इति एकाध्याय

विकिस्रोत कडून

इति एकाध्याय


 रात्रभर जागरण करून गाडी चालवणाऱ्याला पहाटे पहाटे, क्षणार्धाची का होईना, गुंगी लागून जाते, तशाच उडत उडत गुंगीतून खटकन जागा होऊन मी समोर पाहिले. माईचा श्वासोच्छ्वासाचा आणि त्यात कण्हणे मिसळल्याचा आवाज थांबला होता. शेवटी एकदाची शांत, गाढ झोप लागली हे पाहून खूप बरे वाटले. गेल्या पंधरा सोळा तासांत मोठमोठ्या आवाजाने श्वास चालला होता. डॉक्टरांनी नाकातून अन्न देण्यासाठी नळी खुपसलेली असल्यामुळे श्वासाचा आवाज आणखीनच विचित्र यायचा. श्वासानेच माई थकून जात आहे, असे वाटे.

 डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे माईची प्रकृती सुधारत आहे याची नोंद घेतली आणि पुन्हा एक क्षणभराची गुंगी आली. पापण्या मिटतात न मिटतात तोच तोंडावर बर्फगार पाण्याचा हबका बसावा तशी खडबडून जाणीव झाली. माईला इतकी शांत झोप लागेलच कशी? चटकन उठून तिचा हात हलवून बघितला, चेहऱ्यावरून हात फिरवला. तसे काही वेगळे वाटत नव्हते; पण नाकाशी बोट धरूनही श्वास जाणवेना, तेव्हा धावत धावत जाऊन खोलीतल्याच दुसऱ्या खाटेवर दोनतीन दिवसांच्या सतत जागरणानंतर पंधरावीस मिनिटांपूर्वीच थोडे डोळे लागलेल्या सिंधूताईंना हलवून उठवले. सगळ्यात मोठी नमाताईही आवाजाने उठली.

 "माईचा श्वास थांबल्यासारखा वाटतोय गं." एवढेच मी बोललो. मग फटाफट विजेरी घंटा वाजल्या, नर्स आल्या, डॉक्टरीणबाई आल्या, त्यांनी आम्हा तिघा भावंडांना खोलीच्या बाहेर काढले. त्या वेळी पहाटेचे बरोबर पाच वाजले होते. माईचा श्वास थांबल्याचे माझ्या लक्षात येऊन पाच मिनिटे झाली. शेवटच्या क्षणी जी काही धडपड, धावपळ करायची ती चालत राहिली. आम्ही तिघे भावंडे एका कोंडाळ्यात उभे राहिलो. मला समजले होते, माई गेली आहे. मला वाटते, माझ्या बहिणींनाही ते समजले होते; पण उमजले नव्हतं. ५-२० ला डॉक्टरबाईंनी बाहेर येऊन आम्हाला सांगितले, "She has Expired."

 नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्व तऱ्हेने काळ माझी परीक्षाच घेत होता. १८ नोव्हेंबरला धाकटी मुलगी गौरी, फ्रान्समध्ये डॉक्टरीचा अभ्यास करते, ती तीन महिन्यांकरिता म्हणून हिंदुस्थानात आली. आल्यावर दोन दिवस तिचं हालहवाल विचारणे, फार दिवसांनी भेटलेल्या, थोड्या गप्पा असे झाले आणि ती अहमदाबादला

नेत्ररोगतज्ज्ञांच्या एका परिषदेकरिता निघून गेली. अहमदाबादची परिषद संपवून गौरी आंबेठाणला परत आली. ते तिच्या फ्रान्सच्या डॉक्टर प्रोफेसरांच्या बरोबर. माणस मोठा अफलातून. व्यवसायाने म्हटले तर डोळ्यातील कठिणातील कठीण शस्त्रक्रिया करणारा शल्यविशारद; पण भारताचा इतिहास, तत्त्वज्ञान, योगसाधना यांचा जबरदस्त व्यासंग. शेतकरी संघटना, तिची महिला आघाडी आणि, विशेषतः, लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम यांच्याविषयी बोलताना किती ऐकू आणि किती विचारू असे त्याला होऊन गेले. मी थोडा नेट लावला असता तर गृहस्थ सगळा व्यवसाय सोडून संघटनेच्याच कामाला अगदी बिल्ला लावून तयार झाला असता! दोन-तीन दिवस मोठे छान गेले. मग प्रोफेसरसाहेबही फ्रान्सला परत गेले आणि गौरीही दिल्लीच्या स्नेह्यानातेवाइकांना भेटण्यासाठी ३० नोव्हेंबरला रवाना झाली.

 त्याच वेळी अमेरिकेत स्थायिक झालेला माझा सगळ्यांत धाकटा भाऊ बायकोसह दिल्लीला आला. या माझ्या धाकट्या भावाची जीवनकथाही मोठी अद्भूत आहे. १९७६ साली त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. दहाबारा वर्षे तो डायलिसीसवर राहिला. डायलिसीस हा मोठा किचकट आणि कटकटीचा प्रकार. डायलिसीस सुरू झाल्यानंतर इतकी वर्षे जगल्याचे उदाहरण दुर्मिळच. त्यानंतर त्याला जुळणारे एक मूत्रपिंड, अपघाती मृत्यूच्या प्रकरणी मिळाले. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी आरोपणही केले. त्यालाही आता पाचसहा वर्षे झाली. एवढ्या दिव्यातून पार पडलेला माझा भाऊ आणि वहिनी दोघेही मोठ्या उमेदीने, अगदी हसतखेळत सगळ्या परिस्थितीचा सामना करतात. संसारातल्या एकसंधपणाला जराही कुठे तडा नाही. दोन मुले. सुदैवाची गोष्ट अशी, की दोघेही असाधारण बुद्धिमत्तेची. या धाकट्या भावाची आणि गौरीची गाठभेट दिल्लीला झाली. त्यानंतर तो पुण्याला आला. आंबेठाणच्या शेतावर आला. १३ डिसेंबरपर्यंत तो पुण्याला राहिला. आम्ही सगळी बहिणभावंडं त्या निमित्ताने एकत्र झालो. १९ डिसेंबर रोजी माझा धाकटा भाऊ बायकोबरोबर अमेरिकेस परत गेला.

 मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे १४ डिसेंबरपासून मी जिल्हावार महिला अधिवेशने आणि माजघर शेतीच्या प्रदर्शनांच्या कामाला लागलो. २० डिसेंबरपासून सातआठ दिवस दिल्लीला राहावे लागले. याच काळात अर्थमंत्र्यांशी अंदाजपत्रकासंबंधी चर्चा झाली आणि किसान समन्वय समितीने ८ फेब्रुवारीच्या आंदोलनाचाही निर्णय जाहीर केला.

 या वेळेपर्यंत गौरी एक महिनाभर आणंद येथील एका इस्पितळात काम करून आणखी अनुभवाकरिता औरंगाबद येथे आली होती. दिल्लीहून परतताना मी औरंगाबादला आलो. बापलेकींची भेट एक-दोन दिवस कशीबशी तिथे झाली. २४ जानेवारीला नाशिक आणि २५ जानेवारीला धुळे, जळगाव येथील महिला अधिवेशनांचे कार्यक्रम झाले. २५ तारखेला रात्री जळगाव येथे कार्यकारिणीची बैठक झाली. ८ फेब्रुवारीच्या रास्ता रोकोच्या कार्यक्रमाला कार्यकारिणीने मंजुरी दिली आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुकांकरिता महिला आघाडीचे स्त्रीउमेदवार आणि पाठीराखे भाऊ उमेदवार असे मिळून ४००-५०० उमेदवार निवडणुकीत उतरवायचे ठरवले. २६ तारखेला औरंगाबाद येथे गौरी भेटली. इतक्या वर्षांतून कधी नव्हे ती लेक मायदेशी आलेली. पण कामाचा व्याप असा झाला की दोघांना फुरसतीने एकमेकांशी बोलायलासुद्धा सवड मिळाली नाही. २७ जानेवारी रोजी गौरी पुण्याला जाऊन तिथून पुन्हा दिल्ली येथे भरणाऱ्या एका परिषदेकरिता जायला रवाना झाली आणि मी बीड, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला असा एक दिवस एक जिल्हा अधिवेशन असा कार्यक्रम घेत पुढे चाललो. गौरीचा फ्रान्सला परत जाण्याचा दिवस पक्का ठरला होता; ७ जानेवारीला. त्याआधी तिने अमरावतीला येऊन भेटून जावे हेही संभव राहिले नाही आणि माझे दिल्लीला जाणे तर असंभाव्यच झाले. गौरी दिल्लीला खासदार भूपेंद्रसिंग मान आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे उतरली होती. अकोला जिल्ह्यातला लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा बाराला संपला. त्यानंतर गौरीशी निदान फोनवर बोलणे व्हावे म्हणून फोन लावला. फोन लागल्या लागल्या गौरीने बातमी दिली- पुण्याहून तिला फोन आला होता, माझ्या मोठ्या मुलीने- श्रेयाने निरोप दिला होता, की सकाळीच स्वयंपाक करता करता पदर पेटून माझी आई-माई-खूप भाजली आहे; तिला हॉस्पिटलमध्ये नेले आहे. मुंबईची माझी बहिण पुण्याला येऊन पोचली आहे. तितक्या उशिराही लगेच पुण्याला फोन लावला. सिंधूताईशी बोलणे झाले.

 "माई २० % भाजली आहे, पण प्राणावरचे संकट निभावले आहे. दोन तीन आठवडे इस्पितळात राहावे लागेल असा डॉक्टरांचा अंदाज आहे."

 "ठरलेला कार्यक्रम रद्द करून पुण्याला लगेच यायचे का?"

 "तशी काही आवश्यकता नाही," सिंधुताईंनी स्पष्ट केले. लगेच पुण्याला निघून ये म्हणून ती म्हणाली असती, तर मी काय केले असते कुणास ठाऊक?


 २३ फेब्रुवारीपर्यंत सर्व सभांचा कार्यक्रम जळगावच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अगदी कसोशीने ठरला होता. जिल्ह्याजिल्ह्यातील प्रतिनिधींनी हमरीतुमरीवर येऊन एक एक दिवस एक एक सभा मिळवली होती. त्यात बदल करायचा म्हणजे मोठाच गोंधळ झाला असता. सभा तर चालू राहिल्या आणि मीही मनाशी मोठा खंत खात राहिलो. एका बाजूला धाकटी मुलगी परदेशी जाणार आहे, तिला निरोप द्यायला जाण्याचीसुद्धा शक्यता नाही आणि दुसऱ्या बाजूला पुण्याला जन्मदात्री आई गंभीर होऊन इस्पितळात आहे, तिला भेटायला जाणेसुद्धा दुरापास्त.

 ७ जानेवारीला गौरी फ्रान्सला परत गेली. दररोज कार्यक्रम संपल्यानंतर कितीही वाजोत, पुण्याला फोन करून खबरबात घ्यायची आणि एक एक दिवसाचा कार्यक्रम पुढे रेटायचा असे चालले होते. ११ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातला कार्यक्रम संपवून शरद बोबड्यांच्या घरी पोचायला रात्रीचे दोन वाजले. पहारेकऱ्याच्या हातीच कामिनी वहिनींनी चिठ्ठी ठेवली होती. 'पुण्याहून निरोप आला आहे. कोणत्याही परिस्थितीत श्रेयास टेलिफोन करावा, रात्री कितीही उशीर झाला असला तरी.' श्रेयाला लगेच फोन केला. ती म्हणाली, "माईच्या जखमा भरून येताहेत; पण तिची जगण्याची इच्छाच राहिली नाही. सगळे भाऊ, बहिणी पुण्यात जमले आहेत, तर मीही कोणत्याही परिस्थितीत पुण्याला येऊन जावे." फोन ठेवला. झोपायच्या खोलीत आलो. झोपणे कठीणच होते. चुकामुकीनेसुद्धा गोंधळ होऊ नये, म्हणून वहिनींनी माझ्या उशीवरही दुसरी चिठी ठेवली होती.

