Jump to content

अन्वयार्थ - १/देवळांच्या विढ्याचा तिढा

विकिस्रोत कडून


देवळांच्या विढ्याचा तिढा


 मृसरचे सुवर्ण मंदिर, अयोध्येचे मस्जिद-मंदिर आणि आता श्रीनगरचा हजरतबाल दर्गा, तीन देवळे, तीन धर्मांची; पण अलीकडच्या राजकारणाच्या रंगभूमीवर प्रकाशझोतात तळपणारी. सुवर्ण मंदिर प्रकरणामुळे एका पंतप्रधानांची हत्या झाली. अयोध्या प्रकरणामुळे निदान एक सरकार पडले आणि हजरतबालमुळे नरसिंह राव शासनाचे भवितव्य एका केसाच्या आधाराने टांगून राहिले.
 राजनीती देवळांभोवती प्रदक्षिणा घालते आहे. देऊळ पाहिले, की सत्ताधारी विस्तव पाहिल्यावर विंचवाने नांगी टाकावी तसे निष्प्रभ होतात. देवळांचा आश्रय घेणारे गुंड असोत, अतिरेकी असोत, देशद्रोही असोत, देवळात जाऊन त्यांचा पिच्छा करण्याची हिमत सत्ताधाऱ्यांची होत नाही. लहान मुले छापापाणी खेळतात, डाव असलेल्या गड्याने बाकीच्या गड्यांना ते उभे असताना पकडायचे असा खेळ असतो. शिवणारा जवळ आला, की खेळाडू गपकन खाली बसून घेतो. मग शिवणाऱ्याची काही मात्रा चालत नाही. भोज्याला जाऊन शिवले की डाव अंगावर येत नाही तशी देवळे अतिरेक्यांची भोज्ये बनले आहेत. काहीही उद्रेक करावा, माणसांचे मुडदे पाडावे, लुटालूट करावी आणि खुशाल एक चांगलेसे ऐतिहासिक देऊळ गाठून त्याचा आसरा घ्यावा. म्हणजे पाठलाग करणारे पोलिस किंवा लष्कर निष्प्रभ होऊन बावळटासारखे तोंड वासून चिडीचूप बसून जातात. पाठलाग करणाऱ्यांची स्थिती विस्तव पाहिलेल्या विंचवाची, तर अतिरेक्यांची स्थिती तर अक्षरशः शंकराच्या पिंडीवर चढून बसलेल्या विंचवासारखी.

 कवि वचनच आहेः

सांबाच्या पिंडीते बसशी
अधिष्ठून वृश्चिका! आज!
परि तो आश्रय सुटता
खेटर उतरवील रे तुझा माज!!

 म्हणजे डोळ्यासमोर मोठा विंचू बसला आहे, विंचू पाहिला, की पायातली वहाण काढायची आणि त्याला हाणायचे पण विंचू शंकराच्या पिंडीवर बसलेला, त्याला मारायला जावे तर पिंडीला चप्पल लागते! तस्मात विंचू आपणहून पिंडीवरून उतरून खाली येण्याची वाट पाहण्याखेरीज गत्यंतर नाही. ती एकदा उतरला, की मग पायातली वहाण त्याचा माज उतरवेल. तोपर्यंत विंचू पिंडीवर निर्धास्त सुरक्षित राहणार एवढेच नव्हे तर पिंडीबरोबर विंचवाचीही षोडशोपचारे पूजा होत राहणार.

