अन्वयार्थ – २/तिसरे महायुद्ध - जागतिक यादवी
बारा आणि तेरा ऑक्टोबर रोजी युरोप खंडातील जवळजवळ सर्व प्रमुख देशांत अमेरिकाविरोधी प्रचंड निदर्शने झाली. अमेरिकेने आतंकवाद्यांचा म्होरक्या
ओसामा बिन लादेन यास 'जिवंत किंवा मृत' पकडण्यासाठी अफगाणिस्तानवर प्रचंड बाँबहल्ले चालू केले, त्या हल्ल्यांचा विरोध करण्यासाठी इंग्लंड, जर्मनी व फ्रान्समधील लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरावेत याचा अर्थ स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय आतंकवाद्यांना विशेष निष्ठा अशी कोणतीच नसते. अनेक तस्करीचे उद्योग करताना ते कोणतातरी जनाधार शोधतात आणि माफिया टोळ्यांचे दादा एकमेकांत सहकार्य करतात, त्याचप्रमाणे अगदी भिन्नभिन्न विचारसरणीचे आतंकवादीही, प्रसंगोपात्, हातमिळवणी करू शकतात. गेली दोन वर्षे जगातील खुल्या व्यापारास विरोध करण्यासाठी निदर्शनांचे आणि प्रदर्शनांचे तसेच घातपाताचे ज्यांनी सिएटलपासून जिनोआपर्यंत थैमान घातले ती पर्यावरणावादी, डावी आणि संरक्षणवादी मंडळी आता उघडपणे ओसामा बिन लादेनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहेत.
अफगाणिस्तानातील युद्ध कित्येक वर्षे चालेल असे स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच म्हणतात. तसे खरेच घडले आणि ओसामा बिन लादेन व त्याची टोळी महिन्या दोन महिन्यांत हातात आली नाही आणि युद्ध लांबत चालले तर जगात काय चित्र उभे राहील ते हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
अमेरिकन विमानदलाने अफगाणिस्तानच्या आकाशाचा पूर्ण ताबा घेतला आहे. बाँबवर्षावात सातआठशे पठाण मारले गेले, संयुक्त राष्ट्रसंघाचे चार अधिकारीही ठार झाले; पण अद्याप, अमेरिकन लष्कराचा कोणीही सैनिक पिशवीतून मायदेशी परतला नाही. व्हिएटनामचे युद्ध आणि अफगाणिस्तानातील युद्ध यातील हा मोठा फरक आहे. अमेरिकन बाँबर विमानांनी सारा व्हिएटनाम उभा होरपळून
काढला; पण त्याबरोबरच त्यांचे पायदळ सैन्यही लाखांच्या संख्येने तेथे उतरले हाते. व्हिएटनामच्या 'गनिमी' काव्यापुढे अमेरिकेच्या 'औरंगजेबी' लष्करी दलाचे फारसे काही चालेना. अमेरिकन सैनिक हजारोंच्या संख्येने मरू लागले, त्यांचे मृतदेह पिशवीत भरून मायदेशी पोहोचू लागले तेव्हा अमेरिकन लष्कराला स्वयंसेवक मिळेनासे झाले. व्हिएटनाम युद्धाविरुद्ध खुद्द अमेरिकेत प्रचंड निदर्शने होऊ लागली व युद्ध, काय वाटेल ती किंमत पडली तरी, चालविण्याची जॉन केनेडी यांची निर्धाराची भूमिका त्यांच्या वारसदारांना निभावणे अशक्य झाले आणि अमेरिका व्हिएटनाममधून पाय काढून घेण्याच्या सन्माननीय पर्यायांचा शोध करू लागली. तसा पाय काढता घेण्याची संधीही व्हिएटनामी नेत्यांनी मिळू दिली नाही. लढाईत सपशेल पराभव पत्करून अमेरिकेस पाय काढून घ्यावा लागला.
अमेरिकन लोकांवर त्यांच्या भूमीवर आधुनिक युद्ध पाहण्याचा कधी प्रसंग आला नाही. एकविसाव्या शतकातील पहिल्याच लढाईची सुरुवात जागतिक व्यापार केंद्राचे मनोरे कोसळवून आणि खुद्द अमेरिकन लष्कराचे प्रमुख केंद्र उद्ध्वस्त होऊन झाली. अमेरिकन नागरिक या हल्ल्याने चांगलेच हादरले आहेत. अफगाणिस्तान युद्धात मारले गेलेले अमेरिकन जवानांचे मृतदेह मोठ्या संख्येने विमाने भरभरून मायदेशी येऊ लागले तर व्हिएटनाममधून काढता पाय घेणारी अमेरिका ओसामा बिन लादेनसारख्या डोंगरी उंदराच्या शोधात प्राणपणाने लढाई चालवील ही शक्यता फार कमी आहे.
