Jump to content

अंगारमळा/दोन मनस्वी माणसे

विकिस्रोत कडून

दोन मनस्वी माणसे


 महत्त्वाच्या घटना सहसा एकाकी घडत नाहीत. आनंदाच्या सुखदायक घटना 'जवापाडे' असल्यामुळे एकट्यादुकट्या फिरत असतात. मनाला चटका लावून देणाऱ्या दु:खद गोष्टी मात्र टोळीटोळीने फिरतात आणि एकदम कडाडून पडतात. 'देनेवाला जब भी देता है, पूरा छप्पर फाडके देता है,' हा अनुभव फार दुर्मिळ भाग्यवंतांना येत असेल. 'पण, पाऊस सरींनी येत नाही, मुसळधार कोसळतो - It never rains, it pours हा अनुभव अनेकांना आहे.

 ८ मे २००२ हा असाच दु:खद घटनांचा वर्षाव करणारा ठरला. एकाच दिवशी दुर्गाबाई भागवत आणि मनोहर आपटे यांच्या निधनाची बातमी कळली. दुर्गाबाई ९२ वर्षे वयाच्या झालेल्या, म्हणजे एक पिढी आधीच्या. त्यांचे जाणे समजण्यासारखे आहे. पण, मनोहर आपटे जवळपास माझ्या वयाचे. अगदी अलीकडे अलीकडेही आंबेठाणला येऊन गेलेले; आल्या आल्या घरात उपस्थित असलेल्या सर्वांच्या हाती प्रसन्न मुद्रेने एक एक गुलाबाची कळी देऊन गेलेले. मनोहरपंतांच्या मृत्यूच्या बातमीवर तर विश्वासच बसेना. आम्हा दोघांचे अनेक स्नेहसंबंधी; त्यांपैकी कोणीही अक्षरानेदखील मनोहरपंत आजारी असल्याचे कळविले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा धक्का अधिक हादरविणारा झाला.

 दुर्गाबाई भागवत आणि माझा प्रत्यक्ष परिचय अगदीच चुटपूट. सिडेनेहॅम कॉलेजात असताना मी त्यांना एका भाषणासाठी बोलाविले होते. एशियाटिक ग्रंथालयात कधी जाणे झाले तर दुर्गाबाई म्हणजे तेथील स्थावर वाचक; त्यांच्या वाचनसमाधीचा भंग करण्याची हिंमत मला कधी झाली नाही. तरीही, दुर्गाबाई हा व्यासंग, वाणीतील प्रसाद, लालित्य आणि त्याबरोबर रणदुर्गेचा लढाऊपणा यांबाबतीतला माझ्या पिढीच्या जीवनातील आदर्श.

 १९५४-५५ मध्ये आम्ही त्यांना सिडनेहॅम कॉलेजमध्ये भाषणासाठी बोलावले. मध्य प्रदेशातील एका जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन, इतिहास, संस्कृती, राहणीमान यांविषयी बाई बोलल्या. रस्त्याने खाली बुंधा आणि वर हिरवळ असे दिसले, की झाड म्हणायचे इतपतच वनस्पतिसृष्टीशी संबंध असलेल्या आम्हाला बाईंनी इतक्या वेगवेगळ्या वृक्षांशी, वनस्पतींशी परिचय घडवून दिला की सारे सभागृह भारून गेले. त्यांचे भाषण

म्हणजे व्यासंगपूर्ण माहितीचा प्रसादपूर्ण धबधबा.

 आदिवासी प्रदेशातील एका जुन्या देवळात अभ्यासाकरिता गेल्याची आठवण त्यांनी सांगितली. तेथील शंकराच्या पिंडीपुढील नंदीला स्त्रियांनी हात लावायचा नाही असा तेथील नियम; हात लावला तर बाईला मूल होत नाही अशी समजूत. कोणताही अभिनिवेश न ठेवता त्यांनी सहज म्हणून टाकले, "माझ्या बाबतीत असा काहीच धोका नसल्यामुळे मी स्पर्श केला." एका साध्या वाक्यात बाईंनी आपल्या एकाकी आयुष्याचा एखाद्या शंकराचार्यांच्या तटस्थ वृत्तीने असा काही उल्लेख केला, की साऱ्यांची मने हेलावून गेली.

