अंगारमळा/मुहूर्तम् ज्वलितम् श्रेयम्

विकिस्रोत कडून

मुहूर्तम् ज्वलितम् श्रेयम्

 १९९८ च्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधानांनी बोलावलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीकरिता दिल्लीस जाण्यासाठी निघालो असताना एकाएकी शरीराचा काही डावा भाग लुळा पडला; बोलता येईनासे झाले. काही जुजबी उपाययोजना करून दिल्लीच्या विमानात बसलो. तेथील विमानतळावर उतरल्या उतरल्या सुहृद मित्रांनी इस्पितळात भरती केले. तेथून एका मोठ्या भयानक संवत्सराची सुरुवात झाली.

 दोन मोठ्या शस्त्रक्रिया ही, त्या मानाने किरकोळ बाब. १९८४ मध्ये चंडीगडच्या तुरुंगात असताना पहिला मोठा हृदयविकाराचा झटका आला होता. त्याआधीही एकदोन वेळा किरकोळ झटके येऊन गेले असावेत. ८४ साल संघटनेच्या कारकिर्दीतील धामधुमीचे वर्ष. महाराष्ट्र प्रचारयात्रा, त्यानंतर राजीव गांधींनी जाहीर केलेल्या निवडणुका, राजीवस्त्राविरुद्धची चळवळ या सगळ्या धामधुमीत अडखळू लागलेल्या हृदयाकडे लक्ष देण्याची फुरसद मिळाली नाही आणि तसे करावे असा विचारही मनात आला नाही. १९८६ आणि १९९५ मध्ये पुन्हा दोन मोठे झटके आले, त्यांच्याकडेही दुर्लक्ष झाले. आवश्यक ती उपाययोजना म्हणजे शस्त्रक्रिया, ती त्या काळी हिंदुस्थानात फारशी होत नसे; शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी त्यानंतरची शुश्रूषा व्हावी तशी होत नसे. केवळ औषधोपचारासाठी परदेशात जाणे झेपण्यासारखे नव्हते त्यामुळे तो विषय तसाच राहिला.

 १९९५मध्ये एक जुजबी शस्त्रक्रिया करून घेतली; पण धावपळीत आणि मनस्तापात फरक काहीच झाला नाही; झाली ती वाढच झाली. शेगाव कार्यक्रमातील शेतकऱ्यांच्या संस्था स्थापणे आणि चालवणे यात कामाचा बोजा वाढला. शेतकरी सॉल्व्हंट, शिवार, भामा कन्स्ट्रक्शन या सगळ्याच प्रकल्पांना राजकीय पुढारी आणि शासन यांचा विद्वेष भोवू लागला. शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून १५ वर्षे आर्थिक चिंता फारशी जाणवली नव्हती, आता त्या चिंतेची नवीन भर पडली.

 हृदयविकाराचे एक बरे असते; ढकलून न्यायचे म्हटले तर काही काळ ढकलून नेता येते. शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या त्या मूठभर पंपाला झेपेनासे झाले, की डिझेलचा पुरवठा अडकल्यावर इंजिन बंद पड़ते तसे हृदय बंद पडते; सगळाच खेळ खलास. मग, और्ध्वदहिकापलीकडे फारशी यातायात नाही.

 मी इतका सुदैवी नाही; हृदयाच्या अनियमित स्पंदनांमुळे शरीराच्या हालचालींचे

नियंत्रण करणाऱ्या मज्जासंस्थेवरच आघात झाला. अनेकांचे आशीर्वाद फळले, कित्येकांचे शिव्याशाप बारगळले म्हणून डावा हात, थोडी दृष्टी आणि ओठ एवढ्यापुरताच आघात मर्यादित राहिला; पण तरीही अगदी न्हाणीघरातसुद्धा चालत जाणे कठीण व्हावे, पायजम्याची नाडीसुद्धा स्वत:ची स्वत:ला बांधता येऊ नये, जेवणाचा घास स्वत:च्या हाताने स्वत:ला भरवता येऊ नये; थोडक्यात, बहुतेक कामांसाठी परावलंबी व्हावे ही मोठी भयानक गोष्ट आहे.

