अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नव्या युगाचे महाराज

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

टिश राजवट येण्यापूर्वी भारत अनेक संस्थानांमध्ये विभागला गेला होता. आपापल्या मगदुराप्रमाणे हे संस्थानिक राज्यकारभार पाहत असत. ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर या संस्थनिकांच्या नव्या पिढीने संस्थानांचा राज्यकारभार ब्रिटिशांवर सोपविला, पण प्रजेकडून कर वसूल करण्याचा अधिकार मात्र स्वतःकडे राखला. पूर्वी राज्यविस्ताराच्या महत्त्वाकांक्षेपोटी संस्थानिकांमध्ये युध्दे होत. मिळणाऱ्या महसुलापैकी बराच पैसा युध्दापोटी खर्च होई.

 आता सर्वच संस्थानांचा कारभार ब्रिटिशांकडे आल्याने ही युध्दे थांबली, पण उत्पन्न सुरूच राहिले. परिणामी त्यांच्यापाशी सोनं, दागिने, जडजवाहीर, जमीनजुमला, भव्य राजवाडे या रूपानं प्रचंड मालमत्ता गोळा झाली.

 या नव्या पिढीतील ‘महाराजां'पैकी फार थोड्यांनी या मालमत्तेचे रूपांतर ‘उत्पादक संपत्ती’ मध्ये केलं. म्हणजेच, या संपत्तीतून उद्योगधंदे निर्माण केले. लोकांसाठी रोजगार व स्वतःसाठी फायदा अशी दुहेरी सोय केली. थोडक्यात, संपत्तीतून संपत्ती निर्माण होईल, अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र, बहुतेकांनी या कष्टाविना मिळालेल्या संपत्तीचा उपयोग मदिरा, मदिराक्षी व गाणे बजावणे अशा भोगविलासांसाठी करून

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

तिचा चुराडा करून टाकला. याच ब्रिटिशांच्या कालखंडात भारतात अनेक औद्योगिक घराण्यांचा जन्म झाला. टाटा, बिर्ला ही त्यापैकी सर्वतोपरी झालेली नावे होत. अशा घराण्यांच्या पहिल्या पिढीने स्वतःच्या अक्कलहुशारीने व कठोर परिश्रमांतून भव्य उद्योगविश्व साकांरले. इतके दिवस समृध्द आध्यात्मिक संस्कृतीचे माहेरघर म्हणून व कृषिप्रधान म्हणून ओळखला जाणारा आपला देश या ‘उद्योगपतींं'मुळे जगाच्या औद्योगिक नकाशावर आला. त्यांनी जगाला भारताची नव्याने ओळख करून दिली.

 उद्योग जगताच्या या अध्वर्यूंची नवी पिढी संस्थानिकांच्या नव्या पिढीच्याच मार्गाने निघाली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर नव्या ‘महाराजा'चा उदय झाला आहे.

 काही दिवसांपूर्वी मी प्रसिध्द उद्योगपती जी.डी. बिर्ला यांच्या एका नातवासमवेत काम करीत होतो.कुबेरालाही लाजवेल इतक्या संपत्तीचा वारसाहक्काने मालक असणारा हा नातू अत्यंत कष्टाळू होता. इतकी राबणूक हा कशासाठी करतो याचे मला नवल वाटलं. एकदा न राहवून मी त्याला विचारलं, “आपण इतके काम का बरंं करता? धनवान माणसे कमी काम करतात, असं मी ऐकलं होतं. आपण तर सतत कार्यमग्न असता,” तो म्हणाला, ‘परिश्रमाचे प्रमाण संपत्तीवर नव्हे, तर आपल्याला काय साध्य करावयाचे आहे, यावर अवलंबून आहे. मी कॉलेजात असताना माझ्या आजोबांनी एकदा मला विचारलं, ‘तू कसला अभ्यास करतोस?' मी म्हणालो, ‘अर्थशास्त्राचा'. यावर ते म्हणाले, `ठीक आहे, मग मला सांग की भांडवलशाही म्हणजे काय?’ जो स्वतःच भांडवलशाहीचा मुकुटमणी आहे, त्याला भांडवलशाही कशी समजून द्यायची या संभ्रमात मी असतानाच ते म्हणाले, 'मुला, लक्षात ठेव, संपत्तीचा उपयोग करून अधिक संपत्ती निर्माण करणंं म्हणजेच भांडवलशाही!' मला क्षणभर काही उमगलं नाही. ते ओळखून ते पुढे म्हणाले, ‘याचा अर्थ असा की, तुझ्याकडंं एक कोटी रुपये असतील तर त्यातून १० कोटी निर्माण करणं, १० कोटी असतील तर त्याचे १०० कोटी करणं यालाच भांडवलशाही म्हणतात.