 आमचे प्राचार्य एस.के. मुरंजन बँकिंग विषयातील तज्ज्ञ. दलित आणि वनवासी समाजाचा त्यांचा व्यासंग फार मोठा. या विषयावरील त्यांच्या लिखाणाकरिता ते प्रसिद्ध आहेत. भाषणानंतर बाईंचे आभार त्यांनी थोडक्यात मानले. आभाराच्या भाषणात शेवटी ते म्हणाले, "एवढी विद्वता, कर्तृत्व, प्रसाद मूर्तिमंत समोर पाहिल्यानंतर माझ्यासारख्या अश्रद्ध माणसालासुद्धा वाटून गेले, की बाईंनी आदिवासींच्या देवळातील नंदीला हात लावायला नको होता." त्या काळात असा शेरा थोडा आगतुंकच. सारी सभा हास्यकल्लोळात बुडून गेली आणि बाईंनी- त्या वेळी त्यांचे वय ४५ च्या आसपास असणार- स्त्रीसुलभ संकोच आणि कर्तन्यनिष्ठ कठोर तटस्थपणा या दोघांचे असे काही अजब मिश्रण केले, की समोर बसलेल्या तरुण विद्यार्थीविद्यार्थिनींची आयुष्ये उजळून गेली.

 आणीबाणीच्या शेवटच्या काळात मी हिंदुस्थानात परतलो. बांगलादेशच्या लढाईनंतर 'दुर्गा' म्हणून गाजलेल्या इंदिरा गांधी यांनी भ्रष्टाचार आणि सत्तापिपासा झाकण्यापोटी आणीबाणी लादली. हजारो विरोधकांना तुरुंगात डांबले. सक्तीच्या कुटुंबनियोजनासाठी सरकारी गाड्या गावोगाव फिरू लागल्या. सगळीकडे दहशतीचे वातावरण होते. मुंबईच्या विमानतळावर उतरून मी दादर स्टेशनवर पुण्याच्या गाडीत चढलो. या गाडीतील प्रवासी सतत तारस्वराने राजकारणाचा काथ्याकूट करण्याकरिता आणि चढत्या स्वरात आपली मते आग्रहाने मांडण्याकरिता प्रसिद्ध; पण त्या दिवशी कोणी एक चकार अक्षरसुद्धा बोलत नव्हते. इतर देशांतील हुकूमशहांच्या तुलनेने पाहिले तर येथील सरकारी दडपशाही अगदीच हलकीफुलकी; पण तेवढ्यानेही तमाम प्रजा भयभीत झालेली होती. वरून आलेल्या लाथा माथी झेलणे आणि खालच्या लोकांवर लाथा झाडणे हे ज्यांचे ब्रीद असे बुद्धिजीवी आणि नोकरशहा यांची तर खरोखरच पाचावर धारण बसलेली. विरोधाचा शब्दही कोणी काढण्यास तयार नाही. पुढे, आणीबाणीच्या शेवटी निवडणुका जाहीर

झाल्या तेव्हा, आजकाल ध्येयनिष्ठेच्या वारेमाप आरोळ्या ठोकणारे शरद पवार एका प्रचारसभेत म्हणाले, "विरोधकांना आम्ही तुरुंगातून सोडले आहे ते तुरुंगाची रंगरंगोटी करायला सवड मिळावी म्हणून. निवडणुका आटोपल्या म्हणजे सारे विरोधक पुन्हा तुरुंगात जातील." सारा हिंदुस्थान निर्वीर्य झालेला. त्या वेळी एक वीरांगना उठली, कऱ्हाड येथील मराठी साहित्य संमेलनात बोलली, एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रभर गावोगाव जाऊन आणीबाणीविरोधी प्रचाराची रणधुमाळी दुर्गाबाईंनी उठविली. महाराष्ट्रात काँग्रेसचा पाडाव झाला त्याचे प्रमुख श्रेय 'पुलं'बरोबर दुर्गाबाईंना द्यायला पाहिजे.

 वेगवेगळ्या संस्था दुर्गाबाईंना निमंत्रण देऊन त्यांचे भाषण घडवून आणण्यासाठी उत्सुक होत्या. अडचण एवढीच, की बाईंच्या भाषणाचा विषय जाहीर करताना अगदी अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारच्या राजकीय संदर्भाचा उल्लेख करण्याची कोणाची हिंमत होत नसे. दुर्गाबाईंचे भाषण आणि विषय 'आणीबाणी' किंवा 'सध्याची राजकीय परिस्थिती' असे प्रसिद्ध झाले, की भाषणाच्या आधीच नियोजकांची उचलबांगडी तुरुंगात होण्याची निश्चिंती. मग, नियोजक, बाईंच्या भाषणाचा विषय, दुरान्वयानेही राजकारणाशी सबंध लागणार नाही अशा पद्धतीने देत. बाईंना विचारीत, "तुमच्या भाषणाचा विषय 'असा असा' लिहिला तर चालेल ?" बाईंचे उत्तर सर्वदूर मशहूर झाले. "तुम्ही विषय कोणताही द्या, मी आणीबाणीवरच बोलणार आहे."

