अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ मानव - व्यवस्थापनाची कला

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
एतनाम युध्दाची एक कथा सांगितली जाते.अमेरिकेने तिथे दारूगोळा साठविण्यासाठी एक भांडार बनविलं होतं.अमेरिकन सैनिक त्याचं जिवापाड रक्षण करीत. त्या भांडाराभोवती काटेरी तारांची दोन कुंपणं होती आणि त्यांच्या मधल्या जागेत अमेरिकन सैनिकं आणि त्यांच्यासमवेत राखीव कुत्रे चोवीस तास पहारा देत.बाहेरून कित्येक वेळा व्हिएतनामी सैनिक त्यांच्यावर गोळीबार करीत. त्यात काही सैनिक व कुत्री ठार होत असत. असे प्रकार नेहमी होऊ लागल्यावर इवानपथकाच्या प्रमुखाने सैन्याधिकाऱ्याकडे अमेरिकेतून आणखी प्रशिक्षित राखण करणारी कुत्री आयात करण्याची मागणी केली.

 सैन्याधिकारी म्हणाले,'हे पाहा, या युध्दाला अमेरिकन जनतेचा विरोध आहे.आपण तेथून कुत्री आयात करीत आहोत आणि येथे त्यांना मरण्यासाठी सोडत आहोत,असं अमेरिकेतील प्राणी प्रेमींना समजलं तर ते आंदोलन करतील. युध्दाला होणारा विरोध अधिक वाढेल. तेव्हा आहेत तितक्याच कुत्र्यांवर आपण काम भागवलं पाहिजे.श्वानपथकाची पाळी किती तासांची असते?’
 ‘सहा तासांची', श्वानपथकाच्या प्रमुखानं सांगितलं.
 'मग ती आठ तासांची करा. म्हणजे आपल्याला राखणी कुत्र्यांचा तुटवड़ा पडणार नाही,'सैन्याधिकाऱ्यांंनी सल्ला दिला.
 'तसं होऊ शकत नाही सर. आपण माणसांना कुत्र्यांप्रमाणे राबवू शकतो, पण कुत्र्यांना माणसांसारखं राबवू शकत नाही. सहा तास संपल्याक्षणीच ती आपल्या विश्रांंतीस्थानाकडंं परततात. त्यापुढं एक क्षणही त्यांच्याकडून काम करून घेणे अशक्य असतं,’श्वानपथक प्रमुखानं सांगितलं.
 दुसरा एक प्रसंग सांगतो. एकदा मी हिमालयातील जीवसृष्टीसंबंधी एक चित्रपट पाहात होतो.हिमालयात प्रत्येक हजार फूट उंचीवर वनस्पती आणि प्राणी यांच्यात फरक पडलेला आढळतो, पण कोणत्याही उंचीवर समान असा एकच सजीव आहे,तो म्हणजे मानव हे तो चित्रपट पाहतांना लक्षात येत होतं.
 मानव आणि इतर प्राणी यांच्यात हाच फरक आहे. परिस्थितीच्या मागणीनुसार स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन घडविण्याची अचाट क्षमता मानवात आहे. या क्षमतेचं व्यवस्थित मूल्यमापन व व्यवस्थापन झाल्यास वरकरणी सामान्य भासणाच्या माणसाकडूनही मोठी कामं करून घेतली जाऊ शकतात. म्हणूनच मानव व्यवस्थापन ही एक कला आहे आणि कोणत्याही संस्थेचं यश, पैसा किंवा साधनसामग्री यापेक्षा मानव व्यवस्थापनावर अधिक अवलंबून आहे.
 माणूस, सामुग्री आणि यंत्रं ही कोणत्याही संस्थेत व्यवस्थापनाचे प्रमुख विषय असतात. यापैकी सामग्री आणि यंत्रे यांच्या व्यवस्थापनाला मर्यादा असतात. कारण त्यांची क्षमता अगोदरच निश्चित केलेली असते.त्यात बदल होण्यास फारसा वाव नसतो. त्यांचा वापर १०० टक्क्यांहून अधिक प्रमाणात करणं दुरापास्त असतं.केवळ मानवबळाचाच उपयोग १०० टक्क्यांहून अधिक प्रमाणात केला जाऊ शकतो.
 संस्थेने हाती घेतलेला प्रकल्प आकार घेत असतो, तेव्हा कर्मचारी वर्ग नेहमीच्या आठ तासांपेक्षाही अधिक काळ काम करतो. प्रकल्प पूर्णत्वास येत असताना १६ तास म्हणजे २०० टक्के क्षमतेनेही काम करावं लागतं. शेवटच्या काही दिवसांत तर ‘राऊंड द क्लॉक’ म्हणजे जवळपास ३०० टक्के क्षमता उपयोग आणावी लागते.
 मानवाच्या या क्षमतेला एक नकारात्मक बाजूही असते. जसा तो क्षमतेपेक्षा अधिक काम करू शकतो, तसा काम चुकविण्यातही त्याच्याइतका पटाईत प्राणी दुसरा सापडणार नाही. जास्तीत जास्त मोबदल्यात कमीत कमी काम पडावं अनेककमीत कमी पडावंं यासाठी अनेक युक्त्याप्रयुक्त्या तो करत असतो. शिवाय बैल किंवा तत्सम प्राण्यांप्रमाणं त्याच्या नाकात वेसण घालून राबविता येत नाही.
