Jump to content

अन्वयार्थ - १/हिरव्याची हकालपट्टी

विकिस्रोत कडून


हिरव्याची हकालपट्टी


 मुंबईतील उपनगरी गाड्यांची स्थानके शोभिवंत करण्याचा कार्यक्रम धडाक्याने चालू आहे. अगदी पहिल्यांदा वांद्रा स्टेशन सुशोभित करण्यात आले. हिंदुस्थानातील रेल्वे स्टेशन म्हणजे घाणीचे आगर. स्टेशनच्या परिसरात गेले, की शौच, मूत्र आणि सडलेले अन्न यांच्या वासाचा भपकारा येतो. स्टेशनावरील स्वच्छतागृहांचा वापर फक्त ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा मिळवलेल्या योग्यांनाच जमणारी साधना आहे. टपाल कचेऱ्या, पोलिस ठाणी जशी गबाळीच असायची तशी रेल्वे स्टेशने घाणेरडी असायचीच ही भारताची 'प्राचीन' परंपरा आहे. पश्चिम रेल्वेतील कोण्या तल्लख बुद्धिमंत अधिकाऱ्याने ही परिस्थिती बदलवायचे ठरवले; पण त्याकरिता लागणारा पैसा आणायचा कोठून? रेल्वे खाते स्वच्छतेसाठी पैसा खर्च करायला तयार होईल हे शक्यच नाही.
 आजकाल खासगीकरणाचा मोठा जोर आहे. स्टेशन सुधारून ते साफ ठेवण्याचे काम खासगी कंत्राटदारांना द्यायचे आणि त्याबदली त्यांनी स्टेशनात उपलब्ध असलेल्या जाहिरातीच्या सर्व जागा वापरायच्या अशी योजना ठरली. वांद्रे स्टेशन सुधारले म्हणे! अशी सुधारणा माझ्यातरी नजरेत भरली नाही. एखाद्या म्हातारीने साजशृंगार करण्यासाठी सिगारेटच्या पाकिटातील चांदी गोळा करून तिचे नक्षीकाम प्रसाधन म्हणून अंगावर चिकटून घ्यावे असे काहीसे विचित्र स्वरूप स्टेशनच्या जुन्या इमारतीचे दिसले; पण कसे का होईना, पहिल्यापेक्षा स्टेशनाचे रुपडे बरे दिसत होते हे खरे!
 नव्याचे नऊ
 वर्तमानपत्रांनी नव्या उपक्रमाचे कौतुक केले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही या स्टेशनच्या नव्या रूपाचा कौतुकपर उल्लेख केला. रेल्वे खात्याचा हर भरून आला, उत्साहे वाढला आणि असाच कार्यक्रम इतर स्टेशनांवर राबवायला सुरुवात झाली. आणखी दोनचार स्टेशने सुधारली; पण त्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही.
 चंद्रावर पहिल्या उतरणाऱ्या अवकाशयानाचे आणि अवकाशवीरांचे कौतुक झाले. चंद्रावर आर्मस्ट्राँग पहिले पाऊल टाकत असता, ज्यांना ज्यांना शक्य आहे ती यच्ययावत माणसे डोळ्यात प्राण आणून टेलिव्हिजनच्या संचासमोर चिकटून बसली होती. नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी लोकांचा उत्साह पार संपून गेला आणि त्या कार्यक्रमाकडे कोणी बघेना. स्टेशन सुधारणा ही हिंदुस्थानच्या हिशेबी चंद्रावर उतरण्यासारखीच नवलाईची गोष्ट! पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी कौतुक झाले. दुसरे-तिसरे स्टेशन सुशोभित झाले त्याकडे कोणाचे लक्षही गेले नाही.
 खांबाचा 'हिरवेपणा'
 आणि मग एकदम चमत्कार झाला, अंधेरी स्टेशन सुधारले. प्रत्येक फलाटावरील खांब रंगवण्यात आले आणि इथेच कल्लोळ माजला.
 निर्णय कुणाचा होता कुणास ठाऊक? रेल्वे हे खाते केंद्र शासनाच्या अधिकारातील आहे. तेव्हा निर्णय कदाचित केंद्र शासनाचा असेल, पश्चिम रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा असेल, स्टेशनमास्तरांचा असेल किंवा ज्या खासगी कंपनीकडे शोभनाचे काम देण्यात आले, तिचा असेल. तेव्हा रेल्वेचे मंत्री जाफर शरीफ होते. बाकीची माणसे कोणच्या धर्माची आहेत हे ठाऊक नाही. निर्णय का, कसा? घेण्यात आला ते माहीत नाही; पण निर्णय घेतला गेला हे खरे!
