अन्वयार्थ - १/'सियावरत्यक्ता सीता' एक अनादी पीडित

विकिस्रोत कडून


'सियावरत्यक्ता सीता' एक अनादी पीडित


 योध्येत खास तालीम केलेले बाबरी मस्जिदीच्या घुमटावर चढले. कुऱ्हाडी, पहारी, फावडी, दोरखंड, गळ इत्यादी साधनांनी सुसज्ज करसेवक पुढे सरसावले. दोन तीन तासांच्या आल्पावधीत सारी मस्जिद जमीनदोस्त करून टाकली. हा सगळा कार्यक्रम चालू असताना घोषणा दिल्या जात होत्या. साध्वी ऋतंभरा कर्ण्यातून घोषणा देत होती, "सियावर रामचंद्र की" आणि करसेवक उल्हासाने प्रतिसाद देत होते, "जय, सियावर रामचंद्र की जय."
 सीतेचा पती म्हणून प्रभू रामचंद्र ओळखला जातो. एकवचनी, एकबाणी, पुरुषोत्तम इत्यादी अनेक विशेषणे रामासाठी वापरली जातात; पण सर्वांत जनमानसात रुजलेले अभिधान म्हणजे 'सियावर' राम, सीताकांत राम, सीताराम.
 भूमिकन्या सीता :
 सीतेचे जीवनचरित्र सगळे इतके उज्ज्वल आहे, की तिच्या नावाच्या संदर्भात रामाचा परिचय करून द्यावा हे योग्यच आहे. जनक राजाला जमीन नांगरताना एक लहान मुलगी सापडली, म्हणून ती भूमिकन्या. जनक राजाने सीतेचे स्वयंवर मांडले. प्रचंड शिवधनुष्य एकट्या रामाने पेलले आणि राम सीतापती झाला. वयात आल्यानंतर रामाचा राज्याभिषेक ठरला; पण ऐनवेळी कैकेयी मातेच्या आग्रहामुळे त्याला चौदा वर्षे वनवासात पाठवायचे ठरले. सीतेने वनवासात जावे असे कुणी सांगितले नव्हते; पण रामापाठोपाठ वनवासात जाते असा आग्रह तिने स्वतः धरला. 'जिथे राम तिथे सीता' हा त्या कोवळ्या वयातल्या नववधूचा हट्ट. वनवास सुरू झाला. कांचनमृगाच्या कातड्याचा हट्ट सीतेने केला, हा एकच प्रसंग सीतेला माणसाप्रमाणे रागलोभ होते असे दाखवणारा. नाहीतर एरवी आयुष्यभर ती एखाद्या देवतेप्रमाणे जगली. रावणाने सीतेचे हरण केले. रामरावण युद्ध झाले. रावणाचा वध झाला, सीतेची मुक्तता झाली.
 सीता सामोरी आली आणि रामाने एखाद्या प्राकृत पुरुषालासुद्धा न शोभणारे भाषण तिला ऐकवले,
 "भद्रे, समरांगणात शत्रूला पराभूत करून मी तुला त्याच्या तावडीतून सोडवले. पुरुषार्थ दाखवून जे काही करण्यासारखे होते ते सारे मी केले. आता माझ्या अमर्षाचा अंत झाला आहे. माझ्यावर जो कलंक लागला होता त्याचे मी परिमार्जन केलं."
 "तुला हे समजले आहे, की मी हा जो युद्धाचा प्रपंच केला तसेच या मित्रांच्या पराक्रमाचे साहाय्य घेऊन युद्धात जो विजय मिळविला, ते सारे तुझ्या प्राप्तीसाठी केलेले नाही. सदाचाराचे रक्षण, सगळीकडे फैलावलेल्या अपवादाचे निवारण, तसेच आमच्या सुविख्यात वंशावर लागलेल्या कलंकाचे परिमार्जन करण्यासाठी मी हे सारे केले."
 "तुझ्या चरित्रावर संदेहाचा डाग पडला आहे, तरीही तू माझ्यासमोर आली आहेस. ज्याप्रमाणे डोळ्यांचा आजार असलेल्या रोग्याला दिव्याची ज्योत सुखवीत नाही त्याप्रमाणे आज तू मला अत्यंत अप्रिय वाटते आहेस. तेव्हा जनककुमारी. तू तुझ्या इच्छेला येईल तिकडे निघून जा; मी माझ्याकडून तुला अनुमती देतो आहे. भद्रे, या दाही दिशा तुला मोकळ्या आहेत. आता तुझ्याशी मला काहीही कर्तव्य नाही."
