इहवादी शासन/पाश्चात्त्य देशांतील इहवादी शासन

विकिस्रोत कडून


पाश्चात्त्य देशांतील
इहवादी शासन




 गेल्या दोन प्रकरणांत कम्युनिस्ट देशांतील इहवाद व मुस्लिम देशांतील इहवाद यांचें विवेचन केलें. आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादि पाश्चात्त्य देशांतील इहवादी शासनांचा विचार करावयाचा आहे. इहवादाच्या विवेचनांत पश्चिमेंतील इहवादाच्या विवेचनाला फार महत्त्वाचें स्थान देणें आवश्यक आहे. कारण इहवादाचें तें आदिपीठ आहे. बुद्धिप्रामाण्य, सर्वधर्मसमानत्व, प्रवृत्तिपरता, ऐहिक उत्कर्षाची आकांक्षा, धर्मवर्चस्वांतून शासनाची व सर्व जीवनाची मुक्तता इत्यादि इहवादाचीं जीं तत्त्वें आज जगमान्य झाली आहेत तीं जगांतील बहुतेक सर्व देशांनी वर निर्देशिलेल्या पाश्चात्त्य देशांकडूनच घेतलेली आहेत. म्हणून पश्चिम युरोपांत या तत्त्वांचा उदय व विकास कसा झाला, केव्हा झाला, त्यांचा पुरस्कार करणारे तत्त्ववेत्ते व पंडित कोण होते, कोणत्या परिस्थितींत इहवादी तत्त्वज्ञानाची त्यांनी प्रस्थापना केली, त्यांनी त्या वेळीं प्रस्थापिलेल्या इहवादाचें नेमके स्वरूप काय होतें इत्यादि प्रश्नांची चर्चा भारताच्या दृष्टीने निश्चितच उद्बोधक होईल. म्हणून भारतांतील इहवादाची चर्चा करण्याआधी या पाश्चात्त्य इहावादाची चर्चा करण्याचें योजिलें आहे.
 या इहवादाचा उदय प्रामुख्याने तेराव्या शतकांत झाला. त्याच्या आधी शे-दोनशे वर्षे या स्वरूपाचें तत्त्वज्ञान मांडण्यांत येत होतें. त्याविषयी चर्चाहि होत होती. पण रोमच्या धर्मपीठावर त्या वेळीं इनोसंट तिसरा (११७८- १२१६), ग्रेगरी नववा (१२२७- १२४१) व इनोसंट चौथा (१२४३- १२५४) असे एकापाठोपाठ एक समर्थ पोप आल्यामुळे इहवादी पक्षाचा प्रभाव पडूं शकला नाही. पण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात मार्सिलिओ, विल्यम् ऑफ् ओखॅम, पियरी डुवाईस, डांटे असे थोर तत्त्ववेत्ते इहवादाच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि त्याच वेळी इंग्लंडचा पहिला एडवर्ड, फ्रान्सचा फिलीप दि फेअर व जर्मनीचा फ्रेडरिक दि ग्रेट दुसरा, असे पराक्रमी राजेहि पोपच्या वर्चस्वाविरुद्ध उभे ठाकले. त्यामुळे इहवादी पक्षाचें बळ वाढून दिवसेंदिवस ऐहिक जीवनावरील पोपच्या धर्मपीठाची सत्ता कमी होऊं लागली. तेरावें शतक म्हणजे इहवादाच्या प्रारंभाचें युग असें म्हणतात तें यासाठी.

ग्रीक विद्येचा वारसा

 पण पश्चिम युरोपांतील इहवादाचें रूप पाहण्याआधी आपल्याला कांही शतकें मागे गेलें पाहिजे. कारण त्या तत्त्वांचा उदय या शतकांत पश्चिम युरोपांत नव्याने होत असला, तरी युरोपला तें तत्त्व सर्वस्वीं नवीन होतें असें नाही. ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळेच तेराव्या शतकांत पश्चिम युरोपांत इहवादाचा उदय होत होता किंवा त्याचेंहि पुनरुज्जीवन होत होतें, असें म्हणणेंच योग्य होईल. कारण ग्रीक लोक हे पूर्णपणें इहवादी होते. फिशर या इतिहासवेत्त्याच्या मतें ग्रीक महाकवि होमर (इ. स. पूर्व ८ वे शतक) याच्या इलियड या महाकाव्यांतच अर्वाचीन युरोपच्या इहवादी तत्त्वज्ञानाची बीजें सापडतात. मानवत्वाची प्रतिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, आनंदी वृत्ति, प्रबळ जिज्ञासा, ऐहिक आकांक्षा हीं तीं बीजें होत. ग्रीक हे अधार्मिक नव्हते. धर्मनिष्ठ होते. पण संघटित पुरोहितवर्गाच्या सत्तेची त्यांच्या जीवनावर जखडबंदी कधीच नव्हती. ग्रीकांनी ग्रंथप्रामाण्य कधीच स्वीकारले नाही, आणि राजकारणांत धर्माचा हस्तक्षेपहि कधी होऊ दिला नाही. ग्रीक नगरराज्यांत आपसांत नित्य लढाया होत, पण तीं धर्मयुद्धे नव्हती. वैभव, वर्चस्व, स्वातंत्र्य यांसाठी तीं युद्धे होत. ग्रीक हे पराकाष्ठेचे समूहजीवनवादी होते. राजकीय प्रबुद्धता त्यांच्यांत कळसाला गेली होती, हें एकच प्रमाण त्यांचा इहवाद सिद्ध करण्यास पुरेसें आहे. लोकसत्ता, महाजनसत्ता, एकसत्ता अशा सर्व प्रकारच्या राजकीय संस्थांचे ते प्रयोग करीत, त्यांवर चर्चा करीत. प्लेटो, ॲरिस्टॉटलसारखे थोर पुरुष त्यांवर ग्रंथ लिहीत आणि पेरिक्लिजसारखे नेते राजनीतीचीं तत्त्वें प्रत्यक्ष व्यवहारांत आणीत. हें तीव्र इहनिष्ठेवांचून कदापि शक्य झालें नसतें. सॉक्रेटिस हा एक महापुरुष सर्व पाश्चात्त्य संस्कृतीचें प्रतीक म्हणून आपल्यापुढे उभा आहे. बुद्धिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा हा इहवादाचा आत्मा होय. त्या तत्त्वावर त्याची इतकी दृढ श्रद्धा होती की, त्यासाठी त्याने देहदंड पत्करला. बुद्धिप्रामाण्य हें सर्व मानवी कर्तृत्वाचें मूळ आहे, हें मागे अनेक वेळा सांगितलें आहे. ग्रीक संस्कृतीचें तें आद्य तत्त्व होतें. त्यामुळेच ग्रीकांचें भौगोलिक क्षेत्र फार मर्यादित असूनहि त्यांनी सर्व क्षेत्रांत कर्तृत्वाची परिसीमा गाठली होती. ॲनास्कागोरस, पायथागोरस, युक्लिड, सॉक्रेटिस, हिरोडोटस्, हिपॉक्रेटीस, थुसिडायडीज, डेमॉस्थेनीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, युरिपायडीस, ॲरिस्टॉफेनीस, गॅलन, आर्किमिडीज, अर्कोटस्, अपोलोनियस ही नाममालिका आजहि जगाला भूषणभूत होऊन राहिली आहे. ग्रीक विद्येचें पश्चिम युरोपांत पुनरुज्जीवन झाले तेव्हा त्या वेळच्या नेत्यांनी याच थोर पुरुषांपासून गणित, ज्योतिष, वैद्यक, इतिहास, राजनिति, रसायन, वनस्पतिशास्त्र, पदार्थविज्ञान या विद्यांचे धडे घेतले आणि अर्वाचीन युरोपीय संस्कृतीचा पाया घातला. या प्रबोधन युगांत जें इहवादाचें तत्त्वज्ञान सिद्ध झाले तेंच आज जगाने स्वीकारलें आहे. म्हणून तेराव्या शतकाला इहवादाचें प्रारंभयुग म्हणतात तें युक्तच असले तरी त्याचा मूळ प्रारंभ इ. स. पूर्व सहाव्या-सातव्या शतकांत ग्रीक भूमींत झाला होता है आपण विसरून चालणार नाही.

तमोयुद्धाला प्रारंभ

 ग्रीकांनंतर रोमनांचा उदय झाला. रोमन लोक ग्रीकांप्रमाणेच इहवादी होते, पण त्यांच्या काळांत इहवादाचीं नवीं तत्त्वें अशी कोणतीच प्रस्थापित झाली नाहीत; म्हणून रोमनांचा स्वतंत्र विचार करण्याचें कारण नाही. रोमन साम्राज्यांतच ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. इसवी सनाच्या चौथ्या शतकांत त्याचा प्रभाव वाढू लागला. कॉन्स्टंटाईन या रोमन सम्राटाने त्या धर्माला प्रथम आश्रय दिला व इ. स. ३३७ सालीं स्वतः त्या धर्माची दीक्षा घेतली. यामुळे ख्रिस्ती धर्माचा झपाट्याने प्रसार होऊ लागला. पुढील कांही शतकांत फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी येथल्या राजांनी व त्यामुळेच प्रजेनेहि तो धर्म स्वीकारला आणि हळूहळू सर्व युरोप जीजसच्या कळपांत समाविष्ट झाला. आज युरोप ख्रिस्ती असूनहि ऐहिक वैभवाच्या व संस्कृतीच्या शिखरावर आहे; पण त्याचें श्रेय वर सांगितलेल्या प्रबोधनयुगाला– त्यांतील ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनाला आहे, प्रारंभीच्या ख्रिस्ती धर्माला नाही. त्या वेळी तो धर्म पराकाष्ठेचा अंधसिद्धान्तवादी आणि त्यामुळे तितकाच असहिष्णु होता. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, वैभवाकांक्षा, जीवनानंद, विवेकनिष्ठा हीं इहवादाचीं तत्त्वें त्याला मुळीच मान्य नव्हती. मानव हा मुळांत पतित आहे, पापी आहे, अधोगामी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे हाती सत्ता येतांच त्याने ग्रीक व रोमन संस्कृतीचा समूळ नाश करून टाकला. अर्थात् इहवाद त्याबरोबरच विलयास गेला. युरोपच्या इतिहासांतील तमोयुगास तेथूनच, पांचव्या शतकापासूनच, प्रारंभ होतो. हें तमोयुग तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालू होते आणि ज्या ग्रीक विद्येचा ख्रिस्ती धर्माने नाश केला होता तिची उपासना करण्यास त्याने प्रारंभ केला तेव्हाच त्या तमोयुगांतून युरोप मुक्त झाला.
 रोमन सम्राट् कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्याने आपली राजधानी रोमहून पूर्वेकडील कॉन्स्टांटिनोपल या शहरी नेली. त्या वेळी, त्याने रोमच्या बिशपला धर्मक्षेत्रांतील सर्वाधिकारी म्हणून मान्यता दिली. पुढे त्याच्या नंतरचे सम्राट् दुर्बळ निघाले; त्यामुळे रोमच्या बिशपची सत्ता वाढू लागली. पुढील शतकांत जर्मन व हूण ह्या रानटी टोळ्यांनी पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट करून टाकल्यावर तर पश्चिमेला रोमचा बिशप हा अनियंत्रित सत्ताधीश झाला आणि धार्मिक क्षेत्राप्रमाणेच राजकीय क्षेत्रांतहि तो वर्चस्व गाजवूं लागला. हिंदुस्थानांत व इतर पौर्वात्य देशांत धर्मपीठांचे लोकांवर वर्चस्व असले, तरी राजकीय शासनाप्रमाणे धर्माची शासकीय चौकट तेथे कधीच प्रस्थापित झालेली नव्हती व नाही. पण पश्चिम युरोपांत ख्रिस्ती धर्माच्या आचार्यांनी चौथ्या शतकापासून, राज्यसत्तेप्रमाणेच तालुका, जिल्हा, प्रांत, प्रदेश असे विभागवार अधिकारी नेमून राजकीय साम्राज्याप्रमाणेच दृढ असें धार्मिक साम्राज्य प्रस्थापित केलें होतें आणि राजकीय रोमन साम्राज्य लयाला गेल्यावर साहजिकच रोमपीठाचें धार्मिक साम्राज्य तशीच सत्ता गाजवू लागलें. तरी आठव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पूर्वं रोमन साम्राज्याची सत्ता कांही अंशी तरी रोमवर चालत असे. इ. स. ८०० या सालीं पोप लिओ तिसरा याने ती झुगारून दिली. फ्रँक लोकांचा राजा शार्लमेन याला त्याने पवित्र रोमन सम्राट म्हणून अभिषेक केला आणि रोमन सम्राटांचा प्राचीन काळचा मुगुट त्याच्या मस्तकावर ठेवला. पश्चिमेकडचें 'होली रोमन एंपायर' या रीतीने जन्माला आल्यामुळे तें नित्य आपल्या अंकितच राहिलें पाहिजे, असा रोमच्या पोपचा दावा असे. पोपने अभिषेक केल्यावांचून कोणीहि पुरुष सम्राट् पदावर आरूढ होऊ शकणार नाही, असा दंडकच पोपने ठेवला. त्यामुळे हे रोमन सम्राट् त्याला नमून असत. त्यांनी कधी बंडावा केलाच, तर पोप त्यांच्यावर बहिष्कार पुकारीत असे आणि मग शरणागतीवांचून सम्राटांना दुसरें गत्यंतरच राहत नसे. सम्राट् चौथा हेन्री (१०७७) याने थोडी धिटाई करून पोपला पदच्युत करण्याचा घाट घातला. पण पोपने बहिष्कार पुकारून त्याला प्रत्युत्तर दिलें. तेव्हा नाक मुठीत धरून सम्राटाला पोपपुढे लोटांगण घालावें लागलें. क्षमा मागून तो पोपला भेटण्यासाठी रोमला गेला तेव्हा पोपने त्याला तीन दिवस उघड्यावर बर्फात उभे करून ठेवलें व नंतरच त्याला भेट दिली. इंग्लंडच्या जॉन राजाला (१२०८- १२१६) पोप इनोसंट तिसरा याने असेंच नमविलें. पश्चिम युरोपांतील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या सर्व देशांत धर्माचार्यांची नेमणूक करण्याचा अधिकार पोपचा आहे, त्या त्या देशांच्या राजाचा नाही, असा पोपचा दंडक होता. त्याचप्रमाणे धर्मगुरूंवर कर बसविण्याचा किंवा त्यांच्या हातून कांही गुन्हा घडला तर त्यांचा न्याय करण्याचाहि अधिकार राजांना नसून, त्यांच्यावर फक्त पोपची सत्ता चालते, असाहि त्याचा दावा होता. जर्मन (रोमन) सम्राट चौथा हेन्री आणि इंग्लंडचा जॉन यांना पोपचा हा दंडक मान्य नसल्यामुळेच हे संघर्ष उद्भवले होते; आणि दोन्ही वेळा विजय पोपचाच झाला.

धार्मिक अंधश्रद्धा

 येथे प्रश्न असा उद्भवतो की, पश्चिम युरोपचे हे राजे व सम्राट् शरणागति कां पत्करीत ? सत्ता त्यांच्या हातीं होती, सेना त्यांच्याजवळ होती, विपुल धन त्यांच्या खजिन्यांत होतें. पोपजवळ स्वतःचें लष्कर मुळीच नव्हतें व प्रत्यक्ष सत्ताहि त्याच्या हातीं नव्हती. मग या राजे-महाराजांना नमविण्याचें सामर्थ्य त्याला कोठून प्राप्त झाले ? लोकांची धर्मश्रद्धा हें या प्रश्नाचे उत्तर आहे. पोपचा बहिष्कार हें शस्त्र यामुळेच अगदी अजिंक्य झालें होतें. पोपने देशावर व राजावर बहिष्कार पुकारला, की भटजी लग्ने लावणार नाहीत, बाप्तिस्मा देणार नाहीत, अंत्यविधीला येणार नाहीत, पापाची क्षमा करणार नाहीत आणि कोणत्याहि कार्याला आशीर्वाद देणार नाहीत. आजहि हे विधि झाले नाहीत, तर आपले प्रियजन नरकाला जातील, भूतपिशाच्च होऊन आपल्याला छळतील, त्यांच्यावर अनंत संकटें कोसळतील, देशांत साथीचे रोग पसरतील, भूकंप होतील, महापूर येतील, टोळधाडी येतील, अशी कांही प्रमाणांत तरी लोकांना भीति वाटतेच. मग त्या काळी पोपच्या बहिष्कारामुळे केवढा हाहाकार माजत असेल याची कल्पना सहज येईल. त्या बहिष्कारामुळे सर्व देशाला मसणवटीचें रूप येई आणि लोक भीतीने मृतवत् होऊन जात. आणि हें सर्व या राजाच्या धर्मनष्टपणामुळे होत आहे असें दिसून आल्यामुळे ते सर्व राजाच्या विरुद्ध उठत. राजाचें लष्करहि त्यांच्या अधीन राहत नसे. सरंजामदार, सरदारहि घाबरून जाऊन पोपला वश होत. पोप त्यांना चिथावून त्यांच्यांत बेदिली माजवी. इतर देशांच्या राजांना या बहिष्कृत देशावर स्वारी करण्याची आज्ञा तो देई. जॉन राजावर स्वारी करावी असा आदेश त्या वेळचा फ्रान्सचा राजा फिलिप याला पोपने दिला होता व त्यानेहि जंगी तयारी केली होती. म्हणजे राजे लोक असल्या आज्ञाहि निमूटपणें पाळीत असत. तेव्हा लोकांच्या मनांतील धर्मावरील अंधश्रद्धा हेंच पोपचें सामर्थ्य होतें.
 मागील विवेचनांत अनेक वेळा सांगितलें आहे कीं, केवळ शासन इहवादी होण्याला फारसा अर्थ नसतो. सर्व समाज इहवादी झाला तरच समाजाची प्रगति होते. शासनाने समाजाला इहवादी बनविण्याचा कायद्यांनी, प्रचाराने सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे, यांत शंकाच नाही. पण त्याचें फल म्हणून समाज अंधधर्मश्रद्धेतून मुक्त झाला तरच त्याच्या कर्तृत्वाची जोपासना होऊं शकते. अन्यथा समाज आणि त्यामुळे राजसत्ताहि दुर्बल व अकार्यक्षम होऊन बसते. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशांवर चालणारी पोपची अप्रतिहत सत्ता हें याचेंच प्रत्यंतर होय. पोपने पश्चिम युरोपच्या राजांना मांडलिकांच्याहि खालच्या पातळीवर नेऊन ठेवलें होतें. धर्माच्याच वाबतींत तो सत्ता चालवी असें नाही. दोन देशांच्या राजांच्यामध्ये तह किंवा करार हे आपल्याच संमतीने झाले पाहिजेत, राज्यांत होणाऱ्या सर्वच न्यायदानावर आपली देखरेख राहिली पाहिजे, विधवा, लहान मुलें यांच्या मिळकतीची देखभाल आपल्याला विचारून केली पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. 'होली रोमन एंपायर'चे, पवित्र रोमन साम्राज्याचे, सम्राट् हे रोमन कधीच नव्हते. ते बहुधा सर्व जर्मन असत व जर्मनींतच राहत आणि जर्मनींतील सात संस्थानिक त्यांची निवड करीत. ही निवड योग्य की अयोग्य हें पाहण्याचा व ती मंजूर वा नामंजूर करण्याचा हक्क आपला आहे, असा पोपचा दावा होता. सारांश, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व जीवनावर पोप अनियंत्रित, निरंकुश सत्ता चालवीत असे; आणि राजे व सर्व समाज ती मानीत असे. समाजाला यांत विपरीत असें कांही वाटत नसे. धर्मसत्ता हीच सर्वश्रेष्ठ होय, अशी त्या वेळीं पश्चिम युरोपांतील सर्व देशांतील लोकांची श्रद्धा होती. धर्मसत्ता ही परमेश्वराची सत्ता होय आणि पोप हा परमेश्वराचा या भूलोकावरचा प्रति- निधि होय, असें ते मानीत. त्यामुळे पोपच्या विरुद्ध स्वतःच्या राजांना ते पाठिंबा देत नसत. पोपवरची, धर्मपीठावरची त्यांची अंधश्रद्धा इतकी खोलवर जाऊन रुजली होती की, त्याच्या विरुद्ध जाण्याचें धैर्य त्यांच्या ठायीं निर्माण होणें शक्य नव्हतें. ती श्रद्धाच जेव्हा पुढे डळमळली तेव्हा पोपचें सामर्थ्य संपले. पण तो तेराव्या, चौदाव्या शतकांतला इतिहास आहे. अकराव्या-बाराव्या शतकांत तें शक्य नव्हतें. मागे ग्रीसच्या वैभवाच्या काळांत व नंतर रोमन साम्राज्यांत अशी धर्मश्रद्धा मुळीच नव्हती. त्यामुळे त्या वेळी लोक निर्भय असत, विवेकस्वातंत्र्याला आणि व्यक्तिस्वातंत्र्याला जपत आणि धर्माचार्यांना आपल्या ऐहिक व्यवहारांत हस्तक्षेप करू देत नसत. ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर या सर्व गुण- संपदेचा लोप झाला. ख्रिस्ती धर्मपीठाच्या मोठमोठ्या धर्माचार्यांनी व पंडितांनी त्या धर्माचें तत्त्वज्ञान पद्धतशीर प्रयत्नांनी लोकमानसांत रुजविलें आणि दीर्घ असें तमोयुग निर्माण केलें. तें तत्त्वज्ञान काय होतें व तें रुजविण्यासाठी कोणी कसे प्रयत्न केले तें पाहून, हें प्रास्ताविक विवेचन संपवू.

