Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय एकोणतिसावा

विकिस्रोत कडून

<poem> एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरुदयार्णव । तुझे कृपेसी नाहीं थांव । कृपेनें तारिसी जीव । जीवभाव सांडवूनि ॥१॥ सांडवूनि देहबुद्धी । निरसोनि जीवोपाधी । भक्त तारिसी भवाब्धीं । कृपानिधी कृपाळुवा ॥२॥ तुझें पाहतां कृपाळूपण । जीवासी जीवें मारिसी पूर्ण । नामा रुपा घालिसी शून्य । जातिगोत संपूर्ण निर्दळिसी ॥३॥ निर्दळूनि आपपरां । निसंतान करिसी संसारा । तो तूं जिवलग सोयरा । कृपाळू खरा घडे केवीं ॥४॥ जेवीं आंधारीं नांदते दृष्टी । भासतीं नक्षत्रें खद्योतकोटी । ते आंधारेंसीं सूर्य घोंटी । तेवीं तुझी भेटी साधकां ॥५॥ तुझी जेथ साचार भेटी । तुवां केलिया कृपादृष्टी । संसारभेदाची त्रिपुटी । त्रिगुणेंसीं सृष्टी दिसेना ॥६॥ न दाखवूनि गुणादि सृष्टी । दाविसी अद्वय ब्रह्म दृष्टीं । तुझी झालिया भेटी । भेटीसी तुटी कदा न पडे ॥७॥ ’जो कदा न देखिजे दृष्टीं । त्यासी केवीं होय भेटी । भेटीसी कदा न पडे तुटी । हेही गोष्टी घडे केवीं’ ॥८॥ जैसा गर्भ मातेच्या पोटीं । असोनि माउली न देखे दृष्टीं । तरी तिचे भेटीसी नव्हे तुटी । तेवीं तुझे पोटीं साधक ॥९॥ माता कळवळोनि पाळी तान्हें । शेखीं तें माउलितें नेणे । तेवीं तुजमाजीं अज्ञानें । तुवां प्रतिपाळणें निजलोभें ॥१०॥ जन्मल्या बाळाकारणें । माता वाढवी शहाणपणें । तेवीं तुझेनि निजज्ञानें । सज्ञान होणें साधकीं ॥११॥ साधकीं लाधतां तुझें ज्ञान । थितें नाठवे मीतूंपण । जीव विसरला जीवपण । अद्वय पूर्ण परमात्मा ॥१२॥ असोत या बहुता गोष्टी । नव्हतां सद्गुरुकृपादृष्टी । करितां उपायांच्या कोटी । नव्हे भेटी परमार्था ॥१३॥ जाहलिया सद्गुरुकृपादृष्टी । साधनें पळतीं उठाउठीं । ब्रह्मानंदें कोंदे सृष्टी । स्वानंदपुष्टी साधकां ॥१४॥ जाहलिया सद्गुरुकृपा प्राप्त । उपनिषदांचा मथितार्थ । साधकांचा चढे हात । कृपा समर्थ श्रीगुरुची ॥१५॥ सद्‌गुरुकृपा समर्थं । तेणें कृपें श्रीभागवत । वाखाणिलें जी प्राकृत । शुद्ध मथितार्थ सोलींव ॥१६॥ श्रीजनार्दनकृपादृष्टीं । माझ्या मराठया आरुष गोष्टी । रिघाल्या एकादशाचे पोटीं । स्वानंदतुष्टी निजबोधें ॥१७॥ संस्कृतप्राकृतपरवडी । सज्ञान सेविती स्वानंदगोडी । गाय काळी आणि तांबडी । परी दुधीं वांकुडी चवी नाहीं ॥१८॥ तेवीं संस्कृतप्राकृत भाखा । ब्रह्मासी पालट नाहीं देखा । उभय अभेदें वदला एका । साह्य निजसखा जनार्दन ॥१९॥ जनार्दनकृपेस्तव जाण । अष्टाविंशाचें निरुपण । गुह्य गंभीर स्वानंदघन । तेंही केलें व्याख्यान अतिशुद्ध ॥२०॥ तेथें नानाविधा उपपत्ती । निजबोधें साधूनि युक्ती । स्वयें बोलिला श्रीपती । ब्रह्मस्थिती निष्टंक ॥२१॥ ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । तेथ हेतु-मातु-अनुमान । न रिघे बुद्धीयुक्तीसीं मन । अगम्य जाण सर्वार्थीं ॥२२॥ नाहीं दृश्य-द्रष्टा-दर्शन । नाहीं ध्येय-ध्याता-ध्यान । कर्म-कर्ता कारण मी-तूंपण असेना ॥२३॥ युक्तीनें सांडिला प्राण । दृष्टांतीं वाहिली आण । प्रमाणें जाहलीं अप्रमाण । बोधेंसी क्षीण विवेक जहाला ॥२४॥ तेथ बोलणें ना मौन । आकार ना शून्य । गुण आणि निर्गुण । समूळ जाण असेना ॥२५॥ ऐसी ब्रह्माची निजस्थिति । कृष्णकृपा उद्धवासी प्राप्ती । अबळांसी अगम्य निश्चितीं । जन कैशा रीतीं तरतील ॥२६॥ ब्रह्मस्थिति अतिदुर्गम । हें उद्धवासी कळलें वर्म । साधकांचें साधावया काम । उपावो सुगम पूसत ॥२७॥ कृष्ण निजधामा जाईल आतां । मग ब्रह्मप्राप्ति न ये हाता । साधक गुंतती सर्वथा । उपाय तत्त्वतां कोण सांगे ॥२८॥ एवं साधकांचिया हिता । उद्धव कळवळोनि तत्त्वतां । सुगमत्वें ब्रह्मप्राप्ती ये हाता । तो उपाय अच्युता पूसत ॥२९॥ एकुणतिसावा निरुपण । ब्रह्मप्राप्तीचें सुगम साधन । सप्रेम भगवद्भजन । तें भक्तिलक्षण हरि सांगे ॥३०॥ सुगम साधनें ब्रह्मप्राप्ती । अबळांसी लाभे जैशा रीतीं । सा श्र्लोकीं देवासी विनंती । उद्धव तदर्थीं करितसे ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

उद्धव उवाच - सुदुस्तरामिमां मन्ये योगाचर्यामनात्मनः । यथाऽञ्जसा पुमान् सिध्येत्तन्मे ब्रह्मञ्जसाऽच्युत ? ॥१॥

पूर्वाध्यायीं ब्रह्मस्थिती । सांगितली ते दुर्गम गती । भोळ्या भाविकां अबळांप्रती । हे ब्रह्मप्राप्ती साधेना ॥३२॥ वस्तु व्यक्त ना अव्यक्त । शेखीं प्रकट ना नव्हे गुप्त । न कळे मूर्त कीं अमूर्त । केवीं साधकां तेथ प्रवेशु ॥३३॥ जें स्थूल ना सूक्ष्म होये । जें आहे नाहीं हा शब्द न साहे । जेथ पाहतें पाहणें दोनी जाये । तें साधकां होये केवीं साध्य ॥३४॥ जें दिसें तें ब्रह्म म्हणावें । तंव ते माया रुपें नांवें । आतां नाहींचि म्हणोनि सांडावें । तेणेंही नाडावें साधकीं ॥३५॥ जें आकार ना नव्हे शून्य । जेथें न रिघे ध्येय ध्यान । ज्यासी लाजे ज्ञेय ज्ञान । ज्यातें साधन स्पर्शेना ॥३६॥ जें न चढे शब्दांचे हात । जें नातुडे मौना आंत । आंत बाहेर नाहीं जेथ । काय साधकीं तेथ धरावें ॥३७॥ नाहीं आंतबाहेर विचारा । तेथ काय धरावें निर्धारा । जेथ निर्धारुही पुरा । धरावया धीरा धीर नव्हे ॥३८॥ साधकीं स्थिर करावया मन । कांहीं न दिसे अवलंबन । तेथें अनात्मे अज्ञान जन । त्यांसी दुस्तर जाण हा योगु ॥३९॥ यापरी निजात्मप्राप्ती । कदा न चढे अबळांहातीं । मज तंव मानलें निश्चितीं । हे आत्मस्थिति दुस्तुरु ॥४०॥ ऐशिया ब्रह्मयाची प्राप्ती । अज्ञान अप्रयासें पावती । तैशी सुगम साधनस्थिती । सांग श्रीपती कृपाळुवा ॥४१॥ तुवां निजधामा प्रयाण । मांडिलेसें अति त्वरेन । एथ तरावया अज्ञान । सुगम साधन सांगिजे ॥४२॥ म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण । तुज गेलिया, अज्ञान जन । तरावया साधन सुगम सांगें ॥४३॥ पव्हणियापरिस पाय उतारा । स्त्रियां बाळां अतिसोपारा । तैशिया उपायप्रकारा । शार्ङगधरा सांगिजे ॥४४॥ तुझ्या ठायीं सद्भाव पूर्ण । आणि नेणती शब्दज्ञान । ऐसे जे अज्ञान जन । त्यासी तरावया साधन सुगम सांगें ॥४५॥ मनोनिग्रहो अतिकठिण । साधकां नेमवेना संपूर्ण । तेचि अर्थींचें निरुपण । उद्धव आपण सांगत ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

प्रायशः पुण्डरीकाक्ष, युञ्जतो योगिनो मनः । विषीदन्त्यसमाधानान्मनोनिग्रहकर्शिताः ॥२॥

ऐकें कृष्णा कमलनयना । शिणतां साधक साधना । कदा नाकळवे मना । तेही विवंचना अवधारीं ॥४७॥ निग्रहावया निजमन । साधक साधिती प्राणापान । त्यांसीही छळोनियां मन । जाय निघोन तत्काळ ॥४८॥ घालूनियां एकांतीं आसन । मनोनिग्रहीं जे सावधान । त्यांसीही ठकूनियां मन । जाय निघोन चपलत्वें ॥४९॥ मनोनिग्रहीं आम्ही हटी । म्हणोनि रिघाले गिरिकपाटीं । त्यांसीही ठकूनि मन शेवटीं । जाय उठाउठीं चपळत्वें ॥५०॥ एकीं आकळावया मन । त्यजूनि बैसले अन्न । तंव मनें केलें आनेआन । जागृति स्वप्न अन्नमय ॥५१॥ मनोनिग्रह करितां देख । मन खवळे अधिकाधिक । मनोनेमीं सज्ञान लोक । शिणले साधक साधनीं ॥५२॥ वारा बांधवेल मोटें । अग्नि प्राशवेल अवचटें । समुद्र घोंटवेल घोटें । परी आत्मनिष्ठे मन न ये ॥५३॥ आकाश करवेल चौघडी । महामेरु बांधवेल पुडीं । शून्याची मुरडवेल नरडी । परी या मनाच्या वोढी अनिवार ॥५४॥ काळ जिंकवेल तत्त्वतां । त्रिभुवनींची लाभेल सत्ता । परी मनोनिग्रहाची वार्ता । तुजवीण अच्युता घडे केवीं ॥५५॥ मन तापसां तत्काळ छळी । मन नेमस्तांचा नेम टाळी । मन बळियांमाजीं महाबळी । करी रांगोळी धैर्याची ॥५६॥ मन इंद्रातें तळीं पाडी । मन ब्रह्मयातें हटेंचि नाडी । ऐशी मनाची वोखटी खोडी । आपल्या प्रौढीं नावरे ॥५७॥ साधनीं साधक शिणतां । मनोजयो न येचि हाता । तुजवांचूनि अच्युता । मना सर्वथा नावरे ॥५८॥ अत्यंत साधूनि निरवडी । मनोजयो आणितां जोडी । तंव सिद्धींची दाटे आडाडी । तेणेंही मन नाडी साधकां ॥५९॥ तुझी कृपा नव्हतां जाण । साधकां कदा नावरे मन । तूं तुष्टल्या जनार्दन । मनपणा मन स्वयें विसरे ॥६०॥ सर्वभावें न रिघतां शरण । साधकां कदा नावरे मन । मनोनिग्रहार्थ जाण । तुझे चरणा शरण रिघावें ॥६१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

अथात आनन्ददुघं पदाम्बुजं, हंसाः श्रयेरन्नरविन्दलोचन । सुखं नु विश्वेश्वर योगकर्मभिस्त्वन्माययाऽमी विहता न मानिनः ॥३॥

कमलापति कमलवदना । कमलालया कमलनयना । नाभिकमळीं कमलासना। तुवां ब्रह्मज्ञाना अर्पिलें ॥६२॥ त्या तुझ्या चरणींचें चरणामृत । तुझ्या कृपा ज्यास होयप्राप्त । मनोजय त्याचा अंकित । तो होय विरक्त भवभावा ॥६३॥ तुझ्या चरणामृताची गोडी । मनोजयातें तत्काळ जोडी । आधिव्याधि भवपाश तोडी । स्वानंदकोडी साधकां ॥६४॥ सकळ साधनांचें निजसार । सांख्ययोगविवेक सधर । त्या साराचेंही निजसार । तुझी भक्ति साचार श्रीकृष्णा ॥६५॥ जाणोनि भक्तीचें रहस्य । भजनप्रेमा लोभलें मानस । तेंचि विज्ञान राजहंस । भजनसारांश सेविती ॥६६॥ काया वाचा आणि मन । सद्भावें सदा संपन्न । ऐशिया भक्तां तुझे चरण। स्वानंदें पूर्ण दुभती ॥६७॥ धर्म अर्थकाममोक्षांसी । साङग साधनें सिद्धी त्यांसी । विकळ जाहलिया साधनांसी । ये साधकांसी अपावो ॥६८॥ तैशी तंव तुझी भक्ति नव्हे । तुज भजतां जीवें भावें । भजकां विघ्न कदा न पावे । शेखीं भक्त नागवे विघ्नासी ॥६९॥ जैं सूर्य आणि खद्योतासी । भेटी होय सावकाशीं । तरी विघ्नें भक्तांपाशीं । धीरु यावयासी न धरिती ॥७०॥ पडतां पंचाननाची घाणी । होय मदगजा भंगणी । तेवीं तुझ्या भावार्थभजनीं । होय धूळपाणी विघ्नांची ॥७१॥ येणेंचि निश्चयें निजसंपन्न । तुझ्या चरणा अनन्यशरण । त्यांसी नातळे जन्ममरण । मा इतर विघ्न तें कैंचें ॥७२॥ येणें भावें जे अनन्यशरण । त्यांसी तुझे निजचरण । स्वानंदें सदा करिती पूर्ण । जेवीं कामधेनु जाण निजवत्सा ॥७३॥ भक्तिसरोवरीं निर्मळ । नवविध रसें रसिक जळ । तेथ तुझे चरणकमळ । विकासत केवळ भावार्थसूर्यें ॥७४॥ तेथ स्वानुभविक भ्रमर । झेंपावोनियां अरुवार । कुचंबों नेदितां केसर । आमोदसुखसार सेविती ॥७५॥ तेथ विवेक-परमहंस । ते सरोवरींचे राजहंस । चरणकमळीं करुनि वास । आमोद सुरस सेविती ॥७६॥ हो कां आर्त जिज्ञासु अर्थार्थी । हेही ते सरोवरीं असती । परी कमळामोद नेणती । ते क्रीडती कमळातळीं ॥७७॥ ऐसिया भोळ्या भक्तांसी । तूं तारिसी हृषीकेशी । एवं जे जे लागले भक्तीसी । अपावो त्यांसी असेना ॥७८॥ भावें करितां तुझें भजन । तूं भावार्थें होशी प्रसन्न । तुझ्या प्रसन्नता तुझे चरण । स्वानंद पूर्ण वर्षती ॥७९॥ तूं विश्वमूर्ती विश्वेश्वरु । तूं ब्रह्मादिकांचा ईश्वरु । तुझा जाहलिया अभय करु । भक्तां भवभारु स्पर्शेना ॥८०॥ तुझी भक्ति तें त्यांचें सत्कर्म । तुझा भाव तो त्यांचा स्वधर्म । तुज नैवेद्य अर्पणें उत्तम । तोचि याग परम भक्तांचा ॥८१॥ नित्य स्मरणें तुझें नाम । हाचि भक्तांचा जपसंभ्रम । तुझें कीर्तन मनोरम । ते समाधि परम भक्तांची ॥८२॥ एवं भक्त करिती जें जें कर्म । तें तें तूं होसी पुरुषोत्तम । ज्यासी तूं तुष्टसी मेघश्याम । त्यासी भवभ्रम स्पर्शेना ॥८३॥ यापरी भजनमुखें । भक्त तारिसी निजात्मसुखें । तेणें सुखाचेनि हरिखें । अतिसंतोखें डुल्लसी ॥८४॥ एवं अनपेक्षित भक्तजन । तूं निजसुखें करिसी पूर्ण । तुज न रिघती जे शरण । ते मायेनें जाण मोहिले ॥८५॥ जे तुझ्या चरणांसी विमुख । ते स्वप्नींही न देखती सुख । चढतेंवाढतें भोगिती दुःख । मायेनें मूर्ख ते केले ॥८६॥ त्यजूनि तुझें चरणध्यान । करितां योगयागक्रिया साधन । तें तें साधकां होय बंधन । खवळे अभिमान ज्ञातृत्वें ॥८७॥ (पूर्वश्लोकीचा चरण) ’त्वन्माययाऽमी विहता न मानिनः’ हाचि श्लोकींचा अंतींचा चरण । उपक्रमोनियां आपण । पंडितांचा ज्ञानाभिमान । अभक्तपण प्रकाशी ॥८८॥ आम्ही ज्ञाते आम्ही योगी । आम्ही प्रवर्तक कर्ममार्गीं । आम्ही श्रोत्रिय पवित्र जगीं । आमुची मागी अतिशुद्ध ॥८९॥ लोक केवळ अज्ञान । तैसे आम्ही नव्हों आपण । आमचें वचन प्रमाण । सर्वार्थी जाण सर्वांशीं ॥९०॥ आम्ही ज्ञाते हें मानूनि दृढ । ज्ञानाभिमानें केले मूढ । पांडित्यें होऊनि गर्वारुढ । दुःख दुर्वाड भोगिती ॥९१॥ अभिमानाऐसा वैरी । आन नाहीं संसारीं । तो हा ज्ञानाभिमानेंकरीं । घाली दुस्तरीं सज्ञाना ॥९२॥ असो हे अभक्तांची कथा । जे चुकले भक्तिपंथा । यालागीं नानापरींच्या व्यथा । देहअहंता सोसिती ॥९३॥ जिंहीं भक्तीसी विकूनि चित्त । जाहले अनन्यशरणागत । त्यांसी तारिता तूं जगन्नाथ । निजसुखें निजभक्त नांदविसी ॥९४॥ तुझे जे कां भक्तजन । जिंहीं भक्तीसी विकला प्राण । त्यासी न मागतां ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥९५॥ तुझें करितां निजभजन । भक्तांसी कदा न बाधी विघ्न । सुखें होती सुखसंपन्न । हें नवल कोण गोविंदा ॥९६॥ जे तुज अनन्यशरण । तूं सर्वदा त्यांअधीन । तेचि अर्थींचें निरुपण । उद्धव आपण सांगत ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

किं चित्रमच्युत तवैतदशेषबन्धो, दासेष्वनन्यशरणेषु यदात्मसात्त्वम् । यो रोचयन् सहमृगैः स्वयमीश्वराणां, श्रीमत्किरीटतटपीडितपादपीठः ॥४॥

विघ्न न बाधी तुझ्या भक्तांसी । हें नवल नव्हे हृषीकेशी । तूं भुलोनि भक्तप्रेमासी । भक्ताधीन होसी सर्वदा ॥९८॥ होऊनि निजदासाधीन । मध्यरात्रीं पुरविसी अन्न । शेखीं तुज न मिळे भोजन । भुकेल्या पान भाजीचें ॥९९॥ उभय सेनेचे देव्हडीं । शस्त्रें सुटतां अति कडाडीं । तेथ सोसिसी रथाची वोढी । शेखीं रथींचीं घोडीं तूं धुशी ॥१००॥ तुझा मुकुट नाकळे वेदासी । तेथ भक्तांचा चाबुक खोंविसी । देखतां सकळिकां रायासी । रणीं घोडे धुसी निजांगें ॥१॥ वागोरे धरोनि दांतीं । चारी घोडे चहूं हातीं । धुतां न लाजसी श्रीपती । भक्ताधीन निश्चितीं तूं ऐसा ॥२॥ बंदीहुनी सोडविलें ज्यासी। तो उग्रसेन स्वामी करिसी । उच्छिष्टें धर्माघरींचीं काढिसी । शेखीं गायी राखिसी नंदाच्या ॥३॥ असो ते थोरांची थोर मात । तूंचि मिळोनि गोवळाआंत । उभउभ्यां खासी त्यांचा भात । छंदें नाचत त्यांचेनी ॥४॥ न म्हणसी सोवळें ओवळें । प्रत्यक्ष केवळ गोवळे । त्यांचेनि उच्छिष्टकवळें । स्वानंदमेळें डुल्लसी ॥५॥ द्रौपदीचिये अतिसांकडीं । नेसतीं जाहलासि तूं लुगडीं । गोपिकांचिया निजआवडीं । तूं कडोविकडी नाचसी ॥६॥ पूर्णकलश नेतां पाहीं । कांटा मोडला गोपीचे पायीं । तो पाय धरुनि हातीं दोंही । तूं कांटा लवलाहीं काढिसी ॥७॥ खांदीं वाहिलें दुर्वासासी । द्वारपाळ तूं बळीपाशीं । ऐसा भक्ताधीन तूं होसी । वचनें वर्तसी दासांच्या ॥८॥ देवा तूं ऐसें म्हणसी । ’गोवळत्व सत्य मानिसी’ ।

तें तुज न घडे हृषीकेशी । तूं पूज्य होसी सुरनरां ॥९॥

(पूर्वश्लोकींचें पद) ’श्रीमत्किरीटतटपीडितपादपीठः ॥’ इंद्र चंद्र आणि महेंद्र । ब्रह्मा बृहस्पति आणि शंकर। ऐसे पूज्य जे कां ईश्वर । तेही तुझे किंकर श्रीकृष्णा ॥११०॥ तुझे आसनाचे पादपीठीं । त्यांच्या मुकुटमणियांच्या कोटी । घर्षणीं झणत्कार उठी । नमस्कार दाटी सुरवरां ॥११॥ तुझी आज्ञा न मानितां । ब्रह्मादिकांचिया माथां । साटु वाजे जी सर्वथा । मा इतरांची कथा ते कोण ॥१२॥ तुझे आज्ञेभेणें जाण । वायु वागवी नेमस्त प्राण । सूर्य चालवी दिनमान । तुझे आज्ञेभेण गोविंदा ॥१३॥ तुझे आज्ञेचे भयभागीं । समुद्र मर्यादा नुल्लंघी । तुझ्या आज्ञेच्या नियोगी। वर्षिजे मेघीं जळ काळीं ॥१४॥ तुझे आज्ञेची अगाध थोरी । स्वयें मृत्यु वंदी शिरीं । तोही स्वकाळें प्रळयो करी । आज्ञेबाहेरी कदा न निघे ॥१५॥ आशंका ॥ ’मी तंव नंदाचा खिल्लारी। उग्रसेनाची सेवा करीं । माझी हे एवढी थोरी । मिथ्या’ मुरारी म्हणशील ॥१६॥ तुवां पाडूनि काळाचे दांत । गुरुपुत्र आणिला एथ। इंद्र केला मानहत । गोकुळीं अद्भुत वर्षतां ॥१७॥ इतरांची गोठी कायशी। होऊनि वत्सें वत्सपांसीं । वेड लाविलें विधात्यासी । शेखीं गोवळ होसी नंदाचा ॥१८॥ बाणकैवारा लागुनी । शिव आला अतिकोपोनी । तो त्वां जिंकिला अर्धक्षणीं । शार्ङगपाणी ईश्वरेश्वरा ॥१९॥ तुझी भेटी घ्यावयाकारणें । उत्कंठा वाहिजे नारायणें । ब्राह्मण अपत्यद्वारा तेणें । तुझी भेटी वांछिणें सर्वदा ॥१२०॥ तूं भक्तकाजपंचानन। सत्य करावया अर्जुन । क्षीरसागरीं रिघोनि जाण । कृष्णनारायण भेटले ॥२१॥ दोंहीचे भेटीची परवडी । संत जाणती निजआवडीं । दोघां मिठी पडली गाढी । निजात्मगोडी अभिन्न ॥२२॥ कृष्णीं विराला नारायण । कीं नारायणामाजीं श्रीकृष्ण । दोघां नाहीं दोनीपण । स्वरुप परिपूर्ण एकत्वें ॥२३॥ तेथ अर्जुनासी जाहली व्यथा । थित्या अंतरलों कृष्णनाथा । तंव शेषशयनीं होय देखता । नारायणता श्रीकृष्णीं ॥२४॥ तो तूं भक्तकाजकैवारी । लीलाविग्रही अवतारधारी । अवतार धरिसी नानापरी । दीनोद्धारी श्रीकृष्णा ॥२५॥ यापरी गा हृषीकेशी । अगाध महिमा तुझेपाशीं । येचि अवतारीं आम्हांसी । प्रतीती निश्चयेंसी पैं आली ॥२६॥ अखंड ऐश्वर्याची स्थिती । अनावृत ज्ञानस्फूर्ती । अद्वयानंदा नाहीं च्युती । ’अच्युत’ निश्चितीं या नांव ॥२७॥ ऐसा तूं अनंत अपरंपार । नियंत्या ईश्वराचा ईश्वर । तरी तुं भक्तकरुणाकर । तोही प्रकार अवधारीं ॥२८॥

(पूर्वश्लोकींचा चरण) ’यो रोचयन् सहमृगैः स्वयमीश्वराणाम् ॥’

देवां दुर्लभ जो नमस्कारा । तो तूं रिसां आणि वानरां । खेंव देसी रामचंद्रा । लीलावताराचेनि नटनाट्यें ॥२९॥ तुवां बोलावें कृपा करुनी । यालागीं वेद तिष्ठे सावधानीं । तो तूं वानरांच्या कानीं । गुज आळोंचूनी सांगशी ॥१३०॥ तुझें ज्ञान न कळे वेदशास्त्रां । तो तूं विचार पुससी वानरां । अनुसरोनि त्यांच्या मंत्रा । उपायद्वारा वर्तसी ॥३१॥ यज्ञींचीं अवदानें प्रांजळें । कदा न घेसी यज्ञकाळें। तो तूं वानरांचीं वनफळें । खासी कृपाबळें सप्रेम ॥३२॥ ऐसें भक्तांचें निजप्रेम । तूं प्रतिपाळिसी मेघश्याम । त्या तुजमाजीं नाहीं विषम । तूं आत्माराम जगाचा ॥३३॥ ’एतदशेषबंधो’ तूं अंतर्यामीं निजसखा । परमात्मा हृदयस्थ देखा । तुजमाजीं भूतां भौतिकां । भिन्न आवांका असेना ॥३४॥ तूं जडातें चेतविता । मुढातें ज्ञानदाता । सकळ जीवां आनंदविता । तुझिया चित्सत्ता जग नांदे ॥३५॥ मातापित्यांचें सख्यत्व देखा । तो प्रपंचयुक्त आवांका । तूं हृदयस्थ निजसखा । सकळ लोकां सुखदाता ॥३६॥ ऐसा तूं सर्वांचा हृदयस्थ । सर्ववंद्यत्वें अतिसमर्थ । जाणसी हृदयींचा वृत्तांत । स्वामी कृपावंत दीनांचा ॥३७॥ यापरी गा हृषीकेशी । दीनदयाळू निजभक्तांसी । ऐशिया सांडूनि स्वामीसी । कोण धनांधासी भजेल ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

