Jump to content

अन्वयार्थ – २/आणीबाणी : एक विफल कारावास

विकिस्रोत कडून



आणीबाणी : एक विफल कारावास


 २५ जून २०००, इंदिराबाईंनी देशावर लादलेल्या आणीबाणीचा पंचविसावा स्मरणदिन. काही पत्रकारांनी याला रौप्यमहोत्सवही म्हटले; पण रौप्यमहोत्सव सुखद घटनांचा असतो. आणीबाणीबद्दल कुणाचेही काही मत असो, रौप्यमहोत्सव म्हणून उत्साहाने साजरा करण्यासारखी ही घटना आहे असे म्हणणारा कोणीही सुपुत्र, अगदी इंदिरा काँग्रेस पक्षाच्या पठडीतही नाही.
 आणीबाणीच्या काळात आणि त्यासंबंधाने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि निभावणाऱ्या अनेकांनी त्यासंबंधीच्या आठवणी लिहिल्या आहेत. आणीबाणीचा हा साराच कालखंड देशाच्या इतिहासातील एक लज्जास्पद, काळा इतिहास आहे. मूलभूत हक्कांची पायमल्ली, दीडपावणेदोन लाख लोकांचा तुरुंगवास, लॉरेन्स् फर्नाडिस, स्नेहलता रेड्डी यांच्यासारख्यांचा तुरुंगात अनन्वित छळ, पोलिसांची अरेरावी, सक्तीची नसबंदी या असल्या घटनांमध्ये आपला काय सहभाग होता याची कबुली देणारा एकही मायेचा पूत पुढे आलेला नाही.
 आणीबाणीच्या कालखंडाचे खरे खलनायक आता कोणी हयात नाहीत. शेषनसाहेब लोकप्रियतेच्या झोतात आहेत. एन. के. सिंग हे आणीबाणीत तुरुंगवास सोसलेल्या पंतप्रधानांचे प्रमुख सचिव आहेत. त्यांपैकी कोणीच लोकांची क्षमा मागितलेली नाही.
 काँग्रेस आय् च्या परिवारातील बहुतेकांनी कानांवर हात ठेवून विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. आम्हाला काही कळलेच नाही हो! २५ जून रोजी सकाळी वर्तमानपत्रे आली नाहीत याचाच काय तो अचंबा वाटला; बी. बी. सी. वरून बातम्या येत त्यांवरून काहीतरी जगावेगळे चालले आहे अशी शंका वाटत होती; पण, इंदिराबाईंनी विरोधी पक्षांची कारस्थाने आणि त्यांना मिळणारे परकीय हस्तकांचे प्रोत्साहन यांसंबंधी इतक्या तारस्वरात आणि इतक्या वारंवार निक्षून ग्वाही दिली होती, की हा साऱ्या देशाच्या हितशत्रूचा प्रचार आहे असे वाटत होते... ही असली कोडगी आत्मसमर्थने दिली जात आहेत.
 इतिहासात असे घडते. आणीबाणी जाहीर झाली त्याच्या आधी महिनाभर मी पश्चिम जर्मनीत गेलो होतो. पश्चिम जर्मनीत गेले की हिटलरच्या अनुयायांच्या कवायती, विरोधकांना आणि ज्यूधर्मीयांना जेथे अनन्वित छळाला तोंड द्यावे लागले ते तुरुंग ही अजून कुतूहलाची पर्यटनस्थाने होती. बऱ्याचशा जर्मन लोकांशी मी बोललो. हिटलरच्या चढत्या काळात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी नेमके काय केले?" या प्रश्नावर बोलणे आले की सगळ्यांची तोंडे चिडीचूप बंद होत. हिटलर असे काही राक्षसी थैमान घालत आहे हे आमच्या कधी लक्षातच आले नाही. पण, घडले ते फार वाईट घडले आणि नवे जर्मन राष्ट्र हा सगळा इतिहास पुसून टाकून खरेखुरे लोकशाही राष्ट्र बनत आहे अशी मखलाशी सर्वत्र ऐकू येई.