 आधुनिक विंचू
 अलीकडेच विंचू खूपच हुशार झाले आहेत. शंकराची पिंड सोडून खाली उतरण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. उलट पिंडीवरतीच आपली वस्ती कायम पक्की करण्याचा त्यांचा खटाटोप आहे. एरवी दगडाच्या तळाशी राहणारा हा प्राणी दगडाच्याच लिंगाच्या माथ्यावर बसला, की मोठा माज दाखवू लागतो.
 अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा भिद्रानवालेंनी ताबा घेतला. सर्रास अन्नधान्य, इतर रसद, बंदुका, स्वयंचलित रायफली, रॉकेट्स अगदी आधुनिकातील आधुनिक शस्त्रे अतिरेक्यांना बिनधास्त पोचू लागली. दिवसाढवळ्या एका पोलिस उच्चाधिकाऱ्याचा त्यांनी खून केला. अमानुष छळामुळे विद्रूप झालेली प्रेते सुवर्ण मंदिराच्या बाहेर पडत असलेली हरहमशा दिसत होती; पण सरकार चालढकल करत राहिले आणि शेवटी एकदा, प्रार्थनास्थळाचे पावित्र्य भंगू नये अशा तऱ्हेने म्हणजे पायातील वहाणेने नव्हे तर चांगल्या जाडजूड दंडुक्याने विचवाला हाणावे लागलेच. पिंड वहाणेने विटाळली नाही, दंडुक्याने भंगली.
 अयोध्या प्रकरणी तर चालढकलीची कमाल झाली. तिथल्या प्रस्तावित देवळात खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचा जीव अडकलेला. त्यामुळे मशीद पडणार हे स्पष्ट दिसत असताना शासन निष्क्रिय राहिले. अयोध्येचा विंचू इतका माजोरी, की त्याने पिंडच फोडून टाकली. उंटावरील शहाण्याच्या कहाणीप्रमाणे दोन्ही प्रकरणात उंटही गेला, वेसही गेली आणि मडकेही गेले.
 केसाने गळा कापला
 गुरुद्वारा झाले, मंदिर झाले आता पाळी मशीदाची! काश्मीरचा हजतबालचा दर्गा मोठा इतिहासप्रसिद्ध. काश्मीरच्या राजकारणाच्या पटातील एक महत्त्वाचे घर. १९६३ मध्ये दर्ग्यातला हजरत पैगंबरांचा केस चोरीला गेल्याची बातमी पसरली. प्रत्यक्षात तो केस बराच काळ आधी नाहीसा झाला होता; पण चोरीचा मामला, शेख अब्दुल्लांनी राजकारणाच्या सोयीसाठी तारीख शोधून काढली असे त्या वेळी बोलले जात होते. राजकीय प्रश्न मिटला आणि पैगंबरांचा केस जितक्या अद्भुतपणे अदृश्य झाला तितक्याच चमत्काराने परत साकार झाला. एवढेच नव्हे तर जाणकार मल्ला मौलवींनी, "हाच तो प्रेषित महंमदाचा केस" अशी विश्वासपूर्वक ओळख पटवून घेऊन, निर्वाळा दिला. ३० वर्षांनी पुन्हा एकदा हजरतबाल दर्ग्याचेच प्रकरण पेटले. आजूबाजूच्या विद्यापीठात लपलेल्या अतिरेक्यांचा लष्कराने पिच्छा केला. त्या वेळी अतिरेकी दर्ग्यात घुसतील असा धोका आहे. त्यांना दर्ग्यात आसरा घेता येऊ नये अशी काळजी घेणे आवश्यक होते; पण लष्कराने तरी काय काय गोष्टीची चिंता करावी? त्यांना काय थोडी कामे आहेत? एकाच वेळी लष्करी कारवाई आणि लोकांची दिलजमाई असा चमत्कार घडवून पंतप्रधानपदावर आरूढ झाल्याची स्वप्ने पाहणारे, आपण जणू मोशे दायान आणि महात्मा गांधी यांचा संयुक्त अवतारच अशा थाटात वावरणारे राजेश पायलट! त्यांची दर दोन दिवसांआड काश्मीर भेट ठरलेली. आल्यासारखे त्यांची निदान एकतरी सभा व्हायला पाहिजे. सभा म्हटली, की माणसे जमवायला पाहिजेत. दूरदर्शनवचे कॅमेरे पाहिजेत. सगळी व्यवस्था करायची ती लष्कराने.