 ज्ञानमार्गाचा मी यात्रिक, ज्ञानाचे मुख्य साधनच विस्कळित झाले, जे काही चलनवलन गेले ते पुन्हा परत मिळण्याची शक्यता नाही. पुन्हा दुसरा, तिसरा झटका येऊन असमर्थता आणखी वाढू नये यासाठी डॉक्टरांची धावपळ. रक्तदाब वाढू नये, रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत, रक्त पातळ राहावे म्हणजे मेंदूमधील सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या जाळ्यात रक्तप्रवाह कोठे अडकून राहू नये यासाठी वेगवेगळ्या औषधांचा सारखा मारा चालू होता.

 तिसऱ्या दिवसापासून व्यायामाचे डॉक्टर येऊ लागले. हाताची बोटे किती हालतात, हात कोपऱ्यातून, खांद्यातून किती हालचाल करू शकतो याची परीक्षा झाली. बालवर्गातील किंवा अंगणवाडीतील मुलांना जसली खेळणी देतात तसली खेळणी माझ्यापुढे ठेवण्यात आली. एका गजातून लाकडी चकत्या काढून त्या दुसऱ्या गजात टाकणे, फिरवणे असा व्यायाम चालू झाला. अंगठा आणि तर्जनीच्या पकडीत लहानशी लाकडाची चकतीही सांभाळता येईना. इतके श्रम होत, की डोक्याला घाम फुटे. मग एकदम लक्षात आले, आपण पुन्हा लहान बाळ झालो आहोत. ६३ वर्षांचे लहान बाळ! दुपट्यावर पडल्या पडल्या बाळ पाय हलवत राहते, हात वेडेवाकडे फिरवत राहते. बाहेरच्यांना त्या सगळ्या धडपडीचा काही अर्थ लागत नाही. आपल्याला पाहिजे तसे हातापायांचे चलनवलन करू शकण्याचे कौशल्य बाळ हळूहळू कमावीत आहे हे पाहणाऱ्यांना समजत नाही. मीही तसाच हालचालींच्या व्यायामाला लागलो. 'अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडबोळं' या बालगीताच्या शेवटी 'तीट लावू तान्ह्या बाळा' असं म्हटल्यावर बाळाचे हात कपाळाच्या मध्यभागी न जाता भलतीकडे- डोक्यात,कानाकडे- का जातात याचे रहस्य समजू लागले.

 जिभेच्या व्यायामाचे डॉक्टर आले. जिभेवर अडखळणाऱ्या इंग्रजी शब्दांच्या मालिका ते म्हणून दाखवत आणि म्हणायला सांगत 'it rains in spain mainly in planes,' किंचा ‘she sells sea-shells on the sea shore.' वूडहाऊसच्या कादंबऱ्यांत, दारू पिऊन झिंगलेला माणूस सापडला म्हणजे लंडनचा पोलिस बॉबी तो कितपत शुद्धीवर

आहे हे तपासण्यासाठी असली, जिभेची परीक्षा घेणारी वाक्ये म्हणायला सांगतो, ते आठवले आणि तशाही अवस्थेत हसू आले. मी डॉक्टरीणबाईंना भगवद्गीतेतील ११ वा अध्याय खाडखाड म्हणून दाखवला, पाचपंधरा ठिकाणी शब्दोच्चार चुकले, संस्कृत न शिकलेल्यांना संस्कृत वाचायला सांगितले म्हणजे जसे होते तसे काहीवेळा झाले. पण, आपली वाचा पुष्कळशी शाबूत आहे हे कळल्याने आत्मविश्वास वाढला. पण, व्यायाम डॉक्टरांनी या उत्साहावर थंड पाण्याचा घडा टाकला. 'पाठांतरावरून विशेषत: लहानपणी केलेल्या पाठांतरावरून जिभेवरील मज्जानियंत्रणाची परीक्षा होऊ शकत नाही. लहानपणी केलेले पाठांतर जिभेच्या अंगवळणी पडलेले असते. एकप्रकारे जिभेचे एक स्वत:चे स्मरणशक्तीचे केंद्र बनलेले असते. जुनी पाठांतरे म्हणताना जिभेला मुख्य मेंदूतील स्मरणसंग्रहातून आठवावे लागत नाही.' हिरमुसला झालो; पण, ब्राह्मण घरातील लहानपणाच्या, पंतोजींच्या कठोर पद्धतीने पाठांतर करवून घेण्याच्या हव्यासाचा थोडा अर्थ नव्याने उमगला. आजच्या संगणक युगातील भाषेत सांगायचे तर मुख्य मेंदूतील संग्रहणसामर्थ्याला जोड देणारी ताकद पाठांतराने मिळते. लहानपणी घरी पाठांतराचा दंड कसलेल्या घरातील मुले शाळेत, कॉलेजात अभ्यासात पुढे का राहतात आणि असा सराव नसलेली, प्रामुख्याने असवर्ण जातीतील मुले सगळी हुशारी असून औपचारिक अभ्यासात लठ्ठ-मठ्ठ असल्याच्या कुचेष्टेस का पात्र होतात हे समजले. हे सगळे व्यायाम आजही चालू आहेत. हाताची बोटे आता मेंदूचा हुकूम पाळताहेत. कोपर, खांदा अजून काहीशी कुचकुच करतात. बोलण्यातील दोष आता फारसा काही जाणवत नाही.