 यशाचे पितृत्व सांगणारे अनेक उभे राहतात, अपयश नेहमीच पोरके असते अशी एक इंग्रजी म्हण आहे. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास काही वेगळा घडला असता. भयंकर संहाराची अस्त्रे दोस्त राष्ट्रांच्या हाती येण्याऐवजी हिटलर किंवा जपानी टोजो यांच्या हाती असती, दोस्तांचा पराभव झाला असता आणि सर्वत्र शुद्ध आर्य वंशाची हुकूमशाही झाली असती तर आज कानांवर हात ठेवणारे विश्वामित्र कदाचित् नव्या व्यवस्थेत मग्रुर अधिकारी म्हणून दिसले असते.
 भारतातील आणीबाणीची कथा त्याहून विचित्र आहे. आणीबाणीचा शेवट निवडणुकीने झाला. आणीबाणीच्या क्रूरकर्मा शिल्पकारांना लोकांनी धूळ चारली. पण, पर्यायी जनता पक्षांच्या नेत्यांचे विदूषकी चाळे पाहिल्यावर दीड वर्षात त्याच बदनाम क्रूरकर्त्यांना जनतेने निवडून दिले हे एक अद्भूतच आहे. १९८१ मध्ये लोकांनीच इंदिरा गांधींना आणि त्यांच्या पक्षाला निवडून दिले म्हणजे विजनवासाची दोन वर्षांची सजा देऊन माफी करून टाकली. अशाही परिस्थितीत संजय गांधींचे जिगरी दोस्त सोडल्यास अजूनही झाले ते योग्यच झाले; तशीही वेळ आली तर पुन्हाही आणीबाणी लादण्यास आम्ही कमी करणार नाही असे कोणी ताठ मानेने बोलत नाही. १९७७ सालच्या निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम चालू होती तेव्हा त्या वेळचे इंदिराभक्त, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे खजिनदार श्री. शरदचंद्ररावजी पवार सांगत होते, की आणीबाणी संपलेली नाही. निवडणुकांत लोकांच्या पसंतीचे शिक्कामोर्तब झाले, की पुन्हा एकदा वरवंटा फिरू लागणार आहे. येरवड्याच्या तुरुंगातून विरोधकांना बाहेर पाठविले आहे ते तुरुंगाची रंगसफेदी करण्याच्या सोयीसाठी. तेवढे काम उरकले, की सगळ्यांना पुन्हा तुरुंगात डांबण्यात येईल. त्या वेळी पक्षनिष्ठेची भाषा करणारे आता तोच पक्ष आणि त्याच्या नेत्या यांच्याविरुद्ध मर्दपणे बंड करण्यास ठाकल्याचा आव आणीत आहेत.
 आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य नागरिक आणि छोटे कार्यकर्ते दडपशाहीविरुद्ध बोलत होते, प्रचार करीत होते; पण नामवंत सर्व चुप्पी साधून होते. सरकारी महात्मा विनोबा भावे यांनी आणीबाणीला 'अनुशासनपर्व' असे प्रशस्तिपत्रही देऊन टाकले. महाराष्ट्रात दुर्गाबाई भागवत यांचा अपवाद वगळता दुसऱ्या कोणी ऐन आणीबाणीच्या काळात धैर्य दाखविल्याचे दिसत नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना वाचा फुटली; त्यांची रसवंती खुलली आणि आपण जन्मजात स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते व हुकूमशाहीचे कडवे विरोधक असल्याच्या गर्जना ऐकू येऊ लागल्या.
 आणीबाणीच्या कालखंडाचा आणि माझा फार किरकोळ संबंध आलाः पण तरीही माझ्या काही आठवणी लिहून ठेवतो. ते पुढेमागे कधीकाळी ऐतिहासिक अवलोकनास उपयोग व्हावा म्हणून.
