'भारता'साठी/स्वातंत्र्य म्हणजेच प्रगती

विकिस्रोत कडून


स्वातंत्र्य म्हणजेच प्रगती


 डॉक्टर ज्युलियन सायमन ८ फेब्रुवारी १९९८ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन पावले. गेल्या वर्षी ते हिंदुस्थानात आले होते. शेतकरी संघटनेच्या सहकार्याने देवळाली येथे भरलेल्या एका परिसंवादात त्यांनी भाग घेतला होता. त्याही वेळी त्यांचे नाव अर्थशास्त्रातील नोबल पारितोषकाचे उमेदवार म्हणून घेतले जात होते.
 डॉ सायमन आशावादी अर्थशास्त्री म्हणून ओळखले जात. या पृथ्वीवरील सर्वात निर्णायक साधनसंपत्ती माणूस ही आहे. माणूस प्रगतीच्या मार्गात येणारे सारे अडथळे दूर करतो, जमिनीची सुपिकता तसेच धातू, तेल इत्यादी खनिजे देण्याची क्षमता मर्यादित असेल पण, त्यामुळे माणसाची प्रगती थांबणार नाही; 'जगाचा अंत मनुष्यप्राण्याच्या लालसेपोटी येत आहे' असे शतकानुशकते धर्मवादी, पर्यावरणवादी कंठशोष करीत असले तरी प्रत्यक्षात माणसाची प्रगती प्रचंड वेगाने आणि वाढत्या गतीने होतच आहे. अशी डॉक्टरसाहेबांची मांडणी.
 ख्रिस्तपूर्व ८००० वर्षापासून ते इसवी सन १७५० सालापर्यंत माणसाचे जीवनमान २० वर्षांपासून फक्त २४ वर्षांपर्यंत वाढले. आणि, १७५० सालापासून जीवनाचा आलेख सरळच झेप घेतो आहे. या अडीचशे वर्षात ते ७० वर्षांपर्यंत वाढले.
 कच्चा मालाचा निसर्गातील साठा संपत जाईल आणि त्यामुळे खनिजेही माहगतील ही भीतीही खोटी ठरली आहे. बहुतेक सर्व धातूंच्या किंमती सतत उतरत आहेत. १८०१ सालच्या किंमतीच्या तुलनेने आज तांब्याची किंमत एक दशांशदेखील राहिलेली नाही. २०० वर्षापूर्वी एक टन तांबे विकत घेण्यासाठी साधारण माणसाला किती दिवस काम करावे लागे याची तुलना आजच्या परिस्थितीशी केली तर हे स्पष्ट होते.
 अन्नधान्याच्या बाबतीतही तसेच दिसते. भूकबळींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अन्नधान्याचा दरडोई उपभोग गेल्या ३० वर्षात झपाट्याने वाढत आहे. 'जमीन मर्यादित आहे, लोकसंख्या वाढत आहे, तेव्हा रोगराई आणि भूकबळी अपरिहार्य आहेत' हा सिद्धांत मांडला गेला होता. लोकसंख्यावाढीमुळे जीवनमान खाली तर येत नाही, उलट, लोकसंख्येबरोबरच आर्थिक प्रगतीचाही वेग वाढतो आहे.
 १७५० सालापर्यंत मनुष्यप्राण्याने जेवढी प्रगती केली तेवढी प्रगती त्याने त्यानंतरच्या शंभर वर्षांतच केली. तितकीच प्रगती करयला त्यानंतर त्याला पन्नास वर्ष पुरली. त्यानंतर, तेवढीच प्रगती करण्यास वीस वर्षे, दहा वर्षे, पाच वर्षे असा कमी कमी कालावधी लागतो आहे. आजकाल तर तेवढी प्रगती मनुष्यप्राणी वर्षाभरातच करतो आहे.
 हाँगकाँग आणि हिंदुस्थान हे डॉ. सायमन यांच्या विशेष कौतुकाचे विषय होते. १९५५ साली सायमन हाँगकाँगला गेले तेव्हा ते एक पसरलेले खेडे होते; हजारो लोक फूटपाथवर व छोट्या बोटींत रात्र काढीत. ही परिस्थिती पाहून सायमनना मोठे वाईट वाटले होते. लोकसंख्या कमी झाल्याखेरीज या लोकांना सुखाने जगता येणार नाही अशी त्यांची खात्री पटली होती. १९८३ साली ते हाँगकाँगला परत गेले त्यावेळी एक चमत्तारच घडलेला होता. लोकसंख्या कमी झालेली नव्हतीच, कित्येक पटींनी वाढली होती; आणि तरीही, व्यापार, उद्योगधंदे यांच्या वैभवाने हाँगकाँगची वसाहत दिमाखात उभी होती.
 हिंदुस्थानबद्दलही डॉ. सायमन कौतुकाने बोलतात. १९५४-५५ साली आंतरराष्ट्रीय संस्थांनी निष्कर्ष काढला. 'हिंदुस्थानातील धान्याचा तुटवडा आणि तेथील प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता तेथील भूकबळी थांबविणे अशक्य आहे. हिंदुस्थनवर वृथाश्रम आणि साधने घालविण्यापेक्षा त्याचा नादच सोडून द्यावा व तेवढ्याच प्रयासांनी बाकीचे सारे देश व्यवस्थित खाऊपिऊ शकतील त्या कामाकडे वळावे.' एका काळी हाताबाहेर गेलेली हिंदुस्थानची ही 'केस' आता अगदीच वेगळी दिसते. हिंदुस्थान अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे.