 नागपूर आणि पुणे दोन्हीही महाराष्ट्रातच; पण पुण्याला जाउन यायचे म्हटले म्हणजे किमान तीन दिवसांचा तब्बल प्रवास. एवढे करून आईची भेट घेण्यासाठी फार तर दोन तासांची सवड सापडायची. तीन दिवसांचे कार्यक्रम रद्द कसे करायचे? चंद्रपूर जिल्ह्यातला १२ तारखेचा कार्यकम रद्द करायचे ठरले. ११ तारखेचा तेथला कार्यक्रम अर्धवट सोडून नागपूरला परतलो. तेथे विमान पकडून मुंबईला गेलो. रात्रभर बसमध्ये बसून पहाटे चारसाडेचारला पुण्याला श्रेयाच्या घरी गेलो. तास-दीडतास झोप काढून सकाळी आठ वाजता इस्पितळात गेलो.

 एरवी माईला कधीही भेटायला गेलो, तर ती कामात असायची. तिचे वय आता ८० च्या वर गेले होते. लहानपणापासून डोळे अधू. त्यातील एकाने तिला काहीच दिसत नसे. एका डोळ्याने थोडेफार पुसट पुसट दिसत असावे. त्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून अधिक चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करावे असे आम्ही मुलांनी अनेकदा सुचवून पाहिले; पण त्या डोळ्यानेही दिसेनासे झाले तर आपण पुरे आंधळे होऊ याची माईला फार धास्ती होती. शस्त्रक्रिया करायचीच असेल, तर अगदी बाद झालेल्या डोळ्यावर

करा असा युक्तिवाद करत करत तिने शस्त्रक्रिया पुढे ढकलत ठेवली.

 गेल्या वर्षा-दोन वर्षांत डॉक्टरांनीही आपले मत बदलले आणि एवढ्या मोठ्या वयात शस्त्रक्रियेचा धोका नकोच असे सागायला सुरुवात केली. ऑपरेशन रद्द झाले; पण डोळ्यांनी जवळ जवळ काहीच दिसेनासे झाले होते.

 तरीही कोणत्या ना कोणत्या कामात ती गढलेली असे. बागेतील पालापाचोळा गोळा करण्यापासून ते नारळ, आंबे, पेरू गोळा करणे, त्यांची वासलात लावणे, घरामधल्या वेगवेगळ्या दुरुस्त्यांची कामे करणे किंवा करवून घेणे, वायरमन, गवंडी, सुतार, प्लंबर यांच्या मागे लागून घराची डागडुजी चालवणे आणि, याशिवाय, घरातली दररोजची केरवारा, साफसफाई, धुणे, भांडी, स्वयंपाक ही सगळी कामे ती स्वत:च्या स्वत: करी. कधीमधी एखाददुसऱ्या कामाला कामवाली बाई मिळायची; पण माईच्या शिस्तीच्या रेट्यात टिकणे फार कठीण. तिच्याकडे कामाला राहिलेल्याबाया, मोलकरणी यांच्याच कथा लिहायच्या म्हटल्या तरी एक वाचनीय ग्रंथ होऊन जाईल. डोळे जवळ जवळ नसताना अगदी शेवटपर्यंत ती आग्रहाने वर्तमानपत्राचे मथळेतरी नजरेखाली घाली. कोणत्याही मोडक्या तोडक्या भंगार वस्तूतून विजेचे दिवे तयार करणे हा तिचा आवडता छंद होता. माझ्या चष्म्याचा नंबर दीडदोनच आहे, पण तरी चष्मा घातल्याखेरीज मला डोळ्यांसमोर वर्तमानपत्रसुद्धा धरवत नाही. लहानसहान दुरुस्तीची कामे तर चष्म्याशिवाय जमतच नाहीत आणि माईला ते जमे, कसे कुणास ठाऊक!

 माईचा आणखी एक छंद होता, तो कविता करण्याचा. तिने बऱ्याच कविता केल्या आहेत. काही कुठे कुठे छापूनही आल्या आहेत. आपल्या कवितांचे लहानसे का होईना एकतरी पुस्तक छापून प्रकाशित करावे असा लकडा तिने म्हात्र्यांच्या मागे लावला होता. अगदी इस्पितळात असतानासुद्धा तिने याची आठवण करून दिली होती.

 प्रत्येक काम करण्याची तिची एक स्वत:ची पद्धत असे आणि ती पद्धत सर्वांत चांगली, एवढेच नव्हे तर शास्त्रशुद्ध आणि त्यापलीकडे जाऊन ती समाजाच्या आणि विश्वाच्या कल्याणाची आहे याबद्दल खात्री असे आणि लोकांना हे सत्य पटवून देण्याचा तिचा मोठा आग्रह असे. तिचे खाणे एकूणच कमी. दिवसातनं एकदा कुकर लावून डाळ, भात, भाजी उकडून घ्यायची; पण उकडण्याच्या कामाकरिता साधा वाफेचाच कूकर पाहिजे, प्रेशर कूकर घरात असून ती वापरायची नाही. कुकरचे भांडे पितळेचेच पाहिजे आणि यासंबंधी तिचा मोठा आग्रह असे. आम्ही कोणीही कधी घरी गेलो तर तिचे स्वागताचे वाक्य, "बरे झाले, तू आज आलास. मी अमुक अमुक पदार्थ केला आहे

आणि मला तुझी आठवणच येत होती." तिच्या पदार्थात ती जवळजवळ कोणतेच मसाले घालायची नाही. थोडेफार खोबरे, जिऱ्याचा एखादा दाणा; पण तिच्या पदार्थाला चव मोठी चांगली असे. म. गांधींनी शरीर राबविण्याकरितां एक मोठी कर्मठ दिनचर्या ठरवली होती. क्षणाक्षणाचा वापर होण्याबद्दल महात्माजींचा मोठा आग्रह असे; पण त्याकरिता त्यांना सूतकताईसारखे, फावल्या वेळेची भरपाई करण्याचे काम घ्यावे लागे. अशा हुकमी कामाची माईला कधी गरज वाटली नाही. दररोजची कामे आणि नित्य नवी कामे यात ती मोकळी अशी कधी दिसली नाही. चालू असलेल्या कामात जो येईल त्याला जुंपण्याची तिची धडपड असे. माझ्याबरोबर बबन आणि म्हात्रे यांचीसुद्धा कोणत्या ना कोणत्या कामात जुंपणूक व्हायची.