 लाल बहादूर शास्त्रींचे ताश्कंद येथे निधन झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शपथविधीनंतर त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम माझ्या दिल्ली येथील कार्यालयात शास्त्रीजींच्या स्मरणार्थ काढलेल्या टपालतिकीटाच्या प्रकाशनानिमित्त झाला. मृत व्यक्तींविषयी अनादराने बोलू नये; पण इंदिराबाई माझ्या आदराचा विषय कधीच नव्हत्या. पैतृक वारशाने अंगावर आलेले प्रचंड जबाबदारीचे ओझे सावरण्याची आपली कुवत आहे किंवा नाही याबद्दल त्यांच्या मनात जबरदस्त शंका आणि त्यातून निघणारी असुरक्षिततेची भावना व त्यातून देशाला मोठा धोका संभवतो याची जाणीव त्यांच्या त्या वेळच्या भाषणातूनच झाली. त्यानंतर लगेचच मी फ्रान्स आणि स्वित्झर्लण्ड येथे गेलो. त्यानंततरच्या निवडणुकांत काँग्रेस पक्षाची झालेली पडझड, भ्रष्टाचाराची प्रकरणे, गुजराथ व बिहार येथील विद्यार्थ्यांची बेकारीविरोधी आंदोलने, रेल्वे कामगारांचा संप हा सगळा आणीबाणीचा पूर्वरंग घडला. त्या काळात मी देशोदेशी फिरून अविकसित देशांतील गरीबीचे कारण शोधीत होतो.
 १९७१ मध्ये बांगलादेशचा स्वातंत्रयसंग्राम आणि मुक्तता झाली. पहिल्यांदा बाईंच्या कर्तबगारीबद्दल अभिमान वाटला. खुद्द अटल बिहारीजींनीही त्या वेळी त्यांचे 'दुर्गादेवी' म्हणून कौतुक केले. परदेशांतील बहुराष्ट्रीय समाजात हिंदुस्थानातील लोक हे गबाळे, बुळे आणि याउलट, पाकिस्तानी म्हणजे शूर, कडवे व लढवय्ये अशी सर्वदूर कल्पना होती. इस्रायलने भोवतालच्या अरब फौजांची जशी दाणादाण केली तशीच पाकिस्तानी वायुसेना हिंदुस्थानची आठवड्याभरात करून टाकेल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. आमच्या कार्यालयातील, एरवी सज्जनपणे वागणारे पाकिस्तानी सहकारीही मिशीला तूप लावून फक्त पाकिस्तान रेडिओवरील 'खबरें' ऐकत होते. भारतीय सैन्याची आगेकूच चालू राहिली तसतसे वातावरण बदलत गेले. भारतीय फौजेविषयी आदराची भावना वाढत गेली. बांगलादेशातील पाकिस्तानी फौजांनी शरणागती स्वीकारली तेव्हा एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याने माझ्या कार्यालयीन कक्षात येऊन 'मी काही शरणागती दिली पाहिजे असे नाही' असे म्हणून तणाव सारा संपवून टाकला.
 लक्षावधी बांगलादेशी निर्वासित हिंदुस्थानात येत होते. त्यांच्या सचित्र बातम्या सर्व दृक्श्राव्य माध्यमांतून प्रसिद्ध होत होत्या. एक इंग्रज अधिकारी मला बोलून गेले, तुमच्या देशात हे सारे घडत असताना तुमच्यासारख्या माणसाला परदेशात ठेवणे तुमच्या सरकारला परवडते कसे? इंग्रजच तो! त्याच्या बोलण्यातला छुपा अर्थ स्पष्ट होता. अशा परिस्थितीत तुम्ही येथे आरामात जगू शकताच कसे?" मनात एक टोच राहिली.
