अंगारमळा/मुशीतील आचेने सिद्ध झालेले कार्यकर्ते

विकिस्रोत कडून

मुशीतील आचेने सिद्ध झालेले कार्यकर्ते


 २० एप्रिलला मी दिल्लीत होतो. माझ्यापर्यंत निरोप यायला उशीर झाला. आंबेठाणहून मला फोन आला, 'गुरुजी गेले'. पन्नास वर्षांपूर्वी हेच दोन शब्द मी ऐकले होते. सानेगुरुजींनी जळगावमध्ये विष खाऊन आत्महत्या केली. त्या वेळीही सेवादलाच्या सैनिकांपुढे हे दोनच शब्द आले होते - 'गुरुजी गेले.'

 श्रद्धांजली, श्रद्धांजली म्हणून माणसाकडून जी काही वाहिली जाते ती बातमी कळल्यानंतर पहिल्या दहा सेकंदांत वाहिली जाते. हे माणूस आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही; त्याचं चालणं कसं, त्याचं बोलणं कसं, त्याचं सलगी देणं कसं हे पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्याच्या आणि आपल्या ओळखीचा, सहवासाचा सगळा चित्रपट त्या पहिल्या दहा सेकंदांत आपल्या डोळ्यासमोर उघडून जातो. ओळख कोठे झाली, त्याची काय काय वैशिष्ट्ये दिसली, आपल्यावर त्याचा काय प्रभाव पडला त्याचे सिंहावलोकन ही खरी मनोमनची श्रद्धांजली त्या पाचदहा सेकंदांत वाहिली जाते आणि मग, औपचारिकरीत्या आपण सगळे एकत्र जमतो, आपल्या आठवणी दुसऱ्यांना सांगतो, दुसऱ्यांच्या आठवणी ऐकून घेतो. तो एक औपचारिक बुडबुडे काढण्याचा भाग असतो, त्याच्यात आपल्या दु:खावर थोडं मलम लागतं आहे का याचा थोडा तपास असतो.

 मी सकाळी शेवाळेगुरुजींच्या घरी गेलो. त्यांच्या वृद्ध आई काठी टेकीत टेकीत आल्या आणि मी त्यांना सहज म्हटलं, "या वयामध्ये एवढा मोठा कर्तासवरता मुलगा जाणं याच्याएवढं मोठं दु:ख कोणतं नाही." पण मग पटकन माझ्या लक्षात आलं, की आपण शेवाळेगुरुजींच्या आईवर फार कठीण वेळ आहे, असं म्हटलं तर त्याहीपेक्षा कठीण वेळ माझ्यावर आली आहे. आता गुरुजींना श्रद्धांजली वाहताना अनेकांनी म्हटलं, की शेवाळेगुरुजी हे शेतकरी आंदोलनातील एक गुरू होते. म्हणजे एका तऱ्हेने पात्रता नसताना, गोविंदाची भूमिका माझ्याकडे येते. त्या गोविंदाची अवस्था, प्रत्यक्षात आपला शब्द जगभर पसरवणारा गुरू जगातून नाहीसा झाला तेव्हा किती कठीण झाली असेल?

 माझी अशी अवस्था होऊ नये अशी माझी फार इच्छा असते. दोन वर्षांपूर्वी मी स्वत: आजारी होतो. आपल्यापैकी अनेकांनी मला त्यावेळी त्या अवस्थेत पाहिले आहे, सेवा केली, मदत केली. त्या वेळी मला असं वाटत होतं, की या आजारातून मी काही