 दुर्गाबाई, दुर्दैवाने, महाराष्ट्रातील समाजवाद्यांच्या दलदलीत अडकल्या. कारुण्यभावनेने प्रत्येक माणसाला जगण्याची आणि व्यक्तिविकासाची संपूर्ण संधी मिळाली पाहिजे एवढ्या मूलभूत भावनेतून 'कसणाऱ्याची धरणी आणि श्रमणाऱ्याची गिरणी' यापलीकडे जाऊन राष्ट्रीयीकरण, शहरीकरण, औद्योगिकीकरण अशा अमानुष कार्यक्रमांपर्यंत समाजवादी पोहोचले आणि दुर्गाबाईंची मोठी घुसमट झाली. 'पुलं'प्रमाणे त्यांनीही आणीबाणीच्या काळात मिळालेल्या तेजोवलयाचा आणि लोकप्रियतेचा हव्यास ठेवला नाही; सरळ मोकळ्या होऊन त्या आपल्या व्यासंगाच्या विषयाकडे वळल्या आणि शेवटपर्यंत कर्मयोग भावनेने ते काम करीत राहिल्या.

 बाई गेल्या, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातूनच कळाले. त्यांच्या अंत्यविधीला जाणेही शक्य झाले नाही. नामदेव ढसाळ आदी दोनचार माणसे हजर होती असे कळले. पण, आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द बाळगणाऱ्या हजारो लोकांच्या मनात एका इंग्लिश कवीच्या 'To ramparts we carry and not a horn was blown' या ओळीत म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनाच्या आदर्श बनलेल्या सेनापतीला मूठमाती देत

असल्यासारखे ऊर दाटून आला.

 दुर्गाबाई समाजवादाच्या दुष्टचक्रात अडकून गेल्या.६ मे रोजी निधन पावलेले मनोहर आपटे यांनी हा धोका ओळखून या दुष्टचक्राकडे चुकून पाहिलेही नाही.

 पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू म्हणून मनोहरपंत प्रसिद्ध आहेत. यापलीकडे त्यांची कोणाला फारशी आठवण राहील अशी चिन्हे दिसत नाहीत. मनोहर आपटे हे माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या लोकविलक्षण अशा पाचसहा व्यक्तिमत्त्वापैकी एक. सरकारी मान्यतेची अपेक्षा न बाळगणारे एक विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मला फार फार पूर्वी बोलून दाखविली होती. लोकविलक्षण कल्पना मांडण्यात मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही; पण, मलाही, नोकरीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांचे छापखाने झालेली विद्यापीठे सरकारी मान्यतेखेरीज उभी राहू शकतील हे पटेना. समाजवाद संपला, सरकारशाही संपली म्हणजे शिक्षणक्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप संपेल, बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्था उभी राहील आणि बनावट प्रमाणपत्रांवर आपल्या पित्त्यांची नोकरभरती करणे शक्य राहणार नाही; अशी नोकरदारांची भरती केली तर मालकाचा व्यवसाय खड्डयात जाईल हे सगळे मीही मानीत होतो.

 खुलेपणाच्या विचाराचा प्रचार मी शेतकरी संघटनेमार्फत करीत राहिलो. स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून केला; पण खुल्या व्यवस्थेतील शासननिरपेक्ष संस्था उभी करणे आणि चालवून दाखविणे मला जमले नाही.

 ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या प्रकल्पाबद्दल मी शंका व्यक्त केल्यानंतर वर्षभरातच आपटे भेटले आणि विद्यापीठ चालू झाल्याचे त्यांनी सांगितले. जागेची अडचण पुण्याच्या विधी महाविद्यालयातील वापरात न राहिलेली जागा उपयोगात आणून सोडविली. अध्यापकवर्ग मिळविला. प्रयोगशाळा, कार्यशाळा यांच्या सोयी परिचितांतील उद्योजकांच्या चालत्याबोलत्या संस्थांत केल्या. ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर विद्यार्थ्यांना पुण्यातील उद्योजकांनी अहमहमिकेने नोकरीस लावून घेतले. शासननिरपेक्ष विद्यापीठाचा प्रयोग कला, वाणिज्य, विज्ञान या क्षेत्रात तुलनेने फारसा दुष्कर नाही. अभियांत्रिकी क्षेत्रात तो आपट्यांनी यशस्वी करून दाखविला; पण वैद्यकीय क्षेत्राचे काय? आपट्यांच्या योजनेला येथे विरोध फक्त सरकारचाच नाही तर वैद्यकीय संस्थांचाही. आपट्यांवरील विश्वासाने विद्यार्थी आले. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेश्वर विद्यपीठाचा वैद्यकीय अभ्यासक्रम चालविण्याचा हक्कही मानला. उन्हाळी सुट्या चालू झाल्या, की पुण्याच्या आसपास वसलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मी मध्यस्थी करावी म्हणून