प्रवृत्तिनिष्ठेचा लोप

 सेंट ऑगस्टाईन (इ. स. २५४- ४३०) हा ख्रिश्चन धर्माचा सर्वांत मोठा भाष्यकार मानला जातो. रोमने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरच त्याच्यावर रानटी लोकांचे हल्ले होऊन त्या नगरीचा व रोमन साम्राज्याचा अंत झाला. त्यामुळे लोकांची धर्मश्रद्धा डळमळली. आम्हीं ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याचें हेंच का फळ, असें ते म्हणू लागले. लोकांच्या या शंकांचे निरसन करून ख्रिश्चन धर्माचें सर्व तत्त्वज्ञान सविस्तर मांडण्याचें कार्य सेंट ऑगस्टाईन याने केलें. 'सिटी ऑफ गॉड' हा त्याचा ग्रंथ या दृष्टीने फार श्रेष्ठ मानला जातो. जवळ जवळ एक हजार वर्षे म्हणजे इ. स. १२००- १३०० पर्यंत ख्रिश्चन समाजावर त्याचें अखंड वर्चस्व होते. या ग्रंथांत त्याने सांगितले की, रोमन साम्राज्य व तत्सम इतर साम्राज्ये म्हणजे भूनगरी होत. त्या सैतानाधीन असतात, पापमग्न असतात, त्यामुळे त्यांचे मरण अटळ आहे. खरें शाश्वत जीवन म्हणजे देवनगरीचें जीवन होय. ख्रिश्चन धर्माची एकनिष्ठ उपासना करणाऱ्या पुण्यात्म्यांनाच त्या नगरींत प्रवेश मिळतो व तेथेच त्यांना शाश्वत सुखाचा, मोक्षाच लाभ होतो. हें जग क्षणभंगुर आहे, पापमय आहे आणि येथील सुखाच्या मागे लागलेले लोक कायमचे नरकांत जातात. तेव्हा धर्मग्रंथ, धर्ममंदिरें व धर्मगुरु यांना शरण जाऊन प्रत्येकाने मोक्षसाधना करावी हेंच श्रेयस्कर होय. ख्रिस्ती धर्म समतेचें तत्त्व सांगतो. पण सेंट ऑगस्टाईन व त्याच्या आधीचे पीटर, पॉल इत्यादि धर्माचार्य हे गुलामगिरीचें समर्थनच करीत असत. माणसाचें आत्मिक जीवन हेंच त्यांच्या मतें महत्त्वाचें होय. गुलामगिरी ही बाह्य शरीराला जखडते. आत्म्याला नाही. शिवाय मनुष्याने केलेल्या पापाचें फळ म्हणुनच त्याच्या नशिबीं गुलामगिरी येते. असें ते म्हणत. अशा तऱ्हेच्या तत्त्वज्ञानामुळे ग्रीक संस्कृतींतील बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्तिनिष्ठा, स्वातंत्र्यवृत्ति, राजकीय आकांक्षा या तत्त्वांचा हळूहळू लोप झाला. ग्रीक भाषा ही सुद्धा आता निंद्य ठरली. ग्रीक वाङ्मय पाखंडीपणा, नास्तिकवाद शिकवितें म्हणून धर्माचार्यांनी त्याचा अभ्यास निषिद्ध मानला. त्यामुळे हळूहळू तें विस्मृतीत जाऊन युरोपवर अंध धर्मश्रद्धेचा पगडा बसला. पोपच्या अनियंत्रित सत्तेचा तो पायाच ठरला. आपल्या सत्तेचें मंदिर त्यावर उभारून ऐहिक व पारमार्थिक ह्या दोन्ही क्षेत्रांवर तेथून पोप राज्य करूं लागला.
 सेंट ऑगस्टाईनच्या 'सिटी ऑफ गॉड' या ग्रंथांतूनच पवित्र रोमन साम्राज्याची कल्पना उद्भवली. प्रथम धर्मसत्ता व राजसत्ता या दोन तलवारी आहेत, असें मानले जात असे व त्यांचा कारभार स्वतंत्रपणें चालावा, असाहि विचार सांगितला जात असे. पण पोप ग्रेगरी सातवा याने तो पूर्णपणे मोडून काढला. त्यानंतर सेंट बर्नार्ड, जॉन ऑफ सॅलिसबरी व विशेषत: सेंट थॉमस् ॲक्विनास यांनी धर्मपीठाच्या अधिसत्तेचें आणि ग्रंथप्रामाण्य, मोक्षैकनिष्ठा, निवृत्ति या पूर्वाचार्यप्रणीत तत्त्वांचेंच समर्थन केलें व आपल्या प्रभावी वाणीने व लेखणीने त्याचा सर्व कॅथॉलिक जगतांत प्रसार केला. असा प्रसार करणें त्यांना फार सुलभ झालें याचें कारण असें की, सर्व युरोप त्या वेळीं पुन्हा रानटी अवस्थेला गेला होता. फ्रँक (हे मूळचे जर्मन), नार्समेन, स्लाव्ह हे सर्व रानटीच लोक होते आणि पूर्वेकडून आलेले व्हँडाल्, हिसिगॉथ, हूण हे त्यांच्यापेक्षाहि जास्त रानटी होते. त्या सर्वांनी मिळून ग्रीस व रोम यांचा पूर्ण नाश केला व सर्व युरोप वन्यावस्थेस नेऊन पोचविला. या वेळीं ख्रिस्ती धर्मपीठाने इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, रशिया या सर्व देशांत मिशनरी पाठवून तेथील राजांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली आणि त्यामुळे सहजच सर्व प्रजा ख्रिश्चन झाली. त्या वेळी पूर्व युरोपांत रोमन सम्राटांचें राज्य होतें. त्यांनी राज्यपदाबरोबरच धर्मपीठाचेंहि प्रभुत्व आपल्या हातीं घेतलें. पूर्वेकडे पुढील अनेक शतकें राजाच प्रमुख धर्माचार्य असे. पश्चिमेकडे राजसत्ता व धर्मसत्ता एक झाल्या, पण त्या पोपच्या हाती आल्या. त्या दोन्ही सत्ता हातीं घेऊन पोपने तेराव्या शतकापर्यंत पश्चिम युरोपच्या सर्व जीवनावर कसें प्रभुत्व गाजविलें तें येथवर आपण पाहिलें.
 या धर्मसत्तेमुळेच युरोप जवळ जवळ हजार वर्षे तमोयुगांत पिचत पडला होता. शास्त्र, विद्या, कला, राजनीति कोणत्याच क्षेत्रांत या काळांत त्या भूमींत कर्ते पुरुष उदयास आले नाहीत. येणें शक्यच नव्हते. इहवाद नाही, सामाजिक जीवन नाही, ऐहिक वैभवाच्या आकांक्षा नाहीत तेथे मानवी कर्तृत्वाची जोपासना होऊंच शकत नाही. ख्रिस्ती धर्माने व त्यांतील ग्रंथप्रामाण्य, निवृत्ति, परलोकनिष्ठा या तत्त्वांनी या आकांक्षा नष्ट करून टाकल्या होत्या. अंध धर्माचें हें वर्चस्व तेराव्या शतकांत नष्ट होऊं लागलें तेव्हाच मानवी प्रज्ञा पुन्हा फुलूं लागली. (ए हिस्टरी ऑफ् युरोप- एच्. ए. एल्. फिशर, प्रकरण २ ते ५ व ९).


 पोपच्या ख्रिश्चन धर्मसत्तेने चौथ्या- पांचव्या शतकांत निर्माण केलेलें तमोयुग बाराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पश्चिम युरोपांत तसेंच अखंड चालू होतें. कारण तोंपर्यंत रोमच्या धर्मपीठाच्या सत्तेला आव्हान देईल अशी दुसरी शक्ति निर्माण झाली नव्हती. तेराव्या शतकाच्या आरंभीं अशी एक दुसरी समर्थ शक्ति निर्माण झाली व पुढील एक-दोन शतकांत तिने पोपच्या अंध, प्रतिगामी, धर्मसत्तेचा पायाच निखळून टाकला. ती शक्ति म्हणजे राष्ट्रभावना ही होय. तिच्या उदयापर्यंत पश्चिम युरोप हा एक प्रदेश मानला जात असे आणि त्याच्यावर पोपचें धार्मिक व पवित्र रोमन सम्राटाचें राजकीय साम्राज्य आहे, असे मानले जात असें.
 यांपैकी पोपचें साम्राज्य ही वस्तुस्थिति होती. जर्मन राजांचें रोमन साम्राज्य हें तितकें खरें नव्हतें; तरी तत्त्वतः पश्चिम युरोपच्या जनतेने तें मान्य केलें होतें.
 पण अकराव्या-बाराव्या शतकांत फ्रेंच, जर्मन, इटालियन, इंग्लिश या भाषा प्रौढ रूपाला आल्या आणि त्यामुळे ते देश म्हणजे भिन्न राष्ट्रें आहेत, अशी भावना निर्माण होऊन तेथील लोकांना आपल्या स्वतंत्र अस्मितेची जाणीव होऊ लागली. ती होतांच आपल्या राष्ट्राबाहेरचा जो पोप त्याची आपल्या देशावर सत्ता असावी, सर्वंकष सत्ता असावी, हा विचार इंग्लिश, फ्रेंच या लोकांना दुःसह होऊं लागला. मागल्या लेखांत सांगितल्याप्रमाणे पोपच्या धर्मसत्तेला मुख्य आधार म्हणजे वरील देशांतील लोकांच्या मनांत असलेली त्याच्यावरील अंधश्रद्धा हा होता. आता लोकांच्या मनांतील ती श्रद्धा डळमळतांच पोपच्या सत्तेला हादरा बसूं लागला.

सामर्थ्याचा अभाव

 पोपची सत्ता जर्मन (रोमन) सम्राटांनाहि दुःसह होती हें खरें आहे. पण रोमन सम्राटांच्या मागे बळ असें कोठलेच नव्हतें. जनतेची श्रद्धा पोपवर होती. तिच्या मनांत आपले राजे म्हणून, आपले सम्राट् म्हणून त्यांच्यावर भक्ति असावयाची, तर जर्मनीखेरीज बाकीच्या प्रांतांतील लोकांना ते सम्राट् परके वाटत होते. कारण त्यांची प्रत्यक्ष सत्ता त्या प्रांतावर कधीच नव्हती. पवित्र रोमन साम्राज्य हे फक्त नांवालाच साम्राज्य होतें. व्हाल्टेअरने म्हटल्याप्रमाणे तें पवित्र नव्हतें, रोमन नव्हतें आणि साम्राज्यहि नव्हतें. अशा स्थितींत त्याच्या सम्राटांना पोपची सत्ता कितीहि दुःसह असली, तरी तिच्याशी मुकाबला करतां येईल, असें कसलेंच सामर्थ्य त्यांच्या ठायीं नव्हतें.
 ऑटो दि ग्रेट, फ्रेडरिक बार्बरोसा व फेडरिक दुसरा हे सम्राट् कर्तबगार होते, पराक्रमी होते. कांही काळ त्यांनी पोपशीं झगडा यशस्वीपणें केलाहि. पण अंतीं त्याच्यापुढे त्यांना गुडघे टेकावे लागले. त्यांच्या या पराभवाचें आणखी एक कारण आहे. रोमन सम्राट् हे सर्व जर्मन राजे होते. इतर देशांच्या राजांप्रमाणे जर्मनीचे राजे होण्यांत त्यांनी भूषण मानलें असतें, जर्मनी प्रथम संघटित करण्याचें त्यांनी धोरण ठेवलें असतें, तर ते समर्थ झाले असते. पण त्यांना पवित्र रोमन सम्राट् या पदाचा अनिवार मोह होता. तें पद मिळवावयाचें, तर इटलीवर सत्ता प्रस्थापित करणें व पोपकडून अभिषेक करून घेणें हें अवश्य होते. त्यामुळे ते आपली सर्व शक्ति त्यांतच खर्च करीत आणि इटालियन लोकांचा या परक्या सत्तेला कडवा विरोध असल्यामुळे, त्यांना कांही काळ विजय मिळाला, तरी शेवटीं पराभव पत्करावा लागे व मग पोपपुढे गुडघे टेकावे लागत.
 इंग्लिश, फ्रेंच या देशांच्या राजांनी स्वराष्ट्राच्या अस्मितेशी एकरूप होण्यांत भूषण मानले. त्यामुळे इतके दिवस त्यांच्या देशांच्या जनतेची, पोपला पाठिंबा देणारी शक्ति, आता त्यांच्या मागे उभी राहिली; आणि तिच्या आधारें पोपचें आततायी, जुलमी वर्चस्व झुगारून देण्यांत ते यशस्वी झाले. राष्ट्रवाद हा इहवाद आहे हें आपण ध्यानांत घेतलें तर नव्या मन्वंतरामागची ती एक प्रबळ प्रेरणा होती हें आपल्याला पटेल.

विद्यापीठांचे कार्य

 या तेराव्या शतकांतच पोपच्या सर्वंकष धर्मसत्तेला विरोध करणारी दुसरी एक शक्ति पश्चिम युरोपांत निर्माण होत होती. ती म्हणजे नव्याने स्थापन झालेली विद्यापीठें व तेथे होणारा ग्रीक व रोमन विद्यांचा अभ्यास ही होय. बोलोना, सातेर्नो, पॅरिस, ऑक्सफर्ड येथे हिपॉक्रीटस व गेलन या ग्रीक वैद्यांच्या शास्त्राचा अभ्यास सुरू झाला आणि विशेष म्हणजे रोमन कायद्याचें अध्ययन व अध्यापन तेथील पंडित व विद्यार्थी करूं लागले. या विद्यापीठांत अजूनहि धर्मशास्त्रावरच जास्तभर होता हें खरें. वैद्यकाच्या अभ्यासांत अजूनहि प्रयोग, अवलोकन यांना स्थान नव्हतें हेंहि खरें. पण मूळ ग्रीकांचें ज्ञान प्रायोगिकच असल्यामुळे ते संस्कार पश्चिम युरोपांतील विद्यार्थ्यांच्या मनावर होऊं लागले. याला फार महत्त्व आहे. प्रबोधनयुगांत विज्ञानाचा जो विकास झाला त्याचीं बीजें येथेच पेरली गेली असें फिशर- सारख्या इतिहासवेत्त्याचें मत आहे.
 रोमन दण्डविधान (कायदा) याचे महत्त्व असेंच आहे. त्याच्या अभ्यासामुळे पश्चिम युरोपांत एक बुद्धिजीवी नवा वर्गच निर्माण झाला आणि व्यापार, शालेय शिक्षण राजनीति यांवर धर्मसत्तेचें वर्चस्व असूं नये; इहवादी दृष्टीने, म्हणजे समाजाच्या प्रगति- परागतीच्या दृष्टीने त्यासंबंधीचें धोरण आखावें, असें तो सांगू लागला. पियरी डुवॉइस् या कायदेपंडिताचें उदाहरण देऊन जॉर्ज सवाइनने हा विचार चांगला स्पष्ट केला आहे. फिलिप दि फेअर या फ्रान्सच्या राजाने (१२८५- १३१४) पोपच्या सत्तेला आव्हान दिलें त्या वेळीं हा सर्व मध्यमवर्ग त्याच्या पाठीशी होता, असें तो म्हणतो. (हिस्टरी ऑफ पोलिटिकल थिअरी, जॉर्ज सवाइन, पृष्ठें २३३–३४) या वेळी रोमच्या पीठावर वॉनिफेस आठवा हा पोप होता. त्याला नवोदित राष्ट्रभावनेची कल्पना आली नव्हती. आपल्या पूर्वीचे इनोसंट, ग्रेगरी हे जे पोप त्यांच्याप्रमणेच, आपणहि निरंकुश सत्ता गाजवावी, असें त्याने ठरविलें. फिलिप दि फेअर याने फ्रान्समधील धर्मगुरु व धर्ममठ यांवर कर बसविले तेव्हा राजाला तो अधिकार नाही, असा फतवा काढून फ्रेंच धर्मगुरूंना तो कर देण्यास त्याने मनाई केली. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या धर्मगुरूंनीच पोपला कडवा विरोध केला व आपण राजाची सत्ता मानणार व कर भरणार असें जाहीर केलें. पोपने नेहमीच्या नीतीला अनुसरून फ्रेंच सरंजामदारांना राजाविरुद्ध उठण्यास चिथावणी दिली. पण तेंहि त्याची आज्ञा मानीनात.
 याचा अर्थ एकच की, ते धर्मगुरु व सरंजामदार आता फ्रेंच झाले होते. रोमनिष्ठेपेक्षा त्यांच्या लेखीं राष्ट्रनिष्ठेलाच जास्त महत्त्व होते. आता तें नवीन संघटनतत्त्व उदयास आलें होतें. (जॉर्ज सवाइन, पृष्ठे २३४-३५). पोप वॉनिफेस याला त्याचें सामर्थ्य आकळले नाही. म्हणून तो आज्ञापत्र मागे घेईना. तेव्हा फ्रेंच राजा फिलिप याने रोमला कांही कारस्थानी लोक धाडून पोपला कैद करून फ्रान्सला आणलें ! देशोदेशीच्या राजांना व रोमन सम्राटांनाहि धुळींत लोळविणारा पोप आज एका राजाने सहज कैदी म्हणून धरून आणला ! फिशरने मुद्दाम म्हटले आहे की, या वेळी फ्रान्समध्ये विरोधाची कुजबुजसुद्धा ऐकूं आली नाही. (हिस्टरी ऑफ् युरोप पृष्ठ २७९ ). अंध धर्माची सर्वंकष सत्ता नष्ट झाल्याचेंच हें लक्षण होय. आणि तेवढ्यावरच हें भागलें नाही. फ्रान्सच्या राजाने आव्हिग्नॉन हें रोमसारखेंच एक धर्मपीठ निर्माण केलें व तेथेच पोपला राहवयास भाग पाडलें. आणि १३०९ पासून १३७६ पर्यंतचे सर्व पोप निलाजरेपणाने तेथे रहिले. त्यामुळे धर्मसत्तेच्या विटंबनेला सीमाच उरली नाही. कारण इटालियन लोकांना पोपचें हें कृत्य न आवडल्यामुळे त्यांनी रोमच्या पीठावर दुसरा पोप बसविला; आणि मग या दोन पोपांमध्ये, "मी खरा कीं तुं खरा ?" असा आपल्याकडच्या शंकराचार्यांसारखा वाद चालू झाला.
 पुढे पिसा नगरीच्या धर्ममंडळाने या वादाला कंटाळून दोघांनाहि पदच्युत करून अलेक्झांडर नांवाच्या गृहस्थाची त्या पदी नियुक्ति केली. पण त्या धर्ममंडळाला प्रत्यक्षांत सत्ता नसल्यामुळे आता दोहोचे तीन पोप झाले आणि त्या सर्वसत्ताधारी धर्मपीठाची राहिलीसाहिली प्रतिष्ठाहि नष्ट झाली. हा सर्व नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रनिष्ठेचा प्रभाव. नव्या विद्यापीठांच्या मागे ही निष्ठा उभी होती.
 राष्ट्रभावना आणि विद्यापीठे यांबरोबरच या काळांत रोमन धर्मपीठाच्या निरंकुश सत्तेला आव्हान देणारी आणखी एक शक्ति आता निर्माण होत होती. रोमचें धर्मपीठ आज अनेक शतकें निरंकुश सत्ता भोगीत होतें. त्यामुळे त्याचा नीतिदृष्ट्या कमालीचा अधःपात झाला होता. हजारो एकर जमीन पीठाच्या व धर्मगुरूंच्या ताब्यांत असे. कराच्या रूपाने ते अगणित पैसा गोळा करीत. लोकांना त्यांनी केलेल्या पापापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी मुक्तिपत्रे काढली. तीं विकत घेतली की, आपल्या कपाळीचा नरक टळेल व आपल्याला मोक्ष मिळेल, अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे असंख्य पत्रे खपत. प्रत्येक देशांत धर्मगुरूंनी त्यांची दुकानेंच काढलीं होतीं. त्यावरहि धर्मपीठांना राशीने पैसा मिळाला. निरंकुश सत्ता व पैसा हाती आल्यावर धर्मपीठें व धर्मगुरु किती चारित्र्यहीन, भ्रष्ट व धर्महीन झाले असतील याची सहज कल्पना येईल. (हिस्टोरियन्स हिस्टरी ऑफ दि वर्ल्ड, खंड ७ वा, पृष्ठे ६४८-४९).
 इतके दिवस भोळ्या धर्मश्रद्धेमुळे हे भोगविलासहि आपल्याकडच्या 'महाराजां'च्या भोगविलासांप्रमाणे लोकांना कौतुकास्पद वाटत. त्यांतून कोणाला ते निंद्य वाटले, तरी त्याबद्दल टीका करण्याचें वा त्याचा जाब विचारण्याचे धाडस कोणालाहि नव्हतें. पण आता ॲरिस्टॉटल, प्लेटो यांच्या अध्ययनामुळे आणि राष्ट्रभावनेमुळे लोकांच्या ठायीं व्यक्तिवाद उदयास येत होता व या धार्मिक अत्याचारांविरुद्ध घोष करण्याचें व त्यासाठी प्राणदंडहि सोसण्याचे सामर्थ्य, धैर्यं त्यांच्या ठायीं निर्माण होत होतें. तिसरी शक्ति ती हीच.
 ऑक्सफर्ड विद्यापीठांतील प्रा. जॉन वायक्लिफ् हा अशा लोकांत अग्रगण्य होता (१३२४–१३९४). सोळाव्या शतकांत लूथरने जी धर्मसुधारणेची चळवळ केली तिचा खरा जनक वायक्लिफ् हा होता. मनुष्य व परमेश्वर यांमध्ये मध्यस्थ म्हणून पोप, कार्डिनल, बिशप, प्रीस्ट अशा धर्माचार्यांची मुळीच गरज नाही, मनुष्याने भक्ति, प्रार्थना, नामस्मरण करून परमेश्वराशी प्रत्यक्ष संबंध जोडला तरच त्याला मोक्ष मिळेल, असा त्याचा सिद्धान्त होता. आणि आपल्या लेखांतून, व्याख्यानांतून त्यांचें तो निर्भयपणें प्रतिपादन करीत असे. बायबल हा धर्मग्रंथ त्या वेळी लॅटिन भाषेत होता व त्याचें पठण व अध्ययन लोकांनी स्वतः करण्यास पोपची सक्त मनाई होती. अशा लोकांना तो देहदंडाची शिक्षा सांगे. आपल्याकडे शूद्रांना वेदपठणास बंदी होती, तसाच हा प्रकार होता. वायक्लिफने पोपचा हा दंडक उपमर्दण्याचें ठरवून बायबलचें इंग्रजीत भाषांतर केलें व त्याच्या हस्तलिखित प्रती देशभर पसरून दिल्या; आणि बायबल स्वत: वाचण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असें प्रतिपादन केलें.
 वायक्लिफचे हे दोन सिद्धान्त म्हणजे पोपच्या सत्तेला सुरुंगच होते. कारण देव-मानवांतील मध्यस्थी व बायबलचा एकाधिकार यांवरच पोपचें सर्व वैभव, त्याचे राजविलास व त्याची सत्ता अवलंबून होती. पण वायक्लिफला हे धर्मपीठाचें राजवैभवच मुळी मान्य नव्हतें. धर्मगुरूंनी वैराग्याने, निष्कांचन स्थितींतच राहिलें पाहिजे, संपत्तीचा स्पर्श होतांच ते धर्मगुरु या पदाला नालायक होतात असे तो म्हणे

दोन स्वतंत्र सत्ता

 पोपच्या म्हणजे रोमच्या धर्मपीठाच्या राजकीय सत्तेविषयी त्याचें हेंच मत होतें. धर्मपीठ व राजपद या दोन स्वतंत्र संस्था असून धर्माची राजशासनावर कधीहि सत्ता असता कामा नये, राजशासन हें स्वतंत्रच असले पाहिजे, धर्मपीठाने त्यावर सत्ता चालविणें हें पाप आहे, असें त्याचें मत होतें. या त्याच्या मतामागे राष्ट्रभावनेची प्रेरणा होती हे उघड आहे. इंग्लंड हें स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असून राजकीय तर राहोच पण धार्मिक क्षेत्रांतहि त्यावर बाह्य अशा कोणा व्यक्तीची सत्ता चालावी, याची त्याला चीड होती. तो स्वतः राजसत्तावादी होता आणि इंग्लंडमधील धर्माचार्यांवरहि कर, न्यायदान, त्यांची मिळकत या सगळ्या बाबतीत इंग्लंडच्या राजाचीच सत्ता असली पाहिजे, असें स्वच्छ प्रतिपादन तो करी. धर्म पीठाला जशी परमेश्वराकडून सत्ता मिळते तशी राजालाहि परमेश्वराकडूनच सत्ता मिळते, ती पोपकडून मिळते हा दावा खोटा आहे, असा विचार तो सतत मांडीत असे. मात्र या दोन्ही सत्ता लोकसेवेसाठी परमेश्वराने दिलेल्या आहेत, राजा किंवा पोप स्वार्थी, विलासी होताच त्यांना कसलाहि अधिकार राहत नाही, असें त्याने अनेक ठिकाणी बजावून सांगितलें आहे.
 वायक्लिफच्या या मतावरून तो व्यक्तिवादी, बुद्धिवादी व प्रखर राष्ट्रवादी होता हें स्पष्ट दिसून येते. इहवादाचा हाच पाया आहे. प्रत्येक मनुष्याला पूर्ण विवेक-स्वातंत्र्य असले पाहिजे, त्याच्या विचार-उच्चार आचारांवर कोणतेंहि अंध, तर्कशून्य, सुलतानी बंधन असतां कामा नये, हेंच व्यक्तिवादाचें मुख्य तत्त्व होय. वायक्लिफ् या दृष्टीने पूर्ण व्यक्तिवादी होता. प्रचलित अंधरूढीवर, लोकभ्रमांवर तो अशीच कडक टीका करीत असे. 'प्रभुभोजन' नामक धार्मिक विधीच्या वेळीं जें मद्य व भाकरी वापरण्यांत येते त्यांचें ख्रिस्ताच्या रक्तांत व मांसांत रूपांतर होतें, असें भाविक ख्रिस्ती लोक मानतात. वायक्लिफने बायबलच्याच आधारें हें सर्व झूट आहे, असें दाखवून दिले.