तं त्वाऽखिलात्मदयितेश्वरमाश्रितानां, सर्वार्थदं स्वकृतविद्विसृजेत को नु । को वा भजेत् किमपि विस्मृतयेऽनुभूत्यै, किं वा भवेन्न तव पादरजोजुषां नः ॥५॥

विधाता आणि हरि हर । हे मायागुणीं गुणावतार । तूं मायानियंता ईश्वर । भक्तकरुणाकर सुखदाता ॥३९॥ त्या तुझी करितां नि भक्ती । चारी पुरुषार्थ चारी मुक्ती । भक्तांसी लोटांगणीं येती । एवढी अर्थप्राप्ती निजभक्तां ॥१४०॥ निजभक्तांचें मनोगत । तूं सर्वज्ञ जाणता भगवंत । भक्तहृदयींचें हृद्गत । जाणोनि सर्वार्थ तूं देसी ॥४१॥ भावार्थाचें भोक्तेपण । जाणता तूं एक श्रीकृष्ण । तुजवेगळें हें लक्षण । आणिका जाण कळेना ॥४२॥ ऐसा स्वामी तूं उत्तमोत्तम । तुझेनि साधकां सुख परम । आणिक नाहीं तुजसम । तूं स्वामी पुरुषोत्तम सर्वांचा ॥४३॥ तूं सर्वांचा स्वामी होसी । परी कृपाळु निजभक्तांसी । अग्निविषादि नाना बाधेंसीं । तुवां ’प्रर्हासदासी’ रक्षिलें ॥४४॥ तुज भक्तांची कृपा प्रबळ । उत्तानचरणाचें तानें बाळ । करोनियां वैराग्यशीळ । ’ध्रुवासी’ अढळ तुवां केलें ॥४५॥ शत्रुबंधु ’विभीषण’ । तुज झाला अनन्यशरण । त्याचे कृपेस्तव जाण । सकुळीं रावण उद्धरिला ॥४६॥ छळूनि बांधिलें ’बळीसी’ । शेखीं कृपा उपजली कैसी । त्याचे द्वारीं द्वारपाळ होसी । निजलाजेसी सांडूनि ॥४७॥ ऐशी भक्तकृपा तुजपाशीं । भक्तहृद्गत तूं जाणसी । ऐशा सांडूनि निजस्वामीसी । कोण धनांधांसी सेवील ॥४८॥ देहेंद्रियां जें सुख भासे । तें तुझेनि सुखलेशें । तो तूं सकळसुखसमावेशें । प्रसन्न अनायासें निजभक्तां ॥४९॥ साधु जाणती तुझा महिमा । तूं ज्ञानियांचा अभेद आत्मा। भक्तप्रिय पुरुषोत्तमा । तुझा सुखाचा प्रेमा अप्रमेय ॥१५०॥ तुझे सेवेचिया संतोखें । भक्त सुखावले निजसुखें । त्यांसी देहद्वंद्वजन्मदुःखें । स्वप्नींही संमुखें कदा नव्हती ॥५१॥ तुझ्या भजनसुखें तुझे भक्त । विषयीं होऊनि विरक्त । ते राज्य समुद्रवलयांकित । थुंकोनि सांडित तुच्छत्वें ॥५२॥ सकळभोगवैभवेंसीं । स्वर्ग आलिया भक्तांपाशीं । ते उपेक्षिती तयासी । जेवीं राजहंसीं थिल्लर ॥५३॥ जे विनटले भजनाच्या ठायीं । ते तूं सुखरुप करिसी पाहीं । देहीं असतांचि विदेही । सर्वा ठायीं समसाम्यें ॥५४॥ ऐसा स्वामी तूं हृषीकेशी । सदा संतुष्ट निजभक्तांसीं । कठिणत्व नाहीं सेवेसी । कैसें म्हणसी तें ऐक ॥५५॥ जाणें न लगे परदेशासी । आणि अनवसरु नाहीं सेवेसी । भक्तांनिकट अहर्निशीं । तूं हृदयनिवासी निजात्मा ॥५६॥ सेवेलागीं न लगे धन । शरीरकष्ट न लगती जाण । तुझ्या चरणीं ठेविल्या मन । तूं स्वानंदघन तुष्टसी ॥५७॥ तूं तुष्टोनि करिशी ऐसें । सांडविसी प्रपंचाचें पिसें । त्रिगुणेंसीं त्रिपुटी नासे । अनायासें मिथ्यात्वें ॥५८॥ ऐसा तूं सुसेव्य आणि कृपाळू । निजस्वामी तूं दीनदयाळू । तुझी सेवा सांडी तो बरळू । मूर्ख केवळू अतिमंद ॥५९॥ निमेषोन्मेषांचे व्यापार । तुझेनि चालती साचार । तुझे सेवेसी विमुख नर । ते परमपामर अभाग्य ॥१६०॥ तुझी सेवा सुखरुप केवळ । तीस उपेक्षूनियां बरळ । विषयांचे विषकल्लोळ । जे सर्वकाळ वांछिती ॥६१॥ ज्या विषयांचा विषलेश । थित्या निजसुखा करी नाश । जन्ममरणांचा विलास । दुःख असोस भोगवी ॥६२॥ त्या विषयांचे विषयदाते । इंद्र-महींद्र कृपणचित्तें । त्यांसी भजती जे विषयस्वार्थे । तेही निश्चितें अभाग्य ॥६३॥ तुझिया कृपा तुझे भक्त । सुखसंपन्न अतिसमर्थ । संसारीं असोनि विरक्त । हें नवल एथ नव्हे देवा ॥६४॥ तुझें चरणरज जे सेविती । पृथुजनकादि नृपती । त्यासी इंद्रादिक वंदिती । पायां लागती ऋद्धिसिद्धी ॥६५॥ आकल्प करितां तपःस्थिति । ज्या सिद्धींची नव्हे प्राप्ती । त्या सिद्धी भक्तां शरण येती । ऐसी श्रेष्ठ भक्ति पैं तुझी ॥६६॥ आणिक साधनें न करितां । तुझे भजनीं ठेविल्या चित्ता । सर्व सिद्धी होती शरणागता । स्वभावतां भक्तांसी ॥६७॥ यापरी तुझे उपकार । भक्तांप्रति घडले अपार । त्यासी तैंचि घडे प्रत्युपकार । हरिचरणीं साचार जैं स्वयें विरे ॥६८॥ तेंचि विरालेंपण ऐसें । जेवीं प्रतिंबिंब बिंबीं प्रवेशे । कां घटकाशींचेनि आकाशें । होईजे जैसें महदाकाश ॥६९॥ ऐसें तुजमाजीं न विरतां । प्रत्युपकार न ये हाता । जो पुरवी सर्व स्वार्था । त्यासी विसरतां अधःपातु ॥१७०॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

नैवोपयन्त्यपचितिं कवयस्तवेश, ब्रह्मायुषाऽपि कृतमृद्धमुदः स्मरन्तः । योऽन्तर्बहिस्तनुभृतामशुभं विधुन्वन्नाचार्यचैत्यवपुषा स्वगतिं व्यनक्ति ॥६॥

तुजमाजीं न विरतां साचार । ब्रह्मायु होऊनियां नर । योगयागें शिणतां अपार । प्रत्युपकार कदा न घडे ॥७१॥ असो सज्ञान ज्ञाते जन । करितां नानाविध साधन । तुझिया उपकारा उत्तीर्ण । अणुप्रमाण कदा नव्हती ॥७२॥ तो उपकार कोण म्हणसी । निजभक्तांच्या कल्मषांसी । सबाह्याभ्यंतर निर्दळिसी । उभयरुपेंसीं कृपाळुवा ॥७३॥ अंतरीं अंतर्यामीरुपें । बाह्य सद्गुरुस्वरुपें । भक्तांचीं सबाह्य पापें। सहित संकल्पें निर्दळिसी ॥७४॥ अंतर्यामी आणि सद्गुरु । उभयरुपें तूं करुणाकरु। निरसूनि भक्तभवभारु । निजनिर्धारु धरविसी ॥७५॥ निजनिर्धाराचें लक्षण । सहजें हारपे मीतूंपण । स्वयें विरे देहाभिमान । जन्मजरामरण मावळे ॥७६॥ गेलिया जन्मजरामरण । सहजें होती आनंदघन । ऐसे तुझिया कृपें जाण । उपकारें पूर्ण निजभक्त ॥७७॥ ऐसी आपुली स्वरुपस्थिती । भक्तां अर्पिसी कृपामूर्ती । तो तूं निजस्वामी श्रीपती । पूज्य त्रिजगतीं त्रिदशांसी ॥७८॥ ऐसे तुझेनि निजप्रसादें । भक्त सुखी जाहले स्वानंदेम । ते उरलेनि प्रारब्धें । सदा स्वानंदबोधें वर्तती ॥७९॥ ते देहीं असोनि विदेही । कर्म करुनि अकर्ते पाहीं । ऐसे उपकार भक्तांच्या ठायीं । ते कैसेनि उतरायी होतील ॥१८०॥ तुज केवीं होइजे उत्तीर्ण । तुझेनि मनासी मनपण । तुझेनि बुद्धीसी निश्चयो जाण । इंद्रियां स्फुरण तुझेनी ॥८१॥ निमेषोन्मेषांचे व्यापार । तुझेनि चालती साचार । नीच नवे तुझे उपकार । उत्तीर्ण नर कदा नव्हती ॥८२॥ जें जें करावें साधन । तें सिद्धी पावे तुझे कृपेन । त्या तुज उत्तीर्णपण । सर्वथा जाण असेना ॥८३॥ यापरी करुनि उपकार । तुवां उद्धरिले थोरथोर । आतां सुगमोपायें भवसागर । तरती भोळे नर तें सांग ॥८४॥ सुगमोपायें स्वरुपप्राप्ती । भाळेभोळे जन पावती । तैसा उपाय श्रीपती । कृपामूर्ति सांगावा ॥८५॥ तूं गेलिया निजधामा । दीन तरावया मेघश्यामा । सुगम उपायाचा महिमा । पुरुषोत्तमा मज सांग ॥८६॥ म्हणोनि घातिलें लोटांगण । मस्तकीं धरिले श्रीचरण । तरावया दीन जन । सुगम साधन सांगिजे ॥८७॥ उद्धवें प्रार्थिला श्रीपती । अबळें उद्धरावया निश्चितीं । त्याचेनि धर्में त्रिजगती । त्यासी कृपामूर्ति तुष्टला ॥८८॥ उद्धवें प्रार्थिला श्रीपती । तेणें सुखावला शुकही चित्तीं । उल्लासोनि स्वानंदस्थिती । म्हणे परीक्षिती सावध ॥८९॥ सुगम उपायस्थितीं । तरावया त्रिजगती । उद्धवें विनविला श्रीपती । त्यासी कृपामूर्ति तुष्टला ॥१९०॥ संसारतरणोपायबीज । ब्रह्मप्राप्तीचें ब्रह्मगुज । सुगमें साधे सहज निज । तें अधोक्षज सांगेल ॥९१॥ अबळें उद्धरावया निश्चितीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती । त्याचेनि धर्में त्रिजगती । सुगमस्थितीं तरेल ॥९२॥ निजधामा गेलिया श्रीकृष्णनाथ । दीनें तरावया समस्त । उद्धवें सेतु बांधिला एथ । ब्रह्मप्राप्त्यतर्थ प्रश्नोक्तीं ॥९३॥ उद्धवें प्रार्थूनि श्रीकृष्ण । उद्धरावया दीन जन । ब्रह्मप्राप्तीची पव्हे जाण । सुगम संपूर्ण घातली ॥९४॥ एवं उद्धवप्रश्नस्थितीं । शुक सुखावे वचनोक्तीं । तेंचि परीक्षितीप्रती । सुनिश्चितीं सांगत ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

श्रीशुक उवाच - इत्युद्धवेनात्यनुरक्तचेतसा, पृष्टो जगत्क्रीडनकः स्वशक्तिभिः । गृहीतशक्तित्रय ईश्वरेश्वरो, जगाद सप्रेममनोहरस्मितः ॥७॥

जो ज्ञानियांचा शिरोमणी । जो ब्रह्मचार्यां मुकुटमणी । जो योगियांमाजीं अग्रगणी । जो सिद्धासनीं वंदिजे ॥९६॥ जो ब्रह्मज्ञानाचा निजनिधी । जो स्वानंदबोधाचा उदधी । जो भूतदयेचा क्षीराब्धी । तो शुक स्वबोधीं बोलत ॥९७॥ पांडवकुळीं उदारकीर्ती । कौरवकुळीं तुझेनि भक्ती । धर्मस्थापक त्रिजगतीं । ऐक परीक्षिति सभाग्या ॥९८॥ जग जें भासे विचित्रपणें । तें जयाचें लीलाखेळणें । खेळणेंही स्वयें होणें । शेखीं अलिप्तपणें खेळवी ॥९९॥ विचित्र भासे जग जाण । ज्याचेनि अंगें क्रीडे संपूर्ण । जग ज्याचें क्रीडास्थान । जगा जगपण ज्याचेनि ॥२००॥ ऐसा ’जगत्क्रीडनक’ श्रीकृष्ण । जो ईश्वराचा ईश्वर आपण । मायादि तिन्ही गुण । ज्याचेनि पूर्ण प्रकाशती ॥१॥ मायागुणीं गुणावतार । जे उत्पत्तिस्थितिक्षयकर । ब्रह्मा आणि हरि हर । तेही आज्ञाधर जयाचे ॥२॥ ऐशिया श्रीकृष्णाप्रती । उद्धवें सप्रेम विनंती । केली अतिविनीतस्थितीं । तेणें श्रीपति तुष्टला ॥३॥ बहुतीं प्रार्थिला श्रीकृष्ण । तो आपुलाल्या कार्यार्थ जाण । उद्धवें केला विनीत प्रश्न । जगदुद्धरण उपकारी ॥४॥ उद्धवाचिया प्रश्नोक्तीं । तोषोनि तुष्टला श्रीपती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती । ते साधनस्थिती सांगेल ॥५॥ भाळेभोळे सात्त्विक जन । सवेग पावती समाधान । तो उद्धवप्रश्नें श्रीकृष्ण । सोपें ब्रह्मज्ञान सांगत ॥६॥ ज्ञानमार्गीचे कापडी । जीवें सर्वस्वें घालूनि उडी । उद्धवप्रश्नाचे आवडीं । ब्रह्म जोडे जोडी सुगमत्वें ॥७॥ लेऊनियां मोहममतेची बेडी । जे पडिले अभिमानबांदवडीं । त्यांचीही सुटका धडफुडी । उद्धवें गाढी चिंतिली ॥८॥ उद्धवाचें भाग्य थोर । प्रश्न केला जगदुपकार । तेणें तुष्टला शार्ङगधर । अतिसादर बोलत ॥९॥ दीनोद्धाराचा प्रश्न । उद्धवें केला अतिगहन । तेणें संतोषोनि श्रीकृष्ण । हास्यवदन बोलत ॥२१०॥ कृष्णवदन अतिसुंदर । तेंही हास्ययुक्त मनोहर । अतिउल्हासें शार्ङगधर । गिरा गंभीर बोलत ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा श्रीभगवानुवाच - हन्त ते कथयिष्यामि, मम धर्मान् सुमङगलान् । यान् श्रद्धयाचरन्मर्त्यो मृत्युं जयति दुर्जयम् ॥८॥ जो प्रणवाचें सोलींव सार । जो ज्ञानाचें निजजिव्हार । जो चैतन्याचा चमत्कार । जो परात्पर परादिकां ॥१२॥ तो मेघगंभीर गर्जोनी । स्वानंदें बोले शार्ङगपाणी । म्हणे उद्धवा तुझी धन्य धन्य वाणी । तुझ्या प्रश्नीं मी निवालों ॥१३॥ बाळ्याभोळ्या ब्रह्मप्राप्ती । पावावया सुगमस्थितीं । ये अर्थीं दाटुगी माझी भक्ती । तिसी मी श्रीपती सदा वश्य ॥१४॥ माझें करितां अनन्य भजन । मी सर्वथा भक्ताधीन । तेथ जाती गोत ज्ञातेपण । उंच नीच वर्ण मी न म्हणें ॥१५॥ जेणें घडे भजन परम । ते सांगेन भागवतधर्म । जेणें निरसे कर्माकर्म । मरणजन्मच्छेदक ॥१६॥ जे धर्म स्वयें आचरितां । समूळ उन्मळी भवव्यथा । ज्या धर्मांच्या स्वभावतां । सुखसंपन्नता साधकां ॥१७॥ जे स्वयें धर्म स्तवितां । निरसी असत्यादि दोषकथा । जे धर्म सादरें ऐकतां । विषयावस्था निर्दळी ॥१८॥ माझे धर्म अतिसुमंगळ । दोषदाहक कलिमळ । मंगळांचेंही परम मंगळ । भजन केवळ पैं माझें ॥१९॥ श्रद्धेनें आचरतां माझे धर्म । माझ्या निजरुपीं उपजे प्रेम । तेणें हारपे भवभ्रम । मरणजन्म असेना ॥२२०॥ जो मृत्यु ब्रह्मयाचा ग्रास करी । हरिहरांतें मृत्यु मारी । मृत्यु दुर्जय संसारीं । सुरासुरीं कांपिजे ॥२१॥ त्या मृत्यूचें खणोनि खत । पाडूनि कळिकाळाचे दांत । अद्वयभजनें माझे भक्त । सुखें नांदत संसारीं ॥२२॥ जेणें निवारे दुर्जय मरण । ऐसें भजन म्हणसी कोण । ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥२३॥ उद्धवा तूं माझा निजसखा । यालागीं निजभजन आवांका । आरंभूनि पूर्वपीठिका । संक्षेपें देखा सांगेन ॥२४॥ कोटिशस्त्रें रुपल्या पाहें । तरी शूर वांचला राहे । तोचि वर्मीचेनि एके घायें । मरण लाहे तत्काळ ॥२५॥ तेवीं करितां नानासाधन । अनिवार्य जन्ममरण । त्यासी माझें हें संक्षेपभजन । समूळ जाण निर्दळी ॥२६॥ कृष्ण घनश्याम महाघन । उद्धवचातकालागीं जाण । वर्षला स्वानंदजीवन । तेणें त्रिभुवन सुखी होये ॥२७॥ लोटलिया वर्षाकाळ । शारदीचें निर्मळ जळ । तेवीं सुखाचे सुखकल्लोळ । भजनें प्रबळ एकुणतिसावा ॥२८॥ एकादशाचिया अंतीं । सुगमत्वें ब्रह्मप्राप्ती । तदर्थीं उत्तमोत्तम भक्ति । स्वमुखें श्रीपति सांगत ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

कुर्यात्सर्वाणि कर्माणि, मदर्थं शनकैः स्मरन् । मय्यर्पितमनश्चित्तो, मद्धर्माऽऽत्ममनोरतिः ॥९॥

देशाचारें कुलाचारें प्राप्त । वृद्धाचारादि जें एथ । जें कां वेदोक्त नित्यनैमित्य । ’कर्में’ समस्त या नांव ॥२३०॥ माझेनि उद्देशें कर्म जें एथ । या नांव ’साधारण-मदर्थ’ । कर्मा सबाह्य जे मज देखत । ’मुख्यत्वें मदर्थ’ आयास न करितां ॥३१॥ सकळ कर्म माझेनि प्रकाशे । कर्मक्रिया माझेनि भासे । ऐसें समूळ कर्म जेथ दिसे । तें ’अनायासें मदर्थ’ ॥३२॥ कर्माआदि मी कर्मकर्ता । कर्मीं कर्मसिद्धीचा मी दाता । कर्मी कर्माचा मी फळभोक्ता । या नांव ’कृष्णार्पणता’ कर्माची ॥३३॥ सहसा ऐसें नव्हे मन । तैं हें शनैःशनैः अनुसंधान । अखंड करितां आपण । स्वरुपीं प्रवीण मन होय ॥३४॥ मनासी नावडे अनुसंधान । तैं करावें माझें स्मरण । माझेनि स्मरणें मन जाण । धरी अनुसंधान मद्भजनीं ॥३५॥ भजन अभ्यास परवडी । मनासी लागे निजात्मगोडी । तेथें बुद्धि निश्चयेंसीं दे बुडी । देह अहंता सोडी अभिमान ॥३६॥ माझ्या स्वरुपावेगळें कांहीं । मनासी निघावया वाडी नाहीं । ऐसें मन जडे माझ्या ठायीं । ’मदर्पण’ पाहीं या नांव ॥३७॥ ऐसें मद्रूपीं निमग्न मन । तरी आवडे माझें भजन । माझिया भक्तीस्तव जाण । परम पावन मद्भक्त ॥३८॥ म्हणसी विषयनिष्ठ मन । कदा न धरी अनुसंधान । तेचि अर्थींचा उपाय पूर्ण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥३९॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

देशान्पुण्यान् संश्रयेत, मद्भक्तैः साधुभिः श्रितान् । देवासुरमनुष्येषु, मद्भक्ताचरितानि च ॥१०॥

देश पावन कुरुक्षेत्र । अयोध्या देश अतिपवित्र । गंगायमुनेचें उभयतीर । पवित्र अपार अर्बुदाचळ ॥२४०॥ कलापग्राम नंदिग्राम । पावन देश बदरिकाश्रम । पंचवटी श्रीरामाश्रम । पावन परम गौतमीतट ॥४१॥ जेथ लागले श्रीरामचरण । पावन देश दण्डकारण्य । मथुरा गोकुळ वृंदावन । परम पावन ब्रह्मगिरी ॥४२॥ पावन पांडुरंगक्षिती । जे कां दक्षिणद्वारावती । जेथ विराजे विठ्ठलमूर्ती । नामें गर्जती पंढरी ॥४३॥ निर्दळी सकळ पापासी । पंचक्रोशी जे कां काशी । पुण्य देश वाराणसी । साधकांसी अतिसाह्य ॥४४॥ पुण्य सरिता जेथ वाहती । तेही साधकां पावन क्षिती । गंगा यमुना सरस्वती । साबरमती वैतरणी ॥४५॥ गंडकी नर्मदा तपती । गोदावरी भीमरथी । कृष्णा वेण्या तुंगा गोमती । पावन क्षिती श्रीशैल ॥४६॥ कावेरीचें उभय तीर । पवित्र क्षिती चिदंबर । सरिता प्रतीची पवित्र । जिचेनि जळें नर पावन ॥४७॥ कृतमाला पयस्विनी । अतिपवित्र ताम्रपर्णी । पवित्र क्षिती नैमिषारण्यीं । साधकांलागोनि सुसेव्य ॥४८॥ असो हें पवित्रतेचें महिमान । पावना पावन आहे आन । जेथें वसले भक्त सज्जन । तो देश पावन सर्वार्थीं ॥४९॥ जे गांवीं वसती माझे भक्त । तत्संगें तो गांव पुनीत । जे देशीं वसले साधुसंत । तो देश पुनीत त्यांचेनी ॥२५०॥ भक्तांचा वारा लागे जिकडे । अतिपवित्रता होय तिकडे । ते सत्संगती ज्यांसी घडे । पवित्रता जोडे तयांसी ॥५१॥ चंदनाचे संगतीवरी । सुवास होती आरीबोरी । त्यांतें देवद्विज वंदिती शिरीं । तेवीं साधकां करी सत्संग ॥५२॥ जें केवळ काष्ठ कोरडें । संगें मोल पावलें गाढें । त्याची श्रीमंतां चाड पडे । मस्तकीं चढे हरिहरांच्या ॥५३॥ जैं निजभाग्याची संपत्ती । तैंचि जोडे संत्संगती । सत्संगें पावन होती । जाण निश्चितीं साधक ॥५४॥ माझे स्वरुपीं ज्यांचें चित्त । अखंड जडलें भजनयुक्त । त्यांसीच बोलिजे ’मद्भक्त’ । तेचि संत सज्जन ॥५५॥ माझे भक्तांचें आचरित । सुर नर असुर वंदित । साधकींही तेंचि एथ । स्वयें निश्चित साधावें ॥५६॥ श्रेष्ठ विनटले जे भक्तीसी । नारद प्रर्हा द अंबरीषी । तेचि भक्ति अहर्निशीं । साधकीं सद्भावेंसी साधावी ॥५७॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

पृथक् सत्रेण वा मह्यं, पर्वयात्रामहोत्सवान् । कारयेद्गीतनृत्याद्यैर्महाराजविभूतिभिः ॥११॥

वार्षिकी यात्रा पर्वपूजा । भावें अर्पावी अधोक्षजा । छत्रचामरादि वोजा । गरुडध्वजांकित चिह्नीं ॥५८॥ ऐशिया महाराजविभूती । देवासी अर्पाव्या श्रद्धास्थितीं । भजनालागीं अहोरातीं । उल्हास चित्तीं अनिवार ॥५९॥ अश्वगजादिआरोहण । शेषशयन गरुडासन । महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करावा ॥२६०॥ टाळ घोळ निशाण भेरी । शंख मृदंग मंगल तुरीं । नाद न समाय अंबरीं । जयजयकारीं गर्जावें ॥६१॥ तेथ गीतनृत्यपवाडे । कीर्तन करावें वाडेंकोडें । हुंबरीं आखरीं बागडें । देवापुढें करावें ॥६२॥ तोंड करुनि वांकुडें । वांकुली दावावी देवाकडे । वर्णावे देवाचे पवाडे । रंगापुढें गर्जत ॥६३॥ गोपाळकाल्याचा विन्यास । रासक्रीडेचा उल्हास । गोपाळवेषाचा विलास । मनोहर वेष दावावा ॥६४॥ दावावी मालखडयांची परी । झोंबी घ्यावी नानाकुसरी । दंडीं मुडपीं उरीं शिरीं । परस्परीं हाणत ॥६५॥ मल्लविद्येच्या आसुडीं । थडक हाणोनियां गाढी। माळमर्दना परवडी । रंगीं गुढी उभवावी ॥६६॥ कुवलयापीड उन्मत्त । त्याचे उपटोनि गजदंत । गोपाळवेषें डुल्लत । रंगाआंत मिरवावें ॥६७॥ वानावी देवाची वाढीव । करावी देवाची भाटीव । ऐसे दावूनि हावभाव । महामहोत्सव करावा ॥६८॥ असल्या सामर्थ्यवैभव । स्वयें करावे सकळ उत्सव । ना तरी मिळोनियां सर्व । महामहोत्सव करावे ॥६९॥ ऐशिया अनन्य आवडीं । भजन करितां चढोवढी । माझिया भक्तीची लागली गोडी । जोडिलें जोडी हरिप्रेम ॥२७०॥ सप्रेम भक्ती करितां जाण ।तेणें मी भक्तांसी तुष्टमान । माझें अंतरंगभजन । मद्भक्त आपण स्वयें लाहे ॥७१॥ ’अंतरंगभक्ति’ म्हणसी कोण । तें भक्तीचें निजलक्षण । उद्धवाप्रति श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥७२॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