 डोळ्यात काही दोष निर्माण झाला आहे, हे माझ्या लक्षात आलेच नव्हते. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी डोळ्यासमोर डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खालपर्यंत बोटे नाचवली तेव्हा लक्षात आले, की डाव्या बाजूकडील खालील गोष्टी नजर टिपत नाही. मग एक निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी एक आधुनिक गणकयंत्रसंचालित यंत्राला डोळे लावून बसवले. समोरील पडद्यावर एकापाठोपाठ एक सर्व दिशांना लहान काजव्यासारखे दिवे लुकलुकत. तो दिवा नजरेने टिपला की हातात दिलेले एक विजेचे बटण दाबायचे. त्या परीक्षेतही निश्चित झाले, की डाव्या हाताकडील खालची नजर अपंग झाली आहे. झटका आला तेव्हा नजर सर्वांत शेवटी हबकली. जे पहिल्यांदा हबकले ते पहिल्यांदा परत येईल. शेवटी हबकलेली नजर सगळ्यात सावकाश परत येईल.

 अपंगपणात डोळ्याची कमजोरी सगळ्यात कष्टदायक. माझ्या आईची नजर लहानपणापासून अधू होती. ती ८५ वर्षांपर्यंत जगली. त्यात चाळिशीनंतर तिला स्पष्ट

असे काहीच दिसत नसे. सगळे काय दिसायचे ते धुक्याने आच्छादल्यासारखे -अस्पष्ट आणि अंधूक. पण तिचा वाचनाचा आणि लेखनाचा अट्टहास महाप्रचंड. अगदी शेवटच्या अपघातापर्यंत ती डोळ्यासमोर भिंग धरून वर्तमानपत्र वाचत राहिली, हाती येईल त्या चतकोर कागदावर वेड्यावाकड्या अक्षरांत लिहीत राहिली. आम्ही मुले कधी हाती लागलो म्हणजे, 'माझ्या कविता एकदा चांगल्या अक्षरांत उतरवून दे ना!' म्हणून तोंड वेंगाडायची.

 नव्या अपंग अवस्थेत लहान बाळाशी साधर्म्य पाहून हसू आले. अगदी लहान बाळ पुन्हा पुन्हा वारंवार निरखून पाहावे अशी इतकी प्रबळ इच्छा झाली, की एखाद्या मातृत्व नाकारलेल्या स्त्रीची आठवण व्हावी. आईने शेवटचे दिवस कसे काढले असतील, शेवटपर्यंत अधू डोळ्याने ती विजेचे दिवे इत्यादी घरगुती सामान किती पराकाष्ठेने दुरुस्त करी याची आठवण झाली आणि अक्षरश: हुंदक्यावर हुंदके येऊ लागले.

 हा एक नवा अनुभव. एरवी मी कशानेही फारसा कळवळत नाही; पण माझ्या मोठ्या वहिनीने एक दिवस 'बडा कडा है सफर, थोडासा साथ चलों' ही गजल म्हटली आणि मी ओक्साबोक्शी रडलोय. मेंदूचे नियंत्रण कमी झाले, की साहजिकच भावविशता वाढते.

 इस्पितळात दाखल होऊन पुरे ४८ तास होतात न होतात, तोच सरोजावहिनी, सुमनताई, शैलाताई एवढ्या अंतरावर दिल्लीस इस्पितळात दाखल झाल्या. बद्रीनाथ देवकर, हेमंत देशमुख आदी सहकारीही मागोमाग आले. माझे थोरले बंधू दिल्लीजवळ फरिदाबादला असतात; त्यांना बातमी लागून ते भेटायला येईपर्यंत माझ्या खाटेभोवती बिल्लाधारींचा झालेला जमाव पाहून त्यांना मोठे अदभुतच वाटले. ते म्हणाले,

 "हे तुझे खरे कुटुंब. आम्ही रक्ताच्या नात्याचे; पण आम्हीसुद्धा इतक्या त्वरेने धावून आलो नाही."