नवे मन्वन्तर

 रोमच्या धर्मपीठाच्या दृष्टीने हें सर्व भयंकर पाखंड होते. हा अत्यंत निंद्य असा नास्तिकवाद होता. त्याला जिवंत जाळण्याखेरीज दुसरी शिक्षाच नव्हती. पण त्या वेळीं वायक्लिफला इंग्लंडमधील राजघराण्यांतील समर्थ पुरुषांचा पाठिंबा होता. जॉन ऑफ् गाँटसारखे कांही सरदार स्वतःच धर्मसुधारक होते. त्यामुळे वायक्लिफ् हा पोपच्या यमदंडापासून सुटू शकला. पण त्याचा वारसा पुढे चालविणारे जे लोलर्ड पंथाचे लोक त्यांना मात्र प्राणदंड भोगावा लागला. राजा हेन्री हा प्रतिगामी होता. त्याने १४०१ सालीं लोलर्डाच्याविरुद्ध कायदा केला आणि त्या मताच्या सर्व लोकांना जिवंत जाळून मारण्याची शिक्षा फर्मावली. पण आपल्या मतांचा तत्वांचा त्याग न करतां, लोलर्ड पंथीयांनी ती शिक्षा शांतपणें भोगली. जॉन सॉट्रे हा अशी शिक्षा भोगणारा इंग्लंडमधला पहिला धर्मवीर होय. त्यानंतर अनेक लोलर्डांनी अशीच शिक्षा भोगली व नवें मन्वंतर सुरू झाल्याचें जगाला अग्नीच्या साक्षीने सांगितले. तत्त्वासाठी आत्मबलिदान करण्याचें धैर्य ही जगांतील सर्वश्रेष्ठ शक्ति होय.
 लोलर्डांचे बळी घेतले ते अंध धर्माने घेतले हें खरें, पण ते पोपच्या धर्मपीठाने घेतलेले नव्हते, इंग्लंडमधले राजे, सरदार व लोक यांचा, राष्ट्रभावनेमुळे, पोपच्या अधिसत्तेला विरोध होता. पण त्यामुळे ते सर्व अंध, असहिष्णु, शब्दप्रामाण्यवादी धर्माच्या मनगरमिठींतून मुक्त झाले होते असें नाही. आणखी एक-दोन शतकें इंग्लंडमध्ये अंध धर्मसत्ता असेच बळी घेत राहिली होती, असें इतिहासावरून दिसून येईल. मात्र हा अत्याचार पोपने केला असतां तर त्याच्याविरुद्ध भयंकर भडका उडाला असता. कारण तेथे इंग्लंडची राष्ट्रीय अस्मिता दुखावली असती. बोहेमियामध्ये जॉन हसच्या प्रकरणी पोपच्या सुलतानीमुळे त्या राष्ट्राची अस्मिता दुखावली आणि पोपला फ्रान्सच्या फिलिप राजाने जशी अद्दल घडविली तशीच, बोहेमियन सेनापति झिस्का याने पुन्हा एकदा घडविली.
 जॉन् हस् (१३६९–१४१५) हा बोहेमियांतील प्रागच्या विद्यापीठांत प्राध्यापक अनून, वायक्लिफचा अनुयायी होता. वर सांगितलेलें वायक्लिफचें सर्व तत्त्वज्ञान त्याला तंतोतंत पटलें होतें. आणि त्याचें प्रतिपादनहि तो तशाच निर्भयपणें करीत असे. वास्तविक जॉन हस् हा अत्यंत धर्मनिष्ठ व चारित्र्यसंपन्न होता. ख्राइस्ट व बायबल यांवर त्याची अढळ श्रद्धा होती. पण रोमच्या पीठाला त्याचें मुळीच महत्त्व नव्हतें. चारित्र्याचा, नीतीचा व त्या पीठाचा कसलाच संबंध नव्हता. ख्राइस्ट व बायबल हें त्याचें फक्त भांडवल होतें. त्यावरील लोकांची अंध, भोळी श्रद्धा ही त्याची शक्ति होती. वायक्लिफ व हस यांनी तिच्यावरच आघात केला होता. त्यामुळे तें पीठ खवळून उठले व त्याने जॉन हसला आपल्यापुढे उपस्थित राहण्याचें फर्मान सोडलें. जॉन हस एरवी तेथे गेला नसता. पण हंगेरीचा राजा सिसिग्मंड याने त्याला अभय दिले म्हणून तो गेला. पण राजाने त्याला दगा दिला व कन्स्टन्स येथील धर्मपरिषदेने त्याला जाळून मारण्याची शिक्षा दिली.

विवेकाची साक्ष

 तेव्हाचें जॉन हसचें भाषण म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी सॉक्रेटिसने केलेल्या भाषणाचे प्रतिध्वनीच होते. तो म्हणाला, "मी परमेश्वर व माझी विवेकदेवता यांनाच फक्त प्रमाण मानतो. तुम्ही म्हणतां शेकडो धर्माचार्यांचें मत माझ्या मताच्या विरुद्ध आहे. असेल, लाखांचें असेल ! माझ्या विवेकाची साक्ष मी त्याहून मोठी मानतो. मी लोकांना उपदेश केला त्यापेक्षा जास्त पवित्र, जास्त उदात्त, असं जगांत काय आहे ? तुम्ही कर्मकांडाला धर्म मानतां मी आत्म्याच्या विकासाला धर्म मानतों. परमेश्वराने हाच धर्म सांगितला आहे."
 परिषदेने, सरदारांनी, राजाने जॉन हसचें मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. 'मी चुकलों' असें फक्त लिहून दे, तुला मोठे धर्माधिकार देऊ, अलोट धन देऊं, मोक्ष देऊ, अशीं त्याला आश्वासने देण्यांत आली. पण त्याने सत्यनिष्ठा सोडली नाही व धैर्याने अग्निकुंडांत प्रवेश केला!
 पण जॉन हसला रोम-पीठाने दिलेली शिक्षा त्या पीठाच्या अंगावर उतून निघाली. बोहेमियन लोकांना हा भयंकर राष्ट्रीय अपमान वाटला. झिस्का या त्यांच्या सेनापतीने उत्कृष्ट लष्करी संघटना उभारली व पोपच्या पक्षाचें समर्थन करणाऱ्या जर्मन- रोमन सम्राटावर हल्ला चढविला. पुढील बारा वर्षांत बोहेमियन हसाईट (हसचे अनुयायी) व रोमन सम्राट् यांच्यांत पांच धर्मयुद्धे झाली. दर वेळी सम्राटाचा पराभव झाला; तेव्हा रोमचें पीठ घाबरून गेलं आणि त्याने बोहेमियनांपुढे शरणागति पत्करली. त्या वेळी हसाईटांनी पुढीलप्रमाणे तहाच्या अटी घातल्या- १. धर्मप्रवचनाचें प्रत्येकाला स्वातंत्र्य असावें. २. पोपची ऐहिक व्यवहारावरील सत्ता नष्ट व्हावी. ३. धर्मरूंनी प्राचीन ऋषींप्रमाणे वैराग्याने राहवें आणि ४. धर्मगुरूंच्या बाबतींत सरकारी न्यायालयांना न्याय करण्याचा अधिकार असावा. पोपला नाक मुठीत धरून या तहावर सही करावी लागली. या युद्धाच्या काळांत हसाईट लोकांनी हजारो पुस्तिका लिहून आपल्या म्हणजे जॉन् हसच्या तत्त्वज्ञानाचा सर्व युरोपभर प्रसार केला. पुढील शतकांत प्रोटेस्टंट पंथीय धर्मसुधारणेच्या चळवळींचा पाया अशा रीतीने या हसाईट युद्धांनी घालून ठेवला.

तत्त्ववेत्त्यांचें विचारधन

 मागल्या लेखाच्या अखेरीस पोपच्या धार्मिक सत्तेचें तत्त्वज्ञान आपण पाहिलें होतें, त्याचप्रमाणे आता या लेखाच्या शेवटीं इहवादाचें तत्त्वज्ञान प्रतिपादणाऱ्या तत्त्ववेत्त्यांचें विचारधन पाहून हा लेख संपवू. इहवाद, बुद्धिप्रामाण्य, राजसत्तेचें श्रेष्ठत्व यांचें समर्थपणें प्रतिपादन करणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये पदुआ नगरीचा पंडित मासिंग्लिओ (१२७०- १३४०) हा अग्रगण्य होय. मार्सिग्लिओ हा पोपच्या अधिसत्तेचा अगदीं हाडवैरी होता. सर्व ख्रिस्ती जगांतील लोकांच्या सार्वमताने पोपची निवड व्हावी व लोकांच्या सार्वमताचें त्याच्यावर पूर्ण नियंत्रण असावें, तो कर्तव्यच्युत झाल्यास त्याला पदच्युत करण्याचाहि अधिकार लोकांना असावा, असें मत त्याने मांडलें आहे. त्याचप्रमाणे ऐहिक क्षेत्रांत त्याला कसलाहि अधिकार असूं नये आणि पारमार्थिक क्षेत्रांतहि पीठाचा एकंदर कारभार राजसत्तेच्या अंकित असावा, रोमन सम्राटांच्या निवडणुकीवर व त्यांच्या कारभारावर त्याचें कसलेंहि नियंत्रण असूं नये, असे विचार अतिशय आग्रहाने आपल्या ग्रंथांत त्याने मांडले आहेत.
 मार्सिग्लिओ हा ऑरिस्टॉलचा भक्त होता. त्याची विद्वत्ता इतकी असामान्य होती की, त्याला प्रति ॲरिस्टॉटल म्हणत. वायक्लिफने आपले तत्त्वज्ञान त्याच्या ग्रंथावरूनच घेतलें होतें.
 पदुआच्या मार्सिग्लिओप्रमाणेच इंग्लंडमधील ओखॅमचा विल्यम् हा दुसरा तत्त्ववेता (१२९०–१३४५) त्याच्या प्रमाणेच निःस्पृह, निर्भय लेखनामुळे पश्चिम युरोपांत गाजला होता. मार्सिग्लिओप्रमाणेच त्याचीं मतें असून, एक पाऊल पुढे जाऊन त्याने पोपलाच पाखंडी व नास्तिक ठरविलें होतें. हे दोघेहि पंडित फ्रॅन्सिस्कन पंथाचे अनुयायी असून, पोप व इतर धर्माचार्य यांच्या राजवैभवाची व विलासाची त्यांना चीड होती. द्रव्यलोभी, मोहमूढ लोकांना धर्मक्षेत्रांत कोणतेंहि स्थान असू नये, असा विचार ते आग्रहाने मांडीत तो यामुळेच. मार्सिग्लिओपेक्षा विल्यमच्या ग्रंथांचा प्रभाव युरोपी मनावर त्या वेळी जास्त पडला होता.
 तिसरा, याच विचारांचा तत्त्ववेत्ता म्हणजे इटलीचा महाकवि डांटे हा होय (१२६५–१३२१). ऑगस्टाइनच्या मतावर त्याने कडक टीका करून राजाच्या ऐहिक सत्तेवर धर्मसत्तेचें नियंत्रण असावें, या त्याच्या मताचा निषेध केला आहे. डांटे हा राष्ट्रवादी नव्हता. रोमन साम्राज्याचा तो अभिमानी होता. आणि सर्वं युरोपवर एकच साम्राज्यसत्ता असावी, असें त्याचें मत होतें. मात्र तें साम्राज्य रोमन-इटालियन लोकांचें असावें असा त्याचा आग्रह होता. प्राचीन काळी त्यांनी दीर्घकाळ साम्राज्यसत्ता चालविली असल्यामुळे युरोपच्या साम्राज्यपदाला तेच लायक होत असें त्याला वाटे.
 पियरी डुवाईस हा फ्रेंच पंडित (ग्रंथ - रिकव्हरी' इ. स. १३००). डांटेसारखाच साम्राज्यसत्तावादी होता. पण त्याच्या मतें, फ्रेंच राजे हेच खरे सम्राटपदाला लायक होते. अशा रीतीने साम्राज्यसत्तावादाचा पुरस्कार करता करतां या दोघांहि थोर पंडितांनी नकळत आपल्या सुप्त मनांतील राष्ट्रनिष्ठा प्रकट केली आहे. पण ते दोघे इहवादी होते, हें आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांतहि डूवॉइस् हा जास्त इहवादी होता. कायदा व राजसंस्था या गोष्टी त्याच्या मते परमेश्वरप्रणीत नसून परिस्थिति, गरज यांप्रमाणे त्या निर्माण होतात, म्हणून त्या पूर्ण मानवकृत आहेत. शिक्षणाच्या बाबतींत तो प्लेटोचा अनुयायी असून, स्त्रियांनाहि पुरुषांप्रमाणेच शिक्षण मिळालें पाहिजे, असा त्याचा आग्रह असे.


 प्रबोधन- युगापासून युरोपचा अर्वाचीन इतिहास सुरू होतो. त्याच्या आधीचें युग म्हणजे मध्ययुग. त्यालाच तमोयुग म्हणतात. अंधधमसत्तेने मानवी बुद्धि, प्रज्ञा आणि त्यामुळेच एकंदर कर्तृत्व हतप्रभ करून टाकलें होतें, ज्ञान-सूर्याला या युगांत ग्रहण लागलें होतें, म्हणून त्याला तमोयुग म्हणतात. तेराव्या शतकांत राष्ट्रभावनेमुळे पोपच्या धर्मसत्तेविरुद्ध सर्वत्र उठाव कसा झाला, रोमन दंडविधानाच्या अभ्यासामुळे एक नवीन बुद्धिजीवी वर्ग निर्माण होऊन त्यानेहि त्याला पाठिंबा कसा दिला आणि वायक्लिफ्, जॉन हस यांच्या धर्मस्वातंत्र्याच्या चळवळीमुळे पोपच्या सत्तेचा पायाच कसा नि खिळून पडला हे आपण मागल्या लेखांत पाहिलें. या संग्रामांतूनच चवदाव्या शतकांत जें प्रबोधनयुग निर्माण झाले त्याचें स्वरूप आता पाहावयाचें आहे.
 प्रबोधन म्हणजे नवजागृति, पुनरुज्जीवन. (रेनसान्स). या व पुढल्या शतकांत ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन झालें, त्या विद्येचा सर्व युरोपभर पंडितांनी आग्रहाने प्रसार केला आणि त्यांतून नवीन ज्ञानाचें संशोधन व संपादन होऊं लागलें म्हणून या युगाला प्रबोधन-युग म्हणतात. तेराव्या शतकांतहि ग्रीक विद्येचा अभ्यास सुरू झाला होता. मार्सिग्लिओ, विल्यम्, दुवॉइस् हे ॲरिस्टॉटलचेच शिष्य होते, हें मागे सांगितलेच आहे. पण तरी तेराव्या शतकांत ग्रीक विद्या सर्वत्र पसरली होती, असें म्हणतां येणार नाही. चौदाव्या शतकांत इटालियन कवि पेट्रॉर्क (१३०४- १३७४) याने त्या विद्येच्या प्रसारार्थ पद्धतशीर प्रयत्न केले आणि त्याच्या अनुयायांनी शाळा- महाशाळांतून वर्ग चालवून, व्याख्यानें देऊन, ग्रंथशाळा स्थापून त्या विद्येचे संस्कार सर्व पश्चिम युरोपीय देशांत लोकमानसावर करण्याचे अखंड प्रयत्न चालविले. मॅन्युएल क्रिसो लोरास, थिओडोर गाझा, लॉरेंझो, मेडिसी (इटली), जोहान मुल्लर, रुडाल्फ ॲग्रिकोला (जर्मनी), ग्रेगरी टिफरसन्, जेरोम ॲलिअंडर (पॅरिस) हीं नावें यासाठी प्रसिद्ध आहेत. पंधराव्या शतकांत तुर्कांनी (१४५३) काँस्टान्टिनोपल जिंकून घेऊन, पूर्व रोमन साम्राज्य नष्ट केल्यामुळे तेथले सर्व ग्रीक पंडित आपल्या ग्रंथांसह पश्चिम युरोपांत आले. त्यामुळे त्यांच्या विद्येचा प्रसार अतिशय वेगाने झाला. ती विद्या पूर्णपणें इहवादी असल्यामुळे तिची तत्त्वें पश्चिम युरोपांतील सामान्य जनतेंतहि रुजूं लागलीं व मानवी कर्तृत्वाला पडलेल्या बेड्या हळूहळू ढिल्या होऊं लागल्या.

चिकित्सक बुद्धि

 स्वतः अवलोकन करणें, स्वतः प्रयोग करणें आणि उपलब्ध ज्ञानाची, पूर्वीच्या ग्रंथांतील सिद्धान्तांची, रूढ विचारांची, स्वतः बुद्धीने चिकित्सा करून मगच सत्यासत्य निर्णय करणें हें प्रबोधन-युगाचे पहिले लक्षण होय. ग्रीक विद्येने लोकांना ही नवी दृष्टि दिली होती. त्या दृष्टीने ते आता भूगोल, खगोल, निसर्ग व मानवी शरीर यांच्याकडे पाहूं लागले, तेव्हा धर्मग्रंथांत सांगितलेले सिद्धान्त, विचार, मतें चुकीचीं आहेत, प्रामादिक आहेत असें त्यांच्या ध्यानांत आलें आणि प्रयोगाने व अवलोकना प्राप्त झालेले ज्ञान हे पंडित प्रत्यक्ष प्रमाणांनी लोकांच्या पुढे मांडूं लागल्यामुळे त्यांची पोप व जीर्ण धर्मग्रंथ यांच्यावरची अंधश्रद्धा ढळू लागली.
 मार्कोपोलो हा इटालियन प्रवासी (१२५४- १३२४) आशिया खंडांत प्रवास करून आला व १२९९ साली त्याने आपला प्रवासवर्णनाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेन्री (१४१५- ६१) याला या ग्रंथांची एक प्रत १४२८ साली मिळाली. समुद्रपर्यटनाच्या आकांक्षा आधीच त्याच्या मनांत उसळत होत्या. आता त्यांना जोराने चालना मिळाली. पोर्तुगीज प्रवासी १४५३ च्या सुमारास गायना या पश्चिम आफ्रिकेंतल्या देशाला जाऊन पोचले, कोलंबसाने १४९२ सालीं अमेरिका खंड शोधून काढलें आणि वास्को-दि-गामा हा १४९८ सालीं आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानला येऊन पोचला. या शोधांमुळे युरोपीयांच्या मनांतलें जगाचें रुढ चित्र पार बदलून गेलें. आशियामध्येहि सुसंस्कृत लोक आहेत, त्यांची संस्कृति आपल्याइतकीच किंवा जास्तच प्रगत आहे आणि त्यांचें जग सर्वस्वीं निराळें आहे, हें युरोपीय लोकांच्या ध्यानांत आल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या, जिज्ञासा प्रबळ झाली आणि त्यांच्या मनाची मरगळ नाहीशी होऊन एक नवाच उत्साह त्यांच्या ठायीं निर्माण झाला.

वेकनचे प्रतिपादन

 भूगोलाप्रमाणेच खगोलाचेंहि नवें दर्शन या वेळी शास्त्रज्ञ घडवूं लागले. या विषयांतला अत्यंत क्रांतिकारक असा जो सूर्यकेंद्रसिद्धान्त तो कोपर्निकस (१४७३- १५४३) या पोलिश खगोलशास्त्रज्ञाने सांगितला. पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्याभोवतीं फिरतो हा टॉलेमीचा सिद्धान्त असत्य ठरवून त्याने सूर्य हा विश्वाचें केंद्र आहे व पृथ्वी त्याच्याभोवती फिरत आहे, असा सिद्धान्त मांडला. आधुनिक खगोलशास्त्राचा कोपर्निकस हा जनक मानला जातो व तें सयुक्तिकच आहे. पण त्याच्याहि आधी त्याने व पुढे केप्लर, न्यूटन यांनी सांगितलेल्या सिद्धान्तांची चाहूल बाराव्या शतकांतील शास्त्रज्ञांना लागली होती. या शास्त्रज्ञांचा आद्य पुरुष म्हणजे रॉजर बेकन् (१२१४- १२९४) हा होय. हा फ्रॅन्सिस्कन पंथाचा एक धर्म गुरु असूनहि प्रस्थापित धर्ममतें न मानतां अवलोकन व प्रयोग यांनी स्वतंत्र बुद्धीने सत्याचा शोध घ्यावा अशी ज्ञानपद्धति याने उपदेशिली. म्हणून त्यालाच आधुनिक कालखंडाचा प्रवर्तक मानतात. चाक्षुष विज्ञान, परावर्तनाचे नियम, इन्द्रधनुष्य, गुरुदर्शक भिंग हे याचे संशोधनाचे विषय होते. खगोलाचा नव्या पद्धतीने अभ्यास करून त्याने पंचांगाची सुधारणा करण्याचे प्रयत्न केले होते. गणित, हवामान इत्यादि सर्वच विषयांत याची गति अकुंठित होती आणि त्यामुळे त्याचीं मतें धर्मपीठाला पाखंडी वाटून त्याने चोवीस वर्षे त्याला कारागृहांत बद्ध करून ठवलें होतें.
 प्रयोगसिद्ध ज्ञान व रोमच्या पीठाला मान्य असलेले रूढ ज्ञान यांचा संग्राम येथूनच सुरू झाला. कारावासाच्या दीर्घ यातना सोसूनहि बेकन याने सत्याचा व विवेकाचा बळी दिला नाही. म्हणन आधुनिक काळांतील नवविचारांचा व स्वतंत्र, मुक्त मानवी मनाचा प्रभातकाल याच्यापासूनच सुरू झाला, असें मानतात. अल्बर्ट मॅग्नम् (११९३-१२८०) याला रॉजर बेकनच्या खालोखाल याच कारणासाठी मान देतात. हाहि रॉजर बेकनप्रमाणेच अत्यंत धर्मनिष्ठ होता. तरी त्याने सर्व आयुष्य विज्ञान व्यासंगांत घालविलें व पदार्थविज्ञान, निसर्गशास्त्र या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले. निकोलस ऑरिसमी हा वर सांगितलेल्या विल्यम ऑफ ओकहॅमचा शिष्य. इतर ग्रहांबरोबर पृथ्वीहि फिरते हे त्याने सूचित केलें होतें. फ्रॅन्सिस्कन पंथ हा सेंट फ्रॅन्सिस (११८२-१२२६) याने १२०९ साली स्थापन केला. त्याच सुमारास सेंट डॉमिनिक याने डॉमिनिकन पंथांची स्थापना केली. या वेळीं पोपप्रणीत जो रुढ धर्म तो कर्मकाण्डप्रधान झाला असून भोगलोलुपता, धनलोभ, भ्रष्टता हीच धर्मगुरूंची प्रधान लक्षणें झालीं होतीं. या हीन प्रवृत्तींचा निषेध करून या नव्या पंथांनी वैराग्य, रंजल्या गांजलेल्यांची सेवा, इंद्रियनिग्रह, नीतिनिष्ठा, निरहंकार वृत्ति, हीं खरीं धर्माचीं लक्षणें असा उपदेश करण्यास प्रारंभ केला. हा उपदेश करीत व दीन, अनाथांची सेवा करीत या पंथाचे अनुयायी केवळ युरोपांतच नव्हे तर चीन, अरबस्थान, हिंदुस्थान, आफ्रिका अशा दूरच्या देशांतहि भ्रमण करीत. ते अनवाणी चालत, दारिद्र्याची त्यांनी शपथ घतलेली असे. आणि दलितांची सेवा हे त्यांचें व्रत असे. या दोन्ही पंथांचे संस्थापक ज्ञानोपासक नव्हते. विद्वत्ता, पांडित्य यांवर त्यांचा विश्वास नव्हता. श्रद्धा, भक्ति, उपासना, नामस्मरण हाच खरा मार्ग होय, अशी त्यांची निष्ठा होती. तरीहि रूढ धर्ममताला निंद्य मानून, स्वतंत्र बुद्धीने धर्माचीं लक्षणें निश्चित करून, त्यांचे प्रतिपादन करण्यांत यांनी जी निर्भय वृत्ति प्रकट केली, जें विचारस्वातंत्र्य अवलंबिले व आपल्या अनुयायांना उपदेशिलें त्यामुळे त्या पंथांत हळूहळू ज्ञानाची उपासना सुरू झाली आणि त्यांच्यांतूनच अल्बर्ट मॅग्नस व रॉजर बेकन यांसारखे नवयुगाचे प्रवर्तक उदयास आले. बुद्धिस्वातंत्र्याचा, विवेकनिष्ठेचा महिमा हा असा आहे.

अंधश्रद्धेला शह

 मागे अनेक ठिकाणी सांगितलें आहे की, इहवादाचा धर्माला विरोध नाही. परमेश्वरी श्रद्धेचें त्याला वावडे नाही. पण ती श्रद्धा, बुद्धि, विचारस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा सत्यसंशोधन, प्रयोगसिद्ध ज्ञान यांना शृंखला घालूं लागली की, समाजाचा घात करते. मानवी प्रज्ञेची व कर्तृत्वाची हत्या करते. पोपच्या धर्मपीठाने शेकडो वर्षे ही हत्या चालविली होती. नवलाची गोष्ट अशी की, फ्रॅन्सिस्कन्, डॉमिनिकन् या धर्मपंथांतील लोकांनीच प्रथम पोपच्या त्या घातकी धर्माला शह देऊन मानवी मन मुक्त केलें.
 कोपरनिकसची खगोलविज्ञानाची परंपरा पुढे टायकोब्राही, केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन, या थोर शास्त्रज्ञांनी चालविली व सर्व खगोलाचें रूपच पालटून टाकलें. टायकोब्राही याने एक नवा तारा शोधून काढला. केप्लरने गतीच्या तीन नियमांचें स्थूल रूप सिद्ध केलें. न्यूटनचे गुरुत्वाकर्षण याच पायावर पुढे उभें राहिलें. गॅलिलिओने दुर्बीण सिद्ध करून सर्व अंतरिक्ष सूक्ष्मपणे न्याहाळण्याची सोय करून दिली. चंद्रावरचे डोंगर, सूर्यावरचे डाग, गुरूचे उपग्रह, शनीची कडीं, शुक्राच्या कला हे अद्भुत चमत्कार त्याने दुर्बिणींतून स्वतः पाहिले व लोकांना दाखविले. लोकांना हा नवा खगोल पाहून मोठा हर्ष झाला. ते सहस्र संख्येने गॅलिलिओच्या शास्त्रीय व्याख्यानांना येऊं लागले. पण यामुळे रोमच्या पीठाचें पित्त भडकलें. त्याने त्याला पकडलें व 'आपले सिद्धान्त खोटे आहेत' असें लिहून देण्यास फर्मावलें. गॅलिलिओ आता वृद्ध झाला होता. धार्मिक न्यायपीठाच्या कारागृहांतील यातना सोसणें त्याला शक्य नव्हतें. त्याने तसे लिहून दिलें.
 जिऑरडॅनो ब्रूनो (१५४८- १६००) या शास्त्रज्ञाला १६०० सालीं पृथ्वीच्या भ्रमणाचा सिद्धान्त सांगितल्याबद्दल जिवंत जाळण्यांत आलें होतें. गॅलिलिओने माघार घेतल्यामुळे तो बचावला, पण तो आपलें कार्य करून गेला होता. त्याने कांही नुसतें तात्त्विक मत सांगितलें नव्हतें. लोकांना, सहस्रावधि लोकांना, त्याने नवा खगोल प्रत्यक्ष दाखविला होता. धर्मभ्रष्ट, पतित, अंध अशा रोमच्या पीठावर त्याचा परिणाम झाला नाही; पण लोकांच्या मनांत त्याने निश्चित परविर्तन घडवून आणलें होते. कांही धर्मगुरूंनाहि त्याने जिंकलें होतें. गॅलिलिओच्या खटल्यांत कार्डिनल वॅलरमाइन याने प्रमुखपणें भाग घेतला होता. गॅलिलिओच्या भाषणाचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की, तो म्हणाला, "सूर्य स्थिर असून पृथ्वी फिरते याचें प्रत्यक्ष प्रमाण दिसल्यानंतर आपण बायबल पुन्हा वाचलें पाहिजे; आणि या नव्या सिद्धान्ताच्या विरुद्ध अशीं जीं वचनें आपल्याला आढळतील त्यांचा अर्थ आपल्याला कळला नव्हता हें ध्यानांत घेऊन त्यावर नवें भाष्य केलें पाहिजे. जें प्रत्यक्ष दिसलें तें खोटें म्हणणें केव्हाहि युक्त नाही." याचेंच नांव इहवाद !
 शब्दप्रामाण्य त्याज्य मानून प्रयोगप्रामाण्य स्वीकारणें, बुद्धिप्रामाण्याचा अवलंब करणें हेंच इहवादाचें सार आहे. याच अर्थाने फ्रॅन्सिस बेकन म्हणाला, की, "सत्यदेवता ही बायबलची कन्या नसून मानवी प्रज्ञेची कन्या आहे." बायबलच्या आधारे सत्य न ठरवितां सत्याच्या आधारें बायबलचा अर्थ ठरवावा हे लोकांना पटू लागलें, हेंच नव्या मनूचें लक्षण होय.

नव्या मनूचा निर्माता

 भूगोल, खगोल यांच्याप्रमाणेच रसायन, वनस्पतिशास्त्र व शरीरविज्ञान यांनीहि सृष्टीचें बायबलप्रणीत रूप खरें नसून ते फार निराळें आहे, हें लोकांना दाखवून मानवी बुद्धीची प्रतिष्ठा वाढविली. प्रबोधन युगाचा कसलाहि विचार करावयाचा असला तरी लिओनार्डो दि व्हिन्सी (१४५२- १५१९) या थोर पुरुषाला नमन करूनच पुढे जावें लागतें. रसायन, पदार्थविज्ञान, शरीरविज्ञान, गणित, ज्योतिष, भूगोल, खगोल, स्थापत्य या सर्व शास्त्रांत आणि चित्रकला, मूर्तिकला, संगीत या कलांत तो सर्वत्र मूर्धस्थानी होता. गॅलिलिओ, न्यूटन, फ्रॅन्सिस बेकन, हार्वे, जेम्स वॅट या सर्व शास्त्रज्ञांचा तो पूर्वगामी होती. इतिहासकार म्हणतात की, हा इटलीचा सुपुत्र म्हणजे पूर्ण पुरुषावतार होता. त्याचे ग्रंथ व त्याच्या टिपणांच्या वह्या या एकोणिसाव्या शतकांत प्रसिद्ध झाल्या. शास्त्रज्ञ म्हणतात की, त्या त्याच्या मृत्युसमयी प्रसिद्ध झाल्या असत्या, तर पुढील शास्त्रज्ञांचे शतकाशतकांचे श्रम वांचले असते.
 अग्रिकोला हा जर्मन शास्त्रज्ञ (१४९०- १५५५). त्याने प्रायोगिक रसायन- शास्त्रावर ग्रंथ लिहिले, खनिजशास्त्राचा पाया घातला आणि भू-विज्ञान या विषयांतहि संशोधन केले. अल्पिनी प्रॉस्पेरो (१५५३- १६१७) हा इटालियन वनस्पतिशास्त्रज्ञ. पश्चिम युरोप, पूर्व युरोप, इजिप्त येथे हिंडून त्याने अनेक वनस्पतींचा स्वतः अभ्यास केला, कॉफी, खजूर यांचे विशेष संशोधन केलें आणि वनस्पतींतील नर व मादी भिन्न करून दाखविले. वैद्यकशास्त्रांत हीच प्रवृत्ति दिसू लागली. स्वतः मूळ सृष्टीचें अवलोकन करणें! चौदाव्या शतकांतच काही वैद्य स्मशानांतून प्रेतें पळवून त्यांची चिरफाड करून मानवी शरीराचा अभ्यास करू लागले होते. प्रेत उकरणें व फाडणें याला धर्मशास्त्राचा विरोध होता. कारण त्या मानवांना पुढे मोक्ष मिळणार नाही असा त्याचा सिद्धान्त होता. पण तो धूतकारुन वैद्य लोक प्रेतांचा चोरून अभ्यास करू लागले. अँड्रिया व्हेसॅलियस् (१५१४- १५६४) हा फ्लेमिश शरीरशास्त्रज्ञ आधुनिक शरीरविज्ञानाचा जनक होय. हा वरील पद्धतीनेच अभ्यास करीत असे. त्यासाठी धर्मपीठाने त्याला शिक्षाहि ठोठावली होती. पण त्या प्रत्यक्ष प्रायोगिक अभ्यासामुळे ग्रीक शास्त्रज्ञ गेलन याच्या तत्काली रूढ असलेल्या ग्रंथांतील दोनशे चुका त्याला सुधारता आल्या ! तरीहि रोमन धर्मपीठाने गेलनलाच प्रमाण मानले.
 वरीलपैकी जवळ जवळ प्रत्येक शास्त्रज्ञाला रोमच्या पीठाने तीर्थयात्रा, मुंडन यांसारख्या साध्या प्रायश्चित्तापासून देहान्त प्रायश्चित्तापर्यंत शिक्षा केल्या होत्या, हें ध्यानांत घेतां, अंध धर्माची सर्वकष सत्ता समाजाच्या प्रगतीला किती घातक असते व त्या प्रगतीसाठी इहवादाची, मुक्त प्रज्ञेची, बुद्धिस्वातंत्र्याची किती आवश्यकता असते हें कळून येईल.

मानवतावादाचा पुरस्कार

 मुक्त प्रज्ञा, स्वतंत्र संशोधन, स्वतंत्र निर्णयशक्ति हे प्रबोधनयुगाचें जें लक्षण त्याचा येथवर विचार केला. आता मानवता (ह्युमॅनिझम), मानवधर्म हें जे दुसरें लक्षण त्याचा विचार करूं. सहिष्णुता, उदारमतवाद, सामाजिक न्याय, समता, प्रवृत्तिपरता, आशावाद इत्यादि प्रबोधन- युगाचीं लक्षणें इतिहासवेत्त्यांनी दिली आहेत. त्या सर्वांचा समावेश मानवता या लक्षणांत कांही पंडितांनी केला आहे. त्याच व्यापक अर्थाने येथे तो शब्द घेतला आहे. पेट्रॉर्क, इरॅसमस्, थॉमस मूर व कॉलेट हे प्रबोधन- युगांतले प्रसिद्ध मानवतावादी पुरुष. त्यांतील पेट्रॉक हा चौदाव्या शतकांतला असून राहिलेले तिघे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धातले आहेत.
 हे तिघे समकालीन असून एकमेकांचे परममित्र होते. त्यांतील इरॅसमस् हा मूळ डच होता. पण मूर व कॉलेट या आपल्या इंग्लिश मित्रांच्या सहवासासाठी तो इंग्लंडमध्ये इतक्या वेळा येई की, तो जवळ जवळ इंग्लिशच झाला होता. प्रबोधन- युगांतील अग्रगण्य पुरुषांत इरॅसमसची गणना होते. याला सर्व युरोपने गुरु मानलें होतें. रोमन सम्राट्, देशोदेशींचे राजे, सरदार, पंडित, धर्मगुरु आणि पोपहि याला मान देत. ते याच्या सहवासाचे भुकेले असत. त्याने अनेक ग्रंथ लिहिले. त्यांत त्याने रुढ धर्मावर तीव्र शब्दांत अत्यंत उपरोधिक टीका केली आहे. त्या वेळचा धर्म कर्मकांडप्रधान होता. धर्मगुरु शब्दांचा चोथा चघळीत व भावार्थाची उपेक्षा करीत. त्यांचें पांडित्य शुष्क होतें. रोमचें धर्मपीठ अत्यंत असहिष्णु होतें, धर्मभ्रष्ट होतें, धर्माचार्य दुष्ट होते, क्रूर होते. इरॅसमनने या सर्व दुर्लक्षणांवर नुसता भडिमार केला आहे. तो म्हणतो, हे धर्मवेत्ते कुजलेले आहेत, त्यांची वाणी अभद्र आहे, त्यांचें वर्तन असभ्य आहे व खऱ्या विद्येची त्यांना ओळख नाही. 'इन् प्रेज ऑफ् फॉली' हा त्याचा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय झाला होता. बहुतेक सर्व लोक त्या काळी निरक्षर असूनहि त्याच्या हयातीतच या ग्रंथाच्या सत्तावीस मोठ्या आवृत्त्या वृ निघाल्या आणि आश्चर्य असे की, पोपनेहि त्याचें स्वागत केलें. नवा मनू आल्याचें हें फार मोठें लक्षण आहे.

सहिष्णुतेची गरज

 युरोपांतल्या उदारमतवादाचा इरॅसमस् हा संस्थापक मानला जातो. मानवतावाद तो हाच. सहिष्णुता हें त्याचे पहिले लक्षण. आपल्याहून इतर धर्मांचं तत्त्वज्ञान, त्यांचे सिद्धान्त खरे असूं शकतील हें मान्य करून, त्या धर्मांचाहि आपल्याइतकाच मान ठेवणें याचें नांव सहिष्णुता. सर्वधर्मसमानत्व तें हेंच. भौतिक विद्या, ज्ञान या विषयीहि इरॅसमसची हीच दृष्टि होती. विद्या ही विद्येसाठी नाही. मन, बुद्धि स्वतंत्र व्हावी, त्यांवर उदार संस्कार घडावेत, ह्यासाठी विद्या हवी; आणि ही विद्या म्हणजे त्याच्या मतें ग्रीक विद्या होय. हे चौघेहि मानवतावादी पुरुष ग्रीकविद्येचे पुरस्कर्ते होते. त्या ग्रंथांची भाषांतरें करणें, त्यांचे अध्ययन-अध्यापन करणें, विद्यापीठांतून त्यांचा अभ्यास व्हावा अशी व्यवस्था करणें यासाठी ते आटोकाट प्रयत्न करीत. कारण या विद्यमुळे मन्वन्तर घडावयाचें आहे हें त्यांनी जाणलें होतें.
 कॉलेट हा इंग्लंडमधला ग्रीक विद्येचा अत्यंत मोठा पंडित. त्या विद्येच्या आधारेच धर्मग्रंथांची ऐतिहासिक चिकित्सा करण्यास तो शिकला. शब्दांचें जंजाळ बाजूला करून ग्रंथकर्त्याच्या भावार्थाकडे पाहावें, असें तो सांगत असे. 'सेंट पॉल स्कूल' या शाळेचा तो संस्थापक व प्राचार्य होता. या शाळेवर धर्माचें नियंत्रण येऊ द्यावयाचें नाही, असा त्याचा कटाक्ष होता. तीर्थयात्रा, यांत्रिक धर्मविधि यांवर त्याचा विश्वास नव्हता. परमेश्वर हा कर्मकांडाच्या चौकटींत बसणें शक्य नाही, असें तो म्हणे. सर थॉमस मूर याने 'युटोपिया' (मनोराज्य) या आपल्या ग्रंथांत (इ. स. १५१६) असेच विचार मांडले आहेत. त्या आदर्श राज्यांत शिक्षण सर्वांना- पुरुषां प्रमाणेच स्त्रियांनाहि- उपलब्ध होतें. तेथले कायदे सौम्य होते. (इरॅसमस, मूर, कॉलेट हे सर्वच स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते होते). सर्वत्र सहिष्णुता होती. थोडक्यांत म्हणजे, तें आजच्या काळचे कल्याणकारी राज्य होतें. वायक्लिफप्रमाणेच मूरनेहि आपल्या ग्रंथांत साम्यवादी विचार मांडले आहेत. प्रत्येकाने मर्यादित तास काम करावें व राहिलेला वेळ विद्या, कला, क्रीडा यांत घालवून मनोरंजन करावें अशी ही विचारसरणी आहे. निवृत्तिवादाचा आश्रय करून सर्व समाजाने जीवनाला सुतकी कळा आणावी, हें प्रबोधन- युगाला मान्य नव्हतें. हे सर्व पंडित आनंदवादी, आशावादी व प्रवृत्तिवादी होते. इहवादाप्रमाणेच मानवतावादाचीहि अशी आनंदवादी, उल्हासवादी दृष्टि होती.
 ग्रीक विद्या प्रथम इटलीमध्ये आली आणि ग्रीसमध्ये तिने जें फळ ग्रीकांना दिलें तेंच आता ती इटलीला देऊं लागली. इ. स. १३४० ते १५४० हा इटलीच्या प्रबोधनाचा काळ होय. फ्लॉरेन्स, व्हेनिस, मिलान या नगरराज्यांत आणि रोममध्येहि या काळांत विद्या, कला, साहित्य यांना, प्राचीन काळच्या ग्रीससारखाच, बहर आला होता. पेट्रार्क व लिओनार्डो दि हिन्सी यांचा उल्लेख वर आलाच आहे. डांटे, वोकॅशिओ, मायकेल एंजलो, लॉरेंझो, मॅकिअव्हिली, डोनाटेलो, अलवर्टी हीं नांवें त्यांच्यासमवेत उभी केली की, इटलीच्या कर्तृत्वाने डोळे दिपूं लागतात. यांतले कोणी महाकवि आहेत, कोणी कादंबरीकार आहेत. मायकेल एंजलोसारखे कोणी शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत. गुइसिआर्डिनीसारखे इतिहासकार आहेत. पॉलिटियनसारखे लॅटिन पंडित आहेत. मॅकिॲव्हिलीचें राजनीतिशास्त्रज्ञ म्हणून आजहि जगांत नांव गाजत आहे. अलवर्टी हा व्हिन्सीसारखाच चतुरस्त्र होता. काव्य, चित्र, शिल्प, नाट्य या कलांबरोबरच यंत्रविद्या, चाक्षुषविद्या या विद्याहि त्याला वश होत्या. याशिवाय इटलींतील इतिहासकार शास्त्रज्ञ, कलाकार, साहित्यिक यांची लांबच लांब यादी देतात. पण ग्रीक विद्येचा म्हणजेच इहवादाचा प्रभाव काय आहे हें एवढ्यावरून सहज ध्यानी येण्यासारखें आहे.

मुद्रणकलेचा शोध

 जर्मनीत प्रबोधन-युग इटलीनंतर शंभर वर्षांनी आलें. १४५० ते १५०० या अर्धशतकांत तेथे विद्याकलांचा इटलीसारखाच विलास दिसत होता. फिशर हा इतिहासकार म्हणतो, त्या काळांत जर्मनीत जीं आठ ज्ञानपीठे स्थापन झालीं तींच जर्मन विद्वत्ता, पांडित्य, शास्त्राभ्यास यांचा पाया आहे. जर्मनीची या काळांतली सर्वांत मोठी देणगी म्हणजे गटेंबर्ग याने शोधिलेली मुद्रणकला ही होय. प्रबोधन- युगांतल्या विद्या, कला, साहित्य यांना चिररूप देऊन समाजांत त्यांचा प्रसार करण्याचें श्रेय या मुद्रणकलेला असल्यामुळे त्या वेळी झालेल्या क्रांतीचें श्रेय गटेंबर्गला व जर्मन मुद्रकांना देण्यांत येतें.
 छापखाना ही मोठी शक्ति आहे. क्रांतिकार्यांत तिचें स्थान निस्तुळ आहे, हें जाणून, जर्मन मुद्रक मिशनऱ्यांच्या कर्तव्यबुद्धीने व उत्साहाने सर्व युरोपभर आपली कला घेऊन जात असत. पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्यांनी इटलींत शंभर व स्पेनमध्ये तीस छापखाने काढले व जवळजवळ ९० लक्ष पुस्तकें छापली. म्हणून मुद्रणकलेला त्या काळी जर्मनकला असेंच म्हणत. उदारमतवादाच्या प्रसाराला सोळाव्या शतकांत तिने मोठेच साह्य केलें. या कलेप्रमाणेच जर्मनींत स्थापत्य, शिल्प, संगीत, चित्र या कलांतहि पुष्कळ प्रगति झाली होती. 'नुरेंबर्ग' या जर्मन नगरीला जर्मनीतील 'फ्लॉरेन्स' असें त्या काळी म्हणत. निकोलस क्रेब्ज (कार्डिनल कुसानस) (१४०१-६४) हा जर्मन प्रबोधनाचें प्रतीक म्हणून समजला जातो. तो अत्यंत धर्मनिष्ठ असून मानवतावादी होता. गणित, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र या शास्त्रांत कोपरनिकस, हेगेल व डेकार्टस् यांचा तो पूर्वागामी होता, असें म्हणतात.

सामर्थ्यांचा अभाव

 आता प्रश्न असा येतो की, अशी अभूतपूर्व जागृति होऊन इटली व जर्मनी येथे सुरू झालेलें प्रबोधन युग त्याचा सोळाव्या शतकाच्या मध्याला अस्त कशाने झाला ? बुद्धिप्रामाण्य, मुक्तप्रज्ञा, सहिष्णुता, मानवता यांसारखीं जीं थोर तत्त्वें- त्यांचा पुरस्कार करणाऱ्या लोकांच्या ठायीं राष्ट्राचें संरक्षण करण्याइतकें सामर्थ्य असावें लागतें. तें या दोन्ही देशांत नव्हतें ! दोन शतकें इटलींतील नगरराज्ये कांहीसें ऐक्य साधून स्वसंरक्षण करण्यास समर्थ झाली. पण राष्ट्रभावनेवांचून हें ऐक्य फार काळ टिकणें शक्य नव्हतें. याच वेळी नेपल्ससंबंधी फ्रान्स व स्पेन यांच्यांत वाद निर्माण झाला व त्या दोन्ही देशांनी आपल्या सेना इटलींत घुसविल्या. त्यांच्यांतील या लढाया साठ वर्षे चालू होत्या. शेवटीं स्पेनचा विजय झाला. स्पेनचे राजे कडवे, अंध, कॅथॉलिक होते. त्यांची सत्ता इटलीवर प्रस्थापित झाली आणि या देशांतले प्रबोधन संपून तेथे अंधकारयुग सुरू झाले. (दि हिस्टोरियन्स हिस्टरी ऑफ् दि वर्ल्ड, खंड ९ वा पृष्ठ ४६२).
 जर्मनींतहि इटलीप्रमाणेच कायम यादवी होती. तेथला रोमन सम्राट् सत्तालोभाने नेहमी पोपच्या अंकित असे. १५१९ च्या सुमारास स्पेनचा राजा पांचवा चार्लस् हा पवित्र रोमन सम्राट् झाला. तो एकांतिक कॅथॉलिक असून पोपच्या सत्तेचा कट्टा पुरस्कर्ता होता. अशी युति झाल्यामुळे रोमच्या धर्मपीठाची सत्ता पुन्हा प्रबळ झाली. त्यामुळेच जर्मन प्रबोधनाचा अंत झाला. पण या वेळी मार्टिन लूथरचा उदय होऊन युरोपच्या इतिहासाला निराळंच वळण लागले.


 पश्चिम युरोपांतील इहवादाचा विकास कसकसा होत गेला तें आपण पाहत आहों. पांचव्या शतकापासून बाराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या प्रदेशावर रोमच्या धर्मपीठाची अंध, दुराग्रही, अनियंत्रित अशी सत्ता होती. तिला पहिले आव्हान राष्ट्रभावनेने दिले आणि प्रबोधनाने तिचा पायाच निखळून टाकला. असे असले तरी इहवादाचा पुढला प्रवास सरळ, बिनधोक, संथ गतीने व निष्कंटक मार्गाने झाला असें मान नाही. धर्मभावना ही अगदी अमर अशी भावना आहे. परमेश्वरावरील श्रद्धेवांचून मानव जगूच शकणार नाही. परलोकाची चिंता पूर्णपणे नष्ट कधीच होणार नाही. ही धर्मभावना नष्ट व्हावी असेंहि इहवादी पंडित म्हणत नाहीत. लोकांच्या या श्रद्धेचा फायदा घेऊन धर्मपीठे, धर्माचार्य धर्माला अत्यंत विकृत रूप देतात व समाजाच्या प्रज्ञेचा, बुद्धीचा आणि कर्तृत्वाचा घात करतात. यावर म्हणजे या धर्मविकृतीवर, या हीन, अमंगळ भ्रष्ट धर्मावर व त्याच्या आधारें सत्ता व धनैश्वर्य मिळवून स्वैर भोगविलास करणाऱ्या धर्माचार्यांवर इहवादाचा आक्षेप असतो. जगांत सर्वच देशांत असे धर्माचार्य व धर्मपीठे असतात. पण रोमचें धर्मपीठ व त्या पीठाचे आचार्य जे पोप यांनी या काळांत जी अधःपाताची हीन पातळी गाठली होती तिला सीमाच राहिली नव्हती. रोमचें पीठ म्हणजे सैतानाचेंच पीठ होऊन बसलें होतें. आणि अशाहि स्थितीत त्याला पश्चिम युरोपांतील सत्ताधीशांचें विपुल साह्य मिळत असे. यामुळे आपलें सर्व सामर्थ्य खर्च करून इहवादी प्रेरणांचा निःपात करण्याचा तें पीठ पुनः पुन्हा प्रयत्न करीत असे.
 ते प्रयत्न हाणून पाडून बुद्धिप्रामाण्य, विवेकस्वातंत्र्य, प्रवृत्तिपरता आणि मूळ बायबलातील शुद्ध, सात्त्विक धर्म यांचा पुरस्कार करणारे व त्यापायीं प्राणदंडहि सोसणारे धर्माचार्य, पंडित व तत्त्ववेत्ते युरोपांत अखंड उदय पावत राहिले म्हणून अंध धर्मसत्तेपासून मुक्त होऊन वैभवाच्या शिखरावर तो आरूढ होऊ शकला. गेल्या पांच-सहा शतकांचा युरोपचा इतिहास म्हणजे प्राधान्याने या अंध धर्मसत्ता व इहवाद यांच्या संघर्षाचा इतिहासच आहे. तोच आता पाहवयाचा आहे.

पुनश्च हरिः ॐ

 फ्रान्सच्या फिलिपने पोपला कैद करून ॲन्हिग्नॉन येथे राहवयास भाग पाडलें, त्यामुळे एका धर्मपीठाचीं दोन व पुढे तीन पीठे झाली. त्या पीठांचे तीन पोप, आपणच खरे पोप असा दावा करून परस्परांशी भांडूं लागले. यामुळे त्या पीठाला प्रतिष्ठा, अब्रू अशी राहिलीच नाही. पश्चिम युरोपांतील विचारी धर्माचार्यांना व सत्ताधीशांना याची फार चिंता वाटून, त्यांनी एक धर्ममहामंडळ स्थापन केलें. पोपच्या पीठाची शुद्धि करणें व पोपच्या सत्तेवर कायमचें नियंत्रण घालून ती घटनाबद्ध करणें हीं या मंडळाची दोन उद्दिष्टें होतीं.
 ही चळवळ युरोपच्या इतिहासांत 'कन्सिलियर मुव्हमेंट' म्हणून प्रसिद्ध आहे. १४०९ ते १४४३ या दीर्घ काळांत धर्म महामंडळाची चार मोठीं अधिवेशनें झाली. पण त्यांतून फलनिष्पत्ति कांही झाली नाही. मंडळाने भिन्न पीठांवर असलेल्या पोपना पदच्युत केलें आणि रोमच्या पीठावर सहावा अलेक्झांडर याची नियुक्ति केली. हा पोप प्रत्यक्ष सैतानच होता. आपल्या सत्तेवर नियंत्रण बसविण्याची कल्पना त्याला मान्य होणें अशक्यच होतें. त्याने नाना कारस्थानें करून मंडळाच्या सभासदांत फूट पाडली व मंडळाला निर्बल करून टाकले; शिवाय मंडळाचें एकंदर सर्व ख्रिस्ती विश्वाची एकसूत्री व्यवस्था करण्याचें जें धोरण, तें स्वतंत्र राष्ट्रभावनेने प्रेरित झालेल्या राजकीय सत्ताधीशांना मान्य नव्हतें. रोमचें धर्मपीठ अत्यंत भ्रष्ट होतें. पण तें शुद्ध व सात्त्विक झालें असतें, तरी त्याची सत्ता आता राष्ट्रीय शासनांना असह्यच झाली असती.
 पोपवर नियंत्रण किती घालावें याविषयी धर्माचार्यांतहि मतभेद होते. त्यामुळे रोमचें धर्मपीठ घटनाबद्ध करण्याचा हा प्रयत्न फसला व पोपची धर्मसत्ता पूर्वीप्रमाणेच सुलतानी व मदांध होऊन वसली. पण प्रबोधन-युगाने निर्माण केलेल्या प्रेरणा अजून पूर्ण जिवंत होत्या. तेव्हा त्यांनी प्रेरित असे जे धीरपुरुष त्यांनीहि या भ्रप्ट, अंध, जीर्णवादी सत्तेशीं मुकाबला करण्यासाठी पुनश्च हरिः ॐ म्हणून शुद्ध धर्मतत्त्वांचा घोष सुरू केला.

मुक्तिपत्रकांवर भडिमार

 या धीरपुरुषांचा अग्रणी म्हणजे मार्टिन लूथर हा होय (१४८३- १५४६). तरुणपणींच याने 'सेंट ऑगस्टाइन' या मठांत जाऊन जोग घेतला होता. पण त्याचें मन भोवतालचा विकृत धर्म पाहून अस्वस्थ होत असे. त्यांतच १५१० सालीं तो रोमला गेला. तेथल्या धर्मपीठाचें अमंगळ रूप पाहून त्याला किळस आली. परत आल्यावर त्याने जाहीरपणे सांगितले की, "रोम ही एक बाजारबसवी आहे. जो जास्त पैसे देईल त्याला ती वश होते. या धर्मपीठाचा व ख्रिस्ती धर्माचा मुळीच संबंध नाही." याच वेळीं त्या पीठाचे मुनीम देशोदेशीं, गावोगावी जाऊन मुक्तिपत्रके विकून अमाप पैसा गोळा करीत होते. ही भ्रष्टता पाहून लूथरचा संताप अनावर झाला व त्याने आपल्या भाषणांतून या मुक्तिपत्रकांवर भडिमार सुरू केला. "पश्चात्तापावांचून शुद्धि नाही व श्रद्धेवांचून मुक्ति नाही. मानवाला दक्षिणा घेऊन मुक्ति देण्याचें सामर्थ्यं जगांत एकाहि धर्मपीठाला नाही," असें जाहीर करून त्याने आपलें धर्मसुधारणेचें ९५ कलमी पत्रक विटेंबर्गच्या चर्चच्या दारावर चिकटवून दिलें.
 त्या वेळीं स्पेनचा राजा पांचवा चार्लस् हा पवित्र रोमन सम्राट् होता. तो पक्का जीर्णमतवादी असून धर्मसुधारकांचा हाडवैरी होता. जर्मनींतल्या धर्माचार्यांची त्याच्याकडे लूथरविरुद्ध अर्ज केला. मुक्तिपत्रांना विरोध केल्यामुळे रोमच्या पोपच्या अंगाची आग झाली होती. त्याच्याकडेहि अर्ज गेलेच होते. त्याने आपले भयंकर अस्त्र लूथरवर फेकलें. त्याने लूथरवर बहिष्कार पुकारला. पण त्या बहिष्कारांत पूर्वी जें सामर्थ्य होतें तें आता राहिलें नव्हतें. प्रबोधनयुगाने लोकांच्या पोप श्रद्धेला हादरा दिला होता. लूथरला हें चांगलें माहीत होतें. कारण मुक्तिपत्रकांविरुद्ध व एकंदर रोमपीठाविरुद्ध तो जीं भाषणें करी त्यांना हजारो लोक येत. तो जी पत्रके काढी त्यांच्या प्रती हातोहात खपत. राजे, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी- सर्व सर्व तीं पत्रकें वाचीत. त्यांवर सम्राटाने व पोपने बंदी घातली होती, तरी त्यांचा प्रसार थांबला नाही.
 लोकांच्या मनांत तरी एवढी प्रतिकारशक्ति कोठून जागृत झाली ? प्रबोधन- युगाने क्रांति केली होती हें खरें. पण सामान्य जनांपर्यंत तिच्या लाटा अजून पोचल्या नव्हत्या. त्यांना तत्त्वनिष्ठेने, बुद्धिप्रामाण्याने येणारे मनःसामर्थ्य येण्यास अजून फार अवकाश होता. रॉजर बेकन्, कोपर्निकस यांची नांवेंहि त्यांनी ऐकली नव्हतीं. पण तत्त्वनिष्ठा त्यांना समजत नसली, तरी आता राष्ट्रनिष्ठा त्यांना समजूं लागली होती. लूथर हा जर्मन होता आणि त्याला निर्दाळू पहाणारा रोमन सम्राट् चार्लस् हा स्पॅनिश होता. आणि पोप तर कायमचा परकी होता. यामुळे जर्मन राष्ट्र लूथरच्या मागे उभे राहिलें.

मुक्तिपत्रांची जाहीर होळी

 जर्मन शेतकरीवर्ग हा राष्ट्रीय भावनेने भारला होताच. पण आणखी एका कारणाने त्या शेतकऱ्यांना चेतविलें होतें. पोपचे धर्मप्रचारक नाना तऱ्हेचे कर वसूल करण्यासाठी त्यांना अक्षरश: पिळून काढीत असत. जर्मन सरंजामदार हे तर त्यांचे पिढ्यान् पिढ्यांचे वैरी होते. आणि त्या शेतकऱ्यांना माहीत होतें की, रोमन चर्चचा त्या सरंजामदारांना पाठिंबा होता. अशा स्थितीत "प्रत्येकाला बायबल स्वतः वाचण्याचा अधिकार आहे, मोक्षासाठी धर्मगुरु या मध्यस्थाची गरज नाही, पोपला लोकांवर कर बसविण्याचा अधिकार नाही, मोक्षासाठी मुक्तिपत्रकें विकत घेण्याची गरज नाही." या लूथरच्या घोषणा किसानांना अत्यंत प्रिय वाटल्या व तेहि पोपविरुद्ध उसळून उठले. हे सर्व जाणूनच लूथरने पोपचें तें बहिष्कारपत्र जाहीरपणें चव्हाट्यावर जाळून टाकलें.
 सर्व ख्रिस्ती विश्वांत लूथरच्या या कृत्यामुळे हाहाकार उडाला. धर्माचार्यांना तर हा भूकंपच वाटला. विश्वाचा अंतकाळ जवळ आला, असें पोप-भक्तांना वाटलें. याची दखल घेतली नाही तर आपलें साम्राज्य कोसळेल अशी भीति सम्राट् चार्लस याला वाटली आणि वर्म्स या गावीं धर्मसभा घेऊन त्याने लूथरला त्या सभेपुढे जाब देण्यासाठी उभे राहण्याचा हुकूम दिला. सभेपुढे उभे राहून सम्राटाकडे रोखून पाहत लूथरने निर्भयपणें जवाब दिला की, "माझे सिद्धान्त, माझीं मतें खोटी आहेत, चुकीचीं आहेत असें बायबलच्या आधारें सभेने सिद्ध करून द्यावें. तें होत नाही तोपर्यंत माझ्या पत्रकांतील एक शब्दहि मी परत घेणार नाही. कारण तसें करणें म्हणजे विवेकाच्या विरुद्ध वागणें होय. तें पाप आहे." सम्राट् अत्यंत संतापला. पण सभेला येण्याचा हुकूम देतांना त्याने लूथरला अभय दिलें होतें म्हणून त्याने त्याला जाऊं दिलें.
 अर्थात् सर्व जनसागर त्याच्या पक्षाचा होता हेंच खरें कारण होतें. लूथर सभेंतून बाहेर पडतांच सॅक्सनीचा राजा याने आपलें लष्कर त्याच्या संरक्षणार्थं उभे केलें व वार्टबर्ग येथील किल्ल्यांत त्याला नेऊन कडेकोट बंदोबस्तांत सुरक्षित ठेवलें. एक वर्षाने लूथर त्या किल्ल्यांतून बाहेर पडला तेव्हा त्याने प्रसृत केलेल्या तत्त्वज्ञानाच्या ज्वाळा सर्व उत्तर युरोपांत पसरल्या होत्या. जीन कालव्हिन् हा लूथरचा समकालीन. तो त्याच्याइतकाच मोठा धर्मसुधारक होता. झ्विंगली हें नांव जवळ जवळ तितकेंच प्रसिद्ध आहे. इंग्लंडमध्ये क्रॅनमर व लॅटिमर यांनी धर्मसुधारणेसाठी आत्मबलिदान केलें. या सोळाव्या व पुढल्या सतराव्या शतकांत लहानमोठ्या हजारौ, अक्षरश: हजारो, सुधारकांनी या धर्मपरिवर्तनासाठी तुरुंगवास, हद्दपारी, अघोरी छळ, आणि प्राणदंड अशा यातना भोगल्या, पण आपलीं तत्त्वें सोडली नाहीत. इंग्लंडमध्ये लॅटिमर बरोबरच रिडले याला अग्निस्तंभाशी बांधण्यांत आलें होतें. मृत्युपूर्वी लॅटिमर रिडलेला म्हणाला मित्रा, धीर सोडूं नको. आपण परमेश्वरीकृपेने आज इंग्लंडमध्ये अशी ज्योत पाजाळूं की, जी कधीहि विझणार नाही."

लॉयलॉची प्रतिक्रांति

 ही धर्मक्रांतीची लाट अशीच सर्व युरोपभर पसरली असती, तर अंध धर्मसत्तेच्या मगरमिठींतून सोळाव्या शतकाअखेरच तो मुक्त झाला असता. पण तसें झाले नाही. याच वेळी प्रतिक्रांतीचीहि तयारी होत होती. आणि लूथरप्रमाणेच तिला एक जबरदस्त नेता लाभला होता. त्याचें नांव इग्नेशस लायलॉ. लायलॉ हा एक निवृत्त स्पॅनिश लष्करी अधिकारी. लूथरच्या प्रोटेस्टंट पंथाचें ख्रिस्ती धर्मावर होत असलेले आक्रमण त्याला पाहवेना. म्हणून त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याच्या निर्धाराने त्याने १५३४ साली जेसुइट पंथांची स्थापना केली. १५४० साली त्याला पोपने मान्यता दिली आणि मग पंथाचे कार्य अत्यंत वेगाने सुरू झालें.
 लायलॉच्या अंगीं ध्येयवाद, वक्तृत्व, संघटनाचातुर्य, धर्मनिष्ठा, वेधशक्ति अशा अनेक गुणांचा परिपाक झाला होता. त्याला भराभर अनुयायी मिळाले, लष्करी शिस्त हा या पंथाचा विशेष होता. लष्करांत सेनापतीच्या आज्ञा जशा विनतक्रार पाळतात तशाच जेसुइट पंथांत पाळल्या जातात. पूर्ण, अंध शब्दप्रामाण्य हा पंथाचा दुसरा विशेष होय. "हा कागद पांढरा आहे. पण तो काळा आहे असें चर्चने सांगितलें, तर तें तत्काळ मान्य केलें पाहिजे." हा त्याचा कायदा होता. याशिवाय लायलॉने जेसुइट पंथीयांना आणखी दोन गुणांची जोपासना करण्यास सांगितले. ज्ञानोपासना व खडतर तपश्चर्या हे ते दोन गुण होत. लायलॉ मोठा धोरणी व समयज्ञ पुरुष होता. रोमचें पीठ, पोप व बहुतेक सर्व धर्माचार्य हे अत्यंत भ्रष्ट होते. ब्रह्मचर्य हे व्रत त्यांना घ्यावेच लागे. तसें तें घेत पण बहुतेक सर्वांना मुलेबाळे असत. या व्यभिचारजन्य संततीला पुतणे, भाचे, असें म्हणत. पण काही पोप इतके उन्मत्त झाले की, ते जाहीरपणें हीं आमचीच मुले आहेत असे सांगत.
 असल्या चारित्र्यहीन माणसांकडून प्रोटेस्टंट पंथाला थोपविण्याचे कार्य होणें अशक्य आहे, हें इग्नेशस् लॉयलॉने जाणलें होतें. त्याचप्रमाणे नवें भू-विज्ञान, खगोल- ज्ञान, रसायन, गणित या विद्यांमध्ये जे पारंगत नाहीत त्यांना धार्मिक क्रांतीच्या प्रोटेस्टंट तत्त्वांचें खंडन करणें व समाजमनावर सनातन ख्रिस्ती धर्माचीं रूढ तत्त्वं पुन्हा ठसविणें हें साधणार नाही, हेंहि त्याला कळलें होतें. म्हणून प्रत्येक जेसुइट विद्वान असलाच पाहिजे, प्रबोधनयुगांतील विद्यांच्या आधारेंच त्याने रोमन धर्मपीठाचें समर्थन करण्याची कला साधली पाहिजे, असा त्याने दंडक घालून दिला.
 आपल्याकडे जुन्या भटजींना रूढ सनातन धर्माचें समर्थन करण्याची पात्रता मुळीच नव्हती. म्हणून तें कार्य करण्यासाठी नवविद्याविभूषित लोक पुढे आले. कोणत्याहि सुधारणेला विरोध करावयाचा आणि रूढीचें समर्थन करावयाचें हेंच त्यांचें व्रत. त्याअन्वये अस्पृश्यता, जातिभेद, चातुर्वर्ण्य, बालविवाह, विधवाविवाहबंदी, शुद्धिबंदी, वेदवंदी (शूद्रांना वेदपठनास बंदी), समुद्रबंदी, रोटिबंदी या सर्व दुष्ट घातक रूढींचे हे नवे पंडित गाल्टन्, हक्सले, कार साँडर्स, काल पियरसन्, आइन्स्टाईन इत्यादि पाश्चात्त्य शास्त्रज्ञांच्या आधारें समर्थन करूं लागले. गो. म. जोशी, आहिताग्नि राजवाडे, अप्रबुद्ध, बाळशास्त्री हरदास हीं या पंथांतलीं नांवें प्रसिद्ध आहेत. जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य, जातिभेद, वेदांचें अपौरुषेयत्व यांचें आजहि अशा पद्धतीने समर्थन केलें जातें, हें आपण पाहतच आहों. इग्नेशियस् लॉयलॉ यांच्या जेसुइट पंथाने हाच उद्योग, सोळाव्या शतकांत सुरू केला. जेसुइट वाटेल त्या देहदंडनाला तयार असत. थंडी, वारा, ऊन ते मोजीत नसत. दारिद्र्यांत खुषीने राहत. हें त्यांचे देहदंडन व ती नवविद्या या बळावर त्यांनी केवळ युरोपच नव्हे, तर सर्व जग आक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा मनांत धरली. आणि ती आकांक्षा सफल करण्यांत त्यांना विपुल यश लाभलें, हें मान्य केलें पाहिजे.

प्रभावी संस्कार

 प्रबोधन-युगांतील नवविद्या व त्यांतून निर्माण झालेली बुद्धिवाद, व्यक्तिवाद, स्वतंत्र चिंतन, प्रवृत्तिपरता, परिवर्तन वृत्ति, सहिष्णुता ही तत्त्वें यांमुळेच जीर्ण, अंध सनातन धर्माचा पाया हादरला होता. हें जाणून जेसुइटांनी एक धोरण निश्चित केलें. तें असें की, ज्या देशांत त्यांना प्रवेश मिळेल व जेथले सत्ताधारी त्यांना वश होतील त्या देशांतील शिक्षणसंस्था- शाळा, महाशाळा, विद्यापीठें- प्रथम ताब्यात घ्यावयाच्या व नवविद्येच्या साह्यानेच वरील धर्मसुधारणेचीं तत्त्वें कशी निंद्य आहेत व कॅथॉलिक धर्माचीं शब्दप्रामाण्यादि तत्त्वें कशी बरोबर व हितकारक आहेत तें बालतरुण विद्यार्थ्यांच्या बुद्धीवर ठसवावयाचें.
 बालवयांत केलेले हे संस्कार फार प्रभावी ठरत आणि विद्यार्थी कायमचे अंध कॅथालिक होत व प्रोटेस्टंट पंथाशी युद्ध करण्यास उभे ठाकत. सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध व सतरावें संपूर्ण शतक या कालखंडाचा पश्चिम युरोपचा इतिहास म्हणजे या धार्मिक यादवीचा, रक्तपाताचा, क्रूर अत्याचारांचा, नाश, विध्वंस, प्रलय यांचा इतिहास आहे. इंग्लंड, हॉलंड, स्वित्झर्लंड या देशांतील लोकांनी विवेकाचा अवलंब करून या आपत्ति टाळल्या. फ्रान्स, जर्मनी यांना त्यांच्याइतकें यश आले नाही. पण बऱ्याच रक्तपातानंतर त्यांना थोडा थोडा विवेक मधून मधून सुचत असे. पण स्पेन, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, पोलंड, बोहेमिया हे पश्चिम युरोपांतले देश धार्मिक प्रतिक्रांतीला बळी पडून तीनशे वर्षे पुन्हा तमोयुगांत पिचत राहिले. (हिस्टोरियन्स हि. खंड ९ वा, स्पेन, पृष्ठे २३०, ३१) या देशांच्या यशापयशाचा इतिहास इहवादाच्या दृष्टीने फारच उद्बोधक आहे. पण तो पाहण्याआधी या धार्मिक क्रांति- प्रतिक्रांतीचें विवेचन प्रथम पुरें करूं.
 हें विवेचन म्हणजे इहवादाचा उदय, विकास आणि प्रगति-परागति यांचेंच विवेचन होय. 'दि राईज ॲण्ड इन्फ्लुअन्स ऑफ् नॅशनॅलिझम इन् युरोप', या आपल्या विख्यात ग्रंथांत (युरोपांतील बुद्धिवादाचा- कार्यकारणभावाचा उदय व प्रभाव) प्रसिद्ध आयरिश ग्रंथकार लेकी याने हा सर्व इतिहास दिला आहे. त्याचा अवश्य तो सारार्थ पुढे देतों. दैवी, अतिमानुष चमत्कारावरील मानवाची श्रद्धा कमी होऊं लागली की, इहवादाचा उदय होतो. आणि ही श्रद्धा निसर्गनियमांच्या अभ्यासामुळे, पदार्थ- विज्ञान, रसायन, भूगोल, खगोल या शास्त्रांच्या ज्ञानामुळे कमी होत जाते. भूकंप, महापूर, धूमकेतु, चंद्र-सूर्यांना पडणारी खळीं, विद्युत्पात, साथीचे रोग यांची कारणें विज्ञानपूर्व युगांत माहीत नसतात. या सर्व आपत्ति परमेश्वरी रोषांमुळे ओढवतात अशी त्या काळी मानवाची भोळी श्रद्धा असते. ख्रिस्ती धर्मात, मानवाचें पतन मूळ- मानव जो ॲडम त्याच्या पापामुळे झालें व निसर्गत: मानव पापप्रवृत्तीचा आहे, अशी श्रद्धा असल्यामुळे धर्मनिरूपणांत या दैवी आपत्तीचा फारच बाऊ केला जात असे.

ख्रिस्ती धर्मपंडितांचा सिद्धान्त

 ख्रिस्ती धर्माशिवाय अन्य धर्म मोक्ष देण्यास असमर्थ आहेत, असा ख्रिस्ती धर्मपंडितांचा सिद्धान्त आहे. तेव्हा ख्रिस्ती धर्मांतील आज्ञांप्रमाणे आचरण करण्यावांचून गत्यंतर नाही, हें उघडच झालें आणि त्या धर्माचीं मतेंहि- इहपरलोकीच्या प्रत्येक घटनेविषयी मतेंहि- मान्य करणें हाहि धर्माचरणाचाच भाग समजला जात असे. भुतेंखतें, सैतान, चेटुक यांचें अस्तित्व त्या धर्माने मान्य केलें होतें. त्यामुळे देवाप्रमाणेच भुता- खेतांवर, चेटकांवर म्हणजे त्यांच्या अस्तित्वावर मानवाने श्रद्धा ठेवलीच पाहिजे, असा त्याचा दण्डक होता. त्यामुळे मनुष्य चेटक्या आहे किंवा बाई चेटकीण आहे अशी शंका आली, तर त्याला वा तिला जशी देहान्त शिक्षा असे, तशीच चेटुक, भूत, सैतान, यांवर श्रद्धा न ठेवणाऱ्यांनाहि, धर्मपीठे जबर शिक्षा करीत. हॉलंड हें राष्ट्र प्रोटेस्टंट धर्माच्या अवलंबामुळे पुष्कळच प्रगत झालें होतें. तरी १६९१ साली बाल्थसर बेकर या धर्मगुरूला, त्याने भुतेखतें सर्व झूट आहे असें लिहिल्यामुळे, धर्मपीठाने शिक्षा केली होती.
 धर्मग्रंथांतील सिद्धान्तांत सृष्टिघटनांविषयीचे सिद्धान्त येतच असत. आपण ज्या गोलार्धांत राहतों त्याच्या दुसऱ्या बाजूच्या गोलार्धात पशुपक्षी, माणसें आहेत असें मानणें हें ख्रिस्ती धर्माला पाप वाटे. पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे, त्याच्यावर डाग आहेत असें मानणें हें पापच होय आणि ते मानणारा मनुष्य मोक्षाला जाणें शक्य नाही. अशा माणसाला जाळून टाकून त्याचा आत्मा त्या पापी कुडींतून सोडविणें हें धर्माचार्यांना आपले कर्तव्य वाटे. अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की, या बाबतींत प्रोटेस्टंट पंथहि जुन्या पंथाइतकाच अंध होता. विवेक- स्वातंत्र्याचें तत्त्व त्याने मांडलें हें खरें; पण लूथर, काल्व्हिन यांचा चेटकांवर जुन्या धर्माइतकाच विश्वास होता. त्यामुळे प्रोटेस्टंट मताच्या विरुद्ध मतें मांडणारास देहदंड केलाच पाहिजे, असेंच त्यांचें मत होतें. मायकेल सर्व्हिटस् याने हार्वेच्या आधी पाऊणशे वर्षे (१५११-१५५३) रुधिराभिसरणाचा शोध लावला होता. पण काल्व्हिनच्या मतांच्या विरुद्ध त्याने प्रतिपादन केलें. त्यामुळे काल्व्हिनने त्याला जिवंत जाळून मारण्याची शिक्षा दिली. तेव्हा प्रोटेस्टंट हे प्रारंभीं तरी कॅथालिकांइतकेच असहिष्णु होते व लोकभ्रम, भोळया श्रद्धा, अज्ञान यांत फारसे मागे नव्हते. पण विवेक- स्वातंत्र्य, प्रस्थापित सत्तेला आव्हान देण्याची वृत्ति, प्रत्येकाला स्वतः बायबल वाचण्याचा अधिकार आहे हा सिद्धान्त, मध्यस्थाची जरूर नाही हें मत, यांमुळे विज्ञानाचा प्रकाश येतांच ते अंध धर्मसत्तेच्या शृंखलांतून लवकर मुक्त झाले. आणि कला, राजकारण, व्यापार यांना त्यांनी झपाट्याने इहवादी रूप दिलें.

लेकीचा सिद्धान्त

 तेव्हा सृष्टिघटनांविषयीचें लोकांचें अज्ञान हा अंध धर्मसत्तेचा पाया होय व विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो पाया निखळून पडल्यामुळे, खरा कार्यकारणभाव मनुष्याला कळल्यामुळे तो सर्व जीवनाला इहवादी रूप देतो- त्याचें सेक्युलरायझेशन करतो- हा लेकीचा मुख्य सिद्धान्त आहे. निसर्गज्ञानाचा प्रसार होऊं लागला, नवे नवे शोध लागूं लागले, तसे डेकार्ट, मांटेन, वायले यांसारखे तत्त्ववेत्तेहि उदयास येऊ लागले व त्यांनी बुद्धिवादाचा हिरीरीने पुरस्कार केला. रेनी डेकार्ट (१५९६- १६५०) हा अशा तत्त्ववेत्त्यांचा अग्रणी होय. अर्वाचीन तत्त्वज्ञानाचा त्याला जनकच मानतात. त्याने तत्त्वज्ञानाला गणिती पद्धति लावली. त्यामुळे त्याच्या तत्त्वज्ञानाचा पहिला सिद्धान्त अस की, कोणतीहि गोष्ट सिद्ध म्हणून प्रारंभी स्वीकारावयाची नाही. पदार्थविज्ञान असो, अध्यात्मशास्त्र असो, त्याच्या अभ्यासाला आपण अलिप्त मनाने- श्रद्धा किंवा अश्रद्धा कांहीच न बाळगतां- सुरुवात केली पाहिजे. कोणताहि सिद्धान्त पुढे येवो, त्याचा आपण शंका घेऊन, आक्षेप घेऊनच विचार केला पाहिजे, असें त्याचें प्रतिपादन असे. त्यामुळे डेकार्टने युरोपला शंका घ्यायला शिकविलें, असें म्हटलें जातें.
 कॅथॉलिक धर्मावर, रोमन पीठावर हा फार मोठा आघात होता. त्याचप्रमाणे पांढरी दिसणारी वस्तु काळी आहे असें चर्चने सांगितलें तर तें मानले पाहिजे, या जेसुइटांच्या मतावर हा चांगला उतारा होता. पियरी वायले (१६४७-१७०६) हाहि डेकार्टसारखाच बुद्धिवादी तत्त्ववेत्ता होता. याला इतिहासवेत्त व्हाल्टेअरचा गुरु मानतात. चिकित्सा, विश्लेषण केल्यावांचून कोणताहि सिद्धान्त- धर्मसिद्धान्त सुद्धा- स्वीकारावयाचा नाही, हें त्याचें आद्य तत्त्व होतें
 या सर्व तत्त्ववेत्त्यांचा मुकुटमणी म्हणजे इंग्लिश शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेकन हा होय. (१५६१–१६२६) नव्या मानवी कर्तृत्वाचा हा सर्वश्रेष्ठ प्रणेता होय. घटितांचा संग्रह, निरीक्षण, वर्गीकरण या मार्गांनीच म्हणजे प्रायोगिक पद्धतीनेच सत्य शोधलें पाहिजे हें सांगून, त्याने वैज्ञानिक पद्धतीचा पाया घालून दिला. सोळाव्या वर्षीच ॲरिस्टॉटलच्या आधारें केवळ शाब्दिक पांडित्य करणाऱ्या केंब्रिजच्या प्राध्यापकांवर त्याने भडिमार करण्यास प्रारंभ केला होता. तो म्हणे की, "शब्दनिष्ठ अशी ही अध्यात्म धर्माची इमारत जमीनदोस्त केली पाहिजे. समाजाचा उत्कर्ष हे माझें ध्येय आहे. नव्या बौद्धिक संस्कृतीची स्थापना हें माझें कर्तव्य आहे." आणि ॲडव्हान्समेंट ऑफ् लर्निंग, नोव्हम् ऑरगॅनम्, नॅचरल हिस्टरी हे ग्रंथ लिहून त्याने तशी स्थापन केली याविषयी कोठेहि दुमत नाही.
 धर्मक्रांतीचे प्रवर्तक आणि तिचे विरोधक, धर्मसुधारक व जीर्णमतवादी यांच्यांतील सोळाव्या शतकांत सुरू झालेला हा संघर्ष पुढे तीनशे वर्षे चालू होता. जीर्ण पक्षाच्या बाजूने रोमचें धर्मपीठ, जेसुइट पंथ व बहुतेक सर्व कॅथॉलिक धर्माचार्य उभे होते. क्रांतिपक्षाच्या आघाडीला लूथर, काल्व्हिन, झ्विंगली, डेकार्ट, बेकन असे रथी-महारथी होते. अशा या महायुद्धांत ज्या देशांत क्रांतिपक्षाचा विजय झाला त्यांचा सर्वतोपरी उत्कर्ष झाला व ज्या देशांत जीर्णमताचा विजय झाला ते गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत अंधच राहिले. इहवादाशी या उत्कर्षाचा निकटचा संबंध असल्यामुळे त्याचा इतिहास जरा तपशीलाने पाहू.


 स्पेन, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, पोलंड, बोहेमिया हीं सर्व पश्चिम युरोपांतील राष्ट्रेंच आहेत. तरी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड, या पश्चिम युरोपांतील राष्ट्रांशी तुलना करतां ती फार मागासलेली आहेत. गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत तर त्यांची या प्रगत राष्ट्रांशी तुलनाच होऊ शकली नसती. असें कां व्हावें ? हा केवळ दैवयोग आहे काय ? वरवर पाहणारास याचें आश्चर्य वाटतें आणि तेराव्या- चौदाव्या शतकांत, ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन, रोमन धर्मपीठांविरुद्ध उठाव, भूगोल, खगोल, रसायनादि शास्त्रांचा उदय आणि प्रबोधन युगाची सर्व लक्षणें या देशांत दिसूं लागलीं होतीं, असें असूनहि तीं परागतच राहिली हें कळल्यावर तर आश्चर्य दुणावतें.
 पण वर सांगितलेल्या धार्मिक क्षेत्रांतील क्रांति- प्रतिक्रांतीच्या तत्त्वांचा त्या देशांतील इतिहास पाहिला की यांत आश्चर्य करण्याजोगें कांही नाही, समाजाच्या उत्कर्षापकर्षाचे जे इतिहाससिद्ध नियम त्याअन्वयेच हें सर्व घडलें आहे, हें ध्यानांत येतें. प्रबोधन-युगाच्या सर्व तत्त्वांचें बीजारोपण या सर्व देशांत झालें होतें. त्यामुळे तेथील मानवी प्रज्ञेचा विकासहि होऊं लागला होता. पण सोळाव्या शतकांत अंध धर्मसत्तेची त्या देशांत पुन्हा प्रस्थापना झाली आणि तिच्या प्रतिकारार्थं पूर्वीप्रमाणे तेथे कोणी उभे न ठाकल्यामुळे ती बीजें कुजून गेलीं. इहवादाचा त्या देशांत पूर्ण लोप झाला आणि त्यामुळे त्या देशांची प्रगति खुंटली. एवढेच नव्हे, तर ते पुन्हा तमोयुगांत जाऊन घोरत पडले. पश्चिम युरोपांतील वर निर्देशिलेल्या देशांच्या उत्कर्षापकर्षाची अशी ही अगदी साधी कारणमीमांसा आहे. इहवादाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ती अत्यंत उद्बोधक असल्यामुळे तिच्याकडे जरा न्याहाळून पाहणें अवश्य आहे.

पोलंडची कहाणी

 प्रथम पोलंडची कहाणी ऐका. पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोलंड हें जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड यांच्याप्रमाणेच एक प्रगतिपथावरचें राष्ट्र होतें. चौदाव्या शतकांत कॉसिमीर राजाने (१३३०- १३७०) क्रॅको येथे विद्यापीठ स्थापन केलें होतें व तेथे रोमन कायदा, वैद्यक व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास चालू झाला होता. या राजाच्या उदार व सहिष्णु धोरणामुळे इतरत्र ज्यांची कत्तल होत होती त्या ज्यू लोकांना पोलंडने आश्रय दिला होता. १४७४ साली क्रॅको येथे छापखाना आला आणि तेव्हापासून लॅटिनचें वर्चस्व कमी होऊन पोलिश भाषेचा उत्कर्ष होऊं लागला होता. पुढील पन्नास वर्षांत पोलंडमध्ये इतर कोठल्याहि देशांपेक्षा जास्त छापखाने प्रस्थापित झाले होते आणि विशेष म्हणजे अन्यत्र कोठेहि नसलेलें मुद्रणस्वातंत्र्य तेथे होतें. अर्वाचीन युगाचा आद्य प्रणेता अशी ज्याची कीर्ति आहे तो कोपर्निकस पोलंडमध्येच जन्माला आला होता. ॲडम झल झियान्स्की हा वनस्पति- शास्त्रज्ञ त्याच काळांतला. सोळाव्या शतकांत लूथर, काल्व्हिन यांच्या अनुयायांना पोलंडमध्ये मुक्तप्रवेश मिळत असे.
 पण दुर्दैवाने याच सुमारास पोलंडचे राजे दुबळे निघाले. वरील भिन्न पंथांना त्यांना कह्यांत ठेवतां आलें नाही. त्यांचे झगडे होऊं लागले आणि शेवटी १५६४ साली राजा दुसरा सिग्मंड याने जेसुइटांना आपल्या राज्यांत आश्रय दिला व त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व शिक्षणसंस्थाहि त्यांच्या स्वाधीन केल्या. त्या हातीं येतांच जेसुइटांनी शब्दप्रामाण्य, अंधश्रद्धा, असहिष्णुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या व जनतेच्या मनावर करून तेथे पुन्हा अंधारयुग आणले व पोलंडचा सर्वनाश केला. पोलंडमधील विद्या-कला आता संपल्या, संशोधन- बुद्धीचा अस्त झाला आणि पुढील शतकांत रशिया, प्रशिया व ऑस्ट्रिया यांनी हें राष्ट्रच भूपृष्ठावरून नाहीसें केलें. श्रिट या पोलिश इतिहासकाराच्या मतें, जेसुइटांच्या वर्चस्वामुळेच पोलंडचा असा नाश झाला. अनेक कारणांपैकी जेसुइट हें एक प्रधान कारण आहे, याविषयी कोणाचेंच दुमत नाही.

आणखी एक करुणकथा

 स्पेन आणि पोर्तुगाल या राष्ट्रांची करुणकथा अशीच आहे. इटली, जर्मनी यांच्याप्रमाणेच पंधराव्या शतकांत स्पेनमध्ये प्रबोधन- युगाला प्रारंभ झाला होता. आरियस बार्बरोसा हा स्पेनमधला पहिला मानवतावादी पंडित. सालामांका विद्यापीठांत त्याने वीस वर्षे ग्रीक भाषेचें अध्यापन केलें. अँटोनियो लेविक्सा हा दुसरा पंडित (इ. स. १४७३) हा सोव्हिले, सालामांका व अलकाला या तीन विद्यापीठांत ग्रीक भाषा शिकवीत असे. समुद्रपर्यटनांत तर स्पेन, पोर्तुगाल अग्रेसर होते. पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेन्री (१४१५- १४६१) हा नॅव्हिगेटर- जलप्रवासी- म्हणूनच प्रसिद्ध होता. भूगोल, खगोल, गणित या विद्या त्याने स्वतः अभ्यासिल्या होत्या. आफ्रिकेच्या किनाऱ्याने खाली जाऊन शेवटीं त्या खंडाला वळसा घालणारे वारथोलोमो, वास्कोदि गामा हे धाडसी लोक पोर्तुगालचेच होते. कोर्टिझ (१४८५- १५४७) पिझॅरो (१४७१– १५४१) या स्पॅनिश दर्यार्द्यांनी मेक्सिको व पेरू हे देश शोधले व जिंकलेहि होते.
 कोलंबस व पहिली पृथ्वीप्रदक्षिणा करणारा मॅगेलन यांना स्पेननेच सर्वतोपरी साह्य केलें होतें. मेक्सिको, पेरू येथून येणारे अपार सुवर्णधन स्पेनलाच मिळत होतें. असें असूनहि एका शतकाच्या आतच या देशाचें कर्तृत्व थंडावलें व पुढे पूर्ण मावळले. असें कां ? व्यक्तिस्वातंत्र्याचा, सहिष्णुतेचा, स्वतंत्र संशोधनाचा म्हणजेच इहवादाचा लोप हें त्याचें कारण आहे.
 १४७८ साली फर्डिनांड आणि इसाबेला या राजाराणींनी 'इन्क्विझिशन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रूर, अघोरी, न्यायशून्य अशा धार्मिक न्यायपीठांची स्थापना केली. प्रथम त्यांनी देशांतील मूर (मुस्लिम) व ज्यू या जमातींचा निःपात केला. आठ लक्ष ज्यू त्या वेळीं स्पेन सोडून परागंदा झाले. मूरहि तसेच हद्दपार झाले. या दोन्ही जमाती मोठ्या उद्योगी व सुधारलेल्या होत्या. त्यांना हाकलून धर्मांध न्यायपीठांनी स्पेनचें अतोनात नुकसान करून घेतले.
 पुढे १५१९ सालीं राजा पांचवा चार्लस पवित्र रोमन सम्राट् झाल्यावर त्याने धर्मसुधारकांचें निर्दालन करण्याचा विडाच उचलला. त्याच्या व त्याचा मुलगा दुसरा फिलिप याच्या राजवटींत इन्क्विझिशन न्यायपीठांनी जे घोर अत्याचार केले त्यांना सीमाच नाही. तिसरी विनाशक शक्ति म्हणजे जेसुइट पंथ ही होय. लायलॉने स्पेनमध्येच त्याची स्थापना केली होती व आरंभापासूनच त्याला राजाश्रय मिळाला होता. अशा रीतीने राजसत्ता व धर्मसत्ता- (दोन्ही अंधच) – एक होऊन त्यांनी स्पेनच्या प्रगतीला दोनशे वर्षे प्रतिरोध करून ठेवला. हॅन्स कोनने म्हटले आहे की, या सर्वांचा परिणाम होऊन स्पेनचें युरोपीयत्वच नष्ट झालें. (आयडिया ऑफ नशनॅलिझम, पृष्ठ १५४).
 मेक्सिको व पेरू या देशांतून स्पेनमध्ये अमाप सोनेरूपें येत होते. पण त्यामुळे स्पेनचा उत्कर्ष व्हावयाच्या ऐवजी अधःपातच झाला. तो पैसा उद्योगांत घालावा, त्याने कृषिविकास करावा ही स्पेनला बुद्धि झाली नाही. व्यापार, उद्योग यांविषयी ख्रिस्ती धर्माला तिरस्कार आहे. व्याजबट्टा, देवघेव यांना तो धर्म निंद्य, हीन मानतो आणि स्पेन तर कडवा कॅथॉलिकधर्मी. लेकी याने म्हटलें आहे की, सोळाव्या शतकांत स्पेनला व्यापार व उद्योग यांत अधिराज्य सहज प्राप्त झालें असतें. पण असहिष्णुता, व्यापाराविषयीचीं धर्मबंधनें व उद्योगापेक्षा सोनें जास्त मानण्याची वृत्ति यांमुळे स्पेनने तें आपल्या हाताने घालविलें. मग तें मिळविलें कोणीं ? तर प्रोटेस्टंट पंथीय इंग्लिश व डच यांनी. कारण त्या पंथांत व्यापार, उद्योग यांवर असली बंधने नव्हती. (राइज ऑफ नॅशनॅलिझम इन् युरोप).

इटलीचा घात

 धर्मांधतेमुळे स्पेनने स्वतःचा तर घात करून घेतलाच, पण इटली या थोर राष्ट्राचाहि तसाच घात केला. फ्रान्स व स्पेन यांच्या इटलींतील साम्राज्यासाठी झालेल्या लढायांनी इटलीचा नाश झाला हें मागे सांगितलेंच आहे. १५३९ सालीं त्या संपून इटलीवर स्पेनची अधिसत्ता स्थापन झाली आणि मग जेसुइट, इन्क्विझिशन व नवमतप्रवर्तक ग्रंथ वाचण्यावरची बंदी या साधनत्रयीने इटलीच्या स्वतंत्र प्रज्ञेचा नाश केला. नेपल्स व व्हेनिस हीं दोन संस्थानें स्पेन व पोप यांपासून स्वतंत्र राहिली होती. त्यामुळे तेथेच प्रबोधनविद्येचें पुनरुज्जीवन होऊ शकलें. मिलन, फ्लॉरेन्स, पदुआ या संस्थानांनी वास्तविक इटलींत प्रबोधनाचें प्रवर्तन करण्याचा व युरोपला ज्ञानसंपन्न करण्याचा अग्रमान मिळविला होता. पण स्पेनचें साम्राज्य व जेसुइटांची धर्मसत्ता यांमुळे तेथील कर्तृत्वाला ग्रहण लागलें. (हिस्टरी ऑफ् युरोप, फिशर, पृष्ठ ५३९).
 सम्राट् फर्डिनांड पहिला याने १५५६ च्या सुमारास जेसुइटांना ऑस्ट्रियांत व साम्राज्यांत प्रवेश दिला. त्यानंतर पुढील साठ वर्षांत जेसुइटांनी व्हिएन्ना, वॉन, म्युनिच, कोलोन या नगरीत प्रवेश मिळवून तेथील विद्यापीठें ताब्यांत घेतली. पुढे स्टिरियाचा फर्डिनांड हा स्वतः जेसुइट असलेला राजा सम्राट् झाला व त्याने प्रोटेस्टंटांविरुद्ध हत्यार उपसलें. पेट्र्स कॅनिसियस हा कडवा कॅथॉलिक होता. ऑस्ट्रियांतील प्रतिक्रातीचें बव्हंशी श्रेय यालाच आहे. सम्राट् फर्डिनांड याचा हा परम मित्र. त्याने शिक्षणक्षेत्रांत जेसुइटांना सम्राटाकडून वर्चस्व मिळवून दिलें. जेसुइटांची सत्ता पुढे तीनशे वर्षे अबाधित राहिली होती. फर्डिनांडचे सर्व शिक्षण जेसुइट कॉलेजांतच झालें होतें. प्रोटेस्टंटांचा निःपात हें त्याचें एकमेव उद्दिष्ट होतें. आणि सत्ता हातीं येतांच त्याने आपल्या हत्याकांडाला प्रारंभ केला. प्रथम स्टिरिया, मग बोहेमिया व नंतर सर्व ऑस्ट्रिया असे प्रदेश क्रमाने घेऊन त्याने आपले उद्दिष्ट साध्य केलें. हें तीनहि प्रांत त्याने जेसुइट सत्तेखाली कायमचे आणून टाकले. फिशर म्हणतो, जगावर दुःखाचा एवढा डोंगर कोसळून आणणारा आणि मानवी प्रजेला इतक्या दीर्घकाळ बंधनांत टाकणारा राजा इतिहासांत विरळाच! (हिस्टरी ऑफ् युरोप, पृष्ठ ६१२).

सुधारकांचे मनोधैर्य

 फ्रान्स व जर्मनी या देशांतील धर्मक्रांतीचा इतिहास खूपच वेगळा आहे. तेथेहि जेसुइट आणि कॅथॉलिक राजसत्ता त्यांनी भयंकर धर्मच्छळ केला, सुधारकांवर अनन्वित अत्याचार केले, कत्तली केल्या, पण या सर्व यमयातना सोसूनहि त्या अंध धर्मसत्तेचा प्रतिकार करण्याचे मनोधैर्य तेथील सुधारकांनी शेवटपर्यंत प्रकट केलें व त्या संग्रामांत ते अखेरपर्यंत लढत राहिले. म्हणून त्या देशांत बुद्धिस्वातंत्र्य, सहिष्णुता, विवेकनिष्ठा, स्वतंत्र चिंतन आणि त्यामुळेच मानवी कर्तृत्व टिकून राहिलें व कधी कधी बहरास आले. या देशांत कधी कधी राजसत्तेनेहि विद्या- कलांचा व धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार केला व केव्हा केव्हा कॅथॉलिकांनीहि संघटना उभारून जेसुइटांवर प्रहार केले. या सर्व इहवादी हितकारक प्रेरणांमुळे त्यांचे इतिहास स्पेन, पोलंड इत्यादि देशांपेक्षा फार वेगळे झाले.
 धर्मसुधारणेच्या उदयाच्या काळी फ्रॅन्सिस पहिला (१५१५- १५४७) हा फ्रान्समध्ये राजपदीं होता. तो विद्या कलांचा भोक्ता होता. त्याने फ्रेंच भाषेला उत्तेजन दिले. त्यामुळे तेथे मोठे ग्रंथकार उदयास येऊन राष्ट्रभावनेचा परिपोष होऊं लागला. पण स्पेनबरोवर इटलींत चालू झालेल्या युद्धांत फ्रॅन्सिसचा पराभव झाल्यामुळे त्याला रोमच्या पीठावरील पोपच्या साह्याची जरूर वाटू लागली आणि मग पोपला खूष करण्यासाठी त्याने धर्मसुधारकांवर हत्यार धरलें. तरी मनांतून तो सुधारणेस अनुकूल असल्यामुळे प्रारंभी छळ बेताचाच होता. पण पुढील राजे हेन्री व दुसरा फ्रॅन्सिस यांनी ह्यूगेनॉट (फ्रेंच प्रोटेस्टंट) लोकांचा समूळ उच्छेद करण्याच्या प्रतिज्ञाच केल्या होत्या. पण ह्यूगेनॉटस् हे कमी नव्हते. ते संघटित होते आणि एका वेळीं पंचवीस-तीस हजार सैन्य ते रणांत उभे करूं शकत असत. त्यामुळे सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत फ्रान्समध्ये पांच धर्मयुद्धे झाली. फ्रेंच भूमि फ्रेंच रक्ताने भिजून गेली. आणि प्रबोधन- युगाचा अंतसमय आला. फिशर हा इतिहासकार म्हणतो, "या वेळीं फ्रेंच राज्यपदी कोणी शहाणा, समंजस, सहिष्णु राजा असता तर फ्रान्समध्ये उदित झालेल्या राष्ट्रभावनेचा फायदा घेऊन त्याने रोमन पीठाच्या वर्चस्वांतून स्वतःचें राष्ट्र मुक्त केलें असतें. त्यांत त्याला फ्रेंच कॅथालिक धर्मगुरूंचेंहि साह्य मिळाले असतें." इंग्लंडच्या आठव्या हेन्रीने हेंच केलें. त्यामुळे धर्मयुद्ध टळून इंग्लंड संघटित झालें. फ्रेंच राष्ट्र तसेंच संघटित झालें असतें. पण १५९८ पर्यंत एकामागून एक सर्व फ्रेंच राजे महामूर्ख, हेकट आणि धर्मांध निघाल्यामुळे फ्रान्सची अपरिमित हानि झाली. त्या वर्षी चौथा हेन्री गादीवर आला. तो शहाणा होता. त्याने 'एडिक्ट ऑफ् नॅंटीस' या जाहीरनाम्याअन्वये ह्यूगेनॉटस् ना धर्मस्वातंत्र्य देऊन, यादवीचा शेवट केला. हें स्वातंत्र्य १६८५ पर्यंत अबाधित होतें. तेरावा व चौदावा लुई हे अनियंत्रित राजे होते. पण त्यांनी त्या सालपर्यंत धर्मस्वातंत्र्याचें धोरण कायम राखल्यामुळे फ्रान्सची त्या काळांत इतकी प्रगति झाली की, त्या काळाला सुवर्णयुगच म्हणतात.
 कॉनेली, रेसिन, मोलियर हे नाटककार याच काळांतले. पास्कल, डेकार्ट हे तत्त्ववेत्ते याच काळांतले. फरमाट, डिमॉयरे हे गणितीहि याच काळांतले. रेसिन, मोलियर यांसारखे नाटककार उदयास येऊ शकतात याला फार अर्थ आहे. 'बुद्धिवादाचा उदय' या आपल्या ग्रंथांत लेकी याने म्हटले आहे की, नाट्य ही अत्यंत प्रभावी कला ख्रिस्ती धर्माने नष्ट करून टाकली होती. नट-नटी यांना चर्च धर्मबाह्य समजत असे. पण बुद्धिवादी तत्त्ववेत्ते त्या कलेचा फार आदर करीत. व्हाल्टेअरच्या काळची एक नटी अड्रिनी लेकव्हरर हिच्या अंतकाळीं धर्माचार्य तिला सांगू लागले की, जन्मभर मी पाप करीत आलें, असें तूं कबूल कर. पण त्या नटीला आपल्या कलेचा अभिमान होता. तिने नकार दिला तेव्हा शेवटचे मंत्र न म्हणतांच आचार्य निघून गेले व मृत्यूनंतर तिच्या कबरीवर क्रॉस ठेवण्यांत आला नाही ! तेव्हा अंध धर्मसत्ता ही विज्ञानसंशोधनच फक्त नष्ट करतें असें नव्हे, तर सर्व कला आणि नाट्यकला विशेषतः तिच्या विषारी छायेंत कोळपून जातात. स्वतंत्र प्रज्ञेचीच एकदा हत्या झाली की विद्या काय, कला काय, उद्योग काय आणि कृषि काय- सर्वांचा मृत्यु ओढवायचा.

