इहवादी शासन/भारतांतील इहवादविरोधी शक्ति
Appearance
भारतांतील
इहवादविरोधी शक्ति
५
मुस्लिम
१
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या तेवीस वर्षांच्या काळांत राष्ट्रसंघटना, लोकशाही संरक्षणसामर्थ्य, यांपैकी कोठल्याच दृष्टीने भारताची प्रगति झालेली नाही. उलट अगदी उद्वेगजनक अशी परागतीच झालेली आहे. या परागतीला कोणत्या इहवाद- विरोधी शक्ति कारणीभूत झाल्या, त्या शक्तींनी इहवादी तत्त्वज्ञानाची गळचेपी कशी केली व भारताच्या रथाची गति कुंठित करून त्याला चढणीच्या ऐवजी घसरणीच्या मार्गाला कसें लावलें तें आता पाहवयाचें आहे. तें पाहतांना प्रथम मुस्लिम जमातीचा विचार करूं.
१२०६ सालीं हिंदुस्थानांत मुस्लिमांचें राज्य प्रस्थापित झालें. त्याच्या आधी महंमद कासीम याने ७११ सालीं सिंध प्रांत जिंकला होता व अकराव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षांत गझनीच्या महंमदाने दहा बारा स्वाऱ्या करून अपार लूट येथून नेली होती. पण त्यांपैकी कोणी भारतांत स्थिर राज्य स्थापिलें नव्हतें. शिहाबुद्दीन महंमद घोरी याने तें १२०६ साली स्थापन केलें व तेव्हापासून १७५० पर्यंत, मराठ्यांनी दिल्लीच्या मोगल बादशहाला निष्प्रभ करीपर्यंत, जवळ जवळ साडेपांचशे वर्षे उत्तर हिंदुस्थानांत तरी निदान मुस्लिमांची सत्ता अव्याहत चालू होती. या काळांत महाराष्ट्र व आंध्र येथेहि मुस्लिमांची सत्ता साडेतीनशे वर्षे होतीच. पुढच्या काळांत मोगल साम्राज्य बुडालें तरी अयोध्येचे नवाब, बंगालचे सुभेदार, हैदरावादचे निजाम आणि म्हैसूरचे हैदर व टिपू यांच्या सत्ता त्या त्या प्रदेशांत अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालू होत्या.
मुस्लिम सत्तेच्या या सहाशे वर्षांच्या काळाकडे पाहून, भारतीय समाजाच्या एकात्मतेच्या दृष्टीने विचार करतां, पहिली गोष्ट स्पष्ट दिसते ती ही की, भारतांतले मुस्लिम हे भारताशीं, येथल्या समाजाशीं, येथल्या संस्कृतीशीं कधीहि एकरूप झाले नाहीत. एवढेच नव्हे, तर हिंदु समाजाशी एकरूप होण्याचें त्यांनी कटाक्षाने, निर्धाराने टाळले आहे. अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, अरबस्तान, इजिप्त आदि देशांत व जगांत अन्यत्र जे जे मुस्लिम आहेत ते सर्व मिळून आपण एक मुस्लिम जमात, एक मस्लिम विश्व असेंच भारतीय मुस्लिम तेव्हापासून आजपर्यंत मानीत आलेले आहेत. विश्व- मुस्लिमवाद- पॅन इस्लामिझम्- हा शब्द अलीकडचा आहे. पण त्यांतील भावना जुनीच आहे.
'स्टडीज् इन् इस्लामिक कल्चर इन् दि इंडियन एन्व्हिरान्मेंट' या आपल्या लेखांत प्रा. अझीझ अहंमद म्हणतात की, अर्वाचीन परिभाषा वापरून बोलावयाचें तर दिल्लीचा सुलतान शमसुद्दीन अल्तमश (१२१०- १२३५) हा भारतांतील पहिला पॅन्इस्लामिस्ट होय. "जगांतील सर्व मुस्लिम हें स्वतंत्र मुस्लिम विश्व असून, बगदादचे आब्बासीद खलिफा हे त्याचे धार्मिक व राजकीय शास्ते होत" अशी त्याची श्रद्धा होती. तेथून पुढे तीनशे वर्षे भारतांतील मुस्लिम पातशहा किंवा सुलतान बगदादच्या वा तुर्कस्थानांतील कॉन्स्टान्टिनोपलच्या खलिफाचा शिक्का व त्याची मंजुरी आपल्या सत्तेला मिळविण्यांत भूषण मानीत असत.
वेगळेपणाची जाणीव
आपण भारतीय समाजाचे घटक नसून, मुस्लिम विश्वाचे घटक आहों, या वेगळेपणाच्या, पृथकतेच्या भावनेचीच जोपासना भारतीय मुस्लिम आज शतकानुशतकें करीत आहेत. अझीझ अहंमद म्हणतात, "भारताचा मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहास हा हिंदु-मुस्लिमांच्या धार्मिक व सांस्कृतिक तणातणीचा, तेढीचा, संघर्षाचाच आहे. समरसता, एकतानता, ऐक्य हीं अपवादात्मक." जदुनाथ सरकार, आर. सी. मुजुमदार यांचे याच अर्थाचे उतारे देऊन अझीझ अहंमद यांनी त्याला मान्यता दिली आहे. "मुसलमान हा हिंदुस्थानांत होता, पण तो हिंदुस्थानचा नव्हता," असें जदुनाथ म्हणतात आणि प्रा. मुजुमदारांनी म्हटलें आहे की, "हिंदू व मुस्लिम या दोन जमातींचा सण, उत्सव, चालीरीति यांद्वारा जो संपर्क आला तो वर्तुळाच्या परिघापुरताच होता. संस्कृतीचीं जीं प्राणभूत तत्त्वें त्यांचा अल्पांशहि एका जमातीने दुसरीचा घेतलेला नाही." आणि अशा रीतीने मुस्लिम हे भारतांत बव्हंशी परकीयच राहिले.
गेल्या शतकांत तुर्कस्थानचा सुलतान अब्दुल हमीद याने आपली जीर्ण प्रतिगामी सत्ता टिकविण्यासाठी पॅन इस्लामची चळवळ हेतुतः सुरू केली. तेव्हा भारतांतील मुल्ला-मौलवींनी तिला पाठिंबा देऊन, सर सय्यद अहंमद यांचे मुस्लिम समाजांत इहवादी तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. बंगालची फाळणी रद्द झाल्यापासून म्हणजे १९१२ नंतर भारतीय मुस्लिम शुक्रवारच्या प्रार्थनेंत खलिफाच्या नांवाने खुतवा वाचूं लागले. सर्व मुस्लिमांचा खलिफा हा शास्ता होय, हाच याचा अर्थ आहे.
इक्बाल हे प्रसिद्ध मुस्लिम कवि प्रथम राष्ट्रवादी होते. पण पुढे ते विश्व- मुस्लिमवादी झाले व राष्ट्रवादाचा निषेध करूं लागले. राष्ट्रनिष्ठा हें पाप होय असें मौ. मोदुदी आजहि सांगत आहेत रेडियन्स, दावत आदि मुस्लिम पत्रे, वर्ल्ड मुस्लिम कॉन्फरन्स, वर्ल्ड मुस्लिम लीग या विश्व-मुस्लिमवादी संस्थांची महती गाऊन आजहि त्यांच्या तत्त्वज्ञानाला पाठिंबा देतात. तेव्हा हें स्पष्ट आहे की, प्रारंभापासून आतापर्यंत साडेसातशे वर्षे भारतांत राहूनहि भारतीय समाजाचे आपण एक घटक आहोत, असें मानण्यास मुस्लिम तयार नाहीत. जदुनाथ सरकारांनी म्हटल्याप्रमाणे ते येथे राहतात पण येथले होत नाहीत.
असहिष्णु वृत्ति
भारतीय जीवनाशी समरस व्हावयाचें नाही एवढ्यावरच मुस्लिमांची विभक्त वृत्ति संतुष्ट राहिली नाही. या विभक्त वृत्तीचा दुसरा भाग म्हणजे हिंदूंशी हाडवैर धरावयाचें, त्यांना हीन, तुच्छ लेखावयाचें, त्यांना जीवन असह्य करून टाकावयाचे हा होता. मुस्लिमांत ही वृत्ति पोसण्याच्या कामांत सूफी पंथीय मौलवी हे अग्रेसर होते. अझीझ अहंमद म्हणतात, "मोइनुद्दीन चिस्ती या सूफी संताने भारतांत हिंदूंविरुद्ध आघाडी उभारून धर्मांतराच्या कार्याला चालना दिली." (पृष्ठ १३४).
सय्यद नुरुद्दीन गझनवी हा सूफी संत अल्तमशकडे शिष्टमंडळ घेऊन गेला व त्याने त्याला सांगितलें की, "हिंदूंना इस्लाम स्वीकार किंवा मृत्युदंड याशिवाय तिसरा पर्याय ठेवू नये आणि हें जमत नसेल तर पावलोपावलीं त्यांचा अपमान करावा, पाणउतारा करावा व त्यांना बदनाम करावें. कारण हिंदु हे पैगंबराचे व इस्लामचे कट्टे शत्रु आहेत." वराणी हा मुस्लिम इतिहासकार मोठ्या दुःखाने म्हणतो की, "आज महंमद गझनी नाही हें दुर्दैव होय. तो असता तर त्याने मुस्लिम होण्यास नकार देणाऱ्या सर्व हिंदूंची कत्तल केली असती."
फिरोझ तलख याने आपल्या चरित्रांत, आपण हिंदूंवर जिझिया कर कसा लादला, त्यांचा ठायीं ठायीं अपमान कसा केला, या भोगांना कंटाळून अनेक हिंदु मुस्लिम कसे झाले, हिंदूंची अनेक देवळें आपण जमीनदोस्त कशीं केलीं हें सर्व भूषण म्हणून आत्मचरित्रांत सांगितले आहे. लोदी, खिलजी या सुलतानांची हीच वृत्ति होती. अकबराच्या काळी, त्याच्या उदारमतवादी वृत्तीमुळे या मुसलमानी अत्त्याचारांना जरा खंड पडला होता. पण त्याच्या मागून वेताळ पुन्हा पूर्वस्थळावर आला. सूफी पंथांतील नक्षबंदी शाखेचा प्रसिद्ध मौलवी शेख अहंमद सरहिंदी हा या पक्षाचा प्रभावी नेता होय. "हिंदूंशी संपर्क ठेवणें हा इस्लामचा अपमान होय. हिंदु धर्म आणि इस्लाम हे ध्रुवभिन्न आहेत आणि हिंदु इस्लामचे हाडवैरी आहेत. तेव्हा हिंदूंशी पावलोपावलीं शत्रुत्व करणें हेंच खऱ्या मुस्लिमांचें कर्तव्य होय," अशी त्याचीं मतें होतीं. अकबराच्या उदार धोरणामुळे मुस्लिम लोक, दसरा, दिवाळी, शिवरात्र या हिंदूंच्या व नवरोजसारख्या पारशांच्या सणोत्सवांत मिसळू लागले होते. सरहिंदीने याचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जहांगीराचा प्रथम सरहिंदीला विरोध होता, पण लष्करावर व अनेक सरदारांवर त्याचा मोठा प्रभाव आहे हें ध्यानीं घेऊन त्याने तो विरोध मागे घेतला व स्वतःच त्या पंथांत तो सामील झाला. यामुळेच जहांगीवर व शहाजहान यांच्या कारकीर्दीत पुन्हा पहिले अत्याचार चालू झाले. सरहिंदीचे अनुयायी हे सर्व कडवे सुन्नी होते. त्यामुळे शियापंथीय मुस्लिमांचा ते भयंकर द्वेष करीत व त्यांच्यावरहि वरवंटा फिरवीत. स्वधर्मांतल्याच एका पंथाच्या अनुयायांशी सुद्धा ज्यांना सहजीवन वर्ज्य होते ते हिंदु समाजाशीं कसें हाडवैर धरीत असतील हें सांगण्याची गरज नाही.
सरहिंदीचा प्रभाव
सरहिंदीचा प्रभाव दिवसेदिवस वाढतच गेला आणि त्याच्या अंध, हेकट, पिसाट धर्ममतांचा औरंगजेबाच्या कारकीर्दीत कळस झाला. दारा शिकोह हा औरंगजेबाचा भाऊ फारच उदार मताचा होता. वेद, उपनिषदें या हिंदु धर्म-ग्रंथांचा त्याने अभ्यास केला होता आणि त्यांबद्दल त्याला आदरहि वाटत असे. पण त्यामुळेच औरंगजेब व त्याचे कट्टर अनुयायी सुन्नी सरदार यांचा त्याच्यावर भयंकर रोष होता. त्याला ठार मारून औरंगजेबाने गादी बळकावली आणि मग तघलख, लोदी यांनाहि लाजवील असे अत्याचारांचें थैमान त्याने मांडलें. साकी मुस्तांदखान हा औरंगजेबाचा समकालीन चरित्रकार 'मसिरी-इ-आलमगिरी' या आपल्या चरित्रांत म्हणतो की, "हिंदु हे इतक्या अवमानीत, हीन पातळीला पूर्वीच्या कोणत्याच राज्यांत गेले नव्हते." (इस्लाम इन इंडियन ट्रॅझिशन टु मॉडर्निटी- करंदीकर, प्रकरण चौथें).
सरहिंदीविषयी लिहितांना प्रा. अझीझ अहंमद म्हणतात की, "आज भारतांत इस्लामला जें दुराग्रही व जीर्णमतवादी रूप आले आहे तें त्या वेळीं सरहिंदीने स्वकालीन बुद्धिवाद व उदारमतवाद यांवर जो सहज विजय मिळविला त्याळेच होय. आज भारतीय मुस्लिम समाज सहजीवन विरोधी, सनातनी, सुधारणाद्वेषी, मनांत परिवर्तन मान्य असूनहि प्रत्यक्षांत आणण्यास न धजणारा व इतर संस्कृतीपासून विभक्त असा झाला आहे तो सर्व सरहिंदीच्यामुळेच होय. याचें कारण उघड आहे. अर्वाचीन भारतांतील सर सय्यद अहंमद, इक्बाल, अबुल कलम आझाद इत्यादि नेते केव्हा ना केव्हा तरी सरहिंदीच्या वर्चस्वाखाली आलेले होते. (इस्लामिक कल्चर, पृ. १३९).
धर्मयुद्धाची आज्ञा
औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य विस्कटलें, मोडकळीस आलें. मराठ्यांनी हिंदुस्थानांतील सर्व प्रदेशांत मुस्लिम सत्ता खिळखिळी करून शेवटीं नष्ट करून टाकली. याच काळांत उत्तर हिंदुस्थानांत शीख व जाट यांचा उदय होत होता. यामुळे मुस्लिम सत्ताच नव्हे, तर इस्लाम धर्मच नष्ट होणार अशी भीति मुस्लिमांना वाटू लागली. इस्लाम धर्मांत राजकारण व धर्म हे अविभाज्य आहेत. मुस्लिम समाज जेथे आहे तेथे मुस्लिमांचीच सत्ता असली पाहिजे असा इस्लामचा दंडक आहे. कांही कारणांनी ती सत्ता नष्ट झाली, तर परक्या सत्तेशीं जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पुकारून मुस्लिमांनी ती नष्ट केली पाहिजे आणि तो देश पुन्हा 'दार उल इस्लाम' (इस्लाम सत्तांकित) केला पाहिजे; आणि हें न जमलें, तर त्या देशाचा त्याग केला पाहिजे, अशी मुल्ला-मौलवींच्या मतें इस्लामची आज्ञा आहे. मोगल साम्राज्य विनाशपंथाला लागल्यानंतर येथल्या मुस्लिम नेत्यांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला.
२
अठराव्या शतकाच्या आरंभी अरबस्तानांत वहाब नांवाचा एक मुस्लिम धर्मनेता उदयाला आला. तो जीर्णमतवादी, दुराग्रही, परिवर्तनविरोधी व सुधारणाद्वेष्टा असा होता. सरहिंदीनंतर भारतीय मुस्लिमांवर त्याचें वर्चस्व प्रस्थापित झालें. या शतकांतील भारतीय मुस्लिमांचा नेता शहा वलीउल्ला, त्याचा मुलगा अब्दुल अझीझ, त्याचा नातू महंमद इशाक आणि त्याचा शिष्य सय्यद अहंमद बरेलवी (१७७६- १८३१) हे कमीअधिक प्रमाणांत वहाबीपंथी होते. वलीउल्ला प्रथम कांही प्रमाणांत परिवर्तन व सुधारणा यांना अनुकूल होता, पण भारतीय जनतेशीं मुस्लिमांनी कधीहि एकरूप होता कामा नये, हें त्याचें मुख्य सूत्र होतें.
डॉ. आय्. एच्. क्युरेशी म्हणतात, "हिदुस्थानांतील जीवनाशीं मुस्लिमांनी एकात्म होण्यास वलीउल्लांचा सक्त विरोध होता. सर्व बाहेरच्या मुस्लिम जगाशींच त्यांचे संबंध जागते राहिले पाहिजेत; तरच इस्लामचें खरें तेज, खरें सत्त्व त्यांच्या ठायीं जिवंत राहील, असें तो म्हणे." (करंदीकर, इंडियाज् ट्रँझिशन, पृष्ठ १२८) . भारतांत मुस्लिमांचा पराभव झाला तो हिंदूंशी संपर्क आल्यामुळे, त्या काफरांच्या संबंधामुळे, इस्लामला जें मालिन्य आलें त्यामुळे झाला, असें वलीउल्ला सांगत असे. थोडक्यांत म्हणजे मुस्लिम हे हिंदी झाले, भारतीय झाले हें इस्लामच्या सर्व अधःपाताचें कारण होय असें त्याचें मत होतें. त्यामुळेच या दोन जमाती पृथक्, अलिप्त व विभक्त राहिल्या पाहिजेत असा आयुष्यभर प्रचार करून त्याने अर्वाचीन काळांतल्या विभक्त वृत्तीचा पाया दृढ करून टाकला.
सुलतानांना निमंत्रण
भारतांत राहवयाचें, पण भारतीय कधीहि व्हावयाचें नाही, असें मुस्लिमांचें तत्त्वज्ञान असल्यामुळेच कोणत्याहि आपद्प्रसंगी ते भारतीयांना साह्यार्थ पाचारण न करतां भारतबाह्य मुस्लिम सुलतानांनाच आवाहन करीत. बाराव्या शतकांतील सूफी चिस्ती याने शिहाबुद्दीन घोरीला पाचारण केलें. बहुलोल लोदी याने अफगाण टोळ्यांना बोलावलें. त्याच प्रघातानुसार वलीउल्लाने अहमदशहा अब्दालीची प्रार्थना केली की, भारतांत येऊन त्याने इस्लामचें रक्षण करावें. त्याच्या मुलाचा शिष्य सय्यद अहंमद बरेलवी याने शिखांविरुद्ध जिहाद पुकारून अफगाण व पठाण टोळ्यांना असेंच निमंत्रण दिलें होतें. आज भारतामध्ये राहून, 'पाकिस्तान झिंदावाद' अशा घोषणा करून पाकिस्तानच्या साह्याची याचना करणारे मुस्लिम, तीच परंपरा पुढे चालवीत आहेत.
वलीउल्ला पंथीयांनी जी चेतावणी दिली तिचाच परिपाक म्हणजे सय्यद अंंमद बरेलवी याने पंजाबातील महाराजा रणजितसिंग यांच्याविरुद्ध केलेली उठावणी हा होय. सय्यद अहंमद याने कलकत्त्यापासून पेशावरपर्यंत जिहादचा पुकारा करून एक लाख मुस्लिम धर्मयुद्धासाठी उभे केले. पेशावरला आपले राज्य स्थापन केलें व तो स्वतः खलिफा झाला. पण अशा सर्व इस्लामी शक्तीसह तो रणजितसिंहावर चालून गेला असतांनाहि शिखांनी त्याच्या सेनेचें निर्दालन केलें व त्याला बालाकोटच्या लढाईत ठार मारलें (१८३१). पण वलीउल्लापंथी व वहाबीपंथी लोक स्वस्थ बसले नाहीत.
इंग्रजांनी पुढे शिखांचें राज्य नष्ट केलें तरी मुस्लिम सत्ता नष्ट झाल्यामुळे भारत हा 'दार उल् हरब'च राहिला. तो 'दार उल इस्लाम' होईपर्यंत जिहाद चालू ठेवलेंच पाहिजे अशी इस्लामची आज्ञा आहे, हें तर वहाबीपंथाचें मुख्य सूत्र. त्याप्रमाणे इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांनी १८६५ सालापर्यंत अनेकदा उठावणी केली. १८५७ सालीं स्वातंत्र्ययुद्धांत मुस्लिम सामील झाले होते ते याच प्रेरणेने. त्या युद्धाच्या उठावणीचें कार्य हिंदु-मुस्लिम दोन्ही जमातींनी केलें होतें. पण विजयानंतर सत्ता दिल्लीच्या पातशहाचीच राहवयाची होती. त्यामुळे भारत हा 'दार उल इस्लाम' होणार होता. पण त्या युद्धांत पराभव झाला; आधीच्या व नंतरच्या वहाबीयांच्या बंडाळ्या इंग्रजांनी क्रूरपणें निकालांत काढल्या आणि मुस्लिम हे आपले हाडवैरी आहेत हे जाणून त्यांची सत्ता, धनदौलत, त्यांचें वर्चस्व यांचा नायनाट करून टाकला.
याच वेळीं सर सय्यद अहंमद खान यांचा उदय झाला. त्यांनी इंग्रजी सत्ता, पाश्चात्त्य विद्या व धर्मपरिवर्तन यांसाठी मुस्लिमांची मनें वळविली आणि इंग्रजी सत्ता ही परकी सत्ता असली, तरी त्या सत्तेखालीहि भारत हा 'दार उल इस्लाम'च आहे, इंग्रजांना शत्रु मानून या देशाला 'दार उल हरव' मानण्याचें कारण नाही, अशी विचारसरणी मुस्लिम समाजांत प्रसृत केली.
निराळी विचारसरणी
येथून पुढे भारतांतील मुस्लिमांच्या राजकारणाचें दुसरें पर्व सुरू झालें. त्याचा विचार पुढे येणारच आहे. येथे भारतीय मुस्लिमांच्या विभक्त वृत्तीविषयी जीं मतें मांडलीं आहेत त्यांहून निराळी अशी एक विचारसरणी प्रचलित आहे. तिचा परामर्श घेऊन हें पहिले विवेचन संपवू.
प्रा. हुमायून कबीर व प्रा. अबीद हुसेन यांनी आपल्या 'दि इंडियन हेरिटेज' व 'दि नॅशनल कल्चर ऑफ इंडिया' या ग्रंथांत ही विचारसरणी विस्ताराने मांडली आहे. त्यांच्या मतें मुस्लिम भारतांत आल्यानंतरचा हजार वर्षांचा इतिहास हा दोन्ही जमातींच्या स्नेहाचा, सौहार्दाचा, सहकार्याचा व एकात्मतेचा आहे. युद्धे झाली, लढाया झाल्या, रक्तपात झाले, संघर्ष झाले; पण हें सर्व अपवादात्मक होय. इतिहासकारांनी त्यावरच सर्व भर दिल्यामुळे तें चित्र विकृत दिसतें. पण तें खरें नाही. सध्याची भारताची संस्कृति ही मुस्लिमांची वा हिंदूंची नाही. ती हिंदुस्थानी म्हणजे संमिश्र संस्कृति आहे. गणित, वैद्यक, ज्योतिष या विद्या भारतांत प्रगत झाल्या होत्या. अरब व इतर मुस्लिम राष्ट्र यांवर त्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छाप होती. आठव्या- नवव्या शतकांत दक्षिण भारतांत शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान व भागवतांचा भक्तिपंथ यांच्यामागे इस्लामची प्रेरणा होती. चित्र, शिल्प, संगीत या कलांच्या वाबतींत अशीच देवाण- घेवाण झालेली आहे. सूफी पंथाने धर्माच्या बाबतींत हिंदु धर्मं व इस्लाम यांच्यांत समन्वय साधून एकात्मतेला फार मोठें साह्य केलें. रामानंद, कबीर, नानक, चैतन्य, मोइउद्दीन या धर्मधुरीणांनी सूफी पंथाचेंच कार्य पुढे चालवून दोन्ही जमातींना एकजीव करून टाकलें. त्यांच्यांत लढाया झाल्या त्या हुमायून कबीर यांच्या मतें आर्थिक व राजकीय कारणांनी झाल्या. धार्मिक कारणें त्यामागे मुळीच नव्हतीं, तशींच जातीय कारणेंहि नव्हतीं. हिंदु-मुस्लिम यांचे लढे होत तसे हिंदु- हिंदूंत व मुस्लिम- मुस्लिमांतहि होत. तेव्हा त्यावरून या जमातींत धार्मिक वैर होतें, असें म्हणतां येणार नाही. म्हणूनच असें म्हणतां येतें की, या जमातींचा इतिहास हा ऐक्याचा, सातत्याचा, समन्वयाचा, एकात्मतेचा आहे.
या दोन्ही लेखकांचीं काव्यमय पुस्तकें वाचून मनाला मोठा विस्मय वाटतो. वरील काळाचा इतिहास लिहिणारांनी भर कशावर दिला हा विचार बाजूला ठेवला तरी, त्यांनी दिलेल्या घटना आणि मुस्लिम सुलतान, मोगल पातशहा, मुल्ला- मौलवी यांचीं आत्मचरित्रे, त्यांचीं पत्रें, त्यांची फर्मानें यांवरून जो इतिहास वाचकांना दिसतो तो स्नेहाचा, सहकार्याचा व एकात्मतेचा होता हें म्हणणें अत्यंत धाष्ट्र्यांचें वाटतें. या साहित्यावरून दिसून येणारे अत्याचार, विध्वंस, जाळपोळ, लूट, बलात्कार, त्यांतील कत्तली, हत्याकांडे, जबरीचीं धर्मांतरें, यांना जर अपवादात्मक म्हणावयाचें असेल, तर प्रा. कबीर व प्रा. हुसेन यांचा अपवाद शब्दाचा अर्थ फार निराळा असला पाहिजे.
हे कशाचे लक्षण ?
हिंदू व मुस्लिम यांच्या शिल्पकलेचा एकमेकांवर परिणाम झाला असेल, शतकांच्या सान्निध्यामुळे तो अपरिहार्यच आहे; पण उत्तर भारतांतील देवळें, लेणीं, समाधि-मंदिरें, राजवाडे यांतील प्रत्येक मूर्ति, प्रत्येक कलाकृति ही फुटलेली. तुटलेली आहे हें स्नेह, सौहार्द, धार्मिक सहिष्णुता यांचेंच लक्षण काय ? भारतांतले मठ, विद्यापीठांतलीं ग्रंथालये यांचा विध्वंस, त्यांची जाळपोळ ही कशाची साक्ष आहे ? मुस्लिम उदारमतवादाची ?
सूफी पंथाच्या समन्वयाच्या कार्याचें आज जें महत्त्व गाइलें जातें तें असेंच अतिरेकी आहे. प्रारंभापासून सूफी हे हिंदूंचे व हिंदु धर्माचे हाडवैरी होते. चिस्ती व गझनवी यांची उदाहरणें वर दिलींच आहेत. अकबराच्या सहिष्णुतेचा, समन्वयाचा, उदारमतवादित्वाचा ठावठिकाणाहि पुसून टाकण्याचें कार्य नक्षबंदी या सूफी पंथानेच केलें. आपल्या ग्रंथांत प्रा. अझीझ अहंमद यांनी 'नक्षबंदी रीॲक्शन' या प्रकरणांत याचें सविस्तर वर्णन केलें आहे. आणि सूफींच्या समन्वयाच्या कार्याचीं वर्णनें हीं अतिरेकी एकांतिक व अवास्तव आहेत, हें प्रा. मुजुमदार यांचें मतच सत्याच्या जास्त जवळ आहे, असा आपला अभिप्राय दिला आहे.
हिंदुधर्मांतील भक्तिमार्ग व सूफींचा भक्तिमार्ग यांच्यांतील साम्याचें व तज्जन्य सहजीवनाचें नेहमी वर्णन केलें जातें. पण भारतांत भक्तिमार्गाला चौदाव्या, पंधराव्या शतकांत जी जोराची चालना मिळाली ती सूफींच्या धर्मातराच्या चळवळीला प्रत्युत्तरें देण्याच्या हेतुमुळे मिळाली हें लक्षांत ठेवले पाहिजे. (अझीझ अहंमद, पृष्ठ १३६).
एका धर्मांतराचाच फक्त विचार केला तरी हिंदु-मुस्लिमांच्या सहजीवनाच्या, एकात्मतेच्या, सौहार्दाच्या कल्पना किती असत्य, किती विपर्यस्त आहेत तें सहज कळून येईल. अनेक मुस्लिम सुलतान, सरदार, मुल्लामौलवी हे काफरांना इस्लामची दीक्षा देणें, हें पुण्यकर्म मानीत असत. आणि सक्तीने, दहशतीने, भल्याबुऱ्या मार्गांनी त्यांनी हें कार्य अखंड चालू ठेवलेलें होतें. पण हिंदूंनी मुस्लिमांनाच नव्हे, तर बाटलेल्या हिंदूंना सुद्धा परत स्वधर्मांत घेणें हें मात्र कोणालाहि मान्य नव्हतें. त्या अपराधाला देहदंडाचीच शिक्षा होती आणि असें असतांना मुस्लिम सुलतान हे सहिष्णु होते, मुस्लिमेतरांना त्यांनी धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य दिलें होतें असें अनेक विद्वान् सांगतात ! जे हिंदु बाटणार नाहीत त्यांच्यावर जिझिया कर लादला जात असे. प्रा. हुसेन यांच्या मतें जिझिया कर लादण्याचा सुलतानांना अधिकार नव्हता. त्यामुळे हिंदूंचा स्वाभिमान दुखावला जात असे. नोकरीच्या दृष्टीनेहि हिंदु-मुस्लिमांत सुलतान भेदभाव करीत, असे स्वतःच लिहून पुन्हा हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य होते, मुस्लिम सुलतान न्यायाने राज्य करीत, असे त्यांनी म्हटलें आहे.
भारतीय संस्कृति ही केवळ हिंदूंची संस्कृति नाही, ती हिंदु-मुस्लिमांची समाईक, संमिश्र संस्कृति आहे. ती वेद, उपनिषदे, महाभारत यांनी प्रथम घडविली व पुढील काळांत भारतांत आलेल्या सर्व जमातींनी ती हिंदूंप्रमाणेच विकसित केली, असें हुमायून कबीर, अबीद हुसेन, डॉ. ताराचंद या पंडितांचें म्हणणें आहे. प्रश्न एकच आहे. वेदकाळापासून चालत आलेली भारतीय संस्कृति ही आपली आहे, आपण तिचे वारस आहोंत असें मुस्लिम समाज मानतो का ?
ऐक्यभावना, सौहार्द, एकात्मता यांचा हा निकष आहे. तेव्हा मुस्लिम समाज भारतीय जीवनाशीं कधीहि एकात्म झाला नाही हा सिद्धान्त पारखून घेतांना पंडितांची मतें न पाहतां, हा निकष लावून निर्णय केला पाहिजे.
३
भारतांतील मुस्लिम भारतीय जीवनाशी केव्हाही समरस झाले नाहीत, विश्व-मुस्लिमवादाच्या काल्पनिक, भ्रांत जगांतच ते राहिले, याचें प्रधान कारण, म्हणजे त्या समाजावरील मुल्ला-मौलवींचें वर्चस्व हे होय. हे मुल्ला-मौलवी अरबस्तान, तुर्कस्तान, इराण या देशांतल्या मौलवींप्रमाणेच जीर्णमतवादी, शब्दनिष्ठ, हेकट व दुराग्रही होते. त्यामुळे इस्लाममध्ये परिवर्तन, प्रगति, सुधारणा, नवचैतन्य हे सर्व अशक्य होऊन बसलें व भारतीय इस्लामला अगदी मलिन रूप आलें.
कांही मुस्लिम पंडितांच्या मतें, भारतांत इस्लाम आला तोच मुळी मलिन रूपांत आला. प्रा. अबीद हुसेन यांच्या मतें, महंमद पैगंबर व चार खलिफा यांच्या कारकीर्दीतच फक्त म्हणजे पन्नास-साठ वर्षेच खरें इस्लामिक शासन व इस्लामी संस्कृति टिकली. पुढे तिच्यांतील समता, लोकशासन, बुद्धिप्रामाण्यवाद हीं मूलतत्त्वें नष्ट झाली. चार खलिफानंतरची उमायाद खिलाफत व आव्वासीद खिलाफत या पूर्ण नव्हे, तरी निदान अंशत: तरी इस्लामी होत्या. पण आव्वासीद खिलाफतीनंतर जीं मुस्लिम शासनें झालीं त्यांच्या ठायीं राजकीय वा सांस्कृतिक दृष्टीने पाहतां इस्लामचा आत्मा मुळीच नव्हता.
हिंदुस्थानांतील दिल्लीची सुलतानसत्ता (सलतनत) ही अशीच होती. ते सुलतान व त्यांची शासनें अनिस्लामी होती. त्या शासनांत सर्व प्रकारची विषमता मुस्लिम-मुस्लिमांतहि होती. आर्थिक क्षेत्रांत, नीतीच्या क्षेत्रांत ते इस्लामी बंधनें धिक्कारून पुष्कळ वेळा लहरीप्रमाणे वागत. त्यांची सत्ता पूर्ण अनियंत्रित व विषम होती. तेव्हा दिल्ली सल्तनत हें मर्यादित अर्थानेहि इस्लामी राज्य नव्हतें. (नॅशनल कल्चर ऑफ इंडिया, पृष्ठे ८० ते ९०).
पोथीबद्ध अवस्था
भारतांतील आरंभापासून अखेरपर्यंतचे मुस्लिम शास्ते, अकबर व झनल अबीदिन हा काश्मीरचा सुलतान असे कांही अपवाद वगळतां, पुराणमतवादी, हट्टाग्रही अशा मुल्ला-मौलवींच्या छायेखालीच होते. मुईनुद्दीन चिस्ती, नुरुद्दीन गझनवी, सरहिंदी, वलीउल्ला, शहा अदब्दुल अजीज या नाममालिकेचा उल्लेख कारणपरत्वें वर आलाच आहे. हे व यांचे अनुयायी व त्यांच्या तंत्राने वागणारे सुलतान यांनी इस्लाम हा कायमचा पोथीबद्ध, कर्मकांडात्मक, परिवर्तनशून्य, अंधश्रद्ध, असा करून ठेवला. त्यामुळे त्याला इहवादी रूप देणें कोणालाहि शक्य झालें नाही. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरांत त्याच्या नेत्यांचा पराभव होऊन इंग्रजांची सर्वंकष सत्ता भारतांत प्रस्थापित होईपर्यंत, भारतांतील मुस्लिम समाज याच पोथीबद्ध अवस्थेत होता. तेथून पुढला शंभर-सव्वाशे वर्षांचा भारतांतील इस्लामचा इतिहास हा सर सय्यद अहंमद यांचा 'अलीगड पंथ' व मौ. महंमद कासीम नानवटवी यांचा 'देवबंद पंथ' यांचा इतिहास आहे.
विश्व- मुस्लिमवाद, ब्रिटिश राज्यकर्त्यांशी एकनिष्ठा, धर्माची अपरिवर्तनीयता, शरीयत या मुस्लिम कायद्यावरील अंधश्रद्धा या बाबतींत या दोन पंथांत तीव्र मतभेद होते. पण भारतीयांशी एकात्म व्हावयाचें नाही, भारतांत राहूनहि विभक्त वृत्तीच जोपासावयाची, मुस्लिमेतर समाजाशी शत्रुभावच ठेवावयाचा यांविषयी मात्र दोन्ही पंथांचं पूर्ण मतैक्य होतें. यामुळे लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, इहवाद, सर्वधर्मसमानत्व, बुद्धिप्रामाण्य हीं जीं भारतीय नेत्यांनी नवसमाजनिर्मितीसाठी अंगीकारलेलीं तत्त्वें, त्यांना भारतांतील मुस्लिम समाज सतत विरोधच करीत राहिला. येथला मुस्लिम समाज ही एक इहवादविरोधी शक्ति आहे असें प्रारंभी म्हटलें आहे त्याचें हें कारण आहे.
दुर्दैवाने मुस्लिम सत्तेच्या व ब्रिटिशांच्या कारकीर्दीप्रमाणेच स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळांतहि ती शक्ति त्याच रूपांत भारतांत उभी आहे. भारतीय लोकसत्ताक शासनाच्या व भारतीय राष्ट्राच्या घडणींत ती कधीहि सहकार्य करणार नाही. म्हणून तिचें स्वरूप आपल्या इहवादी प्रजासत्ताकाची चिंता वाहणाऱ्यांनी अगदी स्पष्टपणें समजून घेतले पाहिजे. गेल्या लेखांत येथल्या मुस्लिमांचा प्रारंभां- पासूनचा इतिहास दिला आहे याचें हेंच कारण आहे. आज भारतांतील मुस्लिम समाजाची जी वृत्ति आहे, जी विचारसरणी आहे, जें तत्त्वज्ञान आहे त्याचीं पाळेमुळे बाराव्या-तेराव्या शतकांत आपल्याला दिसतात.