 बारा फेब्रुवारीला इस्पितळात माईच्या खोलीत सकाळी साडेआठला गेलो, तेव्हा स्वस्थपणे पडलेली अशी तिला मी पहिल्यांदा पाहिली. माझे मलाच मोठे आश्चर्य वाटले. हे इस्पितळ, इस्पितळातील खोली, टांगत्या बाटल्या, परिचारिकांच्या येरझारा हे सगळे खोटे; कोणत्याही क्षणी माई उठेल आणि कामाला लागेल असे सारखे वाटत राहिले.

 खोलीत, खोलीच्या बाहेर सगळेच भाऊ, बहिणी, मेव्हणे, वहिन्या जमा झालेल्या होत्या. दोनतीन दिवस माई माझी सारखी आठवण काढायची म्हणून मला आल्या आल्या खाटेपाशी नेण्यात आले. "शरद आला गं." असे मोठ्या बहिणीने सांगितले; मात्र मी जवळ गेलो आणि जणू प्रकृतीला काही झालेलेच नाही अशा आवाजात माई मला सांगू लागली.

 "तू आलास बरे झाले. हे बाकीचे कुणी माझे ऐकत नाहीत. तू डॉक्टरांना समजावून सांग. आता हे उपचार बंद करा आणि मला एखादे इंजेक्शन किंवा गोळी देऊन शांतपणे मरू द्या. या वाचवण्याच्या प्रयत्नाला काही अर्थ नाही."

 याच तऱ्हेचे बोलणे तिने यापूर्वीही सगळ्यांशी केलेलेच होते. तरीसुद्धा प्रत्येक वेळी हा सूर ऐकला म्हणजे सगळेजण गंभीर होत.वातावरणातला ताण काढून टाकण्याकरिता मी हसण्याचा आव आणून माईला म्हटले,

 "असे कसे चालेल? ज्योतिष्याने तुझ्या आधी मी मरणार आहे असे सांगितलेय. तेव्हा तुला मरू देऊन मला कसे परवडेल?" तरी तिचा हट्ट चालूच राहिला. आपला शेवट कसा व्हावा याबद्दल तिच्या काही स्पष्ट कल्पना होत्या. माझे वडील तेवीस वर्षांपूर्वी वारले त्या वेळी मी स्वित्झर्लंडहून समाचारासाठी आलो होतो. माईचे वय त्या वेळी आज माझे जेवढे वय आहे त्याच्या आसपास असणार. मुले, मुली सगळ्या मोठ्या

झालेल्या. आयुष्याचा जोडीदार निघून गेलेला. स्वित्झर्लंडला परत गेल्यानंतर मी माईला एक पत्र लिहिले होते. मी तिला असे लिहिण्याची गरज होती असे काही नाही. मी न लिहिताही तिचा निर्णय असाच झाला असता. "काका गेले म्हणजे आता उरलेले आयुष्य कसेबसे काढून संपवायचे आहे असा विचारही मनात आणू नकोस. आपल्या प्रतिमेला आणि कर्तबगारीला आजपर्यंत परिस्थितीने वाव दिला नाही. आज परिस्थिती अनुकूल झाली, तर जोडीदार निघून गेला. अशातही जिद्दीने उभे राहून आयुष्याला एक नवा अर्थ दिला पाहिजे." असे काहीतरी मी माझ्या त्या वेळच्या बुद्धीप्रमाणे आणि थोडे आगाऊपणे लिहिले असावे. त्या पत्राचा माई वारंवार उल्लेख करी. तिच्या आयुष्याची घडी तर तिने बसवलीच; पण एकट्याने एवढी वीसपंचवीस वर्षे राहण्याची वेळ येईल अशी तिची अपेक्षा नव्हती. कधीमधी सर्दीपडशाची, पोटाची किरकोळ दुखणी उद्भवत; पण ती डॉक्टरकडे क्वचित जाई. सगळी कामे करण्याचे तिचे असे जसे शास्त्र होते, तसेच तिचे असे स्वत:चे वैद्यकशास्त्र होते. लिंबाचे सरबत किंवा जास्तीत जास्त म्हणजे आल्याचे पाचक किंवा आयुर्वेदातील एखादे चूर्ण किंवा अतीच झाले तर होमिओपॅथीतील काही गोळ्या यावर तिचे सारे औषधांचे काम भागे. व्हिक्सची एखादी बाटली किंवा स्नायुदुखीवरचे एखादे मलम, अंग किंवा पोट शेकण्याकरिता एखादा तवा आणि कापडाचा बोळा एवढ्यावर ती सगळे भागवून नेई; पण किरकोळ तक्रारी सोडल्यास तिची अलीकडे उलटी तक्रार चालू झाली होती. ती तक्रार करायची, "माझी तब्येत आता सुधरतच चाललीये." कधीम्हणायची, "मला घेऊन जायचे देव विसरून गेला असे दिसते." पण आपलं मरण चटकन यावं, त्यात वेदना नसाव्यात आणि इस्पितळात राहणे मुळीच नसावे एवढी तिची फार फार इच्छा होती. लहानपणापासूनच सर्व प्रतिकूल परिस्थितीवर झगडूनझगडून मात करणाऱ्या माईची याबाबतीत मात्र मोठी निराशा झाली. सगळ्या दुखण्यांत वेदनामय म्हणजे भाजणे. भाजून इस्पितळात राहायला लागले हा म्हणजे तिच्यावर दुर्दैवाने काढलेला रागच होता. "ड्रेसिंग म्हणजे अगदी नरकयातना रे बाबा," असे म्हणायची. यापूर्वीही एकदोन वेळा माझ्यापाशी स्वेच्छामरणाविषयी बोलली होती. आज प्रत्यक्ष प्रसंग पुढे येऊन ठाकल्यावर तिचा स्वेच्छा मरणाचा आग्रह चालला होता. तिचा आग्रह तर्कशुद्ध होता पण तो मानण्याचे सामर्थ्य कुणातच नव्हते.

