अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ भारतीय नीतिमूल्ये समज - गैरसमज

विकिस्रोत कडून
झ्या एका शिक्षक मित्राला निवृत्तीनंतर मूत्रपिंडांची समस्या जाणवू लागली. डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लॅटचा सल्ला दिला. पण ही शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम खर्च करावी लागली असती. मित्राला कॉलेजात शिकणारी दोन मुले होती. त्यांच्या शिक्षणाला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या पत्नीसाठी मग त्याच्याकडे पैसा उरला नसता. त्यानं पत्नीला सल्ला विचारला.

 पत्नीनं व्यवहार्य विचार करून सांगितलं, पैसा माझ्या व मुलांच्या भवितव्यासाठी राखून ठेवा.
 हे उत्तर आपल्याला विचित्र वाटेल. या पत्नीला भारतीय संस्कृती माहीत आहे की नाही असाही प्रश्न आपण विचाराल. पण ही घटना सत्य आहे. 'भारतीय नीतिमूल्यां'मध्ये होत असलेल्या बदलांचे ते संकेत आहेत.
 आता दुसरं उदाहरण पाहा. १९७८ मध्ये 'निवृत्तीनंतरचे जीवन’ या विषयावर अमेरिकेत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो होतो. प्रशिक्षणार्थींना एक प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यातील दोन प्रश्नांनी माझे लक्ष वेधून घेतलं.
 १) आपण निवृत्त झाल्यानंतर आपले मातापिता आजारी पडले, तर त्यांची काळजी आपण स्वत: घ्याल की सरकारी रुग्णालयात सुविधा समाधानकारक नसतात हे माहीत असूनही त्यांना तिथं ठेवाल?
 २) आपण निवृत्त झाल्यावर आपल्या मुलानं व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या निवृत्ती निधीतील ३० टक्के रक्कम मागितली. आपण ती रक्कम त्याला द्याल की आपल्या व पत्नीच्या चरितार्थासाठी राखून ठेवाल?
 या प्रश्नाचे अधिकृत उतर 'पत्नी व आपल्यासाठी रक्कम राखून ठेवा असं होतं १९७८ मध्ये या उत्तराला आपण ‘पाश्चात्य संस्कृती’ म्हणून हिणवत होतो. पण याच नीतिमूल्यांनी आता शहरी भागातही शिरकाव केल्याचे आपल्याला पहिल्या उदाहरणांवरून दिसून येईल.
 भारतीय नीतिमूल्यांसंबंधी बरंच काही बोललं - लिहिलं जातं. ही नीतिमूल्यं अध्यात्माच्या पवित्र पायावर आधारित आहेत. पाश्चिमात्यांसारखी पैसा आणि भौतिक सुखावर अवलंबून नाहीत असं सांगितलं जातं. ते सिध्द करण्यासाठी पुराण काळातील ग्रंथ व घटनांचे दाखले दिले जातात.तथापि, हे सर्व लिखाण व्याख्यानांपुरतेच मर्यादित राहते. व्यवहारात कोणत्याही कृतीचा पाया ‘स्वार्थ’ हाच असतो.
 आपली नीतिमूल्यं घडविणारे तीन स्रोत असतात. एक, बालपणी पालकांनी केलेले संस्कार. दोन, जाणत्या वयात आल्यानंतर आपण स्वतः केलेली निरीक्षणं व तीन, स्वतःची अंतःप्रेरणा.
 बालपणी आपल्याला ‘चांगलं ’ आणि ‘वाईट’ यातील फरक समजावून दिला जातो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी घडविल्या जातात. वडिलधाऱ्या मंडळींचा आदर करणं शिकवलं जातं. हे संस्कार पालक, आजोबा-आजी, कुटुंबातील इतर वयस्कर, नातेवाईक, शेजारी, शिक्षक इत्यादीकडून केले जातात.