फाळणीची प्रस्तावना
'दि ग्रेट डिव्हाईड' या आपल्या पुस्तकांत एच्. डी. हॉडसन या इंग्रज लेखकाने तर म्हटलें आहे की, "हिंदुस्थानची १९४७ साली फाळणी झाली त्या कथेची प्रस्तावना महंमद गझनीने १०१८ सालीं पंजाब जिंकला तेव्हाच लिहिली गेली होती. या पुस्तकाचें 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये परीक्षण लिहिणारे श्री. गोपाळ कृष्ण तर म्हणतात, "माझ्या मतें या प्रस्तावनेचा सन ७११ हा आहे. येथले जमातीय शत्रुत्व तेव्हापासून अटळ झालेले आहे." (टाइम्स दि. १०- २- १९७०). भारतांत अजून पांच-सहा कोटि मुस्लिम आहेत आणि भारताला इहवादी शासन तर यशस्वी करावयाचें आहे. तेव्हा या प्रचंड अल्पसंख्य जमातीची वृत्ति मूलतः तपासून ही विरोधी शक्ति अनुकूल कशी करून घेतां येईल याचा विचार भारताच्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. त्याच दृष्टीने ब्रिटिशपूर्व काळाचा मुस्लिम इतिहास आपण पाहिला आणि त्याच दृष्टीने आता नंतरचा इतिहास हा तपासावयाचा आहे.
सर सय्यद अहंमद हे सुधारणावादी, परिवर्तनवादी व बुद्धिवादी होते. पाश्चात्त्य विद्या आत्मसात केल्यावांचून भारतीय मुस्लिमांची प्रगति होणार नाही, असें त्यांचें मत होतें. आपल्या या मताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी कुराणावर नवें भाष्य लिहिलें, 'सायंटिफिक सोसायटी' नांवाची संस्था स्थापिली व अनेक इंग्रजी ग्रंथांचें भाषांतर करवून घेतलें. अलीगड येथे १८७५ साली त्यांनी कॉलेज स्थापन केलें तें पाश्चात्त्य विद्या व सुधारणावाद मुस्लिमांत रुजविण्याच्या हेतूनेच होय. त्या काळापर्यंत भारतीय मुस्लिम वहाबी पंथ व वलीउल्ला यांच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे, ते इंग्रजी भाषा, इंग्रजी विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांचा कडवा द्वेष करीत. त्यांच्या प्रसारामुळे इस्लाम धर्म नष्ट होईल, इंग्रजांचा तसा हेतूच आहे, असें त्यांना वाटे.
वर उल्लेखिलेला देवबंद पंथ हा वहाबी परंपरेंतील व त्यामुळे पाश्चात्त्य विद्येचा द्वेष्टा होता. इ. स. १८६७ साली उत्तर प्रदेशांतील देवबंद या गावीं मौ. नानवटवी यांनी हा पंथ स्थापिला. इंग्रजी विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांविषयी देवबंद पंथाची दुर्दैवाने आजहि तीच वृत्ति आहे. या वृत्तीमुळेच सर सय्यद अहंमद यांचें व या पंथाचें प्रारंभापासूनच वैमनस्य आहे. या पंथाने त्या वेळीं सर सय्यद यांच्यावर त्यांच्या नवमतवादामुळे प्रखर टीका केली. पण त्यांनी ती न जुमानता आपलें कार्य अखंडपणें व निष्ठेने चालविलें.
ब्रिटिशनिष्ठेचे पुरावे
या कामी त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांचें फार साह्य झालें. १८५७ च्या युद्धांत सहभागी झाल्यामुळे मुस्लिमांवर इंग्रजांनी दात धरला होता. हिंदु हे आपल्या राज्याचे मित्र व मुस्लिम हे शत्रु असें ते मानीत. पण सर सय्यद यांनी नाना मार्गांनी मुस्लिमांच्या ब्रिटिशनिष्ठेचे पुरावे देऊन इंग्रजांची भूमिका संपूर्णपणें पालटवून टाकली व मुस्लिमांच्या प्रगतीला इंग्रज राज्यकत्यांचें हार्दिक साह्य मिळविलें. वहाबीपंथीय व म्हणूनच देवबंदपंथीय लोक हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य असल्यामुळे हा देश म्हणजे 'दार उल हरव'- शत्रुदेश- मानीत. पण सर सय्यद व त्यांचे नबाब अब्दुल लतीफ यांसारखे मित्र यांनी उलेमा, मुल्ला-मौलवी यांचीं मतें वळवून हिंदुस्थान 'दार उल हरव नाही, दार उल इस्लाम आहे' असा फतवा त्यांच्याकडून काढविला.
'विश्व- मुस्लिमवाद- पॅन् इस्लामिझम्'- यालाहि सर सय्यद यांचा विरोध होता. त्यामुळे ते ब्रिटिशांना जास्त प्रिय झाले. युरोपांत तुर्की सुलतानाशीं इंग्रजांचे संबंध केव्हाच बरे नव्हते. पण तुर्की सुलतान हा सर्व मुस्लिम जगताचा खलिफा मानला जात असे. या खलिफापदाला व विश्व- मुस्लिमवादाला प्रत्यक्षांत भरीव अर्थ कधीहि नव्हता व नाही. कारण खलिफांची सत्ता तुर्कस्तानांत सुद्धा तरुण तुर्क व त्यांचे अनुयायी मानीत नसत. साम्राज्यांतील इतर लोक त्यांच्या जुलमी सत्तेला कंटाळलेच होते. पॅन् इस्लामिझमचेंहि तसेंच आहे. सर्व मुस्लिम विश्व एक होऊन त्या मुस्लिमांनी एका सामुदायिक ध्येयासाठी कधी दृढ संघटन केलें आहे व कांही फार मोठे कार्य साधलें आहे, असें इतिहासांत कधीहि घडलेलें नाही. पण खिलाफत व विश्व- मुस्लिमवाद यांचा जगांतले धूर्त राजकीय नेते मात्र हवा तसा उपयोग आजपर्यंत (रावात परिषदेपर्यंत) करून घेत आलेले आहेत.
१८७६ सालीं खलिफा असलेला अब्दुल हमीद याने या दोन्ही कल्पना आपल्या स्वार्थासाठी चांगल्याच राबविल्या होत्या आणि मुस्लिम जगत् हें त्या काळापर्यंत पाश्चात्त्य विद्याविमुख, पोथीनिष्ठ व परिवर्तनविरोधी असल्यामुळे त्याला कांही काळ यशहि आलें. पण सर सय्यद हे नवमतवादी व बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे त्यांनी तुर्की खलिफाची धार्मिक सत्ता व त्याचा विश्व- मुस्लिमवाद यांना आपल्या मनांत कधीहि थारा दिला नाही. ते म्हणत, "आम्हीं हिंदी मुस्लिम तुर्की खलिफाचे प्रजाजन नाही, आम्ही राणीचे प्रजाजन आहों. तुर्की सुलतानाची सत्ता त्याच्या देशापुरती मर्यादित आहे." १८९६ साली ग्रीस व तुर्कस्तान यांची लढाई जुंपली. त्या वेळीं इंग्रजांनी ग्रीकांची बाजू घेतली. देवबंद पीठाने या वेळीं ब्रिटिशांविरुद्ध मुस्लिमांना खूप चिथविलें. पण सर सय्यद यांची राजनिष्ठा ढळली नाही. त्यांनी पत्रके काढून ब्रिटिशांचेंच समर्थन केलें.
विभक्ततेचा आग्रह
सर सय्यद अहंमद यांची ही विचारसणी पाहिली म्हणजे भारतांतील हिंदु- मुस्लिम ऐक्याचे, त्यांच्या सहजीवनाचे ते खंदे पुरस्कर्ते असतील असें वाटतें. पण वस्तुस्थिति याच्याबरोबर उलटी होती. हिंदू व मुस्लिम हीं दोन स्वतंत्र राष्ट्र आहे असें मत मांडून, पाकिस्तानचा पाया त्यांनीच घातला होता, असें इतिहास सांगतो. काँग्रेस अखिल भारतीयांची, तेथील सर्वधर्मीयांची, सर्व जातिजमातींची आहे, असें तत्त्व तिच्या चालकांनी प्रारंभापासूनच उद्घोषिलें होतें. पण अशी संस्था यशस्वी होऊच शकणार नाही, असें सर सय्यद यांचें ठाम मत होतें व आपल्या भाषणांतून, लेखनांतून ते त्याचा हिरीरीने पुरस्कार करीत असत. त्यांचीं मतें प्रारंभापासूनच अशी होती. इंग्रजांनी फोडा व झोडा या नीतीचा अवलंब केला नाही यावद्दल त्यांनी १८५८ सालींच सरकारवर टीका केली होती. हिंदु व मुस्लिम या दोघांना लष्करांत एकाच पलटणींत घातल्यामुळे त्यांच्यांत बंधुभाव वाढतो, तो इंग्रजांना घातक होय, तोच १८५७ साली घातक ठरला, असें सांगून त्यांनी यांच्या स्वतंत्र पलटणी ठेवाव्या असा इंग्रजांना उपदेश तेव्हाच केला होता. (करंदीकर, इंडियाज् ट्रँझिशन, पृष्ठ १५७).
तेथून पुढील तीस वर्षांच्या काळांत सर सय्यद यांची वृत्ति राष्ट्रीय झाली होती, ते हिंदु-मुस्लिम ऐक्याचे, एकराष्ट्रीयत्वाचे पुरस्कर्ते झाले होते असें म्हणतात. तशी त्यांचीं कांही वचनें सापडतातहि. 'जो हिंदुस्थानांत राहतो तो हिंदु' या न्यायाने मी हिंदूच आहें, असेंहि त्यांनी म्हटलें होतें. पण या वृत्तीचा पुढे लोप होऊन ते विभक्त वृत्तीचे कडवे पुरस्कर्ते झाले. अलीगड कॉलेजचे पहिले प्रिंसिपॉल बेक व एकंदर इंग्रज राज्यकर्ते यांची भेदनीति ही याला कारण आहे, असें सांगितलें जातें. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत अनेक राजकीय पुढाऱ्यांनी व पंडितांनी हिंदु-मुस्लिम समस्येची या दृष्टिकोनांतून मीमांसा केली होती. या दोन जमातींच्या वैमनस्याला इंग्रजांची भेदनीति कारण आहे, वस्तुतः त्यांचा पूर्वीचा इतिहास सहजीवनाचा, सामरस्याचा, एकात्मतेचा आहे, असा विचार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासारख्यांनीहि मांडला आहे. (इंडिया डिव्हायडेड, पृष्ठ ८३). पण ब्रिटिश गेले, पाकिस्तान झालें, तरी भारतांतील या दोन जमातींचें वैर अणुमात्र कमी न होतां तें वाढतच चाललें आहे. त्यामुळे आता उपरोक्त पंडितांपैकी अनेकांनी आपला भ्रमनिरास झाल्याचें जाहीरपणें सांगितलें आहे. याच दृष्टीने आपण सर सय्यद यांच्या कार्याकडे पाहिले पाहिजे.
ब्रिटिशांनी सर सय्यद यांना फितविलें व पुढे शेवटपर्यंत भेदनीतीचेंच धोरण अवलंबून या दोन जमातींतील वैराग्नि सतत भडकत ठेवला हें खरें. पण तो वैराग्नि तेथे होता आणि मुस्लिम जमातीने तो सतत सातशे वर्षे जिवंत ठेवला होता, हे आपण विसरतां कामा नये. प्राचीन काळच्या आणि ब्रिटिशांच्या काळच्या इतिहासांत हिंदु-मुस्लिम ऐक्याची उदाहरणें सापडत नाहीत असें मला मुळीच म्हणावयाचें नाही. सूफी पंथाने दोन्ही धर्मातील तत्त्वांच्या समन्वयाचा केलेला प्रयत्न, चित्र, संगीत, शिल्प आदि कलांत दोन्ही जमातींच्या कलांचा झालेला संगम, अनेक प्रांतांत दोन्ही जमातींच्या आचार-विचारांत निर्माण झालेलें सादृश्य, हें सर्व ऐतिहासिक सत्य आहे, यांत मुळीच शंका नाही. पण यामुळे हिंदु-मुस्लिम या जमाती एकराष्ट्रीयत्वाच्या नजीक आल्या होत्या, त्यांच्यांतील भेदाच्या, विभक्ततेच्या, वैराच्या वृत्ति लोपल्या होत्या असें मात्र मुळीच म्हणतां येत नाही. तशा त्या लोपल्या असत्याहि. पण सरहिंदी, वहाबी, वलीउल्ला व एकंदर मुल्ला-मौलवी यांनी त्या हेतुपूर्वक जिवंत ठेवल्या होत्या आणि बहुसंख्य मुस्लिम समाज त्यांचाच अनुयायी असल्यामुळे या दोन जमातींची एकात्मता अशक्य होऊन बसली.
अकबर, दाराशिकोह यांनी एकात्मतेचे विपुल प्रयत्न केले होते. मुस्लिम जनतेंत कायमचा द्वेषभाव नसता, तर ते त्याच वेळीं विजयी झाले असते. पण अकबराच्या उदार विचारांचा पुढील काळांत मुल्ला-मौलवींनी ठावठिकाणाहि पुसून टाकला व औरंगजेबाने दाराला ठार मारले तेव्हा त्यांनी त्याला धन्यवाद दिले. आज अकबराचा गुणगौरव केला जातो, पण तो कोण करतो ? फक्त हिंदु त्याचा गौरव करतात ! देवबंद पीठ त्याला मूर्ख, कमअस्सल व व्यवहारशून्य म्हणतें आणि अकबरासारखे विचार राष्ट्रपति झकीर हुसेन यांनी मांडले म्हणून त्यांचीहि त्याने तशीच संभावना केली आहे. (केसरी, दि. १७-२-१९६९, देशपांडे).
भ्रान्त मीमांसा
१०१८ सालींच पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला असें हॉडसन म्हणतात तें अगदी खरें आहे. तें अपरिहार्य होतें असें मात्र नाही. मुस्लिम समाजधुरीणांनी भारताला मातृभूमि मानली असती तर, तें टळलें असतें. पण येथे राहवयाचें पण भारतीय व्हावयाचे नाही, असें त्यांचें तत्त्व होतें व तें त्यांनी अखिल मुस्लिमांत रुजविलें होतें. त्यांतहि हिंदुसमाज संघटित, इहवादी व त्यामुळे बलशाली असता तरीहि हा अनर्थ टळला असता. अजूनहि तो तसा झाला तर भावी अनर्थ टळतील. पण त्यासाठी मुस्लिमांची शतकानुशतकांची वृत्ति काय आहे, त्यांचें तत्त्वज्ञान काय आहे हें त्याने जाणलें पाहिजे व केवळ इंग्रजांच्या भेदनीतीमुळे हें झालें, पूर्वकाळीं हे दोन समाज एकात्म झाले होते, अशा भ्रांत मीमांसांच्या आहारीं जातां कामा नये. गेल्या दीडशे वर्षांत भारताचा धर्म, राजकारण, समाजजीवन, कला, साहित्य यांवर ब्रिटिशांच्या धर्म, कला, साहित्याचा थोडा का परिणाम झाला आहे ? प्रत्येक क्षेत्रांत ब्रिटिश तत्त्वज्ञानामुळे आमूलाग्र फरक झाला आहे. तरी त्यामुळे ब्रिटिश व भारतीय हे दोन समाज एकजीव झाले आहेत, असें क्षणभर तरी म्हणतां येईल काय ?
सर सय्यद यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्यापासून मुस्लिमांना परावृत्त करण्याचे प्रयत्न केले, तरी प्रारंभी ते तितके यशस्वी झाले नाहीत. बद्रुद्दीन तय्यबजीं- सारखे लोक पूर्ण काँग्रेसनिष्ठ होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रारंभी काँग्रेसमध्ये हिंदु आठशे-हजार असले, तर मुस्लिम तीनशेपर्यंत तरी असतच. पण हळूहळू ही संख्या कमी होत गेली व १९०५ सालीं सातशेत्र्याहत्तर सभासदांपैकी केवळ सतरा मुस्लिम होते. याचा अर्थ असा की, अलिगड पंथाचा व ब्रिटिश भेदनीतीचा प्रभाव हळूहळू वाढत गेला व त्याचीच परिणति म्हणून १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. या लीगनेच सर सय्यद यांचा विभक्ततेचा वारसा पुढे चालवून शेवटीं भारताची फाळणी घडवून आणली. लीगने सर सय्यद यांच्या बुद्धिवादाचा, धर्मसुधारणेचा, पाश्चात्त्य विद्येमुळे येणाऱ्या नव्या दृष्टीचा वारसा मात्र पुढे चालविला नाही. तसें झालें असतें, तर कदाचित् मुस्लिम राजकारणाला निराळें वळण लागलें असतें. पण तसें झालें नाही.
लोकशाहीला विरोध
अलिगडला मुस्लिम विद्यार्थी पाश्चात्त्य विद्या शिकत राहिले. पण त्या विद्येतले गणित, इतिहास, भूगोलादि विषय फक्त ते अभ्यासत राहिले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, इहवाद, राष्ट्रनिष्ठा, लोकशाही हा जो तिचा आत्मा त्याचा त्यांनी स्वतःला स्पर्शहि होऊं दिला नाही. मोईशिन उल् मुल्क या लीगवादी पुढाऱ्याने तर लीगला असा सल्ला दिला की, मुस्लिम समाज अशिक्षित आहे, तो आपले ऐकणार नाही; तेव्हा आपण मुल्ला-मौलवींची मदत घ्यावी. अशी ही संस्था मुस्लिमांत व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही यांचीं बीजें कशी रुजविणार? पण मुस्लिमांना लोकशाही नकोच होती. कारण भारतांत हिंदूंची बहुसंख्या आहे. लोकशाही आली की, सर्व सत्ता त्यांच्याच हातीं जाणार. तेव्हा मुस्लिमांनी लोकशाही कदापि येऊ देतां कामा नये, त्यांनी सतत इंग्रजनिष्ठच राहिलें पाहिजे, असा सर सय्यद व अलिगड पंथ यांचा दंडक होता.
मुस्लिम लीगने सर सय्यद यांची ही परंपरा निष्ठेने पाळली. १९०६ सालीं व्हाइसरॉय मिंटो याने मुस्लिमांचे शिष्टमंडळ बोलावून घेतलें. अलिगडच्या आर्चवाल्ड या प्रिंसिपॉलने मागण्या काय मांडावयाच्या तेंहि मंडळाला पढविलें. त्याप्रमाणे आगाखान यांनी, "आम्ही मुस्लिम हे स्वतंत्र राष्ट्र आहों, इंग्रज येथून गेले, तर बहुसंख्य हिंदु हे आमचा धर्म, आमची संस्कृति यांचा नाश करतील, म्हणून भारताला स्वराज्य कल्याणकारक होणार नाही. इंग्रजी राज्यांतहि आम्हांला विभक्त मतदारसंघ हवे, संयुक्त संघांत खरे मुस्लिम प्रतिनिधि निवडून येणार नाहीत" या व अशा मागण्या मिंटोपुढे मांडल्या व असाहि दावा केली की, "मुस्लिम जमात ही भारतांत अत्यंत महत्त्वाची आहे. तिने इंग्रजांपूर्वी साम्राज्य चालविलें होतें व इंग्रजी साम्राज्याची तिने हिंदूंपेक्षा जास्त मनोभावें सेवा केली आहे. तेव्हा आम्हांला केवळ लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व व अधिकाराच्या जागा न देतां प्रमाणाधिक जागा द्याव्या." ब्रिटिश सरकारने या मागण्या मुद्दामच मांडून घेतल्या होत्या. त्यामुळे व्हाइसरॉयने ताबडतोब त्या पुऱ्या करण्याचें आश्वासन दिलें व १९०९ साली मोर्ले-मिंटो सुधारणा करून तें पाळलेंहि.
तुरळक प्रयत्न
१९१३–१४ पर्यंत लीगचें राजकारण याच पन्हळींतून वाहत होतें. या काळांत अनेक मुस्लिमांनी मुस्लिमांच्या वृत्तीला एकराष्ट्रीयत्वाचें वळण लावण्याचा प्रयत्न चालविला होता. बद्रुद्दीनू तय्यबजी यांनी, अनेक गावांत हिंदु बहुसंख्य असून त्यांनी नगरपालिकांमध्ये मुस्लिम प्रतिनिधींचे बहुमत करून दिले, हें दाखवून हिंदूंवर अविश्वास करण्याचें कारण नाही, असें मुस्लिमांना सांगितलें. बंगालची फाळणी कर्झनने केली ती, पूर्व बंगाल मुस्लिम बहुसंख्येचा व्हावा, या हेतूनेच म्हणजे भेद- नीतीला अनुसरून केली होती. तरीहि कांही मुस्लिम पुढाऱ्यांनी तिला हिंदूंप्रमाणेच विरोध केला होता. काँग्रेसच्या स्वदेशीच्या चळवळीलाहि अनेक मुस्लिमांनी पाठिंबा दिला व वंदे मातरम् हें राष्ट्रगीत गाऊन मिरवणुका काढून हितु नेत्यांच्या सभेलाहि ते उपस्थित राहिले. पण एकराष्ट्रीयत्वाचा हा धागा भारतांत बळकट असा कधीच झाला नाही.
वरील प्रकारचें ऐक्य पाहून सरकारने व लीगने मुल्ला-मौलवींना खेड्या- पाड्यांत धाडून मुस्लिम जनतेला भडकवून दिलें. 'लाल इस्तहार' या नांवाचें प्रसिद्ध पत्रक याच वेळी काढण्यांत आलें होतें. "हिंदु हे मुस्लिमांचे शत्रु आहेत, त्यांच्याशी संबंध ठेवणें हें पाप आहे, त्यांच्यावर बहिष्कार घाला म्हणजे लवकरच ते नरम होऊन इस्लामचा स्वीकार करतील," असा विषारी प्रचार त्यांत होता. याच वेळ पुढे प्रसिद्धीस आलेली जी डायरेक्ट ॲक्शन- घोर हिंसेची राजनीति- तिचा अवलंब करण्यास मुस्लिमांनी प्रारंभ केला आणि भीषण दंगली घडवून आणल्या. मुल्ला-मौलवी मुस्लिमांना जाहीरपणें सांगत की, "तुम्ही काय वाटेल ते अत्याचार केले, तरी तुम्हांला शिक्षा होणार नाही, इंग्रज सरकार आपल्या बाजूचें आहे, न्यायालयें कांही दिवस बंदच ठेवलेलीं आहेत. तेव्हा कचरूं नका." या चिथावणीमुळे हिंदूवर केवढे भयानक अत्याचार झाले असतील याची सहज कल्पना येईल. (स्ट्रगल फॉर फ्रीडम- आर्. सी. मुजुमदार, पृष्ठे ५३-५६).
वर म्हटल्याप्रमाणे हें लीगचें राजकारण १९१३ सालापर्यंत असेंच चालू होतें. काँग्रेसच्या स्वराज्याच्या मागणीला लीगचे नेते कसून विरोध करीत होते आणि हिंदूंचा संपर्क त्यांना दुरूनहि नको होता. पण १९१३ सालीं लीगच्या धोरणांत आकस्मिक बदल झाला व ती स्वराज्याच्या मागणीला साथ देण्यास तयार झाली. काँग्रेसशीं सहकार्य करण्यासाठी तिने हात पुढे केला ! हा पालट कशामुळे झाला? मुस्लिमांत राष्ट्रीय वृत्ति जागृत झाली काय? ते भारताला मातृभूमि मानूं लागले काय?
तसें कांहीहि घडलेलें नव्हतें. पॅन् इस्लामिझम्- विश्व-मुस्लिमवाद- यांचे जबर आवाहन या वेळीं हिंदी मुस्लिमांना आलें, हें त्यामागचें कारण होतें.
सहकार्यामागचा हेतु
इजिप्त, त्रिपोली, मोरोक्को या प्रकरणांवरून इंग्रज हे इस्लामचे शत्रु, हें भारतीय मुस्लिमांना आधीच वाटू लागलें होतें. १९१२ सालीं ग्रीस, बल्गेरिय इत्यादि तुर्की साम्राज्यांतील चार देशांनी उठावणी करून सुलतानाचा पराभव केला. त्या वेळींहि इंग्रजांनी त्या देशांनाच सहानुभूति दाखविली. त्यामुळे आतापर्यंत राजनिष्ठ असलेले अलिगडपंथीय मुस्लिमहि संतप्त झाले. देवबंद पंथ हा तर प्रारंभापासूनच इंग्रजांविरुद्ध होता. आता अलिगड पंथहि त्याला मिळाला आणि अशा रीतीने हिंदी मुस्लिमांची इंग्रजी राज्याविरुद्ध एक फळी तयार होऊन तिने काँग्रेसशी सहकार्य करावयाचें ठरविलें. त्या वेळच्या काँग्रेसच्या धुरीणांनी या वृत्तीचें आनंदाने स्वागत केलें व त्यांनी १९१३ सालच्या कराचीच्या काँग्रेसचें अध्यक्षपद नवाब सय्यद महमूद या एका मुस्लिमाला दिले. या सहकार्याच्या वृत्तींतूनच पुढे १९१६ सालीं लखनौच्या काँग्रेसमध्ये लखनौ करार होऊन हिंदु-मुस्लिम ऐक्यावर शिक्कामोर्तब झालें.
पण मुस्लिमांनी हें सर्व राष्ट्रप्रेमामुळे, भारतनिष्ठेमुळे, सहजीवनाच्या वृत्तीमुळे केलें काय ? द्विराष्ट्रवाद, विश्व-मुस्लिमवाद यांमुळे अपरिहार्यपणें येणारी जी बाह्यनिष्ठा तिचा त्यांनी त्याग केला काय ? हिंदुस्थानांतील मुस्लिम हे राष्ट्रीय झाले काय ?
या वेळेपासून हिंदुस्थानांत 'राष्ट्रीय मुस्लिम' या नांवाने पुढे प्रसिद्धीस आलेला एक वर्ग दिसूं लागला हें खरें आहे. त्या वर्गाचें स्वरूप पाहणें इहवादाच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. महंमदअल्ली हे त्या वेळीं राष्ट्रीय मुस्लिमांचे अग्रणी होते. त्यांचीच साक्ष आपण काढू. तिच्यावरून तें स्वरूप आपल्याला कळून येईल.
४
महमंदअल्ली हे राष्ट्रीय मुस्लिमांचे त्या वेळीं अग्रणी होते. १९२३ साली कोकोनाडा येथे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी जें भाषण केलें त्यावरून काय दिसतें ? हिंदु-मुस्लिम मिळून हिंदुस्थानांत एक राष्ट्र घडवावें असें त्यांनी सांगितलें काय ?
हिंदुस्थान हे एक संघराज्य असावें असें ते म्हणाले. पण हा संघ कोणाचा ? भिन्न प्रांतांचा संघ त्यांच्या मनांत होता काय ? नाही. भिन्न धर्माचे हे संघ असावे व त्यांचें संघराज्य व्हावें असें त्यांनी सांगितलें. हिंदुस्थानचे विभाग करून एकेका धर्माला एकेक विभाग धर्मांतर करण्यासाठी वाटून द्यावा, अशी सूचना त्यांनी मांडली. आतापर्यंत काँग्रेसने जी राष्ट्रनिष्ठा उपदेशिली होती तिचा इहवाद हा पाया होता. त्यावर महंमदअल्ली यांनी कडाडून हल्ला चढविला आणि ऐहिक व पारलौकिक सर्व व्यवहारावर अल्लाचीच सत्ता चालली पाहिजे, असें आपलें मनोगत स्पष्ट करून सांगितलें. अलीगड, सर सय्यद अहंमद यांची विभक्तवृत्ति आणि मुस्लिम लीगने मागितलेले विभक्त मतदार संघ यांचें त्यांनी समर्थन केलें आणि त्यांच्या राजनिष्ठेचेंहि समर्थन केलें. असें असतांना इंग्रजांविरुद्ध भूमिका घेण्याचें लीगला काय कारण झालें ?
व्हाइसरॉय कर्झन याने १९०५ साली बंगालची फाळणी केली. या फाळणी- विरुद्ध काँग्रेसने फार मोठी चळवळ केली होती. पण पूर्व बंगाल हा मुस्लिम बहुसंख्य प्रदेश झाल्यामुळे मुस्लिमांना फाळणीमुळे अतिशय आनंद झाला होता. पुढे काँग्रेसच्या चळवळीमुळे १९११ साली इंग्रज सरकारने बंगालची फाळणी रद्द केली. त्यामुळे हिंदी मुस्लिम अत्यंत संतप्त झाले आणि त्यांचा इंग्रजांवरचा विश्वास ढळू लागला. म्हणजे काँग्रेसने प्राणपणाने लढून जी राष्ट्रहिताची गोष्ट घडवून आणली तिच्यामुळे मुस्लिम भडकून गेले होते आणि हे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरूनच मौ. महंमदअल्ली सांगत होते.
इंग्रजांवरचा मुस्लिमांचा विश्वास ढळण्याचें महंमदअल्लींनी सांगितलेलें दुसरें कारण म्हणजे तुर्क सुलतानाला इंग्रजांनी दगा दिला हें होय. तेव्हा भारताचें पारतंत्र्य, त्यामुळे भारतीयांना प्राप्त झालेली दुर्गति, याचें सोयरसुतक मुस्लिमांना नव्हतें. महंमदअल्ली म्हणाले, "इस्लामच्या मूलभूत नियमांप्रमाणे मुस्लिमांना आचरण करण्यास स्वातंत्र्य मिळाले की, मग त्या देशांत सत्ता मुस्लिम असो की नसो, त्याला महत्त्व नाही. कारण स्वसंरक्षणार्थ ते खलिफावर अवलंबून असतात!"
खिलाफतीचें संरक्षण
महंमदअल्लींच्या या भाषणावरून मुस्लिम काँग्रेसशी सहकार्य करण्यास कां तयार झालें हें स्पष्ट होईल. भारताचें स्वातंत्र्य, भारतीय जनतेचा उत्कर्ष, भारतीयांशीं सहजीवन ही प्रेरणा त्यामागे मुळीच नव्हती. पुढील आठ-दहा वर्षांत घडलेल्या अनेक घटनांवरून हें पुनः पुन्हा अनेक वेळा स्पष्ट झालेलें आहे. पहिले महायुद्ध संपल्यानंतर तुर्क साम्राज्य विस्कटून गेलें आणि तुर्की सुलतान व खलिफा (दोन्ही एकच) याला इंग्रजांनी नाममात्र सत्ताधारी बनविलें. तेव्हा त्या खलिफा- पीठाच्या, खिलाफतीच्या संरक्षणासाठी भारतांत फार मोठी चळवळ सुरू झाली व महात्माजी तिचे अध्वर्यु बनले.
मुस्लिमांच्या दुःखांत आपण सहानुभूति दाखविली की ते भारतीय बनतील, राष्ट्रीय होतील, भारतीय जनतेशी एकरूप होतील, अशी महात्माजींची विचार- सरणी होती. पण खलिफा हा अत्यंत प्रतिगामी, जुलमी, धर्मांध, जीर्णवादी होता; त्याची सत्ता प्रगतिविरोधी, समाजघातक व अन्यायी होती हें आधीचीं पन्नास वर्षे सारखें दिसत होतें. त्याच्याच राज्यांतील सुधारक तरुण पिढीने तिला आव्हान दिलें होतें. असें असूनहि महात्माजींनी खिलाफतीच्या चळवळीचें नेतृत्व पत्करलें ही भारताच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट घडली.
राष्ट्रनिष्ठेच्या प्रगतीला बुद्धिवाद, उदारमतवाद, सर्वधर्मसमानत्व, जनतेचें सार्वभौमत्व, व्यक्तित्व या तत्त्वांची आवश्यकता असते. पण खिलाफतीच्या चळवळींत जे मुस्लिम उतरले ते बरोबर याच्या उलट वृत्तीचे होते. त्यांच्यावर देवबंद विद्यापीठाचें वर्चस्व होतें. ते धर्मांध असून आता तुर्की खलिफाची सत्ता हिंदुस्थानांत स्थापन होणार या कल्पनेने पिसाट झाले होते. खिलाफतीच्या चळवळीमुळे त्यांच्यांतील हिंसक व अत्याचारी वृत्ति उफाळून आल्या होत्या. मोपला या मलबारांतील मुस्लिम जमातीने ही चळवळ ऐन मध्यावर असतांना तेथील हिंदूंवर जे घोर अत्याचार केले त्यांवरून हें स्पष्ट दिसून आलें.
या मोपल्यांनी खलिफाच्या राज्याच्या घोषणा केल्या, एका मुस्लिमाला राजपदीं बसविलें व जाळपोळ, लूट, बलात्कार यांचें थैमान मांडलें. पण एवढें घडूनह एकहि मुस्लिम पुढाऱ्याने वा संस्थेने त्या अत्याचारांचा निषेध केला नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय मुस्लिमांनी काँग्रेसमध्येहि असा ठराव संमत होऊ दिला नाही. हिंदूंशी सहकार्य करण्यामागे मुस्लिम लीगचा काय हेतु होता तें समजण्यास ही घटना पुरेशी होती. (स्ट्रगल फॉर फ्रीडम- मुजुमदार, पृष्ठे २४०, २४१, ३१९, ३६२).
कोहट येथील अत्याचार
यानंतर थोड्याच दिवसांनी वायव्य सरहद्दीजवळच्या कोहट या गावी हिंदु समाजावर मुस्लिमांनी असेच भीषण अत्याचार केले. त्यांची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने महात्माजी व शौकतअल्ली यांची समिति नेमली. चौकशीअंतीं दोघांची ध्रुव-भिन्न अशीं मतें पडलीं ! मुस्लिमांचा प्रक्षोभ व्हवा असें हिंदूंनीं कांहीहि केलें नव्हतें असें गांधींनी लिहिलें. सर्व दोष हिंदूंचाच होता असें शौकतअल्ली म्हणाले. ज्यांना हिंदु-मुस्लिमांचें एक राष्ट्र घडविण्याची सदिच्छा आहे त्यांनी कोहटच्या चौकशीचें हें वृत्त ही प्रतीकात्मक घटना मानावी आणि विचार करावा.
सर सय्यद अहंमद यांनी पन्नास वर्षांपूर्वीच सांगून ठेवलें होतें की, इंग्रज येथून गेल्यावर एका जमातीने दुसरीला जिंकून येथे आपली सत्ता प्रस्थापित करणें एवढाच एक मार्ग आहे. दोन्ही जमाती समभावाने एकत्र राहणें अशक्य आहे. खान दुराणी यांनी १९२९ सालीं व १९४६ साली आपल्या ग्रंथांत हेंच स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. "सर्व भारत पुन्हा इस्लामच्या नांवें जिंकून घेणें, हें एकच तर्कशुद्ध ध्येय मुस्लिमांनी ठेवलें पाहिजे." (करंदीकर- इस्लाम इन इंडियाज ट्रँझिशन टु मॉडर्निटी, पृष्ठ २५५), आज मौलाना सद्रुद्दीन हेंच सांगत आहेत. ( भारतीय मुस्लिम, आव्हान आणि आवाहन- हसनैन, पृष्ठ ६०).
खिलाफत चळवळ सुरू झाल्यानंतर पुढील आठ-दहा वर्षांत ज्या घटना घडल्या त्या सर्व मुस्लिमांच्या याच वृत्तीची साक्ष देतील. १९२१ सालीं अफगाणिस्थानचा अमीर भारतावर आक्रमण करून येणार अशी अफवा उठली होती. त्याने या आधी एक दोनदा भारतांत सैन्य घुसविलेंहि होतें; यामुळे त्या अफवेला अर्थ होता. त्या वेळीं महंमदअल्ली यांनी जाहीर केलें की, "अफगाण सैन्य जिहाद पुकारून आले तर हिंदी मुस्लिम त्याला जाऊन मिळतील. अमीर हा कांही भारताच्या स्वातंत्र्यासाठी येत नव्हता. आधीच्या प्रसंगीं सैन्य घुसवितांना, गझनीच्या महंमदाप्रमाणे आपण काफिरांचा नाश करून अमाप लूट आणूं" असें त्याने सैन्याला प्रोत्साहन दिलें होतें. (स्ट्रगल फॉर फ्रीडम मुजुमदार, पृष्ठ ८१०- १३). तरीहि महंमदअल्ली त्याला मिळणार होते. कारण काफिरांचा नाश त्यांनाहि अभिप्रेत होता.
१९२४ सालीं केमालपाशाने खलिफा- पीठच नष्ट करून टाकलें. त्याबरोबर हिंदी मुस्लिम हे स्वराज्याच्या चळवळींतून एकदम बाजूला झाले. तेव्हा त्या चळवळींत ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी सामील झाले नसून पॅन् इस्लामिझम् ही त्याच्यामागे प्रेरणा होती हे पुन्हा एकदा सिद्ध झालें. वास्तविक हे सिद्ध होण्याची गरजच नव्हती. कारण मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आपले हेतु केव्हाहि लपवून ठेवलेले नव्हते. लेखांतून, भाषणांतून त्यांनी ते अनेक वेळा स्पष्ट केले होते.
पुढील अनर्थाचा पाया
या खिलाफतीच्या चळवळीचें फलित काय, हें पाहिलें तर असें दिसतें की, हिंदु-मुस्लिम ऐक्य तर तिने साधलें नाहीच, तर उलट इहवादाचे, लोकशाहीचे, राष्ट्रनिष्ठेचे कडवे विरोधी असे, देवबंद पीठाचे व याच वेळीं स्थापन झालेल्या जमियत उल् उलेमा या संस्थेचे जे मुस्लिम नेते, त्यांचें वर्चस्व मुस्लिम समाजावर प्रस्थापित झालें आणि पुढील सर्व अनर्थाचा पाया घातला गेला.
१९२६ सालीं आर्य समाजाचे एक प्रमुख कार्यकर्ते स्वामी श्रद्धानंद यांचा अब्दुल रशीद या मुस्लिमाने खून केला. याचे कारण म्हणजे आर्य समाजातर्फे स्वामीजींनी चालविलेली शुद्धीची चळवळ. मुस्लिम भारतांत आल्यापासून 'कुराण वा मरण' अशी गर्जना करून लाखो हिंदूंना सक्तीने बाटवीत. प्राचीन काळीं अशा पतितांना त्या वेळचे धर्मधुरीण शुद्ध करून स्वधर्मांत परत घेत. ही हितावह प्रथा पुढे बंद पडली. आर्य समाजाने गेल्या शतकांत तिचें पुनरुज्जीवन केलें. स्वामी श्रद्धानंद यांनी या सुमारास तीन-चार लाख मुस्लिमांना, रजपुतांना शुद्ध करून परत स्वधर्मांत घेतले. यामुळे मुस्लिम समाज भडकून गेला. शुद्धीच्या चळवळीला प्रथमपासूनच मुस्लिम नेते शिव्याशाप देत होते. हे लोक देशघातकी आहेत, राष्ट्रद्रोही आहेत, अशी लाखोली ते वाहत असत. यामुळेच चिथावणी मिळून रशीद याने स्वामींचा खून केला. त्या वेळीं देवबंद पीठाने व सर्व मुस्लिमांनी त्याचा हृतात्मा म्हणून गौरव केला.