 "शरद, तू माझी मोठी निराशा केलीस. मला फार आशा होती, की तू तरी सगळ्यांना समजावून सांगशील आणि मला यातून सोडवशील," माईचं चाललं होतं आणि मीही ओढून ताणून युक्तिवाद करत होतो,

 "अशा परिस्थितीत मरण मागणे हा पळपुटेपणा आहे. तू बरी हो, घरी चल; मग मरायचे आहे असे सांगितले तर त्याचा विचार करता येईल. तू आत्ता मरायचे म्हणतेस तो तुझा खरा निर्णय कशावरून? जगण्याची तुझी खरंच इच्छा नसती तर भाजण्याच्या वेळी तू आपणहून अंगावर पाणी कशाला ओतून घेतले असतेस?" हे असले युक्तिवाद इस्पितळात खाटेवर पडलेल्या आईशी करणे यातली विक्षिप्तता आणि क्रूरता मला क्षणाक्षणाला जाणवत होती; पण माईला इतक्या स्पष्ट बोलण्याखेरीज चाललेच नसते. तीनचार तास थांबून मी टॅक्सीने मुंबईला जायला निघालो. संध्याकाळी तेथून विमान पकडून वर्ध्याला पोचायचे होते. १३ तारखेला वर्धा जिल्ह्यातला लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम पार पाडायचा होता.

 तीन तारखेला झालेल्या अपघाताची बातमी कळल्यापासून आणि, विशेषत:, नागपूरला श्रेयाचा निरोप मिळाल्यापासून मनावर मोठे दडपण होते. ऐंशीच्या वर वय गेले. त्यात हा असला अपघात. यातून माई उठते की नाही याबद्दल शंकाच वाटत होती. इस्पितळात आज तिचा खणखणीत आवाज ऐकला आणि बराच धीर आला. डॉक्टरांनी मात्र परिस्थिती अगदी स्पष्ट केली.

 "वीस टक्के भाजणे, म्हणजे काही फार गंभीर नाही, पण ऐंशीव्या वर्षी वीस टक्के भाजणे ऐंशी अधिक वीस, शंभर टक्के भाजणे आहे. माईंना मधुमेह वगैरे नाही त्यामुळे जखम भरून येईल; पण दुसऱ्या काही अडचणी त्यातून उद्भवण्याची शक्यता आहे." थोडक्यात, एकूण प्रकरण वाटते तितके सोपे नाही; पण शेवट येणार असला तरी तो अगदीच काही आज उद्या, इतक्यात नाही एवढा तरी मनाला धीर आला.

 वर्ध्याला गेल्यापासून पुन्हा लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमाचा आणि निवडणुकीच्या प्रचाराचा धबडगा चालू झाला व २३ फेब्रुवारीला रात्री नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात या कार्यक्रमाची सांगता झाली. जवळ जवळ सतत ५० दिवस एकसारखा दौऱ्याचा, भाषणांचा कार्यक्रम चालूच होता. सर्वसाधारणपणे रात्री दीड-दोनपर्यंत झोपणे नाही आणि सकाळची पहिली सभा नऊदहापेक्षा उशिरा नाही. दोन सभांच्या मध्ये प्रवासात मिळेल तेवढाच विरंगुळा आणि आराम. बसल्या जागी बोटसुद्धा हलवावेसे वाटू नये इतका मी थकलो होतो; पण १२ तारखेला इस्पितळातून निघताना माईला आश्वासन दिले होते, की मी २५ तारखेस येईन. भावाबहिणींनाही सांगितले होते, 'तोपर्यंत तुम्ही सांभाळा, मग मी बघतो.' दौऱ्याचा धबडगा संपवून आता इस्पितळात बसणे शक्य होणार होते. १२ तारखेला निघताना डॉक्टर म्हणाले होते, "तुम्ही परत या, माईंच्या

शेजारचीच खोली तुम्हाला देऊन तूम्हाला ॲडमिट करून घेतो." पण पुण्याला ताबडतोब परतणेही शक्य नव्हते. लासलगावला कांद्याचे आंदोलन उभे राहू पाहत होते. भास्करराव बोरावके लासलगावच्या कांदेबाजारात अनिश्चितकालीन उपोषणास बसले होते. पुण्याला एकदा गेलो म्हणजे तेथून सुटका केव्हा होईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे नांदेडहून अगदी मध्यरात्री निघून दुसरे दिवशी सकाळी लासलगावला भाऊंच्या भेटीला गेलो. तिथे सगळा गोंधळच होता. थोडीफार शिस्त लावून तेथून निघून आंबेठाणला आलो. एक रात्र विश्रांती घेऊन दुसरे दिवशी इस्पितळात हजर झालो.

 एकूण बातमी चांगली होती. जखमा खूप चांगल्या भरून येत होत्या. दोन-चार ठिकाणीच जखमा अजून ओल्या आहेत. इ... माईंनी खाणेपिणे बंद केल्यामुळे अशक्तता खूप आली होती; पण आदल्या दिवशी रक्त दिल्यामुळे बरीच टवटवी आली होती.

