अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वयंव्यवस्थापन (भाग दुसरा)
आपल्या सहकाऱ्यांच्या किंवा लोकांच्या भावना जाणून घेण्याची गरज वाटत नाही. तर एखाद्या तज्ज्ञ मनुष्यबळ व्यवस्थापकाला अकाऊंट्स या विषयातील ज्ञान घेणं कमीपणाचं वाटतं. सध्याच्या काळात ही वृत्ती उपयोगी पडणार नाही. आपली बुध्दी कोणत्या क्षेत्रात कशी चालते हे समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रांत संचार करणं श्रेयस्कर आहे. या प्रयोगातून आपल्यातील नव्या शक्तिस्थानांचा शोध लागू शकतो.
चुकीच्या सवयी सोडणंही तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एका निष्णात योजनाकारानं एखाद्या प्रकल्पाची योजना तयार केली. ती कितीही चांगली असली तरी तिची लक्षपूर्वक अंमलबजावणी न केल्यास ती अपयशी होऊ शकते. केवळ चांगल्या कल्पनेने पहाड हलविता येत नाही. त्यासाठी बुलडोझरच चालवावे लागतात. तेंव्हा चांगली योजना तयार केली म्हणजे आपलं काम झालं असं समजण्याची वाईट सवय टाळायला हवी. योजना अंमलात आणण्यासाठी योग्य त्या माणसांची जुळणी करणं, योजना कृतीत आणताना तीत करावे लागणारे बदल मोकळेपणाने स्वीकारणं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योजनेचं क्रियान्वयन थांबवणं या बाबीही योजनाकारानं लक्षात घ्यावयास हव्यात.
अपेक्षा व फलनिष्पत्तीची तुलना :
एखादं कार्य हातात घेण्यापूर्वी त्यातून आपल्याला काय मिळवायचं आहे यासंबंधी निश्चित अपेक्षा मनात असतात. कार्यपूर्तीनंतरच्या फलनिष्पत्तीशी या अपेक्षांची तुलना केल्यास कार्य कितपत नेटकेपणानं पार पडलं हे समजतं. यावरून काय करायला हवं होतं आणि काय करायला नको होतं हे कळून येतं, याचा उपयोग पुढच्या कामात होतो. ज्या ठिकाणी कार्यक्षमता कमी आहे तिथे ती सुधारण्यासाठी शक्ती व वेळ खर्च करण्यापेक्षा जिथे ती अधिक आहे, त्या ठिकाणी ती जास्त बलवान कशी करता येईल ते पाहणं अधिक उपयोगी ठरेल. उदाहरणार्थ, एखाद्या चांगल्या फलंदाजाने गोलंदाजी सुधारण्यासाठी वेळ व शक्ती खर्च करणं योग्य ठरणार नाही. त्याऐवजी तोच वेळ व शक्ती त्यानं फलंदाजी अधिक भक्कम करण्यासाठी वापरली तर त्या क्षेत्रात तो उच्चपदावर पोहोचू शकतो.
कामगिरीचे इंगित जाणणे :
एकच काम करण्याची प्रत्येकाची पध्दत भिन्नभिन्न असते. ज्याने त्याने ती स्वतःच्या कुवतीनुसार ठरविलेली असते. अशा स्वयंरचित पध्दतीने काम केल्यास ते चांगलं होण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्याच्या पद्धतीने ते केल्यास बहुतेक वेळा अपयश पदरी पडतं. चांगल्या कामगिरीचं इंगित हेच आहे. त्यामुळं कामाचं स्वरूप नीट समजून घेऊन ते करण्याची स्वतंत्र पध्दत बसविण्याचा प्रयत्न करावा. विशेषत: बौध्दिक कामं करणाऱ्यांसाठी हे सूत्र अधिकच उपयुक्त आहे.
कामगिरीवर आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण पडणं साहजिक असतं. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण स्वभाव व बौद्धिक क्षमता यावर अवलंबून असते. त्यामुळं कामाचं स्वरूप पाहून व्यक्तिमत्त्वात थोडा फेरफार करता येतो, पण ते पूर्णपणे बदलून टाकणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप अशी कामाची पद्धत ठरवून घ्यावी आणि दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा याच स्वतः ठरविलेल्या पध्दतीने काम केल्यास ते यशस्वी होते.
