अन्वयार्थ – २/शालेय शिक्षणातही हॅन्सी क्रोनिए

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


शालेय शिक्षणातही हॅन्सी क्रोनिए


 शिकवणीमहर्षि मच्छिंद्र चाटे आणि शिक्षण राज्यमंत्री अनिल देशमुख यांच्यात काय खडाखडी झाली यासंबंधी स्तंभ भरभरून बातम्या आल्या. मी त्यांवर एक नजर टाकण्यापलीकडे लक्ष दिले नाही. कुत्रं माणसाला चावलं तर त्यात काही नवलाई नाही; त्यामुळे त्याचे बातमीमूल्य फारसे नाही. या उलट, कोणी माणूस कुत्र्याला चावला तर ती अजब गोष्ट आहे. म्हणून पत्रकार त्याविषयी विस्ताराने बातम्या छापतात आणि चावा घेणे या विषयातले आपण तज्ज्ञ आहोत अशा आत्मविश्वासाने त्या विषयी अग्रलेखही लिहितात.
 अलिकडे कुत्री माणसाला चावतात त्यापेक्षा माणसे कुत्र्याला चावण्याचे प्रकार जास्त. वर्तमानपत्र उघडले, की कुत्रा माणसाला चावला अशी बातमी कोठे दिसली तर ती मी वाचतो, माणूस कुत्र्याला चावल्याच्या बातम्यांवरील फक्त मथळे पाहतो.
 शिकवणीमहर्षि राज्यमंत्र्यांना भेटायला मंत्रालयात गेले. काही वादावादी झाली. लवकरच खडाजंगीला सुरुवात झाली. शिक्षणमंत्र्यांनी भेटायला आलेल्या पाहुण्याना बाजूच्या खोलीत कोंडून ठेवले; पुरा अर्धापाऊण तास. वादाचा विषय शिक्षणशास्त्राशी संबंधित नव्हता. नुकत्याच लागलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात साऱ्या राज्यात सर्वोच्च गुण मिळवून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याच्या सत्काराच्या कार्यक्रमात विरोधी पक्षातील अग्रणी गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांना सन्मानाने बोलावण्यात आले; शिक्षण खात्याचा राज्यमंत्री असूनही आपणास बोलाविले नाही याबद्दल मंत्रिमहाशयांची नाराजी होती.
 प्रकरण वाढले. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत खटले दाखल केले. खुद्द राज्यमंत्र्यांना अटक करण्याची पोलिसखात्याची तयारी चालली आहे असे काही वर्तमानपत्रांत छापून आले आहे.
 मराठीतील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव होते दर्पण. वर्तमानपत्राचे काम आरशाप्रमाणे तटस्थपणे प्रतिबिंब दाखविण्याचे आहे. कुरूपाला सुरूप कर, लठ्ठ माणसाचे सडपातळ प्रतिबिंब दाखव किंवा विरुद्ध पक्षाच्या रुबाबदार माणसालाही कुरूप बनव असले उद्योग सच्च्या पत्रकाराने करायचे नसतात. प्रत्यक्षात आता, सरळ प्रामाणिक प्रतिबिंब दाखविणारे वर्तमानपत्र अपवादानेच सापडेल. जत्रेत एखादा तंबू हरहमेश लागतो. आतून प्रचंड हास्याचे कल्लोळ जत्रेच्या गलबलाटातही ऐकू येत असतात. लोक गर्दी करून तिकीट काढतात आणि आत जातात. आत ओळीने तऱ्हेतऱ्हेचे विकृत आरसे लावलेले असतात. कोणा आरशापुढे उभे राहिले तर रबर ताणून लांबविल्यासारखा माणूस दिसतो; दुसऱ्या एखाद्या आरशासमोर हवा भरून फुगविल्यासारखा दिसतो. आपलेच हे अदृष्टपूर्व विभूतिदर्शन पाहून साऱ्या कुचेष्टेचे विषय झालेली माणसेच खदखदा हसत असतात. आद्य दर्पणाचे वारसदार जत्रेच्या तंबूतील या आरशांप्रमाणे जगाचे प्रतिबिंब दाखवतात.
