अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/दुसरं करिअर

विकिस्रोत कडून
यस्कर कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवून घेणं सध्याच्या काळात परवडण्यासारखं

नाही. असं करणं म्हणजे संस्थेच्या पैशाचां अपव्यय केल्यासारखं आहे. यामुळं संस्थेचा दुहेरी तोटा होतो. एक, पगाराचा पूर्ण मोबदला संस्थेला देण्याची त्यांची क्षमता नसूनही, ते ज्येष्ठ असल्याने त्यांना पगार मात्र पूर्ण द्यावा लागतो आणि दुसरा, वयपरत्वे त्यांच्या कामाची गती धिमी झाल्याने आर्थिक नुकसान होतं. याचा थेट परिणाम संस्थेच्या, एकंदर नीतिधैर्यावर होत असल्यानं त्यांची उपस्थिती संस्थेच्या हिताला बाधक ठरते.'
 हे उद्गार जुन्या पिढीवर संतापलेल्या एखाद्या 'अँँग्री यंग' कर्मचार्याचे असतील, असं आपल्याला वाटेल, पण तसं नाही. ते आहेत बोस्टन विद्यापीठातील एफ. स्पेन्सर बाल्डविन सुप्रसिध्द अर्थतज्ज्ञाचे. आणि तेही १९११ मधील!
 वयस्कर कर्मचाऱ्यांचंं काय करायचं हा प्रश्न युरोप-अमेरिकेत गेल्या शतकाच्या सुरुवातीपासूनच उद्भवला होता. कारण तेथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात होऊन अडीचशेहून अधिक वर्षांंचा कालावधी लोटला आहे. भारतात मात्र पाश्चिमात्य धतींचे उद्योग सुरू होऊन सव्वाशे वर्षांही झालेली नाहीत. सहाजिकच येथे ही परिस्थिती गेल्या १५ ते २० वर्षात निर्माण झाली आहे.
 याबाबत अनेक तज्ज्ञांनी भिन्न भिन्न मतं व्यक्त केली आहेत. उपायही सुचविले आहेत. तरीही या नाजूक प्रश्नाचं 'एक घाव दोन तुकडे' असं थेट उत्तर मिळू शकत नाही. याची दोन कारणं आहेत. एक अनेक वर्षे त्यांनी संस्थेला दिलेले योगदान आणि दुसरं, दीर्घकाळाच्या सेवेमुळंं संस्थेशी जुळलेले त्यांचे भावनात्मक संबंध.
 या दोन्ही कारणांचं निराकरण केवळ व्यावहारिक पातळीवरून आणि ‘गरज सरो वैद्य मरो'या (अ)न्यायानं करता येत नाही, याचा अनुभव अनेक संस्थांना आलेला आहे. शिवाय बऱ्याच औद्योगिक संस्थांचे स्वरूप असं असतं की, त्या केवळ तरुणाईच्या सळसळत्या उत्साहावर चालू शकत नाहीत. अनुभवांचीही आवश्यक असते. तो तरुण कर्मचाऱ्यांजवळ असेलच असं नसतं. शिवाय प्रत्येक वयोवृद्ध कर्मचारी कामाच्या बाबतीत शिथिल असेलच असंही नाही. तरुणांना लाजवेल अशा धडाडीने काम करणारे वयस्कर कर्मचारी संख्येने कमी असले तरी असतात. त्यामळे या बाबतीत सरकसट एकच नियम लावून चालत नाही. असं केल्यासही संस्थेचं नुकसान होण्याची शक्यता असते.
 तरीही सध्याच्या गळेकापू स्पर्धेच्या युगात तरुणांचं पारडं जड झाले आहे. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. त्यांच्या दृष्टीनं ही स्थिती कितीही नकोशी असली तरी ती वस्तुस्थिती आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. संस्था ही केवळ भावनेच्या आधारावर आणि कर्मचाऱ्याचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना फार काळ पोसू शकत नाही. कारण अन्यं कारणं कितीही सबळ असली तरी, आर्थिक नफा- नुकसान हा संस्थेच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असतो. त्यामुळं काळाची पावलं ओळखून वयस्कर कर्मचाऱ्यांनी आपल्या करिअरचं व्यवस्थापन केलं पाहिजे असा विचार सध्या उद्योगविश्वात दृढ होत आहे. यातुनच 'दुसऱ्या करिअर'ची संकल्पना आकार घेत आहे.
