अन्वयार्थ – २/सरहद्दीविरहीत तिसऱ्या महायुद्धाच्या

विकिस्रोत कडून



सरहद्दीविरहित तिसऱ्या महायुद्धाच्या
पहिल्या फेरीत सरशी ओसामाची



 मेरिकेने अफगाणिस्तानवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात केली तेव्हापासून पाच आठवडे होऊन गेले. युद्धात जो शेवटी जिंकतो त्यालाच विजेता म्हणतात. कोणत्याही मध्यंतरात कोण किती जिंकतो, कोण किती हारतो याची पाहणी करण्यात तसा काही फारसा अर्थ नसतो; युद्धपरिस्थितीस कधी कलाटणी मिळेल आणि कोणाचे पारडे कधी झुकेल काही सांगता येत नाही. तरीही कुतूहल किंवा मनोरंजन म्हणून का होईना, गेल्या पस्तीस दिवसांच्या लढाईचा आढावा घेतला तर, या पहिल्या फेरीत ओसामा बिन लादेनची सरशी झाली आहे असे उघड दिसते. याचा अर्थ ही सरशी टिकून राहील, वाढत जाईल असा नाही. मुष्टियुद्धाच्या सामन्यात प्रत्येक फेरीला गुण दिले जातात. सामना एक प्रतिस्पर्धी भुईसपाट होऊनही संपू शकतो. तसे नच झाल्यास वेगवेगळ्या फेऱ्यांच्या गुणांची बेरीज केली जाते किंवा कोणत्या प्रतिस्पर्ध्याने किती फेऱ्या जिंकल्या या आधाराने सामन्याचा निर्णय केला जातो. या अर्थाने अमेरिका - अफगाणिस्तान लढाईतील पहिली फेरी ओसामा बिन लादेनने जिंकली हे नि:संशय.
 अमेरिकेला, दऱ्याखोऱ्यांत दडून राहिलेल्या ओसामा बिन लादेनला 'जिवंत वा मृत' पकडणे सोपे नाही, आंतरराष्ट्रीय आतंकवादाचा बंदोबस्त करणे त्याहून कठीण. तालिबानचे सरकार उलथवून त्या जागी अफगाणिस्तानातील सर्व वंशीयांचे प्रातिनिधिक सरकार स्थापन करणे हे मर्यादित राजकीय उद्दिष्टदेखील तसे वेळखाऊच. अमेरिकेच्या या तीन उद्दिष्टांपैकी एकही पहिल्या फेरीपर्यंत दृष्टिपथात आलेले नाही. लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानातील सर्व महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त केली; लक्षावधी लोक, अर्धपोटीच नाही तर, भुकेलेले आहेत; हजारोंच्या सख्येने पठाण निर्वासित होऊन मिळेल त्या साधनाने शेजारच्या देशांकडे धावत आहेत.
 एवढे असूनही ओसामाला मुसक्या बांधून अमेरिकन 'बादशहा' समोर हजर करण्याची तालिबान सरकारची यत्किंचितही तयारी दिसत नाही. उभा अफगाणिस्तान जाळून काढला तरी ओसामा कोठे लपला आहे याची फारशी स्पष्ट कल्पना अमेरिकेला आलेली नाही.
 तालिबान सरकार पडण्याची काहीच लक्षणे नाहीत. याउलट, सध्याचे युद्ध फक्त आंतरराष्ट्रीय आतंकवादाविरुद्ध आहे, इस्लामविरोधी नाही असे अमेरिकी राष्ट्रपती आणि त्यांच्या वतीने इतरांनी कितीही गर्जून सांगितले तरी देशोदेशीच्या मुसलमान समाजात हे युद्ध प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय इस्लामविरुद्ध आहे याची खात्री पटली आहे. ज्या मुसलमान देशांच्या सरकारांनी अमेरिकन कारवाईस अप्रच्छन्न पाठिंबा दिला त्यांना देशांतर्गत रोषास इतक्या बिकटपणे सामोरे जावे लागले आहे, की त्यांच्या स्थैर्याची काहीच शाश्वती राहिली नाही.