 सुमनताई अग्रवाल, शैला देशपांडे यांनी पूर्वीच्या काही आजारांतही माझी देखभाल केलेली. त्यांनी सगळ्या व्यवस्थेचा ताबा तत्परतेने घेतला. मधू किश्वर, मीना पाटील याही लवकरच येऊन पोचल्या.

 चांगले इंजिन एका ठराविक गतीने चालते. त्याच्या फिरण्याचा आवाज एका लयीत चालू असतो. इंजिनमध्ये डिझेल पोचवणाऱ्या नळीत मळगाळ साठून राहू लागला म्हणजे इंजिनाची लय बिघडते व ते आचके खाऊ लागते. कधी एकदम वेगाने पाणी सोडते, तर कधी पाणी ओढायचेच बंद करते. काही वेळा डिलिव्हरी पाइप फुटतो, पाणी कुठे कुठे पसरले आहे हे पाहिले म्हणजे कोणता पाइप फुटला असणार याची अचूक कल्पना शेतकऱ्याला येते. मेंदूत अब्जावधी पेशी काम करीत असतात. प्रत्येकीचं काम स्वतंत्र

आणि खाते वेगळे. नेमक्या कोणत्या पेशींना इजा झाली आहे त्याचा नकाशा डॉक्टरांकडील आधुनिक साधने अचूक लावतात. सगळ्याच निदान परीक्षांच्या आणि उपचारांच्या काळात माझ्यासारख्या आधुनिक विज्ञानाची भाषा बोलणाऱ्या माणसालादेखील अदभुत वाटावे अशा परीक्षा होत होत्या. छातीवर एक नळी लावावी आणि सरळ संगणकाच्या पडद्यावर लयीत स्पंदन करणारे स्वत:चेच हृदय पहावे; रक्तवाहिन्यांवरून तीच नळी फिरवली की त्यातील रक्ताच्या प्रवाहाचा धो धो वाहणाऱ्या धबधब्याप्रमाणे आवाज यावा; सगळ्या शरीरात कोणत्या रक्तवाहिन्या कोठे तुंबल्या आहेत याचे अचूक चित्र स्पष्ट व्हावे. याबाबत, वैद्यकीय अभियांत्रिकीने इतकी कमालीची भरारी मारली आहे, की कोणीही थक्क होऊन जावे. आधुनिक औषधोपचाराची जी उपाययोजना होते, ती योग्य की अयोग्य याबद्दल मोठे वाद चालू आहेत. आहारनियमन, व्यायाम, ध्यानधारणा, योगासने इत्यादिंच्या नियमित दिनचर्येने हृदयविकार आपण ताब्यात आणू शकतो असे आग्रहाने प्रतिपादणारी या ना त्या जुन्या औषधव्यवस्थेतील तज्ज्ञ मंडळी जागोजाग भेटतात. अमेरिकेतील डीन ऑर्निश हा सर्व योगी आणि ध्यानी यांचा वसिष्ठमुनी बनला आहे. या वैकल्पिक औषधांचाही काही अनुभव मी अलीकडे घेण्याचा प्रयत्न करतो आहे; पण, रोगनिदानाच्या बाबतीत वैद्यकी अभियांत्रिकीला तोड नाही यात काही शंका नाही.

 मेंदूचे नकाशे निघाले. आघात झालेल्या भागांचे पुंजके पाहता स्पष्ट निष्कर्ष निघाला, की हृदयातून मेंदूकडे जाणाऱ्या प्रमुख रक्तवाहिनीत रक्त गाठळून साठले आहे. अपुऱ्या रक्तप्रवाहामुळे हृदयाचा पंप आचके देऊ लागला, की त्यातील काही गाठी सुटतात. त्या मेंदूकडील रक्तवाहिनीत जाऊन अडकल्या, की संबंधित भागातील रक्तपुरवठा थांबतो. याला म्हणायचे मज्जासंस्थेचा झटका.