 गृहमंत्री शंकरराव चव्हाण विमानाने श्रीनगरला आले; पण राजधानीपर्यंत ६ कि. मी. अंतरावर मोटारगाडीने जाण्याची त्यांची हिमत झाली नाही. त्यांनी हेलिकॉप्टरचा आग्रह धरला, "या अतिरेक्यांचा काय भरवसा सांगावा? ते लांबून रॉकेटचा मारा करून गाडी उडवून देतील." ही त्यांची भीती!
 असल्या कामाच्या व्यापात लष्कराकडून अनवधान झाले. लष्कर उंदराला पकडायला निघाले. दरवाजे खिडक्या बंद केल्या. फक्त उंदराचे बीळ बंद करायचे राहिले आणि उंदीर सटकला. विंचवाचेच रूपक चालू ठेवायचे म्हणजे, विंचू अशी काही शहाजोग चलाखी करेल अशी कल्पना लष्कराला आली नाही आणि विंचू निर्धास्तपणे पिंडीवर चढून बसला.
 विंचवांना दाणागोटा पुरवा
 सुवर्ण मंदिरातल्या अकाल तख्तात रसद आणि शस्त्रे बिनधास्त येत राहिली. त्यामुळे भिंद्रानवाल्यांच्या साथीदारांना तख्त सोडून बाहेर पडण्याची काही गरजच नव्हती. दररोज देशोदेशीचे बामीदार टेलिव्हिजनवाले आत येत होते. भिंद्रानवालेंच्या मग्रुर अरेरावीला जगभर प्रसिद्धी देत होते. सुवर्ण मंदिराचा वेढा अजागळपणे वर्षानुवर्षे चालला तो थेट, 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'पर्यंत.
 अयोध्येत आणि आसपास तर सारे राज्य विंचवांचेच! त्यांना कसल्याच पुराव्याची कसलीच चिंता करण्याचे काही कारणच नव्हते.
 दर्यात अडकलेले अतिरेकी आठवड्याभरात सहज घायकुतीला आले असते. दाणागोटा संपला, पाणी संपले, औषध संपले म्हणजे पांढरे निशाण फडकवण्याखेरीज काही गत्यंतर राहत नाही; पण खुद्द जम्मू आणि काश्मीर न्यायालयानेच अतिरेक्यांना दाणागोटा पुरवणे ही लष्कराची जबाबदारी असल्याचा निर्णय दिला आणि भारतातील धर्मयुद्धाची परंपरा महाभारत काळानंतर पहिल्यांदा उच्च पराकोटीवर नेऊन ठेवली. वेढा घालून बसलेल्या जवानांना भाकरी मिळाली नाही तरी चालेल; पण वेढ्यात अडकलेल्या अतिरेक्यांना मात्र जेवण पोचलेच पाहिजे. अयोध्या प्रकरणापासून राजकीय निर्णय कोर्टावर ढकलण्याचा पंतप्रधानांचा डाव इथे त्यांच्या अंगलट आला. बाहेरून अन्नपाणी, औषधोपचार, वैद्यकीय सेवा इ. चा पुरवठा नियमितपणे चालू राहिला. मग विंचवाला पिंडीवरून उतरण्याचे कामच काय? त्यांच्या काही तक्रारी आहेत, "जेवण योग्य तसे काश्मिरी पद्धतीचे नसते, कालची बिर्याणी जरा सपक झाली होती आणि रुमाली रोटी पंजाबी पद्धतीची जाडीभरडी होती. काश्मिरी पद्धतीची मऊसूत मुलायम नव्हती." अशा तक्रारी राहणारच. कुटुंबापासून, मित्रमैत्रिणीपासून दूर राहावे लागणे हेही एक अतिरेक्यांचे दुःख आहेच. कोर्टामार्फत निर्णय आणून अतिरेकी असले प्रश्न सोडवून घेतील. नेहरूंनी मान्य केलेली काश्मीरमधील युद्धबंदी रेषाच पक्की झाली. त्याचप्रमाणे काही वर्षांत नरसिंह राव शैलीचा वेढा काश्मीरमधील एक प्रेक्षणीय स्थळ होऊन जाईल आणि कदाचित हा वेढा पाहण्याकरिताच आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गर्दी उसळेल! काय सांगावे कदाचित त्यामुळे सगळ्या देशाचा परकीय चलनाचा चणचणीचा प्रश्न सुटून जाईल!
 किल्ल्यांच्या वेळांचे राजकारण