आता उठत नाही. तेव्हा जर का मला असं वाटलं असतं, की यापुढे आपण उठून काय करणार आहोत तर ज्यांना आपण पंचवीस वर्षे लहानाचे मोठे झालेले पाहिले त्यांची काय अवस्था झाली असती? गुरुजी बुलडाण्याचे; पण प्रत्येक जिल्ह्यात असे एकदोन तरी गुरू आहेत. त्यांच्यामुळे ही शेतकरी संघटना उभी आहे. त्यांच्यापैकी काही कार्यकर्ते माझी भेट झाली तेव्हा दहावीबारावीत शिकत होते, काही कॉलेजमध्ये जात होते. बहुतेकांची अजून लग्नं व्हायची होती. त्या सगळ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये काम करताना, पुढे येताना मी पाहिलेले आहे. त्यांची लग्नं लागली. लग्न झाल्यानंतर त्यांच्या नवपरिणत पत्नींच्या तक्रारी मी ऐकल्या आहेत. "यांनी लग्नं कशाला केली? हे तर सारखे शेतकरी संघटनेच्या कामासाठी गावोगाव धावत असतात. घरसंसार कसा काय व्हायचा?" त्यांची समजूत घालण्याचंही काम मी केलं आहे आणि ही अशी मुलं डोळ्यसमोर गेलेली पहण्याकरिताच जर आयुष्य राहिलेलं असेल तर त्या आयुष्यात काही फारसा अर्थ नाही असं मला शेवाळेगुरुजींच्या वृद्ध आईचं सांत्वन करताना खरोखरच वाटलं.  शेवाळेगुरुजींच्या आठवणी सांगा असं मी इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना म्हटलं. कारण श्रद्धांजलीच्या भाषणात महात्मा, कार्यकर्ता, निष्ठावान वगैरे शब्द वापरले म्हणजे त्या शब्दांतून माणसाच्या अंतर्मनाचा काही फारसा परिचय होत नाही. सर्वांनी अनेक आठवणी सांगितल्या; पण गंभीरपणे काम करणारे, गावात जाऊन दवंडी पिटण्यापासून, सतरंज्या घालण्यापासून, लाऊडस्पीकर्स जोडण्यापासून शेवटचं भाषण करून पुन्हा घोषणाही देणारे शेवाळेगुरुजी हे स्वभावाने गोड, विनोदी, चेष्टेखोर, मिश्किल होते. हा अनुभव मला आला आहे; दुसऱ्या कोणाला आला किंवा नाही कोणास ठाऊक?

 मी बुलडाण्यात आलो म्हणजे नेहमी म्हणतो, की हा बुलडाणा जिल्हा म्हणजे एक चमत्कार आहे. १९८५ मध्ये कापसाचं आंदोलन सुरू व्हायचं होतं तेव्हा सीआयडीचे एक साहेब वर्ध्याला मला भेटायला आले. त्यांनी विचारले, की उद्यापासून तुमचा 'रास्ता रोको' चालू होणार तर कोणकोणत्या जिल्ह्यांत किती लोक रस्त्यावर येतील याचा अंदाज सांगा. आम्हांला निदान तुरुंगाची व्यवस्था करायला पाहिजे. मग मी त्यांना चंद्रपूरपासून सुरुवात करून प्रत्येक जिल्ह्याचे अंदाज सांगू लागलो. सगळं सांगून झाल्यानंतर ते मला विचारू लागले, "बुलडाण्याचं काय? तुम्ही बुलडाण्याचं नाव नाही घेतलं." त्या वेळी बुलडाण्याची परिस्थिती अशी होती, की १९८० मध्ये ज्यांनी या जिल्ह्यात काम सुरू केलं होतं ते निवडणुकीच्या काळात काही वादविवाद झाल्यामुळे

आपल्यापासून दूर झाले होते. त्यामुळे, "सध्या बुलडाण्यात आमचं काही काम नाही, तेव्हा बुलडाण्यात काही फारसं मोठं आंदोलन होईल असं काही मला वाटत नाही." असं मी त्या अधिकाऱ्यांना म्हटलं. ते हसले; त्यांना बहुतेक त्यांच्या खात्याकडून आधी माहिती मिळाली असणार, की बुलडाण्यामध्ये फार प्रचंड आंदोलन होणार आहे आणि मी नागपूरच्या तुरुंगात गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की तेथील बराकीपैकी तीन बराकी फक्त बुलडाण्याच्या सत्याग्रहींनीच भरलेल्या आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो, की बुलडाणा हा चमत्कारांचा जिल्हा आहे.

