अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ युग ‘एकलव्या'चं
'संस्कृत काय आहे, हे आपल्याला माहीत आहे का?’ त्यांनी विचारलं. 'हो, ती एक भाषा आहे, आमच्यापैकी बहुतेकांनी उत्तर दिलं. मात्र, काही म्हणाले, 'तो भरपूर गुण मिळवून देणारा विषय आहे.’ (आमच्या वेळी गणित, विज्ञान व संस्कृत हे तीन स्कोअरिंग विषय असत.)
'दोन्ही उत्तरं चुकीची आहेत. संस्कृत ही केवळ भाषा किंवा गुण मिळवून देणारा विषय नव्हे. आपल्या पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचं ज्ञानभांडार खोलणारी ती चावी आहे. एकदा ती तुमच्या हाती लागली की, सारं धन तुमचंंच समजा.' शिक्षकांनी
सांगितलं. वर्गात आम्ही चाळीस विद्यार्थी होतो. शिक्षकांचं म्हणणं प्रत्येकाला पटलं नाही. केवळ १० -१२ विद्यार्थ्यांनीच त्यावर विश्वास ठेवला.
मॅट्रिकनंतर पुढच्या शैक्षणिक जीवनात संस्कृतशी माझा संबंध आला नाही. केमिकल इंजिनिअॅरिंग किंवा नंतर एमबीए या शिक्षणक्रमात तो विषय नव्हता. तरी आजही मी संस्कृत वाचतो. माझ्या शिक्षकांनी मला केवळ तो विषय शिकवला नाही, तर पहिल्याच तासापासून त्या विषयाबद्दल उत्सुकता आणि आवड निर्माण केली. एकदा एखाद्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण केली की, विद्यार्थीं तो स्वतःच्या प्रेरणेने
पुढे शिकत राहतो.
थोडक्यात विद्यार्थ्याचा एकलव्य होतो. महाभारतातील एकलव्यानं गुरू द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या शिकण्याची स्फूर्ती घेतली. नंतर त्यानंं ही विद्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वयंप्रयासाने गुरुवर अवलंबून न राहता साध्य केली.
असे एकलव्य तयार करणे हीच शिक्षकाची जबाबदारी आहे. केवळ ‘स्पून फीडींग' न करता स्वतःच्या बळावर विषयात पारंगत होण्याची वृत्ती विद्यार्थ्यात निर्माण करणंं हेच खरं शिक्षकी कौशल्य आहे.
गेल्या काही हजार वर्षांमध्ये शिक्षक आणि त्याचे विषय यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. तरी शिक्षकाची ही मूळ जबाबदारी कायम आहे.
पुुरातन काळी विद्यार्थी वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणासाठी गुुरुगृही जात. तेथे त्या काळी शिकविल्या जाणाच्या सर्व विषयांचे ज्ञान एकाच गुरूकडून घेत. आजच्या
आधुनिक शिक्षण पध्दतीत एकाच विषयाचे विविध भाग शिकविण्यासाठी वेगवेगळे शिक्षक असतात. एकंदर शैक्षणिक जीवनात विद्यार्थी विविध शिक्षण संस्थांमधून किमान शंभर शिक्षकांच्या हाताखालन जातो. यापैकी प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याचा एकलव्य बनवतोच असे नाही. कित्येक शिक्षकांचंं लक्ष केेवळ 'पोर्शन कम्प्लीट' करण्याकडे असतं. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आस्था निर्माण करणारे शिक्षकच आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतात.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेतही आज बदल झाला आहे. शाळा-कॉलेजातून मिळणाऱ्या औपचारिक शिक्षणापेक्षा शिकवणीला जाऊन अधिकाधिक गुण मिळविण्याकडंं त्यांचा कल आहे. कॉलेजातील वर्गांंमध्ये ३० टक्केसुध्दा हजेरी नसते. पण कोचिंग क्लासेस मात्र ओसंडून वाहत असतात. कारण उघड आहे. केवळ उपचार पूर्ण करण्याच्या दृष्टीनंं कॉलेजात दिल्या जाणाऱ्या शिक्षणात वेळ खर्च करण्यापेक्षा जास्त गुुण मिळवून पुढील मार्ग मोकळा करणारं शिक्षण विद्यार्थ्यांना अधिक भावतं. कोचिंग क्लासेसमध्ये असंच शिक्षण दिलं जातं.
आताचा विद्यार्थी रिझल्ट ओरिएंटेड' आहे. जास्तीत जास्त गुण मिळवून देणं हेच कोचिंग क्लासेसचंं ध्येय असतं. मात्र कॉलेजमधील शिक्षकाचं मुख्य काम ज्ञान देणं ही असतंं.
शैक्षणिक संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या औपचारिक शिक्षणाला आणि शिक्षकांना
सध्याच्या काळात काही महत्त्व उरलं आहे की नाही आणि असल्यास त्यांची भूमिका
कोणती, असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाला आहे.
त्याचं महत्त्व निश्चितच आहे. शिकवण्यांमधून गुणांची निश्चिती होत असली तरी विषयाचंं सखोल ज्ञान आणि ते मिळविण्याची लालसा तितकीच महत्वाची आहे. गुणांचा उपयोग पुढील शिक्षणाकरिता प्रवेश मिळविण्यासाठी होत असला तरी तो तात्कालिक असतो. शिक्षण संपल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करताना आणि त्यात यशस्वी होताना परीक्षेत मिळालेले गुण उपयोगी पडत नाहीत. तिथं ज्ञानाची लालसा, नवं शिकण्याची प्रवृत्ती आणि ज्ञानात भर घालण्यासाठी प्रयत्न करण्याची सवय हीच
त्रयी महत्त्वाची ठरते. आणि हे संस्कार शैक्षणिक जीवनातच व्हावे लागतात.
त्यामुळं परीक्षेत यश मिळविण्याचे झटपट उपाय कितीही असले किंवा निर्माण
झाले तरी औपचारिक शिक्षणाची आवश्यकता कमी होत नाही. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये घरच्यापेक्षा चवदार आणि वैविध्यपूर्ण पदार्थ मिळत असले व ते खाण्याकडंं नव्या पिढीचा ओढा अधिक असला तरी शरीरप्रकृतीचा दीर्घकालीन विचार करता घरच्या जेवणाची तुलना कशाशीच होत नाही. परीक्षेमधील यश आणि विषयाचंं ज्ञान यात हाच फरक आहे. अर्थात हे दोन्ही मिळवन देणाऱ्या शिक्षणामध्येही तोच फरक आहे. म्हणूनच शिकवण्या, परीक्षेत यश मिळवून देणारी पुस्तकं इत्यादींकडून कितीही स्पर्धा होत असल्या तरी, शिक्षण संस्था आणि त्यातील शिक्षक यांनी 'एकलव्य' बनविण्याचं आपलं कार्य निरंतर सुरू ठेवणंं आवश्यक आहे.
व्यवस्थापन शिक्षणातही आज अनेक नवे नवे विषय निर्माण झाले असून त्या सर्वाचं ज्ञान दोन-चार वर्षांच्या शिक्षणक्रमातूून घेणंं अशक्य आहे. शिक्षण संपवून व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या ज्ञानात नित्य नवी भर टाकणंं गरजेचंं आहे आणि त्यासाठी व्वस्थापकानं एकलव्य असणंं जरुरीचं आहे.