 पुढे पहिली शस्त्रक्रिया झाली ती मेंदूकडे जाणारी मुख्य रक्तवाहिनी साफ करून तिथे ती पुन्हा भरून जाऊ नये यासाठी एक लहानशी लोखंडी जाळीदार नळी बसवायची. ही शस्त्रक्रिया परदेशातच होऊ शकते असे म्हणत; पण आम्हाला एक शल्यचिकित्सक सापडले, तेही मूळचे पुण्याचेच. ती शस्त्रक्रिया निर्विघ्न पार पडली. दोन महिन्यांनी मुंबई येथील इस्पितळात हृदयाची शस्त्रक्रिया झाली. इंजिनकडे जाणाऱ्या डिझेल पाइपातील मळगाळ काढलेला भाग कापून टाकून कापलेल्या भागाऐवजी दुसऱ्या नळीचा जोड देणे अशी ही शस्त्रक्रिया. आता ती अपल्या देशात, अगदी जिल्ह्याच्या गावीही होऊ लागली आहे.

 ही दुसरी शस्त्रक्रिया ४ एप्रिलला झाली. तीन तारखेलाच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांतून सहकारी कार्यकर्ते रक्तदानासाठी येऊन पोचले. 'गंगा सिंधू सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा' अशा सगळ्या नद्यांचे पाणी एकत्र करून शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण शेतकरी रक्तदानासाठी आले. मागितले असते तर जीवदान देण्यासही ते कचरले नसते. स्वयंसेवक जास्त झाले म्हणून काही जणांचे रक्त घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. ते स्फुंदून स्फुंदून रडले. शस्त्रक्रियेच्या दिवशी सकाळी पहाटेपासूनच सगळी आप्तमंडळी आणि शेतकरी संघटना परिवार एकत्र झाला. स्ट्रेचर ऑपरेशन थिएटरकडे निघाले. नांदेडच्या करुणा पा. हंगर्गेकर स्वत: शस्त्रक्रियेच्या वेळी भूल देण्यातल्या निष्णात डॉक्टर. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर स्ट्रेचर असताना 'सगळं काही ठीक आहे' असं त्यांनी सांगितले. त्यांची भाची डॉ. अनिता हिनेही हाताने बाय बाय केले. त्यानंतरचे काहीच स्पष्ट आठवत नाही.

 भूल दिल्याने सर्व शुद्ध जाते, काहीच जाणीव होत नाही असे मी ऐकले होते. प्रत्यक्षात तसे काही होत नव्हते. शरीरातील सर्व संवेदना बधिर झाल्या आहेत याची जाणीव होत होती. मध्येच कोणीतरी लाकडाच्या गिरणीत कापण्यासाठी फिरते चाक वापरतात तसे चाक बरगडीच्या मध्यभागी हाडावरून चालवते आहे याची जाणीव झाली; दुखले मात्र काहीच नाही. मग, माझी स्वत:चीच डावी बरगडी उचलून कोपऱ्यात ठेवली आहे असे दिसले आणि मग सगळेच चिडीचूप झाले. मध्ये बराच काळ गेला असावा. थोडी थोडी आसपासच्या हालचालीची जाणीव होत होती. हालचाल शक्यच नव्हती, कारण शरीरातून अनेक नळ्या बाहेर काढल्या होत्या. तोंडात एक भलीमोठी प्लॅस्टिक नळी कोंबली होती. त्यामुळे बोलणे अशक्य होते.

 ग्लानीने पुन्हा डोळे मिटले आणि अगदी स्पष्ट जाणीव झाली, की आपण आता या लोकातले राहिलो नाही आणि आपल्याच अंत्ययात्रेची तयारी चालू आहे. डाव्या, उजव्या हातापाशी, उशापाशी स्वच्छ घडीची कापडं आणून लावत होते. समोरून अंत्यदर्शनाला आलेल्या लोकांची रीघ लागलेली होती. संपूर्ण काळा वेश परिधान केलेला एक पाद्री काही मंत्र म्हणत होता. माझ्या कानाशी कोणीतरी पुटपुटलेही Ultime sanction झाली - ख्रिश्चन धर्मातील, तोंडात गंगाजल टाकण्यासारखा विधी. कितीतरी वेळ गेला. भेट देणाऱ्यांची रीघ होती. 'आता निघायचंय' असंही कानावर आलं; पण शव कोणी उचलेना. मग जाणीव झाली, आपण मेलो खरे; पण खरे मेलो नाही. अजून हाताला आतमध्ये कोठेतरी संवेदना जाणवते आहे. हे असेच विद्युतदाहिनीत सरकवणार की काय? त्याआधी