 माईजवळ पुन्हा बसलो. तिने पुन्हा इच्छामरणाचा आग्रह धरला; पण या वेळी बोलण्यात तेवढा जोरही नव्हता. माझ्या आणि श्रेयाच्या हाताने तिने थोडेफार खाणेही घेतले. हळूहळू पावलांनी का होईना, सुधारणा होत आहे असे एकूण चित्र दिसले. आता सर्वांत जास्त गरज धीराची आणि सोशिकतेची होती. माझी एकूण अवस्था पाहता सर्वांनी मी दोनतीन दिवसतरी पूर्ण विश्रांती घ्यावी असा आग्रह धरला. मी आंबेठाणला परत आलो, तो तापाची कणकण घेऊनच.

 २९ फेब्रुवारीला सकाळी पुन्हा एकदा इस्पितळात गेलो. मीनावहिनी, सिंधूताई खूपच आनंदात दिसल्या. "पुन्हा रक्त दिल्याने माई आणखी टवटवीत झाल्या आहेत." असे त्यांचे म्हणणे . मला आज माईच्या चेहऱ्यावर अगदीच वेगळा भाव दिसला. तिच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा करारीपणा आणि जगाशी झुंजत चालल्याची भावना आज अजिबात दिसत नव्हती. त्याऐवजी, एखादे अगदी लहान मूल निरागसपणे झोपले असावे असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. जनविपरीत दिसेल हा धोका पत्करूनही मी तीनतीनदा म्हटले की, आज माईची एकूण परिस्थिती काही वेगळीच दिसते.

 संध्याकाळी अंदाजपत्रक जाहीर व्हायचे होते. डॉ. मनमोहनसिंग यांचे भाषण दूरदर्शनवर ऐकायचे, पाहायचे होते. त्यावर टीकाटिप्पणी करायची होती. हे सगळे होईपर्यंत रात्रीचे ११ वाजले. रात्री साडेअकरा वाजता चाकणला जाऊन जुन्नर मुंबई एस.टी. गाडी पकडली. बॉम्बे सेंट्रलला जाऊन ४.५० ची गुजराथ एक्सप्रेस पकडून बिलिमोरा येथे एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचे होते. दुपारी राम जेठमलानींची तार आली होती. ३ तारखेला सुप्रिम कोर्टात कर्जमुक्तीच्या प्रकरणाची सुनावणी व्हायचे ठरले होते. बिलीमोराहून

तसेच पुढे आगगाडीने दिल्लीला जावे असा विचार होता.

 एस.टी. गाडी कधी नव्हे ते अगदी वेळेवर म्हणजे पहाटे साडेतीनलाच मुंबई सेंट्रलला पोचली. तिकीट खिडकीपाशी खासगीत तिकीट विकणारे अनेक टोळभैरव फिरत होते. तत्व म्हणून त्यांच्याकडून तिकीट घेतले नाही आणि नंतर खिडकी उघडली तेव्हा तिकीट मिळू शकत नाही असे समजले. स्टेशनमास्तरांपर्यंत जाऊन तक्रार केली. त्यांनीही काही दाद दिली नाही. मग सत्याग्रह म्हणून विनातिकिटाचा आगगाडीत जाऊन बसलो. त्याच गाडीतून बिपिनभाई देसाई आणि गुणवंतभाई चालले होते. त्यांनी तिकीट तपासनिसाशी काहीतरी जमवले असावे. मला काही त्रास झाला नाही.

 अंमलसाडच्या कोट्यावधी रुपयांचा व्यवहार असणाऱ्या विविध सेवा सहकारी सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री हजर होते. महाराष्ट्रातून माझ्याखेरीज मणिभाई देसाई यांनाही बोलावले होते. कार्यक्रम साडेतीनच्या सुमारास आटोपला. आता मला बडोद्यास पोचून राजधानीने दिल्लीची वाट धरायची होती. मोटारगाडी मला बडोद्यापर्यंत सोडायला येणार होती. सुरतला पोचल्यावर माझ्याच मनात विचार आला. 'इथून बडोद्यापर्यंत एकशे पंचवीस कि.मी. गाडीने जायचे आणि ती गाडी रिकामी परत यायची त्यापेक्षा सुरतहून आगगाडीने बडोद्यास गेलो, तर बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचा कितीतरी त्रास वाचेल.' कर्णावती एक्स्प्रेसमध्येही गर्दी होती. सकाळीच रेल्वे व्यवस्थेशी भांडण केले होते, आता पुन्हा झंझट नको म्हणून मी निमूट दुसऱ्या वर्गाच्या डब्यात दोन तास उभे राहून प्रवास केला. बडोद्याला पोहोचेपर्यंत पायाचे पार तुकडे पडले. राजधानी यायला अजून दोन तास अवकाश होता. फलाटावरूनच दिल्लीला फोन केला, मी येत असल्याचे कळवले आणि टेलिफोनच्या खोक्यातून बाहेर पडलो.

 तेवढ्यात बिपिनभाईंचे बडोद्याचे एक मित्र समोर आले. त्यांनी एका वाक्यात निरोप दिला: "माईंची तब्येत गंभीर आहे. रक्ताच्या उलट्या होताहेत." तेथूनच पुन्हा पुण्यात इस्पितळाशी संपर्क साधला. मोठी बहीण जबलपूरला परत जाता जाता मुंबईहून पुण्याला परत आली होती. मीही यावे असे सगळ्यांचे मत दिसले. परत तर यायला पाहिजे, पण जायचे कसे? बडोद्याहून रात्री एक खासगी बस पुण्याला जायला निघते. चौदा तासांत पोचते. दररोज दोन गाड्या निघतात; पण आज एकच निघणार होती. कारण दुसऱ्या गाडीला आदल्या दिवशी अपघात झाला होता. त्यामुळे गाडीत जागा मिळणे अशक्यच होते. बसमालकांवर सामदाम प्रयोग करून झाले. गुजरातेतील सहकाऱ्याने मी 'शेतकऱ्यांचा

फार मोठा नेता आहे' वगैरे 'भलावण' केली; पण बस कंपनीला त्याचे काहीच कौतुक दिसले नाही. भल्या पहाटे टोळभैरवांकडून तिकीट घ्यायला मोठ्या ताठर मानेने नकार दिला होता. आता अशा एका टोळभैरवाला शोधून काढावे लागले. वरकड पैसे घेऊन सिटांच्या मधल्या जागेवर बसू देण्याचे त्याने मोठ्या औदार्याने कबूल केले. एकूण चौदा तासांचा, घाटांनी भरलेला प्रवास... नजीकच्या भविष्यकाळात तरी त्याची आठवण विसरायला होणे नाही.