 विशेषतः विविध क्षेत्रांतील उच्चपदस्थांनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. अशा कर्मचाऱ्यांना पगार चांगला असल्यानं त्याचं जीवनमान उच्च असतं. निवृत्तीच्या वयापूर्वीच नोकरी गमवावी लागली किंवा निवृत्तीनंतर आर्थिक प्राप्ती कमी झाली तरी ‘लाईफ स्टाईल'मध्ये फारसा फरक पडू नये यासाठी उत्पन्नाचा ओघ कायम ठेवणं त्यांच्या दृष्टीनं गरजेचं असतं.
 इतिहासाकडे धावती नजर टाकली असता असं दिसून येतं की, मानवी संस्कृतीची पहिली काही हजार वर्षे धर्मापासून राजसत्तेपर्यंत व व्यवसायापासून कुटुंबापर्यंत सर्व सत्तास्थानं वृध्दांच्या हाती होती. किंबहुना 'वृध्दत्व' ही अधिकारप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची गुणवत्ता मानली जात होती. त्यांनी सत्ता गाजवायची, आपल्या प्रजेची काळजी वाहायची आणि तरुणांनी त्यांच्या आज्ञेत राहावयाचं अशी जनरीत होती.
 त्या काळी राजसत्तेपासून घराण्याच्या व्यवसायापर्यंत सर्व गोष्टींचं तंत्रज्ञान वृद्ध पिढीकडून तरुणांना मिळत असे. त्यामुळे ते मिळविण्यासाठी तरुण पिढीला वडिलधाऱ्यांंच्या अधिकाराखाली राहणं अनिवार्य असे. वडिलोपार्जित उद्योग,शेतीवाडी,पशुपालन आदींच्या तंत्रज्ञानात बदल होत नसे. हजारो वर्षे ते एकाच पध्दतीने करण्यात आले. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होणार, सुताराचा मुलगा सुतार तर वैद्यांचा वैद्य, हे त्याच्या जन्मापासून ठरलेलं असे. त्यामुळे बुजुर्ग कुटुंबप्रमुखांकडून व्यवसाय चालविण्याचं ज्ञान घेणं, त्यानुसार व्यवसाय चालवणंं आणि आपल्या वृध्दपणी आपल्या मुलाला ते ज्ञान देणं अशी रीत पिढ्यानपिढ्या चालू राहिली. त्या काही बदलांपेक्षा टिकाऊपणाला महत्त्व अधिक होतं.  अडीचशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने काही दशकात या हजारो वर्ष चालत आलेल्या परंपरेची कंबर मोडली. कारखानदारीमुळंं शेती व्यवसायाचंं महत्त्व कमी झालं. नवं तंत्रज्ञान विकसित झालं. त्यामुळे नवे व्यवसाय उदयास आले. त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान कुटुंबाच्या बाहेरून आणणंं भाग पडू लागलं. पिढीजात सवयी बदलणंं आवश्यक झालं. औद्योगिक क्रांतीबरोबरच आधुनिक शिक्षणाचा प्रसार झाला. आपल्या आवडीप्रमाणंं घ्यावं आणि त्याला अनुरूप व्यवसाय चालू करावा, अशी नवी समाजरचना निर्माण झाली. एकंदर, औद्योगिक व व्यवसायात्मक घडामोडींचा वेग कमालीचा वाढला. नित्य नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन उत्पादनंं तयार करून बाजारात आणण्याचा सपाटा उद्योगांनी सुरू केला. त्यामुळंं अनुभवांपेक्षा नावीन्याला, ताजेपणाला अधिक किंमत प्राप्त झाली.
 परिणामी, ‘जुनं ते सोनं' ही म्हण कालबाह्य ठरली. विकसित जगात सुरू झालेले है परिवर्तन कालांतराने विकसनशील जगातही पसरलं. वृद्ध असणंं किंवा दिसणंं कमीपणाचे मानलंं जाऊ लागलं. एकत्र कुटुंब पध्दतींंचा नाश झाल्यानंतर तर वृध्दांची अवस्था अधिकच बिकट बनली.
दुसऱ्या करिअरची संकल्पना :
 विज्ञानाने माणसाचं मरण काही वर्षे पुढे ढकललेलं आहे. सुखवस्तू व्यक्तीची पंचाहत्तर वर्षांपूवींची सरासरी आयुर्मर्यादा ६५ वर्षे होती. ती आता ८० च्या घरात गेली आहे. शास्त्रज्ञांनी माणसांचं आयुष्य वाढविण्याकडे लक्ष केंद्रित केलं असलं तरी समाजशास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि समाज यांनी या आणि वाढीव आयुष्याचं काय करायचं याबाबत कोणतेच दिशानिर्देश उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यातच असलेली नोकरी किती वर्षे टिकेल याचीही शाश्वती नसल्याने ५८-६० व्या वर्षापूर्वीच निवृत्ती स्वीकारावी लागली तर उर्वरित आयुष्य कसं ‘घालवायचं’ ही समस्या अनेकांपुढे आ वासून उभी आहे.
