Jump to content

अन्वयार्थ - १/साम्यवाद्यांच्या इतिहासातील खलनायक माओ

विकिस्रोत कडून


साम्यवाद्यांच्या इतिहासातील खलनायक माओ


 टॉलस्टॉयच्या 'युद्ध आणि शांतता' कादंबरीचा प्रतिनायक भावुक व्यक्तिपूजक आहे. नेपोलियन जगातील सर्व बंधनांतून मानवजातीला सोडवणारा विमोचक युगपुरुष आहे असा त्याचा विश्वासच नव्हे दृढश्रद्धा असते. नेपोलियन म्हणजे सर्व जे जे काही दिव्य भव्य त्याची मूर्ती अशा भावनेने त्याची व्यक्तिपूजा करीत असतो. मातृभूमी रशियावर नेपोलियनच्या फौजा चालून आल्यानंतर आसपासच्या सर्व जनांचा रोष पत्करूनही तो आपली भावना कायम ठेवू पाहतो, हळूहळू त्याचा भ्रमनिरास होतो. थोर माणसे ही सगळी नकली बाहुल्यांसारखी असतात, इतिहासाच्या अपघाताने त्यांच्यावर थोरपण लादले जाते याची त्याला हळूहळू जाणीव होऊ लागते. तारुण्याच्या भरात कोणा विचारावर, कल्पनेवर, व्यक्तीवर सारा जीव ओवाळून टाकावा अशा ऊर्मी उसळत असताना नेपोलियनविषयीचा नायकाचा भ्रमनिरास किती कठोर अनुभव होता याचे मोठे सुंदर चित्रण टॉलस्टायने केले आहे.
 साम्यवादाचे चारित्र्यदोष
 हिंदुस्थानातील असंख्य माओ झेडुंगच्या भक्तांची अशीच मोठी दयनीय आणि कठीण अवस्था होणार आहे. मार्क्स, लेनिन, स्टॅलिन यांच्या व्यक्तिगत जीवनावर आतापर्यंत अनेक प्रकाशझोत पडले तर ही सगळी माणसे काही बाबतीत अगदीच शूद्र काही बाबतीत भयानक राक्षसीही होती असे दिसून आले आहे. साम्यवादाचा पाडाव इतिहासात अटळ होता हे 'भाई' लोकही बोलून दाखवू लागले आहेत. रशियन साम्यवादी सत्तेतील हुकूमशहा भयानक क्रूरकर्मा होत हे खरे; पण त्याउलट चिनी साम्यवादी पक्षातील नेतृत्व खरेखुरे उज्ज्वल चारित्र्याचे, धीरोदात्त, त्यागमयी होते, विशेषतः माओ-त्से-तुंग म्हणजे तर तत्त्वज्ञान, विचार, काव्यशक्ती, त्याबरोबरच कर्मठ कृती आणि रणांगणातील शौर्य अशा यच्चयावत सगळ्या गुणांनी भूषित झालेला आदर्श अशी सार्वत्रिक समजूत होती.
 सर्वगुणसंपन्न नायक माओ
 एके काळी चीनमध्ये केवळ परमेश्वराच्या बरोबरीने माओ झेडांगची पूजा होत असे, त्याच्या उक्तींचे एक छोटेसे लाल रंगाचे पुस्तक हातामध्ये फडकावीत लाखो लोक चालत असत. त्याच्या महाप्रचंड आकाराच्या चित्रांनी आणि पुतळ्यांनी चीनचा कोपरान्कोपरा भरून गेला होता. माओवर परमोच्च कोटीचे प्रेम करणारे लोक हिंदुस्थानातही अनेक होते आणि आहेत. 'राजकीय सत्ता बंदुकीच्या नळीतून येते,' 'शंभर फुले एकावेळी फुलू द्यात,' 'प्रगतीची छलाँग', 'अखंड क्रांती' अशा वचनांनी, अशा घोषणांनी जागतिक कीर्तीचा नेता म्हणून माओ गाजला. चीनने भारतावर आक्रमण केले त्याही काळात 'अध्यक्ष माओ, आमचा अध्यक्ष' अशा घोषणा खुलेआम देण्यात धन्यता मानणारे 'माओ' भक्त आपल्या देशातही काही थोडे नव्हते.