लढाईच्या आघाडीवरून मृतदेह परतू लागलेले नाहीत, परंतु अँथ्रक्स् रोगाच्या जंतूंच्या प्रसाराने अमेरिकन मनोधैर्य खचविण्याचे काम सुरू केले आहे. पहिल्यांदा खासगी कंपन्यांची कार्यालये, मग काही पत्रकार आणि, शेवटच्या बातमीप्रमाणे, अमेरिकन सीनेटच्या कार्यालयातही अँथ्रक्सच्या जंतूंची दूषित पाकिटे पोहोचू लागल्याने अमेरिकेची सारी महासत्ता, कानात मुंगी शिरलेल्या मातबर हत्तीप्रमाणे, सैरभैर झाली आहे.
युरोपीय देशांतील अर्थकारणास पर्यावरणवादी आणि जागतिक व्यापार संस्थाविरोधी घटकांचा मोठा आधार आहे. जागतिक व्यापार संस्थाविरोधी आतंकवाद्यांनी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेधाचे आंदोलन चालविले तर युरोपीय सरकारे त्यांच्यापुढे लवकरच हात टेकल्याखेरीज राहाणार नाहीत. हे असे चित्र येत्या काही महिन्यांतच उभे राहिले तर तिसरे जागतिक युद्ध महासत्तांमधील लठ्ठालठ्ठी न होता सर्वदूर आणि इतःस्ततः पसरलेले यादवी युद्ध
म्हणून समोर येईल.
इतिहासाची पूर्ण पुनरावृत्ती कधीच होत नाही; पण, दुसऱ्या महायुद्धापूर्वीची १९३७-३८ सालातील आणि आजची परिस्थिती यांत विलक्षण साधर्म्य आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला, स्पॅनिश यादवी युद्धापासून पंडित नेहरूंनी लोकसत्ताक राष्ट्रांचा पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली. हिंदुस्थानवर ब्रिटिश साम्राज्याची सत्ता असल्याने अशी भूमिका घेणे सोयीचेही होते. पहिल्या महायुद्धाच्या अनुभवानंतर दोस्त राष्ट्रे हरणे अशक्य आहे; विशेषतः, अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी ताकदीपुढे कोणीही टिकू शकणार नाही अशी सर्वसाधारण भावना होती. 'ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी लोकशाहीच्या फार बाता मारू नयेत; त्याआधी वसाहतींचा स्वातंत्र्याचा हक्क मान्य करावा,' अशी लटपटपंची काँग्रेस नेत्यांनी चालविली होती.
जपानने पर्ल हर्बरवर हल्ला केला आणि फॅसिस्ट फळी मजबूत केली. कमालीच्या जलदीने जपानने सारा आशिया पादाक्रांत केला. ब्रह्मदेशावर हल्ले चालू झाले आणि हिंदुस्थानच्या दरवाजावर त्यांची थाप ऐकू येऊ लागली. कोलकत्ता व मद्रास येथे बाँबहल्ले झाले तेव्हा ब्रिटिश साम्राज्य हिंदुस्थानचे संरक्षण करू शकेल किंवा नाही याची खात्री वाटेना. ज्या साम्राज्यशाही सत्तेविरुद्ध काँग्रेसने लढा चालविला होता तीच सत्ता जपानी आक्रमण आणि क्रौर्य यांचा बागूलबुवा दाखवून जपानविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानी जनतेचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत होती.
थोडक्यात, ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर काँग्रेसचे अधिवेशन भरले त्या वेळी देशापुढे जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती पुन्हा एकदा देशातील गोरगरीब आणि कष्टकरी यांच्या प्रागतिक चळवळीपुढे येत्या महिन्या- दोन महिन्यांत उभी ठाकणार आहे. एका बाजूला मुस्लिम मूलतत्त्ववादी आणि संरक्षणावादी अतिरेकी यांची फळी, तर दुसऱ्या बाजूला साऱ्या जगाची अर्थव्यवस्था एकसूत्री करू पाहणाऱ्या लोकशाही राष्ट्रांची आघाडी.
केंद्रात भारतीय जनता पार्टीचे शासन असल्याने आणि अमेरिकन चढाईचा पहिला रोख, प्रत्यक्षात तरी, मुसलमानविरोधी असल्याने आजतरी हिंदुस्थानची औपचारिक सहानुभूती दोस्त राष्ट्रांना आहे. युद्धाच्या आघाडीवरील परिस्थिती बदलत जाईल तसे हिंदुस्थानातही सारे डावे, पर्यावरणवादी, स्वदेशीवाले, गांधीवादी अधिकाधिक आक्रमकपणे राष्ट्रवादी भूमिका घेऊ लागतील आणि कोणत्याही पक्षाचे शासन असे ना, त्यांना या तथाकथित 'राष्ट्रवादी' आंदोलनाशी
तडजोड करावी लागेल.
शासनव्यवस्थेचा हस्तक्षेप संपवून मुक्त अर्थव्यवस्था आज येईल, उद्या येईल म्हणून वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या कष्टकऱ्यांच्या चळवळीला राष्ट्रवादी पुन्हा एकदा बगल देण्याचा प्रयत्न करतील. शेतकरी, कामगार, दलित आणि महिला यांची आंदोलने अशा परिस्थितीत जो काही कार्यक्रम ठरवतील त्यामुळे ऐतिहासिक उलथापालथ होईल हे नक्की.
दि. २०/१०/२००१
■ ■