 ‘भांडवलवादाच्या बरोबर विरुध्द असतो तो ‘उपभोग'वाद. याचा परिणाम असा होतो की, कोटीचे दहा लाख होतात. दहा लाखांचे एक लाख होतात आणि तुझ्याकडंं एकच लाख असतील तर तुझ्या मुलाला टांगा हाकून पोट चालवावंं लागेल.” बिर्लाच्या नातवाच्या या खुलासेवार उत्तराने तो नव्या ‘महाराजां'पैकी नाही हे मी समजलो.

 पहिल्या पिढीतील उद्योगपती असे संपत्तीतून संपत्ती प्रसवणारे खरेखुरे उद्योजक होते. म्हणूनच धीरुभाई अंबानींनी अवघ्या १० हजार रुपयांमधून केवळ तीन दशकांत ४० हजार कोटींचे साम्राज्य उभे केले. मात्र, या औद्योगिक घराण्यांंची समस्या त्यांच्या दुसऱ्या पिढीपासून सुरू होते. ही पिढी तोंडात सोन्याचा चमचा धरून जन्माला आलेली असते. तिचा कल संपत्तीचा उपभोग घेण्याकडे असतो. मग उद्योगातून मिळालेल्या फायद्याचा उपयोग भव्य प्रासादांची उभारणी, भपकेबाज कार्यालये, महागडी पेंटिंग्ज खरीदणे, मोटारी उडवणे, दागिने, कपडेलत्ते यासाठी सुरू होता. नवे महाराज निर्माण होतात.

हे महाराज तयार होण्यासाठी पुढील तीन बाबी कारणीभूत असतात.  १) महत्त्वाकांक्षेचा अभाव.  २) उद्योजकतेची किंमत नसणे.
 ३) स्तुतिपाठकांचा गराडा

महत्त्वाकांक्षेचा अभाव :
 लवकरात लवकर अधिकाधिक कमावण्याची जबरदस्त भूक हे पहिल्या पिढीतील उद्योगपतींचे स्वभाववैशिष्ट्य होते. स्व. धीरुभाई अंबानींंबद्दल त्यांचे पुत्र मुकेश लिहितात,‘त्यांना मुळीच दम धरवत नसे. प्रत्येक गोष्ट त्यांना ‘काल’ हवी असे आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.'
 उद्योगपतींच्या नव्या पिढीत या महत्वाकांक्षेचा अभाव आहे. धंद्याचा व्याप वाढवण्यापेक्षा आहे ते राखणे व त्याचा उपभोग घेणे, असा मर्यादित विचार ते करतात. त्यांची प्राथमिकता ‘धंदा’ नसून त्यातून मिळणारा पैसा ही असते. यामुळे उत्पादनक्षम संपत्तीचं निरुपयोगी मालमत्तेत रूपांतर होत राहतं.
 पार्ले शीतपेय कंपनी व टाटा-बिर्लांंच्या सिमेंट कारखान्यांची विक्री याच संकुचित संकल्पनेपोटी करण्यात आली. हे उद्योग सुरू असताना होणाऱ्या फायद्यापेक्षा ते विकून जास्त फायदा झाला, अशी सारवासारव करून ते चालवण्यात आलेल्या अपयशावर नव्या पिढीकडून पांघरूण घालण्यात आलं. खरा उद्योगपती प्रतिभावंत खेळाडूप्रमाणे असतो. तो खेळाच्या आनंदासाठी खेळतो. बक्षिसासाठी नाही.