 गेल्या दोनतीन महिन्यांत शेतकरी संघटना, शरद जोशी आणि देशातील यच्चयावत् राजकीय पक्ष यांच्यातील संबंध याबद्दल इतके काही लिहून आले आहे आणि ते इतके परस्परांना छेद देणारे आहे, की पत्रकारितेबद्दल कीव किंवा घृणा तयार व्हावी.
 चाटे-देशमुख संघर्षातील सत्य काय? कोर्टापुढील प्रकरणांचा निकाल होईपर्यन्त थांबावे लागेल. 'अ'ला शिक्षा झाली काय किंवा तो निर्दोष सुटला काय, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्यात कुणालाही यत्किंचितही स्वारस्य राहणार नाही. या वादाच्या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली आहे, त्या चर्चेचा मात्र दूरगामी परिणाम संभवतो.
 शालांत परीक्षांचे निकाल लागले, की हल्ली शिकवणीच्या वर्गांच्या मोठमोठ्या जाहिराती झळकतात. गुणवत्तायादीत आलेल्या शंभर विद्यार्थ्यांपैकी पंचवीसतीस आपल्या शिकवणीवर्गाचे होते असा फोटोसहित दावा करणाऱ्या जाहिराती निदान दहावीस शिकवणीवर्गांचे चालक करतात. गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांच्या मुख्य विद्यालयांविषयी दूरदर्शनवर वृत्तांत येतात; वर्तमानपत्रांतही फोटो झळकतात. गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय शिकवणीमहर्षि जाहीररीत्या दवंडी पिटून घेतात, त्याचा इन्कार किंवा विरोध कोणीच करीत नाही. शिकवणीवर्ग फोफावतात. काही वर्षांपूर्वी शहरोशहरी एखादा कष्टाळू शिक्षक फावल्या वेळात शिकवणीचा वर्ग चालवे, विद्यार्थ्यांकडून कसून मेहनत करून घेई. त्यांचे निकालही चांगले लागत, शिक्षकांना कमाईही घवघवीत होत असे. आताचे शिकवणीचे वर्ग असे 'हातभट्टी' स्वरूपाचे नाहीत. प्रचंड आधुनिक दारूच्या कारखान्यांप्रमाणे ते सर्वदूर पसरले आहेत. काही शिकवणीवर्गांचे कार्यक्षेत्र विद्यापीठांपेक्षाही काही अंशी अधिक विस्तृत आणि व्यापक आहे. अशा शिकवणीच्या वर्गांची वार्षिक फी दरडोई पन्नास हजार रुपयांवर असते. काही वर्गांत प्रश्नपत्रिका फोडून आधी पुरविण्याचा मोबदला फीतच धरला जातो, काही ठिकाणी त्याची रक्कम वेगळी द्यावी लागते असेही ऐकायला मिळते.
 क्रिकेटचे खेळाडू हा लोकांच्या कौतुकाचा विषय आहे. आधुनिक काळात तपस्या, व्यासंग, धैर्य यांचे आदर्श राहिले नाहीत. त्यांची जागा क्रिकेटपटूंनी घेतली आहे. आमच्या लहानपणी क्रिकेट हे काही चरितार्थाचे साधन नव्हते. सारखा क्रिकेट खेळशील तर काय भीक मागून पोट भरशील? असे घरोघरी आया कोकलत असत. आता क्रिकेट हा गडगंज पैसे मिळविण्याचा मार्ग झाला आहे. खेळसामानाचे कारखानदारच फक्त नव्हे तर, टूथपेस्ट आणि शक्तिवर्धकांचे कारखानदारही लक्षावधीने रुपये खेळाडूंना देऊ करतात. हे बरीच वर्षे सर्वांना माहीत आहे. पण, मैदानावर सामने कसोशीने चालतात; कोणती बाजू जयपराजयाच्या लाटांवर वरखाली होईल तसतसे कोट्यवधी लोकांच्या जिवाची घालमेल होत असते; आपल्या देशाचा संघ जिंकला म्हणजे लोक हर्षोन्मादाने नाचतात आणि हरला म्हणजे ओक्साबोक्शी रडतात असा हा गंभीर आणि पवित्र विषय आहे.