 आपण जाणत्या वयाचे होतो, तेव्हा बालपणीच्या या संस्कारांना आपल्या अनुभवांची व निरीक्षणांची जोड मिळते. त्यामुळे काही संस्कारांना तडे जातात, तर काही संस्कार आणखीनच पक्के होतात. जे ऐकलेलं असतं, त्यापेक्षा जे पाहतो त्यावर आपण जास्त विश्वासू ठेवू लागतो. बालपणीचे संस्कार व मोठेपणीचे अनुभव यांच्या संयोगातून आपली नीतिमूल्यं ठरतात.
 तिसरा स्रोत अंत:प्रेरणेचा आहे. प्रत्येकाला स्वतंत्र बुध्दी निसर्गाकडून मिळालेली असते. तिचा वापर करून तो स्वतःचे विचार घडवतो आणि त्याप्रमाणे वागतो. आपल्याला अनेकदा एकाच घरातील दोन पिढ्या किंवा एकाच पिढीतील दोन व्यक्ती पूर्णत: भिन्न व परस्परविरोधी आचार-विचारांच्या आढळतात. याचं हेच कारण आहे.
 चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशियसच्या म्हणण्यानुसार ‘परिस्थितीचे आकलन, सकारात्मक किंवा नकारात्मक विश्लेषण आणि विरोध सहन करण्याची ताकद यातून व्यक्तीची नीतिमूल्ये बनत जातात.
 सध्याच्या काळात ‘समानता’ हे महत्त्वाचं नीतिमूल्य आहे. सर्व माणसं सारखीच असून समान संधीचे हक्कदार आहेत. ही पाश्चात्य संकल्पना आहे.यात लिंग, भाषा,जात, धर्म, समाज, इतकंच नव्हे तर देश किंवा राज्य यावर आधारित भेदाभेदही मानला जात नाही. याबाबत अमेरिकेत घडलेली एक घटना समजून घेणं मनोरंजक ठरेल.
 व्हील चेअरवरील वृध्द व अपंगांना कुणाच्या मदतीशिवाय हालचाल करणे शक्य व्हावे म्हणून सर्व इमारतींना रॅम्प असावेत, असा प्रस्ताव अमेरिकेतील एका राज्याच्या विधिमंडळात मांडण्यात आला. काही सदस्यांनी त्याला विरोध करताना म्हटलं की,सर्व इमारतींना रॅम्प बांधण्यासाठी अतिप्रचंड खर्च करावा लागेल. त्याऐवजी वृध्द व अपंगांना घरी बसण्यासाठी सबसिडी दिली तर ती स्वस्त पडेल.मात्र हा प्रश्न पैशाचा नसून मूलभूत अधिकारांचा आहे असं प्रत्युत्तर देण्यात आले व प्रस्ताव बहुमतानं संमत करण्यात आला.
 भारतातील परंपरा असमानतेची आहे हे मान्य करावे लागेल.पुरुषांचं महिलांवर वर्चस्व,उच्च जातीचं कनिष्ठ जातीवर वर्चस्व इत्यादी कालबाह्य संकल्पनांना आपण आजही कवटाळून बसलो आहोत. आपल्या व्यावसायिक आयुष्यातही त्या डोकावत असतातच.
 वयानुसार ज्ञान वाढतं ही आणखी एक भारतीय संकल्पना आहे, पण सध्याच्या झपाट्यानं बदलणाच्या तंत्रज्ञानाच्या युगात ती कालबाह्य ठरली आहे.
 तिसरी भारतीय संकल्पना म्हणजे पुरेसं निरीक्षण किंवा सर्वेक्षण न करताच निष्कर्ष काढून तोच कवटाळून बसण, यातूनच अंधश्रध्दांची निर्मिती होते. चुकीच्या परंपरा रूढी होतात.
 पाश्चात्य मूल्ये आणि भारतीय मूल्य यांची चढाओढ भारतात सुरू झाली आहे.
 समानता व ज्ञानाचा आदर करणारी मूल्येच या स्पर्धेत टिकून राहतील.बाकीची रद्द ठरतील.