 कोणत्याही देवळाच्या भिंती बांधकामात तकलादू असल्या तरी दुर्गांच्या आणि किल्ल्यांच्या तटबुरुजापेक्षा जास्त मजबूत ठरतात, कारण त्यांना हात लावण्याची कोणाची शहामत नाही. किल्ल्यांना वेढा घालणारे तटबंदीवर तोफांचा भडीमार करीत, सुरुंग लावीत आणि काही जमले नाही तर शेवटी किल्ल्यात फंदफितुरी माजवीत. कोणी 'सूर्याजी पिसाळ' हाताशी धरायचा. त्याच्याकडून दरवाजे उघडून घ्यायचे किंवा देविगिरीच्या वेढ्यातल्याप्रमाणे, फितुरांकडून अन्नधान्याऐवजी कोठारात मिठाची पोती भरवायची अशा काही युक्त्या प्रयुक्त्या, धाडस करून किल्ला जिंकला जात असे. सगळ्या इतिहासकाळात किल्ल्यांचा वेढा हे मोठे खेळीमेळीने चालायचे प्रकरण असायचे. शिबंदीतील रसद संपायची चिन्हे दिसू लागली, की वेढ्याच्या कामाने कंटाळलेल्या शत्रूशी बोलणी सुरू व्हायची आणि किल्ल्यावरील लोकांना जिवंत जाऊ द्यावे किंवा येसूबाईप्रमाणे शत्रूच्या स्वाधीन व्हावे अशा अटींवर किल्ला खाली करून दिला जाई. किल्ल्याच्या वेढ्याचा असा खेळ सतत चाले. रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा १० महिने पडला होता. सिद्दीच्या जंजीऱ्याला जिंकण्याकरिता खुद्द शिवाजीराजांनी तीन प्रयत्न केले. तिसऱ्या वेळचा वेढा तर किती दीर्घकाळ चालला, की त्याची मोठी विनोदी आख्यायिका सांगतात. वेढ्याच्या सुरुवातीच्या काळात मराठी लष्कराने चोखून फेकून दिलेल्या आंब्याच्या कोयी रुजून त्यांचे वृक्ष झाले, मोहोर आला, रसदार आंबे आले आणि ते आंबे चोखून खात खात मराठ्यांनी वेढा पुढे चालवला!
 हजरतबाल दर्ग्याला वेढा घालून बसलेल्या लष्कराला इतर अडचणी कितीही असोत, १०-१५ वर्षांनंतर त्यांना सफरचंदाच्या पुरवठ्याची चिंता पडू नये. त्यांच्या सध्याच्या रेशनमधल्या सफरचंदाच्या बियातून उत्पन्न झालेल्या बागांची फळे तोपर्यंत त्यांना मिळू लागतीलच!
 १९६७ मध्ये सुरू झालेल्या जंजिऱ्याच्या तिसऱ्या वेढ्याचे पुढे काय झाले? वेढा वर्षानुवर्षे चालला. शेवटी एका होळीच्या रात्री मराठी सैन्यात गाफीलपणा आला आहे, हे पाहून फत्तेखान सिद्दीने मराठ्यांच्या तळावर निकराचा हल्ला केला आणि दारूगोळ्याला आग लावून दिली. त्याचा स्फोट इतका गगनभेदी होता, की तो आवाज रायगडावर शिवाजी महाराजांना झोपेतही ऐकू गेला असे म्हणतात. हजारो मराठी लष्कर मेले, वेढा उठवावा लागला. सिद्दीविरुद्धच्या शिवरायांच्या तिसऱ्या मोहिमेचा असा निकाल लागला. सुवर्ण मंदिर, अयोध्या आणि त्यानंतरच्या या तिसऱ्या हजरतबाल दर्ग्यांच्या लढाईत पंतप्रधानांची झोपमोड अशीच होण्याची शक्यता कोण नाकारेल?
 आता नवा गझनीचा महंमूद
 तात्पर्य काय? देवळे त्यांच्या मूळच्या ऐतिहासिक कामगिरीकडे हजारो वर्षांच्या कालावधीनंतर परत आली आहेत. चोरचिलटे, दरोडेखोर, लुटारू, हल्लेखोर यांच्यापासून सुरक्षित ठेवायचे धन जडजवाहीर देवळात ठेवायचे म्हणजे देवाच्या धाकाने ते सुरक्षित राही एवढाच काय तो फरक!
 देवळाच्या वेढ्याचा हा तिढा सुटायला आता नवा गझनीचा महमूद पुन्हा अवतार घेण्याची वाट पाहावी लागणार!

(२५ नोव्हेंबर १९९३)
■ ■