 १९७४ मध्ये एक नवी कलाटणी मिळाली. सिक्कीम भारताच्या आधिपत्याखालील एक स्वायत्त संस्थान. १९७४ मध्ये इंदिराबाईंनी सिक्कीम भारतात सामील करून घेतले. सिक्कीम आणि भूतान यांना संयुक्त राष्ट्रसंघात स्वतंत्र मान्यता देण्याचा त्या वेळी विचार चालला होता. सिक्कीमचे सामीलीकरण म्हणजे बांगलादेश लढाईच्या विजयोन्मादात भारताने सुरू केलेला नवा साम्राज्यवाद आहे आणि त्यामागे वारंवार दुर्गादेवी अवतार धारण करून निवडणुका जिंकण्याची इच्छा आहे असे बहुराष्ट्रीय समाजात वाटत होते.
 पुढच्याच वर्षी आणीबाणी जाहीर झाली. विरोधी पक्षांच्या पुढाऱ्यांची धरपकड, देशभर पसरलेले भीतीचे वातावरण आणि वृत्तपत्रस्वातंत्र्याची गळचेपी यासंबंधी विस्तृत बातम्या युरोपमधील वर्तमानपत्रांत येत होत्या. त्यामुळे हुकुमशाहीविरुद्ध लढा करण्यासाठी स्वित्झर्लण्ड सोडून मी हिंदुस्थानात आलो असे म्हणणे धादांत खोटे असेल. माझ्या परत येण्याची कारणे राजकारणाशी नाही, अर्थकारणाशी जोडलेली आहेत; पण हेही इतकेच खरे की, आणीबाणी जाहीर झाली नसती तर स्वदेशी परतण्याचा निर्णय इतक्या सहजपणे मी घेतला नसता. पंडित नेहरूंच्या काळापासून साऱ्या संयुक्त राष्ट्रसंघात भारताची एक आब होती आणि भारतीयांची एक शान होती. सिक्कीम प्रकरण व आणीबाणी यांमुळे सारे चित्र पालटले आणि भारताची गणना हुकूमशाही राष्ट्रांच्या पंक्तीत होऊ लागली. भारतीय म्हणून ताठ मानेने जगणे इंदिराबाईंच्या आणीबाणीने अशक्य केले.
 १ मे १९७६ रोजी आणीबाणीच्या ऐन भरात मी सहकुटुंब मुंबई विमानतळावर उतरलो. टॅक्सी घेऊन दादर स्टेशनवर आलो. तोपर्यन्त, आणीबाणी म्हणजे काही वेगळे असल्याची पुसटशीही जाणीव झाली नाही. आता भारतात आगगाड्या वेळेवर धावतात अशी फुशारकी ऐकली होती; पण आमची पुण्याकडे जाणारी गाडी चांगली अर्धा तास उशिरा आली. अजूनही आणीबाणीची काही गाठभेट नाही. गाडीत चढल्यावर पहिल्या वर्गाच्या डब्यात मात्र वातावरण वेगळे असल्याचे जाणवले. गाडीचा उशीर या विषयावर मी काही शेरा मारताच शेजारच्या प्रवाशाने तोंडावर बोट ठेवून काही न बोलण्याचा इशारा केला. मुंबई-पुणे गाडी म्हणजे सर्व राजकीय घटनांवर तावातावाने वादविवाद करण्याचे हिंदुस्थानातील 'हाईड पार्क मैदान'च! त्या गाडीतील नीरव शांतता लोकांच्या मनांत आणीबाणी आणि पोलिसांची दडपशाही यांचा किती खोलवर धाक पोहोचला आहे याची जाणीव देत होती.
 कोणी काही बोलू लागले आणि त्याला पोलिसांनी येऊन अटक केली असे काही कुठे पुण्याला पोहोचल्यानंतरही पाहण्यात आले नाही; पण 'काही बोलले, कोणी ऐकले तर मध्यरात्री दरवाजावर थाप पडेल,' असे 'अ'च्या बाबतीत झाले; 'माझ्या माहितीतल्या 'ब'ची अशी प्रत्यक्ष हकिकत आहे, बिचाऱ्याची बायकापोरे उघडी पडली' अशा वदंता वारंवार ऐकू येत.