 अमेरिकेत राहून अणुपदार्थ विज्ञानावर उच्च संशोधन केलेल्या एका भारतीय शास्त्रज्ञाशी माझी चांगली मैत्री जमली होती. गृहस्थ मोठे व्यासंगी, जिज्ञासू आणि चिकित्सक. अनेक विषयांवरील त्यांची माझी मते जुळत असल्याने परदेशातही आम्ही सतत भेटत, बोलत असू. १९७६ मध्ये माओची लोकप्रियता उच्च शिखरावर असताना हे गृहस्थ माझ्याशी भांडले ते त्यांच्या माओवरील नितांत भक्तीमुळे. कम्युनिस्ट क्रांतीच्या विजयानंतर क्रांतिकारी फौजा पेकिंगमध्ये शिरल्या. त्यानंतर माओने केलेली पाहिली कारवाई म्हणजे पेकिंगनिवासी त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या रूपसुंदरी नटीशी लग्न करणे. माओच्या एकूण कीर्तीला हे कृत्य शोभणारे नाही असे मी म्हटल्यावर हा तरुण शास्त्रज्ञ माझ्यावर इतका उखडला, की त्यानंतर अगदी अलीकडेपर्यंत आमचे बोलणेचालणेसुद्धा होत नव्हते. माओचे इतके पराकोटीचे भक्त हिंदुस्थानातही अनेक होते आणि आहेत.
 चीनमधील राज्यक्रांती, लाँग मार्च, नंतर कोमिंटांग सरकारविरुद्धचा उठाव येथपासून तर छोट्या छोट्या प्रसंगावरही काव्ये प्रसवणारी माओची प्रतिभा, आयुष्याच्या शेवटच्या टप्यावरदेखील नदीमध्ये तीस तीस कि. मी. पोहण्याचा चमत्कार, या साऱ्यांचा नायक अनेकांच्या विशुद्ध मूर्तिपूजेचा विषय राहिला.
 पुरुषांचीही चारित्र्ये कुणी जाणावी?
 टॉलस्टॉयच्या नायकाप्रमाणेच आता माओभक्तावरही मोठा मानसिक आघात होणार आहे. माओबरोबर बावीस वर्षे सतत राहिलेले डॉ. झीस्वी यांनी खराखुरा माओ सूर्यप्रकाशात आणला आहे.
 माओने केलेल्या आपल्या साथीदारांच्या निघृण हत्यांचा इतिहास सगळ्या जगाला माहीत आहे. 'मोठी छलाँग', 'सांस्कृतिक क्रांती' यांच्या कालखंडात दशलक्षावधींनी माणसे मारण्यात आली. साम्यवादी सत्तेला विरोध करणाऱ्या व्यक्तींना नुसतेच ठार करण्यात आले असे नाही, तर त्यांचे मांस खायला देण्यात आले. येथपर्यंतच्या आसुरी 'दैत्यकथा' आता सर्वदूर माहिती झाल्या आहेत; पण या सर्व भीषण हकिकतींचा संबंध व्यक्तिशः माओशी नव्हता, असणे शक्यच नव्हते, अशा राक्षसी प्रकारांची माओला यत्किंचितही कल्पना असती तर त्याने ते घडू दिलेच नसते, अशी सर्वसाधारण माओभक्तांनी आजपर्यंत, स्वतःची समजूत घालून दिली होती. या समजुतीचा पाया उखडून टाकणारे आणि माओच्या व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकणारे हे माओचरित्र अमेरिकेत प्रसिद्ध होत आहे. १९५५ ते १९७६ ही बावीस वर्षे डॉ. झीस्वी माओच्या सतत सान्निध्यात राहिले. पहिली अकरा वर्षे त्यांनी रोजनिशी लिहिली; पण स्वसंरक्षणासाठी ती १९६६ मध्ये जाळून टाकली. माओच्या मृत्यूनंतर सुरुवात केली.
 माओचे वस्त्रहरण
 माओ घाणेरड्या शिव्या देई, दात कधी घासत नसे, अंघोळ क्वचितच करी येथपासून ते माओ त्याला झालेल्या गुप्तरोगावर उपचार करून घेण्यास नकार देई, अधिकाधिक स्त्रियांशी संबंध आल्यामुळे रोग बरे होतील एवढेच नव्हे तर, दीर्घायुष्य लाभेल अशी त्याची खात्री होती. येथपर्यंत बारकाईने तपशील डॉ. ली यांनी दिले आहेत. माओ मोठा संशयी आणि खुनशी स्वभावाचा होता. 'मोठ्या छलांगी'च्या काळात शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही कोटी माणसे भुकेने मेली. त्या वेळी माओने काही काळपर्यंत मांसाशन सोडले होते; पण या सगळ्या भूकबळींची जबाबदारी त्याने स्वतः कधी स्वीकारली नाही.
 क्रूरकर्मा सुलतान आपल्या पराक्रमाची पराकोटी जनानखान्यात गाठू इच्छितात. याही बाबतीत एखाद्या चेंगीजखानाचा अपवाद सोडल्यास माओच्या बरोबरीस कोणी सुलतान यायचा नाही. साम्यवादी सत्तेच्या काळात. बेजिंगमधील तालेवार स्त्रिया माओ-त्से-तुंगपासून मिळालेले गुप्तरोग अभिमानाने माओ-निष्ठेचे आणि संबंधांचे मानचिन्ह म्हणून मिरवीत असत आणि अशा संबंधांतून आपल्या दरबारी लोकांवर माओ नजर ठेवीत असे. इ. इ. गोष्टींची अनेक उहारणे डॉ. ली यांनी दिली आहेत.
 इतिहासाने मारले, दुष्टचारित्र्याने बुडवले
 आज साम्यवादाचा पाडाव झाला आहे. पण तरीही गेल्या शतकाभरात जगाला समाजवादाच्या पंजाखाली आणण्यासाठी जे भीमपराक्रम घडले. त्यात माओची कर्तबगारी सर्वश्रेष्ठ आहे. नव्या इतिहासात खलनायक म्हणून त्याचे नाव उरणार आहे. राम म्हणून नव्हे, तर रावणाचा अवतार म्हणून त्याचे स्थान इतिहासात राहणार हे उघड आहे; पण दैवदुर्विलासाने पाडाव केला, तरी वैयक्तिक जीवनाच्या स्वच्छतेने ज्यांचे जीवन सर्वकाळ देदीप्यमानच राहील असे महात्मे असतात. येशू ख्रिस्त, राणा प्रताप, सुभाषचंद्र बोस अशा माणसांच्या आयुष्यात शेवटपर्यंत अपयशाचे पहाडच कोसळले; तरी ते अपयशदेखील उज्ज्वल भूषणे व्हावीत अशी यांची चरित्रे आहेत. माओच्या विचारांचा पाडाव इतिहासाने केला. व्यक्ती म्हणून नाव टिकून राहवे असे त्यांच्याकडे काही नव्हतेच. असल्या माणसाला अध्यक्ष माओ आमचा अध्यक्ष म्हणून उत्साहाने गौरवणाऱ्यां भारतीय शिष्यांवर मात्र मोठी कठिण वेळ येवून ठेपली आहे.
 थोरांची मुबलकता
 पराक्रमी पुरुष्यांच्या आयुष्यातील गुलाबी प्रकरणाविषयी सर्वसाधारणपणे फारशी चर्चा होत नाही झाली तर थोड्याफार कौतुकाच्या स्वरात होते. पहिल्या बाजीरावाच्या चारित्रात मत्सानी भूषणच मानली जाते. मार्क्सचे चोरटे प्रेमप्रकरण, त्याची अनौरस मुलगी, फ्रान्सचे आजचे अध्यक्ष मितेरॉं यांचीही अनौरस कन्या या प्रकरणाबद्दल कोणी अनुदारता दाखवत नाही; पण कोणत्याही राजसत्ताधाऱ्यांने आपल्या सत्तेचा फायदा घेऊन कामुकतेला स्वछंद वाव द्यावा आणि त्यांच्या चारित्रातील या कमजोरीमुळे देशाचे तुकडे पडावेत, नुकसान व्हावे असे घडले तर मग अशा थोर व्यक्तिंच्या खासगी जीवानावरील अवरण टराटरा फाडून देशाच्या घात होण्यास त्यांच्या चारित्र्यातील कोणते दोष कसे कारणीभूत ठरले ते दाखवणे प्रामाणिक इतिहासकारांचे कर्तव्य ठरते.
 डॉ. ली यांनी एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. हे पुस्तक त्यांनी चीनमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच प्रसिद्ध केले असते तर, त्यांना एका खलनायकाला उघडे पाडण्याचे नव्हे तर इतिहासाची दिशा बदलण्याचे श्रेय मिळाले असते. डॉ. ली काही मोठे धीरोदत्त नायक आहेत असे नाही; पण त्यांनी दिलेल्या तपशीलाच्या माहितीबद्दल शंका बाळगण्याचे काही कारण दिसत नाही.
 दुसऱ्या महायुद्ध काळातील चर्चिल, रूझवेल्ट, स्टॅलिन, माओ या चार नेत्यांचे वस्त्रहरण झाले आहे. आपल्या देशात कोणा लेखकाची असले काही संशोधन करण्याची फारशी हिंमत होणार नाही. कोणी एखादा चकार शब्द मान्यवराविरुद्ध काढला, तरी त्या लेखकावरच गोटेमार चालू होते. भारतात थोर 'नररत्ने' अनेक निपजली, असे म्हटले जाते ते त्यामुळेच असावे!

(११ नोव्हेंबर १९९४)
■ ■