उद्योजकतेची किंमत :
 हाडाचा उद्योगपती मालमत्ता कवटाळून बसण्यापेक्षा उद्योगाचा विस्तार व प्रगतीला महत्व देतो. त्याला 'स्पर्धा' जीव की प्राण असते. माझ्या एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ‘कोलगेट पामोलिव्ह'चे अध्यक्ष म्हणाले होते, ‘कोलगेट भारतातील पहिल्या क्रमांकाची टूथपेस्ट आहे. हे सर्वोच्च स्थान दैवगत्या लाभलेले नाही. घाम गाळून मिळवावे लागले आहे आणि एकदा ते मिळाल्यानंतर रोज मिळवावे लागत आहे. (म्हणजेच ते टिकविण्यासाठी रोज झगडावे लागत आहे)
 हाडाचा उद्योगपती असे झगडण्यासाठीच जगतो. स्पर्धेचं जणू त्याला व्यसनच लागलेलं असतं. स्पर्धा जितकी जास्त तितकी त्याची व्यावसायिक प्रतिभा फुलून येते. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारणे हे त्याचे जीवनध्येय असते. मात्र त्याची नवी पिढी हुजऱ्यांकडून मुजरे घेण्यात व छानछोकीत रमते. यशाची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी परिश्रमात बुडून जाण्याऐवजी ती गोल्फ कोर्स, शाही मेजवान्या आणि चैनीचे नवे मार्ग धुंडाळण्यात मग्न असते. परिणाम काय, तर जुन्या पिढीने स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी सुरू केलेले उपक्रम स्पर्धेपासून दूर पळण्यासाठी खुल्या बाजारात विकले जातात.
खुशमस्कऱ्यांची भूमिका :  उद्यमशीलतेच्या विनाशाच्या स्थानकाकडे चाललेल्या या प्रवासाचा वेग वाढवण्याचं काम खुशमस्करे व स्तुतिपाठक बजावतात.हांजी हांजी करून स्वतंची तुंबडी भरून घेणे हा त्यांचा ‘उद्योग' असतो. आपण सर्वश्रेष्ठ आहोत.सर्वसामान्यांप्रमाणे राबणे आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही अशी भावना ते करून घेतात. या ‘अहं’पणाबरोबरच नव्या पिढीला ते ‘रम, रमा व रमी’च्या नव्या विश्वात घेऊन जातात. तेथे जुन्या पिढीतील कर्मठ उद्योजकांनी हाडाची काडंं करून बांधलेलं संपत्तीच धरण फुटतं. त्या लोंढ्यात ही नवी पिढी पार वाहून जाते.
 एखाद्या उद्योगपतीला एकाहून अधिक वारसदार असतील तर परिस्थिती अधिकच बिकट होते. खुशमस्करे या वारसदारांना एकमेकांपासून अलग पाडतात. प्रत्येक वारसदाराचं स्वतःचं कोंडाळ बनतं. राजकीय पक्षांत असते तशी गटबाजी सुरू होते. हे गट एकमेकांना शत्रुसमान मानतात.जीवघेणी स्पर्धा इतर उद्योगांशी न होता आपसांतच सुरू होते. एकमेकांना नामोहरम करण्यासाठी सर्व उपायांचा अवलंब होतो. इतके दिवस जोपासलेल्या उद्योग साम्राज्याची छकले उडतात. दरवर्षी न चुकता गोमटी फळे देणाच्या झाडाच्या फांद्यांची मोजदाद व वाटणी सुरू होते. वृक्ष कोसळतो.
 उद्योगपतीला कन्या असतील तर त्या व त्यांच्या सासरंची मंडळी मैदानात उतरतात. भारतीय परंपरेनुसार मुलीची भूमिका घरापुरतीच मर्यादित असते. मात्र या कन्या व त्यांना पुढे करून त्यांंच्या सासरची मंडळी ‘धंद्यात'लक्ष घालू लागतात. हे सर्व लक्ष घालणं धंद्याच्या कल्याणासाठी नसून स्वतःला त्याचा मोठ्यात मोठा लचका कसा तोडता येईल यासाठी असते. काही मुली आपले भाऊ किंवा पतींपेक्षा स्वतःला जास्त सक्षम समजतात. पण अशी उदाहरणं दुर्मिळ. बहुतेक जणी कौटुंबिक उद्योगांची विल्हेवाट लावण्यालाच हातभार लावतात.
 उद्योगांची वाटणी कधीच सरळपणे करता येत नाही. त्यातील पुष्कळ मालमत्ता अशा स्वरूपात असते की, ती विकून त्याचा पैसा केल्याखेरीज वाटणी करणं शक्य नसतं. मग मालमत्ता विकण्यासाठी वारसदारांकडुन दबाव येतो. कारण उद्योगाच्या हितासाठी स्वतःच्या अधिकाराचा त्याग करण्यास कोणीच तयार नसतो. उत्पादनक्षम मालमत्तेचे पैशात रूपांतर होते. वारसदारांच्या कुतरओढीत व्यवसायाची वाट लागते.
 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोजक्याच महाराजांनी आपली संपत्ती उत्पादन वाढविण्यासाठी कारणी लावली. उरलेल्यांनी ती उपभोगली. त्यामुळे ती कालांतराने कमी कमी होत गेली. याच प्रकारे बड्या औद्योगिक घराण्यांचा भारताच्या औद्योगिक विकासातील वाटा दिवसेंदिवस घटत चालत आहे.कारण त्यांची संपत्ती नव्या पिढीतील ‘आधुनिक महाराजांच्या' तावडीत सापडली आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf