अन्वयार्थ – २/स्पायरॉसिस साथीचा इशारा

विकिस्रोत कडून


स्पायरॉसिस साथीचा इशारा


 मुंबईला अलीकडे एक परिसंवाद झाला. परिसंवादाचा विषय होता 'आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेच्या लवकरच सुरू होणाऱ्या वाटाघाटींत भारताने काय भूमिका घ्यावी?' सुरुवातीची लांबलचक निरर्थक भाषणे होऊन गेली. मंत्री आणि त्यांचे संत्री चहापानानंतर निघून गेले. मग, गंभीर चर्चेला सुरुवात झाली. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा अनेकांनी मांडला, तो थोडक्यात असा :
 खुलेपणा, जागतिकीकरण या संज्ञांना आपण फार गंभीरपणे घेतो. आपल्या उद्योजकांना फटका बसत असला तरी आयात व्यापारावरची बंधने उठवितो. इतर देश, विशेषतः अमेरिका व युरोपातील श्रीमंत देश असल्या तत्त्वांची फारशी पत्रास ठेवीत नाहीत. त्यांच्या उद्योजकांना आणि अर्थव्यवस्थेला फायदेशीर असतील तेवढेच निर्बन्ध ते शिथिल करतात. या पलीकडे जाऊन, भारतासारखे देश त्यांच्या देशांत निर्यात करू लागले आणि त्यामुळे त्यांच्या उद्योगधंद्यांना त्रास होऊ लागला तर काहीही निमित्त काढून अशा आयातीवर ते बंदी घालतात. उदाहरणार्थ, हिंदुस्थानातून येणारी फळे, भाजीपाला पुरेशा स्वच्छ अवस्थेत येत नाहीत, त्यामुळे तेथील सार्वजनिक आरोग्यास धोका संभवतो असा कांगावा करून ते आयात बंद करवतात. थोडक्यात, जागतिकीकरण व खुली बाजारपेठ या संकल्पना खऱ्या अर्थाने घेणे भारताला परवडणारे नाही. म्हणून, आपणही 'येन केन प्रकारेण' परदेशांतून आयात होणाऱ्या मालावरही बंधने घातली पाहिजेत. अगदी बंदीच घालता नाही आली तर, निदान चढ्या दराने त्यांच्यावर आयातशुल्क लावले पाहिजे. इत्यादी, इत्यादी.
 श्रीमंत राष्ट्रे त्यांच्या देशात येणारा माल स्वच्छ असावा, त्यात रोगराईचे जंतू येऊ नयेत अशी अपेक्षा ठेवणार यात चूक काय आहे? आपल्याकडील निर्यातदारांनी जागतिक आरोग्य संघटनेचा दर्जा राखून मालाची निर्यात का करू नये?
 श्रीमंत राष्ट्रे रोगराईचा खराखुरा धोका संभवतो तेथेच आक्षेप घेतात, बंदी घालतात असे नव्हे. त्यांना जी आयात अडचणीची वाटते तेथे असा रोगराईचा खोटा बागुलबुवा ते उभा करतात. द्राक्षे, आंबे, विशेषतः हापूससारखे आंबे यांत रोगराईचा धोका तो काय असणार? पण, या मालांचे पेटारेच्या पेटारे परत आले आहेत किंवा नष्ट केले गेले आहेत. त्यामुळे दुसरा एक दीर्घकालीन परिणाम होतो. अमक्या देशातील माल आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने नष्ट करण्यात आला अशा बातम्या वर्तमानपत्रांत झळकल्या किंवा अशा अफवा जरी पसरल्या, तरी त्या देशांतील चोखंदळ ग्राहक बदनाम देशातील कोणताही माल घ्यायलाच तयार होत नाहीत. काही काळानंतर वादावादी होऊन बंदी उठली तरी पुन्हा बाजारपेठ काही हाती येत नाही. कारण, तेथील ग्राहकच स्वेच्छेने वृथा बदनाम देशातील मालाचा बहिष्कार करतात.
 मुंबईतील या परिसंवादाच्या अध्यक्षमहाराजांनी समारोप केला, युग खुलेपणाचे आले आहे हे नि:संशय. यापुढे आता कोणी म्हटले तरी घड्याळाचे काटे आणि दिनदर्शिकेची पाने उलटी फिरविता येणार नाहीत; स्पर्धेला सामोरे जावेच लागेल. पण, भारताने पावले बेताबेताने, पूर्ण सावधानी घेऊन टाकली पाहिजेत.
 म्हणजे नेमके काय करायला पाहिजे? या प्रश्नाचा गुंता मनातल्या मनात सोडवीत मी निघालो. तयार कपड्यांची निर्यात करणाऱ्या कारखानदाराने त्याच्या कचेरीत येण्याचा आग्रह केला, त्याच्याबरोबर गेलो. वाटेत त्या कारखानदारमित्राने परिसंवादाचा सूर चालूच ठेवला, फळे आणि भाजीपाला सोडून द्या हो! आमच्या तयार कपड्याचे पेटारेच्या पेटारे, आरोग्यास विघातक म्हणून परत येतात. आता सांगा, कशी काय स्पर्धा करायची या बदमाश श्रीमंत राष्ट्रांबरोबर?
 कारखानदाराच्या कार्यालयात पोहोचलो. साहेबांचा कारभार मोठा. टेबलाभोवतीचे अनेक फोन घणघणू लागले. साहेब फक्त महत्त्वाचे फोन घेत; बाकीचे फोन त्यांचे सचिव, निजी सचिव, अव्वर सचिव वगैरे मंडळी घेत होती. साहेब स्वतः एका दूर देशातील ग्राहकाशी बोलत होते. काही कागदपत्रे पाठविण्यासाठी तिकडून फॅक्स् टोन मागितला गेला असावा. विजेचा पुरवठा खंडित होता; एरव्हीही अनेक वेळा असतो, त्या दिवशी म.रा.वि.मं.च्या संपामुळे खंडित असावा. वीज परत केव्हा येईल याची काहीच शाश्वती नव्हती. साहेबांनी मोठ्या विनम्रपणे परदेशी ग्राहकाला सांगितले, छे, छे! आपल्याला त्रास कशाला? आपण कागद 'फॅक्स्' मशीनमध्ये ठेवा, मी इकडे 'पुल' करून घेतो.
 मला आश्चर्य वाटले. ग्राहकाच्या खर्चाने फॅक्स् येत असताना 'पुल' करून ते ओझे साहेब आपल्या डोक्यावर का घेताहेत! खर्चाची रक्कम एकूण कारभाराचा आवाका पहाता तशी किरकोळ. पण, साहेबाची ख्याती पैशाची टाकटुकी करण्याबद्दल होती. मग, हे काय नवल वर्तले?
 साहेबांनी आपणहूनच स्पष्टीकरण दिले, त्यांना काय सांगू? येथे वीज नाही म्हणून सांगू? आपल्याकडे दिवसातून दहा वेळा वीज जाते आणि सार्वजनिक सेवांतील नोकरवर्गही केव्हाही संपावर जातो हे त्यांना मी सांगितले तर ते माझ्याबरोबरचे संबंधच तोडून टाकतील. आम्ही विणकामाचे कपडे तयार करतो. प्रत्येक वेळी वीज बंद पडली, की सारी यंत्रे थंडावतात. पर्यायी व्यवस्था असली तरी मध्ये थोडासा काळ जातोच. त्यामुळे आमच्या विणकामात एक लहानसा दोष राहतो. आम ग्राहकाच्या तो लक्षातही येत नाही, पण जाणकारांच्या नजरेतून तो सुटत नाही. रोगराईच्या धोक्यामुळे माल परत येण्याचे प्रकरण आताच कोठे आटोपते आहे, त्यात ही नवीन भानगड उपटली, तर मग आमचा कारभारच आटोपला.
 विदेशी सारे बदमाश आणि आपण मात्र सारे स्वच्छ धुतल्या तांदळासारखे अशी आपली सर्वांची खात्री असते. माझ्या राहत्या जागी परतलो. दूरदर्शनवर, मुंबईतील नव्या गूढ साथीच्या आजाराने २६ माणसे दगावली आणि हजारो माणसे इस्पितळांत तपासणीसाठी भरती होताहेत, अशी बातमी होती.
 नुकताच मुंबईत बेसुमार पाऊस झाला. गटारे, नाल्या तुंबल्या. रस्यांच्या नद्या झाल्या, लोहमार्ग पाण्याखाली गेले. चांगल्या चांगल्या वस्तीतही पाणी पार बाहेरच्या दाराच्या उंबऱ्यापार्यन्त येऊन पोहोचले. साहजिकच, पाणी उंदीरघुशींच्या बिळांतही घुसले. परिणामी, मुंबईभर वाहणारे पाणी उंदीरघुशींच्या विष्ठेने व मुताने भरलेले होते. हजारो माणसे अशा पाण्यातून चालत राहिली. भायखळ्यासारख्या भाजीबाजारात अशा पाण्यातच बुचकळून भाजीपाला, फळे स्वच्छ करून खरेदीसाठी ठेवण्यात आली. या प्रदूषणाचा काहीही अंश नागरी पुरवठ्यात उतरणे शक्यच नव्हते असे छातीठोकपणे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त साहेबही विश्वासाने सांगू शकणार नाहीत.
 मी जे दूरदर्शनवर पाहतो आहे, ऐकतो आहे हे जर आमच्या कपडा निर्यातदार साहेबांच्या विदेशी ग्राहकाने ऐकले, पाहिले तर भारतीय माल घेण्यास तो कितपत उत्सुक राहील असा विचार साहजिकच मनात आला.
{gap}}मागे सूरत शहरात प्लेगने हैदोस घातला. तिथल्या कारखानदारीवर आणि निर्यात व्यवसायावरही मोठा विपरीत परिणाम झाला. त्या वेळीही हा प्रश्न उभा राहिला होता. ज्या देशात अजून प्लेगसारखा साथीचा रोग पसरतो त्या देशाने आपण आधुनिक राष्ट्र असण्याची कितीही बतावणी केली तरी विदेशी ग्राहकाच्या मनाचे समाधान होईल काय? त्यानंतर सूरतमध्ये कोणी एक नवीन तरुण कर्तबगार आयुक्त साहेब आले. लोकांच्या सहकार्याने त्यांनी मोठे धूमधडाक्याचे अभियान चालविले आणि थोड्याच दिवसांत सूरत हे आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचा बोलबाला होऊ लागला. प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी सूरतला गेलो, तेवढ्यात त्या आयुक्तांची बदली कोण्या दुसऱ्या ठिकाणी झाली होती.
 मुंबईतील या नव्या रोगाची साथ आटोक्यात आणायची असेल तर काही किमान कार्यक्रम तातडीने पुरा करावा लागेल. मुंबईतील केरकचरा आणि सांडपाणी यांच्या निचऱ्याची व्यवस्था दुपटी तिपटीने मोठी करावी लागेल. मस्जिद बंदर इत्यादी भागांत लोहमार्गाच्या बाजूने एवढ्या मोठ्या आकाराच्या घुशी मनमानी करीत फिरताना दिसतात, की ही छोट्या बांध्याची डुकरांची काही उपजाती तर नव्हे, असा संशय यावा. उंदीर, घुशी संपविण्याची प्रचंड मोहीम हाती घ्यावी लागेल. त्यासाठी मनेकादी पर्यावरणवाद्यांनादेखील मुसक्या बांधून ठेवावे लागेल. अखेरीस, मुंबईचा नागरी प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईत 'जगण्या'साठी येणाऱ्या लोकांचा महापूर थांबवावा लागेल; एवढेच नाही तर उलटवावा लागेल. साथीचा रोग लहानसा; पण त्याचा बंदोबस्त करावयाचा असेल तर गेल्या पन्नास वर्षांतील यच्चयावत् आर्थिक-सामाजिक धोरणांना उलटवावे लागेल. अन्यथा, सभ्य राष्ट्रांच्या पंक्तीत भारताला प्रवेश मिळण्याची शक्यता नाही.
 कोणाही मुलीचा बाप किंवा आई मुलगी दाखवायला न्यायची म्हणजे तिच्या गुणांचे यथार्थ आणि अवास्तव गुणगान करतातच; त्याहीपेक्षा, तिचे दोष सहजी दिसून येणार नाहीत असे प्रयत्न करतात. रंग थोडा उजळ दिसावा, डोळ्यातील तिरळेपण लक्षात येऊ नये, उंची थोडी अधिक दिसावी इत्यादी इत्यादी. राम गणेश गडकऱ्यांच्या बाळकरामाने ठकीच्या वधूपरीक्षेत सांगितलेले सर्व उपाय केले जातातच. मुलगी आजारीच असली, क्षयाची किंवा कोड इत्यादीची बाधा असली तर मग विचारायलाच नको!
 जागतिकीकरणात भारताची परिस्थिती काहीशी अशीच आहे. आपला माल आपण पसंतीसाठी नेतो तो चांगल्यात चांगला बनवून नेण्याची शर्थ उद्योजक हरप्रकारे करतात. पण, त्यांच्या प्रयत्नांना काही मर्यादा आहेत. घाणीने बरबटलेल्या, उंदीरघुशींचा सुळसुळाट असलेल्या, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नसलेल्या, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नसलेल्या व दिवसातून दहा वेळा वीज खंडित होणाऱ्या शहरात जागतिक दर्जाचा माल तयार होणे जवळजवळ अशक्य आहे.
 आपली ही अशी स्थिती आहे याबद्दल मी झोड उठवू इच्छित नाही. इतिहासाचे वास्तव नाकारण्यात काय हशील आहे? पण या सगळ्या दोषांवर पांघरूण घालायचे, आमच्यात तसे दोष नाहीतच असा आक्रोश करायचा, उलट विदेशी मंडळीच खोडसाळ आणि बदमाश आहेत असा गिल्ला करायचा आणि त्याहीपेक्षा मोठे पाप म्हणजे, अशा अभिनिवेशापोटी, आत्ता आत्ता साऱ्या जगाचे श्वास मोकळे करू लागलेल्या खुलेपणाला कोलदांडा घालायचा नतद्रष्टपणा राष्ट्रवादाच्या नावाखाली करायचा या प्रवृत्तीबद्दल मला दुःख वाटते. आपले दोष मान्य करून ते दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर, कदाचित्, एक दिवस आपण सभ्य आणि स्वच्छ देशांच्या पंक्तीत आपले 'सोवळे' टाकू शकू. अन्यथा, या बोगद्याच्या पलीकडील उजेड आजतरी डोळ्यास दिसण्यासारखा नाही.
 मुंबईच्या 'स्पायरॉसिस' आजाराच्या साथीचा हा निर्वाणीचा इशारा आहे.

दि. ५/८/२०००
■ ■