 अंधेरी स्टेशनच्या नव्या खांबांना हिरवा रंग दिला गेला आणि इथेच सगळे बिघडले. हिरवा रंग म्हणजे मुसलमानांचा अशी समजूत असलेली शिवसेनेची काही टाळकी एकत्र आली, त्यांनी या रंगकामाला विरोध केला. रंगकाम नवीन असेल तरी ते बदलून दुसरा रंग वापरला गेला पाहिजे असा आग्रह धरला. सध्या मुंबईत पोलिसांपेक्षा शिवसेनेचेच राज्य चालू आहे. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना काही पर्याय उरला नाही. निम्म्याअधिक खांबांचे रंग बदलण्यात आले, प्रत्येक खांबाचा निम्मा भाग वेगळ्या रंगाने रंगवण्यात आला आणि वाद मिटला.
 म्हणजे, अंधेरी स्टेशनापुरता मिटला. ही कदाचित देशभर पसरायच्या एका नव्या आंदोलनाची सुरुवात असू शकेल!
 आता 'हिरवा' बाद
 पॅरिसमध्ये फॅशनचे मोठे कौतुक असते. दरवर्षी हंगामात कपड्यांचे आकार, घाटणी, रंग बदलत राहतात. स्त्रियांचे कपडे कधी पायघोळ होऊन रस्ते झाडू लागतात, तर कधी डोळे मिटण्याची किंवा बुबुळे बाहेर पडण्याची वेळ येईपर्यंत आखूड होतात. नव्या फॅशनच्या घोषणा झाल्या, की तर्वमानपत्रात मथळे झळकतात, 'यंदाचा रंग पिवळा!' किंवा 'यंदा राज्य सुती कापडाचे', 'नायलॉनची सद्दी संपली' इ. इ.
 हिंदुस्थानातही आता द्वाही फिरली, 'हिरवा रंग चलेजाव. जेथे जेथे म्हणून हिरवा रंग दिसेल तेथे तो रंग बदलून, नवा रंग शक्यतो भगवा – देण्याकरिता शिवसैनिक आणि इतर हिंदुधर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ दंगली करू लागतील; पण या हिरवे हटाव कार्यक्रमामुळे मोठी गडबड होणार आहे.
 हिरवा सिग्नल थांबा!
 रेल्वे स्टेशनच्या खांबाला हिरवा रंग चालणार नाही म्हटले तर चालून जाईल. किंबहूना स्टेशनच्या खांबाला रंग नसण्याचीच सवय आहे; पण रेल्वेच्या सिग्नलमध्ये हिरवा रंग चालणार नाही असे हिंदुत्वनिष्ठांनी ठरवले तर कसे करायचे? मुसलमानांचा हिरवा रंग दिसल्यावर पुढे जायचे आणि आमचा लाल रंग दिसला. की थांबायचे हे रेल्वेचे धोरण मुळातच मुस्लिमधार्जिणे आहे. हिंदू आईबापांच्या पोटी जन्माला आलेला कोणीही गाडीचालक हिरव्या रंगाचा आदेश मानणार नाही, असे ठरवले तर? २८ नोव्हेंबर रोजी दिवा स्टेशनजवळ लांब पल्ल्याच्या गाडीच्या चालकाने हिरवा कंदील मिळाला तरी गाडी उभीच ठेवली, त्यामुळे अनेक स्थानिक गाड्यांचा खोळंबा झाला, लोकांना पायी परतावे लागले. गाडीच्या ब्रेकमध्ये नादुरुस्ती असल्यामुळे आपण गाडी चालवण्याचा धोका घेतला नाही अशी त्या चालकाने बतावणी केली; पण गाडीत काहीच दोष नव्हता असे रेल्वे अधिकाऱ्यांना आढळून आले. हिरव्या रंगाला मान न देणारा हा चालक कुणी हिंदुत्वगर्वी असला पाहिजे. हिरव्या सिग्नलला न जुमानण्याच्या या जाज्वल्य उदाहरणाने अनेक हिंदुत्वनिष्ठांचे रक्त सळसळेल. हिरवे सिग्नलही दर्लक्षून मुसलमानांनी इतिहासकाली केलेल्या अत्याचारांचा प्रतिशोध घेण्यासाठी ते बद्धपरिकर होतील. मग भले प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहतर!
 देवांना हिरवी पत्री, दुर्वा, बेल, बंद. हिरवा चुडा चालणार नाही. हिंदू गर्भारशी महिला डोहाळेजेवणाच्या वेळी माहेरी जाताना, सासरहून परत येताना हिरवी साडी शुभकुनाची म्हणून हौसेने नेसतात, हातात हिरवे चुडे भरतात. शिवसेनेच्या आदेशानंतर या सगळ्या स्त्रियांनी काय करावे? आणि बाळंतपणासाठी जातानाच भगवी वस्त्रे परिधान करून संन्याशिनीसारखे त्यांना रूप घ्यावे लागेल. अंगावर गोंदवून घेऊन हिरवे तिलक लावून घेतलेल्या सगळ्या स्त्रिया म्हणजे बाटलेल्याच मानल्या पाहिजेत. नाहीतर शिवसैनिकांशी गाठ आहे.