मामेव सर्वभूतेषु, बहिरन्तरपावृतम् । ईक्षेतात्मनि चात्मानं, यथा खममलाशयः ॥१२॥

भावें करितां माझी भक्ती । शुद्ध होय चित्तवृत्ती । तेणें आत्मदृष्टीची स्थिति । गुरुकृपा पावती मद्भक्त ॥७३॥ पाहतां निजात्मदृष्टीवरी । मीचि सर्व भूतांच्या अंतरीं । अंतरींचा हा निर्धार धरी । तंव भूताबाहेरीही मजचि देखे ॥७४॥ जो परावरादि अनंत । तो मी भूतां सबाह्य भगवंत । मी तोचि होय माझा भक्त । मिळोनि मज आंत मद्रूपें ॥७५॥ जैसजैशी माझी व्याप्ती । तैसतैशी भक्तांची स्थिती । जें जें देखे भूतव्यक्ती । तेथ सबाह्य प्रतीती मद्रूपें ॥७६॥ जेवीं घटामाजीं घटाकाश । तेंचि घटासबाह्य महदाकाश । तेवीं भूतांसबाह्य मी चिद्विलास । माझा रहिवास निजरुपें ॥७७॥ निश्चयेंसीं निजप्रतीती । भगवद्भाव सर्वांभूतीं । तेचि भक्तांची भजती स्थिती । यथानिगुती हरि सांगे ॥७८॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

इति सर्वाणि भूतानि, मद्भावेन महाद्युते । सभाजयन्मन्यमानो, ज्ञानं केवलमाश्रितः ॥१३॥

उद्धवा तुझें भाग्य अमूप । तूं ज्ञाननिधि कैवल्यदीप । सर्व भूतीं माझें रुप । चित्स्वरुप सबाह्य ॥७९॥ यापरी गा सर्वभूतीं । माझ्या स्वरुपाची अनुस्यूती । लक्षोनि जो करी भक्ती । नानाव्यक्ती समभावें ॥२८०॥ भिन्न रुप भिन्न नाम । भिन्न स्थिति भिन्न कर्म । जग देखतांही विषम । मद्भक्ता सम मद्भावो ॥८१॥ भूतें देखतांही भिन्न । भिन्नत्वा न ये ज्याचें ज्ञान । मद्भावें भजे समान । त्यासी सुप्रसन्न भक्ति माझी ॥८२॥ ज्यासी प्रसन्न माझी भक्ति । त्याचा आज्ञाधारक मी श्रीपती । जो भगवद्भावें सर्व भूतीं । सुनिश्चितीं उपासक ॥८३॥ आशंका ॥ ’तुझी वेदाज्ञा तंव प्रमाण । अतिशयें पूज्य ब्राह्मण । उपेक्षावे असुरजन । चांडाळ जाण अतिनिंद्य ॥८४॥ कर्मभ्रष्ट जे जे लोक । त्यांचें पाहों नये मुख । हे वेदमर्यादा देख । तुवांचि निष्टंक नेमिली ॥८५॥ तेथ सर्व भूतीं समान । केवीं घडे भगवद्भजन’ । ऐसा विकल्प धरील मन । तरी ऐक महिमान भक्तीचें ॥८६॥ जंव अंधारासीं सबळ राती । तंवचि प्रतिष्ठा दीपस्थिती । तेथें उगवल्या गभस्ती । दीपाची दीप्ती असतांचि नाहीं ॥८७॥ तेवीं जंववरी दृढ अज्ञान । तंवचिवरी वेदाज्ञा प्रमाण । ज्यासी माझें अभेदभजन । तयासी वेद आपण स्वयें वंदी ॥८८॥ वेद बापुडा तो किती । ज्यासी माझी अभेदभक्ती । त्यासी मी वंदी श्रीपती । सदा वशवर्ती तयाचा ॥८९॥ अभेदभक्ति जेथ पुरी । मी नाटिकारु त्याचे घरीं । त्याचा संसार माझे शिरीं । योगक्षेम करीं मी त्याचा ॥२९०॥ अभेदभक्तीचें महिमान । तिच्या पायां लागे आत्मज्ञान । तेथ वंद्यनिंद्य समसमान । विषमींही जाण विकारेना ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

ब्राह्मणे पुल्कसे स्तेने, ब्रह्मण्येऽर्के स्फुलिङगके । अक्रूरे क्रूरके चैव, समदृक्पण्डितो मतः ॥१४॥

ज्यांचे वंदितां पदरज जाण । पवित्र होइजे आपण । ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । ज्यांचा हृदयीं चरण हरि वाहे ॥९२॥ ऐसे अतिवंद्य जे ब्राह्मण । आणि चांडाळांमाजीं निंद्य हीन । तो ’पुल्कस’ द्विजवरांसमान । हरिरुपें जाण भक्त देखे ॥९३॥ सुवर्णविष्णु सुवर्णश्वान । एक पूज्य एक हीन । विकूं जातां मोल समान । वंद्यनिंद्य जाण आत्मत्वीं तैसें ॥९४॥ पुल्कस आणि ब्राह्मण । जातिभेदें विषमपण । आत्मदृष्टीं पाहतां जाण । दोघे समान चिद्रूपें ॥९५॥ जो बळेंचि ब्रह्मस्व चोरी । जो ब्राह्मणा अतिउपकारी । दोघे निजात्मनिर्धारीं । सद्रूपेंकरीं समसाम्य भक्तां ॥९६॥ जेवीं डावा उजवा दोनी हात । एक नरकीं एक पुण्यार्थ। हा कर्माकर्म विपरीतार्थ । समान निश्चित ज्याचे त्यासी ॥९७॥ तेवीं सर्वस्वें ब्राह्मणांचा दाता । कां जो ब्राह्मणांचा अर्थहरिता । दोंहीसी कर्माची विषमता । निजात्मता समान ॥९८॥ सूर्य आणि खद्योत । तेजविशेषें भेद भासत । निजात्मतेजें पाहतां तेथ । समसाम्य होत दोहोंसी ॥९९॥ दावाग्नि आणि दिवा । भेद भासे तेजवैभवा । निजतेजें समानभावा । तेवीं तेजप्रभावा आत्मत्वें समान ॥३००॥ कर्पूराग्नि सोज्वळ कुंडीं । परी राईसंगें तो तडफडी । तेवीं सत्त्वतमपरवडी । शांति आणि गाढी क्रोधावस्था ॥१॥ एक सत्त्ववृत्ति अतिशांत । कां जो क्रूर तामस क्रोधयुक्त । गुणवैषम्यें भेद भासत । आत्मत्वें निश्चित समसाम्य भक्तां ॥२॥ एक आपत्काळीं सर्वसत्ता । होय एकाचा प्राणरक्षिता । एक प्राणदात्याच्या घाता । प्रवर्ते क्रूरता कृतघ्न जो ॥३॥ हे पुण्यपापविषमता जाण । ऐसेही ठायीं भक्त सज्ञान । वस्तु देखती समसमान । उभयतां जाण निजात्मबोधें ॥४॥ वृक्षासी जो प्रतिपाळी । कां जो घाव घाली मूळीं । दोघांही समान पुष्पीं फळीं । तेवीं आत्ममेळीं घातका घातीं ॥५॥ द्विजाचें सोंवळें धोत्र । कां मद्यपियाचें मलीन वस्त्र । सूत्रसृष्टी समान सूत्र । मशक सृष्टिकर आत्मत्वीं तैसे ॥६॥ मशक आणि सृष्टिकर्ता । भजनीं समान मद्भक्तां । हे चौथे भक्तीची अवस्था । अपावो सर्वथा रिघों न शके ॥७॥ जेथूनि रिघों पाहे अपावो । तेथेंचि देखती भगवद्भावो । तेव्हां अपाव तोचि उपावो । मद्भक्तां पहा हो मद्भजनीं ॥८॥ ईश्वर आणि पाषाण । भजनीं मद्भक्तां समान । हें भक्तीचें मुख्य लक्षण । ’चौथी भक्ति’ जाण या नांव ॥९॥ स्वकर्मधर्मवर्णाचार । करितांही निज व्यवहार । ज्यासी सर्वभूतीं मदाकार । तो भक्त साचार प्रिय माझा ॥३१०॥ ज्यासी सर्वभूतीं बुद्धि समान । तेचि भक्ति तेंचि ज्ञान । तेंचि स्वानंदसमाधान । सत्य सज्ञान मानिती ॥११॥ असो सज्ञानाची कथा । ज्यासी सर्व भूतीं समता । तो मजही मानला तत्त्वतां । मोक्षही सर्वथा वंदी त्यातें ॥१२॥ सर्वांभूतीं आत्माराम । ऐसें कळलें ज्या निःसीम । तेचि भक्ति उत्तमोत्तम । ज्ञानियें परम मद्रूपें ॥१३॥ योग याग ज्ञान ध्यान । सकळ साधनांमाजीं जाण । मुख्यत्वें हेंचि साधन । तेंचि निरुपण हरि सांगे ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नरेष्वभीक्षणं मद्भावं, पुंसो भावयतोऽचिरात् । स्पर्धाऽसूयातिरस्काराः, साहङकारा वियन्ति हि ॥१५॥

जो श्रोत्रिय सदाचार उत्तम । कां जो जातिस्वभावें अधम । कां अनाचारें अकर्म । येथें सद्भावें सम देखे जो वस्तु ॥१५॥ चराचरीं भगवद्भावो । देखणें हा शुद्ध स्वभावो । तरी नराच्याच ठायीं देवो । साक्षेपें पहा हो कृष्ण कां सांगे ॥१६॥ मनुष्यांच्या ठायीं जाण । प्रकट दिसती दोषगुण । तेथ साक्षेपें आपण । ब्रह्म परिपूर्ण पहावें ॥१७॥ चौर्याकयशीं लक्ष योनी अपार । त्यांत त्र्यायशीं लक्ष नव्याण्णव सहस्त्र । नवशें नव्याण्णव योनी साचार । मुक्त निरंतर गुणदोषार्थी ॥१८॥ परी मनुष्ययोनीच्या ठायीं । दोष न देखे जो पाहीं । तोचि देहीं विदेही । अन्यथा नाहीं ये अर्थीं ॥१९॥ मनुष्यदेहीं ब्रह्मभावो । देखे तो सभाग्य पहा हो । चहूं मुक्तींचा तोचि रावो । जगीं निःसंदेहो तो एक ॥३२०॥ सर्व भूतीं भगवद्भजन । ऐसें ज्यासी अखंड साधन । त्या नराचा देहाभिमान । क्षणार्धें जाण स्वयें जाये ॥२१॥ जातां देहींचा अहंकार । निघे सहकुटुंब सपरिवार । स्पर्धा असूया तिरस्कार । येणेंसीं सत्वर समूळ निघे ॥२२॥ देहीं ममता तोचि ’अभिमान’ । आपल्या ज्ञानेंसीं समान । त्याचें निर्भर्त्सणें जें ज्ञान । ’स्पर्धा’ जाण या नांव ॥२३॥ आपणाहूनि अधिक ज्ञान । ऐसें जाणोनि आपण । त्याचे गुणीं दोषारोपण । करणें ते जाण ’असूया’ ॥२४॥ भाविक जे साधक जन । त्यांचें छळून सांडी साधन । धिक्कारुनि निर्भर्त्सी पूर्ण । ’तिरस्कार ’ जाण या नांव ॥२५॥ इत्यादि दोषसमुदावो । घेऊनि पळे अहंभावो । सर्वां भूतीं भगवद्भावो । देखतांच पहा हो तत्काळ ॥२६॥ सर्व भूतीं समत्वें भजतां । हेंचि श्रेष्ठ साधन तत्त्वतां । येणें पूर्णब्रह्म लाभे हाता । हे साधे अवस्था नरदेहीं ॥२७॥ सांडावें ममतेचें काज । सांडावें योग्यतेचें भोज । सांडावी लौकिकाची लाज । ब्रह्मसायुज्य तैं लाभे ॥२८॥ सांडावी देहगर्वता । सांडावी सन्मान अहंता । सांडावी श्रेष्ठत्वपूज्यता । ब्रह्मसायुज्यता तैं लाभे ॥२९॥ तत्काळ होइजे ब्रह्म पूर्ण । या प्राप्तीचें सुगम साधन । कोणाही न करवे जाण । लोकेषणा दारुण जनासी ॥३३०॥ सांडावा वर्णाभिमान । स्वयें सांडूनि जाणपण । अणुरेणूंसीही लोटांगण । घालितां पूर्ण ब्रह्मप्राप्ती ॥३१॥ जो सांडी लोकेषणेची लाज । त्याचें तत्काळ होय काज ॥ तेचि विखींचें निजगुज । स्वयें अधोक्षज सांगत ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

विसृज्य स्मयमानान् स्वान्, दृशं व्रीडां च दैहिकीम् । प्रणमेद्दण्डवद्भूमावाश्वचाण्डालगोखरम् ॥१६॥

सुहृदां देखतां लोटांगण । घालतां हांसतील संपूर्ण । यालागीं विदेशीं आपण । घालावें लोटांगण गो-खर-श्वानां ॥३३॥ ऐशी लौकिकाची लाज । धरितां सिद्धी न पवे काज । लोटांगणाचें निजभोज । नाचावें निर्लज्ज सुहृदांपाशीं ॥३४॥ सासु सासरा जांवयी । इष्ट मित्र व्याही भाई । ज्यांसी देखतांचि पाहीं । विरजे देहीं लाजोनी ॥३५॥ त्यांसि देखतां आपण । लाज सांडोनियां जाण । चांडाळादि हीन जन । गो खर श्वान वंदावीं ॥३६॥ तेंहीं ऐसें गा वंदन । दंडाचे परी आपण । सर्व भूतां लोटांगण । भगवद्भावें जाण घालावें ॥३७॥ तेथ ब्रह्मवेत्ते ब्राह्मण । कां अत्यंजादि हीन जन । यांच्या ठायीं लोटांगण। सारिखें जाण सद्भावें ॥३८॥ गाय गाढव सूकर श्वान । यांच्याही ठायीं आपण । दंडवत लोटांगण । सद्भावें संपूर्ण घालावें ॥३९॥ साधावया निजकार्य पूर्ण । लोकलाज सांडावी खणोन । माशी मुंगी मुरकूट जाण । त्यांसीही लोटांगण दंडप्राय ॥३४०॥ भावें वंदितां गो-खर-रज । प्रकटे भगवद्भजनतेज । त्यजूनि स्वजनांची लाज । वंदीं निजभोज लोटांगणेंसीं ॥४१॥ त्यजूनि संदेहविषमता । लोकलज्जे हाणोनि लाता । भगवद्बुद्धीं सर्वभूतां । घालावें तत्त्वतां लोटांगण ॥४२॥ म्हणसी ऐसें हें साधन । कोठवरी करावें आपण । तेंचि मर्यादानिरुपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

यावत्सर्वेषु भूतेषु, मद्भावो नोपजायते । तावदेवमुपासीत, वाङवनः कायवृत्तिभिः ॥१७॥

आपुला देह घालोनि पुढें । जें जें भूत दृष्टीं आतुडे । तेथ भगवद्भावें ठसा पडे । वाडेंकोडें निश्चित ॥४४॥ दृष्टीं पाहतां जें जें भासे । दृष्टीं नातुडतां जें जें दिसे । तें तें ज्यासी अनायासें । भासे आपैसें चिद्रूप ॥४५॥ मनाचे कल्पने जें जें आलें । कां कल्पनातीत जें जें ठेलें । तें तें ज्यासी अनुभवा आलें । स्वरुप आपुलें मद्रूपत्वें ॥४६॥ कायिक कर्माचार । वैदिक लौकिक व्यापार । ते ज्यासी दिसती मदाकार । चराचर मद्रूपें ॥४७॥ जागृतिस्वप्नसुषुप्तीसीं । देखिजे भोगिजे ज्या सुखासी। तें तें मद्रूप ज्यासी । निश्चयेंसीं ठसावे ॥४८॥ स्वाभाविक जे व्यापार । देहीं निफजती अपार । ज्यासी मद्रूपें साचार । निश्चयें निर्धार ढळेना ॥४९॥ ऐशी न जोडतां अवस्था । सर्व भूतीं भगवद्भावता । भजावें गा तत्त्वतां । निजस्वार्था लागूनी ॥३५०॥ हे सांडूनि भजनावस्था । नाना साधनीं प्रयास करितां । माझ्या अनुभवाची वार्ता । न चढे हाता कल्पांतीं ॥५१॥ ऐसें जाणूनियां आपण । सर्व भूतीं भगवद्भजन । करावें निश्चयेंसीं जाण । हे आज्ञा संपूर्ण पैं माझी ॥५२॥ सांडोनि युक्तीची व्युत्पत्ती । धरितां भगवद्भाव सर्वभूतीं । येणेंचि माझी सुगम प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥५३॥ माझिये प्राप्तीचें सुगम साधन । उद्धवा तुवां पुशिलें जाण । तरी सर्व भूतीं भगवद्भजन । तदर्थ जाण सांगितलें ॥५४॥ हा ब्रह्मप्राप्तीचा उपाव पूर्ण । माझे जिव्हारींची निजखूण । सुगमप्राप्तीलागीं जाण । उत्तम साधन सांगितलें ॥५५॥ येणें सुगम ज्ञानस्थिती । येणें सुगम माझी भक्ती । येणें सुगम माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥५६॥ सर्व भूतीं ब्रह्मस्थिती । ज्यासी निश्चयें जाहली प्राप्ती । त्याची उपरमे भजनवृत्ती । तेंचि श्रीपती सांगत ॥५७॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

सर्वं ब्रह्मात्मकं तस्य, विद्ययाऽऽत्ममनीषया । परिपश्यन्नुपरमेत्, सर्वतो मुक्तसंशयः ॥१८॥

काया वाचा आणि चित्तें । सर्व भूतीं भजले मातें । त्यासी भगवद्रूप सर्व भूतें । सुनिश्चितें ठसावतीं ॥५८॥ तेव्हां मी एक एथें । भगवद्रूप पाहें सर्व भूतें । हेही वृत्ति हारपे तेथें । देखे सभोंवतें परब्रह्म ॥५९॥ परब्रह्म देखती वृत्ती । तेही विरे ब्रह्मा आंतौती । जेवीं घृतकणिका घृतीं । होय सुनिश्चितीं घृतरुप ॥३६०॥ तेव्हां ब्रह्मचि परिपूर्ण । हेही स्फूर्ति नुरे जाण । गिळूनियां मीतूंपण । ब्रह्मीं ब्रह्मपण अहेतुक ॥६१॥ तेथें हेतु मातु दृष्टांतु । खुंटला वेदेंसीं शास्त्रार्थु । हारपला देवभक्तु । अखंड वस्तु अद्वयत्वें ॥६२॥ गेलिया दोराचें सापपण । दोर दोररुपें परिपूर्ण । हो कां भासतांही सापपण । दोरीं दोरपन अनसुट ॥६३॥ तेवीं प्रपंच सकारण । गेलिया ब्रह्मचि परिपूर्ण । कां दिसतांही प्रपंचाचें भान । ब्रह्मीं ब्रह्मपण अनुच्छिष्ट ॥६४॥ याचिलागीं सर्व भूतीं । करितां माझी भगवद्भक्ती । एवढी साधकांसी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६५॥ तत्काळ पावावया ब्रह्म पूर्ण । सांडूनियां दोषगुण । सर्व भूतीं भगवद्भजन । हेंचि साधन मुख्यत्वें ॥६६॥ याही साधनावरतें । आणिक साधन नाहीं सरतें । हेंचि परम साधन येथें । मजही निश्चितें मानलें ॥६७॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

अयं हि सर्वकल्पनां, सध्रीचीनो मतो मम । मद्भावः सर्वभूतेषु, मनोवाक्कायवृत्तिभिः ॥१९॥

सर्व भूतीं भगवद्‌दृष्टी । हेंचि भांडवल माझे गांठीं । येणें भांडवलें कल्पकोटी । करोनि सृष्टीं मी अकर्ता ॥६८॥ मज पाहतां निजात्मपुष्टी । सर्वभूतीं भगवद्‌दृष्टी । हेचि भक्ति माझी गोमटी । ब्रह्मांडकोटीतारक ॥६९॥ हेचि भक्ति म्यां कल्पादी । सर्वभूतीं भगवद्बुद्धी । नाभिकमळीं त्रिशुद्धी । ब्रह्मा या विधीं उपदेशिला ॥३७०॥ व्रत तप करितां दान । योगयाग करितां ध्यान । वेदशास्त्रार्थें साधितां ज्ञान । माझ्या भक्तीसमान ते नव्हती ॥७१॥ नाना साधनांचिया कोटी । साधकीं साधितां आटाटी । माझ्या प्रेमाची नातुडे गोठी । मद्भक्त भेटीवांचूनी ॥७२॥ माझिया भक्तांचिये संगतीं । साधकां लाभे माझी भक्ति । अभेदभजनें माझी प्राप्ति । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥ सर्वभूतीं भगवद्भजन । करितें ऐक पां लक्षण । विषमें भूतें देखतां जाण । मनीं भाव परिपूर्ण ब्रह्मत्वें ॥७४॥ दुष्ट दुरात्मा अनोळख । नष्ट चांडाळ अनामिक । तेथही ब्रह्मभाव चोख । हें ’मानसिक’ निजभजन ॥७५॥ भूतीं भगवंत परिपूर्ण । ऐसें जाणोनि आपण । भूतांसी लागे दारुण । तें कठिण वचन बोलेना ॥७६॥ तेथें जातांही निजप्राण । भूतांचे न बोले दोषगुण । या नांव गा ’वाचिक’ भजन । उद्धवा जाण निश्चित ॥७७॥ जेणें भूतांसी होय उपकार । ते ते करी देहव्यापार । भेदितांही निजजिव्हार । जो अपकारा कर उचलीना ॥७८॥ स्वयें साहूनियां अपकार । जो अपकारियां करी उपकार । ऐसा ज्याचा शरीरव्यापार । तें भजन साचार ’कायिक’ ॥७९॥ यापरी काया-वाचा-मनें । सर्वभूतीं भगवद्भजन । हेंचि मुख्यत्वें श्रेष्ठ साधन । भक्त सज्ञान जाणती ॥३८०॥ ब्रह्मप्राप्तीचें परम कारण । हेंचि एक सुगम साधन । मजही निश्चयें मानलें जाण । देवकीची आण उद्धवा ॥८१॥ हा भजनधर्म अतिशुद्ध । येथें विघ्नांचा संबंध । अल्पही रिघों न शके बाध । तेंचि विशद हरि सांगे ॥८२॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

न ह्यङगोपक्रमे ध्वंसो, मद्धर्मस्योद्धवाण्वपि । मया व्यवसितः सम्यङ्‌, निर्गुणत्वादनाशिषः ॥२०॥

अनेक धर्म नाना शास्त्रार्थी । मन्वादि मुखें बोलिले बहुतीं । परी सर्वभूतीं भगवद्भक्ती । श्रेष्ठ सर्वार्थीं साधकां ॥८३॥ ये भक्तीचें हेंचि श्रेष्ठपण । इचे पूर्वारंभीं जाण । साधकांपाशीं अल्पही विघ्न । बाधकपण धरुं न शके ॥८४॥ ये भक्तीचें निजलक्षण । पूर्वारंभीं हे निर्गुण । एथ रिघावया विघ्न । दाटुगेंपण धरीना ॥८५॥ जेवीं गरुडाचे झडपेतळीं । होती सर्पाच्या चिरफाळी । तेवीं ये भक्तीजवळी । विघ्नांची होळी स्वयें होये॥८६॥ माझिया नामापुढें । विघ्न राहों न शके बापुडें । तें माझे भक्तीकडे । कोणते तोंडें येईल ॥८७॥ यापरी हे भक्ती सधर । उद्धवा तुझें भाग्य थोर । म्यां फोडूनि निजजिव्हार । साराचें सार सांगितलें ॥८८॥ निष्काम जे माझी भक्ती । तेथ विघ्नांची न पडे गुंती । परब्रह्माची ब्रह्मस्थिती। सुलभत्वें प्राप्ती साधकां ॥८९॥ हेतुक अहेतुक कर्माचरण । तेंही करी जो कृष्णार्पण । ते उत्तम माझी भक्ती जाण । तेंचि निरुपण हरि सांगे ॥३९०॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

यो यो मयि पर धर्मः कल्पते निष्फलाय चेत् । तदासायो निरर्थः स्याद्भयादेरिव सत्तम ॥२१॥

व्यवहारार्थ जो प्रयास केला । जो न फळतां व्यर्थ गेला । तोही जैं परब्रह्मीं अर्पिला । तैं मद्भजनीं लागला सद्भावें ॥९१॥ शिमगियाचा महासण । तेथ खेळ खेळला जो आपण । तोही केल्या कृष्णार्पण । तेही भक्ति जाण मज अर्पे ॥९२॥ चोराभेणें लपतां वनीं । निधान आतुडे ज्यालागूनी । तेवीं व्यर्थ कर्मही मदर्पणीं । करितां मद्भजनीं महालाभ ॥९३॥ नासलें तें सांडितां क्षितीं । तेंही लागे माजे भक्तीं । जरी ब्रह्मार्पण चित्तीं । साधक निश्चितीं दृढ मानी ॥९४॥ कडू भोंपळ्याची खिरी । उपेगा न ये श्वानसूकरीं । ते उल्हासें कृष्णार्पण करी । तेही निर्धारीं ब्रह्मीं अर्पे ॥९५॥ जें हारपलें न दिसे । जें सहजें उडे काळवशें । तेंही लाविल्या मदुद्देशें । होय अनायासें मदर्पण ॥९६॥ सकळ सारांचें सार पूर्ण । कर्ममात्र कृष्णार्पण । साक्षेपें करावें आपण । ’सद्बुद्धि’ संपूर्ण या नांव ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

एषा बुद्धिमतां बुद्धिर्मनीषा च मनीषिणाम् । यत्सत्यमनृतेनेह, मर्त्येनाप्नोति मामृतम् ॥२२॥