१८५५ सालीं अयोध्येच्या हनुमानगढीवरून हिंदु-मुस्लिमांत संघर्ष निर्माण झालेला होता. तेथे पूर्वी मशीद होती असा मुस्लिमांचा दावा होता. दिल्लीचा बादशहा व इंग्रज रेसिडेंट यांनी चौकशी करून दावा खोटा आहे असा निर्णय दिला, तरी मुस्लिम दंगली थांबविनात. तेव्हा रेसिडेंटने सुभेदार अलीनकीखान याला लिहिले होते की, या प्रांती तुमचें राज्य अनेक वर्ष आहे. इतके दिवस तुम्ही गप्प बसलात. तेव्हा मशीद असली तरी आता वाद उकरून काढणें योग्य नव्हे. कारण पूर्वी देवळें पाडून मशिदी बांधल्या आहेत तेथे मशिदी पाडुन पुन्हा देवळे बांधून द्या असें हिंदु म्हणतील त्याचें काय ?
यावर अलीनकीखानाने उत्तर दिलें तें मुस्लिम मनोवृत्तीचे द्योतक आहे. तो म्हणाला, "तुम्ही हीं दोन्ही प्रकरणें सारखी मानतां ही आश्चर्याची गोष्ट आहे. हिंदु हे नेहमी मुस्लिमांच्या अंकित राहिलेले आहेत. त्यांची देवळे पाडून तेथे मशिदी उभारल्या तर त्याला कसली हरकत? मशीद पाडणे हा मात्र भयंकर गुन्हा आहे. त्याला मृत्यूचीच शिक्षा दिली पाहिजे." ('ही रामाची अयोध्या'- सेतुमाधवराव पगडी, लोकसत्ता दिवाळी अंक १९६९, पृष्ठ १५१) अर्थात् इंग्रजांनी हा दावा मान्य केला नाही हे निराळे. पण हिंदु समाजाकडे पाहण्याचा मुस्लिमांचा दृष्टिकोन यावरून स्पष्ट दिसतो. "आम्ही हिंदूंची देवळें पाडणार. त्यांनी मशिदी पाडता कामा नये. आम्ही हिंदूंना बाटविणार. त्यांनी शुद्धि करणें हें राष्ट्रद्रोही कृत्य होय."
राष्ट्रवादाचा अपमान
मुल्ला-मौलवींच्या इस्लामचें एक तत्त्व असें आहे की, जो मुस्लिम नाही असा मनुष्य कितीहि श्रेष्ठ असला तरी हीन मुस्लिमांपेक्षाहि तो हीन होय. १९२४ साली महंमद अल्ली व इतर राष्ट्रीय मुस्लिम गांधींना महात्मा म्हणत असत. इस्लामच्या धुरीणांना याचा संताप आला व त्यांनी महंमदअल्लींवर गहजब केला. तेव्हा त्यांनी जाहीर केलें की, अत्यंत हीन, पतित, व्यभिचारी असा मुस्लिमहि मला श्री. गांधीपेक्षा श्रेष्ठ वाटतो. हा महात्माजींचा तर अपमान होताच पण भारताचा आणि त्याच्या राष्ट्रवादाचाहि अपमान होता. तरी खरे, नरीमन, सुभाषचंद्र यांना काँग्रेस मधून हाकलून देण्याचें जसें काँग्रेसने धोरण ठरविलें तसें महंमदअल्लींच्या बाबतींत ठरविलें नाही. त्यांना अखेरपर्यंत राष्ट्रीय मुस्लिम म्हणून काँग्रेसने गौरविलें.
डॉ. किश्चलू हे दुसरे राष्ट्रीय मुसलमान ! शुद्धीच्या चळवळीमुळे ते भडकले व म्हणाले, "हिंदु नामर्द आहेत. आम्ही मुस्लिम राष्ट्रीय चळवळींत पडलों म्हणून तिला कांही चैतन्य आलें, हें हिंदूंनी ध्यानांत घ्यावें. आमच्या तैजीम, तबलीघसारख्या चळवळींना हिंदूंनी विरोध केला, तर आम्ही अफगाणिस्तानशीं सहकार्य करून मुस्लिमांचें राज्य येथे प्रस्थापित करूं." (इंडियन मुस्लिम्स- रामगोपाळ, पृष्ठ १६६).
वर सांगितलेच आहे की, खिलाफत नष्ट होतांच स्वातंत्र्यसंग्रामांतील मुस्लिमांचा रस संपला आणि त्या संग्रामांतील सर्व चळवळींपासून ते अलिप्त राहिले; एवढेच नव्हे, तर त्यांचा निषेध करूं लागले. १९३० साली मुंबईच्या प्रचंड मुस्लिम परिषदेत "सत्याग्रहाची चळवळ ही सात कोटि मुस्लिमांना गुलामगिरीत डांबून टाकण्यासाठी चालविलेली हिंदूंची चळवळ आहे" असें महंमदअल्ली, रहिमतुल्ला व इतर सर्व मुस्लिम नेत्यांनी जाहीरपणे सांगितले.
एकोणिसशेबत्तीस साली ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. मुस्लिम, शीख, युरोपीय व दलित यांना त्या निवाड्याने स्वतंत्र मतदारसंघ दिले. यांतील दलितांचे स्वतंत्र मतदार संघ महात्माजींनी प्राण पणाला लावून रद्द करून घेतले. पण मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाचें काय ? त्याला विरोध करण्याचें सुद्धा काँग्रेसला धैर्य झालें नाही. कारण डॉ. अन्सारीसारख्या राष्ट्रीय मुस्लिमांनी, काँग्रेसने जातीय निवाड्याला- कम्युनल ॲवॉर्डला- विरोध केला, तर आम्ही काँग्रेसचा त्याग करूं, अशी धमकी दिली. तेव्हा काँग्रेसने त्या निवाड्याबाबत विरोधहि नाही व स्वीकारहि नाही असा विनोदी ठराव केला.
राष्ट्रीयतेचा त्याग
याचा अर्थ असा की, राष्ट्रीय मुस्लिमांच्या मर्जीसाठी काँग्रेसने स्वतःच्या राष्ट्रीयतेचा त्याग केला! मुस्लिम लोक जें मागतील तें जें म्हणतील तें हिंदूंनी त्यांना द्यावें, असें महात्माजींनी शतवार सांगितलें होतें. शेवटी मुस्लिमांनी फाळणी मागितली.
१८८७ सालापासून सर सय्यद अहंमद यांनी हिंदू व मुस्लिम हीं दोन राष्ट्रें आहेत, असा घोष चालविला होता. पुढे आगाखान, महंमदअल्ली हे त्याचेच पडसाद उमटवीत होते. पण त्या वेळी हे नेते राष्ट्रविरोधी आहेत, त्यांच्या मागण्या राष्ट्राला घातक आहेत असें काँग्रेसचे नेते म्हणत असत. पण खिलाफत चळवळीनंतर, मुस्लिम नेत्यांच्या वृत्तींत काडीमात्र फरक पडलेला नसतांना, त्यांची गणना राष्ट्रीय नेत्यांत होऊं लागली. मानवता, समानता, समान नागरिकत्व, सर्वांना सारखा कायदा, जनतेचें सार्वभौमत्व, सर्वांना एकत्र न्याय, सामाजिक, राजकीय प्रश्नांवर धर्माचें वर्चस्व नसणें, ते प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडविणें हा राष्ट्रवादाचा पाया. मुस्लिमांनी ही भूमिका कधीच मान्य केली नव्हती. तरीहि त्यांच्या मागण्या मान्य होत होत्या. त्याचीच परिणति होऊन शेवटीं भारताची फाळणी झाली.
१९२५ सालापासून एका बाजूस पाकिस्तानचा जाहीर घोष व दुसऱ्या बाजूस अतिरेकी मागण्या असें दुधारी राजकारण मुस्लिमांनी चालविलें होतें. मुस्लिम बहुसंख्य असलेले नवीन प्रांत निर्माण करणें, त्या प्रांतांतून मुस्लिम प्रतिनिधींना हुकमी बहुमत असणें, दरेक प्रांताला जास्तीत जास्त स्वायत्तता देणें, मध्यवर्ति सरकारकडे कमीत कमी खातीं असणें, मध्यवर्ती कायदेमंडळांत मुस्लिमांना एक-तृतीयांश प्रतिनिधित्व देणें, मुस्लिम प्रतिनिधींनी आपले एक तृतीयांश मंत्री नेमणें, सरकारी नोकऱ्यात मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा जास्त प्रमाणांत जागा देणें, अशा चढत्या मागण्या मुस्लिम नेते मांडीत होते. त्या सर्वांना राष्ट्रीय मुस्लिमांचा पाठिंबा होता. १९४० नंतर मध्यवर्ती सरकारांत पंचेचाळीस टक्के हिंदु प्रतिनिधि व पंचेचाळीस टक्के मुस्लिम प्रतिनिधि असावेत अशी मागणी आली.
१९४६ सालीं मौ. आझादांनी (!) भारत हें संघराज्य असावें, केंद्राच्या हातीं फक्त संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र धोरण एवढ्यापुरतेच अधिकार असावेत व शेषाधिकार राज्यांना असावेत अशी योजना मांडली होती आणि हे मौ. आझाद शेवटपर्यंत राष्ट्रनिष्ठ मुस्लिम म्हणून गौरविले जात होते.
१९३० सालीं पाकिस्तानचा पहिला उद्घोष, ज्या इक्बालांचा राष्ट्रीय मुस्लिम म्हणून फार मोठा गौरव झाला होता त्यांनी केला. त्यांचें एक कवन राष्ट्रगीताच्या पदवीला गेलें होतें. पण इक्बालांनी १९०५ सालापासूनच राष्ट्रवादाचा त्याग केला होता. १९०९ साली हिंदु-मुस्लिमांच्या एकत्र सभेला जाण्याचें नाकारून त्या दोघांचें एक राष्ट्र होणें अशक्य आहे असें त्यांनी सांगितलें होतें. पाकिस्तानची मागणी मांडताना त्यांनी कारण असें दिलें की, मुस्लिमेतरांनी केलेले कायदे मानणें मुस्लिमांना शक्य नाही ! बॅ. जिना हे सर्वांत श्रेष्ठ राष्ट्रीय मुस्लिम नेते. लीगच्या लाहोर अधिवेशनांत त्यांनीच प्रथम पाकिस्तानची रीतसर मागणी केली. हिंदू व मुस्लिम यांचें एक राष्ट्र अशक्य आहे, हें त्या आधी सारखे सांगत आले होते.
१९३७ साली निवडणुका झाल्या त्यांत मुस्लिम लीगचा अगदी लाजिरवाणा पराभव झाला. सिंध, वायव्य सरहद्द आदि मुस्लिम बहुसंख्य प्रांतांतहि लीगला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम काँग्रेसच्या मागे आहेत असा आभास निर्माण झाला. पण हे आव्हान जिनांनी व लीगने स्वीकारलें आणि पुढील पांच-सहा वर्षांत लीगच्या शेकडो शाखा स्थापून त्यांच्या तर्फे मुल्ला-मौलवींना खेडोपाडीं धाडून काँग्रेस व हिंदु यांच्याविरुद्ध इतका विषारी प्रचार केला की, १९४५ च्या निवडणुकांत पंचाण्णव टक्के मुस्लिमांनी पाकिस्तानच्या बाजूने मतें दिली.
काँग्रेसला हिंदु राज्य स्थापावयाचें आहे, इस्लाम नष्ट करावयाचा आहे, ज्या प्रांतांत काँग्रेस सत्ता आहे तेथे मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत आहेत, अशा तऱ्हेचा प्रचार मुल्ला-मौलवी करीत होते. जिनांनी मुद्दामच प्रचारासाठी या लोकांची योजना केली होती. जिना स्वतः बुद्धिवादी, व्यक्तिवादी व सुधारणावादी होते. एका वर्षापूर्वीच अलीगडला विद्यार्थ्यांपुढे बोलतांना "लीगने तुम्हांला मुल्ला-मौलवींच्या शृंखलांतून मुक्त केलें आहे, ते प्रतिगामी, जीर्णवादी आहेत, ते स्वार्थी आहेत, समाज- द्रोही आहेत" असें त्यांनी सांगितलें होतें. पण मुस्लिम जनतेला जिंकावयाचें, तर त्या मौलवींनाच शरण गेलें पाहिजे, असें वर्षानंतर त्यांच्या ध्यानीं आलें. तेव्हा प्रचारार्थ त्यांची योजना करून मुस्लिम जनतेंत त्यांनी विभक्त वृत्ति दृढ करून टाकली. त्याच वेळीं (१९३८) जरूर तर अत्याचारी मोहिमा- डायरेक्ट ॲक्शन- काढून कत्तली, जाळपोळ, लूट, विध्वंस करूनहि पाकिस्तान मिळवावयाचें, असाहि ठराव लीगने करून टाकला आणि त्यासाठी 'मुस्लिम लीग स्वयंसेवक पथक', 'मुस्लिम नॅशनल गार्ड', 'खाकसार', अशा हजारो तरुणांच्या संघटना स्थापन केल्या आणि शेवटीं मुल्ला-मौलवींच्या वाणीचें बळ व या संघटनांचें अत्याचारी बळ या दोन बळांच्या साह्याने जिनांनी व लीगने पाकिस्तानचें स्वप्न प्रत्यक्षांत आणलें.
पाकिस्तानला हिंदुस्थानांतील बहुसंख्य मुस्लिमांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांच्यांत एक गट असा होता की ज्याचा पाकिस्ताननिर्मितीला कडवा विरोध होता. राष्ट्रीय मुस्लिमांचें हें विवेचन या गटाचें स्वरूप पाहिल्यावांचून पुरें होणार नाही. हा गट म्हणजे देवबंद पंथ होय. प्रारंभापासूनच ब्रिटिश सत्तेला देवबंदपंथाचा विरोध होता हें वर सांगितलेच आहे. त्यामुळे हिंदूंशी स्वराज्याच्या चळवळींत सहकार्य करावें असें तेव्हापासूनच त्यांचें प्रतिपादन असे. पण याचा अर्थ असा नव्हे की, येथपर्यंत मुस्लिमांचें जें विभक्ततेचें तत्त्वज्ञान सांगितलें तें या पंथाला मंजूर नव्हतें. प्रारंभी हा पंथ ब्रिटिश साम्राज्यविरोधी असला, तरी तो भारत राष्ट्रवादी नसून तुर्की साम्राज्यवादी होता. सर सय्यद व अलीगड हे प्रारंभीं तुर्क खलिफाच्या विरुद्ध होते, म्हणून देवबंदचे व त्यांचें वैमनस्य होते. आता पाकिस्तानला त्यांचा विरोध होता तोहि हिंदु-मुस्लिमांचें एकराष्ट्र घडविण्याच्या उद्देशामुळे नसून, भारतांतील सर्व हिंदूंना इस्लामदीक्षा देण्याची संधि त्यामुळे हातची जाईल, या भीतीमुळे होता. सर्व हिंदुस्थान ग्रासण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांना त्याचा एक तुकडा मिळाल्याने कसें समाधान होणार ?
इस्लामचा कच्चा माल
मौ. मदानी या देवबंदपंथीयांनी त्या पंथाचें हें मनोगत स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. त्यांचें म्हणणें असें की, हिंदु हा इस्लामचा कच्चा माल आहे. त्यांचें धर्मांतर घडवून सर्व हिंदुस्थान इस्लाममय करण्याचा मुस्लिमांना हक्क आहे. हा विशाल हक्क एका कोपऱ्यापुरता मर्यादित करणें इस्लामच्या दृष्टीने योग्य नाही. शिवाय पाकिस्तान खरें इस्लामी शासन होणार असतें तर गोष्ट निराळी होती. पण लीगचे जीना प्रभृति नेते हे खरे मुस्लिम नाहीतच. ते केमालपाशाचे अनुयायी आहेत. त्यांची शरीयतवर श्रद्धा नाही. ते केमालप्रमाणे पाकिस्तानमध्ये इहवादी शासन स्थापतील. तेव्हा पाकिस्तानमुळे इस्लामची गति कुंठितच होणार असल्यामुळे त्या मागणीला पाठिंबा देणें योग्य नाही. (दि देवबंद स्कूल ॲण्ड डिमांड फॉर पाकिस्तान, झिया उल हसन फरूकी, पु. ११४- १२१) देवबंदपंथीय राष्ट्रीय मुस्लिमांचा पाकिस्तानला विरोध होता तो या कारणामुळे होय.
खिलाफत चळवळीच्या प्रारंभापासून भारतांत राष्ट्रीय मुसलमान नांवाचा जो वर्ग निर्माण झाला आहे त्याचे स्वरूप काय आहे तें यावरून कळेल. स्वातंत्र्यचळवळीला त्याचा विरोध होता. जातीय निवाड्याचें त्यांनी स्वागत केलें होतें. अफगाणिस्तानच्या अमिराची स्वारी त्यांना हवी होती. हिंदूंवर घोर अत्याचार झाले, तरी त्यांचा ते निषेध करीत नाहीत. तसे अत्याचार करणाऱ्यांना देहान्त शासन झाले, तर ते त्यांना हुतात्मा मानून त्यांचा गौरव करतात. राष्ट्रीय म्हणून नांवलौकिक झालेल्या मुस्लिमांची ही मनोवृत्ति ! मग मुल्ला-मौलवींच्या वर्चस्वाखाली असलेल्या एकंदर समाजाची काय मनोवृत्ति असेल ?
अलीकडे काही मुस्लिमांनी अत्याचार केले म्हणून सर्व मुस्लिम समाज तसाच आहे असें समजणें हा अन्याय आहे, असें सांगितलें जातें. तसें शक्य आहे. पण तसा नसलेला हा समाज, मुल्ला-मौलवींच्या चिथावणीमुळे एका क्षणांत तसा होतो, हें बंगालच्या फाळणीच्या वेळीं, मोपला अत्याचाराच्या वेळी, कोहटच्या दंग्याच्या वेळी, पाकिस्तानच्या निर्णयाच्या वेळीं व त्यानंतर प्रत्येक दंग्याच्या वेळी दिसून आलें आहे, येत आहे, प्रत्येक वेळी कृतीने व वाणीने मुस्लिम समाज सांगत आहे, आम्हांला भारतीय जीवनाशी एकरूप व्हावयाचें नाही ! "
५
एकोणिसशे चौसष्ट सालीं मुस्लिम मजलिस मुशावरतची स्थापना झाली. हिंदु- मुस्लिम जमातींत सहकार्य घडवून आणावें, विशेषत: जातीय दंगलींना आळा घालावा हें तिचें उद्दिष्ट होतें. हिंदू व मुस्लिम या दोन्ही जमातींच्या पुढाऱ्यांनी एकत्र संयुक्त दौरा काढून सर्व देशभर फिरावें व दोन्ही जमातींच्या लोकांना, "आजपर्यंतचे हेवेदावे विसरून राष्ट्रपिता महात्मा गांधींचे वारस या नात्याने राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी आपल्या देशबांधवांशीं बंधुत्वाच्या नात्याने वागावें व पंडित नेहरूंच्या स्मृतीचा आदर करावा, असे आवाहन करावें" असें एक पत्रक १४ सप्टेंबर १९६४ रोजीं मजलिसच्या नेत्यांनी काढलें. त्यावर डॉ. सय्यद महमूद, मौ. आझाद, मदनी 'रेडियन्स'चे मॅनेजिंग डायरेक्टर युसुफ सिद्दिकी आदि लोकांच्या सह्या होत्या.
जमाते इस्लामी ही संस्था १९४१ सालीं मौ. मौदुदी यांनी स्थापन केली होती. मौदुदी हे कडवे जमातवादी असून त्यांची संस्था मुस्लिम जमातवादाच्या पोषणासाठीच स्थापन झाली होती. मौ. अबुल लाइस हे १९६४ साली तिचे प्रमुख होते. मजलिस मुशावरतच्या वरील बैठकीच्या वेळीं जमाते इस्लामीचे हे अध्यक्ष हजर होते. त्यांनी मुस्लिमेतरांशीं सहकार्य करावें, अशा अर्थाचें भाषण केलें होतें व पत्नकावर सही पण केली होती. पण दोन-तीन आठवड्यांतच मौ. लाइस यांचें मत फिरलें. त्यांनी पत्नक काढून "भिन्न धर्मीयांची संयुक्त आघाडी करण्याचें धोरण जमाते इस्लामीच्या तत्त्वाशीं विसंगत आहे" असें जाहीर केलें आणि दोन जमातींच्या सहकार्याचा विचार मुळांतच खुडून टाकला. या वेळीं हिंदु पुढाऱ्यांनी ही कल्पना मोठ्या उत्साहाने मान्य केली होती. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, मौ. अबुल लाइस यांनी विरोध दर्शवितांच पत्रकावर सह्या करणारे इतर मुस्लिम पुढारीहि स्वस्थ बसले.
मुस्लिम लीगची प्रतिकृति
याचा अर्थ असा की, मजलिस मुशावरत ही संस्था जमाते इस्लामीच्या पूर्णपणें आहारीं गेली. यासंबंधी लिहितांना 'उर्दू प्रेस' चे संपादक श्री. हसनैन लिहितात की, "हिंदी मुस्लिमांच्या दुर्दैवाने जमाते इस्लामीने मुशावरतवर पूर्ण ताबा मिळविला. जमातच्या दुष्ट प्रभावामुळे मुशावरतने आपल्या उच्च ध्येयांना तिलांजलि दिली. परिणामतः मुशावरत ही विभाजनपूर्व मुस्लिम लीगची प्रतिकृति झाली." (भारतीय मुस्लिम, दि. २९-९-६७) मार्गदीप, दावत इत्यादि मुस्लिम पत्रांनी मुशावरतच्या शिष्टमंडळांत कोणाहि हिंदूंचा अंतर्भाव होता कामा नये असा इशाराच देऊन ठेवला होता.
हिंदु-मुस्लिम सहकार्याचा सातशे वर्षांचा असाच इतिहास आहे. कांही मुस्लिमांना मधून मधून या दोन जमातींचें सहकार्य व्हावें, भारतांत एकात्म समाज निर्माण व्हावा असें वाटतें. ते प्रयत्न करतात, संस्था स्थापतात, लेख लिहितात, काव्यें करतात पण अल्पावधीतच धर्मांध उलेमा व त्यांच्या संस्था हे प्रयत्न उधळून लावतात. "भारतीय समाजाशी केव्हाहि एकात्म व्हावयाचें नाही" हा मुस्लिम नेत्यांचा निर्धार कायम होतो आणि अखिल भारतीय मुस्लिम जनतेवर त्याचें वर्चस्व प्रस्थापित होतें.
वरील घटना फाळणीनंतरची आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर मागे राहिलेल्या मुस्लिम समाजाच्या मनोवृत्तीची ती द्योतक आहे. गेल्या वीस-बावीस वर्षांतली हिंदी मुस्लिम समाजाची विचारसरणी काय आहे तें समजून घेण्याच्या दृष्टीने तिचें महत्त्व फार असल्यामुळे येथे ती सविस्तर दिली आहे.
बॅ. जिनांनी १९४७ साली पाकिस्तानांत जातांना चौधरी खलिकुझमान यांच्याकडे मुस्लिम लीगचें नेतृत्व सोपवून मागलीच परंपरा पुढे चालविण्याचा आदेश त्यांना देऊन ठेवला होता. त्याप्रमाणे त्यांनी भारताच्या घटना समितींत मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ व सरकारी नोकऱ्यांत राखीव जागा यांची मागणी केली. मे १९४८ च्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनांत पुन्हा हीच मागणी करण्यांत आली. १९४९ सालच्या मद्रासच्या सभेंत व १९५३ साली स्थापन झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम जमियतच्या सभेंत याच मागण्यांचा, जळजळीत विषारी भाषेंत पुनरुच्चार करण्यांत आला.
मौ. सय्यद अबुल हसन नदवी हे जमाते इस्लामीचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. मौ. मौदुदीचे ते पट्टशिष्य म्हणून गणले जातात. 'इस्लाम ॲण्ड दि वर्ल्ड' या आपल्या पुस्तकात त्यांनी निःसंदिग्ध शब्दांत सांगितलें आहे की, "इस्लाम हा मानव जातीचे दोनच विभाग मानतो. सत्यप्रिय व अल्लाचे सेवक हा एक व इतर धर्मीय सर्व सैतानांचे अनुयायी व असत्याचे पुरस्कर्ते हा दुसरा. या दुसऱ्या विभागाशीं इस्लामने कायमचें युद्ध पुकारलेलें आहे. मग हा विभाग कोणत्याहि वंशाचा वा राष्ट्राचा असो." तेराव्या शतकांतील मुस्लिमांचीच ही वृत्ति आहे. मुस्लिमेतर हे सर्व इस्लामचे शत्रु आहेत, त्यांच्याशीं सहजीवन अशक्य आहे असें ते मानतात.
वेगळेपणाचा आग्रह
मुस्लिमांना भारतीय जीवनाशीं एकात्म व्हावयाचें नाही, त्यांना येथल्या इतर जमातींशीं समरस व्हावयाचें नाही, हें मुस्लिमांना स्वतंत्र शिक्षणसंस्था हव्या अशी जी त्यांची मागणी आहे तीवरून स्पष्ट होतें. त्यांना नुसत्या शिक्षणसंस्था स्वतंत्र, निराळ्या हव्या असें नाही, त्या संस्थांत पाठ्यपुस्तकें निराळीं हवीं, शिक्षक मुस्लिम हवे, माध्यम उर्दू हवें. हिंदी पुस्तकांत संस्कृत शब्द येतां कामा नयेत, आणि हिंदु देवदेवतांचें, हिंदु पुराणांतील घटनांचें वर्णन असलेले धडे मुस्लिमांना नेमण्यांत येऊ नयेत अशा मुस्लिमांच्या मागण्या आहेत. जुलै १९६९ मध्ये मुरादाबाद येथे इस्लामी धर्मशिक्षण परिषद् भरली होती. तींत या मागण्या आग्रहाने मांडण्यांत आल्या. ('साधना', पुणे, दि. ३०-८-६९).
मौ. मौदुदींच्या भाषणावरून व लेखांवरून याच्या मागची भूमिका स्पष्ट होईल. मौदुदी राष्ट्रवादाचे कडवे विरोधक आहेत. राष्ट्रनिष्ठा हें ते पाप समजतात. त्याचें मुख्य कारण हें की, राष्ट्रनिष्ठेमुळे त्या त्या राष्ट्रांतील मुस्लिमेतर प्राचीन परंपरांविषयी मुस्लिमांच्या मनांत आदर निर्माण होतो. मुस्लिमेतर राष्ट्रीय पुरुषांना मुस्लिम हा मान द्यायला लागतो. 'नॅशनॅलिझम ॲण्ड इंडिया' या आपल्या लेखांत त्यांनी आपला हा आक्षेप मांडला आहे. ते म्हणतात, "इजिप्शियन माणूस राष्ट्रवादी झाला की, तो प्राचीन फरोहांचा अभिमान बाळगू लागतो. तुर्की आपल्या भाषेवरचें अरबी वर्चस्व नष्ट करूं पाहतो व तुर्कस्थानच्या मुस्लिम पूर्व इतिहासाचा म्हणजेच अज्ञानयुगाचा आत्मीयतेने विचार करूं लागतो. हिंदी माणूस राष्ट्रवादामुळे वेदकाळांत जाऊं लागतो व गंगा-यमुनांचीं स्तोत्रें गाऊं लागतो. राष्ट्रवादामुळे मनुष्य पैंगंबरांच्यापासून स्फूर्ति घेण्याच्याऐवजी आपल्या देशांतल्या राष्ट्रपुरुषांपासून स्फूर्ति घेतो. इस्लामी तत्त्वाच्या हें अगदी विरुद्ध आहे." (इस्लाम इन्ं इंडियाज् ट्रँझिशन, करंदीकर, पृष्ठ २३२-३३)
राम, कृष्ण या देवतांचीं चरित्रे पढून मुस्लिम मनें दूषित होतात, तेव्हा पाठ्य- पुस्तकांत तीं असतां कामा नयेत, असें मुस्लिमांचें मत आहे. महात्माजींच्याबद्दल मौ. महंमदअल्ली काय म्हणाले तें वर दिलेंच आहे. पं. नेहरूंच्या निधनानंतर कांही मौलवींनी कुराण- पठण करून मशिदींत प्रार्थना केल्या. देवबंदचे मौलाना तायब यांनी त्यासाठी त्यांचा निषेध केला. हा कुराणाचा अपमान आहे, असें ते म्हणाले. ('दावत' २०–६–१९६४).
स्वातंत्र्यानंतरच्या काळांतहि भारतांत मुस्लिम कोणत्या वृत्तीची जोपासना करीत आहेत तें यावरून कळेल. भारताच्या प्राचीन परंपरेचा अभिमान धरणें, हिंदु थोर पुरुषांना मान देणें, येथल्या पवित्र नद्यांची स्तोत्रें गाणें, संस्कृतचें अध्ययन करणें यांत इस्लामचा घात आहे असें त्यांना वाटतें आणि म्हणूनच रेडियन्स, दावत, निदाए मिल्लत इत्यादि पत्रें "भारत सरकार इस्लामचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न करीत आहे, काँग्रेसमधील हिंदु नेत्यांना मुस्लिम समाज नष्ट करावयाचा आहे," असा धडाक्याने प्रचार करीत असतात.
पॅन् इस्लामिझमच्या तत्त्वापासूनहि हिंदी मुस्लिम अणुमात्र ढळलेले नाहीत. त्यामुळे मुस्लिमेतर भारतीयांपेक्षा भारतबाह्य मुस्लिम त्यांना जवळचे वाटतात. अलअक्सा प्रकरण, पॅलेस्टाईन दिन, राबात परिषद् यांवरून हें स्पष्ट होईल. जागतिक इस्लामी संपर्क परिषदेत भाषण करतांना सय्यद अबुल हसन नदवी म्हणाले, "पॅलेस्टाईन दिनाच्या सर्व हिंदुस्थानांत ज्या सभा झाल्या, निदर्शनें झालीं, मिरवणुका निघाल्या त्यांवरून पुन्हा एकदा हें सिद्ध झालें की, हिंदुस्थानचा मुसलमान बाहेरच्या इस्लामी दुनियेपासून वेगळा राहूं शकत नाही. हिंदुस्थानांत अनेक वर्षांत इस्लामी सामुदायिक भावना एवढ्या मोठ्या प्रमाणांत व्यक्त झाल्या नव्हत्या." ('साधना', दि. २९-११-६९).
"इस्रायलने अरबांचा जो पराभव केला तो उभ्या जगांतल्या मुस्लिमांचा पराभव होय" असें प्रतिपादन मौ. नदवी यांनी 'दावत' या पत्रांतील लेखांतून केलें आहे. अरबांनी सर्व जग जिंकून इस्लामचा झेंडा जगाच्या कानाकोपऱ्यांत फडकवावा, अशी त्यांची मनीषा असून हें कसें साध्य करावें हेंहि त्यांनी या लेखांत सांगितलें आहे.
भारतीय जीवनाशी समरस होणें म्हणजे काय, मुस्लिम हे भारतीय झाले, भारतीय समाजाशी एकरूप झाले असें केव्हा म्हणतां येईल, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. ते भारतीय झालेलेच आहेत, त्यांनी तसें झालें पाहिजे असें म्हणणें म्हणजे एका मोठ्या जमातीचा अपमान करण्यासारखें आहे, असेंहि काँग्रेसचे निवडणूकनिष्ठ नेते अलीकडे म्हणूं लागले आहेत. पण हा प्रश्न गूढ आहे, बिकट आहे असें नाही. स्वातंत्र्य- पूर्वकाळापासून भारताच्या सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी व विशेषतः काँग्रेसने कांही तत्त्वें ध्येयरूपाने स्वीकारली आहेत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या घटनेत त्यांचा समावेश केलेला आहे. सर्वधर्मसमानत्व, लोकशाही, इहवाद आणि राष्ट्रवाद हीं त्यांतील प्रमुख तत्त्वे आहेत. मुस्लिम समाज हीं तत्त्वें शिरसावंद्य मानतो काय, हें पाहून तो समाज भारतीय झाला आहे की नाही, भारतीय जनतेशी एकरूप झाला आहे की नाही, याचें उत्तर सहज मिळू शकेल.
सर्वधर्मसमानत्व हें भारताचे पहिले तत्त्व होय. आज जगांतल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांनी सुद्धा तें स्वीकारलेले आहे. हिंदी मुस्लिम समाज या तत्त्वाला मान्यता देतो काय ? मौ. अबुल कलम आझाद यांना हे तत्त्व मान्य होतें. त्यांनी कुराणावर स्वतंत्र भाष्य लिहून या तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. सर्व धर्मांचे धर्मग्रंथ पूज्य मानणें म्हणजे खरा इस्लाम, असें ते म्हणत. पण त्यांना मुस्लिम उलेमा गुन्हेगार मानतात. माजी राष्ट्रपति डॉ. झकीर हुसेन यांची मतें आझादांसारखीच होती. एक सर्वधर्मी पूजागृह बांधून त्यांत सर्व धर्मीयांनी एकत्र प्रार्थना करावी अशी सूचना त्यांनी केली होती. आपापल्या धर्माच्या उपासनेने सर्वांनाच मोक्ष मिळेल असें त्यांचे मत होतें. याचा देवबंद पंथाचे तज्जली हें जें मुखपत्र, त्याचे संपादक अमीर उस्मानी यांना फार संताप आला. मूर्ख, कमअस्सल, व्यवहारशून्य अकबरासारखेंच डॉ. झकीर हुसेन कुराणाला आव्हान देत आहेत, अशी त्यांनी टीका केली आहे. (केसरी, दि. २७-२-६९ आर. डी. देशपांडे.)
नेहरूंच्या निधनानंतर 'दावत' या पत्राने (दि. २०-६-६४) लिहिलें होते की, नेहरू कलमा पढत नसत. तेव्हा त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळणे शक्य नाही. मौदुदी स्वतः व ते पाकिस्तानात गेल्यानंतर मागे राहिलेले त्यांचे नदवी, मदनी, लाइस वगैरे शिष्य यांचा असा अखंड प्रचार चालू असतो. प्रत्येकाने आपापला धर्म श्रेष्ठ मानावा यांत कांहीच वावगे नाही, पण इतर धर्मीयांना व धर्मांना त्यांनी तोच मान देणें समाजाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अवश्य असतें. पण इस्लामप्रमाणेच इतर धर्महि आपापल्या अनुयायांना मोक्ष देण्यास, सन्मार्ग दाखविण्यास समर्थ आहेत, हें मुस्लिम मुल्ला-मौलवी उलेमा व त्यांचेच वर्चस्व असलेला मुस्लिम समाज कदापि मान्य करणार नाही. भारतीय घटनेचे सर्वधर्मसमानत्व हे महत्त्वाचें तत्त्व आहे. मुस्लिमांना तेच मान्य नाही.
लोकशाही या तत्त्वाचें असेंच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता हीं लोकशाहीचीं आद्य तत्त्वें होत. सर्वांना समान नागरी कायदा हें तितकेंच महत्त्वाचें तत्त्व आहे. पण समान नागरी कायदा म्हणजे इस्लामचा नाश असें मुस्लिम मानतात. न्या. मू. गजेंद्रगडकर यांनी अलीगड विद्यापीठांत दीक्षान्त भाषण केलें. त्यांत नवे कायदे करावयाचे ते सामाजिक आधार घेऊन करावे, कुराणाचा आधार घेऊन नव्हे, या बाबतींतले निर्णय बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीला व वैज्ञानिक दृष्टीला उतरणारे असले पाहिजेत, मग कुराणांत कांहीहि म्हटलेलें असो, असें त्यांनी सांगितलें. यावर कायद, दावत, निदाये मिल्लत या मुस्लिम पत्रांनी नुसती आग पाखडली. कुराणप्रणीत कायद्यांत एका अक्षराचाहि बदल केलेला आम्हांला चालणार नाही, तसें करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला आमच्या प्रेतावरच त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल, अशी भाषा त्यांनी केली.
लोकशाहींत जनतेचें सार्वभौमत्व गृहीत धरलेलें असतें. कायदे करण्याचे अधिकार जनतेला असतात. पण हेंच मुस्लिमांना मान्य नाही. कायदा हा कुराणांतलाच असला पाहिजे, मनुष्यकृत कायदा हा निश्चित अधःपाताला कारणीभूत होतो, असें त्या समाजाचें मत आहे. शिवाय जनतेमध्ये इतर धर्मांचे लोक येतात. त्यांनी केलेले कायदे मुस्लिमांनी मान्य करणें हा त्यांचा अपमान आहे, असें त्यांना वाटतें.
समतेला त्यांचा विरोध आहे तो या कारणासाठीच आहे. मुस्लिम समाजांत स्त्रियांची स्थिति शोचनीय आहे, असें इक्बाल यांना मान्य होते. पण अल्लाच्या आज्ञेपुढे इलाज नाही, असें ते म्हणतात. आज मुस्लिम समाजांत स्त्रियांच्या समान हक्कांची चळवळ सुरू झालेली आहे. तिला सुशिक्षित मुस्लिमहि केवढा तीव्र विरोध करीत आहेत हें पाहिलें म्हणजे लोकशाही या भारतीय मूल्याविषयी त्या समाजाला काय वाटतें तें ध्यानांत येईल.