 बुलडाण्यात असे चमत्कार कसे शक्य होतात? बुलडाण्यातील बहुतेक कार्यकर्ते स्वत:ची मोटारसायकलसुद्धा नसलेले असे आहेत; ज्या थोड्यांकडे आहेत तेसुद्धा आपल्या मोटारसायकली रॉकेलवर चालवू शकतात इतपतच आर्थिक ताकद असलेले आहेत. एखाद्या सभेसाठी, कार्यक्रमासाठी बाहेर जायला निघताना परत येईपर्यंत घरामध्ये भाकरीची सोय आहे किंवा नाही हे बायकोला विचारून घ्यावं लागतं. समोर साधनं नाहीत, हाती वर्तमानपत्रं नाहीत, हँडबिलं वाटायची म्हटली तरीसुद्धा हाती पैसे नाहीत. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत गावागावात जायचं तर हा प्रदेश कसा आहे? धड विदर्भात नाही आणि धड मराठवाड्यात नाही. त्यामुळे या जिल्ह्यातले लोक मराठवाड्यातल्या लोकांना आपले वाटत नाहीत आणि विदर्भातल्या लोकांनाही फारसे आपले वाटत नाहीत. अशा प्रदेशामध्ये अशी ही साधनरहित कार्यकर्ती मंडळी फिरतात आणि एवढं मोठं काम उभं होतं कसं काय, असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यावर मला एकदा शेवाळेगुरुजी म्हणाले, "तुम्ही चेष्टा करता आहात आमची. तुम्हाला माहीत नाही होय, बुलढाण्यात कसं काय काम होतं ते?" मी म्हटलं, "नाही, खरंच समजत नाही." तेव्हा ते म्हणाले, "अहो, तुम्हीच आम्हाला समजावून सांगितलं, की बाजारपेठेमध्ये व्यापारी एकत्र येतात आणि बाजारपेठेत नेमकी अशी एक किंमत ठरते, की त्या किमतीमध्ये उत्पादकांचा जेवढा मालाचा पुरवठा तेवढाच ग्राहकांच्या मागणीचा रेटा असावा अशी व्यवस्था तयार होते." खरं आहे. त्या काळच्या भाषणांमध्ये मी अर्थशास्त्रातला एक अत्यंत कठीण गणिती सिद्धांत साध्या मराठी भाषेत समजावून सांगितला होता. "एखाद्या गजबजलेल्या घरामध्ये एखादं नवविवाहित जोडपं असलं, की त्या दोघांचं ठरलेलं असतं, की सगळ्या लोकांना चुकवून जितकं जमेल तितकं कुठंतरी भेटायचं. मग, ती सगळी मंडळी हजर असतानासुद्धा डोळ्याच्या नुसत्या एका कटाक्षाने किंवा चेहऱ्यावरील एखाद्या स्नायूच्या हालचालीनेसुद्धा पाच मिनिटांनी मी अमक्या अमक्या नारळाच्या झाडाखाली

जाणार आहे,' असा निरोप ते देऊघेऊ शकतात. अशीच संपर्क व्यवस्था बाजारपेठेच्या या घटकांमध्ये असते आणि त्यामुळेच बाजारपेठेची व्यवस्था यशस्वी होते. पण, बाजारपेठेतील तीच माहिती आकड्यांमध्ये कागदावर मांडली आणि सचिवालयात पाहोचली, की ती मेलेली असते, त्यामुळे नियोजन हे अयशस्वी होतं आणि बाजारपेठ यशस्वी होते." असा हा सिद्धांत मी समजावून सांगितला होता. गुरुजी म्हणाले, "बुलडाण्यात हेच झालं. इथं सर्व शेतकऱ्यांच्या पोटामध्ये दु:ख आहे आणि त्या दुःखावर जे औषध आहे ते तुमच्या शब्दांत सांगणारे आम्ही गेलो की प्रेमात पडलेल्या माणसाला जसं एकमेकांकडे नुसतं पाहिलं तरी मनातील विचार समजातो, तसं बुलडाण्यामध्ये आम्ही ज्या ज्या गावांत गेलो तिथं भाषणंसुद्धा निमित्तमात्र झाली. शरद जोशींची माणसं आली असं म्हटल्यानंतर डोळ्याला डोळे भिडल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं, की आपण जे काही शोधत होतो ते गवसलं आणि म्हणून बुलडाण्याचे कार्यक्रम नेहमी यशस्वी होतात."