चांगली कामगिरी आपण शिकतो काय व कसं यावर अवलंबून आहे. कित्येकदा असं दिसून येतं की,
शाळेत कधीही चांगले गुण न मिळालेल्या व्यक्ती मोठेपणी विश्वविख्यात शास्त्रज्ञ, लेखक, कवी इत्यादी होतात. (हजाराहून अधिक शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन याला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं..) याचं कारण असं की, शाळेतील शिक्षणाची पद्धती त्यांच्या स्वयंभू व्यक्तिमत्त्वाशी मिळतीजुळती नसते. शाळेत केवळ ऐकणं आणि वाचणं या दोनच मार्गानी शिक्षण दिलं जातं. त्यामुळं शाळेत त्यांची कामगिरी चांगली होत नव्हती. मात्र पुढं जगाच्या शाळेत प्रवेश केल्यानंतर अनुभावानं मिळालेल्या शिक्षणानं त्यांचं व्यक्तिमत्त्व खुललं आणि तो जगप्रसिध्द बनला.
शिकायचं कसं हे समजून घेणं एकवेळ सोपं आहे. मी जेव्हा लोकांना विचारतो की, तुम्ही शिकता कसे तर याचं उत्तर बहुतेकांना देता येतं. पण शिक्षणातून मिळणारं ज्ञान आचरणात आणता का, या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणाऱ्यांची संख्या अगदीच कमी असते. ज्ञानाचा जास्तीत जास्त हिस्सा आचरणात आणण्यावरच कामगिरीची गुणवत्ता अवलंबून असते.
स्वतःचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करावयाचंं असेल, तर तुम्ही स्वतःला दोन प्रश्न विचारले पाहिजेत. एक, मी इतरांसमवेत काम चांगलंं करू शकतो की एकटा करू शकतो की एकटा करू शकतो? या प्रश्नाचंं उत्तर इतरांसमवेत असं असलं तर दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की, माझ्यासमवेत काम करणाऱ्या इतरांबरोबर कसे संबंध ठेवणंं मला आवडतं? काही लोक टीम-मेंबर्स म्हणून चांगलं काम करू शकतात. काही लोक दुय्यम सहकारी (सबॉर्डिनेट्स) म्हणून उत्तम असतात, तर काही जण एकट्याने चांगली कामगिरी करतात. काही जण मार्गदर्शक किंवा नेते म्हणून चमकू शकतात. हे सर्व गुण एकाच व्यक्तीत असणंं शक्य नसतं. त्यामुळंं वरीलपैकी कोणत्या श्रेणीत आपण बसतो हे प्रत्येकानं तपासून पाहून मग आपली जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
यापुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, तुम्ही निर्णय घेणारी व्यक्ती (डिसिजन मेकर) म्हणून चांगले आहात की, सल्लागार म्हणून? कारण कित्येकांना निर्णय घेण्यापूर्वी किंवा धोरण ठरविण्यापूर्वी कुणाचा तरी सल्ला घेण्याची आवश्यकता भासते. असा सल्ला मिळाल्यानंतर त्यांची विचारशक्ती, आत्मविश्वास आणि साहस जागृत होते आणि ते झपाट्याने निर्णय घेतात. निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर कार्याच्या यशापयशाची पूर्ण जबाबदारी असते. सल्लागाराचं तसं नसतं. म्हणून कोणत्याही संस्थेत सर्वात वरची जागा निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. नंतर अशी व्यक्ती आपल्या विश्वासातील कुणा निष्णात सल्लागाराला आपला मदतनीस म्हणून क्रमांक दोनच्या स्थानावर नियुक्त करते.
क्रिकेट सामन्यात आपण बऱ्याचदा पाहतो की, काही खेळाडू संघ अडचणीत असताना चांगली कामगिरी करतात. संघ सुस्थितीत असताना ते काहीसे रिलॅक्सड् असतात, तर काही खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी पोषक वातावरणच लागतं. इतर क्षेत्रांतही असं असतं. काहीजणांची कामगिरी तणावाखालीच खुलते, तर काही जणांना वातावरण अगदी अनुकूल लागतं. मी अनेक असे कर्मचारी पाहिलेत की, जे मोठ्या संस्थांमध्ये उत्कृष्ट काम करून दाखवितात, पण छोट्या संस्थांमध्ये त्यांची कामगिरी ढेपाळते. कित्येकांच्या बाबतीत याच्या उलट प्रकारही घडतो. तेव्हा आपण कोणत्या प्रकारात मोडतो याची खूणगाठ ज्याची त्यानंं बांधली पाहिजे आणि यावरून कार्यक्षेत्र निवडलं पाहिजे.
तात्पर्य काय, तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात बदल करण्याच्या फंदात फारसे पडू नये. त्यात यश येण्याची शक्यता कमी आहे. त्यापेक्षा कार्यपध्दती सुधारण्यासाठी झटा. जे काम आपल्याला जमणार नाही किंवा चांगलं जमणार नाही असं वाटतं ते शक्यतो अंगावर घेऊ नका.