भारतीय घटनेचें तिसरें महातत्त्व म्हणजे इहवाद. मुस्लिम नेते इहवाद म्हणजे धर्महीनता असेंच मानतात. त्यामुळे भारताने आदराने स्वीकारलेल्या या तत्त्वांवर ते अत्यंत विषारी टीका करतात. बुद्धि, अनुभव, प्रयोग, तर्क, इतिहास यांच्या आधारे समाजाचे कायदे करावयाचे, समाजाच्या उत्कर्षापकर्षाची चिकित्सा करावयाची, आणि त्यांतून निघणारे निष्कर्ष वंद्य मानावयाचे असें इहवादाचें तत्त्वज्ञान आहे. पण कुराणापलीकडे एक अक्षरहि जाण्यास ज्यांची तयारी नाही ते या तत्त्वज्ञानाला कशी मान्यता देणार ?
इहवादावर राग
सय्यद वद्रुदुजा यांनी लोकसभेचे सभासद असतांना लोकसभेंतच इहवादाच्या तत्त्वावर भडिमार केला (दि. २८-४-१९६६). ते म्हणाले, "इहवाद ही शुद्ध फसवणूक आहे, जाळें आहे, तो गुन्हाच आहे. इहवाद म्हणजे ढोंग, भ्रष्टता. अनाचार, लाच, वशिला, पाप, घाण– म्हणजे इहवाद. इहवाद म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अतिक्रमण, मुस्लिमांचें शोषण, मुस्लिमांचा घात." जमाते इस्लामीचे प्रमुख अबुल लाइस यांनी इहवादावर असेंच गरळ ओकलें आहे. लोकशाही म्हणजे बहुदेवतापूजन असून इहवाद म्हणजे धर्माचा नाश करणारें विष आहे, असें ते म्हणतात. इहवादाविषयी अशी दृष्टि असल्यामुळे अर्वाचीन काळच्या समाजधुरीणांनी हितप्रद ठरविलेल्या प्रत्येक गोष्टीला मुस्लिमांचा विरोध असतो. रक्तदानाला विरोध, कुटुंबनियोजनाला विरोध, १९५४ च्या विवाह कायद्यास विरोध. हें सर्व कुराणाच्या विरुद्ध आहे हें त्याचें कारण.
इस्लाम हा सर्वंकष धर्म आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर त्याची अप्रतिहत सत्ता असते, असें मुस्लिम उलेमा मानतात. त्यामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, कलाविषयक, शिक्षणविषयक कोणत्याहि क्षेत्रांत बदल केला तरी त्यामुळे इस्लामला बाध येतो असें त्यांना वाटतें. समाजहिताच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रांत परिवर्तन करूं पाहणाऱ्या भारतीय समाजाशी हा समाज एकात्म होणें कसें शक्य आहे ?
मुस्लिम समाज म्हणजेच त्याचे उलेमा हे जे नेते ते असे सुधारणाविरोधी, परिवर्तन-विन्मुख असल्यामुळे तो समाज स्थिरावस्थेंतून बाहेर पडणार नाही, जगाच्या फार मागे राहील अशी कांही पुरोगामी मुस्लिमांना चिंता वाटते. प्रा. अझीज अहंमद यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "हिंदु समाज हा पुष्कळच सुधारला असून प्रगतिपथाला लागला आहे. पण भारतीय लोकसभेने मुस्लिम शरीयतला स्पर्शहि केला नाही. जमियत उल् उलेमाचे पुढारी हिंदुस्थानला सध्या 'दार उल् हरब' (शत्रु- प्रदेश) मानीत नाहीत. पण मुस्लिम कायद्यांत सुधारणा करण्याचा सरकारने प्रयत्न केला, तर ते भारताला तसा मानू लागतील." (इस्लामिक मॉडर्निझम इन् इंडिया अँड पाकिस्तान, पृष्ठ २५९).
डोनाल्ड युजीन स्मिथ यांनी आपल्या 'इंडिया अँज् ए सेक्युलर स्टेट' या ग्रंथांत हीच चिंता व्यक्त केली आहे. "आज शरीयतचा अंमल चालतो म्हणूनच मुस्लिम लोक भारताला शत्रु- देश मानीत नाहीत" असें त्यांनीहि म्हटलें आहे. "पाकिस्तानांत आयूबखानांनी सुद्धा उलेमांना बाजूस सारून मुस्लिम कुटुंब कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. इतर मुस्लिम देशांनी तर इहवादाच्या दृष्टीने खूपच प्रगति केली आहे. पण हिंदी मुस्लिम मात्र अजून परिवर्तनविरोधी भूमिकेवरच ठामपणे उभे आहेत. अजून ते मध्ययुगीन वातावरणांतच आहेत. त्यामुळे त्या समाजाची प्रगति खुंटून जाईल. प्रगतीसाठी कायद्याचें ऐहिकीकरण अपरिहार्य आहे" (पृ. ४२२). छगलांसारख्या कांही मुस्लिम नेत्यांना हें सर्व मान्य आहे, पण मुस्लिम समाज त्यांच्यामागे नाही. तो उलेमा, मुल्ला-मौलवी यांच्यामागे आहे.
जिहादचा आदेश
आणि हे उलेमा परिवर्तनाला अनुकूल तर नाहीतच, पण उलट हिंदुस्थानांतच इस्लामी शासन स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मौलाना सद्रुद्दिन इस्लाही यांनी 'फरिजाह इक्मत दीन' हें पुस्तक लिहिलें आहे. जमाते इस्लामी हिंदने तें प्रकाशित केलें आहे. खलिफांच्या काळचे कायदेकानू लागू करण्यासाठी भारतांत इस्लामी राज्य प्रस्थापित केलें पाहिजे व त्यासाठी मुस्लिमांनी धर्मयुद्धालाजिहादला- सिद्ध झालें पाहिजे, असा उपदेश मौलानांनी त्या पुस्तकांत केला आहे. (भारतीय मुस्लिम- हसनैन, पृष्ठ ६०).
हमीद दलवाई हे पुरोगामी मुस्लिम तरुण आहेत. सर्व भारतभर मुस्लिमांत नवविचार प्रसृत करण्यासाठी ते हिंडत असतात. म्हणतात की, "मला भेटलेल्या दहा मुस्लिमांपैकी नऊ मुस्लिम तरुण सर्व भारत पुन्हा जिंकून तेथे इस्लामी राज्य प्रस्थापित करण्याचे मनोरथ बाळगून आहेत." त्यांनी असेंहि बजावून सांगितलें आहे की, ही काही मूठभर मुस्लिमांची वैयक्तिक मतें आहेत असें समजण्याची चूक आपण करूं नये. बहुसंख्य मुस्लिम समाजाची हीच विचारसरणी आहे. (मुस्लिम जातीयतेचें स्वरूप, पृष्ठे २९-३०). जमाते इस्लामीच्या 'रेडियन्स' या इंग्रजी पत्राने लिहिलें आहे की, भारतांतील सर्व लोक एका धर्माचे बनतील तेव्हाच भारतांतील धार्मिक संघर्ष संपुष्टांत येईल.
हें उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवूनच आज मुस्लिम नेते मुस्लिमांना अभंग संघटना करा, आपलें बळ वाढवा, त्यावांचून आपल्याला जगतां येणार नाही. इस्लामचें रक्षण करतां येणार नाही, असा उपदेश करतात. तेव्हा दुसऱ्या पाकिस्तानची ही पूर्वतयारी आहे हें स्पष्ट आहे.
दंगे कां होतात ?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला आता तेवीस वर्षे झालीं. त्याच वेळीं मुस्लिमांना पाकिस्तान तोडून देण्यांत आलें आणि भेदनीतीचा अवलंब करून हिंदु-मुस्लिम ऐक्यावर बिब्बा घालणारे ब्रिटिश राज्यकर्तेहि येथून त्याच वेळीं निघून गेले. तरी अजून या दोन जमातींत सारखे दंगे कां होतात, असें मोठ्या विस्मयाने कांही लोक विचारतात. हे दंगे म्हणजे भारताला काळिमा आहे, असें सरकारी प्रवक्ते म्हणतात. सरकार लगेच मंत्रिमंडळाच्या मुख्य मंत्र्यांच्या, सर्वपक्षीय नेत्यांच्या सभा घेतें, समित्या नेमतें आणि दंगलीच्या कारणांचा शोध घेण्यास सांगतें. हें सर्व आता ठरीव कर्मकांड झाले आहे. कारण, खरें कारण जें आहे त्याचा उच्चारहि कोणी करीत नाही, करणार नाही.
या दृष्टीने पाहतां मुस्लिम नेत्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपले मनोगत व्यक्त केलें आहे. राष्ट्रनिष्ठा आम्हांला मान्य नाही, लोकशाहींत आमचा नाश होईल, इहवाद हें पाप आहे, भारतीय परंपरा आमच्या मुलांना शिकवूं नका, तिच्या गौरवाने इस्लाम दूषित होईल, मानवकृत कायदा आम्ही मानीत नाही, सर्वत्र अल्लाचा- कुराणाचा कायदाच असला पाहिजे, आणि तसें घडविण्यासाठी भारतांत इस्लामी राज्याची स्थापना झाली पाहिजे.
हिंदु-मुस्लिमांचा प्रश्न ज्यांना खरोखरच सोडवावयाचा आहे त्यांनी हें सत्य डोळ्यांपुढे ठेवूनच विचार करणें अवश्य आहे. तसा विचार आज कोणीहि करीत नाही. ही समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी काँग्रेस सरकारची आहे. पण त्या सरकारने ब्रिटिशांची राजनीतीच पुढे चालविली आहे. नव्हे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा काँग्रेसची तीच नीति होती.
६
मुस्लिमांनी भारतावर प्रथम आक्रमण केलें तेव्हापासून आजपर्यंत, स्वातंत्र्य- प्राप्तीनंतरच्या काळांतहि तो समाज विभक्त वृत्तीचा कसा परिपोष करीत आहे, भारतीय समाजाशी एकरूप व्हावयाचें नाही हा निर्धार त्याने कसा पाळला आहे आणि भारतबाह्य मुस्लिम समाजाशी व खलिफा- सुलतानांशी संबंध ठेवून भारतीयांशीं सतत शत्रु-भाव त्याने कसा जोपासला आहे, तें मागील लेखांतून आपण पाहिले.
अंध धर्मनिष्ठा, शब्दप्रामाण्य, जीर्णमतवाद, पाश्चात्त्य विद्येला विरोध, विज्ञान- विन्मुखता हीं सर्व इहवादविरोधी तत्त्वेंच या दुर्घटनेला कारण आहेत आणि त्या समाजांतील मुल्ला-मौलवींनी सर्वधर्म समानत्व, समता, राष्ट्रनिष्ठा, बुद्धिवाद, या इहवादी तत्त्वांची गळचेपी करून वरील तत्त्वेंच त्या समाजांत दृढमूल करून, त्याला शतकानुशतकें पोथीनिष्ठ अवस्थेतच खिळून टाकल्यामुळे भविष्यकालांतहि कांही आशेचे किरण दिसत नाहीत, हाहि विचार त्या विवेचनांत वारंवार मांडलेला आहे.
आता प्रश्न असा येतो की, गेल्या शतकांत होऊन गेलेल्या भारताच्या नेत्यांनी व विशेषतः काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी मुस्लिम समाजांतील या इहवादविरोधी प्रवृत्तींना आळा घालण्याचा कांही प्रयत्न केला की नाही ? का प्रयत्न करूनहि त्यांना यश आलें नाही?
या प्रश्नाचें उत्तर अत्यंत खेदजनक व उद्वेगकारक आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मुस्लिमांच्या या प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न तर केला नाहीच, तर उलट त्याचा परिपोष करून भारताचा कायमचा घात करून ठेवला आहे.
पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिमांच्या या विभक्तवृत्तीची काँग्रेसच्या नेत्यांनी एक भ्रांत कारणमीमांसा करून तिलाच ते अंधपणें कायम चिकटून राहिले. हिंदु- मुस्लिमांच्या विद्वेषाला, मुस्लिमांच्या हिंदुद्वेषाला, ब्रिटिशांची भेदनीतीच फक्त कारणीभूत आहे, मुळांत मुस्लिमांची वृत्ति मुळीच तशी नाही व पूर्वीहि कधी नव्हती, असा कायमचा सिद्धान्तच त्यांनी करून टाकला होता. ब्रिटिशपूर्व काळांत मुस्लिमांनी हिंदूंवर सतत, आक्रमण केलें, अत्याचार केले. या दोन समाजांत अखंड संग्राम चाल होते याची कारणें धार्मिक नसून आर्थिक होती, याच मताला जवाहरलाल नेहरू शेवटपर्यंत कवटाळून बसले होते.
इतिहासाचे अज्ञान
१९३६ साली मुस्लिम लीगची जातीयता अगदी उघड झाली होती. राष्ट्रीय मुस्लिमांचें स्वरूपहि स्पष्ट झालें होतें. मागल्या अनेक शतकांचा इतिहासहि या वेळेपर्यंत लिहिला गेला होता. तरी "मुस्लिमांचा जातीयवाद हा आजकालचा आहे, आमच्या डोळ्यांदेखत तो उद्भवला असून, सामाजिक व आर्थिक प्रश्नांची उकल होतांच तो विरून जाईल" असें नेहरू म्हणत होते. या संबंधांत पंडितजींवर टीका करतांना आर. सी. मुजुमदार यांनी म्हटले आहे की, "नेहरूंचें हें इतिहासाचें अज्ञान आहे. महंमद गझनी, तैमूर, फिरोझ तघलख, शिकंदर लोदी, औरंगजेब यांनी जे भयानक अत्याचार केले ते कोणत्या अर्थाने आर्थिक किंवा राजकीय म्हणतां येतील?" (स्ट्रगल फॉर फ्रीडम पृष्ठ ५९०, ५९१).
मला वाटतें इतिहासाच्या अज्ञानापेक्षा हा मार्क्सवादाचा प्रभाव आहे. सोव्हिएट रशियाच्या व चीनच्या साम्राज्याचा विस्तार पंडितजींच्या डोळ्यांदेखत होता. तरी कम्युनिस्ट हे साम्राज्यवादी असूच शकत नाहीत, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती आणि तिच्यापायींच निर्धास्त राहून त्यांनी संरक्षणसिद्धताहि केली नाही. असा मनुष्य मागल्या काळांतल्या लढाया धार्मिक कारणाने झाल्या, हें कसें मान्य करणार? प्रत्येक ठिकाणीं आर्थिक प्रेरणाच प्रभावी असतात, या मार्क्सच्या वचनावर, मुस्लिमांची जशी कुराणावर, तशीच नेहरूंची व सर्व जातींच्या समाजवादी नेत्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांची ही शब्दप्रामाण्यबुद्धीच भारताच्या इहवादाला घातक ठरली आहे.
ब्रिटिशांची भेदनीति हिंदु-मुस्लिमांच्या वैराला व संघर्षाला कारणीभूत झाली असेल; पण हॉडसन् यांनी आपल्या 'दि ग्रेट डिव्हाइड' या पुस्तकांत म्हटल्याप्रमाणे "जित लोकांत भेद माजविण्याची वृत्ति मुळांत असल्यावांचून जेत्यांची भेदनीति कधीहि यशस्वी होणार नाही" (पृष्ठ १६). पण या अत्यंत सामान्य सिद्धान्ताचें काँग्रेसजनांना आकलन झालें नाही. नव्हे त्यांना तें करून घ्यावयाचें नव्हतें. ना. गोखले यांनी शत्रुत्वाची पूर्वपरंपरा, हें कारण बरोबर सांगितलें होतें. "या दोन जमातींचा वारसाच वैराच्या, शत्रुत्वाच्या परंपरेचा आहे. हा शत्रुभाव एरवी सुप्त असला, तरी अगदी क्षुल्लक कारणाने तो पेट घेतो. तेव्हा या परंपरागत शत्रुत्वाला आळा घालणें, हा उपाय होय" असें त्यांनी म्हटलें आहे. (गोखले, भाषणें- नटेसन पृष्ठ ११३६). पण अंध, शब्दप्रामाण्यवादी लोकांना या शहाण्या बोलांचा काय उपयोग?
आज अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण यांसारखे त्या वेळचे काँग्रेस नेते अशी मीमांसा करण्यांत आमचा मोठा प्रमाद झाला, अशी जाहीर कबुली देत आहेत. पण आता हे नेते निष्प्रभ झाले आहेत. जे सत्तारूढ आहेत ते अजूनहि सत्य मान्य करण्यास तयार नाहीत. पण या संबंधांत आणखी एक विचार मनांत येतो. इंग्रजांची भेदनीति हेंच हिंदु-मुस्लिम संघर्षाला कारण आहे, असें ज्या काँग्रेस नेत्यांना वाटत होते त्यांनी त्या कारणाची मीमांसा त्या वेळीं तरी मुस्लिमांना ऐकविली कां? हिंदूंना त्यांनी लाखोली वाहिली, पण मुस्लिम समाजापुढे जाऊन, "सरकारच्या भेदनीतीला बळी पडून तुम्ही अराष्ट्रीय होत आहांत, या देशाचा घात करीत आहांत, द्विराष्ट्र- वादाची जोपासना करीत आहांत, हिंदु समाजावर अन्याय करीत आहांत," असें परखडपणें त्याला कधी सुनावलें का ? असें धैर्य त्यांनी कधीहि दाखविलें नाही. म्हणजे त्यांच्या मताने जें सत्य होतें त्याचेंहि प्रतिपादन त्यांनी कधी निर्भयपणें केलें नाही. त्यांचा निर्भयपणा केवळ हिंदूंपुरता होता.
हिंदु-मुस्लिम संघर्षाची अशी भ्रांत मीमांसा मनांत असल्यामुळे काँग्रेसचे नेते मुस्लिमांच्या विघटक वृत्तीला आळा घालू शकले नाहीत. पण निदान त्यांनी त्यांच्या जातीय वृत्तीचा परिपोष तरी करावयाचा नव्हता ! पण हेंहि पथ्य त्यांनी सांभाळलें नाही. महात्माजींच्याकडे काँग्रेसचें नेतृत्व आल्यापासून म्हणजे खिलाफतीच्या चळवळीपासून काँग्रेसने मुस्लिमांच्या जहरी जातीयवादाला खतपाणी घालण्याचें एकदा धोरण अवलंबिलें तें आजतागायत तिच्या नेत्यांनी अत्यंत निष्ठेने पाळलेलें आहे.
खिलाफतीच्या चळवळीमुळे मुस्लिमांतील सर्व धर्मांध, पिसाट, हिंसक व अत्याचारी प्रवृत्ति उफाळून आल्या व त्यांतूनच मलबारांत मोपल्यांचे अत्याचार झाले, हें मागे सांगितलेंच आहे. महात्माजींनी या अत्याचाराचा निषेध न करतां कौतुकच केलें. "त्या शूरवीर, देवभीरू मोपल्यांनी आपल्या धर्ममताप्रमाणे योग्य वाटलें तें केलें" असें ते म्हणाले. या तत्त्वाप्रमाणे जगांत कोणतेंहि कृत्य निंद्य ठरणार नाही. कारण आपापल्या धर्ममताप्रमाणे किंवा नीतिमतांप्रमाणेच सर्व लोक वागत असतात. पोपचीं क्रूर न्यायासनें पाखंडी लोकांना नरकयातना देत, त्या आपल्या धर्ममताप्रमाणेच देत. निग्रो गुलामांचा व्यापार करणाऱ्या लोकांची, तशी येशूचीच आज्ञा आहे, अशी श्रद्धा होती! सोव्हिएट रशियांत विरोधी लोकांच्या कत्तली करतात, त्या त्यांच्या मतें जगाच्या कल्याणासाठीच होत. तशी नीतीच लेनिनने सांगितलेली आहे. पण त्यांना महात्माजी निंद्य मानतात. मात्र स्त्रियांच्या, मुलांच्या, वृद्धांच्या कत्तली करणारे, बलात्कार करणारे मोपला मात्र शूरवीर आणि पापभीरू!
हे सर्व अत्याचार खिलाफत चळवळीमुळे झाले होते. केरळ काँग्रेस समितीने तसें अहवालांत म्हटलें होतें. महात्माजींचे परम मित्र ॲण्ड्रयूज यांनी आपल्या "हें तुमच्या खिलाफत चळवळीमुळेच झालें आहे" असें स्पष्ट लिहिलें होतें. तरी काँग्रेसने "असहकारिता व खिलाफत यांचा या अत्याचारांशीं कांही संबंध नाही" असा ठराव संमत केला आणि सत्य दडपून टाकलें.
१९२१ सालीं अफगाणिस्तानचा अमीर भारतावर चालून येणार अशी बातमी आली होती. तेव्हा महात्माजी म्हणाले, "मी एका प्रकारें अप्रत्यक्षपणें अमीराला साह्यच करीन. मी माझ्या देशबांधवांना सांगन की, ब्रिटिश सरकारने देशाचा आपल्या वरील विश्वास घालविला आहे. अशा सरकारला अमीराशी लढण्यांत मदत करणें हा गुन्हा आहे. या कारणाने भारताचा अफगाणांच्या हातून नाश झाला तरी चालेल, पण इंग्रजांना मदत करून अफगाणांच्या हातून भारताला वांचविणें यांत भारताचा स्वाभिमान विकण्यासारखें आहें." (स्ट्रगल फॉर फ्रीडम- मुजुमदार, पृष्ठ ८१३, इंडियन मुस्लिम्स- रामगोपाळ, पृष्ठ १५३). पण अमिराविरुद्ध इंग्रजांना मदत करणें हा एकच मार्ग नव्हता. "आम्ही अहिंसावादी सत्याग्रही पथके उभारून अमिरांशीं लढूं व त्याला जिहादसाठी जाऊन मिळणाऱ्या महंमदअल्लींशीं व त्यांच्या मुस्लिम अनुयायांशीं लढूं" असें महात्माजींना म्हणतां आलें असतें. पण मुस्लिमांशी लढू असें म्हणणें हें महात्माजींच्या व्रताच्या विरुद्ध होतें ! या वेळीं लाला लजपतराय, सी. एफ्. ॲण्ड्रयूज, बिपिनचंद्रपाल यांनी गांधीजींच्या त्या उद्गारावर कडक टीका केली, पण त्यांनी आपलें व्रत सोडलें नाही.
१९२६ सालीं अब्दुल रशीद याने श्रद्धानंदांचा खून केला. त्या वेळीं महात्माजींनी त्याचा निषेध केला काय? नाही. त्यांनी त्याला 'भाई रशीद' म्हणून संबोधून त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्याचे जाहीर केलें. ते म्हणाले, "त्याच्या कृत्याला तो जबाबदार नाही. जातीय द्वेष आपण चेतवितों. तो चेतविणारेच याला जबाबदार आहेत." पण महात्माजींची ही उदार मीमांसा हिंदूंच्या वेळीं टिकत नाही. १९२४ साली अर्नेस्ट डे या युरोपीय अधिकाऱ्याचा गोपीनाथ सहा या क्रांतिकारक तरुणाने खून केला. महात्माजी त्या वेळी अहमदाबादच्या अ. भा. काँग्रेस समितींत त्याचा निषेध करूं लागले. वास्तविक राजकीय नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चेतविलेल्या द्वेषामुळे त्याने हें कृत्य केलें होतें. तो त्याला जबाबदार नव्हता. पण हा विचार त्याच्या वेळीं गांधींनी केला नाही आणि बंगाली लोकांच्या विरोधामुळे निषेधाचा ठराव संमत होईना तेव्हा ते रडूं लागले. (काँग्रेसचा इतिहास- पट्टाभिसीतारामय्या, पृष्ठे ५१६, ४६४).
शुद्धीकरणाला विरोध
महात्माजींचा व म्हणूनच काँग्रेसचा आर्य समाजाने चालविलेल्या शुद्धीच्या चळवळीला विरोध होता. "हे खिश्चनांचे अनुकरण आहे, हिंदु धर्मांत धर्मांतराला मान्यता नाही, या चळवळीमुळे हानीच जास्त झाली आहे" असें ते म्हणत. वास्तविक प्राचीन काळीं शुद्धि, पतितपरावर्तन हिंदु धर्मशास्त्राने मान्य केलें होतें. पुढल्या काळांत शृंगेरीच्या शंकराचार्यांनी, विजयनगरच्या माधवाचार्यांनी तिला मान्यता दिली होती. आणि पूर्वी शुद्धि नसली, तरी नवीन पायंडा पाडण्यास कोणती हरकत होती? अस्पृश्यता पूर्वी होती. ती नष्ट करावी, स्पृश्यास्पृश्यांत विवाह घडवावे, हा नवा पायंडा महात्माजींनी पाडलाच होता! पण त्यापेक्षाहि जोरात प्रश्न उद्भवतो तो असा की, महात्माजींनी धर्मांतराच्या बाबतींत मुस्लिमांवर अशी टीका कां केली नाही? कोणीच धर्मांतर घडवू नये, सर्व धर्म समान आहेत असें ते म्हणत. पण टीका फक्त हिंदूंवर करीत!
पण तीच त्यांची वृत्ति होती. हिंदूंची देवळें पाडून तेथे मशिदी बांधल्या, तरी त्याला हरकत नाही पण मशीद पाडणें हा मात्र भयंकर गुन्हा आहे, हें सुभेदार अलीनकीखान यांचें मत मागे एके ठिकाणी दिले आहे. हीच काँग्रसची, महात्माजींची व पंडितजींची वृत्ति होती. मुस्लिमांचा प्रश्न आला की महात्माजी सत्य, अहिंसा, मानवता, समन्याय हीं आपली प्रिय तत्त्वें वाऱ्यावर उधळून देत. शिवाजी व राणा प्रताप यांना त्यांनी 'वाट चुकलेले देशभक्त' असें अगदी सहज बदनाम केलें. पण लक्षावधि हिंदूंच्या कत्तली करणारे तयमूर, फिरोज तघ्लख, अल्लाउद्दीन, औरंगजेब यांसारख्या मुस्लिम सुलतानांवर त्यांनी चकून सुद्धा कधी टीका केली नाही.
अब्दुल रशीदसारखे अनेक मुस्लिम खुनी पुढे निघाले. मुस्लिमांनी त्यांचा हुतात्मे म्हणून गौरव केला. पण महात्माजींनी या खुनी इसमाचा कधीहि निषेध केला नाही किंवा त्यांचा गौरव करणाऱ्या मुस्लिमांना कधी जाब विचारला नाही. कलकत्त्याला मुस्लिमांनी हिंदूंवर भयंकर अत्याचार केले, कत्तली केल्या. त्यांचा सूड म्हणून बिहार व उत्तर प्रदेश येथील हिंदूंनी तेथील मुस्लिमांच्या कत्तली केल्या. त्या वेळी "इतर प्रांतांतील मुस्लिम सुसंस्कृतपणें वागावयास हवे असतील, तर हिंदूंनी बिनशर्त माफी मागावी", असा महात्माजींनी उपदेश केला व सर्व हिंदूंना संदेश दिला की, "संपूर्ण आत्मनाशाचा धोका पत्करूनहि, हिंदूंनी औदार्याचें असें उदाहरण घालून द्यावें!" (दि इंडियन ट्रिमुव्हरेट- व्ही. वी. कुलकर्णी, पृष्ठ ३८८). अशा तऱ्हेचा उपदेश त्यांनी चुकून सुद्धा मुस्लिमांना कधी केला नाही. तेव्हा हिंदु व मुस्लिम यांना भिन्न न्याय लावले पाहिजेत अशीच त्यांची वृत्ति होती हे उघड आहे.
पंडित नेहरू यांनी जन्मभर याच विषम नीतीचा, याच जातीय वृत्तीचा पुरस्कार केला. वरील प्रसंगी बिहारच्या हिंदूंना "तुमच्यावर मी बाँबवर्षाव करीन अशी धमकी त्यांनी दिली. सबंध जन्मांत पंडितजींनी मुस्लिमांना अशी धमकी कधी दिली नाही. त्या वेळी राजसत्ता नुकतीच त्यांच्या हाती आली होती. तिची पहिली सलामी हिंदूंना अशी मिळाली! अफजलखान- शिवाजी प्रकरणांत, शिवाजीने कपटाने खानाला मारलें म्हणून महाराजांच्यावर ठपका ठेवून ते मोकळे झाले. पण नित्य कपट-विद्येचा आश्रय करणाऱ्या खानाला किंवा इतर मुस्लिमांना त्यांनी दूषण दिले नाही.
सरदार पटेलांच्या प्रेरणेने भारतांतील सर्व संस्थाने भारतांत विलीन झाली. हैदरावादच्या निजामाने नकार देऊन हिंदूंच्यावर रझाकारी अत्याचार केले. असें असूनहि निजामाने रझाकारी अत्याचार तीन महिन्यांच्या आंत थांबवावे, एवढ्याच अटीवर त्याचें संस्थान जवळ जवळ सार्वभौम सत्तेवर ठेवण्याचें भारत सरकारने मान्य केलें होतें. त्याची स्वतंत्र सेना ठेवण्यासहि मान्यता दिली होती! निजामाने हेंहि मान्य केलें नाही तेव्हा त्याच्यावर स्वारी करण्यांत आली आणि त्या लढ्यांत त्याचा पूर्ण पराभव झाला असतांनाहि त्याची जिंदगी खालसा न करतां त्याला सर्व इतमामासह सांभाळण्यांत आलें! (दि इंडियन ट्रिमुव्हरेट- व्ही. बी. कुलकर्णी, पृष्ठ ४३१).
काश्मीरच्या राजाने आपले संस्थान भारतांत सामील करण्याचें मान्य केलें. साहजिकच त्याची पुढची व्यवस्था सरदार पटेलांच्या हाती आली. अर्थातच इतर संस्थानांप्रमाणे तेंहि विलीन झालें असतें. पण शेख अब्दुल्लांच्या सांगण्यावरून पंडितजींनी काश्मीर संस्थान सरदारांच्या अखत्यारीतून काढून घेतलें. पुढे काय झालें हे सर्वश्रुतच आहे. डॉ. के. एम. मुन्शी म्हणतात, शेखांच्या सल्ल्यावरून नेहरूंनी काश्मीर असें सरदारांकडून काढून घेतलें नसतें, तर काश्मीरची समस्या उद्भवली नसती " (वरील ग्रंथ, पृष्ठ ३९३). पंडितजींच्या मुस्लिमप्रेमामुळे भारताच्या हिताची केवढी हानि झाली आहे तें यावरून स्पष्ट दिसून येईल.
त्यांची हीच जातीय वृत्ति अखेरपर्यंत कायम होती. त्यानंतर त्यांच्या वारसांनी अनन्यनिष्ठेने तिचाच परिपोष चालविला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळांत हिंदु-मुस्लिमांच्य ऐक्याच्या नावाखाली मुस्लिम जातीय वृत्तीची काँग्रेसने जोपासना केली. स्वातंत्र्यानंतर सत्तेसाठी तेंच व्रत तिने पुढे चालविलें. पण तत्पूर्वी हिंदु-मुस्लिम ऐक्य हे, जें उद्दिष्ट काँग्रेसच्या नेत्यांनी डोळ्यांपुढे ठेविलें होतें त्याचा विचार करूं.
महात्माजी व पंडितजी या दोन थोर पुरुषांनी हिंदुस्थानांत राष्ट्रीय वृत्तीचें संवर्धन व्हावें म्हणून सर्व जन्मभर प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी वाटेल त्या यातना सोसल्या, असीम त्याग केला. हिंदु-मुस्लिम ऐक्य हा त्यांच्या त्या प्रयत्नांचाच भाग होता. पण त्या दृष्टीने पाहिलें तर असें दिसतें की, इतर प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी जें पुरोगामी, तर्कशद्ध, बुद्धिवादी व इहवादी धोरण अंगीकारलें होतें त्याचा मुस्लिमांच्या बाबतींत त्यांनी जाणूनबुजून त्याग केला होता. राष्ट्रसंवर्धनाच्या आड मुस्लिमांची कोणतीं तत्त्वें येत होतीं ? विश्व-मुस्लिमवाद, कुराणाविषयीचें व उलेमाविषयींचें अंधप्रामाण्य, धर्माची अपरिवर्तनीयता, धर्मसमतेला विरोध, अल्लाचाच कायदा आम्ही मानूं, मानवाने केलेला कायदा मानणार नाही हा आग्रह, यांतून निर्माण होणारा लोकशाहीचा द्वेष, हीं तीं तत्त्वें होतीं.
या तत्त्वांचा आग्रह मुस्लिम समाजाने सोडल्यावांचून हिंदी राष्ट्राचे संवर्धन होणें कधीहि शक्य नव्हतें व अजूनहि नाही. महात्माजी व पंडितजी यांनी वरील तत्त्वें मुस्लिमांनी त्यागिली पाहिजेत असा प्रचार मुस्लिम समाजांत जाऊन केला काय? बुद्धीला न पटणारी वचनें धर्मग्रंथांत असली तरी मी मानणार नाही, असें महात्माजी म्हणत. त्यांनी हा विचार मुस्लिम समाजांत प्रसृत करण्यासाठी लेख लिहिले काय? स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता यांचे महात्माजी कडवे पुरस्कर्ते होते. आपल्या मुस्लिम बांधवांच्यावर या दृष्टीने त्यांनी कधी टीका केली काय? ज्या मुस्लिमांनी वरील सर्व राष्ट्रविरोधी तत्त्वांचें समर्थन केलें त्यांना त्यांनी काँग्रेसप्रवेश नाकारला काय? निदान तुमच्या या श्रद्धा हिंदी राष्ट्राच्या घडणीला घातक आहेत, असें त्यांना जाहीरपणे सांगितलें काय?
महात्माजी नेहमी म्हणत की, हिंदूंनी मुस्लिम जें मागतील तें द्यावें, बिनशर्त द्यावें. मुस्लिमांना विश्व- मुस्लिमवाद हवा होता, मुस्लिमांना इस्लामी कायद्याचें राज्य हवें होतें, मुस्लिमांना लोकशाही नको होती, महंमदअल्लींनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून सांगितल्याप्रमाणे, मुस्लिमांना इस्लाम-दीक्षा देण्यासाठी भारताचा एक विभाग तोडून हवा होता. त्यांच्या या मागण्या जाहीर होत्या. तरी इंग्रजांनी स्वराज्यसत्ता जीनांच्या किंवा निजामाच्या ताब्यांत दिली तरी चालेल, असें शेवटच्या क्षणापर्यंत महात्माजी म्हणत असत. हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य होऊन बसलें आहे ते यामुळे.
७
जातीयवादाचा परिपोष करावयाचा, विषमनीतीचा अवलंब करावयाचा आणि हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य करून ठेवावयाचें, हेंच धोरण स्वातंत्र्यानंतरहि काँग्रेस नेत्यांनी अखंड चालू ठेवलेलें आहे. १९५४ साली केवळ हिंदूंसाठी नागरिक कायदा करण्यांत आला. त्यावर "केवळ हिंदूंसाठी कायदा करणें ही प्रतिगामी वृत्ति आहे" अशी एका सभासदाने टीका केली. तिला उत्तर देतांना पंडितजी म्हणाले, "सर्वांसाठी तसा कायदा करण्याची वेळ आलेली नाही. त्यासाठी बरीच पूर्वतयारी करणें अवश्य आहे." प्रश्न असा येतो की, ही पूर्वतयारी करण्यास नेहरूंनी कधी प्रारंभ केला होता काय?
आजहि गृहमंत्री यशवंतराव चव्हाण सोळा वर्षांनी समान नागरी कायद्यास विरोध करतांना, हीच सबब सांगत आहेत. याचा अर्थ असा की, काँग्रेस नेत्यांना ही पूर्वतयारी करावयाची नाही. त्यांना सत्तालोभामुळे तें धैर्य होत नाही. मागे १९३७- ३८ सालीं मुस्लिम जनतेशी संपर्क साधण्याचा काँग्रेसने निर्धार केला होता. त्यांत यश आलें नाही. पण स्वातंत्र्यानंतर तिने तो प्रयत्नहि केला नाही. कुराण कितीहि पूज्य असले, तरी तें सध्याच्या कायद्याचा आधार होऊं शकणार नाही, शरीयतमध्ये परिवर्तन करणें अपरिहार्य आहे, मुस्लिमांनी स्त्रियांना समान हक्क दिले पाहिजेत, असे विचार पंडितजींनी, न्या. मू. छगला, न्या. मू. बेग, प्रा. हबीब यांसारख्या मुस्लिमांना हाताशी घेऊन मुस्लिम समाजांत रुजविण्याचा प्रयत्न करणें अवश्य होतें. पण मुस्लिमांचीं मतें जातील या भीतीने पंडितजींनी कांही एक केलें नाही. मुस्लिमांच्या जात्यंधतेला ते खतपाणीच घालीत राहिले.
पंडितजी इहवादी होते, विज्ञानवादी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, पण मुस्लिमांचा प्रश्न आला की, त्यांची सर्व तत्त्वें लुप्त होत आणि मग अत्यंत प्रतिगामी, जीर्ण, जात्यंध अशा मुस्लिम संस्थांशी व व्यक्तींशीं ते सहकार्य करीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरहि मुस्लिम लीगशी काँग्रेस सहकार्य करीत राहिली याचा दुसरा कोणता अर्थ आहे ?
लीगशी हातमिळवणी
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लिमांच्या वृत्तींत जसा काडीमात्र फरक पडला नाही तसाच पंडितजींच्या व काँग्रेसच्या मुस्लिम- प्रेमांतहि फरक पडला नाही. ज्या लीगने फाळणी घडवून आणली, ज्या लीगने 'डायरेक्ट ॲक्शन'चा अवलंब करून विध्वंस, जाळपोळ, अत्याचार करून हजारो हिंदूंच्या कत्तली केल्या, त्या लीगवर काँग्रेस स्वातंत्र्यानंतरहि एकनिष्ठ प्रेम करीत राहिली. १९५२ साली आसाममध्ये चाळीस लक्ष मतदारांपैकी आठ लक्ष मुस्लिम होते. अर्थात् निवडणूक लढवा- जिंकावयाची तर लीगवाल्या मुस्लिमांना तिकिटे देणें अवश्यच होतें. सय्यद सादुल्ला या मुस्लिमाला काँग्रेसने सभासद करून घेतलें. त्याने वीस जागा मुस्लिमांसाठी मागितल्या. काँग्रेसने त्या दिल्या नाहीत. त्यामुळे त्याने काँग्रेस सोडली. तरी काँग्रेसने लीगवादी मुस्लिमांना चौदा तिकिटें दिलींच. केरळमध्ये काँग्रेसने मुस्लिम लीगशी सहकार्य केलें. आसाम व केरळ हे सरहद्दीचे प्रांत. तेथे तरी काँग्रेसने लीग-संबंधांत जपणूक करणें अवश्य होतें. पण देशहिताची ज्यांना चिंता असते त्यांच्या या गोष्टी. जे निवडणूक व सत्ता हेंच अंतिम उद्दिष्ट मानतात त्यांच्या नव्हे!
१९६१ सालीं काँग्रेसचे अध्यक्ष संजीव रेड्डी यांनी लीग-दोस्तीचें जोरदार समर्थनच केलें आणि त्याच वेळीं, यामुळे काँग्रेस जातीय ठरत नाही, असाहि त्यांनी निर्वाळा दिला. लक्ष्मीमेनन, काँग्रेसचे माजी अध्यक्ष ढेबरभाई यांनी काँग्रेस जातीय- वादाला कवटाळीत आहे, अशी टीका केली. पण तें अरण्यरुदन ठरलें आणि लीगवर इतकें अनन्य प्रेम करून मिळालें काय ? लीगचे अध्यक्ष महंमद इस्माईल म्हणाले, "अल्पसंख्याकांच्या दुःखाला नेहरूच जबाबदार आहेत."
लीगवरच नव्हे तर काँग्रेसचें व पंडितजींचें पाकिस्तानवरहि स्वातंत्र्यानंतर प्रेम कायम होतें. पाकिस्तानवर टीका केली, तर पंडितजींना राग येत असे. ३० ऑक्टोवर १९६० रोजी शुक्लनगर येथील भाषणांत ते म्हणाले, "पाकिस्तानविषयी प्रखर भाषण करून काय होणार ? आपले पूर्वीचे स्नेहसंबंध आहेत, स्वातंत्र्ययुद्धांत आपण खांद्याला खांदा लावून लढलों होतों, हें विसरूं नका." यामुळेच पाकिस्तानांतून भारतांत लक्षावधि लोक चोरून घुसत याची पंडितजींना मुळीच काळजी वाटत नसे. १९५० सालीं काचारमध्ये दंगल झाली. त्या वेळीं चौकशी समितीने "काचारमधील मुस्लिमांवर लीगचें वर्चस्व आहे," "आम्ही जगज्जेते मुसलमान, काचारचें करणार पाकिस्तान" अशी गाणीं तेथे गातात, असें स्पष्ट सांगितलें. तेथील मंत्री मोइनुलहक्क चौधरी व दुसरे एक लीगवादी मंत्री हे काचार पाकिस्तानला जोडण्याच्या चळवळीमागे आहेत, असा गुप्तहेर खात्याने अहवाल सादर केला होता; पण तो अहवालच दडपून ठेवण्यांत आला. व चौधरी हे पाकिस्तान- धार्जिणे नाहीत असें नेहरूंनी त्यांना प्रशस्तिपत्र दिलें.
आज आसामांतील गोलपाडा जिल्ह्यांत हाच प्रचार चालू आहे. मुस्लिमांच्या सभेंत तेथे पाकिस्तान ध्वज लावले जातात. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा होतात. पण याकडे, अल्पसंख्याकांच्याकडे, प्रेमाने पाहण्याची काँग्रेसची रीत कायम आहे. डिसेंबर १९५९ साली अ. भा. काँग्रेस समितीच्या ठरावावर टीका करतांना टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलें होतें की, "काँग्रेसला काळजी आदिवासींची नाही, वर्गीकृतांची नाही, इतर टोळ्यांची नाही, फक्त धार्मिक अल्पसंख्याकांची आहे. कारण त्यांचीं मतें मिळवावयाची आहेत, यामुळे जुनी भुतें वर येऊन त्याचे परिणाम फार वाईट होतील." (दि. २८-१२-५९). काँग्रेसच्या या वृत्तीसंबंधी 'केसरी'ने असेच उद्गार काढले आहेत. "सत्ता टिकविण्यासाठी जातीयवादी मुसलमानांचा आधार घेणाऱ्या राज्यकर्त्यांना आसामांत, त्यांच्या पाकिस्तानधार्जिण्या बंधूंनी चालविलेल्या कारवाया किरकोळ वाटतात यापरतें आसामचे व तेथील हिंदूचें दुर्दैव कोणतें?" (दि. ५-६-१९७०).
लाचार मनोवृत्ति
नेहरू असतांनाच काँग्रेस सत्तेसाठी अशी जातीयवादी झाली होती. मग त्यांचा आधार गेल्यानंतर तिचा जातीयवाद जास्तच तीव्र झाला असला तर नवल नाही. आता काँग्रेसची शकले झाल्यानंतर तर सत्ता टिकविण्यासाठी 'विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः' अशी स्थिति झाल्याचें पदोपदी दिसत आहे. केरळमध्ये पालाघाट येथे गेल्या मे महिन्यांत मुस्लिम लीगचा मेळावा भरला होता. त्यांत काँग्रेस फुटल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यांत आला. कारण आता मतासाठी फायदेशीर सौदा करतां येईल! या मेळाव्यासाठी हिरवे शर्टवाले दहा हजार स्वयंसेवक जमविले होते आणि "मुसलमानी कायद्याला हात लावण्याची जगांत कोणत्याहि शक्तीला हिंमत नाही" अशा घोषणा करण्यांत आल्या. यावर काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी एका अक्षरानेहि आक्षेप घेतला नाही. तेव्हा ते किती लाचार झाले आहेत व उत्तरोत्तर ही लाचारी कशी वाढत जाणार आहे हें यावरून सहज कळून येईल.
अहमदाबाद, भिवंडी आणि विशेषतः रावात या प्रकरणी सरकारने जीं वक्तव्यें केलीं तीं वक्तव्यें म्हणजे काँग्रेसच्या विवेकभ्रष्टतेच्या साक्षीच आहेत. अहमदाबाद व भिवंडी या दोन्ही दंगलींच्या वेळीं प्रादेशिक शासनांना पूर्वसूचना मिळालेल्या होत्या, तरी त्यांनी अत्याचारांना आवर घालण्याची व्यवस्था केली नाही. कारण तसा बंदोबस्त करावयाचा म्हणजे मुस्लिमांना नाराज करावें लागलें असतें. दंगलीनंतर भाषणें झालीं त्यांत अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचीच काळजी व्यक्त करण्यांत आली. त्यांनी दंगली पेटविल्या, 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा केल्या, याबद्दल त्यांना जाब विचारला पाहिजे, असें सत्ताधाऱ्यांच्या मनांतहि आलें नाही. तरी पूर्वीच्या तेवीस दंगलींपैकी बावीस मुस्लिमांनीच सुरू केल्या होत्या, असा सरकारी अहवाल होता. पण सर्व दोष हिंदूंनाच देण्यांत आला.
प्रा. अबीद हुसेन यांच्या 'दि नॅशनल कल्चर ऑफ इंडिया' या पुस्तकाचा मागे उल्लेख केलाच आहे. त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगून ठेविलें आहे की, "बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांच्या तक्रारी, मग त्या खऱ्या असोत वा काल्पनिक असोत, दूर केल्या पाहिजेत. आपले हक्क सुरक्षित नाहीत ही त्यांची भीति निराधार, अन्याय्य असली तरी, बहुसंख्याकांनी तिचा विचार करून ती दूर केली पाहिजे." काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी हा उपदेश शिरसावंद्य मानला आहे. जातीय संघटनांचा उल्लेख करतांना रा. स्व. संघ, जनसंघ यांचा शतवार निर्देश ते करतात, पण तामिरे मिल्लत, जमाते इस्लामी, मुशावरत यांना मातेच्या वात्सल्याने ते पदराआड करतात. मंदिर पाडणें हें योग्य आहे, पण मशीद पाडणें हा गुन्हा आहे, ही सुभेदार अलीकीनखान यांची विषम नीति महात्माजी- नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधींनीहि निष्ठेने पुढे चालविली आहे.
देवबंद पंथ आणि मुल्ला-मौलवी यांचें वर्वस्व जोपर्यंत मुस्लिम समाजावर आहे तोपर्यंत तो समाज इहवादी होणें शक्य नाही. हे मुल्ला-मौलवीच दर वेळी मुस्लिमांना भडकावून देतात. पाकिस्तानसाठी बॅ. जिनांनी त्यांच्याच या शक्तीचा उपयोग केला आणि त्या समाजांतील असहिष्णुता, जीर्णमतवाद, अंधश्रद्धा, अराष्ट्रीय वृत्ति यांचा परिपोष केला. आज काँग्रेस- सत्ताधारी तेच करीत आहेत. त्यांच्या या नागव्या स्वार्थी नीतीचा कळस झाला तो रावात प्रकरणी. कारण राष्ट्रनिष्ठेला अत्यंत घातक असा जो विश्व-मुस्लिमवाद- पॅन इस्लामिझम्- त्याचाच परिपोष या प्रकरणी काँग्रेसने केला.
अलअक्सा मशीद जाळली ती एका अर्धवट परकी माणसाने. इस्त्रायलचा त्यांत कांही संबंध नव्हता. तरी मशिदीच्या हानीबद्दल हिंदी मुस्लिमांना दुःख व्हावें हे साहजिक आहे. पण त्यांनी आपले दुःख व्यक्त करतांना जिहादच्या घोषणा केल्या, लाखालाखाच्या मिरवणुका काढून जात्यंध भाषणें देली आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा केल्या. हें काँग्रेस नेत्यांनी ध्यानी घेऊन मुस्लिमांना त्याचा जाब विचारून या आगीला आवर घालणें अवश्य होतें. पण काँग्रेस नेतेच या मिरवणुकीच्या आघाडीवर होते! खिलाफतीला पाठिंबा दिल्यामुळे मागे मुस्लिमांची धर्मांध वृत्ति पोसली गेली आणि त्यांनी भयानक अत्याचार केले. त्याचीच पुनरावृत्ति आता होईल हें जाणून त्या वृत्तीचा बीमोड काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी केला असता, तर पुढील जातीय दंगे टळले असते.
भीक मागून निमंत्रण
पण काँग्रेसला मुस्लिमांची ती वृत्ति पोसावयाची आहे. म्हणून त्यांनी भारतामध्ये ती आग तर भडकूं दिलीच आणि शिवाय पॅन् इस्लामिझमच्या संवर्धनासाठीच भरलेली रावात परिषद् तिचें आमंत्रण भीक मागून मिळवून तिथे आपले प्रतिनिधि धाडले; आणि आपल्या प्रतिनिधींना तेथून परिषदेच्या नियंत्यांनी हाकलून काढलें, त्याचा विश्वव्यापक दृष्टीने अपमान मानला नाही. कारण तो अपमान मुस्लिमांनी केला होता! सर्व देशभर लोकांनी या अपमानाबद्दल संताप व्यक्त केला. पण एकाहि मुस्लिम संस्थेने रावातच्या नेत्यांचा त्यासाठी निषेध केला नाही. कारण मुस्लिम हे प्रथम मुस्लिम आहेत! मौ. महंमदअल्लींच्यापासून राष्ट्रीय मुस्लिम निःसंदिग्ध शब्दांत हे सांगत आहेत आणि काँग्रेसश्रेष्ठी त्यांच्या त्या वृत्तीला उत्तेजन देत आहेत.
अहमदाबादला कालूपुर पेठेत एका हातगाडीवाल्याला बाजूस सारतांना पोलिसांचा धक्का लागून गाडीवरचीं पुस्तकें खाली पडली. त्यांत कुराण व इतर धर्मग्रंथ होते. तेव्हा पोलिसांनी कुराणाचा व इस्लामचा अपमान केला, असा मुस्लिमांनी ओरडा केला व पोलिसांवर हल्ला केला. सरकारने पोलिसांना गाडींतून हिंडून जाहीर माफी मागावयास लावली. पुढे बहरामपुरा या विभागांत पोलिस इन्स्पेक्टर खान यांनी देवळांत शिरून पोथीला लाथ मारली. तेव्हा त्यांना फक्त तात्पुरते कामावरून दूर करण्यांत आले. माफी वगैरे कांही नाही. अलअक्सा विषयीच्या लाखलाखांच्या मिरवणुका निघाल्या. त्यांना पूर्ण परवानगी आणि रामायणाचा अपमान झाला म्हणून नांदेडला हिंदु मिरवणूक काढणार होते. त्या मिरवणुकीवर बंदी घालण्यांत आली. 'रिलिजस लीडर्स' या पुस्तकावर मुस्लिमांनी आक्षेप घेतला. पुस्तक जप्त. टायनवीच्या लेखावर मुस्लिमांनी आक्षेप घेतला केंद्र-सरकारने लेख मागे घेतला.
हिंदी मुस्लिमांपुढेच फक्त लांगूलचालन करावें, त्यांचीच फक्त जात्यंधता पोसावी, असें संकुचित धोरण काँग्रेस नेत्यांचें नाही. मुसलमान मग तो जगांत कोठेह असो त्याच्यापुढे लाचार व्हावयाचे, स्वाभिमान दुखावला तरी खंत मानावयाची नाही, असें भारत सरकारचें उदार धोरण आहे. इस्रायलशी भारताने कायम विरोध धरला आहे. कां? अरब राष्ट्रें त्याच्याविरुद्ध आहेत म्हणून. पाकिस्तानशीं भारताचें युद्ध जुंपलें होतें तेव्हा एकाहि अरब देशाने भारताबद्दल सहानुभूति दाखविली नाही. रावात परिषदेत भारताचा अपमान झाला तेव्हा एकाहि अरब देशाने उलट अक्षर उच्चारलें नाही. त्यांनी याह्याखानला पाठिंबा दिला व त्याच्याइतकाच भारताचा अपमान केला, पण भारताने त्याची खंत वाळगली नाही. कारण ते सर्व मुस्लिम देश आहेत! त्यांच्याशीं विरोध करणें हें हिंदी मुस्लिमांना आवडणार नाही.
अलअक्सा मशीद जाळली गेली तेव्हा मुस्लिमांबरोबर भारत सरकारहि संतापले. पण पूर्व जेरुसलेममध्ये अनेक ज्यू मंदिरें, पस्तीस पैकी चौतीस सिनॅगॉग पाडण्यांत आली त्या वेळीं भारत सरकार स्वस्थ होतें. ऱ्होडेशियामध्ये चोवीस आफ्रिकनांना फाशी देण्यांत आलें. त्या वेळीं भारत सरकारने मानवतावादाचा उचंबळा आल्यामुळे आकाशपाताळ एक केलें. पण इराकमध्ये नऊ ज्यूंना फाशी देण्यांत आलें तेव्हा त्याने ब्रहि काढला नाही. कारण इराक मुस्लिम देश आहे. मानवता, इहवाद, न्याय हें सर्व त्यापुढे रद्द आहे.
औरंगजेबाचा जयजयकार
हैदराबादचे मुस्लिम मोठमोठ्या सभा भरवून कासीम रझवीचा गौरव करतात. मालेगावच्या मुस्मिमांनी औरंगजेबाचा परवा जयजयकार केला आणि मौ. मौदुदींचा सर्व हिंदी मुस्लिम गौरव करतात. "हिंदूंनी मुस्लिम व्हावें किंवा मरण पत्करावें असें मौदुदींचें मत आहे. त्यांचेच शिष्य मौ. मदनी होत. असे असूनहि अनेक पुरोगामी मुस्लिमहि त्यांचा गौरव करतात. (महाराष्ट्र टाईम्स, दि. २४-११- १९६८). लोकसभेंत हिंदूंच्यावर संतापाने टीका करतांना काँग्रेस नेत्यांनी याची कधी दखल घेतली आहे काय ? का त्यांनाहि रझवी, औरंगजेब, मौदुदी यांचें तत्त्वज्ञान मान्य आहे ?
'इंडियन सेक्युलर फोरम'ची स्थापना झाली तेव्हा महामंत्री इंदिरा गांधी, गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शुभ संदेश पाठविले होते. त्यांत इहवाद हाच खरा आपल्या लोकशाहीचा व राष्ट्रीयतेचा पाया आहे, असें इंदिरा गांधींनी म्हटलें आहे व अंध शब्दप्रामाण्य नष्ट करण्यास फोरमचा उपयोग होईल, असें चव्हाणांनी म्हटलें आहे. याच प्रसंगीं जयप्रकाश नारायण यांनीहि संदेश धाडला होता. त्यांत त्यांनी म्हटलें आहे की, "आज जात्यंधता व शब्दप्रामाण्य यांची अशिक्षितांतच नव्हे, तर सुशिक्षितांतहि वाढ होत आहे. वास्तविक राजकीय पक्षांनी लोकशिक्षणाच्या मार्गाने याचा बीमोड करणें अवश्य होतें. पण इहवादी राजकीय पक्षांनी, मतें गमावण्याच्या भीतीने किंवा आर्थिक कारणांच्या भ्रांत महत्त्वामुळे ती जबाबदारी टाळली आहे."
हा आरोप काँग्रेस नेत्यांना मान्य नसेल व त्यांना खरोखरच लोकशिक्षणाच्या मार्गाने इहवाद, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा यांची तत्त्वें लोकांत रुजवावयाची असतील तर त्यांनी एक गोष्ट करावी. १९३७-३८ साली संकल्पिलेला मुस्लिम जनतासंपर्क आता सुरू करावा. समान नागरी कायद्यासाठी मुस्लिमांत पूर्वतयारी करावयास हवी, असें त्यांना खरोखरच वाटत असेल, तर लोकशिक्षणाचें हें कार्य त्यांनी हातीं घ्यावें. समान नागरी कायदा ही गोष्ट अशी आहे की, त्यासाठी तयारी करावयाची म्हणजे इहवादाचीं सर्व तत्त्वें समाजाच्या मनांत दृढमूल करावी लागतात. सेक्युलर फोरमने स्थापनेच्या वेळीं जे ठराव केले आहेत त्यांचा आशय हाच आहे. अध्यक्ष जी. डी. पारीख यांनी आपल्या भाषणांत तीं सर्वमान्य तत्त्वेंच सांगितलीं आहेत. धर्म ही वैयक्तिक बाब आहे, बुद्धिप्रामाण्य स्वीकारून धर्मांत वेळोवेळीं अवश्य तें परिवर्तन करण्याचा समाजाला हक्क आहे. समाजोत्कर्षासाठी कोणतेहि कायदे करण्याचें लोकांना व लोकसभेला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशीं व या प्रकारचीं इहवादाची तत्त्वेंच फोरमने पुरस्कारिलेलीं आहेत. हीं तत्त्वें सर्व भारतीयांनी व मुस्लिम समाजानेहि स्वीकारल्यावांचून या देशांत लोकशाही यशस्वी होणार नाही. राष्ट्रीय एकात्मता साधणार नाही व त्याची कोणत्याहि दृष्टीने प्रगति होणार नाही. हें काँग्रेस नेत्यांनाहि मान्य आहे, असें त्यांच्या शुभ संदेशावरून तरी दिसतें.
पण ही तत्त्वें मुस्लिम समाजांत प्रसृत करण्यासाठी कोणी प्रयत्न करूं लागला तर त्याच्यावर लाठ्या पडतील, असा पुण्याच्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते हमीद दलवाई यांचा अनुभव आहे. इराणला एके काळी भारताचे वकील अससलेले एम्. आर्. ए. बेग यांचा अनुभव असाच आहे. त्यांनी म्हटले आहे की, उदारमतवादी मुस्लिमाला आमच्या समाजांत सभेत भाषण करणें जवळ जवळ अशक्य आहे. (टाइम्स ऑफ इंडिया, दि. २३-१०-१९६९). अशा स्थितींत मुस्लिमांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, लोकसभेतील भाषणांमुळे ज्यांनी त्यांची भक्ति संपादन केली आहे त्या इंदिरा गांधी, चव्हाण, शुक्ल या काँग्रेस नेत्यांनी हें काम शिरावर घेतलें पाहिजे. त्यांनी मुस्लिम समाजाच्या सभा घेऊन, तुम्ही इहवादी झालें पाहिजे, धर्मपरिवर्तनाला सिद्ध झाले पाहिजे, शरीयतचा आग्रह धरतां कामा नये, असा उपदेश त्यांना करून समान नागरी कायद्याची पूर्वतयारी करणें अवश्य आहे. हें त्यांनी केलें तर जातीय दंगे तात्काळ थांबतील.
ते थांबविण्यासाठी सध्या काँग्रेस नेते रोज सभा घेत आहेतच. त्यासाठी देशभर ते दौरा करणार आहेत. माझी सूचना अशी की, इंदिरा गांधींनी न्या. मू. छगला, न्या. मू. बेग, ना. चव्हाण, ए. ए. ए. पूँजी, न्या. मू. हिदायतुल्ला, मेजर जनरल हबीबुल्ला, न्या. सू. गजेंद्रगडकर, जे. पी. नाईक, यांना बरोबर घेऊन हा दौरा त्वरित काढावा. हिंदु-मुस्लिमांच्या एकत्र सभा घ्याव्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र सभा इष्ट वाटल्यास घ्याव्या, दर्ग्यात जावें, मशिदींत जावें आणि इहवादाचीं तत्त्वें मुस्लिम समाजांत रुजविण्याची कोशीस करावी. असें त्यांनी केलें तरच मुस्लिम समाजांत परिवर्तन होईल व समान नागरी कायद्याला तो समाज तयार होईल.
काँग्रेसचे नेते हें करतील की नाही तें सांगतां येत नाही. न करण्याचाच संभव फार. सध्या निवडणुकी पुढे दिसत असतांना तर याची शक्यता आणखी कमी. स्वातंत्र्यप्राप्ति झाल्याबरोबर हें कार्य त्यांनी हातीं घ्यावयास हवें होतें. त्या वेळचे पुढारी पुण्याईने मोठे होते. त्यांनीहि हें धैर्य दाखविलें नाही. मग आताचे लोक हे धैयं करूं धजतील असें वाटत नाही. पण त्यांनी जबाबदारी टाळली तरी इहवादी, लोकवादी, राष्ट्रनिष्ठ लोकांना ती टाळतां येणार नाही. त्यांनी उपाययोजना केलीच पाहिजे.
८
भारतांतील मुस्लिम जमात ही इहवादविरोधी शक्ति भारताच्या राष्ट्र- संघटनेला, लोकशाहीला व एकंदर प्रगतीला अनुकूल कशी करून घेता येईल याचा विचार आपण करीत आहों. त्यासाठीच त्या शक्तीचें स्वरूप काय आहे हें आपण प्रथम पाहिलें व नंतर तिला वश करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने कोणते प्रयत्न केले व त्यांचें फल काय मिळाले याचा विचार केला. काँग्रेसचे सर्व प्रयत्न फसले, इतकेंच नव्हे, तर तिने मुस्लिम- अनुनयाची जी विषम व पक्षपाती नीति अवलंबिली तिच्यामुळे हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य होऊन बसलें आहे, असें आपल्या ध्यानांत आलें. म्हणुन आता भारतीय जनतेने या दृष्टीने उपाययोजना काय करावी याची चर्चा करावयाची आहे.
ती करण्यापूर्वी मुस्लिम जमातीचें स्वरूप पाहतांना तिचें तत्त्वज्ञान, तिच्या आकांक्षा, वृत्ति, हिंदूंकडे, इतर धर्मीयांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन यांविषयी येथवर ज्या ठळक गोष्टी ध्यानांत आल्या त्या थोडक्यांत पुन्हा एकदा भांडतों म्हणजे चर्चा सुलभ होईल.
• हिंदुस्थानांत हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य असून, येथे दोघांपैकी एकच कोणी तरी सत्ताधारी होऊं शकेल. तेव्हा मुस्लिमांनी सर्व भारत पुन्हा जिंकणें हा एकच उपाय आहे. (खान- दुराणी- मीनिंग ऑफ पाकिस्तान).
• भारत जिंकल्यावर जिहाद पुकारून सर्व हिंदूंना इस्लामची दीक्षा देऊन येथे अरबी खलिफांप्रमाणे इस्लामी शासन स्थापन केलें पाहिजे. (अबुल हसन नदवी- इस्लाम अँड दि वर्ल्ड). जो असा जिहाद पुकारील तोच खरा मुस्लिम.
• हुकमत इ इलाहिया- अल्लाची सत्ता; त्याच्या कायद्याचें राज्य प्रस्थापित करणें हें जमाते इस्लामीचें उद्दिष्ट आहे. (रेडियन्स, दि. १३ -६-१९६५).
• मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणें हें आम्ही केव्हाही सहन करणार नाही. तसें करणारांना आमच्या प्रेतांवरून अंमलबजावणी करावी लागेल. (निदाये मिल्लत, दि. ९-२-१९६९).
• हिंदुस्थानचा मुसलमान बाहेरच्या इस्लामी दुनियेपासून वेगळा राहूं शकत नाही हें पॅलेस्टाईन दिनाच्या सभा- मिरवणुकांवरून सिद्ध झालें. हिंदुस्थानी मुसलमानांनी हिंदुस्थानच्या सरहद्दीपुरतेच मर्यादित राहिलें पाहिजे हें आम्हांला मान्य नाही- मौ. अबुल हसन नदवी (निदाये भिल्लत, दि. ९-११-१९६९).
• मुसलमान मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था संपूर्णपणें मुसलमानांकडेच सोपविण्यांत यावी. माध्यमिक पातळीवर उर्दू भाषा शिक्षणाचें माध्यम करावें. हिंदी पुस्तकांत संस्कृतला स्थान असूं नये. त्रिभाषा सूत्रांतून संस्कृत वगळण्यांत यावें. ज्या शाळा उर्दू शिक्षण देण्यास नकार देतील त्यांचें सरकारी अनुदान बंद करण्यांत यावें. (हाजी अबदुल वहाव- इस्लामी धर्मशिक्षण परिषद्, 'साधना', ३० ऑगस्ट १९६९).
● जागतिक मुस्लिम ऐक्याला राष्ट्रवादामुळे सर्वांत जास्त धोका निर्माण झाला आहे. मुस्लिम हे आंतरराष्ट्रीय पक्षाचे असल्यामुळे त्यांना राष्ट्रवाद मान्य करतां येणार नाही. राष्ट्रवाद इस्लामविरोधी आहे. जागतिक मुस्लिम बंधुभाव टाकून राष्ट्रवाद स्वीकारणें हें काफरांचें अनुकरण आहे- एस्. एम्. गुरुफ, मरियम, जमीला. (रेडियन्स, दि. १३- १२- १९६४ व ९–५-१९६५).
• इहवाद हा नीतिहीन, नास्तिक व म्हणूनच सैतानी होय. त्यावर आधारलेली लोकशाही गुणांपेक्षा संख्येवर भर देते म्हणून ती त्याज्य होय. लोकशाहींत तिच्या जन्मापासून नीतिहीनता आहे- एस्. अबदुल गफार डॉ. इकबालच्या आधारे. (रेडियन्स, दि. २८ -११-१९६५ व २-१-१९६६).
• सर्व धर्म सारखेच सत्य व कल्याणकारक आहेत ही कल्पना भ्रांत आहे. एका उद्दिष्टाकडे जाणारे ते भिन्न मार्ग आहेत, हें सत्य नाही. (ए. एफ्. बादशहा हुसेन शरीयत-उल्-इस्लाम).
• राष्ट्रवाद अंगीकारणारा मुस्लिम मनुष्य स्वतःच्या देशांतील प्राचीन परंपरांचा अभिमान बाळगू लागतो, तेथील पवित्र स्थळें पूज्य मानतो, देशभाषेचा अभिमान धरतो. महंमद पैगंबर व त्यांचे सहकारी यांच्यापासून स्फूर्ति न घेतां तद्देशीय वीर पुरुषांपासून तीं घेतो. स्वदेशाबाहेरील भाषा, तीर्थे, पुरुष यांना तो स्वकीय मानीत नाही. म्हणजे त्याच्या मनांत राष्ट्रवाद एका दिशेने शिरतांच इस्लाम दुसऱ्या दिशेने निघून जातो. (नॅशनॅलिझम अँड इंडिया- मौ. मौदुदी). (साधना, पुणे व 'इस्लाम इन् इंडियाज् ट्रँझिशन टु मॉडर्निटी- करंदीकर. यांत 'रेडियन्स,' 'निदाए मिल्लत' इत्यादि मुस्लिम पत्रांतून हे उतारे दिलेले आहेत. तेथूनच ते येथे घेतलेले आहेत.)
जिहादचा आग्रह
मुस्लिम नेत्यांचे वरील उद्गार व त्यांतून दिसणारी त्यांची वृत्ति पाहिली, तर हिंदु-मुस्लिम समस्येचा विचार करणाऱ्यांच्या हें ध्यानांत येईल की, आहे या स्थितीत त्या समस्येवर तोड निघणें अशक्य आहे. हिंदूंना, भारतीय घटनेला व भारत सरकारला जें जें तत्त्व हवें आहे तें मुस्लिमांना विषवत् त्याज्य आहे. त्यांना इहवाद नको आहे, राष्ट्रवाद नको आहे, लोकसत्ता नको आहे, धर्मसमानत्व नको आहे! भारतीय परंपरेचा अभिमान धरणें, मानवकृत कायदा मानणें हें त्यांना इस्लामविरोधी वाटतें. संस्कृत भाषेचा त्याना द्वेष वाटतो. राम, कृष्ण, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, शिवाजी, राणाप्रताप, महात्माजी, नेहरू यांच्यापासून स्फूर्ति घेणें त्यांना पाप वाटतें. जिहाद पुकारून सर्व भारत जिंकून, तेथे इस्लामी शासन स्थापन करणें हें त्यांचें अंतिम उद्दिष्ट आहे.
एक पक्ष असा आहे की, वरील विचार मुस्लिम नेत्यांनी व मुस्लिम पत्रकारांनी सांगितले असले, तरी मुस्लिम समाज त्यांच्यामागे नाही. असें जर आहे तर मुस्लिम पुरोगामी विचारवंतांना छगला, अलियावर जंग, बेग यांच्यासारख्यांना मुस्लिम समाजांत उभे कां राहतां येत नाही? असें जर आहे, तर काँग्रेस सरकार समान नागरिक कायदा कां करीत नाही? असें जर आहे, तर काँग्रेस नेते मुस्लिम समाजांत जाऊन जनतासंपर्क साधून वरील विचारांवर कडक टीका कां करीत नाहीत? यांचे उत्तर असें आहे की, तसें खरें नाही. मुस्लिम समाज अजून पुराणयुगांतच असून, त्याच्यावर वरील विचारसणीचाच पगडा फार आहे.
जयप्रकाश नारायण किंवा रावसाहेब पटवर्धन यांना कोणी मुस्लिमद्वेष्टे म्हणणार नाही. म्हटलें तर मुस्लिम-पक्षपातीच म्हणतील. त्यांनीहि हेंच मत दिलें आहे. "भारतांतील कित्येक मुसलमान अद्यापि पाकिस्तानी कलाने वागतात आणि भारताची पुन्हा एकदा फाळणी करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत," असें जयप्रकाशांनी म्हटलें आहे. (साधना, दि. १८- १०- १९६९). "भारतीय मुस्लिम समाज हा अशिक्षित व कंगाल आहे, तो कट्टर सनातनी व सुधारणाविरोधी आहे. व्यक्ति-स्वातंत्र्य स्त्री-स्वातंत्र्य, धर्म-स्वातंत्र्य या सर्वांनाच आमचे मुस्लिम बंधु इस्लामविरोधी मानतात. बहुसंख्य समाजाच्या नेत्यांना अल्पसंख्य जमातीत प्रवेश नाही, हें आपण ध्यानांत घेतले पाहिजे. आपला निराळेपणा टिकविण्यांतच अल्पसंख्य समाजाला कृतार्थता वाटते. मुस्लिम समाजांतील मुल्ला-मौलवी हे त्या समाजाचे पहिल्या क्रमांकाचे शत्रु आहेत" असे विचार रावसाहेबांनी मांडले आहेत. (राष्ट्रसेवादलपत्रिका- दिवाळी अंक, १९६७).
'क्वेस्ट'चे संपादक अबू सय्यद आयूब यांनी हेंच मत दिलें आहे. ते म्हणतात, "मुस्लिम समाजांत प्रगति-प्रेरणा दुर्बल आहेत. मुस्लिम अजून साम्राज्य- स्वप्नांत आहेत. सर सय्यद यांचे सुधारणेचे प्रयत्न अयशस्वी झाले; मुल्ला-मौलवींनी त्यांना बुडविलें; तेंच अबुलकलम आझाद यांचें झालें." (सेक्युलॅरिझम इन् इंडिया- संपादक व्ही. के. सिन्हा, पृष्ठ १३१). सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल अलियावर जंग यांना पं. नेहरूंनी अलीगड विद्यापीठाचे कुलगुरु नेमले होते. त्या विद्यापीठाच्या आत्यंतिक धर्मवेडाला आळा घालावा हा त्यांत उद्देश होता. पण त्या दृष्टीने अलियावर जंग यांनी सुधारणेला सुरुवात करतांच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला करण्यांत विद्यार्थ्यांच्या बरोबर प्राध्यापक व सीनेटचे सभासदहि होते. या हल्ल्यामुळे कुलगुरु दीर्घकाल रुग्णालयांत पडून होते.
हैदराबादला रझाकारांनी त्यांच्यावर असाच प्रसंग आणला होता, पण त्यांतून ते निसटले. अलीगडला मात्र त्यांना आपल्या उदार धर्ममतांची जबर किंमत द्यावी लागली. मात्र ते भ्याले नाहीत. प्रकृति ठीक होतांच ते विद्यापीठांत पुन्हा कामावर रूजूं झाले. (मो. ज्ञा. शहाणे- केसरी, दि. ८- २- १९७०). मुस्लिम समाजावर, अशिक्षित, सुशिक्षित, लीगवाले, रझाकारवाले यांवर, कोणाचें वर्चस्व आहे तें यावरून कळून येईल.
मौ. मोदी, नदवी, मदानी, अबुल लाइस, इत्यादींचें वर्चस्व त्यांच्यावर नसतें तर काय झालें असतें ?
तसे येथे घडलें नाही
तुर्कस्तान, इजिप्त, सिरिया, इराक, मोरोक्को इत्यादि मुस्लिम देशांतील मुस्लिमांनी आपापली राष्ट्र घडविण्यासाठी समाजांत जें आमूलाग्र परिवर्तन घडवन आणलें तें येथील मुस्लिमांनी घडविलें असतें व भारतीय राष्ट्राच्या घडणींत ते सहभागी झाले असते. त्या देशांतील मुस्लिमांनी आमूलाग्र परिवर्तन घडविलें म्हणजे काय केलें तें त्या देशांतील इहवादाचा इतिहास मागे सांगितला त्यांत आलेलेंच आहे. त्यांनी आपआपल्या देशांतील मुस्लिमपूर्व, मुस्लिमेतर प्राचीन परंपरांचा व कर्तृत्वाचा अभिमान बाळगला, त्या परंपरा व तें कर्तृत्व आपलेंच आहे व त्यापासूनच आपल्याला स्फूर्ति मिळते, असें त्यांनी जाहीरपणे सांगितलें.
एका बाजूने हा अभिमान येतांच दुसऱ्या बाजूने इस्लाम निघून जातो, असें भारतीय मुस्लिमांप्रमाणे त्यांना वाटले नाही. कुराण, महंमद पैगंबर व इस्लाम यांचे मुस्लिम तितकेच अभिमानी आहेत. हमीद अल् अलेली (इजिप्त) म्हणाला की, "ज्यांनी पिरामिड बांधले त्यांची प्रतिभा सुप्त अग्नीप्रमाणे अजूनहि आमच्या ठायीं आहे. त्यांच्या आठवणीनेच आम्हांला स्फूर्ति येते. राम, कृष्ण, वेद, उपनिषदें, व्यास, वाल्मीकि, चन्द्रगुप्त, समुद्रगुप्त यांच्याविपयी ही भावना भारतीय मुस्लिमांत आहे काय? ते भारतीय असतील तर तशी असायला हवी.
इराणमध्ये सध्याचा शहा हा दरायस, झर्सीस यांचा अभिमान बाळगतो. तो गादीवर आला तेव्हा लोकांनी आपण होऊन अंतःस्फूर्तीने त्याला 'आर्यमेहेर' अशी पदवी दिली व ती त्याने आनंदाने घेतली. आर्य भारतांत आले त्यापूर्वी त्यांनी इराणांत वसाहत केली होती, हें सर्वमान्य आहे. इराणचा धर्म मुस्लिम आहे तरी ते मुस्लिम व त्यांचे नेते त्या प्राचीन आर्यांचा अभिमान धरतात. न्या. मू. छगला यांच्या मतें भारतांतील मुस्लिमांनी प्राचीन भारतीय आर्यांचा असाच अभिमान धरला पाहिजे. ते म्हणतात, "मुस्लिमांनी मुस्लिम कर्तृत्वाचा अभिमान धरावाच, पण भारतीय संस्कृतीला आर्य येथे आले तेव्हापासून प्रारंभ झाला आहे, तेव्हापासूनची भारतीय संस्कृति ही आपलीच आहे, हें त्यांनी ध्यानीं घ्यावें." (कन्सेप्ट ऑफ् सेक्युलॅरिझम- टाइम्स, दि. २०-१-६५).
भारतीय मुस्लिम छगलांची अलियावर जंग यांच्याप्रमाणेच संभावना करतात हें प्रसिद्धच आहे; पण इराकमध्ये बाबिलोनी संस्कृतीबद्दल व तुर्कस्थानांत हिटाइट आणि असीरियन संस्कृतीविषयी अशीच भावना तेथील मुस्लिम जोपासतात. त्यावांचून राष्ट्रीयता फोल आहे, असें त्यांना वाटतें.
या मुस्लिम देशांनी स्वदेशीय प्राचीन परंपरेचा अभिमान धरला व त्याबरोबरच विश्वमुस्लिमवादाचा, पॅन् इस्लामिझमचा बुद्धिपुरस्सर त्याग केला. तुर्कनेता हमदुल्ला सुब्दी १९२१ सालींच म्हणाला, "पॅन् इस्लामिझमची भाषा आता बंद करा. राष्ट्रनिष्ठा हे आमचें नवें उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही आमच्या जुन्या नेत्यांकडे पाठ फिरविली आहे." केमालपाशाने खिलापत नष्ट केली तेव्हा जगांतील अनेक उलेमांनी, आपणच खलिफा होऊन मुस्लिम जगताचें नेतृत्व करा, अशी विनंती त्याला केली होती. तेव्हा ती झिडकारून 'मी फक्त तुर्कस्थान जाणतों' असें परखड उत्तर त्याने दिलें होतें.
कायद्याची महती
धर्मपरिवर्तन व सामाजिक सुधारणा या दृष्टीने त्या देशांतील नेत्यांनी केवढी क्रांति केली आहे हें त्या लेखमालिकेत सविस्तर वर्णिले आहे. ती क्रांति त्यांनी मानवकृत कायद्यांनी केली आहे. अल्लाचा कायदा हा एकच कायदा आम्ही जाणतों, असें ते म्हणत नाहीत. धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक कोणत्याहि कायद्याला हात लावणें म्हणजे इस्लामवर आघात होय, असें भारतीय मुस्लिम मानतात; तसें त्या देशांतील मुस्लिम जनता व नेते मानीत नाहीत. त्या देशांतील आधार घेउनच ए. ए. ए. फैझी यांनी हिंदुस्थानांत मुस्लिम कायद्यांत एक भार्या कायदा करण्याची वेळ आली आहे, असें सांगितलें आहे.
ते म्हणतात, "भारतांतील मुस्लिम कायदा हा घटनेवर आधारलेला आहे. शरीयतवर नाही. तेव्हा कुराण व शरीयत यांचीं नांवें पुनः पुन्हा सांगण्यांत अर्थ नाही. भारतीय दंडविधान, कायदा करतांना धर्मशास्त्र किंवा शरीयत पाहत नाही. न्याय, समता, विवेक हेच त्याचे आधार आहेत. मोरोक्को, तुर्कस्थान. सीरिया, इराण, पाकिस्तान इत्यादि बहुसंख्य मुस्लिम देशांनी एक तर बहुभार्या पद्धति नष्ट केली आहे किंवा अत्यंत दुर्घट केली आहे. तेव्हा भारतांत एक भार्या हा नियम व्हावा व बहु-भार्या अपवाद ठरावा, या कु. सलमा क्युरेशी यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे." (टाइम्स, दि. २३ जून १९७०).
पण मुस्लिम समाज छगलांप्रमाणेच फैजींनाहि मानीत नाही. फैजी यांनी अन्यत्न म्हटल्याप्रमाणे, अनेक मुस्लिम मनांतून पाकिस्तानी आहेत. (ओपिनियन, दि. १५–६–६५). त्याच पत्रांत त्यांनी पुढे म्हटलें आहे की, "मुस्लिमांचें व्यक्तित्व द्विधा झालेलें आहे. एक भाग आंतरराष्ट्रीय आहे व एक हिंदी आहे; या दोहींचा एकजीव झालेला नाही. अनेक शतकें मुस्लिम या देशाशी समरस झालेले नाहीत. तेव्हा मुस्लिमांनी प्रगतिवादी होऊन तें साधावें." पण येथेच तर सर्व वांधा आहे. भारताशीं मुस्लिमांना समरस व्हावयाचें नाही. अनेक शतकें जी विभक्तता त्यांनी जोपासली ती त्यांना अजूनहि तशीच टिकवावयाची आहे. त्यांना केवळ इस्लाम धर्मच टिकवावयाचा आहे असें नाही. त्यांना कायदा निराळा हवा आहे, शिक्षण निराळें हवें आहे, भाषा निराळी हवी आहे आणि स्फूर्तिस्थानें निराळी हवीं आहेत !
पडखाऊ वृत्ति
मुस्लिम हे अल्पसंख्य आहेत, बहुसंख्याकांनी मोठेपणाने त्यांच्याकडे उदार दृष्टीने पाहवें, ते धाकटे भाऊ आहेत, हिंदूंनी बडे भाई म्हणून पड खाऊन त्यांचे चालवावें, असा उपदेश केला जातो. राष्ट्रीय एकात्मतेची जबाबदारी हिंदूंच्यावर आहे, अशीं भाषणें काँग्रेस नेते करीत असतात. हिंदूंनी तसें करावयाचें ठरविलें तर त्यांना कशांत पड घ्यावी लागेल, कोठे तडजोड करावी लागेल त्याचा विचार करून मगच त्यांनी हीं भाषणें करावीत, अशी माझी विनंती आहे.
शिक्षणाचें क्षेत्र पाहा. हिंदु देवतांची वर्णनें असलेले लेख पाठ्यपुस्तकांमध्ये येतां कामा नयेत. राम, कृष्ण यांच्या कथांनी मुस्लिम विद्यार्थ्यांची मनें दूषित होतात. तेव्हा त्या कथा वर्ज्य केल्या पाहिजेत. शिवाजी, राणा प्रताप यांची हिंदु लेखक फार स्तुति करतात. भूषण कवीने केलेली शिवप्रशस्ति हा पाठ असला, तर त्या वेळी मुल्लिम विद्यार्थी उठून जातात. तेव्हा असली चरित्रे पाठ्यपुस्तकांत असता कामा नयेत. संस्कृत भाषा अजीबात वर्ज्य मानली पाहिजे. त्रिभाषा सूत्रांत ती असता कामा नये. इतिहासांतून मुस्लिमांविषयीची टीका व हिंदु वीरपुरुषांचा गौरव हीं गाळून टाकली पाहिजेत.
शालेय पाठ्यपुस्तकांत मुस्लिमांच्या दृष्टीने आक्षेपार्ह वचनें कोणती आहेत त्याचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने सयद्दीन समिति नेमली होती. तिने पुढील उतारे आक्षेपार्ह ठरविले आहेत- "मोगल सम्राट् अकबर सर्व राष्ट्र पराधीन करण्याचा प्रयत्न करीत आहे हें पाहून महाराणा प्रताप याने प्रतिज्ञा केली की, जोपर्यंत देश आक्रमकांच्या ताब्यांतून मुक्त होत नाही तोपर्यंत मी जंगलांत राहीन, कोणताहि डामडौल करणार नाही." हा उतारा आक्षेपार्ह आहे! रूपनगरच्या राजकन्येने राजसिंहाला पत्र लिहिलें, "उद्या संध्याकाळच्या आंत आपण आला नाही तर मी जिवंत राहणार नाही. दिल्लीश्वर औरंगजेब हा माझ्याशी लग्न करण्यासाठी आला आहे. मला राठोड वंशाला कलंक लावावयाचा नाही." हा उतारा आक्षेपार्ह आहे. बल्बन, कुतुबुद्दीन, अल्तमश यांनी हजारो मंदिरें पाडलीं, लक्षावधि पुरुषांच्या कत्तली केल्या. ही माहिती शालेय पुस्तकांत देणें समितीला आक्षेपार्ह वाटतें.
बडे भाईचा मान स्वतःकडे घेऊन धाकट्या मुस्लिम भाईचा हट्ट पुरवावयाचा असें हिंदूंनी ठरविलें, तर त्यांना काय काय पथ्ये पाळावी लागतील तें वरील माहितीवरून दिसून येईल. राम, कृष्ण, शिवाजी, राणा प्रताप यांना विसरावें लागेल. संस्कृत भाषा त्याज्य मानावी लागेल आणि मुस्लिम बादशहाच्या जनानखान्यांत जाण्यापेक्षा मरण पत्करणें बरें असें म्हणणाऱ्या हिंदुकन्यांची चरिलें पाठ्य- पुस्तकांना वर्ज्य मानावी लागतील. तसें करण्यास तयार असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी लोकसभेंत तशीं भाषणें करावीं म्हणजे हिंदूंना दोष देणाऱ्या, त्यांच्यावर जबाबदारी टाकणाऱ्या त्यांच्या शब्दांना अर्थ प्राप्त होईल.
९
मुस्लिमांच्या सर्व मागण्यांचें मूळ कशांत आहे तें आता स्पष्ट होईल. आपला धर्म फक्त निराळा असें मानून, बाकी सर्व क्षेत्रांत भारतीय जीवनाशी एकरूप व्हावयाचें म्हणजेच भारतीय व्हावयाचें अशी मुस्लिमांची भावना नाही. भारताला मातृभूमि, पितृभूमि मानण्यास ते तयार नाहीत. तसें असतें तर जें जें भारतीय त्याचा त्याचा अभिमान त्यांनी धरला असता.
संस्कृत भाषा, तिच्यांतील वेदोपनिषदादि विश्ववंद्य ग्रंथ, भारतांतील महापुरुष, येथल्या थोर स्त्रिया, वन्दे मातरम् हें राष्ट्रगीत, येथील अमर महाकाव्यें, हें सर्व त्यांना आपलें वाटलें असतें. इस्लामचा अभिमान बाळगूनहि त्यांनी हिंदु धर्म, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदु धर्मप्रणेते यांच्याविषयी पाश्चात्त्य ख्रिस्ती पंडितांप्रमाणेच आदरभाव प्रकट केला असता. तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया, इराक यांनी आपापल्या देशांना मातृभूमि मानून तिच्या सर्व प्राचीन वैभवाकडे याच दृष्टीने पाहिलें आहे. भारतीय मुस्लिमांनी ती दृष्टि स्वीकारली असती, तर येथे हिंदु-मुस्लिम समस्या निर्माणच झाली नसती.
१९०६ सालीं मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मुस्लिमांनी आपला सवता सुभा मांडला. तेव्हापासून आजपर्यंत ते सवत्या संसाराचाच आग्रह धरून आहेत. याचें एक कारण असें सांगितलें जातें की, याला काँग्रेसचे हिंदु नेतेच जबाबदार आहेत. कारण त्यांनी काँग्रेसचें हिंदुकरण केलें, आणि मुस्लिमांना सवता सुभा करणें अपरिहार्य करून टाकलें. या आक्षेपाच्या बुडाशीं वरील वृत्तीच आहे, हें थोड्या विचाराअंतीं दिसून येईल. टिळक, गांधी, पटेल व नेहरू हे काँग्रेसचे प्रमुख नेते. त्यांच्यावर काय आणि कसे आक्षेप घेतले जातात तें पाहिलें म्हणजे हिंदूकरणाच्या आरोपामागे कोणती वृत्ति आहे तें कळून येईल.
अजीज अहंमुद म्हणतात, "टिळक आरंभापासूनच मुस्लिमविरोधक होते. हिंदु परंपरांचें पुनरुज्जीवन हें त्यांनी राजकारणांत आणले. १८९३ च्या मुस्लिम दंग्यानंतर त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर हिंदु समाजाचे संघटन सुरू केलें. नंतर त्यांनी गणेशोत्सव व शिवाजी उत्सव सुरू केले. टिळकांचा हा वारसा १९४७ पर्यंत काँग्रेसमध्ये राहिला होता!" (स्टडीज् इन् इस्लामिक कल्चर, पृष्ठ २६५).
जहाल पंथावर टीका
डोनाल्ड युजीन स्मिथ यांनीहि टिळक, अरविंद, विपिनचंद्र पाल, यांच्यावर असाच आरोप केला आहे. त्यांच्या मतें रानडे व गोखले हे खरे इहवादी होते. त्यांनी धर्म व राजकारण हीं विभक्त क्षेत्र मानली होतीं. पण जहाल पंथाच्या लोकांनी मात्र पाश्चात्त्य राष्ट्रवादाचा हिंदु धर्माशी दृढ संबंध जोडून टाकला. महाराष्ट्रांत टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला व त्यांतून हिंदु संघटनेचा व ब्रिटिश-द्वेषाचा प्रचार केला. नंतर त्यांनी शिवाजी उत्सव सुरू केला. त्याचें मुस्लिमविरोधी रूप स्पष्ट होतें. बंगालमध्ये काली, दुर्गा या देवतांशीं पाल, अरविंद यांनी भारतमातेचें अद्वैत मानून त्या देवतांच्या भक्तीला नवा राष्ट्रीय अर्थ प्राप्त करून दिला. मुस्लिम यामुळे साहजिकच साशंक झाले. आणि जहालांच्या या धर्मनिष्ठ राजकारणामुळेच मुस्लिम लीगची स्थापना झाली. (इंडिया ॲज् ए सेक्युलर स्टेट, पृष्ठे ८९-९१).
प्रा. व्ही. के. सिन्हा यांनी टिळक, अरविंद यांच्या जहाल राष्ट्रीय पक्षावर असा आरोप, अशाच शब्दांत केला आहे. ते म्हणतात, "धार्मिक भावनांच्या उद्दीपनामुळेच टिळकांना अनुयायी मिळाले. जहाल पक्षाचा राष्ट्रवाद आक्रमक व धर्माधिष्ठित होता. त्याच्या नेत्यांनी राष्ट्रीय चळवळ बहुजनांपर्यंत पोचविली हें खरें पण त्याचबरोबर त्यांनी धार्मिक राजकारणाचा घातक वारसाहि मागे ठेवला. मुस्लिम लीगची स्थापना यामुळेच झाली." (सेक्युलॅरिझम् इन् इंडिया, पृष्ठ १६, १७).
लो. टिळकांनी गणेशोत्सव व शिवाजी उत्सव सुरू केले त्याच्या आधीच महाराष्ट्रांत मुस्लिमांच्या दंग्यांना व अत्याचारांना प्रारंभ झाला होता. मुस्लिमांच्या त्या अत्याचारी प्रवृत्तीवर कडक टीका करून हिंदूंनी संघटित होऊन तिचा प्रतिकार केला पाहिजे, जशास तसें वागलें पाहिजे, असा टिळकांनी उपदेश केला होता. टिळक मुस्लिमविरोधक ठरले ते यामुळे; आणि तेव्हापासून आजपर्यंत मुस्लिमद्वेष्टेपणाची हीच व्याख्या ठरली आहे. मुस्लिम अत्याचारी प्रवृत्तीचा निषेध करणें, मुस्लिमांच्या जात्यंधतेवर टीका करणें व हिंदूंना स्वसंरक्षण करण्यासाठी प्रतिकार करण्यास सांगणें हे जो करील तो मुस्लिमद्वेष्टा होय. तो जातीयवादी व तो इहवादविरोधी!
दंग्यांचे स्वरूप
१८५० सालीं वैरामजी गांधी नांवाच्या पारशी गृहस्थाने आपल्या वर्तमानपत्रांत महंमद पैगंबरांचें चित्र छापले. त्यामुळे मुंबईच्या मुस्लिमांनी सर्व पारशी जातीवर हत्यार उपसून अनन्वित अत्याचार केले. १८७४ सालीं रुस्तुमभाई लालभाई या ग्रंथकाराने वॉशिंग्टन आयर्व्हिंग या अमेरिकन ग्रंथकाराच्या कांही लेखांचें भाषांतर प्रसिद्ध केलें. त्यांतील पैगंबराविषयीचा मजकूर मुस्लिमांना अपमानास्पद वाटला. त्यांनी पुन्हा पारशी जमातीवर तसेच अत्याचार केले. १८९३ सालीं जुनागड संस्थानांतील प्रभासपट्टण येथे ताबुतावरून भांडण होऊन मुस्लिमांनी देवळें पाडलीं, मूर्ति फोडल्या व कत्तली केल्या. हेंच लोण त्याच साली मुंबईस येऊन त्या सालीं व पुढच्या सालीं हिंदु-मुस्लिमांचे दंगे झाले. अशा दंग्यांचें स्वरूप तेव्हा जे ठरून गेलें तें, कॉंग्रेस सरकारने ब्रिटिशांचा वारसा प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवल्यामुळे आजहि कायम आहे.
मुस्लिमांनी पूर्व तयारी करून दंगा करावयाचा, अनन्वित अत्याचार करावयाचे, आधी पूर्व सूचना मिळाल्या असूनहि सरकारने संरक्षण करावयाचें नाही, मग हिंदूंना पकडावयाचें आणि शेवटीं सरकारने मुस्लिमांचा कैवार घेऊन हिंदूंवर दोषारोप करावयाचा ! लो. टिळकांनी यासाठीच मुस्लिमांवर व सरकारवर प्रखर टीका केली होती- "मुसलमान लोक शेफारून गेले आहेत व त्यांना सरकारची फूस आहे; सरकारने एकाला जवळ करून एकाला दूर न करतां सर्वांनाच सारखा बडगा दाखविला पाहिजे तसें न होईल तर मुंबईतील हिंदु लोकांनी दुसऱ्या दिवशीं केलें त्याप्रमाणे हिंदूंनाहि आपल्या हाताने आपले संरक्षण करावें लागेल. आम्ही जों जो गरिबी दाखवितों तों तों शिष्टाचार मोडल्याचा पुन्हा आमच्यावरच मुसलमान लोक व सरकार आरोप करतात. श्रीकृष्णांनी आम्हांस उपदेश केला आहे- "ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।"
टिळकांच्यावर जातिद्वेषाचा आरोप येतो तो यामुळे. हिंदूंनी संघटित होऊन स्वसंरक्षणासाठी मुस्लिमांचा प्रतिकार करावा असें ते म्हणत म्हणून. आणि या कारणासाठीच ते इहवादविरोधी ! हिंदूंनी आत्मनाशाहि पत्करावा असें महात्माजी म्हणत, ते इहवादी !
गणेशोत्सव व शिवाजी-उत्सव यांवरील आक्षेपांमागे हीच विचारसरणी आहे. हे दोन्ही राष्ट्रीय उत्सव होते व त्यांनी फार मोठी राष्ट्रीय जागृति घडवून आणली, हें आक्षेपकांनाहि मान्य आहे. मग आक्षेप कशावर ? गणेश ही हिंदु देवता आहे व शिवाजी हा हिंदु वीरपुरुष आहे. या उत्सवासंबंधीच्या टिळकांच्या लेखांतून किंवा व्याख्यानांतून मुस्लिमांच्या द्वेषाचें, इस्लामबद्दलच्या तुच्छतेचें किंवा इतर कोणत्याहि धर्माविषयी व जमातीविषयीच्या निदेचें, अधिक्षेपाचें, एक वाक्यहि कधी कोणी का दाखविलेलें नाही. मुस्लिमांना भारतीय परंपरा, भारतीय वीरपुरुष, यांचा अभिमान असता, अकबर, कबीर यांच्या उदारमतवादाविषयी त्यांना आदर असता, तर ते या उत्सवांत हौसेने सामील झाले असते आणि तशा प्रवृत्तीचे लोक सामील झालेहि.
श्री. रामगोपाळ यांनी सोलापूर, नाशिक येथे व इतर अनेक शहरांत गणोशोत्सवांत मुस्लिम सामील झाले होते, नाशिकला तर मिरवणुकीचें नेतृत्व मुस्लिमांनी केलें होतें, इत्यादि माहिती देऊन हिंदु-मुस्लिम ऐक्याचें टिळक हे अत्यंत मोठे पुरस्कर्ते होते असें म्हटलें आहे. मुस्लिम पुढे फुटले ते सरकारी अधिकाऱ्यांच्या चिथावणीमुळे ! (इंडियन मुस्लिम्स, पृष्ठे ८७-९५).
शिवाजी उत्सवाचें हेंच आहे. प्रारंभी अनेक मुस्लिमांनी त्याला पाठिंबा दिला होता. आणि ऐक्य करावयाचें, तर त्या पुरुषांच्या राष्ट्रकार्याकडे लक्ष देऊन जुनें वैर विसरणेंच अवश्य असतें. वॉशिंग्टन, नेपोलियन हे इंग्लंडचे हाडवैरी. पण आजचे ब्रिटिश लोक त्यांचा मुक्त कंठाने गौरव करतात. त्या वेळचे डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल बेन यांनी अफजुलखानवधाचा वाद निघाला असतां, "शिवाजीने जें केलें तें राष्ट्रहितासाठी केलें. मराठ्यांचें स्वातंत्र्य स्थापण्याची कामगिरी त्याला करावयाची होती, त्यासाठीच त्याने जें जें केलें तें तें सर्व योग्यच केलें" असें जाहीरपणें सांगितलें. शिवछत्रपति हे इस्लामचे मुळीच द्वेष्टे नव्हते. कुराण, मशीद यांचा त्यांनी मान राखलेला आहे, असें मुस्लिम इतिहासकारच सांगतात. अशा या महापुरुषाच्या उत्सवामुळे मुस्लिम दुरावले असा टिळकांच्यावर आक्षेप घेणें आणि तो हिंदूंनीहि घेणें हें काँग्रेसने निर्माण केलेल्या विपरीत करंट्या बुद्धीचेंच फळ होय, यांत शंका नाही. गणेशोत्सव व शिवाजी उत्सव यांत इहवादविरोधी लक्षणें दिसावीं यापरतें दुर्दैव तें काय ?
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर टिळकांप्रमाणेच मुस्लिमद्वेषाचा आरोप केला जातो. याचें कारण एकच. ते गांधी-नेहरूंसारखे मुस्लिम-पक्षपाती नव्हते. भारतनिष्ठ मुस्लिम व बाह्यनिष्ठ मुस्लिम यांत ते भेद मानीत होते ! आणि मुस्लिम अत्याचारांचा, आक्रमणांचा बळानेच प्रतिकार केला पाहिजे, असें स्पष्टपणें सांगत असत. लखनौच्या एका भाषणांत ते म्हणाले, "मी मुस्लिमांचा खरा मित्र आहें, पण मला त्यांचा शत्रु मानतात. कारण मी स्पष्ट बोलतों. मी मुस्लिमांना बजावतों की, भारतनिष्ठा नुसती शब्दांनी दाखवून चालणार नाही. ती कृतींत दिसली पाहिजे. तुम्ही भारतनिष्ठ होता तर सरहद्दीवरच्या टोळ्यांनी काश्मीरवर आक्रमण केलें तेव्हा निःसंदिग्ध शब्दांत तुम्ही पाकिस्तानचा निषेध कां केला नाही? ज्यांच्या मनांत अजूनहि चलबिचल असेल त्यांनी खुशाल पाकिस्तानांत जावें."
चौधरी खलिकुझमान हे कडवे लीगवादी होते. ते पाकिस्तान झाल्यावर भारतांतच राहिले होते. एकदा लोकसभेंत त्यांनी भारतनिष्ठेचें भावपूर्ण भाषण केलें. उदार, भोळे, पंडितजी त्यामुळे इतके खूष झाले की, धांवत जाऊन त्यांनी चौधरींना मातृभूमीवर अशी निष्ठा व्यक्त केल्याबद्दल मिठी मारली. पण थोड्याच दिवसांत चौधरी पाकिस्तानांत पळून गेले व भारताचे वैरी झाले. सरदार विवेकी, अंतर्भेदी असल्यामुळे अशा मिठ्या मारीत नसत. ते म्हणाले, "पाकिस्तान स्थापणारा हा माणूस तिकडे गेला हें बरें झालें." सरदारांविषयीची ही माहिती देऊन व्ही. वी. कुलकर्णी आपल्या 'इंडियन ट्रिमुव्हरेट' या ग्रंथांत (पृष्ठे ३८६-८७) म्हणतात, "सरदारांच्या अशा भाषणांमुळे त्यांना मुस्लिमांचे द्वेष्टे मानणें हा फार मोठा अन्याय आहे. पण त्यांच्यावर तसा आरोप येतो त्याला त्यांच्या भाषणांइतकीच गांधी व नेहरू यांची त्या जमातीकडे पाहण्याची जी दृष्टि तीहि कारणीभूत आहे." सरदारांच्या अशा भाषणांमुळेच महात्माजी अस्वस्थ होत असत व नेहरू संतापत असत. कांरण मुस्लिमांचा अनुनय करावा, त्यांच्या बाबतींत विषम, पक्षपाती नीति अनुसरावी असें त्यांचें धोरण होतें.
'रामराज्या'ला आक्षेप
दीर्घकाल त्या धोरणाचा अवलंब करूनहि त्यांना मुस्लिम वश झाले काय ? मुस्लिमांची धर्मांधता, जात्यंध वृत्ति अणुमात्रहि कमी झाली नाही. 'छोडो भारत' चळवळीच्या वेळीं काँग्रेसला हिंदु राज्य स्थापावयाचें आहे, असा आरोप करून मुस्लिम लीगने ब्रिटिश सरकारला पाकिस्तान देण्याच्या अटीवर पूर्ण साह्य देण्याचें अभिवचन दिलें. २० ऑगस्ट १९४२ च्या सभेंत लीगने तसा ठरावच केला. महात्माजी भारतामध्ये 'रामराज्य' स्थापावयाचें, असें म्हणत असत. यावरच मुस्लिमांचा आक्षेप होता. त्यालाच ते हिंदु राज्य म्हणत. वास्तविक राम हा ऐतिहासिक महापुरुष. भारताच्या प्राचीन वैभवाचा मुस्लिमांना अभिमान असता, या भूमीला ते मातृभूमि मानीत असते, तर रामराज्य कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला असता.
दरायसचा, इराणी मुस्लिम जयजयकार करतात. ॲटिल्लापासून तुर्की मुस्लिम स्फूर्ति घेतात. पिरॅमिड बांधणारांच्या स्मरणाने आमच्या रक्तांत चैतन्य येतें, असें इजिप्तचे मुस्लिम म्हणतात. तशीच रामापासून भारतीय मुस्लिमांनी स्फूर्ति घ्यावी हें राष्ट्रीयतेच्या दृष्टीने उजू आहे. त्यांचा धर्म भिन्न असला, तरी ते येथल्याच वंशाचे आहेत. १९१५ सालच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनांत अध्यक्ष मझरउल हक्क हे स्वत:च म्हणाले की, "भारतांतील सात कोटि मुस्लिमांपैकी फक्त ऐंशी लाखांचे पूर्वज बाहेरचे आहेत. बाकी सर्व भारतजातीयच होते." तेव्हा रामकृष्ण हे आपले प्राचीन महापुरुष मानून त्यांना वंद्य मानण्यांत मुस्लिमांना कमीपणा वाटण्याचें कांही कारण नाही. कांही मुस्लिमांना हें पूर्ण मान्य आहे.
'पाकिस्तान एक्झॅमिनड्' या आपल्या पुस्तकांत रेझाऊल करीम या बंगाली मुस्लिम लेखकाने म्हटलें आहे, "अनेक शतके आपणां मुसलमानांना या भूमीने पोसलें आहे. तेव्हा हिंदुस्थान हीच आपली मातृभूमि आहे. या भूमीचें वैभव तेंच माझें वैभव. वेद, उपनिषदें, रामायण, महाभारत, हीच माझी धनदौलत आहे. राम, सीता, अशोक, कालिदास, अमीर खुश्रु, अकबर, राणाप्रताप हीच माझी थोर परंपरा. तिचे कोणतेहि गुण असोत, कोणतेहि दोष असोत, ती माझी म्हणूनच मला प्रिय आहे. अशा वृत्तीने मुस्लिमांनाहि रामराज्य हा शब्द महात्माजींइतकाच प्रिय व्हावा. पण इहवादाचा कसलाहि संस्कार त्यांच्यावर होत नसल्यामुळे धर्म व संस्कृति यांत ते फरक करूं शकत नाहीत. धर्माची सर्वंकष सत्ताच त्यांना अभिप्रेत आहे. त्यामुळे राष्ट्र, मातृभूमि या निष्ठा त्यांना मानवत नाहीत. म्हणूनच ते मुस्लिमेतर पुरुषांना वंद्य मानणें पाप समजतात. मग 'रामराज्य' त्यांच्या डोळ्यांत सलणार हे उघडच आहे. वास्तविक परंपराभिमानावांचून राष्ट्रनिष्ठेला अर्थ नाही.
कलकत्त्याच्या मुस्लिम शिक्षण परिषदेत अध्यक्ष एम्. ए. एन्. हैदरी यांनी स्पष्ट शब्दांत हा विचार मांडला आहे. हिंदु-मुस्लिमांची समाईक परंपरा हा तर भारतीय राष्ट्रवादाचा, त्यांच्या मतें पाया आहे. ते म्हणतात, "चंद्रगुप्त, अशोक, वेरूळ, अजंठा, जयदेव, तुकाराम, कृष्ण, गौतमबुद्ध यांचा मुस्लिमांनी अभिमान धरला नाही, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा वारसा सांगितला नाही, तर भारतीय राष्ट्रवाद संपलाच असें होईल. त्याचप्रमाणे (ताजमहाल, गोलघुमट) इत्यादि मुस्लिम कलाकृति, शेरशहा, अकबर, यांचें राजकीय कार्य व चांदबिबी, नूरजहान यांचे शौर्यधैर्य यांविषयीं हिंदूंना आत्मीयता वाटली नाही, तर भारतीय राष्ट्रवादाचा विकास न होतां त्याचा मृत्यूच ओढवेल."
राष्ट्रीयतेचा हा विचार हिंदूंनी सर्वथैव मान्य केला आहे. धर्मक्षेत्रांत सुद्धा ज्यांनी पराकाष्ठेची सहिष्णुता दाखविली. त्यांना राष्ट्रीयतेचे हे तत्त्वज्ञान अमान्य करण्याचें कांहीच कारण नव्हतें. पण मुस्लिम समाज मुस्लिमेतर पुरुष, मुस्लिमेतर पराक्रम, कलावैभव, कर्तृत्व, हें वंद्य मानण्यासहि तयार नाही. मग ते आपलें मानून त्याचा अभिमान धरणें दूरच. त्यामुळेच गांधींचें रामराज्य म्हणजे त्यांना हिंदूकरण वाटतें. आणि महात्माजींना तें हीनाहून हीन मानतात. आणि तरीहि आपण भारतीय आहों असा त्यांचा आणि काँग्रेस-धुरीणांचा दावा आहे.
नेहरूंवरहि राग
टिळक, पटेल व महात्माजी यांची मनें श्रद्धासंपन्न होती. त्यांची वृत्ति धार्मिक होती, म्हणून मुस्लिमांना त्यांच्याविषयी शंका. पण पंडित नेहरू हेहि मुस्लिमांचे शत्रु आहेत, त्यांनाहि इस्लाम नष्ट करावयाचा आहे, असें मुस्लिम म्हणतात. ही काँग्रेसच्या पक्षपाती नीतीची, तिच्या ऐक्य प्रयत्नांची व मुस्लिमांच्या भारतीयत्वाची खरी शोकांतिका आहे. 'निदाये मिल्लत' या पत्राच्या संपादकांच्या मतें गोळवलकर गुरुजी व नेहरू मुस्लिमांच्या दृष्टीने सारखेच आहेत. ते म्हणतात, "इस्लामी संस्कृति व मुस्लिम पर्सनल लॉ यांवर स्वातंत्र्यानंतर चौफेर हल्ले सुरू आहेत, हिंदूंचा एक गट हे हल्ले उघडपणें करतो, दुसरा गट बुद्धिप्रामाण्य, सेक्युलॅरिझम यांच्या बुरख्याआडून करतो. पहिल्या आघाडीचें नेतृत्व गोळवलकर गुरुजींच्याकडे असून, पंडित जवाहरलाल हे आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत दुसऱ्या गटाचे मुख्य होते," (साधना, पुणे १५-३-६९)
नेहरू कालवश झाले तेव्हा कांही मौलवींनी कुराणपठण केलें. पण शम्स नवीद उस्मानी यांनी यावर आक्षेप घेऊन त्या मौलवींनी कुराणाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर कडक टीका केली. राष्ट्रपति झकीर हुसेन, शेख अबदुल्ला व हफीज महंमद त्या वेळीं तेथे होते. त्यांनी कुराणाची ही विटंबना सहन केली म्हणून त्यांच्यावरहि उस्मानी तुटून पडले आहेत. ते म्हणाले, "त्यांना नेहरूंच्या आत्म्याची काळजी होती तर त्यांनी त्यांना जिवंतपणींच कलिमा पढावयास सांगावयाचें होतें. तसें त्यांनी केलें नाही. तेव्हा नेहरूंच्या आत्म्याला मुक्ति मिळण्याची आशा नाही." देवबंद पंथाचे मौ. तायव यांनीहि हा कुराणाचा अपमान आहे, असेंच म्हटलें आहे. (दावत, १०, २० जून १९६४). शेवटीं दावतचे संपादक म्हणतात, "आपण अज्ञेयवादी आहों असें भासवून जन्मभर नेहरूंनी लोकांची दिशाभूल केली. खरें म्हणजे ते पक्के सनातनी हिंदु होते." (उतारे - दावत, इस्लाम, इन् इंडियाज् ट्रँझिशन- करंदीकर, पृष्ठ ३२५).
जन्मभर नेहरूंनी हिंदूवर अन्याय केला, पक्षपात केला. विषमनीति अवलंबून मुस्लिमांचा अनुनय केला. स्वातंत्र्यानंतरहि लीगशी सहकार्य केलें. पाकिस्तानवर प्रेम केलें, तरी मुस्लिम संतुष्ट नाहीत. गोळवलकर गुरुजी व नेहरू त्यांना सारखेच वाटतात. मुस्लिम केव्हा संतुष्ट झाले असते? नेहरू मुसलमान होऊन कलिमा पढूं लागले असते तर !
अशा परिस्थितीत हिंदु-मुस्लिम समस्या कशी सुटेल याचा वास्तव भूमिकेवरून विचार केला पाहिजे.
१०
मुस्लिम अल्पसंख्य आहेत तेव्हा बहुसंख्याकांनी त्यांना सांभाळन घ्यावें, त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करावें, कोठे पड खावी, कोठे तडजोड करण्यास तयार व्हावें, असा हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी जे उपदेश करतात त्यांनी मुस्लिमांच्या या अपेक्षा ध्यानीं घेऊन व भारताची परंपरा, हिंदु धर्म, भारताची घटना यांविषयी मुस्लिम समाजाची जी मनोवृत्ति दिसते तिचा हिशेब करून मग भाषणें करावीत, अशी माझी त्यांना विनंती आहे.
त्या भाषणांत मुस्लिमांचे कोणकोणते आग्रह मान्य करण्यास आपण तयार आहोंत तें त्यांनी स्पष्टपणें सांगावें. भारताची प्राचीन परंपरा आपली मानणें मुस्लिमांना मान्य नाही, संस्कृत भाषा त्यांना वर्ज्य आहे, मानवकृत कायदा मुस्लिम मानणार नाहीत. अर्थात् लोकशाही निषिद्धच ठरली ! काँग्रेस नेत्यांना हें मान्य आहे काय ? 'इहवाद' हें पाप आहे, असें मुस्लिम समाज मानतो. सर्वधर्मसमान मानणें हे तेवढेंच मोठें पाप होय. त्यामुळे गांधी, नेहरू हे जोंपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत ते मुस्लिमांना आदरणीय होणार नाहीत. बाह्य जगांतील मुस्लिम हिंदी मुस्लिमांना इतर भारतीयांपेक्षा जवळचे वाटतात, म्हणजे विश्व- मुस्लिमवादाचा त्यांचा आग्रह कायम आहे. इंदिराजी, चव्हाण यांना याबद्दल काय म्हणावयाचें आहे ? मुस्लिमांना आपली विद्यालयें निराळीं हवीं आहेत, तेथे उर्दू माध्यम असलें पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे ! उदारमतवादी पुढाऱ्यांना हें पसंत आहे काय ?
वरील सर्व प्रकारचे हट्टाग्रह धरणारे मुस्लिम फार थोडे आहेत, निदाये मिल्लत, दावत यांना मुस्लिम समाजांत फारसे अनुयायी नाहीत, बहुसंख्य मुस्लिम सर्वार्थाने भारतीय आहेत, असा उदारदृष्टि लोकांचा एक मुद्दा असतो. त्याचा विचार वर केलाच आहे. तेव्हा पुनरुक्ति करण्याचें कारण नाही. त्यांचें म्हणणें खरें असेल तर त्यांनी समान नागरी कायदा तत्काळ लोकसभेत संमत करून घ्यावा. त्याआधी फक्रुद्दीन अहंमद, युनुस सलीम यांच्यासह भारतांत दौरे काढून मुस्लिमांच्या हजार-दोन हजार सभा घेऊन या कायद्याला त्यांची संमति असल्याची खात्री करून घ्यावी. पर्सनल लॉमध्ये बदल करण्यास हरकत नाही, स्वतंत्र बुद्धीने धर्म-परिवर्तन करण्यास आमची मान्यता आहे, स्त्रियांना पूर्ण समानता देण्यास आमची तयारी आहे, असें या सभांत मुस्लिम जर जाहीरपणे सांगू लागले, तर सर्व हिंदु- मुस्लिम समस्याच निकालांत निघेल.
पण ज्यांना या समस्येची प्रामाणिकपणें चिंता करावयाची आहे त्यांनी हें जाणलें पाहिजे की, उदारदृष्टि लोकांची मतें भ्रांत आहेत. इहवाद, धर्माची परिवर्तनीयता, धर्मसमानत्व, राष्ट्रनिष्ठा यांचा पुरस्कार करणारा पुरोगामी मनुष्य मुस्लिम समाजाच्या सभेंत उभा राहू शकत नाही, यावरून तेंच दिसून येईल. न्या. मू. छगला, फैजी यांसारखे कर्ते, विद्वान् मुस्लिम तेंच सांगत आहेत. हें सर्व विचारांत घेऊन भारतीय जनतेने ही भारतीय इहवादाला विरोधी असलेली प्रबळ शक्ति अनुकूल कशी करून घेतां येईल याचा स्वतंत्रपणें विचार केला पाहिजे.
