागीं येथ । माझें सत्त्व निश्चित चिंतावें ॥४१॥ जेणें सत्त्वें म्यां जाण । स्वर्गीं स्थापिले सुरगण । त्या सत्त्वगुणाचें धारण । निजहृदयीं जाण जो राखे ॥४२॥ ध्यातां सुरस्त्रियांची कामनिष्ठा । तो पावे सुरस्वर्गींची प्रतिष्ठा । विमानीं चढोनि वरिष्ठा । करी कामचेष्टा अप्सरांसीं ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

यथा सङ्कल्पयेद् बुद्ध्या यदा वा मत्परः पुमान् । मयि सत्ये मनो युञ्जंस्तथा तत् समुपाश्नुते ॥२६॥

संकल्पमात्रें करी समस्त । जो मी सत्यसंकल्प भगवंत । त्या माझे ठायीं चित्त । विश्वासयुक्त जो राखे ॥४४॥ तो जे जे काळीं जे जे देशीं । जे जे कर्मीं जे जे अवस्थेसी । जें जें कांहीं वांछीं मानसीं । ते संकल्प त्यापाशीं सदा सफळ ॥४५॥ मी सत्यसंकल्प भगवंत । हृदयीं धरिल्या ध्यानयुक्त । त्याचें जे जे काम कामी चित्त । ते संकल्प प्राप्त होती त्यासी ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

यो वै मद्भातवमापन्न ईशितुर्वशितुः पुमान् । कुतश्चिन्न विहन्येत तस्य चाज्ञा यथा मम ॥२७॥

जो कां मी सर्वांचा नियंता । स्वयें स्वतंत्र तत्त्वतां । त्या माझें ध्यान करितां । मद्भा वता उपतिष्ठे ॥४७॥ मीचि भगवंत सुनिश्चित । ऐसें बोधा आलें यथास्थित । त्याची आज्ञा सुरवर वंदित । पशुपक्षी नुल्लंघित ते आज्ञा ॥४८॥ जैशी माझी आज्ञा सर्वांवरी । तैशी त्याची आज्ञा चराचरीं । कोणी नुल्लंघिती तिळभरी । ते आज्ञासिद्धी खरी तो लाहे ॥४९॥ एवं या गुणहेतुसिद्धी दहाही । धारणायुक्त सांगीतल्या पाहीं । आतां क्षुद्र पंचसिद्धी ज्याही । तुज मी त्याही सांगेन ॥५०॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

मद्भथक्त्या शुद्धसत्त्वस्य योगिनो धारणाविदः । तस्य त्रैकालिकी बुद्धिर्जन्ममृत्यूपबृंहिता ॥२८॥

जगाचें उत्पत्तिस्थितिनिदान । सत्यत्वें असे मजअाधीन । त्या माझ्या ठायीं करितां भजन । अंतःकरण अतिशुद्ध ॥५१॥ ते शुद्ध अंतःकरणीं जाण । भूत भविष्य वर्तमान । जगाचें जन्म भोग मरण । हे त्रिकाळज्ञान सिद्धी प्रकटे ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

अग्न्यादिभिर्न हन्येत मुनेर्योगमयं वपुः । मद्योगशान्तचित्तस्य यादसामुदकं यथा ॥२९॥

अतिप्रयास करितां चित्त । मजसी योगातें झालें प्राप्त । तेणें योगें शरीर योगयुक्त । अबाधित महाद्वंद्वीं ॥५३॥ त्यासी बाधीना शीत उष्ण । मृदु आणिक कठिण । अग्नि लागलियाही जाण । देह दहन नव्हे त्याचा ॥५४॥ ते अग्निमाजीं विश्रांति त्यासी । जेवीं कां जळीं जळचरांसी । अद्वंद्वतासिद्धी ऐसी । साधकासी उपतिष्ठे ॥५५॥ येचि सिद्धीच्या धारणा । प्रतिष्टंभसिद्धी प्रकटे जाणा । ऐक तिच्याही लक्षणा । जिचे तोडरीं जाणा सकळ बाधा ॥५६॥ त्यासी बाह्य वायूचेनि झडाडें । बाधकता कदा न घडे । प्राण जिंतोनि आंतुलीकडे । करी रोकडे दासी त्यासी ॥५७॥ देंठ फेडूनि सुमनसेजे । जेवीं कां सुखें निद्रा कीजे । तेवीं इंगळावरी हा निजे । बाधा नुपजे अग्नीची ॥५८॥ शीतळ जळीं शीतकाळीं । सिद्ध बुडविल्या कौतुकें जळीं । तो बाहेरी निघावया न तळमळी । जळीं मासोळी जेवीं क्रीडे ॥५९॥ ग्रीष्मकाळींचें निदाघ उष्ण । त्यामाजीं सिद्ध घातल्या जाण । रविकरीं पद्म उल्हासे गहन । तैंसे लागतां उष्ण तो टवटवी ॥६०॥ यापरी अर्कबाधकता । त्यासी बाधीना सर्वथा । तैशींच सिद्धासी शस्त्रें लागतां । शस्त्रघाता नातुडे तो ॥६१॥ आकाश खोचूं जातां पाहें । शस्त्रेंसीं घावो वायां जाये । तेवीं सिद्धासी न लागती घाये । शस्त्रउपाये सुनाट ॥६२॥ सिद्धासी दिधलिया विख । विखही नव्हे त्या बाधक । जेवीं विखकिडे विखीं देख । यथासुख क्रीडती ॥६३॥ छाया पर्वतातळीं दडपितां । ते दाटेना जेवीं पर्वता । तेवीं अग्नि अर्क विष अंबु वाता । सिद्धासी सर्वथा बाधेना ॥६४॥ ऐकोनि सिद्धींची कथा । उल्हासू जरी माने चित्ता । तरी माझे प्राप्तीसी तत्त्वतां । सिद्धी सर्वथा बाधक ॥६५॥ माझें स्वरूप शुद्ध अद्वैत । तेथ सिद्धींचें जे मनोरथ । लोकरंजन समस्त । नाहीं परमार्थ सिद्धींमाजीं ॥६६॥ मागिलेचि श्लोकसंधीं । परचित्ताभिज्ञतेचि सिद्धी । ध्वनित सुचविली त्रिशुद्धी । तिचाही विधी अवधारीं ॥६७॥ तेच श्लोकीं व्याख्यान । करितां भगवंताचें ध्यान । प्रकृतिनियंता आपण । साक्षी जाणा सर्वांचा ॥६८॥ ऐसें ईश्वरत्व दृढ ध्यातां । चित्तचालकता ये त्याच्या हाता । तेव्हां चित्ताची अभिज्ञता । स्वभावतां उपतिष्ठे ॥६९॥ तेव्हां जीवाची स्वप्नावस्था । हा साक्षित्वें देखता । जो जो संकल्प त्याच्या चित्ता । तो स्वभावतां हा जाणे ॥७०॥ जिव्हारींची जे आवडी मोटी । ते हा अवलीला सांगे गोष्टी । एवढी सिद्धीची कसवटी । उठाउठी तो लाभे ॥७१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

मद्‌विभूतीरभिध्यायन् श्रीवत्सास्त्रविभूषिताः । ध्वजातपत्रव्यजनैः स भवेदपराजितः ॥३०॥

अपराजयसिद्धी प्राप्ती । ध्याना आणावी माझी मूर्ती । जिचेनि नांवे जयो पावती । जाण निश्चितीं सुरवर ॥ ७२॥ चतुर्भुज घनश्याम । शंखचक्रगदापद्म । छत्रातपत्र चामरयुग्म । ध्वजीं उत्तम गरुडलांछन ॥७३॥ रत्नादंडें झणत्कार । व्यजन वीजिती सनागर । चरणीं गर्जती तोडर । तोडरीं अपार अरिवर्ग ॥७४॥ ऐशिये माझे मूर्तीचें ध्यान । जो सर्वदा करी सावधान । तो सर्वत्र विजयी जाण । अभंगपण माझेनी ॥७५॥ तो माझेनि ध्यानें पाहें । कोणी न मेळवितां साह्ये । एकला सर्वत्र विजयी होये । ऐशी सिद्धी लाहे या निष्ठा ॥७६॥ जो मी हृदयीं धरी अजितू । तो सर्वत्र होय अपराजितू । ऐसें सांगोनि भगवंतू । उपसंहारितू सिद्धींतें ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

उपासकस्य मामेवं योगधारणया मुनेः । सिद्धयः पूर्वकथिता उपतिष्ठन्त्यशेषतः ॥३१॥

म्यां सांगीतल्या ज्या योगधारणा । मज भजतां त्या भावना । त्या त्या सिद्धी त्यासी जाणा । पूर्वोक्तलक्षणा उपजती ॥७८॥ अनेक भावना धरितां चित्तीं । त्या त्या धारणेच्या व्युत्पत्ती । अनेक सिद्धींची होय प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७९॥ नाना योगधारणाव्युत्पत्ती । न करितां सकळ सिद्धींची प्राप्ती । एके धारणेनें होय निश्चितीं । ते मी तुजप्रती सांगेन ॥१८०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

जितेन्द्रियस्य दान्तस्य जितश्वासात्मनो मुनेः । मद्धारणां धारयतः का सा सिद्धिः सुदुर्लभा ॥३२॥

पांच पांच इंद्रियांची जोडी । जिणोनि शमदमपरवडी । उभवूनि वैराग्याची गुढी । प्राणापानवोढी जिंकिल्या ॥८१॥ विवेकाचेनि बळें जाण । वृत्ति राखोनि सावधान । सदा करितां माझें मनन । मननें मन जिंकिलें ॥८२॥ यापरी गा साधकासी । धारणा धरोनि मानसीं । मी एक ध्यातां अहर्निशीं । सकळ सिद्धी दासी त्यासी होती ॥८३॥ सांडूनि सकळ उपाये । मी एक ध्यानीं धरिल्या पाहें । साधकासी काय उणें आहे । दुर्लभ काये सिद्धींचे ॥८४॥ माझे भजनें सावकाशीं । सिद्धी प्रकटती साधकासी । त्या सेव्य नव्हती त्यासी । तेंचि हृषीकेशी सांगतू ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

अन्तरायान्वदन्त्येता युञ्जतो योगमुत्तमम् । मया सम्पद्यमानस्य कालक्षपणहेतवः ॥३३॥

अहेतुक करितां माझें भजन । तेणें शीघ्र माझी प्राप्ती जाण । तेथें सिद्धींवरी घालिता मन । आली नागवण मत्प्राप्तीसी ॥८६॥ ज्यासी विषयभोग लागे गोड । तोचि सिद्धींची वाहे चाड । ज्यासी माझे प्राप्तीचें कोड । तो वांच्छीना बंड ऋद्धिसिद्धींचें ॥८७॥ ज्यासी लौकिकीं अतिप्रतिष्ठा । तो सिद्धींच्या सोशी खटपटा । ज्यासी मत्प्राप्तीची निष्ठा । तो वचेना वाटा सिद्धींच्या ॥८८॥ पावतपावतां वाराणसी । जो वस्तीसी गेला वेश्यागृहासी । तेथें भुलोनि तिच्या भोगासी । सर्वस्व तियेसी समर्पी ॥८९॥ इयेपासूनि जीवेंप्राणें । सर्वथा वेगळें नाहीं जाणें । ऐसा संकल्प करोनि तेणें । वश्य होणें वेश्येसी ॥१९०॥ जंव असे गांठी गांठोडी । तंव ते त्यापाशीं लुडबुडी । निःशेष वेंचलिया कवडी । बाहेरी दवडी तत्काळ ॥९१॥ तो दवडितांही न जाये । निर्लज्ज निसंगु होऊनि राहे । तरी आपणचि सांडोनि जाये । तैशाचि पाहें महासिद्धी ॥९२॥ सकळ पापांतें निर्दळणें । सकळ कुळांतें उद्धरणें । तें काशीचें खुंटलें पावणें । वेश्यानागवणें भोगलिप्सा ॥९३॥ तैसीच सिद्धींचीही कथा । माझे प्राप्तीसी प्रतिबंधभूता । माझें ध्यान ज्ञान वैराग्यावस्था । नागवूनि रिता सांडिती ॥९४॥ माझे प्राप्तीनिकट जाण । उठे सिद्धींची नागवण । भोगें छळावया व्यामोहकपण । विलंबकारण मत्प्राप्ती ॥९५॥ माझें स्वरूप अद्वैतता । तेथें सिद्धींच्या नानावस्था । ते मायेची व्यामोहकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥९६॥ माझे प्राप्तीआड सिद्धींचें विघ्न । हेंचि तुज कळावया जाण । म्यां सर्व सिद्धींचें निरूपण । समूळ संपूर्ण सांगीतलें ॥९७॥ माझ्या ठायीं धरितां ध्यान । एकाग्रता होतां मन । तेथ भोगलिया सिद्धी जाण । करिती नागवण साधका ॥९८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

जन्मौषधितपोमन्त्रैः यावतीरिह सिद्धयः । योगेनाप्नोति ताः सर्वा नान्यैर्योगगतिं व्रजेत् ॥३४॥

सिद्धींचे प्राप्तीचें कारण । जन्मौषधि मंत्र तप जाण । कां साधल्या प्राणापान । सकळ सिद्धी जाण योगाभ्यासीं ॥९९॥ एकी जन्मास्तव सहज सिद्धी । एकी त्या साधिती औषधी । एकी त्या तपादि महाविधी । एकी त्या त्रिशुद्धि मंत्रद्वारा ॥२००॥ सर्पासी वायुधारण । मीनासी जळतरण । पक्ष्यासी नभोगमन । हे जन्मसिद्धी जाण स्वाभाविक ॥१॥ हंस निवडी क्षीरनीर । कोकिळेसी मधुर स्वर । चंद्रामृत सेवी चकोर । हे सिद्धी साचार जन्मास्तव ॥२॥ जन्मास्तव सहज सिद्धी । त्या म्यां सांगीतल्या सुबुद्धी । आतां साधिलिया औषधी । लाभती सिद्धी त्या ऐक ॥३॥ श्वेतमांदारीं गजानन । अंगारकचतुर्थी साधिल्या जाण । सकल विद्यांचें होय ज्ञान । धनधान्यसमृद्धी ॥४॥ अजानवृक्षाची वोळखण । त्याचीं फळें श्वानमुखें जाण । त्याचें घडल्या क्षीरपान । होय आपण अजरामर ॥५॥ पिचुमंद नित्य सेविल्या देख । त्यासी बाधीना कोणी विख । पाताळगरूडीचें प्राशिल्या मुख । त्यासी देहदुःख बाधीना ॥६॥ पूतिकावृक्षाचे मूळीं । असे महाशक्तीची पुतळी । ते साधल्या अप्सरांचे मेळीं । क्रीडे तत्काळीं साधक ॥७॥ अनंत औषधी अनंत सिद्धी । त्यांची साधना कठिण त्रिशुद्धी । तपादि सिद्धींची विधी । ऐक सुबुद्धी उद्धवा ॥८॥ कृच्छ्र पराक चांद्रायण । आसार जलाशय धूम्रपान । तप करी जें जे भावून । ते ते सिद्धी जाण तो पावे ॥९॥ ऐक मंत्रसिद्धीचें लक्षण । प्रेतावरी बैसोनि आपण । एक रात्र केल्या अनुष्ठान । प्रेतदेवता संपूर्ण प्रसन्न होय ॥२१०॥ तेणें भूत भविष्य वर्तमान । ते सिद्धी प्राप्त होय जाण । करितां सूर्यमंत्रविधान । दूरदर्शनसिद्धी उपजे ॥११॥ जैसा मंत्र जैसी बुद्धी । तैसी त्यास प्रकटे सिद्धी । या सकळ सिद्धींची समृद्धी । योगधारणाविधीमाजीं असती ॥१२॥ नेहटूनियां आसना । ऐक्य करोनि प्राणापानां । जो धरी योगधारणा । सकळ सिद्धी जाणा ते ठायीं ॥१३॥ म्यां सांगीतली सिद्धींची कथा । झालिया प्राणापानसमता । आलिया योगधारणा हाता । तैं सिद्धी समस्ता प्रकटती ॥१४॥ प्राणापान समान न करितां । योगधारणाही न धरितां । मज एकातें हृदयीं धरितां । सिद्धी समस्ता दासी होती ॥१५॥ मज पावावया तत्त्वतां । मज एकातें स्मरतां ध्यातां । पावो देऊन सिद्धींचे माथां । चारी मुक्ति स्वभावतां दासी होती ॥१६॥ नाना सिद्धींची धारणा धरितां । माझी सलोकता समीपता । हाता न ये गा सरूपता । मग सायुज्यता ते कैंची ॥१७॥ माझे अतिशयें शुद्ध भक्त । ते मुक्तीसी दूर दवडित । माझेनि भावार्थें नित्यतृप्त । ते पूज्य होत मजलागीं ॥१८॥ जो सकळ सिद्धींचा ईश्वरू । तो मी लागें त्यांची पूजा करूं । तेथिला जो सिद्धींचा संभारू । घेऊनि निजवेव्हारू पळताती ॥१९॥ सकळ सिद्धींच्या स्वामित्वेंसीं । मी भगवंत तिष्ठें भक्तांपाशीं । तेंचि श्लोकार्थें हृषीकेशी । उद्धवासी सांगत ॥२२०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

सर्वासामपि सिद्धीनां हेतुः पतिरहं प्रभुः । अहं योगस्य साङ्ख्यस्य धर्मस्य ब्रह्मवादिनाम् ॥३५॥

सकळ सिद्धींचें मी जन्मस्थान । माझेनि सिद्धींचें थोर महिमान । सिद्धींसी मजमाजीं निदान । यापरी मी जाण स्वामी त्यांचा ॥२१॥ जे जीवात्म्याची ऐक्यता । त्या योगाचा स्वामी मी तत्त्वतां । जेथ जीवत्वाची मिथ्या वार्ता । त्या ज्ञानाचाही सर्वथा स्वामी मीचि ॥२२॥ ज्ञानोपदेष्टे जे साधू । त्यांचाही स्वामी मी प्रसिद्धू । माझेनि प्रसादें ज्ञानबोधू । होतसे विशदू सज्ञाना ॥२३॥ उपदेशी उपनिषद्भाजगें वेदू । त्या वेदाचाही स्वामी मी गोविंदू । मजवेगळा वेदवादू । उच्चारीं शब्दू नुच्चारे ॥२४॥ धर्म म्हणिजे ज्ञानसाधन । त्याचाही स्वामी मीचि जाण । मी सबाह्य परिपूर्ण । चैतन्यघन सर्वात्मा ॥२५॥ मी सर्वात्मा सर्वव्याप्त । सबाह्य परिपूर्ण समस्त । हे माझ्या ठायीं सहज स्थित । ऐक सुनिश्चित उद्धवा ॥२६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

अहमात्माऽऽन्तरो बाह्योऽनावृतः सर्वदेहिनाम् । यथा भूतानि भूतेषु बहिरन्तः स्वयं तथा ॥३६॥