कोणाला तरी आपली सर्व संवेदना संपलेली नाही हे सांगायला पाहिजे. ही स्वप्नवत अवस्थाही बराच काळ टिकली. प्राण जात नाही आणि तो गेला तर या सगळ्या त्रासांतून मुक्तता होईल अशी प्रचंड उत्कंठा होती. एखाद्या भांड्यातून पाणी ओतायला सुरवात करावी आणि पाणी भांड्याच्या काठाला ओथंबून चिकटून रहावे असे काहीसे वाटत होते. पडू पाहणाऱ्या पाण्याला थोडा कोणी स्पर्श करून वाट करून दिली तर खळखळा पाणी वाहून जाईल आणि मोकळे मोकळे होईल असे वाटत होते; पण हे काही घडत नव्हते.

 मग कानाशी बऱ्यापैकी स्पष्ट आवाज आला.

 "जोशी, मी काय बोलतोय ऐकू येतंय? मी डॉक्टर भट्टाचार्य बोलतोय. काही त्रास वाटतोय?" मी तोंडातील नळीकडे हात करून बोलता येत नसल्याची खूण केली आणि मला लिहायला कागद-पेन्सिल हवी आहे असे खुणेने सांगितले. डॉक्टरांनी हातात पेन्सिल दिली आणि मी कसेबसे मोजून चार शब्द लिहिले, 'कृपया, मला मरू द्या.' 'पेशंट म्हणतोय मला मरू द्या.' कोणा बाईचा आवाज; बहुधा डॉक्टरीणबाई असावी. भट्टाचार्यांनी खांद्यावर थोपटले आणि ते म्हणाले ऑपरेशन अगदी उत्तम झाले. आता विश्रांती घ्या आणि ते निघून गेले. माझी प्रतिक्रिया, 'काय खोटं बोलतायत? ऑपरेशन सगळं फसलंय, यांना हे चांगलं माहिती आहे. एक लहानसा स्पर्श आणि सारा जीवनौघ जायला उत्सुक झाला आहे. किती खोटं बोलताहेत?'

 त्यानंतर मग अर्धवट जागृत अवस्थेतील दोन दिवस गेले. इतर पेशंट एकदोन दिवसांत विशेष दक्षता विभागातून बाहेर जातात. माझ्याबाबतीत जास्त वेळ लागणार आहे असे कानावर आले. माझी मुलगी श्रेया भेटून गेली. तेथे कोणाला येऊ देत नसतानाही महिला आघाडीची सरला कदम एकदा डोकावून गेली: शेवटी, एकदम एक दिवस माझ्या खोलीत जायला डॉक्टरांनी सांगितले. आपण पुन्हा या जगात प्रवेश करणार आहोत, हे खरेच वाटेना. अतिदक्षता विभागातून बाहेर पडलो. एकदोन दिवस चालण्याचे, चढण्याचे, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम झाले आणि डॉक्टरांनी मला चक्क घरी जायला सांगितले; टाकेसुद्धा आठ दिवसांनी काढू म्हणाले !

 आजारपण अकस्मात आले आणि आपल्या देशात जितके काही चांगले उपचार शक्य आहेत या सगळ्यामुळे आणि अनेक मित्रांनी मदतीचा हात दिल्यामुळे आजारपणाचे गंडांतर संपले. त्यानंतर, श्रेयाला बरोबर घेऊन अमेरिकेत जागतिक शेतकरी परिषदेला जाऊन आलो. १९९९ च्या निवडणुकांमधील वेगवेगळ्या पक्षांशी बोलणी चालली आणि

राजकीय निर्णयासंबंधी सहकाऱ्यांमधील भांडणतंटे हे सगळे सोसले. आंबेठाणला न जाता पुण्यात राहिलो, पण काही मनाला विश्रांती मिळते असे वाटेना. बिपिनभाई देसाईंच्या प्रेमाखातर गुजरातेत राहिलो. त्यांच्याबरोबरच हिमालयाच्या प्रवासाला गेलो. अट्टहासाने केदारनाथाची चढण्याची आणि उतरण्याची यात्रा एकट्याने पायी केली; नैनितालचे चीन शिखरही एकट्याने सर केले. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि सकाळ संध्याकाळ नियमित माफक व्यायाम करूनही जो आत्मविश्वास येत नव्हता तो एकट्याने पायी डोंगर चढण्याच्या माझ्या आग्रहामुळे फार झपाट्याने येऊ लागला.