 तालिबानला पर्याय काय? रशियन पाठिंब्याच्या, उत्तरेकडील 'दोस्ताना' गटाला अमेरिकेची चढाई म्हणजे मोठे वरदानच वाटले. प्रत्यक्षात मात्र त्यांना तालिबानच्या अडचणींचा फायदा घेऊन एक शहरही काबीज करता आले नाही. अमेरिकेनेही वास्तवाचे भान ठेवून 'उत्तरी मोर्चा'स पर्यायी सरकार म्हणून मानण्याचा विचार तहकूब केला आहे.
 आधुनिकात आधुनिक बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे यांचा वर्षाव होऊनही तालिबान सरकारविषयी कणमात्र सहानुभूती नसलेल्या अफगाणांच्या मनातही काही भयभीती तयार झाल्याचे दिसत नाही. हजारोंच्या संख्येने अफगाण निर्वासित पाकिस्तानी सरहद्दीकडे आले; पाकिस्तान सरकारने बंदी केल्यावरही सुरक्षादलाला न जुमानता, तारांची कुंपणे मोडून या निर्वासितांनी इस्लामचा जयजयकार करीत पाकिस्तानात प्रवेश केला. या युद्धाच्या निमित्ताने इराण आणि पाकिस्तानमध्ये हजारो अफगाण निर्वासित जाऊन उतरले आहेत. युद्धभूमी बदलली तर हे निर्वासित अफगाणिस्तानची आघाडीची फौज म्हणून उपयोगी येतील यात काही शंका नाही. आधुनिकातील आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करूनही अमेरिकेचे घोडे काही पुढे सरकलेले दिसत नाही. याउलट, ओसामा बिन लादेनची गेल्या चाळीसपंचेचाळीस दिवसांतील कमाई मोठी सज्जड आहे.
 १. वर सांगितल्याप्रमाणे पाकिस्तान व इराण या देशांत त्यांनी तळ मिळवला आहे. त्यामुळे, मुशर्रफसाहेब आणि इराणी सरकार यांना मोठी चिंता वाटू लागली आहे.
 २. पाकिस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स् यांसारख्या देशांत स्थानिक मुसलमानांनी अमेरिकाविरोधी प्रचंड निदर्शने करून हे युद्ध साऱ्या इस्लामविरुद्ध 'जिहाद' आहे हे स्पष्ट केले आहे.
 ३. तशी, युद्धभूमी फक्त अफगाणिस्तानात आहे; पण सगळ्यांत जास्त घबराट अमेरिका आणि युरोपियन देश येथेच माजली आहे. जागतिक व्यापार केंद्राचे मनोरे जमीनदोस्त झाले, खुद्द पेंटॅगॉनवरच हल्ला झाला त्यामुळे, सतत सुरक्षेच्या वातावरणात जगणारे अमेरिकी नागरिक हवालदिल झाले आहेत. विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड घटली आहे. काही विमान कंपन्यांची दिवाळे निघत आहे.
 ४. तीस लाख डॉलर किमतीचे एकएक क्षेपणास्त्र अमेरिकेने अफगाणिस्तानवर सोडले तरी तेथील प्रजेचे मनोधैर्य अजिबात खचलेले नाही. उलट, एक डॉलर टपाल हशील भरून ॲन्थ्रक्स् रोगाचे जंतू पसरवण्याच्या अजब हत्याराने अमेरिका पक्षाघात झाल्यासारखी झाली आहे. सीनेट आणि काँग्रेसची कार्यालयेही बंद करावी लागली आहेत. टपाल खात्याचे चार कर्मचारी रोगाची लागण होऊन मृत्यू पावल्याने टपालव्यवस्थाही डळमळू लागली आहे.