 हे साधं गूढ सांगणारा मनुष्य कोण ? अर्थशास्त्राचा पदवीधर नाही, शाळेमध्ये शिकविणारा साधा मास्तर. प्रत्यक्ष श्रीकृष्णालासुद्धा प्राकृतामध्ये अर्थ सांगणारा ज्ञानेश्वर एकच भेटला. माझं भाग्य असं, की जे काही अर्थशास्त्र मी सांगितलं ते लातूरमध्ये अर्धवट कानडी, अर्धवट मराठी,अर्धवट उर्दू अशा भाषेत सांगणारा एक 'पाशा पटेल' नावाचा ज्ञानेश्वर मला भेटला, बुलडाण्याच्या भाषेत सांगणारा एक 'गुरुजी' भेटला. प्रत्येक जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर प्रत्येक राज्यामध्ये खुल्या बाजारपेठेचं हे अत्यंत गहन अर्थशास्त्र; जेव्हा जगामध्ये कोणीही ते मानायला तयार नव्हतं, तेव्हाही सांगणारे ज्ञानेश्वर भेटले आणि तेसुद्धा भगवद्गीतेची जडजंबाळ भाषा टाकून साध्या, जनसामान्यांच्या भाषेत सांगणारे जे लोक मला भेटले त्यांत गुरुजी एक होते.

 सानेगुरुजींनाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जीव नकोसा झाला आणि त्यांनीही विष खाऊन आत्महत्या केली. जगामध्ये सात्त्विक सात्त्विक म्हणून काही असेल, सोज्वळ सोज्वळ म्हणून काही असेल, शांत प्रकृतीचं म्हणून काही असेल तर त्या सगळ्यांची मूर्ती म्हणजे सानेगुरुजी. शेवाळेगुरुजी शांत होते. विनोदी होते; पण ते काही सानेगुरुजी नव्हते हे नक्की. या दोन भिन्न प्रकृतींच्या माणसांमध्ये एक समानता होती. साने गुरुजींची त्यांच्या कार्यावर जेवढी निष्ठा आणि प्रेम होतं, तेवढी निष्ठा आणि प्रेम, कदाचित् त्याहीपेक्षा जास्त निष्ठा आणि प्रेम शेवाळेगुरुजींनी शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल बाळगली. मग प्रश्न असा पडतो, दोघांपुढेही अशी कोणती समस्या उभी राहिली, की

ज्यामुळे त्यांना जीवन असह्य व्हावं. जर का शेवाळेगुरुजींनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही मला भरभरून देत असाल तर माझ्या कार्यकर्त्यांना इतकी बिकट अवस्था सोसावी लागली, अशा दुर्धर जीण्याला सामोरं जावं लागावं याची जबाबदारीही माझ्यावर येते.

 कोणताही पक्ष किंवा संघटना आपल्या कार्यकर्त्यांच्या चरितार्थाची, उपजीविकेची काहीतरी सोय करतो. मी या बाबतीत नालायक ठरलो हे कबूल करायला हवं. आपल्या कार्यकर्त्यांनी घरामध्ये सगळ्या अडचणी सोसून, धावपळ करून जर का हे काम निभावलं तरच, जशी सोन्याला आच लागली तरच त्याची परीक्षा होते तशी, खरी परीक्षा होईल आणि आपण जो काही विचार सांगायला निघालो आहोत तो लोकांपर्यंत ते पाहोचवतील असं मानायचं काही कारण नव्हतं. पण, वर्षानुवर्षे लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या संघटनेला आर्थिक बळ मिळवायचं कोठून? मनात खंत वाटे. त्यावर शेवाळेगुरुजी म्हणायचे, "तुम्हाला काय वाटतं, आम्हाला तुमचे शब्द लोकांपर्यंत पाहोचवता येणार नाहीत? साधनांनी संपन्न लोक तुमच्याबरोबर येऊन भाषणं करून दाखवतील पण लोकांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हीमात्र लोकांसमोर तुमचे विचार ठेवले, की ते त्यांच्या मनाला भिडतात; कारण आमचं सोनं मुशीच्या आचेतून तावूनसुलाखून सिद्ध झालेलं आहे; हिणकस सोन्याला त्याची कधी बरोबरी करता येणार नाही."

