अन्वयार्थ – २/अवेळी 'एप्रिल फूल'ची मस्करी

विकिस्रोत कडून


अवेळी 'एप्रिलफूल'ची मस्करी


 भारतीय संस्कृतीत सभ्य समाजाला आपल्या मनात साचलेले गरळ ओकण्यासाठी शिमग्याच्या दिवशी मुभा असते. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य परंपरेत १ एप्रिल रोजी एकमेकांना मूर्ख बनविण्याचा महोत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी कोणी काही थट्टामस्करी केली तरी ती मनावर घ्यायची नसते, थट्टामस्करीच्या बळीनेसुद्धा सार्वत्रिक हास्यकल्लोळात सामील होऊन जायचे असते. आजकाल भारतीय समाजात विशेषेकरून नेहरूप्रणित समाजवादी नियोजन व्यवस्थेत प्रस्थापित समाजात एकमेकांच्या नावाने शिमगा करायला आणि सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवायला ठराविक दिवसाचे बंधन राहिलेले नाही.
 मग 'एप्रिलफूल' च्या बळीने थट्टामस्करी मनावर न घेता, त्यामुळे तयार झालेल्या हास्यकल्लोळात सामील व्हावे हा नियम सर्वकाळ लागू धरावा काय? त्या पलिकडे जाऊन हा नियम चळवळी, आंदोलने, संप किंवा बंद यांनाही लागू धरावा काय? कोणी संप केला, बंद पाळला त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली, नुकसान झाले तरी राग गिळून टाकून त्यानेही असली थट्टामस्करी माफ करून ह्या कल्लोळात सामील व्हावे काय?
 २५ एप्रिलच्या महाराष्ट्र बंदचे आयोजन करणाऱ्या डाव्या मजूर संघटना होत्या, काही मध्यममार्गी पक्षही होते, पण बंद यशस्वी झाला तो शिवसैनिकांच्या धाकाने याबद्दल सर्वांचे एकमत आहे. देशाला स्वातंत्रय मिळूनही सर्वसामान्य नागरिकांच्या अवरुद्ध राहिलेला मार्ग खुला करणाऱ्या खुल्या व्यवस्थेला विरोध करण्यासाठी पाळलेला हा बंद म्हणजे सर्वसामान्यांच्या थट्टामस्करीचाच भाग होता. व्हलेंटाईन दिवसासारख्या आपुलकी व्यक्त करणाऱ्या सणालादेखील तो पाश्चिमात्य आहे म्हणून ज्यांचा कडवा विरोध आहे ते शिवसैनिक नागरिकांना अवेळी 'एप्रिलफूल' करणारा महाराष्ट्र बंदचा कार्यक्रम, हा काही थट्टामस्करीचा
राज्यव्यापी कार्यक्रम निषिद्ध मानत नाहीत. खोडी करणारानेच ती विनोदबुद्धीने केली नसेल तरी त्याचा फटका घेणाऱ्यांनी त्याकडे विनोदाने बघावे, त्यामुळे होणाऱ्या हास्यकल्लोळात सामील व्हावे हे कसे शक्य आहे? एप्रिलफूलचे विदूषकसुद्धा जीवघेणी चेष्टा करीत नाहीत, मस्करीची कुस्करी होऊ देत नाहीत.
 २५ एप्रिलचा महाराष्ट्र बंद चांगला यशस्वी झाला याबद्दल काही दुमत नाही. मुंबई बंद पडली एवढेच नाही तर सुनसान झाली, पुणे थंड पडले, अगदी नासिक, मालेगाव, औरंगाबादपर्यंत जनजीवन सुनसान झाले; नागपूर, वर्धा, परभणी, नांदेडपर्यंत सारा विस्कळीतपणा आला.