 दुसरं करिअर हा यावर उपाय आहे. याची सुरुवात आपल्या पहिल्या करिअरच्या कालावधीतच करावी लागते. व्यवस्थापनशास्त्राचे जगप्रसिध्द गुरु पीटर ड्रकर यांच्या सूचनेनुसार नोकरीतील उच्चपदस्थानं पन्नाशीला आल्यानंतर दुसरं करिअर करण्याच्या दृष्टीनं पायाभरणी करून ठेवण्यास सुरुवात करावयास हवी, म्हणजे निवृत्तीच्या वयापर्यंत तो त्यात पदार्पण करण्यास सज्ज होतो.
 क्रिकेटमध्ये जसं केवळ पहिल्या ‘इनिंग'मध्ये चांगली फलंदाजी करून चालत नाही. दुसरी इनिंगही तितकीच, कित्येकदा त्याहूनही अधिक महत्त्वाची असते. कारण सामना चुरशीचा असेल तर दुसया इनिंगमधील धावसंख्येवर सामन्याचा निकाल ठरतो. व्यावसायिक आयुष्याचा सामना जिंकायचा असेल तर करिअरची ही दुसरी इनिंग तितक्याच जोमानं खेळायची तयारी हवी.
 दुसऱ्या करिअरची तयारी पहिल्या नोकरीतून निवृत्त होण्यापूर्वी दहा वर्षे सुरू केली पाहिजे. पहिल्या करिअरचा आधार शिक्षण हा आहे. दुसऱ्या करिअरचा पायाही शिक्षण आहे. वाढत्या वयात नवा विषय शिकायला जमेल की नाही अशी शंका कित्येकांना वाटते. पण अनेकांचा अनुभव असा आहे की, हे काम अधिकच सोपं आहे.
 वाढत्या वयाबरोबर आपल्याला आपले गुण, दोष, वैशिष्ट्य आणि आपली मर्मस्थानं चांगली समजलेली असतात. त्यामुळंं कोणत्या क्षेत्रात आपण पाय रोवू शकतो याचा अचूक अंदाज आलेला असतो. शिवाय अनेक वर्षे नोकरीत व्यतीत केल्यानं अनेकांशी व्यक्तिगत संबंध आलेले असतात. जगाच्या बाजारात आपण कुठं उभे आहोत, आपली उपयुक्तता कितपत आहे याचीही कल्पना त्यांना आलेली असते. त्यामुळंं दुसऱ्या करिअरसाठी क्षेत्र निवडणं आणि त्याचंं ज्ञान घेणंं सुलभ होतं. मात्र, याकरिता थोड्या आत्मपरीक्षणाची गरज असते.
 तरुणपणी आपल्याला शिक्षणासाठी जितका वेळ उपलब्ध होता, तितकाच तो उतार वयात मिळू शकतो हे लक्षात घेतलं तर दुसऱ्या करिअरमध्ये यश मिळवणंं अवघड नाही. फक्त करिअरची दिशा वयोमानाप्रमाणंं बदलावी लागते.
 तरुण वयात शतकं ठोकणारा गावस्कर आता फलंदाजी करू शकत नाही, पण त्याचं समालोचनही त्याच्या फलंदाजीइतकं बहारदार असतंं असा आपला अनुभव आहेच. रवी शास्त्रीनंंही तोच मार्ग अवलंबला. एकेकाळचा गाजलेला स्पिनर वेंकटराघवन आता गोलंदाजी करू शकत नाही, पण त्याने पंच म्हणून दुसऱ्या करिअरला सुरुवात केली.
 सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात शारीरिक शक्तीपेक्षा बौध्दिक शक्तीला जास्त महत्व प्राप्त झालंं आहे. त्यामुळंं हातापायांतील ताकद कमी झाली, आता आपलं कसं होणार याची चिंता करण्याचा काळ आता सरला आहे.
 सारांश, नोकरीतील अस्थिरता आणि वाढतं आयुष्यमान या दुहेरी अडचणीमुळं बावचळूून जाण्याचंं किंवा धीर सोडण्याचं करणाच नाही. प्राप्त परिस्थिती आणि आपल्यातील कलागुण यांची योग्य सांगड घालून दुसऱ्या करिअरचंं नियोजन केलं तर आयुष्याचा सरता काळही यशाच्या झळाळीनं उजळून निघणंं अशक्य नाही.