 गुजराथेत असताना नर्मदा प्रश्नाचा अभ्यास झाला. माझ्या सवयीप्रमाणे गप्प राहवले नाही म्हणून आंदोलनाचा नकाशा बनवला आणि नेतृत्वही गळ्यात पडले. आंदोलनाचा धडाका चालू झाला आणि दर दिवशी प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. शेवटी आंदोलनच प्रकृतीला सर्वांत जास्त मानवले म्हणायचे!

 आजारपण आले तेव्हा अमरावतीची जनसंसद नुकतीच संपली होती. भारताच्या गरिबीची आणि ऱ्हासाची कारणे कोणती याची मीमांसा, स्वत:ला संतोष वाटावा इतकी स्वच्छ झालेली होती. 'माधान'च्या शिबिरात खुल्या अर्थव्यवस्थेचा आराखडा स्पष्टपणे बोलून झाला होता. वधूची आई मांडवपरतणीनंतर आजारी कोसळावी तशातला हा प्रकार!

 नर्मदा जनआंदोलनाच्या काळात गुजराथेत आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे टीकेची राळ उडाली. गुजराथ शासनाने केवळ अट्टहासापोटी आणि पक्षीय हितासाठीच कारसेवेचा सुंदर सोहळा विस्कटण्याचा घाट घातला.

 परत पुण्याला आलो. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाचा कारभार पाहिला. दिल्लीत अर्थव्यवस्था, महिलांचे आरक्षण, राजीव गांधींवरील आरोपपत्र इत्यादीचा गदारोळ पाहिला.

 निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळलेले, कधी नव्हे ते महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजनेत भा.ज.प. शिवसेना युतीच्या शासनाने 'ठोकून देतो ऐसा जे' पद्धतीने कापसाचा भाव जाहीर केल्यामुळे प्रथमच महाराष्ट्राबाहेरील कापसाचे भाव कोसळले, साखरेच्या आयातीमुळे साखर कारखाने आणि ऊसउत्पादक शेतकरी त्रस्त, तेलबियाण्यांच्या शेतकऱ्यांची अशीच दीनवाणी अवस्था हे सगळे पाहिले. शेतकऱ्यांची परिस्थिती जशी २० वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेच्या उदयाच्या वेळी होती जवळजवळ तशीच; फरक एवढाच, की १९८० मध्ये समाजवादाच्या नावाखाली शेतीमालाची लूट होत होती,

आज खुल्या व्यवस्थेचा उद्घोष करणारे शासन शेतकरीविरोधी धोरणे पुढे चालूच ठेवत आहे. यावर तोडगा काढायचा म्हणजे सत्याग्रह किंवा सविनय कायदेभंग यापेक्षा काही प्रतिभाशाली आयुधे तयार करायला पाहिजेत.

 शेतकरी संघटनेचा पाया मजबूत; पण नेतृत्व मोडकळीस आलेले. निवडणुकीतील पराभवानंतर कोणत्याही पक्षात काही अंदाधुंदी, बेबंदशाही माजतेच; पण अक्षरश: पोटच्या पोरांप्रमाणे ज्यांना मानले आणि जोपासले त्यांची एकमेकांतील वर्तणूक, मी मृत्यूच्या छायेत गेलो असे कळल्यावर किती बदलली हे कळून हे सोसण्यापेक्षा आजारपण बरे होते असे वाटले.

 यानंतर आता सगळे काही पुन्हा उभे करायचे आहे. अनेक मित्र, नातेवाईक, सल्ला देतात, "तुमचे काम बहुतक झालेलेच आहे. राहिलेले होणार आहे. तुमचा प्रत्येक शब्द खरा होतो आहे. श्रेय नावाने कोणी तुम्हाला देत नाही, एवढेच. यापुढे जीवाचा आटापिटा करायचा नाही. शांतपणे, संयमाने जितके होईल तितकेच करायचे." मी विचार करतो, 'आपले काय चुकले?' डीन ऑर्निशच्या विचारपठडीतली माणसे 'संयत दिनक्रम ठेवा' म्हणतात. मी आपला नेहमीचा प्रश्न विचारतो-

 "प्रात:काळी उठून पुरुषसुक्त आणि ध्यानधारणा यांनी दिनचर्येला सुरवात करणारे, ध्यान आणि योग यांनी चित्त एकाग्र करण्याची साधना करणारे यांना माझ्याप्रमाणे हृदयविकाराचा झटका आला नसेल; पण, त्यांच्या निरामय प्रदीर्घ आयुष्याचे साफल्य काय? त्यांनी मिळवले काय? स्वत:च्या मनाची शांती, एवढेच?"