 एवढा मोठा यशस्वी बंद हा चमत्कार घडवला कोणी? बंदचा आदेश देणाऱ्या डाव्या कामगार संघटना. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत कामगार संघ यांची मूळ प्रेरणा, त्यात शिवसेनेने हातभार लावला. सर्वांनी मिळून केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांचा आणि कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी एकत्र यायचे ठरवले. कामगार संघाच्या प्रणेत्यांना सत्ता फारशी मानवत नाही. आपलाच पक्ष सत्तेत असला तरी खुर्चीचे पाय कापण्याची त्यांची खोड जात नाही. शिवसेना प्रमुखांनाही आपल्या हातातील 'रिमोट' मधूनमधून चालवीत आपल्या प्रभावाची प्रचिती दाखविण्याची आवड आहे. या कार्यक्रमात कामगार युनियन आणि शिवसेना एकत्र आल्या कशा? शिवसेनेच्या उदयास्ताविषयी जेव्हा चिकित्सेने इतिहास लिहिला जाईल त्यावेळी, 'सत्तादांडग्या कामगार नेत्यांनी चालविलेल्या अरेरावीस शह घालण्याचे काम शिवसेनेने केले' याची नोंद होईल. 'या कामगिरीत त्यांना दोन वसंतांची 'घबाड' मदत मिळाली' हेही नोंदले जाईल. सापमुंगसाचे नाते असलेले हे दोन 'पक्ष' या बंदच्या प्रसंगी एकत्रा कसे आले?
 कोणी फारसे तात्त्विक विवेचन केले नाही. "खुली अर्थव्यवस्था आल्याने स्पर्धा येत आहे. त्यात भारतीय टिकू शकत नाहीत. त्यामुळे मंदी आणि बेकारी पसरत आहे. तेव्हा शासनाने खुलेपणा सोडून पुन्हा एकदा जुन्या लायसन्स- परमिट व्यवस्थेकडे जावे, प्रश्न शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या जीवनमरणाचा आहे, त्यामुळे आम्हीही त्यात सामील झालो" असे या बंदमध्ये सामील होणाऱ्या सर्वांनी म्हटले. अर्धवट ठेचलेल्या कामगार युनियनच्या सापाला शिवशंकराने गळ्याभोवती घेण्याचे ठरवले!
 आपला बंद यशस्वी झाला आणि लायसन्स-परमिट व्यवस्थेत मेहता- सामंत प्रणित युनियनशाही पुन्हा माजली तर काय करावे याची शुद्धबुद्ध राहू
नये इतका कडवा स्वतंत्रतेचा विरोध बंदवाल्यांच्या मनात होता. हा रोष समजण्यासारखा आहे. पाण्यात उतरल्याखेरीज पोहायला शिकता येत नाही तसे स्पर्धेसाठी उतरल्याखेरीज स्पर्धेत टिकण्याचे सामर्थ्य येणार नाही हे सारे मानले तरी नवशिक्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले आणि जीव घाबरा होऊ लागला की तो उरलेल्या ताकदीनिशी जीव बचावण्याची धडपड करणार, आरडाओरड करणार, वाचवायला कोणी आलेच तर त्याच्याच गळ्याला मिठी मारून आपल्याबरोबर त्यालाही ओढायचा प्रयत्न करणार हे सारे समजण्यासारखे आहे. पुढच्या निवडणुकीच्या पलिकडे ज्यांची दृष्टी जात नाही त्या पुढारी मंडळींना तर 'शेतकरी आणि कामगार यांची दुर्दशा' म्हणजे मोठी लॉटरी लागल्यासारखे झाले आहे. शोषितांच्या आक्रोशाचा लाभ उठवून आपण एक निवडणूक जिंकली की मग पुढचे पुढे बघता येईल अशा धुंदीत साध्यसाधनविवेकाचा आक्रोश करणारे गांधीवादी, साध्यसाधनविवेकाचा पुरस्कार करणारे डावे आणि या साऱ्या भाऊगर्दीत साधते काय याचाच शोध घेणारे 'गवसे' सारे एकत्र झाले आहेत.
