अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन ‘तणावा'चं
विशिष्ट पातळीपर्यंतच्या तणावाची शरीराला सवय झाली की,त्यापेक्षा कमी किंंवा अधिक तणावाचा त्रास होऊ लागतो. माझ्या शेजारी एक वृध्द दाम्पत्य राहतं.त्यातील महिलेनं आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या खस्ता खाऊन वाढवलं, शिकवलं,मोठं केलं. त्या २०-२५ वर्षात प्रचंड काम पडूनही तिला कामाचा तणाव अजिबात जाणवला नाही. नंतर नोकरीनिमित्तानं मुलं बाहेरगावी गेली. घरात हे वयस्कर जोडपं एकटंच राहिलं. आता काम अगदी कमी असूनही त्या गृहिणीला पाठदुखी, स्पाँडिलायटीस,थकवा इत्यादी आजार जाणवू लागले.कारण कामाचा तणाव कमी झाला होता आणि कमी तणावांशी जुळवून घेण्याची सवय तिच्या शरीराला नव्हती.
काही वर्षांनंतर तिची मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली आणि तिचे आजार कुठल्या कुठं पळून गेले. कारण आता ती काही महिने पूर्णपणे कामात राहणार होती. म्हणजेच ठराविक प्रमाणापेक्षा कमी तणावही काही वेळा समस्या निर्माण करू शकतो.त्यामुळं तणावाचं व्यवस्थापन करताना तो काही मर्यादेपक्षा कमीही करू दिला जाऊ नये.तणाव सुखावहही वाटेल आणि आपल्याला कृतिशीलही ठेवेल अशा पध्दतीनं त्याचं व्यवस्थापन होणं आवश्यक आहे.
तणावाचे निराकरणः सुखावह पातळीपेक्षा तणाव अधिक वाढला की, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे दोन मार्ग असतात. एक, तो सहन करण्याची क्षमता वाढविणं.दोन, शरीराच्या क्षमतेनुरूप तणावांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणं.
तणाव सहन करण्याची क्षमता अनुभव व वयाबरोबर वाढत जाते. आपला नोकरीतील पहिला दिवस आठवा.त्या दिवशी आपण किती'तणावाखाली'होता!आपण नव्या जगात प्रवेश करीत आहोत. सगळं व्यवस्थित होईल ना?या धास्तीनं आपल्याला रात्री झोपही नीट आली नव्हती. मात्र आठच दिवसांत आपण नोकरीत रुळलात.अनुभवानं तणाव कमी झाला.एका विख्यात लष्करी अधिकाऱ्याचं प्रसिद्ध वाक्य आहे,तो म्हणतो,‘मी पहिल्या दिवशी रणभूमीवर गेलो, तेव्हा शत्रूच्या सर्व गोळ्या माझ्याच दिशेनं येत आहेत असं मला वाटत होतं.दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा काही गोळ्या माझ्या दिशेने येत आहेत असं वाटलं आणि तिसऱ्या दिवशी एकही गोळी माझ्या दिशेनं आली नाही असं वाटलं,'म्हणजेच सरावानं आणि अनुभवानं धीर चेपला आणि तणाव कमी झाला. व्यवस्थापकांच्या जबाबदाच्यांमध्ये वाढ झाली की, तणाव सहन करण्याची क्षमताही वाढीस लागते. विमान चालविणारा एक पायलट अचानक पंतप्रधान होतो पायलट असतानाही एका उड्डडाणानंतर तो चोवीस तास विश्रांती घेत असे, पण पंतप्रधान झाल्यानंतर चोवीस तास काम केल्यानंतरही त्याला सहा तासांची विश्रांती मिळणं मुश्किल होतं पण हा तणाव त्यांचं शरीर आनंदानं स्वीकारतं. या विश्लेषणावरुन हाच निष्कर्ष निघतो की, कामाचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि प्रमाण, आपली शारीरिक क्षमता, आपल्या हाती असलेले अधिकार,सांपत्तिक स्रोत आणि अधिकारपदामुळं आपल्यावर पडलेली जबाबदारी याचा सुरेख मिलाफ साधून तणावाचं व्यवस्थापन यथायोग्य करता येतं. मात्र व्यवस्थापकाने यासाठी स्वत:ला काही प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. त्याच्या काही पध्दती आहेत. त्याबद्दल पुढील लेखात.