 सगळी मैदाने लाल
 हिरव्या खेळपट्ट्या उद्ध्वस्त करणे हा तर हिंदुत्वनिष्ठांचा आवडता छंद. खेळाची सगळी मेदाने हिरवी करणे हादेखील भारत सरकारच्या मुस्लिम अनुनयाच्या धोरणाचाच सज्जड पुरावा आहे. परंपरागत भारतीय धाटणीच्या आखाड्यात मल्लांच्या कुस्तीसाठी लालमातीच ठेवलेली असे. हुतूतू, खो खो, आट्यापाट्या, असल्या खेळांची मैदाने आखाड्यातील मातीप्रमाणे मुद्दाम लाल केलेली नसली तरी जेथल्या तेथल्या धरणीच्या रंगाची असायची. हिरवी कधी नाही. हिरवी मैदाने भारतीय परंपरेत बसतच नाहीत. खेळांची मैदाने हिरवी करण्याचे हे फॅड अलीकडचे. परदेशांत क्रिकेट, फुटबॉल यांची विस्तीर्ण मैदाने कुठे पिवळी, कुठे काळी अशीच ठेवली जात. यातून मुसलमानी हिरव्याचे प्रभुत्व न जुमानण्याचा शूर हिंदू वीरांचा निर्धार दिसून यायचा; पण आता मैदानावर कृत्रिम हिरवळी पसरण्याची टूम निघाली. हाडाचा सच्चा हिंदुत्वनिष्ठ, इस्लामी हिरव्याच्या या नव्या आक्रमणाला सडेतोड उत्तर दिल्याखेरीज राहणार नाही. ज्या शूर वीरांनी गरवारे स्टेडियमचे हारळी मैदान जाळले त्यांना कापडी मैदान उद्ध्वस्त करण्यात अडचण ती काय येणार?
 सगळ्या जगभर पर्यावरणवादी निसर्गाचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाचा पुरस्कार करीत आहेत. हिरवे झेंडे चळवळीचे नाव बदलून टाकले पाहिजे, नाहीतर गाठ हिंदुत्ववाद्यांशी आहे हे त्यांनी विसरू नये!
 बालकवी ठोंबऱ्यांची सगळी पुस्तके जाळून टाकली जातील. 'हिरवे हिरवे गार गालिचे' कसे खुशाल मुसलमानांच्या रंगाचे कौतुक करता? असला हिरवटपणा चालणार नाही. 'सृष्टीमातेने जणू हिरवा शालूच परिधान केला होता' असे लिहिणे हिंदू सृष्टीमातेवर टाकलेला मुसलमानी हात आहे. असे हात कलम केले जातील. 'अफाटची हिरवट वन भोवती' लिहिणारे 'बी' कवी बाद. 'तिलक गोजिरे गोंदवणांचे हिरव्या रंगाचे' असे खरडणारे गोविंदाग्रज! गो! गो! तांब्यांनी हिरव्या रंगाचे कौतुक काही थोडे केलेले नाही; पण त्यांना सर्व गुन्हे माफ; कारण त्यांच्या म्हाताऱ्या नवरदेवाच्या तक्रारीत ते म्हणतात, "उपवर मुलींनो कित्ता गिरवा! त्यजूनी फाकडा धटिंग हिरवा फटिंग जोगी पिकला भगवा! वरा..."
 हिरवी शेती नको
 शेतकऱ्यांनीही आता हिरव्या रंगाची पिके घेण्याचे सोडून दिले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ शेतकरी सेना भगव्या रंगाचे डबे घेऊन देशभरच्या शेतातील उभ्या पिकांना आणि झाडांना रंगाचे नवे हात देण्याचे अभियान चालू करतील आणि सूर्यानेसुद्धा याद राखून ठेवावी. ढगांनाही सक्त ताकीद आहे. इंद्रधनुष्यातला हिरवा रंग यापुढे खपवून घेतला जाणार नाही!
 हे असे हिरव्या रंगाचे उच्चाटन सुरू झाले, की दुसरा कोणी शहाणा उठून त्याला न आवडणाऱ्या आणखी कोणा रंगाचे उच्चाटन करण्याचा कार्यक्रम आखेल आणि पृथ्वीची स्थिती दोन बायकांच्या दादल्यासारखी होईल. तरण्या बायकोने पांढरे केस उपटून काढावे आणि पहिलीने काळे. हिरव्या रंगाच्या उच्चाटनाचा हा कार्यक्रम पुढे काय काय रंग आणणार आहे आणि ठेवणार आहे ते आपण शांत बसून पाहावे, यापलीकडे आपल्या हाती तरी काय आहे?

(१६ डिसेंबर १९९३)
■ ■