इति श्रीमद्भातगवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे पञ्चदशोऽध्यायः ॥१५॥ जीवांच्या जीवामाजीं माझा वास । जीव मजमाजीं सावकाश । माझें स्वरूप गा असमास । गुणमायेस अनावृत ॥२७॥ जेवीं घटाची वस्ती आकाशीं । आकाश सबाह्य त्या घटासी । तेवीं मी जीवमात्रांसी । सबाह्य हृषीकेशी परिपूर्ण ॥२८॥ जैशीं महाभूतें भौतिकांसी । सबाह्य असती सर्वांसी । तेवीं मी सकळ जगासी । सबाह्य हृषीकेशी पूर्णत्वें पूर्ण ॥२९॥ जीवन जैसें तरंगासी । कां गोडी जैसी गुळासी । तेवीं अनंतकोटि ब्रह्मांडांसी । मी पूर्णत्वेंसी परिपूर्ण ॥२३०॥ मज पूर्णाची पूर्ण प्राप्ती । निकट येतयेतां हातीं । ते संधीं सिद्धी नागविती । भोगसंपत्तीउपचारें ॥३१॥ ज्याचें रायापाशीं पूर्ण चलन । त्याचे हाता ये लांचु संपूर्ण । तेणेंचि तो पावे मरण । तैशा सिद्धी जाण घातका ॥३२॥ ये अध्यायींचें निरूपण । सांगावया हेंचि गा कारण । माझे प्राप्तीस सिद्धी विघ्न । उद्धवा जाण निश्चितीं ॥३३॥ एकाग्र भजनें माझी प्राप्ती । होतां ते संधीसी सिद्धी येती । त्या भुलवोनियां भोगासक्तीं । नागविती साधकां ॥३४॥ जे नेणती माझें निजसुख । ऐसे जे कां केवळ मूर्ख । त्यांसीच सिद्धींचें कौतुक । अलोकिक भोगलिप्सा ॥३५॥ जैसे वेश्येचे हावभाव । तैसें सिद्धींचें वैभव । हें त्यागावया गा सर्व । देवें हा अध्याव निरूपिला ॥३६॥ ज्यासी प्राप्त माझें निजसुख । त्यासी सिद्धी तुच्छप्राय देख । न देखती जन्ममरणांचें मुख । माझा पूर्ण हरिख कोंदाटे ॥३७॥ सेवितां सद्गुररुचरण । कोंदाटे ब्रह्म परिपूर्ण । तेथ सिद्धींसी पुसे कोण । हे जाणती खूण हरिभक्त ॥३८॥ हरिभक्तीसी विकीला भावो । भजनें फिटला अहंभावो । तेथ सिद्धींचा भोगसंदेहो । निपुजे पहा हो सर्वथा ॥३९॥ भुक्ति मुक्ति ऋद्धि सिद्धी । सद्गुहरुचरणीं गा त्रिशुद्धी । हें नेणती जे मंदबुद्धी । ते नाना सिद्धी वांछिती ॥२४०॥ सकळ सिद्धींचें साधन । निरपेक्षता सत्य जाण । निरपेक्षाचें अंगण । सिद्धी संपूर्ण ओळंगती ॥४१॥ सिद्धींची अपेक्षा ज्यांचे चित्तीं । सिद्धी त्यांकडे न थुंकिती । निरपेक्षाचे पायींची माती । सिद्धी वंदिती सर्वदा ॥४२॥ ज्ञानवैराग्यभक्तीचे माथां । सत्य जाण पां निरपेक्षता । ते निरपेक्षता आलिया हाता । मुक्ति सायुज्यता पायां लागे ॥४३॥ निरपेक्षतेपाशीं सर्व सिद्धी । निरपेक्षतेपाशीं विधी । निरपेक्षतेपाशीं सुबुद्धी । चरण वंदी अहर्निशीं ॥४४॥ निरपेक्षता तेथ निर्वाहो । निरपेक्षता तेथ सद्भा॥वो । निरपेक्षतेपाशीं भगवद्भा वो । यथार्थ पहा वो तिष्ठतू ॥४५॥ निरपेक्षतेपाशीं उपनिषद्भा गू । निरपेक्षतेपाशीं साचार योगू । निरपेक्षता स्वानंद भोगू । सांपडे श्रीरंगू निरपेक्षा ॥४६॥ एका जनार्दना शरण । त्याचे वंदितां श्रीचरण । चढती निरपेक्षता जाण । सदा संपूर्ण स्वानंदें ॥४७॥ आम्हां स्वानंदाचा निजबोधू । हा सद्गुवरुचरणींचा प्रसादू । महासुखाचा विनोदू । आनंदकंदू श्रीचरणीं ॥४८॥ गुरुचरणीं करितां भक्ती । अनायासें प्राप्त चारी मुक्ती । निजशांतीसी विरक्ती । सेवा मागती गुरुभक्त ॥४९॥ एका जनार्दना शरण । त्याचे कृपेस्तव जाण । श्रीभागवताचें निरूपण । झाला संपूर्ण पंधरावा ॥२५०॥

इति श्रीमद्भा गवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां सिद्धीनिरूपणयोगो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोकसंख्या ॥३६॥ ओंव्या ॥२५०॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]