 यात खेळाडूच सट्टेबाजी करीत असतील आणि पैसे घेऊन मॅच हरत असतील अशी शंकाही कधी कोणाच्या मनाला शिवली नव्हती. एका दिवसात हा आदर्शाचा डोलारा कोसळला आणि या भ्रष्टाचारात हात नसलेला कोणी क्रिकेट हीरो असेल असा लोकांचा विश्वास आता दुरापास्त झाला आहे.
 चाटे प्रकरणामुळे पवित्रतेचे आणखी एक मंदिर ढासळू लागले आहे.
 मॅट्रिकची परीक्षा विद्यापीठ घेत असे तेव्हापासून आणि शालांत परीक्षांची ही मंडळे सुरू झाल्यानंतरही बराच काळ परीक्षेचा निकाल सहा जून रोजी म्हणजे सहा जून रोजीच लागत असे; त्या दिवसाचेच पावित्र्य मानले जात होते. पहिल्या दहा विद्यार्थ्यांची नावे जाहीर होत, त्या यादीत आपले नाव झळकावे ही साऱ्या मेधावी विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा नव्हे, स्वप्न असे. भारताचे माजी वित्तमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी त्या काळी एकूण ७०० पैकी ६०० वर गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला होता. त्यानंतर हा उच्चांक मोडणे जवळजवळ अशक्य मानले जात असे. मॅट्रिकला पहिला येणारा विद्यार्थी असणे आणि जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती मिळविणे म्हणजे पुरुषार्थाची पराकाष्ठा मानली जाई.
 हळूहळू या निकालात पॅटर्न येऊ लागले. एकेका विद्यालयाचे किंवा जिल्ह्याचे दहादहा, वीसवीस विद्यार्थी गुणवत्तायादीत झळकू लागले. शिकवण्यांचे बहुतेक सारे वर्ग तर सारे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आपल्याच क्लासचे विद्यार्थी असल्याचा दावा मांडू लागले. लोकांच्या मनांत शंका येऊ लागली आहे. पहिला आलेला विद्यार्थी आणि त्याचे पालक यांनी शिकवणीवर्गाला श्रेय द्यावे यासाठी काही हजारांलाखांची देवघेव होत असेल, तर शिकवणीवर्गातीलच विद्यार्थी पहिलादुसरा यावा याकरिता अशीच देवघेव होत नसेल कशावरून?
 शालान्त परीक्षेनंतर व्यावसायिक शिक्षणाच्या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी आठदहा लाख रुपये द्यावे लागतात, त्यापेक्षा लाख दोन लाख रुपये देऊन मुळातच परीक्षेतील गुण वाढवून घेतले तर सौदा अधिक स्वस्त पडतो!
 विषय गंभीर आहे. आरोप उथळपणे करणे योग्य नाही. गेली काही वर्षे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी मी पाहिले आहेत. त्यांच्या यशाचे रहस्य त्यांची बुद्धी आणि कष्ट यांपेक्षा त्यांच्या पालकांच्या जवळील काळ्या पैशात आहे असे मला बऱ्याच वेळा वाटे. कोणी तक्रार नोंदविली नसेल; पण अमक्या अमक्या डॉक्टरने पैसे भरून आपला मुलगा पहिला आणवला अशी चर्चा, खालच्या आवाजात का होईना, सर्वदूर चालू आहे. क्रिकेटच्या सामन्यांचे निर्णय फिरविण्याकरिता कोटींची देवघेव होत असेल तर शालान्त परीक्षांचे निकाल फिरविण्याकरिता लाखांची देवघेव होत नसेल तरच ते अद्भुत म्हणावे लागेल!