 पूर्वी आंबेठाण येथे नियमित प्रशिक्षण शिबिरे होत. त्या वेळी इतर काही विषयांवर नाही तरी उत्क्रांती आणि ज्ञानमार्ग या दोन विषयांवर मी आग्रहाने बोलत असे. वर्षभराच्या आजारपणात गमावले खूप; पण एक कमाईही झाली. प्रशिक्षण शिबिरात मी जे बोलत होतो त्याचा अगदी खोलवर अनुभव झाला. माणसाचे हृदय हे लयीवर चालणाऱ्या इंजिनपंपासारखे आहे. घड्याळातील स्प्रिंग ही घड्याळाच्या सर्व काट्यांना एका लयीत गती देते. माणसाच्या शरीरातील ऊर्जास्रोत लयीत स्पंदन करणाऱ्या हृदयातून मिळतो. त्या स्पंदनांशी 'ताल से ताल' मिळवणाऱ्यांचे घड्याळ दीर्घकाळ चालते आणि व्यवस्थित काम देते. तसेच माणसाचे आहे. आयुष्यातील सर्व दिनचर्यांना एक लय ठेवली तर त्या शरीराची नासधूस, मोडतोड फारशी होत नाही, ते टिकते जास्त आणि काम बऱ्यापैकी करते. डिन ऑर्निशच्या सर्व शिकवणुकीचे सार एवढेच आहे; पण ज्ञानमार्ग हा लयविरोधी आहे. विश्वभरच्या प्रत्येक वस्तूशी संपर्क जुळवणे (Networking), क्षणाक्षणाने आणि

कणाकणाने नवीन अनुभव वेचणे, त्यांची गाळणी करणे, साठा करणे, परस्परसंबंध जोडणे, काही ठोकताळे बसवणे, नवनवीन अनुभवांती जुने ठोकताळे चुकले असे लक्षात आले तर निर्दयपणे ते फेकून देणे; पडणे, स्वत:ला सावरणे आणि कोणत्याही निष्कर्षाला सज्जड पुराव्याचा आधार असला तरी त्याविषयी मनात शंका बाळगणे हा सर्व ज्ञानमार्ग विरोधविकासी आहे. क्षणाक्षणाला नवीन अनुभव देणारा आहे. त्याला लय नाही, चक्रनेमीक्रम नाही. म्हणजे, काहीही वेगळे करायला निघालेला माणूस हृदयाच्या स्पंदनाच्या लयीला तोडल्याखेरीज काम करूच शकत नाही.

 'पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' चा लेखक ऑस्कर वाईल्ड याने ही कल्पना फारच सुंदर मांडली आहे. कोणी कवी घ्या, लेखक घ्या, कलाकार घ्या-प्रतिभा असली, की माणसाचा चेहरा कुरूप बनतो, कपाळ मोठे होते, नाक बाकदार होते, चेहरा सुरकुतून जातो, डोळे ओढलेले दिसतात. नेमकी याउलट गोष्ट चर्चमधल्या पाद्रयाची. लहानपणी शिकलेली वाक्ये वापरून तो आयुष्यभर पोपटपंची करत राहतो. त्यामुळे, पाद्रयाचा चेहरा नेहमीच सुडौल, बांधेसूद आणि सतेज दिसतो; कारण त्याला कधी डोक्याला त्रास द्यावाच लागत नाही.

 वर्षानुवर्षाच्या धावपळीमुळे अनियमितपणामुळे, ताणामुळे एवढा मोठा आजार आला. शारीरिक आणि बौद्धिक अपंगत्व म्हणजे काय याची खोलवर विदारक जाणीव झाली. संयत नियमित दिनचर्या ठेवली असती तर हे आजरपण ओढवले नसते हेही उमजले. पण, शेवटी निष्कर्ष काय निघाला? सार्थक जीवनाचा मार्ग लयबद्ध असूच शकत नाही.


 मुहूर्तम् ज्वलितम् श्रेयम्।
 न च धूमायितम् चिरम् ॥

 

(शेतकरी संघटक,६ जानेवारी २०००)

■ ■