 १९८१ साली डॉ. सायमन यांनी 'निर्णायक साधनसंपत्ती (The Ultimate Resources) हे पुस्तक प्रसिद्ध केले आणि १९८६ साली मानवजातीची सद्य:स्थिती (The state of Humanity) हा अहवाल प्रसिद्ध केला. मोठे वादळ उठले.
 'लोकसंख्या गुणाकाराने वाढते, अन्नधान्याचा पुरवठा पावलापावलाने वाढतो, भूकबळी, रोगराई ही मानवाची नियतीच आहे' अशा अर्थाची माल्थसची भाकिते खोटी ठरली. त्याच्या काळी जमीन हीच सर्वांत मोठी साधनसंपत्ती होती. आता जमिनीपेक्षा भांडवल, भांडवलापेक्षा तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानापेक्षा माणूस हे जास्त महत्वाचे उत्पादनाचे घटक ठरले; त्यामुळे माल्थसचे अरिष्ट टळले हा विचार अनेक शास्त्रज्ञांनी पूर्वी मांडला आहे; पण डॉ. सायमन यांना हे स्पष्टीकरण मान्य नव्हते. भांडवल आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या वापरामुळे हे घडले असते तर प्रदूषण वाढत गेले असते. ते वाढते आहे अशीच बहुतेकांची समजूत आहे. १९६० ते १९९० या काळातील आकडेवारीने डॉ. सायमन यांनी असे दाखवून दिले आहे की, औद्योगिक प्रदूषणाची पातळी अमेरिकेत प्रत्यक्षात कमी कमी होते आहे. १९८० साली प्रख्यात जीवशास्त्री पॉल एअर्लिक आणि सायमन यांची गाठ पडली. एअर्लिकसाहेब लोकसंख्येच्या वाढीस आळा घालण्याचे मोठे पुरस्कर्ते. "लोकसंख्या कमी झाली नाही तर साधनसंपत्ती अपुरी पडेल, त्यांच्या किमती वाढतील." हे मत ते आग्रहाने प्रतिपादीत. दोघांची पैज लागली, हजार डॉलर्सची. १९९० सालापर्यंत क्रोमियम, तांबे, निकेल, टिन, टंग्स्टन या पाच धातूंच्या किमती पडताना दिसल्या तर एअर्लिक हरले म्हणायचे आणि किमती चढताना दिसल्या तर एअर्लिक जिंकले म्हणायचे. प्रत्यक्षात या दहा वर्षांत लोकसंख्या वाढली, तांब्याची मागणी वाढली; पण तांब्याचे उत्पादन अधिक कार्यक्षम झाले, अधिक स्वस्त पर्याय सापडले. एअर्लिक यांनी पैजेपोटी ५७६ डॉलर्स ७ सेंट दिले-चलनवृद्धी लक्षात घेऊन! पण त्या सोहबांचा अजूनही विश्वास आहे की, दीर्घ काळाचा अनुभव घेतला तर त्यांचेच म्हणणे खरे ठरेल.
 माणसाची सतत प्रगतीच होते, याला सायमन फक्त एक अपवाद करतात, "सर्वांत निर्णायक साधनसंपत्ती माणूस ही आहे. तो आपले मन, विचारशक्ती, प्रज्ञा, प्रतिभा वापरून परिस्थितीवर सतत मात करीत असतो. त्याला खरी गरज फक्त एकाच गोष्टीची प्रगती त्यांतील नागरिकांच्या स्वतंत्र्याशी सरळ जोडलेली आहे." साऱ्या पृथ्वीतलावर प्रगती झाली. फक्त राष्ट्र, धर्म, समाजवाद असल्या झेंड्याखाली जेथे जेथे हुकूमशाही लादली गेली, नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली तेथे मात्र प्रगतीचे चक्र मंदावले, थांबले आणि उलटही फिरू लागले, ख्रिस्तानंतरच्या १७५० वर्षांत प्रगती झाली नाही याचे कारणही हच. धर्मगुरू आणि सुलतानांनी सामान्य जनांना निव्वळ गुलाम बनवून टाकले होते त्यामुळे प्रगती थांबली. धर्माचा आणि राजसत्तेचा पगडा जसजसा कमी होत गेला तसतशी माणसाची प्रगती झाली, जीवनमान सुधारले. स्वातंत्र्य आणि प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 यंदाचे नोबल पारितोषक डॉ. सायमन यांना मिळो किंवा न मिळो, खुलीकरणाच्या नवीन युगाच्या पहाटेच अनेक वर्षे स्थिरावलेल्या अनेक बाष्कळ समजुती त्यांनी त्यांच्या दोनच पुस्तकांनी कचरापेटीत टाकल्या यात काही शंका नाही.

(२१ मार्च १९९८)

♦♦