 चाटे-देशमुख वादंगातून आणखी एक मुद्दा चर्चेला येत आहे. चाटेविरोधी गटाची माणसे हे सारे शिकवणीचे वर्ग बंदच करून टाकावे आणि शिक्षणक्षेत्रातील या 'हातभट्ट्या' संपवून टाकाव्या असे मांडू लागले आहेत.
 तसे पाहिले तर शिकवण्यांचे वर्ग हा सगळा खासगी मामला आहे. कागदोपत्री पाहिले तर शालान्त परीक्षांचे उमेदवार कोण्या सरकारी मान्यताप्राप्त विद्यालयाचे विद्यार्थी असतात. परीक्षेस बसण्यासाठी ते फॉर्म भरतात ते त्यांच्या विद्यालयांमार्फत; पण ही विद्यालये अभ्यासाची केंद्रे नाहीत. तेथे प्रवेशाचा धांगडधिंगाच गणपती येईपर्यन्त चालतो. मग गणपती, नवरात्र, दांडिया हे धुडगूस संपता संपता सहामाही परीक्षा आणि दिवाळी येऊन ठेपते. जे काही थोडे दिवस विद्यालये भरतात, त्यात निवडणुका आदी कार्यक्रम होतात. सरकारी मान्यताप्राप्त अधिकृत विद्यालये म्हणजे नेतागिरी, नाटके, संमेलने, वनभोजने, सहली यांचे नियोजन करणारी यंत्रणा आणि हीरो वा हीरॉईन म्हणून मिरविण्याच्या जागा झाल्या आहेत. या असल्या कार्यक्रमासाठी विद्यालये काढली जातात. सरकारी मान्यता राज्यकर्त्या पक्षाच्या पुठ्यातील मंडळींनाच मिळते. शिक्षकांचे पगार सरकारने ठरविलेले. भरभक्कम पगार देण्यासाठी सरकारी अनुदाने. शिक्षणक्षेत्र राजकीय वशिलेबाजीने मक्तेदारीचा फायदा लुटणाऱ्यांनी बजबजले आहे.
 मग अभ्यास होतो कोठे? अभ्यासाच्या निमित्ताने विद्यार्थी शिकवणीच्या वर्गांत जातात. विद्यालयांत वर्ग बुडविणारी टवाळ पोरेही शिकवणीचा वर्ग कधी चुकवीत नाहीत.
 अशा परिस्थितीत शिकवण्यांचे वर्ग बंद केल्याने काय साधणार आहे? प्राप्त परिस्थितीत शिकवण्यांच्या वर्गांनाच परीक्षांसाठी फॉर्म भरण्याची परवानगी देणे अधिक तर्कसंगत होईल. त्यासाठी, मान्यताप्राप्त विद्यालये बंद करण्याची आवश्यकता नाही. त्यांना शिकवणीच्या वर्गांबरोबर स्पर्धेत उतरण्यास भाग पाडले पाहिजे. विद्यालयात जायचे का शिकवणीच्या वर्गात हा विकल्प विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर खुला राहावा. सरकारने अनुदान विद्यालयांना देऊ नये आणि शिकवणीवर्गांनाही देऊ नये. विद्यार्थी ज्या प्रमाणात प्रवेश घेतील त्यातून जमेल त्याप्रमाणे शिक्षकांच्या वेतनश्रेणी ठरविण्यात याव्यात. परंपरागत अर्थाने शिक्षणाची पातळी उंचावेल किंवा नाही हे सांगणे कठीण आहे; पण निदान भ्रष्टाचार आणि खोटेपणा यांचा शिक्षणक्षेत्रातील पगडातरी कमी होईल.

दि. १३/६/२०००
■ ■