 जमीन घेऊन मी आंबेठाण येथे शेतीकामाला लागलो. पहिले बटाट्याचे पीक घेतले. बाजारात भाव नसल्यामुळे पिकाची अरण लावून ठेवण्याचे ठरले. त्यासाठी कडुनिंबाच्या डहाळ्या शोधत शेजारच्या गावी गेलो. लोक सैरावैरा धूम पळत होते. जो तो ज्याला त्याला 'गाडी आली आहे' एवढाच निरोप देत होता. गाडी म्हणजे नसबंदीवाल्यांची गाडी. या गाडीने इतका पराक्रम गाजवला की, घोडे पाणी पीत नसेल तर 'पाण्यात संताजीधनाजीप्रमाणे नसबंदीवाले दिसतात की काय?' असे विचारण्याची लोकांवर वेळ आली. एक दिवस दिल्लीच्या गलीच्छवस्ती निर्मूलनाची बातमी छापून आली. गावातल्याच एका माणसाशी मी बोललो. तो पटकन् म्हणाला, म्हणजे ही जुनी राजेशाहीच परत आली म्हणायची?
 आणीबाणी संपली. जनता पक्षाच्या स्थानिक उमेदवाराकरिता मी भरपूर धावपळ केली. पण सर्वत्र वातावरण अजून काँग्रेसचेच होते. निकाल लागला, आमचा उमेदवार पडला. साऱ्या देशभर असेच झाले असणार अशा कल्पनेने उदासवाणेपणाने घरी परतलो. रेडिओवरच्या बातम्यांचा कल तर अगदीच वेगळा होता. त्या रात्री शेवटी इंदिराबाईंचा पराभव झाल्याची बातमी ऐकली आणि जनसामर्थ्याच्या या विराट विश्वरूपदर्शनाने, इतके रोमांच अनुभवले, की पहाटेपर्यन्त डोळ्याला डोळा लागला नाही.
 जनता पक्षाचे सरकार आले. आनंदीआनंद जाहला. पण काही महिन्यांतच कांद्याच्या निर्यातीवर बंदी आली. चाकणचे कांदा आंदोलन सुरू झाले. जनता पक्षाचे सरकार आल्याबरोबर शेतकरी आंदोलन उठले तेव्हा, हा शरद जोशी हा कोणी काँग्रेसी हस्तक असावा असा होरा दिग्गज पत्रकारांनी मोठ्या विश्वासपूर्वक मांडला. पुढे इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. आंदोलनाने उग्र स्वरूप घेतले. आपला होरा चुकल्याचा कबुलीजबाब देण्याची प्रथा भारतीय पत्रकारितेत नाही. सत्याग्रहात अटक झाली. लोकांचा संपर्क येऊ नये म्हणून आम्हा पाचदहाजणांना औरंगाबादजवळच्या हर्सल तुरुंगात नेऊन ठेवले. तुरुंग कसला? इतिहासकालीन घोड्यांच्या पागा आता तुरुंगातील बराकी म्हणून वापरात येत होत्या. भिंतींवर ढेकणांची जत्रा. संडास जुन्या औरंगजेबाच्या काळातील; बसल्यावर खालची टोपली फूटदीडफूट अंतरावर. सारा गलीच्छ प्रकार. जमेची बाजू एवढीच, की बराक मोकळी. ज्याला पाहिजे तेथे त्याने आपली पथारी मांडावी. जेल सुपरिटेंडेंट सांगत होता, संडासाबद्दल तक्रार करू नका. माझ्या घरी असाच संडास आहे. त्यामुळे बायको माहेरी निघून जाण्याची भाषा सतत बोलत असते. आता काहीच नाही, आणीबाणीच्या काळात तुम्ही पाहायला पाहिजे होते. इतके स्थानबद्ध की एकमेकांना चिकटून झोपायला लागे आणि तरीही संडासच्या पार दरवाजापर्यन्त पथाऱ्या पसरलेल्या रहात. माणसे इतकी, की सकाळी तासाभरात संडास भरून जायचा.