अंतरीं विषयांची आसक्ती । वरीवरी ब्रह्मार्पण म्हणती। ते ठकिले बहुतां अर्थीं । तेंचि श्रीपती सांगत ॥९८॥ एक बुद्धिमंत होती । ते निजबुद्धी घेऊन हातीं । शेखीं लागले विषयस्वार्थीं । ते ठकिले निश्चितीं देहममता ॥९९॥ एकाची बुद्धि अतिचोखडी । वेदशास्त्रार्थी व्युत्पत्ति गाढी । ते अभिमानें कडोविकडी । ठकिले पडिपाडीं ज्ञानगर्वें ॥४००॥ बुद्धिमंत अभ्यासी जन । अभ्यासें साधिती प्राणापान । ते योगदुर्गीं रिघतां जाण । ठकिले संपूर्ण भोगसिद्धीं ॥१॥ एक मानिती कर्म श्रेष्ठ । वाढविती कर्मकचाट । विधिनिषेधीं रुंधिली वाट । बुडाले कर्मठ कर्मामाजीं ॥२॥ यापरी नानाव्युत्पत्ती । करितां ठकले नेणों किती । तैसी नव्हे माझी भक्ती । सभाग्य पावती निजभाग्यें ॥३॥ माझें सर्वभूतीं ज्यासीं भजन । त्याचे बुद्धीची बुद्धी मी आपण । ते तूं बुद्धी म्हणसी कोण । कर्म ब्रह्मार्पण ’महाबुद्धी’॥४॥ सर्वभूतीं माझें भजन । सर्व कर्म मदर्पण । हे बुद्धीचि ’महाबुद्धि’ जाण । येणें ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥५॥ चतुरांचें चातुर्य गहन । या नांव बोलिजे गा आपण । मिथ्या देहें करुनि भजन । ब्रह्म सनातन स्वयें होती ॥६॥ आधीं मायाचि तंव वावो । मायाकल्पित मिथ्या देहो । तें देहकर्म मज अर्पितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो स्वयें होती ॥७॥ मिथ्या देहाचेनि भजनें । सत्य परब्रह्म स्वयें होणें । जेवीं कोंडा देऊनि आपणें । कणांची घेणें महाराशी ॥८॥ देतां फुटकी कांचवटी । चिंतामणी जोडे गांठीं । कां इटेच्या साटोवाटीं । जोडे उठाउठीं अव्हाशंख ॥९॥ तेवीं मिथ्या देहींचें कर्माचरण । जेणें जीवासी दृढ बंधन । तें कर्म करितां मदर्पण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥४१०॥ अनित्य देहाचियासाठीं । नित्यवस्तूसी पडे मिठी । हेचि बुद्धिमतीं बुद्धि मोठी । ’ज्ञानाची संतुष्टी’ या नांव म्हणिपे ॥११॥ निष्टंकित परमार्थ । स्वमुखें बोलिला श्रीकृष्णनाथ । तो कळसा आणोनियां ग्रंथ। उपसंहारार्थ सांगतु ॥१२॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

एष तेऽभिहितः कृत्स्नो, ब्रह्मवादस्य सङ्‌ग्रहः । समासव्यासविधिना, देवानामपि दुर्गमः ॥२३॥

संक्षेपें आणि सविस्तरें । सांडूनि नाना मतांतरें । म्यां सांगितलें निजनिर्धारें । ब्रह्मज्ञान खरें अतिशुद्ध ॥१३॥ तुज सांगितलें करुन सुगम । परी हें ब्रह्मादि देवां दुर्गम । जे आलोडिती आगमनिगम । त्यांसीही परम दुस्तर ॥१४॥ तेथें नाना शास्त्रशब्दबोध । वस्तु नेणोनि करिती विवाद । जेथ वेदांचा ब्रह्मवाद । होय निःशब्द ’नेति’ शब्दें ॥१५॥ तें हें आत्मज्ञानाचें निजसार । परमार्थाचें गुह्य भांडार । मज परमात्म्याचें जिव्हार । फोडूनि साचार सांगितलें ॥१६॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

अभीक्ष्णशस्ते गदितं, ज्ञानं विस्पष्टयुक्तिमत् । एतद्विज्ञाय मुच्येत, पुरुषो नष्टसंशयः ॥२४॥

जेथ वेदशास्त्रांसी कुवाडें । जें बोलीं बोलतां नातुडे । तेंचि ज्ञान म्यां तुजपुढें । निजनिवाडें सांगितलें ॥१७॥ जें सांगितलें शुद्ध ज्ञान । तें नाना युक्तींकरुनि जाण । दृढतेलागीं निरुपण । पुनः पुनः जाण म्यां केलें ॥१८॥ बहुत न लावितां खटपट । तुज न वाटतांही कष्ट । ज्ञान सांगितलें विस्पष्ट । जेणें होती सपाट संशय सर्व ॥१९॥ हें जाणितलिया ज्ञान । सर्व संशय होती दहन । साधक होय ब्रह्मसंपन्न । स्वानंदपूर्ण सर्वदा ॥४२०॥ म्यां सांगितलें गुह्यज्ञान । एकादशाचें निरुपण । याचें श्रवण पठण मनन । करी तो धन्य उद्धवा ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

सुविविक्तं तव प्रश्नं, मयैतदपि धारयेत् । सनातनं ब्रह्म गुह्यं, परं ब्रह्माधिगच्छति ॥२५॥

ज्ञाते तरती हें नवल कोण । परी भाळेभाळे जे अज्ञान । त्यांसी उद्धरावया जाण । उद्धवा तुवां प्रश्न पुशिला ॥२२॥ त्या प्रश्नानुसारें जाण । म्यां संतोषोनि आपण । सांगितलें गुह्य ज्ञान । परम कारण परब्रह्म ॥२३॥ जेवीं वत्साचे हुंकारें । धेनु स्त्रवत चाले क्षीरें । तेवीं तुझेनि प्रश्नादरें । मी स्वानंदभरें तुष्टलों ॥२४॥ तेथ न करितांही प्रश्न । होतां तानयाचें अवलोकन । कूर्मी नेत्रद्वारां आपण । अमृतपान करवीत ॥२५॥ तेवीं उद्धवा तुझें अवलोकन । होतां, माझें हृदयींचें ब्रह्मज्ञान । तें वोसंडलें गा परिपूर्ण । तें हें निरुपण म्यां केलें ॥२६॥ येणें निरुपणमिसें । परमामृत सावकाशें । तुज म्यां पाजिलें अनायासें । स्वानंदरसें निजबोधु ॥२७॥ सिंधु मेघा जळपान करवी । तेणें जळें मेघ जगातें निववी । तेवीं उद्धवाचिये ब्रह्मपदवीं । जडमूढजीवीं उद्धरिजे ॥२८॥ जेवीं वत्साचेनि प्रेमभरें । गाय दुभे तें घरासी पुरे । तेवीं उद्धवप्रश्नादरें । जग उद्धरे अनायासें ॥२९॥ तो हा प्रश्नोत्तरकथानुवाद । माजा तुझा ब्रह्मसंवाद । निरुपणीं एकादशस्कंध । हा अर्थावबोध जो राखे ॥४३०॥ अथवा हें निरुपण । सार्थकें जो कां करी श्रवण । तैं श्रोते वक्ते उभय जाण । ब्रह्म सनातन स्वयें होती ॥३१॥ जगीं ब्रह्म असतां परिपूर्ण । मनबुद्धिइंद्रियां न दिसे जाण । जेथें वेदांसी पडिलें मौन । तें गुह्यज्ञान पावती ॥३२॥ ज्ञान पावलिया पुढती । कदा काळें नव्हे च्युती । हा एकादशार्थ धरितां चित्तीं । पदप्राप्ती अच्युत ॥३३॥ श्रोते वक्ते एकादशार्थी । एवढी पदवी पावती । मा मद्भक्तांसी अतिप्रीतीं । जे उपदेशिती हें ज्ञान ॥३४॥ त्यांच्या फळाची फलप्राप्ती । ज्ञानोपदेशाची शुद्ध स्थिती । उद्धवालागीं अतिप्रीतीं । स्वमुखें श्रीपती सांगत ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

य एतन्मम भक्तेषु, सम्प्रदद्यात् सुपुष्कलम् । तस्याहं ब्रह्मदायस्य, ददाम्यात्मानमात्मना ॥२६॥

काया वाचा आणि चित्त । ग्रह दारा वित्त जीवित । निष्कामता मज अर्पित । अनन्य भक्त ते माझे ॥३६॥ ऐशिया भक्तांच्या ठायीं जाण । अवश्य उपदेशावें हें ज्ञान । त्याही उपदेशाचें लक्षण । पक्व परिपूर्ण तें ऐसें ॥३७॥ जेथ जेथ जाय साधकाचें मन । तेथ तेथ ब्रह्म परिपूर्ण । मन निघावया तेथून । रितें स्थान असेना ॥३८॥ ऐसें करितां अनुसंधान । चैतन्यीं समरसे मन । त्यातें म्हणिजे ’पुष्कल ज्ञान’ । उपदेश पूर्ण या नांव ॥३९॥ ऐसें समूळ ब्रह्मज्ञान । मद्भक्तांसी जो करी दान । त्याचा ब्रह्मऋणिया मी जाण । होय संपूर्ण उद्धवा ॥४४०॥ त्याचिया उत्तीर्णत्वासी । गांठीं कांहीं नाहीं मजपाशीं । मी निजरुप अर्पी त्यासी । अहर्निशीं मी त्याजवळी ॥४१॥ जो शिष्यांसी दे ब्रह्मज्ञान । मी परमात्मा त्या अधीन । ब्रह्मदात्याच्या बोलें जाण । स्त्रियादि शूद्रजन मी उद्धरीं ॥४२॥ देऊनियां परब्रह्म । जो मद्भक्तांसी करी निष्कर्म । त्याचा अंकित मी पुरुषोत्तम । तो प्रिय परम मजलागीं ॥४३॥ जो ब्रह्मज्ञान दे मद्भक्तां । तयाहूनि आणिक परता । मज आन नाहीं गा पढियंता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४४॥ तो आत्मा मी शरीर जाण । त्याचा देह मी होय आपण । त्याचें जें जें कर्माचरण । तें तें संपूर्ण मीचि होय ॥४५॥ जैसा मी अवतारधारी । तैसाचि तोही अवतारी । त्या आणि मजमाझारीं । नाहीं तिळभरी अंतर ॥४६॥ जो या ब्रह्मज्ञानाचें करी दान । त्यासी यापरी मी आपण । करीं निजात्म अर्पण । तरी उत्तीर्ण नव्हेचि ॥४७॥ यालागीं वर्ततांही शरीरीं । मी अखंड त्याची सेवा करीं । निजात्म अर्पण प्रीतीवारी । मी त्याच्या घरीं सर्वदा ॥४८॥ त्यातें जें जें जडभारी । तेंही मी वाहें आपुले शिरीं । माझी चैतन्यसाम्राज्यश्री । नांदें त्याचे घरीं सर्वदा ॥४९॥ एकादशाचें ब्रह्मज्ञान । बोधूनि मद्भक्तां जो करी दान । त्यासी मी यापरी जाण । आत्मार्पण स्वयें करीं ॥४५०॥ असो न साधवे ब्रह्मज्ञान । तरी या ग्रंथाचेंचि पठण । जो सर्वदा करी सावधान । तो परम पावन उद्धवा ॥५१॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

य एतत्समधीयीत, पवित्रं परमं शुचि । स पूयेताहरहर्मां, ज्ञानदीपेन दर्शयन् ॥२७॥

निखळ जें कां ब्रह्मज्ञान । तो हा माझा तुझा संवाद जाण । जो सादरें करी पठण । सावधान श्रद्धाळू ॥५२॥ चढत्या वाढत्या परवडी । शुद्ध सात्त्विकी श्रद्धा गाढी ॥ पदोपदीं नीच नवी गोडी । अद्भुत आवडी पठणाची ॥५३॥ वाचेचिया टवळ्यांप्रती । श्रद्धास्नेहाची संपत्ति । निजजिव्हा करुनि वाती । जो हें ज्ञानदीप्ती प्रकाशी ॥५४॥ एकादशाचे ज्ञानदीप्ती । एकादश इंद्रियांच्या वाती । उजळूनि जे मज वोंवाळिती । ते पवित्र किती मी सांगूं ॥५५॥ यापरी जें ग्रंथपठण । तें माझें ज्ञान-निरांजन । तेणें ज्ञानदीपें जो जाण । माझें स्वरुप पूर्ण प्रकाशी ॥५६॥ त्याचे लागले जे संगती । त्यांतें ब्रह्मादिक वंदिती । त्यांचेनि पावन त्रिजगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥५७॥ असो, ज्यांसी न टके पठण । तिंहीं श्रद्धेनें करितां श्रवण । त्यांसी न बाधी भवबंधन । तेंही निरुपण हरि सांगे ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

य एतच्छ्र्द्धया नित्यमव्यग्रः श्रृणुयान्नरः । मय भक्तिं परां कुर्वन्, कर्मभिर्न स बध्यते ॥२८॥

असो न करवे अध्ययन । तरी श्रद्धायुक्त सावधान । करितां एकादशाचें श्रवण । कर्मबंधन बाधीना ॥५९॥ अति श्रद्धेनें केलें श्रवण । त्याहूनि दृढ व्हावें मनन । मननेंवीण तें नपुंसक जाण । ब्रह्मप्राप्ति पूर्ण फळेना ॥४६०॥ संपलिया कथाश्रवण । मनींचें संपावें ना मनन । जैसें लोभियाचें धन । हृदयीं आठवण सर्वदा ॥६१॥ जैसें जैसें कीजे श्रवण । तैसें तैसें लागे मनन । मननानुसारें भजन । ’पराभक्ती’ जाण उद्बोधे ॥६२॥ आर्त जिज्ञासु अर्थार्थी । यांची सांडोनिया स्थिती । उल्हासे माझी चौथी भक्ती । जितें ’परा’ म्हणती सज्ञान ॥६३॥ पराभक्तीचें माझें भजन । क्रियामात्रें निजात्मदर्शन । यालागीं मद्भक्तांसी जाण । कर्मबंधन बाधीना ॥६४॥ हें असो अतिगुह्य बोलणें । येणें एकादशाचेनि श्रवणें । ’मी तरेन’ हा विश्वास जेणें । अंतःकरणें दृढ केला ॥६५॥ दृढ विश्वास मानूनि पाहीं । जो लोधला श्रवणविषयीं । माझी भक्ती त्याच्या ठायीं । दवडितां पाहीं घर रिघे ॥६६॥ घर रिघोन भक्ति निष्काम । भक्तांचें निर्दळी सकळ कर्म । या नांव ’पराभक्ति’ परम । विश्रामधाम श्रवणार्थ्यां ॥६७॥ एकादशाचें श्रद्धा श्रवण । करितां एवढा लाभ पूर्ण । श्रवणें उपजे माझें भजन । भजनें भक्तजन निर्मुक्त ॥६८॥ असो पां इतरांची वार्ता । म्यां तुज निरुपिली जे ज्ञानकथा । ते तुझिया निश्चितार्था । काय तत्त्वतां प्रतिबोधली ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

अप्युद्धव त्वया ब्रह्म, सखे समवधारितम् । अपि ते विगतो मोहः, शोकश्वासौ मनोभवः ॥२९॥

उद्धवा तुझें देखोनि प्रेम । गुह्य ज्ञान अतिउत्तम । तुज म्यां निरुपिलें परब्रह्म । साङग सुगम अतिशुद्ध ॥४७०॥ हें ज्ञानाचें सोलींव ज्ञान । हें वेदांचें विसावतें स्थान । हेचि अविद्येची बोळवण । समाधान जिवशिवां ॥७१॥ ऐसें हें जें गुह्यज्ञान । मनबुद्धिवाचेसी अगम्य जाण । तें म्यां तुज केलें निरुपण । श्रद्धा संपूर्ण देखोनि ॥७२॥ जेवीं सखा सख्याप्रती । आपुली वोपी निजसंपत्ती । तेवीं म्यां हे ब्रह्मस्थिती । तुझ्या हातीं वोपिली ॥७३॥ जैसें दिधलें श्रवणाच्या हातीं । तैसें प्रविष्ट जाहलें तुझिया चित्तीं । कीं माझारीं पडली कांहीं गुंती । विकल्पवस्ती विक्षेप ॥७४॥ म्यां निरुपिलें सार परम । तें तुज कळलें परब्रह्म । नसेल, तरी हाचि उपक्रम । पुढती सुगम सांगेन ॥७५॥ चैतन्य ठसावोनि चित्तीं । जेथ आकळिली ब्रह्मस्थिती । तेथ मोहममतेची वस्ती । समूळ निश्चितीं नसावी ॥७६॥ आकळलें ब्रह्मज्ञान । त्याची हेचि वोळखण । संकल्पविकल्पविंदान । पुढती जाण उपजेना ॥७७॥ उपजेना मीतूंपण । उपजेना ध्येय ध्याता ध्यान । नुपजे त्यासी कर्मठपण । ब्रह्म परिपूर्ण जाणितल्या ॥७८॥ जेणें जाणितलें ब्रह्मज्ञान । त्यासी बाधीना कर्मबंधन । कर्माचें जें कर्माचरण । तें जाण आपण मायिक ॥७९॥ जेवीं छाया चळे पुरुषाचेनी । परी तियेचा लोभ पुरुष न मानी । तेवीं काया चाळी ब्रह्मज्ञानी । देहाभिमानी तो नव्हे ॥४८०॥ जेवीं सूर्यापुढें आंधार । अर्ध क्षण न धरी धीर । तेवीं ब्रह्मज्ञानी कमादर । अणुमात्र उरेना ॥८१॥ कर्माचें जें कर्मबंधन । तो मनोजन्य संकल्प जाण । जेथें मनाचें मोडे मनपण । तेथें कर्माचरण निर्बीज ॥८२॥ वस्तु नित्य निर्विकल्प । तेथें नाहीं संकल्पविकल्प । हें परब्रह्माचें निजस्वरुप । हेंचि रुप स्वानुभवासी ॥८३॥ ऐसें ब्रह्म पावल्या स्वयमेवो । मी एक उद्धव होतों पहा हो । त्या उद्धवपणासी नाहीं ठावो । मा शोकमोहो तेथ कैंचा ॥८४॥ उद्धवपणाचिये वस्ती । शोकमोहांची उत्पत्ती । तें उद्धवपण नाठवे चित्तीं । जरी ब्रह्मप्राप्ति तुज जाहली ॥८५॥ ऐसें ऐकतां देवाचें वचन । उडालें उद्धवाचें उद्धवपण । जाहला स्वानंदीं निमग्न । बोलतेपण बुडालें ॥८६॥ पावतां आपुली निजात्मता । उडाली उद्धवत्वाची अवस्था ॥ बुडाली स्वदेह अहंता । निजनिमग्नता स्वानंदीं ॥८७॥ तेथें देवें पुशिला जो प्रश्न । त्याचें कोण दे प्रतिवचन । कृष्णेंसहित उद्धवपण । गिळोनि परिपूर्ण वस्तु जाहला ॥८८॥ देखोनि उद्धवाची अवस्था । हा ब्रह्म पावला निजात्मता । हें कळों सरलें श्रीकृष्णनाथा । हृदयस्था काय न कळे ॥८९॥ शिष्य साचार अनुभव लाहे । तेणें सद्गुरु सुखाचा मेरु होये । जेवीं तानयाचे धणीं माये । सुखावली राहे स्वानंदें ॥४९०॥ सेवक विभांडितां परचक्र । तेणें रायासी संतोष थोर । गुढी उभारुनि साचार । करी निजगजर स्वानंदें ॥९१॥ तानयाचे लळे पुरविणें । हे व्यालीची वेदना व्याली जाणे । कां शिष्यासी स्वानुभव देणें । हें स्वयें जाणे सद्गुरु ॥९२॥ निजपुत्रें लाधल्या निधान । पिता संतोषे आपण । तेवीं उद्धवाचेनि अनुभवें जाण । स्वयें श्रीकृष्ण संतोषे ॥९३॥ कृष्ण सुखें सुखरुप नित्यतां । तोही शिष्यानुभवें सर्वथा । लाहे सुखाची परमावस्था । हे गुरुगम्यता अगम्य ॥९४॥ शिष्यासी बोध करितां । गुरुसि नसती सुखावस्था । तरी उपदेशपरंपरता । नव्हती तत्त्वतां इये लोकीं ॥९५॥ गुरु सांगे जैं उबगलेसाठीं । तैं ते शिष्यासी बोधेना गोष्टी । मा निजानुभवाची भेटी । केवीं निजदृष्टीं देखेल ॥९६॥ जेवीं बाळासी लेणें लेववितां । तें नेणें परी सुखावे माता । तेवीं शिष्यासी अनुभव होतां । सुखावे तत्त्वतां सद्गुरुरावो ॥९७॥ तैसा उद्धवाचा ब्रह्मभावो । देखोनि सुखावे कृष्णदेवो । माझा उद्धव जाहला निःसंदेहो । यासी ब्रह्मानुभवो आकळिला ॥९८॥ उद्धवाची ब्रह्मनिष्ठता । अनुभवा आली निजात्मता । हें कळों सरलें श्रीकृष्णनाथा । परोपदेशार्था शिकवीत ॥९९॥ तूं पावल्या ब्रह्मज्ञान । तेथ शिष्योपदेशलक्षण । पात्रशुद्धीचें कारण । तेही वोळखण हरि सांगे ॥५००॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नैतत्त्वया दाम्भिकाय, नास्तिकाय शठाय च । अशुश्रूषोरभक्ताय, दुर्विनीताय दीयताम् ॥३०॥

शठ नास्तिक दंभयुक्त । अशुश्रूषु आणि अभक्त । ज्यांची स्थिति दुर्विनीत । ते शिष्य निश्चित त्यागावे ॥१॥ जेणें लोकरुढी होय गहन । तें तें बाह्य कर्माचरण । विपुल धन आणि सन्मान । तदर्थीं जाण अतितृष्णा ॥२॥ ऐसें ज्याचें दांभिक भजन । त्यासी हें एकादशींचें ज्ञान । वोसणतां गा आपण । स्वप्नींही जाण नेदावें ॥३॥ मोहममतेचें आधिक्य । तेणें निर्दळिलें निज आस्तिक्य । वेदीं शास्त्रीं दृढ नास्तिक्य । देवचि मुख्य नाहीं म्हणती ॥४॥ नास्तिक्यवादाचिया बंडा । या ज्ञानाचा ढोरकोंडा । लागों नेदी त्यांचिया तोंडा । ज्यांचा भाव कोरडा नास्तिक्यें केला ॥५॥ नास्तिक्यवादापुढें । ज्ञान कायसें बापुडें । अनीश्वरवादाचें बंड गाढें । ते त्यागावे रोकडे नास्तिक्यवादी ॥६॥ अनन्यभावें न रिघे शरण । मिथ्या लावूनि गोडपण । धूर्तवादें घेवों पाहे ज्ञान । तेही शठ जाण त्यागावे ॥७॥ शठाची ऐशी निजमती । पुढिलांची ठकूनि घे युक्ती । परी जे आपुली व्युत्पत्ती । ते पुढिलांप्रती सांगेना ॥८॥ काया वाचा मन धन । जो गुरुसीं करी वंचन । जो गुरुचे देखे दोषगुण । तोही शठ पूर्ण त्यागावा ॥९॥ माझें अतिथोर महिमान । गुरुसेवा केवीं करुं आपण । सेवा न करी महिमेभेण । तोही शिष्य जाण त्यागावा ॥५१०॥ आपण श्रेष्ठासनीं बैसोनि बरवा । सेवकाहातीं करवी गुरुसेवा । तो दांभिक शिष्य जाणावा । तोही त्यागावा ये ग्रंथीं ॥११॥ सद्गुरुपाशीं समर्थपण । जो आपली मिरवी जाणीव जाण । जो सेवा न करी गर्वें पूर्ण । तो शिष्य जाण त्यागावा ॥१२॥ मी धनदानी अतिसमर्थ । नीचसेवेसी न लावीं हात । ऐसाही जो गर्वयुक्त । तोही निश्चित त्यागावा ॥१३॥ जो लौकिक लाजेभेण । गुरुसेवा न करी आपण । ज्यासी लौकिकाचा अतिअभिमान । तोही शिष्य जाण त्यागावा ॥१४॥ जो गुरुगृहींचें नीच कृत्य । न करी मानूनि मी समर्थ । तो मान्यताअभिमानयुक्त । जाण निश्चित त्यागावा ॥१५॥ न करी गुरुसेवा नीचवृत्ती । आम्हां अखंड ध्यान हेचि गुरुभक्ती । ऐशी सेवावंचक ज्याची युक्ती । तोही निश्चितीं त्यागावा ॥१६॥ नीच सेवा न करी आपण । म्हणे मागाल तें देईन धन । ऐसा धनवर्गी शिष्य आपण । सर्वथा जाण न करावा ॥१७॥ धरुनि धनाची आस । गुरु शिष्यासी देत उपदेश । तैं ब्रह्मज्ञान पडलें वोस । वाढला असोस धनलोभ ॥१८॥ अथवा वेंचूनिया धन । जो घेईन म्हणे ब्रह्मज्ञान । ऐसा धनाभिमानी शिष्य जाण । सर्वथा आपण न करावा ॥१९॥ यथाकाळें जाहली प्राप्त । गुरुसेवा जे कालोचित । न करी तो ’अशुश्रूषु’ म्हणत । तोही निश्चित त्यागावा ॥५२०॥ करितां सद्गुरुची भक्ती । मी उद्धरेन निश्चितीं’ । ऐसा भाव नसे ज्याचे चित्तीं । तो शिष्य हातीं न धरावा ॥२१॥ सद्गुरु तोचि ब्रह्ममूर्ती । ऐसा भाव नाहीं ज्याच्या चित्तीं । मूळींच विकल्पाची वस्ती । तोही शिष्य हातीं न धरावा ॥२२॥ गुरुहोनि ब्रह्म भिन्न । ऐसें ज्याचें निश्चित ज्ञान । तो निश्चयेंसीं ’अभक्त’ जाण । त्यासी शिष्य आपण न करवें ॥२३॥ मनुष्य मानूनि सद्गुरुसी । जो उल्लंघी गुरुवचनासी । तो जाण पडला अपभ्रंशीं । त्या शिष्यासी त्यागावें ॥२४॥ सद्गुरुहोनि अधिकता । शिष्य आपुली मानी पवित्रता । तो अभक्तांमाजीं पूर्ण सरता । त्यासी तत्त्वतां त्यागावें ॥२५॥ गुरुच्या ठायीं ब्रह्मस्थिती । ज्यासी श्रद्धा संपूर्ण नाहीं चित्तीं । याचि नांव गा ’अभक्ती’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥ कां ये ग्रंथींचें ब्रह्मज्ञान । ज्यासी निश्चयें नमने जाण । त्यासी केव्हांही आपण । झणें विसरोन शिष्य करिसी ॥२७॥ ये ग्रंथींची ब्रह्मस्थिती । वक्ता जो मी परब्रह्ममूर्ती । त्या माझ्या ठायीं नाहीं ज्याची भक्ती । तो शिष्य निश्चितीं त्यागावा ॥२८॥ ये ग्रंथींचें आवडे ज्ञान । गुरुच्या ठायीं श्रद्धा संपूर्ण । परी ज्याचें उद्धत वर्तन । तो शिष्य जाण त्यागावा ॥२९॥ माझ्या निजमूर्ति संत सज्जन । माझे भक्त माझे जीवप्राण । त्यांचें जो करी हेळण । ’दुर्विनीतपण’ या नांव ॥५३०॥ माझ्या भक्तांमाजील रंक जाण । त्याचे सर्वस्वें वंदावे चरण । हें ज्यासी नावडे संपूर्ण । ’दुर्विनीतपण’ या नांव ॥३१॥ साधुसज्जनां भेटों जाये । शठनम्रता वंदी पाये । त्याचे गिवसोनि दोषगुण पाहे । ’दुर्विनीतता’ राहे ते ठायीं ॥३२॥ दुष्टबुद्धीची जे विनीतता । ती नांव बोलिजे ’दुर्विनीतता’ । ऐशी ज्या शिष्याची अवस्था । तो जाण तत्त्वतां त्यागावा ॥३३॥ ऐसें हें ऐकोनि निरुपण । म्हणसी ’मी शिष्य न करीं जाण’ । तरी जो सच्छिष्यासी उपदेशी ब्रह्मज्ञान । तो आत्मा जाण पैं माझा ॥३४॥ जो उपदेशीं सत्पात्र पूर्ण । त्या सच्छिष्याचें लक्षण । तुज मी सांगेन निरुपण । ऐक सावधान उद्धवा ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