शहाणा सुलतान

 चीदावा लुई हा सुलतान होता. अनियंत्रित होता. पण तो प्रारंभी फार शहाणा व सहिष्णु होता. १६६४ साली त्याने सायन्स ॲकेडमीची स्थापना केली. पुढील वर्षी संगीत विद्यापीठ स्थापले. कोलवर्ट या प्रधानाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन उद्योग-व्यापार यांची पुनर्घटना केली व फ्रान्सला समृद्ध केलें. पण १६८५ सालीं, एका रखेलीच्या आहारी जाऊन त्याने 'एडिक्ट ऑफ् नॅटीस' रद्द केला व ह्यूगेनॉटस् लोकांचें धर्मस्वातंत्र्य नष्ट करून, पुन्हा त्यांचे हत्याकांड सुरू केलें. हे ह्यूगेनॉटस् मोठे कारागीर होते, व्यापारी होते, कारखानदार होते, उद्योगपति होते. पण धर्मस्वातंत्र्य गेल्यामुळे लक्षावधि ह्यूगेनॉटस् मायभूमि सोडून इंग्लंड, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड या देशांत गेले. फ्रेंच इतिहासकार मिकेलेट म्हणतो, "ते गेल्यामुळे कोलबर्टची सर्व अर्थव्यवस्था कोसळून पडली आणि फ्रान्स दरिद्री झाला." आणि उलट वरील प्रोटेस्टंट सहिष्ण देशांनी त्यांचें स्वागत करून त्यांना सर्व प्रकारच्या सवलती दिल्यामुळे त्यांच्य व्यापाराची, उद्योगाची, कारागिरीची सर्वतोपरी भरभराट झाली.
 याच सुमारास लुईराजाने आक्रमक युद्धे सुरू केली. पण अर्थव्यवस्था ढासळली असल्यामुळे प्रत्येक वेळीं फ्रान्सचा पराभव झाला आणि सुवर्णयुगांतले सर्व वैभव रसातळाला गेलें. पुढे अठराव्या शतकांत धार्मिक जुलूम, धर्मच्छळ, धर्माचार्यांची अरेरावी हें सर्व चालू होतें. पण त्याच शतकांत रूसो, व्हॉल्टेअर, मॉंटेक्स, डिडेरो यांसारखे झुंजार तत्त्ववेत्ते फ्रान्समध्ये निर्माण झाले. त्यामुळे फान्सची प्रज्ञा जिवंत राहूं शकली आणि फ्रेंच राज्यक्रांति घडून येऊन सर्वच क्षेत्रांत पुराणमतवादाच पाया हादरून गेला.
 फ्रेंच धीरपुरुषांनी, क्रांतिकारकांनी, शास्त्रज्ञांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा लढा अखंड चालू ठेवल्यामुळे स्पेन-पोलंडसारखीं फ्रान्सची स्थिति झाली नाही हें खरें; पण त्या संग्रामांत त्यांची शक्ति खर्च झाल्यामुळे व लोकमत बव्हंशी जेसुइटांच्या वर्चस्वाखाली विवेकहीन राहिल्यामुळे फ्रान्समध्ये सुस्थिर व बलशाली लोकसत्ता अवतरूं शकली नाही. पहिलें व दुसरें महायुद्ध- दोन्ही युद्धांत फ्रान्स आत्मसंरक्षण करूं शकले नाही. महायुद्धानंतरहि डी गॉल याला पाचारण करून त्याच्या हातीं फ्रेंचांना दंडसत्ता द्यावी लागली. गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत फ्रेंच खरे विवेकवादी, इहवादी झालेच नव्हते त्याचे हे परिणाम आहेत.
 एमिल झोला याची ट्रुथ ही कादंबरी व ड्रायफस प्रकरणी त्याने केलेली भाषणें व लेख हे पाहतां या काळपर्यंत फ्रेंच जनमानसावर जेसुइटांची केवढी सत्ता होती हें कळून येतें. जेसुइट हा जसा धर्मांध तसा अघोरी पंथ आहे. न्याय-नीति, सत्य-असत्य याचा त्यांना विधिनिषेध नाही. धर्माच्या प्रगतीसाठी असत्य, खून, रक्तपात करण्यास कांही हरकत नाही, असें त्यांचें शास्त्र आहे. पास्कल हा सतराव्या शतकांतला मोठा फ्रेंच गणिती व तत्त्ववेत्ता. त्याने 'प्रॉव्हिन्सियल लेटर्स' या आपल्या पत्रकांतून अत्यंत उपरोधिक भाषेत जेसुइटांचे काळेकुट्ट अंतरंग फ्रेंचांना उघडे करून दाखविलें होतें. तरीहि फ्रेंच जनता फारशी विवेकी झाली नाही. ड्रायफस या ज्यू लष्करी अधिकाऱ्यावर जेसुइटांनी खोटे आरोप केले तेव्हा ती इतकी अंध, विकवेशून्य झाली की, सोळाव्या शतकांतील धर्मयुद्धांची पुन्हा आठवण व्हावी. अशा या अंध, असहिष्णु अविवेकी वृत्तीमुळे राष्ट्रनिष्ठा व लोकशाही या कायमच्या दुबळ्या राहून देश कायमचा दुबळा राहिला तर त्यांत नवल काय ? (फ्रान्स- हडलस्टन्, पृष्ठे १०, ९८) .

जर्मनीतील संग्राम

 जर्मनीचा इतिहास असाच कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यांतील यादवीने भरला आहे. लूथरकृत धर्मक्रांतीनंतर जर्मनीची उत्तर जर्मनी व दक्षिण जर्मनी अशी फाळणी झाली. उत्तरेकडचे संस्थानिक प्रोटेस्टंट व दक्षिणेचे कॅथॉलिक यांचे दोन संघ झाले व यादवीला प्रारंभ झाला. पण १५५५ साली ऑगसबर्ग येथे तह होऊन प्रत्येक संस्थानाला धर्मस्वातंत्र्य देण्यांत आलें. सम्राट् फर्डिनांड पहिला यानेहि त्याला मान्यता दिली. यामुळे जर्मनीला पन्नास वर्षे शांतता मिळाली. त्यानंतर स्टिरियाचा राजा सम्राट् झाला. हा पक्का जेसुइट होता हें वर सांगितलेच आहे. त्याने प्रोटेस्टंटांचा उच्छेद करायचा विडा उचलला व त्यापायीं तीस वर्षे युद्ध ओढवून घेतलें. १६१८ साली हें युद्ध सुरू झालें व १६४८ साली संपलें. प्रथम तें कॅथॉलिक व प्रोटेस्टंट संघांत चालू होतें. पण नंतर त्याला राजकीय स्वरूप येऊन फ्रान्स, स्वीडन, हॉलंड सर्वच त्यांत पडले. मात्र दर वेळीं युद्ध जर्मन भूमीवर होत होतें.
 या तीस वर्षात जर्मनीचें अक्षरशः स्मशान झालें. तीस वर्षे त्या भूमींत रक्तपात, विध्वंस, जाळपोळ, लूट यांचे थैमान चालू होतें. अत्याचार, अनाचार यांना ऊत आला होता. दारिद्र्य, भूकमार इतकी झाली की, कोठे कोठे नरमांस- भक्षणहि घडूं लागलें. आणि हें सर्व धर्मासाठी ! सोळाव्या शतकाच्या प्रारंभी जर्मनी संस्कृतिप्रगतीच्या दृष्टीने युरोपच्या अग्रभागी होता. तीस वर्षे युद्धाच्या अखेरीस तो पुन्हां रानटी अवस्थेला येऊन पोचला. जेसुइट सम्राट् फर्डिनांड दुसरा या सर्वाला कारण ! (फिशर, पृष्ठे ६१२).
 पण एवढें युद्ध होऊनहि प्रोटेस्टंटांनी लढा सोडला नाही. युद्धांत सम्राटाला नमतें घेऊन उत्तर जर्मनीला धर्मस्वातंत्र्य द्यावें लागलें. बोहेमिया, ऑस्ट्रिया व त्या साम्राज्यांतले सर्व प्रदेश मात्र त्याच्या मगरमिठींत तसेच राहिले. ते जेसुइटांच्या स्वाधीन करून धर्मसुधारणेचा निःपात करण्याचें त्याने आपले स्वप्न तेथे प्रत्यक्षांत आणलें. पण उत्तर जर्मनींत धर्मस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य हीं कायम राहिल्यामुळे त्यांतूनच पुढे प्रशियाचा उदय झाला आणि फेडरिक दि ग्रेट याला जर्मनीचें भवितव्य बदलून टाकण्याची संधि प्राप्त झाली. १७४० साली सत्तारूढ होतांच त्याने सर्व धर्मपंथांना स्वातंत्र्य देऊन टाकलें. तो स्वतः अज्ञेयवादी होता; धर्मकलह त्याला बालिश वाटत. त्यामुळे प्रशियांत इहवादी शासन स्थापन होऊन त्याची सर्व दृष्टींनी प्रगति झाली आणि पुढल्या शतकांत याच प्रशियाने सर्व जर्मनी संघटित करून त्याला राष्ट्रपदवी प्राप्त करून दिली !

समन्वयी धर्म

 या धार्मिक यादवींच्या प्रलयांतून पूर्णपणे नव्हे, पण बव्हंशी मुक्त राहिला तो देश म्हणजे इंग्लंड. ट्यूडर राजा आठवा हेन्री याने खाजगी कारणाने १५३४ सालीं पोपच्या धर्मपीठाचा संबंध तोडून टाकला व तेव्हापासून सुधारक पंथाला त्या भूमींत अवसर लाभू लागला. मध्यंतरी पांच- सहा वर्षे हेन्रीची मुलगी मेरी हिच्या राज्यांत पोपची सत्ता प्रबळ झाली होती. त्या अवधीत सहा-सातशे सुधारकांना तिने जाळून मारलें. पण १५५९ साली एलिझाबेथ गादीवर आली. तिने दोन्ही धार्मिक अतिरेकी पक्ष बाजूला ठेवून इंलंडचा म्हणून स्वतंत्र समन्वयी धर्म स्थापन केला व पोपचें वर्चस्व कायमचें नष्ट करून टाकले. यामुळे संतापून जाऊन पोपने एलिझाबेथवर बहिष्कार पुकारला. पण आता त्याला इंग्लंडमध्ये कोणी कवडीचीहि किंमत दिली नाहीं. अंध धर्मसत्तेच्या जोखडापासून इंग्लिश जनता मुक्त झाल्याचेंच हें लक्षण होय.
 दुसऱ्या एका प्रसंगाने तर हें फार स्पष्ट झालें. इंग्लंड हातांतून चाललें हें पाहून, पोपने स्पेनचा राजा फिलिप याला इंग्लंडवर स्वारी करण्यास आज्ञा केली. १५८८ सालीं एक प्रचंड आरमार- स्पॅनिश आरमाडा- इंग्लंडवर चालूनहि आलें. पण इंग्लिश नौसेनेने त्याची धूळधाण करून टाकली. लक्षणीय गोप्ट ही की, या वेळी इंग्लिश आरमाराचा सेनापति हॉवर्ड हा कॅथॉलिक होता. आरमारी आक्रमण आलें होतें तें कॅथॉलिक पक्षांचें होतें. पोपचा त्याला आशीर्वाद होता. तरीहि एका कॅथॉलिकाला सेनापति नेमण्यास इंग्लंडला भीति वाटली नाही. राष्ट्र ही इहवादीसत्ता पोपच्या धार्मिक सत्तेपेक्षा श्रेष्ठ होय, असा निर्णय इंग्रजांनी दिला, असा याचा अर्थ होय.
 जेम्स पहिला हा एलिझाबेथप्रमाणे इंग्लिश चर्चचाच पुरस्कर्ता होता. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीत पोपवादी कॅथॉलिकांनी सर्व पार्लमेंट सभागृह सुरुंगाने उडवून देण्याचा कट केला होता. पण तो उघडकीस आला व कटवाले फाशी गेले. यावरून असं दिसून येईल की, इंग्लंडमध्ये नव्या-जुन्या दोन्ही पक्षांमध्ये वैमनस्य असले तरी यादवीला उद्युक्त होण्याइतकी तीव्रता त्याला कधीच आली नाही. यांतच इंग्लिश लोकांची विवेकी वृत्ति दिसून येते. या वृत्तीमुळे त्यांनी स्वदेशांतील अंध धर्मसत्ता व अनियंत्रित राजसत्ताहि नष्ट केली आणि त्यामुळे व्यक्तिवाद, बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्तिपरता, स्वतंत्र अवलोकन, संशोधन यांना अवसर मिळून त्या देशाची अतुल प्रगति झाली. या युगांतल्या इंग्लिशांच्या कर्तृत्वामागची महाप्रेरक शक्ति म्हणजे विख्यात शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेकन ही होय, हें मागे सांगितलेच आहे.
 शेक्सपियर हा महाकवि यात्रा समकालीनच होता. पुढे थोड्याच काळांत न्यूटन, मिल्टन हे क्षितिजावर दिसूं लागतात. दुसरा चार्लस (१६६०- १६८५) हा भ्रष्ट राजा होता. पण त्याने भौतिक शास्त्र संशोधन करणारी जगविख्यात रॉयल सोसायटी स्थापन केली व ग्रीनविचची वेधशाळा उभारली. तो स्वतः एक शास्त्रवेत्ता असून, त्याची स्वतःची प्रयोगशाळा व वस्तुसंग्रहहि होता. या सर्व इहवादी प्रेरणांमुळेच हार्वे, ख्रिस्तोफर रेन, फ्लॅमस्टीड, बॉइल, प्रीस्टले, कॅव्हेंडिश रॅले, ड्रेक, कॅप्टन कुक, लॉक यांसारखे थोर पुरुष इंग्लंडला लाभले व त्यांनीच त्या भूमीचा पुढला वैभवशाली इतिहास घडविला हैं सर्वमान्य आहे. 'एंडलेस क्वेस्ट' या ग्रंथांत युरोपच्या कर्तृत्वाचा इतिहास दिला आहे. त्यांत इंग्लिश शास्त्रज्ञ १२४ दिसतात, जर्मन ४७, फ्रेंच ३१ आणि मग कोठे ३, कोठे २, कोठे १ असे दृष्टीस पडतात. इतर कर्तृत्वाचा हिशेब असाच आहे.


 एकोणिसावें शतक हे पश्चिम युरोपच्या इतिहासांत राष्ट्रसंघटनेचें शतक असें मानलें जातें. प्रामुख्याने इटली व जर्मनी हे दोन देश या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्र पदवीला पोचले. हें ऐकायला जरा विचित्र वाटतें. तेराव्या शतकांतच युरोपांत राष्ट्रभावना उदयास आली व पोपच्या अनियंत्रित धर्मांध सत्तेला तिनेच हादरा दिला, असें प्रारंभी सांगितलें आहे. असें असतांना जर्मनी व इटली या प्रारंभापासून प्रगतीच्या आघाडीवर असलेल्या देशांना राष्ट्र म्हणून संघटित होण्यास पांचशे वर्षे लागावीं याचा अर्थ काय ? अंध धर्मसत्ता या दोन्ही देशांचे संघटित होण्याचे प्रयत्न सारख्या हाणून पाडीत होत्या, हा याचा साधा अर्थ आहे.

रोमच्या पोपला राष्ट्र हें तत्त्वच मान्य नव्हतें. अखिल ख्रिस्ती जगत् एक व त्याचे आपण स्वामी, हें त्याचें कायमचें स्वप्न होतें. शिवाय इटली राष्ट्र म्हणून संघटित झाले, तर तेथे इंग्लंडप्रमाणे पार्लमेंट येईल किंवा फ्रान्सप्रमाणे राजघराण्याची सत्ता यईल ही पोपला भीति होती. मग सार्वभौम सत्ता त्याच्या हातीं राहिली नसती. हें दिसत असल्यामुळे राष्ट्रसंघटनेच्या प्रयत्नांत रोमन धर्मपीठ कायम बिब्बा घालीत असे. शिवाय इटलीच्या कांही भागांवर ऑस्ट्रेलियन साम्राज्यसत्ता होती. कांही भाग स्पेनच्या ताब्यांत होते व या दोन्ही सत्ता अंध कॅथॉलिकधर्मी असल्यामुळे त्या त्या प्रदेशांत धर्मसुधारणा किंवा इतर भौतिक प्रगति होणें शक्यच नव्हतें. जर्मनीवर पोपची प्रत्यक्ष सत्ता नव्हती, पण तेथे पवित्र रोमन साम्राज्याची सत्ता होती व तें साम्राज्य कायमचें पोपच्या छायेंत होतें. इ. स. ८०० मध्ये रोमच्या पोपने जर्मन राजा शार्लमेन याला पवित्र रोमन सम्राट् म्हणून अभिषेक केला. तेव्हापासून तें साम्राज्य प्रत्यक्षांत कधीहि अस्तित्वांत नव्हतें तरी त्या कल्पनेचें भूत जर्मन राजांच्या मानगुटीला कायमचें बसलें होतें.
 या दोन्ही सत्तांना नेपोलियनच्या स्वाऱ्यांमुळे हादरे बसले. रोमन साम्राज्य तर १८०६ सालीं नेपोलियनने कायमचें नष्ट केलें. इटलीत ऑस्ट्रिया व स्पेन यांच्या सत्ताहि त्याने कांही काळ नष्ट केल्या. त्या फिरून प्रस्थापित झाल्या हें खरें. पण याच्या स्वाऱ्यांबरोबर समता, स्वातंत्र्य, बंधुता, जनतेचें सार्वभौमत्व, प्रजासत्ताक राज्य, इत्यादि क्रांतिकारक तत्त्वांचे वारे इटलीत शिरले यामुळे या दोन्ही देशांत अंध धर्मसत्ता कमजोर झाली, ढिलावली आणि म्हणूनच गेल्या शतकांत ते देश राष्ट्र म्हणून संघटित होऊ शकले.

धर्मसत्तेवर हल्ले

 मॅझिनी, काव्हूर व गॅरिबाल्डी हे इटलीचे तिघेहि राष्ट्रवीर पोपच्या सत्तेचे हाडवैरी होते. मॅझिनीने आपल्या लेखणीने, गॅरिबाल्डीने आपल्या तलवारीने व काव्हूरने आपल्या मुत्सद्देगिरीने धर्मसत्तेवर प्रखर हल्ले चढवून, इटलींत राष्ट्रभावना जागृत केली. १८४६ च्या सुमारास रोमन पीठावर आलेला पोप पायस हा बराचसा पुरोगामी होता. त्याने उदारमतवादाला व राष्ट्रसंघटनेला वेळोवेळी पाठिवाहि दिला होता. पण ऑस्ट्रियन सम्राटाला हें खपवून घेणें शक्य नव्हतें. त्याने पोपवर दाब ठेवण्यासाठी आपलें लष्करच रोमला आणून ठेवलें होतें. अर्थात् पोपला कांहीच करणें शक्य नव्हतें. तरीहि पोपने अल्पकाळ जो राष्ट्रतत्त्वाला पाठिंबा दिला त्याचा फार उपयोग झाला. इटलींतील अनेक सरदार, संस्थानिक व बहुसंख्य जनता यांची पोपवर एकांतिक निष्ठा होती. त्याने राष्ट्रभावनेला पाठिंबा दिल्यामुळेच हे सर्व लोक राष्ट्रीय चळवळींत सामील झाले. त्याचा हा ओझरता आशीर्वाद मिळाला नसता, तर चळवळीला इतकें यश आलें नसतें, असें फिशरसारख्या इतिहासकाराने म्हणून ठेवलें आहे. (हिस्टरी ऑफ युरोप, पृष्ठ ९१४).
 काव्हूर हा १८५० साली इटलींतील पिडमांट या संस्थानाचा राजा व्हिक्टर इमॅन्युएल याचा मुख्य प्रधान झाला. आणि त्याने पहिली गोष्ट केली ती ही की, त्याने प्रथम पाद्रीवर्गाविरुद्ध कायदे करून त्याचें वर्चस्व नष्ट करून टाकले. त्यावांचून सामाजिक, आर्थिक, धार्मिक कोणतीच सुधारणा करणें त्याला शक्य नव्हतें. हे कायदे संमत झाले तेव्हापासून एका महिन्याच्या आंत राजाची आई, बायको व भाऊ हे सर्व मृत्युमुखी पडले. त्याबरोबर या कायद्यामुळेच, धर्मपीठाला विरोध केल्यामुळेच, ही आपत्ति आली असा सर्वत्र ओरडा झाला व काव्हूरला राजीनामा द्यावा लागला. पण डी आझेग्लिओ या पूर्वीच्या एका मंत्र्याने राजाची समजूत घातली तेव्हा त्याने काव्हूरला पुन्हा सत्ता सत्ता दिली.
 व्हिक्टर इमॅन्युएल याने हा समंजसपणा, हा विवेक दाखवला नसता, पाद्रयांचा शाप आणि आप्तांचा मृत्यु यांत कार्यकारण भाव नाही हें त्याला पटलें नसतें, त्याच्या मनावरची धर्मचमत्काराची मिठी सुटली नसती, तर इटलीची राष्ट्रसंघटना पुढल्या दहा वर्षांत जी काव्हूरने घडवून आणली ती साधली नसती. इहवादावांचून राष्ट्रसंघटना नाही या वाक्याचा अर्थ यावरून ध्यानीं येईल. काव्हूरने पिडमाँट संस्थानचा जर्मनींतील प्रशियाप्रमाणे कायाकल्प केला, आणि त्या संस्थानानेच इटलीच्या सर्व शक्ति एकात्म करून तें राष्ट्र जन्माला आणलें असा इतिहास आहे.

विस्मार्कचें कार्य

 इटलीतील पिडमाँटने जें साधलें तेंच जर्मनींतील प्रशियाने साधलें. आधीच्या शतकांत फ्रेडरिक दि ग्रेट याने प्रशियाला आधुनिक युगांत आणून ठेवलें होतें हे मागे सांगितलेच आहे. याच प्रशियाचा मुख्य प्रधान प्रिन्स बिस्मार्क याने काव्हूरचा आदर्श पुढे ठेवून जर्मन राष्ट्र संघटित केलें. १८६६ साली त्याने ऑस्ट्रियाचा व १८७० साली फ्रान्सचा रणांगणांत पराभव केला. त्यामुळे सर्व जर्मन संस्थानिक (त्या वेळी ३९ संस्थानें होतीं) जर्मनी एकात्म एकछत्री करण्यास अनुकूल झाले आणि १८७० सालीं जर्मनीचा जन्म झाला. हाती सत्ता येतांच बिस्मार्कलाहि प्रथम कॅथालिकांविरुद्ध कायदे करावे लागले. त्या धर्मगुरूंची अंधसत्ता नष्ट झाल्यावांचून कोणतीहि प्रगति शक्य नाही हें त्याच्या ध्यानीं आलें होतें. कॅथॉलिक पक्ष नव्या पार्लमेंटांत बराच प्रबळ होता. पोपचें वर्चस्व जर्मनीवरच नव्हे तर सर्व युरोपांत पुन्हा प्रस्थापित व्हावे, असे त्या पक्षाचे प्रयत्न होते. पहिल्याच बैठकींत, बादशहांना मानपत्र देण्याचा ठराव आला तेव्हा बादशहांनी "ऐहिक व्यवहारावरहि पोपचें वर्चस्व युरोपांत पुन्हा प्रथापित करण्यास पोपला साह्य केलें पाहिजे या अटीवरच आम्ही मानपत्राच्या ठरावाला संमति देऊं," असें त्यांनी सांगितलें. अर्थात् ती अट मान्य झाली नाही. याच साली कोलोन येथील आर्चबिशप याने असें फर्मान काढले की, "बॉन विद्यापीठांतील प्राध्यापकांनी, पोप हे सर्वज्ञ आहेत, प्रमादातीत आहेत हा सिद्धान्त मान्य केला पाहिजे." सरकारने हें फर्मान रद्द केलें पण कॅथॉलिक धर्मगुरूंना जर्मनीला पुन्हा तमोयुगांत न्यावयाचें होतें, तें यावरून स्पष्ट दिसतें.
 स्पेन, पोलंड, ऑस्ट्रिया, बोहेमिया इत्यादि देशांत जेसुइटांना तेथल्या राजसत्तेने पाठिंबा दिला म्हणूनच त्या देशांचा अपकर्ष झाला. जर्मनींतहि तेंच झालें असतें. कारण पोप सर्वज्ञ आहे प्रमादातीत आहे, हें मत स्वीकारणें म्हणजे मानवी प्रज्ञेची जाणूनबुजून हत्या करण्यासारखेंच आहे. प्रिन्स बिस्मार्कने तें स्वीकारलें नाही म्हणूनच जर्मनी प्रगतिपथ आक्रमू शकला. १८७२ साली जर्मनीने पोपच्या दरबारी वकील म्हणून कार्डिनल प्रिन्स होहेन लो याची नेमणूक केली. पण पोपने त्याला दरबारी येण्यास मनाई केली. त्यासंबंधी भाषण करतांना बिस्मार्क म्हणाला की, "आम्ही पोपचें वर्चस्व कधीहि मान्य करणार नाही. आपण हें ध्यानांत ठेवा की, आम्ही कॅनोसाला कधीहि जाणार नाही" (जर्मन सम्राट् चौथा हेन्री याला १०७७ सालीं कॅनोसा या गावी जाऊन, पोपपुढे गुडघे टेकून माफी मागावी लागली होती. तेव्हापासून कॅनोसाला जाणें म्हणजे पोपपुढे गुडघे टेकून शरणागति पत्करणें असा अर्थ रूढ झाला.) बिस्मार्कचे हे उद्गार चिरस्मरणीय व्हावे म्हणून लोकांनी हार्झबर्ग येथे एक स्तंभ उभारून त्यावर ते कोरून ठेवले आहेत. जनतेचा असा पाठिंबा होता म्हणूनच पोपची अंधसत्ता बिस्मार्क नष्ट करूं शकला. चौथ्या हेन्रीला तें शक्य नव्हतें. कारण पोपकडून त्याला माफी मिळाली नसती, तर तो सम्राट्पदी राहू शकला नसता. बिस्मार्कच्या कॅथॉलिकविरोधी धोरणामुळे व कायद्यामुळे कॅथॉलिकांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. तेव्हा त्या खुनी इसमाने जाहीरपणें सांगितलें की, "तुम्ही कॅथॉलिकांविरुद्ध कायदे केले म्हणूनच मी तुमच्यावर गोळी झाडली." यावरून पोप व त्याचे अनुयायी हे राष्ट्रसंघटनेचे कायमचे शत्रु होते, हें उघड आहे. आणि बहुसंख्य जर्मन जनता त्यांच्या धार्मिक सत्तेच्या पकडींतू मुक्त झाली होती म्हणूनच जर्मन राष्ट्राची घडण होऊ शकली यांतहि शंका नाही.