 ५. ओसामा बिन लादेनचा सर्वांत मोठा विजय, मानसिक पातळीवर, प्रसिद्धिमाध्यमांच्या क्षेत्रात आहे. सर्व माध्यमांनी त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली, त्याचे फोटो झळकवले. पण, हिटलर किंवा टोजो यांच्याप्रमाणे ओसामा, छायाचित्रांवरूनतरी, कोणी क्रूरकर्मा वाटत नाही. एखादा शांत, गंभीर प्रेषित असावा असे त्याचे सारे बोलणे, चालणे, वागणे वाटते. अमेरिकन सरकारच्या साऱ्या अधिकृत निवेदनांबद्दल प्रसारमाध्यमे संशय व्यक्त करतात; उलट, अफगाणिस्तान टेलिव्हिजनवर जे सांगितले जाईल, ते सारे प्रथमदर्शनी तरी, सत्य असल्याचे गृहीत धरतात.
 तालिबानने अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला. अमेरिकन वायुसेनेने हे हेलिकॉप्टर अपघाताने ग्रस्त झाले आणि पाकिस्तानातील एका विमानतळावर कोसळले असे सांगितले. लगेच, तालिबानने कंदाहारजवळ पडलेल्या हेलिकॉप्टरच्या अवशेषांचे फोटो प्रसिद्ध केले. हेरात शहरातील शंभर खाटांच्या इस्पितळावर अमेरिकी बॉम्ब पडल्याचे वृत्त अमेरिकेने नाकारले, पण खुद्द संयुक्त राष्ट्रसंघानेच ते सत्य असल्याचा निर्वाळा दिला. अमेरिकन नागरिकांचाच त्यांच्या सरकारच्या सुरक्षा कार्यक्षमतेवर विश्वास उरला नाही आणि त्यांच्या सरकारच्या विश्वासार्हतेलाही तडा गेला आहे.
 ६. कोणत्याही पारंपरिक लष्करशहाप्रमाणे, अमेरिकन सेनापती झालेल्या हानीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कसोशीने प्रयत्न करतात
 जागतिक व्यापार केंद्रावर हल्ला झाला, विमानतळावर बंदोबस्त कडेकोट झाला. सर्व महत्त्वाच्या इमारतींभोवती असा पहारा बसवण्यात आला, की कोणते प्रवासी विमान त्यांवर आदळण्याकरिता जात आहे असे दिसले तर ते विमान, प्रवाशांच्या प्राणांची पर्वा न करता, पाडून टाकण्याची व्यवस्था झाली. ॲन्थ्रेक्स जंतूंची पाकिटे येऊ लागल्यानंतर, रोगराईचा फैलाव होऊ नये यासाठी जंगजंग तयारी चालू आहे. आम्ही शक्यतो सारे प्रयत्न करीत आहोत असे अमेरिकन सरकार छाती फुगवून सांगत असले तरी अमेरिकन नागरिकांना चिंता पडली आहे ती, विमाने आदळणे किंवा जंतुग्रस्त पाकिटे यानंतर आता कोणती नवीन अजब क्लृप्ती ओसामा बिन लादेन काढेल, याची.
 बायबलच्या कथांतील डेव्हिड आणि गोलायत यांच्या संघर्षाप्रमाणेच ओसामा बिन लादेन आणि अमेरिका यांची लढाई पराकोटीची विषम आहे आणि तरीदेखील, पहिल्या पाच आठवड्यांनंतर सरशी झाली आहे ती ओसामाची, हे नि:संशय.
 हिवाळा जवळ येत आहे. रमझानचा उपवासाचा महिनाही जवळ येत आहे. अमेरिकेची चढाई काही काळातच थांबवावी लागणार आहे किंवा थंडावणार आहे. याउलट, ओसामाच्या कारवाया बिनदिक्कत चालू राहणार आहेत. या युद्धात आघाड्या नाहीत, सरहद्दी नाहीत. या जागतिक यादवी युद्धात बंडखोरांची बाजू वरचढ ठरली आहे. आणखी महिन्या-दोन महिन्यांत युद्ध आटोपते घेण्याची मजबुरी झाली तर त्या मध्यंतरात अमेरिकेच्या हाती काही फारसे आले असेल असे दिसत नाही.

दि. ४/११/२००१
■ ■