एतैर्दोषैर्विहीनाय, ब्रह्मण्याय प्रियाय च । साधवे शुचये ब्रूयाद्भक्तिः स्याच्छूद्रयोषिताम् ॥३१॥

उपदेशीं मुख्य अधिकारपण । धडधडीत वैराग्य पूर्ण । तेंही पिशाचवैराग्य नव्हे जाण । विवेकसंपन्न शास्त्रोक्त ॥३६॥ दिवस चारी वैराग्य केलें । सवेंचि विषयार्थीं लागले । तेथ जें जें उपदेशिलें । तें सर्पासि पाजिलें दुग्ध जैसें ॥३७॥ जेथ वैराग्य निघोनि जाये । तेथ ज्ञानाभिमान उरला राहे । तेणें अभिमानें करी काये । गुणदोष पाहे श्रेष्ठांचे ॥३८॥ नीच निंदी हेळसून । श्रेष्ठांचे पाहे दोषगुण । जेथ वैराग्य होय क्षीण । तेथें ज्ञानाभिमान चढे ऐसा ॥३९॥ उद्धवा जगीं दोनी अवस्था । वैराग्य कां विषयासक्तता । तिसरे अवस्थेची कथा । जाण सर्वथा असेना ॥५४०॥ जेथ विवेकें विषयो होय क्षीण । तेथ वैराग्य प्रबळे परिपूर्ण । जेथ विवेकेंसीं वैराग्य क्षीण । तेथ विषयाचरण ज्ञानाभिमानें ॥४१॥ यालागीं होय जंव ब्रह्मज्ञान । तंव जो वैराग्य राखे पूर्ण । वैराग्यें गुरुसी अनन्यशरण । तें ’अधिकारीरत्नू’ उपदेशा ॥४२॥ गत श्लोकींचें दोषनिरुपण । आतां बोलिलों वैराग्यार्थ जाण । इहीं दोषीं ज्यासी रहितपण । तो ’अधिकारी’ पूर्ण सच्छिष्य ॥४३॥ ज्यासी ब्रह्मत्वें ब्राह्मणभक्ती । अनन्यभावें भजे भूर्ती । त्याची आंदणी भक्ती विरक्ती । तो जाण निश्चितीं ’अधिकारी’ ॥४४॥ गुरुचा पढियंताही पूर्ण । त्यापासीं असल्या अभक्तपण । त्यासी नव्हे ब्रह्मज्ञान । अनन्य भजन जंव न करी ॥४५॥ प्रिय आणि भजनशीळ । दोषरहित निर्मळ । त्यासी विरक्त करुनि अढळ । उपदेशावें प्रांजळ हें गुह्य ज्ञान ॥४६॥ स्वदारा आणि स्वधन । यांचा लोभ ज्यासी संपूर्ण । त्यासी स्वर्ग ना मुक्तपण । जन्ममरण अनिवार ॥४७॥ परदारा परधन । सर्वथा नातळे ज्याचें मन । ऐसें ज्यापाशीं पवित्रपण । त्यासी हें ज्ञान उपदेशावें ॥४८॥ जो वैराग्याचा वोतिला । विवेकें पूर्ण वोसंडला । सद्गुरुसेवेसी जीवें विकला । चरणीं विनटला अनन्यत्वें ॥४९॥ सांडूनि निजमहिमान । श्रीगुरुसेवेलागीं आपण । ज्यासी आवडे रंकपण । ऐसा सेवेसी पूर्ण सद्भाव ॥५५०॥ अमरश्रेष्ठ जे सुरवर । ते मानी सद्गुरुचे किंकर । सद्गुरुहूनियां थोर । हरिहर मानीना ॥५१॥ ज्यासी नाहीं गर्वमद । ज्यासी नाहीं कामक्रोध । ज्यासी नावडे विकल्पभेद । तो शिष्य शुद्ध परमार्थी ॥५२॥ काया वाचा मन धन । सांडूनि समर्थतामहिमान । जो सद्गुरुसी अनन्यशरण । तो सच्छिष्य जाण साधुत्वें ॥५३॥ सांडूनि लज्जा लौकिक । जो ब्रह्मज्ञानाचा याचक । सद्गुरुवचनार्थी चातक । तो आवश्यक उपदेशीं ॥५४॥ जे कां द्विजन्म्यांहूनि बाहेरी । वेदें वाळूनि सांडिले दूरीं । जे कां मंत्रार्थी अमंत्री । जे अनधिकारी श्रवणासी ॥५५॥ ज्यांसी नाहीं आश्रमधर्म । ज्यांसी नाहीं श्रौतकर्म । ज्यांसी नाहीं जप होम । जे वर्णाधम अतिनीच ॥५६॥ ऐसे जे कां शूद्रजन । ऐकोनि ये ग्रंथींचें ज्ञान । निवाराया जन्ममरण । उपजे दारुण विरक्ती ॥५७॥ उखितांच एकसरें चित्तें । मनींहूनि विटे विषयांतें । मग चित्तें वित्तें जीवितें । रिघे सद्गुरुतें अनन्यशरण ॥५८॥ गुरुसी पुसों नेणे प्रश्न । म्हणे निवारीं जन्ममरण । भावार्थें घाली लोटांगण । शुद्ध श्रद्धा संपूर्ण परमार्थीं ॥५९॥ ते होत कां शूद्रजन । त्यांसी उपदेशिता ब्रह्मज्ञान । उद्धवा कदा न लागे दूषण । हें सत्यवचन पैं माझें ॥५६०॥ जे कां अपेक्षोनियां वित्त । चतुर्वर्णा उपदेशित । ते धनलोभें लोलुप एथ । नाहीं घेइजेत गुरुत्वें ॥६१॥ जेथ गुरुशींच सलोभता । तेथ शिष्याची बुडे विरक्तता । ऐशिये ठायीं उपदेश घेतां । परमार्थतां अपघातु ॥६२॥ निर्लोभत्वें कृपेनें पूर्ण । सद्गुरु उपदेशी शुद्रजन । ऐसेनि करी जो दीनोद्धरण । तेथ न लगे दूषण । उपदेशा ॥६३॥ जेणें तडफडूनि जान । वैराग्याशी ये मरण । जेणें ज्ञात्यासी लागे दूशण । तो स्त्रीसंग आपण न करावा ॥६४॥ स्त्री देखतांचि अवचितीं । तत्काल पाडी अधःपातीं । तिची जाहलिया संगती । कैंची धडगती सज्ञाना ॥६५॥ प्रमादीं पाडी सर्वार्थीं । हे ’प्रमदा’ नामाची निजख्याती । तिची जाहलिया नित्य संगती । केवीं परमार्थीं तरतील ॥६६॥ जिचें देखतांचि वदन । काम मोकली कटाक्षबाण । तेथ कायसा उपदेश जाण । आली नागवण परमार्था ॥६७॥ उद्धवा तुज हेंचि मागतों जाण । नको स्त्रियांशीं संभाषण । नको स्त्रियांचें अवलोकन । नको स्त्रीवचन कानीं घेऊं ॥६८॥ नको नको स्त्रियांशीं मात । नको नको स्त्रीयांशीं एकांत । नको नको स्त्रियांशीं संगत । निंद्य लोकांत सर्वार्थीं ॥६९॥ नको नको स्त्रियांचा अनुवाद । नको नको स्त्रियांचा संवाद । नको नको स्त्रियांसी करुं बोध । मिथ्या प्रवाद अंगीं वाजे ॥५७०॥ स्वभावें सात्त्विक वनिता । गोष्टी सांगों आली परमार्था । तोचि विकल्प तत्त्वतां । सुहृदां समस्तां परिकल्पे ॥७१॥ यालागीं प्रमदा जन । सर्वथा त्यागावा आपण । प्रमदासंगतीं ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण वाढेना ॥७२॥आशंका ॥ उपदेशीं त्याज्य स्त्रिया जरी । तरी मागिलीं थोरथोरीं । उपदेशिल्या कैशापरी । तें ऐक निर्धारीं सांगेन ॥७३॥ श्रेष्ठ याज्ञवल्क्य पाहीं । तेणें उपनिषदांच्या ठायीं । उपदेशिली मैत्रेयी । नानायुक्तीं पाहीं प्रबोधूनि ॥७४॥ स्वयें नारद महामुनी । प्रर्हाीदाची निजजननि । इंद्रापासूनी सोडवूनी । ब्रह्मज्ञानीं उपदेशी ॥७५॥ अवतरोनि कपिलमुनी । बैसोनियां सिद्धासनीं । देवहूतीलागोनी । ब्रह्मज्ञानीं प्रबोधी ॥७६॥ जो योगियांचा मुकुटमणी । कैलासपति शूळपाणी । भव उपदेशी भवानी । ब्रह्मज्ञानी निजबोधें ॥७७॥ इतरांची गोठी कायशी । तुवांचि गा हृषीकेशी । उपदेशिलें यज्ञपत्न्यां सी । ऐसें म्हणसी उद्धवा ॥७८॥ असो देखोनियां सद्भावा । उपदेश करुं म्हणशी कणवा । तरी तो अधिकार ओळखावा । ऐक उद्धवा सांगेन ॥७९॥ ऐक उद्धवा निश्चित । वाचाळ स्त्री ते अनुचित । तेथें उपदेश करणें तें व्यर्थ । लागे अपघात गुरुत्वा ॥५८०॥ जेथें स्त्रीस अति बडबड । ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड । जेथें विषयाचा धुमाड । परमार्थ गोड परपुरुषीं ॥८१॥ जे स्त्री ब्रह्मज्ञानीं धीट । मुखीं अत्यंत वटवट । तिसी उपदेश करुं नये स्पष्ट । अपवादाचें बोट जेणें लागे ॥८२॥ तेथें म्यां ही केली विनंति । श्रीजनार्दन स्वामीप्रति । स्त्रिया शूद्र उपदेशार्थ येती । काय निश्चितीं सांगावें ॥८३॥ गुरुवेगळा मार्ग नाहीं । म्हणोनि येती लवलाही । त्यांसी उपदेशावें काई । हें माझ्या हृदयीं स्मरेना ॥८४॥ हें ऐकोनियां वचन । संतोषले श्रीजनार्दन । जेणें होय चित्ताचें शोधन । तें ’नाम’ जाण उपदेशी ॥८५॥ चित्तशुद्धि झालिया जाण । वोरसोनि येतें आपण । अनन्य भावें मग शरण । आल्या ज्ञान उपदेशी ॥८६॥ स्त्रीपुरुष-अवलोकन । जयाचे दृष्टीं समसमान । ऐसेनि अनुभवें जो परिपूर्ण । तोचि स्त्रियांसी जाण उपदेशी ॥८७॥ तोही अधिकार न पाहतां । उपदेश न करीं सर्वथा । त्याही उपदेशाची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥८८॥ म्यां ज्या कां निंदिल्या वनिता । त्यांमाजीं सभाग्या सात्त्विकता । सांडोनियां विषयावस्था । जे परमार्था उद्यत ॥८९॥ त्यजूनियां प्रपंचाची हाव । नावडे विषयाचें नांव । वैराग्यें उठला सद्भाव । घेऊनि धांव परमार्थी ॥५९०॥ अतिथि आणि पतिपुत्रांसी । भोजनीं समता नित्य जिसी । धनलोभ नाहीं मानसीं । परमार्थीं तिसी अधिकारु ॥९१॥ जन्ममरणनिवारणीं । जीवामनाची नित्य काचणी । माझे भवपाशच्छेदनीं । धर्मदाता कोणी मिळता का ॥९२॥ सद्गुरुप्राप्तीची अतिआर्त । काया वाचा वित्त जीवित । कुरवंडी करुनि सांडित । परमार्थार्थ सद्भावें ॥९३॥ यापरी निजपरमार्था । सद्भावें जे विनटे वनिता । उद्धवा तिसी हें उपदेशितां । दोष सर्वथा लागेना ॥९४॥ क्षत्रिय वैश्य स्त्री शूद्रजन । यांची सच्छ्रद्धा दृढ पाहून । उपदेशितां ब्रह्मज्ञान । दोषनिर्दळण शिष्यांचे ॥९५॥ उपदेशितां ब्रह्मज्ञान । जैं गुरुसीच लागे दूषण । तैं शिष्यासी उद्धरी कोण । हें व्याख्यान अबद्ध ॥९६॥ पहावया पात्रशुद्धता । मी बोलिलों दोषवार्ता । वांचूनि ब्रह्मज्ञान उपदेशितां । दोष सर्वथा असेना ॥९७॥ हें ज्ञान जाणितल्यापाठीं । जाणणेंचि सरे सृष्टीं । संसारासी पडे तुटी । तेथ दोषाची गोठी असेना ॥९८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

नैतद्विज्ञाय जिज्ञासोर्ज्ञातव्यमवशिष्यते । पीत्वा पीयूषममृतं, पातव्यं नावशिष्यते ॥३२॥

ये ग्रंथींचें जाणितल्या ज्ञान । मुमुक्षु जे साधक जन । त्यांसी जाणावया आन । जाणतेपण उरेना ॥९९॥ जेवीं केलिया अमृतपान । पुढें प्राशनासी नुरे आन । तेवीं जाणितल्या हें ज्ञान । ज्ञातव्य ज्ञातेपण समूळ नुरे ॥६००॥ आशंका ॥ धर्मार्थकाममोक्षांप्रती । साधने असतीं नेणों किती । तुवां हें एकचि श्रीपती । कैशा रीतीं प्रतिपादिलें ॥१॥ उद्धवा साधनें जीं आनान । ते अभक्त सोशिती आपण । माझ्या भक्तांसी गा जाण । मीच साधन सर्वार्थी ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

ज्ञाने कर्मणि योगे च, वार्तायां दण्डधारणे । यावानर्थो नृणां तात, तावांस्तेऽहं चतुर्विधः ॥३३॥

मोक्षालागीं ’ज्ञान’ साधन । धर्मालागीं ’स्वधर्मचरण’ । स्वामित्वालागीं ’दंडधारण’ । ’अर्थोद्यम’ जाण जीविकावृत्तीं ॥३॥ इहामुत्र कामभोग । तदर्थ करिती ’योगयाग’ । चहूं पुरुषार्थीं हा चांग । साधनप्रयोग अभक्तां ॥४॥ ऐसें सोशितां साधन । सहसा सिद्धी न पवे जाण । अनेक विकळता दूषण । माजीं छळी विघ्न देवांचें ॥५॥ तैसें मद्भक्तांसी नव्हे जाण । माझें करितां अनन्यभजन । चारी पुरुषार्थ येती शरण । पायां सुरगण लागती ॥६॥ उद्धवा जे मज अनन्यशरण । त्यांचा धर्म अर्थ मीचि पूर्ण । त्यांचा काम तोही मीचि जाण । मोक्षही संपूर्ण मी त्यांचा ॥७॥ अभक्तां भोगक्षयें पुनरावृत्ती । भक्तांसी भोग भोगितां नित्यमुक्ती । एवढी माझ्या भक्तीची ख्याती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८॥ ऐशी ऐकतां देवाची मात । उद्धव प्रेमें वोसंडला अद्भुत । तेणें प्रेमें लोधला कृष्णनाथ। हर्षें बोलत तेणेंसी ॥९॥ उद्धवा तुझे चारी पुरुषार्थ । तो मी प्रत्यक्ष भगवंत । ऐसें बोलोनि हर्षयुक्त । हृदयाआंत आलिंगी ॥६१०॥ हर्षें देतां आलिंगन । कृष्ण विसरला कृष्णपण । उद्धव स्वानंदीं निमग्न । उद्धवपण विसरला ॥११॥ कैसें अभिनव आलिंगन । दोघांचें गेलें दोनीपण । पूर्ण चैतन्य स्वानंदघन । परिपूर्ण स्वयें झाले ॥१२॥ तेथ विरोनि गेला हेतु । वेदेंसहित बुडाली मातु । एकवटला देवीं भक्तु । एकीं एकांतु एकत्वें ॥१३॥ तेथ मावळले धर्माधर्म । क्रियेसहित उडालें कर्म । भ्रम आणि निर्भ्रम । या दोंहीचें नाम असेना ॥१४॥ भेद घेऊनि गेला अभेदा । बोध घेऊनि गेला निजबोधा । आनंद लाजला आनंदा । ऐशिया निजपदा उद्धव पावे ॥१५॥ मी जाहलों परब्रह्म । हाही मुख्यत्वें जेथ भ्रम । कृष्णालिंगनाचा हा धर्म । जाहला निरुपम निजवस्तु ॥१६॥ यावरी कृष्ण सर्वज्ञ । सोडोनियां आलिंगन । ऐक्यबोधें उद्धवासी जाण । निजभक्तपण प्रबोधी ॥१७॥ तेव्हां उद्धव चमत्कारला । अतिशयें चाकाटला । परम विस्मयें दाटला। तटस्थ ठेला ते काळीं ॥१८॥ मग म्हणे हे निजात्मता । स्वतःसिद्ध जवळी असतां । जनासी न कळे सर्वथा । साधकांच्या हाता चढे केवीं ॥१९॥ तें उद्धवाचें मनोगत । जाणोनियां श्रीकृष्णनाथ । तदर्थींचा सुनिश्चित । असे सांगत उपाय ॥६२०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

मर्त्यो यदा त्यक्तसमस्तकर्मा, निवेदितात्मा विचिकीर्षितो मे । तदाऽमृतत्वं प्रतिपद्यमानो, मयाऽऽत्मभूयाय च कल्पते वै ॥३४॥

जें बोलिलीं धर्मार्थकाममोक्षार्थ । तें साधनें सांडूनि समस्त । जे अनन्यभावें मज भजत । विश्वासयुक्त निजभावें ॥२१॥ त्यांसी हे स्वरुपस्थिती । जे त्वां भोगिली आत्मप्रतीती । ते तत्काळ होय प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२२॥ धर्मार्थकामवासना । असोनि लागल्या मद्भजना । तरी तेही पुरवूनियां जाणा । सायुज्यसदना मी आणीं ॥२३॥ भक्तांसी स्वधर्मकर्मावस्था । तेही लाविल्या भजनपंथा । स्वधर्मकर्मीं अकर्मात्मता । माझिया निजभक्तां उद्बोधीं मी ॥२४॥ भक्त वांछी भोगकाम । भोग भोगोनि होय निष्काम । ऐशिया निजबोधाचें वर्म । मी आत्माराम उद्बोधीं ॥२५॥ भक्त मागे अर्थसंपन्नता । त्याचे गांठीं धन नसतां । माझी षड्‌गुणैश्वर्यसमर्थता । वोळंगे तत्त्वतां त्यापाशीं ॥२६॥ सर्व भूतीं माझी भक्ती । भक्त भजे अनन्यप्रीतीं । तैं चारी मुक्ती शरण येती । मद्भक्तां मुक्ती स्वतःसिद्ध ॥२७॥ वैद्य धडफुडा पंचानन । नाना रोगियांची वासना पोखून । मागे तें तें देऊनि अन्न । वांचवी रसज्ञ रसप्रयोगें ॥२८॥ तेवीं धर्म अर्थ काम वासना । भक्तांच्या पोखूनियां जाणा । मी आणीं सायुज्यसदना । तेही विवंचना सांगितली ॥२९॥ नाना साधनाभिमान । सांडूनियां जो ये मज शरण । त्यासीही स्वरुपप्राप्ति पूर्ण । उद्धवा जाण सुनिश्चित ॥६३०॥ भक्त सकाम जरी चित्तीं । तो जैं करी अनन्यभक्ती । तैं काम पुरवूनि मी दें मुक्ती । भक्तां अधोगति कदा न घडे ॥३१॥ बाळकें थाया घेऊनि कांहीं । मिठी घातल्या मातेच्या पायीं । धन वेंचोनि अर्पी तेंही । परी जीवें कांहीं मारीना ॥३२॥ तेवीं माझी करितां अनन्यभक्ती । जो जो काम भक्त वांछी चित्तीं । तो तो पुरवूनि मी दें मुक्ती । परी अधोगती जावों नेदीं ॥३३॥ देखोनि बाळकाची व्यथा । जेवीं सर्वस्वें कळवळी माता । तेवीं निजभक्तांची अवस्था । मजही सर्वथा सहावेना ॥३४॥ काम पुरवूनि द्यावया मुक्ती । काय माझे गांठीं नाहीं शक्ती । मी भक्तकैवारी श्रीपती । त्यासी अधोगती कदा न घडे ॥३५॥ माझें नाम अवचटें आल्या अंतीं । रंक लाहे सायुज्यमुक्ती । मा माझी करितां अनन्यभक्ती । भक्तां अवगती मग कैंची ॥३६॥ माझा भक्त जयाकडे कृपें पाहे । तोही माझी भक्ति लाहे । मा मद्भक्ता अवगती होये । हा बोल न साहे मजलागीं ॥३७॥ सोसूनियां गर्भवासासी । म्यां मुक्त केला अंबर्षी । विदारुनि हिरण्यकशिपूसी । प्रल्हादासी रक्षिलें ॥३८॥ चक्र घेऊनियां हातीं । म्यां गर्भी रक्षिला परीक्षिती । तो मी भक्तांसी अधोगती । कदा कल्पांतीं होऊं नेदीं ॥३९॥ माझिये भक्ताचेनि नांवें । तृण तेंही म्यां उद्धरावें । भक्तां केवीं अवगती पावे । जे जीवेंभावें मज भजले ॥६४०॥ काया वाचा मन धन । अवंचूनि, अनन्यशरण । त्यांचा योगक्षेम जाण । मी श्रीकृष्ण स्वयें सोशीं ॥४१॥ ऐसा अनन्यभक्तीचा महिमा । सांगतां उत्साह पुरुषोत्तमा । तेणें उद्धवासी लोटला प्रेमा । स्वेद रोमां रवरवित ॥४२॥ ऐकोनि भक्तीचें महिमान । देखोनि उद्धवाचें प्रेम पूर्ण । श्रीशुक सुखावला आपण । स्वानंदपूर्ण डोलत ॥४३॥ हरिखें म्हणे परीक्षिती । धन्य हरिभक्त त्रिजगतीं । ज्यांसी सर्वार्थीं मुक्ती । स्वमुखें श्रीपती बोलिला ॥४४॥ जैसें भक्तीचें महिमान । तैसेंचि उद्धवाचें प्रेम गहन । हें उद्धवाचें प्रेमलक्षण । श्रीशुक आपण सांगत ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ व ३६ वा श्रीशुक उवाच - स एवमादर्शितयोगमार्गस्तदोत्तमश्लोकवचो निशम्य । बद्धाञ्जलिः प्रीत्युषरुद्धकण्ठो न किञ्चिदूचेऽश्रुपरिप्लुताक्षः ॥३५॥

विष्टभ्य चित्तं प्रणयावघूर्णं, धैर्येण राजन् बहुमन्यमानः । कृताञ्जलिः प्राह यदुप्रवीरं, शीर्ष्णा स्पृशंस्तच्चरणारविन्दम् ॥३६॥

जो ज्ञानियांचा ज्ञाननिधी । जो निजबोधाचा उदधी । जो आनंदाचा क्षीराब्धी । तो श्रीशुक स्वानंदीं तोषला बोले ॥४६॥ ऐक बापा परीक्षिती । श्रवनसौभाग्यचक्रवर्ती । ज्यातें सुर नर असुर वानिती । ज्याची कीजे स्तुती महासिद्धीं ॥४७॥ ज्यातें वेद नित्य गाती । योगिवृंदीं वानिजे कीर्ती । तेणें श्रीकृष्णें स्तविली भक्ती । परम प्रीतीं अचुंबित ॥४८॥ अनन्यभक्तिपरतें सुख । आन नाहींच विशेख । सर्व सारांचें सार देख । मद्भक्ति चोख सुरवरादिकां ॥४९॥ भक्तियोगाचा योगमार्ग । समूळ सप्रेम शुद्ध साङग । स्वमुखें बोलिला श्रीरंग । तें उद्धवें चांग अवधारिलें ॥६५०॥ ऐकतां भक्तीचें निरुपण । उद्धवाचें द्रवलें मन । नयनीं अश्रु आले पूर्ण । स्वानंदजीवन लोटलें ॥५१॥ शरीर जाहलें रोमांचित । चित्त जाहलें हर्षयुक्त । तेणें कंठीं बाष्प दाटत । स्वेदकण येत सर्वांगीं ॥५२॥ प्राण पांगुळला जेथींचा तेथ । शरीर मंदमंद कांपत । नयन पुंजाळले निश्चित । अर्धोन्मीलित ते जाहले ॥५३॥ औत्सुक्याचे अतिप्रीतीं । स्वानंदीं समरसे चित्तवृत्ती । उद्धवदेहाची विरतां स्थिती । प्रारब्धें निश्चितीं तें राखिलें ॥५४॥ जळीं नांव उलथतां पूर्ण । जेवीं दोर राखे आवरुन । तेवी मावळतां उद्धवपण । प्रारब्धें जाण राखिलें ॥५५॥ धैर्याचेनि अतिसामर्थ्यें । आवरुनि प्रेमाचें भरितें । मी कृतकृत्य जाहलों एथें । हेंही निश्चितें मानिलें ॥५६॥ श्रीकृष्णें उद्धरिलें मातें । ऐशिया मानूनि उपकारातें । काय उतरायी होऊं मी यातें । ऐसे निजचित्तें विचारी ॥५७॥ गुरुसी चिंतामणि देवों आतां । तो चिंता वाढवी चिंतिलें देतां । गुरुंनीं दिधलें अचिंत्यार्था । तेणें उत्तीर्णता कदा न घडे ॥५८॥ गुरुसी कल्पतरु देवों जातां । तो कल्पना वाढवी कल्पिलें देतां । गुरुनें दिधली निर्विकल्पता । त्यासी उत्तीर्णता तेणें नव्हिजे ॥५९॥ गुरुसी देवों स्पर्शमणी । तो स्पर्शें धातु करी सुवर्णी । ब्रह्मत्व गुरुचरणस्पर्शनीं । त्यासी नव्हे उत्तीर्णी परीसही देतां ॥६६०॥ गुरुसी कामधेनु देऊं आणोनी । ते कामना वाढवी अर्थ देऊनी । गुरु निष्काम निर्गुणदानी । त्याचे उत्तीर्णी कामधेनु नव्हे ॥६१॥ त्रिभुवनींची संपत्ति चोख । गुरुसी देतां ते मायिक । जेणें दिधली वस्तु अमायिक । त्यासी कैसेनि लोक उतरायी होती ॥६२॥ देहें उतरायी होऊं गुरुसी । तंव नश्वरपण या देहासी । नश्वरें अनश्वरासी । उत्तीर्णत्वासी कदा न घडे ॥६३॥ जेणें अव्हाशंख दीधला आवडीं । त्यासी देऊनि फुटकी कवडी । उत्तीर्णत्वाची वाढवी गोडी । तैशी परवडी देहभावा ॥६४॥ जीवें उतरायी होऊं गुरुसी । तंव जीवत्वचि मिथ्या त्यासी । जेणें दिधलें सत्य वस्तूसी । मिथ्या देतां त्यासी लाजचि कीं ॥६५॥ जेणें दिधलें अनर्घ्य रत्नाूसी । वंध्यापुत्र देवों केला त्यासी । तेवीं मिथ्यत्व जीवभावासी । उत्तीर्णत्वासी कदा न घडे ॥६६॥ काया वाचा मन धन । गुरुसी अर्पितां जीवप्राण । तरी कदा नव्हिजे उत्तीर्ण । हें उद्धवें संपूर्ण जाणितलें ॥६७॥ जेथें अणुमात्र नाहीं दुःख । ऐसें दिधलें निजसुख। त्या गुरुसी उतरायी देख । न होवें निःशेख शिष्यांसी ॥६८॥ यालागीं मौनेंचि जाण । उद्धवें घातलें लोटांगण । श्रीकृष्णाचे श्रीचरण । मस्तकीं संपूर्ण वंदिले ॥६९॥ मागां श्रीकृष्णें पुशिलें पहा हो । उद्धवा तुझा गेला कीं शोकमोहो । तेणें उद्धवासी जाहला विस्मयो । उत्तर द्यावया ठावो न घडेचि ॥६७०॥ आतां वंदोनि श्रीचरण । कृतांजली धरोनि जाण । उत्तर द्यावया आपण । श्रीकृष्णवदन अवलोकी ॥७१॥ जेवीं सेवितां चंद्रकर । चकोर तृप्तीचे दे ढेंकर । तेवीं उद्धव कृष्णसुखें अतिनिर्भर । काय प्रत्युत्तर बोलत ॥७२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा उद्धव उवाच - विद्रावितो मोहमहान्धकारो, य आश्रितो मे तव संनिधानात् । विभावसोः किन्नु समीपगस्य, शीतं तमो भीः प्रभवन्त्यजाद्य ॥३७॥

जो सकळदेवचूडामणी । जो यादवांमाजीं अग्रगणी । जो अविद्यारात्रीचा तरणी । जो शिरोमणी ब्रह्मवेत्त्यां ॥७३॥ ऐशिया श्रीकृष्णाप्रती । स्वानंदाचिये निजस्फूर्ती । उद्धवें सांगतां निजस्थिती । त्यामाजीं करी स्तुती आद्यत्वें हरीची ॥७४॥ मज तंव विचारितां । ब्रह्मा सर्वांचा आदिकर्ता । तोही नारायणनाभीं तत्त्वतां । होय जन्मता ’अज’ नामें ॥७५॥ तो तूं कमळनाभि नारायण । मायासंवलित ब्रह्म जाण । ते मायेचें तूं आद्यकारण । आद्यत्व पूर्ण तुज साजे ॥७६॥ अविद्येच्या महारात्रीं । अडकलों होतों मोहअंधारीं । तेथूनि काढावया बाहेरीं । आणिकांची थोरी चालेना ॥७७॥ तेथ तुझेनि वचनभास्करें । नासोनि शोकमोह अंधारें । मज काढिलें जी बाहेरें । चमत्कारें संनिधीं तुझ्या ॥७८॥ तुझिये संनिधीपाशीं । ठाव नाहीं अविद्येसी । तेथ मोहममता कैसी ग्रासी । हृषीकेशी तुज असतां ॥७९॥ अंधारी राती अतिगहन । तेथ शीतें पीडिला जो संपूर्ण । त्यासी आतुडलिया हुताशन । शीत तम जाण तत्काळ पळे ॥६८०॥ तो अग्नि सेवितां स्वयें सदा । शीततमांची भयबाधा । पुढती बाधों न शके कदा । तेवीं गोविंदा संनिधीं तुझ्या ॥८१॥ तेवीं शोकमोहममतेशीं । माया जन बांधे भवपाशीं । ते तुझिये संनिधीपाशीं । जाती आपैसीं हारपोनी ॥८२॥ मरणजन्मां अपाये । मागां अनेक सोशिले स्वयें । ज्यासी तुझी संनिधि होये । त्यासी तें भवभये समूळ मिथ्या ॥८३॥ तुझे संनिधीपाशीं जाण । समूळ मायेचें निर्दळण । तेचि अर्थीचें निरुपण । उद्धव आपण सांगत ॥८४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

प्रत्यर्पितो मे भवताऽनुकम्पिना, भृत्याय विज्ञानमयः प्रदीपः । हित्वा कृतज्ञस्तव पादमूलं, कोऽन्यत्समीयाच्छरणं त्वदीयम् ॥३८॥

तुझी संनिधिमात्र देख । समूळ अज्ञानासी घातक । हेंचि मुख्यत्वें आवश्यक । भक्त सात्त्विक जाणती ॥८५॥ असो इतरांची गोष्टी । म्यांही अनुभविलें निजदृष्टीं । अविद्या निरसावया सृष्टीं । सत्संगती लाठी सर्वार्थीं ॥८६॥ सत्संगाहीमाजीं जाण । तुझी संगती अतिपावन । तुवां उद्धरावया दीनजन । हें निजात्मज्ञान प्रकाशिलें ॥८७॥ माझें निमित्त करुनि जाण । उद्धरावया दीन जन । त्यांचें निरसावया अज्ञान घन । ज्ञानदीप पूर्ण प्रज्वाळिला ॥८८॥ उपदेशार्थ श्रद्धास्थिती । हेचि टवळें पैं निश्चितीं । तेथें बोधिका ज्या निजात्मयुक्ती । तेंचि टवळ्यांप्रती स्नेह पूर्ण ॥८९॥ विवेकवैराग्यधारण । हेंचि तेथील वाती जाण । तेथ प्रज्वळिला ज्ञानघन । चित्प्रभापूर्ण महादीप ॥६९०॥ नैराश्य तेंचि वैराग्यधारण । तेथें प्रज्वळे ज्ञानदीप पूर्ण । आशा तेंचि माल्हवण । गडद संपूर्ण पडे तेथें ॥९१॥ तो दीप कर्णद्वारीं ठेविला । तंव सबाह्य प्रकाश जाहला । अज्ञान अंधार निर्दाळिला । स्वयें प्रबळला सद्रूपें ॥९२॥ तेणें सबाह्यसत्प्रकाशें । तुझी पदवी प्रकट दिसे । ऐसें निजरुप हृषीकेशें । अनायासें मज अर्पिंलें ॥९३॥ तुवां अंतर्यामित्वें आपुलें । स्वरुप पूर्वींच मम अर्पिलें । तें तुवांच माझारीं आच्छादिलें । भजन आपुलें प्रकटावया ॥९४॥ तुझ्या निजभजनाचें लक्षण । सर्वभूतीं भगवद्भजन । तेणें तूं साचार संतोषोन । अर्पिलेंचि ज्ञान अर्पिसी पुढती ॥९५॥ वाढवूनि निजभजन । माझें मज अर्पिसी ज्ञान । या नांव ’प्रत्यर्पण’ । साधु सज्ञान बोलती ॥९६॥ वाढवूनि आपुली भक्ती । माझें ज्ञान दिधलें माझे हातीं । दिधलें तेथ माया पुढती । विकल्पवृत्ती स्पर्शेना ॥९७॥ जे दिधली स्वरुपस्थिती । ते आच्छादेना कदा कल्पांतीं । यापरी गा श्रीपती । कृपा निश्चितीं तुवां केली ॥९८॥ यापरी तूं अतिकृपाळू । निजदासांलागीं दयाळू । त्या तुज सांडूनियां बरळू । आनासी गोवळू भजों धांवे ॥९९॥ त्यजूनि स्वामी हृषीकेशु । आना भजेल तो केवळ पशु । पशूंहीमाजीं तो रासभेशु । ज्यासी नाहीं विश्वासु हरिभजनीं ॥७००॥ तुवां जनासी केला उपकारु । इंद्रियां पाटव्य ज्ञानाधिकारु । तो उपकार विसरे जो नरु । तो जाण साचारु कृतघ्न ॥१॥ जे जाणती तुझ्या उपकारातें । ते काया वाचा चित्तें वित्तें । कदा न भजती आनातें । मज निश्चितें मानिलें ॥२॥ मज निमित्त करुनियां जाण । जें त्वां प्रकाशिलें निजात्मज्ञान । तेणें जगाचें उद्धरण । श्रवण मनन कीर्तनें ॥३॥ यापरी तूं कृपाळु पूर्ण । माझें छेदिलें भवबंधन । तेचि अर्थींचें निरुपण । उद्धव आपण स्वयें सांगे ॥४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

वृक्णश्च मे सुदृढः स्नेहपाशो, दाशार्हवृष्ण्यन्धकसात्वतेषु । प्रसारितः सृष्टिविवृद्धये त्वया, स्वमायया ह्यात्मसुबोधहेतिना ॥३९॥

तुवां मायेनें सृजिले जन । ते सृष्टि व्हावया वर्धमान । स्त्री पुत्र सुहृद सज्जन । हा स्नेह संपूर्ण वाढविला ॥५॥ मी जन्मलों यादवकुळांत । तेथ वृष्णि-अंधक-सात्वत । इत्यादि सुहृद समस्त । अतिस्नेहयुक्त आप्तत्वें ॥६॥ तें सुहृदस्त्रीपुत्रस्नेहबंधन । त्या स्नेहपाशाचें छेदन । माझे बाळपणीं त्वां केलें जाण । जें खेळतां तुझें ध्यान मज लागलें ॥७॥ जेवीं वोडंबरी खेळतां खेळ । मोहिनी विद्या प्रेरी प्रबळ । ते विद्येचें आवरावया बळ । शक्त केवळ खेळ खेळविता ॥८॥ तेवीं तुझी स्वमाया जाण । जे कां सदा तुज अधीन । तिचे स्नेहपाश दारुण । तेणें बांधोनि जन अतिबद्ध केले ॥९॥ ते माझे स्नेहपाश जाण । त्वां पूर्वींच छेदिले आपण । जैं मज होतें बाळपण । तैंचि कृपा पूर्ण मज केली ॥७१०॥ तें भवबंध छेदितें जें शस्त्र । तुवां निजयुक्तीं फोडोनि धार । सतेज करुनियां खडतर । मजलागीं स्वतंत्र अर्पिलें ॥११॥ येणें शस्त्रबळें मी जाण । छेदूं शकें जगाचें बंधन । एवढी मजवरी कृपा पूर्ण । केली आपण दयालुत्वें ॥१२॥ संसार दुःखरुप जो का एथें । तोचि सुखरुप जाहला मातें । ऐशिये कृपेचेनि हातें । मज निश्चितें उद्धरिलें ॥१३॥ मी कृतकृत्य जाहलों एथें । परी कांहींएक मागेन तूतें । ते कृपा करावी श्रीकृष्णनाथें । म्हणोनि चरणातें लागला ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

नमोऽस्तु ते महायोगिन्, प्रपन्नमनुशाधि माम् । यथा त्वच्चरनाम्भोजे, रतिः स्यादनपायिनी ॥४०॥

न घडतें घडविसी आपण । नाथिलें दाविसी विंदान । जित्या मेल्या लावूनि लग्न । नांदविसी संपूर्ण निजमाया ॥१५॥ जे योगियांसी अतिदुस्तर । जिणें नाडिले स्त्रष्टा शंकर । ते माया तुझी किंकर । तूं परात्पर महायोगी ॥१६॥ त्या तुझ्या कृपेस्तव जाण । मी कृतकृत्य जाहलों आपण । न देखें भवभयादि दुःखभान । स्वानंदीं निमग्न सर्वदा ॥१७॥ दृश्य द्रष्टा दर्शन । नाहीं त्रिपुटी ना त्रिगुण । हारपलें मीतूंपण । स्वानंदपूर्ण निजबोधें ॥१८॥ निजबोधें स्वानंदपूर्ण । हेही बोल मायिक जाण । परादिवाचां पडिलें शून्य । यालागीं मौन वेदवादा ॥१९॥ कार्य कारन कर्तव्यता । मज उरली नाहीं सर्वथा । तरी कांहींएक श्रीकृष्णनाथा । तुज मी आतां मागेन ॥७२०॥ जेवीं कां बाळकाचा थाया । कळवळोनि पुरवी माया । तेवीं माझिया वचना यया । श्रीकृष्णराया अवधारीं ॥२१॥ हें अंतींचें माझें मागतेपण । देवें अवधारावें सावधान । वंदूनियां श्रीकृष्णचरण । अगम्य विंदान मागत ॥२२॥ मज थोर भ्रम होता चित्तीं । गोड असेल जीवन्मुक्ती । तेथ न देखें तुझी भक्ती । कोरडी मुक्ती मज न लगे ॥२३॥ सद्गुरुक्रुपावचनोक्तीं । शिष्य तत्काळ लाहे मुक्ती । ज्यांत सद्गुरुची नाहीं भक्ती । जळो ती मुक्ती मज न लगे ॥२४॥ यालागीं तुज शरण । मागुतेन मी आलों जाण । सायुज्याहीवरी पूर्ण । तुझें गुरुभजन मज देईं ॥२५॥ मागां बहुतीं केली भक्ती । म्हणसी त्यांसी म्यां दिधली मुक्ती । परी मुक्तीवरती भक्ती । नाहीं मजप्रती मागितली ॥२६॥ मागां जिंहीं जिंहीं केली भक्ती । त्यासीं त्वां ठकिलें देऊनि मुक्ती । तें ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रती सर्वथा ॥२७॥ ज्यांची अहंकारशून्य वृत्ती । जाहले आत्माराम सहजगतीं । तेही अहेतुक भक्ती करिती । ऐशी स्वरुपस्थिती पैं तुझी ॥२८॥ (संमतश्लोक) - आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रन्था अप्युरुक्रमे । कुर्वन्त्यहैतुकीं भक्तिमित्थम्भूतगुणो हरिः ॥ तेथ त्यजोनियां तुझी गुरुभक्ती । मुक्ती मागणें हेचि भ्रान्ती । असो तुझी न लगे मुक्ती । माझी गुरुभक्ती मज देईं ॥२९॥ ज्यासी आकळली निजमुक्तता । म्हणसी त्यासी भक्ती नेदवे आतां । हे मजसी बोलों नको कथा । तुझी समर्थता मी जाणें ॥७३०॥ तूं न घडे तें घडविसी । न चळे तें चाळविसी । नव्हे तें तूं होय करिसी । नाहीं सामर्थ्याची मर्यादा ॥३१॥ अगम्य सामर्थ्याची गणना । बुडत्या तारुनि पाषाणां । त्यावरी तारिसी वानरसेना । सेतुबंधना श्रीरामा ॥३२॥ केवळ जे कां वनचर । पालेखाईर वानर । चारी मुक्ती त्यांच्या किंकर । त्यांसी सुरवर वंदिती स्वयें ॥३३॥ केवळ ज्या कां व्यभिचारिणी । शेखीं ज्या घुरटा गौळणी । मोक्ष लागे त्यांच्या चरणीं । ये ब्रह्मा लोटांगणीं चरणरजासी ॥३४॥ तूं परमात्मा परमेश्वर । हें नेणती गौळणी वानर । तरी तुझें त्यांसी भजनमात्र । फळलें साचार परब्रह्मत्वें ॥३५॥ ऐसें अगाध तुझें भजन । अगम्य भजनाचें महिमान । भक्तीअधीन तुझें देवपण । मा मोक्षासी कोण अधिकाई ॥३६॥ भक्तीच्या पोटीं जन्मली मुक्ती । वाढली मुक्ती भक्तीतें घाती । ऐसी जे कां मुक्ती मातृहंती । तिसी मी सर्वार्थीं नातळें ॥३७॥ फिटे मुक्तीचें दूषण । जेणें ते होय अतिपावन । तें मीं सांगेन विंदान । ऐक सावधान श्रीकृष्णा ॥३८॥ जोडल्याही मुक्तपण । मज द्यावें तुजें गुरुभजन । तेणें मुक्तीही होय पावन । म्हणोनि लोटांगण घातलें ॥३९॥ मस्तकीं धरिले श्रीचरण । उद्धव सर्वथा न सोडी जाण । तेणें टकच जाहला श्रीकृष्ण । त्यासी संपूर्ण तुष्टला ॥७४०॥ जाणोनि आपलें मुक्तपण । मी न सांडी तुझें निजभजन । ऐशी कृपा करीं पूर्ण । म्हणोनि श्रीचरण न सोडी ॥४१॥ मुक्तता मानल्या संपूर्ण । तैं राहों शके सद्गुरुभजन । हेंही बाधों न शके विघ्न । तैशी भक्ति निर्विघ्न मज सांग ॥४२॥ कोटिजन्में शिणतां जाण । म्हणसी नातुडे मुक्तपण । त्या मोक्षा नांव ठेविसी ’विघ्न’ । मूर्ख संपूर्ण मज म्हणसी ॥४३॥ जेणें सुटे तुझें सद्गुरुभजन । तें मी मानीं परम विघ्न । तुझे भक्तिवीण मुक्तपण । अलवणी मज जाण गोविंदा ॥४४॥ माझी न मोडे नित्यमुक्तता । अहेतुक चालवीं भक्तिपंथा । ऐसी कृपा करीं श्रीकृष्णनाथा । झणीं संकोचता मानिसी ॥४५॥ म्हणसी म्यां दिधली नित्यमुक्ती । ते माझी मजपाशीं सिद्ध होती । ’दिधली’ म्हणणें हे मिथ्या वदंती । वाऊगी ख्याती दातृत्वाची ॥४६॥ माझी स्वतःसिद्ध नित्यमुक्तता । त्यावरी भक्ति मी मागें आतां । ते देशील तरी तूं साचार दाता । उदारता या नांव ॥४७॥ ते संतोषोनि भक्ति देतां । उल्हास न देखों तुझ्या चित्ता । थोर मांडली कृपणता । कृष्णनाथा मजलागीं ॥४८॥ जे सांडवी सद्गुरुभक्ती । आम्हां न लगे तुझिया जीवन्मुक्ती । मुक्ति म्हणणें हेही भ्रांती । ऐक श्रीपती सांगेन ॥४९॥ मुळीं मुख्यत्वें नाहीं बद्धता । तेथ कैंची काढिली मुक्तता । मिथ्या मुक्ति मी नातळे सर्वथा । माझी गुरुभक्तिता मज देईं ॥७५०॥ मागें ज्यांसी त्वां दिधली मुक्ति । ते ठकिले ठकिले याच रीतीं । तैसें चाळवूं नको श्रीपती । मोक्षावरील भक्ती मज देईं ॥५१॥ म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले दोनी चरण । प्रेमें वोसंडला श्रीकृष्ण । उद्धवासी संपूर्ण तुष्टला ॥५२॥ मोक्षाहीवरील गुरुभक्ती । उद्धवें मागितली नाना युक्तीं । जे जे चालली उपपत्ती । तेणें सुखें श्रीपती सुखावला ॥५३॥ सुखें सुखावली श्रीकृष्णमूर्ती । डोलों लागला स्वानंदस्थितीं । तेणें संतोषें भक्तिमुक्ती । उद्धवाहातीं अर्पिली ॥५४॥ जगीं उद्धवाचें शुद्ध पुण्य । जगीं उद्धवचि धन्य धन्य । ज्यालागीं सर्वस्वें श्रीकृष्ण । मोक्षावरील गुरुभजन स्वानंदें देत ॥५५॥ गुरु ब्रह्म दोनी अभिन्न । हेंही सद्गुरु प्रबोधी पूर्ण । यालागीं मोक्षावरील गुरुभजन । नव्हे दूषण सच्छिष्या ॥५६॥ मागिलां निजभक्ताप्रती । स्वानंदें तुष्टला श्रीपती । तिहीं मागितली निजमुक्ती । त्यांसी हे स्थिती अतर्क्य ॥५७॥ उद्धवें थोर केली ख्याती । मुक्तीचे माथां वाइली भक्ती । अगम्य मागितली स्थिती । तेही श्रीपती अर्पित ॥५८॥ उद्धवा मुक्तीवरील जे भक्ती । ते मज अवतारांची अवतारशक्ती । येणें उत्पत्ति-स्थिति-प्रलय अंतीं । करुनि श्रीपती मी अलिप्त ॥५९॥ येणेंचि बळें मी तत्त्वतां । कर्में करुनि अकर्ता । भोग भोगोनि अभोक्ता । जाण सर्वथा येणेंचि योगें ॥७६०॥ हा योग न कळे ज्यासी । दुःखरुप संसार त्यासी । हा अखंड योग मजपाशीं । मीं संसारेंसीं सुखरुप ॥६१॥ हा योग सदाशिव जाणे । का म्यां जाणिजे नारायणें । इतरांचें जें जाणणें । तें अगम्यपणें रिघेना ॥६२॥ ऐसी श्रीकृष्ण सांगे गुह्य गोष्टी । ते स्थिति बाणली उद्धवाचे पोटीं । दोघां निजबोधें एकगांठी । भजनकसवटी कळों सरली ॥६३॥ मुक्तीसी भक्तीची हातवटी । ते उद्धवासी कळली गोष्टी । तो उल्हास न माये पोटीं । स्वानंदपुष्टीं कोंदला ॥६४॥ जेवीं बाळकाच्या थायाकारणें । माता लेववी निजभूषणें । तेवीं उद्धवालागीं श्रीकृष्णें । अवतारस्थिति देणें निश्चित ॥६५॥ मनाचें नाइकती कान । बुद्धीचें न देखती नयन । शेखीं गगनातेंही चोरुन । उद्धवासी श्रीकृष्ण निजस्थिति अर्पी ॥६६॥ जे ब्रह्मवेत्त्यांसी नकळे । जे वेदानुवादा नाकळे । ते स्थिति उद्धवासी गोपाळें । कृपाबळें अर्पिली ॥६७॥ पूर्वी श्रीकृष्णें पुसतां पहा हो । ’उद्धरलों’ म्हणे उद्धवो । आतां मागें भजनभावो । हा गूढाभिप्रावो हरि जाणे ॥६८॥ मुक्तीवरील मागतां भक्ती । श्रीकृष्णाची अवतारशक्ती । मायानियंतृत्वाची पूर्ण स्थिति । उद्धवाचे हातीं स्वयें आली ॥६९॥ जाणोनि मायेचें मिथ्यात्वपूर्ण । तिचें प्रेरण आणि आवरण । हें मायानियंतृत्वलक्षण । उद्धवासी श्रीकृष्ण स्वयें अर्पी ॥७७०॥ जसें बुद्धिबळाचे पोटीं । पूर्व कर्म नसतां गांठीं । राजा प्रधान पशु प्यादा उठी । निर्धारितां दृष्टीं काष्ठ एक ॥७१॥ एकचि काष्ठ दोंही भारीं । तेथ कोण कोणाचा वैरी । वैर नसतांही झुंजारी । मारामारी अचेतनां ॥७२॥ म्हणती हस्ती घोडा प्रधान मेला । तेथ काय त्यांचा प्राण गेला । प्यादा होता तो प्रधान जाहला । तो काय पावला गजान्तलक्ष्मी ॥७३॥ जीव नसतांही निर्धारीं । मारिलें म्हणती निजगजरीं । एका जीत एका हारी । तें ज्ञान सारीं नेणतीं ॥७४॥ सारीं निमाल्या पाठीं । कोण धर्मात्मा चढे वैकुंठीं । कोण पडे नरकसंकटीं । तेवीं बद्धमुक्तगोठी समूळ मिथ्या ॥७५॥ एवं बुद्धिबळाचिये परी । ज्याची निजदृष्टि संसारीं । तोचि अवतारांचा अवतारी । जाण तो निर्धारीं भगवंत ॥७६॥ समूळ मिथ्या जाणे वेदोक्ती । समूळ मिथ्या जाणे बंधमुक्ती । हें जाणोनि आचरे जो वेदविहितीं । तेचि निजभक्ती मुक्तीवरिल ॥७७॥ करुनि संसारनिवृत्ती । बहुत पावले नित्यमुक्ती । त्यांसि हे दुर्गमभक्ती । अतर्क्य स्थिती तर्केना ॥७८॥ ऐशी ज्यापाशीं माझी स्थिती । तोचि मोक्षावरील करी भक्ती । इतरांसी हे अतर्क्य गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७९॥ उद्धव पावला अगाध गती । त्यासी सर्वलोकोपकारार्थी । वांचवावया ब्रह्मशापाहातीं । उपाय श्रीपती स्वयें योजी ॥७८०॥ नारदासी ब्रह्मज्ञान । त्यासीही दक्षशापबंधन । एके ठायीं न राहे जाण । करी परिभ्रमण शापास्तव ॥८१॥ झालियाही ब्रह्मज्ञान । ब्रह्मशाप अतिदारुण । हें जाणोनियां श्रीकृष्ण । उद्धवा जाण दूरी दवडी ॥८२॥ उद्धव जन्मला यादववंशीं । यादव निमती ब्रह्मशापेंसीं । तेथ वांचवावया उद्धवासी । बदरिकाश्रमासी स्वयें धाडी ॥८३॥ ब्रह्मशापाचेनि आघातें । यादव निमती स्वगोत्रघातें । उद्धव वांचवावया तेथें । बदरिकाश्रमातें हरि प्रेरी ॥८४॥ उद्धवासी जें झालें ज्ञान । त्याहूनि बदरिकाश्रम पावन । हें सर्वथा न घडे जाण । ब्रह्मशापाभेण पळवीत ॥८५॥ उद्धवा ऐसें अनर्घ्य रत्न् । ज्यासी बाणली स्थिति पूर्ण । त्यासी वांचवावया श्रीकृष्ण । पाठवी आपण बदरिकाश्रमा ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा श्रीभगवानुवाच - गच्छोद्धव मयाऽऽदिष्टो, बदर्याख्यं ममाश्रमम् । तत्र मत्पादतीर्थोदे, स्नानोपस्पर्शनैः शुचिः ॥४१॥

गंभीरगिरा बोले श्रीकृष्ण । उद्धवा तुज जाहलें ब्रह्मज्ञान । तुटलें स्नेहपाशबंधन । तरी ममाज्ञा करीं गमन बदरिकाश्रमा ॥८७॥ त्या बदरिकाश्रमाचें महिमान । लोकसंग्रहार्थ संपूर्ण । तरावया जडमूढ जन । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥८८॥ तो बदरिकाश्रम माझें स्थान । तेथ नित्य माझें अनुष्ठान । तया स्थानाचें दूरदर्शन । करी निर्दळण कलिकल्मषा ॥८९॥ ज्या पर्वताचें स्पर्शन । मानवां करी परम पावन । जें बदरीचें नामस्मरण । विभांडी दारुण महादोषां ॥७९०॥ तेथेंही माझें पादोदक । अलकनंदा पवित्र देख । जिचेनि स्पर्शमात्रें लोक । होती अलौकिक पावन ॥९१॥ जेथ श्रद्धायुक्त करितां स्नान । जीवाचें तुटे भवबंधन । ज्यासी घडे आचमन । तो उद्धरे जाण पितरेंसीं ॥९२॥ ऐसें बदरिकाश्रम माझें जाण । अतिशयें परम पावन । म्हणसी कैं केलें त्वां तें स्थान । तरी ऐक तें कथन उद्धवा ॥९३॥ रजोगुणें सृजिले जन । ते जाहले भोगकर्मीं प्रवीण । भोगासक्तीं बुडतां पूर्ण । दों रुपीं जाण मी अवतरलों ॥९४॥ तम निरसी रविचंद्र पूर्ण । तैसा मी जाहलों नरनारायण । बदरिकाचलामाजीं जाण । केला संपूर्ण नित्योदयो ॥९५॥ भज्यपूज्यत्वें मी नारायण । नररुपें मीचि भक्त जाण । तेथ भक्ति वैराग्य ज्ञान । म्यां आचरोन प्रकाशिलें ॥९६॥ तो बदरिकाश्रम माझें स्थान । तेथें सर्वदा मी आपण । अद्यापि करितों अनुष्ठान । भक्तिज्ञानवैराग्यें ॥९७॥ नरनारायणस्थितीं । मी अवतरलों जे पर्वतीं । तेथ तोडिले बोरीऐशी मागुती । माझी निजभक्ती फांपाइली ॥९८॥ यालागीं ’बदरिकाश्रम’ । त्या स्थळासी म्यां ठेविलें नाम । तेथें फिटे भवभ्रम । यापरी परम पावन तें स्थळ ॥९९॥ त्या बदरिकाश्रमाप्रती । तुवां जावें गा निश्चितीं । ऐसें उद्धवा कल्पिसी चित्तीं । मज काय तीर्थी विवंचू ॥८००॥ मोक्षाहीवरील भक्ती । तुवां अर्पिली माझे हातीं । तेणें मी जाहलों कृतकृत्यार्थी । म्हणसी मज तीर्थीं चाड नाहीं ॥१॥ तुज माझी आज्ञा प्रमाण । अवश्य तेथें करावें गमन । मग उद्धवें धरोनियां मौन । मस्तकीं वचन वंदिलें ॥२॥ सद्भावें करुनि नमन । घेतां बदरिकाश्रमदर्शन । तो नर होय नारायण । एवढें महिमान त्या स्थळाचें ॥३॥ उद्धवा तुझ्या ठायीं पूर्ण ज्ञान । ज्ञान असोनि माझें भजन । तुझेनि चरणस्पर्शें जाण । होईल पावन बदरिकाश्रम ॥४॥ ऐसें ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धवासी आलें रुदन । धांवोनि वंदिले श्रीचरण । सर्वथा गमन करीन आतां ॥५॥ ब्रह्मशापाचें निर्दळण । उद्धवाचें चुकवावया जाण । श्रीकृष्णें प्रबोधोनि पूर्ण । करवी गमन बदरिकाश्रमा ॥६॥ उद्धव ज्ञानियाचें ज्ञानरत्न । त्यासी वांचवूनि श्रीकृष्ण । विस्तारावया निजज्ञान । करवी गमन बदरिकाश्रमा ॥७॥ चुकवावया ब्रह्मशाप दारुण । उद्धवासी ’विशाळीं’ गमन । अन्यथा जाहलिया ब्रह्मज्ञान । कृष्ण तीर्थाटन नेमीना ॥८॥ उद्धवासी भवबंधन । बाळपणींचि नाहीं जाण । हें जाणोनियां श्रीकृष्ण । ब्रह्मशापाभेण तीर्था धाडी ॥९॥ तीर्थयात्रेचा अभिप्रावो । हाचि निश्चितें निजभावो । जाणोनि देवाधिदेवो । मोकली उद्धवो बदरिकाश्रमा ॥८१०॥ उद्धवा तुज गेलिया तेथ । थोर लोकोपकार होईल सत्य । तुझेनि धर्में निश्चित । दीन समस्त उद्धरती ॥११॥ म्हणसी पावल्या तें तीर्थ । म्यां कैसें वसावें तेथ । तेही अर्थी लोकहितार्थ । तुज इत्यर्थ सांगेन ॥१२॥ उद्धवा तुझें जें आचरण । तोचि जनांसी उपदेश जाण । यालागीं वैराग्य-भक्ति-ज्ञान । स्वधर्माचरन सांडूं नको ॥१३॥ त्रिभुवनामाजीं सर्वथा । उद्धवा मज नाहीं कर्तव्यता । तोही मी लोकसंग्रहार्था । होय वर्तता निजधर्मीं ॥१४॥ तूं ऐसें म्हणसी आतां । ’त्रैलोक्य असे तुझ्या माथां । यालागीं लोकसंग्रहाथा । तूं होसी वर्तता स्वधर्मकर्मीं’ ॥१५॥ मी निजधामा जातों आपण । यालागीं माझी स्थिती पूर्ण । ते पूर्णता तुज म्यां अर्पिली जाण । लोकसंग्रहार्थ पूर्ण तूं विरक्त होईं ॥१६॥ अभेदभक्ती वैराग्य ज्ञान । स्वयें आचरोनि आपण । देखीं लावावे इतर जन । ’लोकासंग्रह’ जाण या नांव ॥१७॥ (संमतश्लोक-भगवद्गीता) न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् । जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥ (अ.३ श्लोक २६)* उद्धवा माझिये ज्ञानप्राप्ती । तूं वंद्य जाहलासी त्रिजगतीं । तुझी जे आचरती स्थिती । तेचि लोकीं समस्तीं करिजेल ॥१८॥ आतां तुझेनि मिसें जाण । साडेतीं श्र्लोकींचें निरुपण । लोकसंग्रहार्थ सांगेन । तैसेंचि वर्तन करावें तुवां ॥१९॥ तुज पावलिया बदरिकाश्रमातें । तेथ विद्यमान बहुत तीर्थें । परी अलकनंदा मुख्य तेथें । जे नाशी दोषांतें दर्शनमात्रें ॥८२०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

ईक्षयाऽलकनन्दाया, विधूताशेषकल्मषः । वसानो वल्कलान्यङग, वन्यभुक् सुखनिस्पृहः ॥४२॥

करुनि अलकनंदेचें स्नान । करावें विध्युक्त तीर्थविधान । मग तेथें वसावें आपण । वसतें लक्षण तें ऐक ॥२१॥ त्यजूनि वस्त्रें आपण । करावीं वल्कलें परिधान । करुनि वनफलें भोजन । रहावें आपण अनुद्वेग ॥२२॥ आपुली पूर्ण निःस्पृहता । दावावी लोकसंग्रहार्था । निजसुखें तुज तेथें असतां । द्वंद्वसहिष्णुता दावावी ॥२३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

तितिक्षुर्द्वन्द्वमात्राणां, सुशीलः संयतेन्द्रियः । शान्तः समाहितधिया, ज्ञानविज्ञानसंयुतः ॥४३॥

तूं ज्ञानविज्ञान संपन्न । तुज द्वंद्वबाधा न बाधी जाण । तरी द्वंद्वसहिष्णुता पूर्ण । दावावी आपण लोकहितार्था ॥२४॥ तुज नाहीं विषयासक्तता । तरी नेमावें इंद्रियार्था । प्रकट करावी सुशीलता । निजशांतता दावावी ॥२५॥ निजबुद्धीचें समाधान । सहजें प्रकटवावें आपण । मजपासूनि जें प्राप्त ज्ञान । त्याचें अनुसंधान दावावें ॥२६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

मत्तोऽनुशिक्षितं यत्ते, विविक्तमनुभावयन् । मय्यावेशितवाक्‌चितो, मद्धर्मनिरतो भव ॥४४॥

या स्थितीं तुज असतां जाण । बहुसाल तुज येतील शरण । तूं पावलासि माझें ज्ञान । हें सर्वही जन जाणती ॥२७॥ पावोनियां ब्रह्मज्ञान । स्वयें उद्धरला आपण । न करीचि दीनोद्धारण । हें भेडपण ज्ञात्याचें ॥२८॥ एक पावोनि ब्रह्मज्ञान । शिष्य उपदेशी आपण । बोध न करवे परिपूर्ण । ते निष्ठा हीन निर्वीर्य ॥२९॥ शिष्य बोधेंवीण चरफडी । गुरु गुरुपणें बडबडी । घरींच्या घरीं चुकामुकी गाढी । हे बोधपरवडी अबद्ध ॥८३०॥ परचित्तप्रबोधकवृत्ती । हे सामान्य नव्हे स्थिती । ब्रह्मज्ञानाची पूर्ण निष्पत्ती । या नांव निश्चितीं उद्धवा ॥३१॥ स्वयें तरोनि जनां तारी । हे ज्ञानाची अगाध थोरी । ते म्यां दिधली तुझ्या करीं । जन उद्धरीं उद्धवा ॥३२॥ शिष्यसुक्षेत्रीं ब्रह्मज्ञान । ज्याचें नव्हे वर्धमान । तंववरी नाहीं पूर्णपण । उद्धवा जाण निश्चित ॥३३॥ जेवीं पिकलिया वृक्षाप्रती । पक्षी तुटले स्वयें येती । तेवीं निडारली ब्रह्मस्थिती । तेथ शिष्य पावती स्वानंद ॥३४॥ बोलें उपदेशिती ब्रह्मज्ञान । बोध नव्हे तें निर्वीर्य जाण । तें तूं म्हणसी कायसेन । ऐक सांगेन उद्धवा ॥३५॥ अनुभवा आलें ब्रह्मज्ञान । तेणें अंगीं ये जाणपण । तेथ संचरे ज्ञानाभिमान । तेणें वीर्य क्षीण ज्ञानाचें ॥३६॥ जंव जंव ज्ञाता निरहंकार । तंव तंव ज्ञानासी वीर्य थोर । त्याची होतां कृपामात्र । बोध साचार सच्छिष्यासी ॥३७॥ तुज फावलें माझें ज्ञान । उपदेशिसी शिष्यजन । ते तुज देतील सन्मान । तरी तूं ज्ञानाभिमान धरुं नको ॥३८॥ शिष्य देतील सन्मान । तो ’नेघे’ म्हणतां अपक्वपण । घेतां आला ज्ञानाभिमान । हेंही विघ्न ज्ञात्यासी ॥३९॥ शिष्य देतील सन्मान । तो अनुद्वेगें घ्यावा आपण । परी न धरावा ज्ञानाभिमान । हें मुख्य लक्षण ज्ञात्याचें ॥८४०॥ तुज माझ्या ज्ञानाची पूर्ण प्राप्ती । तेचि एकांतीं लोकांतीं । नित्य निरभिमानस्थिती । स्वानंदस्फूर्ती सर्वदा ॥४१॥ तेचि निरभिमान स्थिती । उपदेशीं शिष्यांप्रती । निरभिमानापरती । दशा त्रिजगतीं असेना ॥४२॥ तेंचि उपदेशलक्षण । वाचेसी माझें नामकीर्तन । शरीरीं माझें नित्य भजन । मद्रूपीं मन निमग्न सदा ॥४३॥ ज्ञाता म्हणतां न धरी श्र्लाघ । मूर्ख म्हणतां न यावा राग । स्वयें रहावें अनुद्वेग । हे दशा चांग ज्ञात्याची ॥४४॥ एवं नित्य निरभिमान । भक्तियुक्त वैराग्य ज्ञान । स्वयें आचरोनि आपण । शिष्यसज्जन उपदेशिजे ॥४५॥ तुज जे शिष्य येती शरण । ते नीच न म्हणावे आपण । हें गुरुत्वाचें पूर्णपण । शिष्यही पूर्ण पूज्यत्वें देखें ॥४६॥ सद्गुरुसी सर्वां भूतीं । सर्वदा ब्रह्मप्रतीती । तेथ शिष्याचिये भूतव्यक्तीं । काय ब्रह्मस्थिती पळाली ॥४७॥ यालागीं शिष्यीं नीचपण । सर्वथा न देखावें आपण । शिष्य देखावा ब्रह्म पूर्ण । हें मुख्य लक्षण गुरुत्वाचें ॥४८॥ जेवीं तानयालागीं माता । तेवीं शिष्याचिया निजस्वार्था । गुरुसी कळवळा तत्त्वतां । शुद्ध ’सद्गुरुता’ या नांव ॥४९॥ शिष्यलक्षणप्रकार । मागां सांगितला विचार । तो जेथ देखसी अधिकार । तेथ साचार उपदेशीं ॥८५०॥ तुज जें शिकविलें प्रस्तुत । तें शिष्योपदेशसंग्रहार्थ । तूं ठायींचा गुणातीत । तुज हें समस्त स्पर्शेना ॥५१॥ अतिव्रज्य गतिस्तिस्त्रो, मामेष्यसि ततः परम् (॥४४॥) यापरी ज्ञान उपदेशितां । तुझी न मोडे गुणातीतता । ज्यांसी उपदेशिसी तत्त्वतां । तेही त्रिगुणावस्था जिंकिती ॥५२॥ पूर्वोक्त उपदेशयुक्तीं । जे शिष्य सर्वदा वर्तती । ते त्रिगुणांची त्रिविध वृत्ती । अतिक्रमिती गुरुकृपां ॥५३॥ त्रिगुणांचें त्रिविधपण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । ज्ञेय ज्ञाता ज्ञान साक्षेपें ॥५४॥ कार्य कारण आणि कर्ता । भोज्य भोजन आणि भोक्ता । शत्रु मित्र उदासीनता । या त्रिगुणावस्था बाधक ॥५५॥ तेथ येणें उपदेशें जाण । सच्छिष्य करुनि माझें भजन । त्रिगुणत्रिपुटी निर्दळून । माझें स्वरुप पूर्ण स्वयें होती ॥५६॥ माझिया स्वरुपाप्रती । नाहीं गुण ना गुणवृत्ती । भक्त मद्भावें गुणातीतीं । सहज पावती स्वानंद ॥५७॥ ऐसा आज्ञापिला उद्धवो । त्याचे अवस्थेचा अभिप्रावो । परीक्षितीप्रती पहा हो । स्वयें शुकदेवो सांगत ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा श्रीशुक उवाच - स एव मुक्तो हरिमेधसोद्धवः प्रदक्षिणं त्म परिसृत्य पादयोः । शिरो निधायाश्रुकलाभिरार्द्रधीर्न्यषिंचदद्वन्द्वपरोप्यपक्रमे ॥४५॥

जो निजमोक्षें नित्य निष्काम । जेणें अनुभविलें परब्रह्म । त्या श्रीशुकासी अतिसंभ्रम । उद्धवाचें प्रेम वर्णावया ॥५९॥ तो शुक म्हणे परीक्षिती । उद्धव आज्ञापिला श्रीपती । त्याच्या प्रेमाची अद्भुत स्थिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥८६०॥ उद्धव जरी जाहला गुणातीत । तरी गुरुचरणीं प्रेम अद्भुत । ज्यासी सद्गुरु श्रीकृष्णनाथ । मूर्तिमंत परब्रह्म ॥६१॥ त्यजूं न शके हरिपदा । हरीचे ठायीं पूर्ण श्रद्धा । यालागीं जाण ’हरिमेधा’ । बोलिजे प्रबुद्धा उद्धवातें ॥६२॥ जो आवडीं करी हरीचें ध्यान । त्याचे ध्यानेंसीं हरि हरी मन । जो विवंची श्रीकृष्ण समाधान । त्याचे बुद्धीचें हरण हरि करी ॥६३॥ जो करी हरिचिंतन । त्याचे चित्ताचें हरि करी हरण । जो करी हरीचें स्मरण । त्याचा संसार संपूर्ण हरि हरी ॥६४॥ ऐशिया हरीच्या ठायीं सर्वदा । पावलियाही मुक्तिपदा । उद्धवाची सप्रेम श्रद्धा। यालागीं ’हरिमेधा’ त्यासी म्हणती ॥६५॥ जे पावले गुणातीतीं । त्यांसीही आवडे ज्याची भक्ती । तेणें श्रीकृष्णें उद्धवाप्रती । प्रयाण निश्चितीं नेमिलें ॥६६॥ दुरी प्रयाण बदरिकाश्रम । मागुता न भेटे पुरुषोत्तम । तो प्रयाणकाळ उपक्रम । जाहला सप्रेम उद्धवासी ॥६७॥ सर्वदा सुखदुःखातीत । उद्धव जाहलासे निश्चित । तोही प्रयाणकाळीं प्रेमयुक्त । प्रदक्षिणा करीत श्रीकृष्णासी ॥६८॥ चरणीं मस्तक ठेवितां जाण । आनंदाश्रु लोटले नयन । तेणें श्रीकृष्णाचें चरणक्षाळण । जाहलें संपूर्ण पदद्वया ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

सुदुस्त्यजस्नेहवियोगकातरो, न शक्नुवंस्तं परिहातुमातुरः । कृच्छ्रं ययौ मूर्धनि भर्तृपादुके, बिभ्रन्नमस्कृत्य ययौ पुनः पुनः ॥४६॥

आणिकांचा सेन्ह अतिबाधक । त्यातें सांडवी वेदविवेक । तैसा कृष्णस्नेह नव्हे देख । तो सुखदायक स्नेहाळू ॥८७०॥ उद्धवासी स्वाभाविक । गुरु परब्रह्म दोनी एक । इतरांसी भावनात्मक । उद्धवासी देख स्वतःसिद्ध ॥७१॥ ऐसा श्रीकृष्णस्नेहो आवश्यक । उद्धवासी सुखदायक । त्या श्रीकृष्णासी सांडितां देख । आत्यंतिक विव्हळ ॥७२॥ निःशेष निमाली विषयावस्था । जरी वृद्ध जाहली पतिव्रता । तरी त्यागावा निजभर्ता । हें तिशीं सर्वथा नावडे ॥७३॥ तेवीं अनुभवूनि परमार्था । उद्धव पावला जीवन्मुक्तता । तरी सद्गुरु श्रीकृष्ण त्यागितां । अतिविव्हळता गुरुप्रेमें ॥७४॥ स्नेहें द्वेषें सकामेंसीं । जे जे वेधले श्रीकृष्णासी । ते ते पावले परमानंदासी । त्या श्रीकृष्णासी त्यजी कोण ॥७५॥ (संमत श्लोक) काम क्रोधं भयं स्नेहमैक्यं सौहृदमेव च । नित्यं हरौ विदधतो, यान्ति तन्मयतां हि ते ॥ अविधीं रातलीं श्रीकृष्णासी । तीं वंद्य जाहलीं ब्रह्मादिकांसी । मा उद्धव विकला गुरुप्रेमांसी । केवीं श्रीकृष्णासी त्यजील ॥७६॥ ज्यासी परब्रह्मत्वें गुरुभक्ती । त्यासी तृणप्राय जीवन्मुक्ती । जाहलीही मुक्ती उपेक्षिती । विकिले गुरुभक्तीं अनन्यत्वें ॥७७॥ उल्लंघूं नये सद्गुरुवचन । करावें बदरिकाश्रमीं गमन । श्रीकृष्णप्रेमा पढिये पूर्ण । तो सर्वथा जाण निघों नेदी ॥७८॥ ऐसें उभयतां अतिसंकट । उद्धवासी वोढवलें दुर्घट । श्रीकृष्णप्रेमें उतटे पोट । न देखे वाट बदरीची ॥७९॥ त्यागोनि जावें जरी कृष्णनाथ । तरी हा निजधामा जाईल आतां । मग मी न देखें मागुता । यालागीं अवस्था अनावर ॥८८०॥ नवजलदघनतनु । श्याम राजीवलोचनु । आनंदविग्रही श्रीकृष्णु । ब्रह्म परिपूर्णु पूर्णत्वें ॥८१॥ मुकुट कुंडलें मेखळा । तिलक रेखिला पिंवळा । पदक एकावली गळां। कंठीं तेजागळा कौस्तुभ ॥८२॥ वांकीअंदुवांचा गजर । चरणीं गर्जत तोडर । विद्युत्प्राय पीतांबर । तेणें शार्ङगधर शोभत ॥८३॥ कांसे विराजे सोनसळा । अपाद रुळे वनमाळा । घवघवीत घनसांवळा । देखतां डोळां मन निवे ॥८४॥ ऐसें श्रीकृष्णदर्शन । पुढती न देखें मी आपण । यालागीं उद्धव जाण । प्रेमें संपूर्न विव्हळ ॥८५॥ उद्धव पावला ब्रह्म पूर्ण । त्यासी सगुणाची अवस्था कोण । तरी श्रीकृष्णप्रभा प्रकाशे चिद्धन । आत्मवस्तु संपूर्ण श्रीकृष्ण ॥८६॥ घृत थिजलें कां विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें । तेवीं सगुणनिर्गुणत्वें मुसावलें । परब्रह्म संचलें श्रीकृष्ण ॥८७॥ त्याज्य सगुण पूज्य निर्गुण । हेही दशा आरती जाण । ज्यासी ब्रह्मरुप तृणपाषाण । त्यासी त्याज्य सगुण कदा नव्हे ॥८८॥ एवं सगुण आणि निर्गुण । उद्धवासी समसमान । गुरुत्वें कृष्णीं प्रेम गहन । तो त्यागितां पूर्ण विव्हळता ॥८९॥ परी आज्ञा नुल्लंघवे सर्वथा । म्हणोनि निघावें बदरीतीर्था । तंव श्रीकृष्णासी सांडूनि जातां । परमावस्था उद्धवीं ॥८९०॥ उद्धव प्रयाण अवसरीं । लोळणी घाली पायांवरी । चरण आलिंगुनी हृदयीं धरी । तरी जावया दूरी धीर नव्हे ॥९१॥ मज एथोनि गेलिया आतां । मागुती न देखें श्रीकृष्णनाथा । तेणें अनिवार अवस्था । पाऊल सर्वथा न घालवे ॥९२॥ मी निवालों कृष्णचरणामृतीं । मज चाड नाहीं महातीर्थी । त्याही मज अदृष्टगतीं । अंतीं श्रीपति त्यागवी ॥९३॥ सप्रेम चळचळां कांपत । कंठ जाहला सद्गदित । बाष्पें क्षणक्षणां स्फुंदत । स्वेदरोमांचित उद्धव ॥९४॥ गमनालागीं अतिउद्यत । पायां लागोनि पर्हाच जात । सवेंचि येऊनि पायां लागत । विगुंतलें चित्त हरिप्रेमीं ॥९५॥ पुढती नमन पुढती गमन । पुढती घाली लोटांगन । पुढती वंदी श्रीकृष्णचरण । सर्वथा जाण निघवेना ॥९६॥ देखोनि उद्धवाचा भावो । परमानंदें तुष्टला देवो । यासी माझ्या ठायीं अतिस्नेहो । गुरुत्वें पहा हो अनन्य ॥९७॥ कृपा उपजली यदुनायका । आपुले चरणींच्या पादुका । उद्धवासी दिधल्या देखा । तेणें निजमस्तका ठेविल्या ॥९८॥ पादुका ठेवितांचि शिरीं । मी जातों कृष्णापासूनि दूरी । हें नाठवे उद्धवाअंतरीं । ऐशियापरी प्रबोधिला ॥९९॥ पादुका ठेवितांचि माथां । स्वयें उपशमे अवस्था । नमस्कारोनि श्रीकृष्णनाथा । होय निघता तदाज्ञा ॥९००॥ त्रिवार करोनि प्रदक्षिणा । अवलोकूनि श्रीकृष्णवदना । नमस्कारोनि श्रीचरणा । उद्धव कृष्णाज्ञा निघाला ॥१॥ तृतीयस्कंधींचें निरुपण । उद्धवासी विदुरदर्शन । दोघां पडिलें आलिंगन । कुशल संपूर्ण पूशिलें ॥२॥ तेथ सांगतां कृष्णनिधन । उद्धव नव्हेचि दीनवदन । तें विदुरासी कळलें चिह्न । हा ब्रह्मज्ञान पावला ॥३॥ मरता गुरु रडता चेला । दोंहीचा बोध वायां गेला । साच मानी जो या बोला । तोही ठकला निश्चित ॥४॥ यासी तुष्टली श्रीकृष्णकृपामूर्ती । निमाली मोहममतावृत्ती । पावला परमानंदप्राप्ती । स्वानंदस्थितीं डुल्लत ॥५॥ शब्दा नातळोनि बोल बोले । पृथ्वी नातळोनि सहजें चाले । असोनि नामरुपमेळें । नामरुपा नातळे हा एक ॥६॥ हा रसनेवीण सुरस चाखे । डोळ्यांवीण आपणपैं देखे । इंद्रियावीण सोलींव सुखें । निजात्मतोखें हा भोगी ॥७॥ निर्विकल्पनिजबोधेंसीं । त्यावरी भक्तिज्ञानवैराग्येंसीं । स्थिती देखोनि उद्धवापाशीं । विदुर मानसीं निवाला ॥८॥ मग तो विनवी उद्धवासी । तुज तुष्टला हृषीकेशी । तूं पावलासि ब्रह्मज्ञानासी । तें मज उपदेशीं सभाग्या ॥९॥ उद्धव म्हणे तुझें भाग्य धन्य । तुज अंतीं स्मरला श्रीकृष्ण । तुज सांगावया ब्रह्मज्ञान । मैत्रेयासी जाण आज्ञापिलें ॥९१०॥ कृष्ण मज जरी आज्ञा देता । तरी मी तत्काळ बोध करितों तत्त्वतां । तुज सद्गुरु परमार्था । जाण सर्वथा मैत्रेय ॥११॥ ऐकतां उद्धवाचें वचन । विदुर प्रेमें गहिंवरला पूर्ण । काय बोलिला आपण । सावधान अवधारा ॥१२॥ हें तृतीयस्कंधींचें निरुपण । प्रसंगें एथें आलें जाण । विदुर बोलिला अतिगहन । तेंचि वचन अवधारा ॥१३॥

(संमत श्लोक) - क्वाहं कीटकवत्तुच्छ:, क्व च कारुण्यवारिधिः । तेनाहं स्मारितोऽस्म्यद्य, मुमुर्षुः केशवं यथा ॥१॥