 माझ्या अंगावर शहारे आले. हिंदुस्थानभर पावणेदोन लाख लोक बाईने असे गुरांसारखे कोंडून ठेवले; पण त्याची आता कुणाला चीड राहिली नाही, संताप राहिला नाही; सारे कसे शांत शांत! आणीबाणीच्या अठरा महिन्यांत ही सारी अमानुषता सोसणाऱ्यांची सारी तपश्चर्या फुकट गेली.
 शेतकरी संघटनेच्या झेंड्याभोवती जमा झालेल्या पाईकांत त्या वेळच्या सामाजिक, आर्थिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते होते. छात्रयुवा संघर्ष वाहिनी आणि राष्ट्र सेवा दल यांतील कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात भाग घेत होते. अमर हबीब, सुधाकर जाधव, दशरथ सावंत, भीम बडदे, चंद्रकांत वानखेडे हे शेतकरी संघटनेचे बिनीचे कार्यकर्ते आणीबाणीच्या संपूर्ण काळात तुरुंगात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा ज्ञानप्रबोधिनी यांची पार्श्वभूमी असलेले विनय हर्डीकर,राम डिंबळे अशा कार्यकर्त्यांनीही आणीबाणीच्या काळात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम केले.
 आणीबाणीचा कालखंड संपला. इंदिरा गांधी गेल्या, परत आल्या, परत गेल्या. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले नेते आज शासनात अधिकारपदी आहेत. देशातील आजची परिस्थिती ही अनेक बाबतींत आणीबाणीपूर्व परिस्थितीसारखीच आहे. सरकारला बहुमताची खात्री नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बिहार, गुजराथ यांसारख्या राज्यांत बेबंद अंदाधुंदीच माजली आहे. एक कारगील आटोपले, पण आणखी दोनतीन 'कारगिल' प्रकरणांना लवकरच तोंड द्यावे लागेल असे दिसते आहे. अतिरेक्यांकडून घातपात, बॉम्बस्फोट, खून सर्रास घडत आहेत.
 इंदिरा गांधींनी 'मिसा' लावला तो बेबंदशाहीच्या परिस्थितीत, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्याविरुद्ध गेला म्हणून. आजही केंद्र शासन नवीन घातपातविरोधी कायदा संसदेपुढे आणीत आहे. हा कायदा 'मिसा'ची वाढवून बिघडविलेली आवृत्ती आहे. यात कोणालाही केवळ संशयावरून पकडण्याची तरतूद आहे, जामिनाचा हक्क काढून घेतला आहे आणि न्यायालयाकडे धाव घेण्यावरही निर्बन्ध असणार आहेत. इंदिरा गांधींनी 'मिसा'चा गैरवापर केला तसा आम्ही करणार नाही अशी सध्याच्या राज्यकार्त्यांनी कितीही ग्वाही दिली तरी ती निरर्थक आहे. सुलतानी कायदे तयार झाले, की त्यांचा वापर जितका अमानुष होणे शक्य आहे तितका होतोच. पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या विरुद्ध केलेल्या तरतुदींचा जाच सामान्य लोकांना किती भयंकर झाला हे अगदी अलीकडचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. शासनातील कोणा प्रमुख नेत्यास बाबरी मस्जिद प्रकरणी कारावासाची शिक्षा झाली तर दुसऱ्या आणीबाणीची घोषणा होण्यासाठी सारी काही तयारी सज्ज आहे.

दि. ७/६/२०००
■ ■