गळ घालणाऱ्यांच मोठी झुंबड उडते. आपट्यांना 'याची देही याची डोळां' ज्ञानेश्वर विद्यापीठांत प्रवेश मिळावा यासाठी झुंबड उडालेली पहायला मिळाली; कृतकृत्य वाटले.

 आपटे हा माणूसच मोठा अफलातून. ही असली विक्षिप्त माणसे पुण्याच्या आसपास खूप पिकतात; जातिवाचक उल्लेख करायचा तर चित्पावनांत.

 अगदी तरुण वयात वडीलबंधू नारायण आपटे यांच्या, गांधी खुनाच्या कटातील भूमिकेमुळे साऱ्या घरावर एक सावट आलेले; पण विद्यार्थी मनोहरने आपल्या बुद्धीच्या तल्लखपणाने अभियांत्रिकीच्या एका विशेष क्षेत्रात प्रावीण्य मिळविले; एवढेच नाही तर, त्या क्षेत्रात एक अभिनव उद्योग प्रकल्प यशस्वी करून दाखविला.

 लोकमान्य टिळक म्हणायचे, "कल्पना काय, पैशाची अफू घेतली, की पासरीभर कल्पना सुचतात." आपट्यांची कल्पकता लोकविलक्षण, पण अशा कल्पना जमिनीवर उतरवून दाखविण्याची त्यांची हातोटीही तितकीच लक्षणीय.  गेली पंचवीसतीस वर्षेतरी मी खुल्या व्यवस्थेचा विचारवंत म्हणून लोकांच्या डोळ्यासमोर आहे. प्रत्येक मनुष्यप्राणी अनन्यसाधारण आहे, विश्वातील गूढ सत्याचा शोध तो आपापल्या अनन्यसाधारण प्रयोगशाळेत करीत असतो. अंतिम सत्य कोणा परमेश्वरी अवताराला कळलेले नाही, प्रेषिताला कळलेले नाही. ते कळले असल्याचा दावा मांडणाऱ्या लोकाग्रणींनी मनुष्यजातीचे नुकसान केले. मनुष्यजातीची जी प्रगती झाली ती आपल्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याच्या अव्याहत खटाटोपात असणाऱ्या माणसांनी केली. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राखणे यापरता सत्यशोधनाचा आणि कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. आपले स्वातंत्र्य जोपासताना दुसऱ्याच्या पायावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याखेरीज स्वातंत्र्याच्या मूलतत्त्वाचा काहीही अपवाद नाही." अशी मांडणी मी करीत आहे. भस्मासुराप्रमाणे, सरकार ज्याला ज्याला स्पर्श करील त्याचा त्याचा विनाश घडवील या विचारावर मी शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केले. ग्रामीण स्त्रियांची मोठी आघाडी उभी केली. स्वतंत्रतावादाचा मी खंदा पुरस्कर्ता; पण आपटे भेटले म्हणजे आपली स्वतंत्रतेवरील निष्ठाही थोडी कच्ची तर नाही असा माझ्या मनात प्रश्न उभा राही. मी स्वतंत्रतेचा मूलतत्त्ववादी आहे, आपटे स्वतंत्रतेच्या विश्वासाने ओतप्रोत भरलेले.

 इतर कोणाशीही चर्चा करायची म्हणजे स्वतंत्रतेच्या मूलसिद्धांताचा काथ्याकूट कण्यातच 'घडाभर तेल' संपून जायचे. 'It is not the business of the government to do business' .आणि 'Power corrupts and absolute power corrupts

absolutely' या दोन उक्तींवर प्रखर विश्वास असल्यामुळे आमच्या दोघांच्या भेटीगाठीत चर्चा, विचारविनिमय व्हायचा तो स्वतंत्र व्यवस्था प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक बारकाव्यांचा.