 या नकारात्मक गुणधर्माचा प्रभाव कमीत कमी असावा आणि त्याची क्षमता पूरेपूर उपयोगात आणण्यासाठी तो उद्युक्त व्हावा हे व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठं आव्हान असतंं आणि ते युक्तीनं साध्य करावं लागतं. म्हणूनच मानव व्यवस्थापन ही शास्त्राबरोबरच एक कलाही आहे.
 ‘चला, ऑफिसची वेळ झाली. कामावर हजर राहून पाट्या टाकल्या पाहिजेत,'असे उद्गार सरकारी कर्मचारी नेहमी काढताना आपण ऐकतो. म्हणजे केवळ कामावर हजर राहणं आणि नेमून दिलेलं काम यांत्रिकपणे करणे एवढाच त्याचा उद्देश असतो.कामाबाबत आपलेपणाची भावना जवळपास नसतेच.
 त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करावयास लावणं हे व्यवस्थापनासमोरचं आव्हान असतं. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या दोन पातळ्या असतात. एक, कमीत कमी काम करून सटकणं आणि दोन, आपली पूर्ण क्षमता उपयोगात आणणं. कर्मचाऱ्याचा प्रवास पहिल्या पातळीकडून दुसऱ्यापर्यंत होण्यासाठी व्यवस्थापनानं प्रेरक शक्ती म्हणून काम केलं पाहिजे. ही प्रेरणा किंवा मोटिव्हेशन हा मानव व्यवस्थापनातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
प्रेरणा : कर्मचाऱ्याला कामासाठी प्रवृत्त करण्याचा पारंपरिक मार्ग म्हणजे भीती घालणं. ‘हे काम संध्याकाळच्या आत पूर्ण झालंं पाहिजे. नाहा तर तू उद्या कामावर येण्याची गरज नाही,’ अशी भीती घातली की ते काम होण्याची शक्यता बरीच असते. तथापि,एक समस्या असते. ‘आज संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होणं शक्य नाही. तरीही मी उद्या कामावर येणार आहे.कोण करतं हे पाहू'असं उत्तर जर कर्मचाऱ्यांनं दिलं, तर व्यवस्थापकाची पंचाईत होते.
 बदलत्या काळानुसार या भीतीच्या मात्रेचा परिणाम कमी होत चालला आहे केवळ कार्यालयातच नाही तर घरातही. माझ्या लहानपणी आम्ही सहा मुलं घरात होतो. आई सकाळी सात वाजता सहा कपात दूध ओतून ठेवायची आणि हुकूम करायची जो दूध तीन मिनिटांत संपवणार नाही, त्याला मार मिळेल. सर्व कप दोन मिनिटांत रिकामे व्हायचे.
 आता घरात एक किंवा दोनच मुलं असतात. आई विचारते, ‘सनी, बाळा अरे दूध घेतलंस का?' बाळ उत्तरतो, ‘नो मॉम, आज मी दूध पिणार नाही.’ मग वाटाघाटी सुरू होतात. ‘बोर्नव्हिटा घालू? मग पिशील? नको, अरे मग हॉर्लिक्स हवं का? तू शहाणा मुलगा ना? मग असं नाई करायचं. दूध प्यालास तर संध्याकाळी ना तुझ्यासाठी मी कॅडबरीज आणणारय.’ वगैैरे. नोकरीच्या ठिकाणी अशी आणि इतकी आर्जवं केली जात नसली, तरी भीतीचा परिणाम होत नाही, तर दुसरं मोटिव्हेशन म्हणजे आमिष, पण त्यालाही मर्यादा आहेत. कारण संस्थेजवळ तितका पैसा उपलब्ध हवा. शिवाय आमिषं घेऊन काम करायची सवय लागली, तर दिवसेंदिवस मागणी वाढतच जाते. सुटीच्या दिवशी किंवा अधिक तास काम करावं लागलं तर दुप्पट ओव्हरटाईम देण्याचा प्रघात पूर्वी सरकारी कार्यालयांमध्ये होता. त्याचा फायदा घेण्यासाठी कर्मचारी कामाच्या नियमित तासांमध्ये स्वस्थ बसून तसेच काम ओव्हरटाईममध्ये करू लागले(आम के आम गुठलियों के भी दाम) अखेर ही पध्दत बंद करावी लागली.
 म्हणजेच भीती किंवा आमिष या मार्गाने मानव व्यवस्थापन करणं अयोग्य असल्याचं आता स्पष्ट होत आहे. काळ जसा पुढं जाईल तशी ही व्यवस्थापन पध्दती मागं पडत जाणार आहे.भविष्यकाळात कर्मचाऱ्यांला प्रेरणा देण्यासाठी त्याच्या मनात तीन भावना निर्माण करण्याचे कार्य करावं लागणार आहे. एक, समरसता (सेन्स ऑफआयडेंटिटी), दोन, जबाबदारी (सेन्स ऑफ इम्पॉर्टन्स) आणि तीन, स्वयंविकास (सेन्सऑफ डेव्हलपमेंट).
 पुढील लेखात विविध उदाहरणांच्या मदतीनं या तिन्ही भावनांबद्दल जाणून घेऊ.