 कार्यकर्त्यांच्या चरितार्थाची, उपजीविकेची काही सोय कण्याची व्यवस्था उभी करणे ही माझी जबाबदारी आहे हे खरे; पण, एक दिवस, कदाचित गोविंद गुरुजींची जागा घेईल आणि त्या वेळी तुम्हावर अशीच श्रद्धांजली वाहण्याची पाळी येईल. माझी अशी इच्छा आहे, की यापुढे जो काही चळवळीचा प्रयत्न करायचा तो आपल्या कार्यकर्त्यांनी काहीतरी खंबीर व्यवस्था करूनच चालवायचा आहे एवढाच निश्चय त्या वेळी तुम्ही करावा.

 स्वातंत्र्य मिळालं तरी सानेगुरुजी गेले. ज्या स्वातंत्र्याकरिता आपण एवढं आंदोलन केलं, त्याग केला ते हेच का स्वातंत्र्य? हा प्रश्न त्यांना टोचत असावा. मला अशी शंका येते, की गेली पंचवीस वर्षे शेतकऱ्याच्या सन्मानाकरिता आंदोलन करता करता 'केवळ आमच्या हातापायातल्या बेड्या काढा आणि मग दाखवतो आम्ही काय करू शकतो ते' या निर्धाराचा संदेश गावोगाव पोहोचविणाऱ्या शेवाळेगुरुजींना अलीकडची वर्तमानपत्रं पाहिली, कानावर ज्या बातम्या येतात त्या ऐकल्या म्हणजे खरंच दु:ख होत असावं. आम्ही शेतकऱ्यांचे पुढारी आहोत असं म्हणणारी माणसं जेव्हा म्हणू लागतात, "आपण जर का निर्यात खुली केली, आयात खुली केली तर आमचं कसं काय धड चालायचं?

तेव्हा, आम्हाला तुमचं स्वातंत्र्य नको. आम्हाला तुमचा सन्मान नको. त्याऐवजी आम्हाला तुमचं संरक्षण द्या, आमचा बचाव करा." म्हणजे कसाई बकरी घेऊन चालला आहे आणि बकरीला सुटायची संधी मिळाल्याबरोबर कसाई त्या बकरीला म्हणतो, 'कोठे जातेस पळून? बाहेर गेलीस तर तुला लांडगा खाईल. माझ्या दोरीला बांधून घे, एकदाच काय ती सुरी चालायची ती चालेल.' या पद्धतीने शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे लोक 'आमचा शेतकरी जगातल्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करायला उतरणार नाही, तशी त्याची पात्रता नाही, त्यापेक्षा त्याला सरकारने संरक्षण दिले. तर त्याच्यातच आनंद मानेल' असे म्हणताना आणि त्यांच्याबरोबरीने शेतकरी संघटनेत काही काळ काढलेले कार्यकर्तेही तसेच म्हणताना पाहिल्यानंतर शेवाळेगुरुजींची स्थिती सानेगुरुजींसारखीच झाली असावी.

 तेव्हा, ही लढाई चालू ठेवणे यापलीकडे जास्त कोणती श्रद्धांजली नाही. पण, शेवाळेगुरुजींच्या मनामध्ये शतेकरी संघटनेवर नितांत निष्ठा होती. "हिंदुस्थानातील शेतकरी जगातील कोणत्याही शेतकऱ्यापेक्षा कमी नाही, हिंदुस्थानातल्यासारखा चांगला सूर्यप्रकाश कोठे नाही, हिंदुस्थानात मुबलक पाणी आहे. तेंव्हा, जगाशी टक्कर झाली तर ती टक्कर आम्ही देऊ शकतो. आम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही, आमच्या हातापायात बेड्या घातल्या आहेत, त्या काढा आणि आमचा पराक्रम पहा." ही जी शेवाळेगुरुजींची निष्ठा होती, त्यातील एक कण जरी आपण आपल्या मनात बाणून येथून गेलो तर शेवाळे गुरुजी नसताना, येत्या काही काळामध्ये ज्या काही मोठ्या लढाया द्याव्या लागणार आहेत, त्यांतही आपण यशस्वी होऊ. त्यासाठी जी काही तयारी करावी लागणार आहे त्या तयारीच्या वेळी शेवाळेगुरुजींची स्मृती आपल्याला स्फूर्ती देवो आणि शेतकऱ्यांना सन्मानाने व सुखाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम राबवण्यासाठी अधिक बळ मिळो, अशी प्रार्थना करतो.


 

(शेतकरी संघटक दि. २१ मे २००१)

■ ■