प्रबोधनाची गरज
तसा विचार करूं लागतांच विचारवंतांच्या ध्यानीं येईल की, मुस्लिम समाजांत प्रबोधन घडून आल्यावांचून, रेनासान्स, रेफर्मेशन इत्यादि युगांच्या ज्या तत्त्वामुळे युरोपीय समाज उत्कर्ष पावला तीं तत्त्वें त्या समाजांत प्रसृत्त झाल्यावांचून, बिंबल्यावाचून हिंदु-मुस्लिम समस्या सुटणार नाही, जातीय दंगे थांबणार नाहीत व ती शक्ति अनुकूल होणार नाही. या दृष्टीने सेक्युलर फोरम, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, मुस्लिम प्रोग्रेसिव्ह ग्रुप, दिल्ली, यांच्या कार्याला प्रत्येक राष्ट्रीय वृत्तीच्या नागरिकाने जास्तीत जास्त पाठिंबा देणें अवश्य आहे. या संस्थांत अनेक मुस्लिम तरुण स्त्री-पुरुष सहभागी झाले आहेत व निर्भयपणे आपल्या समाजावर प्रबोधनयुगाचे संस्कार करण्याचे धाडस करीत आहेत, ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे.
"सत्यशोधक मंडळ व हमीद दलवाई यांचे कार्य पृथ्वीमोलाचें आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे लोक जात्यंध आहेत, धर्मांध आहेत, प्रतिगामी आहेत. त्यांच्या या वृत्तीमुळे हिंदु-मुस्लिम समस्या अधिक बिकट होते व त्याचे परिणाम अप्रत्यक्षपणें सर्व मुसलमान नागरिकांना भोगावे लागतात." असा भावार्थ असलेली मुस्लिम तरुणांचीं अनेक पत्रे वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेलीं आहेत. "उद्याची मुसलमान पिढी ही सुधारणा घडवून आणणारच-" असा निर्धार त्या पत्रांतून या तरुणांनी व्यक्त केला आहे, ही फारच आशादायक गोष्ट आहे. तेव्हा मुस्लिम तरुणांनी चालविलेलें हें जें प्रबोधनाचें कार्य त्याला हिंदूंनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने यावच्छक्य साह्य केलें पाहिजे.
पुन्हा तीच भाषा
पण या प्रयत्नावर सर्वस्वी अवलंबून राहणें धोक्याचें होईल; कारण त्यांचा परिणाम दिसायला दीर्घकाल लागेल आणि आज देशांत पाकिस्तानपूर्व कालाप्रमाणे, १९४० ते १९४७ या सात-आठ वर्षातल्याप्रमाणे दुसऱ्या पाकिस्तानचे वारे वाहूं लागले आहेत. मुस्लिम समाज नेते पुन्हा 'डायरेक्ट ॲक्शन' ची भाषा बोलूं लागले आहेत व तो समाज तशी कृति करूं लागला आहे. तेवीसपैकी बावीस दंगे मुस्लिमांनी सुरू केले याचा दुसरा काय अर्थ आहे ? आम्हांला दुय्यम नागरिक म्हणून वागविलें जातें, इस्लामचा नाश करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी त्यांची ओरड सुरू आहे. पण आपण मोगल कालाप्रमाणे सत्ताधारी आहों, अशी प्रत्यक्षांत मुस्लिमांची वागणूक आहे.
शिवजयंती, रामलीला, गणेशोत्सव या मिरवणुकींवर ते हल्ले करतात, कत्तली करतात आणि प्रतिकार झाला की, इस्लाम धोक्यांत आहे, असा ओरडा करतात आणि त्याच्या संरक्षणासाठी स्वतंत्र मुस्लिम संघटना स्थापिली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी प्रत्याघात केला पाहिजे, अशी चिथावणी देतात. नोव्हेंबर १९६७ मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या जमाते इस्लामीच्या परिषदेत सहचिटणीस सय्यद हमीद हुसेन म्हणाले, "आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता मुस्लिमांनी तिसरा प्रभावी गट म्हणून संघटित झालें पाहिजे." ७ नोव्हेंबर १९६७ च्या 'दावत'च्या अंकांत मुस्लिमांच्या स्वतंत्र संघटनेचें आवाहन केलेलें आहे. १९६७ साली मुशावरतचे अध्यक्ष डॉ. सय्यद महमूद यांनी वार्ताहरांना मुलाखत देऊन हीच घोषणा केली- "मुस्लिमांनी सरकारवर अवलंबून न राहतां स्वसंरक्षणासाठी उघडपणें बलिष्ठ संघटना उभी केली पाहिजे व स्वसंरक्षणासाठी प्रत्याघात करण्याचीहि तयारी ठेवली पाहिजे." (भारतीय मुस्लिम, आव्हान आणि आवाहन, उर्दू प्रेस, हसनैन, पृष्ठे १४२, १४९).
यांतील प्रत्याघात शब्दाचा अर्थ, बहुतेक दंगे मुस्लिांनी सुरू केले होते या सरकारी अहवालाच्या आधारेंच केला पाहिजे. पूर्वीच्या लीगची डायरेक्ट ॲक्शन हाच त्यांचा अर्थ आहे.
१९४६ सालच्या मुस्लिम लीगच्या बैठकींतले ठराव व भाषणें पाहिलीं म्हणजे त्यांचेच हे पडसाद पुन्हा उमटत असून, ही दुसऱ्या पाकिस्तानची पूर्वतयारी आहे हें कोणाच्याहि सहज ध्यानांत येईल. त्या बैठकींतला दुसरा ठराव असा आहे: "काँग्रेस ही हिंदूंचें जातीय राज्य स्थापू पाहत आहे. ब्रिटिश सरकार तिकडे कानाडोळा करीत आहे. तेव्हा पाकिस्तान मिळविण्यासाठी मुस्लिमांनी डायरेक्ट ॲक्शनचाच अवलंब केला पाहिजे. त्यावांचून आम्हांला न्याय मिळणार नाही, आमची इज्जत सांभाळली जाणार नाही". हा ठराव संमत होतांच बॅ. जीना म्हणाले, "आता सनदशीर मार्ग आम्ही सोडले" आहेत. आतापर्यंत त्या मार्गांचा आम्ही अवलंब केला. (वास्तविक १९३८ सालींच डायरेक्ट ॲक्शनचा अवलंब मुस्लिमांनी केला होता. किंबहुना प्रारंभापासून त्यांचा तोच मार्ग होता.) पण यश येत नाही. ब्रिटिश व काँग्रेस यांनी आमच्यावर पिस्तूल रोखलें आहे. तेव्हा आम्ही पिस्तूल रोखलें पाहिजे. (स्ट्रगल फॉर फ्रीडम- मुजुमदार, पृष्ठ ७४६).
यानंतर मुस्लिमांची अत्यंत भयानक अशी डायरेक्ट ॲक्शन पंजाब आणि बंगाल मध्ये सुरू झाली हें सर्वश्रुत आहे. आणि तिच्यामुळेच काँग्रेस फाळणीला तयार झाली यांतहि शंका नाही. पंडितजींनीच तसें म्हटलें आहे. १९६० सालीं लिओनार्ड मॉसले यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, 'खरें म्हणजे आम्ही सर्व म्हातारे झालों होतो. थकलों होतों. पुन्हा तुरुंगांत जाण्याची आमच्यांत ताकद नव्हती. पंजाबांतून जाळपोळीच्या नि कत्तलीच्या बातम्या रोज येत होत्या. फाळणी हाच मार्ग होता. आम्ही तो पत्करला.' (स्ट्रगल फॉर फ्रीडम, पृष्ठ ७६८, ६९).
संघटित बळ हवें
याच इतिहासाची आता पुनरावृत्ति होत आहे. तेव्हा दुसरें पाकिस्तान टाळावयाचें असेल, तर इहवादी राष्ट्रीय वृत्तीच्या समाजांनी आणि विशेषतः हिंदूंनी केंद्र व राज्य सरकारच्या मागे संघटित बळ उभे करणें अवश्य आहे. मागच्या वेळी महात्माजी म्हणाले होते की, "बहुसंख्य मुस्लिमांना फाळणी हवी असेल, तर ती कोणीहि नाकारूं शकणार नाही. आता फाळणीविरुद्ध हिंदूंनी लढा द्यावयाचें ठरविलें तर गोष्ट निराळी. पण तो केवळ आत्मघाताचा मार्ग होय!" पण हिंदूंनी लढा दिला नाही तरी, अथवा म्हणूनच आत्मघात झाला, हें पुढच्या इतिहासाने दाखविलेंच आहे. आजहि काँग्रेस थकली आहे, म्हातारी झाली आहे. नेहरू प्रभृतींची जीं वयें १९४७ सालीं होतीं तींच आज बहुतेक काँग्रेस नेत्यांची आहेत आणि आज शिवाय काँग्रेस दुभंगली आहे. या दुहीचा सौदा करण्यासाठी फायदा घ्यावयाचा, असें जाहीरपणें मुस्लिम सांगत आहेत. तेव्हा आता दुसरी फाळणी जर टाळावयाची असेल, तर सरकारच्या मागे किंवा सर्वराष्ट्रीय एक-पक्ष स्थापून त्याच्या मागे इहवादी, लोकवादी, राष्ट्रनिष्ठ अशा सर्व समाजांनी संघटित बळ उभे करणें अवश्य आहे. तरच मुस्लिमांच्या डायरेक्ट ॲक्शनला तोंड देतां येईल.
पण हें व्हावयाचें तर हिंदु समाज पूर्णपणे इहवादी होणें अवश्य आहे. त्या दृष्टीने त्याने पुष्कळच पावले टाकलीं आहेत, हें खरें आहे. येथे राष्ट्रनिष्ठा उदयाला आली, स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी झाला, लोकसत्ताक आपण स्थापन केलें व कृषि, उद्योग, विज्ञान यांतहि वरीच प्रगति झाली हें त्याचेंच फळ होय, हें भारतीय इहवादाचें विवेचन करतांना प्रारंभीच्या लेखांत सांगितलेच आहे; पण अजूनहि पुष्कळच पल्ला गाठावयाचा आहे हे विसरून चालणार नाही.
स्वातंत्र्यानंतरच्या काळांत डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने लक्षावधि हरिजन हिंदु धर्म सोडून गेलें हें पाहूनहि हिंदु जागे झाले नाहीत. अत्यंत घातक अशा जन्मनिष्ठ चातुर्वण्याचा अभिमान सोडावयास ते तयार नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री चरणसिंग यांनी म्हटलें आहे की, "गेल्या चाळीस वर्षांत शेकडा ५६ जाट मुस्लिम झाले. कारण ब्राह्मण खत्री हे त्यांना अति हीन लेखतात. त्यांना जात बदलतां येत नाही, त्यांनी धर्म बदलला! गेल्या पंधरा वर्षांत उत्तर हिंदुस्थानांत वीस लाख लोकांनी हिंदु धर्म सोडून खिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे. हिंदुधर्मांत राहून आपल्याला उत्कर्ष संधि मिळेल असें ज्यांना वाटत नाही त्या सर्व जाति हेंच करणार. हें ओळखूनच मुस्लिम नेत्यांनी भारतांतील मागास जमाती, आदिवासी व हरिजन यांना इस्लामची दीक्षा देऊन समतेचा धर्म द्यावा व इतकीं शतकें आपण केलेली चूक दुरुस्त करावी, अशा घोषणा करण्यास प्रारंभ केला आहे."
निदाये मिल्लतचे संपादक म्हणतात, (१२-१-६९) "अस्पृश्य व आदिवासी यांना हिंदु समाजांत मनुष्याचा सुद्धा दर्जा नाही. वैदिक धर्मीयांनी त्यांना हजारो वर्षांपासून जन्म आणि कर्म यांच्या साखळदंडांनी जखडून टाकलें आहे. या लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवून पापाच्या मार्गापासून त्यांचें संरक्षण करणें ही मुसलमान या नात्याने आमची जबाबदारी आहे."
अस्पृश्यतेप्रमाणेच जातिजातीतले भेद अजून असेच टिकून आहेत. जाट, रजपूत, भूमिहर, ब्राह्मण, मराठा, मराठेतर, रेड्डी, अयंगार इत्यादि भेद स्वातंत्र्यानंतर जास्तच चिघळले आहेत व बहुतेक सर्व पक्ष ते स्वार्थासाठी चिघळवीत आहेत. आणि त्यामुळे हिंदु समाजाची शकलें होत आहेत. यांचे कारण एकच. बुद्धि, तर्क, इतिहास, अनुभव, वैज्ञानिक दृष्टि यांच्या आधारें आपण अजूनहि अरपृश्यता, चातुर्वर्ण्य, जातिभेद यांची तपासणी करूं शकत नाही; म्हणजेज आपण इहवादी नाही. अजुनहि हिंदु बहुजनसमाज हा पोथीनिष्ठ व अंधश्रद्ध आहे. तो इहवादी झाला तरच तो संघटित होऊं शकेल व आपल्या संख्येला लागलेली गळती थांबवूं शकेल. नाही तर केवळ लोकसंख्येच्या जोरावर भारतांत मल्लापुरम्सारखी अनेक पाकिस्तानें व अनेक ख्रिस्तीस्थानें निर्माण होतील.
राजकीय डाव
भारतीय मुस्लिमांचा कुटुंबनियोजनाला विरोध आहे. त्यामुळे अशी पाकिस्तानें लोकसंख्येच्या जोरावर निर्माण करणें कसें सहज शक्य आहे तें हिंदूंनी ध्यानीं घ्यावें. गेल्या वर्षी मलेशियामध्ये इस्लामी परिषद् भरली होती. त्या वेळीं कुटुंब- नियोजन इस्लामविरोधी नाही, असा ठराव अनेक मुस्लिम राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या संमतीने मान्य करण्यांत आला. पण भारतीय मुस्लिमांना मात्र कुटुंबनियोजन मान्य नाही! यामागे केवळ धर्मश्रद्धा नाही, विभक्ततेचा राजकीय डाव आहे. हें लोकसंख्येचें राजकारण 'रेडियन्स'सारख्या पत्रांत उघडपणें उपदेशिलें जात आहे. (दि. ९-५-६५, १६–५–६५, २७–७–६४).
धर्मपरिवर्तनाला मुस्लिमांचा विरोध आहे तो जास्तकरून राजकीयच आहे. चीनमध्ये इस्लाम नष्ट करण्याची कम्युनिस्टांनी प्रतिज्ञा केली आहे. कुराणपठण, रमजानचा उपवास, यांना बंदी घाला, अशी चळवळ ते करीत आहेत, मशिदी पाडीत आहेत, मुस्लिमांना हाकलून देत आहेत. तरी रेडियन्स म्हणते, चीन हा मुस्लिमांचा सच्चा मित्र आहे ! ( उर्दू प्रेस, आव्हान आणि आवाहन पृष्टं ४६, ४७).
भारतांत मुस्लिमांविरुद्ध शब्द उच्चारला तर सरकार त्या माणसावर खटला भरतें. अशा भारतांत इस्लाम धोक्यांत आहे आणि इस्लाम व मुस्लिम नष्ट करण्याची ज्या चीनमध्ये मोहीम चालू आहे तो चीन मात्र मुस्लिमांचा मित्र आहे ! पसर्नल लॉ, शरीयत यांच्याबद्दल असेंच आहे. त्यांतील एक अक्षरहि आम्ही बदलूंन देणार नाही, असें मुस्लिम म्हणतात. पण सोयीसाठी अनेक बदल त्यांनी केलेले आहेतच. इस्लामला व्याजबट्टा मंजूर नाही, चोरीच्या गुन्ह्याला हात तोडण्याची शिक्षा आहे. मुस्लिमांनी मुस्लिम न्यायाधीशाच्या आज्ञा पाळाव्या, असा इस्लामचा दंडक आहे. व्यभिचाऱ्याला दगडांनी ठेचून मारतो. अशा शरीयतच्या आज्ञा मुस्लिम पाळीत नाहीत. कारण त्या त्यांच्या स्वार्थाच्या आड येतात ! ए. ए. ए. फैजी यांनी मुस्लिमांवर अशाच तऱ्हेचा आक्षेप घेतला आहे. (टाइम्स, दि. २३ जून १९७०). तरी समान नागरिकत्वाच्या कायद्याला शरीयतच्या आधारेंच मुस्लिम विरोध करतात आणि भारत सरकार तो मानतें.
मतलबी धोरण
तरीहि या मागचें द्विराष्ट्रवादाचें राजकारण हिंदु ध्यानी घेत नाहीत. जीनांप्रमाणेच आजहि भारतीय मुस्लिम नेत्यांना मुस्लिम समाज अंधश्रद्ध, दुराग्रही असाच राखावयाचा आहे. तरच त्याला भडकावून देऊन डायरेक्ट ॲक्शनला प्रवृत्त करणें शक्य होईल आणि दुसरें पाकिस्तान साधतां येईल. हा हेतु निदाये मिल्लतने स्पष्टपणें जाहीर केला आहे. तें पत्र म्हणते, "आसाममध्ये पहाडी जिल्ह्यांचे उपराज्य स्थापन झालें यापासून मुसलमानांना पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यावरून देशाचे तुकडे करण्याच्ची इच्छा करणाऱ्यांना येथे वाव आहे असें दृष्टोपत्तीस येतें." (साधना, दि. ४- १- १९६९).
मुस्लिमांच्या या पाकिस्तानी आकांक्षांना हिंदु समाजाने इहवादी होणें हें एकच उत्तर आहे. इहवादावांचून तो संघटित होणें शक्य नाही. कारण जातिभेद, चातुर्वर्ण्य अस्पृश्यता यांचीं मुळें पोथींत आहेत, अंधश्रद्धेत आहेत. शेकडो वर्षे हा समाज इहवादशून्य होऊन शब्दप्रामाण्याच्या आहारी गेला आहे. वेदबंदी, स्पर्शबंदी, शुद्धिबंदी, सिंधुबंदी, रोटीबंदी. बेटीबंदी व व्यवसायबंदी या सात शृंखला त्याने आपण होऊन आपल्या पायांत ठोकून घेतल्या आहेत. त्या नसत्या तर भारतांत मुस्लिम कोटि संख्येने दिसलेच नसते. शुद्धि-बंदीमुळे ते दिसत आहेत. स्पपर्शबंदी नसती तर कोट्यवधि हरिजन आज नरकांत पिचत पडले नसते. आरंभीचा एकवर्णी समाज या शृंखलांमुळे हजारो जातींत छिनला जाऊन विस्कळित, असंघटित अणि म्हणूनच दुबळा झाला. अजूनहि त्या शृंखला तुटलेल्या नाहीत. त्यामुळेच लक्षावधि लोक धर्मांतर करीत आहेत. हेंच चालू राहिलें तर भारतांत, एखादे हिंदुस्थान हि असावें, अशी मागणी करण्याची हिंदूंना वेळ येईल. तेव्हा वेळींच सावध होऊन राष्ट्रसंघटनेची चिंता हिंदूंनी वहावी.
'टाइम्स ऑफ इंडिया'चे संपादक गिरिलाल जैन यांनी 'कम्युनल प्रॉब्लेम' या शीर्षकाचे दोन लेख लिहून या विषयाचें मोठें उद्बोधक विवेचन केलें आहे. (टाइम्स, दि. २२, २३ ऑक्टोबर १९६९). त्याचा मतितार्थ देऊन या लांबलेल्या विवेचनाचा समारोप करूं. जैन म्हणतात, 'प्रत्येक देशांत कोणती तरी एक प्रभावी जमात राष्ट्रसंघटनेचें कार्य करीत असतें. रशियांत ग्रेट रशियन, जर्मनीत प्रशियन, चीनमध्ये हन, ब्रिटनमध्ये इंग्लिश, यांनी हें कार्य केलें आहे. हिंदुस्थानांत ही जबाबदारी हिंदूंची आहे. याचा अर्थ असा नव्हे की, हिंदूंनी हिंदुधर्मीय राष्ट्र करावें. राष्ट्र सर्वांचेच झालें पाहिजे. पण तें घडविण्याची जबाबदारी हिंदूंची आहे. कारण हिंदु हे धर्मातीत इहवादी दृष्टि स्वीकारूं शकतात. आपली प्राचीन संस्कृति फार श्रेष्ठ होती ही जाणीव फार महत्त्वाची आहे. पण तो अभिमान धरूनहि हिंदु आधुनिक झाले, पूर्ण राष्ट्रीय झाले. परंपरेच्या अभिमानाने ते संकुचित झाले नाहीत. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. अरविंदबाबूंनी भारताची कालीमातेशीं तुलना केली; गांधींना रामराज्य स्थापावयाचें होतें. तरी या सर्वांना इहवादी लोकायत्त राष्ट्रच अभिप्रेत होतें.
"याउलट बहुसंख्य मुस्लिमांनी शब्दप्रामाण्यवादी, अंधश्रद्धा लोकशाही- विरोधी व इहवादविरोधी अशा उलेमांचे नेतृत्व स्वीकारलें. त्यामुळे त्या जमातीने विभक्त वृत्तीची जोपासना करून राष्ट्रीय प्रवाहांत एकरूप होण्याचें नाकारलें. आता यापुढे हा मुस्लिम समाज जर असाच जीर्णवादी व पोथीबद्ध राहून समाजसुधारणेला विन्मुख होऊन बसेल तर त्याचें जीवन जड व चैतन्यहीन होईल. त्यामुळे त्या जमातीची तर हानि होईलच, पण भारताच्या राष्ट्रीय प्रगतीला तो अडसर होऊन बसेल. ही जाणीव ठेवून मुस्लिम नेत्यांनी त्याला काळाबरोबर आणण्याचे कार्य शिरावर घेतलें पाहिजे."
कांही मुस्लिम नेत्यांनी या कार्याला शुभारंभ केला आहे. त्यांना हिंदूंनी शक्य तें साह्य केलें पाहिजे. पण एकीकडे ते करीत असतांना अंतर्मुख होऊन, इहवादाचा आश्रय करून, हिंदूंनी स्वसमाजांतील विघटनेचीं बीजें नष्ट करण्याचें कार्यहि केलें पाहिजे. म्हणजे हा सनातन समाज संघटित होईल, बलिष्ठ होईल व मग त्याला इहवादी, लोकायत्त भारत राष्ट्राचें स्वप्न सहज प्रत्यक्षांत आणतां येईल.
कम्युनिस्ट
११
११
भारतीय इहवादाला कम्युनिस्ट पक्ष हा मुस्लिम लीगइतकाच घातक आहे. आज जवळ जवळ तीस वर्षे या पक्षाने मुस्लिम लीगच्या अराष्ट्रीय जातीयवादाला सतत पाठिंबा दिलेला आहे आणि आता तर काँग्रेस व तिचे नेते या पक्षाच्या संपूर्ण आहारीं गेले आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची घातशक्ति दसपट वाढली आहे. म्हणून मुस्लिम जातीयवादाप्रमाणेच कम्युनिस्टांच्या जातीयवादाचा व त्या पक्षाच्या इहवादघातक वृत्तीचा बारकाईने अभ्यास करणें अवश्य आहे.
सोव्हिएट रशियांतील इहवादी शासनाचा विचार करतांना बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, वस्तुनिष्ठ सत्यशोधन, विज्ञाननिष्ठा, प्रयोगनिष्ठा इत्यादि इहवादाच्या तत्त्वांची तेथे क्षणोक्षणी कशी पायमल्ली होत आहे याचा ऊहापोह झालेला आहे.
चीनमध्ये तर वरील तत्त्वांची यापेक्षा दसपट गळचेपी होत आहे आणि जगांतील बहुतेक सर्व देशांतील कम्युनिस्ट पक्ष हे रशिया व चीन यांचेच हस्तक असल्यामुळे त्या पक्षांत इहवादी विचार- आचार- स्वातंत्र्याची, स्वतंत्र मतप्रतिपादनाची काय प्रतिष्ठा असेल तें निराळें सांगण्याची गरज नाही.
मॉस्को किंवा पीकिंग येथून आज्ञा येतील त्याप्रमाणे त्यांना आपलीं मतें बनवावीं लागतात. तशा तशा कोलांट्या मारून दाखवाव्या लागतात. तसा तसा नाच करून दाखवावा लागतो. इतर देशांतील कम्युनिस्ट पक्ष असे पूर्ण शब्द-प्रामाण्यवादी मार्क्स-लेनिन-स्टालिन-माओ-कोसिगिनोक्त धर्माचे अंध अनुयायी असल्यामुळे इहवादाशी त्यांचा दूरतः सुद्धा संबंध असण्याची शक्यतां नाही. पूर्वी "वचनात् प्रवृत्तिः वचनात् निवृत्तिः" हा जसा दंडक होता तसाच दंडक आज त्या पक्षांत सर्वत्र आहे. वेद, स्मृति यांच्या ऐवजी मॉस्को-पीकिंग यांची वचनें ते मानतात इतकाच फरक. त्यामुळे त्या त्या देशांतील इहवादाचे आणि प्रगतीचे, उत्कर्षाचे तेथील कम्युनिस्ट पक्ष कडवे शत्रु होऊन बसतात. भारतांतील कम्युनिस्ट पक्षहि याला अपवाद नाही.
मॉस्कोच्या वचनांवरूनच भारतीय कम्युनिस्टांची प्रवृत्ति व निवृत्ति होत असते हें आता जगजाहीर आहे. अनेक पंडितांनी या पक्षाचें विवेचन करतांना त्याची उदाहरणेंहि भरपूर दिली आहेत. त्या सर्वांची पुनरुक्ति येथे करण्याचें कारण नाही. विषयपूर्तीसाठी त्यांच्या विवेचनाचा सारार्थ देऊन पुढे जाऊं.
'महाराजां'चे मार्गदर्शन
पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, भारतांत ज्या ज्या वेळीं कम्युनिस्ट पक्षाचीं अधिवेशने होतात त्या त्या वेळीं सोव्हिएट रशियांतून किंवा रशियामान्य इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षांतून कोणी तरी मार्गदर्शक येथे येतो आणि वारकऱ्यांच्या फडावर मुख्य फडकरी जसा हुकमत गाजवतो तसा तो कम्युनिस्ट पक्षाच्या भाविक, श्रद्धाळू, मॉस्को-परायण सभासदांवर अंमल चालवितो. आतापर्यंत ॲशले, ॲलिसन, ब्रॅडले, डायाकाव्ह, व्हाल्डिमीर, डेडीजर, रॅडोनिन, झॅकोव्हस्की इत्यादि 'महाराजांनी' येथल्या शिष्यांना गुरूपदेश दिला आहे.
१९५३ च्या मदुराई परिषदेला हॅरिपॉलिट हे 'गुरुजी' आले होते. १९५६ मध्ये पालघाटला शेपिलाव्हने पत्रद्वारें मंत्र दिला होता. १९६१ च्या विजयवाडा अधिवेशनाचे सुस्लाव्ह हे मार्गदर्शक होते. अजय घोष यांच्यासारख्या प्रौढ सभासदांनी केव्हा केव्हा जरा नाराजीने तक्रार केलेली आढळते की, त्या "गुरुजींनी जे जे मंत्र आम्हांला पढविले ते ते मुकाट्याने आम्हीं म्हटलें." ते म्हणाले, "म्हणा, भारताचें स्वातंत्र्य पोकळ स्वातंत्र्य आहे" आम्हीं तसें म्हटलें. ते म्हणाले, म्हणा "नेहरू साम्राज्यवाद्यांचे हस्तक आहेत." आम्ही म्हणालों, "नेहरू साम्राज्यवाद्यांचे हस्तक आहेत." अशी नाराजी, अशी कुरकूर केव्हा केव्हा केली जाते. पण मॉस्कोवचनप्रामाण्याला त्यामुळे कधी बाध आलेला नाही.
दुसरें महायुद्ध १९३९ साली सुरू झालें. तें जर्मनी व ब्रिटन या दोन राष्ट्रांत चालू होतें. तोंपर्यंत भारतीय कम्युनिस्ट त्याला साम्राज्यवादी युद्ध म्हणत. पण १९४१ सालीं जर्मनीने रशियावर स्वारी करतांच तें लोकयुद्ध होय, असें त्या पक्षाने जाहीर केलें. त्यामुळे अर्थातच ब्रिटन हें जें अव्वल साम्राज्यवादी राष्ट्र होतें तें एकदम लोकवादी, प्रगतिशील राष्ट्र ठरलें आणि भारतांतील गांधी, नेहरू हे जे काँग्रेसचे युद्धविरोधी नेते ते प्रतिगामी, कामगारविरोधी, इतिहासाला मागे खेचणारे असे ठरले. 'छोडो भारत' या काँग्रेसच्या चळवळीला कम्युनिस्टांचा कडवा विरोध झाला तो यामुळेच. सोव्हिएट रशियाची त्यामुळे हानि झाली असती. अशा चळवळीला पाठिंबा देणें म्हणजे स्वामिद्रोह होय!
भारत हे एक राष्ट्र आहे असें भारतीय कम्युनिस्ट पक्ष कधीच मानीत नसे. कारण स्टॅलिन तसें मानीत नसे. सोव्हिएट रशियामध्ये युक्रेन, अझरबैदान, तुर्किस्तान इ. बारा-पंधरा प्रांत आहेत. त्यांच्या भाषा, त्यांचें व्यक्तित्व रशियांतला प्रधान प्रांत जो ग्रेट रशिया त्याच्याहून अगदी भिन्न आहे. क्रांति होतांच लेनिनच्या पक्षाने "या सर्व प्रांतांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, रशियांतून फुटून निघण्याचा सुद्धा हक्क आहे" अशी घोषणा केली. पण प्रत्यक्षांत मात्र तसें स्वातंत्र्य त्याने कोणालाहि दिलें नाही. त्या त्या प्रांतांतील ज्या नेत्यांनी तसा प्रचार केला त्यांना लेनिनने जगांतून नाहीसें केलें व लष्करी बळावर रशियाचें पूर्वीचें साम्राज्य जसेंच्या तसें टिकवून धरलें. पण बाह्यतः मात्र या सर्व प्रांतांना पूर्ण स्वातंत्र्य आहे व सोव्हिएट रशिया हें अजूनहि त्यांचें संघराज्य आहे असा पुकारा अजूनहि केला जातो. अर्थातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतांतील पंजाब, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र हीं स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रें व्हायला हवीं आहेत. तेव्हा भारत हे एकराष्ट्र कधीहि नव्हतें व तसें तें होणें शक्य नाही, तें फार तर संघराज्य होईल, असा घोष करणें प्राप्तच होतें.
सूर बदलला
हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून काँग्रेसने मान्य केली. तिलाहि याच कारणासाठी विरोध करणें अवश्य होतें. कारण भारताच्या एकराष्ट्रीयत्वाची ती निदर्शक आहे. आज्ञेप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट भारताचे एकराष्ट्रीयत्व व राष्ट्रभाषा हिंदी यांना विरोध करण्याचें कार्य भक्तिभावाने करीत राहिले. पण १९५३ मध्ये स्टॅलिन मृत्यु पावला. त्यानंतर त्याच्या पदावर जे सोव्हिएट शास्ते आले त्यांना भारताशी स्नेह करणें अवश्य आहे असें वाटलें. त्यांनी अपले धोरण बदलून आपल्या मुखयंत्रांच्या कळी दाबल्या. त्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालसूर पालटले. भारत हे पूर्वीपासूनच एक राष्ट्र आहे, प्रांतभेद हे गौण आहेत, या सुरांत ते गाऊं लागले.
"पूर्वीच हें आपल्या लक्षांत यावयास हवें होतें, पण आलें नाही" याबद्दल अवश्य ती खंत व लज्जा व्यक्त करून मदुरेच्या सभेंत (डिसेंबर १९५३) अजय घोष म्हणाले की, "वास्तविक कष्टकरी जनता भारतांत एकवर्गीयच आहे आणि म्हणून भारत हें एक राष्ट्र आहे, हेंच सत्य होय. पण भांडवली राष्ट्रवादाच्या कल्पना आमच्या डोक्यांत शिरल्यामुळे आमच्याकडून प्रमाद झाला." याच सुमारास कम्युनिस्ट पक्ष हिंदीचाहि राष्ट्रभाषा म्हणून गौरव करूं लागला व हिंदीतर प्रांतांतह हिंदीचा अभ्यास झाला पाहिजे, असे आग्रहाने सांगू लागला.
आपली बुद्धि ज्यांनी आपल्या परकीय स्वामींना अशा रीतीने कायमची विकलेली आहे, त्यांना इहवादी कसें म्हणतां येईल ? ती त्या शब्दाची विटंबना होईल. कारण स्वतंत्र प्रज्ञा, स्वतंत्र चिंतन, निर्णय करण्याचें स्वातंत्र्य हें इहवादाचें प्रधान लक्षण होय.
कम्युनिझमचें मूळ तत्त्वज्ञान विश्वराष्ट्राचें आहे. कोणत्याहि एका देशांत कम्युनिझम स्थापन होणें मार्क्समतान्वये अशक्य आहे. सोव्हिएट नेत्यांनी १९१७ च्या क्रांतीनंतर सर्व जगभर क्रांति करण्याचे प्रारंभी प्रयत्न केले. पण त्यांत पूर्ण अपयश आल्यामुळे स्टॅलिनने एकराष्ट्रीय कम्युनिझमचें तत्त्व सांगितलें. पण आपण मूळ मार्क्सतत्त्व सोडलें नाही, हें जगांतल्या कम्युनिस्टांना दाखविण्यासाठी त्याने कॉमिटर्न, कॉमिनफॉर्म अशा संस्था स्थापून कामगारांच्या विश्वराज्याच्या घोषणा चालू ठेवल्या आणि या राज्यांत म्हणजे कॉमिनफॉर्ममध्ये आपापले देश आणून समाविष्ट करावे अशी देशोदेशींच्या कम्युनिस्टांना आज्ञा दिली.
जमातवादाचा आश्रय
वास्तविक आता कॉमिटर्न, कॉमिन्फॉर्म याचा अर्थ सोव्हिएट रशियाचें साम्राज्य असाच होतो हें जगजाहीर झालेलें आहे. तरीहि सोव्हिएट नेत्यांवर भारतीय कम्युनिस्टांची पूर्ण श्रद्धा असल्यामूळे, ते यांचे आश्रयदाते, तारणकर्ते स्वामी असल्यामुळे, ते तसें मानीत नाहीत. त्यामुळे स्वदेशीय शासन दुबळें करून, स्वदेशांत अराजक माजवून, त्याची शकलें करून, संपूर्ण देश विघटित करून, अंतीं रशिया किंवा चीन यांच्या मुक्ति फौजांच्या तो स्वाधीन करणें हें त्यांचें ध्येय आहे. अर्थातच इहवाद, शास्त्र, इतिहास, बुद्धिस्वातंत्र्य हीं सर्व वाऱ्यावर उधळून देऊन जातीयता, प्रांतीयता, जमातवाद यांचा आश्रय करून आपले वर्चस्व भारतांत जेथे साधेल तेथे प्रस्थापित करणें आणि शक्य तर सत्तास्थानें काबीज करून त्यामार्गे भारताला हीनबल करून टाकणें हें त्यांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट हे पक्के जातीयवादी, जमातवादी व प्रांतवादी झालेले आहेत. (इंडिया- दि मोस्ट डेंजरस डिकेडस्– सेलिंग हॅरिसन आणि 'कम्युनिझम इन् इंडिया' ओव्हरस्ट्रीट अँड विंडमिलर, या ग्रंथांत कम्युनिस्ट कसे एकांतिक जातीयवादी आहेत त्याचें सविस्तर विवेचन केलेलें आहे. 'इलस्ट्रेटेड वीकली, दिनांक २६-४-१९७० या अंकांतील, 'विल इंडिया गो कम्युनिस्ट'- नुराणी आणि 'इन् शिप्स क्लोदिंग'- 'सतींद्रसिंग' हे लेखहि 'जिज्ञासूंनी अवश्य पाहवे.)'
आंध्र प्रदेशांत कम्मा व रेड्डी या दोन प्रबल अशा ब्राह्मणेतर जाति आहेत. दोन्ही जाति प्रामुख्याने जमीनदार आहेत. दोन्ही जमाती मूळच्या क्षत्रिय. पण आता त्या शेतकरी-कुणबी झाल्या आहेत. कम्मा जातीचें म्हणणें असें की, आपण क्षत्रिय असतांना रेड्डी जातीने आपल्याला तुच्छ लेखून किसानपदाला नेलें. यामुळे या दोन जातींत अनेक शतकें वैर आहे. येथील ब्राह्मण या दोन्ही जातींना शूद्र लेखतात. त्यामुळे त्यांच्याशीं तर त्यांचा उभा दावा आहे. अशा स्थितींत जातिकल्पनांचा उच्छेद करून या जातींतला वैराग्नि शमविण्याचा प्रयत्न करणें हें कोणाहि राष्ट्रनिष्ठ इहवादी नेत्यांचे कर्तव्य होय. पण कम्युनिस्टांनी असा प्रयत्न कधीहि केला नाही.
आंध्रमधील चंद्रशेखर राव, राजेश्वर राव, वसवपुनय्या, कत्रगद्द, राजगोपाल राव इ. प्रमुख नेते हे सर्व कम्मा जातीचे आहेत. आणि स्वतः चांगले सधन आहेत. कम्मा ही सर्व जातच जमीनदार असल्यामुळे श्रीमंत आहे व ती तेथील कम्युनिस्ट पक्षाचें चांगलें पोषण करतें. कम्युनिस्ट नेते त्यांच्यांतलेच असल्यामूळे तिला तेथे जमीनदारी नष्ट होण्याची भीति नाही. रेड्डी लोक काँग्रेसच्या पक्षाचे आहेत. कम्युनिस्टांना काँग्रेसला विरोध करावयाचा आहे. तेव्हा ते जातीयतेचा उघड उघड आश्रय करतात. तामीळनाडूमध्ये कम्युनिस्ट पक्षाचें नेतृत्व ब्राह्मणांकडे आहे. वास्तविक राष्ट्रीय वृत्तीच्या त्यागी नेत्यांना ब्राह्मण असूनहि अनेक प्रांतांत यश मिळालेलें आहे. पण कम्युनिस्टांना ती वृत्ति वर्ज्यच आहे. त्यामुळे तामीळनाडू, महाराष्ट्र अशा प्रदेशांत जेथे नेतृत्व ब्राह्मण कम्युनिस्टांकडे आहे तेथे ते यशस्वी होत नाहीत. अर्थातच तेथे ते पराकाष्ठेचे जातीय बनतात. पण तरीहि त्या त्या जातीचे पुढारी त्यांच्यावर कृपा करतात तेव्हाच त्यांना थोडेसें यश मिळतें. तामीळनाडूमध्ये द्रविड कळघमच्या आश्रयाने कम्युनिस्ट जरा पुढे सरकले. पण त्यांचा आश्रय तुटतांच त्यांचे यश रोडावलें.
केरळमध्ये कम्युनिस्टांना यश आलें व त्यांच्या हातीं सत्ताहि आली ती झावा, नायर या जातींचा जात्यभिमान त्यांनी चेतविल्यामुळे आणि मुस्लिम लीगच्या आश्रयामुळे. नंबुद्रिपाद हे जातीने ब्राह्मण जातिभेद मोडले पाहिजेत, असें ते म्हणतात. पण प्रारंभीं किसानांची वर्गीय संघटना करण्याऐवजी जातीय संघटना केली पाहिजे, असें त्यांचें प्रतिपादन आहे.
मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष
प्रांतभेद, जातिभेद, धर्मभेद, जमातभेद हे भेद वृथा होत. भांडवलदार, जमीनदार हा एक वर्ग आणि किसान कामगार ही कष्टकरी जनता हा दुसरा वर्ग. हा एकच भेद खरा असून, पहिल्या वर्गाला पदच्युत करण्यासाठी किसान- कामगार या वर्गांची संघटना बांधली पाहिजे, असें मार्क्सचें प्रधान तत्त्व आहे आणि या तत्त्वावर दृष्टि ठेवून कम्युनिष्ट पक्षाने कष्टकरी जनतेची संघटना दृढ केली असती, तर हिंदुस्थानचें कोट-कल्याण झालें असतें. कारण तसें करतांना त्यांना स्पृश्य-अस्पृश्य भेदावर प्रहार करून अस्पृश्यता निर्मूलनाचा देशव्यापी कार्यक्रम हातीं घ्यावा लागला असता. भारतांतील जातिभेदांचें घातकत्व सर्व जातींना पटवून देऊन जात्युच्छेदनाची प्रचंड चळवळ उभारावी लागली असती. त्यासाठी वुद्धिवाद, तर्कविज्ञान यांचे संस्कार भारतीय जनतेवर करून तिच्या मनांतील अनेक भ्रांत समज, अनेक अंधश्रद्धा, अनेक घातक रूढि यांचा नायनाट करावा लागला असता. पण हें कार्य दीर्घकाळाचें, अत्यंत कष्टाचें तीव्र मतभेदांचें आणि प्रारंभी तर निराशेचें होतें आणि अजूनहि आहे.
एक शेतकरीवर्ग घेतला तरी त्यांत स्पृश्य आहेत, अस्पृश्य आहेत, हिंदु आहेत, मुस्लिम आहेत, कम्मा आहेत, रेड्डी आहेत, जाट, चौहान, रजपूत, भूमिहर, कायस्थ, मराठे, कुणबी, ब्राह्मण सर्व सर्व आहेत. एवढ्यांच्या मनांतील जात्यभिमान नष्ट करून, यांना वर्गजागृत करावयाचें म्हणजे अत्यंत कष्टाचें काम आणि त्यामुळे भारतीय समाज संघटित होईल ही भीति ! तेव्हा अखिल भारतीय किसानसभेचे अध्यक्ष एन् प्रसाद राव (आंध्र कम्मा) यांनी उपदेश केला की, "किसानांच्या जातीय संघटनाच कम्युनिस्टांनी केल्या पाहिजेत."
श्रीमंत शेतकऱ्यांचा भरणा
१९५४ सालच्या मध्यवर्ती समितीने एका ठरावांतच म्हटलें आहे की, बहुसंख्य शेत-मजूर मागास जातीचे आहेत. त्यांना स्पृश्य किसान सभेंत प्रवेश दिला, तर इतर किसान त्या संघटनेत येणार नाहीत म्हणून त्यांना सभेत घेणें कठीण आहे. यामुळे झालें काय की, मध्यम व श्रीमंत शेतकरी यांचा भरणा किसान संघटनेंत होऊन बहुसंख्येने अस्पृश्य असलेले भूमिहीन मजूर हे त्या संघटनेत अभावानेच उठून दिसले. पण याची स्टॅलिनच्या अनुयायांना कांही खंत वाटली नाही. यावर टीका करतांना 'डेंजरस् डिकेडस्' या ग्रंथाचा लेखक हॅरिसन म्हणतो की, "अशा रीतीने जातीयवादाचा आश्रय केल्यामुळे कदाचित् काँग्रेसच्या हत्यारानेच तिच्याशीं कम्युनिस्टांना मुकाबला करतां येईल. पण तसें झालें तरी ती संघटना म्हणजे क्रांतीचें हत्यार ठरत नाही किंवा हिंदु समाजांतील जातीय तट कोसळून टाकण्याचें कार्यहि तिच्यामुळे होत नाही (पृष्ठे २७१-७२).
पण हें कार्य कम्युनिस्टांना करावयाचेंच नाही. जातीय तट जास्तच भक्कम करून हिंदु समाज जितका जास्त भग्न करतां येईल तितका त्यांना करावयाचा आहे. कारण मार्क्सप्रणीत वर्गजागृति, वर्गलढा ही भाषा ते बोलत असले तरी तें त्याचें खरें उद्दिष्ट नाही. सोव्हिएट रशिया वा चीन यांच्या मुक्ति फौजांच्या यशाची त्यांना चिंता आहे. इंदिरा गांधी या १९५९ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून म्हणाल्या होत्या, "कम्युनिस्ट हे पंचस्तंभीय आहेत, देशद्रोही आहेत, मीरजाफर आहेत, जयचंद आहेत. त्यांचे धनी परदेशांत असून ते त्यांचे पोपट आहेत."
पंडित जवाहरलालहि एकदा म्हणाले होते, "कम्युनिस्टांना नीतिअनीति नाही. कसली निष्ठा नाही व मानवी मूल्येंहि ते जाणीत नाहीत." असा पक्ष इहवादासारख्या क्षुद्र तत्त्वज्ञानाला मान देणें कसें शक्य आहे ?
फुटीर वृत्तींना पाठिंबा
प्रांतीय व जातीय भेदांना चेतविणारे कम्युनिस्ट जमातीय भेदाचा फायदा घेणार नाहीत हे शक्यच नाही. हिंदु-मुस्लिम या जमातींचा संघर्ष हे भारतीय राजकारणांतील मर्मस्थान आहे आणि १९४० पासून कम्युनिस्ट पक्षाने मुस्लिमांच्या पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा देऊन त्या जमातीच्या फुटीर वृत्तीचा सतत परिपोष केलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ हे त्यांच्या मतें जातीय आहेत, पण मुस्लिम लीग मात्र प्रगतिवादी आहे, तिला प्रतिगामी म्हणणे चूक आहे. १९४० पर्यंत डायाकॉव्ह, ब्रुशेव्हिन यांसारखे भारतीय कम्युनिस्टांचे गुरु लीगवर प्रखर टीका करीत. पाकिस्तानच्या मागणीचा निषेध करीत. पण पुढे त्यांनी आपलीं मतें बदललीं आणि तशी कळ फिरताच येथल्या कम्युनिस्टांचीं भाषणेंहि बदललीं.
कम्युनिस्टांच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य सय्यद जहीर यांनी मुस्लिम लीगचा प्रभाव वाढत आहे म्हणून तिचें जाहीरपणें अभिनंदन केलें आणि मुस्लिमांना स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र दिलें पाहिजे असा प्रचार सुरू केला. त्या वेळी युद्धप्रयत्नांत ब्रिटिशांना साह्य करण्याचें कम्युनिस्टांचें धोरण होतें. मुस्लिमांचा गौरव करून, त्यांच्या मागण्या मान्य करून ते त्या कामी सहभागी व्हावेत असा कम्युनिस्ट पक्षाचा हेतु होता. त्यामुळे मुस्लिम लीग ही साम्राज्यविरोधी असून, तिच्या मागण्या न्याय्य, राष्ट्रीय व पुरोगामी स्वरूपाच्या आहेत असा घोष पक्षाने चालविला होता.
फेब्रुवारी १९६९ मध्ये बिहारमध्ये मध्यावधि निवडणुका झाल्या. त्या वेळी कम्युनिस्टांनी मुस्लिम मतें जिंकण्यासाठी काय प्रचार केला? "रशियाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत दिलेली आहे तेव्हा रशियाच्या कृपेंतला जो भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याला मतें देणें हें मुस्लिमांचें कर्तव्यच ठरतें", असा उघड उघड पाकिस्तानधार्जिणा, धार्मिक भावनेला फुंकर घालणारा व अराष्ट्रीय प्रवृत्तीला चेतविणारा प्रचार कम्युनिस्टांनी केला. धर्म ही अफूची गोळी मानणाऱ्यांनी धर्मभेद चेतवून मतें मिळविली. केरळमध्ये नंबुद्रिपाद सरकारने मुल्लापुरम् जिल्हा निर्माण करून हाच धर्मभेद आणखी रुंद केला. हा जिल्हा निर्माण झाला तेव्हा देशांतून व परदेशांतून तेथील लीग-नेत्यांना अभिनंदनाच्या तारा आल्या, यावरून हें लहानसें दुसरें पाकिस्तान निर्माण झालें, ही त्या वेळी झालेली टीका सार्थच होती असें दिसतें.
याच मलबार भागांत खिलाफतीच्या काळी हिंदूंच्या कत्तली झाल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती झाली, तर त्यांत दुःख करण्याचें कारण नाही. आणि दुःख कोणाला होणार आहे ? केरळमधील संयुक्त आघाडीतील एकाहि पक्षाने या स्वतंत्र जिल्ह्याला विरोध केला नाही. तेव्हा कत्तली झाल्या, तर 'शूर मोपला' म्हणून त्यांचें कौतुकच होईल.
आता तर इंदिरा काँग्रेसने केरळमध्ये कम्युनिस्टांना व त्यांच्या मुस्लिम स्नेहाला भरघोस आशीर्वाद दिला आहे. कम्युनिस्ट व मुस्लिम लीग या दोन्ही इहवादविरोधी शक्ति. जातीयता, अंधश्रद्धा, राष्ट्रधर्माला विरोध, भारतबाह्य परकीय शासनाशीं दृढसंबंध हीं दोन्ही पक्षांची प्रधान लक्षणें आणि इहवादाची प्रतिज्ञा करून सत्तारूढ झालेली काँग्रेस त्यांना पाठिंबा देत आहे, त्यांच्याशीं सहकार्य करीत आहे, त्यांचा गौरव करीत आहे! कामातुर आणि सत्तातुर यांची जात एकच आहे असें दिसतें. या राष्ट्राचें हित, येथील जनतेचा उत्कर्ष, आपल्या स्वतःच्या प्रतिज्ञा, भारताची घटना यासंबंधी कसलीहि चिंता या देशांतल्या सत्ताधाऱ्यांना नसावी यापरता इहवादी तत्त्वांचा पराभव तो काय असतो ?
व्यक्ति-स्वातंत्र्याला विरोध
भारतांतील कम्युनिस्ट पक्ष ही इहवादविरोधी शक्ति आहे असें त्या पक्षाच्या इतिहासांतून सांगून वर कांही उदाहरणें दिलीं आहेत. पण कम्युनिस्टांचा विचार करतांना आपण हें ध्यानांत ठेविलें पाहिजे की, कम्युनिझमचें मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानच मुळांत इहवादविरोधी आहे. लोकशाहींत व्यक्ति हे अंतिम स्वयंसिद्ध मूल्य मानतात. कार्ल मार्क्सला तेंच मान्य नाही. व्यक्ति ही कोठल्या तरी एका वर्गाचा घटक म्हणूनच मार्क्सवाद तिच्याकडे पाहतो. त्या तत्त्वज्ञानांत व्यक्ति हे साधन आहे, साध्य नाही. वर्ग हेंच सत्य, व्यक्तीचें स्वतंत्र अस्तित्व ही केवळ कविकल्पना होय, असें मार्क्सचें वचनच आहे आणि व्यक्तीची स्वतंत्र प्रज्ञा, तिची बुद्धिनिष्ठा, तिचें वेगळें व्यक्तित्व हा तर इहवादाचा आत्मा होय. सर्व भौतिक शास्त्रांचा विकास मानवाच्या या स्वतंत्र प्रज्ञेतूनच झाला आहे आणि आपला समाजवाद शास्त्रशुद्ध होय, विज्ञानपूत होय, आणि आपण इतिहासाची भौतिक मीमांसा केली आहे असें जरी मार्क्स म्हणत असला, तरी भौतिक शास्त्रांचें रहस्य जाणण्याची पात्रता त्याच्या बुद्धीला नव्हती. म्हणूनच त्याचें इतिहास- विवेचन भाकड, भाबड्या पुराणकथांपेक्षा फारसें निराळें झालेलें नाही.
मॉस्को व पीकिंग नभोवाणीवरून स्टॅलिन व माओ यांचीं, "त्यांच्या कृपेनेच सूर्य उगवतो, फुलें फुलतात, ते सर्वसाक्षी सर्वज्ञ आहेत" अशीं स्तुतीस्त्रोतें गाइलीं जातात, हें पुराणवर्चस्वाचेंच द्योतक होय. हे तत्त्वज्ञान, ही वृत्ति व त्यांचा परिपोष करणारे पक्ष व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, इहवाद यांचे अत्यंत घातक शत्रु होत. भारतांतील कम्युनिस्ट पक्ष त्याच जातीचा आहे.
भारतांतील राजकीय पक्ष
१२
१२
कांग्रेस ही भारतांतील सर्वांत जास्त प्रबल अशी इहवादविरोधी शक्ति आहे. ती तशी नसती तर कम्युनिस्ट, मुस्लिम लीग या राष्ट्रघातक शक्तींचें कांही चाललें नसतें. त्या केव्हाच नामशेष होऊन भारताची अत्यंत द्रुतगतीने प्रगति झाली असती.
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतांतील इहवादाचे सर्वांत मोठे पुरस्कर्ते होते असे मानले जातें आणि त्यांची भाषणें व लेख पाहिले तर तसे ते दिसतात यांत वादच नाही. पण त्यांची कृति पाहिली तर आपला भ्रमनिरास होतो. ते बुद्धिवादी होते, विज्ञाननिष्ठ होते, रूढ लोकभ्रमांतून मुक्त होते हें सर्व खरें आहे. पण कम्युनिस्ट तत्त्वज्ञान, कम्युनिस्ट पक्ष व स्वतःला कम्युनिस्ट म्हणविणारे देश यांचा प्रश्न उद्भवला की पंडितजींच्याइतका अंधश्रद्ध, इतका भ्रांत, इतका वास्तवशून्य माणूस दुसरा कोणी असेल असें वाटत नाही. आणि स्वतः पंडितजींनीच ही कबुली दिली आहे. २५ ऑक्टोबर १९६२ रोजी माहिती खात्याच्या मंत्र्यांच्या परिषदेत भाषण करतांना ते म्हणाले, "चीनच्या या सत्यहीन वृत्तीची आम्हांला जाणीव नव्हती म्हणून त्या बाबतींत आम्ही तेवढेसे जागरूक नव्हतों. आम्ही स्वतःच निर्मिलेल्या कृत्रिम जगांत राहत होतों. चीनने दिलेल्या या धक्क्याने आम्ही जागे झालों."
भोळीभाबडी श्रद्धा
पण हें उशिरा जागे होणें भारताला अत्यंत महाग पडलें आहे आणि त्याचें कारण एकच, पंडितजींची कम्युनिझमवरील अंधश्रद्धा. कम्युनिस्ट राष्ट्रें साम्राज्यवादी असूच शकणार नाहीत, अशी त्यांची भोळीभाबडी श्रद्धा होती. १९४६ पासून पुढल्या पांच-सहा वर्षांत रशियाने मोठा साम्राज्यविस्तार केला होता. पोलंड, हंगेरी, रूमानिया आदि देश घशांत टाकले होते. तरी पंडितजींची भोळी श्रद्धा हादरली नाही. यामुळेच ते उत्तर सरहद्दीविषयी आणि एकंदर संरक्षणाविषयी गाफील राहिले. त्यांच्या शब्दांत म्हणजे "तेवढेसे जागरूक राहिले नाहीत."
एवढेच नव्हे, तर कम्युनिस्ट चीनच्या सद्भावावर श्रद्धा ठेवून त्यांनी त्याला तिबेट-आक्रमणास संमति दिली. वास्तव जाणण्याची शक्ति हा इहवादाचा पाया आहे. ती शक्तीच पंडितजींच्या ठायीं नव्हती. त्यामुळे भारताची अतिशय हानि झाली आहे. चीनने दिलेल्या धक्क्याने आम्ही जागे झालों असें पंडितजी म्हणाले. पण ते जागे झाले असलेच, तर ते फक्त चीनच्या बाबतींत. कम्युनिझमच्या व कम्युनिस्ट देशांच्या बाबतीत नाही. १२ फेब्रुवारी १९६३ या दिवशी केलेल्या भाषणामध्ये ते म्हणाले, "मानवतेच्या शांततापूर्ण विकासाला चीनचा विरोध आहे. रशियाप्रमाणे त्याला सहजीवन नको आहे."
पंडितजींच्या भोळ्या श्रद्धेमुळे संरक्षणाच्या दृष्टीने जशी हानि झाली तशीच नियोजनाच्या व उत्पादनाच्या बाबतींतहि झाली. कोणत्याहि देशाने उपलब्ध भांडवलाचा सर्वांत जास्त भाग प्रथम शेती विकासांत घातला पाहिजे. अवजड उद्योग हे नंतर पाहवयाचे, असा अर्थशास्त्राचा सिद्धान्त आहे. पण रशिया आपले भांडवल जड उद्योगांत गुंतवितो. तेव्हा भारताने त्याचेंच अनुकरण केलें पाहिजे हें उघड आहे. कारण तो कम्युनिस्ट देश आहे आणि कम्युनिस्टप्रेमी पंडितजी भारताचे महामंत्री होते. भारताला शेतीकडे दुर्लक्ष करून जड उद्योगांत आधी भांडवल गुंतविणें हें शक्य नाही, तें झेपण्याजोगें नाही. त्यामुळे जनता राष्ट्रीय उद्योगांत सहभागी होणार नाही, हे समजण्यास कांही अवघड नव्हतें. पण ते वास्तव जगांत राहणाऱ्याला, स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्याला, इहवादी दृष्टीने संपन्न असणाऱ्याला! स्वप्नांत वावरणाऱ्या अंधश्रद्ध मनुष्याला नव्हे.
याहि बाबतींत आपण तसें होतों आणि त्यामुळेच फसलों हें पडितजींनीच सांगून ठेवलें आहे. ८ नोव्हेंबर १९६३ या दिवशीच्या भाषणांत ते म्हणाले, "रशिया व चीन यांना जें शेतींत अपयश आलें त्यावरून आम्हांला धडा मिळाला. शेती व लघु उद्योग यांना त्वरित फळ मिळतें म्हणून त्याकडे आधी लक्ष पुरविलें पाहिजे. शेतीत बिघाड म्हणजे सर्वच बिघाड. तेव्हा भारताने जड उद्योगांच्या नादी न लागतां शेतीवर लक्ष केंद्रित केलें पाहिजे."
वास्तविक एस्टिमेट कमिटी, इव्हॅल्युएशन कमिटी या लोकसभेने नेमलेल्या समित्यांनी १९५७, १९५९, १९६० या सालच्या अहवालांत, "शासकीय योजना आपल्यासाठी आहेत असें जनतेला वाटत नाही, त्या सद्य फलदायी नसल्यामुळे जनता त्यांत सहभागी होत नाही," हें महत्त्वाचें सत्य पुनः पुन्हा सांगितलें होतें. पण पंडितजींच्या मनावरची कम्युनिझमची मोहिनी दूर होण्यास सहा-सात वर्षे लागली. कारण रशिया, चीनकडून तोंपर्यंत धडा मिळाला नव्हता. ते देश शेतीचें महत्त्व गाऊं लागल्यावांचून पंडितजींनी तें कसें गावयाचें? ते देश म्हणजे पंडितजींची दैवतें. ते त्यांचे गुरु. त्यांच्या वाबतींत "वचनात् प्रवृत्तिः वचनात् निवृत्तिः।" हें पंडितजींचें ब्रीद. भारताची परिस्थिति पाहून, वस्तुस्थितीची दखल घेऊन, कांही धोरण आखणें त्या दृष्टीने अगदी निषिद्ध होय.
मध्य-युगांतील शास्त्री-पंडित, भारताचें स्वातंत्र्य गेलें, अनेक आक्रमणें झाली, मुस्लिम, ख्रिश्चन सत्ता जुलूम करूं लागल्या, देश दरिद्री झाला, तरी वस्तुस्थिति पाहून स्वतः निर्णय करीत नसत. श्रुतिस्मृतिपुराणोक्त वचनांवरूनच निर्णय करावयाचा, असा त्यांचा दंडक होता. कम्युनिझमच्या बाबतींत पंडितजींची तीच वृत्ति होती. मार्क्स-लेनिन-स्टॅलिनोक्त वचनांवरूनच निर्णय करावयाचा. मग लोकसभेच्या समित्या कांही म्हणोत! भारताच्या शेतीचें व संरक्षणाचें कांहीहि होवो!
फसलेली परराष्ट्रनीति
आपल्या परराष्ट्रीय राजकारणाचा जो विचका झाला आहे तो नेहरूंच्या व त्यांच्या वारसांच्या याच अंध, विवेकशून्य श्रद्धेमुळेच होय. आपलें धोरण अलिप्ततेचें होतें व आहे. पण त्यांत दर वेळी न्यायाधीशाची भूमिका भारताने घेतलेली आहे. अनेक राष्ट्रांना या शिष्टपणाची चीड आली होती. पण हंगेरीच्या बाबतींत रशियाविषयी जो पक्षपात पंडितजींनी केला, हंगेरीवर त्याने केलेल्या आक्रमणाचा वेळींच निषेध केला नाही, त्या वेळी भारताचा अलिप्तपणा ढोंगी आहे, हें सर्वांच्या निदर्शनास आलें. त्यामुळे अलिप्तपणाचें श्रेय तर गेलेंच आणि शिवाय दुसरी जबर हानि झाली ती म्हणजे भारताला जगांत एकहि मित्र राहिला नाही. ज्या रशियासाठी पंडितजींनी जीव पाखडला त्यानेच पाकिस्तानच्या लढाईतलें भारताचें यश ताश्कंद करार करायला लावून हिरावून घेतलें. पंडितजींच्या कम्युनिस्टांवरील अंध, अविवेकीश्रद्धेमुळे भारत एकाकी, असहाय झाला. परराष्ट्रनीतीचें आणखी अपयश तें काय?
त्याचप्रमाणे चेकोस्लोव्हाकियावरील रशियाचें आक्रमण याचा निःसंदिग्ध निषेध आपण करूं शकत नाही व व्हिएटनामबाबत फक्त अमेरिकेलाच ठपका देतों, याचा अर्थ लोकांना समजतो.
कम्युनिझमवरील अंधश्रद्धेमुळे पंडितजींनी भारताची आणखी अनेक प्रकारांनी हानि केली आहे. कम्युनिस्ट देशांसंबंधीच्या त्यांच्या प्रेमामुळे कम्युनिस्ट पक्षाला भारतांत रान मोकळेंच झालें. शिवाय कृष्ण मेनन, केशवदेव मालवीय अशा कम्युनिस्टांच्या सहप्रवाश्यांना त्यांनी केंद्र-मंत्रिमंडळांत महत्त्वाच्या जागा देऊन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला खतपाणीच घातलें. अशा रीतीने स्वातंत्र्यांनंतर मुस्लिम लीग, ख्रिश्चन मिशनरी या राष्ट्रद्रोही इहवादघातक शक्तींचा पंडितजींनी जसा परिपोष केला, तसाच कम्युनिस्ट पक्ष या दुष्ट शक्तीचाहि केला आणि भारताच्या प्रगतीच्या मार्गांत अनेक अडसर निर्माण करून ठेवले.
कम्युनिझमवरील अंधश्रद्धेमुळे काँग्रसने व तिच्या नेत्यांनी इहवादाची एकपट गळचेपी केली असेल, तर सत्तालोभाने त्यांनी दसपट गळचेपी केली आहे. निवडणुकांत जातीयता, पक्षपात, राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष, विषम नीति यांचा अवलंब काँग्रेस प्रारंभापासून करीत आली आहे. आणि जातीयता एकदा आली की मानवत्वाची प्रतिष्ठा, व्यक्तीचें स्वातंत्र्य, सत्यनिष्ठा हीं इहवादाची सर्व मूल्यें वाऱ्यावर उधळलीं जातात. काँग्रेसने ती तशी उधळली आहेत, हें काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनीच वेळोवेळीं सांगितले आहे.
डॉ. संपूर्णानंद यांनी विधानसभेत भाषण करतांना स्पष्टपणे सांगितलें की, जातीयता ही आपल्या रक्तांतच भिनलेली आहे. १९५९ साली काँग्रेस पार्लमेंटरी पक्षाने नेमलेल्या दशसभासद समितीने काँग्रेसच्या कारभाराची तपासणी करून अहवाल सादर केला. त्यांत म्हटलें आहे की, "काँग्रेसमध्ये ध्येयवाद, निष्ठा हें कांही राहिलेलेच नाही. सत्ता हेंच तिचें प्राप्तव्य झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय वृत्तिलोपत असून जातीयतेचें विष पसरत चाललें आहे."
जातीयतेचा आश्रय
नुकतेच मुंबईला श्री. अच्युतराव पटवर्धन यांनी बलवंतराय मेहता स्मारक व्याख्यानमालेत बोलतांना सांगितले की, "समाजवादाच्या विकासाला भांडवलदार वर्गापेक्षा समाजवादी म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांकडूनच जास्त गंभीर धोका आहे." हें विधान इहवादाच्या बाबतींतहि तितकेंच सत्य आहे. कारण सर्व पक्ष निवडणुकांच्या बाबतींत जातीयतेचा विनाखंत आश्रय करतात. काँग्रेसने स्वातंत्र्यप्राप्ती पासून इहवादाच्या घोषणा चालविल्या आहेत. आणि तेव्हापासूनच त्या उदात्त तत्त्वज्ञानाला हरताळ फासण्यालाहि प्रारंभ केला आहे. कसा तो पाहा:
डॉ. गोपीचंद भार्गव यांनी नोकऱ्यांमध्ये शीखांना जाहीरपणें राखीव जागा देऊ केल्या. निवडणुकीची वेळ जवळ आली की जातीय विष सर्वांच्याच अंगांत शिरतें. शीखांमुळेच नेता म्हणून भार्गवांची निवड झाली. (टाइम्स, दि. २३-२-१९४९) अकाली दल ही पूर्णपणें जातीय संस्था आहे. १९४७ सालींच एक पत्रक काढून जाहीर केलें होतें की, शिखांना कोठे तरी सत्ता मिळाल्यावांचून त्यांच्या धर्म व संस्कृति यांचें रक्षण होणार नाही. आज अकाली दल पंजाबमध्ये सत्तारूढ आहे आणि काँग्रेस त्याच्याशीं अनेक वर्षे सहकार्य करीत आहे.
आसाममध्ये १९५२ साली काँग्रेसने जुन्या मुस्लिम लीगवाल्यांना तिकिटें दिल्याचें सर्वांना माहीत आहे. बिहारमधील भूमिहर व रजपूत या दोन जातींमध्ये सारखी चुरस आहे. १९५२ सालीं भूमिहरांचे नेते होते श्रीकृष्णसिंह व रजपूतांचे अनुग्रह नारायण. दोघेहि काँग्रेसचेच. या वेळीं काँग्रेसच्या प्रचारभाषणांत जातीय विष थबथबून आलेलें दिसत होतें. कांही ठिकाणी काँग्रेसबाहेरच्या स्वजातीयांचा पुरस्कार काँग्रेस-पीठावरून जाहीरपणें होत होता. तिकिटे दिली गेलीं तीं जातीय तत्त्वावरच. (टाईम्स, दि. ३-१-१९५२). याच वेळीं पंडितजी रांचीच्या भाषणांत म्हणाले की, 'जातीयवादी लोकांना काँग्रेसमधून हाकून देण्यांत येईल.' अर्थात् काळा बाजारवाल्यांना फाशी देण्यांत येईल, खोटे सभासद नोंदणाऱ्यांना कठोर शासन करण्यांत येईल, या त्यांच्या धमक्यांप्रमाणेच हीहि धमकी कधी अमलांत आली नाही.
निवडणुका जिंकावयाच्या तर त्या धमक्या अमलांत आणून भागणार नाही हें लवकरच काँग्रेसजनांनी त्यांच्या ध्यानांत आणून दिलें असावें. म्हैसूर राज्यामध्ये लिंगायत व व्होक्कालिग या जातींत कायमची दुफळी आहे. १९६९ साली माजी महसूलमंत्री एम्. व्ही. कृष्णाप्पा यांनी तक्रार केली की, "पूर्वीच्या म्हैसूरचे जे नऊ जिल्हे, त्या विभागाला सावत्र वागणूक मिळत असून, त्यामागे जातीय व राजकीय कारणें आहेत. सर्वत्र लिंगायतांचें वर्चस्व असून, इतरांना वाव मिळत नाही." (टाइम्स, दि. २३ जुलै १९६९).
आता काँग्रेस द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षाशी सहकार्य करीत आहे. हा पक्ष म्हणजे रामस्वामी नायकरांचा कमालीचा जातीय पक्ष. त्याचें स्वरूप नव्या नेत्यांनी कांहीसें पालटलें आहे. पण त्याची जातीयता नष्ट झालेली नाही. उलट प्रांतीयतेची त्यांत भरच पडली आहे. अखिल भारतीय असें त्या पक्षाला कांही नको आहे. सेना नको, लष्कर नको, ध्वज नको, भाषा नको; आणि अशा पक्षाशी काँग्रेसने सूत जमविलें आहे.
भारतांत पुरातनकाळापासून अनेक धर्म, धर्मपंथ, वर्ण, जाति, पोटजाति यांचा बुजबुजाट झालेला आहे. ब्राह्मण, मराठा, कायस्थ, रजपूत, भूमिहर, रेड्डी, कम्मा, शीख, जैन, लिंगायत, महार, चांभार, मांग, धेड- अनंत जाति, अनंत पंथ! हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू– अनेक धर्म आणि पंजाब, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक– अनेक प्रांत, अनेक भाषा- यांमुळे अखिल भारतीय राष्ट्रीय भावना येथे कधी निर्माणच झाली नाही. ती गेल्या शतकांत पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे झाली. त्या विद्येमुळे बुद्धिप्रामाण्य कांही प्रमाणांत आलें. व्यक्तिस्वातंत्र्य आलें, मानवाला, व्यक्तीला तिच्या गुणकर्मांनी प्रतिष्ठा मिळावी; जातीमुळे, जन्मामुळे नव्हे, हा विचार आला. यांतूनच धर्म-जातिभेदातीत राष्ट्रभावना निर्माण झाली व राममोहन, रानडे, आगरकर, टिळक, विवेकानंद, सावरकर, महात्माजी या थोर पुरुषांनी तिचा परिपोष केला. त्यामुळेच स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला.
पण त्यालाहि संपूर्ण यश आलें नाही. कारण आधीचीं तीस वर्षे काँग्रेस मुस्लिम जातीयवादाचा सतत परिपोष करीत होती. भारताची फाळणी झाली ती त्यामुळेच. तरीहि स्वातंत्र्यानंतर राहिलेल्या भारतांत जाति, धर्म, पंथ, प्रांत, हे भेद नष्ट करण्याचा सतत प्रयत्न करून काँग्रेस या खंडित भारतांत तरी राष्ट्रभावनेची प्राणपणाने जोपासना करील अशी अपेक्षा होती; पण दुर्दैवाने तें घडलें नाही. आणि काँग्रेसच्याच नेत्यांनी– वल्लभभाई, नेहरू, कृपलानी, राजेंद्रबाबू, पट्टाभिसीतारामय्या यांनी व निरनिराळ्या समित्यांनी म्हटल्याप्रमाणे सत्तालोभामुळे, निवडणूक- निष्ठेमुळे जातीयतेचा परिपोष करून राष्ट्रभावनेचाच नाश केला.
इतरांचीहि तीच स्थिति
दुर्दैव असे की, पुरोगामित्वाचें, इहवादाचें कंकण बांधणारे समाजवादी पक्ष (त्यांच्या सर्व जाति पोटजाति), कम्युनिस्ट पक्ष हेहि काँग्रेसइतकेच किंबहुना थोडे जास्तच जातीय झाले. निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल त्या पक्षाशी सोयरीक करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिलें नाही व अजूनहि ते तसे पाहत नाहीत.
आणि अशांतच जिल्हा परिषदा व ग्रामपंचायती या संस्था निर्माण झाल्या. त्यांनी तर उरलीसुरली राष्ट्रभावना पार निपटून काढली. शहरी लोकांवर पाश्चात्त्य विद्येचे कांही तरी संस्कार झाले होते. ग्रामीण भागांतील नेते त्यांतून पूर्णपणें मुक्त होते. त्यामुळे अंधश्रद्धा, जातीय अहंकार, वैयक्तिक दृष्टि, पुराणमतवाद या भारतीय समाजाच्या दोषांना तेथे कसलाच उतार पडला नव्हता. अर्थातच व्यक्तित्व, मानवत्वाची प्रतिष्ठा, बुद्धिप्रामाण्य यांचें नांवहि तेथपर्यंत पोचलें नव्हतें. अशा स्थितींत तेथे राजकारण मात्र शिरलें. त्यामुळे तेथे अनर्थ होऊन राहिला आहे.
राजस्थान विद्यापीठाने पंचायत राज्यांचा अभ्यास करून आपला अहवाल १९६४ साली प्रसिद्ध केला. हा अहवाल म्हणतो, "खेड्यांत जाति-पोटजातींचा पगडा फार आहे. त्यामुळे तेथे ग्रामपंचायतींत जातीय व जमातीय भावना नव्याने उफाळून आल्या आहेत. पंचायत राज्यामुळे सामाजिक सुधारणा मुळीच झाली नाही. उलट परागतीच झाली आहे. अकार्यक्षमता, गटबाजी, लाचलुचपत हे दोष वाढीला लागले आहेत. एकंदरींत विकेंद्रीकरणाचा प्रयोग फसला आहे." हा १९६४ सालचा अहवाल आहे. त्यानंतरचे अनेक राज्यांचे अहवाल हेंच सांगत आहेत.
अस्पृश्यता- निवारणाच्या दृष्टीने ग्रामीण भागांत परिस्थिति फार निराशा- जनक आहे. अस्पृश्यांना देवळांत प्रवेश नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरतां येत नाही. हॉटेल, सलून, येथे त्यांना मज्जाव आहे आणि याच्या जोडीला त्यांच्यावर भीषण अत्याचार सुरू आहेत. केंद्राचा या खात्याचा अहवाल सांगतो की, "कायदे केलेले आहेत, पण त्यांचा अंमल होत नाही."
स्वतः काँग्रेसच जातीय विषाचा प्रसार करीत असल्यामुळे जातीयतेचा हा भस्मासुर सर्व संस्थांच्या डोक्यावर हात ठेवीत आहे.
मद्रासमध्ये हरिजनांच्या शाळा निराळ्या कां असें विचारतां, स्पृश्य जनतेचें हृदयपरिवर्तन झाल्यावांचून एकत्र शाळा करतां येणार नाही, असें शिक्षणमंत्री म्हणाले (टाइम्स, दि. १३- ९- १९५०). तामिळनाडू, म्हैसूर या प्रदेशांत कॉलेजमध्ये जातीय तत्त्वावर जागा देण्याचे कायदेच झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते पुनः पुन्हा रद्द केले. पण निराळ्या मार्गाने प्रादेशिक शासनें तेच करीत राहिलीं, हें प्रसिद्धच आहे. विद्यापीठांतहि जातीयता तशीच आहे.
१९६९ सालीं नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालांत म्हटलें आहे की, "बिहार व तामिळनाडू येथील विद्यापीठांचे अधिकारीच जातीय वृत्तीचे आहेत. प्रवेश, नेमणुका, बदल्या सर्व कांही जात पाहून होतें. वरच्या जातीच्या हुशार मुलांनाहि इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजांत प्रवेश मिळत नाही. हें विष फार फार खोल गेलें आहे! (टाइम्स, दि. २०-९-१९६९). क्रिकेट बोर्डात जातीयता, सहकारी संस्थांत जातीयता आणि शेवटीं मंत्रिमंडळांतहि जातीयता!
अशा रीतीने बुद्धिप्रामाण्य, जातिधर्म-निरपेक्ष राज्यकारभार, मानवता, व्यक्ति हें अंतिम मूल्य मानणें (जाति नव्हे) आदि इहवादाच्या प्रत्येक तत्त्वाचा काँग्रेस-श्रेष्ठांनी अवमान केला आहे. आणि अजूनहि तेंच चालू आहे. यामुळेच काँग्रेस ही भारतांतील सर्वात जास्त विघातक अशी इहवादविरोधी शक्ति झाली आहे. ती तशी असल्यामुळे तर भारताची हानि झाली आहेच. पण शिवाय तिने कम्युनिस्ट, मुस्लिम लीग, ख्रिश्चम मिशनरी यांना उत्तेजन देऊन त्यांचें पोषण केल्यामुळे भारताच्या भवितव्याविषयी चिंता वाटणें स्वाभाविक आहे.