 "रावण तुला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन गेला, त्याने तुझ्यावर दुष्टदृष्टी टाकलेली आहे. अशा अवस्थेत, महाकुलीन असा माझ्यासारखा पुरुष तुझे पुनर्ग्रहण कसे करू शकेल?"
 फाळणीच्या वेळी हजारो अपहृत स्त्रियांचा शोध लावून, त्यांना पाकिस्तानातून परत आणण्याचे मोठे कठीण काम अनेक संस्थांनी केले. दुर्दैवाची गोष्ट अशी, की त्या स्त्रियांचे आईबाप, पती, सासूसासरे त्यांना स्वीकारण्यास तयार झाले नाहीत. या अपहृत स्त्रिया कलंकित झालेल्या आहेत, त्यांना आम्ही स्वीकारू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. स्वस्त्रियांचे रक्षण करण्यास जे पुरुष असमर्थ ठरले होते त्यांनीच अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना धुत्कारले. या सगळ्या नरवीरांचा सनातन आदर्श 'प्रभू रामचंद्र'च.
 बिभीषणापाशी रहा :
 एखाद्या अभद्र पुरुषाप्रमाणे राम सीतेला पुढे म्हणाला, "आता तू पाहिजे तिकडे जाऊ शकतेस. तू इच्छिलेस तर भरत किंवा लक्ष्मणाच्या संरक्षणाखाली सुखपूर्वक राहण्याचा विचार करू शकशील. तुझी इच्छा असेल तर शत्रुघ्न, वानरराज सुग्रीव किंवा राक्षसराज बिभीषणाजवळही राहू शकतेस. जिथे तुला सुख वाटेल तेथे तू आपले मन वळीव. तुझ्यासारखी दिव्यरूपसौंदर्याने सुशोभित नारी आपल्या घरात असता रावण इतका काळ तुझ्यापासून दूर राहिला असणे शक्य नाही."
 रामाचे कठोर बोल ऐकून सीता दुःखित झाली. डोळ्यातील पाण्याने भिजलेले आपले मुख पदराने पुशीत ती हळूहळू गदगदलेल्या वाणीने म्हणाली,
 अग्निदेवाची साक्ष :
 "वीरा, तुम्ही असं कठोर अनुचित, कर्णकटू आणि रूक्ष बोल मला का ऐकवता आहात? माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझ्या सदाचाराचीच शपथ घेऊन सांगते, की मी शंका घेण्यायोग्य नाही. रावणाच्या शरीराला माझ्या शरीराचा स्पर्श घडला आहे. माझं दुर्भाग्य त्याला कारणीभूत आहे. माझं अंग पराधीन होते; पण माझे हृदय सदैव तुमच्याच ठायी गुंतलेले आहे."
 "माझ्या शोधासाठी तुम्ही महावीर हनुमानाला पाठविले होते त्याच वेळी माझ्या त्याग का केला नाही? त्या वेळी हनुमानाच्या मुखातून तुम्ही मला त्यागल्याचे वृत्त ऐकले असते तर त्याच्यासमोरच मी माझ्या प्राणाचा त्याग केला असता, मग अशाप्रकारे तुमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला हा युद्धाचा व्यर्थ खटाटोप करावा लागला नसता."
 रडत आणि अश्रू ढाळीत बसलेल्या लक्ष्मणाला सीता म्हणाली,
 "सुमित्रानंदन, माझ्यासाठी चिता तयार कर. माझ्या दुःखाला हेच औषध आहे."
 अग्निपरीक्षाः अग्निदेवाने स्वतःच सीतेच्या शुद्धतेची साक्ष दिली तेव्हा एकवचनी रामाने उलटे बोलायला सुरुवात केली आणि 'अग्निपरीक्षा' करणे योग्यच होते अशी मखलाशी केली.
 राम सीतेसह अयोध्येला पोचले. राज्याभिषेक झाला. सीता गर्भवती झाली, तिने तपोवनात एक रात्र निवास करण्याची इच्छा असल्याचे डोहाळे सांगितले. एवढ्यात काही गुप्तहेरांनी प्रजाजनांत सीतेच्या स्वीकाराबद्दल नाखुषी आहे अशी माहिती रामराजाला सांगितली.