 असल्या बारकाव्यांच्या बाबतीत आपटे 'वल्ली' म्हणावे इतके लोकविलक्षण होते. त्यांच्यासमोर एखादा प्रश्न मांडला, की खटकाही न दाबता एखादी लोकविलक्षण कल्पना ऐकायला मिळे.

 नैसर्गिक खतामुतांचा पुरवठा शेतीसाठी पुरेसा होत नाही, त्यामुळे बहुसंख्य जनता शौचासाठी बहिर्दिशेला जाणारी असूनही खताचा तुटवडा पडतो असे मी म्हटल्यावर आपट्यांची योजना दोन दिवसांत तयार. प्रत्येक बसच्या थांब्यावर आणि इतरत्र जागोजागी स्वच्छतागृहे उभी करावीत. प्रवेशशुल्क घेऊन त्यांचा उपयोग करू द्यावा; एकत्र झालेले खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे यासाठी त्यांची योजना तयार. 'सुलभ शौचालयां'नी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून दाखविली आहे.

 पूर्वी मी टपाल खात्यात प्रशासकीय सेवेत होतो. टपालाच्या हाताळणीच्या गणिती मांडणीचा मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त अभ्यासक आहे. भारतातील पिनकोड प्रणाली तयार करण्यात माझा महत्त्वाचा हातभार लागलेला होता. या विषयावर चर्चा चालू असतांना आपट्यांनी म्हटले, "या पिनकोडची इतकी माथेकूट कशाला? साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर अचूक अक्षांश आणि रेखांश दिला, की कोणत्याही माणसाचा नेमका पत्ता कळून जातो.' टपालव्यवस्था अक्षांशरेखांशांच्या पत्त्यावर करण्याची त्यांच्या बुद्धीची एक चमक.

 अशा योजनेतील अडचणी मी त्यांना समजावून सांगितल्या; पण मी मांडलेल्या अडचणींना गणकयंत्राच्या युगात काही महत्त्व नाही अशी त्यांची खात्री.

 गणकयंत्र हा आपट्यांचा खास आवडीचा विषय. विजय भटकर आणि सी-डॅकचे इतर तज्ज्ञ यांच्याबरोबर त्यांनी देशी भाषांच्या वापरासाठी अनेक सॉफ्टवेअर सिस्टम्स् उभ्या केल्या. नॅशलन इन्फरमॅटिक्स सेंटरचा माझा संबंध आला तो मनोहर आपट्यांच्या मध्यस्थीनेच.

 असल्या लोकविलक्षण प्रज्ञावंताच्या मनात स्वदेश, महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संत यांच्याबद्दल, अतिरेकी म्हणावा इतका जिव्हाळा होता. या कोणत्याच गोष्टीबद्दल मला फारशी कदर नाही. ज्ञानेश्वर विज्ञापीठाच्या पदविदान समारंभात पसायदान म्हटले जाते आणि त्यावेळी सर्व सभा उठून उभी राहते हे मला हास्यास्पद वाटते. मनोहरपंतांना

मी हे बोलूनही दाखवले होते. त्यांच्या बुद्धीच्या झेपेला कोणताच अडसर नव्हता; पण मराठी भाषा आणि ज्ञानेश्वर हे त्याला अपवाद. हे विषय निघाले, की एरवी प्रकांड कठोर तर्क आणि कर्मठ व्यवहार मांडणारे आपटे एकदम वेगळे दिसू लागत. त्यांचा चेहरा बदले, मोहरा बदले, भाषा तर पार पालटून जाई.

 आपटे हे एक अजब रसायन होते. ते पटकन निघून गेले. शेवटचे दर्शनही घेता आले नाही.

 अशी मनस्वी माणसे मला मनापासून आवडतात. मनाला भावलेल्या गोष्टींकरिता सर्वस्व उधळून टाकण्याचा बेदरकार धाडसीपणा फक्त तारुण्यातच येऊ शकतो. ज्या काळात तरुण माणसेही म्हातारी बनू लागली आहेत, त्या काळात मनोहरपंतांनी त्यांचा मनस्वीपणा जपला आणि आपल्या एका दिवटीने ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या कार्यकर्त्यांत एक दीपमाला तयार केली. त्यांच्या स्वतंत्रतेच्या आग्रहाने माझ्यासारख्या किती लोकांना मानसिक आधार मिळाला असेल याची गणती करणे कठीण आहे. मनोहरपंत गेले आणि माझ्यातीलच एक भाग मरून गेला असे वाटले.


 

(शेतकरी संघटक, २१ मे २००२)

■ ■