विदुर म्हणे मी मशक । रंकांमाजीं अतिरंक । त्या मज स्मरे यदुनायक । कृपा अलोलिक दासांची ॥१४॥ नाठवीच देवकीवसुदेवांसी । नाठवीच बळिभद्रपांडवांसी । तो आठवी मज दासीपुत्रासी । हृषीकेशी कृपाळू ॥१५॥ जेवीं मरता स्मरे नारायण । तेवीं अंतीं मज स्मरला कृष्ण । यापरी भक्तप्रतिपाळू जाण । कृपासिंधु पूर्ण श्रीकृष्ण ॥१६॥ आशंका ॥ द्वारकेसी असतां श्रीकृष्ण । तैंचि उद्धवें केलें गमन । त्यासी प्रभासींचें कृष्णनिधन । म्हणाल संपूर्ण अदृश्य ॥१७॥ तरी उद्धवविदुरसंवादखूण । येचि अर्थीचें निरुपण । समूळ सांगेन कथन । तें सावधान अवधारा ॥१८॥ उद्धव जाता मार्गीं आपण । अवचितीं जाहली आठवण । न पाहतां कृष्णनिधन । मी कां गमन करितों हें ॥१९॥ श्रीकृष्णचरित्र अतिगोड । तें सांडूनि तीर्थी काय चाड । ऐसा विचार करुनि दृढ । श्रद्धेनें प्रौढ श्रद्धाळू ॥९२०॥ परतोनि कृष्णापाशीं जातां । तो मज राहों नेदी सर्वथा । कृष्णामागें कळों नेदितां । आला मागुता प्रभासेंसी ॥२१॥ तेथेंही राहोनियां गुप्त । पाहों लागला श्रीकृष्णचरित । तंव यादवकुळाचा घात । देखिला समस्त उद्धवें ॥२२॥ कुळ निर्दळूनि एकला । कृष्ण अश्वत्थातळीं बैसला । तेथ जराव्याधें बाण विंधिला । चरणीं लागला मृगशंका ॥२३॥ चरणीं लागतांचि घावो । थोर सुखें सुखावला देवो । कृतकार्य जाहलें निःसंदेहो । निजधामा पहा हो जावया ॥२४॥ बाण लागतां भलतेयांसी । घायें होती कासाविशी । ते दशा नाहीं श्रीकृष्णासी । देहत्व त्यासी अतिमिथ्या ॥२५॥ जेवीं घाय लागतां छायेसी । पुरुष नव्हे कासाविशी । तेवीं व्याधें विंधितां बाणेंसी । ग्लानी कृष्णासी असेना ॥२६॥ ते संधीं मैत्रेय आला । त्यासी ज्ञानोपदेश केला । ते काळीं विदुर आठवला । कृपा कळवळला श्रीकृष्ण ॥२७॥ आजी येथें विदुर असता । तरी मी ब्रह्मज्ञान उपदेशितों सर्वथा । मैत्रेया तुज सांगतों आतां । त्यासी तूं तत्त्वतां उपदेशीं ॥२८॥ पावोनि कृष्णगुह्यज्ञान । मैत्रेयासी परम सावधान । म्हणे कलियुग धन्य धन्य । ब्रह्मवादी जन बहुसाल होती ॥२९॥ "सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति, सम्प्राप्ते च कलौ युगे । नैव तिष्ठन्ति मैत्रेय, शिश्नोदरपरायणाः" ॥२॥ वादकत्वें कलियुगाप्रती । बहुसाल ब्रह्मवादी होती । परी न राहती ब्रह्मस्थितीं । जाण निश्चितीं मैत्रेया ॥९३०॥ वदूनियां ब्रह्मज्ञान । होती शिश्नोदरपरायण । जिह्वा शिश्न जो आवरी संपूर्ण । त्यासीच ब्रह्मज्ञान कलियुगीं ॥३१॥ ऐकोनि मैत्रेयसंवादासी । उद्धव आला श्रीकृष्णापाशीं । प्रदक्षिणा करुनि त्यासी । मग पायांसी लागला ॥३२॥ ऐकून मैत्रेयाचें ज्ञान । देखोनि कृष्णाचें निर्याण । उद्धव निघाला आपण । तें ऐक लक्षण परीक्षिती ॥३३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

ततस्तमन्तर्हृदि सन्निवेश्य, गतो महाभागवतो विशालाम् । यथोपदिष्टां जगदेकबन्धुना, ततः समास्थाय हरेरगाद्गतिम् ॥४७॥

जगाचें विश्रामधाम । जो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । तो हृदयीं धरोनि आत्माराम । उद्धव सप्रेम निघाला ॥३४॥ कृष्णाची पूर्णस्थिती । हृदयीं धरोनि सुनिश्चितीं । उद्धव विशाल तीर्थाप्रती । स्वानंदस्थितीं निघाला ॥३५॥ उद्धव स्वानंदस्थितिपूर्ण । जेथें जेथें करी गमन । ते ते लोक होती पावन । भक्तिज्ञानवैराग्यें ॥३६॥ जैसजैसी विवेकविरक्ती । तैसतैसी बोधक शक्ती । उपदेशित ज्ञानभक्ती । चालिला त्रिजगती उद्धरित ॥३७॥ ज्यांसी उद्धवासी जाहली भेटी । त्यांसी हरिभजनीं पडे मिठी । भवभय पडों नेदी दृष्टीं । बोधक जगजेठी उद्धव ॥३८॥ जे जे भगवद्भक्ति करित । ते ते ’भागवत’ म्हणिजेत । मुक्तीहीवरी भजनयुक्त । महाभागवत उद्धव ॥३९॥ उद्धवें आदरिली जे भक्ती । तिची किंकर नित्यमुक्ती । यालागीं ’महाभागवत’ स्थिती । बोलिजे निश्चितीं उद्धवा ॥९४०॥ निजशांतता अतिनिर्मळ । आत्मानुभवें अतिप्रांजळ । मोक्षाहीवरी भजनशीळ । भक्त विशाळ उद्धव ॥४१॥ ऐशी उद्धवाची विशाळता । तोही पावला विशालतीर्था । ’विशाल’ म्हणावयाची कथा । ऐक आतां सांगेन ॥४२॥ जेथ श्रद्धामात्रें चित्तशुद्धी । स्मरणमात्रें निर्विकल्प बुद्धी । ’नारायण’ नामें मोक्षसिद्धी । ’विशाल’ या विधीं बदरिकाश्रम ॥४३॥ जेथ जनहितार्थ नारायण । अद्यापि करितो अनुष्ठान । मोक्षमार्गी कृपा पूर्ण । यापरी विशाळपण बदरिकाश्रमातें ॥४४॥ जेथ अल्प तपें फळ प्रबळ । अल्पध्यानें आकळे सकळ । अल्प विरक्तीं मोक्ष केवळ । ऐसा फळोनि विशाळ बदरिकाश्रम ॥४५॥ जो अंतर्यामीं गोविंदु । जो जगाचा सुहृद बंधु । जो आत्माराम प्रसिद्धु । ज्याचेनि निजबोधु उद्धवा ॥४६॥ जैसा कृष्णें केला उपदेशु । तैसा बदरिकाश्रमीं रहिवासु । उद्धवें केला निजवासु । तोचि जनांसी विश्वासु परमार्थनिष्ठे ॥४७॥ जैसी उद्धवाची स्थिती गती । जैशी उद्धवाची ज्ञानभक्ती । जैशी उद्धवाची विरक्ती । तोचि जनांप्रती उपदेश ॥४८॥ जेथें गुरुसी विषयासक्ती । तेथें शिष्यासी कैंची विरक्ती । जेथ गुरुसी अधर्मप्रवृत्ती । तेथ शिष्यासी निवृत्ति कदा न घडे ॥४९॥ यालागीं उद्धवाचें आचरित । तेंचि आचरती जन समस्त । एवं परोपकारार्थ । उद्धव विरक्त बदरिकाश्रमीं ॥९५०॥ जैसें शिकवूनि गेला श्रीकृष्णनाथ । तैसेंचि उद्धव आचरत । त्याचेनि धर्में जन समस्त । जाहले विरक्त परमार्थीं ॥५१॥ परब्रह्माची निजप्राप्ती । दृढ करुनि गेला श्रीपती । तेचि उद्धवासी ब्रह्मस्थिती । अहोरातीं अखंड ॥५२॥ बैसतां घालूनि आसन । का करितां गमनागमन । उद्धवाचें ब्रह्मपण । सर्वथा जाण मोडेना ॥५३॥ विरक्ती आणि भोगासक्ती । दोनी देहावरी दिसती । या दोंहीहूनि परती । परब्रह्मस्थिती उद्धवीं ॥५४॥ विरक्तीमाजीं नव्हे विरक्त । भोगीं नव्हे भोगासक्त । या दोंहीहून अतीत । ब्रह्म सदोदित उद्धव ॥५५॥ तेथ प्रारब्धक्षयें जाण । त्या देहासी येतां मरण । उद्धव ब्रह्मीं ब्रह्म पूर्ण । जन्ममरण तो नेणे ॥५६॥ देहींचा देहात्मभावो । निर्दळूनि निःसंदेहो । उद्धवासी ब्रह्मानुभवो । श्रीकृष्णें पहा हो दृढ केला ॥५७॥ ऐशिया उद्धवासी देहांतीं । ’विदेहकैवल्या’ ची प्राप्ती । म्हणणें हें परीक्षिती । दृढ भ्रांती वक्त्याची ॥५८॥ घडितां मोडितां कांकण । घडमोडी नेणे सुवर्ण । तेवीं देहासीच जन्ममरण । उद्धव परिपूर्ण परब्रह्म ॥५९॥ उद्धवासी देहीं वर्ततां । तो नित्य मुक्त विदेहता । त्यासी देहांतीं विदेहकैवल्यता । हे समूळ वार्ता लौकिक ॥९६०॥ देह राहो अथवा जावो । हा ज्ञात्यासी नाहीं संदेहो । त्यासी निजात्मता ब्रह्मभावो । अखंड पहा हो अनुस्यूत ॥६१॥ देहासी दैव वर्तवि जाण । देहासी दैव आणी मरण । ज्ञाता ब्रह्मीं ब्रह्म पूर्ण । जन्ममरण तो नेणे ॥६२॥ देह असो किंवा जावो । आम्ही परब्रह्मचि आहों । दोरीं सापपण वावो । दोरेंचि पहा हो जेवीं होय ॥६३॥ जेथ मृगजळ आटलें । तेथें म्हणावें कोरडें जाहलें । जेव्हां होतें पूर्ण भरलें । तेव्हांही ओलें असेना ॥६४॥ तेवीं देहाची वर्तती स्थिती । समूळ मिथ्या प्रतीती । त्या देहाचे देहांतीं । विदेहकैवल्यप्राप्ती नवी न घडे ॥६५॥ यापरी बदरिकाश्रमाप्रती । उद्धवें बहुकाळ करुनि वस्ती । त्याचि निजदेहाचे अंतीं । भगवद्गती पावला ॥६६॥ ’पावला’ हेही वदंती । लौकिक जाण परीक्षिती । तो परब्रह्मचि आद्यंतीं । सहज स्थिती पावला ॥६७॥ उद्धवाची भगवद्भक्ती । आणि निदानींची निजस्थिती । तेणें शुक सुखावला चित्तीं । कृष्णकृपा निश्चितीं वर्णित ॥६८॥


एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

य एतदानन्दसमुद्रसम्भृतं, ज्ञानामृतं भागवताय भाषितम् । कृष्णेन योगेश्वरसेविताङघ्रिणा, सच्छ्रद्धयाऽऽसेव्य जगद्विमुच्यते ॥४८॥

जे योगेश्वर योगस्थिती । जे पावले जीवन्मुक्ती । तेही कृष्णचरण सेविती । ऐशी पूज्य मूर्ती श्रीकृष्णाची ॥६९॥ पदीं रंगले सनकादिक । संत सज्जन अनेक । ब्रह्मादिक तेथें रंक । ऐसा श्रेष्ठ देख श्रीकृष्ण ॥९७०॥ तेणें श्रीकृष्णें स्वानंदस्थिती । प्रगट केली निजभक्ती । अतिकृपा उद्धवाप्रती । स्वमुखें श्रीपती बोलिला ॥७१॥ भगवद्भक्ति महासागर । तेथें निजधैर्य तोचि मंदर । गुरुशिष्ययुक्ति सुरासुर । मथनतत्पर साटोपें ॥७२॥ भाव विश्वास दोनी मांजरीं । बोध रविदोर दृढ धरी । प्रत्यगावृत्ति अभ्यासेंकरीं । मंथन निर्धारीं मांडिलें ॥७३॥ तेथ मथनीं प्रथमदृष्टीं । ’अहं ज्ञाता’ हें हालाहल उठी । तें विवेकशिवें धरिलें कंठीं । पुढती अहं नुठी गिळिलें तैसें ॥७४॥ निरभिमानें मथूनि मथित । काढिलें भक्तिसारामृत । तें उद्धवालागीं श्रीकृष्णनाथ । कृपेनें निश्चित अर्पिलें ॥७५॥ धर्म अर्थ काम मुक्ती । चहूं पुरुषार्थाही वरती । श्रीकृष्णें सारामृत-निजभक्ती । उद्धवाहातीं अर्पिली ॥७६॥ निजबोधाचें पात्र जाण । निजानुभवें आसाऊन । तेथें हें सारामृत भरोन । करविलें प्राशन उद्धवासी ॥७७॥ तेणें उद्धव निवाला । त्रिविधतापें सांडवला । परम सुखें सुखावला । परब्रह्मीं जडला ब्रह्मत्वें ॥७८॥ भक्तिसारामृतप्राशन । उद्धवें करोनियां जाण । पावला परम समाधान । ऐसा कृपाळु श्रीकृष्ण निजभक्तां ॥७९॥ कृष्ण उद्धव संवाद पूर्ण । भक्तिसारामृत गुह्यज्ञान । याचें जो करी सेवन । श्रवणमनन निदिध्यासें ॥९८०॥ ऐसें जो करी कथासेवन । त्या भेणें पळे भवबंधन । स्वप्नीं न देखे जन्ममरण । हाही नव्हे जाण नवलावो ॥८१॥ जे लागोनि त्याचे संगती । दृढावले ये कथेचे भक्तीं । त्यांसी भवभयाची प्राप्ती । न बाधी कल्पांतीं कुरुराया ॥८२॥ ज्यासी या कथेची श्रद्धा पूर्ण । ज्यासी या कथेचें अनुसंधान । ज्यासी ये कथेचें अनुष्ठान । तो उद्धरी जाण जगातें ॥८३॥ जो सूर्याचे घरीं राहिला । त्यासी रात्रीचा यावा ठेला । मा जो त्याचे गांवींच वसला । तोही मुकला रात्रीसी ॥८४॥


एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

भवभयमपहन्तुं ज्ञानविज्ञानसारं, निगमकृदुपजर्हे- भृङगवद्वेदसारम् । अमृतमुदधितश्चापाययद्भृत्यवर्गान् पुरुषमृषभमाद्यं कृष्णसंज्ञं नतोऽस्मि ॥४९॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥

संसारभयें अति त्रासले । जे कृष्णासी शरण आले । त्यांचें भवभय हरावया वहिलें । जेणें मथन केलें वेदार्थाचें ॥९३॥ मथूनि उपनिषद्भार । काढिलें ज्ञानविज्ञानसार । ज्यालागीं शिणले ज्ञाते नर । तयांसी पैल मेर ठाकेना ॥९४॥ म्हणशी निगम मथितां । वेदासी जाहली परम व्यथा । कृष्ण वेदांचा आदिकर्ता । तो दुःख सर्वथा हों नेदी ॥९५॥ जेवीं स्वयें वांसरुं गाय दुहितां । वाहला न लगे सर्वथा । तेवीं श्रीकृष्ण वेद मथितां । वेदासी व्यथा बाधीना ॥९६॥ जो सर्वज्ञ हृषीकेश । वेदार्थसार-राजहंस । तेणें नेदितां दुःखलेश । वेदसारांश काढिला ॥९७॥ एवं वेदार्थनिजमथित । ज्ञानविज्ञानसारामृत । कृष्णें काढूनि इत्यंभूत । भृत्यहितार्थ कृपा अर्पी ॥९८॥ जेवीं हळुवारपणें षट्‌पद । काढी सुमनमकरंद । तेवीं मथूनियां वेद । श्रीकृष्णें सार शुद्ध काढिलें ॥९९॥ यापरी श्रीकृष्णनाथ । भक्तकृपाळू कृपावंत । काढूनि वेदसारामृत । निजभृत्या देत निर्भय ॥१०००॥ ऐसें वेदसारामृत पूर्ण । भृत्यासी पाजूनि श्रीकृष्ण । निजभक्तांचें जन्ममरण । निर्दळी संपूर्ण भवभय ॥१॥ जगाचें माया मुख्य कारण । कृष्ण मायेचेंही निजकारण । जें स्वरुप सच्चिदानंदघन । त्यासी संज्ञा ’श्रीकृष्ण’ नामाची ॥२॥ घेऊनि माया मनुष्यनट । पुरुषांमाजीं पुरुषश्रेष्ठ । पूर्ण ज्ञानें ज्ञाननिष्ठ । वंद्य वरिष्ठ श्रीकृष्ण ॥३॥ त्यासी कायावाचा आणि मन । सर्वार्थीं अनन्यशरण । यापरी श्रीशुक आपण । करी मनें नमन श्रीकृष्णा ॥४॥ ऐसें श्रीशुकें केलें नमन । तेणें परीक्षिती सप्रेम पूर्ण । भक्तकृपाळू एक श्रीकृष्ण । दुसरा जाण असेना ॥५॥ उद्धव पावला परम निर्वाण । सरलें ज्ञानकथानिरुपण । जगीं श्रेष्ठ भगवद्भजन । भक्तांअधीन श्रीकृष्ण ॥६॥ जें जें भक्तांचें मनोगत । तें तें पुरवी श्रीकृष्णनाथ । शेखीं निजपदही देत । कृपा समर्थ भक्तांची ॥७॥ निजधामा निघतां श्रीकृष्ण । जरी उद्धव न करितां प्रश्न । तरी हें परमामृतकथन । सर्वथा श्रीकृष्ण न बोलता ॥८॥ यालागीं उद्धवाचा महाथोर । जगासी जाहला उपकार । भक्तिज्ञानवैराग्यसार । ज्याचेनि शार्ङगधर स्वयें वदला ॥९॥ उद्धवाचेनि धर्में जाण । भवाब्धि तरे त्रिभुवन । ऐसें बोलविलें गुह्यज्ञान । सप्रेम भजन तद्युक्त ॥१०१०॥ उपेक्षून चारी मुक्ती । उद्धवें थोराविली हरिभक्ति । एवढी उद्धवें केली ख्याती । त्रिजगती तरावया ॥११॥ एकादशाचेनि नांवें । घातली भक्तिमुक्तीची पव्हे । एवढी कीर्ति केली उद्धवें । जडजीवें तरावया ॥१२॥ धेनूच्या ठायीं क्षीर पूर्ण । परी हाता न ये वत्सेंवीण । तेवीं श्रीकृष्णाचें पूर्ण ज्ञान । उद्धवें जाण प्रगट केलें ॥१३॥ कृष्णोद्धवसंवादकथन । तें अतिशयें ज्ञान गहन । तेथ मी अपुरतें दीन । केवीं व्याख्यान करवलें ॥१४॥ कृष्णोद्धवज्ञान गहन । त्याचें करावया व्याख्यान । साह्य जाहला जनार्दन । जो सर्वी सर्वज्ञ सर्वार्थीं ॥१५॥ पदपदार्थसंगतीं । ज्ञानाची परिपाकस्थिती । वैराग्ययुक्त भक्तिमुक्ती । हेही व्युत्पत्ती मी नेणें ॥१६॥ माझें जें कां मीपण । तेंही जाहला जनार्दन । तेव्हां पदपदार्थव्याख्यान । कर्ता जाण तो एक ॥१७॥ तो एका एकपणाचेनि भावें । ऐक्यता फावली स्वभावें । ’एकाजनार्दन’ येणें नांवें । हा ग्रंथ देवें विस्तारिला ॥१८॥ माझे बुद्धीचीही बुद्धी । जनार्दन जाहला अर्थावबोधीं । कवित्वयुक्ति-पदबंधीं । वदता त्रिशुद्धी जनार्दन ॥१९॥ माझें नामरुप कर्म गुण । मूळीं पाहतां मिथ्या जाण । परी तेंही जाहला जनार्दन । ऐसें एकपण पढियंतें ॥१०२०॥ नांवें भावें एकपण । यालागीं तुष्टला जनार्दन । तेणें माझ्या नांवाऐसें जाण । जगीं एकपण प्रकाशिलें ॥२१॥ ’एका’या नामाचें कौतुक । पढिये जनार्दनासी आत्यंतिक । तेणें तो मजशीं जाहला एक । ’मी तूं’ देख म्हणतांही ॥२२॥ ’एका’ या नांवाचें कौतुक । जनार्दनासी ऐसें देख । एकत्वीं प्रकाशी अनेक । अनेकीं एक अविकारी ॥२३॥ नांवें एक भावें एक । त्यासी देवाचें सर्वदा ऐक्य । मग देखतां एकानेक । भिन्नत्व देख असेना ॥२४॥ हें एकत्व जंव न ये हाता । तंव न लाभे देवाची प्रसन्नता । एकत्वावांचूनि सर्वथा । अकर्तात्मता कळेना ॥२५॥ जंव कर्तव्याचा अहंभावो । तंव सर्वथा न भेटे देवो । अहंपाशीं बद्धतेशी ठावो । मुक्तता पहा हो तत्त्यागें ॥२६॥ नामरुपा एकपण । हेंचि माझें अनुष्ठान । तेणें तुष्टला जनार्दन । माझें मीपण तोचि जाहला ॥२७॥ जेवीं बाहुल्यांचें खेळणें । तेथ रुसणें आणि संतोषणें । हें खेळवित्याचें करणें । बाहुली नेणे तो अर्थ ॥२८॥ तेवीं माझेनि नांवें कविता । करुन जनार्दन जाहला वक्ता । यालागीं हें ग्रंथकथा । साधुसंतां पढियंती ॥२९॥ देह अहंता ग्रंथ करितां । एकही वोवी न ये हाता । येथ जनार्दन जाहला वक्ता । ग्रंथ ग्रंथार्था तेणें आला ॥१०३०॥ देखोनि मराठी गोठी । न म्हणावी वृथा चावटी । पहावी निजबोधकसवटी । निजात्मदृष्टीं सज्जनीं ॥३१॥ संस्कृत वंद्य प्राकृत निंद्य । हे बोल काय होती शुद्ध । हाही अभिमानवाद । अहंता बंध परमार्थी ॥३२॥ मोलें भूमि खणितां वैरागरीं । अवचटें अनर्घ्यरत्नो लाभे करीं । तें रत्नम सांपडल्या केरीं । काय चतुरीं उपेक्षा ॥३३॥ तेवीं संस्कृत आटाटी । करितां परमार्थीं नव्हे भेटी । तेचि जोडल्या मराठीसाठीं । तेथ घालिती मिठी सज्ञान ॥३४॥ चकोरां चंद्रामृतप्राशन । वायसां तेथें पडे लंघन । तेवीं हा महाराष्ट्र ग्रंथ जाण । फळाफळपण ज्ञानाज्ञानें ॥३५॥ देवासी नाहीं भाषाभिमान । संस्कृत प्राकृत दोनी समान । ज्या भाषा केलें ब्रह्मकथन । त्या भाषां श्रीकृष्ण संतोषे ॥३६॥ साजुक आणि सुकलीं । सुवर्णसुमनीं नाहीं चाली । तेवीं संस्कृत प्राकृत बोली । ब्रह्मकथेनें आली समत्वा ॥३७॥ संस्कृत भाषा निंदा केली । तरी ते काय पावन जाहली । प्राकृत भाषा हरिकथा केली । ते वृथा गेली म्हणवेना ॥३८॥ जंव जंव दृढ भाषाअभिमान । तंव तंव वक्त्यासी बाधक पूर्ण । ज्या भाषा केलें ब्रह्मकथन । ते होय पावन हरिचरणीं ॥३९॥ माझी मराठी भाषा उघडी । परी परब्रह्मेंसीं फळली गाढी । जे जनार्दनें लाविली गोडी । ते चवी न सोडी ग्रंथार्थ ॥१०४०॥ हे जनार्दनकवितावाडी । ब्रह्मरसें रसाळ गाढी । संतसज्जन जाणती गोडी । यालागीं जोडी जोडिला ग्रंथ ॥४१॥ उद्धवव्याजें स्वयें श्रीकृष्ण । वदला पूर्ण ब्रह्मज्ञान । येणें छेदूनि भवबंधन । दीनजन तरावया ॥४२॥ तो हा एकादशाऐसा ग्रंथ । जेथ ठाकठोक परमार्थ । येणें महाकवि समस्त । निजहितार्थ पावले ॥४३॥ पक्व फळीं शुक झेंपावे । तेथ मुंगीही जाऊनि पावे । तेवीं महाकवींचे घेऊनि मागोवे । मीही पावें प्राकृत ॥४४॥ महारायाच्या ताटापाशीं । रिगमु नाहीं समर्थांसी । तेथें सुखें बैसे माशी । तेवीं हा आम्हांसी प्राकृत ग्रंथ ॥४५॥ भोजनीं धरोनि बापाचा हात । गोड तें आधीं बाळक खात । तेवीं हा महाकवींच्या अनुभवांत । प्राकृतें परमार्थ मीही लाभें ॥४६॥ मी लाधलों सद्गुरुचरण । तेणें हें चालिलें निरुपण । बाप कृपाळु जनार्दन । ग्रंथ संपूर्ण तेणें केला ॥४७॥ म्हणाल पूर्ण जाहला परमार्थ । पुढें आहे महाअनर्थ । तैसा नव्हे गुह्यज्ञानार्थ । स्वयें श्रीकृष्णनाथ दावील ॥४८॥ माता पिता स्त्री पुत्र जन । जाती गोत सुहृद सज्जन । सकळ कुळासी येतां मरण । ममता श्रीकृष्ण कदा न धरी ॥४९॥ कृष्ण आज्ञा काळ वंदी माथां । एवढी हातीं असतां सत्ता । तरी कुळरक्षणाची ममता । श्रीकृष्णनाथा असेना ॥१०५०॥ ज्यासी देहीं निरभिमानता । ज्यासी बाधीना कुळाची ममता । ते देहींची निरहंकारता । श्रीकृष्ण आतां स्वांगें दावी ॥५१॥ तें ज्ञानपरिपाकनिर्वाण । अतिगोडीचें निरुपण । पुढिले दों अध्यायीं जाण । श्रीशुक आपण सांगेल ॥५२॥ ते ज्ञानगुह्य निजकथा । जनार्दनकृपा तत्त्वतां । एका जनार्दन वक्ता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥५३॥ जेथ संत अवधान देती । ते कथा वोढवे परमार्थीं । एका जनार्दनीं विनंती । अवधान ग्रंथार्थीं मज द्यावें ॥५४॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे एकाकारटीकायां परमार्थप्राप्तिसुगमोपायकथनोद्धवबदरिकाश्रमप्रवेशो नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]