 परित्यक्तासीता
 रामाने प्रत्यक्ष अग्निदेवतेच्या साक्षीपेक्षा संकुचित दृष्टीच्या काही प्रजाजनांचा अपवाद अधिक महत्त्वाचा मानला. याचा अर्थ स्पष्ट आहे, की सीतेला घरी आणल्याबद्दल त्याच्या मनातही कोठेतरी रुखरुख राहिली होती. अन्यथा जनापवाद कानावर आला. त्यानंतर तो सीतेकडे जाऊन म्हणाला असता, "लोक तुझा अनादर करत आहेत. गेल्या वेळी तू माझ्यामागोमाग वनवासात आलीस, या वेळी मी तुझ्याबरोबर वनवासात येतो. आपण दोघेही अयोध्या सोडून जाऊ."
 पण, राम असे म्हणाला नाही, त्याच्याने एवढेसुद्धा बोलवले नाही, की "मी राजा आहे, माझ्या कर्तव्यामुळे तुला जवळ ठेवणे मला शक्य नाही; पण तुझी आबाळ होणार नाही. एवढ्या वैभवशाली अयोध्येतल्या कोणत्याही महालात दासदासी, धनधान्य, आभूषणे घेऊन तू सुखाने राहा आणि आपल्या मुलांनाही योग्य तऱ्हेने वाढीव."
 गर्भवती सीतेचे डोहाळे पुरवणे दूरच राहिले; पण बाळंतपण होईपर्यंत तिला अयोध्येत दोन खोल्या घेऊन राहण्याचीसुद्धा मुभा राहिली नाही, तिला जंगलात नेऊन सोडण्यात आले.
 रावेरीचे सीतामंदिर
 यवतमाळ जिल्हा, राळेगाव तालुका, गाव वस्ती रावेरी. एका बाजूला रामतीर्थ आणि दुसऱ्या बाजूला चिंतामणी गणपती देवस्थान कळंब, या दोघांच्या मधोमध दरीकंदरातून, रानावनातून फिरता फिरता परित्यक्ता सीता या कुग्राम वस्तीला आली. गावात तिला कोण आसरा देणार? गावाबाहेर नदीच्या काठी एका खोपटात ती थांबली. पोटात दुखू लागले. जवळ ना सुईण ना दाईण. पाठीवर हात फिरवायलाही कुणी नाही. अशा अवस्थेत अयोध्येची महाराणी दोन बाळांना जन्म देती झाली.
 त्या जागी सीतेचे मंदिर आजही मोडक्या तोडक्या अवस्थेत उभे आहे. गावचे लोक सांगतात, "या इथे लवकुशांचा जन्म झाला. सीता एकटी एकटी या इथे न्हायली." बाळंतपणाच्या श्रमाने व्याकूळ झालेल्या सीतेने गावकऱ्यांना गहू देण्याची विनंती केली. ओळखदेख नसलेल्या फिरत फिरत आलेल्या बाईला मदत कोण करतो? सीतेने तळतळून गावाला शाप दिला, "या गावात गहू म्हणून उगवायचे नाहीत."
 रावेरीकर गावकऱ्यांना या सगळ्या हकिकतीचे दुःख वाटते. सर्वसाधारणपणे लोककथा गावाच्या गौरवाच्या असतात, गावाला काळिमा लावणारी कथा क्वचितच. रावेरीकर गावाला कमीपणा आणणारी कथा मानतात एवढी गोष्टच लोककथा आणि वास्तव यांचा काहीतरी संबंध असावा हे दाखवण्यास पुरेशी आहे.
 सीता अजून वनवासी
 हनुमानाच्या मंदिराची काही डागडुजी चालू आहे. सीतेचा वनवास मात्र आजही संपलेला नाही. सीतेच्या मंदिराच्या आसपास घाण माजली आहे. गावची हागंदारी तिथे आहे.
 रामाच्या नावाने हजारो मंदिरे आहेत. सीता मात्र अभागिनी, वनवासी, आजही निराधार आहे. पुरुषोत्तम रामाच्या आणखी एका मंदिराचे नवे 'कांड' घडते आहे; घोषणांच्या निनादात मस्जिद त्यासाठी पाडण्यात आली. रामाचे भक्त घोषणा देत आहेत, "सियावर रामचंद्र की जय!"

(७ जानेवारी १९९३)
■ ■