 पुण्याला परत फिरण्याचा निरोप मला बडोद्याला मिळाला तो जवळजवळ दहा तासांच्या पाठलागानंतर. मी चाकणहून निघाल्यानंतर दोनएक तासांनी माईची प्रकृती खालावल्याची आणि रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याची बातमी आंबेठाणला पोचली. तोपर्यंत मी मुंबईची निम्मी वाट चालून गेलो होतो. नितीन प्रधान यांच्यामार्फत दादर प्लॅटफॉर्मवर निरोप द्यायला कुणी माणूस गेला होता; पण त्याला मी दिसलो नाही. सुरतला बिपिनभाई देसाईंच्या घरी निरोप ठेवला होता; पण कर्णावती पकडून बडोद्याला जायच्या बदलामुळे सुरतलाही हा निरोप मिळाला नाही. शेवटी बिपिनभाईंनी बडोद्यातल्या त्यांच्याच मित्राला फोन करून निरोप पोचवला. अगदी सुरतला जरी निरोप असता, तर निदान तीनशे कि.मी.ची कष्टयात्रा कमी झाली असती. पुण्याला पोचायला साडेदहा वाजले. अंघोळबिंघोळ करून तातडीने इस्पितळात पोचलो. आता वातावरण अगदीच वेगळे होते. माईला वरून सलाईन लावले होते, नाकामध्ये अन्न देण्याकरिता नळी खुपसली होती. मी आल्यावर काही तरी बोलण्याचा तिने प्रयत्न केला; पण नाकातील नळीमुळे तिची वाक्यं सराईतांच्यासुद्धा ध्यानात येत नव्हती. नाकात नळी खुपसलेली असल्यामुळे बोलणे आणखीच अस्पष्ट झाले होते. संध्याकाळच्या सुमारास डॉक्टरांनी निरोप पाठवला की, पुन्हा एकदा रक्त देणे आवश्यक आहे. पूर्वी ज्यांची नोंदणी केली होती ते रक्तदाते, दिवस महाशिवरात्रीचा असल्यामुळे पुण्यात भेटेनात; मग श्रेयाची एक मैत्रीण आणि शेजारच्या खोलीतल्या रुग्णांचे चिरंजीव अशा दोघांना घेऊन प्रयोगशाळेत गेलो. रक्त तपासणीकरिता दिले. रक्त जुळले तर पुन्हा वेळेचा अपव्यय नको म्हणून दोघांचेही रक्त काढून ठेवले. कोणत्याही परिस्थितीत ब्लड बँकेतले रक्त घ्यायचे नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तपासण्या होईपर्यंत आणखी चार तास तरी जाणे भाग होते. रात्री एक वाजता प्रयोगशाळेला फोन केला. त्यांना रक्त जुळत असल्याची शुभवार्ता सांगितली. इस्पितळात रात्री दोन वाजता डॉक्टरांनी रक्त देण्यासाठी शीर शोधायला सुरुवात केली. माई आता इतकी अशक्त झाली होती, की अक्षरश: डझनवारी ठिकाणी सुया खूपसूनसुद्धा

हवी ती शीर सापडेना. शेवटी डॉक्टर कंटाळले आणि त्यांनी सगळाच कार्यक्रम दुसऱ्या दिवसावर ढकलला.

 तीनच्या सुमारास दुसरी एक डॉक्टरीण मुलगी आली. एवढ्या अर्ध्या रात्रीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात इतका काही उत्साह होता, की आम्हालाही बरे वाटले. ती श्रेयाची वर्गमैत्रीण होती हे तिने स्वत:च आवर्जून सांगितले आणि तिने, खरोखरच नातीने आजीची सेवा करावी अशी सुरुवात केली. कोपराजवळ शीर सापडेना; दंडाच्या वर खांद्यापाशी शीर शोधून काढली; रक्त चालू केले; त्याबरोबर द्यायची वेगवेगळी औषधेही ठिबकाबरोबरच देऊन टाकली. माईला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून पलंगाची डोक्याकडची बाजू थोडी आणखीन वर केली. माईचा श्वास संथ झाल्यासारखे वाटले.

 चारसाडेचार वाजले होते. नमाताई आणि सिंधूताई दोनतीन दिवस सतत जागत होत्या, त्यांना मी बळेच आग्रहाने थोडे आडवे व्हायला सांगितले. गेले दोनतीन दिवस माईचे श्वासाबरोबर सतत कण्हणे चालूच होते. आतासुद्धा श्वास जास्त संथपणे चालला होता; पण तिचे कण्हणे हळूहळू वाढत जाई तसतसे मी तिचा हात थोपटे किंवा कपाळावरून हात फिरवे. थोडेफार बोले, मग तिचे कण्हणे बंद पडायचे आणि पाचदहा सेकंदातच हलक्या आवाजात कण्हणे सुरू व्हायचे.

 सगळ्या इस्पितळात नीरव शांतता होती. फक्त माईच्या चढत्या कण्हण्यामुळे गाडी कष्टाने घाट चढत असावी असा आवाज येत होता. पहाटेच्या वेळी गाडी चालवणाऱ्यांना क्षणभर गुंगी येते तशी क्षणभर का होईना मला आली असावी आणि एकदम लक्षात आले, की माईच्या श्वासाचा आवाज यायचा थांबला आहे.