औद्योगिक क्रांति

 आणि युरोपच्या गेल्या दोन शतकांच्या इतिहासांत सर्व क्षेत्रांत हेंच मन्वंतर घडून येत असल्याचे दिसून येतें. भांडवलशाहीचा उदय, विकास आणि परिणति ही गेल्या दोन शतकांतलीच आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये व नंतर सर्व पश्चिम युरोपांत औद्योगिक क्रांति झाली व तींतूनच भांडवलशाही निर्माण होऊन अपार धनसमृद्धि प्राप्त करून घेणं मानवाला शक्य झालें. ही औद्योगिक क्रांति व भांडवलशाही धर्मक्रांतीवांचून जन्माला येणें शक्य नव्हते, असें अनेक पंडितांचे मत आहे. डब्ल्यू. इ. एच्. लेकी याने 'रॅशनॅलिझम् इन युरोप' या आपल्या ग्रंथांत 'दि इंडस्ट्रियल हिस्टरी ऑफ रॅशनॅलिझम' या प्रकरणांत हा विचार स्पष्ट करून मांडला आहे. त्याने आपल्या ग्रंथांत 'राजकारणाचें ऐहिकीकरण' (सेक्युलरायझेशन) 'अर्थव्यवस्थेचे ऐहिकीकरण' अशींच या प्रकरणांना नांवें दिली आहेत. त्यावरून बुद्धिवादाचा, कार्यकारणभावाचा, इहवादाशी कसा अविभाज्य संबंध आहे ते ध्यानीं येईल.
 तो म्हणतो की, ख्रिस्ती धर्माने धनाचा, अर्थार्जनाचा नेहमीच निषेध केला आहे आणि धनार्जनाची जबर आकांक्षा ही तर भांडवलशाहीची मुख्य प्रेरणा आहे. शिवाय ख्रिस्ती धर्माला व्याजबट्टा मंजूर नाही. व्याज घेणें ही तो धर्म- चोरीच समजतो. यामुळेच त्या काळांत सावकारी हा धंदा प्राधान्याने ज्यू लोकांच्या हातीं होता. कारण त्यांना ख्रिस्ती धर्मबंधनें लागू नव्हती. स्पेन, फ्रान्स हे देश कॅथॉलिक धर्माच्या वर्चस्वाखाली नसते, तर त्यांना व्यापार व उद्योग यांचं महत्त्व समजलें असतें व त्यांनी मूर, ज्यू व ह्युगेनॉटस् यांना हाकलून देऊन आत्मघात करून घेतला नसता. प्रोटेस्टंट धर्म ज्यांनी स्वीकारला होता त्या इंग्लंड, हॉलंड या देशांनी वरील लोकांना उदार आश्रय देऊन आपला फायदा करून घेतल्याचें वर सांगितलेच आहे. अर्थशास्त्र व भौतिक विज्ञान यांची अठराव्या शतकांत वाढ झाली. तेव्हा शेती हाच धंदा श्रेष्ठ व कारखानदारी हा हीन व्यवसाय होय हा रूढ सिद्धान्त पदभ्रष्ट झाला व भांडवलशाहीचा मार्ग मोकळा झाला. तेव्हा राष्ट्रसंघटनेला ज्याप्रमाणे धर्मक्रांति अवश्य होती त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीला व भांडवलशाहीच्या उदयासाठीहि त्या प्रोटेस्टंट धर्मक्रांतीची आवश्यकता होती.
 जीन काल्व्हिन हा लूथरप्रमाणेच प्रोटेस्टंट धर्मक्रांतीचा अध्वर्यु होता. त्याचा चरित्रकार म्हणतो की, भांडवलशाहीच्या विकासाचें श्रेय बऱ्याच अंशी काल्व्हिनला आहे. व्याजबट्ट्यावरची बंदी त्याने काढून टाकली. पण त्यापेक्षाहि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यापार, कारखाने, पेढी या उद्योगांना त्याने नैतिक अधिष्ठान निर्माण करून दिले. जुन्या धर्माने त्यांना निद्य मानलें होतें. ख्रिस्ती लोकांना तें वर्ज्य केलें होतें. त्यामुळे जरी कांही लोक तो व्यवसाय करीत असले तरी लोक त्यांना अनाचारी मानीत आणि त्यांना स्वतःलाच पुष्कळ वेळा आपण हीनव्यवसायी आहोंत, असें वाटत असे. अशा स्थितीत भांडवलशाहीचा विकास होणें शक्य नव्हतें. प्रोटेस्टंट धर्माचेहि यम-नियम, आचार- विचार, बंधनें, वर्ज्यावर्ज्य फार होतें. देहदंडन, कष्ट, तापसी वृत्ति यांना त्या पंथांत फार महत्त्व होतें. पण त्यांनो धनोद्योग वर्ज्य न मानल्यामुळे या कष्टाळू, उद्योगी व काटकसरी वृत्तीचा भांडवलशाहीला फायदाच झाला. कारण त्या वृत्तीशिवाय, अपार कष्टाशिवाय, भांडवलशाहीला यश आलें नसतें.

प्रोटेस्टंट पंथाचे कार्य

 सोळाव्या शतकाच्या अखेरीस एक जो नवा व्यापारी व उद्योगी वर्ग निर्माण झाला व मानाने जगूं लागला त्याचें श्रेय अनेक पंडितांच्या मतें, प्रोटेस्टंट पंथाला आहे; या मताचा मोठा पुरस्कर्ता लेकी हा होय. तो गेल्या शतकांत होऊन गेला. या विसाव्या शतकांत हा विचार पुन्हा अत्यंत प्रभावीपणे मांडणारा पंडित म्हणजे मॅक्सवेवर (१८६४- १९२०) हा होय. 'प्रोटेस्टंट एथिक अँड दि स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम' या आपल्या प्रबंधांत त्याने हाच विचार विवरून सांगितला आहे. साधारणतः धर्मपरायण लोक ऐहिक व्यवहाराविषयी विशेषतः आर्थिक उद्योगाविषयी, उदासीन असत आणि धनोद्योगी लोक धर्मनीति फारशी पाहत नसत. पण प्रोटेस्टंट पंथाने या धनोद्योगी लोकांना उत्तेजन देऊन धर्मकक्षेत स्थान दिल्यामुळे केवळ सुखोपभोग हेंच आपलें उद्दिष्ट मानणारा हा मध्यमवर्ग, इह व पर दोन्ही साधणें शक्य आहे हें ध्यानीं येतांच मोठ्या आनंदाने प्रोटेस्टंट पंथांत आला व दीर्घोद्योग, अविरत कष्ट, अर्पण- वृत्ति हे आपले गुण त्याने अर्थ-व्यवसायांत आणले आणि कॅपिटॅलिझमला चालना मिळून सर्व नवे उद्योग- व्यवसाय यशस्वी झाले, असा मॅक्सवेवरच्या प्रतिपादनाचा भावार्थ आहे.
 अर्थव्यवस्थेप्रमाणेच राजकारणहि आता ऐहिक होऊं लागलें आहे. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धांत राष्ट्रभावना उदयास आली तेव्हाच राजकारणाला इहवादी रूप प्राप्त होऊं लागलें होतें. पण त्या वेळीं देवदत्त राजसत्तेचें तत्त्व उदयास आल्यामुळे इहवृत्तीचा विकास तितकासा होणें शक्य नव्हतें. व्यक्तिवाद, जनतेची सार्वभौम सत्ता या तत्त्वांचा चार-दोन तत्त्ववेत्त्यांच्या पलीकडे तेव्हा मुळीच प्रसार झाला नव्हता. आता त्या तत्त्वांचा सर्वत्र पुरस्कार होऊं लागला. सामाजिक कराराच्या तत्त्वाचा उदय म्हणजे दैवी सत्तेचा संपूर्ण लोप होय. मानव निसर्गतः स्वतंत्र व सम असून, समाजाच्या रक्षणासाठी त्याने राजाशी करार करून त्याला कांही सत्ता, कांही अधिकार दिले व तितक्यापुरती स्वतःवर कांही कायद्याचीं बंधने घालून घेतली, असा या करारतत्त्वाचा (सोशल कॉंट्रॅक्ट) अर्थ आहे. यांत कोठल्याहि राजाच्या किंवा पोपच्या दैवी सत्तेचा, देवदत्त अधिकाराचा संबंध नाही, हें उघड आहे. त्यामुळे येथूनच राजकारणाचें ऐहिकीकरण होण्यास प्रारंभ झाला.
 सामाजिक कराराच्या तत्त्वाचा रूसो हा प्रणेता मानला जातो. व्यक्ति- स्वातंत्र्य, समता व जनतेची सार्वभौमसत्ता आणि याच्या भरीला सामाजिक कराराचें तत्त्व हीं तत्त्वें रूसोने आपल्या अत्यंत प्रभावी शैलीने फ्रेंच जनतेंत प्रसृत केल्यामुळेच क्रांतीचा ज्वालामुखी भडकला व त्यांत फ्रेंच राजसत्तेची आहुति पडली. यामुळे रूसोला सामाजिक कराराच्या तत्त्वाचा उद्गाता म्हणतात तें युक्तच आहे. पण त्याच्या आधी शंभर वर्षांपासून हॉब्स व लॉक हे इंग्लिश राज्यशास्त्रज्ञ या तत्त्वाचें प्रतिपादन करीत होते. या प्रत्येकाच्या प्रतिपादनाच्या तपशिलांत फार मतभेद होते. पण राजसत्ता ईश्वरदत्त नाही, ती सामाजिक करारानेच शास्त्याला लाभते, याविषयी मतभेद मुळीच नव्हता.

बुद्धिवादाचें युग

 त्याचप्रमाणे व्यक्ति-स्वातंत्र्य, मुद्रण-स्वातंत्र्य. जनतेची सार्वभौम सत्ता, सामाजिक समता, घटनाबद्ध शासन याविषयीहि कोणाचें दुमत नव्हतें. अठराव्या शतकाच्या प्रारंभी या तत्त्वांच्या प्रतिपादनास इंग्लिश राज्यशास्त्रज लॉक याने प्रारंभ केल्यावर पुढे ह्यूम, रूसो, व्हॉल्टेअर, माँटेस्क, थॉमस पेन यांसारख्या थोर शास्त्रज्ञांनी अनेक ग्रंथ लिहून अनेक प्रकारांनी तीं तत्त्वें जनतेंत दृढमूल करून टाकली आणि राजकारणांतून दैवी सत्तेच्या तत्त्वाचा उच्छेद करून त्याला पूर्ण इहनिष्ठरूप दिलें. यामुळेच अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून बुद्धिवादाचें युग (एज् ऑफ रीझन) सुरू झालें, असे इतिहासकार म्हणतात. या दृष्टीने थॉमस पेन याच्या 'राइटस् ऑफ मॅन' व 'एज् ऑफ रीझन' या दोन ग्रंथांचें अनन्य महत्त्व आहे. फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका या तीनहि देशांत या ग्रंथांनी प्रचंड क्षोभ निर्माण केला. अमेरिकेच्या क्रांतीप्रमाणेच फ्रेंच राज्यक्रांतीमागचीहि थॉमस पेन (१७३७- १८०९) ही एक प्रेरक शक्ति होती. धार्मिक सत्ता, राजसत्ता यांची जीं कांही बंधनें या काळपर्यंत लोकांच्या मनावर होतीं तीं सर्व या ग्रंथांनी तोडून टाकलीं व मानवी मन शब्दप्रामाण्याच्या, धर्मसत्तेच्या व असहिष्णुतेच्या युगांतून उचलून बुद्धिप्रामाण्याच्या, लोकसत्तेच्या धर्म- समानत्वाच्या बुद्धिवादाच्या युगांत आणून ठेवलें.
 पश्चिम युरोपच्या या कथेंत अमेरिकेतील इहवादाचा विचार कोठे आणलेला नाही. कारण तो विषयाच्या कक्षेच्या बाहेर आहे. पण अमेरिका ही इहवादी पक्षाची प्रारंभापासूनच फार मोठी शक्ति असल्यामुळे व तत्त्वतः तिचा पाश्चात्त्य देशांत अंतर्भाव होत असल्यामुळे तेथील इहवादाचा अगदी थोडक्यांत येथे परामर्श घेऊन मग पुढे जाऊं.
 अमेरिकन वसाहतींचा जन्मच मुळी युरोपांतील धर्मक्रांतींतून झालेला आहे. इंग्लंडमध्ये जेम्सच्या कारकीर्दीत तसा धर्मच्छळ नव्हता, पण प्युरिटन पंथाला मात्र स्वातंत्र्य नव्हतें. त्यामुळे अनेक प्युरिटनपंथी लोक १६२० साली मे फ्लॉवर नामक जहाजांतून अमेरिकेला गेले. नंतरच्या काळांत तेथे अनेक वसाहती स्थापन झाल्या. त्यांतील बहुसंख्य धर्मसुधारकांच्याच होत्या. तरीहि तेथे धार्मिक संघर्ष टळले नाहीत. प्युरिटनपंथीयांना ज्याप्रमाणे प्रोटेस्टंट पाण्यांत पाहत त्याचप्रमाणे प्युरिटन हे क्वेकर- पंथीयांचा तीव्र द्वेष करीत. याच सुमारास रॉजर विल्यम हा एक धर्माधिकारी अमेरिकेंत आला. तो प्युरिटनपंथी होता. पण इतर पंथीयांना धर्मस्वातंत्र्य दिलें पाहिजे, असा उपदेश तो करूं लागला. त्याचबरोबर इंग्लंडच्या राजाची सत्ता अमेरिकेंत चालू नये असेंहि तो प्रतिपादूं लागला. त्यामुळे मासाच्युसेट्सच्या न्यायालयाने त्याला हद्दपार केलें. पण रॉजर विल्यम याने तेथून पळून जाऊन ऱ्होड आयलंड नांवाची नवी वसाहत स्थापन केली.
 विल्यम पेन हा इंग्लिश तरुण क्वेकरपंथीय होता. त्याने अमेरिकेत येऊन पेन्सिल्व्हानिया नांवाची आणखी एक नवी वसाहत स्थापली. क्वेकरपंथीय लोक अंध धर्मसत्ता व राजसत्ता यांना तर विरोध करीतच, पण शिवाय काळे निग्रो व गोरे युरोपीय यांच्यांतहि भेदभाव करूं नये, असेंहि मत तें मांडीत. यामुळे अमेरिकेत त्यांचा भयंकर छळ झाला. त्यांना बर्फावरून फरफटत नेत, तुरुंगांत डांबून ठेवीत आणि फाशीहि देत; पण प्युरिटन, प्रोटेस्टंट, क्वेकर सर्वच ताठर मानेने जुलूम, यातना सहन करीत असल्यामुळे व अमेरिकेत पूर्वपरंपरेचा व म्हणूनच पूर्वग्रहांचा तीव्र जोर नसल्यामुळे लवकरच तेथील जनता विवेकी झाली आणि थॉमस पेन, फ्रँकलिन, वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन तिने राजकीय व इतर सर्व स्वातंत्र्यांची स्थापना केली व आपल्या जीवनाला पूर्ण इहवादी रूप दिलें.

विज्ञानाचा आधार

 आता अमेरिकेप्रमाणेच युरोपांतल्या बहुतेक सर्व देशांनी आपापल्या राष्ट्रीय जीवनांत, राजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षण, कला या सर्व क्षेत्रांत इहवादी तत्त्वांचा अंगीकार केला आहे. त्या संबंधांत एक महत्त्वाची गोष्ट सांगून हें विवेचन संपवूं. ती गोष्ट ही की, आता पाश्चात्त्य जगांतील धर्महि इहवादी झाला आहे. परमेश्वर हें जगांतील सर्व धर्मांचें मूळ अधिष्ठान आहे. तो परमेश्वर आज विज्ञानाच्या आधारें सिद्ध करण्यांत येतो. परमेश्वराच्या वचनांच्या आधारें पूर्वी भौतिक जगांतील सत्यासत्याचा निर्णय करण्यांत येत असे. आज भौतिकशास्त्रांच्या आधारें परमेश्वराच्या अस्तित्वाविषयीचा निर्णय करण्यांत येतो. जगांतले आजचे बहुतेक सर्व भौतिक शास्त्रज्ञ ईश्वरवादी आहेत.
 सर जेम्स जीनने म्हटलें आहे की, विश्वाचा अभ्यास करतां, असें स्वच्छ दिसतें की, त्यामागे मानवी मनासारखेंच गणिती पद्धतीने विचार करणारें नियामक मन आहे (दि मिस्टीरियस युनिव्हर्स पृष्ठ १४९), एडिंग्टन म्हणतो की, निसर्गशास्त्रामुळे धर्म नष्ट होईल ही कल्पना फोल आहे. फ्रॅन्सिस गाल्टन हा कोणताहि लेख प्रसिद्धीस देण्यापूर्वी थोडा वेळ प्रार्थना करीत असे. प्रा. व्हाईट हेड म्हणतो, "या विश्वाला धर्मामुळेच अर्थ प्राप्त होतो. मानवाचें अंतिम प्राप्तव्य त्यामुळेच समजते. मात्र तें अंतिम सत्य बुद्धीच्या पलीकडे आहे." (सायन्स अँड मॉडर्न वर्ल्ड, पृष्ठ २३८) ऑलिव्हर लॉज, आइन्स्टाईन या थोर शास्त्रज्ञांनी परमेश्वर मानण्यावांचून जगाचें गूढ उकलणार नाही, असाच निर्वाळा दिला आहे.
 या विश्वाला रचना आहे, त्यांत सुसंगति आहे, त्यांत व्यवस्था आहे, असें तत्त्ववेत्ते म्हणतात आणि भौतिक शास्त्राच्या प्रत्येक नव्या शोधांमुळे हेंच सिद्ध होत आहे. तेव्हा आज परमेश्वराचें अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धर्माचार्यहि भौतिक- शास्त्रांचीं प्रमाणें आग्रहाने पुढे मांडतांना दिसतात आणि एकदा परमेश्वराचें अस्तित्व शास्त्रीय प्रमाणांवर अवलंबून ठेवल्यानंतर तत्त्वज्ञान, नीति व सदाचार यांचे निकषह विज्ञानानेच निश्चित करणें युक्त होय हें कांही सांगावयास पाहिजे असें नाही. इहवादाची यापलीकडे कसलीच मागणी नाही. त्याचा धर्माशीं, परमेश्वराशीं, भक्ति, प्रार्थना, नीति यांच्याशी कधीहि विरोध नव्हता व नाही. देकार्त, न्यूटन, व्हॉल्टेअर सर्व धर्मनिष्ठ होते. परमेश्वरावर त्यांची अंध श्रद्धा होती. ऐहिक जगांतील सत्यासत्य निसर्गविषयक ज्ञान, राजनीति, आचार-विचार, नीति- अनीति, सामाजिक रचनेची तत्त्वें, ही धर्मपीठाच्या अंध, दुराग्रही मतावर अवलंबून ठेवू नयेत एवढाच इहवादाचा प्रारंभापासून आग्रह होता व अजूनहि आहे.

धर्मसत्तेची पकड

 पश्चिम युरोपांतील इहवादाचें विवेचन येथवर केलें. त्याआधी सोव्हिएट रशिया व मुस्लिम देश यांतील इहवादाच्या प्रगति- परागतीचा इतिहास आपण पाहिला. त्यावरून मानवी मनावरची धर्मसत्तेची पकड फार दृढ व फार अनिवार असून, दर वेळीं तीच बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिवाद, स्वतंत्र चिंतन, सहिष्णुता आदि इहवादी तत्त्वांच्या आड येत असते हे दिसून आलें. हा सर्व संसार अत्यंत दुःखमय असल्यामुळे मनुष्याला कोणा तरी दैवी, अतिमानुष, दयाळू, सर्वसमर्थ अशा शक्तीचा आश्रय अपरिहार्य होऊन बसतो. "जोपर्यंत जगांत दारिद्र्य व दुःख आहे तोंपर्यंत परमेश्वर राहणारच," असें विल् ड्युरंट याने म्हटलें आहे, तें याच अर्थाने. संकटग्रस्त मानवाने अशा दैवी शक्तीचा धांवा केला, जन्मभर तिची उपासना केली, तरी त्यांत हानिकारक असे काही नाही. पण मानवाच्या या वैकल्याचा, या अगतिकतेचा, असहायतेचा फायदा घेऊन स्वतःला धर्मवेत्ते म्हणविणारे लोक त्याला या दुःखातून मुक्ति देण्याचें आश्वासन देऊन धर्माला वाटेल तें विकृत रूप देतात व सर्व मानवी जीवनावर सत्ता स्थापून समाजाला लुटूं पाहतात तेव्हा धर्मसंस्था ही अत्यंत घातक रूप धारण करते.
 मुस्लिम देशांत हेंच झालें. पश्चिम युरोपांत हेंच झालें. सोव्हिएट रशियांत अगदी हेंच नव्हे, पण अशाच प्रकारचें घडलें. बुद्धिवाद, तर्क यांच्या पलीकडचें, गूढ, असें एक तत्त्वज्ञान मार्क्सने सांगितलें आणि त्याचे अनुयायी पोपसारखेच, धर्माचार्यासारखेच, बुद्धिवादाचे, स्वतंत्र प्रज्ञेचे, व्यक्तिवादाचे हाडवैरी बनले. साधारण याच काळांत हेगेलच्या तत्त्वज्ञानाची अशीच दुष्परिणति जर्मनींत हिटलरने केली. हेगेलने शासनाची एक आध्यात्मिक उपपत्ति बसविली होती. तीअन्वये शासन ही अमूर्त परब्रह्मासारखीच एक वस्तु आहे आणि वंशपरंपरेने आलेला राजा हा तिचेंच मूर्त रूप आहे. या तत्त्वज्ञानान्वये व्यक्तीसाठी शासन नसून शासनासाठी व्यक्ति आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, जनतेचें शासनावरील नियंत्रण, शासन पदच्युत करण्याचा व्यक्तीचा अधिकार हें सर्व संपुष्टात येतें.
 हिटलरने जर्मनीत हेंच केलें. जर्मन लोक, भौतिकशास्त्रे, स्वतंत्र प्रज्ञा, संघटना विद्या यांसाठी जितके प्रसिद्ध आहेत तितकेच अविवेक, अंधनिष्ठा, त्यांनी येणारा पिसाटपणा यांसाठीहि प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच फ्रान्सप्रमाणेच जर्मन लोक लोकशाही यशस्वी करण्यास कधीहि समर्थ झाले नाहीत. केप्लर, लूथर, लिबनिटस्, मॅक्स प्लॅक आइनस्टाईन, हर्षल, हर्टस, बिस्मार्क असे थोर पुरुष ज्या जनतेने निर्माण केले तीच जनता, तेच लोक विसाव्या शतकांत हिटलरच्या कमालीच्या अर्थशून्य, विवेकहीन, शास्त्रहीन, अंध व अत्याचारी तत्त्वज्ञानाच्या आहारीं जाऊं शकतात याचा अर्थ फार वाईट आहे. अत्यंत श्रेष्ठ कर्तृत्व व प्रज्ञा अंगी असलेला एक मोठा समाज मधून मधून आंधळ्या दुराग्रहाने पछाडला जातो व मानवसमाज त्याच्या प्रचंड कर्तृत्वाला दीर्घकाळपर्यंत मुकतो हा त्याचा अर्थ आहे. अंध धर्मसत्ता किंवा तत्सम दुसरी सत्ता यांमुळे यापेक्षा जास्त हानि ती काय व्हावयाची ?
 लोकसत्ता हा एक प्रजागर आहे, अखंड सावधता, असें म्हणतात. वरील इतिहासावरून इहवादाविषयीहि तेंच म्हणावें लागेल.