 समाजवादी नियोजनपद्धती रशियात कोसळली, एका महासत्तेचा अंत झाला. तेथील जनसामान्यांच्याच काय, सत्ताधुरंधरांच्या वेदनांना काही पार नव्हता. एके काळी लष्करात आधिपत्य गाजवलेले सेनानी आपले जुने गणवेश ठाकठिक करीत बाजारात उभे राहिले, पौंडभर पाव मिळावा म्हणून रांगा लागल्या. एकदा तर सारे सरकारच उलथवले गेले; पण नवीन सरकारनेही खुल्या व्यापार व्यवस्थेला पर्याय नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर रशियन जनता निश्चय करून उठली. महासत्तेचे स्थान गेलेले, साम्राज्याचे तुकडे-तुकडे झालेले, रूबल सतत घसरत आलेला, उत्पादन थंडावलेले बेकारी माजलेली अशाही परिस्थितीत रशियन जनतेने शुद्धबुद्ध सोडली नाही, औषधालाच आजार म्हटले नाही, सात दशके ज्यांचा अभिमान उराशी बाळगला त्यांचे पुतळे खाली खेचले आणि नव्या मार्गाने वाटचाल करण्याचा निश्चय केला.
 रशियन जनतेने हा ऐतिहासिक निर्णय केला नसता तर आज रशियाचे जे काही, निदान दुय्यम स्थान राहिले आहे तेही टिकले नसते आणि पावाच्या तुकड्यासाठी रांगा चालूच राहिल्या असत्या.
 चीनमधील साम्यवादी नेत्यांनी समाजवादाच्या उन्मादात लक्षावधींचे शिरकाण केले; पण त्यातील वैयर्थ्य लक्षात आल्यावर समाजवादी अनुशासन आणि तैवान, सिंगापूर व इतर परदेशात नाव कमावलेल्या चीनी नागरिकांची कार्यकुशलता
यांचा संगम घडवून आणला, हाँगकाँगच्या खिडकीचा चातुर्याने उपयोग केला. परिणाम असा की, चीन एक आर्थिक ताकद बनत आहे. 'मधल्या काळात माओ-त्से-तुंग आला नसता तर आमचा चीन आजपावेतो जगातील प्रथम क्रमांकाची महासत्ता बनला असता,' असे तेथील जाणकार म्हणतात.
 दोन देश, दोन संस्कृती, संकटाचा सामना करण्याच्या दोन पद्धती इंडिया वेगळा देश, वेगळी पद्धती. औषध देणाऱ्याच्याच हाताला चावण्याचा कार्यक्रम येथे मोठा लोकप्रिय होत आहे. सध्याची स्थिती जर पाहिली तर आगामी निवडणुकीत लायसन्स-परमिटवादी सत्तेला हात घालतील अशी लक्षणे दिसतात.
 फुटकळ कामगार नेते, दत्तोपंत ठेंगडी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती सर्वंकष सत्ता आली तरी लायसन्स-परमिट धोरणे त्यांना राबविता येतील हे काही शक्य नाही; देवेगौडा, यशवंत सिन्हा यांनी सत्ता हाती येताच हृदयपरिवर्तन करून घेतले तसेच यांचेही होईल. सत्ता हाती आल्यानंतरही 'सुधबुध खोयी' अवस्था संपली नाही आणि सरकारशाहीचा हेका कायम ठेवला तर देशावरील आर्थिक अरिष्ट टळणार नाही; परिवर्तनाचा कालखंड आणि त्यातील वेदना अधिक कठोर व दीर्घकालीन होतील एवढेच. जुन्या अर्थव्यवस्थेला 'झटका' द्यायचा की 'हलाल' करायचे एवढाच विकल्प वास्तविक पुढे आहे.
 शेतकरी कामगारांच्या करूणेचा पुतळा दाखवणारे या समाजाच्या वेदना दीर्घकाळ लांबवतील आणि जीवघेण्या करतील ही या 'अवेळी एप्रिलफूल' ची मस्करी आहे. जे या मस्करीच्या हास्यकल्लोळात सामील होताहेत त्यांच्याबद्दल काय लिहावे? खिस्तवचन त्यांना चालायचे नाही पण, 'प्रभो, त्यांना क्षमा कर, ते काय करीत आहेत हे त्यांनाच समजत नाही,' एवढेच म्हणता येईल.

दि. ३/५/२००१
■ ■