 मग यथाकाळ यथोचित यथाविधी जे काही पार पडायचे ते पार पडले. सगळ्या लोकांना फोन गेले. दिल्लीचे थोरले बंधू, अमेरिकेतील धाकटे भाऊ, फ्रान्समधील गौरी. दिल्लीचे वडील बंधू लगेच निघाले पण पुण्याला पोचायला त्यांना निदान ४ वाजणार होते. त्यामुळे अंत्यविधी वैकुंठात चार वाजल्यानंतर करायचे ठरले. इस्पितळातून शव माईच्या लाडक्या घरी परत आणले. रुग्णवाहिकेत मागच्या बाजूला शवाबरोबर मी एकटाच बसलो होतो. यापूर्वी दोनतीन वेळा शवाबरोबर प्रवास करण्याचा प्रसंग आला होता. त्या प्रत्येकवेळी मनावर काहीएक विचित्र दडपण होते. शवाच्या सान्निध्यात काही एक अमंगलता आहे आणि हा प्रसंग जितक्या लवकर आटोपेल तितके बरे असे वाटत असे. या वेळी मात्र असे नव्हते. शैशवात आणि बालपणी ज्या आईने मला लहानाचे मोठे केले ती, चाळिशीच्या आतील आई आणि माझ्यासमोरचे ८२ वर्षांच्या वृद्धेचे शव यात

थोडासुद्धा सारखेपणा नसणार; पण दूरभाव कणमात्र वाटत नव्हता. गाडीमध्ये, नंतर घरी पोचल्यावर, शेवटच्या तयारीच्या वेळी- किती वेळा शवाला स्पर्श करावा लागला, तरी एकदाही काही दूरभाव जाणवला नाही. हे काय गूढ आहे हे माझ्या अजून तरी लक्षात आलेले नाही.

 दिल्लीचे बंधू आले. वैकुंठ यात्रा सुरू झाली. माझ्यापुरते पुत्रकर्तव्य इथे संपले. आता वैकुंठातील विधी, सारे सव्यापसव्य आणि त्यानंतरचे धार्मिक कार्यक्रम यांचा माझा काही संबंध नव्हता. ती जबाबदारी मोठ्या मुलाची. पुण्याचे प्रख्यात मोघे गुरुजी विधी सांगत होते, वडील बंधू बाळासाहेब विधी पार पाडत होते. माईच्या शवाजवळ उभे असताना मला एका गोष्टीची खाडकन जाणीव झाली. जन्मापासूनच्या माझ्या आयुष्यातली पहिली आठवण जिच्याशी संबंधित आहे त्या व्यक्तीच्या संबंधाचा हा शेवटचा प्रसंग.

 माझ्या आयुष्यातली मला स्वत:ला आठवणारी पहिली घटना. त्या वेळी आम्ही साताऱ्याला राहत होतो; म्हणजे मी तीन वर्षांचा असावा; फार तर साडेतीन वर्षांचा. शनिवार पेठेतल्या दत्तमंदिरासमोरच्या गुजराच्या घरातल्या पहिल्या मजल्यावर आम्ही भाडेकरू म्हणून राहत होतो. सरळ अरुंद जिना चढून वर गेले म्हणजे उजव्या हाताला एक खोली. त्यात स्वयंपाकघर, जेवणघर, माजघर सगळे एकत्र असावे. डाव्या हाताला दुसरी जरा मोठी बैठकीची खोली. त्याच्या बाहेरच्या, रस्त्याच्या बाजूला एक छोटीशी गॅलरी.

 आठवणींचा प्रसंग तसा किरकोळ आहे. स्वयंपाकघरातून निघून जिन्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन, तेथून मी बैठकीच्या खोलीत आलो आणि गॅलरीकडे जाण्याचा विचार होता. खोलीच्या मध्यभागी एक लहान गोल टेबल असावे. माझ्या त्यावेळच्या उंचीच्या मानाने हे टेबल भले उंच वाटत होते. टेबलाला उजवीकडून वळसा घालून मी छोट्या पावलांनी गॅलरीच्या दिशेने जाणार, इतक्यात मला जाणीव झाली, की माझी आईही जिना ओलांडून बैठकीत आली आहे आणि मधल्या टेबलाला डाव्या बाजूने वळसा घालत आहे. टेबलाच्या दोन बाजूंनी आम्ही दोघे पुढे सरकत होतो. मी छोट्या पावलाने आणि आई खूपच जास्त जलद. माझ्या मनात विचार आला, तो हा, की आपण व आई टेबलाच्या पलीकडे एकाच वेळी पोचणार आणि समोरासमोर भेटणार. त्याबरोबर अशीही खात्री वाटली, की असे समोरासमोर भेटल्यानंतर आई आपल्याशी नक्की काहीतरी बोलेल. हा अंदाज मनात बांधल्यानंतर प्रत्यक्षात टेबल ओलांडून आम्हाला समोरासमोर यायला

फार तर दोनतीन सेकंद लागले असतील; पण तो अवघी मला खूप लांब वाटला. अखेरीस एकदाचे ते टेबल संपले. शेवटी एकदाचे मी आणि आई समोरासमोर आलो आणि काय आश्चर्य आणि केवढा आनंद. आई खरोखरच माझ्याशी बोलली. काही तरी बोलली. काय बोलली ते आठवत नाही पण काहीतरी बोलली.

 नाळ कापून मोकळा झाल्यानंतर तीनेक वर्षांच्या साठवलेल्या अनुभवाने मी एका वेळी तीन गोष्टींचा आडाखा मांडला. वेळ जमणार, आम्ही समोरासमोर येणार, आणि आई बोलणार आणि हे तीनही आडाखे बरोबर ठरले. याचा मला विलक्षण आनंद झाला होता. माझी ही पहिली आठवण. त्या आठवणीच्या भागीदाराशी दुवा जोडणारा शेवटचा प्रसंग माझ्यासमोर घडत होता.

 थोड्या वेळात वैकुंठातील विजेरी भट्टीचे दार उघडले आणि एका अध्यायाचा शेवट झाला.


 

(शेतकरी संघटक, २१ मार्च १९९२)

■ ■